मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृष्णस्पर्श ☆ सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? कवितेचा उत्सव ?

☆ कृष्णस्पर्श ☆ सुश्री नीलिमा खरे ☆

निळी सावळी कोमल कांती मनमोही मोहना

हृदयात आस कळावी मनास निर्मोही साधना

*

शिरी मयुराचे पीस लेवुनी मूर्ती दिसे गोजिरी

रेखियले परी रूप अंतरी निर्गुण प्रत्ययकारी

*

काळीज करते कायम केवळ तव कृपेचा धावा

हवाहवासा भास निरंतर आसपास माधवा

*

जळात नभात नितळ निर्मळ अथांग अंतरंग

सांज सकाळी चितारलेस तू सावळझावळ रंग

*

अती दयाळू तू कनवाळू केलीस कृपा अनंता

अधरीचा मंजुळ मुरलीरव निनादतो आसमंता

*

उदास गाभारा हृदयाचा समीपतेने उजळला

कर्माद्वारे मजला केशवा तू मोक्षमार्ग दाविला

*

बालपणीचा कृष्ण कन्हैया तुझ्या मनी माया

इहलोकी अवतार तुझा विश्वरूप दाखवाया

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाटील… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ पाटील… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

बारा वस्त्या

 ऐसपैस पांगलेले

 बारा बलुत्याचे गाव

 सूत्री एका ओवलेले

*

 गाव पाटलाचा वाडा

 उंच दूरच्या डोंगरी

 याच्या घारीच्या डोळ्यात

 गावासवे पंचक्रोशी

*

 सारा डोंगर चढून

 गाववारी येई दारी

 हीना दीना रावरंका

 न्याय, हक्काची पंढरी

*

 गावातील गल्ल्याबोळ

 घरे सारी उरावर

 साऱ्या गावची पालखी

 नित्य याच्या खांद्यावर

*

 दारी टांगलेली घंटा

 अपरात्रीही ठणाणे

 येता दारी आगंतुक

 कधी दूरचे पाहुणे

*

 लमाणांचे तंबू कधी

 चक्क याच्या अंगणात

 दाही दिशांची भ्रमंती

 घडे एकाच रात्रीत

*

 खाजगी न अश्रू आता

 खाजगी न खेद खंत

 याचा एकान्त विलीन

 गावच्याच लोकान्तात

*

 गाव रात्रीच्या कुशीत

 जागा पाटील अजून

 गावमाउलीच्या कंठी

 येई अंगाई दाटून

*

 हाडामांसाचा पाटील

 मूर्त एक दंतकथा

 सरलेले सारे द्वैत

 माथा पायथ्याचे आता!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ कॉफी, पाऊस आणि कविता… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ कॉफी, पाऊस आणि कविता ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

माझ्या आयुष्यात “काॅफी, पाऊस आणि कविता ” या तीन गोष्टी एकत्र आल्या आणि काही क्षण सुखाचे करून गेल्या..! तेच क्षण मी एकत्र करून कवितेच्या रुपात कागदावर मांडले…!

जितकी साधी जीवाला भावणारी कॉफी, जितका जिव्हाळयाचा पाऊस तितक्याच साध्या सरळ, भावणा-या माझ्या कविता…!

कुठल्या तरी वळणावर, कळत- नकळत, काही कारण नसतांना आड वाटेला थांबून एखादा कोवळा क्षण समोर यावा ना तश्या ह्या कविता त्या अनोळखी क्षणासारख्या समोर उभ्या राहिल्या आणि त्या क्षणांनी पहिल्या सरीच्या बेधुंद पावसात मनाला भिजवून टाकल्या…!

म्हणून म्हणावस वाटत की…!

पावसाने चिंब झाली

धरा मृद्गंगंधात भिजली

काॅफी, पाऊस आणि

कवितांची मैफिल

मनात रंगली

 

ओलेत्याने धरा सजली

गंध मातीचा दरवळला

कोंब फुटले कवितेला

ओठी कविता

हिरवी झाली

 

धन गहिवरता अलवार

आभाळ रिते झाले

ओल्या पाऊलखुणांवर बरसावे

वाटेवर चालताना

अर्थाला शब्द मिळावे

 

शब्दांच्या रानी यावे

मौनाच्या अंगणी

माझे शब्द झरावे

अबोल अव्यक्ताचे

सुरेल गाणे व्हावे…!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆”तो ‘मित्र’…” –  लेखिका : डॉ. ज्योती तोरसकर  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तो ‘मित्र’…” –  लेखिका : डॉ. ज्योती तोरसकर  ☆ सुश्री प्रभा हर्षे

 – – – मनाचे आश्रयस्थान, विसाव्याची जागा, ज्याच्या आधारावर अस्तित्व टेकवावे — तो ‘मित्र’.

मैत्रीच्या व्याख्या कराव्या तेवढ्या कमी. प्रत्येक मैत्रीचं स्वरूप निराळं, स्थान निराळं, गंध निराळा, अस्तित्व निराळं. त्या-त्या ठिकाणी, त्या-त्या वेळी सर्वोच्च स्थानावर असणारी ही मैत्री — अगदी अनादिकालापासून.

नाती तयार होण्याआधी, कुटुंबव्यवस्था आणि त्यातील काटेकोर बंधना पूर्वीही माणसाला एकमेकांविषयी जे काही वाटत असेल, ते नातं मैत्रीचं असणार… सहवासाच्या वेलीवर सहज फुलणार, सतत सोबत असणार, आपलंसं वाटणारं. कोणतीच बंधनं नसणार, पण अनेक भावनिक बंध असणार.

पुराणांपासून इतिहासातील अनेक कथांमध्ये, ग्रंथांमध्ये मैत्रीची सर्वोच्च उदाहरणं दिसतात. पण जेव्हा स्त्री आणि पुरुषाची मैत्री असते, तेव्हा मात्र भुवई थोडी तिरकी होतेच.

अशा या तिरक्या भुवयांना आणि डोळ्यांना वरील छायाचित्र किती बोलकं उत्तर देतं! मैत्री किती प्रगल्भ आणि एकमेकांना समृद्ध करणारी असू शकते, हे त्या भावनिक, प्रेमपूर्वक, उत्साहाने दिलेल्या आलिंगनातून उमगते.

हे आलिंगन दिले आहे पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी, आणि चार मानद डॉक्टरेटने अलंकृत झालेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सम्राज्ञी गंगूबाई हनगल यांनी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न मित्र उस्ताद बिस्मिल्ला खान यांना.

काय असेल या आलिंगनात? ..

मित्रा, तुझ्या पवित्र सुरांमुळे कजरी, चैती, पूरबीचं चैतन्य मी अनुभवले. तुझ्या संगीताचा साज माझ्या सुरांना मिळाला म्हणून आज ठुमरी रंगली. परिपूर्णतेचा अद्भुत क्षण, सख्या, फक्त तुझ्या साथीमुळे गांधारीला दिसला… तुझ्यासोबत.

 हे संगीताचं जग निराळं; इथले नियम धारदार.

सख्या, जगाला सुरांची किंमत होती, पण सनईची नव्हती.

घराबाहेर, वाड्याबाहेर वाजणारी ही सनई… तू शीर्षस्थानी नेऊन ठेवलीस. कन्हैरा रागाने तू धर्माच्या भिंती सुरांनी भेदू शकतात हे दाखवून दिलंस.

स्त्रीचं गाणं हे असंच — अनेक मर्यादांनी परंपरेने बांधलेलं. अशा वेळी सुरांच्या चौकटी विस्तारित करताना, प्रगल्भ करताना तू मला वेळोवेळी साथ दिलीस. कधी अबोलपणे, कधी सुरातून तू समर्थपणे पाठीशी उभा राहिलास…

स्वर्गीय सुरांच्या परिपूर्णतेचा अद्भुत क्षण, मित्रा, फक्त तुझ्या साथीमुळे!

म्हणूनच हे प्रेमपूर्वक, आदरयुक्त आलिंगन.

सखे, स्वरगंगे, अमृतगंगे,

गंगा तीरावरील माझ्या सुरांमध्ये तुझा स्वर मिसळल्याने

मी अधिक सकस आणि प्रगल्भ होत गेलो.

तुझ्या स्वरलयीचा साक्षात्कार मी अनुभवतो आहे.

सौजन्य मूर्ती असणारी तू — गाण्यातील स्त्रियांची बंधनं अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने झुगारून, हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचे नवे मापदंड तयार केलेस.

गंगालहरी गांधारी तू, सुरांची दिव्यदृष्टी दिलीस.

गंगेच्या पुत्राकडून तुला हे भावयुक्त, प्रेमपूर्वक आलिंगन!

खरंच, संगीताला नसतातच बंधनं — लिंगाचं, धर्माचं, भाषेचं, देशाचं! या सगळ्याच्या पलीकडे म्हणूनच, ही मैत्री आणि हे आलिंगन स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडचं.

मैत्री ही अशीच असते.

म्हणूनच ज्ञानी, पराक्रमी, सुंदर, प्रगल्भ असे पाच पुरुष सोबतीला असतानाही, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं,

ज्याचा हात हातात घेऊन राग-अपमान भडभडून सांगावसं वाटतं —पतिव्रता द्रौपदीला वाटतो तो सखा कृष्ण.

घरात भाईंसारखा, जगाला हसवणारा, बडबडणारा आनंदघन असतानाही, ज्याच्याशी मनातलं सारं हळुवार बोलावं असं सुनीताबाईंना वाटतं, ते म्हणजे जगापासून अलिप्त असणारे जी. ए. कुलकर्णी.

त्यांची पत्रं — हा एक काव्यात्मक अनुभव, मैत्री — संवेदनशील, चिंतनशील, मनोज्ञ! दोघांचे प्रतिभा आणि व्यासंग अफाट, म्हणूनच अशी मैत्री ही सामान्य परिप्रेक्षे पलीकडची.

मैत्री हे नातंच असं आहे —

अधिक नाजूक, अधिक तरल.

अत्यंत धूसर अशी सीमारेषा असणार,

म्हणून दोन्ही व्यक्ती तशाच हव्या —

तरच हे बहुपदरी, बहुरंगी नातं अधिक प्रगल्भ आणि सहवासाने अधिक पवित्र होत जातं.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखिका : डॉ. ज्योती बुवा तोरसकर 

(• राग कन्हैरा : कुंभमेळ्यात पं. बिस्मिल्ला यांनी सादर केलेला नवीन राग

  • गंगापुत्र : बिस्मिल्ला खा
  • गांधारी : गंगुबाईंचं नाव
  • गंगालहरी : गंगुबाईंनी स्थापन केलेले संगीत विद्यापीठ)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सांगा हे खोटे की खरे!! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सांगा हे खोटे की खरे!! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

ज्या पावलांनी आपण चालतो

ज्या पावलावर शरीर तोलतो

उठल्या उठल्या त्या पायावर

एकदा तरी मस्तक टेकवा

*

एकदा करणं जमलं की

रोज चार पाच वेळा टेकावे 

आपलेच मस्तक आपले चरण

भार वाहती म्हणून आभार हवे

*

वाचा आणि करून पहा

शरिरी येईल उत्साहाचे वारे

कंबर पोटाच स्थौल्य म्हणेल

आपण दूर गेलेलेच बरे..

*

सांगा हे खोटे की खरे!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “हे कान्हा” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “हे कान्हा” ☆ सुश्री शीला पतकी 

हे कान्हा तू जाऊ नको ना माझ्या दारावरूनी.

चाहूल तुझी मज सहज लागते

केवळ पायरवानी//

*

दारावरून तुझी सावली स्पर्शूनी ती मम जाते /

देह शहरत डोळ्यामधूनही अश्रुधार बरसते //

*

नाही दिसत मज तुझी छबी ती दर्शन ना मज होते /

नेत्रामध्ये तूच दिसतसे हृदयामध्ये तूच वसतसे तुझे विस्मरण ना होते//

*

तव देहाला स्पर्शून येती गंभयुक्त ते वारे /

उगा मनाला करीती आतुर ओढ लावती ना रे//

*

धावत भरभर मीही जाते नजर शोधत रहाते/

कुठे कान्हा असेल माझा मन हे बावरे होते//

*

कान्हा मज तू व्यापून गेला मनात तू जनात तू/

हृदयात असतो तुझाच वास श्वासामधला प्राणसखा तू //

*

क्षणभरचा ना विरह सोसतो

तुझ्या विना जीव व्याकुळ होतो//

*

तुझे नी माझे अद्वैत घडावे

तुझ्या मध्ये मी मला पहावे

प्रभु चरणी तव समर्पित मी

जीवन माझे सार्थक व्हावे//

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शून्य… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ शून्य… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

शून्य

शून्य इवलेसे

पुर्णत्वही देते

वाचे उच्चारीता

अपूर्णत्व वाटते…

*

यावे पुर्णत्व

व्हावे जीवन सार्थक

पूर्ण आणि शून्य

संज्ञा दोन अर्थ एक..

*

जीवनाच्या गणितात

शून्यचि हवे शेवटास

त्याशिवाय आहे का?

वाव नवनिर्मितीस…

*

रितं असेल

तरच भरेल

अमृतकुंभ

मानव तेव्हाच तरेल..

*

शून्यत्व हेचि पुर्णत्व

पुर्णत्व हेचि शून्यत्व

साधनेचे सोपान चढता

एकरूप होवू त्या वैश्विक शून्यात…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६१ – ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६१  – विजय साहित्य ?

☆ काळीज माया…!

(वृत्त‌हरिभगिनी)

कसा असावा, जोडिदार हा‌,

तुला सांगतो, ऐक जरा

श्वासाश्वासा, मधे पेरला

अनुभूतीचा बोल खरा.

*

समोर येता, शब्द साखरी

मागे त्याची, टवाळकी

असा नसावा, जोडीदार तो

बोलघेवड्या, कुचाळकी.

*

पारीजातक फुल फुलावे

दिठीत ज्याच्या परोपरी

असा  असावा, जोडीदार तो,

संकट येता दूर करी.

*

ओवी आणि शिवी जयाची

ओळख आहे मनांतरी

अशीच जोडी ,सौख्य देतसे

टिकून राही, जनांतरी.

*

ओळख झाली, जमली मैत्री

सहवासाची, ओढ मना

टिपून घेई,काळीज अपुले,

भाव मनीचा, असे कणा.

*

विश्वासाची, अमृत धारा

जोड असे ही, गुणकारी

कधी हासरी,कधी बोचरी,

मैत्री नाते, जपणारी.

*

असो अंतरी, प्रेम काळजी

दया करुणा, कीव नको

एका ताटी, जेवण खासे

मुखी गोडवा, सदा वसो.

*

जोडी असते, जोड मनाची

 खोड टाळ तू, दोषांची

रागा लोभा, वरती अपुल्या,

काळीज माया नात्यांची.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काय सांगू देवा तुझे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ काय सांगू देवा तुझे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

काय सांगू देवा तुझे फारच उपकार

सदाच आहे खुले तुझे आम्हासाठी दार

*

पतितपावन आहेस देवा येते प्रचिती

तुझ्यामुळे विश्वाला या मिळते सद्गती

*

ठाई ठाई रूप तुझे दिसते आम्हाला

कशास जावे सांग आम्ही तीर्थक्षेत्राला…

*

पशुपक्षी प्राणी सारे तुझेच ना रूप

व्यर्थ का जाळतो आम्ही यज्ञातून तूप…

*

जळीस्थळीकाष्टीपाषाणी म्हणती आहे

म्हणून मी माझ्यामध्ये नित्य तुला पाहे..

*

श्वास माझा प्राण माझा सर्वस्व तूच

क्षणभर साथ सोडली की होते मग कूच..

*

तरी न डोळे उघडती ना होतो शहाणे

उठसूठ सुरूच असते आमचे गाऱ्हाणे..

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 280 ☆ हे शिवशंकर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 280 ?

☆ हे शिवशंकर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कर्पूरगौरा, शुभांग, शंकर…

नीलकंठ स्वामी गिरिजावर

राहो सदा कृपा आम्हावर

हे ईश्वर….परमेश्वर!

*

कैलास पर्वत तुमचे निवासस्थान

व्याघ्रांबराचे बसण्यास आसन

जटेत गंगा, वामांगी गौरी,

सर्व पृथ्वीवर तुमचे अनुशासन!

*

हे शशीशेखरा, डमरू, त्रिशूल धारी,

तुमच्या नजरेत ही दुनिया सारी,

महादेव तुम्हीच पृथ्वीचे नियंता…

तुम्हीच आमचे भाग्यविधाता!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares