श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘साद-प्रतिसाद-दाद!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
कोणी साद घातली तर प्रतिसाद द्यायला हवा. कुणी प्रतिसाद दिला तर आभार मानायला विसरू नये. याला संवाद म्हणता येईल. सुसंवादासाठी साद-प्रतिसाद-दाद-धन्यवाद यामधे सातत्य असावे.
एखाद्याच्या कलाप्रदर्शनाला रसिकांनी -दर्शक, प्रेक्षक, श्रोत्यांनी -दाद देणे फार महत्त्वाचे असते. कलानिर्मितीमागे कलाप्रदर्शन अंतर्भूत आहेच. ‘कलेसाठी कला’, ‘स्वान्तसुखाय कला’ हे म्हणणे सत्य नाही. कलाविष्कारासाठी कलाकार आणि कलाकृतीचा रसस्वाद घ्यायला रसिक हवेतच. रसिकांखेरीज कला व कलाकृती अपूर्ण आहेत. म्हणून कलाकाराला व त्याच्या कलाकृतीला रसिकांचा रसरशीत प्रतिसाद आवश्यक आहे. कोणत्याही कलाप्रदर्शनाला भरभरून दाद द्यायला हवी. दाद देणे हे जिवंतपणाचे, जिंदादिलीचे लक्षण आहे! कलाकार अशा जिंदादिल रसिकासाठी हापापलेला असतो मित्रहो.
जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याची एखादी गोष्ट आवडेल, त्या त्या क्षणी तात्काळ त्या माणसाला लगेच सांगा. व्यक्त व्हा, त्याचे कौतुक करा, त्याला दाद द्या. अशी दाद कधी शब्दाने, कधी कटाक्षाने, कधी स्पर्शाने तर कधी एखाद्या स्मिताने देता येते.
एखादी कविता, तुम्हाला आवडलेले एखादे चित्र, एखाद्या फुलाचा वास, बायकोची नवी साडी, एखादी रंगलेली मैफिल, एखाद्याचा फोटो, पहिल्या पावसाचा गंध, नव्या पुस्तकाचा वास, ओली भेळ, कांदा भज्यांचा किंवा बटाटेवड्याच्या तळण्याचा रसना चाळवणारा खमंग वास इ. इ. इ. जे जे आवडेल त्याला मोकळेपणे दाद द्या.
आपण दररोज किती तरी गोष्टी करत असतो. कितीतरी घटना, व्यक्ति पहात असतो, अनुभवत असतो. कधी त्या गोष्टी आपल्याला आवडतात, भावतात, आनंद देतात. पण त्याविषयी आपण सहसा कोणाला काही सांगतच नाही. मी काय म्हणतो, एकदा संबंधिताला सांगून तर पहा. त्याचं कौतुक करून तर पहा. आहो, याने त्याला आनंदच होईल आणि तुम्हालाही.
मला सवय आहे. माझी बायको खरेच सुगरण आहे. तिने केलेली प्रत्येक पाककृती रुचकर असते. (हे दांभिकपणे नाही, मनापासून सांगतोय बरं का! ). तिने सिद्ध केलेल्या रोजच्या पोळी-भाजीचा पहिला घास घेताना ती माझ्याकडे अपेक्षेने पहाते. मुखी तो प्रथम सुग्रास पडताच जेव्हा मी तिला म्हणतो, ” वा! क्या बात है! ” तेव्हा ते ऐकून ती सुखावते, हसते आणि मग स्वतः जेवायला वाढून घेते. खूप समाधान दिसते तिच्या मुद्रेवर. जरा अलंकारिक पद्धतीने सांगायचे झाल्यास मी म्हणेन, अशा वेळी जर स्वतः साक्षात् समर्थांनी विचारले, “जगी सर्व सुखी असा कोण आहे रे? ” तर मी नक्कीच हात आणि हातातला सुग्रास वर करून म्हणेन “मी”!
कधी कधी कलाकार एवढा मोठा असतो की त्याला आपण दाद देणे म्हणजे सूर्याला कंदिल दाखवण्यासारखे असते. म्हणून आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण हे योग्य नाही. कलाकार मोठा असला तरी तुम्ही दाद द्या. कलाकार तिच्या प्रतिक्षेत असतो. दाद न देणे म्हणजे कलाकाराच्या कलेची प्रतारणा आहे.
आपण एखादी सुंदर कविता किंवा लेख वाचतो, तो आपल्याला आवडतोही पण आपण ते कवीला किंवा लेखकाला सांगत नाही, सांगायचे विसरून जातो किंवा टाळतो. एखादे गीत काळजाचा ठाव घेते पण त्याला साधी दाद न देण्याने आपण आपल्या कृपणतेचेच प्रदर्शन करतो.
मी अनुभवाने सांगतो, कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला दाद हवीहवीशी वाटते. अगदी लतादिदी, आशाताई, माधुरी दीक्षित, रेखा, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, प्रभा अत्रे इ. सारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या या व अशा अर्थाच्या भावना प्रकट मंचांवरूनही व्यक्त केल्या आहेत अनेकवेळा.
शेरोशायरी, गझल यात दोन वाक्यांचा एक शेर असतो. हा त्या काव्यप्रकाराचा आकृतिबंध आहे. दोन ओळीनंतर शेर, गझल आवडली तर दाद द्यायची असते हे सांगावे लागते यासारखे दुर्दैव नाही. शायरी, गझल ऐकताना लोक निर्विकार चेहऱ्यांनी बसलेले असतात हे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटते. लोकांच्या रुक्षतेचे वाईट वाटते. प्रसिद्ध शायर अँड. भाऊसाहेब पाटणकर तर आपल्या मैफिलीच्या आरंभीच श्रोत्यांना म्हणायचे,
दोस्तहो, मैफील आपुली रंगण्या जर का हवी
आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी।
ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा
ती ही अशी, ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा! ।।
पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे पूर्वी एकत्र गायनाचे कार्यक्रम करायचे. त्यात बऱ्याच वेळा पुल गायचे आणि वसंतराव तबल्याची साथ करायचे.
ते दोघे एके ठिकाणी मैफिल करण्यासाठी, गाणे सादर करण्यासाठी गेले होते. चांगली उच्चभ्रू, धनिक, श्रीमंत श्रोतेमंडळी मैफिल ऐकायला जमली होती. या मैफिलीत वसंतराव गाणार होते.
मैफल सुरू झाली. दहा-पंधरा मिनिटे झाली तरी वसंतरावांच्या एकही आलापीला, तानेला, समेवर येण्याला श्रोत्यांकडून ना दाद ना प्रतिक्रिया ना टाळी. सगळी मंडळी मठ्ठपणे, पुतळ्यासारखी बसून होती. असा प्रतिसादशून्य श्रोतागण समोर आहे हे लक्षात येताच वसंतरावांनी पुलं कडे पाहिले आणि हळूच म्हटले, ” पी एल आज रियाजच करून घेऊ. मनसोक्त.”
एवढ्यात अगदी मागच्या कोपऱ्यातून, “वाह, बहुत खूब, बहुत अच्छे! ” अशी सणसणीत दाद आली. पुलंनी दाद देणाराकडे चमकून पाहिले तर काय, सकाळी त्यांना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता! पुलंना एवढा आनंद झाला, वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा तसा! त्यांनी त्या माणसाला सन्मानाने पुढे येऊन बसायला सांगितले. पुढची सारी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली कारण दिलखुलास दाद देणारा तो एकच रसिकराज मैफिलीत उपस्थित होता!
एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन द्या अन् बघा त्याचा चेहरा किती खुलतो ते. लहान मुलांना तर प्रोत्साहनाची खूप आवश्यकता असते. बालवयात यथोचित कौतुक झाले नाही, वेळीच दाद मिळाली नाही तर मुले हिरमुसली होतात. येवढेच नव्हे तर त्यांच्या मनात न्यूनदंड निर्माण होतो. त्या कळ्या अवेळीच सुकू लागतात. मुलांचेच काय मोठ्यांचेही असेच असते. प्रत्येकाला स्तुती प्रिय असते. ती माणसाची मानसिक गरज आहे.
वास्तविक आपल्या सगळ्यांनाच कौतुक, स्तुती, प्रिय वाटते. आपल्या कृतीवर इतरांनी दिलेली दाद हवीशी वाटते. त्याने आपण उत्साहित व प्रोत्साहित होतो. त्यातूनच अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. जसे आपल्याला वाटते तसेच इतरांना, विशेषतः कलाकारांना वाटत असते. दाद न मिळाल्यास कलावंत निरुत्साही होतो, व्यथित, निराश, उद्विग्न होतो.
प्रतिसादशून्य, अरसिकांविषयी संस्कृत कवी भवभूति काहिशी अशीच भावना पुढील श्लोकातून मांडतो….
इतरतापशतानि यदृच्छया
वितर तानि सहे चतुरानन l
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख।।
भावार्थ:-
इतर ताप शतानी खुषाल दे बा चतुरानना
परि, अरसिकास कवित्वनिवेदन नको लिहू भाळी, नको लिहू, नको लिहू!
म्हणून दुसऱ्याचं कौतुक करा, करायला शिका. दाद द्या, दाद द्यायला शिका.
कलावंत आपल्या कलाकृती सादर करून तुम्हाला साद घालीत असतात, ‘या आणि पहा माझा प्रतिभाविलास’. बेगम परविन सुलताना पुण्याच्या ‘सवाई गंधर्व संगित महोत्सवा’त गंगाधर महांबऱ्यांचे एक मराठी गीत अवश्य सादर करतात, ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते. ‘ हे गीत त्या गातात वाहवा करणाऱ्या जिंदादिल रसिकांसाठी!
मित्रहो, आपणही इतरांना उत्फूर्त प्रतिसाद द्या. ‘साद-प्रतिसाद-दाद’ हे आदान-प्रदान अखंड चालू ठेवा. त्याने आपले तसेच इतरांचेही जीवन समृद्ध होईल, आनंदमय होईल.
अखेर येवढीच विनंती की, जर आपल्याला हा लेख आवडला, यातले विचार पटले तर नक्की दाद द्या. मी वाट बघतोय आपल्या प्रतिसादाची.
🙏🏼🙏🏼🙏🏼
©️दिवाकर बुरसे, पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
🌼🌼
याच अभिप्रायाची आरती प्रभू यांची एक कविता आठवते…
ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन् शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा।।१।।
*
मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी।।२।।
*
दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट।।३।।
*
नम्र व्हा अन् सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा।।४।।
*
चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही।।६।।
*
ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा।।७।।
आरती प्रभू
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
















