मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- अचानक झालेली ती डी. जी. एम् साहेबांची अनपेक्षित भेट ‘ सगळेच दिवस सारखे नसतात’ हे आपल्या सर्वांच्याच बाबतीतले सत्य त्यांच्याबाबतीत अतिशय बोचरेपणानं सत्यात उतरलेलं असल्याची भावना निर्माण करणारी ठरली, जी पुढे कितीतरी दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिलेली होती!

माझ्या पुण्यातल्या त्या अल्पकाळातील असंख्य आठवणींपैकी अशा इतरही अनेक आठवणी मला नेमक्या वास्तव्याचं भान देत माझ्या विचारांना योग्य दिशा देणाऱ्या ठरलेल्या आहेत! )

या घटनेनंतर लगेचच आलेला एक अनुभव, माझी कसोटी पहाणारा आणि अखेर मला चटका लावून जाणाराही ठरला होता. त्या सगळ्याची सुरूवातही माझं तिथलं नवखेपण संपण्यापूर्वीच झाली होती. बँकिंग करिअरमधील त्यापूर्वीचा जवळजवळ तीस वर्षांचा माझा कार्यकाळ फिल्डलेव्हललाच व्यतित झालेला होता. अॅडमिनिस्ट्रेटीव्ह आॅफिसमधे आणि तेही या अधिकारपदावर काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. तोवर प्रत्येक प्रमोशननंतरची माझी पोस्टिंग्ज माझ्या नवीन ग्रेडनुसारच्या मोठ्या ब्रॅंचेस् ना ‘ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून झालेली. प्रत्येकवेळी सर्वसाधारण कामाचं स्वरूप तेच असलं तरी प्रत्येक ब्रँचची पार्श्वभूमी, प्रश्न, ब्रॅंचमधील स्टाफ-मेंबर्स आणि ग्राहक यामधे जाणवण्याइतकं वैविध्य असे. कधी सुसह्य तर कधी प्रत्येक क्षणी परीक्षा पहाणारं! त्यामुळे त्या त्या ब्रँचमधील वातावरणात मिसळून, अत्यल्प काळात त्याचाच एक भाग बनून कोणतीही अवास्तव तडजोड न करता सर्वांचं समाधान होईल असे रिझल्ट्स् देणं म्हणजे तारेवरची कसरतच असे.

उजाडणारा प्रत्येक दिवस ‘आज पुढं काय वाढून ठेवलं असेल’ ही विवंचना घेऊनच उगवायचा. या पार्श्वभूमीवर आमचं ‘रिजनल आॅफिस’ जे आमच्या ब्रॅंचेसचे वरिष्ठ-कार्यालय असे त्यांचा सर्व ब्रॅंचेस वर असणारा अंकुश आणि त्यांचे अधिकार याचे फिल्डवर्कर्सच्या मनावर अर्थातच एक वेगळं दडपण असायचेच. सर्वसाधारणपणे सर्वच ब्रॅंचमॅनेजर्सना तिथे काम करणाऱ्या अधिकारीवर्गाबद्दल अर्थातच हेवाच वाटायचा. रिजनल आॅफिस किंवा त्यावरील झोनल किंवा सेंट्रल आॅफिसमधे काम करण्यासारखं सुख ब्रॅचलेव्हलला काम करण्यात कुठून असायला? ‘ असंच वाटे. ‘.. तिथे ना कधी दिवसभराची ग्राहकांची सततची वर्दळ, ना कॅशची जबाबदारी, ना कामांची दडपणं.. सगळं कसं शांत आणि सुरळीत.. ‘ असा आमचा समज दृढ झालेला.

या पार्श्वभूमीवर माझं झोनल ऑफिसला झालेलं हे पोस्टिंग म्हणजे माझ्यासाठी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला काम करायचा आयुष्यात प्रथमच मिळत असलेला नवा अनुभव होता. माझ्याप्रमाणेच आमचे डी. जी. एम् श्री. वखरे साहेब आणि त्यांच्या सोबतचे इतर दोन नवीन प्रमोटीज् यांचाही माझ्यासारखा हा पहिलाच अनुभव असल्याने आम्हा सर्वांच्याच पाट्या नवीन जबाबदारी स्वीकारताना कोऱ्याच होत्या!

या पार्श्वभूमीवर इथलं रुटीन सुरू झाल्यानंतरचा माझा अनुभव मनातला तो दृढ समज पुसून टाकणारा होता. इथं येऊन आठ एक दिवसच झाले असतील. त्यादिवशी मी मस्टरवर सही करून केबिनमधे जाताच ड्राॅवर उघडून डायरी घेऊन नेहमीप्रमाणे त्या दिवशी करायच्या कामांच्या नोंदींवरून नजर फिरवू लागलो तेवढ्यांत इंटरकॉमची रिंग वाजली. डी. जी. एम्. साहेबांनी मला तातडीने त्यांच्या केबिनमधे बोलावलेलं होतं.

मी जाण्यापूर्वीच माझ्याबरोबरचे इतर दोघे चीफ मॅनेजर्सही आधीच तिथे येऊन बसले होते. त्या तिघांचेही चेहरे कांहीसे गंभीर होते.

“मिस्टर लिमये, पी. अॅण्ड डी. डिपार्टमेंटमधील ‘लाॅंग पेंडिंग मॅटर्स’ ची पूर्ण माहिती घेऊन त्याची नोट तयार करून घ्या. सर्व पॅरामीटर्सवरील नुकत्याच संपलेल्या वर्षातला परफाॅर्मन्स आणि प्रेझेंट पोझिशन यांचं संपूर्ण स्टॅटॅस्टीक एकदा पाहून घ्या. वुई वुईल हॅव टू फेस अवर एम्. डी. पर्सनली. ही इज एक्पेक्टेट हिअर फाॅर हिज प्रीप्लॅन्ड व्हिजीट डे आफ्टर टूमारो. ” वखरेसाहेब घाईघाईने म्हणाले. मी नेमकं काय करायचंय हे समजलं होतं पण एवढ्या कमी वेळेत कसं करायचं याचा विचार करीत मी क्षणभर घुटमळलो.

“मिसेस् जोगळेकर तुम्हाला मदत करतील. शी नोज एव्हरीथिंग” माझी अडचण त्यांनी न सांगताच ओळखली होती.

मी माझ्या केबिनमधे येऊन मिसेस् जोगळेकरांना इंटरकाॅमवरून बोलावून घेण्याचा विचार करीत माझ्या केबिनचं दार ढकललं. पाहिलं तर मिसेस् जोगळेकर तिथे आधीच येऊन माझी वाट पहात बसलेल्या होत्या.

“गुड माॅर्निंग सर” म्हणत त्या अदबीने उठून उभ्या राहिल्या.

“गुड माॅर्निंग मॅडम.. कशा आहात? .. ” मी हसत विचारलं. त्या थोड्या रिलॅक्स झाल्या.

“आता एकतर्फी आक्रमण फेस करायची तयारी सुरू आहे. ” सोबत आणलेल्या दोन मोठ्या बॉक्स फाईल्सकडे निर्देश करीत कसनुसं हसत त्या म्हणाल्या.

त्या लगेचच होत असलेल्या एम्. डी. व्हिजीटबद्दलच बोलत होत्या हे उघडच होतं!

“एकतर्फी आकमण? ” मी न समजून विचारलं.

“तर काय? अशा मीटिंगची पंधरा पंधरा दिवस आधीपासून आम्ही तयारी करायचो. आता कसाबसा आजचा एकच दिवस हातात आहे. डिटेल डिस्कशनसाठी आपल्या सर्वांचा उद्याचा अख्खा दिवस डी. जी. एम् साहेबांच्या केबिनमध्ये जाईल. आजच सगळं निपटायला हवं. ” त्या म्हणाल्या.

“म्हणजे काय करायचं? “

“एम. डीं सोबत सर्व पोर्टफोलिओजचे तीन जी. एम् सुध्दा असतील. या नव्या एम्. डी. नीही गेल्याच आठवड्यात चार्ज घेतलाय. परवा होणारी ही व्हिजिट म्हणजे आधीच्या साहेबांमुळे या झोनची विस्कटलेली घडी तातडीने पुन्हा नीट बसवण्याची युद्धपातळीवर सुरू झालेली तयारी आहे. कारण पुढे लगेचच एम्. डी ऑफिसमधे सर्व झोनलहेडस् ची हाय लेव्हल मिटींग आहे. त्याची ही पूर्वतयारीच असणाराय. सर्वजण इथे येतील ते प्रत्येक डिपार्टमेंटमेंटसमधील त्रुटींची अख्खी कुंडली घेऊनच बघालच तुम्ही. मीटिंगमधील चर्चा म्हणजे फक्त एकतर्फी आक्रमण असणाराय नक्कीच. ते कसंबसं थोपवायचा प्रयत्न करायचा एवढंच. “

मिसेस् जोगळेकर पी अॅण्ड डी डिपार्टमेंटमधे गेल्या दोन वर्षांपासून अॅसिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. शिवाय ऑफिसर म्हणून त्यानी पुण्याच्या रिजनल ऑफिसमधेही पूर्वी काम केलेलं होते. त्यांच्या बोलण्यातून हा अनुभव जाणवतही होता. पण इथला काहीच अनुभव नसणाऱ्या माझ्यासाठी मात्र हाकेच्या अंतरावर असणारी ही एम्. डी. मिटिंग दडपण वाढवणाराच विषय होती!

मधले दोन दिवस आम्हा सर्वांनाच श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती अशी अवस्था!

ती एम्. डी. व्हिजीट आणि प्रत्येक डिपार्टमेंटची तिथं झालेली चिरफाड हा अक्षरश: अंगावर काटा आणणारा अनुभव होता. सुरूवातीच्या इंट्राॅडक्शन सेशनमधे आम्ही तिन्ही चीफ मॅनेजर्सनी इथे नुकताच चार्ज घेतल्याचे समजल्यामुळे आम्ही तसे सेफ झोनमधे होतो. कोणत्याही गंभीर बाबींबद्दल सविस्तर उत्तरं द्यायची वेळ येईल तेव्हा आमच्या डिपार्टमेंटमधील मॅनेजर्सना आत बोलावून घेतले जायचे. इतर डिपार्टमेंटसच्या तुलनेत मिसेस जोगळेकरांनी पी. अॅण्ड डी. डिपार्टमेंटची आघाडी मात्र खरोखरच हिंमतीने आणि त्यांच्या अंगभूत हजरजबाबीपणामुळे चांगली सांभाळली. तरीही एका प्रसंगात मात्र त्या निरूत्तर होऊन अस्वस्थपणे उभ्या होत्या. निमित्त झालं ते पुण्यातीलच आमच्या एका ब्रॅंचमधल्या ग्राहकाची गेल्या तीन वर्षापासून निराकरण व झालेल्या एका गंभीर तक्रारीचं! ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण न होता ते घोंगडं तीन तीन वर्षं भिजत पडलेलं पाहून एम्. डी. संतापले आणि वातावरण अचानक तापलं. चांगली ग्राहकसेवा हा बँकिंग इंडस्ट्रीचा पाया भक्कमच असायलाच हवा हे अतिशय कठोरपणे बजावून “सेंट्रल आॅफिसमधे लवकरच होणाऱ्या सर्व झोनलहेडसच्या मिटींगपूर्वी या लाॅंग पेंटिंग कस्टमर कम्प्लेंटचं कोणत्याही परिस्थितीत निराकरण व्हायलाच पाहिजे” असं त्यांनी निक्षून सांगितलं.

यासारखे इतर डिपार्टमेंटमधीलही बर्निंग इश्यूज्

होतेच. याबद्दलच्या सविस्तर चर्चा म्हणजे खरोखरच प्रतिकार करताच न येणारं फायरिंगच होतं आणि त्या त्या प्रत्येकवेळी स्वत:च्या त्या ए. सी. केबिनमधेही घामाघूम झालेल्या वखरेसाहेबांना खिशातून रुमाल काढून आपला घाम टिपत असताना पहाणं आम्हा सर्वांसाठीच अतिशय क्लेशकारक होतं!

जवळजवळ तीन तास चाललेली ती एम्. डी. मीटिंग म्हणजे इतकी वर्षे मनात रूजलेला ‘ब्रॅंचेसच्या तुलनेत ऍडमिनिस्ट्रेटीव ऑफिसमधे काम करणं किती सुखाचं असतं! ‘ हा भ्रम नाहीसा होत वास्तवाची लख्ख जाणिव करून द्यायला पुरेशी होती!

मीटिंग संपताच आम्ही बाहेर आलो तरी पुढे दीड दोन तास आत वखरे साहेबांसोबत सर्व जी. एम्. आणि एम् डी. साहेबांची हाय लेव्हल टॉक्ज् सुरू होतीच. त्याची सांगता होऊन सर्व टीम मुंबईला निघून जाताच आम्हा सर्व चीफ मॅनेजर्सना वखरेसाहेबांनी केबिनमधे बोलावून घेतलं.

मी आत जाण्यापूर्वीच जोगळेकर मॅडमनाही त्यांनी ‘कंप्लेंटस् फाईल’ घेऊन आत यायला सांगितलं होतं त्यामुळे माझ्यापाठोपाठ त्याही आत आल्या.

अर्थातच हा विषय इतक्या सविस्तरपणे माझ्यापुढे प्रथमच येत होता आणि त्यातलं गांभीर्य मलाही हादरवून सोडणारं होतं.

“तुम्ही या केसची फाईल वाचून पूर्ण समजून घ्या. कांहीही करून ही तक्रार समाधानकारक रित्या चार-सहा दिवसात मागे घेतली जायला हवी यासाठी काय करावं लागेल याचा विचार करून ठेवा. आपण संध्याकाळी इतर कामं आवरली की त्यावर चर्चा करू. ” वखरेसाहेब म्हणाले.

मिसेस् जोगळेकर माझ्या पाठोपाठ माझ्या केबिनमधे आल्या. “या तक्रारदाराला प्रत्यक्ष भेटणं, चर्चा करणं, आणि सामोपचाराने त्यातून मार्ग काढणं यासाठी करायचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत सर ” असं म्हणत त्या संबंधीच्या पत्रव्यवहाराची बॉक्स फाईल माझ्यासमोर ठेवून त्या खाली मान घालून बसून राहिल्या. तो क्षण माझ्यासाठी अतिशय हतबल करणाराच होता!

यापूर्वीच्या अशा प्रत्येक हतबल क्षणी ‘त्या’ची आठवण व्हायचीच आणि अतिशय अकल्पितपणे तो मदतीला धावून आल्याचा अलौकिक अनुभव मला दिलासा देऊन जायचा. ‘यावेळीही आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे. ‘तो’ आहेच. ‘ हा विचार मनात आला आणि मी सावरलो.

फाईल पूर्ण वाचून झाली तेव्हा मात्र मन अंधारून गेलं होतं. समोर कणभर प्रकाशही दिसेना. यापुढं येणारा प्रत्येक क्षण माझीच नव्हे तर ‘त्या’चीही कसोटी पहाणारा होता या विचाराने निर्माण केलेली अस्वस्थता मनातल्या अंधारावर तरंगत राहिली होती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदी वाचनाची सवय- — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आनंदी वाचनाची सवय- — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 मला आठवते आमच्या लहानपणी परीक्षा झाल्या की सगळी भावंडे (मावस, मामे, चुलत, आते) निरनिराळ्या नातेवाईकांच्या कडे जाण्याची पद्धत होती. आणि ते नातेवाईक सुद्धा पत्रव्यवहार करुन सर्वांना आग्रहाने बोलवायचे. आमचे बरेच नातेवाईक शिक्षण क्षेत्रात असल्याने त्यांच्या कडे पुस्तकाची मेजवानी असायची. इतर अनेक कार्यक्रम असायचेच. पण या सुट्टीत मुलांनी कोणती पुस्तके वाचायची हे आधीच ठरवलेले असायचे. एखाद्या मुलाने दुसऱ्याचे पुस्तक घेतले की, त्याला सांगितले जायचे, “ते वाचण्यासाठी तू अजून लहान आहेस. ते तू अजून २ वर्षांनी वाच. ” त्यावेळी फारसे लक्षात येत नव्हते. पण वाचनाची गोडी लावण्यासाठी हे किती आवश्यक आहे. ते मोठे झाल्यावर कळले.

पुस्तक वाचनाची सवय लागण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत

योग्य पुस्तक निवड

या साठी मोठ्या माणसांनी आपल्या मुलांचा वयोगट पाहून पुस्तके द्यावीत. सध्या तर इतकी आकर्षक व रंगीत पुस्तके आहेत की ती मोठ्यांना पण आकर्षित करतात. अगदी लहान मुले सुद्धा ती चित्रे आवडीने बघतात.

नेहमी एक पुस्तक सोबत ठेवावे.

असे म्हणतात, नजरेआड होणे म्हणजे मनाबाहेर जाणे. नेहमी एक पुस्तक सोबत ठेवायचे. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचे. प्रवास करताना किंवा रेस्टॉरंटमध्ये, कॅबमध्ये, रेल्वे स्टेशनवर – कुठेही मोकळा वेळ असेल तिथे वाचायचे. बरेच लोक प्रवासात वाचताना मी बघितले आहेत.

वाचन करायच्या पुस्तकांची यादी बनववणे

आपल्याला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात हे ठरवताना छंद/आवड लक्षात ठेवून पुस्तकांची यादी बनवायची. जर एखाद्या चांगल्या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली तर ते पुस्तक आपल्या यादीत जोडायचे.

वाचनालयात किंवा जुनी पुस्तके मिळतात त्या दुकानात किंवा पुस्तक प्रदर्शनात जायचे

त्या ठिकाणी पुस्तके हाताळायला मिळतात. तिथे बसून पुस्तके बघण्याची व्यवस्था असते. काही रस्त्यावर बसलेल्या पुस्तक विक्रेत्यांच्या कडे मला खूप उत्तमोत्तम पुस्तके मिळाली आहेत. सध्या पुस्तक प्रदर्शने खूप भव्य आयोजित केली जातात. त्या ठिकाणी सहकुटुंब जायचे. बऱ्याच शाळा अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जातात. आणि सोबत असलेले शिक्षक त्यांना पुस्तकांची माहिती देतात.

टीव्ही आणि सोशल मीडियाचा वेळ कमी करायचा

टीव्ही आणि सोशल मीडिया आपला बराचसा उत्पादक वेळ वाया घालवतात आणि काही वैद्यकीय अहवालांनुसार त्यांचा आपल्या मेंदूवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. टीव्ही आणि सोशल मीडियावरील आपला वेळ कमी करणे सुरुवातीला थोडे अवघड वाटेल. परंतु एकदा प्रयत्न केले की पुस्तक वाचनासाठी किती मोकळा वेळ आहे हे पाहून आश्चर्य वाटते. कित्येक वेळा मुले जेवत नाहीत म्हणून त्यांना मोबाईल दिला जातो. ही सवय अत्यंत घातक आहे. त्या ऐवजी त्यांना चित्रे दाखवावीत. त्यांची माहिती, गोष्टी सांगाव्यात.

वाचनाची वेळ ठरवून घ्यावी

 दैनंदिन वेळापत्रकात पुस्तक वाचनासाठी वेळ निश्चित करायची. जोपर्यंत आपण ते वेळापत्रक तयार करत नाही तोपर्यंत व्यस्त वेळापत्रकात कधीच वेळ मिळणार नाही. दिवसभरात १५ मिनिटे असली तरीही ती वेळ ठरवावी आणि काहीही झाले तरी ती वेळ पाळायची.

पुस्तकापासून दूर जायचे नाही

सुरुवातीला अशी पुस्तके शोधायची जी मजेदार आणि आकर्षक असतील आणि गोडी लावतील. जर एखादे पुस्तक वाचत असताना पहिली ५० पाने कंटाळवाणी वाटत असतील तर सोडून द्यायचे. म्हणजे ते पुस्तक बाजूला ठेवायचे. आणि दुसरे पुस्तक घ्यायचे. एकदा वाचनाची सवय लावली की तेच पुस्तक उचलून वाचू लागतो.

स्वतःला बक्षीस द्यायचे

आपल्या वाचनाचा वेळ आनंददायी बनवायचा. वाचताना चहा/कॉफी घ्या. आणि पुस्तक संपल्यानंतर आईस्क्रीम, एखादा आवडीचा पदार्थ याचा आस्वाद घ्यायचा.

घरातील मोठ्यांच्या सवयी

मोबाईल किंवा कोणताही स्क्रीन घरातील मोठ्या माणसांनी दूर ठेवून हातात पुस्तक घ्यावे. मुले तेच अनुकरण करतात.

पुस्तके हाताशी ठेवावीत

आपल्या बसण्याच्या जागी, झोपण्याच्या जागी जवळ सहज हाताशी लागतील अशा प्रकारे पुस्तके ठेवावीत म्हणजे ती पटकन वाचायला घेता येतात. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी जसे दवाखाना, पुस्तके हॉलच्या मध्यभागी ठेवलेली असायची.

भेटवस्तू म्हणून पुस्तके देणे

वाढदिवस आणि विशेष प्रसंगी अन्य गोष्टी देण्यापेक्षा पुस्तकेच भेट द्यावीत. चांगली पुस्तके असतील तर त्यातूनही वाचनाची आवड जोपासली जाईल.

चर्चा करणे

समविचारी किंवा समवयस्कर मित्रांनी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून तरी एकदा एकत्र येऊन आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करावी. त्यातूनही विविध पुस्तकांबद्दल माहिती मिळेल आणि आवड निर्माण होईल.

नोंद ठेवणे

आपण कोणत्या लेखकाची कोणती पुस्तके वाचली आणि ती आपल्याला का आवडली याची नोंद एका स्वतंत्र वहीवर करून ठेवावी. आपण वाचलेल्या पुस्तकातील चांगली माहिती, उतारे लिहून ठेवता येतील.

पुस्तक भिशी

ग्रुपने एकत्र अशी पुस्तक भिशी लावावी. म्हणजे विविध पुस्तके वाचायला मिळतील.

काही उपक्रम आम्ही शाळेत घेत असतो.

वाचन कोपरा

प्रत्येक वर्गात किंवा घरात असा वाचन कोपरा असावा. त्यावर विविध प्रकारचे वाचन साहित्य असावे. म्हणजे आपल्या आवडी प्रमाणे वाचता येते.

चावडी वाचन (प्रगट वाचन)

लहान मुलांना आपले कौतुक मोठ्यांनी केलेले आवडते. म्हणून त्यांना समूहा समोर वाचायला लावावे. किंवा घरी पाहुणे आल्यावर त्यांच्या समोर वाचायला सांगावे. त्यातून जी कौतुकाची शाबासकी मिळते ती वाचन आवड जोपासायला मदत करते.

वाचन स्पर्धा

शाळेत अशा स्पर्धा घेतल्या जातात. अशा स्पर्धा सार्वजनिक उत्सवात ठेवू शकतो.

वृत्तपत्र वाचन

शाळेत परिपाठाच्या वेळी असे वाचन घेतले जाते. असेच वाचन घरी येणाऱ्या वृत्तपत्राचे पालकांनी वाचन करुन घ्यावे. त्यातून सामान्य माहिती, जगातील घडामोडी समजतात. आणि त्यातून भावी स्पर्धा परीक्षांची तयारी पण होऊ शकते.

वाचनालये

सध्या वाचनालये पुस्तकांची घरपोच सेवा देतात. त्याचा लाभ घेता येईल. मोठ्यांनी कोणते पुस्तक घ्यायचे ते ठरवून ठेवावे. आणि मुलांनाही तसे सांगावे. सुरुवातीला मोठ्यांनी मुलांना मदत करावी.

 अशा प्रकारे आपण लहान थोर सर्वजण वाचनाची गोडी लावून घेऊ शकतो आणि इतरांना गोडी लावू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चंद्र महिमा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ चंद्र महिमा… ☆ सौ शालिनी जोशी

“चांदोमामा चांदोमामा भागलास का?

लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?”

आकाशातील चंद्र, पृथ्वीचा उपग्रह. पण तोच बालकांचा चंदामामा. ढगामागुन डोकावणारा आणि झाडामागे लपून बालकांशी लपाछपी खेळणारा. कधी त्याच्यावरील डागात मुलं सशाची जोडी पाहतात, तर कधी वहिनीला आणायला चांदोबाची गाडी पाठवायची तयारी करतात. असा हा मुलांचा जानी दोस्त. प्रियकराला मात्र तो प्रियेच्या मुखात भासतो आणि ते मुख चंद्रमुख होते. बंधू नसलेल्या स्त्रीचा भाऊ होऊन तिच्याकडून ओवाळण्याचा मान तो मिळवितो. गरोदर स्त्रीला आपले डोहाळे पुरविण्यासाठी चंद्रकोरीवर बसावे वाटते व चांदणी भोजनाची हौसही पुरवावी वाटते.

लक्ष्मीलाही त्याची प्रभा मोहित करते. तसे वस्त्र व कांती ती धारण करते. गणेशही या खट्याळ चंद्राला शिक्षा देतो. (गणेश उंदरावर बसून निघाला असला त्याचा तोल जातो म्हणून चंद्र त्याला हसतो. म्हणून गणेश त्याला शाप देतो. अशी कथा आहे). म्हणून आपले रूप कमी जास्त करण्याची व  पूर्ण नाहीसे करण्याची लीला त्याला करावी लागते आणि गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करणाऱ्यांवर चोरीचा आळ येतो, हा कलंक ही चंद्राला सहन करावा लागतो. अशा चंद्राला भगवंत मात्र आपली विभुती मानतात. ते म्हणतात,  ‘नक्षत्राणामहं शशी’. चंद्र शीतल, थंड, शांत म्हणून विषप्राशनाने झालेला दाह कमी करण्यासाठी भगवान शंकर  त्याला आपल्या भाळी स्थान देतात. म्हणून भगवान शंकर चंद्रमौळी नावाने ओळखले जातात.

रामाला तर बालपणी तो चेंडू वाटला. तो मिळावा असा बालहट्ट तो करतो व पुढे चंद्रासारख्या शांत स्वभावाचा म्हणून रामचंद्र होतो. समुद्रमंथनातून याचा जन्म झाला असे सांगितले जाते. चंद्र ही मनाची देवता. म्हणून ‘चंद्रमामनसोजातः’ असा पुरुषसुक्तात त्याचा उल्लेख आहे. गोपी कृष्णाच्या रासक्रीडेचा  साक्षीदारही तोच. आणि कृष्णाचा वंश ही चंद्रवंश. अशाप्रकारे पुराणकालापासून असलेले आपले महत्व तो आजही टिकवून आहे.

खगोलशास्त्रीय दृष्टीने पृथ्वीचा उपग्रह, म्हणणून त्याला पृथ्वीपुत्र म्हटले जाते. लाडक्या बालकाप्रमाणे अखडं पृथ्वीभोवती गोल गोल तो फिरतो व पृथ्वीच्या मदतीने सूर्याला झाकायचे धाडस करतो (यालाच ग्रहण म्हणतात). चंद्र आपल्या पूर्णत्वाने पृथ्वीवरील सममुद्राला आकर्षित करतो. (भरती, ओहोटी होतात).

आपल्या उगवण्याने चंद्रविकासी कमळाला (कुमुदिनी) उमलवितो. सोमकांत मण्याला पाझरायला भाग पडतो. आपल्या अमतृमय किरणांनी चकोराला तृप्त करतो. संत ज्ञानेश्वरांनाही मोहात पाडतो. त्यामुळे वेळोवेळी चन्द्राच्या दृष्टांतांची आपल्या ग्रंथात ते रेलचेल करतात. अनेक कवींच्या कवितांचा विषय होण्याचे भाग्य या चंद्राला लाभले. तो चिरंतन आहे म्हणून ‘आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ अशा स्वातंत्र्यगीतात त्याला स्थान आहे. आपली शीतलता व मंद प्रकाश कोणताही भेद न करता सर्वांना मुक्त हस्ताने वाटणारा संत ही तोच. आजारी दमेकऱ्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशातील औषध मानवते. वनस्पतीतील औषधी गुणधर्म ही त्याचीच किमया. विवाह यशस्वी होण्यासाठी लग्नापूर्वी पत्रिका बघताना आधी चंद्रबळ  बघीतले जाते. असे याचे बळ!

स्त्रियांचा तर लाडका, म्हणून  त्यांच्या रांगोळीत याला मानाचे स्थान असते. तसेच आपल्या भाळी कुंकवाची चंद्रकोर काढून त्या त्याला मिरवतात आणि गळ्यात चंद्रहार नावाचा दागिनाही घालतात. चंद्राच्या कलेप्रमाणे रोज एक एक घास वाढविणे व कमी करणे असे ‘चांद्रायणी’ नावाचे व्रतही स्त्रिया करीत. बालपणीचा मामा, बहिणीचा भाऊ, प्रेमाचा साक्षीदार, म्हातारपणी वयाची ऎंशी वर्षे झाल्यावरही सोबतीला असतो. ८१ वर्षांत १००० पौर्णिमा येतात. म्हणन ८१ वर्षे पूर्ण झाल्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो.

हे सर्व झाले लांबून केलेले कौतुक. पण आपले शास्त्रज्ञ मात्र या लांबच्या अनुभवावर तृप्त नाहीत. त्यांना तेथे वस्ती करायचा आनंद उपभोगायचा आहे. त्यासाठी तेथील माती, हवामान, पाणी, गुरुत्वाकर्षण या सर्वांचा अभ्यास करायचा आहे. त्यादृष्टीने आपले चांद्रवीर चंद्रावर जाऊनही आले आहेत. (नील आर्मस्ट्रॉंग आणि एडवर्ड ऑल्ड्रिन आता ही संख्या बारा झाली आहे.) इस्रोने सोडलेल्या यानाचा ऑरबिटर अभ्यासासाठी त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालून आला. तर चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली.

अशाप्रकारे आपल्या विविधांगी व्यक्तीमत्वाने सर्वांना भुरळ पाडणारा, पुराणकालापासून सर्वांचे आकर्षण ठरलेला चंद्र विविध नावांनी मिरवतो यात नवल नाही. उदा. सोम, शशी, नील, सुधाकर, भौमिक, विकेश इ.

आपले पंचांगही चंद्राच्या फिरण्यावर आधारीत आहे. आपले विविध सणही आपण पौर्णिमेला साजरे करतो. जसे गुरुपौर्णिमा, राखीपौर्णिमा, वटपौर्णिमा. यातून गुरु-शिष्य, बहीण-भाऊ, पती-पत्नी यांच्या नात्याचा दुवा तो होतो. या शिवाय त्रिपुरीपौर्णिमा, नव्याचीपोर्णिमा, होळीपौर्णिमा  इ. सणही पौर्णिमेलाच असतात. प्रत्येक पौर्णिमेची नवलाई वेगळी. याशिवाय अश्विनपौर्णिमा किंवा शरदपौर्णिमा हिला कोजागिरीपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी रात्री चंद्राच्या अमतृवर्षावाने सुगंधीत व रसमय झालेले दूध पिऊन लोक नीरामय आयुष्याची इच्छा करतात. चंद्र पूजन करतात. आनंदाने एकमेकांच्या सहवासाचे सुख उपभोगतात. या रात्री लक्ष्मी ‘को जागराति?’ (कोण जागे आहे?) असे विचारत सर्वत्र संचार करते. अर्थात ही जागृती साधीसुधी नाही तर ही ज्ञानदृष्टीची जागृती आहे. आणि अशी जागृती झालेला साहजिकच परमसुखरूपी धनाचा आधिकारी होतो. या पौर्णिमेचे वैशिष्टय म्हणजे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या  जास्तीत जास्त जवळ येतो  व आपल्या अमतृधारा पृथ्वीरूप प्रियेच्या हिरवळीत मिसळून टाकतो.. अशी कवी कल्पना. आणि मग श्रीनिवास खळेंसारख्या कवीना काव्य स्फुरते,  ‘उगवला चंद्र पुनवेचा, मज हृदयी दरिया उसळला प्रीतीचा’.

चंद्राचे रोज निराळे लावण्य. आजची कला उद्या नाही. शंकराच्या भालप्रदेशावर प्रकट होते ती द्वितीयेची चंद्रशोभा. तर प्रतिपदेची अगदी कळत नकळत दिसणारी, शाखाचद्रंन्यासाने दाखविली जाणारी. अष्टमीच्या चंद्राचे सौंदर्य विशेष असते. पौर्णिमेला चंद्राच्या तेजापुढे तारका लोपतात. तर अष्टमीला वेचक तारकच दिसतात. अमावास्येचा आनंद तर फारच गंभीर. त्या दिवशी निस्तब्ध शांतता असते. चंद्राचा जुलमी प्रकाश नसल्याने लहान मोठे अगणित तारे पूर्णपणे चमचम करीत असतात. त्या दिवशी चंद्र सूर्याशी एकरूप होतो.

असा हा चंद्र आपल्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनला आहे. इतर कोणत्याही ग्रहाला मिळाले नाही ते स्थान चंद्राला मिळाले आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाचू आनंदे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वाचू आनंदे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बऱ्याच म्हणजे २५ वर्षा पूर्वीचा एक सिनेमा बघितला. त्यावेळी त्यात विशेष काही वाटले नव्हते. पण आता पुस्तक घेऊन वाचणे या विषयी जी अनास्था दिसते त्या मुळे हा सिनेमा काढणाऱ्यांचे कौतुक वाटले. त्याची कल्पना अशी आहे, सुरुवातीलाच एका ९ महिन्याच्या बाळाला त्याची आया पुस्तकातील चित्रे दाखवून माहिती व गोष्टी सांगत असते. त्या बाळाला

काही लोक पैशासाठी किडनॅप करतात. त्या नंतर या बाळाचा प्रवास सुरु होतो. त्याचा प्रवास आणि किडनॅप करणाऱ्यांना झालेला त्रास मजेशीर व बघण्या सारखा आहे. ज्यावेळी पोलीस घरी येऊन त्या बाळाचा प्रवास अर्थात लोकांनी सांगितलेला सांगतात. त्यावेळी ती आया आता बाळ कुठे असेल ते सांगते. कारण ते बाळ त्या पुस्तकातील चित्राच्या क्रमाने प्रवास करत अर्थात रांगत जात असते. त्या वरून ते बाळाला शोधतात. आणि ते बाळ त्या किडनॅपरची बिल्डिंग पण दाखवते. व ते पकडले जातात.

या वरून पुस्तकातील ज्ञानाचे महत्व नक्कीच लक्षात येते.

पुस्तक वाचनाचे पुढीलप्रमाणे काही फायदे लक्षात येतात.

ज्ञान वाढवणे

पुस्तके विविध विषयांची माहिती देतात. जसे इतिहास, विज्ञान, विविध शोध, विविध कला त्यांचा उगम आणि इतर अनेक माहिती मिळते.

त्या मुळे जगाची माहिती मिळून समज वाढते.

मेंदूसाठी व्यायाम

वाचन मेंदूला सक्रिय ठेवते. एखादे वाक्य किंवा माहिती वाचल्यावर त्याची मेंदूत साठवणूक होते. व मेंदूची कार्यक्षमता वाढते. आपल्या मेंदूची रचना अशी असते कि त्याला कायम नवीन माहिती हवी असते. त्यामुळे आपल्या मनाचे आरोग्य उत्तम राहते.

भाषा कौशल्ये

वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. नवीन शब्द शिकायला मिळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ समजतात. पूर्वीच्या लोकांची भाषा समजते.

भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवता येते.

तणाव कमी होतो

वाचनामुळे मनःशांती मिळते. आपल्या मनातील मरगळ दूर करुन पुस्तके आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. त्यामुळे

मानसिक तणाव कमी होतो. शांतता मिळते आणि आपल्याला मानसिक आराम मिळतो.

सर्जनशीलता वाढते

पुस्तके नवीन जगात घेऊन जातात. त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. एक विचार वाचताना त्या सारखे अनुभव किंवा विचार आठवतात. नवीन विचार सुचतात.

सर्जनशील विचारांचा विकास होतो.

एकाग्रता वाढते

पुस्तकांच्या नियमित वाचनाने इतर गोष्टींचा विसर पडतो. काही वर्षांपूर्वी पुस्तके हेच विरंगुळ्याचे साधन होते. त्यातून ज्ञान, रंजन होत होते.

लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. अगदी आजारी व्यक्ती सुद्धा आपले दुखणे विसरत असे.

भावनात्मक विकास

वाचनामुळे विविध लोकांच्या भावना, विविध प्रसंगातील विविध दृष्टीकोन समजतात. वेगवेगळ्या प्रसंगी लोक कसे वागले होते ते समजते. त्यातील योग्य कि अयोग्य याचे वर्गीकरण केले जाते.

विचार करण्याची क्षमता

पुस्तकात विविध गोष्टींचे विश्लेषण विविध गोष्टीतून, विचारातून, उदाहरणातून केलेले असते. त्यातून आपली वैचारिक क्षमता वाढते. पुस्तके आपल्याला  चिकित्सकपणे विचार करायला शिकवतात.

संज्ञात्मक कौशल्ये वाढतात

वाचनामुळे गंभीर विचार करण्याची सवय लागते.

जटील समस्या सोडवण्याची व त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे कठीण प्रसंगी कोणते निर्णय घ्यावेत याची कल्पना येते.

संवाद कौशल्य वाढते

योग्य व प्रभावी संवाद साधण्यासाठी आवश्यक शब्द, वाक्य पुस्तक वाचनातून समजतात.

ऐतिहासिक वारसा

पूर्वीच्या काळातील लोकांनी लिहून ठेवलेली माहिती, लावलेले शोध, आपल्या देशाचा इतिहास, वारसा समजतो.

असे म्हणतात की एखाद्या देशाला नेस्तनाबूत करायचे असेल तर तेथील वाचनालये नष्ट करावीत. इतके वाचन व पुस्तके यांचे महत्व आहे.

आरोग्य

वाचनामुळे आपल्या आरोग्यावर कोणतेही घातक परिणाम होत नाहीत. कोणतेही घातक प्रकाश किरण डोळ्यात जात नाही.

उलट शांत झोप लागते. आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.

असे फायदेशीर वाचन करायलाच हवे. आणि त्यासाठी पुस्तके वाचायला हवीत. घरात एक पुस्तक आले तर घरातील सर्वजण ते वाचू शकतात. त्यावर चर्चा करु शकतात. त्या निमित्ताने कमी होत चाललेले सांभाषण वाढू शकते. वाचून चर्चा केलेला अभ्यास सुद्धा चांगला लक्षात राहतो.

असे महत्वाचे पुस्तक वाचन जपायलाच हवे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पुनर्जन्म आणि मोक्ष काही प्रश्न?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “पुनर्जन्म आणि मोक्ष काही प्रश्न?☆ श्री जगदीश काबरे ☆

बहुदा सगळ्याच लोकांना पुनर्जन्म आणि मोक्ष याबद्दल कुतूहल असते. माझ्याही मनात असे कुतूहल निर्माण झाले, म्हणून मी या विषयांचा धांडोळा घेऊ लागलो आणि प्रश्नांच्या गुंत्यात अडकत गेलो. ते प्रश्न आपल्या समोर मांडत आहे. पहा काही सुचतयं का?

१. मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही?

२. मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा हवा ना?

३. समजा वरील प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार? भारताऐवजी मी ’टीटीलिस’ नावाच्या देशात जन्मलो तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार की मी भारतीय कायद्याच्या ‘ज्युरिस्डिक्शन’ मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार?

४. आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्याबाबत असे असेल तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का?

५. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) ‘मनुष्यजन्मांचे’? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही ‘कन्सेंट’ मिळावेत अशा आईबापांपोटी… वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्‍यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्‍यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते?

५. १ मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री ही पुरूष म्हणून नि पुरूष हा स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या कॉंट्रॅक्टमधे धरला जातो की नाही?

५. २. मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय!) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हजबंड-वाईफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का?

६. दोन जन्मांच्या मध्ये भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणे! त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे! म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी-फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी-फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत ‘टीडीआर’ असतो का? लक्ष-चौर्‍यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात? रिलेटिव्हीटीला स्मरून एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग भुताच्या इच्छा अपुर्‍या राहिल्या तर त्याला मनुष्य जन्म मिळतो असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का?

६. १ प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात?

७. पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हे संतुलन अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची शक्ती आहे त्याला रेकमेंड करून) ‘अकाउंट क्लोज्ड’ चा शिक्का का मारत नाहीत?

७. १. पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते?

७. २ काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते?

७. ३. वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यूआर कोड देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यूआर कोडवाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घ्यायची?

७. ४. माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का?

८. मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट होते का? याचे उत्तर ‘हो’ असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर – थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर – हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही ‘मोक्षपत्र’ करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल?

९. फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का?

१०. पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ‘सिविल सोसायटी’च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे – खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले – विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण ‘शांभवी’च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?

आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर ‘सास भी कभी बहू थी’ सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होताच म्हणे!) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. 😂

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सैनिकांना देश काय देतो ?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ “सैनिकांना देश काय देतो ?” ☆ श्री संभाजी बबन गायके

“चांगला शिकलेला असतास तर आज चांगल्या कंपनीत नोकरी करीत असतास, अर्धशिक्षित आहेस म्हणूनच तिकडे सीमेवर पाठवलाय तुला… कुणाचे पैसे बुडवून तुमचं काही चांगलं होणार नाही… तुम्ही लोक असं करता म्हणून तुमची मुलं अपंग म्हणून जन्माला येतात… आणि तुम्ही लोक शत्रूच्या हातून मारले जाता! मी पाहतेच तू काय करतोयेस ते… मी पण फौजी कुटुंबातीलच आहे… तू जर चांगल्या कुटुंबातला असतास ना तर असा पंधरा सोळा लाख रुपयांचं कर्ज घेऊन जगला नसतास… !” 

वरील वक्तव्ये आहेत एका तथाकथित रिकवरी एजंट महिलेची. सी. आर. पी. एफ. अर्थात सेन्ट्रल रिजर्व पुलिस फोर्समध्ये आणि सध्या सीमेवर तैनात असणा-या कुणा एका सैनिकाने एच. डी. एफ. सी. बँकेतून सुमारे सोळा लाखाचे कर्ज घेतलेले आहे. या कर्जाबाबत कर्जदार आणि बँक यांच्यात काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. एच. डी. एफ. सी. बँक म्हणते की ही महिला त्यांची कर्मचारी नाही. याचा अर्थ ही महिला कर्ज वसुलीच्या कामावर नेमल्या गेलेल्या कुणा खाजगी संस्थेची प्रतिनिधी आहे. कर्जाचे थकलेले हफ्ते वसूल करण्याच्या कामासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अधिक आक्रमक वसुलीसाठी काही बँका थेट बाहुबली लोकांची मदत घेताना दिसतात. असो.

प्रस्तुत विषयात या महिलेने संबंधित सैनिकाशी मोबाईलवर केलेल्या संभाषणाचा ऑडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. पुढे संबंधित महिलेने याबाबत माफीनामा दिल्याचा ऑडीओ सुद्धा आला आहे. असो.

सामान्य लोकांमध्ये सैनिकांविषयी विशेषत: सामान्य सैनिकांविषयी किती आणि कोणकोणते गैरसमज आहेत हेच यातून काही अंशाने पुढे आले आहे. ही बाई तर स्वत:ला सैनिकी कुटुंबातील एक सदस्य म्हणवते… तिच्याच तोंडी जर सैनिकांबाबत अशी भयावह भाषा असेल तर इतर जनतेचे काय असेल? 

सैन्य पोटावर चालते हे जरी खरे असले तरी सैन्यामुळेच सामान्य जनता आपापले जीवन सुरक्षितपणे जगून पोट भरू शकते हे नाकारता येणार नाही! 

सैनिक अर्धशिक्षित असतात असाही एक मोठा गैरसमज समाजात आहे. अगदी सामान्य सैनिक म्हणून भरती व्हायचे असले तरी हल्ली किमान एस. एस. सी. उत्तीर्ण असावे लागते… आणि दहावी पास म्हणजे शिक्षित असे मानले जाते. (इथे मी सामान्य शब्द मी सैन्यसेवेतील अगदी प्रारंभिक पद अशा अर्थाने वापरला आहे. देशासाठी जीवाचा धोका पत्करण्यास तयार असलेला प्रत्येक सैनिक असामान्य म्हणावा!) 

 भारतीय सैन्याच्या ब्रिटीशकालीन जडणघडणीच्या काळात शालेय, पुस्तकी शिक्षणाचा प्रसार अगदीच नगण्य होता. शिवाय समाजाच्या तळागाळातील तरुण सैन्यात भरती होत असत. तत्कालीन आर्थिक हलाखीची परिस्थिती तर होतीच… आणि ही परिस्थिती ब्रिटीशांनी भारतीयांना दिलेली देणगीच होती, हेही खरे! पण पोटाची सोय एवढेच काही सैन्यात भरती होण्याचे एकमेव कारण नव्हते. भारतातल्या काही वंशाच्या लोकांच्या स्वभावात मूळातच असलेल्या लढवय्येपणाच्या भावनेचाही यांमध्ये मोठा वाटा होता. मर्दुमकी गाजवण्याची आंतरिक इच्छा हेही मोठे कारण होते. एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी लढणे आणि त्यासाठी प्राण देण्याची तयारी दर्शवणे हे शिकवून येत नाही! असो.

सैनिकांना सर्व काही फुकट मिळते, त्यांची मज्जाच असते, युद्ध काही नेहमी नेहमी होत नसतात, भरपूर पेन्शन असते, सैनिकी पुरवठा संस्थेत खूप कमी किंमतीमध्ये जीवनोपयोगी वस्तू मिळतात…. असे सामान्य लोकांना वाटते.

शिवाय, पहिलवान लोकांचा मेंदू त्यांच्या गुडघ्यात असतो त्या चालीवर सैनिकांची बुद्धीही तेवढीच असते, असाही एक मोठा मतप्रवाह आजही समाजात दुर्दैवाने आढळून येतो! भारतासारखी कृतघ्न प्रजा अन्य कुठेही आढळून येत नाही! अर्थात यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तशी कमी आहे, किंवा त्यांची मते खुद्द सैनिकच हिशेबात धरत नाहीत… हे देशाचे सुदैवच म्हणावे लागेल!

जीविताचे रक्षण हेच मानवी अस्तित्वाचे मूळ आहे. मग आपल्या जीविताचे रक्षण करणा-यांच्या बाबतीत जनता असा विचारच कसा करू शकते. आपल्या कातड्याचे जोडे करून सैनिकांच्या पायांत घातले तरी त्यांचे उपकार फिटायचे नाहीत असं असताना जनता पैशांच्या हिशेबात सैनिकांना तोलते हे काही चांगले लक्षण नाही! 

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर सामान्य सैनिकांना दिले जाणारे पैसे साधारणपणे पुढीलनुसार आहेत. हाती शस्त्र धरून प्राण पणाला लावण्यात आघाडीवर असणारा शिपायाचा (सैन्यातला शिपाई म्हणजे कार्यालयातील प्यून नव्हे!) (अगदीच अक्षरशत्रू असण्याचा जमाना केंव्हाच मागे पडला आहे. सेनेत भरतीसाठी अनेक उच्चशिक्षित तरुण हजारोंच्या संख्येने प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशिक्षित, अर्धशिक्षित सैनिक असा प्रकार आता उरलेला नाही. ) सुरुवातीचा पगार साधारण एकवीस-बावीस हजार असतो. तो पुढे एकोणसत्तर हजारांपर्यंत जातो. पुढे बढती मिळत गेल्यावर यांच्या प्रवर्गातील सर्वांत उच्च पदावरील सैनिकाला दीड लाखांपर्यंत वेतन मिळू शकते. कोणत्या प्रदेशात, कोणत्या परिस्थितीमध्ये नेमणूक आहे, तिथे जीवितास किती धोका आहे यानुसारही अधिकचे वेतन, भत्ते दिले जातात. सैनिकी सेवा बजावत असताना मृत्यू आल्यास कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक नुकसान भरपाई सुद्धा उत्तम रकमेची असते. सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन असतेच. इतर अधिकारी वर्गाचे वेतन यांच्यापेक्षा अर्थातच अधिक आहे. नव्याने अंगीकारल्या गेलेल्या अग्निवीर योजनेत पहिल्या वर्षी सुमारे एकवीस हजार हाती पडतात आणि बाकीची रक्कम विशेष योजनेत जमा होते, जी सैनिकाचा कार्यकाळ संपल्यावर त्याला हिशेब आणि नियमानुसार परत दिली जाते. इतर खात्यांतील नोक-यांत प्राधान्य, कर्जसुविधा असे लाभ आहेत. शिवाय सैनिकी कर्तव्यावर असताना मृत्यू आल्यास अधिकृत वारसांना सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते.

दहा-बारा लाख प्रत्यक्ष सैनिक, त्यांना साहाय्यक इतर सेवा करणारे तितकेच लोक यांचा समावेश असणारी सैन्य ही एक मोठी यंत्रणा आहे. कारभार अत्यंत व्यापक आणि वर्षानुवर्षे चालत आलेली आर्थिक व्यवस्था आहे. त्याबाबत न्याय व्यवस्था आहे. एवढे सर्व असले तरी सैनिकांना जे काही मिळते ते त्यांनी त्यांचे प्राण पणाला लावलेले असतात म्हणून. या सेवेत तंदुरुस्ती सातत्याने टिकवून ठेवावी लागते. सतत प्रशिक्षण घेत राहावे लागते. घाम गाळावा लागतो. नागरी जीवनापासून, कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहावे लागते, एकाकीपणा असतो. भारतीय प्रदेशांच्या विविधतेमुळे विविध शारीरिक समस्यांना, विकारांना सामोरे जावे लागते. या सेवेत प्राणार्पण करणा-यांचे वय इतर जनतेच्या मानाने खूप कमी असते… जवान म्हणजेच मराठीत तरुण. देशासाठी मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांची आर्थिक बाजू जरी बरी दिसत असली तरी त्याही कुटुंबाला, विशेषत: पत्नी, आई, वडील यांना कित्येकदा आर्थिकी वाद, कुचंबणा, समाजकंटक, दुर्लक्ष, दफ्तरदिरंगाई यांना सामोरे जावे लागते. या यादीत आणखी कितीतरी गोष्टींची भर घालता येईल.

घराच्या रक्षणासाठी वेतन देऊन रक्षक नेमला आणि चोरी झालीच नाही म्हणजे रक्षकाच्या वेतनावर केलेला खर्च वाया गेला असे म्हणणे हास्यास्पद नव्हे काय? विमा काढला पण विकार झालाच नाही हा विचारही तसाच. सैनिकांचे कामच आहे प्राणार्पण करणं, त्याचे त्यांना पैसे मिळतात असे म्हणणारे लोक इतरत्र आढळत असतील असे वाटत नाही.

अपहरण झाले, शस्त्राचा धाक दाखवला गेला, गुंडांनी मागितले, कुणी ऑनलाईन अटकेची भीती दाखवली, जीवघेणा आजार झाला उपचारांसाठी जवळचे सर्वस्व द्यायला लोक सहजी राजी होतात. इथे तर आपल्या जीविताच्या रक्षणाचा प्रश्न आहे, आपल्या इभ्रतीचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि ही इभ्रत प्राणांचे मोल देऊन राखण्याचे काम करण्यासाठी तरुण रक्त (आपल्याकडे सैन्यसेवा अनिवार्य नाही!) स्वयंस्फूर्तीने, देशसेवेच्या, मातृभूमीच्या रक्षणाच्या प्रेरणेने पुढे येत असतात… हे जगण्याची आस असणा-या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या पथ्यावर पडणारी बाब नव्हे काय? आणि आपल्या देशासमोरची सध्याची भयावह परिस्थिती पाहता रुपयातले बारा आणे जरी खर्ची पडले तरी ते कमीच पडतील, असे वाटते! 

प्रस्तुत लेखातील आरंभी उल्लेख केलेल्या महिलेने क्षमायाचना केली आहे, सैनिक तिला क्षमा करतीलच…. कारण आपण ज्यांचे रक्षण करण्यासाठी प्राण तळहातावर घेतलेले आहेत…. त्यांपैकी काहीजण असे अशिक्षित, अर्धशिक्षित निपजतील याची त्यांना अपेक्षा असेलच! जय हिंद!

(ता. क. :-बी. एस. एफ, सी. आर. पी. एफ., इंडियन आर्मी, टेरीटोरिअल आर्मी इत्यादी इत्यादी विभाग, नावे ही देशरक्षणाच्या व्यापक कार्याच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत.. यातील प्रत्येकजण सैनिकच!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झापडं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ झापडं… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

मला आठवतंय् माझ्या लहानपणी आम्हाला गावातल्या गावात कुठे जायचं असलं, तर आम्ही कितीदा तरी टांग्याने जायचो. आत्तासारखा तेव्हा रस्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा सुळसुळाट नव्हता… आणि माणसांचाही… मुळात गावंच काय पण शहरंही एवढी विस्तारलेली नव्हती… आणि नागरिकांची संख्याही. त्यामुळे रस्त्यातून टांगे अगदी आरामात फिरायचे. त्या टांग्यातून प्रवास करतांना एक वेगळीच मजा यायची. वाटलं तर मागच्या बाजूला बसा… मनात आलं तर टुणकन् उडी मारून पुढे टांगेवाल्याजवळ जाऊन बसा… मज्जा यायची खूप. कुठे बघावं आणि कुठे नाही असं होऊन जायचं अगदी. पुढे बसलं की मग घोड्याचं निरीक्षण करता यायचं आणि पावलागणिक एका विशिष्ट लयीतलं त्याचं चालणं…त्याचं मान हलवणं…शेपूट हलवणं…या सगळ्याच गोष्टी लक्ष वेधून घ्यायच्या. वय थोडं वाढल्यावर त्याच्या डोळ्यांना बांधलेल्या झापडांकडेही आवर्जून लक्ष जायचं, आणि मनात यायचं की मनात आणलं तर स्वैर उधळू शकणारा हा घोडा ती झापडं कशी काय बांधून घेत असेल? … सहन करत असेल? मुळात त्यालाही चौफेर बघण्याचा जन्मजात हक्क असतांना, का झापडं लावून त्याची नजर अशी ‘बंदिस्त’ करून टाकत असतील…‘त्याने फक्त समोरचा…त्या झापडांमधून दिसेल तेवढाच रस्ता पहावा…उधळू नये म्हणून…’ हे त्या प्रश्नाचं उत्तर असायचं.

हळूहळू अतिशय सोयीची वाटणारी इतर अनेक वाहने आली, आणि टांगे कालबाह्य झाले. आम्हीही रिक्षा वापरायला लागलो… गाड्या वापरायला लागलो… टांगे विसरलो… पण कुठे एखादा घोडा दिसला की त्याच्या डोळ्यांना झापडं आहेत का हे बघण्याचं खूळ मात्र डोक्यातून गेलं नाही.

… काल असाच एक उगीचच इकडेतिकडे फिरणारा घोडा पाहिला. अगदीच हडकुळा-निकामी झाल्यामुळे मालकाने सोडून दिला असावा…झापडं अर्थातच नव्हती. शांतपणाने फक्त खाद्य शोधत फिरत होता…का कोण जाणे.. पण त्याच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद.. ’आता मी मला हवं तसं वागायला मुक्त आहे’ असे काहीसे भाव दिसताहेत असं मला नक्कीच वाटून गेलं.

…. या असल्या विचारांनी भरकटणारं मन कसंतरी आवरलं खरं…पण ‘झापडं’ काही विसरता येईनात… बरंय ना माणसांना अशी झापडं लावून फिरावं लागत नाही हा विचार मनात आला आणि मन परत भरकटायला लागलं… मनात विचारांची भिरभिर सुरू झाली… बघता बघता ती वाढतच गेली… खरंच का माणसांना झापडं नाहीत…? डोळ्यांना तरी लावलेली नसतात. पण त्यांच्या मनाला…? विचारांना…? आणि दिसायला लागली.. झापडं लावून फिरणारी असंख्य माणसं… खरं तर बहुतेक सगळीच.

अमुक एक गोष्ट अशीच करायची…तशी अजिबात नाही…हे आई-बाबांनी लहानपणीच आपल्या बुध्दीला आणि विचारांना लावलेलं पहिलं झापड… तेव्हा त्या वयांत म्हणजे ‘विचार’ या शब्दाचा अर्थ न कळण्याच्या वयात ती झापडं गरजेची असतात हे खरं… पण स्वत:च्याही नकळत ती इतकी सवयीची होऊ लागतात की तो स्वत:चा एक अंगभूत भाग झाला आहे, हे पुढे कधीही लक्षातच येत नाही… वयाबरोबर मग ही झापडं आहेत हेही जाणवेनासं होतं… त्यांची संख्या झपाट्याने वाढत रहाते… आणि गंमत म्हणजे ही गोष्टही अजिबात लक्षात येत नाही.

खरं तर मन…विचार म्हणजे उधाणवारा…निर्बंध असा एक प्रवासी…बऱ्याचदा दिशा चुकून भरकटणारा. त्याला जागेवर आणणाऱ्या विचारांची झापडंच आवश्यक ठरतात मग. पण माणसाचं वय वाढतं तसतसा तो या झापडांच्या ‘साथीने’ ग्रासला जातो… एखाद्या चिवट आजारासारखा… बऱ्याचदा कायमचा…म्हणजे झापडांशिवाय जगूच शकत नाही मग तो.

लहानपणीचा निरागस-निष्पापपणा बघता बघता हरवतो, तसतशी झापडांची संख्या दिवसागणिक वाढत जाते. पहिलं झापड लागतं ते ‘मी’चं… मी… माझं… माझ्यापुरतं… या विचारांच्या घट्ट पट्ट्यांनी आवळून बांधलेलं. आणि अर्थातच् हे असतं स्वार्थाचं झापड. ‘इतरांशी मला काय देणं-घेणं आहे’ हा विचार नकळत रस्ता दाखवायला लागतो. तेवढाच त्या झापडातून दिसतो. आणि मग त्या रत्यावरून अशी झापडं जणू पडू नयेत म्हणून घट्ट सांभाळत वेगाने उधळल्यासारखं जातांना स्वत:च्या आयुष्याची दिशा कधी…कशी बदलते हे कधीच कळत नाही. मग ‘मी’ पाठोपाठ ओघानेच येतात इतर कितीतरी झापडं… मी… माझी बायको… माझी मुलं… माझं घर… माझी नोकरी… माझं सुख… माझं स्वास्थ्य! इतरांपेक्षा मी मोठा… श्रीमंत… सर्वतोपरी वरचढ कसा होईन या स्वार्थी विचाराचं झापड तर फारच जड. या अशा झापडांना मग स्वतःच्याही नकळत ‘अहंभाव‘ जोपासणारे.. गोंजारणारे विचार एखाद्या अस्तरासारखे कायमचे चिकटतात. एकदा विचार या असल्या झापडात घट्ट बांधले गेले की नजरही आंधळी होते बहुधा… पाय नेतील त्या वाटेने आपण भरकटल्यासारखे चाललोय् हेही लक्षात येत नाही… मग मनाला…विचारांना सद्सद् विवेकबुध्दीचा लगाम घालता येणं ही गोष्ट तर अशक्यच होऊन जाते. आजूबाजूचं काहीच दिसेनासं होतं… मग रस्ता चुकतोय का ही शंकाही येईनाशी होते.

काय होतं की अशी झापडं इतकी नकळत आपणहून आपण लावून घेतो की आपण झापडं लावली आहेत हेच मुळात लक्षात येत नाही.. रहात नाही. कारण आपण नेमके कसे आहोत याचा विचारच आपण कधी करत नाही. मग लावलेली झापडं आपल्याला सूट होताहेत की नाही, त्याचा आपल्याला मानसिक काही त्रास होतो आहे का? – की केवळ दुसऱ्या कुणीतरी ती तशी लावली आहेत म्हणून निष्फळ स्पर्धेच्या हेतूने आपणही ती लावतो आहोत? — असले विचार करण्याची गरजच जाणवत नाही. मग त्या बाबतीत ‘ अंगापेक्षा बोंगा जड ‘ असं तर होत नाहीये ना हा विचार मनात येतच नाही.

एक वेळ असं मान्य केलं की, झापडं लावणं ही गोष्ट काही काळासाठी अनिवार्य असू शकते, तरी एरवी आपली जन्मजात कुवत काय.. आवाका किती.. वजन पेलण्याची आपली ताकद किती.. या गोष्टींचा निदान स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करणं अत्यावश्यक आहे ना! तो न करता निव्वळ इतरांशी बरोबरी करणं.. अनावश्यक स्पर्धा करणं.. केवळ यासाठीच स्वतःला न पेलणारी झापडं लावायची का? जी माणसं आयुष्यात अपयशी झालेली दिसतात ना त्यांच्या अपयशाचं कारण बहुतेक वेळा त्यांनी स्वतःला न पेलणारी झापडं लावलेली असतात हेच असतं आणि त्यात चूक झापडांची नसते.. एकतर घोडदौड करण्यासाठी त्या माणसांनी चुकीचा रस्ता निवडलेला असतो.. आणि इप्सित साध्य करण्यासाठी भार पेलण्याच्या स्वतःच्या कुवतीपेक्षा जास्त वजनाची झापडं स्वतःच बांधून घेतलेली असतात. मग रस्ता कितीही चांगला असला तरी ठेचकळायला.. धडपडायला होणारच.. पळण्याचा वेग कमी होणार.. मग उद्दिष्ट गाठणार कधी आणि कसं??

ही आंधळी वाटचाल इप्सित ठिकाणी पोहोचली तर नशीबच म्हणायचं… पण दुर्दैवाने मध्येच ती वाट चुकली…भरकटली तर? …तर काय…हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणं…अशीच अवस्था होते… मग त्यावेळी दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न पडतो… झापडांना दोष देता येतो सहजपणे… पण त्यांची काय चूक असते? ती चूक झापडं स्वत:साठी निवडणाऱ्यांची… स्वत:च्या हातांनी डोळ्याला बांधणाऱ्यांची असते… झापडं तर बिचारी निर्जीव… स्वत:चं काहीच म्हणणं नसणारी. आपण कुणाला कुठे कधी कसं बांधून घ्यायचं याचं स्वातंत्र्य तर नसतंच त्यांना… पण रस्ता चुकला तर खापर मात्र स्वतःच्याही नकळत झापडांवरच फोडलं जातं…ती बांधणाऱ्यावर नाही…आणि हा तर सरासर अन्याय आहे…

काही झापडांबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमीच… असंच हे एक मनातलं पण मनालाच कधी जाणवत नाही असं झापड.. श्रद्धेचं.. जणू वंशपरंपरागत मिळालेलं.. इतकं घट्ट चिकटलेलं की जणू अंगाचाच एक भाग असावा. अर्थात हे झापड नसावंच असं अजिबात नाही…असहाय्यतेनं कोलमडू पाहणारं मन या झापडाने सावरू पहातं.. सावरतंही बरेचदा. मनाला नकळत आधार देणारंच असतं ते. पण अनेकांच्या बाबतीत बरेचदा असं दिसतं की त्याने नजरेबरोबर विचारांनाही पूर्ण झाकोळून टाकलेलं असतं.. बऱ्याच श्रद्धा कशा असतात.. तर खूप जुन्या गोष्टी आपण वर्षानुवर्षे अगदी जपून ठेवतो तशाच … पण अशा वस्तू आपल्याही नकळत कालबाह्य झालेल्या आपल्या लक्षातही येत नाही.. म्हणजे खरं तर तसा विचारच आपण कधी करत नाही. आणि अशी झापडं कितीही त्रासदायक वाटली तरी आपण कशीतरी.. वेळी उरस्फोड करूनही पेलत रहातो. ‘ बापरे हे इतर लोक अमुक तमुक गोष्ट करताहेत.. मग मीही तसंच करायला हवं ‘ या असल्या विचाराची भीती श्रद्धेच्या झापडाला मग इतकी घट्ट चिकटते की दृष्टीबरोबर विचारही फक्त अधू नाहीत तर पार आंधळे कधी होतात ते स्वतःलाच समजत नाही. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येकाची कुठेतरी.. कशावर तरी श्रद्धा असणं स्वतःला सावरण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे.. तरी पण बदलत्या काळाबरोबर चालतांना एखाद्या सायकलसारखं त्यांचंही Overhauling आपणच निदान आपल्यापुरतं तरी नक्कीच करायला हवं.. झापड श्रद्धेचंच पण.. त्यातले जुने कालबाह्य झालेले पार्टस काढून कालानुरूप नवे बसवायलाच हवेत असं मला ठामपणे वाटतं…. अर्थात हे माझं व्यक्तिशः मत झालं.

… या असल्या विचारात चालतांना मी मात्र रस्ता विसरले… चुकले, आणि घरी पोहोचण्याऐवजी, जिथून निघाले होते तिथेच परत जाऊन थांबले… केवळ उगीचच इकडेतिकडे पाहिल्यामुळे लक्ष विचलित होऊन चुकीच्या रस्त्यावर जाऊ नये याच एकमेव हेतूने घोड्याला जी फक्त त्या प्रवासापुरती हलकीशी झापडं लावलेली असायची.. निदान तशी तरी मला.. माझ्या भरकटणाऱ्या विचारांना.. आणि माझ्या सतत चंचलपणे मुक्त बागडणाऱ्या मनालाही लावायला हवीत का बहुतेक आता? … असो.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मला अन्यायकारक वाटणारी अकोल्याला झालेली माझी बदली काय किंवा डी. जी. एम्. साहेबांचा सातत्याने सुरू असलेला नकारात्मक अॅप्रोच काय या दोन्ही गोष्टी त्या त्या वेळी मला कितीही त्रासदायक वाटलेल्या असल्या तरी माझ्या भविष्यकालीन स्वास्थ्य न् सुरक्षेसाठी ‘त्या’नेच निर्माण केलेलं असावं असं ते एक सुरक्षाकवच ठरलं होतं!

 त्या सगळ्याच

घटना-प्रसंगांचा मी घेतलेला मागोवा दिलासा देणारा ‘त्या’चाच हळूवार स्पर्श असावा तसा मला पुढील वाटचालीत सोबत करणाराच ठरणार होता! )

फक्त त्या क्षणी याबाबतीत मी मात्र अनभिज्ञच होतो एवढंच! पण त्याची प्रचीति मात्र मला पुढील चार-पाच महिन्यांच्या माझ्या पुण्यातील अत्यल्प वास्तव्यात लगेचच आली!

माझ्या बँकिंग

करिअरमधल्या तोवरच्या साधारण ३० वर्षांच्या प्रवासातला तो अल्पकाळ त्या प्रवासातली माझी अखेरची पाऊलवाट ठरणार आहे आणि ती मला आयुष्यातल्या एका अनोख्या वळणावर घेऊन जाणार आहे याची मात्र मला कल्पना नव्हती. पुण्यातला तो चार-पाच महिन्यांचा माझा कार्यकाळ अतिशय अकल्पित, अघटित आणि सुखद अशा असंख्य घटनांनी भरलेला आहे. त्यातील कांही घटना तर मी कधीच विसरू शकणार नाही.

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या भल्याबुऱ्या सर्वच घटना आपल्याला बरंच कांही शिकवून जातात. मला त्या घटनांमधे लपलेला कार्यकारणभावही तेवढाच महत्त्वाचा वाटतो. तो माझ्या विचारांना योग्य दिशा देतो. कांही घटना जितक्या अकल्पित तितक्याच आश्चर्यकारकही असतात. त्या अनुभवत असताना वरवर सहज योगायोग असावा तशा वाटल्या तरी त्यातली बऱ्याच घटना योगायोगाने घडलेल्या नसून ‘त्या’नेच घडवलेल्या आहेत असं वाटावं इतक्या त्या अतर्क्य आणि अकल्पित अशाच होत्या. ही घटनाही तशीच. ‘प्लॅनिंग अॅन्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट’चा चार्ज घेऊन मला चार-पाच दिवसच झाले असतील फार तर. रोजचं रुटीन नेहमीप्रमाणे सुरू असतानाच एक दिवस ऑफिसमधील शिपाई घाईघाईने माझ्या केबिनमधे आला. टायपिस्टने टाईप करून दिलेलं एक पत्र माझ्याकडे दिलं आणि..

“तुमची सही पायजेलाय. एकदम अर्जंट हाय. मोठ्ठं सायब आत डीजीएम् साहेबांच्या केबिनमंदी बसल्यात. त्येनला द्याय हवं लगीच… “… म्हणाला.

मी ते पत्र हातात घेऊन वाचणार एवढ्यांत डी. जी. एम्. साहेबांच्या केबिनमधली बेल वाजल्याचं ऐकताच शिपाई ‘आलोच.. ‘ म्हणत बाहेर धावला.

‘मोठ्ठे साहेब आत डी. जी. एम्. साहेबांच्या केबिनमधे बसलेत’ असं शिपाई म्हणाला होता त्यामुळे ‘कोण साहेब? ‘ ही उत्सुकता मनात होतीच. हातातलं पत्र वाचायला सुरुवात करताच ते पत्र आमच्या पूर्वीच्या डी. जी. एम्. साहेबांना ऍड्रेस केलेलं असल्याचं लक्षात आलं आणि मी क्षणभर स्तब्ध झालो. त्यांची अतिशय विचित्र परिस्थितीत अचानक अहमदाबादला ट्रान्सफर झाल्यावर क्षणभराचीही उसंत न घेता त्यांना लगोलग इथून निघावं लागलं होतं. त्यामुळे बदलीनंतरच्या सगळ्याच फॉरमॅलिटीज तेव्हा पूर्ण करणं त्यांना शक्य झालं नव्हतं. त्यांच्या इथल्या पोस्टिंगवेळी त्यांना बँकेतर्फे मिळालेल्या वेल फर्निश्ड बंगल्याचा ताबा बंगला रिकामा करून बँकेकडे सुपूर्त करण्यासाठीच केवळ आज ते गडबडीने इकडे आलेले होते. ‘स्टाफ ॲमिनिटीज्’ हा माझ्या अखत्यारीतील विषय असल्याने ‘सदर बंगल्याचा सर्व फर्निचरसह व्यवस्थित ताबा बॅंकेला मिळाल्याचे’ ते पोचपत्र होते आणि त्यावर माझी सही अपेक्षित होती. माझ्या डिपार्टमेंट मधील सुपरिंटेडेंटने सदर बंगला सर्व फर्निचरसह सुस्थितीत परत मिळाल्याची खात्री करून, याचे ऑथेंटीकेशन म्हणून सदर पत्रावर एक सही केलेली होतीच. तरीही इंटरकॉम वरून त्याच्याशी बोलून मी खात्री करून घेतली आणि माझी सही केली. शिपाई बाहेर गेल्यापासून माझी सही होईपर्यंत मधे फारतर पाच मिनिटही झाली नसतील.. तेवढ्यात.. ” मे आय् कमी इन? .. ” म्हणत कुणीतरी माझ्या केबिनचं दार ढकलून उभं असल्याचं मला जाणवलं.. मी वर पाहिलं.. तर.. ते आमचे पूर्वीचे डी. जी. साहेब होते!! मी एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा उठून उभा राहिलो. त्यांना विश केलं. मला काय बोलावं सुचेचना..

“मै थोडा जल्दीमे हूॅं. रेसिडन्स सरेंडरका वो लेटर मुझे चाहिए था… वुईल यू प्लीज… “

माझ्यासमोरचं ते पत्र एका एन्वलपमधे ठेवत मी स्वत: तत्परतेने पुढे झालो आणि ते त्यांच्या हातात दिलं.

“थँक्यू मिस्टर लिमये… ” ते म्हणाले. मला काय बोलावं सुचेचना. त्यांच्या हा सौम्य स्वर आणि चेहऱ्यावरची अदब मी प्रथमच अनुभवत होतो. हे सत्य की स्वप्न मला कळेना.

“इट्स माय प्लेझर सर.. ” माझ्याही नकळत मी अगदी मनापासून बोललो आणि माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखं करत

ते… ” गाॅड ब्लेस यू… ” म्हणाले आणि घाईघाईने निघून गेले….!

मी क्षणभर खिळून गेल्यासारखा तिथंच उभा होतो. त्यांच्यासारख्या माणसाकडून आपुलकीचे हे शब्द…. माझा विश्वासच बसेना….!

माझ्या सहीचं एक साधं औपचारिक पत्र ते! शिपाई मघाशी एक मिनिट थांबला असता तर तोच ते पत्र घेऊन गेला असता. त्यांना ते परस्पर नेऊनही दिलं असतंन् आणि आमची समक्ष भेट झालीच नसती. मला त्याचं फारसं वैषम्यही नसतं वाटलं. पण तसं व्हायचं नव्हतं. मी त्यांच्या केबिनचं दार ढकलून ‘मे आय कम इन सर.. ‘ म्हणत अदबीने त्यांच्या दारात उभं रहाण्याचे प्रसंग अनेकदा आले होते आणि प्रत्येकवेळी मला ते फार मोठं संकटच वाटले होते.. त्या प्रत्येक प्रसंगी त्यांनी माझं कपाळावर आठ्या घालतच माझं स्वागत केलेलं होतं. मलाच नव्हे तर सर्वांनाच त्यांनी अत्यंत अपमानास्पद पद्धतीने झिडकारलेलं होतं. प्रत्येक भेटीत सतत दमदाटी करत पाणउतारा केलेला होता. तीच व्यक्ती आज माझ्या केबिनचं दार ढकलत आत येण्यासाठी माझी परवानगी विचारून क्षणभर घुटमळत तिथंच उभी राहिली होती! त्याक्षणीची माझी प्रतिक्रिया आणि कृती दोन्ही माझी कसोटी पहाणारंच होतं. पण तेवढा विचार करण्याइतकं मन भानावर नव्हतंच. अगदी अंत:प्रेरणेने घडाव्यात तशा प्रतिक्षिप्त क्रियांसारखं माझ्याकडून माझ्यातली अदब, चांगुलपणा आणि माणुसकी माझ्या नकळतच जपत त्यांचा मान राखला गेला होता! त्यांच्याकडून व्यक्त झालेली ‘गाॅड ब्लेस यू.. ‘ ही सद्भावना ही त्याचीच तर पोच होती! ते निघून गेल्यानंतर मात्र त्यांच्या संदर्भातल्या कितीतरी कडवट आठवणी माझ्या मनात ढवळून निघाल्या होत्या. त्यांच्या चालण्या.. वागण्या-बोलण्यातला पूर्वीचा गर्व आणि रुबाब निघून गेलेलं त्यांचं आजचं रूप आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं उसनं, कृत्रिम वाटावं असं स्मितहास्य मला अतिशय केविलवाणंच वाटत राहिलं होतं!

त्यामुळंच असेल त्यांची आजची ही अनपेक्षित भेट वरवर मला काव्यगत न्याय देणारी असल्यासारखी भासली तरी माझ्यासाठी त्याक्षणी मात्र ती फारशी आनंददायी नव्हती. सगळे दिवस सारखे नसतात हे आपल्या सर्वांच्याच बाबतीतलं सत्य त्यांच्या बाबतीत मात्र अतिशय बोचरेपणानं सत्यात उतरलेलं असल्याची माझ्या मनातली त्याक्षणीची भावना पुढं कितीतरी दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिलेली होती!!

माझ्या पुण्यातल्या त्या अल्पकाळातील असंख्य आठवणींपैकी ही आठवण जशी मनात घर करून राहिलीय तशाच इतरही अनेक आठवणी मला नेमक्या वास्तवाचं भान देत माझ्या विचारांना नेमकी दिशा देणाऱ्या ठरलेल्या आहेत..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘सीमोल्लंघन आणि सीमावरोधन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘सीमोल्लंघन आणि सीमावरोधन’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कोणे एके काळी आपल्या देशात ‘कालो वर्षति पर्जन्यः, पृथिवि सस्यशालिनि, देशोयं क्षोभरहितो, ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः’ अशी अवस्था होती. जो तो सुखी समाधानी, चारित्र्यवान, शीलवान, मर्यादाशील, विनयशील, धनवान, गुणवान, निरोगी व दीर्घायुषी होता. सर्वांचे वर्तन शास्त्राला धरून असे. कोणी शास्त्रमर्यादांचे उल्लंघन करण्यास धजावत नसे. कुणी केलेच तर तो स्वतःच त्याचे प्रायःचित्त घेई.

त्याकाळी निसर्ग समृद्ध होता. वृक्षराजी फळाफुलांनी सदा बहरलेली असे. वन्यजीवन पशु, पक्षी, कीटकांनी गजबजलेले होते. अरण्यपशूंना क्षुधाशांतीसाठी, मृगयेसाठी कधीही नगरात प्रवेश करण्याची आवश्यकता पडत नसे. नागरीकांनी कधीही विनाकारण अरण्यप्रदेश आक्रमिले नाहीत. जो तो आपापल्या मर्यादांचे कधीच उल्लंघन करीत नसे. जगा आणि जगू द्या या सूत्राप्रमाणे माणसाचे वर्तन असे.

राजे प्रजाहितक्ष होते. ते प्रजेला अपत्यवत वागवीत. त्यांच्या संरक्षणाचे, शिक्षण, व्यवसायाचे दायित्व राजा व त्याचे प्रशासन स्वतः स्वीकारीत. प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे शिक्षणाचा अधिकार होता. शिक्षण अद्ययावत असे. देशभर शिक्षणक्रम आणि गुरुकुलपद्धती समान होती.

विद्वानांना राजाश्रय व जनाश्रय होता. त्यांचा मान राखला जात असे. ऋषिमुनी वैज्ञानिक होते. त्यांचे विज्ञान पर्वावरणाला पूरक असून ते विकसित होते. धातू, खनिजे, कायचिकित्सा, शल्यचिकित्सा, गणित, ज्योतिष, भूमिति, त्रिकोणमिति, रसायनविद्या, वास्तुशास्त्र, साहित्य, संगीत, कला पूर्ण विकसित होत्या. या कलाशास्त्रांना समाजात मान होता. समाज सुशिक्षित व विज्ञाननिष्ठ होता. भौतिक सधनता व समृद्धी होती. समाजात अंधश्रद्ध नव्हत्या. करप्रणाली होती पण सुसह्य होती.

निसर्ग शुद्ध होता. औषधी आपल्या गुणांनी परिपूर्ण होत्या. पुष्ट गोधन होते. दूधदुभत्याची रेलचेल होती. राजकोष रत्ने, शस्त्रे, अस्त्रे, वाहने, धनधान्य, चंदनादि सुगंधी द्रव्ये, मध, लवणे, औषधी, विविध वस्त्रे, मृगजिने सुवर्णादि अलंकारांनी ओसंडून वहात होते. सर्वसामान्य नागरिकही सुवर्णलंकार घालून निर्भयपणे मिरवीत असत.

स्त्रिपुरुष सभ्य होते. स्त्रियांना समाजात व परिवारात मानाने वागवले जात असे. सर्व व्यवहारात स्त्रियांचा सहभाग असे. जीवनक्रम चार आश्रमात विभागलेला असे. लोक त्याचे काटेकोर पालन करीत. युवासंघ बलशाली व सभ्य होते. वृद्धांचा आदर केला जाई. वृद्ध, जेष्ठ व्यक्ती घरचे भूषण असे. त्यांची कधीच उपेक्षा होत नसे. भ्रष्टाचाराला स्थान नव्हते.

व्यापारी आपापला उद्यम प्रामाणिकपणे करीत. जगभर त्यांचा लौकिक होता. भूमी व जलमार्गाने त्यांच्या वस्तूंचे जगभर वितरण होई. थोडक्यात ह्या आपल्या भारत देशात सर्वत्र सुजलां सुफलाम् होते! कोणीही दैनंदिन जीवनात आपापल्या मर्यादा कधीही ओलांडित नसत. कोणतेही सीमोल्लंघन सहसा निषिद्ध होते!

वरील वर्णन कपोलकल्पित नाही. कोणे एके काळी भारतीय जीवन असे होते याची अनेक प्रमाणे वाङमयात उपलब्ध आहेत. या समृद्धीशांतीचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मर्यादांचे काटेकोर, कठोर पालन.

पण ही कोणे एकेकाळची गोष्ट झाली. पुढे पुढे त्यात परिवर्तन होत गेले. सतत होणारी परकीय आक्रमणे हे त्याचे प्रधान कारण. ही आक्रमणे अतिशय प्रखर व पाशवी होती. आक्रमणे करणारे हिंस्र, अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, जीवनमूल्यहीन, रानटी होते. त्यांनी अनन्वित अत्याचार केले. ही आक्रमणे देशावर होती, देशातल्या नागरिकांवर, त्यांच्या संपत्तीवर, स्त्रियांवर, पशुधनावर तर होतीच पण इथल्या सुसंस्कृतीवर, ज्ञानावर, कलाकौशल्यांवर आणि धर्मावर होती. सहस्र वर्षांच्या या गदारोळात इथल्या सर्व व्यवस्था, परंपरा कोलमडून पडल्या. याचा परिणाम असा गंभीर झाला की इथला माणूस स्वतःचा सत्य परिचयही हरवून बसला!

इतरांप्रमाणे तो ही बदलला. सर्व मर्यादा उल्लंघू लागला. बघता बघता सर्वच अस्ताव्यस्त, अव्यवस्थित, अमर्याद आकारहीन झाले.

आता आम्हाला कोणतीही मर्यादा नकोशी झाली आहे. आम्हाला अनिर्बंध जीवन जगायचे आहे. आम्हाला आहार-विहार, भक्ष्य-अभक्ष्य, निद्रा-मैथुन, शिष्ट-अशिष्ट वर्तन, व्यवसाय, विवाह, यातले कोणतही संकेत पाळायचे नाहीत. साधे नागरी रहदारीचे नियम व बंधनेही नकोत. चौकाचौकात लावलेले हिरवे-तांबडे दिवे, झेब्रा क्राँसिंग, पादचरी मार्गांचे पट्टे आम्ही मानत नाही. कुठूनही, कसेही, केव्हाही आम्ही जाऊ, तुम्ही कोण आम्हाला आडवणारे? ही आमची वृत्ती. आम्ही रांगेत नाही उभे राहणार, आम्ही पुढे घुसणार. आम्ही पैसे देऊन कामे करवून घेणार. तुम्ही ज्याला भ्रष्टाचार म्हणता तो आमच्यासाठी शिष्टाचार आहे. अशी सर्वांची वागण्याची त-हा झालीय!

विज्ञान, तंत्रज्ञान याच्या मदतीला धाऊन आले आहे. जीवनाचा हेतू आणि जीवनमूल्ये हरवली आहेत. उपभोग वाढू लागले आहेत, अमर्याद झाले आहेत. अंधश्रद्धा वाढल्या आहेत. जातीपातीत आणि धर्माधर्मात समाज विभागला जाऊ लागला आहे. उपभोगांच्या तृप्तीसाठी आम्ही हाती जे लागेल, सापडेल ते लुटू लागलो आहोत. नैसर्गिक साधनसंपत्ती उधळू लागलो आहोत, ओरबाडू लागलो आहोत. स्वार्थापायी नाती विसरतो आहोत. स्त्री ही उपभोग्य वस्तू झालीय. आई, बहीण, पत्नी, काकू, सून, मुलगी ही नाती विसरत चाललो आहोत, आमची कर्तव्ये विसरत चाललो आहोत. आम्ही सर्व सीमांचे उल्लंघन करू लागलो आहोत. त्यासाठी कोणताही मार्ग आम्हाला वर्ज्य नाही. आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहोत.

ज्ञानसाधनेऐवजी भोगविलासामागे धावू लागलो आहोत. आम्हाला स्वैर, मुक्त, भोगी जीवनशैली हवी आहे. कामतृप्तीसाठी आम्हाला केवळ मादी हवी आहे, मग ती तीन वर्षांची बालिका असो वा सत्तर वर्षाची वृद्धा! आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीच नव्हे तर आता कुटुंबपध्दती उध्वस करीत आहोत. विवाहापेक्षा ‘लीव्ह इन रिलेशनपद्धती’ आम्हाला सोईची वाटू लागली आहे. शारीरिक श्रम टाळण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. बसल्याजागी हवंय सगळं आपल्याला.

या हव्यासापोटी आम्ही सर्व मर्यादा ओलांडत आहोत. पण लक्षात असू द्या अमर्याद उपभोग आम्हाला शीघ्रगतीने विनाशाकडे घेऊन जात आहे. आपण पकडलेली अमर्याद गती आपल्याला गर्तेत खेचत आहे.

आता तरी आपण आत्मचिंतन करायला हवे. कोरोनाने या गतीला रोखण्याचा प्रयत्न केला काहिसा. सात-आठ महिने आपण सारे स्थानबद्ध होऊन पडलो होतो. आपल्या स्वैराचाराला बंधने आली होती. सीमांचा अवरोध झाला होता काहीसा. या काळात प्रत्येकाचे काही आत्मचिंतन झाले आहे. त्यातून हे समजले आहे की काही तरी चुकले आहे, चुकत आहे.

मला वाटते, आता तरी आपण स्वतःला सावरायला हवे. काही मर्यादा पाळायला हव्यात. नीतिनियमांचे उल्लंघन टाळायला हवे. स्वतःपुरते न पाहता इतरांचाही विचार करायला हवा. भ्रष्टाचार संपवायला हवा. अंधश्रद्धा गाडायला हव्यात. माणूस म्हणून जगायलाच हवं. स्वतःवर काही बंधने घालून घ्यायलाच हवीत. आपण या विजयादशमीच्या निमित्ताने सीमोल्लंघन करण्याऐवजी सीमावरोध करायला हवा. आपणहून स्वतःभोवती काही सीमा आखायला हव्यात. दिशाहीन जीवनाला सावरायला हवे. देशाला, मानवतेला पुन्हा पूर्वीचे संपन्न, सुसंस्कृत, सभ्य, जीवन प्राप्त करून द्यायला हवे.

चला, या दसऱ्याच्या दिवशी आपण व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवर सीमोल्लंघन करण्याऐवजी सीमावरोधन करण्यासाठी वचनबद्ध होऊ या. मी सर्वांना असे विनम्र आवाहन करतो. द्याल मला साथ?

विजया दशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इंडियन नाव्हल एव्हिएशन म्युझियम… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ इंडियन  नाव्हल एव्हिएशन म्युझियम ☆ प्रा. भरत खैरकर 

दर दोन वर्षानंतर गोव्याला ह्या  ना त्या कारणाने जाणं होतं.. मात्र दरवर्षी तेच ते बीचेस आणि चर्चेस बघून बघून एक प्रकारचा रटाळपणा ह्या टूरला यायचा.. म्हणून वेगळ्या पद्धतीने काही बघता येतो कां? म्हणून ह्या वर्षी मुद्दामच मडगावच्या पुढील एरिया आपण एक्सप्लोर करूया म्हणून पणजी पासून साधारण 40-50 किलोमीटर पुढे गेल्यावर  काबो दी रामा फोर्ट, पेबल बीच, पोलोलीम बीच, बॉगमोला बीच, असे एकापेक्षा एक सरस स्थळं आम्हांला मिळाले.. त्यातीलच एक होतं ते “इंडियन नाव्हल एव्हिएशन म्युझियम”!!

हॉलीवुड, बॉलीवुड पिक्चर मधील फायटर एरोप्लेन, हेलिकॉप्टर्स आणि  त्यातील यंत्रणा इत्यादी जवळून बघायची असेल तर  वास्को मधील बागमालौ या ठिकाणी असलेल्या “इंडियन  नावल एव्हिएशन म्युझियम” या संग्रहालयाला नक्की भेट द्या..

गोव्याला गेल्यावर बहुतेक वेळा बीचेस आणि चर्चेस शिवाय खाणे पिणे ह्या पलीकडे आपण अजून काही एन्जॉय करतो असं  वाटत नाही.. पण पणजी पासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वास्को मध्ये आशियातील सर्वात मोठे आणि एकमेव असे  नावल एव्हिएशन म्युझियम आहे. हे संपूर्ण  कुटुंबासह नातेवाईकांसह मित्रांसह बघण्याचे एक अप्रतिम  ठिकाण आहे.

ह्या संग्रहालयाचे उद्घाटन १९९८ साली करण्यात आले. इथे आपण भारतीय नौसेनेतून डीकमिशन्ड  झालेले म्हणजेच एक प्रकारे रिटायर्ड झालेले.. फायटरप्लेन, एरोप्लेन, हेलिकॉप्टर्स मोठ्या प्रमाणात बघू शकतो..

या संग्रहालयाचे दोन भाग आहेत एक आउटडोर आणि दुसरा इंडोअर ! बाहेरच्या मैदानी भागामध्ये खूप  एरोप्लेन, फायटरप्लेन, हेलिकॉप्टर्स, इंजिन्स, इत्यादी ठेवलेले आहेत. ‌

त्यामध्ये प्रामुख्याने सुपर कॉन्स्टेलेशन विमान!  प्रवासी विमान आपण बघू शकतो.. १९५१ ते १९६१ या कालावधीमध्ये ह्या विमानाने कमर्शियल फ्लाईट म्हणून सेवा दिलेली होती होती.. साधारण १३ ते १४ विमाने तसेच तेवढीच हेलिकॉप्टर्स या ठिकाणी आहेत.. त्यात प्रामुख्याने आय एन 083, डोव्ह, सीकिंग एम के 42, शी हॅरीअर, व्हॅम्पायर, आयएस ल्यांडर, किरण, फायरफ्लाय, कमोव 25, बी एक्स748, के ए25, हगेस, इत्यादी हेलिकॉप्टर्स, विमानासह त्या ठिकाणी विविध इंजिन्स, टोर्पिडोज, रडार, मिसाईल, बाॅम्बज, जे फायटर विमानातून किंवा पाणबुडी वरून लॉन्च केले जातात ते आपण बघू शकतो. “इंजिन बे”  नावाने असलेल्या  विभागामध्ये विविध प्रकारचे इंजिन्स  ठेवलेले आहेत. त्यामध्ये रोल्स रॉयल कंपनीने बनवलेल्या भव्य  इंजिनांचा समावेश  आहे. विमानाचे इंजिन किती किचकट असते हे जवळून बघण्याची ही खूप मोठी संधी आहे कारण इथे इंजिनाचे ‘क्रॉस सेक्शन’ ठेवलेले आहेत.

बाहेर मैदानात असलेला प्रदर्शनी भाग बघितल्यावर  इंनडोअर  प्रदर्शनासाठी आपल्याला दोन मजली इमारतीत जायचे असते.. इंट्री सुद्धा आपण सबमरीनमध्ये.. पाणबुडी मध्ये प्रवेश करावा.. तशी आहे! खूप कल्पकतेने हे म्युझियम तयार केले आहे.. ह्या ठिकाणी आल्यावर आपण विविध नौदलाच्या सैनिकांचे, माॅरकोसचे पोशाख.. त्यांची आयुधे.. वापरात येणारे इन्स्ट्रुमेंट.. इत्यादी अगदी जवळून बघू शकतो.. ह्या ठिकाणी एक ‘ व्हर्च्युअल रियालिटी कॉर्नर’ आहे, तिथे आपण पाचशे रुपये एक्स्ट्रा देऊन दहा मिनिटांसाठी पाणबुडीच्या आतील अनुभव वर्चुअली घेऊ शकतो.

१९४७ पासून इंडियन एव्हिएशनची सुरुवात  ते २०२३ पर्यंतचा सर्व इतिहास संग्रहालयात आपण बघू शकतो.. नौसेनेने गोवा मुक्ती संग्रामात बजावलेली महत्त्वाची भूमिकाही आपण या ठिकाणी इतिहास रूपात पाहू शकतो.. विविध ऍडमिरल्स आणि त्यांच्या काळात झालेल्या मोहिमा यांची माहिती चित्ररूपात  आणि काही फोटो टाईप वापरून या ठिकाणी  मांडण्यात आली आहे.       

‘श्रद्धांजली’ नावाचा  विभाग बघितल्यावर नौदलाने केलेल्या शौर्याची… पराक्रमाची.. दिलेल्या बलिदानाची.. आपल्याला ओळख होते. विविध लढाया, त्यांची माहिती, नौदलाने विविध चक्रीवादळांमध्ये.. नैसर्गिक आपत्तीमध्ये समुद्रात केलेल्या मोहिमा.. लोकांचे वाचविलेले जीव.. इत्यादी बघून पाहणारा चकित होतो.. ह्या ठिकाणी विराट, विक्रमादित्य आणि विक्रांत या विमानवाहू जहाजांच्या रिप्लीका म्हणजे  प्रोटोटाईप खूप सुंदर प्रकारे तयार करून ठेवलेल्या आहेत.. बाहेर निघण्याआधी सर्व प्रकारच्या विमानांचे छोटे छोटे प्रोटोटाईप व  माहिती बघण्याजोगी आहे. पूर्ण प्रदर्शन बघून झाल्यावर दहा मिनिटांचा “नौदल शो” व्हिडिओ रूपामध्ये आपण एका छोट्याशा  थिएटरमध्ये बघू शकतो.. हा शो बघणे म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय नौदल आणि त्यांचा आजवरचा इतिहास समजावून घेणे आहे.

ज्या पालकांना आपल्या मुलांनी देशाभिमानी व्हावं शिवाय सैन्यामध्ये भरती व्हावं असं वाटत असेल तर गोव्याला गेल्यावर नक्की ह्या संग्रहालयाला भेट द्यावी… अन्य लोकांनी आपले सैन्यदल किती मेहनत करून आपणां  सर्वांचे रक्षण करते हे बघणे गरजेचे आहे त्यासाठी गोव्यात  गेल्यावर एक दिवस काढून इथे नक्की भेट द्यावी असे वाटते..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares