मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆”तो ‘मित्र’…” –  लेखिका : डॉ. ज्योती तोरसकर  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तो ‘मित्र’…” –  लेखिका : डॉ. ज्योती तोरसकर  ☆ सुश्री प्रभा हर्षे

 – – – मनाचे आश्रयस्थान, विसाव्याची जागा, ज्याच्या आधारावर अस्तित्व टेकवावे — तो ‘मित्र’.

मैत्रीच्या व्याख्या कराव्या तेवढ्या कमी. प्रत्येक मैत्रीचं स्वरूप निराळं, स्थान निराळं, गंध निराळा, अस्तित्व निराळं. त्या-त्या ठिकाणी, त्या-त्या वेळी सर्वोच्च स्थानावर असणारी ही मैत्री — अगदी अनादिकालापासून.

नाती तयार होण्याआधी, कुटुंबव्यवस्था आणि त्यातील काटेकोर बंधना पूर्वीही माणसाला एकमेकांविषयी जे काही वाटत असेल, ते नातं मैत्रीचं असणार… सहवासाच्या वेलीवर सहज फुलणार, सतत सोबत असणार, आपलंसं वाटणारं. कोणतीच बंधनं नसणार, पण अनेक भावनिक बंध असणार.

पुराणांपासून इतिहासातील अनेक कथांमध्ये, ग्रंथांमध्ये मैत्रीची सर्वोच्च उदाहरणं दिसतात. पण जेव्हा स्त्री आणि पुरुषाची मैत्री असते, तेव्हा मात्र भुवई थोडी तिरकी होतेच.

अशा या तिरक्या भुवयांना आणि डोळ्यांना वरील छायाचित्र किती बोलकं उत्तर देतं! मैत्री किती प्रगल्भ आणि एकमेकांना समृद्ध करणारी असू शकते, हे त्या भावनिक, प्रेमपूर्वक, उत्साहाने दिलेल्या आलिंगनातून उमगते.

हे आलिंगन दिले आहे पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी, आणि चार मानद डॉक्टरेटने अलंकृत झालेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सम्राज्ञी गंगूबाई हनगल यांनी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न मित्र उस्ताद बिस्मिल्ला खान यांना.

काय असेल या आलिंगनात? ..

मित्रा, तुझ्या पवित्र सुरांमुळे कजरी, चैती, पूरबीचं चैतन्य मी अनुभवले. तुझ्या संगीताचा साज माझ्या सुरांना मिळाला म्हणून आज ठुमरी रंगली. परिपूर्णतेचा अद्भुत क्षण, सख्या, फक्त तुझ्या साथीमुळे गांधारीला दिसला… तुझ्यासोबत.

 हे संगीताचं जग निराळं; इथले नियम धारदार.

सख्या, जगाला सुरांची किंमत होती, पण सनईची नव्हती.

घराबाहेर, वाड्याबाहेर वाजणारी ही सनई… तू शीर्षस्थानी नेऊन ठेवलीस. कन्हैरा रागाने तू धर्माच्या भिंती सुरांनी भेदू शकतात हे दाखवून दिलंस.

स्त्रीचं गाणं हे असंच — अनेक मर्यादांनी परंपरेने बांधलेलं. अशा वेळी सुरांच्या चौकटी विस्तारित करताना, प्रगल्भ करताना तू मला वेळोवेळी साथ दिलीस. कधी अबोलपणे, कधी सुरातून तू समर्थपणे पाठीशी उभा राहिलास…

स्वर्गीय सुरांच्या परिपूर्णतेचा अद्भुत क्षण, मित्रा, फक्त तुझ्या साथीमुळे!

म्हणूनच हे प्रेमपूर्वक, आदरयुक्त आलिंगन.

सखे, स्वरगंगे, अमृतगंगे,

गंगा तीरावरील माझ्या सुरांमध्ये तुझा स्वर मिसळल्याने

मी अधिक सकस आणि प्रगल्भ होत गेलो.

तुझ्या स्वरलयीचा साक्षात्कार मी अनुभवतो आहे.

सौजन्य मूर्ती असणारी तू — गाण्यातील स्त्रियांची बंधनं अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने झुगारून, हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचे नवे मापदंड तयार केलेस.

गंगालहरी गांधारी तू, सुरांची दिव्यदृष्टी दिलीस.

गंगेच्या पुत्राकडून तुला हे भावयुक्त, प्रेमपूर्वक आलिंगन!

खरंच, संगीताला नसतातच बंधनं — लिंगाचं, धर्माचं, भाषेचं, देशाचं! या सगळ्याच्या पलीकडे म्हणूनच, ही मैत्री आणि हे आलिंगन स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडचं.

मैत्री ही अशीच असते.

म्हणूनच ज्ञानी, पराक्रमी, सुंदर, प्रगल्भ असे पाच पुरुष सोबतीला असतानाही, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं,

ज्याचा हात हातात घेऊन राग-अपमान भडभडून सांगावसं वाटतं —पतिव्रता द्रौपदीला वाटतो तो सखा कृष्ण.

घरात भाईंसारखा, जगाला हसवणारा, बडबडणारा आनंदघन असतानाही, ज्याच्याशी मनातलं सारं हळुवार बोलावं असं सुनीताबाईंना वाटतं, ते म्हणजे जगापासून अलिप्त असणारे जी. ए. कुलकर्णी.

त्यांची पत्रं — हा एक काव्यात्मक अनुभव, मैत्री — संवेदनशील, चिंतनशील, मनोज्ञ! दोघांचे प्रतिभा आणि व्यासंग अफाट, म्हणूनच अशी मैत्री ही सामान्य परिप्रेक्षे पलीकडची.

मैत्री हे नातंच असं आहे —

अधिक नाजूक, अधिक तरल.

अत्यंत धूसर अशी सीमारेषा असणार,

म्हणून दोन्ही व्यक्ती तशाच हव्या —

तरच हे बहुपदरी, बहुरंगी नातं अधिक प्रगल्भ आणि सहवासाने अधिक पवित्र होत जातं.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखिका : डॉ. ज्योती बुवा तोरसकर 

(• राग कन्हैरा : कुंभमेळ्यात पं. बिस्मिल्ला यांनी सादर केलेला नवीन राग

  • गंगापुत्र : बिस्मिल्ला खा
  • गांधारी : गंगुबाईंचं नाव
  • गंगालहरी : गंगुबाईंनी स्थापन केलेले संगीत विद्यापीठ)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “विचारांचे विश्लेषण.. का गरजेचे??…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “विचारांचे विश्लेषण.. का गरजेचे??…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

*मी जे कष्ट केले ते माझ्या मुलांना करायला लागू नये. * – – हा विचार बरोबर आहे का??

अजय, ताई भाऊजींचा एकुलता एक मुलगा. ताईचा परिवार मध्यम परिस्थितीचा. भाऊजी स्वभावाने खूप चांगले, सांपत्तिक स्थिती मात्र बेताचीच. पण ताई अजयला काही कमी पडू नये, याची भाऊजी नेहमी काळजी घ्यायचे. सगळी बचत स्वतः वरच करायचे. एकंदरीत मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. अजयच्या शिक्षणासाठी नेहमी लक्ष दयायचे. तो म्हणेल तशी मदत करायचे.

अजयने पण कधी हट्ट केला नाही. छान अभ्यास केला. इंजिनीअर झाला. आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी करतोय. •••

ताई शांत स्वभावाची होती. कधी तक्रार केली नाही. पण अनेक लहान सहान इच्छा तिच्या राहूनच गेल्या. •••

अजयने घरात नेहमी पैशाची चणचण बघीतली म्हणून त्याची एक वेगळयाच प्रकारची मानसिकता तयार होत गेली. •••

“मी खूप पैसे कमवेन. माझ्या परिवाराला खूप आनंदात ठेवेन‌. माझ्या मुलाला काही कमी पडू देणार नाही. एवढा पैसा एकत्र करेन की माझ्या सारखे कष्ट करायची गरज त्याला पडणार नाही. वगैरे वगैरे तो नेहमी म्हणत असे. “

भाऊजी यावर काहीच बोलत नसत. त्यांचा conscious clear होता. त्यांचे जेमतेम शिक्षण, त्यानुसार नोकरी आणि त्याच प्रमाणात त्यांनी प्रामाणिक कमाई आयुष्यभर केली. कष्ट केले. काटकसर केली. त्यांना माहीत होते, ••• अजयचा प्रगतीचा मार्ग म्हणजे त्याच शिक्षणच आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिल. तेथे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष केले नाही. ••• 

आपली बौद्धिक, सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण हे एक अचूक आणि प्रभावशाली शस्त्र आहे. हे भाऊजी समजून ह़ोते. अजयने पण मेहनत केली. आणि आज त्याचे परिणामही दिसतायेत. •••

बरोबर आहे 

Patience and hard work is a key that connects efforts to success.

मग अजयचे हे विचार, •••

“मी जे कष्ट केले ते माझ्या मुलाला करावे लागू नये ” •••

ते बरोबर आहेत का??

आज त्याच्या मेहनतीनेच तो या स्टेजवर पोहचला आहे. •••

कष्ट करून मिळालेल्या पैशाचे महत्व आणि किंमत तो ओळखून आहे. •••

आणि असा किती पैसा जमवून ठेवणार आहे अजय? म्हणजे आयुष्यभर मुलाच्या हातात त्याला जे लागेल, तो जे मागेल ते देणार का?

पैसा वापरायची आणि सांभाळायची अक्कलही असावी लागते. •••

मुलांना खर्च करायची सवय लागेल, पण पैसा कमवायची आणि पैसा कुठे आणि कसा वाचवायचा?? हे शिकणे राहून जाईल. •••

अजयच्या तुलनेत त्यांच्या मुलाची परिस्थिती चांगलीच राहणार आहे. •••

जेंव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून आपण जातो तेव्हा आपली मानसिकता तयार होत असते. ‍•••

म्हणतात ना, ••••

“Reactions r based on one’s past memories, but conclusion and Response is a conscious process in present moments. “

आज ताई म्हणाली, •••

अरे अजय!! तुझे असे विचार मला पटत नाहीत. आपण कोणत्या आई वडीलांच्या पोटी, कोणत्या देशात, कोणत्या सामाजिक परिस्थितीत जन्म घ्यावा?? हे आपल्या हातात नसतच. •••

आपल्या घरात खूप आधुनिक सुखसोयी नव्हत्या. म्हणजे अगदी तुला अभ्यासासाठी वेगळी खोली वगैरे नव्हती. तुला तबला शिकायचा होता पण तो खर्च आपण करू शकत नव्हत़ो. हे मान्य आहे. परंतु तुझ्या मेहनतीने तू चागला शिकला. आज आपली परिस्थिती चांगली आहे. कष्ट केल्याशिवाय हे सर्व घडल का? •••

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कस वागाव? , कस जगाव? याचे प्रशिक्षण / धडे आपल्याला कष्ट केल्यावर, चालताना पडल्यावर, आयुष्यात नकार ऐकल्यावर, अपयशाचा सामना झाल्यावर होणाऱ्या दुःखामुळेच शिकायला मिळतात. •••

तुम्ही मानसिक दृष्ट्या मजबूत होता.

मानसिक सामर्थ्य हा एक महत्वाचा गुण आहे. आयुष्यात येणारे अडथळे, संकट अपयश यांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता असलीच पाहिजे. आपले भावनिक व्यवस्थापन करता आले पाहिजे. शाळा कॉलेजचा अभ्यास, डिग्री नोकरीसाठी आवश्यक आहे. परंतु अनुभवांची ठोकर लागल्याशिवाय आयुष्याचं गणित सोडविता येत नाहीत. •••

Psychology of adjustments should be taught in every branch of learning from childhood. •••

आज तुझी प्रगती बघून आम्हाला आनंद आहे. आपली मुल आपल्या पेक्षा दोन पावलं पूढे गेली ही आई वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते.

तू खूप पैसे कमव. परंतु आपल्या मुलांना कष्ट करायची सवय असलीच पाहिजे. तुझ्या पेक्षा दोन पावलं पुढे जायला त्याला तू आधार नक्की दे. त्यांना नाही ऐकायची सवय असलीच पाहिजे. •••

खरतर तूझे स्वकर्तुत्वाने मिळालेले यश हीच गोष्ट तुझ्या मुलांसाठी प्रेरणा असेल. •••

किती तरी मोठे बिझनेस मॅन, खेळाडूंनी शुन्यातून स्वतः चे जग तयार केले आज त्यांच्या यशोगाथांची उदाहरण देतात. हे सर्व मेहनतीशिवाय झाले का?? •••

आयुष्यातील लहान संकटे, पूढे येणाऱ्या मोठया संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळण्यासाठीच निर्मित झालेली असतात. ••

वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो. त्या काळात एवढे शिकायला मिळते की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते. •••

मुलांना आधार द्यावा, जमेल तेवढ्या सुखसोई द्यावा. परंतु पैशाची किंमत आणि कष्टाची सवय त्यांना असलीच पाहिजे. •••

तेंव्हा तुझे विचारांचे विश्लेषण कर. विचार कर.

बघ पटतंय का?

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वर्णमयी – लेख क्र. ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वर्णमयी – लेख क्र. ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

लहान वयात ओंजळीत मावणार नाही एवढं ऐश्वर्य मिळालं की हातात व्यसनांचा चषक देऊन ओंजळ रिकामी करणारे खूप भेटतात. चांगल्या वाईटाची समज नसते. आपला मित्र कोण आणि शत्रू कोण ओळखायला डोळ्यावर धुंदीचा पडदा असतो. कधीतरी या गोष्टीचा पश्चाताप झाला, तरी आपण या चक्रातून कधीच सुटू शकणार नाही ही जाणीव बोचत राहते व माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. असंच काहीसं माझे पती, कासीमबाजारचे‌ महाराजा, कृष्णनाथ यांचं झालं.

माझं नाव वडिलांनी शारदा सुंदरी ठेवलं होतं. कां, ते मात्र कळलं नाही कारण सुंदर मी पाळण्यातही दिसली असेन पण शाळा, शिक्षण यांचा वाराही जिथून वाहत नाही तिथे शारदा कुठून जन्माला येणार होती? पण नाही, परिस्थितीनं नावातील शारदा हा शब्दही खरा करून दाखवला. लग्नानंतर मात्र माझ्या तेजस्वी कांतीला पाहून स्वर्णमयी हे नाव ठेवलं असावं. ते कसं ठेवलं, कां ठेवलं हे विचारण्याइतका पतीचा सहवास व प्रेम मिळालंच नाही.

लग्नाच्या वेळी मी अवघी नऊ दहा वर्षाची होते. गरीब घरातून आलेली. इथली पडदा पद्धत, राजघराण्याच्या रूढींची ओळख अंगवळणी पडण्यापूर्वीच मातृत्वाची जबाबदारी आली. पती घराबाहेर काय करतात हे समजणे शक्य नव्हतं आणि ते समजून घ्यायला हवं ही जाणीवही नव्हती. माझ्या अंगावर दोन मुलींची जबाबदारी टाकून त्यांनी माझा हात सोडून दिला. आणि त्या क्षणी मी प्रौढ झाले. अवघ्या १६_१७ वयाची विधवा!

घराण्याला वारस नव्हता. त्यामुळे राज्याला राजाच नाही, म्हणून सगळी जहागिरी सरकार जमा करण्यास व राज्य ताब्यात घेण्यास ब्रिटिश सरकार तयारच होते. त्यात आत्महत्या करणे हा गुन्हा होता त्याची शिक्षा म्हणूनही जहागिरी सरकार जमा होणार होती. त्यातच महाराजांनी आधीच मृत्युपत्र तयार केले होते आणि आपली सगळी संपत्ती नोकर म्हणून असणारा केशव सरकार याच्या नावे केली होती. त्याशिवाय इतर काही मित्रांनी अशी कागदपत्रं दाखवली की त्यात त्यांच्या नावे जहागिरीचा काही भाग केला होता. माझ्यासाठी हे सगळे एकावर एक धक्के होते. सोसाट्याचा वारा सुटला की वाळलेली पाने गळून पडतात, मला देवानं असे एक एक धक्के दिले की माझी सारी कोवळी स्वप्ने गळून पडली.

एकच गोष्ट लक्षात आली ती म्हणजे दोन्ही मुलींना घेऊन राजवाडा सोडून रस्त्यावर भीक मागावी लागणार आहे त्या क्षणी खडबडून जागी झाले. आणि ठरवलं, आता धैर्य आणि मुत्सद्देगिरी हेच गुण आपल्याला तारणार आहेत. पहिली गोष्ट करावी लागली ती म्हणजे साक्षर होणं! नाही म्हणायला एक सुखाचा धागा होता तो म्हणजे आमचे वयोवृद्ध दिवाणजी मथुरानाथ बॅनर्जी. त्यांनी मला साक्षर केलं. बांगला, संस्कृत, फारसी, इंग्रजी चार भाषा शिकायला मदत केली. ते म्हणाले, मी तुला बापासारखा आहे. काळजी करू नकोस. आपण दोघे झटून हे राज्य टिकवूया, अबाधित ठेवूया. आणि माझा कायद्याचा अभ्यास सुरू झाला. एका मागोमाग एक खटलेही सुरू झाले. पतीच्या निधनानंतर वारस नसेल तर अधिकार पत्नीला मिळायला हवेत यासाठी मी राणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहीलं. त्यांनीही माझ्या मताला दुजोरा दिला आणि मला या सगळ्या खटल्यातून सही सलामत सुटता आलं. मृत्युपत्रे अनेक मिळाल्यामुळे त्यावेळी महाराजांची मानसिक स्थिती ठीक नव्हती हे सिद्ध करून सर्व मृत्युपत्रे बेकायदेशीर ठरवली. आणि मी बंगालची बेताज, अनभिषिक्त राणी झाले.

थोडी सावरायला सुरुवात होत होती, पण धक्क्यांची मालिका सुरूच होती. लहान मुलीचा थोड्याशा आजाराने मृत्यू झाला. मोठ्या मुलीचे लग्न झाले तिला एक मुलगी ही झाली. आणि तिच्या अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले. एक बाकी नियतीनं ठरवलं होतं की दुःखं कोसळायला लागली की त्यांना कुरवाळत बसायला मला वेळच द्यायचा नाही. उलट खडबडून जागं करायचं. आमच्या जावयांनी, आपल्याला पत्नीचा म्हणजे माझ्या मुलीचा व त्यांच्या मुलीचा जहागिरीतील वाटा मिळावा म्हणून खटला दाखल केला. हाही खटला मी जिंकला पण आता मी जास्तच एकटी पडले.

दरम्यानच्या काळात मी सगळ्या जहागिरीची माहिती करून घेतली. भाडेकरू, शेतात राबणारे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत केली. या लोकांना मानाने वागवले पाहिजे, अमानुषपणा त्यांच्या बाबतीत होता कामा नये, अशी सक्त ताकीद तिथल्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे एक दयाळू राणी अशी समाज मनात प्रतिमा निर्माण झाली. जहागिरीत फिरताना हत्ती, तलवारबाज‌ सैनिक, रसद भरलेल्या गाड्या घेऊन पालखीत बसून मी जात होते. लोकांना माझ्या येण्याची खबर मिळावी म्हणून ढोल वाजवून सूचना दिली जाई. मग मी त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या सोडवत असे. माझं आरस्पानी सौंदर्य माझा शत्रू होऊ नये म्हणून मरेपर्यंत मी पडदा बाजूला केला नाही.

माझी ईश्वरचंद्र विद्यासागर या प्रसिद्ध समाज सुधारकाशी ओळख झाली आणि माझे आयुष्यच बदलले. एकाही जहागिरीचा लिलाव होण्याची वेळ तर येऊ दिली नाहीच पण दूर दूर पर्यंत जाहगिरीचा विस्तार केला आणि मिळणाऱ्या सगळ्या पैशाचा चांगल्या कामासाठी विनीयोग व्हावा यासाठी राजीवलोचन यांच्यासारखे दिवाण मदतीला घेतले. विधवा, निराश्रित, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासाठी वसतीगृहे बांधली. विद्वानांना त्यांच्या कामासाठी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणावर भर दिला. शिक्षण विनाशुल्क केले. मेडिकल कॉलेज ची सोय केली. फक्त बंगालच नाही तर बाहेरच्या शिक्षण संस्थांनाही मदत केली. स्त्रियांना शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यावर माझा भर होता. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण आर्थिक मदत देत होते. त्याशिवाय तलाव खोदून पाण्याची सोय करणे, नद्यांची सफाई करणे, झाडे लावणे ही कामे केली. महिला व लहान मुलांसाठी दवाखाने, औषधाची दुकाने काढणे, कुष्ठरोग्यांसाठी आश्रम बांधणे, छापखाने काढणे या गोष्टी केल्या. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आली तर बाधितांना अन्न, पाणी, कपडा, अंथरूण पांघरूण सगळी सोय करत होते. बंगालमध्ये माझ्या कारकिर्दीत बऱ्याच वेळा दुष्काळ पडला पण मदत देण्यात कधी हयगय केली नाही. फक्त बंगालच नाही तर आयर्लंड ला मोठा दुष्काळ पडला तेव्हाही आमच्याकडून मदतीचा हात दिला गेला होता. या सर्व सामाजिक कार्यांची नोंद घेऊन १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारकडून महाराणी ही उपाधी मिळाली. तसेच १८७८ ला ‘ऑर्डर ऑफ द ग्राउंड ऑफ इंडिया’ ची सदस्यता मिळाली.

आधुनिकतेचे मला वावडे नव्हतेच. सामाजिक बदल स्वीकारायला हवेत हीच माझी धारणा होती. पण पडदा प्रथा मात्र मी सोडायला तयार नव्हते. त्यासाठी ईस्ट इंडिया विरुद्ध कायदेशीर लढा करावा लागला. बंगालमधील प्रतिष्ठेची दुर्गा पुजा बंद करण्याचा फतवा काढला होता. त्यासाठीही मी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढले व पुन्हा मानाने दुर्गापूजा सुरू केली. शिक्षणामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. इतिहास, भूगोल, विज्ञान, धर्म या विषयावरील पुस्तकांचा खजिनाच माझ्याजवळ होता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रे, कोर्टाच्या निर्णयावरील सरकारी प्रकाशने यांचे आवर्जून वाचन करीत होते व महत्त्वाच्या गोष्टींची कात्रणे काढून त्यांची चिकटवही बनवीत होते.

शेवटपर्यंत मी कोणालाही माझे चित्र किंवा फोटो काढण्याची परवानगी दिली नाही. इतिहास माझ्या चेहऱ्यावरून नाही तर माझ्या कार्यावरून मला ओळखेल ही खात्री आहे. जनता माझ्यासाठी नारायण होती तर तिचं कल्याण ही माझी देवपूजा होती.

निरक्षर म्हणून दुर्लक्षित, विधवा म्हणून उपेक्षित, अपमानित या सगळ्या मधून बाहेर पडून भाडेकरू, कष्टकरी कुळं, कासीमबाजारची जनता व ब्रिटिश सरकार यांच्याकडून एक कल्याणकारी महाराणी म्हणून माझा स्वीकार झाला आणि मी धन्य झाले!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १५  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

पूजादिष्वनुराग इति पाराशर्यः

अर्थ : पराशर ऋषीचे पुत्र श्रीव्यास महर्षी यांच्या मताप्रमाणे भगवंताची विविध प्रकारे पूजा करणे म्हणजे भक्ति होय.

विवेचन : श्रीनारदमहर्षी प्रथम पराशरसुत व्यासमहर्षींनी प्रतिपादित केलेली भक्तिची लक्षणे सांगत आहेत. त्यांचे एक नाव कृष्ण द्वैपायन असेही आहे. अर्थात ते साक्षात नारायणाचा अवतार आहेत असे मानले जाते. महाभारतात एक श्लोक आहे.

“कृष्णद्वैपायनं व्यासं विद्धि नारायणं प्रभुम्।

को ह्यन्यः पुरुषव्याघ्र महाभारतकृद् भवेत्॥”

श्रीनारदमहर्षीनीच व्यासांना भागवताचा उपदेश केला होता, हे प्रथम सांगितलेच आहे. तोच भागवताचा उपदेश व्यासानी आपला ज्ञानी पुत्र जो शुक त्याला केला. महर्षी नारद हे वेदव्यासांचे गुरू मानले जातात. नारदांनी व्यासांना भक्तिमार्गाचा उपदेश केल्याचे सांगितले जाते, अर्थात एका दृष्टीने वेदव्यास हे नारदाचे शिष्य होत. आपल्या शिष्याचे मत आपल्या ग्रंथाच्या अग्रस्थानी ठेवण्याची उदात्तता आपल्या संस्कृतीत होती हे यावरून सिद्ध होताना दिसते. वेदव्यासांच्या श्रेष्ठत्वाची नारदांना पूर्ण कल्पना होती हेच याचे कारण असावे.

भक्तीमध्ये भज्य, भजक व भजन (सेवा) अशी त्रिपुटी मानली जाते. भक्ती करणारा भक्त आपल्या भावनेप्रमाणे भज्य, सेव्य जो असेल त्याच्या अधिकाधिक सेवेचा लाभ कसा मिळेल हे पाहून सेवेची अर्थात पूजेची पद्धती स्वीकारीत असतो. या दृष्टीने व्यासांना सेवेमध्ये पूजापद्धती श्रेष्ठ वाटली. कारण त्या सेवेत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मनबुद्धि, चित्तप्राणादि सर्वांचा समावेश होत असतो. अशी भक्ति करताना सर्वांगाने सेवा घडते. आपल्याकडे प्रामुख्याने षोडशोपचार पूजा आणि पंचोपचार पूजा सांगितली गेली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सोळा उपचार करणे सर्च दृष्ट्या जिकिरीचे ठरत असते, त्यासाठी किमान पंचोपचार पूजा करावी असा दंडक घातला गेला. सोळा उपचार कोणते ते आपण पाहू.

१. आवाहन (देवतेचे आवाहन करणे),

२. पाद्य (अर्थात देवाला पाय धुण्यासाठी पाणी देणे) 

३. अर्घ्य (देवाला गंध, फुल, अक्षता मिश्रित पाणी देणे) 

४. आसन (देवाला आसन ग्रहण करण्याची विनंती करणे

५. आचमन (देवाला तोंड धुवायला व पिण्यासाठी पाणी देणे)

६. स्नान (देवाला पंचामृत, सुगंधी द्रव्ये, अथवा उष्णोदकाने स्नान घालावे.

७. देवाचे अंग पुसणे, देवाला उपवस्त्र अर्पण करणे.

८. देवाला जानवे समर्पण करणे.

९. चंदन, कस्तुरी इ. सुगंधी द्रव्यांचे विलेपन करणे.

१०. फुले आणि हार समर्पण करणे.

११. धूप दाखवणे.

१२. दीप, निरांजन ओवाळणे.

१३. नैवेद्य दाखवणे.

१४. मंत्रपुष्पांजली म्हणणे.

१५. दक्षिणा देणे.

१६. प्रदक्षिणा घाल.

(टीप : रुढी परंपरे नुसार एखादा उपचार किंवा त्याचा क्रम मागेपुढे होऊ शकतो) 

सोळा उपचार करणे शक्य नसल्यास स्नान, गंध, फुल, दीप आणि नैवेद्य इत्यादी किमान पाच उपचार करून पूजा करावी.

सगुण पूजा कशी करावी याचा विचार आपण केला आता मानसपूजा कशी करावी याचा विचार आपण करू.

सगुण पूजेत खास करून मानस पूजेचे महत्व सर्व संतांनी गायिले आहे.

मानसपूजेला परमार्थात फार महत्त्व आहे. मानसपूजा म्हणजे सूक्ष्म अर्चन, तर प्रत्यक्ष सगुण मूर्तीची केलेली पूजा म्हणजे स्थूल अर्चन होय. आपले आराध्य दैवत किंवा सद्गुरू यांची कल्पनेने, मनाने केलेली पूजा म्हणजे मानसपूजा.

मानसपूजेला परमार्थात फार महत्त्व आहे. मानसपूजा म्हणजे सूक्ष्म अर्चन, तर प्रत्यक्ष सगुण मूर्तीची केलेली पूजा म्हणजे स्थूल अर्चन होय. आपले आराध्य दैवत किंवा सद्गुरू यांची कल्पनेने, मनाने केलेली पूजा म्हणजे मानसपूजा. त्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये आपल्या आराध्य देवतेची किंवा सद्गुरूंची मूर्ती स्थापन करणे आवश्यक असते; किंबहुना मानसपूजेचे ते साध्य आहे. त्यासाठी उपासना आवश्यक आहे. अंत:करण पवित्र असल्याशिवाय तेथे परमात्मा विराजमान होणार नाही.

आपण इथे अगदी संक्षिप्त रूपात मानसपूजा कशी असते किंवा करतात याचा आढावा इथे घेतला आहे.

सगुण उपासनेत एक गोष्ट खूप महत्वाची आहे असे लज्जा येते. देव प्रसन्न होण्यासाठी कितीही बाह्योपचार केले पण मनीचा भाव जर शुद्ध नसेल, तर त्यापासून लाभ होण्याची शक्यता फारच कमी आहे असे समजावे.

संत ज्ञानेश्वरांनी ताटी लावून घेतली आणि स्वतःला कोंडून घेतले, तेव्हा त्यांनी ताटी उघडावी म्हणून छोट्या मुक्ताईने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यात मुक्ताई म्हणते,

“शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला”

मुक्ताबाई म्हणतात, ज्याच्या मनीचा भाव शुद्ध झाला, तो देवापासून दूर राहूच शकणार नाही, नव्हे देवच त्याच्यापासून दूर राहू शकणार नाही.

एक उदाहरण पाहू. *एक मिठाची बरणी आहे. त्यातील मीठ बाहेर काढले आणि त्यात पाणी ओतले तरी त्याचा खारटपणा जात नाही. त्याच्यात सतत पाणी ओतत राहिले तर पाण्याचा खारटपणा हळूहळू कमी होत जातो आणि कालांतराने त्या बरणीतील पाणी खारट लागत नाही. मनुष्याचे मन असेच वासनांनी लडबडलेले असते. साधना सुरू केली की वासना रुपी खारटपणा हळूहळू कमी होत जातो. असे करता करता मनातील मळ निघून गेला की मनाचा तळ स्वच्छ होतो, अर्थात भाव शुद्ध होतो, मग अंतरात असलेला भगवंत प्रगट होतो*.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १५ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्वासांचं सोनं केलेला सैनिक! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

श्वासांचं सोनं केलेला सैनिक! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन आर. सुब्रमनियन 

श्वासांचं सोनं केलेला सैनिक!

– – – एका बलिदानाचे रौप्यमहोत्सवी स्मरण!

आज १९ जून, २०२५… आणि तो दिवस होता १९ जून, २०००! अर्थात आज पंचवीस वर्षे झालीत त्याला जाऊन. तो म्हणायचा… मरणाच्या दारात जाऊन न आलेला माणूस कधी जगलाच नव्हता, असं समजावं! जो लढणं स्वीकारतो.. त्याच्या जीवनाची लज्जतच काही न्यारी असते… सुरक्षित कोषात राहणा-यांना ही खुमारी समजायची नाही!

१९४७, १९६५, १९७१ अशी पराभवांची hat-trick झालेली असूनही (ना)पाकिस्तानने १९९९ मध्ये चौथं दु:साहस केलेच… आणि अर्थातच पुन्हा पराभवाचे तोंड पाहिले! परंतु, त्यांची ‘जित्याची खोड… त्यांना मारल्याशिवाय जाणार नाही’ हेच ते वारंवार सिद्ध करतात!

एकतर कारगिल संघर्ष संपल्यावरही त्यांच्या काही तुकड्यांनी युद्ध सुरूच ठेवले होते… एवढा तर त्यांच्या सेनेत समन्वय आहे! त्यांचीही नांगी ठेचून काढल्यावर ते काही दिवसच शांत राहिले. आणि मग पुन्हा छुप्या मार्गाने भारतात घुसखोरी करून अतिरेकी तुकड्या पाठवायला सुरुवात केली गेली. कारगिल युद्धाला एक वर्ष पूर्ण झालेले होते. वर्ष होते २०००.. काश्मीर मधील कुपवाडा सेक्टरमधील हाफुरडा पर्वतराजीमधून पाकिस्तान खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षित अतिरेकी भारतीय सीमेत पाठवणार असल्याची खबर भारतीय गुप्तचरांना लागली.. हरकत-उल-मुजाहिद्दीन या नावाच्या अतिरेकी संघटनेची ही योजना होती… आणि अर्थातच पाकिस्तानी सैन्याचा यांना पूर्ण सक्रीय पाठिंबा होता!

भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे काही सलग बांधलेली भिंत किंवा तार-कंपाउंड नव्हे. अतिरेकी आत घुसलेच कसे? हा प्रश्न इथे केवळ मूर्ख माणसेच विचारू शकतात… नुकत्याच झालेल्या पहलगाम प्रकरणी आपलेच काही बिनडोक नागरिक नेमका हाच प्रश्न विचारताना आपण पाहिले असतीलच. असो. प्रचंड घनदाट जंगल, उंच पहाडी, द-यांनी वेढलेला परिसर आहे हा. बर्फ असते.. धुके असते बरेचदा. पावसात दोन फुटांवरचे दिसत नाही. त्याचा फायदा घेत अतिरेकी घुसतात! त्यांच्या घुसण्याच्या मार्गावर छुपे मोर्चे लावून त्यांना रोखणे हाच एक मोठा उपाय असतो. कारण एकदा का ते आत खोलवर घुसले की त्यांना टिपणे जिकीरीचे होऊन जाते!

या अतिरेक्यांचा माग काढत काढत त्यांना नष्ट करण्यासाठी एक मोठे सैन्य अभियान त्वरीत हाती घेण्यात आले… seek and destroy अर्थात शोध आणि विनाश!

स्पेशल फोर्सेसच्या PARA वाल्यांना याच कामासाठी तर प्रशिक्षित केले जाते.. त्यातील चार्ली टीम या कामासाठी नेमली गेली.

१८ जून… मोहीम सुरु झाली. भारतीय सेनेच्या या मोहिमेचे नेतृत्व करत होता 12 ऑगस्ट, १९७२ रोजी मुंबईच्या गोरेगावात जन्मलेला एक तरुण, तडफदार, दिलदार आणि दिलेर अधिकारी! अहमदाबाद येथे माध्यमिक-पूर्व शिक्षण, पुढे मुंबईतून दहावी-बारावीपर्यंतचे उत्कृष्ठ गुण मिळवत पूर्ण केलेले शिक्षण, १९९३ मध्ये एन. डी. ए. खडकवासला, १९९७ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी, देहरादून, ७ जून १९९७ रोजी 1, Para सेकंड लेफ्टनंट, प्रचंड आव्हानात्मक paratrooper training, महू येथे लष्कर मुख्यालयात आणि पुढे बेळगाव येथे आर्टीलरी ट्रेनिंग असे टप्पे पार करत करत १९९९ मध्ये कारगिल परिसरात नेमणूक होण्यापर्यंत या विविध खेळांमध्ये निष्णात असलेल्या मुलाची मजल गेली होती…. यासाठी कठोर परिश्रम हा तर परवलीचा शब्द! किंबहुना PARA-SF म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याच्या तोडीचे!

२००० मध्ये साहेब कॅप्टनपदी पदोन्नती प्राप्त करते झाले! खांद्यावरचे सितारे वाढले होते.. आणि जबाबदारी सुद्धा! कॅप्टन आर. सुब्रमनियन साहेब आता नव्या उमेदीने देशसेवा करण्याच्या मार्गावर अग्रेसर झाले. त्याआधी त्यांनी अनेक मोहिमांमध्ये स्वत: पुढे होऊन नेतृत्व स्वीकारले होते.

विशेषत: काश्मीर खो-यातले त्यांचे काम अतिशय यशस्वी होते. कॅप्टन साहेब नुकतेच सुट्टीवरून परतले होते. त्यांचे युनिट एका मोठ्या ऑपरेशनची तयारी करताना त्यांना दिसले. अर्थातच, साहेबांनी त्वरीत त्या युनिटचे नेतृत्व हाती घेतले. सुमारे नऊ अतिरेकी भारतीय सीमेत घुसल्याची बातमी होती… आणि या सर्वच्या सर्व नऊही श्वापदांना यमसदनी धाडणे गरजेचे होते. हवामानाचा, रात्रीच्या भयावह अंधाराचा अजिबात बाऊ न करून घेता कॅप्टन साहेब आणि त्यांचे सहकारी सैनिक अतिरेक्यांच्या शोधात निघाले…. आज contact होगा… त्यांना माहीत होतं. आपल्या सैनिकांची चाहूल लागताच पाकिस्तानी अतिरेकी सावध झाले आणि पुढे रात्रभर घमासान लढाई सुरु राहिली… तहान, भूक, मरणाची भीती याचा लवलेशही आपल्या बहादूर सैनिकांच्या मनात नव्हता. पहाटे पर्यंत बहुदा सहा अतिरेक्यांचे मुडदे पडले! विरुद्ध बाजूने येणारा गोळीबार थांबला… एकतर सर्वच खलास झाले असतील किंवा वाचलेले परत मागे पळून गेले असतील, असा अंदाज लावून आपल्या सैनिकांनी काही वेळ विश्रांती घेतली.

१९ जून उजाडला… सकाळचे आठ वाजले. त्या अतिरेक्यांचे मृतदेह आणि त्यांच्या जवळ आलेल्या इतर वस्तू ताब्यात घेण्यासाठी सैनिकांची एक तुकडी नेमण्यात आली. रात्रभर जागलेले कॅप्टन साहेब याही तुकडीसोबत निघाले…! आपल्या दुर्दैवाने तीन जनावरं तोपर्यंत बचावली होती… आणि आपल्या सैनिकांची वाट पहात होती. शत्रू असले म्हणून काय झाले… त्यांनाही आपल्या सैनिकांची कार्यपद्धती साधारण माहिती असते. त्यांनी व्यवस्थित सापळा रचला होता. आपल्या सैनिकांवर अचूक गोळीबार करता यावा, अशा जागा त्यांनी धरून ठेवल्या होत्या… कॅप्टन साहेब आणि इतर सैनिक त्यांच्या टप्प्यात येताच उरलेल्या तीन अतिरेक्यांनी एके ४७ मधून तुफान गोळीबार आरंभला! कॅप्टन साहेब अर्थात सर्वांच्या अग्रभागी होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता धैर्य धरून शत्रूला शक्य ते तिखट प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण स्पेशल फोर्सेस आणि इतर सर्वच सैनिकांना दिलेले असतेच. कॅप्टन साहेबांनी ताबडतोड जवाबी फायर सुरु केला… पण त्यांच्या खांद्यामध्ये आणि मानेत काही गोळ्या शिरल्या… रक्ताची धार, वेदना यांचा प्रवाह सुरु झाला! साहेबांनी जमिनीवर लोळण घेतली… आणि पुढच्याच क्षणी ते उभे राहिले… कारण ते जर उभे राहिले नसते तर इतर सैनिक अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या मा-यात अलगद सापडले असते… साहेब पुढे धावत गेले… तीन एके ४७ एकाच वेळी एकाच दिशेला फायर करीत होत्या… शेकडो गोळ्या असतात या…. burst म्हणतात याला… म्हणजे नेम धरण्याची गरज नाही… केवळ फवारा मारल्यासारखा गोळीबार… समोरचा या मरणाच्या पावसात चिंब भिजला नाही तरच नवल! कॅप्टन साहेब फायर करीत पुढे निघाले… वायुवेगाने. दोघांना अचूक टिपले… तिसरा अगदी हाताच्या अंतरावर होता… त्यालाही ठोकले.. पण.. त्याच्या हातातल्या एके ४७ ने तिचे काम चोख बजावले… साहेबांच्या चेह-यावर, डोक्यात कित्येक गोळ्या शिरल्या… प्रचंड आग, प्रचंड वेदना… आणि रक्तस्राव! रात्री सहा आणि सकाळी तीन.. असा हिशेब पूर्ण झाला होता! साहेबांना आणि इतर जखमी सैनिकांना रुग्णालयात नेण्यात आले…!

दुपारी चार वाजून तीस मिनिटे… काश्मीरमधल्या पोस्टात एक तार बुक झाली… पत्ता होता.. श्रीमती सुब्बा लक्ष्मी, बी ११, गोपुरम सोसायटी, राम मंदिर रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई. चार वाजून एकेचाळीस मिनिटांनी ही एक्सप्रेस तार या पत्त्यावर पोहोचवली गेली… थरथरत्या हातांनी सुब्रमनियन यांनी ती तार स्वीकारली… न वाचताच मजकूर समजू लागला… कळवताना अत्यंत दु:ख होत आहे… आय. सी. ५६९६३ कॅप्टन आर. सुब्रमनियन यांनी ऑपरेशन रक्षक मध्ये परदेशी अतिरेक्यांशी लढताना आपले सर्वोच्च बलिदान दिले! ही कधीही भरून न येऊ शकणारी हानी सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हांस आणि तुमच्या आप्त मंडळीस देवो,… आपला… कमांडिंग ऑफिसर, 1, PARA SF.

… जीवनाच्या हिरवळीवर कातळ कडा कोसळून पडावा… तशी अवस्था ही… तरुण, देखणा, बहादूर मुलगा, कुलदीपक असा अवेळी विझून गेला! पण त्याला तेच तर करायचे होते लहानपणापासून. दहावीत 94, बारावीत ९६ टक्के मिळवणारा पोरगा खरे तर डॉक्टर, इंजिनियर होऊन परदेशी जावा, त्याने पैसे कमवावेत आणि स्वत: आणि कुटुंबाला सुखी करावे की नाही? पण ज्याने देशसेवेचे, लष्करी गणवेशाचे स्वप्न पाहिले.. त्याच्या मनात या स्वप्नाशिवाय काहीही नसते.. ही मुले स्वप्न जगतात आणि स्वप्नासाठी मृत्यूच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त होतात… त्यामुळेच हा देश शांत झोपू शकतो आणि उठून सुख भोगू शकतो! कॅप्टन ‘सुब्बु’ साहेब म्हणायचे… शौर्यासाठी जीवन माणसाला विशेष पुरस्कार देत असते… समाधानाचा, कर्त्यव्यपूर्तीचा सनमान. जगलो तर पृथ्वी भोगावी आणि मृत्यू आला तर थेट स्वर्गसुख भोगायला निघून जावे… मातृभूमीचे ऋण फेडून! देहावर राष्ट्रध्वज पांघरलेला असावा.. आसमंतात जयजयकार निनादात राहावा… ज्वालांनी अलगद हातांनी देह पोहोचवावा… पल्याड!

मरणाच्या गोळीबाराने चेहरा उरलाच नव्हता… पाहण्यासाठी. पण त्याच्या देहाच्या चेहऱ्यावर चंदनाची लाकडे ठेवलेली होती… मरणाच्या दारात सुगंधाची पखरण! जीवनाचं सोनं करून गेला हा देह.

१९ जून, २०२५.. बरोबर पंचवीस वर्षे झाली! त्यानिमित्त त्या मरणाचे हे स्मरण! जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समर्थ रामदासांच्या मुसलमानी अष्टकांविषयी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ समर्थ रामदासांच्या मुसलमानी अष्टकांविषयी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

संत तुकाराम, संत नामदेवाप्रमाणे समर्थ रामदासांच्यादेखिल हिंदी रचना पुष्कळ आहेत. त्यांच्या हिंदी रचनेत ‘मुसलमानी अष्टके’ ही रचना मनाच्या श्लोकासारखीच आहे. समर्थांच्या दृष्टिकोनातून अल्ला आणि राम यामध्ये काहीएक भेद नाही. अल्लाला समजून घेणे म्हणजे स्वत:ला समजून घेणे होय, असे समर्थ म्हणतात. मुसलमानी अष्टकांचे वैशिष्ट्य असे की, समर्थांनी आपल्या ग्रंथात परब्रह्मााचे अथवा रामचंदाचे वर्णन करण्यासाठी जी विशेषणे वापरली, ती सारी विशेषणे अल्लासाठी वापरली आहेत. मात्र श्रीराम, गणेश, शारदा, परमेश्वर असे शब्द न वापरता खुदा, इलाही, पैगंबर, पीर, अल्ला अशा शब्दांचा वापर समर्थ मनमोकळेपणे करतात. अल्ला ही संकल्पना धर्म, जात, गोत्र या सगळ्यांच्या पलीकडे आहे, असा तर्कशुद्ध विचार समर्थ मांडतात. त्याला कोणताही रंग नाही. ब्राह्माण मोठा की मुसलमान मोठा असा वाद घालण्यापेक्षा अल्लाला जाणून घेणे जास्त चांगले, असे त्यांचे मत होते.

समर्थ रामदास म्हणतात— 

अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।

किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।

नहि रंग ना रूप रेखा कछुही।

मुँह से हि कहेसा नूहि वोईलाहि।।

– – धर्माधर्मातील संघर्ष समर्थांना अजिबात मान्य नव्हते. या ठिकाणी अध्यात्मातील अत्युच्च शिखर गाठताना पुढे समर्थ म्हणतात— 

नही वो मुसलमान हिंदू कछुहि । 

सयथ्बी नहीं क्या कहूँ मैं ई सेही ।।

सभी ज्यातसे वो है रे नियारा।

कहे रामदासो चला वेहि सारा।।

याचा अर्थ खरा परमेश्वर हिंदूही नसतो अथवा मुसलमानही नसतो. ईश्वराला जाती आणि धर्म यांच्या चौकटीत अडकविणे बरोबर नाही. या प्रकारे धर्माच्या बाबतीत सगळ्याच संतांचा दृष्टिकोन व्यापक होता.

स्वामी विवेकानंद एका पत्रात लिहितात- 

‘आपण आता हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे शब्द वापरायचे थांबवले पाहिजे; कारण या शब्दांची उपयोगिता आता संपली आहे. केवळ धर्म हा शब्द पुरेसा आहे.’ 

अगदी हाच विचार समर्थ ’मुसलमानी अष्टकात’ मांडतात. स्वधर्माची व्याख्या सांगताना दासबोधात ते म्हणतात- 

सकळ धर्मांमध्ये धर्म। 

स्वरूपि रहाणे हा स्वधर्म।

हे चि जाणावे मुख्य वर्म। 

साधु लक्षणाचे।।

*

एका गीतात साहिर म्हणतो-

मालीकने हर इन्सानको इन्सान बनाया। 

हमनें उसे हिंदू या मुसलमान बनाया।

कुदरतने तो बक्षी थी हमें एकही धरती। 

हमनें कहीं भारत इरान बनाया।।

भक्त हा भक्त असतो. जाती, पंथ संप्रदाय, धर्म या सर्व गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत. मानवाच्या विकासासाठी त्या उपयोगी ठरतात तोपर्यंत त्याला महत्त्व आहे. धर्म हा द्वेषाचा अथवा संघर्षाचा विषयच असू शकत नाही. मुसलमानी अष्टकात तर धर्माच्या नावाखाली संघर्ष करणाऱ्यांना समर्थ बजावतात की मस्जिद तोडल्याने अल्ला तुटत नाही किंवा मंदिर फोडल्याने राम मरत नाही. जे मंदिर आणि मस्जिद तोडतात, ते नष्ट होऊन जातात. मुसलमानी अष्टकात समर्थांच्या तर्कबुद्धीने विचारांचे एव्हरेस्ट शिखर गाठले आहे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हरवलेले जुने पावसाळी दागिने !…” – लेखक – श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “हरवलेले जुने पावसाळी दागिने !…” – लेखक – श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

 – – – गार्टर्स आणि क्लिपा !

पूर्वी सायकल स्वाराच्या उजव्या पायातील पॅन्ट, लेंगा किंवा धोतर हे पोटरीपर्यंत वर घेऊन, क्लिपने बांधलेले असे. तर पाऊस सुरू झाल्यावर पॅन्टच्या दोन्ही पायांना क्लिपा बांधून ठेवल्या जात असत. आजच्या काळातील मंडळींना कदाचित हे माहितीही नसेल. पण पूर्वी हे अगदी सहज पाहायला मिळत असे. सायकलच्या उजव्या बाजूला असलेल्या साखळीला पूर्वी सरसकट चेन गार्ड बसविलेला नसे. त्यामुळे सायकल नीट फिरण्यासाठी या साखळीमध्ये घातले जाणारे तेल, पोटरीच्या खाली पॅन्ट किंवा लेंग्याला लागत असे. हे कपडे रोज खराब होत असत. मशीन ऑईल असल्यामुळे ते पटकन निघत नसे. पूर्वी १०० लिंबाची शक्ती असलेले साबणही नव्हते.

तर पावसाळ्यामध्ये सायकल चालवताना दोन्ही चाकांमधून चिखल उडत असे. आणि तेव्हाही पॅन्ट, लेंगा, धोतर यांचा पोटरीखालचा भाग चिखलाने खराब होत असे.

यासाठी पूर्वी सायकल स्वार दोन महत्त्वाचे दागिने वापरत असत. त्यांचे काम एकच असे. ते म्हणजे पॅन्ट, लेंगा, धोतर पोटरीपर्यंत घट्ट बांधून ठेवणे ! यासाठी गोल आकाराच्या पण स्टेथॉस्कोपप्रमाणे उघडू शकणाऱ्या (कृपया सोबतचे फोटो पहावेत) लोखंडी पट्ट्यांच्या क्लिप्सची जोडी किंवा ताणणाऱ्या रबराच्या कापडीपट्टीला हूक लावून त्यांची जोडी बनवली जात असे. या दोन्ही गोष्टी वापरून वरील हेतू सहजपणे साध्य करता येत असे. पुण्यात पूर्वींपासून स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणावर सायकल वापरत असत. त्यावेळी नऊवारी साड्या नेसण्याची प्रथा असल्यामुळे त्यांना देखील या क्लिप्स वापरणे सोयीस्कर पडत असे. मोठ्या आकारात पुरुषांसाठी व लहान आकारात स्त्रियांसाठी अशा दोन प्रकारच्या क्लिप्स उपलब्ध होत्या. तेव्हां पोलिसदलात मोठ्या प्रमाणावर सायकलचा वापर केला जात असे. निळा किंवा खाकी गणवेश वापरणारे पोलीस दादा तेव्हा पोटरीभोवती त्याच रंगाचा, पट्टा गुंडाळत असत. त्यांना या क्लिप्स वापरता येत नसत. कांही बूटमोजेवाले साहेबलोक त्यांच्या मोज्यांमध्ये पँट कोंबून ठेवत असत. तर काही ब्रिटिश साहेब आपली पँट पोटरीपर्यंत दुमडून होणाऱ्या घडीला, पेपर क्लिपसारखी मोठी क्लिप लावीत असत. पण हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता. गमबूट हा एक खात्रीचा मार्ग उपलब्ध होता. पण हे बूट खूप वजनदार असल्यामुळे ते सफाईने वापरणे शक्य होत नसे. तसेच गमबुट्स हे अधिकतर सफाई कामगार, कारखान्यातील मजूर, बांधकाम मजूर वापरत असल्यामुळे त्याचा स्टेटस कमी समजला जात असे.

ब्रिटिशांच्या आगमनाच्या आधी भारतामध्ये पंचा, धोतर, लेंगा, लुंगी, सुरवार असे सहज गुडघ्यापर्यंत मुडपून घेता येणारे कपडे वापरले जात असत. ब्रिटिशांच्या पाटलोणींबरोबरच या क्लिपाही आल्या असाव्यात.

या क्लिप्स वापरणे हे त्यामानाने जास्त लवकर रूढ झाले. अशा गोल क्लिप्सना आणि रबरी पट्ट्यांना ” गार्टर्स किंवा क्लिपा ” म्हणत असत. गार्टर्स हे स्टेनलेस स्टील प्रमाणे चकचकीत किंवा प्लास्टिक आवरण असलेल्या काळया रंगाच्या लोखंडी पट्टीचे असत. इलॅस्टिक रबरी गार्टर्स हे पांढऱ्या व काळया रंगांमध्ये किंवा रंगीबेरंगी लेस सारख्या प्रकारचे असायचे. नंतरच्या काळामध्ये या रबरी गार्टर्सना क्लिप आणि हूक ऐवजी वेलक्रो लावण्यात आले होते.

पूर्वी अनेक ठिकाणी पूर्ण मातीचे रस्ते असल्यामुळे चिखल आणि तो उडण्याचे प्रमाण प्रचंड असे. त्यासाठी या गार्टर्सच्या वापराबरोबरच सायकलच्या दोन्ही चाकांना मागच्या बाजूला रबरी मडगार्डस वापरले जात असे. अन्यथा पुढील चाकातून तोंडापर्यंत आणि मागील चाकातून पाठीवर, डोक्यापर्यंत चिखल उडत असे. रबरी स्लीपर्स वापरणाऱ्यांची पावसात होणारी रंगरंगोटी आपण पहिली असेलच. चाकांवर लावलेल्या पत्र्याच्या अर्धगोल पन्हळीच्या (याला फेंडर्स असे म्हणतात) मागच्या टोकांवर आठ ते दहा इंच लांब आणि सुमारे सहा इंच रुंद असे रबरी तुकडे, मडगार्ड्स म्हणून बसविले जात असत. उडणारा चिखल याच्या आड अडविला जात असे. या मडगार्ड्सवर विविध उत्पादनांच्या जाहिरातीही केल्या जात असत. अशीच एक माझ्या संग्रहातील जोडी, सोबतच्या फोटोमध्ये अवश्य पहा.

आता व्यायामासाठी घरातल्या घरात सायकल चालवली जाते. पण शहरातील रस्त्यांवर दैनंदिन सायकल चालविणे धोक्याचे आणि तथाकथित स्टेटसला बाधा आणणारे ठरत आहे. तरीही शहराबाहेर अजूनसुद्धा सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

सायकलच्या विविध प्रकारच्या आणि आवाजाच्या घंटा, हँडलच्या खाली पुढच्या बाजूला विविध प्रकारची बोधचिन्हे, रंगीबेरंगी दिवे, वीज निर्मिती करणारे डायनॅमो, कॅरियर्स, हँडलवर किंवा चाकांच्या अक्षाभोवती फिरणारी रंगीत फुले, विविध प्रकारचे स्टँड्स अशा कितीतरी गोष्टींमध्ये आता नाविन्यपूर्ण आणि कलात्मक प्रकार पाहायला मिळतात. पण एकेकाळी अत्यावश्यक असणारे हे गार्टर्स नावाचे दागिने मात्र आता इतिहास जमा झाले आहेत.

लेखक : श्री मकरंद करंदीकर.

 makarandsk@gmail. com

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाव नसलेले भांडे…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाव नसलेले भांडे…” –  लेखिका : सुश्री आसावरी इंगळे ☆ सुश्री प्रभा हर्षे

काही वर्षांपूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती म्हणजे दुकानातुन वापरायची कोणतीही भांडी विकत आणली. की ती आणतांनाच त्यावर नांव टाकून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे.

समजा बायको सोबत नसतांना जर नवरा एकटाच दुकानात गेला. व गरजेचे भांडे घेऊन घरी आला की गृहिणी आधी त्यावर नांव काय घातले आहे ते पहात असे. त्या भांड्यावर तीला तिचे नाव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे… आणि समजा नाव जर दिसले नाहीच तर मात्र काही खरे नसे, ती आल्यापावली नवऱ्याला परत दुकानात पाठवुन त्यावर नांव घालुन आणा असे सांगत असे. किंवा स्वत: जावुन नांव घालुन आणुन मगच ते वापरायला सुरुवात करीत असे.

काय हो बरोबर आहे ना? आजही तुमच्या घरात नांव घातलेली खुप भांडी असतील.

पण आता दिवस बदलले आहेत आता विचार हा असतो की सगळे करायचे पण कुठे नामोनिशाण ठेवायचे नाही.

लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे. नाव घातलेली व नाव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नाव असलेली भांडी वापरात घेतली जायची. व नाव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देवाण, घेवाणीसाठी वापरली जात असत.

– – तर अशी ही नांव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.

असो. हे सारे आले कशावरुन.. तर नावावरुन. आता ती भांडी जरा घडीभर आपण बाजुला ठेवा व विचार करा.

– – आपला देह हे सुद्धा एक पंचभुतांनी बनलेले भांडेच आहे. हे भांडे जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नसतेच. ते असेच फ़िरत फ़िरत आपल्या घरात आलेले असते. मग त्या देहाला आपल्याकडून नांव दिले जाते. आणि ते मरे पर्यंत रहाते. पण देह संपला की नांव संपते व बिना नांवाचा देह या योनीतुन त्या योनीत असा बिन नावाच्या भांड्यासारखा फिरायला लागतो.

आता ही पळापळ थांबायला उपाय काय?

– – – उपाय आहे नां सांगितला आहे आपल्या संत, सत़्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थांनी जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नामस्मरण करा. म्हणजे काय होईल? देह जरी पडला तरी देवाचे केलेले नामस्मरण हे सोबत येईल.

…. आणि ते नांव एकदा देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नांव आहे. याला माझ्या घरात पाठवा.

…. आणि ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना द्या पाठवून या योनीतुन त्या योनीत फ़िरायला.

आपले काय होते माहिती आहे का? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नामस्मरण करा नाम घ्या असे सांगितले आहे.

पण आपण त्यात पळवाट शोधण्यात पटाईत.

आपण म्हणतो जमेल तसे ना! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार?

मग परमपिता म्हणतो. नाही जमले नांव? हरकत नाही. मग रहा फ़िरत निवांत या योनीतुन त्या योनीत.

…… माझे नामस्मरण कर असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींवर म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांचेवर सोपवले आहे. ते काम ही मंडळी चोख बजावतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नाव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे. व नाव नसेल तर पुढील प्रवासाला द्यायचे पाठवुन.

हे एवढ्यासाठीच की वाचा आणि विचार करा. नुसता विचार करु नका. तर अंमलात देखील आणा….

धन कमविले कोट्यानकोटी… 

संगे येईना साधी लंगोटी… 

– – – बरोबर फक्त नामस्मरणच येईल……..

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगळ्या वाटेने जातांना… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगळ्या वाटेने जातांना☆ सुश्री शीला पतकी 

वेगळ्या वाटेने जाताना – – 

घटना इटली देशातील आहे. जॉन चा मुलगा सॅम काही अपराधामुळे तुरुंगात होता जाॅन म्हातारा झाला होता. तो आपल्या घरात एकटाच. घराच्या मागे खूप मोठा शिवार होतं बॅक यार्ड ज्याला म्हणतात तसं. त्याच्यामध्ये तो थोडी शेती करत असे पण आता त्याला ते झेपत नव्हतं. जमीन खणायची, बी पेरायचे, त्याची निगा राखायची…. यातल्या जमीन खणायची गोष्ट त्याला आता झेपत नव्हती. पण त्याला मनापासून शेती करावी असे वाटत होते. एकट्या जीवाचा तो विरंगुळा ठरावा. त्यांने आपल्या मुलाला सॅम ला तुरुंगात पत्र पाठवलं “प्रिय सॅम, टोमॅटोची शेती करावीशी वाटते पण आता जमत नाही रे.. तू असता तर अंगण खणून दिलं असतं आणि मग मी टोमॅटोची रोप लावली असती. टोमॅटोच्या रोपाने अंगण भरल असत. लाल भडक टोमॅटो किती सुंदर दिसले असते. असो आय लव यू सॅम! “असे म्हणत त्याने ते पत्र पूर्ण केले आणि तुरुंगात पाठवले. सॅमला ते पत्र वाचताना खूप वाईट वाटत होते की आपल्या वडिलांची छोटी इच्छा… कारण त्यांना कामात गुंतून घेणे खूप आवडत होते.. पण आपण नसल्यामुळे ते काही करू शकत नाहीत. मग त्याने तुरुंगातून पत्र पाठवले” प्रिय बाबा बॅकयार्डची जमीन खणण्याच्या भानगडीत पडू नका. मी तेथे खून केलेली प्रेतं पुरली आहेत लव यू सॅम” वडिलांच्या हातात पत्र पडण्यापूर्वी दारात पोलीस उभे राहिले. त्यांनी झडतीचे पत्र दाखवले आणि बॅक यार्डची जमीन खणायला सुरुवात केली. चांगली तीन चार फूट खोल जमीन म्हणून काढली. दिवसभरात संपूर्ण अंगण खणले गेले पण त्यांना कुठेही प्रेतं सापडली नाहीत ते जॉनची माफी मागून निघून गेले. जॉन चे सगळे अंगण खणून झाले होते दोन दिवसांनी मुलाचे पत्र आले “बाबा मी इथे बसून माझे काम केले आहे आता तुम्ही टोमॅटोची रोपे लावा आणि शेती करा लव यू तुमचा सॅम”

या गोष्टीतला सॅम गुन्हेगार आहे पण वेगळा विचार करणार आहे. त्याने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता अंगणात प्रेत दडवल्याचे पत्रात लिहिले तुरुंगातील पत्रे सेंसाॅर होऊन जात असत हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे वडिलांना अंगण खणू नका तिथे प्रेते आहेत ही सूचना आपोआपच पोलिसांना मिळाली त्यांना ती खरी वाटली आणि त्यांनी ते अंगण पूर्ण करून टाकले. सॅम चे काम आपोआपच झाले होते. जाॅनने त्याच्यामध्ये टोमॅटोची शेती केली त्याचा वेळ चांगला गेला अंगण टोमॅटो ने बहरून आले…..!

या गोष्टीमध्ये आणि आपल्याकडच्या तीन आळशी मुलांची गोष्ट याच्यामध्ये साम्य आहे मरणारा बाप त्या तीन पोरांना सांगतो की शेतामध्ये खजिना पुरून ठेवला आहे मी मेल्यावर तो ऊकरून घ्या. बाप मरून गेल्यावर पोरं संपूर्ण शेत उकरून काढतात. कुठेही खजिना मिळत नाहीत आळशी मुलांनी शेत मात्र संपूर्ण खणून काढलेली असते. मग गावकरी म्हणतात एवढी मेहनत गेली तर पीक तरी लावा. मग ते बिया पेरतात पीक उत्तम येते त्याला पैसेही चांगले मिळतात गावकरी सांगतात अरे हेच तुमच्या वडिलांनी पुरलेले धन…..! आपल्याकडे आणि त्यांच्याकडच्या गोष्टीत फक्त संस्काराचा फरक आहे पण युक्ती मात्र तीच आहे. अशी वेगळ्या दिशेने काम करणारी माणसं यांना आपण आऊट ऑफ बॉक्स असं म्हणूयात.

अशा तऱ्हेने वेगळा विचार करणारी पुढची पिढी निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं पण असतंच. मुलांना तर खूप वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. त्यांना त्या कोणाजवळ सांगता येत नाहीत. कारण त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ते त्यांना कळत नाही. त्या प्रत्यक्षात येतील की नाही याची त्यांना माहिती नसते. पण त्यांच्या डोक्यात मात्र खूप काही वेगळं चाललेलं असतं. मग या मुलांच्या डोक्यातल्या अशा कल्पनांना आपण मूर्त स्वरूप दिले पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात आला आणि ह्या “तुमच्या कल्पना लिहा आणि पाठवा आमच्याकडे” हा प्रकल्प मी हाती घ्यायचे ठरवले आहे. शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे एकत्रीकरण करावे असा विचार आहे. त्याचे आणखीन एक कारण असे की आमच्या पिढीत किंवा आमच्या मागच्या पिढीतल्या शिक्षकानी शिकवले संस्कार दिले पण विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटेने विचार करायला शिकवण्यात आम्ही कमी पडलो होतो की मग विद्यार्थ्यांना विचार करायला वेळच दिला नाही. गप्प बैस तुला काय करायचे हे आमची पिढी… त्यानंतर आमच्या पुढची पिढी जी होती त्यांना आम्ही… असं काही नसतं रे म्हणून गप्प बसवल. पण आता लक्षात येते की ही पुढची पिढी खूप हुशार आहे त्यांच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे लहान म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये ते आपल्यापेक्षा अतिशय वेगळा विचार करू शकतात.

याचे एक उदाहरण…… मी एका कार्यशाळेमध्ये एका बाटलीवर एक टाचणी खोचून ठेवली आणि त्यावर एक एक बाय एकचा छोटा चौकोनी तुकडा झोपडी सारखा घडी करून ठेवला आणि मुलाला सांगितले हा फुंकर घालून किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वापरून हलवायचा नाही. त्यापेक्षा वेगळा काही विचार सुचतो का पहा. मुलं विचार करायला लागले आणि पंधरा मिनिटात एक मुलगा उठून उभा राहिला तो त्या उपकरणा जवळ आला त्यांनी आपले दोन्ही हात एकमेकावर घासले. ज्यायोगे घर्षणाने त्याच्या मधील हवा गरम झाली आणि ते त्यांनी पटकन त्या कागदाखाली धरले गरम हवा वर जाते त्यामुळे कागद हलला आणि फिरला मला त्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या विचार करण्याचे कौतुक वाटले. आज तो मुलगा आयआयटी बेंगलोर मधून पास आऊट होऊन बाहेर पडला आहे अशी वेगळी विचार करणारी पिढी आम्हाला हवी आहे. खरं तर हा खूपच छोटा प्रयोग होता पण तो वेगळा विचार करू शकतो हे लक्षात आले त्याच शिबिरामध्ये मी मुलांना सांगितले “आपण एका खेड्यामध्ये सहलीला चाललो आहोत आपल्याबरोबर भाजीपाला ब्रेड बटर फळ घेतलेली आहेत उन्हाळा खूप आहे ती सगळी सामुग्री आपल्याला टिकवायची तर तुम्ही काय कराल? त्यासाठी या खोलीत असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही व्यवस्था करावयाची आहे कोणत्याही वस्तू वापरायला तुम्हाला मुभा” माझ्या संस्थेमध्ये हा प्रयोग चालला होता मुलांनी खोलीत असलेले छोटे टेबल एकमेकावर मांडले पडद्याचा राॅड होता तो त्या टेबलावर ठेवला त्या ठिकाणी पडलेली एक बाटली घेऊन तिला भोक पाडले त्या बाटलीला तिथे असलेल्या कापडाच्या चिंध्या दोरी करून टांगून ठेवता येईल असे बांधून घेतले आणि ती बाटली त्या राॅडला बांधली. त्यानंतर त्या खोलीतला माठ रिकामा होता तो त्यांनी आडणीवर तिरकस ठेवला त्यावर एक पाय पुसणे होतं ते ओले करून त्यावर टाकले बाटलीतील पाणी सतत माठावर पडत राहील अशी व्यवस्था झाली आणि नंतर त्या मुलांनी त्याचे स्पष्टीकरण दिले की “आता या माठामध्ये त्या सगळ्या वस्तू ठेवायच्या जेणेकरून ते सतत गार राहील कारण बाहेरच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे तेथील उष्णता कमी होईल माठामध्ये गारवा निर्माण होईल तापमान कमी होईल आणि वस्तू ताज्या राहतील” मला त्यांच्या या कृतीचे खूप कौतुक वाटले असेच एकदा मी अमोनिया वायू तयार करून त्याचे गुणधर्म शिकवत होते आणि हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये बुडवलेली काच कांडी अमोनियाजवळ आणली की नवसागराचा धूर येतो हे मी मुलींना फळ्यावर समीकरण मांडून शिकवत होते मुलीने मला विचारले बाई आपल्या पाठीमागील असलेल्या बाथरूम मध्ये हे असाच वास येतो मी म्हणाले बरोबर आहे कारण युरीन मधला युरिया जो असतो त्याचे विघटन होते, उष्णतेमुळे आणि त्यातून अमोनिया सारखे वायू बाहेर पडतात त्यावर त्या मुली म्हणाल्या उन्हाळ्यात तर खूप वास येतो आपण तिथे हायड्रोक्लोरिक आम्लात बुडवलेला कापूस ठेवूया म्हणजे तिथे किती धूर होतोत्यावरूनअमोनिया बाहेर पडतो हे लक्षात येईल मुलींच्या या कल्पनेचे मला खरोखर कौतुक वाटले अशा तऱ्हेने खरं मुलं खूप वेगळ्या वाटेने विचार करत असतात आपण त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी वेगळ्या वाटेने जाणारी मुले आणि त्यांची कल्पनाशक्ती यांच्यासाठी मी लवकरच एक प्रकल्प घेत आहे मला खात्री आहे अनेक शाळा मधून वेगळा विचार करणारी मुलं मला नक्कीच मिळतील. तुमच्याही घरी असे एखादे मुल असेल आणि त्याच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्या माझ्याकडे जरूर पाठवा! मी वाट पाहतेय…..!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवटेकडी… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

? इंद्रधनुष्य ?

☆ शिवटेकडी… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

इंद्रपुरी अमरावती आणि सामाजिक, सांस्कृतिक ऐतिहासिक वैभव जपणारी शिवटेकडी……..

अमरावती या शहराला आधी उमरावती, असे सुद्धा म्हणायचे. इंद्रपुरी अमरावती असा सुद्धा इतिहासात उल्लेख आढळतो. अशाप्रकारे मग आज ही अमरावती महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

इथे या शहरात आहे ही प्रसिद्ध ‘ शिवटेकडी ‘. यापूर्वी याच टेकडीला मालटेकडी म्हणून सुद्धा लोक म्हणायचे. पूर्वी या टेकडीवर मोठ्या प्रमाणावर उंची दगड होते. सकाळ आणि संध्याकाळी येथे शेकडो माणसे, बालके आणि स्त्रिया फेरफटका मारायला येतात. शहराच्या अगदी मध्यभागी ही एक टेकडी आहे.

पुढे १९९१ मधे या टेकडीवर तत्कालीन राष्ट्रपती श्री निलमसंजीव रेड्डी साहेब यांचे हस्ते शिवाजी महाराज यांचा एक सुरेख पुतळा उभारण्यात आला. तर काही मुस्लिम बांधवांनी एका बाजूला त्यांची मजार सुद्धा बांधली आहे. आजही अनेक मुस्लिम समाज बांधव हे दर गुरुवारी तसेच शुक्रवारी येथे दर्शनासाठी येतात ही वस्तुस्थिती आहे.

तसेच या शिवटेकडीचे नावाने एक संवर्धन समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचे माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात आली आहे. हे स्थळ एक आत्मिक समाधान व आनंद देणारे अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर ही माता रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. तर भगवान श्रीकृष्ण यांनी रुख्मिणीचे हरण येथे केल्याची आख्यायिका सुद्धा सांगीतली जाते.

अशा शिवटेकडी येथे मी अनेक दिवसांपासून पहाटे जात असताना मनात एक विचार आला. कारण हे गाव संत गाडगेबाबा यांचे गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छता अभियान राबविले. अनेक गोरगरीब यांना आपल्या दशसुत्रीचे माध्यमातून सामाजिक बांधिलकी आयुष्यभर जपली. तर

दुसरे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा आपल्या गीताने देशातील सैन्य यांना प्रेरणा दिली. चीनच्या युद्ध प्रसंगी ते सीमेवर गेले हा एक इतिहास आहे.

अमरावती येथे अंबादेवी मंदिर अतिशय पुरातन काळापासून आहे. नवरात्रात संपूर्ण महाराष्ट्रातील लोक येथे 

मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. तर स्व. अंबादासपंत वैद्य यांनी हनुमान आखाडा १९१४ मधे स्थापन केला. आज त्यांचेनंतर पद्मश्री श्री. प्रभाकररावजी वैद्य साहेब हे या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनात काम करीत होते. ते सुद्धा येथे राहत होते. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी सुद्धा या व्यायाम प्रसारक मंडळात तेव्हा येऊन गेले होते. आज अमरावती जिल्ह्यातील हे व्यायाम प्रसारक मंडळ जागतिक स्तरावर काम करीत आहेत. येथे अनेक राष्ट्रातील खेडाळू आहेत. १९१४ ते १९४७ या जवळपास ३३ वर्षात अनेक कार्यकर्ते येथे येऊन राहत होते. स्वातंत्र लढ्यात त्यांचा सहभाग होता. वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी त्या काळात कृष्ठरोगी माणसांची सेवा अहोरात्र केली. आज तपोवन नावाने ही संस्था अनेक वर्षेपासून हे काम करीत आहे.

डॉ पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषीमंत्री होते. ते सुद्धा अमरावती जिल्ह्यातील. तर संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गझल देणारे कविवर्य सुरेश भट यांचा जन्म अमरावती येथील. सुरेश भट यांनी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी गझल पोहचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. अनेक चित्रपटगीते सुद्धा भटांनी लिहिले आहे.

अशा प्रकारे माझे समोर ही सारीच माणसं एकत्र येऊ लागली. आणि हा एक विचार मनात आल्यानंतर या शिवटेकडी संदर्भात असलेल्या सुंदर अशा कवितेचा जन्म झाला. मला कोणत्याही प्रकारे कल्पना नव्हती की, ही कविता अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत गुडेवार साहेब यांनी एका शिलालेखात शिवटेकडी येथे जवळ जवळ साठ हजार रुपये खर्च करून अमरावती महानगरपालिका यांच्या माध्यमातून लावली. हा माझा मोठा सन्मान मी समजतो.

आज या नवीन पिढीचे वाचन कमीच झाले आहे. साहित्याकडे वाचकांचा ओढा कमी होत आहे हीच माझी खंत आहे. तरी सुद्धा जेव्हा एखादी कविता जन्माला येत असते तो आनंद काही वेगळाच असतो. अमरावती जिल्ह्यातील व अमरावती शहरातील हे सर्व साहित्यिक, सामाजिक, ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय जळणघडण व वैभव यांचा या कवितेत समावेश आहे. आयुष्यात शेवटी आठवणीच शिल्लक राहतात. माणूस हा निघून जात असतो. ही कविता अमरावती जिल्ह्यातील येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा एक मार्गदर्शक ठरेल हे मात्र खरे आहे…… अशाप्रकारे ही कविता अमरावती जिल्ह्यातील सर्वच नागरिक यांना अर्पण करतो आहे.

जवळपास वीस वर्ष पासून सुरेश भट यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मला लाभले आहे. अमरावती येथे सुरेश भट यांचे स्मारक शासनाने करावे यासाठी मी पाच वर्ष पासून सातत्याने शासकीय स्तरावर पाठपुरावा करीत आहो. शासनाने हे स्मारक अमरावती येथे करावे अशी जाहीर विनंती सुद्धा मनापासून करतो. कारण तेव्हा तरुण भारतचे संपादक म्हणून काम करीत असताना स्व. वामनराव तेलंग म्हणायचे की विष्णू, हे गाव लेखक कवी साहित्यिक कलावंत यांचे गाव आहे. मग ते सुरेश भट, मधुकर केचे, उद्धव शेळके, विद्याधर गोखले, के. ज. पुरोहीत, विश्राम बेडेकर, राम शेवाळकर, तर आजही भारताचे सरन्यायाधीश म्हणून श्री. भुषण गवई साहेब काम करीत आहेत.

तर असे हे अमरावती गांव सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदू मुस्लिम एकतेची नांदी असलेले हे गाव आहे. दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या कामाचे गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते.

आणि इथली ही शिवटेकडीही त्याप्रमाणेच प्रसिद्ध आहे.

मला ही शिवटेकडी आयुष्यात नेहमीच सोबत करते हे मात्र खरे आहे…….

इंद्रपुरीच्या वैभवाची साक्ष ही शिवटेकडी 

छत्रपतींच्या समतेची ज्योत ही शिवटेकडी…

*

अंबामाता इंद्रपुरीचे दैवत आहे खरे आहे 

पटवर्धन तुकडोजींच्या छायेची शिवटेकडी…

*

गाडगेबाबा, पंजाबराव खापडैची इंद्रपुरी 

हिंदू मुस्लिम एकतेची नांदी ही शिवटेकडी…

*

फुले आंबेडकर शाहूंच्या समतेचे गाव हे

लहान थोरा इथे सावली देते ही शिवटेकडी…

*

हनुमान आखाडा हे भुषण सा-या देशाचे 

सुरेश भटांच्या गझलेची साक्ष ही शिवटेकडी…

*

माणसांच्या आयुष्याची कथा व्यथाच ही ऐकते 

सुख दुःखाच्या वळणावरची सोबत ही शिवटेकडी…

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares