मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

विजय – पराभव, यश – अपयश, जिंकणं – हरणं या सर्वांमध्येच एक सूक्ष्म रेषा असते जी यशातलंही अपयश किंवा अपयशातलं यश, जिंकण्यातलं हरणं, हरण्यातलं जिंकणं ठरवत असते.

जगाच्या इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांचे विचार, कार्य किंवा लष्करी प्रतिभा विशाल असूनही त्यांना त्यांच्या अंतिम किंवा एखाद्या मोठ्या संघर्षात भीषण पराभवाला सामोरे जावे लागले.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट ज्याने युरोप जिंकला पण वॉटर्लूच्या लढाईत तो पराभूत झाला आणि त्याला आपले साम्राज्य गमवावे लागले.

विसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीला एका मोठ्या युद्धाच्या खाईत लोटले पण शेवटी त्याचा स्वतःचाच पराभव झाला.

अलेक्झांडरने बहुतेक ज्ञात जग जिंकले परंतु भारतीय उपखंडातला प्रतिकार आणि सैन्याची झालेली दमणूक यामुळे त्याच्या विजयाची मोहीम खंडित झाली.

रोमन सम्राट नीरो याच्या राज्यातील अस्थिरतेमुळे त्यालाही सत्ता गमवावी लागली आणि त्याचा अंत शोकांतिक झाला.

अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या अब्राहम लिंकन यांचाही त्यांच्याच देशात खून झाला.

गॅलिलिओ, टॉलस्टाॅय, साॅक्रेटीस यांच्यासारख्या महापुरुषांनाही प्रस्थापित सत्तेपुढे हार मानावी लागली.

महात्मा गांधीजी नाही पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हटले जाते. वैचारिक पातळीवर ते विजयी झाले पण राजकीय स्तरावर मात्र पराभूत झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही मुंबई आणि भंडाऱ्यातून दोनदा पराभूत व्हावे लागले.

मुळात महापुरुषांना विशिष्ट जातीत आणि गटात वाटल्यामुळेही ते पराभूत ठरले. त्यांच्या अनुयायांच्यातल्या स्पर्धा त्यास कारणीभूत ठरल्या.

एकंदर या सर्वांचा विचार करत असताना सहज मनात येते पराभूत असूनही या सर्व व्यक्ती मानवी मनातून दूर झाल्या नाहीत कारण एकेकाळचा इतिहास त्यांनी त्यांच्या धोरणाने घडवला होता.त्यांच्या पराभवाची कारणेही विविध होती.

मात्र *महापुरुषांचा पराभव* या विषयाचा विचार करताना, त्याची कारणे ठरवताना तो नक्की कुणामुळे आणि कशामुळे झाला याचा अभ्यास करताना, तो दोन ठळक भागात करावा लागतो एक त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे त्यांची तत्त्वेच, अति महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैयक्तिक अपयशाची किंवा पराभवाची मूलभूत कारणे ठरू शकतात.

एखाद्या महान व्यक्तीचा त्यांच्या अनुयायांकडूनच कसा पराभव होतो याचा विचार करताना काही ठळक बाबी मनात उतरतात. कुठलीही व्यक्ती ही तिच्या कर्माने महान ठरते. प्राप्त परिस्थितीकडे निराळ्या दृष्टिकोनातून बघून समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा समाज उद्धाराचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. त्या कार्यामुळेच ती व्यक्ती महान ठरते. छत्रपतींनी स्वराज्याच्या प्राप्तीला नेहमी “श्रींची इच्छा” असे म्हटले कारण कार्य श्रेष्ठ असते. व्यक्ती कार्यामुळे महान बनते.

कार्यापेक्षा जास्त कुठलीच व्यक्ती श्रेष्ठ नसते. महापुरुषांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचे अनुयायी मात्र त्यांनी आरंभिलेले कार्य पुढे नेण्याऐवजी त्या महापुरुषाची पूजा करण्यात धन्यता मानतात. इथूनच व्यक्ती पूजेला सुरुवात होते आणि महापुरुषांच्या तत्त्वांचा पराभवही सुरू होतो. त्यांच्या तत्त्वांना काळानुरूप बदलतं स्वरूप देण्याऐवजी, अथवा त्यातील निकड, गरज समाजाला समजावण्याऐवजी त्यांचे (त्या व्यक्तींचे) फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानतात आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल होऊन वैचारिक कुजवणूकही होते. पर्यायाने महापुरुषाचे कार्य, कार्यकारणता, उद्देश हे सर्व विरून जाते. केवळ गळ्यात पुष्पमाळा घालून कोनाड्यात बसवलेलं देवत्त्व त्यांना दिलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जातात. कधी त्यांच्याविषयी केलेल्या विधानांचा त्यांच्या अनुयायांकडून निषेध वगैरे होतो.

थोडक्यात व्यक्तीपूजन होते. जेव्हा कार्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होते तिथेच महापुरुषांचं अपयश मोजलं जातं आणि याला जबाबदार त्यांचे अनुयायी असतात. गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजिक बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह, यांच्याशी जेव्हा त्यांच्याच अनुयायांयांकडून प्रतारणा होते किंवा त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते तेव्हा नाईलाजाने म्हणावे लागते की महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात.अधिक तीव्रतेने, अथवा कठोरपणे असंही म्हणता येईल की ज्यांना आपण या महापुरुषांचे अनुयायी म्हणतो ते प्रत्यक्षात फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचे “तोंडीलावणं” करतात तेव्हा या महापुरुषांचे झालेले आत्मिक पराभव जाणवतात.

याच विषयाच्या दुसऱ्या भागात “अनुयायी” हा घटक दूर ठेवला तर त्या व्यक्तीच्या आचारसंहितेतच कुठेतरी त्यांच्या पराजयाची बीजे सापडतात आणि यासाठी मला पुराणकालीन युगपुरुषांचाही वेध घ्यावासा वाटतो. प्रजाहितदक्ष, मर्यादापुरुष श्रीरामाचे चरित्र वाचतानाही त्यांनी केलेल्या “सीतेच्या त्यागाचं”समर्थन ओढूनताणूनच करावं लागतं.

पुराणातल्या महापुरुषांचा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा नकळत आणि अगदी अलगद माझं मन महाभारतातल्या महापुरुषांचा विचार करू लागतं. महाभारतातल्या कथा लहानपणापासून जशा सांगितल्या गेल्या तशा स्वीकारल्या गेल्या पण त्यानंतर जेव्हा जाणीवा काहीशा प्रगल्भ होत गेल्या तेव्हा महाभारतात गणल्या जाणाऱ्या थोर, धोरणी, कर्तव्यनिष्ठ शब्दकठोर, वचनबद्ध महापुरुषांविषयी संदेह निर्माण होऊ लागला. त्यात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठीर, कर्ण हे सुद्धा सारे महापुरुषच होते पण कुठे ना कुठे ते पराभूत होते, त्यांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची महानताच त्यांना पराभूत करण्यासाठीचे कारण ठरली असे ठामपणे वाटतं.

त्यापैकी एका व्यक्तीचा मला या लेखात जाणीवपूर्वक परामर्श घ्यावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य आणि हस्तीनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची भीषण शप्पथ घेतली होती ते कुरू साम्राज्याचे पितामह, एक महान योद्धे आणि नीतीज्ञ. त्यांची जीवनकथा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या प्रतिज्ञा, कुरु साम्राज्यात घडलेल्या प्रसंगाशी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिका, त्या भूमिकांना दिलेलं वचनबद्धतेचं उदात्त कवच, कुरुक्षेत्रातल्या लढाईतलं त्यांचं सेनापतीपद आणि धोरण या अनेक बाबींचा एखाद्या विस्तृत कॅनव्हासवर मांडणी करून आढावा घेतला तर हा महापुरुष पराभूतच होता हे जाणवतं.

देवव्रत ते भीष्म ते भीष्माचार्य ते पितामह हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या भूमिकेवर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आकारतं. सोमवंशातील राजा शंतनु आणि गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष म्हणजे भीष्म. मूळ नाव देवव्रत परंतु सत्यवती नामक धीवर कन्येवर त्यांच्या वडिलांचे मन बसले आणि तिच्याशी विवाह व्हावा म्हणून “माझ्याच मुलाला राज्य प्राप्त व्हावे” या तिच्या अटीला त्यांनी मान्यता दिली त्याचवेळी देवव्रतने ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म असे उपनाव प्राप्त झाले आणि तेच प्रख्यात झाले. या प्रतिज्ञेपासूनच खरं म्हणजे भविष्यातल्या त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्मनीती इत्यादी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अलौकिक होते.

“सर्वशास्त्रवेत्ता” म्हणूनच त्यांना मानले जायचे. कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सावत्र भावांचे ते संरक्षक बनले. आंबा, अंबिका, अंबालिका या राजकन्यांचे स्वयंवर त्यांनी जिंकले पण या मुली त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी जिंकून आणल्या. स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हा त्यांचा स्वभाव म्हणून आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते अशा रीतीने चिकटून राहिले.

परशुरामांनी अंबेशी विवाह करण्याची त्यांना आज्ञा केली होती पण तीही त्यांनी पाळली नाही परिणामी अंबा सूडबुद्धीने ग्रासली गेली आणि कुरुक्षेत्री याच अंबेने शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन अर्जुनासोबत लढताना भीष्मास हरवले. शिखंडी रुपातल्या अंबेकडून म्हणजेच एका स्त्री कडून आलेल्या बाणांचा भीष्मांनी प्रतिकार केला नाही म्हणूनच ते रणांगणात अखेर कोसळले.

दु:शासनाने भर दरबारात केलेली द्रौपदीची विटंबना हा महापुरुष थांबवू शकला नाही हा केवढा तरी मोठा कलंक या महान विद्वान व्यक्तीवर कायमचा लागलेला आहे.
द्रौपदीने त्यांना प्रश्न केला होता, ” जुगारात हरलेल्या युधिष्ठीरास मला पणाला लावायचा काय अधिकार होता? वस्त्रहरणाच्या वेळी पितामह तुम्ही मौन धारण करून न्यायाच्या दरबारात माझा अपमान का केलात? ”

द्रौपदीचा हा प्रश्न म्हणजे भीष्माच्या आचारसंहितेवर आणि न्यायाच्या उल्लंघनावर केलेला थेट आरोप होता. त्यांचा कायदेशीरपणा आणि नीतिमत्तेवरच तिने प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि इथेच या महापुरुषाचा दारुण पराभव अधोरेखित होतो.

“कुरुवंशाचे खाल्लेले मीठ विरोधास रोकतं” हे त्यांनी केलेलं त्यांच्या मौनाचं समर्थन अत्यंत पांगळं नव्हतं का? कौरवांचे दोष दिसत असतानाही युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होण्याची चिन्हे दिसत असतानाही केवळ प्रतिज्ञेला चिकटून राहण्यासाठी असत्य, अधर्माविषयी मौन बाळगणं हे या महापुरुषाच्या नैतिक पराभवाचं मूळ कारण आहे.

युद्धानंतर इच्छामरणी, मृत्युला उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबवणारे, शरपंजरी पहुडलेले पितामह भीष्म कृष्णास प्रश्न विचारतात.

“एका क्रूर वास्तवास मला का सामोरे जावे लागत आहे? इतिहास माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल? ” त्यावेळी कृष्ण सांगतात, ” कुरुक्षेत्रातील रक्तपात हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गरजेचा होता. जरी त्यात पितृतुल्य व्यक्तींचा वध होणे वेदनादायी होते.” श्रीकृष्ण पुढे सांगतात, ” जेव्हा क्रूरता आणि अधर्म मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रतिज्ञा, वचनबद्धता, शब्दकठोरता हा आत्मघाती मार्ग ठरतो. पितामह! तुमच्या वैचारिकतेत नैतिकता असली तरी वास्तविक लवचिकता नव्हती. असत्य आणि अधर्म दिसत असतानाही तुम्ही तुमच्या विचारांची माघार पत्करली असती तर आज हा रक्तपात नव्हे हे युद्धच वाचले असते. पितामह! म्हणून नेमके इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने पराभूत झालात.”

एका महापुरुषाचा पराभव कलियुगात किंवा युद्धाच्या काळात हेच सूचित करेल की भीष्माचार्यांसारख्या जुन्या नियमांपेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याचे कृष्णा सारखे धोरणच उपयुक्त आहे. कृष्ण -भीष्म यांच्या संवादातून हेच स्पष्ट होते की न्यायाच्या रक्षणासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वीकृत धोरणांना छेद द्यावे लागतात. जे भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाला का समजू शकले नाही?

महापुरुषांचा पराभव याविषयाचा विचार करतांना भीष्माचार्यांचे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपातले आहे.

वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांचा, युद्धांचा, युद्धात कोसळणाऱ्या अथवा हत्या होणाऱ्या त्या त्या देशांतील नेत्यांचा, त्यांच्या पराभवाचा विचार भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्यांच्याही पराभवाची कारणे अशीच त्यांचे अनुयायी, राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर तपासली जातील हे नक्कीच.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मेजर संदीप उन्नीकृष्णन

राऊळात जाता श्री विठ्ठलाची भेट झाली नाही म्हणजे पांडुरंग परमात्मा कुठे तरी दूर, बाहेर गेले असतील. त्यांना येण्यास का बरं वेळ लागतो आहे? असं कुठल्या कामात अडकलेत देव, कुणाच्या भेटीत एवढे गुंतून राहिले असतील? जी अवस्था संत जनाबाईंची तीच अवस्था मूल गमावलेल्या आईची आणि अर्थात बापाचीही! जनाबाईंचा विठ्ठल तरी त्यांना भेटला…पण या आई-बापास त्यांचा विठ्ठल किमान या जन्मी तरी दिसणार नाही प्रत्यक्ष. त्याची जागा दुसरं कुणी घेऊ शकेल अशीही स्थिती नव्हती. त्याच्याऐवजी नव्हे, पण त्याच्यासारखं कुणीतरी आयुष्यात आलं तर…ते कुणाला नको असेल?

एकुलता एक मुलगा…देशरक्षणासाठी जातो म्हणाला. त्याला अडवून उपयोग नव्हताच. प्रकाश पसरवणारा तो संदीप…यांच्या संदीपने देशाचा प्रकाश तेवत राहावा म्हणून स्वत: विझून जाणं पसंत केलं. 

हिंदुस्थानला युद्धात पराभूत करू शकत नाही…पण त्याला सतत रक्तबंबाळ तर करूच शकतो…असं शत्रूच्या म्होरक्याने त्यांच्या पळपुट्या सेनेला शिकवून ठेवलं आहे. “we will bleed them a thousand times” आम्ही एक हजार वेळा युद्ध करू…अशी त्यांची दर्पोक्ती असते..आणि प्रत्येक पराभवानंतर ते हेच म्हणत राहतात. त्यानुसार ते एकेदिवशी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले. शेकडो निष्पाप नागरीकांना ओलीस धरले! त्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली!

२६ नोव्हेंबर, २००८. केरळ(मूळ गाव), कर्नाटक(जन्म, बालपण) आणि महाराष्ट्राशी (एन.डी.ए.खडकवासला) नाते असलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन…मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांवर चालून गेलेला झंझावात! Operation Tornado मध्ये 51, Special Action Group (51 SAG) चे पथक प्रमुख म्हणून मेजर साहेब दहा कमांडोजसह ताजच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले. ओलिसांची सहाव्या मजल्यावरून सुटका करीत ते पाचव्या मजल्यावर पोहोचले. तोच चौथ्या मजल्यावरील एका मोठ्या दालनात अतिरेकी असल्याची शंका आली…दालनाचा दरवाजा आतून बंद होता!

दरवाजा तोडून उघडला गेला…आतून प्रचंड गोळीबार झाला…आपला एक कमांडो जबर जखमी झाला. त्या दालनात हातगोळा फेकून अतिरेकी तिथून दुस-या ठिकाणी निसटून गेले.

मेजर साहेबांनी उर्वरीत कमांडोज सोबत घेत आणखी सुमारे १५ तास ओलिसांची सुखरूप सुटका करण्याचे काम केले. २७ नोव्हेंबरची मध्यरात्र. ताज मधील मध्यभागी असलेल्या जिन्याने वरच्या मजल्यावर एकट्याने शोध घेत जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला!

याच प्रयत्नात त्यांनी चार अतिरेक्यांना एका खोलीत आश्रय घ्यायला भाग पाडले…आता त्यांचा पळण्याचा मार्ग बंद…मध्ये मेजर साहेब होते. ते त्यांच्या साथीदारांना म्हणाले…”तुम्ही कुणीही वर येऊ नका…ते धोक्याचे आहे. मी यांचा बंदोबस्त करेन…! आणि मेजर साहेब त्या अंधा-या, धुराने भरलेल्या दालनात घुसले…चार रायफली धडाडल्या…साहेबांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला…पण अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मेजर साहेबांना पुरते घायाळ करून टाकले! एक दीप विझून गेला होता!

साहेबांचे आई-वडील ताज मधील त्या दालनाला दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या रात्री, मध्यरात्री भेट देतात…जिथे मेजर साहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्या खोलीत थांबतात…त्यांच्या अश्रूंना वाटा फुटतात. या दोघांनी आपल्या लेकाच्या स्मृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु ठेवला आहे…काळ जखमा भरून टाकतो…पण यांच्या जखमा अजूनही ओल्याच आहेत!

पुतळे उभारले गेले, रस्त्यांना नांवे दिली गेली. चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जो प्रभाव एखादा ग्रंथ करू शकणार नाही, तो प्रभाव काही तासांत एखादा उत्तम चित्रपट निर्माण करू शकतो. विषय अतिशय रोमांचक असल्याने अनेक चित्रपट निर्माते मेजर साहेबांचे वडील के.उन्नीकृष्णन (ISRO मधील सेवानिवृत्त संशोधक) आणि साहेबांच्या मातोश्री धनलक्ष्मी यांना भेटले. “आम्ही मेजर साहेबांच्या कामगिरीवर चित्रपट बनवू म्हणाले. पण या व्यावसायिक लोकांचा आविर्भाव “आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत” असा असल्याचे या दोघांना वाटले. त्यामुळे त्यांनी कुणालाच परवानगी दिली नाही. माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला..त्यामुळे तो सर्व देशाचा मुलगा ठरला. पण राजकीय मंडळी त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी अशा बलिदानांचा वापर करून घेतात, याचा त्यांना राग होता. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला घरी येण्यास थेट मज्जाव केला होता. मध्ये असेच काही दिवस गेले!

हैदराबादेत जन्मलेला पण अमेरिकेत वाढलेला एक युवा अभिनेता, लेखक आणि अनेक तेलगु चित्रपटांत चमकलेला आणि बाहुबली चित्रपटात खलनायकाच्या वेशात दिसलेल्या देखण्या आदिवी सेश याच्याही मनात मेजर साहेबांची कथा घोळत होती. त्यांनी उन्नीकृष्णन दांपत्याचे मन वळवले…आणि एक नातं आकार घेऊ लागलं! आदिवी यांनी स्वत: कथा, पटकथा लिहिली आणि मेजर संदीप यांची भूमिकाही निभावली…किंबहुना जगली! चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत तन-मन आणि धनाने सहभागी झाले. मध्येच उपटलेल्या कोरोना संकटातही हार न मानता एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मेजर’ चित्रपट तयार व्हावा म्हणून मेहनत घेतली. या काळात कोरोनाने जगाला हैराण करून ठेवले होते, या चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांचे जवळचे आप्त यात दगावले. या सर्व परिस्थितीमध्ये धैर्य न गमावता आदिवी काम करीत राहिले…Mission Major!

पण आदिवू यांनी संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन समजावून घेतले. Don’t come up! I will handle them! हे मेजर साहेबांनी त्या रात्री उच्चारलेले वाक्य त्यांनी मनात बिंबवून घेतलं. मेजर साहेबांच्या आयुष्यात आलेल्या जवळजवळ सर्वांशी आदिवू स्वत: बोलले, त्या त्या ठिकाणांना भेटी दिल्या…आणि पडद्यावर एक वीर गाथा साकारली गेली. 

‘मेजर’ चित्रपटाच्या पहिल्या प्रदर्शनाला मेजर साहेबांच्या मातोश्री, मेजर साहेबांनी त्यांना भेट दिलेली साडी परिधान करून आल्या होत्या. आदिवी त्यांना ‘अम्मा’ संबोधतात! मी मेजर संदीप यांची जागा कदापि घेऊ शकणार नाही…पण अम्माचा धाकटा मुलगा तर होऊच शकतो. आदिवी यांच्यामुळे उन्नीकृष्णन दांपत्याच्या चेह-यावर कित्येक वर्षांनी पहिल्यांदा हास्य उमटलं…ही खूप मोठी गोष्ट होती. 

आदिवू यांनी चित्रपटातून मिळणा-या पैशांचा विचार केला नाही. हिंदी आणि तेलगु भाषांत हा चित्रपट वेगवेगळा चित्रित केला. हा चित्रपट त्यांनी जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी खूप प्रयत्न केले. याचवेळी दक्षिणेतील महान अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते…पण तरीही ‘मेजर’ चित्रपटाने उत्तम पैसे मिळवले. अधिकाधिक तरुणांपर्यंत मेजर संदीप यांची शौर्यगाथा पोहोचावी म्हणून कित्येक ठिकाणी हा चित्रपट विनामूल्यही दाखवण्यात आला. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म केरळ येथे झाला होता. केरळसाठी हा चित्रपट खास मल्याळम भाषेतही ‘डब’ करण्यात आला होता. मेजर आणि मेजर संदीप अशी दोन शीर्षके या चित्रपटासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांचा मेजर साहब हा हिंदी चित्रपट येऊन गेला होताच. अर्थात याची कथा वेगळी होती. 

भारतात चित्रपट निर्मिती हा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अभिनेते, अभिनेत्री यांचा चाहता वर्ग मोठा आहेच…शिवाय या लोकांचे अनुकरणही खूप केले जाते…लोक यांनाच हिरो मानतात. पण देशासाठी खरेखुरे बलिदान देणा-या सैनिकांच्या कथा सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. अनेक वीरांची माहितीच लोकांना कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आदिवी सेश या अभिनेत्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पदच म्हणावे लागेल! अभिनंदन, आदिवी! मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. १५ मार्च हा यांचा वाढदिवस! यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा प्रयत्न. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ईश्वरार्पणम्… लेखक: डॉ. सरवनन – माहिती संकलक : मधुकर बोरीकर ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ईश्वरार्पणम्… लेखक: डॉ. सरवनन – माहिती संकलक : मधुकर बोरीकर ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

विज्ञानाच्या पलीकडे जे काही आहे,  ते सर्व म्हणजेच परमेश्वर आहे,  हे सिद्ध करणारी ही कहाणी आहे. आपण कर्ता असलो तरी करविता केवळ ‘तो’च असतो हे दाखवून देणारा हा लेख आहे.

जीवनाचा खरा अर्थ आणि त्यापलीकडचे सत्य म्हणजे ‘देव’च आहे.

मी MRI स्कॅनकडे पाहिलं आणि अंगावर काटा आला. तो हॉस्पिटलच्या एअर कंडिशनरमुळे नव्हता,  तर समोर दिसणाऱ्या दाहक सत्यामुळे होता. तो साक्षात मृत्यूचा आदेशच होता — काळ्या-पांढऱ्या अक्षरांत छापलेला.

*या हॉस्पिटलमध्ये मला एक दंतकथा म्हणतात. *

मी डॉ. सरवनन — व्हॅस्क्युलर सर्जरीचा निवृत्त प्रमुख.

चाळीस वर्षं मी मानवी शरीराच्या आत काम केलं आहे. चेन्नईच्या रस्त्यांपेक्षा मला माणसांच्या रक्तवाहिन्यांचा नकाशा अधिक चांगला माहीत आहे. धडधडणारी हृदयं मी हातात धरली आहेत,  छतावर रक्त उडवणाऱ्या नसा मी शांत केल्या आहेत. पण त्या स्कॅनकडे पाहताना,  इतक्या दशकांनंतर पहिल्यांदाच,  मला स्वतःला मी सर्जन आहे असं वाटलं नाही. मला स्वतःचीच फसवणूक झाल्यासारखं वाटलं.

रुग्णाचं नाव गौरी होतं.

वय अवघं सव्वीस. एकटी आई. दोन शिफ्ट्समध्ये एका छोट्या उपहारगृहात काम करून घर चालवणारी. कॉफी ओतताना ती अचानक कोसळली. तिच्या हृदयामधील अ‍ॅन्युरिझम (रक्तवाहिनी ज्या ठिकाणी कमजोर होते,  त्या ठिकाणी नसतील रक्तदाबामुळे येणारा फुगीर भाग. रक्तदाब अधिक वाढला तर ही नस फुटू शकते आणि असीमित रक्तस्त्राव होऊ लागतो.) फक्त मोठा नव्हता — तो राक्षसी होता. हृदयाच्या अतिशय नाजूक भागाभोवती तो अजगरासारखा विळखा घालून बसला होता.

*“हे ऑपरेशन शक्य नाही,  वरदन, ” विभागप्रमुखांनी मान हलवत सांगितलं. *

*“आत गेलात,  तर टेबलवरच ती मुलगी रक्तस्राव होऊन मरेल. हात लावला नाहीत,  तरी ४८ तासांत नस फुटेल. दोन्ही मार्गांनी मृत्यूच. ”*

*वैद्यकीय व्यवस्थेत आम्हाला जोखमी तोलून पहायला शिकवलं जातं. कायदेशीर जबाबदाऱ्या,  यशाची टक्केवारी — सगळं. *

*तर्क सांगत होता,  ” वहात लावू नकोस. निसर्गावर सोड. मागे फिर. “*

*पण मग मी गौरीच्या डोळ्यांत पाहिलं आणि वेटींग रूम मध्ये बसलेली तिची चार वर्षांची चिमुकली मुलगी दिसली. वहीत चित्रं काढत तिथे बसली होती. तिने फाटके बूट घातले होते. * 

*गौरी गेली,  तर ती मुलगी एकटी पडणार होती. बाहेरच्या जगात तिचे आईविना किती हाल होतील या विचारानेच तिच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने माझे मन भरून गेले होते. मी प्रशासनाला ऑपरेशन थिएटर ठरवायला सांगितलं. *

*मी केस घेणार असल्याचं जाहीर केलं. ते मला वेड्यात काढत होते. कदाचित मी होतोही. *

*ऑपरेशनच्या आदल्या रात्री,  मी माझ्या अंधारलेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो. बाहेर शहर झगमगत होतं — आत टांगणीला लागलेल्या एका जीवाबद्दल पूर्णपणे उदासीन असलेलं. *

*मी घाबरलो होतो. दगडासारखे स्थिर असणारे माझे हात थरथरत होते. स्कॅन पुन्हा पुन्हा पाहिला. *

*कुठलाच मार्ग नव्हता. कुठलीच आशा नव्हती. हे आत्मघातकी मिशन होतं. *

*मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. *

*स्कॅलपेल,  टाके,  रक्तदाब — ह्यांवर. * 

*पण माझ्या टेबलावर,  वैद्यकीय जर्नल्सच्या ढिगाऱ्यामागे,  एक लहानसं,  प्लास्टिक लॅमिनेट केलेलं वैद्येश्वराचं चित्र आहे. माझ्या आजीनं मेडिकल कॉलेज सुरू करताना दिलं होतं. *

ती म्हणाली होती —

*“औषध शरीरावर उपचार करतं,  पण माणसाला देव बरा करतो. ”*

मी ते चित्र हातात घेतलं.

कोणतीही औपचारिक प्रार्थना केली नाही.

फक्त गौरीची फाईल हातावर ठेवली,  देवाच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि अंधारात हळूच बोललो —

*“हे प्रभो…, या वेळेला माझे हात अपुरे पडतायत. *

*मी इथे फक्त एक मेकॅनिक आहे. *

*उद्या सकाळी तुम्हालाच ऑपरेशनसाठी यावं लागेल. *

*मी हात देतो…, *

*पण बुद्धी तुम्ही द्या. *

*आज सर्जन तुम्हीच आहात. ”*

*दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये गोठवून टाकणारं थंड वातावरण होतं. तणावानं भरलेलं. नर्सेस शांत होत्या. भूलतज्ज्ञ तर,  माझ्याकडे पाहायलाच तयार नव्हते. *

सगळ्यांना माहित होतं — *”आपण एका अटळ सत्याकडे चाललो आहोत. तिचा मृत्यू अटळ होता. “*

ऑपरेशन सुरू झालं.

*स्कॅनपेक्षाही परिस्थिती वाईट होती. रक्तवाहिनी कागदासारखी पातळ,  आणि जणू संतापून धडधडत होती. एक चुकीचा श्वास,  एक सूक्ष्म कंप — आणि सगळं संपणार होतं. *

*मी मायक्रो-कात्री उचलली. *

*तो क्षण होता. Widowmaker क्षण. * (widowmaker artery= left anterior descending artery हृदयाच्या बहुतांश भागाला शुद्ध रक्त पुरवणारी,  एक अत्यंत महत्वाची रक्तवाहिनी)

*या क्षणाच्या अलीकडे होतं जीवन आणि पलीकडे उभा होता केवळ मृत्यू! *

*आणि ते घडलं. * 

*खोलीत पूर्ण शांतता पसरली. फक्त शांतता नाही,  — पोकळी. *

*मॉनिटर्सचे आवाज दूर कुठेतरी विरून गेले. *

*माझ्या खांद्यांवरून एक विलक्षण उब पसरली,  हातांमधून बोटांपर्यंत वाहत गेली. तो अ‍ॅड्रेनालिन नव्हता. *

*ही होती… शांतता. *

*गंभीर,  भारलेली शांतता. *

*माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —*

*”मी ते हलवत नव्हतो,  मी ते हलताना पाहत होतो. *

*मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ,  मिलिमीटर अंतरावर,  क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती. *

*“BP स्थिर आहे…”* *भूलतज्ज्ञ आश्चर्याने कुजबुजला. *

मी उत्तर देऊ शकलो नाही.

*मी एका तंद्रीत होतो. *

*”माझ्या मागे कुणीतरी उभं आहे,  माझ्या कोपरांना दिशा देत आहे,  मनगट स्थिर करत आहे”* — *अशी तीव्र जाणीव होती. *

*क्षणभर वाटलं,  खरंच दुसराच कोणी डॉक्टर टेबलजवळ उभा आहे. *

पंचेचाळीस मिनिटांनी मी शेवटचं उपकरण ट्रेमध्ये ठेवलं.

*“अ‍ॅन्युरिझम संपलं आहे,  नसेवर आलेलं फुगीरपणा गेला आहे. ”* मी म्हणालो.

*“आता बंद करा. ”*

*थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. नर्सेस रडत होत्या. *

*रेसिडेंट्स मॉनिटर्सकडे अविश्वासाने पाहत होते. *

*एक थेंबही रक्त गेलं नव्हतं. *

*ते अशक्य होतं — पण परिपूर्ण होतं. *

मी गाऊन काढून हात धुण्याच्या ठिकाणी गेलो.

आरशात पाहिलं.

*अशा ऑपरेशननंतर मी नेहमी थकलेला,  घामाघूम,  पाठ दुखत असणारा असतो. *

*आज मला यापैकी काहीही जाणवत नव्हतं. मी शांत होतो. अजिबात थकलो नव्हतो. *

 *मी माझ्या सुरकुतलेल्या,  वृद्ध हातांकडे पाहिलं. * 

*आज त्यांनी एका आईला वाचवलं होतं. एका छोट्या मुलीला अनाथ होण्यापासून वाचवलं होतं. *

*पण सत्य फक्त मला माहीत होतं. *

मी ऑफिसमध्ये परत गेलो,  वैद्येश्वराचं ते छोटंसं चित्र उचललं आणि खिशात ठेवलं.

*एका आठवड्यानंतर मी डिस्चार्जच्या कागदावर सही केली. *

गौरी तिच्या मुलीचा हात धरून बाहेर पडली. डोळ्यांत अश्रू,  *”मला हिरो… किंवा देव “* म्हणत होती.

मी हसलो आणि मान हलवली.

*“मी एकट्याने नाही केलं, ”* मी म्हणालो.

*तिला वाटलं,  मी टीमबद्दल बोलतोय. *

*पण त्या दिवशी मुख्य सर्जन कोण होता,  हे मला माहीत होतं. *

*विज्ञान ‘कसं’ हे सांगू शकतं. रक्तप्रवाह,  नसांचं जाळं,  सगळं सगळं. *

*पण ‘का’ — हे कधीच सांगू शकत नाही. *

*अशक्याच्या समोर उभा असलेला माणूस अचानक मार्ग कसा शोधतो,  हे विज्ञान समजावू शकत नाही. *

*कधी कधी स्वीकारावं लागतं,  की,  आपण फक्त एक साधन आहोत. *

आणि त्या मंगळवारी,  ऑपरेशन थिएटर क्रमांक ४ मध्ये, *खरा वैद्य — परमवैद्य — स्वतः हजर होता. *

*कधीही आशा सोडू नका. *

*स्कॅन काळा असला तरी,  जग संपलं असं म्हणत असलं,  तरीही! *

*चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत. कधी कधी ते फक्त स्थिर हातांमध्ये…, आणि शांत प्रार्थनेत येतात. *

जय वैद्येश्वर.

सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती दाखवणारी अतिशय सुंदर कथा..

 

मूळ इंग्रजी लेखक : डॉ. सरवनन

संकलक : मधुकर बोरीकर 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सापाच्या विषावरील उतारा!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सापाच्या विषावरील उतारा!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

वायन्स बायोटेक प्रा. लि. द्वारे हैदराबादमध्ये भारतातील अँटी स्नेक बाईट इंजेक्शन तयार केले जाते!!

त्याबद्दल आपण जाणून घेऊ.

या कंपनीचा एक मोठा घोड्यांचा तबेला आणि प्रजनन केंद्र आहे,  उत्तम गुणवत्ता नियंत्रण आणि पर्यायाने गुणवत्ता हमी आहे.

नाग सापाच्या विषारी दंशाने हत्तीलाही मारले जाऊ शकते,  पण एक प्राणी त्यापासून बचावतो: घोडा!

कोणत्याही विषारी सांपाने दंश केला तरी घोडा त्यातून मरत नाही. दंश केल्यानंतर,  घोडा सुमारे तीन दिवस हलका असला तरी,  तो पूर्णपणे ठीक होतो,  जसे काहीच झाले नाही.

हे निसर्गातील एक अविश्वसनीय आश्चर्य आहे.

आणि या प्राण्यातच मानवासाठी जीवन वाचवण्याचे एक रहस्य आहे – अँटी-वेनोम व्हॅक्सीन.

पण हे अँटी-वेनोम व्हॅक्सीन कसे बनवले जाते?

प्रथम,  सांपांचे विष गोळा केले जाते.

मग,  घोड्यास थोड्या प्रमाणात विष टोचले जाते.

घोड्याची प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते आणि विष निष्प्रभ करण्यासाठी प्रतिद्रव्य तयार करते.

2-3 दिवसांनंतर,  ही प्रतिद्रव्ये घोड्याच्या रक्तात असतात.

मग घोड्याचे रक्त घेतले जाते आणि लाल रक्तपेशी काढून टाकल्या जातात.

प्लाझ्मा (पांढरा भाग) अँटी-वेनोम तयार करण्यासाठी प्रक्रिया केला जातो.

हे अँटी-वेनोम नंतर सांपाने दंश केलेल्या मानवांमध्ये इंजेक्ट केले जाते,  त्यांचे जीवन वाचवण्यासाठी.

केवळ भारतात,  शेकडो घोड्यांची देखभाल करून हे जीवन वाचवणारे सीरम तयार करण्यासाठी अनेक अँटी-वेनोम उत्पादन सुविधा आहेत.

या सौम्य प्राण्यामुळे,  आम्ही पृथ्वीवरील काही घातक विषांपासून संरक्षित आहोत.

घोड्यांशिवाय,  सांपाच्या दंशामुळे अनेकांना जीवन गमवावे लागेल.

हे निसर्गाच्या रहस्य,  दया आणि अंगभूत योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

निसर्गाचा प्रत्येक घटक हे अशा आश्चर्यजनक कृपेचे प्रतिबिंब आहे.

— 

(एका इंग्लिश पोस्टवरून अनुवादित) 

इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद : श्री सुनील देशपांडे 

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक पंधरावा – – 

मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी |

जिता बोलती सर्वही जीव मी मी`

 चिरंजीव हे सर्वही मानिताती |

अकस्मात सांडूनिया सर्व जाती १५|

अर्थ:

आपल्या भोवताली दिसणारे सुंदर जग म्हणजे मृत्यूभूमी आहे ही सत्य गोष्ट आहे. असे असले तरी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अहंकारामुळे मी मी करीत असतो. आपण अमर आहोत अशीच सर्वांची भावना असते. परंतु एक दिवस अचानक हे सगळेच सोडून जावे लागते.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले असे सांगतात. या श्लोकात आपण ज्या पृथ्वीवर म्हणजेच इहलोकांत राहतो तो इहलोक किंवा ही पृथ्वी मृत्यूभूमी कशी आहे हे समजावून सांगतात. हे जग नित्य बदलते आहे किंबहुना बदल हाच या जगाचा स्थायिभाव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था पृथ्वीवर आपल्याला बघायला मिळतात. भासमान असणाऱ्या या दृश्य जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थातून जाताना दिसते. माणसाला देखील याच अवस्थांमधून जावे लागते. तरीसुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला चिरंजीव समजतो आणि आपण केलेल्याचा अहंकार मिरवत असतो. हा अहंकार भल्याभल्यांचा घात करतो. ज्यांना साधना मार्गावर चालायचे आहे, त्यांना तर अहंकार विषाप्रमाणे वर्ज्य आहे. संत, सद्गुरू किंवा सद्ग्रंथ यांच्यामध्ये अहंकार दूर करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून साधकाने त्यांचा आश्रय घ्यावा.

माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे लागून पैसा कमावतो. घरदार, मुलेबाळे सगळे नाती निर्माण होतात. परंतु या सगळ्या गोष्टी इथेच राहतात. माणूस गेला की पैसा, धन, संपत्ती जागच्या जागीच राहते आणि इतरांची मालमत्ता होते. पत्नी त्याला दारापर्यंत पोहोचविण्यास येते, समाजातील लोक त्याला स्मशानापर्यंत पोहोचवतात. मात्र अगदी अंगावरचा कपडा देखील सोबत येत नाही. सोबत जाते ते फक्त आपले कर्म. परंतु तरीही माणसाचा ताठा किंवा गुर्मी शेवटपर्यंत कायम असते. मी एवढा पैसा कमावला, मी एवढे वैभव मिळवले, मला एवढे यश मिळाले, हे सगळे माझ्या कर्तृत्वामुळे ! माझी मुले, माझी बायको असे सगळे तो मी मी करत असतो.

काही लोक गैरमार्गाने अमाप संपत्ती कमावतात परंतु अंत्यसमयी त्यातील काहीही कामी येत नाही. करोडोंची संपत्ती असते परंतु एखाद्या दुर्धर आजाराने दवाखान्यात दाखल व्हावे लागले की पैसा सुद्धा त्याला बरे करू शकत नाही. आयुष्य वाढवून मिळत नाही की गेलेले क्षण परत येत नाहीत. हे सगळे सोडून कधीही अचानक जावे लागते. ‘नाही घडीचा भरवसा, कोण काळ येईल कैसा‘ हेच खरे. समर्थ म्हणतात

घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा,

आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना”

प्रत्येक क्षण मृत्यूच्या दिशेने जात असताना, संसाराच्या मायेत न अडकता ईश्वराचे (रामाचे) नामस्मरण करावे, कारण तोच कायमचा आधार आहे. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपला प्रत्येक क्षण सार्थकी लावला पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

स्वसंवाद :

  • माझ्या आयुष्यात मी हे केले किंवा हे सगळे माझ्यामुळे आहे असा अहंकार बाळगतो का ?
  • पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमच्या नाहीत हे मला खरोखर पटते का?
  • माझ्या आयुष्यातील सत्कर्मेच माझ्यासोबत येतील यावर माझा विश्वास आहे का ? ( क्रमशः )

– – – 

श्लोक सोळावा – – 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। 

अकस्मात तोही पुढे जात आहे॥ 

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। 

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

अर्थ : आपली प्रिय किंवा जिव्हाळ्याची व्यक्ती गेली, मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा व्यक्तीच्या निधनाचे दुःख करीत बसणारा देखील त्याच रांगेत उभा असतो आणि अकस्मात त्याला देखील हे जग सोडून जावे लागते. शोक हा लोभ किंवा मोहापोटी असतो. त्यातून क्षोभ म्हणजे नाशालाच जन्म मिळतो म्हणून माणूस पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला काळ हा आपल्या पाठीशी लागलेला आहे हे अटळ सत्य सांगतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे. या श्लोकात ते मृत्यूबद्दलच अधिक सांगून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आपली प्रिय व्यक्ती मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखाचा शोक करत बसतो परंतु हा शोक लोभ किंवा मोहाच्या पोटी असतो असेच समर्थांना सांगायचे आहे. कारण त्यातून क्षोभ निर्माण होतो आणि हा क्षोभ सर्वनाशाला कारणीभूत ठरतो.

मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल दुःख करीत बसताना आपल्यालाही एक दिवस त्याच वाटेने जायचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मृत्यूची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे आज माझी प्रिय व्यक्ती मला सोडून गेली परंतु उद्या मला देखील त्याच मार्गाने जायचे आहे. हे लक्षात घेतले तर आपोआपच जगण्याची आसक्ती आणि इहलोकीचा लोभ कमी होतो. असे झाले म्हणजे व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून च्युत होत नाही.

उपकार या हिंदी चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक फार सुंदर गाणं आहे. त्यात कवी म्हणतो,” कस्मे वादे प्यार वफा सब बाते है, बातों का क्या ? कोई किसी का नही है, झूठे नाते है नातोंका का क्या ?”

गाडगे बाबा कीर्तन करीत असताना कोणीतरी त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेल्याची बातमी सांगितली. तेव्हा ते म्हणाले

किती मेले कोट्यानुकोटी

काय रडू एकासाठी ?

लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित असताना त्यांना देखील आपला मुलगा वारल्याची बातमी कळाली. परंतु त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून अग्रलेख पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच केसरीचा अंक निघाला. ही सगळी मंडळी महान असली तरी त्यांना दुःख झाले नसेल का ? निश्चितच झाले असणार. परंतु त्याचे रूपांतर त्यांनी शोकामध्ये होऊ दिले नाही आणि आपल्या कर्तव्य मार्गावर ते अग्रेसर राहिले. कारण त्यांना देखील पुढे आपणही त्याच मार्गाने कधीतरी जाणार आहोत याची जाणीव होती.

समर्थ असे सांगतात की अति शोक हा मोहातून निर्माण होतो. मोह म्हणजेच लोभ किंवा वासना. असे षडरिपूंचे मायाजाल आपल्याला जगण्यात किंवा ज्या अनंत अशा राघवाच्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे त्यापासून परावृत्त करते. माणसाने त्यातून बाहेर पडले पाहिजे.

इच्छेतून वासना निर्माण होतात. वासनेतून काम किंवा षडरिपू निर्माण होतात. त्यात आपण अडकलो की जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका नाही. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि मृत्यू पावत राहतो. माणसाचे अंतिम ध्येय मोक्ष हेच आहे. म्हणूनच मरणाचा अति शोक न करता आपल्यालाही एक दिवस त्याच मार्गाने जायचे आहे हे लक्षात ठेवून आपले कर्तव्य करीत राहणे महत्त्वाचे आहे.

आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम सांगितले आहेत, त्यातील वानप्रस्थाश्रमाची कल्पना फार सुंदर आहे. ती यासाठी फार उपयोगी पडते. वानप्रस्थाश्रमात संसारातील लक्ष हळूहळू काढून घ्यायचे असते. आजच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे वानप्रस्थाश्रम शक्य नाही. परंतु काही ठराविक वयानंतर मुलांच्या बरोबर संसारात राहताना आपली आसक्ती हळूहळू कमी करायला हवी. ही आसक्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मुलांच्या संसारात अप्रत्यक्षपणे आपली ढवळाढवळ सुरूच राहते आणि त्याचे प्रमाण अति वाढले म्हणजे मुलांना देखील आपण नकोसे होतो. ही आसक्ती सोडता आली तर अंतकाळी जो मोह किंवा लोभ शिल्लक राहतो, तो राहणार नाही आणि त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकेल.

स्वसंवाद : 

  • माझ्या प्रिय व्यक्तींबद्दल असलेले माझे प्रेम हे आसक्तीत तर बदलत नाही ना?
  • मृत्यू अटळ आहे ही जाणीव मी खरंच मनापासून स्वीकारली आहे का?
  • दुःखाच्या प्रसंगी मी खचून जातो की कर्तव्य मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो?
  • संसारातील मोह आणि लोभ कमी करण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
  • माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ संसारापुरते मर्यादित आहे की आत्मोन्नतीकडेही माझे लक्ष आहे?

– क्रमशः श्लोक १५ आणि १६.  

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अनृण्य” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अनृण्य” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

अनृण्य 

– – – ऋणमुक्त जीवनाची भारतीय संकल्पना

    – – कृतज्ञता, कर्तव्य आणि जीवनाचे नैतिक तत्त्व

प्रस्तावना

कधी कधी एखाद्या शब्दावरून सुरू झालेली अल्पशी चर्चा आपल्याला भारतीय संस्कृतीच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाते. “आनृण्य की अनृण्य?” हा प्रश्नही तसाच आहे. हा केवळ शब्दरूपाचा वाद नसून भारतीय जीवनदृष्टीतील एका महत्त्वपूर्ण नैतिक संकल्पनेशी संबंधित आहे.

शब्दाची व्युत्पत्ती

“अनृण्य” हा शब्द संस्कृतमधील “ऋण” या शब्दापासून निर्माण झाला आहे. “ऋण” म्हणजे देणे, कर्ज किंवा दायित्व. “अन्” हा नकारार्थी उपसर्ग जोडल्यावर “अनृण” म्हणजे ऋण नसलेला असा अर्थ होतो. त्याचेच भाववाचक रूप “अनृण्य” असून त्याचा अर्थ ऋणमुक्तता असा आहे.

मराठी भाषेत “आनृण्य” असे रूपही अनेकदा दिसते; परंतु व्युत्पत्तिशास्त्रीय दृष्टिकोनातून “अनृण्य” हेच अधिक प्रमाणभूत रूप मानले जाते.

जन्मतः ऋणी असलेला मनुष्य

भारतीय चिंतनानुसार मनुष्य या जगात पूर्णपणे स्वतंत्र येत नाही. तो काही मूलभूत ऋणांनी बद्ध असतो. आपल्या अस्तित्वामागे निसर्ग, देवता, ऋषी आणि पूर्वज यांचे योगदान असते. म्हणूनच जीवन म्हणजे केवळ अधिकारांचा उपभोग नसून कृतज्ञतेने ऋणांची परतफेड करण्याचा प्रवास आहे.

धर्मशास्त्रात या विचाराला “त्रि-ऋण सिद्धांत” असे म्हटले जाते.

तीन मूलभूत ऋणे

देवऋण

  • विश्वव्यवस्था आणि निसर्गाच्या देणगीबद्दलची कृतज्ञता.

यज्ञ, उपासना, सदाचार आणि धर्मपालन यांद्वारे हे ऋण फेडले जाते.

ऋषिऋण

  • ज्ञानपरंपरा घडवणाऱ्या ऋषींचे ऋण.

अध्ययन, स्वाध्याय, अध्यापन आणि ज्ञानसंवर्धन यांद्वारे हे ऋण परतफेडले जाते.

*पितृऋण*

पालक आणि पूर्वजांचे ऋण.

कुटुंबसंरक्षण, संतती, परंपरेचे जतन आणि पूर्वजस्मरण यांद्वारे हे ऋण फेडले जाते.

धर्मग्रंथांचा आधार

भारतीय धर्मग्रंथांनी या विचाराला स्पष्टपणे मांडले आहे. मनुस्मृतीत असे म्हटले आहे —

“ऋषिभ्यो देवताभ्यश्च पितृभ्यश्चैव मानवः ।

ऋणी जायते तस्मात् त्रिभ्य एव प्रतिपूजयेत् ॥”

अर्थ : मनुष्य जन्मतः देव, ऋषी आणि पितर यांचा ऋणी असतो; म्हणून त्याने या तिघांप्रती कृतज्ञतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

महाभारतातही धर्मविचाराच्या संदर्भात यज्ञ, स्वाध्याय आणि कुटुंबकर्तव्य यांद्वारे ही ऋणे फेडण्याचे महत्त्व सांगितले आहे.

कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात राजा दिलीपाच्या कथेत पितृऋण पूर्ण करण्याची भावना सूचित होते.

– – –  यावरून या संकल्पनेचा प्रभाव धर्मशास्त्राबरोबरच काव्यपरंपरेवरही पडलेला दिसतो.

संतपरंपरेतील भावार्थ

मराठी संतांनी “अनृण्य” हा शब्द थेट वापरला नसला तरी त्यामागील भावार्थ अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. संत म्हणतात —

  • “देह देवाचे मंदिर
  • करावे त्याचे सेवाकार्य.”

या ओळीत जीवनाची दिशा सूचित होते. देह आणि जीवन ही देवाची देणगी मानून त्याचा उपयोग सेवा, साधना आणि सदाचारासाठी करणे हीच देवऋणाची खरी परतफेड आहे.

आधुनिक जीवनातील अनृण्य

आजच्या काळात “अनृण्य” ही संकल्पना केवळ धार्मिक कर्मकांडापुरती मर्यादित राहिलेली नाही. समाज, संस्कृती, निसर्ग आणि मानवजातीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याप्रती आपली दायित्वे पार पाडणे हेच तिचे आधुनिक रूप आहे… .. .. 

— पालकांची सेवा करणे_

— गुरूंनी दिलेले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे_

— समाजासाठी कार्य करणे_

— निसर्गाचे संवर्धन करणे_

– – – ही सर्व कृत्ये म्हणजे आपल्या ऋणांची परतफेडच होय.

अंतिम विचार

भारतीय संस्कृतीचा मूलस्वर कृतज्ञतेचा आहे.

जीवनात आपण जे काही प्राप्त करतो ते पूर्णपणे स्वतःचे नसते; त्यामागे असंख्य अदृश्य हातांचा सहभाग असतो.

म्हणूनच —

  • उपकारांचे स्मरण ठेवून कर्तव्यपूर्तीने जगणे .. हेच “अनृण्य” या संकल्पनेचे खरे सार आहे.
  • ऋणमुक्त जीवन म्हणजे उपकार विसरणे नव्हे, .. .. तर कृतज्ञतेने जीवन अर्थपूर्ण करणे होय.

☆

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३ आणि १४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३ आणि १४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक १३ वा – –

मना सांग पां रावणा काय जाले।

अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगीं।

बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

अर्थ: हे मना, महापराक्रमी अशा रावणाचा अंत कसा झाला या गोष्टीचा विचार कर. त्याला कल्पनाही नसताना त्याच्या राज्याचा संपूर्णपणे नाश झाला. म्हणून वाईट वासना सोडून दे. कारण सर्व शक्तिमान असा काळ सर्वांच्याच पाठीमागे लागलेला आहे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला “विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी” असे सांगतात. विवेक हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाजवळ ज्ञान, संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य सर्व काही असेल परंतु विवेकाची उणीव असेल तर त्याचे जीवन व्यर्थ जाते. जीवनात सारासार बुद्धीचा म्हणजेच विवेकाचा वापर करून वागले पाहिजे. रावण शक्तिमान होता. देवांनाही त्याने बंदी बनवले होते. तो वेदांचा जाणकार होता परंतु त्याच्या मनातील दुष्ट वासनांनी त्याचा घात केला. परस्त्रीच्या मोहाने त्याने सीतेसरख्या पतिव्रतेला पळवून आणले. त्याचे हे दुष्कृत्य त्याची पत्नी मंदोदरी, त्याचा भाऊ बिभीषण आणि दरबारातील गुरुजनांना आवडले नाही. त्यांनी त्याला वेळोवेळी सीतेला सन्मानाने परत पाठव असे सांगितले. परंतु मदांध आणि वासनांध रावणाला ते पटले नाही. त्यामुळे फक्त त्याचाच नाही तर त्याच्या संपूर्ण राज्याचा विनाश झाला.

पुत्रमोह आणि सत्तेचा लोभ यामुळे अंध झालेल्या धृतराष्ट्राने आपला पुत्र दुर्योधन, दुःशासन इ. च्या दुष्कृत्यांचा विरोध न करता त्यांना मूक संमतीच दिली. दुर्योधनाने सुद्धा पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीची अभिलाषा धरली होती. त्यामुळे कौरवांचा संपूर्णपणे नि:पात झाला. महाभारतात एका प्रसंगी दुर्योधन बोलताना असे म्हणतो की चांगले काय आणि वाईट काय हे मला कळते. परंतु मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. याचाच अर्थ दुर्योधन आपल्या मनातील वाईट विचारांचा, वासनांचा त्याग करू शकला नाही विवेकाने वागू शकला नाही. “म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी” असे समर्थ म्हणूनच म्हणतात.

या रामायण महाभारतातील उदाहरणाव्यतिरिक्त इतिहासात आणि वर्तमानात देखील वाईट वासना मनात ठेवून वागल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याचा विनाश झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक राजे आणि राज्यांचा नाश झाला आहे. अनितीने वागल्यामुळेच अनेक व्यक्तींनी स्वतःचा विनाश ओढवून घेतला आहे. काळ हा सर्वशक्तिमान आहे. त्याची सर्वांवर सत्ता चालते. जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू निश्चित असतो परंतु तो केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे. तीच जाणीव आपल्याला समर्थ या ठिकाणी करून देतात. ” पापाची वासना नको दावू डोळा “असे संत तुकाराम महाराज देखील आपल्याला सांगतात ते यामुळेच.

महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिर यांचा एक संवाद याबाबतीत अतिशय समर्पक असा आहे. ” या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते? “असा प्रश्न यक्ष युधिष्ठिराला विचारतो. त्यावर युधिष्ठिराने दिलेले उत्तर मोठे छान आहे. तो म्हणतो, ” जन्मलेल्याला मृत्यू निश्चित आहे परंतु तरीही त्याचे भान व्यक्तीला नसते. आपण अमर आहोत असेच सगळे वागत असतात. हेच या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य आहे. “

या सगळ्या इतिहासातील उदाहरणांवरून आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नव्हे तर त्यापासून शिकण्यासाठी असतो. पुढच्या ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो ते याच अर्थाने! आपले आयुष्य मर्यादित असते. म्हणून मृत्यूचे भान ठेवून प्रत्येकाने वाईट वासनांचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात सत्कर्मांना स्थान दिले पाहिजे असेच समर्थांचे सांगणे आहे. आणि हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले!

स्वसंवाद :

  • माझ्या मनात अजूनही कोणत्या वाईट वासनांचे बीज दडलेले आहे का?
  • रावण किंवा दुर्योधन यांच्या कथांमधून मी खरोखर काही बोध घेतो का?
  • सत्ता, अहंकार किंवा मोह यामुळे माझ्या विवेकावर पडदा तर पडत नाही ना?
  • जीवन क्षणभंगुर आहे ही जाणीव ठेवून मी माझा वर्तमान अधिक सजगपणे जगतो का?
  • माझ्या आयुष्यात सत्कर्मांची वाढ आणि दुष्प्रवृत्तींचा त्याग करण्यासाठी मी सजग प्रयत्न करतो का?

—

श्लोक १४ वा 

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।

परी शेवटीं काळमुखीं निमाला ॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।

कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

अर्थ :

आपल्या पूर्वसंचित कर्मांमुळे आपल्याला हा मनुष्यजन्म प्राप्त होतो. हा जन्म खरोखरच दुर्लभ आहे; परंतु असे असले तरी मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. म्हणून हे मना, विचार कर – या जगात अनेक महापुरुष होऊन गेले; परंतु त्यांनाही मृत्युपंथाची वाट धरावीच लागली. सर्वसामान्य माणसे तर किती जन्मली आणि मेली याची गणतीच नाही.

या श्लोकातून समर्थ रामदास स्वामी मानवी जीवनाचे एक अटळ सत्य सांगतात. मागील श्लोकात त्यांनी “बळे लागला काळ हा पाठिलागी” असे म्हटले आहे. त्याच विचाराची अधिक स्पष्ट मांडणी येथे दिसते. मनुष्यजन्म दुर्लभ असला तरी मृत्यू हा त्याचा अविभाज्य भाग आहे.

राम, कृष्ण, संत ज्ञानेश्वर यांसारखे महान पुरुष या पृथ्वीवर होऊन गेले; पण त्यांनाही एक दिवस मृत्युपंथाचा स्वीकार करावाच लागला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात – “जे जे उपजे ते नाशे”. म्हणजेच जे निर्माण होते ते नाश पावतेच. जन्म आणि मृत्यूचे हे चक्र अखंड चालूच असते.

निसर्गातही हेच दिसते. झाडावरील पिकलेली पाने गळून पडतात आणि त्यानंतरच नव्या पालवीला जागा मिळते. थोडक्यात सांगायचे तर नवनिर्मितीसाठी जुन्याचा निरोप आवश्यक असतो. मृत्यू ही देखील निसर्गाच्या या नित्यचक्रातील एक महत्त्वाची क्रिया आहे.

जन्म आणि मृत्यू या जणू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनाला कंटाळलेले वृद्ध किंवा असाध्य रोगांनी त्रस्त झालेले काही जण मृत्यूला वरदान मानतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्य जुने झालेले वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो; त्याप्रमाणे आत्मा जर्जर देह सोडून नवीन शरीर धारण करतो. त्यामुळे मृत्यू हा अंत नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे असेही म्हणता येईल.

तरीसुद्धा माणसाच्या मनात मृत्यूचे भय असते. कारण देहाशी असलेली आसक्ती फार प्रबळ असते. परंतु काळापुढे सर्व समान असतात. लहान-थोर, स्त्री-पुरुष, राजा-रंक असा कोणताही भेद काळ करत नाही. म्हणूनच समर्थ “परी शेवटीं काळमुखीं निमाला” असे अत्यंत नेमके शब्द वापरतात.

राम, कृष्ण किंवा संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान विभूतींनी आपले अवतारकार्य पूर्ण करून देह ठेवला. त्यांच्यासारख्या महापुरुषांचेही जीवन मर्यादित होते. मग सामान्य माणसांचे जीवन किती क्षणभंगुर आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.

आपल्याला हा जन्म पूर्वसंचितानुसार मिळतो. आपल्या मनातील वासना पूर्ण करण्यासाठी आणि कर्मफळे भोगण्यासाठी आपण जन्म घेतो असे सांगितले जाते. चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळते, तर वाईट कर्मांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. भोग संपेपर्यंत जीवनयात्रा सुरूच राहते.

म्हणूनच समर्थ आपल्याला सूचित करतात की या दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व ओळखावे. प्रपंच करत असतानाही परमार्थाचा मार्ग धरावा. जीवनाचा उपयोग सत्कर्मांसाठी आणि आत्मोन्नतीसाठी करावा.

स्वसंवाद :

  • माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • मृत्यू अटळ आहे ही जाणीव ठेवून मी माझे वर्तमान अधिक अर्थपूर्ण जगतो का?
  • हा दुर्लभ मनुष्यजन्म मला काही चांगले करण्यासाठी मिळाला आहे का, याचा मी कधी विचार करतो का?
  • प्रपंच करत असतानाही परमार्थ साधण्यासाठी मी काही प्रयत्न करतो आहे का?

– क्रमशः श्लोक १३ आणि १४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

(मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली! ) 

इथून पुढे – –

दिवस… नव्हे रात्र निश्चित झाली… हल्ला करण्याची! केवळ बारा सैनिक, तीन नावा… एका नावेत मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी आणि इतर दोन नावांत सहा-सहा सैनिक. सैनिकांना बुलेट प्रुफ जाकेटस घालून चालणार नव्हते… कारण जर पाण्यात पडावे लागले तर वजनाने बुडण्याची शक्यता अधिक होती. अतिरेकी असलेल्या फुमदीपासून अगदी सुरक्षित अंतरावर आणखी नावांनी वेढा घातला… अतिरेकी तेथून निसटले तर ते तावडीत सापडावेत म्हणून ही योजना होती. पण यामध्ये काही झाले असते तर वेढा गोलाकार असल्याने आपला गोळीबार आपल्याच सैनिकांसाठी धोकादायक ठरू शकला असता. पण हा धोका पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. अर्थात याचाही सराव झाला होताच!

जे टार्गेट होते, त्याच्या अगदी समोर गवताचे एक छोटे बेट होते. तिथे पोहोचायचे आणि तिथून गोळीबार करावा, अशी योजना होती. त्यानुसार तीनही नावा निघाल्या आणि टार्गेटपासून सुमारे एक किलोमीटरभर अंतरावर पोहोचल्या… पाहतात तो काय? ज्या बेटावर चढून गोळीबार करायचा होता ते बेटच नाहीसे झालेले होते! गवताचा तो मोठा पुंजका वा-याने कित्येक मीटर्स दूर वाहून निघून गेलेला होता!

आता? आधी सराव झालेला असल्याने त्या नावा पलटी करणे आणि त्यांवर बंदुका ठेवून गोळीबार करणे अशी योजना झाली! पण ही बाब सोपी नव्हती… पाण्यात पोहोताना शरीर कितीतरी हलते, नाव तर हलणारच… अशा स्थितीत अचूक निशाणा कसा लागणार? अंधार तर होताच… मध्यरात्र उलटून गेलेली होती. चांदणरात्र होती म्हणून थोडं दिसत होतं. मागील नावा आणि किना-यावरून नाईट विजन यंत्रणा वापरून मोहिमेच्या प्रमुख अधिका-यांना इत्यंभूत माहिती दिली जात होती.

परंतू ते गवताचे बेटच नाहीसे झाल्याने थोडी अडचण झाली होती. म्हणून मोहिमेच्या प्रमुखांनी canoeवर उभे राहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला… पण त्यामुळे canoe कलंडली आणि साहेबांच्या सोबत त्या नावेत असलेले सर्वजण पाण्यात पडले… परंतु हत्यार हवाबंद प्लास्टिक पिशव्यांत आणलेली असल्याने बचावली! Canoe सरळ केली, तिच्यातलं पाणी काढलं… आणि मोहीम पुन्हा सुरु झाली!

ज्याने तिथली खबर आणली होती, त्या माणसाचं Code Name ठेवलं होतं… James Bond! मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी ज्या बोटीत बसले होते, त्या बोटीच्या पुढच्या भागात हा जेम्स बसला होता. आता तिन्ही नावा त्या अंधारातून हळूहळू मार्ग काढीत लक्ष्य जवळ करीत निघाल्या… वल्ह्यांचा (चप्पू) मात्र आवाज टाळता येत नव्हता. तेवढ्यात साहेबांच्या मानेला थंड हवेचा स्पर्श होऊ लागला… साहेब सावध झाले. त्यांच्या मागून वाहणारी हवा लक्ष्याच्या दिशेने वाहात होती… याचा अर्थ पहा-यावर असलेल्या अतिरेक्याला आवाज तर निश्चित येईल. साहेबांनी जेम्सला वल्ह्याने टोचलं! तो बिचारा.. त्याला वाटलं हे सर्व कमांडो आहेत म्हणजे काहीही करू शकतात… थेट जायचं आणि अतिरेक्यांना गोळ्या घालायच्या! पण तसं शक्य नव्हतं… काहीच वेळात या तिन्ही नावा अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार होत्या… आणि लपायाला कुठेही संधी नव्हती… कारण आजूबाजूला फक्त पाणी!

साहेबांनी नावा तिथून मागे घेण्याचा आदेश दिला. आणि सुमारे चार किलोमीटर्सचा वळसा घ्यायला लावला… जेणेकरून वल्ह्यांचा आवाज अतिरेक्यांना ऐकू जाणार नाही! या कामाला आणखी दीड दोन तास लागणार होते… पण त्याला इलाज नव्हता!

दूरवर अंधारातही पाहू शकणा-या दुर्बिणीतून टेहळणी करणारे पथक साहेबांना संदेश वहन उपकरणाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट सांगत होते… एक अतिरेकी पहा-यावर होता… त्याने त्या झोपडीशेजारी एक उंच मचाण बांधले होते… आणि तो जागा होता… हातातली विजेरी अधून मधून इकडे तिकडे फिरवत सावधपणे पहारा देत होता!

आता नशीब आपल्या सैनिकांच्या बाजूने फिरले. आधी मार्गातून वाहून गेलेली फुमदी नेमकी सैनिक ज्या बाजूने त्या बेटावर जाण्याचा प्रयत्न करणार होते… त्याच बाजूला येऊन स्थिरावली होती. तिच्यावर चढून सैनिकांनी आपापल्या शस्त्रांसाठी भक्कम जागा तयार केली! आता अतिरेक्यांना पुरते घेरले गेले होते… अकरा अतिरेकी तावडीत सापडले होते… त्यातील दहा झोपलेले होते. एक पहा-यावर होता!

ठरलेल्या बाजूने न आल्याने नेमक्या झोपड्या कोणत्या याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला होता. पण साहेबांनी किना-यावर असलेल्या पथकाकडून पुन:पुन्हा खात्री करून घेतली… कारण कोणत्याही परिस्थितीत निष्पाप सामान्य नागरीकांवर गोळीबार होऊ द्यायचा नव्हता. किना-यावरून दिसणारे दृश्य आणि आता दुस-या बाजूने आल्याने दिसणारे दृश्य यात फरक असू शकत होता. शिवाय सतत जागा बदलणारी गवताची बेटं होतीच. बेटाला वेढा घालून थांबलेल्या काही पथकांचा गोंधळ उडाला होता… त्यांना योग्य मार्गदर्शन केले गेले… आणि नक्की कोणत्या झोपड्यांवर हल्ला चढवायचा हे निश्चित झाले! अन्यथा त्या अंधारात स्थानिक गरीब मच्छीमार लोक मारले गेले असते! सतत केलेला सराव, आणि योग्य पद्धतीने योजना आखलेली असल्याने हे करणे सोपे झाले!

पहाटेचे साडेतीन वाजले होते. मचाण सुमारे १५ मीटर्स अंतरावर होतं. तेवढ्यात तो अतिरेकी पहारेकरी मचाण उतरून खाली येऊ लागला… आणि त्याच बरोबर अतिरेक्यांच्या झोपड्यांमधून चार पाच जण बाहेर पडले. त्यांचा तो नेहमीचा शिरस्ता असावा. त्यांपैकी काही जण प्रात:विधीसाठी निघाले असावेत.

मचाणावरचा पहारेकरी खाली उतरल्याची संधी साधत साहेबांनी आणि त्यांच्या सहका-याने त्यांची नाव गवताच्या फुमदीवर चढवली… गोळीबार करण्यासाठी स्थिर जागा तयार करून घेतली… दृष्टीपथात येणारे गवत थोडे थोडे करीत तोडून टाकले… जेणेकरून अचूक नेम साधता येईल!

नेमबाजीत माहीर असलेल्या साहेबांनी नेम धरला… एवढ्यात किना-यावरून संदेश आला… साहेब… आणखी एक अतिरेकी मचाण चढतो आहे. तर खरंच एक अतिरेकी मचाणावर चढताना दिसला अंधुकसा. तो वर आला आणि त्याने तिथेच आळोखे-पिळोखे देत व्यायाम करायला सुरुवात केली. आता दोन नेम धरले गेले… आपल्या आधुनिक रायफल्समधून दोन गोळ्या निघाल्या… आणि ते दोघेही अतिरेकी खाली कोसळले! काही क्षण शांततेत गेले आणि… त्या चारही झोपड्यांमधून आपल्या सैनिकांच्या दिशेने तुफान गोळीबार सुरु झाला. आपल्या सैनिकांनी केलेला सराव यावेळी कामाला आला. अवघ्या चारच मिनिटांत अकरा पैकी नऊ अतिरेकी ठार केले गेले. एक महिला अतिरेकी जखमी अवस्थेत सापडली… तिला वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देऊन ताब्यात घेण्यात आले… एक अतिरेकी मात्र कट्टर निघाला… सात गोळ्या लागूनही तो जिवंत राहू शकला… त्याने फुमदी वरून खाली उडी मारून पाण्यात बुडी मारली… हलकेच डोके वर काढून गवताला धरून तो तरंगत राहिला आणि आपले सैनिक तिथून मागे फिरल्यावर एका मच्छीमाराच्या मदतीने तो किना-यावर गेला… स्थानिक डॉक्टरकडून उपचार मिळवले आणि तो घरी गेला. पण काही तासांतच त्याला पोलिसांनी अटक केली… त्याचा पाय कापावा लागला! मात्र त्याला जिवंत पकडले गेल्याने त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली!

४५ दिवसांचा सराव, योजना, योजनेत वेळोवेळी केले गेलेले बदल यांमुळे मुख्य कारवाई केवळ चार मिनिटांत आटोपली… आणि आपले सर्व सैनिक सहीसलामत परतले! ज्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली हे रोमांचक ऑपरेशन पार पडले… त्यांची ही ख्यातीच होती… त्यांनी ज्या ज्या सैनिकाला सोबत मोहिमेवर नेले… ते ते सर्व सैनिक सुरक्षित परत येत असत… कामगिरी फत्ते करूनच!

पुढील सहा दिवस या सर्व सरोवराची भारतीय लष्कराने काटेकोर तपासणी केली. अनेक हत्यारे जप्त केली… ज्यांत rocket launchers सुद्धा होते… अतिरेक्यांची तयारी पुरेपूर होती. त्यांना नेस्तनाबूद केल्यामुळे पुढील अनेक अतिरेकी कारवायांना लगाम तर बसलाच शिवाय अतिरेक्यांच्या मनात भारतीय लष्कराची भीती अधिक गडद झाली!

 या मोहिमेचे नेतृत्व अगदी स्वत: आघाडीवर राहून करणारे ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.) यांची माहिती आणि महती सांगण्यासाठी खरं तर दोन स्वतंत्र लेख लागतील. ब्रिगेडीअर साहेब आता सेवानिवृत्त असून त्यांची खूप प्रेरणादायी जीवन कहाणी विविध मुलाखती, लेख आणि बातम्यांतून मी समजावून घेतो आहे.

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्र ५४

“गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं|

अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम् ||”

अर्थ: भगवंतावरील या प्रेमाला कोणतेही गुण नाहीत, त्यामध्ये कोणतीही वासना नाही, ते अखंड, अतिसूक्ष्म, प्रत्येक क्षणी वाढणारे, आणि केवळ अनुभवरूप आहे.

विवेचन:

नारद मुनी इथे आपला अनुभव सांगत आहेत. आपण इथे असे समजू की नारद मुनींनी भगवंतावर कसे प्रेम केलं असेल…

इथे नारद महर्षी आपल्याला सहा गुण अथवा प्रकार सांगत आहेत. त्यातील तीन हे थोडे नकारात्मक आणि तीन सकारात्मक आहेत. आधी नकारात्मक पाहू.

१. गुणरहित: 

सर्वसाधारण मनुष्य प्रेम करतो ते स्वार्थासाठी. स्वार्थाचा रंग वेगवेगळा असू शकतो. पण खरे अर्थात भगवंतावरील प्रेम हे निःस्वार्थ असते. त्याला सत्व, रज अथवा तम असा कोणताही गुणदोष चिकटत नाही. एका अर्थाने ते निर्गुण असते.

२. कामनारहितं: 

सामान्यतः कोणतीही गोष्ट करताना प्रत्येक मनुष्याच्या मनात काही विशिष्ट असा उद्देश असतो, कामना असते. कधी ती लौकिक असते तर कधी अलौकिक. कधी सकाम असते तर कधी निष्काम. पण खरा भक्त भगवंतावर अकारण प्रेम करीत असतो. अमुक व्हावे किंवा अमुक होऊ नये म्हणून तो काहीही करीत नसतो. तो फक्त प्रेम करीत असतो.

समर्थ रामदास याचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – – 

“देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित।

इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥”

(दासबोध ०४. ०८. २२)

– – – जो भक्त आपल्या सर्व कामना /इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो.

३. अविच्छिन्नं:

आपण सर्वांनी आपल्या लहानपणी आईकडे हट्ट करून तेलाच्या डब्यातून तेल ओतून पाहण्याचा प्रयोग नक्की केला असेल. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ती तैलधार अखंड असते. देवावर प्रेम करण्याची सवय लावून घ्यावी. सवय झाली की ज्याप्रमाणे वाहन चालवताना गप्पा मारता येतात, गाणी म्हणता येतात, तसे प्रपंच करता करता, प्रपंचाची स्थिती कशीही असली भगवंतावर त्याचे स्मरण ठेवून अखंड प्रेम करता येते.

४. अनुभवरूपम् 

आपण अनेक वेळा एक वाक्य ऐकतो. अमक्या मनुष्याचा मी चांगलाच अनुभव घेतला आहे. याचा व्यावहारीक अर्थ असा आहे की त्या माणसाने याला वाईट अनुभव दिला आहे. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव अर्थात भगवंताचा अनुभव. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासारखे व्हावं लागेल. किंवा त्याच्याशी तादात्म्य पावावे लागेल. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

“अणुरेणिया थोकडा | तुका आकाशा एवढा ||”

संत सोयराबाई म्हणतात,

“अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥”

५. सूक्ष्मतरं :

प्रेम जात्याच सूक्ष्म आहे. इथे नारदमहाराज सूक्ष्मतरं असे म्हणतात. आपली सूक्ष्मतेची व्याख्या आपल्या देहबुद्धीप्रमाणे असते. प्रेमाची अनुभूती सुद्धा अधिक सूक्ष्म असते. अशी अनेक उदाहरणे आहेत की भक्ताला कोणीतरी शारीरिक त्रास दिला आणि त्याचे वळ मात्र भगवंताच्या पाठीवर उठले. ज्ञाना नावाच्या रेड्याला पैठण येथे लोकांनी मारले आणि त्याचे वळ माउलींच्या अंगावर उठले. उदा. म्हणून आपण याचा आधार घ्यावा.

६. प्रतिक्षणवर्धमानं :

एखाद्या व्यक्तीवरील एखाद्या मनुष्याचे प्रेम ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत किंवा त्या व्यक्तीचे सौंदर्य टिकेल तोपर्यंत असते, असे आपल्या लक्षात येते. भगवंत अमर आहे, त्यामुळे त्याच्यावरील केलेले प्रेम हे सुद्धा अमर होते. मीरा प्रेमात एवढी तल्लीन होऊन गेली (अर्थात तिचे प्रेम इतके वाढत गेले..) की समोर आणलेला विषाचा प्याला ठाकूरजींचा प्रसाद समजून तिने प्यायला आणि ती अमर झाली.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्ति सूत्रे ५५

“तत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव श्रृणोति

तदेव भाषयति तदेव चिंतयति ||”

अर्थ: या प्रेमाचा, अर्थात भागवतांच्या प्रेमाचा लाभ झाल्यावर तो सर्वत्र ते प्रेमच पाहतो. सर्वत्र ते प्रेमच ऐकतो. त्या प्रेमाबद्दलच बोलता आणि सर्वकाळ त्या प्रेमाचेच चिंतन करतो.

विवेचन: संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. माझ्यामते तो या सूत्रांचे स्पष्टीकरण अधिक सुलभतेने करू शकेल…

“तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥”

– – भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा अभंग म्हणजे नामदेवांच्या “नामभक्तिचे” एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावे लागेल. “चक्रवाक पक्षी वियोगे बाहती । जाहले मज प्रती तैसे आता ॥” असे म्हणणाऱ्या नामदेवांना जेव्हा विठ्ठल सापडला तेव्हा त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विठ्ठल दिसू लागला. खरं तर “तीर्थ” म्हणजे पाण्याने भरलेली अशी जागा जी सहज ओलांडता येईल. म्हणून चंद्रभागा नदी हे “तीर्थ” आणि त्याकाठी वसलेलं “पंढरपूर” हे “क्षेत्र” म्हणजे स्थान! नामदेवांसाठी हे तीर्थक्षेत्र विठ्ठलमय झाले. ह्या विठ्ठल नामाच्या गजरात “माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली” आणि म्हणून “देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥. ” पुढे नामदेवांना माय, बाप, आप्त, इष्ट, गण, गोत, गुरू ह्या सगळ्यातच विठ्ठल दिसू लागतो आणि अखेर ते सुखाच्या परमोच्च बिंदूला जाऊन मिळतात, ते सुख जे ह्या मायिक विश्वाच्या अतीत आहे, जे कालातीत आहे आणि निरंतर आहे म्हणजेच “नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥”. त्या सुखाचं “निधान” म्हणजे साठाही विठ्ठलच आहे असे ते सांगतात. आता ह्या जागेला पोचल्यावर, विठ्ठलाशी एकरूप झाल्यावर मला मृत्यू जरी आला तरी त्याचे भय नाही.

नारद मुनी जी स्थिती सांगतात की भक्ति मार्गातील परमोच्च स्थिती आहे असे मला तर्काने वाटते. यानंतर काही मिळवायचे असेल किंवा मिळवायची इच्छा राहील असे वाटतं नाही.

संतांचे आपल्यावर उपकार आहेत की त्यांनी ही स्थिती अनुभवली आणि स्वतःचे अवतरण करून ती अभंगाच्या रूपात आपल्या समोर ठेवली, अन्यथा त्याची शाब्दिक अनुभूति आपल्याला घेणं शक्य झालं नसतं…!

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५६ 

“गौणी त्रिधा गुण भेदादार्तादिभेदाद्वा||५६||”

अर्थ:  सत्त्व, रज आणि तम या तीन प्रकारांच्या भेदांमुळे किंवा आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या तीन प्रकारच्या भेदांमुळे गौण भक्तीचे तीन प्रकार होतात, करता येतात.

विवेचन: भक्तीचे प्रामुख्याने दोन भाग केलेले आढळतात. एक मुख्य भक्ति आणि दुसरी गौणी भक्ति. सर्वसाधारण मनुष्य बरेच वेळेस अपघाताने या भक्तिमार्गात खेचला जातो, असे म्हटले तर वावगे होऊ नये. कधी हा अपघात सुखद असतोझ तर बरेच वेळेस तो वेदनेचा असतो, असे आपल्या लक्षात येईल. जन्माला आला आणि भक्तिमार्गाला लागला असा जीव सापडणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यास सारखे म्हणता येईल..!

प्रत्येक मनुष्यच नव्हे तर सारी सृष्टि त्रिगुणाची बनलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. सत्व, रज आणि तम. प्रत्येक मनुष्यात या तिन्ही गुणांचे प्रमाण कमीअधिक प्रमाणात असते. ज्याप्रमाणे ते त्या त्या मनुष्याचा अंगी हे तीन गुण असतात, त्यानुसार तो करीत असलेली भक्ति सात्विक, राजस किंवा तामस स्वरूपात प्रकट होत असते. भक्ति न करणाऱ्यापेक्षा तामस भक्ति करणारा बरा. तामस भक्ति करता करता कालांतराने बदल होऊन मनुष्य राजस भक्ति करू लागतो आणि अशी राजस भक्ति वृद्धिंगत होत गेली हा मनुष्य सात्विक भक्ति करू लागतो. या तिन्ही भक्ती चढत्याक्रमाने उत्तम मानल्या जातात.

समर्थ रामदास स्वामी या त्रिगुणांचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – –

“मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।

त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।

तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥”

(दासबोध दशक २, समास ५)

आता मुख्य भक्ति कशी असते हे सुद्धा आपण अभ्यासले पाहिजे. एकूण चार प्रकारचे भक्त सांगितले जातात. याचे वर्णन गीताई मध्ये पुढील प्रमाणे आले आहे – – 

“भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना|

ज्ञानी तसे चि जिज्ञासू हितार्थी आणि विहृ़ल||”

(गीताई ०७:१६)

– – – सात्विक भक्ति फळास येते तेव्हा तो भक्त सिद्ध स्थितीस पोहोचतो.

मी आहे, हे भक्तिमार्गातील पहिली पायरी. मी आहे आणि देव आहे ही दुसरी पायरी म्हणता येईल आणि देहबुद्धीचा लय होऊन देव आहे आणि मी नाही अशी स्थिती येणे ही भक्तिमार्गातील सर्वोच्च पायरी म्हणता येईल. थोडक्यात काम्य भक्तीतून निष्काम भक्तीकडे वाटचाल होणे म्हणजे भक्तिमार्गात प्रगती होणे असे म्हणता येईल.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५४ / ५५ / ५६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

मणिपुरच्या मैतेई बांधवांच्या भाषेत ‘लोक’ म्हणजे वाहता प्रवाह आणि ‘टक’ म्हणजे शेवट… टोक! ‘लोकटक’ म्हणजे वाहत्या प्रवाहाचे अंतिम टोक!

हे लोकटक म्हणजे एक विशालकाय गोड्या पाण्याचे सरोवर आहे.. क्षेत्रफळ सुमारे २५० चौरस किलोमीटर्स जे पावसाळ्यात ५०० चौरस किलोमीटर्सपर्यंत विस्तारत जाऊ शकते! आणि या सरोवरात एक जागतिक आश्चर्य नांदताना दिसते… या सरोवरात सुमारे सहा हजार माणसं राहतात!

या सरोवरात एक विशिष्ट प्रकारचे गवत उगवते आणि कालांतराने हे गवत तळापासून वेगळे होऊन पाण्यावर तरंगू लागते. तळातून सोबत आलेली माती, पाण्यातील रासायनिक घटक आणि इतर नैसर्गिक प्रक्रिया घडत जाऊन हे गवत पुंजक्या पुंजक्यांनी एकमेकाला जोडले जाते आणि दोन-तीन मीटर्स जाडी असलेले जणू एक तरंगणारे बेटच अस्तित्वात येते… असे बेट जे माणसांचे, घरांचे वजन पेलू शकेल! या पुंजक्याला ‘फुमदी’ म्हणतात. मासेमार बांधव असा फुमदी एकत्रित करतात आणि त्या जोडून एक मोठे वर्तुळ तयार करतात… त्या वर्तुळातल्या पाण्यात जाळी टाकतात व मासे पकडतात. याच वर्तुळात माशांची पैदासही केली जाते.

बांबू, प्लास्टिक आणि अन्य हलक्या वस्तू वापरून या तरंगत्या बेटांवर इथल्या मच्छीमार बांधवांनी राहण्याजोगती घरं निर्माण केलीत. सरोवरातील मासळी पकडून शहरांत जाऊन विकणे हा इथला प्रमुख व्यवसाय! वर्षाला साधारण दीड हजार टन मासळी इथून मिळते. एरव्ही ही बेटं त्या भव्य सरोवरात एकाकीच… चहूबाजूंनी पाणी आणि जमिनीवर पाय ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे निमुळत्या हलक्या, लाकडी नावा.. canoes!

मणिपूरची राजधानी इंफाळ इथून ३८ किलोमीटर्सवर आहे. शेजारचा ब्रम्हदेश मात्र इथून हाकेच्या अंतरावर… एवढा जवळ की काही तासांत तिकडे जाऊन इकडे सहीसलामत परत येता यावे!

उत्तर-पूर्व भारताचे मणिपूर… महाराजा बोधाचंद्र सिंग यांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबर, १९४९ रोजी भारतात विलीन झाले आणि १९७२ मध्ये मणिपूरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला. परंतू साधारणत: १९६४ पासून या प्रदेशातील काही विशिष्ट समाजसमूहातील काही गट भारतापासून वेगळे होण्याच्या दृष्टीने शेजारील काही देशांच्या मदतीने भारतविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध नावांनी कार्यरत असलेल्या या संघटनांत हजारो सशस्त्र, प्रशिक्षित अतिरेकी होते आणि आहेत! अपहरण, हत्या आणि खंडणी गोळा करणे हा यांचा प्रमुख उद्योग आहे. भारतात कारवाया करून म्यानमार (तत्कालीन ब्रम्हदेश)मध्ये पलायन करायचे अशी यांचा कामाची पद्धत आहे.

भारताचे सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी भारतीय सैन्यदल इथे सातत्याने डोळ्यांत तेल घालून कार्यरत असते… सीमा सुरक्षा बल, आसाम रायफल्स, आसाम पोलिस इत्यादी आणि भारतीय सैन्यातील शेकडो जवान-अधिकारी यांनी यासाठी प्राणांची आहुतीही दिलेली आहे! शिवाय घनदाट जंगल, दमट हवामान, पर्वतराजी अशी बिकट स्थिती आहेच.

२००८… याच तरंगत्या ‘फुमदी’ पैकी एका फुमदी वर काही झोपड्या होत्या. त्यांपैकी मध्यभागी असलेल्या चार झोपड्यांत दहा-बारा अतिरेकी वस्ती करून असल्याची पक्की खबर भारतीय सेनेला प्राप्त झाली! एका स्थानिक व्यक्तीला त्या अतिरेक्यांनी धमकावून पैसे मागितले होते अन्यथा त्याची हत्या केली जाईल, असा दमही दिला होता. त्या व्यक्तीच्या भावाकडून ही माहिती स्थानिक पोलिसांना आणि तिथून आपल्या सैन्याला मिळाली होती… खात्री करून घेणे गरजेचे होते… पण एवढ्या मोठ्या संख्येने अतिरेकी सापडणार असतील तर धोका पत्करणे अपरिहार्य होते!

परंतू वरिष्ठ अधिकारी अशा कोणत्याही मोहिमेला परवानगी देत नव्हते. कारण या मोहिमेत प्रचंड धोका होता. मणिपूरची त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, जर मोहीम फसली तर स्थानिक जनतेचा मोठा रोष पत्करावा लागण्याची शक्यता होती… किंबहुना देशविघातक शक्ती असे काही होण्याची ववाटच पहात असतात. नकार ऐकून या मोहिमेवर जाऊ इच्छिणारे आपले कथानायक अधिकारी मनातून खट्टू झाले… पण शेवटी आज्ञा ती आज्ञाच.

परंतू दुर्दैवी योगायोगाने आपल्या बी. एस. एफ. च्या तळावर काहीच दिवसांत मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि अनेक जवानांची आहुती पडली. यामुळे चिडलेल्या अधिका-यांनी या अतिरेक्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्याची व त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता व्यक्त केली. अर्थातच या लोकटक मोहिमेस हिरवा कंदील मिळाला… आणि सैनिक, अधिकारी तयारीला लागले!

अतिरेक्यांचा ठावठिकाणा समजावा म्हणून खब-याला घेऊन सैन्य पथकाच्या प्रमुखांनी काही सैनिकांना सोबत घेऊन एका बोटीतून तिकडे प्रयाण केले. काही अंतरावर असताना त्यांना लाकूड तोडण्याचा आवाज आला. खबरी म्हणाला, “हे लोक म्यानमारमधून इकडे घुसतात, बांबू, लाकडे तोडून घेऊन जातात. ते लोक तिथून जाईपर्यंत साहेबांनी दबा धरून वाट पाहिली. कोणतीही सैन्य कारवाई करण्यापूर्वी अगदी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते! आरंभी असे ऑपरेशन अतिशय धोकादायक, अव्यवहार्य आहे, असं सांगून प्रमुख अधिका-यांनी या मोहिमेस परवानगी नाकारली होती. इथे काही हजार सामान्य नागरिकही रहात असल्याने हवाई हल्ला हा पर्याय असूच शकत नव्हता. त्यांना सर्व बाजूंनी घेरायचे म्हटले तर तिथपर्यंत पोहोचायला नावांशिवाय पर्याय नव्हता. यांत्रिक नावा, रबर बोटी वापरणे सोयीचे नव्हते… कारण सरोवरातील ‘फुमदी’ तरंगत असतात आणि सतत जागा बदलतात.. त्यांच्या गवतात नाव अडकून बसतात. दिवसा-उजेडी अतिरेक्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचायचे म्हणजे अतिरेक्यांना येणा-या बोटी सहज दिसणार… आणि त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांनी ते पाण्यातून येणा-या सैन्यावर सहज आणि अचूक गोळीबार करू शकणार! अशी परिस्थिती होती. त्यांनी गोळीबार आरंभला तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात स्थानिक सामान्य लोकांच्या जीवाला धोका होता!

इथून सुरु झालं.. ४५ दिवसांचं एक अद्भूत ऑपरेशन… एक सैन्य मोहिम… जिचं नाव ठेवलं गेलं.. ऑप. लोकटक विजय! जमिनीपासून अतिरेकी वस्ती सुमारे सात किलोमीटर्सवर असावी. विविध प्रकारची त्यावेळची आधुनिक संपर्क साधने, दुर्बिणी वापरून या वस्तीवर बारीक नजर ठेवली जाऊ लागली. एका उंच झाडावर चढून एका सैनिकाला ते ठिकाण नेमके कुठे आणि कसे आहे, यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली गेली. त्या सैनिकाने तेवढ्या उंचीवर चढून मचाण बांधले आणि आधुनिक उपकरणे वापरून बरीच माहिती गोळा करून दिली! अचूक हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांच्या वस्तीचे निश्चित ठिकाण समजणे गरजेचे होते. त्यासाठी ज्याने खबर आणली होती, त्यालाच मासेमार म्हणून तिथपर्यंत जाऊन यायला सांगितले… त्याच्याकडे आधुनिक यंत्रणा लपवून दिली… त्यामुळे तांत्रिक भाषेत co-ordinates मिळू शकले!

नावा घेऊन जाणे अशक्य असल्याने तिथपर्यंत पोहत जाण्याचा मार्ग निवडला गेला… पण अंतर होते सात किलोमीटर्स. अवजड शस्त्रं घेऊन पोहत जाणे… कल्पना करता येईल का? यासाठी सराव पाहिजे. दिवसा सराव करता येणार नव्हता. कारण सरोवरात दिवसभर म्हणजे पहाटे चार ते रात्री दहा-साडेदहापर्यंत मासेमारी चालते… लोक सैनिकांना सराव करताना दिसता कामा नव्हते! यावर उपाय म्हणून या सरोवराच्या एका बाजूला असलेल्या चार-साडेचार किलोमीटर्स लांबीच्या एका कालव्याचा वापर करण्याचे ठरले. त्यानुसार रात्री अकरा ते पहाटे साडेतीन पर्यंत सैनिक शस्त्रं घेऊन त्या थंडीत पोहण्याचा सराव करू लागले. एवढे काटक, कणखर सैनिक परंतू इतका वेळ पोहणे म्हणजे मानवी क्षमतेची कसोटी पाहणारे ठरत होते. कित्येक सैनिक आजारी पडले आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. कित्येकांचे पाच-सहा किलो वजन कमी झाले. कालव्याच्या पाण्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागला. पण तरीही सराव सुरु होताच! पण पुढे असे लक्षात आले की, एवढे पोहूनही रात्रीच्या अंधारात आणि मर्यादित वेळेत लक्ष्य गाठता येणार तर नाहीच, पण गाठले गेले तरी प्रचंड थकलेले सैनिक लढणार तरी कुठल्या बळाने!

काही दिवसांनी ही योजना मागे ठेवण्यात आली. आणि रबरी नावा आणल्या गेल्या, पण सरोवरातील गवतामुळे त्याही प्रभावीरीत्या चालेनात… अडकून राहू लागल्या. निमुळत्या नावा अर्थात canoes मधून जायचे ठरले. पण ह्या नावा स्थानिक पातळीवरून खरेदी केल्या असत्या तर त्याचा बोभाटा झाला असता म्हणून दुस-या राज्यातून त्या मागवून घेतल्या गेल्या! पण canoe चालवण्यासाठीही सराव पाहिजे. कारण canoe म्हणजे जणू सायकल. सराव नसला म्हणजे सायकल चालवताना जसा माणूस कोसळतो, तसे पाण्यात कोसळावे लागणार!

मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares