मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ घडयाळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? घडयाळ… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

प्रत्येक घरात एक तरी असते हो घड्याळ 

थांबत नाही धावत राही रोज तिन्ही त्रिकाळ||

*

काय उद्देश असतो हो, फक्त दाखवायची वेळ?

मला तर वाटते प्रतीक हे तीन पिढ्यांचा मेळ

तीन काटे धावती सदा, सांगती वेळ तू पाळ

थांबत नाही धावत राही रोज तिन्ही त्रिकाळ||

*

प्रत्येकाची गती वेगळी एकक वेगळे आकारही वेगळे

३६० अंश फिरती पकडण्या एकमेकां टपले

संकटांचे १२ वाजवण्या वेगळे राहणे टाळ

थांबत नाही धावत राही रोज तिन्ही त्रिकाळ||

*

घड्याळाची तबकडी म्हणजे आपले घर

तीन काटे तीन पिढ्या असती त्यात हजर

असल्या तऱ्हा वेगळ्या तरी एकोप्याच्या टिकटिकीचे चाळ

थांबत नाही धावत राही रोज तिन्ही त्रिकाळ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आई… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

भूक लागता

पान्हा देई आई

वात्सल्याची मूर्ती 

जगात दुसरी नाही…

पिल्लांच्या आवाजाने 

धावत माऊली येई

प्रेमाने स्पर्षी पिलांना

कुशीत विसावा देई..

 

शब्दावाचून कळे

पिल्लांच्या मनीचे

छेडीता कुणी तया

संरक्षी पुर्ण सामर्थ्याने…

 

आई आईच असते

माझी तुमची सेम असते

शब्द नसले तरी

भावना मातृत्वाची असते…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २९५ ☆ तुझ्या साठीच… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २९५ ?

☆ तुझ्या साठीच… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

ही माझी अखेरची कविता…

असेल कदाचित,

मन उगाचच हळवं होतं,

आत्मपरीक्षण करत—

आठवत राहतंय,

भूतकाळ!

खूप रडू कोसळतंय,

स्वतःतून उगवल्या असंख्य कविता,

अगदी प्रामाणिक होत्या त्या,

तुला कळल्याच नाहीत,

तू ,

आयुष्याचा अध्याय !

तुझ्याशिवाय—

अस्तित्वहीन मी,

हे मला तरी कुठं समजलं ?

आधे आधुरेच आहोत आपण,

एकमेकांशिवाय,

हे समजण्यात,

केवढा मोठा कालखंड पार केला…

आज हा फोटो पाहिल्यावर,

जाणवलं,

परतीच्या वाटेवर,

आपण दोघेही आहोत….

आणि ही माझी अखेरची कविता —

तुला न कळणारी….

माझ्या सारखीच!!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मन्मनीच्या गंधकोषा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “मन्मनीच्या गंधकोषा...” ☆ सौ राधिका भांडारकर 

 मन्मनीच्या गंधकोषा एकदा

स्पर्शून जा

उमलत्या पुष्प परागा हलकेच

चुंबून जा.. ।ध्रु।

*

तुजसाठी चांदण्यांचा साज

मी केला

शेला मृदू पाकळ्यांचा मंचकी

अंथरला

त्या गंधात रमण्या एकदा

येऊन जा

मन्मनीच्या गंध कोषा एकदा

स्पर्शून जा.. १

*

देह हा माझा एक कमळ

फुललेले

धुंद तुझ्या मिठीत शिरण्या

आसुसलेले

त्या रोमातल्या ठिणगीला

विझवून जा

मन्मनीच्या गंधकोषा एकदा

स्पर्शून जा …

*

सांगू कसे तुला मी भाव

स्पंदनातले

दावू कसे मोती ते अंतरीच्या

 शिंपल्यातले

दवबिंदूत रे भ्रमरा एकदा

भिजून जा

मन्मनीच्या गंध कोषा एकदा

स्पर्शून जा …

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांना संगीताचं सखोल ज्ञान होतं. ते स्वत: लिहिलेल्या गीतांना स्वत: संगीतबद्ध करत. अशी दोन हजारहून अधिक वैशिष्ट्यपूर्ण गाणी रविंद्र संगीतया नावाने भारतात व भारताबाहेरही प्रसिद्ध आहेत व गायली जातात. टागोरांनी सहा नवीन तालांची निर्मिती देखिल केली आहे. कदाचित म्हणूनच गीतांजलीत वारंवार गायन, वादनाचे उल्लेख आढळतात.

————-

गीत : ४

Life of my life, I shall ever try to keep my body pure, knowing that thy living touch is upon all my limbs.

I shall ever try to keep all untruths out from my thoughts, knowing that thou art that truth which has kindled the light of reason in my mind.

I shall ever try to drive all evils away from my heart and keep my love in flower, knowing that thou hast thy seat in the inmost shrine of my heart.

And it shall be my endeavour to reveal thee in my actions, knowing it is thy power gives me strength to act.

———

 मराठी भावानुवाद : गीत : ४

*

माझ्या जीवनी तूच वससि

प्राण रूपे अससि विधाता

*

मनुष्य जीवन तुझी देणगी

जपून ठेवीन त्याची शुचिता

अंतर माझे प्रकाशित करी

तुझे रूप, अंतीम सत्यता

*

मनात माझ्या पाप नसे

अभद्र विचारा वाव नसे

हृदयमंदिरी वास तुझा रे

अमंगलाला स्थान नसे

*

तूच प्रेरणा मम कार्याची

कृतीत माझ्या तुझा भास हो

आश्वासित तुज प्राणपणाने

सत्कर्माची मला आस हो

*

भावानुवाद : कवयित्री : ©️मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—— 

गीत : ५

I ask for a moment’s indulgence to sit by thy side. The works that I have in hand I will finish afterwards.

Away from the site of thy face my heart knows no rest nor respite, and my work becomes an endless toil in a shoreless sea of toil.

To-day the summer has come at my window with its sighs and murmurs;and the bees are plying their minstrelsy at the court of the flowering grove.

Now it is time to sit quiet, face to face with thee, and to sing dedication of life in this silent and overflowing leisure.

————-

मराठी भावानुवाद : गीत ५

*

ऐहिक काजामधुनि फुरसत

क्षणभर विश्रांतीची ऐपत

देशील का मज हे रघुराया॥

*

बसेन तुझिया समीप म्हणतो

लाड मनाचे पुरविन म्हणतो

कधी देशी मज संधी सखया॥

*

पाहीन शुभ तव मुखमंडल

दर्शन लाभो तुझे सुमंगल

पूर्ण करीन मग विहित कार्या॥

*

संग तुझा मज कसा मिळेना

तुझ्यावरून मम दृष्टी हटेना

विसाव्याचे क्षण हेच माझिया॥

*

गवाक्षी माझ्या ग्रीष्म उसासे

मधमाशांची लगबग भासे

निवांत प्रहरी येशील का या॥

*

जीवनगाणे तुजला अर्पून

देईन मी कुडी ही समर्पून

दृष्टी तुजवर अंती सुखावया॥

*

भावानुवाद : कवयित्री : ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

 –—————————–

गीत : ६

Pluck this little flower and take it, delay not! I fear lest it droop and drop into the dust.

It may not find a place in thy garland, but honour it with a touch of pain from thy hand and pluck it while there is time.

——————

भावानुवाद: गीत : ६

*

फुले उमलती, सुगंध पसरती

गळुनि पडता, धुळीत मिळती

*

खुडुनि तयांना घेऊन जा तू

जीवन त्यांचे न व्यर्थ दवड तू

*

हारात असणे जर नसे प्राक्तनी

करूण स्पर्श दे वेदना जाणुनि

*

दिवस आजचा सरण्या आधी

वेळ पुजेची टळण्या आधी

*

खुडुनि तयांना प्रभुचरणांशी

वाहुनि जातील निर्माल्याशी

*

सार्थक होईल त्या फुलण्याचे

सार्थक होईल त्या जगण्याचे

*

रूप देखणे नसेल त्यांना

सुगंध मोहक नसेल त्यांना

*

खुडुनि आणी पूजेस्तव ती

जाण्यापूर्वी वेळ टळुनि ती

*

— क्रमशः भाग दुसरा

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३११ ☆ जाम लावा भाकरीला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३११ ?

☆ जाम लावा भाकरीला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सात जन्माचे बंधन आता पाळतोय कोण

घटस्फोट हे घेण्याचे किती वाढलेय लोण

*

सात फेऱ्यांचाही तिने नाही पाळला करार

सोने नाणे घेऊन ही वधू झालेली फरार

*

लग्नापूर्वीचे शूटिंग खर्च केला हा लाखात

लग्नानंतर हो नाही कुणी कुणाच्या धाकात

*

भरपूर वेळ आहे नाही दळण कांडण

कुत्र्या मांजरा सारखे होते घरात भांडण

*

सम वाटणी कामाची दोघे आहे नोकरीला

भाजी नाही केली सांगे जाम लावा भाकरीला

*

माय कामावर गेली पोर घरी रडवेला

दूध आया ही पाजते माझ्या छोट्या लेकराला

*

आहे आबादी आबाद चकाकतोय बंगला

नाही संस्कार राहिले आहे माणूस खंगला

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तोच चंद्रमा नभात… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ तोच चंद्रमा नभात… ☆ श्रीशैल चौगुले ☆

अंधार दाटून आला तरीही

एक उजेड प्रकाशून आहे

त्या दुरच्या नभात झळकता

आशेचा किरण ग्रासून आहे.

*

उगीच उदासीन मन भोळे

शंकेत भयाण त्रासून आहे

अंतरी स्मृतींचे चांदणे सारे

ध्येयात दुःखास प्राशून आहे.

*

धुके धुसर नजरेत गर्द

नाट्याचे रंगास फासून आहे

काळिज बोलके, विश्वास चंद्र

डोळ्यात शृंगार नेसून आहे.

*

वाटते जगावे प्रेमात त्याच

पौर्णिमा तीच तरसून आहे

एकांत मिठीतला स्पर्श पुन्हा

प्रीत काजवे बरसून आहे.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || जाब विचाराया नाही आलो… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || जाब विचाराया नाही आलो… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

काय विठ्ठला,

पंढरी तुझी भक्तांनी सजली!

ओल्या डोळ्यांनी आलो,

पावसाने भाकरी माझी भिजली!

*

शेतात कष्ट करून,

जगाला म्हणे आम्ही पोसतो!

नुकसान झालया,

नशिबाचा फेरा नेहमीच सोसतो!

*

आषाढीला आलो होतो,

मागितलं चांगल पीक पाणी!

आभाळच कोसळलं,

आम्हा उरला ना वाली कोणी!

*

कसली दिवाळी- दसरा,

चिंधी नाही घेतली लेकराबाळा!

फाटकंच लुगडं नेसलं तिनं

कारभारीण हात लावी कपाळा!

*

गोडधोड केल नाही लेकराना,

दोन वेळ अन्नाची उरली भ्रांत!

देवा रडगाणंच म्हण माझे,

कसा राहू मी आता तरी शांत!

*

जाब विचाराया नाही आलो,

पंढरीनाथा तुझ्या दारात!

माऊलीच तू माझी,

घे दुःख लेकराच पदरात!

*

बळ दे झुंजायला,

साकडं घालतो आता!

परीक्षा नको घेऊ,

चरणी टेकतो माथा!

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंदाज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ अंदाज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

 मातीत तू स्वतःला पेरून रोज घ्यावे

जपण्यास माणसाला उगवून रोप व्हावे

*

दाता निसर्ग आहे माणूस पोसणारा

देतो उदार हस्ते त्याच्या पुढे झुकावे

*

ज्याच्या मुळे मनाला मिळतो खरा दिलासा

आहेच देव तेथे जाणून हेच घ्यावे

*

पाऊस ऊन वारा उपकार थोर त्यांचे

हे देवदूत सारे त्यानाच तू स्मरावे

*

सांगून संत गेले सर्वत्र देव आहे

जे जे जिवंत त्याला देवत्व देत जावे

*

टाळून अंधश्रद्धा कर्तृत्व दाखवावे

कर्मा सवे श्रमाला कार्यात गुंतवावे

*

जे वाटते मनाला बोलून व्यक्त व्हावे

प्रेमात गुंतताना मन मोकळे असावे

*

निरखून वास्तवाला जगण्यात मोज आहे

अंदाज बांधताना ते नेमके असावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ एकावर एक फ्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकावर एक फ्री…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..

जर आपण ‘राग’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘ॲसिडिटी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘ईर्ष्या’ विकत घेतली,

तर आपल्याला ‘डोकेदुखी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘द्वेष’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘अल्सर’ फुकट मिळतो.

*

जर आपण ‘ताणतणाव’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘रक्तदाब (BP)’ फुकट मिळतो.

जर आपण ‘विश्वास’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘मैत्री’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘व्यायाम’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘निरोगी आयुष्य’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘शांती’ विकत घेतली,

तर आपल्याला ‘समृद्धी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘प्रामाणिकपणा’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘झोप’ फुकट मिळते.

*

आता हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की,

आपण काय विकत घेतलं पाहिजे…

ते आपणचं ठरवायचं आहे.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares