कविता म्हणजे भावनांच्या आकाशात उमटलेला शब्दांचा चंद्र…
ती कधी मनाच्या वेदनांना स्पर्श करते तर कधी आनंदाच्या क्षणांना सुंदर रंग देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हे केवळ शीर्षक नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक हळवा प्रवास आहे.
कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते ती मनाच्या भावनांना मिळालेली सुंदर अभिव्यक्ती असते.. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे बोलून व्यक्त करता येत नाहीत तेव्हा कविता आपल्या भावना अलगद शब्दांत उतरवते. “कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन मनांमधील नात्याची भावनांची आणि आठवणींची एक सुंदर सांगड होय.
तुझ्या कवितेत प्रेमाची कोवळी चाहूल असते… तुझ्या प्रत्येक ओळीत स्वप्नांचे मोर नाचत असतात… तुझे शब्द जसे मंद वाऱ्याच्या झुळुकीसारखे मनाला स्पर्शून जातात तसेच माझ्या कवितेत आयुष्याच्या अनुभवांचे गहिरे रंग असतात. माझ्या शब्दांत कधी संघर्षाची कहाणी असते तर कधी आठवणींच्या पावसात भिजलेले क्षण… या दोन्ही कविता जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्या जीवनाचे सुंदर गीत बनून जातात… तसेच
तुझ्या कवितेत प्रेमाचा गोडवा असतो तर माझ्या कवितेत आयुष्याचे अनुभव. तुझ्या ओळींमध्ये स्वप्नांची रंगीत दुनिया असते तर माझ्या शब्दांत वास्तवाची जाणीव… पण या दोन्ही कविता एकत्र येतात तेव्हा त्या जीवनाचा अर्थ अधिक सुंदर करून जातात.
कविता ही माणसाच्या मनाचा आरसा असते. मनात दडलेले भाव न सांगितलेली दुःखे, अपूर्ण स्वप्ने आणि निरागस आनंद हे सर्व कविता सहज व्यक्त करते. कधी एखादी कविता डोळ्यांत अश्रू आणते तर कधी तीच कविता जगण्याची नवी प्रेरणा देते म्हणूनच कविता ही केवळ साहित्य नसून ती आत्म्याची भाषा आहे.
कविता माणसाला संवेदनशील बनवते. आनंद, दुःख, विरह, मैत्री, निसर्ग, प्रेम अशा अनेक भावनांना कविता सहज व्यक्त करते… म्हणूनच कविता ही प्रत्येकाच्या जीवनातील एक जिवलग मैत्रीण आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात कविता माणसाला थोडा वेळ स्वतःकडे पाहायला शिकवते. ती मनाला शांतता देते आणि विचारांना नवी दिशा देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हा केवळ शब्दांचा प्रवास नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक सुंदर पूल आहे..
तुझ्या आणि माझ्या कवितेत फरक असला तरी त्यांचा उद्देश एकच असतो मनाला स्पर्श करणे. तुझ्या ओळींमध्ये चांदण्यांची कोमलता आहे तर माझ्या शब्दांत सूर्यकिरणांची ताकद…
तुझी कविता स्वप्न दाखवते आणि माझी कविता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडते. या दोन भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून जीवनाचा खरा अर्थ उमलतो.
आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या जीवनात कविता माणसाला स्वतःशी बोलायला शिकवते. ती मनाला शांतता देते.. विचारांना दिशा देते आणि भावनांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते. कविता माणसाला अधिक संवेदनशील, अधिक जिवंत बनवते… कविता ही मनाची भाषा आहे… ती जितकी तुझी आहे तितकीच माझीही… कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी कविता असते जी त्याच्या मनात कायम जिवंत राहते.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,
“कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन हृदयांची अव्यक्त कहाणी…
☆ काय फरक पडतो?? … मूळ हिन्दी कविता : हेमन्त बावनकर ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अमेरिका – इस्राईल – इराण यांच्यामध्ये सुरु झालेल्या आणि जगभर खळबळ आणि अशांतता माजविणाऱ्या तीव्र संघर्षाचे खेदजनक आणि वेदनादायक पडसाद जगभर वेगवेगळ्या प्रकारे उमटले .. उमटत आहेत.. उमटत राहणार आहेत. या युद्धातला सर्वात जास्त उद्विग्न करणारा हाहा:कार म्हणजे दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नराधमांकडून केली गेलेली अत्यंत हीन कारवाई ….. दक्षिण इराणमधल्या ‘मिनाब’ मध्ये मुलींच्या प्राथमिक शाळेवर केला गेलेला मिसाईल हल्ला. या हल्ल्यात शंभराहूनही जास्त व्यक्ती मारल्या गेल्या …. ज्यात बहुतांश व्यक्ती म्हणजे या शाळेतल्या लहान लहान मुली होत्या .. ‘ व्यक्ती’ म्हणून अजून पुरेशा उमललेल्याही नाहीत अशा मुग्ध कळ्या ..
…. ज्यांची मने दगडाचीच आहेत त्या निर्घृणांना या घटनेमुळे दु:खच काय .. साधा खेदही वाटला नसेल. पण अतिशय संवेदनशील मन असणारे हिंदी कवी श्री. हेमंत बावनकर यांच्या मनात या प्रसंगामुळे माजलेली खळबळ आणि उद्विग्नता मात्र शब्दरूप घेऊन व्यक्त झाली आणि ‘क्या फर्क पड़ता है?’ या अगदी चपखल शीर्षकाची त्यांची मुक्तछंदातली कविता कागदावर उतरली. त्यांनी अनुभवलेला सृजनाचा हा अतिशय हळवा क्षण या कवितेतून थेट हृदयाला भिडला आणि या काव्याचा स्वैर अनुवाद केल्यावाचून रहावलेच नाही …..
☆ काय फरक पडतो ? ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अजिबात आवाज नको हं ..
शांतता .. एकदम शांतता ..
इथे गाढ झोपल्यात लहान लहान मुली .. शंभराहून जास्त ..
हो खरंच .. शंभराहून जास्त
शिकायला चाललेल्या ..
चालल्या तर होत्या .. पण परत येऊ शकल्याच नाहीत ..
झोपवून टाकलं गेलं त्यांना .. त्या लहान लहान कबरींमध्ये ..
एका भयानक दफनभूमीमध्ये ..
– – पण .. पण यामुळे जगातल्या बाकीच्या तशाच लहान लहान मुलींना ..
त्यांच्या नातेवाईकांना .. आणि .. आणि ..
माणूस म्हणण्याच्या लायकीच्याच नसलेल्या माणसांना ..
काय फरक पडतो ???
..
त्या निष्पाप लहान मुलींना तर हेही माहिती नव्हतं की ..
देश म्हणजे नक्की काय असतं ?
देशाची सीमा काय असते ? ..
धर्म .. पंथ म्हणजे तरी काय ?
वंश म्हणजे नेमकं काय असतं ? .. यातलं काही काही माहिती नव्हतं ..
मित्र देश आणि शत्रू देश म्हणजे नेमके कोण ?
.. आणि ते कसं ठरवतात
.. हे कुठे ठाऊक होतं ?
.. .. त्यांना तर एवढंच समजत होतं की ..
सूर्य एकच असतो ..
चंद्रही एकच असतो ..
आणि ही जमीन सगळ्यांचीच असते.
त्यांचं सगळं विश्व घरापासून सुरू होतं आणि शाळेपर्यंत संपतं सुद्धा..
खायचं-प्यायचं, अभ्यास करायचा आणि आई-वडलांच्या कुशीत स्वतःला विसरून जायचं .. बस् .. ..
– – पण ज्याने कुणी त्यांच्या शाळेला लक्ष्य करून मिसाईल टाकलं ..
.. .. त्यांना या निरागस वास्तवामुळे काय फरक पडतो ???
आपल्याला तर आता सवयच झालीये ..
टि.व्ही. वर लढाया बघायची ..
व्हिडिओ गेम्स बघतो तितक्याच सहजपणे बघायची …
विनाशाच्या या खेळात आता आम्हाला दिसतच नाहीत ..
.. .. पार विध्वंस होत असलेल्या शाळा आणि रुग्णालयं ..
.. शहरं .. तिथल्या दिमाखदार इमारती ..
.. विध्वंस झालेल्या शहरांखाली दडलेली
.. गुदमरणारी शांत- स्वस्थ आयुष्यं …
.. उध्वस्त झालेल्या सुंदर बागा .. .. आता ..
.. आता लहान मुलं , स्त्री-पुरुष ,वृद्ध माणसं
.. सगळेच कसं का जगेनात नाहीतर मरेनात …
.. .. कुणाला काय फरक पडतो ???
शिकण्यासारखं तर खूप काही होतं आपल्याला …
पण काय शिकलो आपण …
– – शासक निरंकुश सत्ताधारी झाले त्यापासून ?
– – नागासाकीत अणुबॉम्बचा विस्फोट केला गेला त्यापासून ?
– – छळछावण्यांकडून ? गॅस चेम्बर्सकडून ? थेट मृत्यूच्या जबड्यात टाकणाऱ्या त्या विनाशक गॅसकडून ?
– – आतंकवादाच्या भयानक सावटाकडून ..
– – जहाल विषारी असणाऱ्या धर्मान्धतेकडून ..
– – सततची युद्ध आणि प्रचंड नरसंहाराकडून … ???
.. .. .. आणि आता हताश झालेल्या त्या शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेचीच जरी हिंसा झाली
.. शान्तिदूत जन्माला येण्याची शक्यताच जरी मावळली .. तरी ..