मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॥ अंतर्बोध ॥ ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ ॥ अंतर्बोध ॥ ☆ अपर्णा परांजपे ☆

 सिंहावलोकनी दृष्टी, सृष्टि कर्ता ब्रह्मा असे

संकल्प “मनाचा” असे सृष्टी तशी प्रगटतसे

*

परब्रह्म परमात्मा पुत्र त्याचा ब्रह्मदेव

सृष्टिनिर्माता हा दृष्य पिता “स्वरुप, नाव”..

*

कल्पनेचा खेळ हा कुशल मन हे चंचल

सत्य जाणण्यासाठी खेळ असे मंगल

*

पिंजरा हा कल्पनेचा, कल्पनेने रे सजे,

मीच माझा कैदी येथे, मीच माझे बंध जे.

*

भ्रामक या ओळखींचे, लेऊनी मी वेष्टण,

विसरलो मी कोण आहे, विसरलो मी ‘स्व’पण..

*

स्मृतिंच्या या सावल्यांनी, ग्रासले वर्तमाना,

धावतो मी अतीताच्या, शोधण्या “त्या” खुणा.

*

भविष्याच्या “कल्पनेतच” रंगले माझे मन

वर्तमानाचा ना “विचार”शांतता नाही क्षण

*

दृष्टिला या धूसरतेचे, लाभले जे अंजन,

सत्य काही दिसेना अन, व्यर्थ हे रे रंजन

*

शांत होता क्षणभर, बघतो मी मजकडे,

उकलती मग हळूहळू, गुंतागुंतीचे कडे.

*

ना निवाडा, ना समर्थन, केवळ ही “जागृती”,

साक्षी भावे पाहता ही, विरून जाते “आकृती” (कल्पनेचा देहभाव)

*

मुक्त नभ हे अंतरीचे, मौन ज्याचे सार हो,

समजुतीचा दीप उजळे, तुटती हे पाश हो.

*

करुणा उगमते अंतरी, भेद सारे लोपती,

“स्वयंप्रकाशी” होऊनी आता, जीवना लाभे “गती”…

🙏 कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मीराबेन☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ मीराबेन ☆ शालिनी जोशी

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे समर्थन करण्यासाठी आपला देश सोडून आलेली मीराबेन.हिचे मूळ नाव मॅडलीन स्लेड. जन्म २२ नोव्हेंबर १८९२. वडील ब्रिटिश नेव्हीत ऑफिसर होते. सर एडमंट स्लेड वडिलांचे नाव आणि फ्लोरेंन्स आईचं नाव. एका सुस्थितीतल्या ब्रिटिश कुटुंबातल्या मॅडलीनला लहानपणापासून निसर्ग व घोडेस्वारीची आवड.तसेच संगीताची ही आवड होती.पियानो आणि संगीत मैफलीत भाग घेत असे. एकदा त्यासंबंधी कामासाठी जर्मनीला गेली असता रोलॅंडने लिहिलेल्या  महात्मा गांधी यांच्या चरित्राविषयी कळले. दुसरे ख्रिस्त आणि विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन ऐकून ती भारावली.

इंग्लंडला परत आल्यावर रोलँड ने लिहिलेले गांधी चरित्र वाचले. आणि गांधीजींची शिष्य होण्याचे, जीवन त्यांना समर्पित करण्याचे ठरविले. त्यासाठी तयारी म्हणून आधी साबरमती आश्रमातील साहित्याचा अभ्यास केला. मांडी घालून बसणे शिकली. आहारात बदल केला. शाकाहार स्वीकारला मांस व मद्याचा त्याग केला. सुत कातणे,लोकर विणकाम शिकली. इंग्लंडमध्ये यंग इंडियाची सदस्य झाली.  भगवत् गीता, ऋग्वेद वाचण्याचा अभ्यास केला.

१९२५ मध्ये गांधींची संपर्क साधून त्यांच्या आश्रमात राहण्याची परवानगी मागितली. भारतात येऊन गांधींना भेटल्यावर गांधींनी ‘तू माझी मुलगी होशील’ असे म्हणून तिला ‘मीराबेन’ नाव दिले. आपले जुने जीवन ती विसरली.१९२५ च्या भारतीय काँग्रेसच्या पहिल्या वार्षिक सभेला त्या उपस्थित राहिल्या. साबरमती आश्रमात सुतकताई, विणकाम, स्वयंपाक, स्वच्छता अशी कामे त्या करत. गुजराती व मराठी शिकल्या. साबरमतीत स्वतःने विणकाम केंद्र सुरू केले. रवींद्रनाथ यांच्या शांतिनिकेतनला भेट दिली.१९३१ च्या गोलमेज परिषदेसाठी गांधींबरोबर केल्या. गांधीना अटक झाल्यावर त्यांनाही अटक झाली. आर्थर रोड आणि साबरमती तुरंगात राहावे लागले.

इंग्लंडमध्ये जाऊन सरकारला पटवून दिले की, भारत देश चालवायला समर्थ आहे. ब्रिटिश वसाहत वादामुळे ग्रामीण उद्योगांचा विनाश होतो. उच्च कर लादले जातात. भारत छोडो चळवळीत गांधी व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही अटक झाली. दोन वर्षे पुणे येथे आगाखान पॅलेस मध्ये होत्या. नंतर हरिद्वार येथे किसान आश्रम स्थापला. गो संरक्षणाचे काम केले. भारताच्या स्वातंत्र्याची संबंधित सिमला परिषद, संविधान सभा, भारताची फाळणी आणि गांधीहत्येच्या त्या साक्षीदार होत्या. स्वातंत्र्यानंतर शेती, दुग्ध व्यवसाय, वनसंरक्षण, पर्यावरण या क्षेत्रात काम केले. पुढे १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाल्या. १९८२ मध्ये मृत्यू झाला. त्यापूर्वी १९८१ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांनी काही पुस्तके लिहिली स्वतःचे चरित्र, गांधींची मीरेला पत्रे इ. अशा प्रकारे एका सुखवस्तू  ब्रिटिश घरातील मुलगी आपले पूर्वीचे नावासकट सर्व विसरली आणि भारतीय नेत्याची कार्यकर्ती व मुलगी म्हणून राहणे पसंत केले. सगळेच अतर्क्य !

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर

‘तुला काही झालं असतं ना… तू मेला असतास ना… तरी मी तुझ्याशी आजिबात बोललो नसतो… कधीच… ’ संग्रामचा हा मोबाईलवर आलेला डायलॉग ऐकताना, त्याही स्थितीत गौरवला खदाखदा हसू आलं. त्याही स्थितीत… म्हणजे गेले पाच-सहा दिवस असह्य वेदनांमुळे बाहेर पडणार्‍या किंकाळ्यांना मोठ्या संयमाने रोखून धरत असतानाही, त्याला संग्रामच्या बोलण्याचं हसू आलं. त्याला असं खदाखदा हसताना आहून बेस हॉस्पिटलची हेड नर्स शकुंतला मॅमनी त्याच्याकडे चमकून पाहीलं. त्याच्या या अशा मोठमोठ्याने हसण्यामुळे, तीन दिवस आधी पोटावर आणि डाव्या हातावर घातलेल्या टाक्यांवर अतिरिक्त ताण तर पडणार नाही ना, अशी त्यांना शंका येत होती आणि तसं होणं मुळीच योग्य नव्हतं. शकुंतला मॅमच्या चमकून बघण्यामागे ही काळजी होती. पण गौरवला असं हसताना पाहून तिचं मन द्रवलंही. गेल्या पाच-सहा दिवसाच्या त्याच्या मूक अश्रूपाताची ती एकटीच साक्षीदार होती.

श्रीनगरच्या या आर्मी बेस हॉस्पिटलच्या भितींवर या दिवसात दु:ख, वेदनेचा, नवा मजकूर लिहिला जात होता. बदामी बागेच्या आर्मी कॅंन्टोंन्मेंटच्या विशाल पसरलेल्या परिसराच्या मधे असलेले ते बेस हॉस्पिटल किती तरी वर्षांपासून किती तरी किंचाळ्यांचं, कण्हण्याचं मूक साक्षीदार बनलय. विशेषत: गेल्या दहा-पंधरा वर्षापासून, जेव्हापासून आतंकवादाने या घाटीत आपलं डोकं वर काढलय, तेव्हापासून जरा जास्तच. गोळ्यांनी विंधलेल्या, बॉम्बनी क्षत-विक्षत झालेल्या सैनिकांच्या शरिरांनी या हॉस्पिटलचे बेड भरलेलेच असायचे.

ऑफिसर वॉर्डच्या दहा बेडच्या हॉलमध्ये एका कोपर्‍यातल्या बेडवर गौरव पडलेला होता. शेजारी ठेवलेल्या एका उंच स्टॅंडवर प्लॅस्टर घातलेला त्याचा डावा हात क्लिपमध्ये बांधून ठेवलेला होता. ओठातून उमटत असलेलं दबक्या आवाजातलं कण्हणं, त्या भिंतींवर नव्या काव्यपंक्ती लिहीत चाललं होतं. गौरव… मेजर गौरव वत्स… सात गोळ्या आपल्या शरीरात सामावलेला. केवढा तरी रक्तपात झाल्यानंतर, हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, त्याचं जीवंत रहाणं हा मोठाच चमत्कार होता. डॉक्टरांच्या या कथित चमत्कारानंतर, त्याच्या शौर्याची, वीरतेची सगळीकडे चर्चा होत होती. ‘कॉन्ग्रेचुलेशन मेजर.. ’ आणि ‘वेल डन माय बॉय… ‘ सारखे उद्गार भेटायला येणार्‍यांच्या ओठांवर विराजमान होते. अशा सगळ्या ‘कॉन्ग्रेचुलेशन्स’ आणि ‘वेल डन’वर, गौरवला सगळ्या मर्यादा तोडून आभाळाला जाऊन भिडेल, इतक्या मोठयाने किंचाळावसं वाटतं. कसलं शौर्य? कसली वीरता? जेव्हा त्याचा बड्डी… साथीदार लांस नायाक खुशहाल सिंह याने त्याच्यासमोर प्राण सोडला होता… जेव्हा त्याच्यासाठी बाहेर पडलेल्या गोळीने त्याच्या लाडक्या अतिप्रीय सिद्धार्थचा जीव घेतला, तेव्हा तो काहीच करू शकला नाही. मग यात शौर्य कुठून आलं? किती तरी वेळा त्याला वेदना असह्य होते. खूप मोठयाने ओरडावसं वाटतं पण त्याने स्वत:वर कामालीची बंधने घालून घेतली आहेत. ओठातून बाहेर पडण्यापूर्वीच किंचाळीला मूक व्हावं लागत होतं. तसंही, कुठल्याही सैनिकाला, आपलं दु:ख, आपल्या वेदना, यामुळे कण्हण्याची, ओरडण्याची परवानगी, त्यांची वर्दी देत नाही. ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’चा परीघ, क्रूरतेच्या हद्दीपर्यंत सगळा अंधार, वर्दी आपल्या चमकत्या आवरणाखाली लपवून ठेवते.

तीन दिवस आय. सी. यू. मध्ये बेशुद्धावस्थेत पडून राहिल्यानंतर आज जेव्हा त्याला ऑफिसर वॉर्डमध्ये आणलं गेलं, तेव्हा त्याला त्याचा मोबाईल हातात घेण्याची परवानगी मिळाली. शेकडो एसएमएसनी त्याचा इनबॉक्स तुडुंब भरला होता. पहिला कॉल त्याने गीतालीलाच केला.

‘हाऊ आर यू माय हीरो? ’ स्वत:ला सहज असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करता करता ती हमसून हमसून रडू लागली.

’कमॉन सोना… तूच जर असं करू लागलीस, तर कसं होणार? तूच तर माझी ताकद आहेस ना! ’

‘किती दुखतय? ’

‘आता कुठलं दु:ख सोना! तू विचारलंस आणि सगळं दु:ख गायब. हा… हा… ’ गौरवनं जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला.

’राहू दे… राहू दे… हा डायलॉग तुझ्या गर्लफ्रेण्डससाठी राखून ठेव! ’

‘कुठल्या गर्लफ्रेण्डस बेबी? कधीच सुटल्या सगळ्या… तुझ्याशी बांधला गेलो तेव्हा. बरं मला सांग, मम्मी, पप्पा कसे आहेत? आणि माझी टिप्सी? ’ गौरवने विषय बदलत विचारलं. त्याच्या मनात अनेकानेक एसएमएसनी भरलेला इनबॉक्स चमकत होता. पण ते कुणाचे आहेत, ते त्याला कळणार नव्हतं कारण काही दिवसांपूर्वीच त्याने स्वत:च सगळे नंबर डीलिट केले होते.

‘न्यूज कळल्यापासून मम्मींचं रडणं थांबतच नाही आहे. पप्पा गप्प गप्प आहेत. आजीचं रडणं पाहून टिप्सीला कळलं, आपल्या पापांना गोळी-बिळीसारखं काही लागलय. काल आपल्या सगळ्या दोस्तांना सांगत होती की तिच्या पापांना गुंडांशी लढताना जखम झालीय. ’ गीतालीचे हुंदके मोबाईलच्या स्पीकरमधून बाहेर पडून वॉर्डमध्ये तरंगू लागले.

हॉस्पिटलच्या मूक भितींवर आधीपासूनच लिहिलेल्या दु:ख, वेदनांच्या कहाण्यांवर नवीन नवीन थर चढत होते. त्याला संग्रामच्या कॉलने थोडासा विसावा मिळाला होता. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक क्षणी त्याची हसरी, खेळकर वृत्ती कायम असायची. अथांग पीडेच्या क्षणीही, त्याच्या कॉलने हसण्यासाठी गौरवला विवश केलं होतं. गौरवकडून सगळं जाणून घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. ऑपरेशनमध्ये कुठे गडबड झाली की ज्यामुळे आतंकवाद्यांचा निपटारा करताना गौरवच्या बटालियनला इतकं नुकसान सोसावं लागलं? झालेल्या क्षितीसाठी नुकसान शब्द छोटाच म्हणायला हवा. यावेळी गौरवला ते जाणवत असणार, ही गोष्ट संग्रामच्या लक्षात येत होती. दोन आतंकवाद्यांना मारून टाकण्यात भारतीय सेनेचा एक कॅप्टन आणि एक जवान यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं आणि एक मेजर अतिशय घायाळ होऊन हॉस्पिटलमध्ये पडला होता. संग्रामने दोन-तीन वेळा विचारल्यावर गौरवने कण्हल्यासारख्या आवाजात म्हंटलं होतं, ‘हे सांग संग्राम, कुणाच्या असण्यासाठी कुणाचं नसणं, नियतीच्या कोणत्या कायद्यात बसतं? ’

‘मला माहीत आहे गौरव तू कॅप्टन सिद्धार्थबद्दल बोलतो आहेस ना? कसं झालं दोस्त हे सगळं? तुम्हाला जर पक्की खबर होती की त्या घरात विदेशी आतंकवादी लपलेले आहेत, तर घरात घुसण्याची काय गरज होती? बाहेरूनच बॉम्ब टाकून घर का नाही उडवलंत? सरकार मालकाला पूर्ण पैसे देतंच की! ’

‘सगळं कसं धूसर धूसर आहे संग्राम… आत्ता मला तू माफ कर. ’

‘ठीकाय! ठिकाय! आत्ता तू आराम कर. स्वत:ची काळजी घे. जे झालं ते झालं. यू डीड युअर बेस्ट… गीतालीचा कॉल आला होता. तुला बघायला श्रीनगरला यायचं म्हणतेय. मला म्हणत होती, घेऊन चल… मलासुद्धा तुला बघावसं, भेटावसं वाटतय. ’

‘कुणीही येणार नाही इथे… मला एकट्यालाच राहू दे. ’ गौरवने ओरडत फोन कट केला.

सगळी मीडिया या ऑपरेशनच्या वेळी सेनेच्या झालेल्या त्रुटीबद्दल हा:हा:कार माजवत होती. संग्रामला माहीत होतं की सत्य काय आहे, ते केवळ आणि केवळ त्याचा जिगरी दोस्त गौरवच सांगू शकतो आणि ते सत्य तो आपल्या चॅनेलद्वारा सर्वांपुढे आणू इच्छितोय. दोघांची दोस्ती लहानपणापासूनची. ‘दो जिस्म मगर एक जान’ सारखा एखादा बिल्ला लावून वाढलेली. मोठी झालेली. आता गौरवच्या आवाजात असलेली वेदना संग्राम आपल्या छातीत अनुभवत होता. संग्रामच्या प्रश्नांनंतर गौरवला पेन-किलरच्या इंजक्शनची अवश्यकता कित्येक पटीने जास्त वाटू लागली होती. शकुंतला मॅमला थोडी काळजी वाटत होती. पेन-किलरच्या इतक्या जास्त डोसाचा काही विपरीत परिणाम तर गौरवच्या शरीरावर होणार नाही ना? . या काळजीपोटीच गौरवने वारंवार केलेल्या विनंतीवरून त्याला हॉस्पिटलच्या परिसरात सिगरेट ओढण्याची परवानगी देण्यात आली होती. गौरवचं म्हणणं होतं की विल्सवाल्यांनी आपली ‘क्लासिक’ नावाची जी चौर्‍याऐशी मिलीमीटरची नळी… सिगरेट बाजारात उतरवलीय, तिच्या तोडीचं दुसरं पेन-किलर सध्या तरी शक्य नाही. यावर, शकुंतला मॅम आणि गौरवच्या डॉक्टरांचं हसू त्या ऑंफिसर वॉर्डमध्ये किती तरी वेळ खळखळत राहीलं.

वेदनेच्या उत्तुंग लहरींनी भिजलेला फेसाळ किनारा, केव्हढ्या तरी दु:खाचा फेस घेऊन हळू हळू वाहणारा काळाचा प्रवाह गुपचुप बघत होता. काश्मीरच्या त्या ऑक्टोबरच्या कुडकुडणार्‍या थंडीत धुक्यात न्हालेल्या दुपारी आणि उदास हुडहुडी भरवणार्‍या रात्रींच्यामध्ये पेन कीलरच्या इंजक्शनच्या गुंगीत असताना मधेच खडबडून जागा व्हायचा गौरव. दूरवरून, ’गौरव सर.. ’ अशी हाक यायची आणि खूप वेळपर्यंत त्याच्या कानाच्या अनंत खोलीत, त्याची झोप उडवत ती गुंजत राहयाची. दूरवरून येणार्‍या प्रत्येक हाकेसरशी त्याला उठून तिकडे जावंसं वाटायचं पण पोटावर बांधलेल्या भरभक्कम पट्ट्या आणि क्लिपमध्ये अडकवलेला त्याचा प्लॅस्टर घातलेला डावा हात त्याला तसं करण्यापासून रोखायचा. त्या रात्री सिद्धार्थचा आवाज ‘गौरव सर… सेव्ह मी प्लीज… ’, वॉर्डचे झरोके आणि खिडक्या यातून खाली उतरून वॉर्डच्या चारी बाजूच्या भिंतींवर टांगला गेला. डॉक्टरांनी त्याचे पोट आणि डाव्या हातावर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून टाके घातले होते, त्याला अवघा दीड आठवडा झाला होता.

आकाशातून बारीक बारीक बर्फाचे फाये हळू हळू खाली उतरत होते. मध्यरात्र होऊन गेली होती. कॅप्टन सिद्धार्थ राय आपल्या फूल बॅटल गिअरमध्ये रक्तरंजित वर्दीसहित वॉर्डच्या एका झरोक्यातून तरंगत तरंगत त्याच्या बेडच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरून टपकणारं रक्त गौरवाच्या पोटावर पडत होतं आणि न जाणे, कसल्या उदास, विरक्त दृष्टीने तो टकामका गौरवकडे बघत होता. क्षणभरातच गौरवच्या चित्काराने सगळा वॉर्ड गडबडून उठला. थोड्या वेळापूर्वी शिफ्ट ड्यूटीवर आलेल्या शकुंतला मॅम पळतच गौरवच्या बेडपाशी आल्या. ऑक्टोबरच्या त्या थंडीतही घामाने भिजलेल्या गौरवला पाहून त्या घाबरून गेल्या. त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्यांनी विचारलं,

‘काय झालं बेटा? आर यू ऑल राईट? ’

‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.

‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं… सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”खेळ नशिबाचा असला तरी..” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “खेळ नशिबाचा असला तरी..” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सध्या चालू असलेल्या भारत इंग्लंड ची मॅच, मी माझ्या वडिलांबरोबर बघत होते. शेवटच्या बाॅलवर सिक्स गेला. व त्या एका बॉलमुळे म्हणा किंवा सिक्स मुळे म्हणा आपण हातातोंडाशी आलेला मॅच हारलो.

त्या नंतर त्यावर चर्चेला रंग चढला. जो तो आपापल्या बुद्धी नुसार, त्या एका बाॅलवर आपली प्रतिक्रिया देण्यात दंग होता. चर्चेला उधाण आलं होतं. प्रत्त्येक जण या क्षेत्रातील expert असल्यासारखे विश्लेषण करत होता.

बॉल असा फेकला असता तर, पिच कसं आहे?? त्याप्रमाणे बॉल फेकायला पाहिजे होता. या मोमेंटवर कोणी फुल टॉस बॉल फेकतो का?? वगैरे वगैरे  अंतरराष्ट्रीय स्टेजवर बसलेले कॉमेंटेटर्स तर आपले गहन विचार मांडत होते. जूने उदाहरण देऊन यावर चर्चा करण्यात गुंग होते. काय आणि कसं करायला हवं होतं?? यावर ‘expert comments ‘ देण्यात प्रत्येकाने स्वतः ला झोकून दिलं होतं. क्रिकेट प्रेमी तर पार कोलमडले होते.

मी बाबांना विचारलं, हे सर्व बरोबर बोलताहेत का?? मला मॅच बघायला आवडत, पण खूप बारीक सारीक डिटेल्स काही कळत नाही. डिस्कस करता येत नाही.

तेंव्हा बाबा म्हणाले,  

हा बॉलरही इंटरनॅशनल प्लेअर आहे. बरेच मॅचेस खेळलेला आहे. तो प्रत्यक्ष फिल्ड वर आहे. त्यानेही काही तरी विचार बॉलफेकण्यापुर्वी केलाच असेल ना. त्यालाही हे “एक बॉल पाच रन्स ” हे समीकरण माहित होतं, त्यालाही जिंकायचीच इच्छा होती. ते त्याच्या करिता आणि टीम करिता सर्वच दृष्टीने आवश्यक होतं. महत्वाचे होते. आणि फायद्याचेही होत. मॅच विनर/ फिनिशर म्हणून त्याच्यावर शिक्का लागला असता. तर, त्याची ‘ IPL’ मध्येही किंमत वाढली असती. जाहिराती मिळाल्या असत्या.

“जैसा परफोर्मेंस वैसी प्राइस मिलती हैं।” बॉल फेकण्याआधी कॅप्टन व त्याचे डिस्कशन ही झाले होतेच.

पण यावेळेस निशाणा ठिकाणी लागला नाही. हे खरय. त्याने जो विचार करून बॉल फेकला, तसं झालं नाही. बॅट्समनला पण जिंकायचं होत, त्यांच्यासाठी पण एकच चान्स होता, त्याने शेवटच्या बॉलवर आपले प्राण लावले, शक्ती लावली, तो सफल झाला.

यात चूक कोणाचीच नाही. असं होतच.

“कोशीश करना हमारा कामं है, हारजीत तो परिणाम हैं ”

दोघांनी आपापल्या दृष्टीने बरोबरच विचार केला. सिक्स च्या जागी तो कॅच आउट झाला असता. कदाचित स्टंप्स उडाले असते. तर बाजी पालटली असती.

आयुष्यातही असच होत असत. किती तरी निर्णय आपण घेत असतो. प्रश्न / समस्याच्या degree of difficulty, नुसार आपण त्यावर विचार करतो, कधी दुसऱ्या कोणाबरोबर विचार विमर्श ही करतो. प्रत्येकाला आयुष्यात जिंकायचेच असते. कोणालाही हार, नुकसान नको असते. प्रत्त्येक जण धावायचाच प्रयत्न करतो, पडायचा करत नाही. पण प्रत्त्येक वेळेस आपल्या मनासारखे होतेच असं नाही. निर्णय घेताना परिस्थिती वर खूप विचार करूनही कधी कधी नुकसान होतेच. हार होते, निर्णय चूक घेतला, हेही सर्व नंतरच कळत. घटना घडून गेल्यावरच कळत. शेअर्स मध्ये नुकसान झाले. घराचे बुकिंग झाल्यावर बिल्डरने धोका दिला, पैशाची गुंतवणूक चूक जागी झाली. हे सर्व नंतरच कळत. प्रयत्न शेवटपर्यंत जिंकायचाच असतो.

हार की जीत मॅच झाल्यावरच कळत.

यालाच नशीब म्हणतात का??

प्रत्त्येक निर्णय विचार पूर्वक घेतल्यानंतर ही असं का होतं??

परिस्थिती बदलली की निर्णयही बदलतात.

वेळ कधी कशी येईल?? सांगता येत नाही. रात्री रामाला राज्य द्यायचा निर्णय झाला होता, परंतु सकाळी वनवास मिळाला.

“अपेक्षा घेऊन सुरू केलेला प्रत्येक दिवस अनुभव देऊनच जातो, मग तो देवमाणूस असो नाहीतर सामान्य माणूस असो. “

निसर्गाच्या नियमानुसार बदल होत असतात. आयुष्यात ही बदल होत असतातच. बालपण, तारुण्य, म्हातारपण या वेगवेगळ्या फेज मध्ये खूपदा गणित बदलत, समीकरण बदलतात. तेंव्हा त्याप्रमाणे आधी घेतलेले निर्णय कधी विचार पूर्वक तर कधी नाइलाजाने बदलावे लागतात. म्हणून निर्णय घ्यायचेच नाही असं नाही. पण लवचिकता ठेवावी. जेवढ लवचिक राहाल तेवढं चांगलं.

खूपदा लोकांनी घेतलेल्या निर्णयांवर आपण चर्चा करतो. जोपर्यंत आपल्यावर एखादी ‘तशी’ वेळ येत नाही. तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी चे गांभिर्य कळत नाही.

घरचा प्रमूखाला तर नेहमीच मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्या निर्णयावर तर घरच्यांच्या बऱ्याच गोष्टी/ भविष्य अवलंबून असतात. प्रमूख नेहमी परिवाराच्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतो. पण ते नेहमी बरोबरच सिद्ध होत, असं नाही.

घरच्या प्रमूखाची स्थिती घरावरील पत्र्याच्या शेडसारखी असते, जो ऊन, पाऊस, वादळ, वारा सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो. आयुष्यात येणारे उतार चढाव सर्वांना तोंड देतो. आपल्या क्षमतेनुसार निर्णय घेतो. पण त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की,

“हा खूप आवाज करतो. ” नेहमी सर्व खुश असतातच असं नाही.

घरच्यांना बरेच निर्णय पटत नाही. कदाचित चूकतही असतील. पण जाणूनबुजून कोणी नुकसान करण्यासाठी चूकीचे निर्णय घेत नाही.

कदाचित नशीबात तेच लिहिले असते. म्हणून तसे निर्णय घेतले जात असावेत.

“अकल कितनी भी तेज़ हो, नसीब के बिना  जीत नहीं सकते ।”

म्हणतात ना,

” देवाला हसवायचे असेल तर त्याला आपला प्लान सांगावा, तो म्हणे गालातल्या गालात हसतो. ” त्याने आधीच आपले आयुष्य ठरवून ठेवलेले असते, त्याचे सर्व निर्णय घेऊन झालेले असतात.

“कोई चाहें कितना भी सोच ले,

आखिर में हुकुम का इक्का कुदरत ही फेंकती हैं।”

निर्णय चूकला तर वाईट वाटणे सहाजिकच आहे. पण (guilt) अपराधीपणाची भावना नसावी.

कधी कधी न ठरविलेल्या/ अपेक्षा नसलेल्या गोष्टी सहज घडतात/मिळतात. तर कधी खूप विचार करून घेतलेले निर्णय अपेक्षेप्रमाणे, मनासारखे नसतात. यालाच बहुतेक नशिबाचे खेळ म्हणतात.

म्हणूनच म्हणतात,

दैव जाणिले कुणी???

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक – १७ – – 

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते ।

अकस्मात होणार होऊनि जाते ।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

अर्थ :

संसारात माणूस अनेक व्यर्थ चिंता करत बसतो. परंतु जे घडायचे असते ते अकस्मात घडूनच जाते. कारण प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते. हे सत्य काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि ते मात्र त्याबद्दल सतत दुःख करत राहतात.

आधीच्या श्लोकात आपण गेलेल्या व्यक्तीचा जो शोक करतो, तो शोक मोह किंवा लोभातून निर्माण होतो असे समर्थ सांगतात. या श्लोकात ते पुढे एक वेगळाच पैलू उलगडतात. माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त असतो. परंतु चिंता करून फारसा उपयोग नसतो, कारण जे घडायचे आहे ते कर्मानुसार घडणारच असते.

माणसाचे आयुष्य चिंतांनी भरलेले असते. चिंता नाही असा दिवस फार क्वचितच येतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही याची चिंता असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी मिळेल की नाही याची काळजी वाटते. पुढे लग्न होईल की नाही, संसार कसा होईल, मुलं चांगली निघतील का, म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल? अशा अनेक चिंता माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत असतात. या चिंतेच्या ओझ्याखाली तो आयुष्य जगत राहतो.

परंतु समर्थ सांगतात की अशा प्रकारची व्यर्थ चिंता करण्याचा काही उपयोग नाही. कारण आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसारच घडत असते. आपले कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, आणि दुष्कर्म केले असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बाभळीचे झाड लावून आंब्यांची अपेक्षा करणे जसे अशक्य आहे, तसेच दुष्कर्म करून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.

महाभारतातील दुर्योधन आणि दुःशासन यांनी नीतीने वागणाऱ्या पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. त्या दुष्कृत्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अखेर महाभारताच्या युद्धात संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. कर्माच्या नियमानुसार फळ मिळते याचे हे ठळक उदाहरण आहे.

आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. या भेटीचा आपण सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटकडून चांगल्याकडे अशी आपली वाटचाल व्हायला हवी.

जीवनाला अनेकदा रंगमंचाची उपमा दिली जाते. त्या रंगमंचावर प्रत्येकाला एक भूमिका मिळालेली असते. त्या भूमिकेचे प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. एखादा शिक्षक असेल तर त्याने आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असलेली व्यक्ती आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तेच तिचे खरे साधन आहे.

आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजेच आपला स्वधर्म आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात —

“स्वये आचरिता स्वकर्म ।

ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म ॥”

म्हणूनच माणसाने आपले कर्म उत्तम करणे आवश्यक आहे. जीवनात येणारी सुखदुःखे ही आपल्या प्रारब्धानुसारच येतात हे ज्यांच्या लक्षात येते, ते शहाणे लोक त्यांचा शांतपणे स्वीकार करतात. ते व्यर्थ चिंता करत बसत नाहीत.

परंतु जे या तत्त्वाला समजून घेत नाहीत, ते मात्र दुःख आणि खेद यांच्या गर्तेत अडकून पडतात. स्वधर्म विसरला की माणूस विकारांच्या आहारी जातो, आसक्ती वाढते आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे त्याला अधिकाधिक बंधनात अडकवतात. परिणामी तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटत राहतो.

जर आपण खरोखरच हे मानत असू की जीवन ही परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण सुंदर उपयोग करायला हवा. आपल्या कर्तृत्वाने जीवनपथ उजळून टाकायला हवा. कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कर्म करणे आणि ते परमेश्वराला अर्पण करणे हीच जगण्याची खरी रीत आहे. अन्यथा तेच कर्म बंधनकारक ठरून दुःखाला कारणीभूत होते.

स्वसंवाद : 

  • मी माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल खूप चिंता करतो का?
  • जे काही घडते ते माझ्या संचिताचे फळ आहे हे मी मान्य करतो का?
  • माझ्या हातातील वर्तमानकाळ मी चांगल्या कर्मासाठी वापरतो आहे का?
  • स्वधर्माचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?
  • कर्तव्य करताना मी फळाची अपेक्षा ठेवतो का, की निरपेक्ष भावनेने कर्म करण्याचा प्रयत्न करतो?

– – – 

श्लोक क्र. १८ – – – 

मना राघवेंवीण आशा नको रे |

मना मानवाची नको कीर्ति तू रे|

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |

तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे|१८|

अर्थ: हे मना एका रामाशिवाय (परमेश्वराशिवाय) तू कशाचीच आशा ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती (कीर्ति गाऊ नकोस) करू नकोस. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, त्याचेच वर्णन करणे (स्तुती करणे) योग्य (म्हणजे श्लाघ्यवाणे)आहे. कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तोच तुला तारू शकेल.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला आपण व्यर्थ चिंता करीत बसतो असे सांगतात. कारण होणारी गोष्ट पूर्वसंचितानुसार घडणारच असते. पण मग चिंता करायची नाही तर काय करायचे त्याचे उत्तर या श्लोकात आपल्याला मिळते. आपल्याला कोण मदत करेल? कोणाची आशा ठेवायची? कोणाची स्तुती गायची? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या श्लोकात मिळतात.

मनुष्याचा जन्मच वासनेच्या पोटी होतो. त्यामुळे वासना पूर्णपणे सोडणे सोपे नाही. परंतु ईश्वरप्राप्ती शिवाय ठेवलेल्या इतर वासना किंवा कामना दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून समर्थ सांगतात की हे मना (मानवा)एका भगवंतावाचून तू दुसऱ्या कशाचीही वासना किंवा अपेक्षा ठेवू नकोस.

आपली भारतीय संस्कृती ही मुलत: अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे अध्यात्मात मानले जाते. सारी वेद, शास्त्रे आणि पुराणे परमेश्वराचे वर्णन करतात आणि परमेश्वराचा महिमा गातात.

परंतु माणसाच्या ठायी असलेल्या देहबुद्धीमुळे त्याला मानवी जीवनातच धन्यता वाटते. इतर श्रेष्ठ व्यक्तींकडे पाहून आपले जीवनही तसेच असावे असे त्याला वाटल्यास नवल नाही. समाजामध्ये लोक थोर व्यक्तींची प्रशंसा करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक तर आपल्या दरबारात आपली कीर्ती गाण्यासाठी भाट ठेवत असत. आजही वरिष्ठांची खुशामत करण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झाली आहे. आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी लोक वरिष्ठांची स्तुती करताना दिसतात. अशा प्रकारच्या स्तुतीने ऐहिक जीवनात थोडाफार फायदा होतही असेल. पण त्याला स्वाभिमानाने जगणे म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची लाचारीच आहे. दुसऱ्याची स्तुती जरूर करावी. गुणग्राहकता आपल्याजवळ असावी परंतु ती स्वार्थापोटी नसावी. लोकांची मानसिकता अशी असते की ते स्वार्थापोटी आज आपली स्तुती करतील परंतु उद्या त्यांचा स्वार्थ साधत नाही असे दिसले की ते निंदा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

परंतु संकटकाळी किंवा अंतिम प्रसंगी श्रीमंत माणसे, वरिष्ठ लोक किंवा नातेवाईक यापैकी कोणीही उपयोगी पडत नाही. मोक्षमार्गावर वाटचाल करणे, आत्मदर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हे जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रसंगी केवळ परमेश्वराचेच सहाय्य आपल्याला होत असते. त्याच्याच कृपेने जीवनातील संकटांना आपण धैर्याने तोंड देऊ शकतो.

महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवतील म्हणून द्रौपदीने सुरुवातीला दरबारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदींना विनंती केली. तिचे पती असलेल्या पांडवांची देखील तिला आशा होती. परंतु यापैकी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तेव्हा तिने आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तोच तिच्या मदतीला धावून आला. म्हणून आशा करायची ती परमेश्वराची.

हे मानवा, स्तुती करायचीच असेल तर संत, सद्गुरु किंवा परमेश्वराची कर. त्यांचेच गुणगान गा असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी त्या परमेश्वराची स्तुती गुणांचे वर्णन केले आहेत. समर्थ ज्या राघवाची स्तुती करायला आपल्याला सांगतात, तो राघव म्हणजे परमेश्वर सर्व सृष्टीत विराजमान आहे. राघव हा शब्दच किती सुंदर आहे! राघव म्हणजे चैतन्य! हे चैतन्य सर्व चराचरात भरलेले आहे. चैतन्याची अनेक रूपे असतात. त्याला नावेही वेगवेगळी असतात. पण मूळ चैतन्य एकच असते. ते आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण त्याचेच गुणगान करावे. तोच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात मी खरोखर कोणावर आशा ठेवतो — माणसांवर की परमेश्वरावर?
  • स्वार्थ साधण्यासाठी मी कधी कोणाची खुशामत तर करत नाही ना?
  • दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करताना माझ्या मनात स्वार्थ तर नसतो ना?
  • माझ्या दैनंदिन जीवनात परमेश्वराचे स्मरण किंवा स्तवन याला किती स्थान आहे?
  • ऐहिक यशापेक्षा आत्मिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे हे मला खरोखर पटते का? (क्रमशः)

 

– क्रमशः श्लोक १७ आणि १८. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

परंपरा, प्रतीक आणि स्वाभिमानाची उंच पताका

आकाशाला स्पर्शणारा अभिमान

… भारताचा राष्ट्रीय ध्वज — केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी निळे अशोकचक्र.

आपण त्याला तिरंगा म्हणतो; पण रंगांच्या दृष्टीने तो खरे तर चौरंगा आहे.

अशोकचक्रांकित हा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची जणू देवताच.

तो भारताच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्म्याचा तेजस्वी प्रतीक आहे.

निरभ्र निळ्या आकाशात डौलाने फडकणारा ध्वज पाहिला की मन भरून येते; छाती अभिमानाने फुलते आणि मस्तक आदराने आपोआप झुकते.

ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो राष्ट्राच्या अस्मितेचा उंचावलेला स्वर.

रणांगणातील पताका

भगवाध्वज आणि जरिपटका

महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या परंपरेतून लाभलेला जरिपटका हा स्वाभिमानाचा ध्वज.

पूर्वी युद्धभूमीवर सैन्याच्या अग्रेसर रेषेत हा भगवा झेंडा घेऊन धावणाऱ्या वीराला “बिनीचा सरदार” किंवा “बिनीचा स्वार” म्हणत. याच शब्दावरून बिनिवाले हे आडनाव प्रचलित झाले.

रणांगणावर ध्वज फडकत आहे, याचा अर्थ सैन्य अजून पराभूत झालेले नाही.

बिनीचा स्वार पडला तरी दुसरा वीर पुढे सरसावून ध्वज उचलत असे.

कारण फडकता ध्वज म्हणजे सैन्याचा आत्मसन्मान.

ध्वजाचा तात्त्विक अर्थ

ध्वज म्हणजे उपस्थितीची खूण.

अग्नीला धूम्रध्वज असे म्हणतात, कारण —

“यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र अग्निः”

जिथे धूर दिसतो, तिथे अग्नी असतो.

ध्वज म्हणजे अस्तित्वाची घोषणा.

रामायणातील ध्वज

रामायणकाळात इक्ष्वाकू वंशाच्या ध्वजावर कोविदार (कांचन) वृक्षाचे चिन्ह होते.

अयोध्येतील नव्या राममंदिरावरही याच परंपरेचा ध्वज फडकतो.

रघुवंशाचा ध्वज रक्तारुण वर्णाचा, कमळासारखा लालसर होता आणि त्यावर सूर्यज्वालेसारखी शमीपत्रे होती. म्हणूनच रामाचा ध्वज अरुणध्वज म्हणून ओळखला जातो.

रावणाच्या ध्वजावर मानवी कवटीचे चिन्ह होते.

कुंभकर्णाच्या ध्वजावर शेषनाग,

मेघनादाच्या ध्वजावर सिंह,

तर प्रहस्ताच्या ध्वजावर सर्प.

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या सामर्थ्याची जाहीर घोषणा.

महाभारतातील ध्वज

महाभारतातील प्रत्येक योद्ध्याची स्वतःची ध्वजपताका होती.

श्रीकृष्ण — गरुडध्वज

अर्जुन — कपिध्वज (हनुमान)

युधिष्ठिर — चंद्र-नक्षत्र

सहदेव — हंस

नकुल — सुवर्णपृष्ठी हरिण

भीष्म — ताडपत्र व तारे

द्रोण — वेदी आणि धनुष्य

कृपाचार्य — वृषभ

दुर्योधन — नाग

घटोत्कच — गिधाड

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख.

ध्वजात दडलेल्या कथा

जगातील प्रत्येक राष्ट्राच्या ध्वजात त्याच्या इतिहासाची एखादी आठवण किंवा शौर्यकथा दडलेली असते.

– – अमेरिकेच्या ध्वजावरील ५० तारे तेथील राज्यांचे प्रतीक आहेत, तर १३ पट्टे त्यांच्या प्रारंभीच्या वसाहतींची स्मृती जपतात.

– – दक्षिण गोलार्धातील अनेक देशांच्या झेंड्यांवर सदर्न क्रॉस हा तारकासमूह दिसतो. भारतीय २७ नक्षत्रांमध्ये याचा समावेश नसला तरी पुराणकथांमध्ये त्यालाच स्वर्ग आणि मृत्युलोक यांच्या मध्ये लटकणारा त्रिशंकू असे संबोधले जाते.

– – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सामोआ आणि ब्राझील यांच्या ध्वजांवर हा तारकासमूह दिसतो.

काही ध्वजांची प्रतीके

जपानचा ध्वज

पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा लाल सूर्य — उगवत्या सूर्याच्या देशाची ओळख.

चीनचा ध्वज

लाल पार्श्वभूमीवर एक मोठा आणि चार छोटे तारे — क्रांती आणि समाजरचनेचे प्रतीक.

नेपाळचा ध्वज

दोन त्रिकोणांचा असलेला जगातील एकमेव राष्ट्रीय ध्वज — हिमालयाची प्रतीकात्मक आकृती.

जर्मनीच्या ध्वजात तीन आडवे पट्टे आहेत : काळा – लाल – सोनेरी (पिवळसर).

रंगांचा अर्थ:

काळा – दडपशाही व संघर्षातून उभा राहिलेला इतिहास

लाल – स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व क्रांतीची भावना

सोनेरी – स्वातंत्र्य, एकता आणि उज्ज्वल भविष्य.

श्रीलंकेचा ध्वज

तलवार धारण केलेला सिंह आणि चार पिंपळाची पाने — सिंहली परंपरा आणि बौद्ध मूल्यांचे प्रतीक.

इतर ध्वज

अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थाचे सुद्धा आपापले ध्वज असतात. त्यांचे कार्यकर्ते हे ध्वज घेऊन अभिमानाने मिरवतात.

ब्रह्मध्वज आणि गुढी

—- नवनिर्मितीची पताका

ब्रह्मध्वज म्हणजे ब्रह्मतत्त्व, ज्ञान किंवा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे प्रतीक असलेला ध्वज.

लोकपरंपरेत याच ब्रह्मध्वजाचे रूप म्हणजे गुढी.

म्हणजे ब्रह्मध्वज हा तात्त्विक शब्द, आणि गुढी हा लोकजीवनातील व्यवहारातील शब्द.

गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. या सृष्टीउदयानाच्या आनंदाप्रीत्यर्थ ब्रह्मध्वज उभारण्याची प्रथा आहे.

वसंत ऋतू — नवनिर्मितीचा काळ.

झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात.

सृष्टीच्या या नवउदयानिमित्त घरासमोर उभारली जाणारी गुढी म्हणजे नवनिर्मितीचा उत्सव.

समारोप

उंचावलेली पताका

ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो इतिहासाची आठवण, संस्कृतीची ओळख आणि स्वाभिमानाचा उंचावलेला स्वर.

रणांगणात तो शौर्याची शपथ असतो.

राष्ट्रात तो अभिमानाची ओळख असतो.

आणि गुढीच्या रूपाने तो नवनिर्मितीचा मंगल संदेश देत असतो.

म्हणूनच नववर्षाच्या या पवित्र क्षणी आपण ब्रह्मध्वजाला वंदन करतो —

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥

 

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४८

‘पराभव’ नाम संवत्सर

विक्रम संवत् २०८२–८३

सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

 

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला ! अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत ! ‘शर्करा अवगुंठीत’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ ! मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच ! कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्ट पुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या “ ! मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दांत उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत.

आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय? “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पोसारखा पडलेला असतो “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मन दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल. “ एखादीसाठी “इतकी रुपवान आहे की वाटेवरचा चोर सुद्धा उचलून नेईल” (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा

 ‘ चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक ‘ असे उल्लेख असत आणि त्यावरून रुपाचा अचूक अंदाज येई !

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ, जमदग्नीचा अवतार, दुर्वास मुनी, पिंपळावरचा मुंजा, पाप्याचं पितर, लुंग्या सुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडणं टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ती व्यक्ती’चा ‘तो व्यक्ती’ कधी झाला, समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “** पण नांदा“ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो!तसंच, ही मराठीपण आपलीच आहे, नाही का ?

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रांगोळी अशी ही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रांगोळी अशी ही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

निळ्या आभाळी

नाजुक रांगोळी

रेखिलीय कोणी

सकाळी सकाळी!!

*
वारा वाहे तशी

बदलते नक्षी

आभाळ अंगण

तयासाठी साक्षी!!

*

रंग रांगोळीचा

फिकट लिंबोळी

निळ्या लिंबोळीची

आगळी ही खेळी!

*

रंगसंगती ही

मना पाडी भूल

आभाळाचं चित्र

मनात रेखलं!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वेड्याला वेळीच आवरा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ वेड्याला वेळीच आवराश्री प्रमोद वामन वर्तक ☆

लोटून जगाला भयंकर 

तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत 

वेडा “तात्या” स्वतः निघाला

आरूढ होण्या मुद्रेवर घाईत

*

जगात डागाळलेली प्रतिमा 

स्वच्छ होईल कां स्वर्णमुद्रेने?

अहंकाराचा मेरूमणी म्हणून 

पूर्वीच ओळखले त्या जगाने

*

बगल मारून कायद्याला

“तात्या” स्वर्णनाणे छापणार 

स्वतः नरकवासी झाला तरी 

शिक्का बनून अमर राहणार

*

द्यावी सु्बुद्धी लवकर त्याला 

आज विनवितो मी येशूला 

नाहीतर एका ठार वेड्यामुळे 

अंत जगाचा तो ठरलेला

अंत जगाचा तो ठरलेला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३१५ ☆ महाभारत नहीं रामायण… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख महाभारत नहीं रामायण। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३१५ ☆

☆ महाभारत नहीं रामायण… ☆

‘जब तक सहने की चरम सीमा रहेगी, रामायण लिखी जाएगी। मांगा हक़, जो अपने हित में महाभारत हो जाएगी।’ जी हाँ! यही सत्य है जीवन का, जो सदियों से धरोहर के रूप में सुरक्षित है। इसलिए नारी को सहन करने की शिक्षा दी जाती है, क्योंकि मौन सर्वश्रेष्ठ व सर्वोत्तम निधि है। वैसे तो यह सबके लिए वरदान है। बड़े-बड़े ऋषि-मुनियों ने मौन रहकर व चित्त को एकाग्र कर अपने अभीष्ठ को प्राप्त किया है और जीव-जगत् व आत्मा-परमात्मा के रहस्य को जाना है। जब तक आप में सहन करने की शक्ति व त्याग करने का सामर्थ्य है; परिवारजन व संसार के लोग आपको सहन करते हैं, अन्यथा जीवन से बेदखल करने में पल-भर भी नहीं लगाते। विशेष रूप से नारी को तो बचपन से यह शिक्षा दी जाती है, ‘तुम्हें सहना है, कहना नहीं’ और वह धीरे-धीरे उसे जीने का मूलमंत्र बना लेती है तथा पिता, पति व पुत्र के आश्रय में सदैव मौन रहकर अपना जीवन बसर करती है।

वास्तव में नारी धरा की भांति क्षमाशील व सहनशील है; गंगा की भांति निर्मल व निरंतर गतिशील है; पापियों के पाप धोती है; पर्वत की भांति अटल है, परंतु कभी उफ़् नहीं करती। इसी प्रकार नारी भी ता-उम्र सबके व्यंग्य-बाणों के असंख्य भीषण प्रहार व ज़ुल्म हंसते-हंसते सहन करती है… यहां तक कि वह कभी भी अपना पक्ष रखने का साहस  नहीं जुटा पाती। वैसे तो पुरुष वर्ग द्वारा यह अधिकार नारी-प्रदत्त हैं ही नहीं। सो! वह दोयम दर्जे की प्राणी समझी जाती है– एक हाड़-मांस की जीवित प्रतिमा, जिसे दु:ख-दर्द होता ही नहीं, क्योंकि उसका मान-सम्मान नहीं होता। इसलिए आजीवन कठपुतली की भांति दूसरों के इशारों पर नाचना उसकी नियति बन जाती है। वह आजीवन समस्त दायित्व-वहन करती है; उसी आबोहवा में स्वयं को ढाल लेती है; दिन-भर घर को सजाती-संवारती व व्यवस्थित करती है और वह उस अहाते में स्वयं को सुरक्षित अनुभव करती है। बच्चों को जन्म देकर ब्रह्मा व उनकी परवरिश कर विष्णु का दायित्व निभाती है और उसके एवज़ में उसे उस घर में रहने का अधिकार प्राप्त होता है; जिसे वह कभी अपना कह ही नहीं सकती। यदि वह संतान को जन्म देने में असमर्थ रहती है, तो बाँझ कहलाती है और उससे उस घर में रहने का अधिकार भी छीन लिया जाता है, क्योंकि वह वंश-वृद्धि नहीं कर पाती। परिणाम-स्वरूप पति के पुनः विवाह की तैयारियां प्रारंभ की जाती हैं। इस स्थिति में साक्षर-निरक्षर का भेद नहीं किया जाता है… भले ही वह अपने पति से अधिक धन कमा रही हो; अपने सभी दायित्वों को सहर्ष वहन कर रही हो। मुझे स्मरण हो रही है ऐसी ही एक घटना…जहां एक शिक्षित नौकरीशुदा महिला को केवल बाँझ कह कर ही तिरस्कृत नहीं किया गया; उसे पति के विवाह में जाने को भी विवश कर लिया गया, ताकि उसकी मांग में सिंदूर व गले में मंगलसूत्र धारण करने का अधिकार कायम रह सके और उसे विवाहिता के रूप में उस छत के नीचे रहने का अधिकार प्राप्त हो सके। परंतु एक अंतराल के पश्चात् घर में बच्चों की किलकारियां गूंजने के पश्चात् घर- आँगन महक उठा और वह खुशी से अपना पूरा वेतन घर में खर्च करती रही। धीरे-धीरे उसकी उपस्थिति नव-ब्याहता को अखरने लगी और वह उस घर छोड़ने को विवश हो गयी। परंतु फिर भी वह मांग में सिंदूर धारण कर पतिव्रता नारी होने का स्वांग रचती रही। है न यह उसके प्रति अन्याय…. परंतु उस पीड़िता को सब मूर्ख समझते हैं, जिसने घर फूंक कर तमाशा देखा है। इसलिए उसके पक्ष में कोई भी आवाज़ नहीं उठाता।

सो! जब तक सहनशक्ति है, आपकी प्रशंसा होगी और रामायण लिखी जाएगी। परंतु जब आपने अपने हित में हक़ मांग लिया, तो महाभारत होना निश्चित है। वैसे भी अधिकारों की मांग करना–संघर्ष का आह्वान करना है और संघर्ष से महाभारत हो जाता है और जीवन का कोई भी पक्ष इससे अछूता नहीं रहता। राजनीति हो या धर्म; घर-परिवार हो या समाज; हर जगह इसका दबदबा कायम है। राजनीति तो सबसे बड़ा अखाड़ा है, परंतु आजकल तो सबसे अधिक झगड़े धर्म के नाम पर होते हैं। 

घर-परिवार में भी अब इसका पूर्ण हस्तक्षेप है। पिता-पुत्र, भाई-भाई व पति-पत्नी के जीवन से स्नेह-सौहार्द इस प्रकार नदारद है, जैसे चील के घोंसले से माँस। जहां तक पति-पत्नी का संबंध है, उनमें समन्वय व सामंजस्य है ही नहीं… वे दोनों एक-दूसरे के प्रतिद्वंद्वी के रूप में अपना क़िरदार निभाते हैं, जिसका मूल कारण है अहं; जो मानव का सबसे बड़ा शत्रु है। इसी कारण वे आजकल एक-दूसरे के अस्तित्व को भी नहीं स्वीकारते; जिसका परिणाम अलगाव व तलाक़ के रूप में हमारे समक्ष है। वैसे भी आजकल संयुक्त परिवार-व्यवस्था का स्थान एकल परिवार- व्यवस्था ने ले लिया है, परंतु फिर भी पति-पत्नी आपस में प्रसन्नता से अपना जीवन बसर नहीं कर पाते और एक-दूसरे से निज़ात पाने में लेशमात्र भी संकोच नहीं करते। वैसे भी आजकल ‘तू नहीं, और सही’ का बोलबाला है। लोग संबंधों को वस्त्रों की भांति बदलने लगे हैं, जिसका मूल कारण ‘लिव-इन व प्रेम विवाह’ है। अक्सर बच्चे भावावेश में संबंध तो स्थापित कर लेते हैं और चंद दिन साथ रहने के पश्चात् एक-दूसरे की कमियाँ-ख़ामियाँ उजागर होने लगती हैं; जिन्हें वे स्वीकार नहीं पाते और परिणाम होता है तलाक़–जिसका सबसे अधिक खामियाज़ा बच्चों को भुगतना पड़ता है। वैसे आजकल सिंगल पेरेंट का प्रचलन भी बहुत बढ़ गया है। सो! इन विषम परिस्थितियों में बच्चों का सर्वांगीण विकास कैसे संभव है? एकांत की त्रासदी झेलते बच्चों का भविष्य अंधकारमय हो जाता है। वे असामान्य हो जाते हैं; सहज नहीं रह पाते और वह सब दोहराते हुए अपना जीवन नरक-तुल्य बना लेते हैं। 

ग़लत लोगों से अच्छी बातों की अपेक्षा कर हम आधे ग़मों को प्राप्त करते हैं और आधी मुसीबतें हम अच्छे लोगों में दोष ढूंढ कर प्राप्त करते हैं। ग़लत साथी का चुनाव करके हम अपने जीवन के सुख-चैन को दाँव पर लगा देते हैं और दोष-दर्शन हमारा स्वभाव बन जाता है, जिसके परिणाम- स्वरूप हमारा जीवन जहन्नुम बन जाता है। आजकल लोग भाग्य व नियति पर कहाँ विश्वास करते हैं? वे तो स्वयं को भाग्य-विधाता समझते हैं और यही सोचते हैं कि उनसे अधिक बुद्धिमान संसार में कोई दूसरा है ही नहीं। इस प्रकार वे अहंनिष्ठ प्राणी पूरे परिवार की जीवन भर की खुशियों को लील जाते हैं। संदेह व अविश्वास इसके मूल कारक होते हैं। सो! समाज में शांति कैसे व्याप्त रह सकती है? इसलिए बीते हुए कल को याद करके उससे प्राप्त सबक़ को स्मरण रखना श्रेयस्कर है। मानव को अतीत का स्मरण कर अपने वर्तमान को दु:खमय नहीं बनाना चाहिए, बल्कि उससे सीख लेकर अपने भविष्य को उज्ज्वल बनाना चाहिए। जीवन में सफलता पाने का मूलमंत्र यह है कि ‘उस लम्हे को बुरा मत कहो, जो आपको ठोकर पहुँचाता है; बल्कि उस लम्हे की कद्र करो, क्योंकि वह आपको जीने का अंदाज़ सिखाता है। दूसरे शब्दों में अपनी हर ग़लती से सीख गहण करें, क्योंकि आपदाएं आपके धैर्य की परीक्षा लेती हैं और मज़बूत बनाती हैं। सो! ग़लती को दोहराओ मत। जो मिला है, उन परिस्थितियों को उत्तम बनाने की चेष्टा करो; न कि भाग्य को कोसने की। हर रात के पश्चात् सूर्योदय अवश्य होता है और अमावस के पश्चात् पूनम का आगमन भी निश्चित है। जीवन में आशा का दामन कभी मत छोड़ें, क्योंकि गया वक्त लौटकर कभी नहीं आता। हर पल को सुंदर बनाने का प्रयास करें। जीवन में सहन करना व त्याग करना सीखें, क्योंकि अगली सांस लेने के लिए मानव को पहली सांस का त्याग करना पड़ता है। संचय की प्रवृत्ति का त्याग करें। इंसान खाली हाथ आया है और उसे खाली हाथ ही इस संसार से लौट जाना है। सो! सदाशयता को अपनाएं और दूसरों के प्रति कर्तव्यनिष्ठता का भाव रखें, क्योंकि कर्त्तव्य व अधिकार अन्योन्याश्रित हैं। अधिकार-स्थापत्य अशांति- प्रदाता है, जो हृदय का सुक़ून छीन लेता है। इसलिए उसे अपने जीवन से बाहर का रास्ता दिखा दें, ताकि हर घर में रामायण की रचना हो सके। पारस्परिक ईर्ष्या-द्वेष व संघर्ष को जीवन में पदार्पण मत करने दें, क्योंकि ये महाभारत के जनक हैं, प्रणेता हैं। सो! अलौकिक आनंद से अपना जीवन बसर कर लें।                   

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares