मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ इतिहास बदलणारा उंदीर  — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

सर्वसाधारणपणे उंदीर हा पराकोटीची नासाडी करणारा अत्यंत उपद्रवी जीव समजला जातो. शास्त्रीय प्रयोगासाठी ते पांढरे उंदीर वापरताना आपण बघतो, ते वगळता उंदीर हा पाळीव प्राणी म्हणून कोणी वापरताना दिसत नाही. पण काही प्रशिक्षित उंदीर जीवितहानी टाळत आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यातील एकाला सुवर्ण पदक दिलं गेलं होतं याबद्दल वाचलं आहे का?

आपल्या बोलण्यात सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा हे शब्दप्रयोग येत असतात, पण भविष्यात त्यात उंदराचा वाटा अशी भर पडली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हे काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात एक चक्कर मारावी लागेल व त्याचा आज होणारा भीषण परिणाम जाणून घ्यावा लागेल.

व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेच्या विरोधात लढणारे शेकडो व्हिएतकाँगी म्हणजे व्हिएतनामचे स्वातंत्र्यसैनिक सीमा ओलांडून कंबोडियातील जंगलात लपून बसायचे. त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी विमानातून हजारो टन बॉम्ब तर टाकले गेलेच पण सोबत लाखो भू-सुरुंग पेरले गेले. वरून टाकलेल्या बॉम्बपैकी अनेक बॉम्ब चिखलात, शेतात रुतून बसल्याने फुटलेच नाहीत.  ते आजही तसेच जिवंत आहेत. तेच भू-सुरुंगांच्या बाबतीत. अमेरिकेने पेरलेल्या भू-सुरुंगातून आजही मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे पीक निघते आहे. दरवर्षी शेकडो नागरिक शेतात, जंगलात काम करताना, लहान मुले खेळताना अजाणतेपणी अश्या बॉम्ब/भू-सुरुंगावर वजन पडल्याने प्राणास मुकतात किंवा अपंग होतात. अशाप्रकारे अपंग झालेल्यांचा अधिकृत आकडा तब्बल ६४ हजारांचा आहे. लाखो चौरस किमी.मध्ये लपलेले हे पन्नास लाखांहून अधिक बॉम्ब/भू-सुरुंग शोधून काढणे म्हणजे गवताच्या गंजीत टाचणी शोधण्यागत आहे. शिवाय शोधताना अपघात होतात ते वेगळे. अपघात होऊ न देता काम करणे अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि खर्चिक काम. कंबोडिया हा देखील शेतीप्रधान देश. एखाद्या शेतात हे भू-सुरुंग न शोधता काम करायला जावं तर जिवाची जोखीम. म्हणजे गेली दशकानुदशके दररोज लाखो कंबोडियन नागरिक जीव मुठीत धरून कामावर जात आहेत. सगळ्याच बाजूने बिचाऱ्यांची कुचंबणा.

अशावेळी मदतीला आला एक उंदीर. तोच उंदीर जो एरवी शेतकऱ्यांचा मोठा शत्रू समजला जातो. त्याचं नाव – “मगावा”. हे त्याला लाडाने दिलेलं नाव. मगावाचा अर्थ “ध्यान केंद्रित असलेला”. तर हा मगावा मूळचा टांझानियातील “आफ्रिकन जायंट पोच्ड रॅट” प्रजातीचा उंदीर. हे उंदीर आकाराने सश्याइतपत मोठे असतात. अत्यंत तीव्र घाणेंद्रिय आणि मातीत कित्येक फूट खोल असलेल्या गोष्टीचा वास घेण्याची आश्चर्यकारक क्षमता असलेला हा मगावा कंबोडियन नागरिकांसाठी जणू देवदूत ठरला. जन्मानंतर पहिले दहा आठवडे त्याची व्यवस्थित वाढ झाल्यावर त्याला भू-सुरुंग बनवायला जी स्फोटकं किंवा मिश्रण वापरले जाते त्याचा गंध ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं. मोठमोठ्या लाकडी खोक्यात माती भरून त्यात ती मिश्रणे ठेवून त्याला तितका भाग ओळखण्याचे प्रशिक्षण दिले. बरोबर शोध घेण्याच्या बदल्यात त्याला अत्यंत चविष्ट फळे मिळत.

यासाठी मगावा आणि त्याच्यासारखे अजून काही उंदीर “ऑन फिल्ड” काम करत आहेत. वजनाने हलका असल्याने भू-सुरुंगावर त्याच्या वजनाचा काहीच परिणाम होत नाही. या उंदरांना एक छोटा बॉडी हार्नेस घालून त्यातून एक दोरी पास केली जाते व त्यांना एका सरळ रेषेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालवलं जातं. मगावा २०० चौरस मीटरचा परिसर अर्ध्यातासात बिनचूक पिंजून काढू शकत असे. हेच काम करायला माणसाला अत्यंत प्रगत माईन-डिटेक्टर्स घेऊनदेखील चार दिवस लागतात. जून २०२१ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आयुर्मानानुसार मगावा “म्हातारा” झाल्याने या कामातून त्याला निवृत्ती दिली। मात्र तोवर मगावाने १,७७,००० चौरस मीटरहून अधिक परिसर निर्धोक केला. त्याने ७१ भू-सुरुंग आणि डझनावारी इतर प्रकारची जिवंत स्फोटके शोधली होती. इतक्याश्या जीवासाठी हे काम खरोखर प्रचंड आहे. मगावाने एकही चूक न करता जो परिसर निर्धोक केला त्याची खात्री लोकांना पटविण्यासाठी मगावा ज्या भु-सुरुंग शोधणाऱ्या पथकासोबत काम करतो त्यांनी त्या जागी फुटबॉल मॅचेस खेळून दाखवल्या. ते बघून त्या परिसरातील नागरिक निश्चिंत झाले. मगावा हा कंबोडियन लोकांचा लाडका हिरो झाला.

त्याच्या याच कामाचे कौतुक म्हणून लंडनस्थित PDSA या संस्थेने सप्टेंबर २०२० मध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. PDSA ही संस्था १९१७ पासून माणसाला आपत्तीतून वाचविणाऱ्या प्राणी-पक्ष्यांचा ३ प्रकारची पदके देऊन सन्मान करते आहे. पैकी युद्धकाळात विशेष कामगिरी करणाऱ्या पशु-पक्ष्यांना डिकीन मेडल दिले जाते. हा पुरस्कार म्हणजे प्राण्यांचा “व्हिक्टोरिया क्रॉस” समजला जातो. याशिवाय शांतताकाळात विशेष काम करणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना सुवर्ण किंवा रौप्य पदक दिले जाते. आजवर PDSA ने कुत्रे, मांजरी, घोडे आणि कबुतरांचा सन्मान केला होता (यावर मी माझ्या “परिंदे” या ब्लॉग मध्ये मागेच लिहिलं होतं – http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2015/01/blog-post_21.html ). मगावा  हा असे पदक/पुरस्कार प्राप्त करणारा पहिला उंदीर. PDSA ने प्राण्यांसाठी ब्रिटनमध्ये ४२ दवाखाने उघडले असून तिथे प्राण्यांवर मोफत उपचार होतात.ज्यांना सन्मान प्राप्त झाला आहे त्या प्राण्यांची कृतज्ञता म्हणून खरोखर ते मरेपर्यंत बडदास्त ठेवली जाते. जानेवारी २०२२ मध्ये मगावाने अखेरचा श्वास घेतला तोवर त्याचीही अशीच काळजी घेतली गेली.

तर अशी आहे ही सामान्य लोकांच्या जीवनासोबत एका अर्थी इतिहासही बदलणाऱ्या एका छोट्याश्या “हिरोरॅट” मगावाची छोटीशी तरीही खूप मोठी गोष्ट. 

— श्री सौरभ वैशंपायन

संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆

हरिश्चंद्र देसाई यांच्या ‘झापडे’ येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा “शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग” असा थक्क करणारा प्रवास.

 एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडीचा निर्णय घेतो. खरं तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोपे मिळवतो..अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची, 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.

बरं, एवढं करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या  उत्पन्नाची वाट पहात कोकणी शेतक-यासारखा निवांत राहील ना! पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रूट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो. मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील “जॅकफ्रूटकिंग” म्हणून आपले आणि कोकणचे नाव जगाच्या नकाशावर आणतो.

बरं, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस – मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरणविषयक आरोग्यविषयक फायदे पटवून देतो. उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो. अशी हजारो रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.                                                          

आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली. तुम्ही म्हणाल, आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलंय, आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहिलं आहे ? —- पण, संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा—–

म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो. तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो. मशागत करतो. आपल्या 900 काजू झाडांच्यामधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन, असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास आपली खात्री पटवतो . 

शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेली ही वल्ली. हा एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही, पण यातून उत्पन्नही मिळवेन.

हा याचा आणखीन एक संकल्प..! ‘या झाडांवर (नैसर्गिक स्टीक’वर) मी काळीमिरीच्या (ब्लॅकपेपर) वेली सोडेन, मी येथे कृषी-पर्यटन सुरू करेन.’ हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दीला सलाम करणे एवढे एकच काम आपलं रहातं.

फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही, तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भूक भागवेल.. असा सिद्धांत मांडत, आपल्या बागेत  फणासापासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. फणसापासून बिर्याणी ते कबाब, पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहिती घेत रहातो…

“पुरूषाचे नशीब पाते-यात” अशी एक जुनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून/पाहून वाटते…. चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.

आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो. तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही, त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो… ही खतनिर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल. कारण हा शेतीमधला ‘एडिसन’ आहे.  

‘कल्पवृक्ष कन्येसाठी’च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत  सासुरवाडीकडून आणलेल्या फणसाच्या जातीपासून “देसाई कप्पा” नावाची फणसाची नवी जात विकसित करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो. 

समस्या, अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा, यावर मी ठाम आहे. अहो, माकडांचा बंदोबस्त असो, गवा – रेड्यांचा उच्छाद असो, या माणसाकडे जालीम (रामबाण नको, संवेदनशील आहे) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.

बरं, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप. हजारो मीटर विद्युतवहन विनाघट कसे करावे, हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..

एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पाने विकत घ्यायला लावणार आहे…. अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिश्चंद्र देसाई असा तुमच्या शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.

खरं सांगतो, एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती उभ्या आयुष्यात, @57 मी पाहिलेली नाही. या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य, उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्तहस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी इमान राखणारा हा “फणस-राजा” हरिश्चंद्र या वरदानास पात्र आहे. 

लेखक  – प्रदीप कोळेकर, संस्थापक – माय राजापूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-            

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 

कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत  म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.  धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली.  कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”  “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज  आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.                            

अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.                       

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,

 पेडगावचे शहाणे

 आणि                             

वेड पांघरून पेडगावला जाणे

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

 

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

 

माहिती संग्राहक : माधव केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

One liner Geeta.

हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे.

त्यावर एका काकांनी लिहिले आहे. पण नुसतीच टीका न करता त्यांनी एक सोल्युशनही देण्याचा प्रयत्न केला आहे.

फक्त हे सोल्युशनच पुरेसे नाही हे मला मान्य आहे. पण आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. गीता तत्वज्ञानाची तोंडओळख म्हणा ना.

☆ ☆ ☆ ☆ 

मला सांगा, दूरदर्शन मालिका सर्वसामान्य कुटुंबाकडून बघितल्या जातात. त्या मालिकेत गीतेचे नाव सुद्धा नसते . शाळेत गीता शिकवली जात नाही . कॉलेजात अर्थ समजावला जात नाही. खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही. 

तरुणपणी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी गीता अभ्यासणार नाही . वयाच्या ४०/५० व्या वर्षी भविष्याच्या तरतुदीमध्ये व्यस्त .

संपूर्ण आयुष्य असेच निघून जाते . 

वाचकहो, मी तुम्हाला कसे समजावून सांगू ? गीतेशिवाय पर्याय नाही. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहे .

आजच्या ४०  वय असलेल्या मुलाला/ मुलीला विचारा , त्याला गीतेतील एका तरी श्लोकाचा अर्थ माहित आहे का ?

मी तुम्हाला  १८ अध्यायांचे सार सांगणारी १८ वाक्ये देतो  – इंग्रजी मध्ये देतो – One liner Geeta. 

करताय त्याचा प्रसार ?

प्रत्येकानी ४  दिवसात त्याला

किमान १०० फॉरवर्ड करा .

सगळ्या महाराष्ट्रात काय पण सर्व भारतभर पसरवा.

☆ One liner Geeta. ☆

Chapter 1 – Wrong thinking is the only problem in life .

(चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे)

Chapter 2 – Right knowledge is the ultimate solution to all our problems .

(सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील अंतिम उपाय आहे)

Chapter 3 – Selflessness is the only way to progress and prosperity .

(निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे)

Chapter 4 – Every act can be an act of prayer .

(प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा)

Chapter 5 – Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity .

(आत्मगौरवामधील अहम् चा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा)

Chapter 6 – Connect to the higher consciousness daily.

(नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा)

Chapter 7 – Live what you learn .

(जे शिकाल त्याचे तसेच आचरण करा)

Chapter 8 – Never give up on yourself .

( स्वतः माघार घेऊन हार मानू नका)

Chapter 9 – Value your blessings .

(तुम्हाला लाभलेल्या आशिर्वादाची कदर करा)

Chapter 10 – See divinity all around .

(तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती घ्या)

Chapter 11 – Have enough surrender to see the truth as it is.

(सत्याच्या प्रचितीसाठी स्वतःला समर्पित करा)

Chapter 12 – Absorb your mind in the higher.

(उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा)

Chapter 13 – Detach from Maya and attach to divine .

(मायावी जालापासून दूर रहा आणि देवत्वाशी जवळीक साधा)

Chapter 14 – Live a life- style that matches your vision.

(तुमच्या विचारांशी जुळेल अशीच जीवनशैली आचरणात आणा)

Chapter 15 – Give priority to Divinity .

(देवत्वाला अग्रक्रम द्या)

Chapter 16 – Being good is a reward in itself .

(सृजनशीलता हे एक वरदान आहे)

Chapter 17 – Choosing the right over the pleasant is a sign of power .

(आनंदाचा हक्क हे एकप्रकारे शक्तीचे दर्शक आहे)

Chapter 18 – Let go, let us move to union with God .

(ईश्वराशी तद्रुप होण्यासाठी पुढाकार घ्या)

(Introspect on each one of this principle)

(वरील सर्व विचारांचा परिचय करून घ्या)

|| ॐ तत् सत् ||0

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  राम – चंद्र ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ राम – चंद्र ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

चैत्र महिन्यातील नवमी, प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले .. सूर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले, इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सूर्यानारायणाचे समाधान होईना , त्या वेळी सूर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात … इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या , पण “चंद्र ” मात्र दु:खी होता , सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना, त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना .. त्यांनी सूर्य नारायणाला खूप विनवण्या केल्या, पण सूर्य काही पुढे जाईना .. 

शेवटी चंद्राने राम प्रभूंना सांगितले की सूर्याला पुढे सरकायला सांगा पण सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात, माझे समाधान झाले की मी पुढे जाईन, असे म्हणू लागले ..

रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली, व म्हणाले आज पासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल , “राम – चंद्र” आणि माझ्या पुढल्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल …

राम- जन्म दुपारी झाला … आणि पुढल्या अवतारात “श्री कृष्ण ” जन्म मध्यरात्री झाला .. 

कृष्ण जन्म झाला तेव्हा फक्त तिघे जागे होते .. देवकी – वसुदेव आणि चंद्र …

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

(या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता ! ) इथून पुढे —-

केरोपंत यांनी इतर अनेक सुधारणाही सुचवल्या. त्यांतील शेवटची, झीटा अक्षराची सुधारणा वगळता बाकी सर्व पुढील काळात स्वीकारल्या गेल्या. पंचांग करणारे सर्वजण आधुनिक गणित शिकलेले नव्हते. त्यांना गणित आधुनिक प्रमाणे (मानके) वापरून करता यावे यासाठी केरोपंतांनी ‘ग्रहलाघवा’च्या धर्तीवर ‘ग्रहगणिताची कोष्टके’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे केरोपंतांचे शिष्य; त्याचप्रमाणे ते गणित, संस्कृत आणि पौर्वात्य विज्ञानाचे अभ्यासक व जाणकार. त्यांनी त्या सुधारणा पंचांगात झाल्याच पाहिजेत आणि ‘आमची पंचांगे फ्रेंच नाविक पंचांगांच्या तोडीची असलीच पाहिजेत’ असा आग्रह धरला व तशा  प्रेरणेने पंचांग सुधारणा घडवून आणल्या. त्या सुधारणा करणे हे सांगली येथे लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये झालेल्या परिषदेत सर्वमान्य झाले.

पुढील काळात पंचांग गणित हे आधुनिक साधने वापरून केले जाऊ लागले. गेली काही वर्षे तर संपूर्ण पंचांग हे संगणकाच्या मदतीने मांडले जाते. त्यासाठी लागणारे खगोलीय स्थिरांक आणि गणितीय पद्धती भारत सरकारतर्फे कोलकाता येथील ‘पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी’ ही संस्था प्रकाशित करते. त्यामुळे सर्व पंचांगांत एकवाक्यता आढळते. या सगळ्या सुधारणा पंचांगकर्ते हळुहळू स्वीकारू लागले आहेत आणि सर्व पंचांगे गणितीय व खगोलीय दृष्ट्या अचूक आहेत. लोकमान्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले आहे. त्या अर्थाने प्रसिद्ध होणारी सर्वच पंचांगे ही एका अर्थी ‘टिळक पंचांगे’ आहेत. पंचांगात दर्शवलेल्या तिथी, नक्षत्र, ग्रहांच्या स्थिती, गती; तसेच, सूर्य-चंद्र ग्रहणांच्या वेळा या वास्तविक असून त्यात कोणताही फरक राहिलेला नाही.

मग प्रश्न असा उरतो, की केरोपंत छत्रे यांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा अंमलात आल्या पण नक्षत्र चक्र आरंभ हा रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून करावा ही सूचना काही सर्वमान्य झाली नाही. लोकमान्य असतानादेखील त्या सूचनेस लोकांचा विरोध होता आणि तो पुढे तसाच राहिला. त्याचे कारण म्हणजे त्या सूचनेचा स्वीकार केला असता तर, ‘अधिक’ महिने मोजण्याच्या पद्धतीत फरक येईल आणि त्यामुळे लोक नवीन कोणत्याच सुधारणा पंचांगात स्वीकारणार नाहीत. त्यामुळे सर्वजण ती सूचना वगळून बाकी सुधारणा करण्यास तयार झाले. त्यांतील अग्रणी म्हणजे व्यंकटेश बापुजी केतकर.

व्यंकटेश बापुजी केतकर यांनी एक आकाशीय बिंदू कल्पिला. तो बिंदू जुन्या सूर्य सिद्धांत नक्षत्र चक्र आरंभाजवळ आहे. चित्रा नक्षत्रातील स्पायका ताऱ्यापासून 180 अंशांवर येतो. त्यामुळे त्या पद्धतीला चित्रा पक्ष असे म्हणतात. त्यामुळे व्यवहारात कोणताच नजरेत भरणारा फरक पडणार नव्हता, त्यामुळेच ती पद्धत सर्वांना मान्य झाली. पुढील काळात रेवती पक्ष आणि चित्रा पक्ष या दोन्ही पक्षांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर केले. त्यांचा मुख्य उद्देश पूर्वी झालेल्या वराहमिहीर, आर्यभट्ट; तसेच, इतर सिद्धांत ग्रंथकारांना कोणता नक्षत्र चक्र आरंभ अपेक्षित होता हे सांगणे. परंतु ते पुरावे नि:संदिग्ध नसल्याने कोणताच दावा पूर्णपणे मान्य होऊ शकला नाही. शेवटी, भारत सरकारने स्थापन केलेल्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीने चित्रा पक्षास मान्यता देऊन त्या वादावर पडदा टाकला.

असे असूनसुद्धा रेवती पक्षाचे अभिमानी त्यावर आधारित टिळक पंचांग वापरतात. त्या पंचांगानुसार ‘अधिक’ मास, ‘क्षय’ मास यात फरक पडतो आणि त्यामुळे सर्वच नाही पण काही वर्षांत टिळक पंचांगाच्या आणि चित्रा पक्ष पंचांगांच्या सणांच्या तारखांमध्ये फरक पडतो. तो फरक अधिक महिन्याच्या गणनेमुळे पडतो. त्यामुळे काही वर्षी (उदा. सन 2012) टिळक पंचांगानुसार गणपती ऑगस्ट मध्ये बसले आणि दाते पंचांगानुसार सप्टेंबरमध्ये ! तोच प्रकार दिवाळीच्या बाबतीत घडताना दिसतो. मग स्वाभाविक प्रश्‍न हा पडतो की नक्‍की खरे पंचांग कोणते, टिळक की दाते? वास्तविक, दोन्ही योग्यच. आपण मोजण्यास सुरुवात कोठून करतो यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे गणितीय दृष्टिकोनातून पाहता दोघांत फरक काही नाही. पण पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अशा विसंगती लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. तेव्हा वाद विसरून सर्वांनी एकच प्रमाण मानून धार्मिक आचरण करणे योग्य.

– समाप्त –

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  m.datar76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे…

महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. इतर सर्व पंचांगे एका माळेतील आहेत. ती पंचांगे त्या त्या व्यक्तीने व्यक्तिगत साहस वा उपक्रम म्हणून त्यांची प्रसिद्धी वेगवेगळ्या काळी सुरू केली. ती सर्व चित्रा पक्षीय पंचांगे आहेत. टिळक पंचांग हे एकमेव रेवती पक्षाचे पंचांग आहे. चित्रा पंचांग व रेवती पंचांग या संज्ञांची फोड लेखामध्ये पुढे येते. दाते हे प्रमुख पंचांग म्हणून चित्रा पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे पंचांग येथे नमुना म्हणून घेऊ आणि दाते व टिळक या पंचांगांत नेमका फरक काय व कशामुळे ते पाहू.

दाते आणि इतर चित्रा पक्षीय पंचांगे महाराष्ट्रात बहुतांश भागांत वापरली जातात, तर टिळक पंचांग हे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, आंजर्ले, कोळथरे, पंचनदी, दाभोळ या भागांत वापरले जाते. त्या गावांतील उत्सव टिळक पंचांगांप्रमाणे तिथीवार धरून साजरे केले जातात आणि तेथील ग्रामस्थ त्याचे कसोशीने पालन करतात. केळशी येथील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव असो किंवा कोळथरे येथील कोळेश्वरचा उत्सव असो, ते प्रसंग टिळक पंचांगातील तिथीनुसारच होत असतात.

दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत, महाराष्ट्रातील सर्व पंचांगे किंबहुना संपूर्ण भारतातील पंचांगे ही सोळाव्या शतकात रचलेल्या ‘ग्रहलाघव’ या ग्रंथानुसार तयार केली जात. तो ग्रंथ गणेश दैवज्ञ या मराठी माणसाने रचला होता ! त्यानुसार ग्रहगणित करणे तुलनेने सोपे असल्याने तो ग्रंथ पंचांग गणितकर्त्यांमध्ये लोकप्रिय होता. गणित आणि खगोलगणित यांत अनेक क्रांतिकारक शोध सोळाव्या शतकापासून युरोपात लागले. तसेच, आकाशाचे वेध घेण्यासाठी नवनवीन दुर्बिणी उपलब्ध झाल्या. त्यामुळे युरोपातील तज्ज्ञांचे आकाशाचे गणितीय वेध अचूक नोंदले जाऊ लागले; तसेच, अनेक खगोलीय घटनांची गणितीय सिद्धता देणे शक्‍य झाले. ते ज्ञान भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी अंमलाबरोबर आले. तोपर्यंत भारतात पंचांग गणित हे प्रामुख्याने गुरु-शिष्य परंपरेने शिकवले जात असे.

सिद्धांत हा एक ग्रंथ प्रकार आहे. त्यात खगोल शास्त्र, आकाश निरीक्षणे यासाठीचे गणित, सिद्धांत लिहिणाऱ्यांचे स्वत:चे निरीक्षण या गोष्टी असतात. हा खगोलशास्त्राचा सिद्धांत प्रस्थापित करणारा ग्रंथ म्हणता येईल. या ग्रंथावरून थेट पंचांग करणे कठीण असते. त्यासाठी अशा ग्रंथातील प्रस्थापित सिद्धांतावर आधारित करण ग्रंथ करण्यात येतो. करण ग्रंथ हा केवळ पंचांग करण्यासाठी उपयुक्त गणित, खगोल यावर आधारित कोष्टके असा असतो. त्यामुळे पंचांग करणे सोपे असते. ग्रहलाघव हा एक करण ग्रंथ आहे. तो सूर्य सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ग्रहलाघव वापरुन केलेली पंचांगे एका अर्थी सूर्य सिद्धांतावर आधारलेली होती असे म्हणता येते. असेच आर्यभटचा आर्यसिद्धांत, ब्रम्हगुप्तचा ब्रम्ह स्फुटसिद्धांत, वराह मिहीर याने उल्लेख केलेले प्राचीन पाच सिद्धांत असे अनेक सिद्धांत भारतात प्रसिद्ध होते.

प्रथमच, त्या पारंपरिक ज्ञानाची तुलना आधुनिक गणिताचा अभ्यास करून आलेल्या आणि नवीन साधने वापरून प्राप्त केलेल्या निरीक्षणांशी केली जाऊ लागली. पंचांग गणित पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही पद्धतींनी शिकलेले लोक तशी तुलना करू शकत होते. त्यात प्रामुख्याने दोन व्यक्ती होत्या त्या म्हणजे प्रा.केरोपंत छत्रे आणि पं. बापू देव शास्त्री. त्या दोघांनी स्वतंत्रपणे पारंपरिक पंचांग गणित पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आरंभले. सुरुवातीस, त्या दोघांना विरोध बराच सहन करावा लागला. पण तरुण उच्च शिक्षित जसजसे होऊ लागले तसतशा त्या सुधारणा स्वीकारल्या जाऊ लागल्या. त्या सुधारणा नेमक्‍या काय होत्या? 1. सौर वर्ष सूर्य सिद्धांतानुसार न घेता आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे घेणे (यात वास्तविक फार थोडा फरक आहे, याबद्दल सूर्य सिद्धांतकारांचे कौतुकच करण्यास हवे), 2. वसंत संपातास वार्षिक गती आहे, ती आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे 50.2 सेकंद अशी घेणे (ती सामान्यत: साठ सेकंद घेण्यात येत होती), 3. निरयन राशी चक्र आरंभ रेवती नक्षत्रातील झीटा या ग्रीक अक्षराने ओळखल्या जाणाऱ्या तारखेपासून करावा. या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता !

क्रमशः…  

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  m.datar76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अष्टपैलू आचार्य… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ अष्टपैलू आचार्य ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

एकोणीसावं शतक संपताना पुण्याजवळील सासवड येथील कोडित खुर्द गावात १३ आॅगस्ट १८९८ साली, एक ‘सरस्वती पुत्र’ जन्माला आला.. ज्यानं अवघ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.. त्यांचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे!

पाचवीत असतानाच, माझ्या वडिलांनी ‘मी कसा झालो’ हे अत्र्यांचं पुस्तक वाचायला हातात दिलं.. त्या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत कसे घडत गेले, ते लिहिलेलं आहे. शाळेत असतानाच ‘श्यामची आई’ हा चित्रपट पाहिला.. तो हृदयस्पर्शी चित्रपट पाहून, मन हेलावून गेलं. दहावीच्या दरम्यान मी वाचनालयातून ‘कऱ्हेचे पाणी’चे पाचही खंड आणून, वाचून काढले.. 

नाटक-चित्रपटांच्या जाहिराती करताना, आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी, मोरुची मावशी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, प्रितीसंगम, ब्रह्मचारी या नाटकांच्या जाहिराती केल्या. थोडक्यात, आचार्य अत्रेंना जरी प्रत्यक्ष मी पाहिलेलं नसलं तरी त्याचं साहित्य वाचून, नाटक व चित्रपट पाहून त्यांना गुरुस्थानी मानलं..

आचार्य अत्रे इतके भाग्यवान की, राम गणेश गडकरींच्या ते संपर्कात होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे शिष्य, राम गणेश गडकरी.. राम गणेश गडकरींचे शिष्य.. आचार्य अत्रे! संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा, आचार्य अत्रे यांच्याच शुभहस्ते बसविलेला आहे.. 

आचार्य अत्रे यांनी शालेय शिक्षणानंतर फर्ग्युसन काॅलेज  व पुणे विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर, शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९२८ साली लंडनमध्ये जाऊन टी.डी. ही पदवी घेतली. 

अत्रे यांची साहित्यिक व पत्रकारिता म्हणून कारकीर्द १९२३ च्या ‘अध्यापन’ या मासिकापासून सुरु झाली. २६ साली ‘रत्नाकर’, २९ साली ‘मनोरमा’, ३५ साली ‘नवे अध्यापन’, ३९ साली ‘इलाखा शिक्षक’, ४० साली साप्ताहिक ‘नवयुग’, ४७ साली सायंदैनिक ‘जयहिंद’, ५६ साली दैनिक ‘मराठा’ अशी आहे..

चित्रपटाच्या बाबतीत अत्रे यांनी सुरुवातीला कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. १९३४ साली ‘नारद नारदी’ चित्रपटापासून या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. ३८ साली ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची कथा लिहिली. त्यांच्या ‘ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटानेही अफाट लोकप्रियता मिळवली. १९५४ सालातील ‘श्यामची आई’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ मिळविले. 

आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला मुंबईत काही महिने शिक्षकाची नोकरी करताना इंग्रजी, गणित, संस्कृत विषय शिकविले. नंतर पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून १८ वर्षे काम केले. तसेच पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींसाठी आगरकर हायस्कूलची स्थापना केली. १९३७ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग काॅलेज काढले. प्राथमिक शाळेसाठी, नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरूण वाचनमाला, अशी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली.

आचार्य अत्रे यांची भाषणे त्याकाळी फार गाजलेली होती. सदानंद जोशी यांनी ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री प्रयोगातून त्यांच्या भाषणकलेचा आस्वाद अनेक वर्षे प्रेक्षकांना दिला. 

१३ जून हा दिवस, पाश्चिमात्त्य देशांत अशुभ मानला जातो.. १९६९ साली त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात देखील आला.. याच दिवशी आचार्य अत्रे, अनंतात विलीन झाले.. त्यांचा जन्मही १३ तारखेचा व मृत्यूही १३ तारखेलाच.. विलक्षण योगायोग! त्यांना जाऊन ५३ वर्षे झालेली आहेत.. मात्र अजूनही ते आपल्याला पुस्तकातून, भाषणांतून, नाटकांतून, चित्रपटांतून आसपासच आहेत असं वाटतं.. खरंच अशी मोठी माणसं जरी शरीराने गेलेली असली तरी त्यांच्या कर्तुत्वाने शतकानुशतके, अमरच असतात..

आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!!

© सुरेश नावडकर

१३-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

(सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!! ) –इथून पुढे —–

*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!

पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 

लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??

गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!

रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुरच्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती..!!

एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण यामुळे, तैमुरचे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!

बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठवर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!! 

त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!

तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे, तर दुसरी तुकडी तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!

*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या  अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली..!!

चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारीने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!

रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुरने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारीने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारीने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!

खिजराखानला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!

ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंदला पळून 

गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!

अशा ह्या ‘पळपुट्याचे’ तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे उभे आहेत ..!!

आणि इथे त्याचे नांव, आपल्या मुलाला दिले जात आहे ..!!

*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!

पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!

तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणाऱ्या रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!

रामप्यारीला मानाचा मुजरा ..!!

—समाप्त— 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!! आता, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये, आम्हाला आमचा ‘खरा’ इतिहास शिकवला जाईल ..!!

वाचा …

समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर ..!! भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला ..!!

अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की, तो अत्यंत क्रूर, निर्दयी, 

दुष्ट होता ..!!

.. त्याच तैमुरला, एका रणरागिणीने अक्षरश: जेरीस आणले होते ..!!

ती होती रामप्यारीबाई चौहान ..!!

तैमुरच्या अत्याचाराचे किस्से वाचून, कुणाचाही थरकाप उडेल ..!! अफगाणिस्तानचा प्रदेश जिंकून, हाच तैमुर, हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखाने, पंजाब उध्वस्त करून निघाला .. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील .. पण, तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही ..!!

राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती ..!!

उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी, देश, धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली ..!!

आमने सामने लढून आपला निभाव, तैमुरसमोर लागणार नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने, त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले ..!!

जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले ..!! गावोगावचे तरुण लढण्यासाठी

 आले ..!!

पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्याने, त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते ..!!

तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग ह्यांनी, त्या सर्व ‘सेनेला’ प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली ..!!

इसवी सन 1305 मध्ये, हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग एक छोटे संस्थानिक होते ..!! इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून, जाळून नष्ट करून टाकले होते ..!!

यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून, ह्या ‘हिरव्या’ संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते ..!!

यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तब्बल ८०,००० युवकांची सेना, देशभरातून तयार झाली होती ..!!

सर्व जाती-जमातींची महापंचायत, पुन्हा एकदा विचार-विनिमयास बसली .. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता .. गावो-गावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या .. सर्वानी एकमताने ठराव मंजूर केला की, स्त्री सेना तयार करून, त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे ..!! अशाप्रकारे, तब्बल ४५,००० युवतींची ‘स्त्री सेना’ तयार 

झाली ..!! त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान ..!!

कोण होती ही रामप्यारी बाई चौहान ..??

उत्तरप्रदेश मधील सहारनपूर गावात, रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला ..!!

लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून, रामप्यारीचे मन पेटून उठत होते ..!!

अन्यायाचा प्रतिकार करायचा तर, शरीर मजबूत हवे ..!! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे .. त्यासाठी रामप्यारी रोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर, आपल्या शेतात जाऊन, सर्व प्रकारचे व्यायाम करत असे .. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते ..!! 

गांवकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत पण तिचे आई-वडील मात्र तिच्यामागे ठामपणे उभे राहिले होते .. एकदा पंचायती समोर तिने गावक-यांना ह्याचे महत्त्व पटवून सांगितले ..!! 

इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर, आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे .. तिने सांगितलेला हा उपाय सहजसाध्य होता, आणि सर्वाना पटला होता ..!!

*मग काय .. गावोगावी अशी व्यायाम शिबिरे होऊ लागली ..!!

सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!!

क्रमशः…

 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares