मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रेण्टल फॅमिली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रेण्टल फॅमिली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

काल ‘Rental Family’नावाचा चित्रपट पाहिला.

वरवर पाहताना ही गोष्ट अशा एका व्यवसायाची वाटते जिथे तुम्ही पैसे देऊन वडील, आई, किंवा जोडीदार ‘भाड्याने’ घेऊ शकता. पण जसजशी कथा पुढे सरकते, तसतसं जाणवते की हे केवळ पैशांचे व्यवहार नाहीत, तर ते आपल्या समाजातील ‘एकाकीपणाचं’ एक भयाण वास्तव आहे.

त्या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे माझ्या काळजाला भिडले.

त्यातला एक प्रसंग म्हणजे, एका माणसाला तो मेल्यावर त्याच्या फ्युनरलला इतर माणसं कशी त्याची आठवण काढत रडतायत, हे फिलींग अनुभवायचं असतं. त्यासाठी तो ही सर्विस घेतो.

खरंतर त्या व्यक्तीला माहीत असतं की ही समोरची माणसं फक्त ‘अभिनय’ करत आहेत, तरीही त्यांच्याकडून मिळणाऱ्या दोन शब्दांच्या मायेसाठी तो लाखो रुपये खर्च करायला तयार असतो.

आणि त्यांच्या त्या शब्दांनी त्याला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते.

हा चित्रपट पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे माणसाला अन्नाइतकीच भावनिक ओलाव्याचीही भूक असते.

‘Rental Family’‌ मध्ये आपण पाहतो की, लोक केवळ संवाद हवा म्हणून पैसे मोजतात. पण जेव्हा आपलं हेच नातं नैसर्गिक आणि भावनिकदृष्ट्या घट्ट असतं, तेव्हा ते आपल्याला केवळ आनंदच नाही, तर ‘गगनभरारी’ घेण्याचं बळ देतं.

जेव्हा आपल्याला माहीत असतं की, “जर मी गोते खात पडलो, तर मला सावरणारे हात आहेत,” तेव्हा आपण आयुष्यात मोठे निर्णय घ्यायला घाबरत नाही.

हे नात्यातील डीप इमोशनल कनेक्शन आपलं ‘सिक्युरिटी नेट’ बनतं.

या चित्रपटातून मला पुन्हा एकदा जाणवलं की, हजार दिखाऊ नात्यांपेक्षा आपल्या आयुष्यात ती ‘एक’ व्यक्ती महत्त्वाची असते, जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि असं सिक्युरिटी नेट असलेलं नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या रिलेशनशिप स्किलवर काम करणं अत्यावश्यक आहे.

खरी नाती आपल्यासाठी आरसा बनतात . ती आपल्या चांगल्या गुणांचे कौतुक करतात आणि त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.

Love relationship is an opportunity to take ownership of our shadow parts.

जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून स्वतःकडे पाहतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा देते.

संशोधन सांगतं की, ज्यांची कौटुंबिक आणि सामाजिक नाती घट्ट आहेत, त्यांची निर्णयक्षमता अधिक चांगली असते.

‘रेण्टल फॅमिली’ मधला तो एकाकीपणा माणसाला आतून पोखरतो, पण याउलट, खरी माया माणसाला ऊर्जा देते.

भावनिक आधार = कमी ताणतणाव

कमी ताणतणाव = कामात जास्त एकाग्रता

एकाग्रता = हमखास यश

अनेकदा माणसं करिअरच्या मागे धावताना जवळच्या नात्यांना ‘टेकन फॉर ग्रांटेड’ धरतात.

पण लक्षात ठेवा, नोकरी/बिझनेस रिलेशनशिप फक्त त्यांच्या ग्रोथसाठी आपल्या सोबत असतात.

आपण आजारी पडल्यावर, खरोखरच भावनिक ओलाव्याचीही गरज असते. तेव्हा बिझनेस रिलेशनशिप कामी येत नाहीत.

एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळालेल्या तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला प्रेमाची व्यक्ती सोबत कोणी नसेल, तर त्या यशाला काहीच अर्थ उरत नाही.

पैशाने आपण ‘माणसं’ गोळा करू शकतो, पण ‘माया’ नाही. आणि प्रगतीसाठी माणसांच्या गर्दीपेक्षा मायेची ऊब जास्त कामाला येते.

म्हणूनच आजपासून एक गोष्ट करायला सुरुवात करा.

नोकरी /व्यवसायाच्या ‘रेण्टल’ जगात सतत राहण्यापेक्षा, आपल्या खऱ्या जवळच्या माणसांशी दिवसातून एकदा तरी मनमोकळं बोला.

तुम्हाला सायलेंटली सपोर्ट करणाऱ्या व तुमच्या यशात ज्यांचा वाटा आहे, त्यांना “तुझ्यामुळे मी इथवर पोहोचलो,” असं सांगायला विसरू नका.

लक्षात घ्या, कधीकधी जवळच्या व्यक्तीला फक्त तुमचं ऐकून घेणं हवं असतं, तुमचा वेळ हवा असतो आणि ही गोष्ट कोणत्याही महागड्या भेटीपेक्षा त्यांच्यासाठी मौल्यवान असते.

चला तर मग, आपण आपली नाती इतकी घट्ट करूया की आपल्याला कोणत्याही ‘रेण्टल’ आधाराची गरज पडणार नाही. कारण जेव्हा मनं जोडलेली असतात, तेव्हाच आयुष्याची खऱ्या अर्थाने वाढ होते!

तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रगतीत तुमच्या जवळच्या व्यक्तीचा भावनिक पाठिंबा किती मोलाचा ठरला?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कसा सापडला कार्व्हर?” – लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसा सापडला कार्व्हर?” लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

पुस्तकामागच्या गोष्टी

एक होता कार्व्हर 

 प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची काही ना काही गोष्ट ही असतेच. मराठी मनावर गेली 45 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या निर्मितीमागे ही काही रंजक गोष्टी आहेत..

 राजहंसप्रकाशन

पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवी आवृत्तीनिमित्त खास काही आठवणी तुमच्यासाठी..

प्रसन्ना ठाकूर पानसे.

त्याचं झालं असं की आपल्या मुलांना रात्री झोपताना गोष्टी सांगाव्यात, यासाठी वीणाताई व त्यांचे पती (चंद्रकांत गवाणकर) नवनवीन पुस्तकं शोधत. एके दिवशी त्यांचे पती कार्व्हरवरचं इंग्रजी पुस्तक घेऊन आले. वीणाताईंनी त्यातल्या गोष्टी रात्री झोपताना मुलांना सांगायला सुरुवात केली. नेहमी गोष्टी सांगताना झोपणारी मुलं टक्क जागी राहिली.. आई.. पुढे काय झालं गं त्याचं? असं विचारत मुलांचे डोळे झरू लागले.. हे डोळे झरणे, मुलांना इतकी उत्कटता वाटणं, हा ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचं मूलस्थान सापडण्याचा क्षण होता..

‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, “

या चिं. त्र्यं. खानोलकर (#आरती_प्रभू)च्या ओळींप्रमाणे वीणाताईंच्या हाती गंधार सापडला होता…

त्यानंतर अनेक इंग्रजी पुस्तकं, संदर्भ ग्रंथ वाचत वीणाताई माहिती मिळवू लागल्या. आई आणि मुलांच्या गोष्टीतलं हे पुस्तक कागदावर येत गेलं. ही नव्या प्रवासाची नांदी होती… बाकी सोपस्कार आपोआप होत गेले. लिखाणाचे कागद माजगावकरांच्या ‘माणूस’पर्यंत पोहोचले.

मधल्या काळात काही घडामोडी घडल्या आणि ‘माणूस’ या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी ‘कार्व्हर’ या विषयावर लिहायचं ठरलं. दिवाळीचा मूड लक्षात घेता संपूर्ण दिवाळी अंकात कार्व्हरची संघर्षगाथा मांडावी का? #मराठी माणसाला सातासमुद्रापारचा कार्व्हर आपलासा वाटेल का? अशा अनेक शंका माणूसचे संस्थापक श्री. ग. माजगावकर आणि दिलीप माजगावकर यांच्या मनात आल्या. प्रयोगावर भर देणार्‍या ‘माणूस’ मांसिकाने वेगळी वाट चोखाळायची ठरवली. दिवाळीचा संपूर्ण अंक ‘कार्व्हर’ या विषयावरच निघाला. ऐन दिवाळीत हा अंक उजळून गेला.

तो अतिशय लोकप्रियही ठरला. कित्येक महिने वाचकांची अभिप्रायाची पत्रं ‘माणूस’च्या कार्यालयात येत होती. सुरुवातीलाच ‘कार्व्हर’ला अशी अफाट लोकप्रियता मिळाली.

१९८१ मध्ये यावर पुस्तक काढायचं ठरलं. #दुर्गाभागवत यांनीही या सुमारास ‘कार्व्हर’वर लिहिलं होतं. पण आपल्यापेक्षाही वीणा गवाणकर यांना तो (कार्व्हर) सहजतेने उमगलाय, लिखाणाचा सूर सापडलाय, तेव्हा वीणाताईंनीच हे पुस्तक लिहावे, असा आग्रह दुर्गाबाईंनी धरला. एक लेखकानं दुसऱ्या लेखकाला समजून घेतलं तर किती उत्तम साहित्यकृती जन्माला येते याचं हे उत्तम उदाहरण.

दरम्यानच्या काळात #पुल देशपांडे यांना वीणाताईंनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले,

“हे पुस्तक लोकप्रिय ठरेल. पुस्तक स्वतःच्या पायांवर चालणारं आहे. त्याला कुणाच्या प्रस्तावनेच्या कुबड्यांची गरज नाही. “. त्यांच्या पत्रातील मजकूर मलपृष्ठावर छापण्याची परवानगी वीणाताईनी मागितली. त्यांनी उदारमनाने ती दिली. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर ते पत्र छापलेलं आहे.

पुलंपासून सामान्यातल्या सामान्यांपर्यंत सर्व वयोगटातल्यांना सातासमुद्रापारचा ‘कार्व्हर’ आपला वाटू लागला. त्याच्या कथांनी मराठी माणसाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, त्याच्या संघर्षातून प्रेरणा मिळू लागली. अपयश आलं, एकटं वाटलं, की हातात ‘कार्व्हर’चं पुस्तक येऊ लागलं. ते कधी मित्र बनलं तर कधी मार्गदर्शक (सेल्फ हेल्प बुक) झालं. मराठी माणसाच्या घराघरात हृदयात विराजमान झालं.

#अक्षरधारा च्या रसिकाताई राठिवडेकर सांगतात, की ‘कार्व्हर’ हे पुस्तक विकलं जात नाही, असा दिवस जात नाही.

बघा बरं. आजच्या पुस्तक आल्यानंतरच्या ४५ वर्षानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. जेव्हा पुस्तक माणसाच्या मनामनात पोहोचतं, त्याला ते आपलं वाटतं, तेव्हा ती कलाकृती फक्त लेखकाची राहात नाही, तर आपल्या सर्वांची बनते. खरं सांगायचं तर लेखकाच्या आयुष्यात यापेक्षा आनंदाचा क्षण तो कोणता?

राहून राहून वाटतं या ‘कार्व्हर’ नावाच्या माणसाचं. तो बिचारा आयुष्यात स्वतःचं असं काही घेऊन आला नाही. आई ज्यानं पाहिली नाही, जन्मगाव नातलग कोणी नसलेलं ‘मेरी’चं पोर आयुष्यभर सर्वांना भरभरून देत गेलं. किती भाग्यवान ते अमेरिकेचे लोक.

आणि हो. ‘कार्व्हर’नं लेखिका प्रकाशकांनाही भरभरून दिलं. वीणाताईंनी त्यानंतर १५ पुस्तकं लिहिली आणि ती लोकप्रियही झाली. ‘#राजहंसप्रकाशन’ च्या गौरवशाली वाटचालीतलं ‘कार्व्हर’ हे मानबिंदू ठरलं. लेखक- प्रकाशक दोघांनी पुस्तकविक्रीतून मिळालेला मोठा भाग समाजासाठीही अर्पण केला.

आता चौथी -पाचवी पिढी ‘कार्व्हर’ वाचते. जेन झी लाही हे पुस्तक आपलसं वाटतंय… गेल्या 45 वर्षात

आजूबाजूचा समाज, समाजमाध्यमं बदलली, पण ‘कार्व्हर’ची लोकप्रियता सर्व वयोगटात कायम आहे.

‘कार्व्हर’ हा ‘कार्व्हर’ होता. एकमेवाद्वितीय होता, हे मान्य करावंच लागेल. आज अनेकदा आपल्या आयुष्यात प्रचंड निराशेचे, उदासीनतेचे क्षण येतात. सारं काही संपलं, असं वाटतं. त्या क्षणी या पुस्तकाचं कोणताही पान उघडलं आणि वाचलं की आपण पुन्हा सकारात्मक विचारांकडे वळतो.

कधीतरी वाटतं, या ‘कार्व्हर’वर #चित्रपट किंवा #नाटक अशी कलाकृती तयार व्हायला हवी होती.. पण नंतर

मनात विचार आला.. काहींच्या आयुष्यात, संघर्षात इतकी नाट्यमयता असते की चित्रपट फिका वाटावा. नाटकातली आभासी नाट्यमयता कमी पडावी.

या पुस्तकात वीणाताईंनी अनेक शब्दांपलीकडच्या गोष्टी मांडल्या आहेत. आपल्या मनात त्याचं चित्रीकरण होत राहतं. वाचताना प्रत्येकाच्या मनात त्याचा त्याचा म्हणून ‘कार्व्हर’ सापडत जातो.. अणि तो चिरंतन राहो..

* * * *

लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फ्रीजला पण स्वभाव असतो.. ” – लेखिका : विनया रायदुर्ग ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “फ्रीजला पण स्वभाव असतो.. ” – लेखिका : विनया रायदुर्ग ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

असे म्हणतात की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते… माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील, त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.

त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.

माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:

आळशी फ्रिज:

या फ्रिजमध्ये काय सापडेल, याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात… आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारताना आढळतात. फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट गेलेल्या बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे ‘सडत’ पडलेल्या असतात.

हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो!

टापटीप फ्रिज

या फ्रिजमध्ये सर्व वस्तूंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते. प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रे मधल्या भाज्या फ्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा “गंध” देखील नसतो.

बॅचलर फ्रिज

हा फ्रिज सहसा रिकामाच असतो. भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेल रूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घासपूस केलेली नसते.. जाताना आईने करून ठेवलेली लोणची मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो. कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.

नवविवाहित फ्रिज

हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिजमध्ये स्वतःचे स्थान शोधत असतात. काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.

NRI फ्रिज

इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज कायम आपला कंफ्युज्ड असतो. माहेरून आणलेली पिठं, मसाले, पापड, लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज, पिझ्झा, जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो… मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो. अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा… तोच संभ्रम.. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा!

ज्येष्ठ नागरिक फ्रिज

या सर्वात केविलवाणा असणारा… एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असते. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीमऐवजी फ्रीझरमध्ये मुलांनी भारत भेटीत दिलेला सुकामेवा असतो.. सणावारांना मुलांच्या आठवणीसारखाच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो, कारण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रेला काही कामच नसते.

कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा, हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते!

लेखिका : विनया रायदुर्ग

प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पुत्रसुख…! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

पुत्रसुख…! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, ” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडं पाहिलं. ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!

काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असताना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, “राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेवू. तेव्हा द्या.”

थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, “काका, एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; तेही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “

सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गावात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”

कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला. ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षांपूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणू काही… तिचे डोळे भरून वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले, “माझं बाळ…! “

हे असं घडल्यापासून ह्या गावातून मूर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो. “

कंडक्टर हे ऐकून स्तिमित झाला. थोड्या वेळानं त्यानं विचारलं ” पण काका, तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”

” तेही केलं पण… जास्त मूर्ती केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच,याची शाश्वती नाही.”

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, “काका, मग विसर्जित करायचीच नाही मूर्ती ..!”

सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले,”विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल. रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं ….काय विचारू नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. “

यावर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली. म्हणाला “काका, तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडं जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदललेली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले, “दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “

कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “

काकांनी स्मित केलं, “दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “

हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..!

काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही …

पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची.. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” हे बोलताना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!

सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी.तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले….. अगदी अनाहूतपणे …!

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई ही आई असते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आई ही आई असते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

जराशी गंमत.. अर्थात या सर्व महान माणसांची माफी मागून …

आई ही आई असते…

  • आयझॅक न्यूटनची आई : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का?
  • आर्किमिडीजची आई : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
  • एडिसनची आई: अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!
  • जेम्स वॅटची आई : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
  • ग्रॅहम बेलची आई: ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
  • मोनालीसाची आई : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
  • गॅलेलियोची आई: मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर?
  • कोलंबसची आई: कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
  • मायकल अँजेलोची आई: इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
  • बिल गेट्सची आई: दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण ऍडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!
  • फॅरेनहाइटची आई : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?

आणि शेवटी..

  • अल्बर्ट आईनस्टाइनची आई: कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!

HAPPY MOTHER’S DAY

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाईचा मेंदू…” – कवयित्री : शिल्पा परुळेकर पै ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “बाईचा मेंदू…” – कवयित्री : शिल्पा परुळेकर पै ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

बाईच्या मेंदूच्या कोपऱ्यात

एक अजब कपाट असतं…

ज्यात अगदी लख्ख साठवलेलं असतं—

कोणाकडे गेलेली वाटी,

कोणाकडे राहिलेला चमचा,

चहाचे कप,

साडी, अगदी एखादी जुनी ताटली

आणि कुणीतरी मागून नेलेली ती चटई…

जिचा फाटलेला कोपरा तिला आजही टोचतो….!

 

हिशोब तर जिभेवरच असतात—

कोणी उसने घेतलेले पैसे,

दुधाचे, वाणसामानाचे बिल,

भाजीवाल्याला द्यायचा राहिलेला तो एक रुपया,

किंवा त्याच्याकडून घ्यायची उरलेली चिल्लर.

 

काळजावरचे ओरखडे ही तितकेच असतात लक्षात—

कुठल्यातरी समारंभात,

कुणीतरी केलेला अपमान,

कुणी मारलेले विषारी टोमणे,

आणि सासू-नणंदांच्या

शब्दांतून पाझरलेला

तो जुना द्वेष…

 

ती कधीच विसरत नाही—

मुलाच्या पहिल्या पावलाचा ठसा,

त्याच्या शाळेच्या डब्यातली रिकामी जागा,

आणि संसाराच्या घाईत मागे राहिलेली तिच्या माहेरच्या

अंगणातली ती चिमूटभर माया.

तिला आठवत असतं—

कपाटात घडी घालून ठेवलेलं तिचं स्वप्न‘,

जे वेळेअभावी तिने कधी उलगडलंच नाही…

तिला सगळं, अगदी सगळं आठवत असतं.

 

पण… तिच्या लक्षात नसते

स्वतःची झीज

कपाळावरच्या केसांत हळूहळू

उमलणारी पांढरी किनार,

धूसर होत जाणारी नजर,

आणि कमरेत साचत गेलेलं

ते जुनाट दुखणं.

ती विसरते वेळेवर घ्यायची

बीपीची गोळी

ती विसरते…भुकेची वेळ, निवांत झोप, आवडीची भाजी..आवडीच गाणं .

तिला आठवतही नाही,

शेवटचं कधी निरखून पाहिलंय स्वत:ला,

ती विसरते…

आरशात पाहताना स्वतःच्या डोळ्यांत डोकावायला,

आणि कोमेजलेल्या चेहऱ्यावर

प्रेमाचा हात फिरवायला.

चुकून कधीतरी आठवलंच सर्व तरीही,

पुन्हा त्यांना विस्मृतीच्या बोचक्यात बांधते आणि

आणि ढकलून देते माळ्यावर…

 

कवयित्री : शिल्पा परुळेकर पै

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटी मराठी म्हणजे… – लेखिका: केतकी कुलकर्णी ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शेवटी मराठी म्हणजे… – लेखिका: केतकी कुलकर्णी ☆ अंजली दिलीप गोखले

मऊ भात, मेतकूट आणि साजूक तूप!

लिंबाचं लोणचं, पोह्याचा पापड, ताकातला डांगर, वरण-फळं, आणि मोदकांच्या उरलेल्या उकडीच्या केलेल्या — फक्त शेवटच्या पंगतीत मिळणाऱ्या त्या तिखट, चमचमीत निवागऱ्या!

डब्यात दिलेली पोळीची गुंडाळी, गुळतूप पोळी, लोणी-साखर पोळी, आणि नावडती भाजी असली की आज्जीनं कालवून दिलेलं केळ्याचं शिकरण!

बाहेरगावी फिरून, थकून-भागून घरी पोहोचल्यावर, रात्री जेवायला “काहीही नको” असं वाटत असताना आईच्या आग्रहास्तव खाल्लेला पहिल्या वाफेचा वरणभात… आणि पहिला घास घेताच डोळे मिटून दिसलेलं ते सुख!

शेवटी मराठी म्हणजे…

ठकठक, चंपक, चंदामामा आणि चिंटू-मिनीच्या गमतीजमती!

दिवाळी अंकासाठी वर्षभर पाहिलेली वाट आणि हाती येताच झालेला तो इवल्याशा हृदयात न मावणारा आनंद…

दुपारच्या वेळी ऐकलेल्या “छान छान गोष्टी”च्या कॅसेट्स आणि चेटकिणीची गोष्ट येताच घाबरून बंद करून टाकलेला तो टेप रेकॉर्डर!

शेवटी मराठी म्हणजे…

व. पु. काळे, शिरीष कणेकर आणि सुहास शिरवळकर!

एका बैठकीत वाचलेले स्वामी, श्रीमान योगी, राधेय आणि अशा कितीतरी कादंबऱ्या… एखाद्या लेखकाचे शब्द आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात ही अनुभवलेली किमया!

शेवटी मराठी म्हणजे…

अशी ही बनवा बनवीचं केलेलं पारायण आणि “ओम फट्ट स्वाहा” म्हणताच तोंडपाठ असलेला “ओम भगानी भगोदरी…” हा तात्या विंचूचा चित्रविचित्र मंत्र!

शेवटी मराठी म्हणजे…

नववी-दहावीत असताना ऐकलेले चितळे मास्तर आणि अंतू बर्वा.

कोणीतरी पोट दुखेपर्यंत हसवता हसवता चटकन रडवूही शकतो याचा झालेला तो साक्षात्कार.

त्या वल्लीला “पु. ल. दैवत” असं का म्हणतात याची पदोपदी झालेली ती जाणीव!

शेवटी मराठी म्हणजे…

आभाळमाया, वादळवाट आणि अवंतिका!

रात्री शाळेचं दप्तर भरत असताना आणि आई उद्याची भाजी निवडत असताना, बाबांनी हळूच रिमोट घेऊन लावलेल्या साडेनऊच्या “आजच्या ठळक बातम्या”!

टिपरे परिवारासोबत मोठं होताना, हल्लीच आलेला ‘दशावतार’ पाहून दिलीप प्रभावळकरांबद्दल वाटलेलं ते भलतंच अप्रूप, आश्चर्य आणि आदर!

शेवटी मराठी म्हणजे…

बालभारती!

बहिणाबाई, बोरकर, कुसुमाग्रज, ग्रेस, शांताबाई शेळके यांच्या अजूनही चालीसह लक्षात असलेल्या कविता.

बाईंनी तोंडपाठ करून घेतलेली “श्रावणमासी हर्ष मानसी” गर्दीत कुठूनतरी कानावर पडताच — आपलं कोणी तरी ओळखीचं आहे इथे, हा मिळालेला एक दिलासा!

शेवटी मराठी म्हणजे…

लोकसत्ताची रविवारची पुरवणी!

चतुरंग मधले प्रवीण दवणे आणि गौतम राजाध्यक्षांचे लेख, आणि दुपारच्या वेळी सोडवत बसलेले भलेमोठे शब्दकोडे!

शेवटी मराठी म्हणजे…

नाट्यदैवतांना वंदन करून तिसरी घंटा वाजताच उघडलेला तो पडदा… आणि त्यानंतर तीन तास शब्दांत न मांडता येणारा तो जादुई अनुभव!

“सुयोग प्रस्तुत, विजय केंकरे दिग्दर्शित, दोन अंकी नाटक” — हे शब्द कानावर पडताच आता आपल्याला कमाल काहीतरी बघायला मिळणार ही खात्री… आणि पोटात न मावणारा तो आनंद!

शेवटी मराठी म्हणजे…

लतादीदी, आशाताई, बाबूजी यांची अजरामर गाणी आणि मराठी शब्दांना लाभलेलं ते एक सुरेल असं वरदान!

मराठी रसिकांना एक साधा-सोपा कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम हाऊसफुल कसा होऊ शकतो हे दाखवून देणारे सलील आणि संदीप दादा!

शेवटी मराठी म्हणजे…

सकाळी उठताच सवयीने तोंडी येणारं “कराग्रे वसते लक्ष्मी…”

संध्याकाळी शुभंकरोती झाल्यावर आजोबांसोबत झोपाळ्यावर बसून ऐकलेली ती रामरक्षा आणि आज्जीनं लावलेला तो अंगारा!

शेवटी मराठी म्हणजे…

“माझी शाळा”, “माझा आवडता प्राणी”, “मला पंख असते तर!” यावर लिहिलेले ते मजेशीर निबंध!

“निबंध” शब्द ऐकताच कित्येक वर्षांत मराठी लिहिलंच नाही ही झालेली बोचरी जाणीव…

मराठी “टाईप” करता करता ती मुळाक्षरं स्वतःच्या अक्षरात कशी दिसतात याचा पडत चाललेला विसर… आणि वाटलेली थोडीशी ती लाज…

 

लेखिका: केतकी कुलकर्णी

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

किती सुंदर भांडण !

(घरोघरी चालणारं,

डोळ्यात आनंदाश्रू आणणारं!)

 

माझे भांडखोर आई-बाबा

 

लहानपणापासून बघतेय मी,

आई-बाबा सतत भांडायचे,

आता सत्तरी उलटली तरीही,

तेच सुरू त्यांचे !

 

खूप दिवसांनी, दोन दिवसांसाठी,

गेले होते मी माहेरी,

बाबा बाहेर गेल्या गेल्या,

आईच्या सुरू झाल्या तक्रारी.

 

रोज सकाळी सकाळी तुझे,

बाबा जातात फिरायला,

मी ही जाते, कोपऱ्यापर्यंत,

त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायला.

 

कानाला काहीतरी बांधा म्हणते,

किती गारठा असतो हल्ली,

ऐकत तर नाहीतच,

वर उडवतात माझीच खिल्ली.

 

रोज ह्यांच्या मित्रांपैकी आणतं,

कुणीतरी काहीतरी खायला,

बॉर्डरलाईन शुगर आहे आपली,

आता सांभाळून नको का राहायला ?

 

घरी आल्यावर खुशाल बसतात

तासभर वाचत पेपर,

धुणेवाली बाई निघून गेली तर,

पुन्हा माझ्याच डोक्यावर खापर !

 

ऐन बाराच्या उन्हात म्हणतात,

जरा बँकेत जाऊन येतो,

एन्ट्री आणतो, बिलाचं बघतो,

अन देवाला दोन हार घेतो ”.

 

अमेरिकेतून तुझा भाऊच इथले,

सांभाळतो, ग, सगळे व्यवहार,

पण ‘मी’ उन्हात नका जाऊ म्हणाले,

की हे जाणार, म्हणजे जाणार !

 

तुझ्या ताईने ‘मोबाईल’ घेऊन दिलाय,

इमर्जन्सीत सोबत असावा म्हणून,

तेव्हढा बरोब्बर घरी विसरतात,

कितीही सांगा शिरा ताणून !

 

इतकी वर्ष सांगतीये तरीही,

तितकेच भरभर जेवतात,

वाघाच्या अन ह्यांच्या शर्यतीत,

अजूनही हेच जिंकतात.

 

रोज संध्याकाळी मुलांच्या फोन्सची

वाट बसतात बघत,

मी म्हणते, ‘’अहो, मुलं बिझी असतात, ”

तरीही घुटमळतात येरझाऱ्या घालत.

 

परवा म्हणे, ”पंखा पुसतो, ”

अन घेतलं स्टूल चढायला,

आता ह्यांचं का वय राहिलं,

असली कामं करायला ?

 

तेव्हढ्यात बाबा आले फिरून,

म्हणाले, ”चला वाढा ”,

मी काही बोलणार, तितक्यात,

बाबांनी, सुरू केला त्यांचाही पाढा.

 

नका करत जाऊ, ‘स्वतः’ चार जिन्नस,

सांग जरा तुझ्या आईला,

फुकटचा का पगार द्यायचा,

स्वैपाकाच्या बाईला ?

 

खावं-प्यावं, मजेत राहावं,

कशाला ते धरावे उपास,

आता काय मिळवायचं राहिलंय,

आता कशात होणार नापास ?

 

अजून एक तिला समजावून सांग,

ती घेत नाही नीट औषधं-गोळ्या ”,

आई म्हणाली आतून, ”चला,

झाल्यात गरम-गरम पोळ्या ”.

…………………………..

………………………….

केला मी देवाला नमस्कार,

डोळ्यांतून अश्रू सांडत,

म्हटलं,

देवा, ह्या दोघांना,

असेच ठेव भांडत !”

 

अगदी हृदयास स्पर्शून गेले हे भांडण.

फक्त आपल्या पिढीपर्यंतच मर्यादित राहील का हे भांडण?

 

माहीत नाही या बाबतीत कोणाचे काय मत आहे मात्र या भांडणात पती- पत्नी संबंधात जो गोडवा आहे तो जगात कोणत्याच संबंधात दिसत नाही.

 

पति – पत्नी एकमेकांस किती पूरक असतात, याचे हे भांडण ज्वलंत उदाहरण आहे.

तसे पाहता हे भांडण जरूर आहे परंतु यात प्रेम भरभरून आहे हे मात्र तितकेच खरे.

कवयित्री:अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वेडेपणा आणि मूर्खपणा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

  

मूर्खपणा आणि वेडेपणा (Madness and Stupidity)!

एका माणसाच्या गाडीचे टायर बरोबर एका मानसिक रुग्णालयासमोर (Mental Hospital) पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना त्याला मोठी कसरत करावी लागली.

त्याने गाडीचा बोनेट उघडला, जॅक काढला, जादा चाक (spare wheel) आणि व्हील स्पॅनर बाहेर काढले. पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी त्याने चारही नट (nuts) उघडले. पण दुर्दैवाने, ते चारही नट गडगडत गेले आणि थेट गटारात पडले. गटाराचे झाकण उघडता येण्यासारखे नव्हते; नट पाण्यात गायब झाले होते.

तो माणूस हताश होऊन इकडे-तिकडे पाहू लागला आणि शेवटी निराश होऊन पदपथावर बसला.

रुग्णालयाचा एक रुग्ण कुंपणातून हे सर्व सुरुवातीपासून पाहत होता. तो ओरडला:

“ए मूर्खा! काय करतोयस तिथे? “

माणसाने उत्तर दिले:

“मित्रा, विचारू नकोस रे. टायर पंक्चर झाला आणि चाक बदलताना चारही नट गटारात पडले. “

तो रुग्ण लगेच म्हणाला: “अरे, तू उगीच गोष्टी अवघड करतोयस! साधी गोष्ट आहे, बाकीच्या तिन्ही चाकांमधून एक-एक नट काढ, म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक चाकाला तीन नट होतील. पुढच्या पेट्रोल पंपापर्यंत किंवा टायर रिपेअरिंगच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी तेवढे पुरेसे आहेत! “

त्या माणसाने रुग्णाने सांगितल्याप्रमाणे केले आणि आनंदाने त्याला विचारले: “अरे वा! मग तू या मानसिक रुग्णालयात काय करतोयस? “

त्या रुग्णाने दिलेले उत्तर खरंच ‘लेजेंडरी’ होते…

“मित्रा, आम्ही इथे ‘वेडेपणा’मुळे आहोत, ‘मूर्खपणा’मुळे नाही! “

‘वेडेपणा’ ही एक वेगळी गोष्ट आहे.

आणि ‘मूर्खपणा’ पूर्णपणे वेगळी.

वेडेपणावर उपचार होऊ शकतात, पण मूर्खपणावर नाही!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “साळिंदराचं कोडं” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

साळिंदराचं कोडं (Porcupine Dilemma)

जवळ यायचं की लांब राहायचं? तुम्हाला वाटतं की प्रेमात किंवा मैत्रीत जितकं जास्त जवळ जाल, तितकं जास्त सुख मिळेल? तर मग तुम्ही स्वतःला एका मोठ्या संकटात ढकलत आहात.

खरं तर, माणसांच्या बाबतीत ‘अति जवळीक’ हेच दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. नात्यातलं अंतर कमी करणं म्हणजे आनंदाची खात्री नसून, तो दुखापतीला दिलेलं आमंत्रण असू शकतं.

१८५१ सालची गोष्ट आहे… आर्थर शोपेनहॉवर नावाच्या एका जर्मन तत्त्वज्ञानं जगाला एक अजब विचार दिला. याला ‘पोरक्युपाइन डिलेमा’ किंवा ‘साळिंदराचं कोडं’ म्हणतात.

आता तुम्ही म्हणाल, माणसाच्या आयुष्याचा आणि काट्यांनी भरलेल्या साळिंदराचा काय संबंध? ऐका तर, हा संबंध तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्याशी आणि तुटणाऱ्या नात्यांशी जोडलेला आहे!

कल्पना करा, की कडाक्याची थंडी पडलीय. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीनं कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवीय.

साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचू लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन्हा जवळ येतात, आणि पुन्हा तेच काटे टोचतात.

हा खेळ असाच सुरू राहतो. जोपर्यंत त्यांना एक असं ‘योग्य अंतर’ सापडत नाही, जिथं त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत.

माणसाचंही अगदी असंच असतं… आपल्याला एकटं वाटतं, एकाकीपणाची भीती वाटते, म्हणून आपण नात्यांच्या शोधात असतो. कुणाच्या तरी जवळ जावंसं वाटतं, कुणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं…

परंतु जसं आपण कुणाच्या तरी खूप जवळ जातो, तसे समोरच्याचे ‘काटे’ आपल्याला टोचू लागतात.

हे काटे म्हणजे काय? तर समोरच्याचे स्वभावदोष, त्यांच्या सवयी, त्यांचा अहंकार किंवा त्यांचे विचार. आपण जितके जवळ जातो, तितके त्यांचे हे दोष आपल्याला स्पष्ट दिसू लागतात आणि मग सुरू होतो संघर्षाचा प्रवास… आणि आपल्याला वाटतं की, यापेक्षा लांब राहिलेलं बरं होतं!

आज  २०२६ मध्ये, जेव्हा आपण डिजिटल जगात एकमेकांशी २४ तास जोडलेले आहोत, तेव्हा हा ‘साळिंदराचा पेच’ अधिकच गंभीर झालाय.

अलीकडच्या काही संशोधनांतून असं समोर आलंय की, सोशल मीडियामुळं आपण लोकांच्या व्हर्च्युअली इतके जवळ गेलो आहोत की, त्यांच्या खाजगी आयुष्यातले ‘काटे’ आपल्याला सतत टोचत राहतात. त्यामुळं आजकाल त्यामध्ये लवकर ‘बर्नआउट’ जाणवतोय.

शोपेनहॉवरनं यावर एक जालीम उपाय सांगितला होता… तो म्हणजे, ‘सन्मानजनक अंतर’ (Polite Distance).

नात्यात पूर्णपणे विरघळून जाणं किंवा पूर्णपणे लांब जाणं, या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. सुखी व्हायचं असेल तर दोन साळिंदरांसारखं असं अंतर राखायला हवं, जिथं प्रेमाची ऊबही टिकून राहील आणि स्वाभिमानाला धक्काही लागणार नाही.

अनेकदा आपण प्रेमाच्या नादात समोरच्याच्या वैयक्तिक अवकाशात (Personal Space) शिरतो, आणि मग तक्रार करतो की, नात्यात गुदमरल्यासारखं होतंय.

थांबा, अजून पुढं ऐका… ही समस्या फक्त जोडप्यांची नाहीये. आई-वडील आणि मुलं, जिवलग मित्र किंवा ऑफिसमधले सहकारी, या सगळ्यांना हे साळिंदराचं तत्त्व लागू पडतं.

याचा अर्थ असा नाही की जवळ जाऊच नका… याचा अर्थ असा आहे की, डोंगर चढताना त्याचे दगडधोंडे टोचणारच, हे स्वीकारून योग्य अंतर राखा. शिष्टाचार आणि मर्यादा या नात्यातल्या भिंती नसून, ती नात्याला वाचवणारी कुंपणं आहेत.

आजच्या या धावपळीच्या आणि ‘ओव्हर-शेअरिंग’च्या जगात तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपासून किती अंतर राखून आहात? विचार करा, तुम्ही उबेसाठी जवळ जाताय की एकमेकांना टोचण्यासाठी?

शेवटी प्रश्न उरतोच… आपण उबेसाठी टोचून घ्यायला तयार आहोत की थंडीत कुडकुडत एकटं राहायला? की आपण ते सुवर्णमध्य गाठणारं ‘अंतर’ शोधण्यात यशस्वी झालो आहोत…?

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares