मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पुढं जे काही घडलं ते सगळं आपसूकच घडत जावं तसंच आणि कधी कल्पनाही केली नव्हती असं एक अनपेक्षित वळण येताच मी थबकलो. इथं वळायचं की आहे त्याच मार्गाने पुढं जायचं या माझ्या क्षणकाळाच्या द्विधा मन:स्थितीत ‘तो’ स्वतःशीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी… माझ्याजवळ! कारण पुढे जे घडत गेलं ते प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं असंच सगळं..!! )

स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा माझा अट्टाहास नव्हता, पण आयुष्यात क्वचितच येणारी एकमेव संधी या दृष्टीने मी त्याकडे पहात होतो. या योजनेच्या अतिरिक्त आर्थिक मोहात न पडता, मिळू शकणारे ते लाभ माझ्या सर्व जबाबदाऱ्या विनासायास पार पडण्यासाठी पुरेसे आहेत कां याचाच विचार करणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. सलिल आणि आरतीने जेव्हा नि:शंकपणे संमती दर्शवली त्यानंतर माझ्या विचारांना या दिशेने चालना मिळाली आणि मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक असल्याने मी हे कितपत फायदेशीर ठरेल हे पहायला सुरूवात केली.

या योजनेतील वरवर जाणवणारे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येकाच्या शिल्लक राहिलेल्या नोकरीच्या मुदतीच्या अर्ध्या कालावधीचा पूर्ण पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता. या हिशोबाने माझ्या उर्वरित नऊ वर्षांच्या कार्यकाळाच्या निम्म्या म्हणजे साडेचार वर्षांच्या पगाराची रक्कम अतिरिक्त लाभ म्हणून मला मिळणार होती. त्या रकमेचे मासिक व्याज माझ्या त्यावेळेच्या पगारापेक्षा थोडे जास्तच येत होते. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार केला तर मला ते सोयीचे आणि पुरून उरणारेच होते. शिवाय माझे घरापासून लांब, एकटा राहिल्याने होणारे अतिरिक्त सर्व खर्च जे दरमहा माझ्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके होते ते वाचणार होते. शिवाय नोकरीतल्या जबाबदाऱ्यांची कायम मनात असणारी व्यवधानं आणि दडपणं नाहिशी होणार होती आणि त्यासाठी द्यावा लागणारा रोजचा दहा- बारा तासांचा वेळ हा माझ्यासाठी पूर्ण मला हवा तसा व्यतित करण्यासाठी मोकळा मिळणार होता जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं होतं!

असे सगळेच घटक निदान माझ्यापुरते तरी सर्वार्थाने सोयीचे होते तसेच फायद्याचेही! नकारात्मक म्हणता येईल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे बॅंकांमधे पूर्वी पेन्शन योजना आस्तित्त्वात नव्हती. तरीही सुरुवातीपासूनच आपला जॉब पेन्शनेबल नाही हे गृहित धरूनच मी माझे आर्थिक नियोजन केलेले होते. त्यानंतर १९९६ मधे सर्वप्रथम पेन्शन योजना बँकांसाठी लागू करण्यात आली होती. ती ऐच्छिक होती. त्यामुळे ती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय अर्थातच खुला होता. आणि त्या वेळच्या हिशोबानुसार पेन्शन पर्याय न स्विकारता बऱ्याच जणांनी आणि मीही पीएफ् चा पर्यायच स्वीकारला होता. अर्थात पेन्शन नसणे हा योग्य अशा आर्थिक नियोजनामुळे माझ्यासाठी तरी तसा गौण मुद्दा होता. अर्थात स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर उच्चाधिकार पदांवरील बऱ्याच जागा रिक्त होणार असल्याने मागे राहिलेल्यांसाठी पुढच्या प्रमोशनच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार होत्या हे खरे, पण त्यामुळे वाढणाऱ्या अधिकारांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि मला हव्यास नसणाऱ्या अॅमिनीटीज् भरपूर पण टॅक्सेशनचा विचार करता मिळणारे आर्थिक लाभ मात्र तुलनेने अतिशय नगण्य ही वस्तुस्थिती होती.

अर्थात इतर बऱ्याच जणांना या ना त्या कारणाने या योजनेचा फायदा घेता येणार नव्हता त्यामुळे त्याचे शल्य मनात घेऊनच उर्वरित काळ इच्छा नसूनही त्यांना शेवटपर्यंत नोकरी करणं क्रमप्राप्त होतं!

अशा रीतीने या सर्व बाबींचा विचार करून नोकरी चालू ठेवणे अधिक तोट्याचे आणि गैरसोयीचे होते याची खात्री झाल्यानंतर मी

स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करायचे निश्चित केले. घरी आई, आरती आणि सलिल यांना यासंदर्भातल्या सर्व हिशोबांची आणि माझ्या नियोजनाची सविस्तर कल्पना देऊन त्यांचे समाधान झाल्यानंतर माझा अर्ज तयार केला. तरीही तो सबमिट करण्यापूर्वी वखरे साहेबांना माझ्या निर्णयाची पूर्वकल्पना देणे मला आवश्यक वाटले. मी माझा अर्ज सोबत घेऊन साहेबांच्या केबिनमधे गेलो पण त्यामुळे माझ्या या संकल्पात अडसर निर्माण होऊ पहातोय याची मला कल्पना कुठं होती?

मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी मला बसायची खूण केली. मी त्यांचं बोलणं संपायची वाट पहात बसलो खरा पण फोन महत्त्वाचा होता हे वखरे साहेबांच्या अदबीने बोलण्यावरून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून माझ्या लक्षात आले. आपण नंतर यावे असा विचार करून मी खुर्ची मागे सरकवून उठलो तेवढ्यांत त्यांनी बसायची खूण केली. पुढे कांही मिनिटातच फोनवरचं बोलणं संपलं तसं रिसिव्हर ठेवून ते क्षणभर शांत बसून राहिले आणि मग माझ्याकडे पहात सहज विचारल्यासारखं म्हणाले,

“फोन कुणाचा होता सांगा बरं…? “

“सेंट्रल ऑफिस? “

“एम्. डी. हिमसेल्फ वाॅज आॅन द लाईन… ” पाण्याचा ग्लास हातात घेत त्यांनी सांगितलं.

“कां? .. कांही प्राॅब्लेम..? “

“आपल्या ऑफिसपुरता तरी काही प्रश्न नसणाराय हे नशीब माझं. ” ते कांहीसे रिलॅक्स होत म्हणाले.

“म्हणजे? ” मला कांही अंदाजच येईना.

” आपल्याला डिपॉझिट, ॲडव्हान्सेस, रिकव्हरी.. अशी डोईजड टार्गेट्स दिली जातात ना नेहमी? आताही त्यांनी एक वेगळंच टार्गेट दिलंय. आश्चर्य म्हणजे ते ‘निगेटीव्ह टार्गेट’ आहे. पण ठीक आहे. फार टेन्शन घ्यावं असं कांही नाहीय. “

“निगेटिव्ह टार्गेट? म्हणजे? “

ते हसले.

“नुकत्याच आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या सर्क्युलरच्या संबंधातलं टार्गेट.. “

“म्हणजे? “

अतिरिक्त स्टाफची संख्या कमी करण्यासाठी ही योजना तयार केलेली असली तरी त्यामागे अनप्राॅडक्टीव्ह स्टाफसंख्या कमी करण्याचा प्रमुख उद्देश आहे. तरीही कायदेशीर आक्षेप घेतले जाऊ नयेत म्हणूनच केवळ ती सरसकट सर्वांसाठी खुली ठेवली गेलीय हे मला माहित होतं पण..

” पण यासंदर्भातलं ‘निगेटिव्ह टार्गेट’ म्हणजे काय ते नाही समजलं.. ” मी साहेबांना माझी शंका विचारली.

” त्या संदर्भातच सगळं फोनवर ऐकवून झालंय” ते हसत म्हणाले, ” त्याचं काय आहे, नुकत्याच झालेल्या एक्झिक्युटिव्ह प्रमोशन प्रोसेसमधले रिसेण्ट प्रमोटीज् आहेत ना तुमच्यासारखे ते बॅंकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अॅसेटस् आहेत. त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यापासून परावृत्त करण्याची सूचना एम्. डी. नी आम्हा सर्व झोनल हेडस् ना दिलीय. त्यापैकी कुणीही ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. या अर्थाने आपल्या झोनसाठी मला दिलं गेलेलं हे ‘निगेटिव्ह टार्गेट’च ना? “

वखरे साहेबांचं बोलणं त्यांच्या नकळत माझ्या निर्णयात मोठ्ठा अडसर निर्माण करणारं होतं. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायलाच मी आलेलो असताना नेमका त्यातच हा अडसर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तो अर्ज आत्ताच देणं मला योग्य वाटेना. न द्यावा तर मी इथे कां आलो होतो हा प्रश्न निर्माण होणार होताच. मनातली ही अनिश्चितता मनात तशीच घेऊन मी जायला उठलो..

“अरे, बसा ना, बोला, तुम्ही कां आला होतात? ” वखरे साहेबांनी विचारलंच.

आता मात्र खरं कारण सांगणं मला अवघड वाटेना….

” मी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलंय. ते सांगायलाच मी आलो होतो. ” मी मोकळेपणानं सांगून टाकलं.

ते अविश्वासाने पहातंच राहिले.

” तुम्ही आणि स्वेच्छानिवृत्ती? चेष्टा करताय कां माझी? ” त्यांचा आवाज थोडा चढल्या सारखा वाटला.

“नाही सर. खरंच सांगतोय. ” मी म्हंटलं, आणि सोबत आणलेला माझा अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवला.

त्यांनी तो हातात घेऊन त्यावरून झरझर नजर फिरवताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला अस्वस्थ करीत राहिले. तो अर्ज घडी घालून मला परत देत ते म्हणाले,

” हा सध्या तुमच्या जवळच राहू दे. यू प्लीज गिव्ह सेकंड थाॅट टू युवर डिसिजन. आपण यावर सविस्तर बोलू नंतर. मग ठरवू काय करायचं ते. ” ते शांत पण ठाम स्वरात म्हणाले.

त्यांचं म्हणणं मला स्विकारता येईना न् डावलताही.

” ठीक आहे. आपण बोलू नंतर ” असं म्हणत त्यांनी पुढे केलेला तो अर्ज मुकाट्याने परत घेऊन मी केबिनमधून बाहेर आलो.

जे सुरळीत पार पडणार हे मी गृहितच धरलं होतं ते गृहितच असं चुकीचं ठरलं होतं. त्यामुळं जे सहजसाध्य वाटत होतं तेच अप्राप्य ठरत असल्याचं लक्षात येताच माझी चलबिचल सुरू झाली. जे घडेल ते आपल्या हिताचंच असेल हा विश्वास मनात असूनही आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जातं असल्याची रूखरूख माझं मन अस्वस्थ करीत राहिली.

आता यातून अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे अखेर ‘तो’च तर ठरवणार होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओ. टी. पी.” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओ. टी. पी.” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

मी झोपेत होतो का… हो झोपेतच होतो. अचानक मला एक प्रकाशमान गोलाकार भाग समोर दिसायला लागला. हे काय आहे… काय असेल… हा विचार करत होतो.

तेवढ्यात आवाज आला… वत्सा… घाबरु नकोस… मीच आहे. आता सध्या आईमुळे मीपण काही धार्मिक सिरीयल सुरु असतांना मोबाईल हातात घेत टि. व्ही. समोर बसतो. त्यामुळे वत्सा, आचार्य, शिष्य, नामस्मरण असे शब्द कानावर येतात त्यामुळे त्यांची थोडी सवय झाली आहे. नाहीतर मी झोपेत त्या आवाजाला घाबरण्याऐवजी वत्सा या शब्दालाच घाबरलो असतो.

जागा असतो तर कदाचित मोबाईल हातात घेऊन गुगलवर वत्सा याचा अर्थ पण शोधला असता. पण वत्सा लिहीतांना त ला स जोडायचा, का स ला त हा प्रश्न कदाचित पडला असता. आणि शाळेत शिकलेले स ला ते स ला ना ते हे व्याकरण याचा काहि संबंध आहे का हे आठवावे लागले असते.

व्याकरणात हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. पण झोपेत द्वितीय, विभक्ती, आणि प्रत्यय याचा संबंध नव्हता, कारण मी प्रथम किंंवा प्रथमच भक्तीचा प्रत्यय घेत होतो. पण वत्सा मीच आहे यात मी म्हणजे नक्की कोण हे काही समजलंच नाही.

मोबाईलच एक बर असतं, त्याला ट्रू काॅलर लावल की कोण बोलतय हे समजत. पण नुसत्या आवाजाने मी ओळखणं मला कठीण गेलं. किंवा आवाजावरून मी कोणालाही ओळखेन असा असणारा मी पणा गळून पडला. कारण हल्ली मी आवाजावरून दुधवाला, भंगारवाला, भाजीवाला अशा काही लोकांना ओळखायला लागलो होतो. पण हा आवाज नवीन होता.

अरे तु ज्याची आराधना करतोस तोच मी… तुला भेटायला आलो आहे…

अरे देवा… काही कळलं नाही तर जागेपणात जी त्रासीक प्रतिक्रिया असते, तीच झोपेतही उमटली…

बरोबर तोच… तोच मी देव…

त्याला अरे देवा हेच समजलं असेल. त्रासीक आवाज लक्षात आला नसावा.

तोच मी देव अस म्हंटल्यावर आता माझे वरचे शब्द तेच होते, फक्त वापर वेगळ्या पध्दतीने. आणि ऊत्साहात… अरे… देवा… वा… वा… पण तुझा चेहराच दिसत नाही. तो दिसू दे…

तु नामस्मरण करतांना जे नांव घेतो तेच नांव घे. तोच तुझा ओ. टि. पी. आहे. ते अगदी मोबाईल सारखच आहे… पैसे देतांना जसं तू ओ. टि. पी. ने कन्फर्मेशन देतोस तसच माझं नांव घे. ते नांव म्हणजे ओ. टि. पी. घेतल्यावर माझा चेहरा काय संपूर्ण मीच दिसायला लागेल.

आता देवाला काय सांगणार… मोबाईल वर पैसे देतांना दोन बँक असल्यातरी आधी बँक सिलेक्ट करावी लागते मग ओ. टि. पी. येतो. इथेही ओ. टि. पी. म्हणून देव नावच घ्यायला सांगतोय. पण… कोणत्या देवाचं नांव घेऊ…

रविवारी सूर्यनारायण, सोमवारी महादेव शंकर, मंगळवारी गणपती बाप्पा, गुरुवारी दत्तात्रेय, शुक्रवारी कोणत्या देवीचं नांव घ्याव हा प्रश्न असतो, पण मी आठवेल किंवा जमेल त्या देवीच नांव घेत हा प्रश्न तात्पुरता माझ्यासाठी सोडवतो. शनिवारी हनुमान यांच नांव घेतो.

शनिवारी शनीचं नांव टाळतो. कारण खोडी काढणं याचही नांव घेणं असा अर्थ निघतो. त्या अर्थाने शनी देेवाने पाहिले तर ऊगाचच शनी मागे लागेल हि भिती.

बर्‍याचदा तर सकाळ, संध्याकाळ आणि जमल्यास दुपार, व ठराविक दिवस यांना ठरवून वेगवेगळ्या देवांची नांव घेतो. आता ओ. टि. पी. म्हणून कोणाचं नांव घेऊ. कारण चेहराच दिसत नाही…

हो, बरोब्बर वरच्या वारात बुधवार नाही. हा वार मी मुद्दाम मोकळा सोडला आहे. त्याला काही कारण आहे. पण ते सांगायचं नाही.

बर मी सगळ्यावारी वेगवगळ्या देवाचं नांव घेतो. त्यांचा चेहरा लक्षात आहे. पण आवाजाच काय? देव आपला आवाज ऐकत नाही असं आपण सहज म्हणतो. पण आपला प्रयत्न त्याने आपलं ऐकावं याचसाठी असतो. आपण कधी मनापासून त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केल्याचं आठवतच नाही. मग ओळखणार कसा त्याचा आवाज…

बरं त्याची नांव तरी किती… सूर्य, रवी, शंकर, महादेव, गणपती, वक्रतुंड, दत्तात्रेय, श्रीपाद, अंबाबाई, दुर्गा, पवनसूत, हनुमान, विष्णुला तर सहस्त्र नांव आहेत. बरं ओ. टि. पी. टाकायचा म्हणजे तोच टाकावा लागेल, चुकवून चालणार नाही. ही मानसिकता.

आता झोपेत का असेना पण देवाच्या मिळणार्‍या दर्शनाला आपण मुकणार याची खंत. काय करावं हाच विचार.

तेवढ्यात देवच म्हणाला, तुझ्या ओ. टि. पी. ची वेळ संपली आहे. मला जावं लागेल कारण अजूनही काही लोकांना असेच ओ. टि. पी. द्यायचे आहेत. पण तु निराश होऊ नकोस. कारण…

एखाद्या गोष्टीचं मुल्य ठरल्यावर ते द्यायचं सध्या तुझ्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. वेगवेगळे पे तुझ्याकडे आहेत. शिवाय चेक, रोख रक्कम, क्रेडिट कार्ड असेही पर्याय आहेत. रोख रकमेत दहा, पन्नास, शंभर, पाचशे अशा वेगवेगळ्या दर्शनी मुल्यांच चलन तुझ्याकडे आहे. हे फक्त सोयीस्कर व्यवहारासाठीचे मार्ग आहेत. पण मुल्य एकच असतं.

तु वारानुसार भक्ती करत असलास तरी सगळी एकाच ठिकाणी येऊन मिळते. वार कदाचित आमच्या किंवा तुमच्या सोयीने झाले किंवा केले असतील. पण तुमची भक्ती आणि श्रध्दा यात फरक जाणवत नाही. सगळ्या वारी आमच्याबद्दल असलेला तुमच्या मनातला भाव तेवढाच आणि सारखाच असतो. त्यात ऊजवं डावं जाणवत नाही. ऊलट ज्या देवाला जे आवडेल, भावेल, रुचेल ते सर्वतोपरी करण्याचा आणि देण्याचा तुमचा ऊत्साह आणि प्रयत्न दांडगा असतो. मग यात उपवास घडला, त्रास झाला तरी चालतो. आणखीन काय पाहिजे. हिच भक्ती म्हणजे मूल्य आहे. जे तु वेगवेगळ्या पध्दतीने देण्याचा प्रयत्न करतोस. पण प्रामाणिकपणा तेवढाच असतो.

मी तुला भेटायला यायचं ठरवलं होत, तसा आलो आणि भेटलो. जाता जाता एकच सांगतो तुम्हाला हल्ली मोबाईलमुळे मराठी पण इंग्रजी शब्दांच्या सहाय्याने लिहायची सवय झाली आहे.

मी म्हणालो तो ओ. टि. पी. काहिसा तसाच आहे. ओळख Olakh तुझा Tuza परमेश्वर Parameshwar. OTP.

मनात देव कोणताही असला तरी भाव एकच असतो. आणि तो तुच नाही, तर तुझ्या सारख्या अनेकांनी ओळखला आहे. कोणाचही आणि कोणतही नांव घेतलं तरी चालतं हेच लक्षात ठेव. ज्याच नांव घेशील तोच ओ. टि. पी. परत संभ्रमात पडू नकोस. चला येतो मी. अनेक आशिर्वाद. असं म्हणत तो प्रकाश देणारा गोलाकार भाग लुप्त झाला.

पण जाता जाता अनेक ओ. टि. पी. त्याचा अर्थ आणि भक्तीभाव यासह देऊन, समजवून गेला.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

🔅 विविधा 🔅

☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

जगामध्ये काही चांगली माणसं आहेत म्हणून हे जग चाललेलं आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. किंवा खरोखर अनुभवतो सुद्धा. डॉ. सुजित भरत पाटील यांचा “ते शंभर रुपये “हा लेख वाचला आणि अगदी तसाच काहीसा प्रसंग मी अनुभवला तो मला आता लिहावासा वाटतो. प्रसंग अगदी असाच माणसा माणसातला फरक जाणून देणारा. 27 आणि 28 जानेवारी 2026 या दोन दिवशी आमच्या गावाकडची देवीची यात्रा होती. 28 जानेवारीला देवीचा प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. जेवण झाल्यामुळे घरी जायची गडबड नव्हती. समोर लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल लागलेले होते. मी सुद्धा नातीसाठी काहीतरी घ्याव म्हणून खेळण्यांच्या स्टॉल कडे गेले. खूपच लहान मुलांची खेळणी होती. त्यामुळे दुसरी मध्ये शिकणाऱ्या माझ्या नातीसाठी मी एक मोठा बॉल घेतला. माझी पहिलीच भवानी असल्यामुळे त्याच्याकडे मला परत द्यायला सुट्टे पैसे नव्हते. माझ्याकडे त्यावेळी दोनशे रुपये होते. त्यातली शंभर रुपयाची नोट मी त्याला दिली आणि पन्नास रुपये परत मिळण्याची वाट बघत होते. त्यावेळी मी उरलेले शंभर रुपये रुमालाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात ठेवले होते.

“थोडं थांबा मॅडम पैसे देतो “असे म्हटल्यामुळे मी आणखीन खेळणी बघू लागले. खाली वाकून खेळणं घ्यायचं. बघायचं कसं आहे आणि परत जागेवर ठेवून दुसर खेळण घ्यायच. असं मी बऱ्याच वेळा केले. त्यानंतर त्याने माझे पन्नास रुपये दिले आणि मी आमच्या घरच्या स्त्रियांबरोबर घरी आले. कुलूप उघडेपर्यंत मी कट्ट्यावर बसले आणि सगळे पैसे एकत्र ठेवायचे म्हणून रुमाल उघडला. तर त्यात शंभर रुपये नव्हते. माझ्या लक्षात आले की बहुतेक खेळण्यांच्या तिथे पडले असावेत. मी आमच्या घरी आलेल्या एका पाहुणीला घेऊन पुन्हा खेळण्यांच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. पैसे मी नीट ठेवले नाहीत. माझ्या निष्काळजी पणामुळे ते पडले याचा दुःख माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. तिथे जाऊन मी खेळणी उलटी पालटी करून बघू लागले. तो खेळणी वाला म्हणाला, “मॅडम काय पाहिजे “मी म्हणाले “मघाशी माझे शंभर रुपये बहुतेक इथे पडले आहेत. “स्टॉल वाला 30 -32 वर्षाचा तरुण मुलगा होता. तो हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाला, “हो हो आहेत माझ्याकडे पैसे. मला सापडले ते. ” हे ऐकल्यानंतर मला खूप हायस वाटलं. आणि माझ्या लक्षात आलं की तो माझी ही रिएक्शन टिपण्यासाठी माझ्याकडे एक टक बघत होता आणि अतिशय गोड हसत होता. “थँक गॉड “मी म्हणाले. थँक्स असे मी त्याला दोन-तीन वेळा म्हणाले. तो म्हणाला, “मॅडम असू दे हो. दिवसभर कष्ट करून जे पैसे मिळतात त्यात आम्ही समाधानी आहे. आम्हाला दुसऱ्यांचे पैसे कशाला हवेत. घरी गेल्यानंतर शांत झोप येते हे महत्त्वाच आहे. पण मॅडम पैसे नीट सांभाळून ठेवत जावा बरं का. ” मी त्याला हो हो म्हटले आणि तिथून निघाले. मला राहून राहून वाटत होते की जगात काही चांगली माणसं आहेत म्हणून जग चालते. असा प्रामाणिकपणा खूप दुर्मिळ असतो. त्याचबरोबर मलाही पैसे नीट जपून ठेवायला हवेत याची जाणीव झाली. एक मोठा अनुभव येऊनही माझ्याकडून पुन्हा पुन्हा चुका होतात याचे कधीकधी मला आश्चर्य वाटते. या प्रसंगा बरोबरच सहा महिन्यापूर्वी श्रावणामध्ये घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळला. माझ्याकडे भिशी होती. श्रावण महिना आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणींना जेवणाचे आमंत्रण दिले. आणायसे श्रावण महिना आहे तर सवाष्णी घालूयात असा विचार केला होता. मैत्रिणी बरोबर सव्वा बारा वाजता घरी आल्या. पण हे सगळं करायच्या नादात माझी पूजा राहिली होती. पण आता एवढ्या सगळ्या गोंधळात शांतपणे पूजा होणार नाही म्हणून मी या सगळ्या गेल्या की पूजा करू आणि नंतर जेवण करू असा विचार केला. मी पूजेची चांदीची भांडी धुतलेली तिथेच किचनमध्ये ठेवली होती. माझ्या सुनबाई सर्विसला गेल्यामुळे दोघी चौघीं मैत्रिणींचा मदतीसाठी म्हणून वावर किचन मध्ये होता. त्यांच्या नजरेला ती भांडी पडलेली होती. सगळ्या सवाष्णींना जेवण दिले. एक छोटासा गेम ही घेतला आणि नंतर त्या सगळ्या घरी गेल्या. मी पूजा करण्यासाठी ताम्हण हातात घेतले तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यातली चांदीची वाटी गायब झाली आहे. वाटी बऱ्यापैकी मध्यम आकाराची होती. मला प्रचंड धक्का बसला. मी सगळीकडे शोधाशोध केली. पण वाटी काही सापडली नाही. मी देवाची पूजा नीट करू शकले नाही. तसेच मी जेवनही नीट करू शकले नाही. माझा मैत्रिणींवरचा विश्वासच उडून गेला. मी खूप अस्वस्थ झाले. आमच्या यांना काही सांगण्याची सोय नव्हती. काय करावे काही सुचत नव्हते. कोणी बरं घेतली असेल याचा विचार करून करून डोके भनभानून गेले. प्रत्येक मैत्रिणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आणि त्यांना वाचायचा मी प्रयत्न करत होते. तरीही मला काही अंदाज येत नव्हता. मी आल्यानंतर माझ्या सुनबाईंना सांगितले. तिने सगळी भांडी व वाट्या चेक केल्या. तरीही वाटी सापडली नाही. कोणाला कसे विचारावे काही समजेना. शेवटी मुलाला मी ही गोष्ट सांगितली आणि दोघांनाही सांगितलं की मला आत्ता जाऊन सगळ्यांना जाब विचारता येईल पण वाटी तर एकीनेच घेतली आहे. मी घेतली आहे म्हणून कोणीही सांगणार नाही. आणि इतर सगळ्यांना वाटणार की मी त्यांच्यावर संशय घेतला. मैत्रीमध्ये एवढ्या वर्षांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार म्हणून मी ही गोष्ट आमच्या तिघांमध्ये ठेवली. अजूनही राहून राहून वाटते की एवढ्या चांगल्या घरातल्या स्त्रिया सुद्धा अशा असू शकतात अशा वागू शकतात. आमची कामवाली सुद्धा खूप प्रामाणिक आहे. तिने कधी कशाला हात लावलेला नव्हता. उलट कधी पॅन्टच्या खिशात पैसे सापडले तर तिने आणून दिले होते. पण एखादी मैत्रीण अशी वागते याचा अजूनही भरोसा वाटत नाही. उलट मैत्रिणींनी सांगायला हवे होते की तू ही सगळी भांडी देवघरात नेऊन ठेव. यांना अस करून झोप कशी काय लागत असेल. एका व्यक्तीबरोबर या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना याचे काही वाटत नाही. उलट मी कशी चालाखी केली आणि मला फायदा झाला याची फुशारकी ते घरात मारत असतील. आज चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. केव्हाही आता चांदीचा विषय आला की मला ती डोळ्यासमोर चांदीची वाटी दिसते. आणि मैत्रिणी दिसतात. आणि तो खेळण्यांचा स्टॉल वाला दिसतो.

© सौ. जयश्री अनिल पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ – डब्यातील डबे- – -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ डब्यातील डबे — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

आज सकाळी मसाल्याचा डबा घासायला काढला आणि त्याकडे बघतच राहिले.कारण आपली महिलांची सवय! डब्यावरचे नाव वाचले, विशेष म्हणजे बाहेरच्या डब्यावर व आतील छोट्या डबीवर नाव वेगळे.मग डब्याकडेच बघत बसले आणि हळूच आठवणीची एक पुडी सुटली.बाहेरचा डबा मैत्रिणीने दिलेला तर आतील छोटे डबे माझ्या जुन्या डब्यातील होते, जो डबा पूर्वी चिरल्यामुळे मोडीत काढला होता.मग लक्षात आले महिलांचा जीव कुठे कुठे अडकलेला असतो.

अगदी आजचे उदाहरण बघायचे झाले तर डबे घरात बघितले तर किती विविध प्रकारचे डबे सांभाळून ठेवलेले असतात.आई कडे असतो तो पर्यंत याचे महत्व लक्षात येत नाही. पण एकदा स्वतः च्या संसाराला सुरुवात झाली की या डब्यात जीव अडकणे सुरु होते.लग्नात आहेरात आलेले डबे अगदी कायमची सोबत करतात.विविध आकाराचे डबे अगदी व्यवस्थित लावून ठेवणे, दर महिन्याला घासून चकचकित ठेवणे.घासून मगच त्यात सामान भरणे.व्यवस्थित साहित्य सापडावे म्हणून त्यावर छान स्टिकर्स लावणे.अशी उत्तम गृहिणीची कामे सुरु होतात.आणि त्या कामाचे सर्वांकडून कौतुक पण होते.अर्थात लेबल असलेल्या डब्यात तोच पदार्थ असेल याची मात्र खात्री नसते.आणि कोणी शेंगदाणे कुठे आहेत? याच्या उत्तरा दाखल “आहेत ना तिथेच, रवा लिहिलेल्या डब्यात.” हे वाक्य ऐकू येते.काय करणार, तात्पुरती सोय केलेली असते.पण कोणाला समजणार?

काही मैत्रिणी तर डब्यांच्या समोर मुद्दाम सेल्फी काढून आपले वैभव दाखवत असतात.पूर्वी तर किचन मधील एक भिंत म्हणजे डब्यांची मांडणी असायची.आणि त्यात चढत्या किंवा उतरत्या डब्यांच्या उंचीच्या क्रमाने डबे लावलेले असायचे.जणू किचनचे वैभवच!

हळूहळू हळदीकुंकू, मिळालेले आहेर, भेटवस्तू अशा प्रसंगातून छोट्या, मोठ्या, विविध आकाराच्या, रंगाच्या डब्यांची बहीण, भावंडे घरात येतात आणि ऐटीत जुन्या डब्यांच्या समोर किंवा डोक्यावर जाऊन बसतात.त्यात अगदी सध्याच्या पार्सल मध्ये येणारे डबे पण अपवाद नसतात.अगदी टाकून द्यावेसे वाटले तरी “असू दे, वेळेला उपयोगी पडतील.” असे म्हणून ठेवले जातात.इतके डबे असून एखादा डबा आला नाही तर जीव हळहळतो.आणि दुकाना समोरून जाताना एखादा नवीन फॅशनचा डबा भुरळ घालतोच!

आणि हो आपला जीव अडकलेले डबे घरातल्यांच्या मात्र डोळ्यात खुपत असतात.मग मी एक युक्तीच केली आहे.एक बॉक्स घेऊन त्यात हे डबे छान ठेवले आहेत.काही दिवसांनी मात्र हे डबे त्यात मावत नाहीत.मग मी डबे एकात एक असे घालून जपून ठेवते.आणि छोट्या छोट्या डब्या मोठ्या डब्यांच्या पोटात लपून बसतात. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला या तत्वाने! अजून एक गंमत सांगू का? हे झाले निवडक डब्यांचे अजून आठवणींचे डबे उघडलेच नाहीत.म्हणजे लहानपणीचे, आज्जीचे, कड्या कुलुपे असणारे, विविध घाटांचे ( आकार ).

आणि हो या डब्यांच्या मध्ये यांच्या बहिणी बरण्या राहूनच गेल्या आहेत.बरण्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संकल्प… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ संकल्प☆ सौ शालिनी जोशी

‘संकल्प’ हा संस्कृत शब्द सम् अधिक कल्प. सम् म्हणजे चांगला आणि कल्प म्हणजे इच्छा, प्रतिज्ञा किंवा निश्चय म्हणून कोणताही चांगला म्हणजे हितकारक निश्चय हा संकल्प असतो.

परमात्मा एकटाच सर्व विश्वाला व्यापून होता. तेव्हा ‘एकोsहं बहुस्याम’ ‘एकटाच आहे बहु व्हावे ‘असे स्फुरण त्याला झाले. हाच पहिला संकल्प. याला ‘हरी संकल्प’ म्हणतात. यातूनच पुढे सृष्टीची रचना झाली. म्हणजे संकल्पाचे मूळ परमात्म्याकडे जाते. सहजच ते आपल्यापर्यंत आले. म्हणूनच कोणत्याही धार्मिक विधी पूर्वी संकल्प करून त्या देवतेला कार्यपुर्तीसाठी प्रार्थना केली जाते म्हणजे तो सिद्धीला जातो इच्छापूर्ती होते.

परमात्म्याचा संकल्प तत्काळ सिद्धीला गेला. आपल्यासाठी मात्र संकल्प आणि सिद्धी यामध्ये जमीन आसमानाचे अंतर. म्हणजे बराच काळ, कष्ट, प्रतीक्षा, संयम आणि सातत्याची गरज. समर्थ मनोबोधात सांगतात ‘सत्य संकल्प जीवी धरावा’ ‘ पाप संकल्प सोडून द्यावा’ म्हणजे संकल्पचे दोन प्रकार. परिणाम चांगला घडवणारा सत्य संकल्प. जसा ध्रुवाने अढळपद प्राप्तीचा केला. बालपणी तपश्चर्या आणि बराच काळ चांगले राज्य केल्यावर त्याला अढळपद प्राप्त झाले. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या प्रतिमेला पुढे ठेवून श्रेष्ठ धनुर्धर बनण्याचा संकल्प केला. मोठ्या कष्टाने त्याने आपले ध्येय साधले. संकल्प सिद्धीला पोहोचला. हे सत्य संकल्प. पण दुर्योधनाने ‘सुईच्या टोकावर राहील एवढीही जमीन पांडवाना देणार नाही’ असा संकल्प केला आणि तो युद्धाला कारण झाला. कौरवांचा नाश झाला हा पाप संकल्प. चाणक्य, शिवाजी महाराज यांचे संकल्प देशोध्दाराला कारण झाले. आर्य चाणक्याने नंदाच्या सभेत ‘तुझे भ्रष्टाचाराने बरबटलेले राज्य नाश करून समर्थ असा राजा सिंहासनावर बसवेपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली ‘ती पूर्ण करून दाखवली. अडीच तपाचा कालावधीमध्ये गेला. पण संकल्प पूर्ण झाला. तसेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पूर्ण केली. हे सत्य संकल्प. अशा प्रकारे संकल्प करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

गीतेत संकल्प हा शब्द बरेच वेळा आला आहे

१) न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन।(गी६/२)

२) सर्व संकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते। (गी६/४)

येथे संकल्प म्हणजे कामनायुक्त इच्छा असा अर्थ आहे त्यांचा त्याग येथे सांगितला आहे.

पूर्वी स्त्रिया चातुर्मासाच्या निमित्ताने काही व्रते करीत ते संकल्पच. संकल्पच यशाला कारण होतो. आताही कोणी एव्हरेस्ट चढण्याचा, कोणी खाडी पार करण्याचा, कोणी समाज सुधारण्याचा, कोणी अनाथांना सांभाळण्याचा, तर कोणी प्राण्यांची काळजी घेण्याचा संकल्प करतात. अशा प्रकारे संकल्पाना मर्यादा नाही. ज्याला जो आवडेल, झेपेल, पचेल, रुचेल पण दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही. तो त्याने अवश्य करावा. रोज काही वाचण्याचा, लिहिण्याचा, पाठांतराचा, व्यायाम करण्याचा, काही नियम करून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प नेहमी चांगलाच असतो. त्यामुळे शिस्त लागते. शरीराला म्हणाला वळण लागते. मनाची चंचलता कमी होते. अशा प्रकारे संकल्प करावा. सिद्धीचा आनंद भोगाव व सुखी व्हावे.

सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत हा मोठा संकल्प आपल्या देशापुढे आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आपण असे का वागतो?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आपण असे का वागतो?☆ श्री जगदीश काबरे ☆

माणसाचे सामाजिक वर्तन हे त्याच्या संस्कारांचे, परंपरांचे, भीतीच्या आणि स्वीकाराच्या अपेक्षांचे मिश्रण असते. अनेकदा आपण अनुभवतो की आपल्या आसपास असे मित्र, सहकारी किंवा नातेवाईक असतात की जे स्पष्ट बोलायला घाबरतात. त्यांना एखादे काम सांगितले असता ते आवर्जून “हो बघतो”, “हो करतो”, “नक्की करतो”, असे शब्द उच्चारतात; पण प्रत्यक्षात ते काम करतच नाहीत. ही घटना अनेकांच्या जीवनात इतकी वारंवार घडते की ती एक सामान्य ’सामाजिक पॅटर्न’ बनली आहे. या पॅटर्नचा अभ्यास केला तर त्यामागे केवळ व्यक्तीगत स्वभाव नसून खोल सांस्कृतिक आणि मानसिक संरचना दिसते. “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या संस्कारांनी हीच मानसिकता बळकट केली आहे. सत्य बोला, पण तेही प्रिय असले पाहिजे, ही अपेक्षा चांगली असली तरी तिचा अनपेक्षित परिणाम असा होतो की माणूस अप्रिय सत्य टाळायला लागतो आणि अखेरीस बोटचेपणा किंवा लोकांना न दुखावण्याच्या वर्तनाची एक प्रमुख खूण बनते.

भारतीय संस्कृतीत सहिष्णुता, नम्रता, इतरांना न दुखावणे, सुसंवाद राखणे यांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. हे मूल्य समाज टिकवण्यासाठी नक्कीच आवश्यक असले तरी त्यांचा अतिरेक झाल्यास माणूस स्वतःची भूमिका, मत किंवा नकार व्यक्त करताना त्याला असुरक्षित वाटायला लागते. “नाही” म्हणणे म्हणजे उद्धटपणा, रूक्षपणा, अनादर किंवा असामाजिकता, अशी एक समजूत पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात बसवली गेली आहे. त्यामुळे लोक “नाही” म्हणण्यापेक्षा “हो” म्हणतात आणि नंतर दुर्लक्ष करतात. हा प्रकार केवळ व्यक्तीगत संबंधांमध्येच नाही, तर कार्यालयीन कामकाजात, सार्वजनिक ठिकाणी, प्रशासनात आणि राजकीय जीवनातही दिसतो. वरवर पाहता सौम्य वाटणारी ही मानसिकता प्रत्यक्षात मोठ्या सामाजिक समस्यांना जन्म देते. जे करायचे नाही, तेही “हो” म्हणणे म्हणजे गैरसमज, चुकीची अपेक्षा वाढवणे आणि परस्पर अविश्वास निर्माण करणे. हीच परिस्थिती पुढे नात्यातील ताण, मित्रांमधील नाराजी किंवा कार्यक्षेत्रातील काम प्रभावीपणे न करण्यात परिवर्तित होते.

बोटचेपणा म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे मत, निर्णय किंवा स्वभाव लपवत, फक्त समोरच्याला भावेल असेच बोलणे. यातून खरी संवाद प्रक्रिया अगदी बिघडण्याचा सांभाव असतो. समाजशास्त्र सांगते की संवाद जितका अस्पष्ट तितका गैरसमज निर्माण होण्याची शक्यता अधिक. आपण एखाद्याला काम सांगतो तेव्हा आपल्याला हवे असते उत्तर –ते काम शक्य आहे की नाही. परंतु समोरचा माणूस स्पष्टपणे नकार देत नाही, कारण त्याच्या मते नकार देणे म्हणजे संबंध बिघडवणे. म्हणून तो “करतो”, “बघतो”, “थोडा वेळ दे” असे शब्द वापरून दुसऱ्याच्या अपेक्षा जिवंत ठेवतो. हे उत्तर ऐकणाऱ्याला सुखकारक वाटले तरी नंतर काम न केल्यामुळे गैरसमज वाढण्याची शक्यता असते. परिणामी, काम न झाल्यावर निराशा आणि नाराजी वाढते आणि त्या व्यक्तीला पुन्हा काम न सांगण्याचा सांगण्याचा निर्णय घेतला जातो. विश्वास तुटणे हे बोटचेपणाच्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे.

या मानसिकतेच्या सामाजिक मूळांचा अभ्यास केला तर सर्वप्रथम लक्ष जाते ते संस्कारांकडे. भारतात घरात, शाळेत आणि समाजात ज्या प्रकारे मुलांचे संस्कार होतात त्यात “नकार देणे चुकीचे आहे” असा भाव अगदी खोल रुजवला जातो. मुलांनी मोठ्यांना “हो” म्हटले पाहिजे, शिक्षकांनी सांगितले तसे वागले पाहिजे, घरी पालकांच्या निर्णयांवर प्रश्न विचारू नये, नम्रता दाखवावी, रागावू नये, गैरसोय होईल असे काही बोलू नये, अशा अनेक सूक्ष्म अपेक्षा त्यामागे असतात. या प्रक्रियेतून वाढणारे मूल आत्मविश्वासाने “हे मला जमत नाही”, “हे मी करू शकत नाही”, किंवा “हे मला मान्य नाही” असे बोलण्याची हिम्मत दाखवूच शकत नाही. भीडस्त स्वभाव वाढल्यामुळे मोठेपणी एखाद्या कामाला नकार द्यायचा असेल तरी त्याला ते कठीण जाते. तो विषम परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा बोटचेपणा स्वीकारतो, कारण त्याच्या मते ते अधिक सुरक्षित असते.

समाजशास्त्रात ’संघर्ष टाळण्याची संस्कृती’ अशी एक संकल्पना आहे. भारतीय सामूहिक जीवन हा या संस्कृतीचा एक प्रमुख नमुना म्हणायला हवा. कारण आपल्यात उघड संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती इतकी प्रबळ आहे की लोक सत्य बोलण्यापेक्षा शांत राहणे किंवा आनंददायी प्रतिसाद देणे पसंत करतात. एखाद्याने सांगितलेले काम नक्कीच नकोसे असू शकते, वेळ नसेल, कौशल्य कमी असेल, किंवा मनात इच्छा नसेल पण या सगळ्यांपेक्षा संघर्ष नको हा भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. मैत्री, नातेसंबंध किंवा सहकार्यातील सौहार्द टिकवण्याची भीती वाटणाऱ्या व्यक्तीचा खोटे आश्वासन देण्याकडे कल वाढतो. परंतु या संस्कृतीचे दुष्परिणाम बहुआयामी आहेत. सर्वप्रथम, व्यक्ती स्वतःच्या मर्यादा मान्य करण्याची सवय गमावते. ती स्वतःच्या क्षमता, वेळ, प्राधान्ये किंवा आवडीनिवडींचा विचार न करता प्रत्येक गोष्टीला “हो” म्हणते. त्यामुळे तिच्यावर अनावश्यक भार वाढतो. ती दिलेल्या शब्दांवर ती ठाम राहू शकत नाही, कारण सुरुवातीपासूनच ते शब्द वास्तविकतेवर आधारलेले नसतात. दुसरे म्हणजे, इतरांच्या दृष्टीने तिची प्रतिमा हळूहळू अविश्वसनीय, ढिसाळ, किंवा दुटप्पी बनते. जेव्हा एखादा माणूस वारंवार “हो” सांगून काम करत नाही तेव्हा लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत. त्याचे वचन, आश्वासन किंवा बोलणे यांचे मूल्य कमी होते. कार्यक्षेत्रात ही मानसिकता अधिक गंभीर बनते. भारतीय कार्यालयीन संस्कृतीत सांगितलेली कामे स्वीकारण्याचा दबाव असतो. येथेही सरळ “हे माझ्याकडून होणार नाही” असे सांगितले जात नाही. कारण करिअर वर डाग लागण्याची भीती असते. म्हणून कोणीही नकार देत नाही, पण कार्याची गती मंदावते, जबाबदाऱ्या ढकलल्या जातात, शेवटच्या क्षणी सबबी दिल्या जातात. यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. व्यवस्थित संवादाअभावी प्रकल्प अर्धवट राहतात आणि संस्थेत इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. सामूहिक कामकाजासाठी स्पष्ट संवाद ही पहिली अट असते; बोटचेपणा हा संवादाचा सर्वात मोठा शत्रू असतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर “नाही” म्हणू न शकणाऱ्या लोकांमध्ये अपराधगंड प्रबळ असतो. नकार दिल्यास समोरचा दुखावेल, रागावेल किंवा आपल्याबद्दल नकारात्मक विचार करेल अशी भीती वाटते. ही भीती त्यांना स्वतःच्या प्रतिमेबद्दल अतिसंवेदनशील बनवते. ते “चांगले व्यक्ती” दिसण्याची इच्छा ठेवतात. त्यांच्या मते जे लोक स्पष्टपणे नकार देतात ते उद्धट, हट्टी किंवा कठोर असतात. त्यामुळे ते कोणत्याही नात्यात स्वतःची जागा स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. परंतु दीर्घकाळात हीच प्रवृत्ती मानसिक ताण वाढवते. सतत लोकांशी गोड बोलत राहणे म्हणजे स्वतःची इच्छा, वेळ आणि ऊर्जेचा अपव्य करणे होय. त्यामुळे अशा लोकांत चिंता, निराशा निर्माण होताना दिसते.

सामाजिक पातळीवर बघितले तर “अप्रिय सत्य” बोलण्याची भीती आपल्याला आपली संस्कृती व्यक्तीगत स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते की दडपते, या प्रश्नाचे द्वंद्व आपल्या मनात उभे करते. स्पष्टपणा, प्रामाणिक संवाद, आणि नकार देण्याची क्षमता या गोष्टी कोणत्याही निरोगी समाजासाठी अत्यावश्यक असतात. परंतु जिथे कधीही नकार देऊ नये, तडजोड करावीच, सौहार्द राखणेच महत्वाचे अशी मानसिकता असते तिथे समाज बाहेरून शांत वाटला तरी आतून अस्वस्थ असतो. असा समाज दुटप्पी, दाम्भीक बनतो. संबंधांमध्ये आंतरिक प्रामाणिकता नसते. लोक एकमेकांना खरेपणे ओळखू शकत नाहीत, कारण ते मुखवटे धारण करून खऱ्या भावना लपवून ठेवत असतात. परिणामी, संबंध वरवरचेच राहतात. जर आपल्याला सामाजिकदृष्ट्या प्रामाणिकपणा वाढवायचा असेल तर प्रथम “नाही” म्हणण्याच्या संस्कृतीला स्वीकारले पाहिजे. “नकार देणे म्हणजे नातं तोडणे नाही”, हे लोकांच्या मनात ठसवले पाहिजे. नकार देणारी व्यक्ती प्रामाणिक असते, कारण ती आपली क्षमता आणि मर्यादा स्पष्टपणे सांगते. यामुळे त्याचे शब्द विश्वासार्ह असतात. उलट, सतत “हो” म्हणणारी व्यक्तीच अविश्वसनीय ठरते. म्हणूनच, सामाजिक विश्वास टिकवण्यासाठी “नाही” हा शब्द आपल्याला अपमानित करणारा वाटता कामा नये. कारण “हो” आणि “नाही” या दोन शब्दांमध्येच संवादाची मूलभूत रचना असते. दोन्ही शब्द आवश्यक.

म्हणून “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या वाक्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सत्य प्रिय असावे—होय. पण “प्रिय नसल्यास सत्य बोलू नये” हा अर्थ काढणे चुकीचे आहे. सत्याने प्रिय होणे म्हणजे सत्य सांगण्याची पद्धत विनम्र असावी. म्हणजेच सत्य लपवू नका, पण ते अप्रिय असले तरीही सत्य सांगायला कचरू नका. समाजात सत्य बोलण्याला प्रोत्साहन देताना त्याची पद्धत सौम्य ठेवणे हा मूळ उद्देश आहेच, परंतु याचा अर्थ असा नाही की अप्रिय सत्य सांगूच नये. पण संस्कृतीने प्रिय सत्यच सांगा असाच संस्कार रुजवला आणि व्यक्तीला सामाजिक दबाव सहन करावा लागला. म्हणून भारतीय समाजात “नकार” हा शब्द सामाजिक भीतीचा केंद्रबिंदू झाला आहे. कुणाला दुखावण्याची, कुणाकडून अवहेलना होण्याची, कुणीकडून नाते तुटण्याची किंवा स्वतःला वाईट ठरवले जाण्याची भीती लोकांना “हो” म्हटण्यास भाग पाडते. ही मानसिकता बदलायची असेल तर शैक्षणिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर आणि सामाजात संवाद कौशल्याची नव्याने मांडणी करणे गरजेचे आहे. मुलांना “हो” आणि “नाही” दोन्ही शब्द योग्य ठिकाणी कसे वापरायचे हे शिकवणे आवश्यक आहे. “नाही” म्हणणाऱ्या व्यक्तीला समाजाने दोष देणे बंद केले पाहिजे. उलट, त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान करायला हवा. याशिवाय, काम स्वीकारताना लोकांनी स्वतःच्या क्षमतांचा आणि वेळेचा तर्कसंगत विचार करणे आवश्यक आहे. नकार देणे कठीण वाटले तरी त्याचे दीर्घकालीन फायदे अधिक असतात. सामाजिक प्रामाणिकता वाढते, काम व्यवस्थित विभागले जाते, आणि अपेक्षा स्पष्ट राहतात. अशा संवादामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यांमध्ये पारदर्शकता वाढते.

शेवटी, “नाही” म्हणण्याची क्षमता असणे ही सामाज प्रगल्भ झाल्याची खूण आहे. जिथे लोक एकमेकांशी स्पष्टपणे व्यक्त होतात आणि तसे वागतात तिथे संबंध टिकाऊ बनतात, कामकाज अधिक परिणामकारक होते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. बोटचेपणा माणसाला वरवर चांगला वाटतो, पण वास्तवात तो स्वतःलाही आणि इतरांनाही हानीकारक असतो. एखाद्या कामाला नकार देणे हे चुकीचे नाही तर ते प्रामाणिकपणाचे धैर्य आहे. सत्य सांगणे आणि नको असलेले टाळणे यात संतुलन साधल्याशिवाय समाज निरोगी बनू शकत नाही. “प्रिय सत्य” ही संकल्पना योग्य आहे, पण “अप्रिय सत्य” टाळणे ही सामाजिक चूक आहे. म्हणूनच, स्पष्टपणे “नाही” म्हणणे ही परस्परातील संबंध पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक असणारी कृती आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंग वाणीतून कळलेले संत तुकाराम

अत्यंत तळमळीने पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या मुखातून जी अभंगवाणी निघाली आहे त्यातून आपल्यासारख्या साधक भक्तांना तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडत गेले आहे.

आता तरी पुढे/ हाचि उपदेश/

नका करू नाश/ आयुष्याचा//

सकाळच्या पाया/ माझे दंडवत/

अपुलाले चित्त/ शुद्ध करा//

हित ते करावे/ देवाचे चिंतन/

करूनिया मन/ एक विध//

तुका म्हणे लाभ/ होय तो व्यापार/

करा काय फार/ शिकवावे//

तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी(व्यापारी) होते. त्यामुळे भक्तांना उपदेश करताना, ज्यामध्ये तुमचे हित आहे, असाच व्यापार तुम्ही करावा असे ते बोलतात. या ठिकाणी व्यापार या शब्दाचा अर्थ कर्म असाच घेणे योग्य ठरेल.

अर्थात स्वहिताचे कर्म करावे.

*शरणागत झालो/ तेणे मी पणा मुकलो//

आता दिल्याचीच वाट/ पाहू नाही खटपट//

नलगे उचित/ काही पहावे संचित//

तुका म्हणे सेवा/ माने तैसी करू देवा//

या ठिकाणी संसारातून मुक्त झाल्याची त्यांची अवस्था दिसते. त्यांच्यातील मी नष्ट होऊन परमेश्वरा जवळ त्यांनी पूर्णतया शरणागती पत्करली आहे. परमेश्वर जे देईल त्याचीच वाट पाहणे आहे असे ते म्हणतात. संचिता पासून सुखाची अथवा दुःखाची प्राप्ती होवो, त्यांना काही फरक पडत नाही. परमेश्वराची सेवा हा एकच त्यांचा ध्यास आहे.

खऱ्या अर्थी तुकाराम जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे हे खालील १३ अभंग वाचले पाहिजेत. ते काय म्हणतात बघा…

कपट काही एक/ नेणे भुलवायाचे लोक//

तुमचे करितो कीर्तन/ गातो उत्तम ते गुण//

दावू नेणे जडी बुटी/ चमत्कार उठा उठी//

नव्हे मठपती/ नाही चाहूरांची वृत्ती//

नाही देवार्चन / असे मांडीले दुकान//

नाही वेताळ प्रसन्न/ काही सांगो खाणखूण //

नव्हे पुराणिक/ करणे सांगणे आणिक//

नाही जाळीत भणदी / उद्धव म्हणोनी आनंदी//

नेणे वादा घटा पटा/ करिता पंडित करंटा//

नाही हलवीत माळ/ भोवते मिळवूनी गबाळ//

आगमीचे नेणे कुडे / स्तंभन मोहन उच्चाटणे //

नोहे त्यांच्या ऐसा/ निरथवासी पिसा/

१) लोकांना कसे फसवावे, हे कपट मी जाणत नाही.

२) मी फक्त कीर्तन करतो आणि कीर्तनातून देवा, फक्त तुमचे गुणगान करतो.

३) लोकांना नादी लावणे हा माझा उद्देश नाही, म्हणून एखादी मुळी काढण्यासारखा कोणताही चमत्कार मी कधीच करत नाही.

४) माझे कोणीही शिष्य नाहीत, की जात वारा, मी माझे मोठेपण समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन.

५) मी मठाधिपती नाही किंवा मला कोणतीही जमीन इनाम मिळालेली नाही.

६) धूप, दीप, गंधादी पुजा अर्चनेच्या कोणत्याही गोष्टींचे दुकान मांडून मी पसारा घातलेला नाही.

७) काही लोकांच्या खाणाखुणा सांगणारा कोणताही वेताळ माझ्यावर प्रसन्न नाही.

८) पुराणाचा आधार घेऊन लोकांना एक सांगावे आणि व्यवहारात वेगळेच वागावे असा ढोंगी पुराणिक मी नाही.

९) अंबाबाईच्या नावाने उदो करत डोक्यावर अग्नीचे खापर जाळणे मला माहित नाही.

१०) घटाकाश, मटाकाश, तंतू आणि पट असे जे वेदांतातील दृष्टांत आहेत त्यांचा अनुवाद करणारा करंटा पंडित मी नाही.

११) लोकांना भवती जमवून आणि त्यांच्यात बसून जपमाळ ओढण्याचे ढोंग करणाऱ्यातला मी नाही.

१२) वेदातील जारण, मारण, उच्चाटन इत्यादी प्रयोग मला माहित नाहीत.

१३) हरीच्या भक्ती वाचून इतर प्रकार करणारा नरकवासी वेडा मी नाही.

तुकाराम महाराज हे फक्त तनाने आणि मनाने हरीचे दास आहेत, भक्त आहेत.

संत तुकाराम एक प्रापंचिक माणूस, साधना करताना त्यांचे मन मध्येच साशंक होते. आपली भक्ती खरी आहे की मी भक्तीचे ढोंग!! करतो आहे अशी शंका त्यांच्या मनात उत्पन्न होते आणि ते अस्वस्थ होतात. पांडुरंगाला सांगतात…

गातो भाव नाही अंगी/ भूषण करावया जगी//

परी तू पतित पावन/ करी साच हे वचन//

मुखे म्हणावितो दास/ चित्ती माया लोभ आस//

तुका म्हणे दावी वेष/ पैसा अंतरी नाही लेश //

ते या अभंगात स्वतःचे दोष वर्णन करतात.

हे हरी, मी तुझे नाव घेतो, परंतु त्यासाठी योग्य असा भक्ती भाव माझ्यापाशी आहे का? जगात माझा लौकिक वाढावा म्हणून तर मी हे नामस्मरणाचे ढोंग करत नाही ना? अशी स्वतःविषयी ते शंका घेतात. तू पतीत पावन आहेस, तेव्हा तूच मला माझ्या चुकीतून सावर. मी जेव्हा माझ्या भक्त असण्याचे दाखवतो, स्वतःला तुझा दास म्हणवितो, तेव्हा मला असे वाटते की भक्तीचा लेशही माझ्यात नसून माझ्या चित्तात अजूनही माया मोह लोभ आहे.

देवाला तुकारामांची ही प्रामाणिक कबुली आहे.

भक्तीचा महिमा इतका अपार आहे, की त्यामुळे तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यातील द्वैतभाव हळूहळू कमी होत चालला आहे. महाराज म्हणतात,

बाहिर पडलो/ आपुल्या कर्तव्ये /

संसाराची जीवे/ वेटाळीलो//

एका मध्ये एक/ नाही मिळो येत/

ताक नवनीत/ निवडिले//

झाली दोन्ही नामे / एकची मथनी/

*दुसरीया गुणी/ वेगळाली//

तुका म्हणे दाखविली/ मुक्ताफळी/

शिम्पलेची स्वस्थळी/ खुंटलीया//

महाराज स्वतःची स्थिती या अभंगात वर्णन करतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, केवळ या जीवदशेमुळे जन्म, मृत्यू, आणि संसार यात ते गुंतून पडले आहेत. पण आता प्रयत्नपूर्वक या सर्वातून बाहेर पडत आहेत. ताकापासून निघालेले लोणी ज्याप्रमाणे ताकात पुन्हा मिसळणे अशक्य, त्याचप्रमाणे आता एकदा संसारातून बाहेर पडल्यावर त्यात पुन्हा अडकणे नाही. एकाच्याच मंथना पासून वेगळ्या गुणांमुळे सार व असार हे दोन भाग झाले आणि त्यास दोन नावे पडली. एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढल्यावर त्याला पूर्ववत शिंपल्याशी जोडता येत नाही.

तुकाराम महाराजांची स्थिती या शिंपल्यातून बाहेर काढलेल्या मोत्यासारखी झाली आहे.

मोक्ष तुमचा देवा/ तुम्ही दुर्लभ तो ठेवा/

माझी भक्तीची आवडी/ नाही अंतरी ते गोडी//

आपल्या प्रकारा/ करा जतन दातारा/

तुका म्हणे भेटी/ पुरे एकची शेवटी//

तुकारामांना मोक्षाची हाव नाही. तो दुर्लभ आहे. ते देवाला सांगतात की देवा, मोक्ष काय आहे तो तुझ्यापाशीच ठेव. मला फक्त तुझ्या भक्तीची आवड आहे. तुझ्या भेटीसाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे.

तुकाराम महाराजांच्या मनस्थितीची कल्पना या अभंगातून वाचकांना येते.

५००० अभंगाच्या या गाथेत वेळोवेळी तुकाराम महाराज आपल्या नजरेसमोर सतत उभे राहतात. त्यांच्याविषयी पुढील लेखात अजून जाणून घेऊ.

 क्रमशः…  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- प्रकाशन समारंभाची सांगता झाली पण त्या आठवणी मात्र इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर मनात आजही तितक्याच ताज्या आहेत! कारण त्या कार्यक्रमाचं चोख नियोजन जसं, तसंच या समारंभाच्या निमित्ताने माझ्या उर्वरित आयुष्याला मिळालेलं एक अनोखं वळणसुद्धा! ते वळण म्हणजे त्या दिवशीच्या पहाटे मला पडलेल्या स्वप्नाचं ‘त्या’च्या कृपेने अकल्पितपणे सत्यात होणारं परिवर्तनच होतं!!)

आणि याला सुरूवात होणार होती मी सोमवारी बॅंकेत पोचल्यानंतर लगेचच!

सोमवारी मी बँकेत गेलो तेव्हा याच सर्क्युलरच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यसाठी वखरेसाहेबांनी मला आणि माझ्या असिस्टंटना तातडीने केबिनमधे बोलावून घेतलं. मी डायरीत सर्व महत्त्वाचे मुद्दे त्या रात्री व्यवस्थित लिहून ठेवले होतेच. त्यामुळे सुरूवातीलाच मी या योजनेचे सर्व नियम व अटीं यांची थोडक्यात माहिती सांगितली. या स्वेच्छानिवृत्ती योजनेला प्रतिसाद म्हणून स्वेच्छानिवृत्ती साठी आता स्टाफमेंबर्सकडून येणाऱ्या अर्जांची अक्षरश: रीघ लागणार होती. त्यामुळे मुदत संपेपर्यंतचा पुढचा संपूर्ण महिना आम्ही याच कामाच्या चक्रात फिरत रहाणार होतो!

या स्वेच्छानिवृत्ती योजनेतून मिळणारे आर्थिक लाभ आणि त्यामुळे उर्वरीत आयुष्यात मिळणारी निश्चिंतता यांचा विचार केला तर कुणालाही मोह पडावा अशीच ही योजना होती. कमीतकमी वीस वर्षे सर्व्हिस झालेलं कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार होतं. आर्थिक लाभ म्हणजे उर्वरीत सर्व्हिस मुदतीच्या ५०% मुदतीचा पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता!

असं असूनही ज्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ते मात्र इच्छा असूनही या योजनेचा लाभ घेण्याचं धाडस करणं शक्य नव्हतं. तसंच ज्यांच्या विरूध्द कामामधील अनियमिततांमुळे अंतर्गत चौकशी सुरू आहे तेही या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार होते. अशा केवळ नाईलाजाने मागे रहाणाऱ्यांना अचानक निर्माण होणारं स्टाफ शाॅर्टेज, बॅंकांमधे लगेचंच सुरू होणाऱ्या काॅम्प्युटरायझेशनमुळे नवीन भरतीची फारशी शक्यता नसणे या सगळ्यामुळे बॅंकेतलं रूटीन मॅनेज करण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागणार होती! आणि अर्थातच माझी तेव्हा अजून नऊ वर्षे सर्व्हिस शिल्लक असल्याने मीही मागे रहाण्यातलाच एक असल्याने मलाही त्या तारेवरच्या कसरतीची मानसिक तयारी आत्तापासूनच करायला हवी होती,.. पण त्याचं आत्तापासून दडपण घेण्यात अर्थ नव्हता.

या सर्क्युलरबद्दलची आमची चर्चा पुढे तासभर सुरू होती आणि मग चहा येईपर्यंत आपल्या प्रत्यक्ष झोनल आॅफिसमधून कोण कोण स्वेच्छानिवृत्ती स्विकारू शकेल याविषयीचे अंदाज बांधणं सुरू झालं. कारण त्याचा थेट नकारात्मक परिणाम आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या मोजक्या स्टाफलाच सहन करावा लागणार होता! याचं दडपण आमच्यापैकी इतर कुणाला त्याक्षणी फारसं जाणवलं नसलं तरी संपूर्ण झोनल आॅफिसचे सर्वेसर्वा म्हणून वखरे साहेबांना जाणवलं असणारच. कारण याच अनुषंगाने त्यांची आलेली प्रतिक्रिया प्रथमदर्शनी तरी मला बुचकळ्यात टाकणारीच होती.

“खरं सांगू कां? .. मला शक्य असतं ना, तर या योजनेनुसार पहिला अर्ज मी स्वत:च केला असता… ” ते वरवर हसत गंमतीने बोलावं तसं म्हणाले होते!

मीटिंग संपवून मी केबिनमधे आलो ते मनात तरंगत राहिलेले हे सगळे विचार सोबत घेऊनच. अर्थात मी त्यात फार वेळ गुंतून पडणं योग्य नव्हतं. समोरच्या कामांचा निपटारा अधिक महत्त्वाचा होता!

त्यादिवशी सगळी कामं आवरून मी ड्राॅवर लॉक केला आणि ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा मात्र दुर्लक्ष करून मी दूर सारलेले तेच सगळे विचार मनात पुन्हा डोकावू लागले. त्या विचारांचं दडपण नव्हतं, फारशी उत्सुकता नव्हती, चलबिचल नव्हती, तरीही ते विचार झटकून टाकावेत असंही वाटेना. ‘मला शक्य असतं तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यासाठी मीच पहिला अर्ज केला असता.. ‘ असं वखरे साहेब म्हणाले होते. पण आपल्याला ते त्यांच्याइतकं अशक्य कुठं आहे? आजवर मी आणि आरती दोघांनीही आमच्या संसाराची गरज म्हणून तिची नोकरी कधीच गृहीत धरलेली नव्हती. जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा आरती नोकरी सोडून त्या क्षणीच्या कर्तव्यभावनेने घरी राहिली होतीच. आता यावेळी तिची नोकरी आहे म्हणून स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेणं मलाच योग्य वाटत नव्हतं. अर्थात या योजनेमुळे निर्माण झालेल्या असंख्य व्हेकन्सीज् पैकी थोड्या फार जागा तरी तातडीने भरण्याची निकड निर्माण होणार असल्यामुळे पुढचं प्रमोशन प्रोसेस तात्काळ सुरू व्हायची शक्यता होतीच. आणि अर्थातच प्रत्येक स्टेटमधे उच्चाधिकार पदांच्या जागा मोजक्याच असल्याने आऊट ऑफ स्टेट पोस्टिंग देखील अपरिहार्यच होतं! थोडक्यात आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या जवळजवळ सर्वच अधिकाऱ्यांच्या आयुष्यांत या आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे प्रचंड उलथापालथ होणार होती!!

मनातले हे सगळे उलट सुलट विचार दूर सारून मी दारावरची बेल वाजवली. घरी आई होतीच आणि आरती आणि सलिलही प्रकाशन समारंभाला येताना दोन-तीन दिवसांची सवड घेऊनच आले होते. दार सलिलनेच उघडले. जेवायला बसण्यापूर्वीपर्यंत गप्पांचे सगळे विषय कालच्या प्रकाशन समारंभाबद्दलचेच होते आणि ते अपेक्षितही होतं. या तिघांसाठीही तो एक वेगळा आणि आनंददायी अनुभव होताच!

रात्रीची जेवणं आवरली. गप्पागोष्टी झाल्यावर आई झोपायला गेली. आरती/सलिलला आता लवकरच घडू शकणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींची अंधूक कां होईना कल्पना देणं मला आवश्यक वाटलं.

“तुम्हा दोघांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय.. ” मी म्हणालो. दोघांनीही प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं.

“कां? काळजी करण्यासारखं आहे कां कांही? ” आरतीनं विचारलं.

“आज नाही पण पुढं लवकरच थोडं फार काळजी करण्यासारखं घडू शकेल.. “

“तुम्ही क.. कशाबद्दल बोलताय? “

“बँकेत बरेच फेरबदल होऊ पहातायत. कोणत्याही क्षणी कांहीही घडू शकेल. माझ्यापुरतं बोलायचं तर आमचं प्रमोशन प्रोसेसही लवकरच सुरू होईल आणि त्यानंतरचं पोस्टिंग मात्र आऊट ऑफ स्टेटच असणार हे ठरलेलंच आहे. मला कुठेही जावं लागेल आणि त्यासाठी आपल्या तिघांचीही तयारी हवी. म्हणूनच आज बँकेत याविषयी बोलणं सुरू झाल्यापासून एकच विचार माझ्या मनात येतोय. त्याबद्दलच बोलायचंय. तशीच वेळ आली तर आरती, तू जॉब रिझाईन करून माझ्याबरोबर येशील? ” मी विचारलं. याआधी प्रत्येक वेळी मी कांहीं दिवस एकटा राहून निभावत आलो होतो पण यापुढे वय आणि जबाबदाऱ्या वाढत जातील तेव्हा मला ती ओढाताण नको होती. तिला सौम्य शब्दांत मी कल्पना दिली ती यासाठीच.

आरतीने चमकून माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खरकन् उतरलेला होता न् नजरेत हातून कांहीतरी निसटून जात असल्याची भावना!

” तुम्हाला लगेच कुठं जावं लागणार नाहीये ना? तशीच वेळ आली, तर तेव्हा ठरवूया ना आपण. आत्ताच त्याची चर्चा कशाला? ” बोलतानाही तिचा आवाज भरून आला होता.

” कां? तुला कंटाळा नाही आला नोकरीचा? ” मी विचारलं.

“नाही. मला आवडतो हा जाॅब. पण तरीही वेळ येईल तेव्हा सोडेन ना मी. ” ती त्याच भिजल्या आवाजात म्हणाली.

“पण मला कंटाळा आलाय आता नोकरीचा. मी सोडू? ” मी दोघांचा अंदाज घेत गंमतीने विचारलं.

” होs.. कंटाळा आला असेल तर खरंच सोडा. ” आरतीचा चेहरा खुलला. ती अगदी मनापासून म्हणाली.

आता मात्र त्यांना अधांतरी ठेवणं मला योग्य वाटेना. मी त्यांना नवीन स्वेच्छा निवृत्ती योजनेची सविस्तर माहिती दिली. ते ऐकून तोवर कांही न बोलता लक्षपूर्वक सगळं ऐकत राहिलेला सलिल म्हणाला, “बाबा, तुम्ही ही चांगली संधी खरंच सोडू नका. तुमचं सगळं व्यवस्थित आर्थिक नियोजन आहे, त्यामुळे निवृत्त व्हायचं ठरवलंत तर पुढं तुमचे आत्तापर्यंत शक्य न झालेले सगळे छंद जोपासत रहायचं आणि अर्निंग साठी कांहीही करायचं नाही. तसं असेल तरच.. ” तो म्हणाला. ते ऐकलं आणि मी पूर्ण निश्चिंत झालो. आता जे कांही करायचं ते आरतीची नोकरी आणि पगार गृहीत न धरता जे शक्य असेल तेच करायचं. आणि तेही पूर्ण विचारांती..!

हे मी मनाशी ठरवलं आणि पुढं अल्पावधीतच जे कांही घडलं ते आपसूकच घडत जावं तसंच सगळं.. आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती अशा अनपेक्षित वळणापर्यंत मी येऊन थबकलो! इथे वळायचं कीं आहे त्याच रस्त्याने पुढं चालत रहायचं? .. माझी क्षणकाळाची ही द्विधा मनोवस्था ओळखल्या सारखा ‘तो’ स्वत:शीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी.. माझ्याजवळ. कारण पुढं जे जे घडत गेलं ते सगळं त्यानेच घडवल्यासारखं! प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं आणि बरंच कांही एरवी मी कधी कल्पनाही केली नसती असं सगळं..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “राष्ट्रीय सणांचे महत्त्व…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “राष्ट्रीय सणांचे महत्त्व…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

जुलै, ऑगस्ट महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••

असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••

महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••

देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, सांजोरया, पूरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••

प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••

याच बरोबर १५ ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.

तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.

आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?

आपल्याच घरच उदाहरण घ्या… घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच ना.

घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.

कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच? हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायला, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. आपल्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलन आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.

जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील १४० करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा…

मग हाच विचार, हीच भावना, असच वागण, , ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही, तर दररोजचचच..

इतक्यातच घडलेली घटना…

४१ वर्षानंतर अंतराळातून

भारत कसा दिसतो?

याबद्दल बोलताना Wing Commander Sudhanshu Shukla म्हणाले…

* अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत सारे जहां से अच्छा आहे.

त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.

अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.

मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,… मी किंवा माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच बरोबर नाही.

सिंदूर operation च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.

परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••

हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो??. म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.

ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?

कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••

देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असतात.

मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल. मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..

ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।

म्हणतात ना…

Your greatest weapon is your mind. Train it To make right decisions. To make right selectios. To make right choices.

जय हिंद.

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योतीने तेजाची आरती… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ ज्योतीने तेजाची आरती… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

काजवा” किती वेगळा अद्भुत कीटक आहे ज्याने तेज प्रकाशित केले… स्वतः! स्वयंनिर्मितीचा पुरावा हा! पण चंद्रासारखाच परप्रकाशित!

चंद्राचा शीतल प्रकाश मिळवतोय सूर्याकडून तर काजव्याचा प्रकाश मिळवतोय, नव्हे नव्हे मिळतोय आंतरिक सूर्यापासूच (त्याचा आत्मा)!

 

मोराचं सौंदर्य, सिंहांच शौर्य, हरणाची चपळता, विंचवाचं डंख मारणं, पाण्याचं उतारा कडे वाहण, अग्नीचं जाळणं, कमल पत्राची निर्लेपता, ढगांची सौहार्द्रता, सागराची असीमता, नदीची पवित्रता, पर्वतांची स्थिरता, फुलांची मोहकता… किती सांगू…

“हरि अनंत हरिकथा अनंता”… याप्रमाणे ही प्रकृती चिंतनाचा नसून आनंदाचा विषय व्हावा हे वाटणेही कुणाचे? तोच आत्मा जो (काजव्याला व चंद्राला) सर्वत्र आहे, तोच हृदयस्थ आहे त्याचे!

 

आता एक गोष्ट लक्षात येते की सगळीकडे तोच कार्यरत आहे, पण त्याची ओळख पटत नाही! आपल्या शरीरात एक गोष्ट नक्की की पहाणारा “मी” आहे तसेच प्रकृतीला व मला सांभाळणारा ही एकच व तोच सगळीकडे व माझ्यात अविरतपणे आहे! मग…

 

“अनेक रुपे नटलेली” ही सत्ता आता आपली वाटू लागते कारण आधी इतर गोष्टी पाहिल्या की एकतर न्यूनगंड किंवा मिळवण्याची धडपड असायची स्वमर्यादेच्या जाणीवेचा हा अभाव!

हा अभाव संपणे म्हणजे जीवनाची खरी सुरुवात आहे. या मूलभूत जाणीवेनंतर जगात काहीही करणे ही त्या जाणीवेची प्रतिक्रिया असणार आहे (अभावातून प्रभावाकडे! )

 

“माझ्यातलाच” तो आहे तर मग यत्र तत्र सर्वत्र “माझ्यातलाच” आहे, हा प्रभावाचा “स्वानंद” आहे!

 

हिमालयाला गवसणी घालणारा कुणीतरी गिर्यारोहक माझीच इच्छा पूर्ण करतोय (माझाच हा विस्तार आहे), माझी शास्त्रीय संगीताची इच्छा एखादा कलाकार पूर्ण करतो, तोही माझाच विस्तार ठरतो. मी किंवा माझ्याच मुलीनी किंवा माझ्याच शिष्यांनी ते गायले तर फक्त “आनंद” असेल तर तो स्वानंदाचा एक भाग आहे! “स्वानंद हा त्याचा अमर्याद विस्तार आहे”! हा विस्तारही माझ्या स्वानंदाचा विषय नाही कारण जीवनाची काळी बाजूही माझ्यातल्या च मी चा विस्तार आहे! हा चौफेर विस्तार शून्य (अंधार)व अमर्याद (प्रकाश) माझाच आहे!

जितकं सकारात्मक उत्तम ऊर्जादायी तेजस्वी जगात आहे तितकंच या विरुध्दही आहे हे न नाकारता प्रकृतीचाच तो विस्तार आहे हे जाणवणं खरं “माझं” आहे! शब्दांचा विस्तार व शब्दांचे शून्यत्व एकाच पारड्यात पहाणारा “मी” आहे!

विरोधाभासात जो स्थिर आहे तो मी आहे म्हणून माझं काहीच नाही व सगळंच माझं आहे हे ही मी नाही!

(फक्त) मी आहे!

एक निमिषभर मिळालेला हा दुर्मिळ, अमर”क्षणच” मी आहे त्यासाठी “मी” आहे!

अपूर्ण गोडी पूर्ण करोनी “क्षण झाला अमर”… (अमृतकण)

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares