मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ही विसंगती कशी समजून घ्यायची?…” – लेखक : श्री हेरंब कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “ही विसंगती कशी समजून घ्यायची?…” – लेखक : श्री हेरंब कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

ही विसंगती कशी समजून घ्यायची?

चतुर्थीला चंद्राला ओवाळणारे हात आणि आज चंद्रयान उतरल्यावर टाळ्या वाजवणारे हात एकच असणार आहेत..

ईदचा चांद बघणारे डोळे आणि चांद्रयान उतरताना बघणारे डोळे एकच असणार आहेत आज…

ही विसंगती कशी समजून घ्यायची?

पावसाचे चक्र समजून घेत पेपर लिहून पास झालेले हात आणि पावसासाठी महादेव कोंडणारे, प्रार्थना करणारे हात एकच असतात…

ही विसंगती कशी समजून घ्यायची?

ती विसंगती मानव जातीच्या प्रवासातून आली आहे. जेव्हा माणसाकडे निसर्गाचा प्रवास समजून घेणारी कोणतीच यंत्रणा नव्हती. तेव्हा आकाशातून कोणीतरी हे घडवते असे सोपे अर्थ लोकांनी लावले. साधा खोकला बरा होण्यासाठी खोकलाई नावाची देवी आहे अशी मूर्ती अनेक ठिकाणी दिसते.इतकी अगतिकता होती. त्यातून इंद्र हा पाऊस पाडतो. गणपती आणि चंद्र यांचे नाते. सुर्य आणि चंद्र यांचे व्यक्ती किंवा देवता म्हणून समजूत असे घडत असते.

…. पण ते त्या काळातील मानवाला माफ होते पण आज विज्ञानाने आपल्याला कारणमीमांसा  सांगितल्यावर आपण परंपरा सोडायला हवी. नव्या मनाने या सर्व पौराणिक कथांकडे बघायला हवे. हे फक्त हिंदू धर्माला लागू नाही तर सर्वच धर्मांना लागू आहे. सर्वच धर्मात अशा कहाणी आहेत.

तेव्हा हा स्वतःशी संघर्ष असतो.हळूहळू या जुन्या परंपरेकडून आपण वास्तवाकडे जायला हवे.

पण आपण ते सोडत नाही. उदाहरणार्थ जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता तेव्हा मंदिरात तेलाचे दिवे आले. पण आज विजेचा शोध लागल्यावर मंदिरात विजेचे दिवे ही आहेत, चर्च मध्ये रोषणाई आहे. पण तरीही तेलाचे दिवे आणि चर्च मध्ये मात्र मेणबत्ती आहे. त्याची काहीही गरज नसताना ते सोडवत नाही इतकाच त्याचा अर्थ आहे. कहर म्हणजे दक्षिणेकडील मंदिरात बाहेर रोषणाई पण गाभाऱ्यात मात्र फक्त तेल तुपाचे दिवे आहेत. ते सोडवत नाही म्हणून मग तेलाच्या दिव्याने कसे शांत वाटते आणि waves निर्माण होतात या विज्ञानाचा आधार आम्ही शोधत राहिलो.प्रत्येक परंपरा सोडवत नाही मग अशीच नवी वैज्ञानिक कारणमीमांसा जोडत राहिलो.

उपवास आम्ही देवासाठी नाही तर पोटाला आराम म्हणून करतो असे युक्तिवाद आले. पण मग तो उपवास अमावस्या किंवा कधीही का करत नाही? याचे उत्तर नसते. अशी खूप उदाहरणे दिसतील आणि सर्व धर्मात दिसतील.

एक उदाहरण बघू या..माणूस मृत्यू झाल्यावर स्मशानात नेण्याची पद्धत म्हणून बघू. लाकडाची ताटी बांधून त्यावर प्रेत बांधले जाते. गाडग्यात विस्तव नेला जातो व अंतर जिथे कमी तिथे खांद्यावर नेले जाते. जेव्हा गाडीचा शोध लागला नव्हता तेव्हा खांद्यावर प्रेत नेले जात होते. काडेपेटी नव्हती तेव्हा घरात असलेला विस्तव सोबत घेतला जात होता.वीज नसल्याने लाकडावर प्रेत जाळले जात होते. आज गाडीचा शोध लागला तरीही ती मानसिकता व्हायला वेळ लागतोय. तरीही लाकडावर बांधून काही अंतर चालले जाते व खिशात काडेपेटी असताना अग्नी घरातला नेला जातो. अजूनही अनेकजण विद्युतवाहिनीत तयार होत नाहीत. राजकीय नेते तर हा आदर्श घालून देण्यापेक्षा चंदनाची लाकडात जाळून घेणे पसंत करतात..ही आपली समाज म्हणून मानसिकता आहे..

विज्ञानाने वेग धारण केल्यावर अनेकांच्या परंपरा सुटत आहेत.पण तो वेग कमी आहे. आपण करतो ते निरर्थक आहे हे कळते पण मनात अनामिक भीती असते. काही झाले तर?पुन्हा समाजाचा दबाव असतो.

सर्व धर्मातील रक्षक हे या निरर्थक परंपरा म्हणजे धर्म समजतात. त्यातून त्या निरर्थक परंपरा मोडण्याला विरोध करणे म्हणजे धर्माला विरोध असा अर्थ घेतला जातो. एक एक परंपरा संपली तर धर्म संपेल असे ते गृहितक असते पण खरा धर्म यापलीकडे असतो. न लगती सायास असा तो धर्म असतो,भक्ती योगमार्ग असतो. संतांनी तोच सांगितला. यावर भर द्यायला हवा. त्यामुळे जुनाट परंपरा म्हंजे धर्म नव्हे ही भूमिका सुशिक्षित समूहाने घ्यायला हवी. पण अडचण ही आहे की सुशिक्षित असणारे च आज प्रत्येक परंपरा कशी वैज्ञानिक आहे हे सांगण्यात धन्यता मानतात. त्यांच्यावर काम करणे हेच आज सर्वात मोठे आव्हान आहे. यातून आपल्या समाजात दांभिकता आली आहे. आम्ही एकाचवेळी चांद्रयान आणि चतुर्थी ला टाळ्या वाजवत राहतो.

मी प्रसिद्ध शास्त्रज्ञ यशपाल यांची मुलाखत केरळमध्ये घेतली होती. तेव्हा ते म्हणाले होते की शिक्षक परंपरेचे भाग असतात ही वैज्ञानिक दृष्टिकोनात समस्या आहे. ते म्हणाले की मध्यप्रदेशात आम्ही सूर्य कशाचा बनला असतो हे सांगितले तेव्हा नंतर काही शिक्षक म्हणाले की ७ रथांच्या घोड्यात येणाऱ्या सूर्य नारायणाचे तुम्ही हे काय करून ठेवले? गॅस आणि स्फोट फक्त.

तेव्हा आजचे यश नक्कीच साजरे करू..  पण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही करू या…

लेखक: श्री हेरंब कुलकर्णी

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “देवदूताच्या नावानं चांगभलं..!” – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “देवदूताच्या नावानं चांगभलं..!” – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

( तपस्याचे वडील अनेकांचे दरवाजे ठोठावत फिरले, पण कुठेच काही उपयोग झाला नाही. शेवटी एका मित्राच्या मदतीने त्यांनी डॉ. शेटे यांच्याशी संपर्क साधला आणि तिथेच आशेचा किरण दिसला.)

इथून पुढे —

डॉ. शेटे यांच्या प्रयत्नाने तपस्याचं दिल्लीतील नामांकित दवाखान्यात यशस्वी यकृत प्रत्यारोपण झालं. सरकारी योजनेतून ऑपरेशनचा खर्च भागला आणि ‘तपश्या आता माझ्या कुटुंबाचा घटक आहे, या भावनेतून शेटे यांनी त्यांना आर्थिक व मानसिक आधारही दिला.

तपस्याचे वडील मला हकीगत सांगत होते आणि बाजूला उभी असलेली तिची आई वारंवार डोळे पुसत होती. त्यांच्या शब्दांतून जणू त्यांनी सोसलेली सारी वेदना उलगडत होती.

बोलणं संपल्यावर मी शांतपणे तपस्याकडे पाहिलं. लहानशी ती परी, हातात गुलाबाचं फूल आणि डोळे मात्र रस्त्याकडे खिळलेले. जणू ‘माझ्या जीवदानदात्याची मी वाट पाहते आहे’ असं ते निरागस डोळे बोलत होते.

तपस्यासारखीच कहाणी तिथे बसलेल्या प्रत्येकाची होती. कुणी कॅन्सरग्रस्त, कुणी हृदयरुग्ण, कुणी अपघातातून जीव वाचवण्यासाठी झगडणारे, पण सगळ्यांच्या कहाणीत एक समान धागा होता—डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिलेला दिलासा.

एवढंच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात—गल्लीबोळात, खेड्यापाड्यात, अडलेल्या-नडलेल्या प्रत्येकाला मदत पोहोचवण्यासाठी आज ५,०००हून अधिक लोकांची टीम युद्धपातळीवर काम करते.

मी मनात विचार करत होतो, डॉ. शेटे येण्यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम होत नव्हतं का? होत होतं, पण त्याचा ‘रेशो’ फारसा प्रभावी नव्हता. आज मात्र तो रेशो जबरदस्त उंचीवर पोहोचला आहे.

शेटे नावाच्या एका माणसाने आपल्या घरादाराची फार चिंता न करता, हा विडा उचलला आहे आणि त्यानंतर जणू संपूर्ण राज्यातील हजारो आजारी, संकटग्रस्त माणसांसाठी नवी पहाट उगवली आहे. डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्यासोबत त्यांचे भाऊ डॉ. शिवरत्न शेटे हेही तितकेच समाजमन जपणारे व्यक्तिमत्त्व आहे.

शिव हे व्याख्याते असून, त्यांच्या विचारप्रवर्तक भाषणांनी, गडकिल्ल्यांच्या, आयुर्वेदाच्या प्रेमाने असंख्य तरुणांना प्रेरणा दिली आहे. डॉ. शेटे यांच्या पत्नी शिल्पा या मोठ्या उद्योजक आहेत. शिल्पा यांच्यामुळे संसाराचा आर्थिक गाडा ओढण्याची चिंता डॉ. शेटे यांना नव्हती. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड हे त्यांचं मूळ गाव. त्या गावासाठी आणि परिसरासाठी डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केलेलं कार्य एखाद्या कॅबिनेट मंत्र्यानं करावं इतकं प्रभावी आहे.

लोकांच्या दैनंदिन अडचणी असोत, शिक्षणाचे प्रश्न असोत किंवा सामाजिक उपक्रम, शेटे यांनी आपल्या कर्तृत्वाने गावकऱ्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे दिंद्रुडच्या लोकांसाठी ‘शेटे’ हे नाव म्हणजे आधार आणि आत्मविश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

हे सारे काही तिथे असलेले लोक बोलत होते. गुगलवर सापडणाऱ्या माहितीवरून, जनतेच्या अनुभवांवरून डॉ शेटे यांच्या कामाची पोचपावती मिळत होती.

आम्ही गप्पांमध्ये रमलो असतानाच डॉ. ओमप्रकाश शेटे आले. बाहेर जमलेले लोक जिथे बसले होते, तिथेच तेही बसले. कोणाची काय अडचण आहे, कुणाकडे काय काम आहे, ते सर्व शांतपणे विचारू लागले. लगेच कुणाला फोन, कुणाला पत्र… माझ्यासमोर आलेल्या प्रत्येकाचं काम क्षणार्धात मार्गी लागत होतं.

जे चेहरे आत येताना खिन्न, दु:खी, काळजीने भरलेले होते, तेच चेहरे बाहेर पडताना आनंदाने उजळलेले दिसत होते.

दोन तासांनी शेटेजींनी माझा चेहरा पाहिला आणि आम्ही संवाद साधला. त्यांच्या गप्पांमध्ये जो नम्रपणा होता, तो विलक्षण होता. राज्यातील आरोग्यविषयक प्रत्येक गोष्टीची त्यांना असलेली सखोल माहिती तर मला आचंबित करणारी होती.

त्यांच्या पहिल्या वाक्यानेच त्यांच्या स्वभावाची जाणीव झाली,  ‘मला येण्यासाठी उशीर झाला, माफ करा.’

मी विचारलं, “बाहेर कुठला आरोग्य कॅम्प होता का?”

ते हसत म्हणाले, “नाही, सार्थक कोल्हे, शिरूर कासारचा माझा पेशंट होता. २०१७ मध्ये तो मरणाच्या दारातून वाचला. त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं. आज त्याने एक मोठा उद्योग उभारला आहे. त्याच्या आग्रहास्तव मी पहाटे त्याचं उद्घाटन करून आलो आणि मग इकडे आलो.”

ते पुढे सांगू लागले, “आज राज्यात १७० ठिकाणी आरोग्य कॅम्प सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांत आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम जोमाने सुरू आहे”. एक नाही, तर दरदिवशी अशी अनेक कामं होती, ज्याविषयी डॉ. शेटे मला सांगत होते.

राज्यातील धर्मदाय संस्थांशी संबंधित प्रत्येक दवाखान्यावर त्यांची पकड कमालीची होती. केंद्र आणि राज्याच्या योजनांमुळे आज दोन कोटी लोकांना मदत मिळाली आहे आणि आता हे काम साडेबारा कोटी लोकांपर्यंत नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे.

डॉ. शेटे यांना भेटायला आलेले काही लोक भावनिक होऊन अश्रू ढाळत होते. त्याक्षणी शेटे यांनाही स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही.

त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला,

डॉ. शेटे यांनी जे साध्य केलं, ते जर एखाद्या आरोग्यमंत्र्याने साधलं असतं, तर महाराष्ट्र कधीच अनारोग्याच्या संकटातून बाहेर पडला असता.

असं वाटत होतं, ओमप्रकाश शेटे यांच्यासोबत तासन्‌तास बसावं, त्यांच्या ओठांतून नवनव्या कहाण्या ऐकत राहावं. वेळ मात्र मर्यादित होता. शेवटी मी डॉ. शेटे यांचे दोन्ही हात घट्ट पकडले, डोक्याला लावले आणि अगदी भावुक होऊन त्यांचा निरोप घेतला.

बाहेर पडलो तेव्हा मनात एकच विचार घोळत होता, देव जर खरोखर माणसात प्रकट होत असेल, तर तो निश्चितच ओमप्रकाश शेटे यांच्या रूपानं अवतरला आहे.

देवाच्या नावाने कित्येकांचं चांगलं होतं, हे मी आधी ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष पाहिलं ते इथे. कित्येक उदाहरणं माझ्या डोळ्यांसमोर होती, आणि जेव्हा ती आकडेवारीत मांडली गेली, तेव्हा ती २४ लाखांपेक्षा अधिक लोकांची झाली होती.

हेच काम आरोग्य विभागाने इतक्या वर्षांत ठरवलं असतं, तर महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था किती वेगळी दिसली असती! दवाखान्यांतील मक्तेदारी, राजकीय वरदहस्ताने चालणारा काळाबाजार, पेशंटची होणारी लूट, डॉक्टरांना होणार त्रास हे सर्व एका अर्थाने मोडून काढण्याचं धाडस डॉ. शेटे यांनी दाखवलं.

त्यांच्या मागे प्रचंड इच्छाशक्ती आहे. जर त्यामागे राजकीय इच्छाशक्तीही उभी राहिली असती, तर आज डॉ. ओमप्रकाश शेटे नक्कीच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री झाले असते. पण दुर्दैव असं की, ज्याला चांगलं जमतं त्याला तेच काम देऊ नये ही मानसिकता आपल्या राजकीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. डॉ. शेटे जरी मंत्री नसले, तरी चार मंत्र्यांचं काम एकट्यानं करून दाखवणारा हा माणूस आजही झगडत आहे, आणि त्यातच त्यांचं खरं मोठेपण दडलेलं आहे.

– समाप्त –

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘’कथा एका रंगमंदिराच्या निर्मितीची…’ – लेखक: ॲडव्होकेट बाबूराव कानडे ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कथा एका रंगमंदिराच्या निर्मितीची...’ – लेखक: ॲडव्होकेट बाबूराव कानडे ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवर अगोदर “आशानगर” नावाची झोपडपट्टी होती. ‘हा जिमखान्याला कुरूपतेचा डाग होय’, अशी पुणेकरांची भावना होती.

साक्षात बालगंधर्वांच्या हस्ते कुदळ मारली जात असतांना डॉ.बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आला होता…..

..  ” शनिवार, नारायण, सदाशिव पेठांमधील नागरिकांसाठी बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती आरंभली आहे. नदीच्या पलीकडे कोण जाणार?  अगोदर रिक्षाभाडे, नंतर नाटकाचा तिकीट दर, शिवाय रात्री बे रात्री कोण नाट्यरसिक जाणार लांबच्या बालगंधर्व रंगमंदिराला? “

बालगंधर्व रंगमंदिराची योजना पुणे महानगरपालिकेची. त्या अगोदर आचार्य अत्रे यांनी स्वत: वीस लाख रूपये खर्च करून रंगमंदिर उभारण्याची योजना असलेले पत्र पूर्वीच दिले होते. ते पत्र आजही नगरपालिका दप्तरांत जमा आहे. नंतर भुजंगराव कुलकर्णी, आयुक्त यांनी – “आचार्य अत्रे यांचेऐवजी नगरपालिकेने का बांधू नये?नगरपालिकेनेच रंगमंदिर बांधावे.”, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला.

पुणे शहरात एकच गदारोळ उठला. नाट्य थिएटर उभारणे नगरपालिकेचे काम नाही, असा बूट निघाला. त्यावर ” नगरपालिकेने फक्त संडास आणि मुता-याच बांधायच्या का? त्यांनी चांगले काम करायचे नाही का? ” – प्रश्न करण्याची पध्दत बघा. ते फक्त आचार्य अत्रे यांनाच जमले!

बांधकामाचे कंत्राट बी.जे शिर्के या नामांकित कंपनीला देण्यात आले. मुदत घातली. उलटा क्रम लावण्यात आला जसे १८०, १७९, १७८ असा. विद्युतीकरण महाराष्ट्र इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनला देण्यात आले. ते पूर्वी सकाळ परिसरात होते.

रंगमंदिर उद्घाटन सोहळा ठरला. निमंत्रणे सर्वेसर्वा पु.ल. यांच्या स्वाधीन. कार्यक्रम ठरला. अनावरण शुभहस्ते – आचार्य अत्रे, प्रमुख पाहुणे – मा. यशवंतराव चव्हाण, अध्यक्ष – महापौर नारायणराव गोरे.

पु.लं.नी मुंबई साहित्य संघ मंदिराला डावलून पार्ले सेवा संघाला निमंत्रण दिले. झाले मुंबईतील साहित्यिक मंडळी नाराज. साहित्यिकांची आचार्य अत्रेंकडे धांव. आता ‘राजकीय आजार!’ आचार्य अत्रे अनावरणाला आजारपणमुळे अनुपस्थित. तरीही तार पाठवून – रंगभूमी सासर सोडून माहेरी आली., हा अग्रलेख अवश्य वाचून दाखवावा, ही विनंती केली. अनावरण यशवंतरावानी केले. नानासाहेब अळंटळं करू लागले. मी एकदम ओरडलो, “आचार्य अत्रे यांचा अग्रलेख वाचा.” सर्वत्र कल्ला झाला. नानासाहेबांनी अग्रलेख मनापासून वाचला.

नंतर आचार्य अत्रे यांनी बालगंधर्व रंगमंदिर महिनाभर बुक केले. प्रीतिसंगम नाटकाचे प्रयोग महिनाभर केले. पहिल्या दिवशी सहा दिवसांचा प्लॅन आचार्य अत्रे यांनी जाहीर केला. लोक म्हणाले, ‘आचार्य अत्रे यांना वेड लागले आहे.’ आचार्य अत्रे डगमगले नाहीत. पहिल्या तासांत सहा दिवसांचा प्लॅन संपला! आचार्य अत्रे यांनी दाखवून दिलं, बालगंधर्व रंगमंदिरांतही नाटकं हाऊसफुल्ल होतात. विरोधकांना ही जबर चपराक होती. हा अत्रे थिएटरचा विजय होता. आचार्य अत्रे यांची इतर नाटके गाजली. आचार्य अत्रे यांनी पुन्हा एकदा पुणे जिंकले. महिनाभर आचार्य अत्रे यांच्या नावाचा जल्लोष चालू होता.

लेखक: ॲडव्होकेट बाबूराव कानडे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ घडसुनि आकारु यशाला… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “घडसुनि आकारु यशाला” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“माझा अभ्यासच होत नाहीये रे” असं म्हणून ती हमसून हमसून रडायलाच लागली. दहावीत ९२ टक्के गुण मिळवून अकरावीत शिकत असलेली ही मुलगी. ट्यूशन मध्ये दर रविवारी होणाऱ्या परीक्षांमध्ये तिला सातत्याने कमी गुण मिळत होते. पण मागच्या सहा टेस्ट मध्ये ती नापास झाली होती. आईवडील वैतागून गेले होते. एका हुशार आणि मागच्या वर्षापर्यंत चांगले गुण मिळवणाऱ्या मुलीला असं अचानक काय झालं, याच प्रश्नात सगळेजण होते.

तिनं अधिकाधिक वेळ अभ्यास अभ्यास करायला हवा, असं तिच्या क्लास मधल्या शिक्षकांचं म्हणणं होतं. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ट्यूशन.. त्यासाठी पहाटे पाच वाजता उठणं भाग असायचं. क्लास संपवून घरी यायला संध्याकाळी सात वाजायचे. आल्यावर आवरून, उद्याची तयारी करेपर्यंत आठ व्हायचे. रात्रीचं जेवण झालं की, तिला अंथरुण आठवायचं. सुस्ती यायची, झोप अनावर व्हायची. मग झोप टाळण्यासाठी मोठ्ठा मग भरुन कॉफी.. त्यानंतर क्लासचा अभ्यास.. पण कॉफी घेऊन उडवलेली झोप परत यायचीच नाही. मग रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मोबाईल.. पहाटे तीन वाजता डोळा लागायचा खरा,पण लगेच दोन तासात गजर व्हायचा..! उण्यापुऱ्या दोन तासांच्या अर्धवट झोपेच्या विश्रांतीवर बारा तासांच्या बौद्धिक कामाची अपेक्षा करावी तरी कशी?

“अभ्यासच न होणं” ही कितीतरी मुलामुलींची समस्या आहे. आपल्याकडं “अभ्यास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी” आणि “अभ्यास करण्यासाठी आतूनच कळकळ हवी” असे दोन अलिखित सामाजिक सिद्धांत फार पूर्वीपासून चालत आले आहेत. जे आज १०० टक्के जसेच्या तसे मान्य करणं कठीण आहे. कारण, मुलांना विचलित करणाऱ्या अनेकविध गोष्टी वाढल्या आहेत. मुलांचं वेळ वाया घालवण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यांचं एका जागी तासनतास बसून राहणं, एसी च्या थंडगार वातावरणात निवांत सोफ्यावर लोळत पडून राहणं, मोबाईलवर जे दिसेल ते पाहत दिवस घालवणं, हे प्रश्न आता घरोघरी दिसतात. असंच सुरु राहिलं तर अभ्यासातलंच काय, आयुष्यातलंही अपयश ठरलेलंच आहे. “केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे” ही उक्ती कितीही खरी असली तरीही, “करण्याची नेमकी पद्धत अचूकपणे शिकून घेणं,आत्मसात करणं” हेही त्यात गृहीत धरलेलं आहे,हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे.

आज याच अवस्थेत लाखो मुलंमुली आहेत. त्यांना अभ्यास टाळायचा नसतो, अभ्यासाचा कंटाळाही नसतो. पण अभ्यासाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करावी, हेच त्यांना सुचत नाही. जेव्हा एका दिवसात दोन किंवा तीन ट्यूशन्स आणि शाळेतल्या पाच ते सहा तासिका यांचा अभ्यास रोजच्या रोज करायचा, हेच मुळात आव्हान आहे. अनेक हुशार मुलांनाही हे दैनंदिन अभ्यासाचं तंत्र अवगत होत नाही. अभ्यासक्रम आटोपण्याच्या मागे लागायचं की, नेमका अभ्यास करायचा तरी कसा? हे शिकवायचं, या संभ्रमात अनेक शिक्षकही असतात.

घड्याळी चोवीस तासांच्या दिवसात शाळेत येणे-जाणे, क्लासेस, शाळा, तिथले प्रत्येक विषयाचे गृहपाठ, वह्या पूर्ण करणे आणि दर आठवड्याच्या क्लासेसच्या परीक्षा यांत नेमकं कशाला प्राधान्य द्यावं,या प्रश्नात मुलं अडकतात. अभ्यासाची गोळाबेरीज शेवटी मार्कांच्या संख्येपाशी आणि टक्केवारीपाशीच येऊन थांबते. वह्या पूर्ण केल्या नाहीत तर इंटर्नल मार्क्स मिळणार नाहीत, या भीतीपोटी मुलं दिवसरात्र फक्त लिहित राहतात. पण त्या लिखाणामागे अभ्यासाचा उद्देश नसतो, तर मार्क न मिळण्याची भीती असते. आता या परिस्थितीत जगातली कितीही चांगली शिक्षण प्रणाली रुजवण्याचा प्रयत्न केला तरीही, मूळ अभ्यास कौशल्याचाच दुष्काळ असल्याने मुलांमध्ये अस्सल शैक्षणिक गुणवत्तेची कमतरता राहतेच.

घोकंपट्टी पद्धत कुठपर्यंत उपयोगी पडणार? मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत कुठपर्यंत उपयोगी पडणार? किंवा वह्या भरभरून लिखाणाची पद्धत कुठपर्यंत उपयोगी पडणार? अभ्यासक्रम जसजसे विस्तृत होत जातात, तसतशी अभ्यासाची पद्धत आणि अभ्यासाची तंत्रं, दोन्हीही बदलली पाहिजेत. तरच, अभ्यासक्रमांमधलं ज्ञान पुढं कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि उपयोगी पडेल.

प्रत्येक विषयाचं रुप वेगळं, त्यातला अभ्यासाचा भाग वेगळा आणि अर्थातच त्याचा उपयोगही वेगळाच असतो. त्यातल्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. ज्या त्या विषयातल्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यामुळं, प्रत्येक विषयाचं आकलन होण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेमधल्या वेगवेगळ्या क्षमता उपयोगात आणाव्या लागतात. बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची पद्धत बदलली की, त्या विषयाच्या अभ्यासाचं तंत्र सुद्धा बदलावं लागतं. लक्षात ठेवण्याच्या पद्धती बदलाव्या लागतात. उदाहरणार्थ, संस्कृतचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आणि गणिताचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी. जर दोन्ही विषयांच्या अभ्यासपद्धतींची अदलाबदल केली तर, दोन्ही विषयांचा अभ्यास खराब होईल.

म्हणूनच, अभ्यास करण्याची विविध तंत्रं नीट शिकून घेणं आणि सुरुवातीपासूनच ती उपयोगात आणणं, त्यांचा पुरेपूर सराव करणं आवश्यक आहे. अभ्यासक्रम आणि आपल्या मुलाला दिवसभरात एकूण किती वेळ उपलब्ध असतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण त्या दिनक्रमातल्या शिस्तीमध्येच यशाची ओपन सिक्रेट्स आहेत, हे किती जणांना शिकवलं जातं?

विशेषतः सातवीपासून पुढच्या सगळ्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा दिनक्रम, वेळापत्रक आणि त्यातली शिस्त पाळणं हाच भाग अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गरजेचा आहे. अत्यंत हुशार विद्यार्थीसुद्धा याच गोष्टींच्या अभावामुळे मागे पडतात. अभ्यासाची आखणी करणं, त्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती वापरुन प्रत्येक धड्याची वेगळी रचना करणं, त्यासाठी शास्त्रीय युक्त्या वापरणं, नोंदी करणं शिकून घ्यायला हवं. म्हणजे, अभ्यासाचा कंटाळा आणि टाळाटाळ करणं कमी करता येऊ शकतं.

अभ्यास करताना तो अधिकाधिक प्रभावी कसा होईल याहीपेक्षा तो पटापट एकदाचा कसा उरकेल, याकडेच बहुतेक विद्यार्थ्यांचा कल असतो. भराभर अभ्यासाचं काम उरकून टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेम्स, रिल्स पाहणं, प्ले स्टेशन बघत बसणं, हा घरोघरच्या मुलामुलींचा आवडता उद्योग आहे. कसाबसा उरकलेला अभ्यास आणि अत्यंत आवडीनं, तल्लीन होऊन, तहानभूक विसरून बघितलेल्या रिल्स यात कशाचा प्रभाव अधिक जास्त होतो?

एखादा छंद असो किंवा एखादी कला असो, तिची जोपासना करण्यासाठी वेळही द्यावा लागतो आणि त्यासाठी सरावही करावा लागतो. निरीक्षण करावं लागतं. त्यातल्या अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. ज्या त्या कलेचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग चालतात, कार्यशाळा चालतात, तिथं सहभागी व्हावं लागतं. शास्त्रशुद्ध तंत्रं शिकून घेतली आणि नियमित सराव केला की, त्या कलासुद्धा आपल्याला अधिक उत्कृष्ट आनंद देतात. अगदी हेच तत्त्व अभ्यासालाही लागू आहे.

अत्यंत क्लिष्ट संकल्पना, मोठमोठे धडे, युनिट्स, वाढत जाणारे विषय, बदलत्या परीक्षा पद्धती, त्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ न मिळणं यांचा तोल साधता आला नाही तर आपसूकच अभ्यासाचं ओझं वाटायला लागतं, ताण येतो, अभ्यास नकोसा वाटायला लागतो. या सगळ्याचा परिणाम मार्कांवर होतो. आता इथेच मोठा घोटाळा होतो. पालकांना फक्त “कमी मार्क्स” हा शेवटचा परिणामच दिसतो. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी खाजगी ट्यूशन्स लावणे, वेगवेगळ्या रेडीमेड नोट्स आणून देणे, टेस्ट सिरिज लावणे असे उपाय केले जातात. पण आपल्या मुलाला अभ्यासाशी जुळवूनच घेता येत नाहीये, हे आधी समजून घेणं आवश्यक आहे.

स्पर्धा मार्कांची असली तरीही, कसोटी मात्र ज्ञानाचीच असते. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी जसे मार्क लागतात, तसेच त्या अभ्यासक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासाची कौशल्येच अंगी बाणवावी लागतात. ज्याची अभ्यास करण्याची पद्धत उत्तम असेल, तोच विद्यार्थी पुढच्या स्पर्धेत चांगलं यश मिळवू शकतो.

याच समस्या लक्षात घेऊन गेल्या १९ वर्षांपासून खास अभ्यासाच्या पद्धती आणि अभ्यास तंत्रांचं प्रशिक्षण देणारं एक निवासी शिबिर दरवर्षी आयोजित केलं जातं. “साधना” हे त्या शिबिराचं नाव. विविध देशांमधल्या अध्ययन तज्ज्ञांनी संशोधन करुन विकसित केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची अभ्यास कौशल्यं या शिबिरात मुलांना शिकवली जातात. “लर्निंग सिस्टिम्स” हाच या शिबिराचा मुख्य विषय असतो. चार दिवस मुलं पूर्णवेळ शिबिरातच राहतात, त्यांची निवास आणि शाकाहारी भोजनाची उत्तम सोय केलेली असते. मुले आणि मुली यांची राहण्याची सोय वेगवेगळी असते.

अत्यंत शांत आणि खऱ्याखुऱ्या निसर्गाच्या सानिध्यात हे शिबिर घेतलं जातं. आजुबाजूला सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार पावसाळी वातावरण आणि मुलांना विचलित करतील अशा प्रत्येक गोष्टीला पूर्ण बंदी असल्यामुळे मुलांचं प्रशिक्षण उत्तम होतं.

अत्यंत मर्यादित विद्यार्थी संख्या आणि अभ्यासाशी संबंधित असणारी विविध कौशल्यांची २१ सेशन्स हे या शिबिराचं वैशिष्ट्य असतं. पालकांसाठीही एक विशेष सेशन शिबिरात असतं. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक मुलाच्या घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चार मानसशास्त्रीय चाचण्या..! खरोखरच पालकांनी अजिबात चुकवू नये, असंच हे शिबिर आहे.

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “देवदूताच्या नावानं चांगभलं..!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “देवदूताच्या नावानं चांगभलं..!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

आम्ही नागपूरचा दौरा आटोपून यवतमाळला निघालो होतो. यवतमाळला माझा जुना जिवलग मित्र प्रकाश गायकवाड याची मृत्यूशी झुंज चालू होती. प्रकाश माझा नांदेडला ‘लोकमत’मध्ये असतानाचा सहकारी, मित्र. लोकमतच्या त्या काळात आम्ही कित्येकदा रात्री रस्त्यावर भटकत बातम्यांचा शोध घेतला होता. चहा टपरीवरच्या गप्पांपासून ते संपादकीयच्या गंभीर चर्चांपर्यंत प्रकाश हा माझा सततचा साथीदार होता.

आता मात्र तो जीवन-मरणाच्या सीमारेषेवर उभा होता. रुग्णालयाच्या त्या खोलीत प्रवेश करताच मन सुन्न झालं. प्रचंड औषधोपचार, डॉक्टरांची धडपड, तरीही त्याच्या अंगातली शक्ती रोज थोडी थोडी निघून जात होती.  पण डोळ्यांतली चमक मावळली नव्हती. मला पाहताच त्याने ओठांवर हलकं हसू आणलं आणि म्हणाला,

“अरे, तू आलास! आता मला काही चिंता नाही.” त्या क्षणी माझे शब्द ओठांवर अडखळले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मनात विचार आला.

आपण आयुष्यभर लोकांच्या समस्या लिहितो, त्यांना आवाज देतो; पण जेव्हा आपल्या जवळचाच एखादा मित्र मृत्यूच्या झुंजीत असतो, तेव्हा आपण किती असहाय होतो.

त्याचा हात हातात घेत मी शांत बसलो. कित्येक आठवणींनी मन व्यापलं. रात्रीच्या जागरणानंतर पहाटेपर्यंत चाललेले डेडलाईनचे युद्ध, गावोगाव केलेल्या धावपळीच्या बातम्या, सायकलवरून केलेला प्रवास आणि प्रकाशचा खणखणीत हशा. पत्रकारितेतील हा योद्धा आज जीवनमरणाच्या सीमारेषेवर उभा आहे, ही कल्पनाच मनाला चिरून गेली.

प्रकाशला कॅन्सर झाला होता. तो शेवटच्या टप्यातून बाहेर येण्यासाठी इलाज घेत होता. प्रकाशची आई माझ्याशी बोलत होती. ती म्हणाली, “मुंबईत नऊ महिने काढले. आता तो जरा बरा आहे. येथे या दवाखान्यात दोन वर्षांपासून इलाज चालू आहे.”

आईच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या आसवांत मला तिच्या मनातील प्रचंड यातना दिसत होत्या. तिने मागच्या सगळ्या हालअपेष्टा सांगितल्या. ती म्हणाली, “प्रकाशला सतत बाहेर खाण्याचा चटका होता, म्हणूनच कॅन्सर झाला, असं पहिल्याच भेटीत डॉक्टरांनी सांगितलं.”

मलाही प्रकाशच्या सवयी माहीत होत्या. मी प्रकाशकडे पाहिलं आणि आईकडे वळून विचारलं,  “आई, एवढा खर्च झाला, तो तुम्ही केला कसा?”

काकूंनी संपूर्ण कहाणी सांगितली. ऐकून मी थक्क झालो. त्या म्हणाल्या, “तीस लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. पण डॉ. ओमप्रकाश शेटे  यांच्यामुळे ते सगळं केवळ तीस रुपयांत झालं.”

त्यांच्या बोलण्यात सतत एक नाव येत होतं, डॉ. ओमप्रकाश शेटे.

काकूंचा आवाज थरथरत होता.

“प्रकाशच्या एका मित्राने डॉ. शेटे यांच्याशी ओळख करून दिली. त्या दिवसापासून त्यांनी आम्हाला सोडलं नाही. एवढा मोठा माणूस देवासारखा धावून आला आणि मुंबई सोडेपर्यंत सावलीसारखा सोबत राहिला. चार दवाखाने बदलले, पण कुठेच एक पैसाही लागला नाही. उलट, खर्चासाठी लागणारे पैसेही त्यांनी पदरमोड करून दिले. प्रकाशची लहान लहान मुलं पाहून, पहिल्याच भेटीत शेटेसाहेबांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.”

आईच्या या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. माझ्या डोळ्यांसमोर डॉ. शेटे यांचा प्रत्यक्ष देवदूतासारखा चेहरा दिसू लागला. त्यांच्या कृपेने, त्यांच्या सहकार्यामुळे, प्रकाशसारख्या कित्येकांच्या घरात पुन्हा उजेड परतला होता.

प्रकाश ज्या दवाखान्यात होता, त्या दवाखान्यात अनेक रुग्ण होते. त्यांपैकी  अनेक जण डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या कृपेने मोठ्या मोठ्या आजारांवर उपचार घेत होते. मी दवाखान्याच्या वार्डांतून फेरफटका मारत होतो. ज्यांना ज्यांना भेटलो, त्यांच्या डोळ्यांत एकच भाव दिसला, आस्था आणि कृतज्ञता.

त्या प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर मला डॉ. शेटे यांच्याविषयीची न विसरता येणारी अपार श्रद्धा दिसत होती. मला डॉ. शेटे यांची ओळख नवी नव्हती; पण या क्षणापर्यंत त्यांचं कार्य किती अफाट, किती सर्वव्यापी आहे याची मला कल्पना नव्हती. एकेक रुग्ण त्यांच्याकडे जणू देवाप्रमाणे पाहत होता.

तेव्हाच माझ्या मनात एक विचार घुमला,

“जगात देव कुठे आहे?”

त्याचं उत्तर त्या क्षणी मला सापडलं.

देव म्हणजे डॉ. ओमप्रकाश शेटे.

ज्याच्या हाताने लाखो लोकांना जीवनदान मिळालं, ज्याच्या डोळ्यांत दुसऱ्याच्या दुःखाने पाणी येतं, ज्याच्या पावलांनी गरिबांच्या दारात आशा उभी राहते.

डॉ. शेटे यांचं नाव उच्चारलं की प्रत्येकाच्या मनातून एकच शब्द उमटतो, “देवदूताच्या नावाने चांगभलं!”

मी यवतमाळवरून मुंबईच्या दिशेने निघालो.  प्रवासात असताना मी डॉ. ओमप्रकाश शेटे यांना फोन केला. प्रकाशची खुशाली त्यांना सांगितली आणि भेटीसाठी वेळ मागितला. त्यांच्या आवाजातली माया आणि साधेपणा जाणवला. त्यांनी मला तत्परतेनं भेटीसाठी बोलावलं.

भेटीला जाण्यापूर्वी मी एक पत्रकार म्हणून डॉ. शेटे यांच्या कार्याची  माहिती काढली आणि त्या शोधयात्रेतून मला जे कळलं, ते अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं. एक माणूस, सरकारी यंत्रणेचे गुंतागुंतीचे कारस्थान भेदत, अनेकांचे स्वार्थ आडवे येऊनही, सत्ताधाऱ्यांची नाराजी सहन करूनही, हा माणूस लाखो लोकांच्या जीवनासाठी झटतो आहे. डॉ. शेटे यांचं काम म्हणजे केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माणसाच्या श्वासाला नवी उमेद देणारा संजीवनीचा झरा आहे. समाजातल्या कित्येकांना शत्रू करून घेतलं, पण तरीही त्यांनी गरिबांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. माझ्या डोळ्यांसमोर एक सत्य उभं राहिलं, देव मूर्तीमध्ये नसतो, तर अशा माणसांच्या रूपांत आपल्यातच असतो, आणि म्हणूनच लोक त्यांना ‘देवदूत’ म्हणतात.

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मंत्रालयात २०१५ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना केलेली कामगिरी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. त्यावेळी शासकीय व्यवस्थेवर त्यांच्या सामाजिक कार्याच्या मोहोरामुळे विश्वासार्हतेची मुद्रा उमटली होती.

राज्यातील तब्बल साडेतीन हजार दवाखान्यांची दारे गरिबांसाठी खुली करणारा मसीहा म्हणून जनतेनं डॉ. शेटे यांच्याकडे पाहिलं. आयुष्याच्या अखेरच्या खडतर टप्प्यावर असलेल्या हजारो रुग्णांना त्यांनी ५९८ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली, ही खरी त्यांची ऐतिहासिक कामगिरी ठरली.

याच कार्याचा गौरव करूनच १ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्णी राज्याच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या प्रमुख पदावर लावली. आज ते जीवनदायी आणि महात्मा फुले या दोन्ही महत्त्वाच्या योजनांना दिशा देतात. राज्याची आरोग्यव्यवस्था आता त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. त्यांच्याकडे आता ‘अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन समिती, महाराष्ट्र शासन’ हे पद आहे. त्यांनी केंद्रात काम केल्यामुळे तो अनुभवही उपयोगाला आला आहे.

केंद्र आणि राज्य यांचा समन्वय साधत त्यांनी राबवलेल्या आरोग्यविषयक धोरणांमुळे, दीर्घकाळ आजारी असलेल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला जणू नवसंजीवनी मिळाली आहे. लादलेलं ओझं दूर सारून आरोग्य विभागाने डॉ. शेटे यांच्यामुळे मुक्त श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. मी या प्रवासात डॉ. शेटे यांच्याबद्दल वाचत होतो. वरळीला आरोग्य विभागाचे ‘जीवनदायी’ नावाचे मोठे कार्यालय आहे. मी तिथे पोहोचलो. संपूर्ण परिसरात मोठी गर्दी होती.

डॉ. शेटे अजून आले नव्हते. मी बाहेर बसलेल्या लोकांशी बोलत होतो. त्या प्रत्येकाच्या डोळ्यांत एक वेगळीच आशा होती. कुणाला ऑपरेशनसाठी मदत हवी होती, कुणी दवाखान्याचं कमी करायचं बिल घेऊन आले होते, तर कुणी आरोग्याच्या मोठ्या संकटातून सुटण्यासाठी केवळ एक आधार शोधत होता.

अनेकांच्या हातात एक गुलाबाचं फूल होतं,  आभार मानण्यासाठी. ते फूल जणू त्यांच्या मनातील कृतज्ञतेचं प्रतीक होतं. डॉ. शेटे यांची वाट पाहात ते सर्व जण शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यांवरची ओढ, आतली धडपड, आणि आशेचा किरण मला स्पष्ट दिसत होता.

मी ज्या कोणाशी बोललो, त्याची एक वेगळी कहाणी होती. कुणी आरोग्याच्या प्रचंड संकटातून जात होतं, तर कुणी नुकतंच त्या संकटातून बाहेर पडून आलेलं होतं. पण एक गोष्ट मात्र सारखीच होती—सर्वांच्या कहाणीत डॉ. ओमप्रकाश शेटे यांचं नाव हेच ‘जीवनदाना’चं प्रतीक होतं.

तपस्या तेरटी ही चार वर्षांची छोटी मुलगी आणि तिचे आई-वडील भेटले. त्यांना डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे आभार मानायचे होते. तपस्याच्या वडलांशी मी बोललो आणि जे काही त्यांनी सांगितलं ते ऐकून मी थक्कच झालो.

तपस्याचे वडील एका छोट्या गावात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.  मुलगी गंभीर आजारी पडली, तेव्हा संपूर्ण कुटुंबावर जणू आकाश कोसळलं. तपस्याला लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) करणं गरजेचं होतं. पण खर्च तब्बल २५ लाखांहून अधिक! त्यात वडलांचं दारिद्र्य, मुलीचं लहान वय आणि प्रचंड असहाय्यता, या सगळ्याने त्यांना खोलवर घेरलं होतं.

तपस्याचे वडील अनेकांचे दरवाजे ठोठावत फिरले, पण कुठेच काही उपयोग झाला नाही. शेवटी एका मित्राच्या मदतीने त्यांनी डॉ. शेटे यांच्याशी संपर्क साधला आणि तिथेच आशेचा किरण दिसला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कोकणातील खाजगी अभयारण्य… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ कोकणातील खाजगी अभयारण्य… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणपासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवली या गावातल्या नंदू तांबे यांच्या स्वत:च्या मालकीच्या सुमारे ३२ एकरांच्या जंगलाला ‘खासगी अभयारण्य’ हेच नाव समर्पक ठरेल. वास्तविक आज पर्यावरण या विषयात बरीच ‘अरण्यरूदनं’ सुरू आहेत. कुठे विकासप्रकल्पासाठी जंगलतोडीचा आदेश निघतो. त्याला स्थानिकांचा आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध होतो आणि मग अशी प्रकरणं कोर्टात जातात. यात धड विकासही होत नाही आणि पर्यावरणही सांभाळलं जात नाही.

पण अशा कुठल्याच भानगडीत न पडता कोकणातला एक माणूस गेली अनेक वर्षे तटस्थपणे सुमारे ३३ एकरांचं जंगल जपण्याचं आणि वाढविण्याचं काम करतोय. त्यांचं खरं नाव आहे निशिकांत तांबे; पण त्यांना ओळखणारी सगळी माणसं ‘नंदू तांबे’ याच नावाने ओळखतात. हे कोकणप्रांताचं एक गमतीशीर वैशिष्ट्य आहे. इथले लोक टोपणनावानेच ओळखले जातात. त्यात एक प्रेमभावना असते. गुहागरला गेल्यावर ‘निशिकांत तांबे कुठे राहतात?’ असं कोणालाही विचारलं तर पटकन सांगता येईल की नाही शंका आहे; पण ‘नंदू तांबे कुठे राहतात?’ असं विचारलं तर कोणीही सांगेल!

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं शिरवली गाव हीच नंदू तांबेंची जन्मभूमी आणि कर्मभूमी. खास कोकणी पद्धतीचं पारंपरिक कौलारू घर आणि एकत्र कुटुंब. पूर्वी त्यांची स्वत:ची १२-१३ एकर जंगलजमीन होती. आई गृहिणी तर वडील लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरी करत होते. नंदू तांबेंना लहानपणापासून झाडं, पक्षी, प्राणी यांची आवड होती. बारावीपर्यंत शिक्षण झालं. मुंबईत ते नोकरीसाठी आले होते, पण काही दिवसांतच गावाला परत गेले. कोकणातला सोन्यासारखा निसर्ग सोडून मुंबईच्या नको इतक्या वाढलेल्या लोकसंख्येत भर घालणं त्यांना पटलं नाही. अर्थात, कोकणात राहायचं म्हणजे अर्थार्जनाचं काहीतरी साधन बघावंच लागणार होतं. पण नंदू तांबेंचा सगळ्यात मोठा शहाणपणा म्हणजे मूळचं असलेलं जंगल सपाट करून त्यांनी तिथे हापूस आंबा, काजूची झाडं लावली नाहीत. जमीन घ्यायची, तिथलं मूळचं जंगल वणवे लावून वा जेसीबी लावून जमीनदोस्त करायचं, मग तिथे आंबा-काजूची कलमं लावायची, त्यांना पाणी घालायला बोअरवेल्स खणायच्या, दरवर्षी कलमांना वारेमाप खतं घालायची आणि फवारण्या करायच्या आणि एवढं करूनही बागायती परवडेनाशी झाली की मग जमीन विकून टाकायची, हे कोकणात सध्या प्रतिष्ठा पावलेले उपद्व्याप नंदू तांबेंनी कधीच केले नाहीत. जंगल हे जंगलच ठेवायचं, हा दृढनिश्‍चय होता. जंगलात फिरणं, झाडांची काळजी घेणं, पक्षीनिरीक्षण, अशा गोष्टींमध्ये त्यांना मनापासून आनंद वाटत होता.

बहुतांश लोक ‘पैसा कमविण्यासाठी मी काय करू?’ या चिंतेत असतात. त्याचे मार्ग शोधत असतात. यात अस्वाभाविक असं काहीच नाही, पण एक सिद्धांत असं सांगतो की, माणसाने आपल्या आवडीचं काम न कंटाळता चिकाटीने करत राहावं. लक्ष्मी त्याच्याकडे आपोआप चालत येते, हा सिद्धांत नंदू तांबे यांच्याबाबतीत तरी तंतोतंत खरा ठरला आहे. त्यांना आर्थिक उत्पन्नासाठी वेगळं काही करावं लागलं नाही. जंगलाची आवड जपता जपताच त्यांना अर्थार्जनाचा मार्ग सापडला. नंदू तांबेंच्या जंगलात पक्ष्यांना आश्रयस्थान मिळाल्यामुळे पक्ष्यांचा अधिवास पूर्वीपासून बर्‍यापैकी होता. पक्षीनिरीक्षणाची आवड असणारे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. मग आपण ‘जंगल पर्यटन’ व्यवसाय म्हणून का करू नये? असा विचार त्यांच्या मनात आला. ती कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि आज त्यात त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. ’’माझ्याकडे येणार्‍या पक्ष्यांनी मला जंगल वाढवण्याची संधी दिली.’’ असं ते आवर्जून सांगतात. निसर्ग जपणुकीचा चांगला विचार मनात ठेवून आपण काम करत राहिलं तर निसर्गही आपली काळजी घेतो, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.

जंगल पर्यटनाला सुरुवात केल्यानंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी आणखी जंगलजमीन विकत घेतली आणि मूळचं १२-१३ एकर असलेलं जंगल आज ३२ एकरांएवढं मोठं झालं आहे. मूळची झाडं टिकवून त्यांनी आणखीही झाडं लावली आहेत. जवळजवळ ८० ते ९० प्रकारची जंगली झाडं इथे पाहायला मिळतात. यात रायवळ आंबा, फणस, जांभूळ, सीता-अशोक, जंगली आवळा, चिंच, किंजळ, हरडा, बेहडा, अर्जुन, कळंब, कदंब, हसाणी, शिवण, कडू कवठ, बिब्बा, चाफा, नागचाफा, आपटा, सागवान, शिवण, पांगारा, काटेसावर अशी इतरत्र क्वचित दिसणारी झाडं इथे जपली गेली आहेत. काही झाडं दीडदोनशे वर्षांपूर्वीची, तर काही झाडं पाचशे वर्षांपूर्वीचीही आहेत. नंदू तांबेंचा स्वत:चा झाडांविषयी बारीक अभ्यास आहे. झाडाच्या सालीची जाडी आणि त्याचा घेर यावरून झाडाचं वय ओळखता येतं. सहा ते आठ मीटर एवढा मोठा घेर असलेली अनेक झाडं इथे पाहायला मिळतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांनी अडीच ते तीन हजार नवीन झाडं लावली आहेत. सुमारे २१८ पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. हे जंगल खर्‍या अर्थाने खासगी पक्षी अभयारण्य आहे. नंदू तांबे यांना स्वत:ला पक्षीनिरीक्षणाची आवड आहेच, शिवाय दूरदूरचे पक्षीनिरीक्षक इथे पक्षीनिरीक्षणासाठी येतात. ‘तिबोटी खंड्या’ हे इथलं विशेष आकर्षण आहे. हे जंगल म्हणजे खर्‍या अर्थाने आता ‘टुरिस्ट स्पॉट’ झाला आहे. खूप मोठ्या संख्येने आता पर्यटक आणि निसर्गप्रेमी इथे येतात. त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोयही केली जाते. नंदू तांबे स्वत: येणार्‍या माणसांना जंगल फिरून दाखवतात. झाडं, पक्ष्यांची माहिती देतात. याकामी त्यांचा भाऊ श्रीकांत तांबे याचीही मदत होते. वासिष्ठी नदीत आढळणार्‍या मगरी हेही इथलं खास आकर्षण आहे. मात्र मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जंगल पर्यटन करताना मानवी वावरामुळे जंगली प्राणी आणि पक्ष्यांच्या वावरावर विपरित परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. एकाच वेळी अनेक माणसं जंगलात न्यायची नाहीत, बरीच माणसं असतील तर छोटे छोटे गट करून त्यांना जंगलात न्यायचं, असे काही नियम त्यांनी घालून घेतले आहेत, जेणेकरून तिथल्या प्राणीपक्ष्यांना माणसांचं भय वाटणार नाही. नाहीतर आज अनेक शासकीय अभयारण्यांमध्ये ‘पर्यटकांचा अतिवावर’ ही समस्या बनली आहे. २०११-१२ मध्ये कोकण कृषी विद्यापीठाकडून या जंगलातील जैवविविधतेचा सर्व्हे करण्यात आला आणि या जंगलाला ‘अ’ दर्जा मिळाला.

निसर्ग माणसाला अनंत सेवा पुरवत असतो. निसर्गाची गरज माणसाला शेवटपर्यंत राहील. निसर्गासाठी माणसाने नेमकं काय करावं याबाबत नंदू तांबे यांचे विचार चिंतनीय आहेत. ते म्हणतात, ‘‘निसर्गाला माणसांची मुळीच गरज नाही. निसर्ग जपण्यासाठी माणसाने वास्तविक काहीच करण्याची जरूर नाही. निसर्गातला अवाजवी हस्तक्षेप मात्र थांबवला पाहिजे. ‘काहीही न करणं’ हेच खूप काही करण्यासारखं आहे. नवीन झाडं लावणं हे वरवर चांगलं वाटत असलं तरी गेल्या तीनचारशे वर्षांपूर्वीपासूनचा निसर्गाचा अनमोल ठेवा आपण त्याने भरून नाही काढू शकत. त्यामुळे वृक्षतोड थांबविण्याला पर्याय नाही.’’

नंदू तांबे हे खर्‍या अर्थाने जंगल जगलेलं व्यक्तिमत्त्व आहे. कोकणात कधी पर्यटनाला गेलोच तर अथांग समुद्रकिनारे, आंब्या-फणसांच्या बागा, मंदिरं हे सगळं जरूर पाहावं, पण चिपळूणपासून २२ किलोमीटरवर असलेलं शिरवली गावातलं नंदू तांबे यांचं हे ‘खासगी अभयारण्य’ मात्र चुकवू नये!

माहिती संग्राहक: अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आमचं जगणं वेगळंच… लेखिका: सुश्री शामली निंबाळकर नागपूरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ आमचं जगणं वेगळंच… लेखिका: सुश्री शामली निंबाळकर नागपूरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

फौजीची बायको म्हटली कि कायम जवानाचीच बायको हेच चित्र सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर येतं, म्हणजे त्यात काही वावगं नाही पण आज मला फौजीच्या बायको विषयी आणखी भरपूर काही सांगायचे आहे. मी शामली, एका फौजी डॉक्टरची बायको. माझा नवरा भारतीय वायुदलात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. आमचा तसा प्रेमविवाह, आणि लग्नाआधीच त्यांच्या सैन्यात जायच्या निर्णयाला माझा पूर्ण  पाठिंबा होता. आणि तसेच झाले सुद्धा ते सैन्यदलात भरती झाले.

आमचे लग्न झाले आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलले. माझ्या  बिनधास्त आणि निर्धास्त आयुष्याला शिस्त लागली. त्यांचा युनिफॉर्म, बूट, रँक, बेल्ट आणि सगळंच माझी जबाबदारी झाली. हळू हळू आयुष्य बदलत होतं. पण सगळ्यात आधी गेल्यावर  सिनियरच्या बायकोने समजावून सांगितलेली गोष्ट म्हणजे, “बघ शामली, फौजीशी लग्न केलस खरी पण त्याच्याकडून सामान्य नवऱ्या सारख्या अपेक्षा ठेऊ नको. कितीही काही झालं तरी पहिले त्याचे काम त्यानंतर त्याचा परिवार. आणि हि गोष्ट तुला मान्य करावी लागेल. आणि हो,  जे जसं आहे त्यात आनंदी राहायला शिकावं लागेल. “पुणे आमची पहिली पोस्टिंग त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची खोली मला नंतरच्या पोस्टिंग मध्ये कळली.

बंगालच्या एका अगदी छोट्याश्या कसब्यामध्ये आम्हाला  आमची  पुढची पोस्टिंग मिळाली. त्या गावामध्ये फक्त नेमकी दुकाने, आजूबाजूला  बकऱ्या, गाई आणि नुसती हिरवळ. राहायला घर नाही, एका खोलीत घर मिळत पर्यंत राहायचं आणि मुख्य म्हणजे संध्याकाळ झाली कि घरची दारं बंद ठेवायची कारण आजूबाजूला दाट जंगल असल्याने विंचू, साप आणि इतर प्राणी घरात येण्याची भीती असायची. तसे ते आजूबाजूला भटकत हि असायचे. सामान्य शहराच्या २० किलोमीटर अंतरावर स्टेशन असल्याने घरासाठी लागणाऱ्या साध्य  गोष्टींसाठी महिन्यातून एखाद्यावेळा बाहेर निघायचा योग यायचा ( नवरा एकुलता एक डॉक्टर असल्याने स्टेशन सोडून जायला परवानगी नव्हती.) आणि त्यातच मला धन्यता वाटायची.

पुण्याहून अश्या ठिकाणी आल्यावर चीड चीड झाली, रडायला आलं, पण यातून मी एक गोष्ट शिकले  कि थोडक्यात, आणि जे आहे त्यात समाधान मानण्यात खरा आनंद आहे. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपल्या माणसाची साथ सदैव असणं खूप महत्वाची असते, कारण थोड्या थोडक्यात आपल्या माणसासोबत अडीच वर्ष सहज काढता येतात पण त्याच्या पासून दूर राहून ते दिवस काढणं खूप कठीण असतं. हळू हळू सगळ्या सवयी बदलल्या, सामान्य माणसं बोअर होत म्हणून सिनेमा बघायला बाहेर फिरायला निघतात पण आम्ही बोअर झालं कि एकमेकांच्या घरी जात असू, आहे त्या घोळक्यात आनंदाने रमत असू.

एकमेकांच्या सणावाराला आवर्जून जात असू. आणि असे दिवस पार पडले. मग आलो अश्या ठिकाणी जे वायुदलाचे सगळ्यात मोठ्या स्टेशन्स पैकी एक होते. नवऱ्याशी सकाळी जे बोलणे झाले ते झाले नंतर सरळ रात्री ८ ला कधी ९ ला असा संवाद व्हायचा. इथे बाहेर ये जा करायला बरीच मुभा होती पण मग आमच्याजवळ तसा वेळ नव्हता. इथे राहता राहता दोन वर्षे पूर्ण होणारच होती तर येथून आमची पोस्टिंग थेट हार्ड एरिया मध्ये झाली. अश्या ठिकाणी कुटुंब नेता येत नाहीत अशीही ठिकाणे आहेत पण आमचं नशीबच कि आम्हाला इतक्या खडतर जागेवर सुद्धा सोबत राहण्याची संधी  मिळाली.

अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने येथून ‘फिरायला’ बाहेर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यापेक्षा कमी नाही. या आसपासच्या जागेत फक्त नयनरम्य दृश्यांशिवाय रमणीय वाटावं असे काहीही नाही. सध्या आम्ही जिथे राहतोय तिथे आठवड्यातून फक्त एकचदा भाजीपाला येतो. संपूर्ण आठवडा त्याच भाजीपाल्यांवर, फळांवर अवलंबून राहणे असते. वातावरण खराब असेल तर अगदी मोजकीच भाजी उपलब्ध असते, आणि आजूबाजूला संशयास्पद स्थिती असेल, रस्ते बंद असतील तर भाजी येईलच हे सुद्धा निश्चित नसते. ह्या आणि अश्या  बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला असामान्य गृहिणी बनवितात.

एका सैनिकाशी लग्न झाल्यावर त्या स्त्रीला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. त्यातली पहिली तडजोड म्हणजे तिच्या करियरशी असते. माझ्या ओळखीच्या बऱ्याच फायटर पायलटच्या बायका ह्या  इंजिनियर, डॉक्टर, सी ए, डेंटिस्ट, शिक्षिका असतात. पण लग्न झाल्यावर सतत बदल्या होत असल्याने त्या आपल्या करियर पुढे नेऊ शकत नाही आणि म्हणून तडजोड करून आणखी काही करता येईल का हा पर्याय शोधात असतात. आणि म्हणूनच आम्ही सगळ्या घर सांभाळून करता येणाऱ्या करियरचा पर्याय शोधतो. दुसरी तडजोड असते जी आमच्या नवऱ्यांचीही असते ती म्हणजे स्वतःच्या आई वडिलांपासून खूप दूर असणं.  चुलत्यांची लग्न, साक्षगंध, सणवार यासाठी आम्हाला सहज येत येत नाही. मुलांना सुद्धा शिस्तीतच वाढवायचे असते. त्यांना सख्खे मित्र मैत्रिणी बनवायची मुभा नसते, कारण सतत होणाऱ्या बदल्यांमुळे ते शक्य होत नसतं.

मात्र या सगळ्या तडजोडी आम्हाला नेहमीच सामान्यांपासून वेगळं सिद्ध करतात.  आम्हाला घराचा मोह नसतो कारण आमचं बिऱ्हाड सतत आमच्या पाठीवर असतं. मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत आम्ही आमचा संसार अगदी एका खोलीत किंवा सरकारी घराच्या ५ खोल्यांमध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे मांडू शकतो, आणि तेच आमच्यासाठी स्वतःच घर असतं.  खाण्यापिण्यात, राहणीमानात कुठे तडजोड करायची हे आम्हाला चांगलंच जमतं.प्रत्येक ठिकाणाहून नवीन अनुभव सोनार घेऊन जायचा. मात्र खूप अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आणि यासगळ्या अनुभवातून जात असताना सगळ्यात  जास्त कळते ती सोबत असणाऱ्या माणसाची किंमत कारण भीतीच्या पलीकडे जगणं हे आम्ही आमच्या नवऱ्याच्या डोळ्यात बघून शिकलेलो असतो. त्यांनी घेतलेल्या आजन्म सेवेची शपथ नकळत आम्हीही निभावतच असतो. आणि म्हणूनच आमचं जगणं हे इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. आणि हे जगणं समृद्ध करण्यासाठी आम्हाला कदाचित देवानि वेगळीच हिम्मत देऊन जन्माला घातलं असतं. असो, असे बरेच अनुभव आहेत जे सगळेच लिहिणं शक्य नाही पण आज हे लिहिताना एक नक्की सांगावेसे वाटते कि आपल्या जवळ जे आहे ते आणखी चांगलं कसे करता येईल याचा ध्यास ठेवा. कारण एका चांगल्या समाजाच्या जडण घडणासाठी चांगल्या दृष्टीकोनाची आवश्यकता असते आणि तो आपण नक्कीच ठेऊ शकतो. कारण हाच दृष्टिकोन घेऊन आपली पुढची पिढी चांगला समाज व देश घडवू शकेल.

जय हिंद!

लेखिका: शामली निंबाळकर नागपूरकर

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कथा पुण्यातील एका चौकाची…” – शब्दांकन : श्री बाजीराव जांभेकर  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “कथा पुण्यातील एका चौकाची…” – शब्दांकन : श्री बाजीराव जांभेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी एका महाकाय साम्राज्यात केले.

मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा संपूर्ण हिंदोस्तानात गाजत होता. अशाच वेळी अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चालून आला. दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली.

नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे… भाऊंच्या नेतृत्वाखाली होळकर, शिंदे, पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते.

दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती. एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते. याचवेळी भाऊंची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती.

अशाच एका खलबतात जनकोजी शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला. तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला. बघता बघता दहा सैन्य गारद केले.

पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले. पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्‍या जनकोजीला लांबूनच पहात होते. शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशिव भाऊंकडे परत आला. भाऊंनी त्याचा सत्कार केला. तसा जनकोजीनी भाऊंना प्रश्न विचारला. माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता.? आणि बळवंतराव काय करत होते, जरा विचारा त्यांना… त्यावरुन शब्दाला शब्द झाला. दरबार संपला… सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले.

पण बळवंतरावांच्या बायकोला दरबारातील घडला प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला. तिने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले. आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली. एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले. आर्यपत्नी म्हणाली, “या पराक्रम करुन आलात ओवाळते पंचारतीने.” आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात. बळवंतरावांनी मान खाली घातली. तसा पत्नीच्या तोंडाचा ताबा सुटला. ती म्हणाली, उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव.? एका नामर्दाचा.? की पळपुट्याचा.? लाज कशी वाटली नाही तुम्हाला.?

पत्नी ताडताड बोलत होती आणि बोलता बोलता म्हणाली, जा परत गिलच्यांना ठेचा त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका. जिंकून आलात तर ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन.

गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले. सरदशी हात तलवारीवर निघाला. बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकली. बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले. हर हर महादेव… जय भवानी… जय शिवाजी अशी आरोळी घुमली. अफाट कापाकापी सूरु झाली. गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते. बळवंराव त्वेशाने दांडपट्टे फिरवत होते. त्यांचे कान फक्त आकडे एकत होते. हजार… पाचहजार… आठहजार…. एकच कापाकापी… रक्ताचा चिखल अन् प्रेतांचा ढीग दिसू लागला. एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा, हलगीचा नाद घुमला. फिरणाऱ्या दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल. साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात… बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. प्रत्यक्ष स्वामी… फक्त माझ्यासाठी…! खरंच धन्य झालो मी आज… पण एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली. एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या… भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला. सदाशिव भाऊंनी त्या अचेतन देहाला मिठीच मारली. आदर्श प्रेमाच हे उदाहरण…

भाऊंनी देह मागे आणला. पानिपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली. बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली. त्या सती जाणार्‍या पत्नीला सदाशिवराव भाऊ सांगत होते. बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे. किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको. पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली. तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की, याचा सांभाळ आपण करा आणि मोठा झाला की,  एव्हडच सांगा त्याला… “तुझे आई वडील का मेले” हीच आठवण द्या. बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल. कारण तो वीराचा पुत्र आहे. पुढे १४ जानेवारी १७६१  पानिपतचा रणसंग्राम झाला. मराठे तळहातावर शीर घेऊन लढले. देशासाठी… धर्मासाठी… महाराष्ट्राची एक तरुण पीढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली.

पण पानिपतात जय मिळवून ही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची… अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला.

पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा… राष्ट्रभक्तीचा आणि १७७५-७६ च्या वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीला धडक दिली. पार सिंधूपर्यत भगवा रोवला… यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता. पानिपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता.

आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले… तो पोर म्हणजेच… लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा.

आप्पा बळवंत मेहेंदळे… आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा…

त्याच्या पराक्रमावर बहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली  करुन दिली आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नांव ठेवले गेले.

“आप्पा बळवंत चौक…”

या चौकाच्या नावाच्या निमित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे, स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्‍या सदाशिवरांवांचे आणि आई वडीलांचा शब्द साकार करणार्‍या त्या आप्पा बळवंतांचे… राष्ट्रासाठी स्वतःची आहूती देणार्‍या या सार्‍या वीरपुरुषांना दंडवत…!

******

‘आप्पा बळवंत चौक ‘ नावाचा आज अर्थ उमगला.

आजकाल मॉडर्न झालेली लोकं त्या चौकाला पुण्यात ‘ ABC चौक ‘ म्हणून पुकारतात. तसंही  नवीन पिढीने  सगळीकडे shortcut नावे कशी वापरता येतील याचा ध्यासच घेतला आहे.  पण त्यामुळे त्या ABC चे नाव अप्पा बळवंत चौक आहे याचा विसर पडायला नको एवढेच! असा आप्पा बळवंत चौक अनेक दिवसांपासून ठाऊक होता पण त्या नावामागे असा अफाट प्रचंड ताकदीचा इतिहास होता हे आज  लेखाच्या निमित्ताने समजले तेव्हा उर अभिमानाने भरून आला

शब्दांकन:- बाजीराव सुधाकर जांभेकर

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हत्तीची आजी – – ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हत्तीची आजी – – ☆ प्रा. भरत खैरकर 

कोकणामध्ये आंबोली घाट उतरून खाली गेलो की हिरण्यकेशी नदीचा उगम आहे.. तिथून अजून खाली उतरलो तर तिलारी नावाचा एक मोठासा जलाशय आपणास दिसतो.. आणि अजून खाली उतरलं तर मग गोवा बॉर्डर सुरू होते.काही अंतरावर कर्नाटक बॉर्डर  आहे. त्या निसर्गरम्य भागात राहणाऱ्या एका गावातील आजीची ही गोष्ट..

कोकणामध्ये पंधरा-वीस  वर्षापासून सारखा हत्तीचा धुमाकूळ आणि त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रातून  येतात.. आजीचे शेत  मुख्य गावापासून साधारण सात आठ किलोमीटर जंगलामध्ये.. तेथे आजी व आजोबाने एक झोपडी वजा राखण करण्यासाठी मचानासारखं घर बंद होतं.. बाजूलाच विहीर होती.. जंगलातील हत्ती कित्येक वर्षापासून आजी आजोबांना बघायचे.. आजी आजोबा सुद्धा.. हत्तींना सरावले होते.. विहिरीचं पाणी प्यायला मिळत असल्याने म्हणा.. किंवा त्या भागात हत्तींना सेफ वाटत असल्याने.. तोच त्यांच्या येण्या- जाण्याचा व विसाव्याचा मार्ग होता..  हत्ती बऱ्याचदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह आजीच्या ह्या घराजवळ बराच वेळ घालवायचे.. आजोबा आजी हत्तींचा हा कुटुंब कबीला लांबून निरीक्षण करायचे.. कधीही त्यांना ढोल बडवून किंवा मोठा आवाज करून.. फटाके लावून.. करंट लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही.. उलट त्यांच्यासाठी सुरक्षित असे वातावरण त्या ठिकाणी निर्माण केले..

एक दिवस दुपारी आजी आजोबा लांबून हत्तींना बघत असताना.. एक भली मोठी हत्तीण  जमिनीवर गडबडा लोळायला  लागली.. तिला वेदना होत होत्या असं वाटलं.. आणि थोड्याच वेळात.. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला..  तीन चार हत्ती तिच्या बाजूला घोळका करून बघत होते.. बराच वेळ झाला तरी हत्तीण जागेवरून उठत नव्हती.. त्यामुळे इतर हत्तीची  कासावीस वाढली होती..  ते काळजीपोटी मागेपुढे.. मागेपुढे  करत होते.. काय करावं त्यांना सूचना! आजीने हे लांबून बघितलं.. तिच्या लक्षात आलं.. शेवटी आजीही एक आईच होती.. तिने हिंमत करून  हत्तीजवळ जायचं ठरविलं.. आजोबा ‘नको.. नको’  म्हणत असतानाही आजी गेली.. तिने विहिरीतून दोन-तीन बदल्याभरून पाणी काढलं.. आणि ते पाणी बेशुद्ध झालेल्या हत्तीणीच्या सोंडेवर आणि अंगावर ओतलं.. थोडसं पाणी तिने हिमतीने.. सोंडेतही टाकण्याचा प्रयत्न केला.. आणि काय आश्चर्य पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये हत्तीण उठून उभी झाली.. हत्तीणीच्या डोळ्यांमध्ये एक कारुण्य भाव होता.. नंतर तो कळप थोड्याच वेळात जंगलात निघून गेला.. आजी आणि आजोबाही  आपल्या गावात आले..

दरम्यानच्या काळात कोरोना संकट आल्याने.. दोन अडीच वर्ष.. कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते.. शिवाय आजीचीही तब्येत बऱ्यापैकी खालावली होती.. कारण नेहमी रानात फिरणारे आजी आजोबा कोरोना पायी घरात बसून बसून अजून थकले होते.. खेड्यातील माणसाला विशेषता रानातल्या माणसाला.. रानाशिवाय कसं जगवेल..? पण त्यांचं रानात जाणं मात्र बंद झालं होतं..

बऱ्याच दिवसानंतर.. गावातलाच एक गुराखी खूप घाबरत घाबरत आजीकडे आला आणि म्हणाला,” आजी तुमच्या जंगलातल्या घराकडे रोज दहा-बारा हत्तीचा कळप येतो.. तो तुमचं घर पाडणार आहे.. आम्ही हाकलायचा खूप प्रयत्न केला.. पण ते काही तिथून हलत नाही.. रोज दुपारी तुझ्या झोपडीजवळ त्यांचा राबता असतो.. बघ काहीतरी कर जंगलच्या लोकांना सांग.. नाहीतर तुझा घर काही रहायचा नाही.. काहीतरी सुतळी बॉम्ब वगैरे लाव.. फटाके वगैरे फोडून  हाकलून देऊ आपण त्यांना..” असं मनात गुराख्याने उपाय सुचविला.. आजी म्हटली” अरे हो, गप कि जरा! मला बघू तर दे!”

” उद्या जाते मी रानात अन् बघते काय करायचं ते?”  असं सांगून आजीने त्या गुराख्याला त्याच्या घरी पाठवलं..

दुसऱ्या दिवशी आजी आजोबा सह अडीच तीन वर्षानंतर पहिल्यांदा जंगलातील  शेतावर गेली.. तिला हत्तींची दुपारची येण्याची वेळ माहिती होती.. तोच वेळ तिने साधला.. आणि गेल्यावर पाहते तर काय.. आता दहा-बारा हत्ती होते.. त्यातला एक हत्ती आजीला पाहताच.. पुढे येऊन आपली सोंड वर करून “जणू इकडे ये.” असं सांगतो आहेस वाटत होतं.. आजीने ओळखलं ही हत्तीण तीच होती.. जिला आपण पाणी पाजलं होतं.. ती आपली सोंड सारखी.. कधी आजीकडे तर कधी छोट्या पिलांकडे करत होती.. जणू ती आजीला आपलं मूलं दाखवीत होती.. आणि जवळ येण्यासाठी सारखी सोंड खालीवर करून आजीला बोलवत होती..!

आजोबा ‘नको.. नको’ म्हणत असतानाही.. आजी हिंमत करून पुन्हा त्या हत्तीणीपाशी गेली.. तर आश्चर्य.. हत्तीणीने   सोंडेने आजीला स्पर्श करत.. आपल्या छोट्या बाळाच्या दिशेने हलकसं ढकललं.. जणू काही “हा तुझा नातू आहे बघ!” असंच काहीसं त्या हत्तीणीला सांगायचं असेल.. आजीनेही मग त्या छोट्या हत्तीच्या   पाठीवरून हात फिरवून  त्याला  अंजारलं..गोंजरलं.. विहिरीतलं तीन-चार बादल्या पाणी काढलं.. छोट्या हत्तींना पाजलं.. पाणी पिऊन झाल्यावर पुढच्या काही क्षणातच संपूर्ण कळप जंगलाच्या दिशेला निघाला.. आजीही आपल्या घरी आली..

तिने पुण्यातल्या आपल्या सॉफ्टवेअर  इंजिनीयर  असलेल्या नातवाला फोन करून सांगितलं, ” बाबू, आपल्या रानात हत्ती आले आहेत.. आपल्या शेतात राहतात.. तुला बघायचे असतील तर तू दिवाळीमध्ये ये.. तुला दाखवते मी हत्ती जवळून..!”

आजीचा हा फोन ऐकून नातवाला आश्चर्य वाटलं. तो सुरुवातीला आजीवर रागावला.. “कशाला ह्या गोष्टी करतेस.. हत्ती पिसाळला वगैरे तर ठेवेल कां तुला?”

वगैरे समजावलं.. पण आजीच म्हणाली, “अरे, तू डरपोक की काय?  मला नाही भीती वाटत.. तू ये तुझा कॅमेरा घेऊन.. वाटल्यास लांबच उभा रहा आणि माझा फोटो काढ बरं हत्ती आणि त्याच्या पिला सोबत…!” तेवढाच तुला फेसबुक का काय म्हणतात त्याला स्टेटस ठेवायला बरं.. नाहीतर रिल बनवायला बरं..” म्हणून आजीने फोन ठेवला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेलो तरी असेन मी..! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ गेलो तरी असेन मी..! ☆ श्री संभाजी बबन गायके 

राम चाले वाटे… लक्ष्मण झाडी काटे! आजीच्या मांडीवर डोकं टेकवून त्या दोघांनीही आजीच्या गोष्टींत कधीतरी हे शब्द ऐकले असावेत. प्रभू रामचंद्र यांच्या पदरी वनवासाचा निखारा पडला… तोच निखारा आपल्याही पदरात बांधून घेणारा लक्ष्मण हे बंधूप्रेमाचे एक महान उदाहरण म्हणून जगाने स्मरणात ठेवले आणि पुढच्या पिढ्यांना सांगितले!

वनातली वाट म्हणजे पायांची कसोटी पाहणारी… अणकुचीदार दगड, टोकदार काटे यांचे आच्छादन असते या वाटांवर. प्रभू याच वाटेवर चालू लागले… सीतामाई त्यांचे अनुसरण करीत निघाल्या होत्या… धाकटे लक्ष्मण यांचे सारे ध्यान या दोघांच्या पायांकडे लागून राहिलेले होते… या चरणकमलांना इजा होता कामा नये! लक्ष्मण पुढे झाले… त्यांनी वाटेलगतची झुडपे तोडून त्यांचा झाडू बनवला… आणि ते प्रभूंच्या पुढे झाले…. खाली वाकले आणि त्यांनी मार्ग निष्कंटक करायला आरंभ केला! भावाने आपला बंधूभाव असा प्रकट केला आणि सा-या जगाला एक उदाहरण घालून दिले!

पण कलियुगात कुणी कुणाचे राहिले नाही…. पण कुठेतरी एखादे राम… एखादे लक्ष्मण मात्र जन्म घेत होते… असेच एका आईच्या पोटी दोघे जन्मले… पण इथे थोरल्या रामाने धाकटया लक्ष्मणाचा मार्ग निष्कंटक केला… स्वत:च्या पायांत काटे रुतवून घेत!

निसर्गाने मानवाला दोन मूत्रपिंडे प्रदान केलीत. एक नादुरुस्त झाले तरी दुस-यावर काम सोपवता येते. पण जेंव्हा दोन्ही निकामी होतात… तेंव्हा देह अंतर्गत विषबाधेने जेरीस येतो आणि त्याचा अकाली अंत होतो. वैद्यकशास्त्रात प्रगती होत गेली, विविध प्रयोग होत गेले. एका देहातील अवयव दुस-या देहात प्रत्यारोपित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली… आरंभी प्राण्यांचे मूत्रपिंड माणसाच्या शरीरात बसवण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. मानवी शरीर बाहेरचे काहीही लगोलग स्विकारत नाही! एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन शरीरे मात्र याबाबतीत एकमेकांना पूरक ठरू शकतात… कारण रक्ताचे नाते अधिक जवळचे! १९५४ मध्ये रोनाल्ड आणि रिचर्ड हेनरिक या जुळ्या भावांवर हा प्रयोग झाला… डॉक्टर जोसेफ मरे, डॉक्टर जॉन मेरील, डॉक्टर हॅरिसन यांनी रोनाल्डची एक किडनी काढून रिचर्डच्या शरीरात बसवली…. आणि रिचर्डला पुढे आठ वर्षांचे वाढीव आयुष्य लाभले! पण यासाठी रोनाल्डने सुद्धा रिचर्डएवढ्याच वेदना सहन केल्या!

एक अवयव काढून दुस-या शरीरात बसवणे ही प्रक्रिया दाता आणि स्वीकारकर्ता या दोघांनाही सारखीच वेदनादायी प्रक्रिया असते.

आजपासून बत्तीस वर्षांपूर्वी असेच एक प्रत्यारोपण झाले.

मोठ्या भावाने धाकट्याला त्याचं एक मूत्रपिंड (किडनी) दिली. साधारणत: १९९३ मधील ही गोष्ट असावी. त्यावेळी आजच्या इतकी अवयवदान जागृती आणि आधुनिक साधनेसुद्धा नव्हती. उपचारांसाठी शहरात जावे लागे! धाकट्या भावाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झाले! एकच पर्याय होता…. मूत्रपिंड प्रत्यारोपण!

 अशावेळी थोरले बंधू पुढे सरसावले… केवळ भावावरील निस्सीम प्रेमापोटी हे दान झाले… दान नव्हे जीवनदान…. पंधरा वर्षांच्या श्वासांचे दान.

 महर्षि दधिची यांचे येथे स्मरण होते…. एका भयावह असूराशी लढण्यासाठी देवांना एका वज्राची गरज होती… आणि ते वज्र केवळ हाडांपासून बनवण्यात येऊ शकत होते… यासाठी देवांनी दधिची यांना प्रार्थना केली… आणि महर्षि दधिची यांनी देहत्याग केला! त्यांच्या हाडांपासून वज्र बनवले गेले आणि त्या असूराचा नाश केला गेला! पुढे महर्षींच्या उर्वरित हाडांपासून गांडीव, पिनाक आणि सारंग नावांची धनुष्ये बनवली गेली, असे पुराणात सांगितले जाते!

ऋषींनी दान देण्याची रीत समाजाला समजावली… लक्ष्मण यांनी सेवेचा, त्यागाचा मार्ग अवलंबला!

माऊली ज्ञानोबाराय म्हणतात.. येथ वडील जे जे करिती, तया नाम धर्म धर्मु ठेविती… तेचि येर अनुसरिती सामान्य सकळ! वडील म्हणजे मोठी माणसे जे काही करतात त्याचे अनुकरण सामान्य माणसे करीत असतात. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या मातोश्री म्हणाल्या होत्या.. “केवळ माझे मूत्रपिंडच नव्हे.. तर गरज पडली तर माझे सर्व अवयव घ्या.. पण माझ्या मुलाला वाचवा! “

आपल्या या प्रस्तुत सत्य कहाणीमधल्या थोरल्या भावाच्या रक्ताने धाकट्या भावाच्या रक्ताचा गंध जाणला… एकाच मुशीत तयार झालेले हे दोन जीव… एकमेकांशी यांनी जुळवून घेतले… शरीराने हा नवा अवयव स्वीकारला… धाकट्याचे जीवन पंधरा वर्षांनी वाढले… त्याचा संसार झाला! ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकऱ्याने, त्याकाळी मर्यादित साधने असताना हे धाडस केले होते.. ही मोठी गोष्ट होती.

इकडे एकाच किडनीवर थोरल्या बंधूंची मदार होती. आता त्यांना स्वतःच्याही तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागणार होती. शेतातली कामे तर होतीच. मुले अजून हाताशी यायची होती. पण आपले घर अजून एकसंध आहे याचे समाधान पदरी होते. या सर्व गदारोळात पत्नीने जणू जबाबदारीच्या धनुष्याला स्वतः प्रत्यंचा लावली होती… आणि ते पेललेही.

त्यांनी आयुष्याला निर्धारित वळण लावून घेतले. नवा जन्म लाभलेल्या बंधूंनी सुद्धा आहार विहार सांभाळला, पथ्यपाणी कसोशीने पाळले. थोरल्याने अध्यात्माची कास धरली. हरिपाठ, भजन यांत हजेरी नियमित ठेवली… एक एक दिवस कारणी लावला. पाऊस असला तरी घराच्या ओसरीत ठरवलेली पावले चालण्याचा नेम चुकवला नाही… पावले मोजण्यासाठी जपमाळ हाती घेतली… स्वार्थाच्या जोडीने परमार्थ साधला जाऊ लागला!

कालांतराने धाकट्याची प्राणज्योत मालवली… तो आघात सोसला आणि संसाराचे ओझे खांद्यावर पेलले!

पुढे देहाने वार्धक्य अंगिकारले.. वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्षे उलटली…. संसार मार्गी लागला होता… कन्यादानाचे पुण्य लाभले होते.. दोन्ही चिरंजीव शेतीत, जबाबदारीच्या नोकरीत स्थिरावले! नातवंडांचा गराडा अवती भवती होता… काळया आईची सेवा धनधान्य देत होती.

पण.. निसर्ग आपल्या वेगाने पावले टाकीत आला… शरीर आणि अवयव आता थकत चालले होते…. देहावसान अपरिहार्य!

वेदना झाल्या.. मात्र आधुनिक उपचार, कुटुंबियांची सेवा यामुळे अंतकाळी त्या सुसह्य झाल्या!

दादा म्हणत सर्वजण त्यांना.. दशक्रियेच्या दिवशी हजारोंनी समाज लोटला… प्रत्येकाने हीच भावना व्यक्त केली… कीर्ती रुपे उरावे ते असे!

बत्तीस वर्षांपूर्वी जी आर्थिक, सामाजिक, मानसिक परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाला असलेला धोका पत्करून धाकट्याचे प्राण वाचवण्याची हिंमत दाखवणे किती जिकिरीचे असेल.. याची कल्पनाच करता येईल… ज्यांनी हे प्रत्यक्ष भोगले त्यांच्या जीवालाच त्या कळा ठाऊक!

सोपानरावांना हे जग सोडून आता वीसेक दिवस झाले असतील… पण त्यांच्या दातृत्वाचा, बंधुप्रेमाचा आदर्श पुढील कित्येक पिढ्यांना पुरेल असाच ठरेल!

(माझे आप्त कैलासवासी सोपानराव सखाराम गोगावले यांना नुकतीच देवाज्ञा झाली… त्यांच्या दातृत्वाला वंदन करण्यासाठी हा लेखन प्रपंच. यानिमित्ताने अवयवदान करणाऱ्या, प्रेमासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सर्वांना नमस्कार! दादांना भावपूर्ण श्रद्धांजली… राम कृष्ण हरी)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares