मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

‘वर्डस्वर्थ‘ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.

टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.

आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.

टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.

—–

☆ गीत: ५८ ☆

LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and 

waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of 

pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५८ ☆

*

आनंदाचे स्वर अखेरच्या

गीतात माझ्या पाझरावे

अवखळ या हरिततृणावर

धरणीने त्या उधळावे

*

जन्ममरणाच्या यमलासी

विश्वात त्याने नाचवावे

कमळाच्या अश्रुत बसोनि

ओघळणे थांबवावे

*

आनंदाने त्या आनंदाला

मृत्तिकेसम उधळावे

या गीतातून तुला अखेरी

मी आनंदा अर्पावे

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ५९ ☆

YES, I know, this is nothing but thy love, O beloved of my heart ⎯ this golden light that 

dances upon the leaves, these idle clouds sailing across the sky, this passing breeze leaving its coolness upon my forehead.

The morning light has flooded my eyes ⎯ this is thy message to my heart. Thy face is 

bent from above, thy eyes look down on my eyes, and my heart has touched thy feet.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ५९ ☆

*

प्रकाश किरण सोनेरी

हिरवाई वरी नृत्य करी

*

जलद आक्रमिती नभा

शिरी घेऊनि अमृतकुंभा

*

तृप्तता होतसे जीवाची

मंद झुळूक येता वाऱ्याची

*

भरभरुनि मज देशी सारे

प्रेम यालाच म्हणती ना रे!

*

प्रभात किरणे घेऊन येती

तव संदेशा, मला सुखविती

*

आज सहज मी पाही तुला

ओणवुनि तू निरखिता मला

*

नजरानजर झाली आपुली

शतजन्मांची ओळख पटली

*

आणि त्याच अद्भुत क्षणी

सर्वस्व वाहिले तुझिया चरणी

 *

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६० ☆

ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.

They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.

They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.

The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.

On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,

ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the 

seashore of endless worlds is the great meeting of children.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६० ☆

*

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥धृ॥

*

खाली बंडखोर सागर, वर अविचल आकाश

निरागस कोवळी मने, रचिती आनंदाची रास

वाळूचे घर, त्यावर सुंदर शिंपल्याची नक्षी

वाळल्या पानांच्या बोटी, लाटांच्या वक्षी

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥१॥

*

वाळूत रेघोट्या, किड्यांमागे धावती

आत तांडव लाटांचे, किनारी मुले खेळती

रंगीत खडे गोळा करता, आनंद बाल जीवाला

सारी दौलत गोळा केली, उधळती सागराला

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥२॥

*

मच्छीमार माशांसाठी, तर कप्तान व्यापारासाठी,

कुणा खजिन्याचा मोह, उडी पाण्यात मोत्यांसाठी

ना कसब पोहण्याचं, ना खजिन्याची आस

ना जाळं विणण्याची कला, खेळ चाले झकास

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥३॥

*

वाटाहीन नभ अन् वादळ घुमे दिशाहीन

उध्वस्त बोटी, मृत्यूचे तांडव, पाणी मार्गहीन

लाटांचं हास्य क्रूर, शांत हास्य काठात

अंगाईचा झोका हले, क्रुद्ध लाटांच्या गीतात

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥४॥

*

– क्रमशः भाग २० 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे ☆

एका शांत आश्रमात एक साधक राहत होता. त्याने अनेक वर्षे तप, जप, ध्यान केलं होतं. आता सर्वजण त्याला “योगीजी” म्हणून ओळखू लागले होते.

एके दिवशी तो आपल्या गुरूकडे गेला—

“गुरुदेव, मला योग प्राप्त झाला आहे. आता मला पुढे काय करायचं? ”

गुरु हसले, पण काही बोलले नाहीत.

काही दिवसांनी तो पुन्हा आला—

“गुरुदेव, मला आता ज्ञानही झालं आहे. शास्त्रांचा अर्थ कळतो, आत्मा कळतो. ”

गुरु पुन्हा शांतच राहिले.

काळ गेला…

एक दिवस तो अत्यंत भावुक अवस्थेत आला— “गुरुदेव, आता माझ्या हृदयात अपार प्रेम आहे. मला वाटतं, मी प्रेमात पूर्ण झालो आहे. ”

यावेळी गुरु त्याच्याकडे प्रेमाने पाहून म्हणाल, “तू अजूनही ‘मी’ मध्येच आहेस. ”

साधक थोडा चकित झाला—

“गुरुदेव, मी इतकी साधना केली, तरी ‘मी’ कसा राहिला? ”

गुरु शांतपणे म्हणाले— “तू म्हणतोस— मी योगी आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रेमी आहे.

जोपर्यंत ‘मी’ बोलतो आहे, तोपर्यंत तू त्या अवस्थांचा भोग घेतो आहेस, त्यात अडकलेला आहेस. ”

हे ऐकून साधकाच्या मनात काहीतरी हललं…पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे खोल पाहिलं. त्या रात्री तो एकटाच बसला.

ना जप, ना ध्यान… फक्त शांत साक्षीभाव.

हळूहळू त्याला जाणवलं—

योग, ज्ञान, प्रेम… हे सगळं येतं आणि जातं पण “मी” जो म्हणतो आहे, तोच खरा अडथळा आहे.

अचानक त्याच्या आत काहीतरी विरघळलं…

जणू “मी” हा शब्दच नाहीसा झाला.

फक्त शांतता उरली…

निर्विचार, निरहंकार, नितळ अस्तित्व.

दुसऱ्या दिवशी तो गुरूकडे गेला…

पण यावेळी तो काही बोललाच नाही.

गुरु त्याच्याकडे पाहून हसले—

“आता तुला कळलं…

जिथे ‘मी’ नाही, तिथेच खरा योग, ज्ञान आणि प्रेम आहे. ”

योग प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण योगी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण योगाचे भोगीच आहोत.

आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण ज्ञानी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण ज्ञानाचे भोगीच आहोत.

तसेच प्रेम प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण प्रेमी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण प्रेमाचे भोगीच आहोत.

आणि बंधूंनो, जो प्रेमाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘कामाचा’ भोगी होऊ शकतो.

जो ज्ञानाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘अज्ञानाचा’ भोगी होऊ शकतो.

आणि जो योगाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘भोगाचा’ भोगी होऊ शकतो.

आपली बुध्दी ही खऱ्या ज्ञानापर्यत पोहोचण्यातील खरा अडथळा आहे! हे जाणवणं म्हणजे खरी स्वयंजागृती! ज्याला मी समजतो तो मी मर्यादित आहे व आज बुध्दीचा विलय झाल्यावर उरला तो‌खरा मी आहे जो अनंत आहे अमर्याद आहे असीम आहे, अमर्याद आहे.

कुठे होता तो? आतच होता पण झाकोळला होता मर्यादित मी ने च! इतर कशाचाही अडथळा नव्हता असे समजल्यावर दोषारोप थांबतात व कृतज्ञताच प्रगट होते जी आतून, हृदयातून, सहजतेने प्रकट होते.

 “मीपण विरघळे”(वृत्त: आर्या)

मीपण धरुनी अंतरी, म्हणे “मी योगी ज्ञानी” ।

भावांच्या या लहरींमध्ये, अडकला जीव अभिमानी ॥

ज्ञानदीप उजळता, उरला तरी सूक्ष्म अहंभाव ।

प्रेमाच्या त्या सागरात, उठती “मीपणाचे” ठाव ॥

शांत बसुनी पाहता, विरती सारे भाव हळूच ।

उरे न काही म्हणण्यास, साक्षी निखळ तोच ॥

जिथे नाही “मी”पणा, तिथेच सत्य फुले सहज ।

योग-ज्ञान-प्रेम एक, तेथेच परम तेज ॥

 

“‘मी’ हा सूक्ष्म धागा सुटेपर्यंत, साधना पूर्ण होत नाही;

तो विरघळला की सर्व एकरूप होतं.”

“जोपर्यंत ‘मी’ आहे, तोपर्यंत साधना आहे;

जिथे ‘मी’ विरघळतो, तिथेच सत्य प्रकट होतं.”

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू.

(भारतीय सैन्याच्या The Army Medical Corpsचा स्थापना दिन ३ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला! त्यानिमित्ताने विशेष लेख)

जेंव्हा दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकतात… तेंव्हा केवळ दोन सैन्यदलं लढत नाहीत… तर दोन व्यवस्था, दोन मनोवृत्ती युद्धभूमीत दोन हात करीत असतात… आणि जिंकते तेच सैन्य ज्याच्यातील प्रत्येक घटक देशप्रेमाने ओतप्रोत भरून गेलेला असतो… आणि हिंदुस्तान असाच एक देश आहे!

आपल्यासाठी तळहातांवर प्राण घेऊन लढणा-या सैनिकांच्या पाठीशी अनेक यंत्रणा कार्यरत असतात… त्यात अगदी रणभूमीवर स्वत:चे प्राण संकटात टाकून उभे असतात ते डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंटस… हे जणू स्टेथोस्कोपधारी सैनिकच!

वर्ष १९९९. १९८९ मध्ये पुण्याच्या The Armed Forces Medical College मधून एम. बी. बी. एस. चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशाच्या विविध सीमांवर intern म्हणून अनुभव घेतल्या नंतर लखनौ येथील Officers’ Training College मध्ये the Medical Officers’ Basic Course हा एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधीत लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. या प्रशिक्षणात पी. टी. , संचलन, लष्करी कायदे, लष्करी जीवनपद्धती, शस्त्र चालवणे इत्यादी सर्व शिकावे लागते… एखाद्या सैनिकासारखे. कारण सेनेत फिल्ड हॉस्पिटल्स अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमीवर तात्पुरत्या उभारल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये तैनात डॉक्टर्स सैनिकांच्या सदैव जवळपास असतात… हे परिपूर्ण सैनिकी डॉक्टर्स असतात!

१९९९ वर्ष सुरु होते. लेफ्टनंट डॉक्टर अरूप यांना काश्मिरात कारगिल भागातल्या एका छोट्या गावात स्थित असलेल्या एका सैनिकी फिल्ड हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचा आदेश प्राप्त झाला होता. इथले सर्जन काही महिन्यांच्या रजेवर जात होते, त्यांच्या जागी अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. डॉक्टरसाहेब सर्जरीमध्ये तज्ज्ञ होते… या छोट्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कर्तृत्वाला कितीसा वाव मिळेल?  अशी त्यांना शंका होती. ते रुजू झाले मात्र कंटाळून गेले. तिथे अन्य काही डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंस होतेच, पण सर्जन असे ते एकमेवच होते. शिवाय इथं आधुनिक असं फारसं काही नव्हतं. आपले इतर सहाध्यायी शहरांमध्ये, अत्याधुनिक रुग्णालयांच्या सुसज्ज शस्त्रक्रियागृहांत सर्जरी करीत असतील आणि इथं आपण या दुर्गम भागात आपले सर्जरीमधले कौशल्य सराव नसल्याने गमावून बसू की काय असं डॉक्टर बसू यांना वाटणं स्वाभाविकच होतं! शिवाय काश्मीर पुस्तकातील वर्णनात अगदी सुंदर, छान, आल्हाददायक असले तरी सीमेवर प्रचंड थंडी असते, रस्ते धोकादायक आणि वातावरण तसे नीरस… शिवाय अतिरेक्यांचा धोका तर चोवीस तास!

काहीही कितीही कारणे सांगितली तरी भारताच्या डोळ्यांत माती उधळीत पाकिस्तान भारताच्या सीमेत अगदी खोलवर घुसून बसला आहे, हे संरक्षण यंत्रणेच्या लवकर लक्षात आलं नाही! आणि याची किंमत जीवाच्या आकडेवारीच्या संख्येत सांगायची झाल्यास ५२७ मृत आणि १३६३ जायबंदी एवढी प्रचंड आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान मोठे असणार यात शंका नाही!

पाकिस्तानने ताब्यात घेतलेली सैन्यठिकाणे, सैन्यचौक्या परत मिळवायला सैनिकांना उंच पर्वत चढत जायला लागले… आणि पाकिस्तानी सैन्य नेम धरून गोळीबार करायला मोकळे होते… मोक्याच्या जागी सज्ज होते!

लेफ्ट. डॉक्टर बसूंच्या रुग्णालयात आता थंडी-तापाचे रुग्ण येत नव्हते… तर शरीरात गोळ्या घुसलेले, रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या मुखात जाण्याच्या बेतात असलेले रुग्ण येऊ लागले! सुरुवातीला रोज रात्री दोन, चार नंतर नंतर तीस-चाळीस. पंधरा-वीस खाटांचे ते रुग्णालय. गोळीच्या जखमा म्हणजे शस्त्रक्रिया अत्यावश्यक. उपलब्ध यंत्रसामग्री आवश्यकतेच्या मानाने तोकडी!

सैनिक दिवसा उजेडी पहाड चढत होते, लढत होते… जखमी होत होते! त्यांना दिवसाउजेडी खाली आणणे म्हणजे खाली आणणा-या लोकांच्या जीवाला मोठा धोका. कारण पाकिस्तानी गोळीबार दिवसा तर अगदीच अचूक होणार! मग आपल्या सैन्याच्या बहुतांश मोहिमा रात्रीच्या अंधाराचा आडोसा घेत सुरु झाल्या. आता जखमी सैनिक रात्रीच्या वेळीच रुग्णालयात आणले जाऊ लागले. सैनिक रात्री जखमी झाला, आणि त्याला खाली रुग्णालयात हलवताना दिवस उजाडला की रात्रीचा अंधार पडेपर्यंत काहीही हालचाल करता येणे शक्य नसे… कारण तेच… पाकिस्तानी गोळीबार!

डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी संपूर्ण रात्र या जखमी सैनिकांवर उपचार करण्यात घालवीत… संख्या वाढत चालली होती म्हणजे… युद्धात आपली अजून सरशी होत नव्हती! प्रत्यक्ष समोरासमोर लढण्यापूर्वीच आपले सैनिक शत्रूने लपून केलेल्या हल्ल्यात जायबंदी होऊन खाली परतत होते… सैनिक मनातून हताश होते आरंभी! भारतीय वायुसेना युद्धात उतरली आणि भारतीय सैनिक वेगाने पुढे जाऊ लागले… पण युद्धभूमी अजूनही शत्रूवरच मेहरबान होती!

२९ मे, १९९९. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा साहेबांचा देह अशाच एका रात्री रुग्णालयात आणण्यात आला! आहुजा साहेबांना पाकिस्तान्यांनी अनन्वित छळ करून मारले होते… उत्तरीय तपासणीत सारं स्पष्ट होतं! … युद्ध पुढं सुरूच होतं… रात्री जखमी सैनिक रुग्णालयात आणले जात होते… डॉक्टर आणि इतर सेवेकरी अपु-या साधनांच्या सहाय्याने पूर्ण प्रयत्न करून त्यांना अत्यावश्यक उपचार देत होते… आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून पुढे उपचारार्थ नेले जात होते… प्राणांतिक जखमांवर आरंभीच्या Golden Hour मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते… ते डॉक्टर बसू आणि त्यांचे सहकारी महत्प्रयासाने देत होते.

डॉक्टर साहेब जखमी सैनिकांशी संवादही साधत होते. त्यांनी सांगितलेले अनुभव वहीत टिपूनही ठेवत होते… अशा अनेक गोष्टी ज्या कुठेही नोंदवल्या गेलेल्या नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी राहिलेले सैनिक, केवळ बर्फ चघळत जिवंत राहून सातव्या, आठव्या दिवशी रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलेले सैनिक, युद्धातील प्रचंड संहार पाहून मानसिक संतुलन गमावलेले सैनिक… प्रत्येकाची कहाणी वेगळी!

इथल्या रुग्णालयात सर्जरी करण्याची संधी मिळणार नाही म्हणून निराश झालेले डॉक्टर बसू आता रोज चार, पाच सर्जरी करीत होते… मात्र यात त्यांना आनंद नव्हता… तरुण सैनिक असे घायाळ झालेले त्यांना पाहवत नव्हते…! पण काळजावर दगड ठेवीत तहान-भूक विसरून काम सुरु होते!

रुग्णांना रुग्णालयात हलवण्यासाठी तयार केलेल्या Helipad पर्यंत शत्रूचे तोफगोळे येऊन आदळत होते… त्याही स्थितीत पायलट उड्डाणे करीत होते! डॉक्टर्स रुग्णावर उपचार करीत आहेत आणि त्यांच्या पासून केवळ काही मीटर्सवर गोळा आदळतो आहे… अशीही स्थिती होत होती… रुग्नालां सोडून पळून दूर जाताही येत नव्हतं. सैनिक म्हणत होते… ”डॉक्टर साहेब, आमच्यावर गोळा पडला आणि आम्ही जखमी झालो तर आमचा जीव वाचवायला इथं तुम्हीच आहात… तुमच्यावर गोळा पडला आणि तुम्हीच जखमी झालात तर आमचं कसं होईल? ” सैनिकांचं बरोबर होतं… पण त्याला काही इलाज नव्हता. रुग्णालयाच्या छतावर तोफगोळ्यांचे तुकडे आदळत असताना डॉक्टर बसू आणि सहकारी डॉक्टर्स सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या मोठ्या कौशल्याने बाहेर काढीत त्यांच्या जखमा शिवत होते… त्यांना मृत्यूमुखातून बाहेर आणीत होते. यांपैकी काही तर पुन्हा लढायला निघूनही गेले… this is Indian Army!

९ जून, १९९९. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदार सैनिकांचे मृतदेह रुग्णालयात आणले गेले… उत्तरीय तपासणीसाठी! नृशंस शब्दाला जर समानार्थी शब्द द्यायचा झाल्यास या हुतात्म्यांचे देह दाखवावेत अशी परिस्थिती! हे देह पाहून, त्यांच्यावरच्या जखमा पाहून रुग्णालयात जखमी होऊन पडलेले जातिवंत सैनिक म्हणत होते… ”आम्हांला लवकर बरे करा… आम्हांला परत लढायला धाडा… आता आम्ही शत्रूच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय परतणार नाही! ” पेटून उठलेल्या सैनिकांनी पुढे इतिहास घडवला. भारतीय वाघांनी अंगावर आलेल्या कोल्हया-कुत्र्यांच्या नखांचे ओरखडे सहन करीत त्यांची नरडी फोडली!

वाघ रक्तबंबाळ झाले, काही कामी आले… पण सरशी झाली ती वाघांचीच. ज्याला लोक सशस्त्र संघर्ष म्हणतात ते युद्ध त्यात लढलेल्या सैनिकांसाठी महायुद्धच होतं… अत्यंत विपरीत परिस्थितीत लढावं लागणं म्हणजे महायुद्धच. यात कामी आलेले सैनिक कोवळ्या वयातले, तरणेबांड होते… शेकडो मातांनी त्यांचे एकुलते एक मुलगे गमावले. वीरपत्नी सुद्धा संख्येने भरपूर झाल्या… फार मोठी किंमत म्हणजे हीच! ज्यांची मुले, ज्यांची सौभाग्ये गमावली गेली… त्यांच्यासाठी जग बुडाले!

ऑपरेशन विजय त्यावेळेपुरते संपले! डॉक्टर साहेबांची सर्जिकल ऑपरेशन्ससुद्धा संपली तात्पुरती. ३०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या त्या ५६ दिवसांत. वरिष्ठ डॉक्टर्स लोकांनी डॉक्टर बसू यांचे नामकरण केले… The Kargil Surgeon! यातील दोन सैनिकांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत… कारण त्यांच्या जखमाच जीवघेण्या होत्या… आणि दिवसा त्यांना रुग्णालयात आणता आले नव्हते… उशीर झाला होता!

हे सारे अनुभव लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू यांनी पुढे शब्दबद्ध केलेत… The Kargil War Surgeon’s Testimony हे या पुस्तकाचे शीर्षक असून ते मी विकत घेतले आहे. याचे भाषांतर करायला मिळाले तर भारी होईल. असो.

या पुस्तकात आकडेवारी, लष्करी व्यूहरचना यात नाहीत… यात अनेक प्रश्न आहेत… ज्याची उत्तरे कुणाकडेही नसतील! पण देश युद्ध कुणाच्या रक्ताच्या बलिदानाने जिंकतो हे मात्र समजू शकते. रणांगणात आपल्या देशाचा ध्वज रोवल्याशिवाय आपण युद्ध जिंकले आहे असे होत नाही… आणि हे करणारा पायदळाचा साधा सैनिकच असतो! असं डॉक्टर बसू म्हणतात!

प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांच्या मागे सावलीसारखे राहून, प्रसंगी जीवाचे बलिदान देत भारतीय सैन्याचे वैद्यकीय कर्मचारी एक प्रकारचे युद्धच लढत असतात, हे खरेच. Army Medical Corps च्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्या सर्वांना अभिवादन करूयात. महाराष्ट्राच्या कन्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर साहेबा यांनी या दलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांनी तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष पहाडांवर जाऊन जखमी सैनिकांचे जीव वाचवले आहेत… स्वत: शत्रूवर गोळ्या झाडलेल्या आहेत. भारतीय सैन्यात अशा मराठी सैनिक-धन्वंतरींची संख्याही मोठी आहे!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

गौतम बुद्ध यांची पत्नी – यशोधरा.

अबला जीवन हाय! तेरी यही कहानी,

आंचल में है दूध और आंखोंमें पानी! 

हे उद्गार आहेत… हिंदी कविवर्य मैथिलीशरण गुप्त यांच्या एका प्रसिद्ध रचनेतील!

एक रात्र… शाक्य गणराज्याच्या राजपुत्र सिद्धार्थ ची पत्नी *यशोधरा* सुशील, सौंदर्यवती, जिच्या प्रसव वेदना अजुनही ताज्या च आहेत मनात… एक दिवसाचा नवजात पुत्र राहुल मातेच्या कुशीत आश्वस्त होऊन गाढ झोपलेला… यशोधरा ही क्लांत पण पुत्र जन्माच्या आनंदात,

पुढील आयुष्याच्या स्वप्नात शांत, निश्चिंत मनाने झोपलेली! आणि… अशावेळी अघटित घडते… तीन प्रसंग 

जरा, मृत्यू आणि व्याधी बघून व्यथित झालेला सिद्धार्थ, जीवनाचं सत्य शोधायला… पत्नी यशोधरा, पुत्र राहुल, राजसी ऐश्वर्य, आणि परिवार या सगळ्याचा त्याग करून… दूर निघून जातो. सुंदर पत्नी, नवजात पुत्र यांचा मोह ही त्याला थांबवू शकत नाही. नंतर त्याला कठोर तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती होते, तो *गौतम बुद्ध* होतो. त्याची कथा इतिहासात, आणि आध्यात्मिक इतिहासात नोंदली गेली. पण… *यशोधरेचं* काय?  जिला तो न भेटताच, तिचा साधा निरोप ही न घेता… निर्मोही बनून, तिला मागे नवजात पुत्रासह सोडून गेला??  

त्याच्या मागे यशोधरा आणि राहुल कसे राहिले?  त्यांचं काय झालं?  याची कुठेच नोंद नाही. सिद्धार्थ च्या तपात तिचंही… एक पत्नी, एक सून, एक माता म्हणून योगदान उपेक्षितच राहिलं ना!

यशोधरा फक्त सिद्धार्थ ने सोडून दिलेली पत्नी नाहीच मुळी!! तिचेही अधोरेखित करावेत असे किती तरी पैलू आहेतच की!!

यशोधरा… मौनातल्या दृढतेची आणि धीरोदात्त, खंबीर, निग्रही आणि एका सच्च्या क्षत्राणीची कहाणी… म्हणजे यशोधरा!! सिद्धार्थ ची पत्नी… येवढीच तिची ओळख पुरेशी नाहीच! तिला बुद्धाच्या छायेतून, सावलीतून बाहेर काढून बघितलं तर लक्षात येते ती तिच्या परिपक्वतेची, समंजसपणाची आणि एका आदर्श पत्नी आणि मातेच्या आदर्शाची उंची, खोली आणि व्याप्ती!! आपल्या पतीला राजकुमार ते बुद्ध या परिवर्तित रूपात, संयमाने, धीराने, स्थिर चित्त होऊन बघणं सोपं नाही ना एका पत्नी साठी??  पण हे परिवर्तन तिनं पेललं समर्थ पणे! तिने तिचं विरहाचं दु:ख, तिच्या अनावर भावनांचा आवेग… आक्रोशात नाही व्यक्त होऊ दिला.

तिने अत्यंत शांत आणि समजदार भूमिकेतून, सिद्धार्थ ने स्वीकारलेल्या मार्गाकडे बघितलं… आणि तिच्या लक्षात आलं की, सिद्धार्थचा हा मार्ग त्या दोघांना त्यागणं यापेक्षा त्या दोघांपेक्षा ही काहीतरी, मोठं, महान, महत्त्वाचं असं मिळवणं यासाठी होता.

आणि बस्स्… त्याच क्षणी यशोधराने ही भगवी वस्त्रे परिधान करून, राजसी वस्त्रालंकार त्यागून.. दिवसातून एकदाच भोजन करण्यास सुरुवात केली… तिने ही पत्नी धर्म पालन करंत, पतीच्या तपात स्वतः च्या तपाच्या समिधा अर्पण करंत, त्याला मौन साथ देत जणू पाठबळंच दिलं. त्याच्या बुद्ध होण्याच्या मार्गात ती आक्रोशाची, ऊलाहनेची धोंड न होता… त्याच्या आध्यात्म प्रवासातील खरी *अर्धांगिनी* होत… *सहधर्मचारिणी* सिद्ध झाली… सिद्धार्थ ची सिद्धा झाली! योग्याची योगिनी झाली. त्याग आणि प्रेम दोन्ही ही हातात हात घालून चालू शकतात, हे सिद्ध केलं यशोधरेने!

पती असा न सांगता सोडून गेला… उरात न मावणारं, उर फुटून बाहेर येणारं दु:ख होतंच की… पण यशोधरेने समजावलं स्वतःला…

 अब कठोर हो वज्रादपि ओ कुसुमादपि सुकुमारी,

 आर्य पुत्र दे चुके परीक्षा, अब है मेरी बारी!!

आणि दाखवून दिलं की… खरं प्रेम स्वार्थाचा पलीकडचं असतं! खरा वारसा तोच… जो आत्म्याला शांती आणि मोक्षा कडे घेऊन जाईल. तिला पती ने दिलेला हा वारसा कळला, पटला ही… आणि तिने तोच वारसा मग पुत्र राहुल यालाही देऊन त्यालाही भिक्षू/ भिख्खू बनण्याच्या वाटेवर चालण्याचं सामर्थ्य त्याच्या पावलांत देत, चालायला शिकवलं.

यशोधरेला फक्त एकच सल मनात बोचला की, पती तिला न सांगता गेला. तिचा स्वाभिमान दुखावला! एक पत्नी ची वेदना उरी दाटली की… पतीचा तिच्यावर येवढा ही विश्वास नव्हता की ती एक क्षत्राणी आहे… जी आपल्या पतीला औक्षण करून, मंगल तिलक लावून, त्याच्या यशाची कामना करते आणि अभिमानाने त्याला निरोप देते! पण सिद्धार्थ ने तिला आणि राहुल ला आपल्या मार्गातील बाधा मानले. ती तिच्या सखी जवळ हेच म्हणंत राहिली…

सखी वे मुझसे कहकर जाते, कह, तो क्या वे मुझे अपने पथ की बाधा पाते? 

त्याने तिला ओळखलंच नाही… याचं मात्र तिला दु:ख खूप च झालं. स्वाभिमान दुखावला तिचा. पण तरीही तिने नंतर बुद्धांकडूनच पुत्राला ही बौद्ध धर्माची दिक्षा देवविली आणि स्वतः ही घेतली. अरहंत पदापर्यंत ही जाऊन पोहोचली. भद्रकात्यायनी या नावाने ही ओळखली जाते.

अशी ही अलक्षित… पण… स्त्री जातीला महिमा आणि गरिमा मंडित करणारी… परित्यक्ता नाहीच… तर… तपस्विनी, त्यागमयी, तेजोमयी शलाका… जी चैतन्य युक्त, चेतलेलीच ठेवू यात.

– लेख क्र. ३ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी जग… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

एकेकाळी भारतात औषध म्हणूनही उपलब्ध नसलेला मानसिक आजार नावाचा रोग आता जवळजवळ प्रत्येकाच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे डोके वर काढू लागला आहे. याला जबाबदार कोण?  अमेरिका, इंग्लंड की अन्य कोणी?  बघा, विचार करा?  

याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येईल.

  • आधुनिक जीवनपद्धती,
  • विभक्त कुटुंब व्यवस्था,
  • हातात खेळणारा पैसा,
  • मी कसा आहे हे दिसण्यापेक्षा मी कसा असायला हवा हे दाखवण्याची अहमहिका आणि त्यातून स्वतःच निर्माण केलेली अनावश्यक स्पर्धा,
  • नकार पचविण्याची कमी होत चाललेली क्षमता,
  • मुलांना फुलझाडांसारखे न वाढवता फुलांसारखे जपणे,
  • सनातन वैदिक परंपरांबद्दल अनादर… ,
  • सामाजिक माध्यमांचा अति आणि गैरवापर, स्वतःची क्षमता न पाहता स्वतःकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा
  • वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसणे.
  • व्यायामाचा अभाव
  • आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाररिक हालचालींवर आलेली मर्यादा.

अनावश्यक आणि चमचमीत अन्नपदार्थ

  • अमली पदार्थांचे सेवन
  • वेदना शामक गोळ्यांचा अतिवापर
  • स्टेटस जपण्याची स्पर्धा

यात आपण आणखी काही मुद्दे जोडू शकाल…

मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर हृदयरोग आणि हृदयाला झटका येऊन गेला आहे अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने ४५ ते ६० या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात कोणाला तरी हृदय विकार असेल किंवा कधीतरी झटका येऊन गेल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्यावेळी त्यांची झालेली मानसिक, शाररिक, भावनिक आणि आर्थिक घालमेल आणि ओढाताण आपण पाहिली असेल…

मानसिक आरोग्य उत्तम असणे ही निरामय जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे.

आपण समस्या पाहिली, आता यावर उपाय पाहूया.

  1. स्वतः का प्रश्न विचारा. आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे का?
  2. मेंदू सशक्त हवा त्यासाठी मन आरोग्य महत्वाचे.
  3. शांत मन, चिडचिड नको, मानसिक आरोग्य यासाठी आनंदी रहावे
  4. छोट्या गोष्टीत आनंद शोधा.
  5. सुखाच्या मागे धावल्याने आजचे सुख गमावताय.
  6. प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवा.
  7. काळजीत वेळ घालवू नका.
  8. छंद जोपासा.
  9. मन मोकळे करा, नंतर करु असे नको.
  10. पक्षांचे (BIRDS’) आवाज आनंदी करते.
  11. सकाळी फिरायला जा.
  12. योग, प्राणायाम व ध्यान.
  13. हसतमुख रहा/ Be Cheerful 
  14. मेंदूचे दोन्ही भाग वापरा कलागुण यात येते. LEFT side of BRAIN is for ROUTINE ACTIVITIES & RIGHT SIDE of BRAIN is for CREATIVE ACTIVITIES. Make more use of Right side of brain.
  15. मन मोकळे करा, मनांत काही ठेऊ नका.
  16. *आध्यात्मिक विकास व्हावा ही काळाची गरज* यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका.
  17. शांत झोप ही हेल्दी मनाची पायरी.
  18. आत्मपरीक्षण/ Think on your DAILY ACTIVITIES. Is there any room for improvement? मोबाईल ऊठल्या ऊठल्या नको. मोबाईल मेंदू दुषीत करतो.
  19. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्लोक म्हणा, किंवा Utube वर लावा. त्यामुळे मेंदूत चांगल्या लहरी तयार होतील.
  20. नकारार्थी विचार मेंदूला दूषित करतो.
  21. सकारात्मक विचार रुजवा Negative विचार दूर करा.
  22. कंटाळा हा शब्दच नको. सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा.
  23. दैवी गुण रुजवणे आवश्यक. असुरी गुण नको.
  24. मनाचे श्लोक आत्मसात करा. , रोज किमान १० श्लोक म्हणा.
  25. श्रध्दा व ऊपासना महत्वाची.
  26. रोज तुमचा आरसा (मनाचा) स्वच्छ ठेवा. Stay away from Negativity.
  27. चांगले वाचन करा. मन प्रसन्न राहील.
  28. मेंदूचा वापर सतत असावा.
  29. रोज किमान चार ओळी लिहीत जा. दिसा माजि काही लिहीत जावे…
  30. मागण्या कमी ठेवा. मन आनंदी राहील.
  31. रोजच्या रोज वेळेचे नियोजन करा
  32. एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करा याने मेंदूतील झिज कमी होईल.
  33. वर्तमानात जगा. भूतकाळाचा व भविष्यकाळाचा विचार नको.
  34. अनुभवातून शिकणे हवे. पण त्याचा बाऊ नको.
  35. वाईट विचारांना तिलांजली व चांगल्या विचारांना चालना.
  36. चढउतार (IN LIFE) पचवणेची क्षमता वाढवा.
  37. मी काही चूकीचे करतोय का? स्वत:ला विचारा. मनाचे ऐका.
  38. पैशांच्या मागे नको. झोप उडेल व मन दुःख:ी होणार. पैसा आवश्यक असेल तेवढाच हवा. (MONEY: साध्य नसून साधन).
  39. SHREESUKTA पठण व आत्मसात करा. KNOW THE REAL MEANING OF “LAKSHMI”.
  40. TRY TO BE A MAN OF VALUE NOT JUST A MAN OF SUCCESS.
  41. चांगली मुल्ये आनंदी करतात.
  42. श्रेयसाची वाट धरा. PREYAS will give you a short pleasure.
  43. रागावर नियंत्रण. मेंदूचे रसायन बदल. ANGER causes Mental as well as Physical imbalance.
  44. खरं बोलणे पालन. खोटे बोलणे मुळे ऊपयुक्त रसायनांत बदल.
  45. संस्कार जतन, चूक काय व बरोबर काय याकडे लक्ष हवे. सोंग नको. मनाला विचारणा करा.
  46. नात्यांचा आदर करा. एकी ठेवा. एकीतच बळ आहे. बंधनातच आनंद असतो.
  47. ध्यानधारणा करा व मेंदूला आराम द्या. PRANAYAM, YOGA & MEDITATION play an important role in keeping your brain cells healthy by producing dopamine like chemicals.
  48. आईवडिलांवर प्रेम करा व आदर करा.
  49. भावनांचा दिखावा नको. फसवू नका.
  50. नातेसंबंध दृढ करा. आपल्या आवडत्या लोकांबरोबरच रहा नावडत्यांना दुर ठेवा. Nurture Relationships.
  51. परस्परावर विश्वास ठेवा.
  52. लोकांचे आवडते बना.
  53. सॉरी म्हणायला शिका.
  54. जबाबदाऱ्या जाणा.
  55. गैरसमज टाळा. “आपणच बरोबर” हे नको. दुसऱ्याचे म्हणणे ऐका. आत्मपरीक्षण करा.
  56. विवेकाने वागायला शिका.
  57. माणूस बनायला शिका प्राणी नको.
  58. बुध्दीचे मनावर नियंत्रण हवे.
  59. मेधा, मती, प्रज्ञा, ऋता हे आचरण.
  60. चांगला दृष्टीकोन हवा.
  61. *व्यक्त व्हा…! *
  62. *मन आनंदी तर हृद्य आनंदी…! *
  63. सत्संगती

देवावर विश्वास ठेवा, आजपर्यंत ज्याने सांभाळले तो पुढेही सांभाळेल हा विश्वास मनाला उभारी देईल…!

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु. ॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

 – जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज

सर्वांनी आपापले मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला प्रयत्नांना प्रभू श्रीरामांनी सहाय्य करावे अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करीत आहे.

विशेष आभार :- या लेखास नाशिक येथील जगप्रसिध्द न्युरोलोजिस्ट डॉ. महेश करंदीकर यांच्या एका भाषणाचे सहाय्य झाले आहे.

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २९ – – 

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |

बळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे |

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं|

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९|

अर्थ : आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर (त्यांच्या डोक्यावर) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी (आणि श्रीकृष्णांनी सुद्धा) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत (त्यांच्या रक्षणासाठी)विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर (राम) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.

(ब्रीद – प्रतिज्ञा, रिपु – शत्रू, कांबी – धनुष्याची कांबीट/कामठा, पुरी – नगरी)

विवेचन: मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण (कोदंडधारी) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात.

सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या सहाय्याने स्वउद्धार करून घेऊ शकतो. संत महंत आपल्या आयुष्यामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करणे आणि समाजातील भक्ती किंवा सात्विकता वाढवणे असे कार्य करीत असतात. ते लोकांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. परंतु दृष्टांचे निर्दालन करणे त्यांना शक्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा – – 

 जे खळांची व्यंकटी सांडो |

तया सत्कर्मी रती वाढो ||

– – असे म्हटले आहे. म्हणजे दुष्टांचे दुष्टत्व किंवा वाईट भावना नष्ट होवोत आणि सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड वाढो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् |

धर्मसंस्थापनार्थामि युगे युगे || 

– – हे भगवंताने आपल्या भक्तांना गीतेत दिलेले वचन आहे. जे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत अशा लोकांना सुद्धा तो कधी शासन करत नाही. तो तर अजातशत्रू आहे. पण पण जर कोणी त्याच्या भक्ताला त्रास देत असेल तर ते मात्र तो सहन करू शकत नाही आणि त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अवतार घेतो.

जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजला होता आणि राक्षसांनी सदाचारी लोकांना आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांना त्रास देणे सुरू केले, तेव्हा देवीने देखील अनेक अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. श्रीराम आणि श्रीकृष्णांनी देखील अशा अनेक दुराचारी लोकांचा नाश केला.

परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतो यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात, ” आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उद्धारासाठी, मोक्षासाठी श्रीरामांनी अयोध्यानगरीतील नागरिकांना आपल्या सोबत विमानात बसवून नेले होते. श्रीकृष्णांनी देखील शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्या नगरीतील लोकांना नवीन द्वारकापूरीत नेले होते. असा हा भगवंत भक्तवत्सल आणि सज्जनांचे रक्षण करणारा आहे. एकदा का आपण त्याचे भक्त झालो की आपली सगळी काळजी तोच वाहतो आणि सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये तोच आपला आधार होतो. आपले रक्षण करतो.

समर्थ म्हणतात भक्तांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीदच (कर्तव्य)आहे. आणि भक्तांचे रक्षण करण्याबद्दलचा त्याचा महिमा पदोपदी म्हणजे सर्वत्र गाजतो आहे. राम अत्यंत उदार आहे. आपले भक्त त्याला प्रिय आहेत. त्यांच्यात तो भेदभाव करत नाही. हा माझा तो तुझा असे त्याच्याजवळ नसते. तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तांना तो मोक्ष मार्गावर नेण्यासाठी सहाय्य करतो. तेव्हा आपल्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी अशा रामाला शरण जावे हेच खरे !

स्वसंवाद :: 

१) मी परमेश्वराची खरोखरच मनापासून भक्ती करतो का ?

२) संकटसमयी मला ‘तो माझ्या पाठीशी आहे’ ही भावना कितपत बळ देते? 

३) मी सज्जनांच्या बाजूने उभा राहतो का, की परिस्थितीनुसार भूमिका बदलतो? 

४ “भगवंत भक्तांची उपेक्षा करत नाही” या विचारावर माझा किती दृढ विश्वास आहे ? 

– – – 

श्लोक क्र. ३० – – – 

समर्थाचिया सेवका वक्र पाहे |

असा सर्व भूमंडळी कोण आहे ? 

जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही | 

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०|

अर्थ :  एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.

विवेचन : “नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे.

सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा निस्सीम भक्त हनुमान याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूया.

हनुमंत रामाचा सेवक आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो त्याच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या धन्यावर म्हणजे मालकावर ज्याची प्रचंड निष्ठा आहे. असा सेवक म्हणजे हनुमंतराय !मग साहजिकच अशा सेवकावर मालकाचे देखील प्रेम असणारच ! 

सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीराम हनुमंताला विचारतात की बोल तुझी काय इच्छा आहे ? तेव्हा हनुमंत फक्त त्याची भक्ती मागतात. श्रीराम त्याला उराशी धरतात. आपला लहान बंधू म्हणून आलिंगन देतात केवढे हे प्रेम ! मारुतीरायांची केवढी ही निरपेक्ष सेवा !

समर्थांचा (भगवंताचा) जो भक्त असतो तो देखील त्यांच्या कृपेने समर्थच होतो. त्यामुळे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नसते. त्याच्यावर संकटे येत नाहीत असे नाही. पण जीवनातील दुःखांना, संकटांना तो धैर्याने सामोरा जातो. हा देह माझा नाहीच. तो भगवंताचा आहे अशी त्याची धारणा झालेली असते. त्याच्या सेवेसाठीच त्याचा उपयोग तो करत असतो. म्हणून देहाला दुःख झाले तरी तो विचलित होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे… अशी त्याची वृत्ती होते.

सेवक व्हावे तर अशा व्यक्तीचे व्हावे जो आपली कधीही उपेक्षा करीत नाही. व्यवहारात चाकरी भलेही कोणाची करा. परंतु सेवक मात्र त्या भगवंताचे व्हा. कसा आहे हा भगवंत ? ज्याचा सेवक आपल्याला व्हायचे आहे ? हा भगवंत असा आहे की त्याच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे वर्णन तिन्ही लोक करतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत त्याच्या पराक्रमाचा डंका वाजतो आणि सगळेच त्याचे गुणगान गातात.

एकदा का आपण त्याचे सेवक झालो की तो आपली कधीही उपेक्षा करत नाही. सेवक म्हणजे भगवंताचा भक्त ! खरा भक्त भगवंताकडून काही हवे म्हणून भक्ती करीत नाही. तर मला भगवंत हवा आहे, त्याच्याशिवाय दुसरे काही नको अशा समर्पण भावनेने त्याची भक्ती असते. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त ! असा सेवक, असा भक्त जो असतो, त्याची सुखदुःखे, काळजी, चिंता आपोआप कमी होत जातात. म्हणजे त्याला त्याची पर्वा नसते. भगवंत त्याची काळजी वाहतो. भगवंताच्या नामात तो रंगून गेलेला असतो. अशा या भगवंताकडे भक्ताकडे भगवंत देखील लक्ष ठेवून असतो. तो त्याची उपेक्षा करीत नाही. त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी ज्याची खात्री असते तो निर्भयपणे जीवन जगू शकतो. लोकांनी स्तुती केली किंवा निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांपासून असा भक्त कोसो दूर असतो. आपल्या कर्तव्यात रत असताना त्याची आठवण ठेवावी. कर्तेपण आपल्याकडे न घेता राम कर्ता आहे, तोच हे करून घेतो आहे ही भावना ठेवावी.

स्वसंवाद :: 

१) मी भगवंताचा “सेवक” आहे की केवळ “अपेक्षा करणारा भक्त”? 

२) माझ्या भक्तीत निरपेक्षता आहे का, की काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे? 

३) मी माझ्या चिंता खरोखरच परमेश्वरावर सोपवतो का, की फक्त शब्दांत बोलतो? 

– क्रमशः श्लोक २९ आणि ३०. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका जिद्दी माणसाची गोष्ट… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका जिद्दी माणसाची गोष्ट… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

— — स्टीव्ह जॉब्ज

अ‍ॅपल : १९७६ साली एका साध्या गॅरेजमधून सुरू झालेली ही कंपनी आज इतकी अफाट श्रीमंत आहे की, तिचा पैसा मोजायचा झाला तर जगातील १८० पेक्षा जास्त देशांची एकूण अर्थव्यवस्था फिकी पडेल. ज्या माणसाने हे साम्राज्य उभं केलं, त्या स्टीव्ह जॉब्जचा २४ फेब्रुवारी, हा जन्मदिवस – आज स्टीव्ह आपल्यात नसूनही त्याच्या विचारांची जादू आजही आपल्या खिशातल्या आयफोनमध्ये किंवा समोरच्या मॅकबुकमध्ये जिवंत आहे. तो फक्त एक बिझनेसमन नव्हता, तर तो एक असा किमयागार होता ज्याने तंत्रज्ञानाला सौंदर्याची जोड दिली.

गोष्ट अशी आहे की, जॉब्ज म्हणायचा की ‘नवनिर्मितीच ठरवते की तुम्ही लीडर आहात की फक्त कुणाचे तरी फॉलोअर’. हे वाक्य आजही तितकंच लागू होतं, कारण त्याने कधीच कोणाची कॉपी केली नाही, तर स्वतःचे नियम स्वतः बनवले.

आता इथे ट्विस्ट आहे, अनेकांना वाटतं की डिझाईन म्हणजे फक्त एखादी वस्तू दिसायला कशी आहे, पण स्टीव्हचं मत वेगळं होतं. तो ठामपणे सांगायचा की ‘डिझाईन म्हणजे ती वस्तू कशी दिसते एवढंच नाही, तर ती काम कशी करते हे सर्वात महत्त्वाचं असतं’.

कल्पना करा, ज्या माणसाला त्याच्याच कंपनीतून बाहेर काढलं गेलं, तोच माणूस पुन्हा परततो आणि जगाला सांगतो की ‘तुमचं काम हे तुमच्या आयुष्याचा मोठा भाग व्यापणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला महान काम करायचं असेल, तर तुम्ही जे करताय त्यावर तुमचं प्रेम असायला हवं’.

ही गोष्ट इथे संपत नाही, कारण साधेपणा ही स्टीव्हची सर्वात मोठी ताकद होती. मनाला शांत ठेवून एखादी गोष्ट सोपी करणं ही एक तपश्चर्याच आहे, असं तो नेहमी म्हणायचा,

 २०११ मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला पण जाताना ‘स्टे हंग्री, स्टे फूलिश’ हा मंत्र देऊन गेला. नवनवीन गोष्टी शिकण्याची भूक आणि काहीतरी वेगळं धाडस करण्याचं वेड असेल, तरच तुम्ही जग बदलू शकता हे त्याने सिद्ध केलं.

आज जेव्हा आपण एआय (AI) आणि नवनवीन गॅजेट्सच्या गराड्यात आहोत, तेव्हा या माणसाची आठवण येणं स्वाभाविक आहे. त्याने आपल्याला फक्त मशीन नाही, तर एक अनुभव दिला.

तुमच्या आयुष्यात असं कोणतं ‘वेड’ आहे जे तुम्हाला स्टीव्ह जॉब्जसारखं काहीतरी वेगळं करायला भाग पाडतंय?


माहिती संग्राहक : अज्ञात .

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २७ आणि २८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २७ आणि २८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २७ – – – 

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।

धरी रे मना धीर धाकासि सांडी ।

रघुनायका सारिखा स्वामि शीरी ।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।

अर्थ : हे मना, एखाद्या भित्र्या माणसासारखा तू प्रपंचाला का घाबरतोस? भीती सोडून धैर्य धारण कर. कारण तुझ्या पाठीशी रघुनायकासारखा स्वामी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अगदी यमाचा कोप झाला तरी तो तुला कधीही सोडणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही.

(भव – प्रपंच, लंडी – भित्रा/कमजोर मनाचा, दंडधारी – यम)

विवेचन : मानवी जीवन हे अनेक अनिश्चिततांनी भरलेले आहे. उद्या काय होईल याची चिंता, नोकरीची काळजी, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा असंख्य विचारांनी मन व्यापलेले असते. त्यामुळे माणूस आतून अस्वस्थ आणि भयग्रस्त होतो.

प्रपंचाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या भीतीने खचून जाणे योग्य नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला धीर देतात…

“धरी रे मना धीर, धाकासि सांडी”

… हे मना, तू भीती झटकून टाक आणि धैर्याने उभा रहा.

आपले जीवन हे जर एक रणांगण मानले, तर या रणांगणावर शूरवीराप्रमाणे लढणे आवश्यक आहे. हातात तलवार किंवा बंदूक आहे पण हात पाय कापताहेत, तर लढाई कशी लढणार ? शत्रूसाठी मग तुम्ही सोपे लक्ष्य असाल. मनात भीती असेल तर विजय शक्य नाही.

संकटेही अशीच असतात. आपण त्यांना जेवढे घाबरतो, तेवढी ती अधिक मोठी वाटतात. धैर्याने सामना केला, तर ती हळूहळू नाहीशी होतात.

या संदर्भात स्वामी विवेकानंद यांच्या बालपणातील प्रसंग अत्यंत बोलका आहे. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र. ते अत्यंत अवखळ आणि खोडकर होते. ते झाडावर चढत. आईला असे वाटले की झाडावर चढून हा खाली पडला तर त्याला इजा होईल. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना झाडावर चढू नकोस. तिथे ब्रह्मराक्षस राहतो असे सांगितले. पण नरेंद्राने आईला विचारले, “ब्रह्मराक्षस ? कुठे आहे तो मला त्याला पाहायचेच आहे. ?” ब्रह्मराक्षस प्रत्यक्षात नव्हताच. आपली मनच अशा गोष्टींची निर्मिती करते. म्हणूनच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे आपण म्हणतो.

समर्थ पुढे आपल्याला एक मोठा आधार देतात…

… रघुनायकासारखा स्वामी आपल्या पाठीशी आहे.

राम म्हणजे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाही, तर तो धैर्य, धर्मनिष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. वाल्यासारख्या बलाढ्याला संपवणारा, रावणासारख्या अहंकारी व्यक्तीचा नाश करणारा हा राम सज्जनांचा त्राता आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात 

प्रत्यक्ष यम जरी कोपला, तरी राम तुला कधीही सोडणार नाही. तुझी उपेक्षा करणार नाही. याचा अर्थ असा नाही की की श्रीरामांना शरण जाण्यामुळे आपला मृत्यू टळणार आहे. मृत्यू तर अटळ आहे परंतु श्रीराम आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो तेव्हा मृत्यूची भीती कमी होते. संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते.

शेवटी, भय, आनंदी आणि धैर्याचे जीवन जगण्यासाठी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की श्रीरामावर (भगवंतावर) श्रद्धा ठेवा, धैर्य धरा आणि निर्भयपणे जगायला शिका. श्रीराम तुमच्या पाठीशी आहेतच.

स्वसंवाद :: 

  • मी माझ्या आयुष्यातील समस्यांना धैर्याने सामोरे जातो का, की त्यांना घाबरून जातो?
  • माझी भीती वास्तव आहे की ती माझ्या मनाने निर्माण केली आहे ?
  • संकटांच्या वेळी मला ईश्वरावर खरोखर विश्वास वाटतो का?
  • माझ्या मनातील श्रद्धा आणि धैर्य वाढवण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?

– – – – 

श्लोक क्र. २८ – – – 

दिनानाथ हा राम कोदंडधारी |

पुढे देखता काळ पोटी थरारी |

जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |२८|

अर्थ: श्रीराम हा दीनांचा कैवारी/रक्षणकर्ता आहे. धनुर्धारी रामाला समोर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काळ म्हणजे यमराजाला देखील धडकी भरते. हे वाक्य सत्य समजा की भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आणि त्याचे रक्षण करणारा आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही.

(कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला, वाक्य – वचन, नेमस्त – निश्चितपणे)

विवेचन : मागील श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी म्हणजे प्रपंचाच्या भीतीने हे मानवा तू का घाबरतोस ? या श्लोकात ते भगवंत आपला रक्षणकर्ता कसा आहे आणि तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करीत नाही हे समर्थ निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवतात. त्यासाठीच भगवंत आपल्या दासाची/भक्ताची उपेक्षा करीत नाही हे सांगणारे (नुपेक्षी कदा राम दासाभिमानी)हे पालुपद असलेले बरेच श्लोक आहेत.

मनुष्य अनेक अर्थाने दुबळा किंवा परावलंबी असतो. संकटप्रसंगी त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. कधी कधी हा आधार तो आपल्या नातलगांमध्ये किंवा मित्रांमध्ये शोधत असतो. परंतु या सगळ्याच गोष्टी बेभरवशाच्या असतात. परिस्थिती फिरली की ही मंडळी सुद्धा पाठ फिरवतात. पैसा सुद्धा सर्वप्रसंगी उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून संत आपल्याला कळकळीने सांगतात की आधार हा एकमेव परमेश्वराचाच असला पाहिजे कारण सर्व परिस्थितीत तोच आपल्याला साथ देईल. तो दीनानाथ आहे.

आपल्याला नुसता कोणाचातरी आधार आहे ही जाणीव सुद्धा खूप मानसिक बळ देणारी असते. स्वामी समर्थांच्या फोटोखाली, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे वचन लिहिलेले असते. हे वचन लाखो भक्तांना जगण्याची शक्ती देते. स्वामी प्रत्यक्ष आपल्या पाठीशी आहेत या भावनेतून भक्त कठीण प्रसंगातूनही तरुन जातो. गीतेतील नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात – – 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

– – जो भक्त निष्ठेने आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी उपासना करील त्याचे मी रक्षण करतो.

आजकाल बरीच शिकलेली मंडळी माझा देवावर विश्वास नाही असे म्हणत असतात आणि त्याचे निरनिराळ्या प्रकारे समर्थन करीत असतात. आपण आस्तिक म्हणून जगायचे की नास्तिक म्हणून जगायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अशा मंडळींनी आस्तिक लोकांचा बुद्धिभेद करून त्यांच्या जगण्याचा आधार काढून घेऊ नये. ईश्वराला विज्ञानाच्या कसोटीवर अनुभवता येत नाही. त्याची अनुभूती श्रद्धेच्या कसोटीवर घेता येते ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी त्याच्यावर दृढ श्रद्धा असावी लागते, निष्ठा असावी लागते. त्या भावनेने जोपर्यंत आपण त्याची भक्ती करीत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही.

समर्थांना प्रिय असलेला आणि त्यांचे आराध्य दैवत असलेला राम हा कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला आहे. त्याच्या नुसत्या धनुष्याच्या टणत्काराने काळ देखील थरारतो. तो दीनांचा, दुःखितांचा रक्षण करणारा आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. फक्त आपली त्याच्यावर दृढ श्रद्धा हवी.

संकटातून परमेश्वर आपले रक्षण करतो असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ संकटांशी सामना करण्याची शक्ती तो आपल्याला देतो आणि त्याच्या कृपेनेच हा भवसागर आपण तरुन जातो असा आहे. तेव्हा हे मना, तू अन्य सगळे आधार सोडून केवळ एका रामावर श्रद्धा ठेव. तोच तुझे कल्याण करील. जेव्हा आपल्याला आतून जाणवते की एक दिव्यशक्ती आपल्या सोबत आहे, तेव्हा चिंता, राग, भविष्याची भीती यासारख्या गोष्टी आपोआपच कमी होतात. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, आपल्याजवळ आहे ही अनुभूती आली की माणूस कोणत्याही संकटांना सहजपणे तोंड देऊ शकतो.

स्वसंवाद :: 

१) मी खरोखरच परमेश्वराला अंतिम आधार मानतो का ? की पैसा, मित्र नातेवाईक हेच अंतिम प्रसंगी उपयोगी पडतील असे मला वाटते ?

२) संकटसमयी देवावरील माझा विश्वास डळमळतो का की अधिक दृढ होतो? 

३) “राम दासाभिमानी आहे” या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे का ? 

४) मी परमेश्वराला केवळ सुखात आठवतो की दुःखातही त्याच्यावर भार टाकतो ? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक २७ आणि २८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Contact आणि Connection – – –  – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ Contact आणि Connection – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.

त्यातील एकाने साधूला विचारलं,

“साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.

पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?”

 

साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.

साधू : “तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?”

पत्रकार : “येस !! का हो ?”

साधू : “घरी कोण कोण असत?”

आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं… कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

 – – तरी मूळ प्रश्नाचे “उत्तर” मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.

तो म्हणाला : “माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण ! सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत. “

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?”

(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)

साधू : “तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?”

पत्रकाराने राग आवरत सांगितलं : “बहुतेक एक महिना झाला असावा.

साधू : “तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ? एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?”

(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)

तरी त्याने उत्तर दिले : “गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो”

साधू : “त्यावेळी किती दिवस एकत्र होता?”

पत्रकार (हळवा होत) : “तीन दिवस होतो”

साधू : “तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?”

(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ? वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?”

– – (असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).

साधू : “बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते… 

… तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीये….. You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी “लगाव” असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते.

एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं… हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही…

– – तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही. ”

आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं.

एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला.

आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं… 

… आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, सहकारी, समाज… सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो…

सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही…

कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत, सगळे स्वमग्न झालेत… !

– – – आपण वरचेवर बदलत चाललोय… हेच खरं आहे.. !

इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय…

कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं, हे चांगलच समजायला लागलयं…

प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे…

गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे…

वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं ऊत्तर तयार ठेवायचं… !

– – दाहक असलं… तरी सत्य हेच आहे… 

संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच connection.. 

वरील घटनेतील “साधू” म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आपले होते… * स्वामी विवेकानंद. * 

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।।

भक्ति सूत्रे ६६ – – 

“त्रिरूपभङ्गपूर्वमकम् नित्यदास्यनित्यकान्ताभजनात्मकं प्रेम कार्य प्रेमैव कार्यम् ||६६||”

अर्थ : त्रिपुटीचा भंग म्हणजे नाश अथवा लय करून सर्वकाळ भगवतांचा दास आहे अथवा त्याची कांता आहे असा भाव धारण करून त्याच्यावर प्रेम करावे, प्रेमच करावे.

विवेचन : साधन, साधक आणि साध्य अथवा भक्त, भक्ति आणि भगवंत अशी त्रिपुटी अथवा त्रिकुट मानले जातात. अध्यात्मात या तिन्हीची गरज असते. जेव्हा भगवतांची प्राप्ती होते तेव्हा ही त्रिपुटी संपुष्टात येत असते.

आपण नदीचे उदाहरण पाहू.

नदीचा उगम सागराला जाऊन मिळण्यासाठी होतो. यात नदी, नदीचे वाहणे आणि सागर मिळून त्रिकुट अथवा त्रिपुटी होते. यातील एक जरी नसेल तरी चालणार नाही. नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्वच संपुष्टात येते, तिचे नदीपण शिल्कच उरत नाही…

भक्त भक्ति करतो, यथावकाश त्याला भगवंताची प्राप्ती होते, मग तो भक्त म्हणून सांगायला शिल्लकच उरत नाही. इथे आपल्याला प्रश्न पडेल की मग संत कसे काय आपल्याला उपदेश करतात. त्याला एकमेव उत्तर आहे. संत कमीपणा घेऊन आपल्यासाठी *”अवतरण”* करीत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याची अनुभूती आपण प्रत्येक संताच्या बाबतीत घेऊ शकतो.

हे सर्व लिहिणे सोपे आहे, प्रत्यक्षात आणणे महाकठीण.

त्यासाठी संपूर्ण शरणागत भाव अथवा हनुमंतासारखी दास्य भक्ति अंगिकारता आली पाहिजे.

साधकाने भगवंताला म्हटले पाहिजे की तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन… ! तुझे चरण मी काही झाले तरी सोडणार नाही. तुझ्या चरणावर डोके ठेवले आहे. आता तू तार अथवा मार. तू तारलेस किंवा मारलेस, तरी दोन्ही मध्ये माझेच कल्याण आहे. अशी दृढ श्रध्दा हवी. असे जमले की विषाचा प्याला पिताना भीती वाटतं नाही, छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता कल्याण गडाच्या तटावरून उडी मारू शकतो, कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी भक्त प्रल्हादाला निश्चिंत रहात नाम घेता येते…

अशी अनेक उदा. आपल्याला सांगता येतील.

… बाळाची आई बाळावर अकारण प्रेम करते. ते बाळ दुध पिताना आईला लाथा मारते, तिच्या अंगावर शी करते, शू करते, रात्री अपरात्री जागरण करवते, तरी आई त्या बाळावर अपरंपार प्रेम करते…

… भक्त आपल्या भगवंतावर असाच प्रेम करतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते.

संत तुकाराम महाराज या स्थितीचे खालील अभंगात वर्णन करतात.

“हाचि नेमआतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ 

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥ 

बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥”

– – – – –

भक्ति सूत्रे ६७ – –

“भक्ता एकान्तिनो मुख्याः ||६७||”

अर्थ : भगवंतांची एकनिष्ठपणे भक्ति करणारे भक्त हे मुख्य भक्त होत.

विवेचन: प्रपंचात अनेक गोष्टी मनुष्याला सांभाळाव्या लागतात, याउलट परमार्थ मार्गात मात्र एका भगवंताला आपलेसे करून घ्यायचे असते. गणिती भाषेत बोलायचे झाल्यास अनेक गणिते सोडवण्यापेक्षा एक गणित सोडवणे त्यामानाने सोपे, नाही का?

अनेक वर्षे प्रपंच करून मनुष्याला किती समाधान मिळतं हा प्रश्नच सध्याच्या काळात गैरलागू झाल्यासारखा आहे, असे म्हटले तर नवल वाटू नये… !

समर्थ म्हणतात, ” प्रपंच अवघाचि नासका”

यासाठी प्रापंचिक मनुष्याने, साधकाने दिवसातील काही वेळ एकांतात व्यतित करायला हवा. अनेक लोकांना एकांतापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटतं असते. एकांत म्हणजे एकाचाही अंत. अंतर्यांमी वसलेल्या आत्मारामामध्ये स्वतःचा अंत करणे म्हणजे एकांत सेवन करणे. दुसऱ्या बाजूने विचार करता, आपली आणि भगवंताची इच्छा एक करणे, अर्थात त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळणे. तो जसा ठेवील तसे आनंदाने राहणे म्हणजे एकांत म्हणता येईल.

ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते तसे साधकाने भक्तीत विरघळून जावे. एक अर्थात जो आपला अभिमान आहे, अहंकार आहे, मीपणा आहे तो सर्व त्याच्याचरणी वाहून टाकावा, संपूर्ण शरणागत होऊन भगवंताशी समरस होऊन जावे… ! सर्व संतांनी हे करून दाखवले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“लवण मेळविता जळे| काय उरले निराळे ||१|| समरस झालो `तूज माजी हरपलो ||२|| अग्निकर्पूराच्या मेळी| काय उरली काजळी ||३|| तुका म्हणे होती| तुझी माझी एक ज्योती||४||”

(संदर्भ : अभंग क्रमांक २३७९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

या गुणातीत भक्तीमध्ये व्यवहाराचा, स्वार्थाचा लवलेश नसतो. अशा भक्ताला फक्त भगवंताचे प्रेम हवे असते, आणि त्यासाठीच तो भगवंतावर जिवापाड प्रेम करीत असतो… ! मग, एखादी मीरा म्हणून जाते आणि ते अजरामर होते,

“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोय||”

असा भक्त सर्वांना आवडतो, अर्थात देवालाही प्रिय होतो.

– – – –

भक्ति सूत्रे ६८, ६९ – – – 

“कण्ठावरोधरोमञ्चाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवीं च ||६८||”

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि, सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि॥ ६९ |।

अर्थ : प्रेमातिरेकामुळे कंठ दाटून येऊन शरीरावर रोमांच उभे राहिलेले असतांना आणि डोळ्यांतून अश्रू वहात असताना सिद्ध भक्त बाष्प गद्गद स्वरांनी एकमेकांशी संभाषण करताना उभय कुळे आणि पृथ्वी पावन करतात. इतकेच नव्हे तर असे भक्त (संत) तीर्थांना पावन करतात तसेच, ते जे बोलतात, त्याला वेदांत वाक्य म्हणून मान्यता मिळते.

विवेचन : भक्ति वाढत चालली की साधकाचे अष्ट सात्विक भाव जागृत होत असतात. आता अष्ट सात्विक भाव आपण पाहू.

अष्ट सात्विक भाव म्हणजे भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होणारी आठ प्रकारची शरीरिक-मानसिक लक्षणं. हे भाव परम भक्तीच्या अवस्थेत देवाप्रती प्रेम व एकात्मतेमुळे आपोआप उमटतात. हे “सात्विक” (शुद्ध, निर्मळ) स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना सात्विक भाव असे म्हणतात.

अष्ट सात्विक भाव :

  1. स्तंभ (स्तब्धता)

शरीर स्थिर होणे, न बोलणे, हालचाल थांबणे.

  1. स्वेद (घाम येणे)

अनोख्या आनंदाने किंवा भावानं अंगाला घाम फुटणे.

  1. रोमांच (रोमहर्ष)

अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर सुटणे.

  1. स्वरभंग (गेल्यावर आवाज अडखळणे)

बोलताना गहिवर येणे, आवाज तुटक होणे.

  1. कंपन (थरथर)

शरीर थरथरणे, हातपाय हलणे.

  1. वैवर्ण (रंग बदलणे)

चेहऱ्यावर लाली, पल्लव, पांडूपणा इ. रंग बदल.

  1. अश्रू (डोळ्यांतून पाणी येणे)

आनंद, प्रेम, भक्तिभावाने डोळ्यांतून अश्रू येणे.

  1. प्रलय (संमोहनासारखी अवस्था / शून्यभाव)

शरीर व मन पूर्णपणे विश्रांतीत जाणे, समाधिस्थ अवस्था.

साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर साधकाला या आठही भावांची अनुभूती येत असते. परंतु यामध्ये न गुंतता साधकाने आपली साधना, उपासना सुरू ठेवायला हवी.

जेव्हा अधिकार प्राप्त झालेले दोन भक्त भेटतात किंवा दोन संत भेटतात, तेव्हा त्यांच्यात एकतर मौनात चर्चा होते किंवा ते फक्त आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या भक्तीबद्दल चर्चा करीत असतात. तेव्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊ शकतात, किंवा काही वेळा झालेले अनेक साधकांनी पाहिले असेल. जिवंत साधकांच्या डोळ्यात पाणी आले यात नवल कदाचित नसेल, पण श्रीमहाराज (गोंदवलेकर महाराज) जेव्हा नैमिष्यरण्यात जायला निघाले तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज त्याच्याजवळ गेले की त्याला विचारले की अरे, मी नैमिष्यरण्यात जातोय, ते तुला आवडले नाही का ? तसे असेल तर मी जाणार नाही… !

या सर्व गोष्टी परम प्रेमातूनच घडून येऊ शकतात. सर्व संतांनी भगवंतावर निरातिशय प्रेम करून त्याच्या सगुण विग्रहातून चैतन्य प्रकट करविले. चैतन्य सर्वत्र भरून राहिले असेल तर ते कोठूनही प्रगट होऊ शकते, फक्त ते प्रगट करण्याइतकी साधना, तप:श्चर्या आणि संपूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक ठरते.

गंगेचे अवतरण झाले तेव्हा गंगा म्हणाली की पृथ्वीवर पापी लोकं राहतात, ते माझ्या पाण्यात स्नान करतील तेव्हा त्यांची पापे नष्ट होतील, यात बिल्कुल संदेह नाही, पण मी मैली होईन तेव्हा मला कोण शुद्ध करेल. तेव्हा भगवंताने तिला वचन दिले की संतमंडळी जेव्हा तुझ्या स्नान करतील तेव्हा त्याच्या अंतरंगी असलेल्या माझ्या अंशाने तू पुन्हा पुण्यसलीला होशील. आजपर्यंत हे वचन भगवंताने पाळले आहे.

अशा एकनिष्ठ भक्तांमुळे, संतांमुळे कुळ, मूळ आणि धरित्री पावन होत असते, नद्यांना तीर्थत्व प्राप्त होत असते… ! आणि संत जे बोलतात ते शास्त्र म्हणून मान्यता पावते. आदरणीय ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की मी पुस्तकातून जो वेदांत शिकलो तोच वेदांत श्रीमहाराज साध्या साध्या उदाहरणातून आणि स्व-आचरणातून जगाला सांगत आहेत. वेगळा वेदांत अभ्यासण्याची गरजच नाही. श्रींचे प्रत्येक वाक्य हे वेद वाक्य आहे, वेद वचन आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ६६, ६७, ६८, ६९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares