मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिव्याची आवस आणि गटारी आवस… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

 

अल्प परिचय

नावः दिवाकर धुंडिराज बुरसे

१९६७ सप्टेंबरमधे पासून पुण्याच्या टाटा मोटर्स या जगप्रसिद्ध कंपनीत मशीन टूल डिझाईन्स विभागात कार्यरत. २००६ साली डिव्हिजनल मॕनेजर पदावरून सेवानिवृत्त.
१९९२ साली ‘श्री सुरक्षितताबोध’ हा ‘सुरक्षितता’ विषयावरील एकवीस अध्यायी काव्यबाद्ध ग्रंथ लिहिला. टेल्को कंपनीने प्रकाशित केला.
उद्योग महर्षी आदरणीय श्री शंतनुराव किर्लोस्कर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र शासनाने विशेष साहित्यिक पारितोषिक प्रदान करून ग्रंथास गौरविले.

? इंद्रधनुष्य ?

☆ दिव्याची आवस आणि गटारी आवस… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

आषाढ अमावस्येला पूर्वी ‘दिव्यांची आवस’ किंवा ‘दर्श अमावस्या’ म्हणत. अलिकडे हा दिवस ‘गटारी आवस’ म्हणून महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. तो अधिकाधिक उत्साहाने साजरा करण्याची जणु चुरसच गटा-गटात, कुटुंब-परिवारात आणि गावा-गावात लागल्याचे दृष्य आहे.

आठवडाभर आधीपासूनच आपल्याला व्हाॕटस् ॲपवर या गटारीवरचे सवंग जोक्स यायला लागतात. हे जोक्स् काही मंडळी अगदी चवीने वाचतात, एवढेच नाही, तर इतरांनाही कौतुकाने पाठवतात.

छंदीफंदी चंगळवादी मंडळी या गटारी महोत्सवाच्या तयारीला आठवडाभर आधीच लागतात. मित्रमंडळी वर्गण्या गोळा करू लागतात. उत्सवाला साजेसा ‘माहोल’ बनवायला लागतात. जमवत असलेला माहोल चढत्या क्रमाने परमोत्कर्षबिंदूपर्यंत नेटाने नेतात आणि आवसेच्या मध्यरात्री तो परमोत्कर्षबिंदू मनासारखा साधला जातो एकदाचा!

मग ही पेताड मंडळी दुस-या दिवशी दुपारपर्यंत जागोजागी, पदपथांवर, रस्त्यात, घरांच्या कुंपणाच्या भिंतींजवळ, गल्ली, बोळ, नुक्कड, मोहोल्ल्यातल्या गटारा-गटारात सुखेनैव अस्ताव्यस्त व बेधुंद अवस्थेत लोळत पडलेली आढळतात.

शेवटी रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस किंवा पेताडांच्या घरची मंडळी त्यांना शोधून काढतात. दोघा-तिघांच्या मदतीने त्यांना उचलून कसेबसे घरी नेऊन पाईपाने पाणी मारून लख्ख धुऊन काढतात. एवढे केल्यावर ही मंडळी ब-यापैकी भानावर येतात!

या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला आरंभ होतो. श्रावण हा हिंदूंचा पुण्यप्राप्तीचा, व्रतवैकल्ये, उपास-तापास करण्याचा महिना अशी धार्मिक मान्यता आहे. या श्रावण महिन्यात मांसाहार, मद्यपान पूर्ण वर्ज्य असते. अर्धशतकापूर्वीपर्यंत बहुतेक हिंदु ही शिस्त पाळत होते.

अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात, कोण जाणे. हल्ली ‘गटारी अमावस्या’ मात्र बरेच लोक उत्साहाने साजरी करताना दिसतात.

मुळात गटारी आणि गटार यांचा काही संबंध असतो, की नसतो, हेच आपल्यापैकी अनेकांना ठाऊकही नाही.

गटारी अमावस्या हे नाव कसे पडले?

‘गतहारी’ अमावस्या हा मूळ शब्द. ‘गत’ (गेलेला) आणि ‘आहार’ (खाणेपिणे) या दोन शब्दांपासून सिद्ध झालेला शब्द म्हणजे ‘गताहार’. गताहारचा अर्थ होतो ‘गेलेला, त्यागलेला आहार’. ‘गतहारा’चा अपभ्रंश ‘गटारी’. यावरून याला ‘गटारी अमावस्या’ असे नाव पडले आहे, असा तर्क काही भोळेजन देतात.

दुसरा तर्क असा की, त्या दिवशी लोक मनसोक्त मांसाहार करून व दारू पिऊन अक्षरशः गटारात लोळत पडतात, म्हणून याला ‘गटारी आवस’ म्हणतात. मला तरी हा दुसरा तर्क वस्तुनिष्ठ व अधिक तर्कसंगत आणि म्हणून योग्य वाटतो.

आता ही ‘गटारी’ का साजरी केली जाते?

श्रावण महिन्यात दारू, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या आहेत. म्हणून श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात-पीत नाही. म्हणजेच सामिष आहार नित्य भोजनातून गेलेला असतो. म्हणून श्रावण सुरु होण्याआधीची म्हणजेच आषाढाची अमावस्या गताहारी, साजरी केली जाते आणि पुढच्या महिन्याभरात जे जेवण त्यागायचे आहे, सोडायचे आहे ते भोजन या दिवशी यथेच्छ केले जाते. पुढे महिनाभर मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसी पदार्थ आहारातून कटाक्षाने टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते.

गटारी आवसेचे हे लोण शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूपर्यंतही जाऊन पोहोचल्याचे समजते.

गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात. श्रावण सुरू झाल्यानंतर चिकन, मटण, मासे खाणे चुकीचे मानले जाते. पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत या सामिष मेजवानीचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात, एकत्र बसून खाणे-पिणे करतात.

दुर्दैवाने ‘गटारी अमावस्या’ या दिवसाचे मटण-मच्छी खाणे आणि आकंठ दारू पिणे याव्यतिरिक्त काही वेगळे सांस्कृतिक महत्व आहे, हे आपण सपशेल विसरलो आहोत! ते महत्व सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही.

म्हणून सांगावेसे वाटते, ‘मित्रहो, खरे तर या आषाढ आमावस्येला गटारी नव्हे तर ‘दिव्याची आवस’ म्हणतात. या दिव्याच्या अमावस्येची एक पारंपारिक जानपद कहाणी प्रसिद्ध आहे, तीही सांगतो. कहाणी अगदी बाळबोध असली, तरी काही सुसंस्कार करणारी आहे. ऐका…

एका आटपाट नगरातील राजाची सून रोज दिवे घासून तेलवात करायची. दिव्यांच्या अवसेला दिव्यांची पूजा करून चांगला नैवेद्य करून दिव्यांना दाखवायची.

एकदा घरात केलेला एक पदार्थ तिला खूप आवडला. तिने तो गुपचुप खाऊन संपवला आणि आळ उंदरांवर घेतला. याचा उंदरांना राग आला. सूड घेण्यासाठी त्यांनी त्या रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली. त्यामुळे तिची सर्वांनी निदा केली आणि घरातून बाहेर काढून टाकले. ती निघून गेल्यानंतर त्या घरातील दिव्यांची काळजी कोणीच घेतली नाही. असेच दिवस गेले.

दर्श अमावस्येचा दिवस आला. त्या दिवशी राजा अरण्यात मृगयेला गेला होता. येताना त्याला उशीर झाला म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीला थांबला होता. त्याच झाडावर त्या गावातील सर्व दिवे जमले होते. ते दिवे आपापसात प्रत्येक घरातील केलेली पूजा आणि मिळालेला नैवेद्य या विषयी बोलत होते. तेव्हा राजाच्या घरातील दिव्याने दु:खी स्वरात राजाच्या सुनेची कहाणी सांगितली आणि म्हणाला की, ‘ती गेल्यापासून राजाच्या घरातील दिव्यांची वाईट अवस्था आहे. ‘ 

झाडाखाली उभ्या असलेल्या राजाने हे ऐकले. तो वाड्यावर गेला आणि सर्वांना समोर उभे करून त्याने विचारले की, कोणी सुनेला पाहुण्यांच्या खोलीत जाताना प्रत्यक्ष बघितले होते का? सर्वांनी ते नाकारले. हे ऐकून राजाला पश्चात्ताप झाला. मग राजाने पालखी पाठवून सुनेला परत बोलावून घेतले आणि तिची क्षमा मागितली. तिला साऱ्या घराची जबाबदारी दिली. त्यानंतर राजाची सून दिव्यांची पूजा परत करू लागली.

तर जसा राजाच्या सुनेला दीपक पावला, तसा तुम्हां आम्हाला पावो. तिचा आळ जसा टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

(संदर्भः संपूर्ण चातुर्मास)

श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.

या दिव्यांचे प्रकार तरी किती आहेत पहा…

पोत, पलिता, मशाल, पणती, टेंभा, चिमणी, ढणढण्या, निरांजन, समई, पिळाची समई, आवळ्याची समई, मोराची समई, नागाची समई, कासवाची समई, ज्योति समई, लामण दिवा, ठाणवाई, लक्ष्मी दीप, सूर्यदीप, कंदुकदीप, पुतळी, टांगता दिवा, कंदील, पेट्रोमॕक्स, सायकलचा दिवा, विजेरी आणि असे किती तरी!

घराघरातील गृहिणी आदल्या दिवशी घरातील वापरातले आणि बाजूला ठेवलेले हे सर्व प्रकारचे दिवे घासूनपुसून स्वच्छ, लखलखीत करीत. तेल आणि वाती घालून हे दिवे एका चौरंगावर नवे वस्त्र आच्छादून त्यावर आकर्षक पद्धतीने मांडीत. संध्याकाळी हे सर्व दिवे प्रज्वलित केले जात. नंतर त्यांची हळद-कुंकू, गंधाक्षता, फुले वाहून यथासांग पूजा केली जाई.

या दिवाशी किसलेला गूळ आणि कणिक यात कढत तेलाचे मोहन घालून ते मिश्रण मळून साधारण लिंबाएवढे दिवे करीत. ते दिवे वाफेवर मोदकांप्रमाणे उकडत. पुजलेल्या दिव्यांना त्याचा नैवेद्य दाखवला जाई. प्रसाद म्हणून कणकीचे दिवे सर्वांना दिले जात. मागच्या पिढीपर्यंत घरोघरीच्या माता गृहिणी दिव्यांच्या अवसेला हे दिवे आवर्जून करायच्या. मुलांना ह्या दिव्याच्या प्रसादाचे मोठे अप्रूप वाटायचे.

मित्रहो, अतिप्राचीन भारतीय संस्कृती हिंदुसंस्कृती विश्वातील पंचमहाभूतांचा, चराचराचा, भूतमात्रांचा, ग्रहनक्षत्रांचा सदैव आदर करणारी संस्कृती आहे. सर्व चराचरात आणि विश्वातील कणाकणात परमेश्वर वास करत असतो, यावर भारतिय हिंदूंचा दृढ विश्वास आहे. मानवी जीवनासाठी जे जे उपयुक्त, उपकारक त्या सर्वांविषयी भारतीय सभ्यता सदैव कृतज्ञ आहे. याच उदात्त भावनेपोटी आपल्या जीनवात सदैव प्रकाश देणा-या दीपकांचाही आदरपूर्वक नित्य संध्याकाळी आम्ही ‘दीपज्योति नमोस्तुते’ म्हणत समई लावून तिला वंदन करतो.

या कृतज्ञतेपोटीच आषाढ अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची आम्ही पूजा करतो आणि दिवाळीचे चार दिवस घराघरात आणि गावा – मंदिरात लक्ष लक्ष दिवे लावून विश्वातील अंधःकार दूर करतो.

अशा या संपन्न, उदात्त परंपरेकडे दुर्लक्ष करून आपण गटारीचे हे नवे खूळ का आरंभले आहे? याला काय अर्थ आहे? अशा सुंदर परंपरा सोडून, चारित्र्याने, मनाने, विचाराने ऊन्नत होण्याऐवजी मद्यपान करुन, उन्मत्त होऊन, गाढवासारखे उकिरड्यात किंवा डुकरासारखे गटारात लोळण्याची ही अवदसा का आठवावी आपल्याला? खरं तर, वानराचा नर आणि नराचा नारायण हा उत्क्रांति-क्रम अपेक्षित आहे. तसेच व्हावे असा प्रयत्न करून स्वतःचा व समाजाचा उत्कर्ष करणे हे ध्येय सोडून असे पशुवत वागणे शोभा देते का आपल्याला?

लोकहो, विचार करा आणि आपल्या उदात्त संस्कृतीच्या गंगाप्रवाहात येऊन मिळणा-या या अशा अभद्र, अमंगळ गटारांना वेळीच आवर घाला. अन्यथा प्राचीन तीर्थवत भारतीय संकृतीरूपी भद्रमंगल भागिरथीचे विशाल गटार व्हायला कितीसा वेळ लागणार आहे!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खारीचा वाटा … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

 

 

? इंद्रधनुष्य ?

☆ खारीचा वाटा … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी

खारीचा वाटा ही रामायणातील कथा सर्वश्रुत आहे. प्रभू रामचंद्राला सेतुबंधाच्या कामात एका लहानशा खारीने तिच्या परीने केलेली मदत आणि प्रभू रामचंद्राने या छोट्याशा मदतीचे केलेले कौतुक आणि तिच्या कार्याचा गौरव यावरून खारीचा वाटा हा वाक्प्रचार रूढ झाला. कारण मदत जरी छोटी असली तरी त्या मागील भावना ही फार महत्त्वाची.

मात्र काही भाषा अभ्यासकांच्या मते खारीचा वाटा म्हणजे काही छोटी मदत नाही. त्यांच्या मते खार हे पूर्वीच्या काळातील मापन प्रमाणक असून आता जसा किलोचा वाटा, एकराचा वाटा आहे, तसा पूर्वी खारीचा वाटा असे. यासाठी त्यांनी गीर्वाण लघुकोशातील मुष्टिका, निष्टिका, अष्टिका, कुडव, प्रस्थ, आढकी, द्रोण आणि खार या मापन प्रमाणकांचा संदर्भ दिला. त्यानुसार खार म्हणजे १ कैली माप. उदाहरणादाखल धान्य मापन करावयाचे असल्यास ते असे –

 ४ मुठी = ४ मुष्टिका = १ निष्टिका

 ८ मुठी = २ निष्टिका = १ अष्टिका

१६ मुठी = २ अष्टिका = १ कुडव

६४ मुठी = ४ कुडव = १ प्रस्थ

 २५६ मुठी = ४ प्रस्थ = १ आढकी

 १०२४ मुठी = ४ आढकी = १ द्रोण

 २०४८० मुठी = २० द्रोण = १ खार

यावरून १ खार धान्य म्हणजे २०४८० मुठी धान्य. जर १ मूठ धान्य अंदाजे ५० ग्रॅमच्या स्वरूपात धरल्यास २०४८०/५० = १०२४ किलो धान्य होते.

गणितीय पध्दतीतील ही अष्टमान पध्दत पुढे संगणकीय प्रणालीमध्ये वापरली गेली.

जसे 1024B = 1 KB, 1024 KB =1 MB, 1024 MB = 1 GB 

… इतके दिवस “ खारीचा वाटा “ म्हणजे “ अगदी लहान वाटा “ असेच वाटायचे….. पण ‘खार‘ हा शब्द म्हणजे फक्त एका लहानशा प्राण्याचे नाव नाहीये, तर ‘खार‘ हे काही मोजण्याचे एक ‘मापक’ किंवा एक ‘प्रमाण’ आहे.. आणि “ खारीचा वाटा “ म्हणजे “ खूप मोठा वाटा “ हे मला तरी नव्यानेच समजले.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “काल आणि उद्या यांचं बेट…” – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

‘काल आणि उद्या यांचं बेट…’  – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

 

– – – डायोमीड आयलंड्सची गूढ कहाणी

बेरिंग सामुद्रधुनीत दोन छोटी बेटं आहेत – लिटल डायोमीड आणि बिग डायोमीड. या दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं आहे!

लिटल डायोमीड बेट अमेरिकेचं आहे, आणि तिथं आजचा दिवस चालू असतो. दुसरीकडे बिग डायोमीड बेट रशियाचं आहे, जिथं आधीच उद्या सुरू झालेला असतो! म्हणूनच लिटल डायोमीडला “Yesterday Island” आणि बिग डायोमीडला “Tomorrow Island” म्हणतात.

या दोन्ही बेटांमध्ये इंटरनॅशनल डेट लाइन जाते – जी पृथ्वीवरील ‘आज आणि उद्या’ यांचं काल्पनिक सीमारेषा ठरवते.

लिटल डायोमीडवर थोडी लोकवस्ती आहे – सुमारे ८० एस्कीमो लोक तिथं राहतात. दुसरीकडे, बिग डायोमीडवर कुणीही राहत नाही – तिथं फक्त रशियन लष्कराचं स्टेशन आहे.

हिवाळ्यात जेव्हा समुद्र गोठतो, तेव्हा हे दोन बेटं बर्फाच्या पुलानं जोडली जातात. काही धाडसी लोक चालत एक बेटावरून दुसऱ्या बेटावर जातात – म्हणजे कालातून उद्यात किंवा उद्यातून कालात!

हे बेटं एकमेकांना स्पष्ट दिसतात. म्हणजे, अमेरिकेत उभं राहून आपण रशियाकडं बघू शकतो, आणि उलटंही.

थोडक्यात, हे बेट म्हणजे भूगोल, राजकारण आणि वेळ यांचं अद्भुत मिश्रण आहे. एवढं जवळ असूनही – दोन देश, दोन वेळा, दोन जगं!

एका बेटावर सूर्य मावळतोय… आणि दुसऱ्यावर तो आधीच उगवलेला असतो. त्यामुळेच डायोमीड बेटं सांगतात – अंतर नेहमी मैलांनी मोजू नये… काही अंतरं काळातही असतात !

*******

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आम्ही एक UPI संकटाच्या काळात आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आम्ही एक UPI संकटाच्या काळात आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

जिथे जाल तिथे QR कोड तुमचे बँक खाते रिकामं करण्यासाठी तयार असतो.

भाजीवाले, रिक्षावाले, पान टपऱ्या, आलिशान दुकानं — सगळे फक्त एका स्कॅनवर तुमच्या पैशांपासून दूर आहेत. कोणतीही संकोच नाही, कोणतीही जाणीव नाही. फक्त दोन टॅप, आणि काम संपलं.

पूर्वी असं नव्हतं…

पैशांना वजन असायचं. तुम्ही ते हातात धरायचात. दहा रुपयांच्या नोटेचा स्पर्श, एखादी कुरकुरीत ₹५०० ची नोट खर्च करताना येणारी घालमेल. पाकीट उघडून खर्च करण्याआधी दोनदा विचार करायची ती क्रिया. तो ‘फ्रिक्शन’ म्हणजे शहाणपणा होता. तो तुम्हाला थोडा थांबवत होता, विचारायला लावत होता — माझं खरंच याची गरज आहे का?

UPI ने तो फ्रिक्शन काढून टाकला. आणि त्यासोबत आपल्या मेंदूमधील एक महत्त्वाचा भावनिक सर्किटही. वर्तनशास्त्रज्ञ याला “pain of paying” म्हणतात — खर्च करताना होणारी ती हलकीशी मानसिक घालमेल, जी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवते. रोख रक्कम देताना ती होती. UPI ने ती गायब केली.

हे सगळं मला गेल्या आठवड्यात समजलं, जेव्हा मी माझे मासिक खर्च तपासत होतो. आकडे पाहून अक्षरशः धक्का बसला.

फूड डिलिव्हरीवरचा खर्च दुप्पट झाला होता. यादृच्छिक व्यवहार, विसरलेली सदस्यता शुल्कं, अनियोजित खर्च — हे सगळं शांतपणे होत होतं, आणि मी निष्काळजीपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. सोयीने मला सुस्तावून टाकलं होतं. मी झोपेत चालणाऱ्यासारखा खर्च करत होतो.

बाबांनी नेहमीप्रमाणे आधीच सांगितलं होतं. ते अजूनही नोटा बाळगतात. महिन्यातून एक किंवा दोनदा रोख रक्कम काढतात. त्यांना वाटतं, त्यामुळे वास्तवाशी नातं टिकून राहतं.

सुरुवातीला मी ते जुनाट म्हणून झटकून टाकलं. पण आता त्यांचं म्हणणं कळतं.

मर्यादेत एक शिस्त असते. स्पर्श करता येणाऱ्या पैशात स्पष्टता असते.

UPI च्या सुलभतेमुळे आपल्याला भास होतो की आपण सगळं परवडवू शकतो. पण तुम्ही पैसे जाताना पाहत नाही. पश्चात्तापही होत नाही.

आणि खरं तर, पश्चात्ताप शत्रू नाही — तो एक प्रतिक्रिया आहे. एक आठवण आहे. त्याशिवाय खर्चाचं परिणामांशी नातं तुटतं.

आणि जेव्हा पैसा अनभिज्ञतेने खर्च होतो, तेव्हा जीवनसुद्धा दिशा हरवू लागतं.

सोय ही एका किमतीवर येते. आणि ती किंमत म्हणजे जाणीव.

कॅशलेस म्हणजे कायमच भान ठेवूनच होतो असं नाही.

एकदा हरवलेली जागरूकता पुन्हा मिळवणं महागडं असतं.

हा लेख तंत्रज्ञानाला दोष देण्यासाठी नाही.

हा केवळ आठवण करून देण्यासाठी आहे — की व्यवहाराची गती, विचाराच्या गतीपेक्षा जास्त वेगाने जाऊ नये.

UPI राहणारच आहे. पण तसाच विचार पण राहायला हवा. संयम राहायला हवा. आणि तो लहानसा आतला आवाज, जो पूर्वी कुजबुजायचा — पुन्हा विचार कर.

कारण खरी अडचण पाकिटात नाही, तर खर्च आणि जाणिवा यांच्यामधल्या त्या शांततेत आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अभिधा… – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अभिधा… –  माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

माझ्याकडे हे नाही ते नाही हे वाक्य आपल्या तोंडातून दिवसातून किमान एकदा तरी बाहेर पडतेच. . . जीवनातलं असमाधान आणि कर्तव्य शून्यता आयुष्य भर उगाळली तरी संपत नाही. . . . आणि मग एक दिवस आयुष्य संपतं. . . . . कर्तृत्वाला मिळणारी झळाळी संकुचित विचारांच्या कोंदणात तशीच अडकून राहते आणि चमकायचीच राहून जाते तत्पूर्वी. . . .!

– – – – लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. .!

कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून. . . ,

“अभिधा” शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती. .!

ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी ‘अभिधा धुमटकर’ हिची.!

अभिधा आपल्या पार्ल्यातल्या. . . शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी. ए. ची पदवी घेतली.! पुढे पी. एच. डी. पर्यंत मजल मारली.! सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे.!

— — ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही.!

ती जन्मतःच दृष्टीहीन आहे.!

या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.!

अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक.!

ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची.! ही मात्र डोळे फिरवायची.!

त्यावरुन आईने डॉक्टरांना हे सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही.!

खरी कहाणी इथूनच सुरू होते.!

. . या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.! त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.! त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं.! बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती.! एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता.! मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती.!

पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला.!

बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले.! प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच.! जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची.! ‘कमळ’ शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. .! शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा ‘ब’ कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.!

अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती.! आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता.! शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, “पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार.! पण मला खेळू द्या.! ‘ यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा. . तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता. .!

. . आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं.! अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली.! गणितात पैकीच्या पैकी मार्क. . . आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं.!

नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं.! त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची.! नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं.!

अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती.! संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.! याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली.! पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या.!

1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली.!

सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी. एच. डी चा विषय पक्का झाला.!

हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले. . शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात.! एम. ए. , बी. एड. , सेट, नेट पूर्ण झालेलं एम. फील. चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.! पण अंध म्हणून नकार मिळत होते.! ती खूप खचून जायची.!

पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली.! नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली.! ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे.!

रीडर नसल्यामुळे पी. एच. डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती.! पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो. जे. व्ही. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी. एच. डी. मिळाली.!

. . . . पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली.! 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.!

श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्ससाठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं.! फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेणं खूपच खर्चिक होणार होतं.! त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती.! अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती.! पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं.!

लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली.! सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे.! ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते.! सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे.!

दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं.! त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम.!

अभिधाचे 14 रिसर्च पेपर “इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली”, “इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स”, “इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग”, “इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च” अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.!

आता प्रश्न हा उरतो की आपले देखील आयुष्याचे पेपर या धर्तीवर नामांकित होतील काय? .

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं – – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एक निवृत्त पोलिस कमिशनर, जे आधी आपल्या सरकारी बंगल्यात राहत होते, ते आता कॉलनीतल्या स्वत:च्या घरी राहायला आले. त्यांना आपल्याबद्दल प्रचंड अभिमान होता.

दररोज संध्याकाळी ते कॉलनीतल्या पार्कमध्ये चालायला जायचे, पण तिथे येणाऱ्या कोणालाही काही बोलायचे नाही, त्यांच्या दिशेने पाहायचेही नाही. त्यांना वाटायचं – “हे लोक माझ्या लेव्हलचे नाहीत! “

एक दिवस ते एका बाकावर बसले होते, तेव्हा एक म्हातारा तिथे येऊन त्यांच्या शेजारी बसला आणि सहज गप्पा मारायला लागला.

पण कमिशनर साहेबांनी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ते फक्त आपल्या बद्दलच बोलत राहिले – आपण काय पदावर होतो, आपली प्रतिष्ठा काय आहे, आपण किती मोठे आहोत…

ते म्हणाले, “मी इथे राहतो कारण हे माझं स्वत:चं घर आहे! ”

असं काही दिवस चाललं. म्हातारा फक्त शांतपणे ऐकत राहिला.

शेवटी एक दिवस त्या म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केली –

“ऐका कमिशनर साहेब, विजेचा बल्ब असतो ना – तो जोपर्यंत पेटतो, तोपर्यंत त्याचं महत्त्व. पण एकदा का फ्यूज झाला, की मग तो १० वॅट असो, २०, ४०, १०० – काही फरक पडत नाही. दिसायला तो बल्बच राहतो, पण प्रकाश देत नाही. मी इथे पाच वर्षांपासून राहतो. पण मी आजवर कुणालाही सांगितलं नाही की मी दोन वेळा संसद सदस्य होतो. “

हे ऐकल्यावर कमिशनर साहेबांचा चेहरा बदलला.

म्हातारा पुढे म्हणाला –

“तुमच्या उजव्या बाजूला जे वर्मा बसले आहेत, ते रेल्वेमध्ये जनरल मॅनेजर होते. समोर हसत-हसत बोलणारे रावसाहेब – आर्मीमधून लेफ्टिनंट जनरल म्हणून रिटायर झालेत. आणि कोपऱ्यात जे पांढऱ्या कपड्यांत शिवाजी बसले आहेत – ते ISRO चे चेअरमन होते. पण त्यानेही कधी कोणाला हे सांगितलं नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे – हे सगळे लोक इथे आहेत, मोठमोठ्या पदांवरून आलेत, पण आज सगळे एकसारखे आहेत.

– – मी आधीच सांगायला पाहिजे होतं – सगळे फ्यूज झालेले बल्ब एकाच गटात येतात.

कोणताही बल्ब – झिरो वॅट, १०, २०, ४०, ६०, १०० – पेटतो तोपर्यंतच महत्त्वाचा. एकदा का बंद झाला, की मग तो LED असो, CFL, हॅलोजन, डेकोरेटिव – सगळे सारखेच! आम्ही सगळे इथे बसलेले – तुमच्यासकट – फ्यूज झालेले बल्ब आहोत. पॉवर गेले की, पोलिस कमिशनर आणि पोलिस कॉन्स्टेबल – फरक राहत नाही.

– – उगवता सूर्य आणि मावळता सूर्य – दोघंही सुंदरच असतात. पण लोक नमस्कार फक्त उगवत्या सूर्यालाच करतात. मावळत्याला कोणी विचारत नाही. हे वास्तव आपण मान्य केलंच पाहिजे.

आपण जे पद, प्रतिष्ठा, सत्ता यांमध्ये जगत असतो – ती आपली ओळख नसते. ती काही काळापुरती असते. आणि जर आपण त्यालाच आयुष्य समजत असू, तर लक्षात घेतलं पाहिजे – की एक दिवस हे सगळं संपणारच.

– – शतरंजात राजा, राणी, उंट, घोडा, प्यादा – यांचं महत्त्व फक्त खेळ सुरू असेपर्यंतच असतं.

एकदा का खेळ संपला – सगळेच एकाच पेटीत जातात. डब्बा बंद!

. . . . . . आजचा दिवस शांत आहे याचा आनंद घ्या, उद्याही शांती लाभो हीच आशा बाळगा…

आणि शेवटी… आयुष्यात कितीही सर्टिफिकेट्स, मेडल्स, पुरस्कार मिळाले – शेवटी सगळ्यांना मिळणारं एकच प्रमाणपत्र असतं… ‘मृत्यू प्रमाणपत्र! ’ “ 

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातला कोलाहल कमी करणारा लेख…! – भाग-२ – लेखक : श्री सुकृत करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनातला कोलाहल कमी करणारा लेख…! – भाग-२ – लेखक : श्री सुकृत करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. अंजली दिलीप गोखले

आपल्याला काय आवडतं याचा बोध त्यांना फार लहानपणी झाला. त्याच मार्गानं जाण्याचा त्यांचा निश्चय झाला असावा. म्हणून चितमपल्ली यांनी वनखात्यात नोकरी करण्यापूर्वी रितसर प्रशिक्षण घेतलं. मद्रासमधल्या प्रशिक्षण काळात देशभरातल्या जंगलांची ओळख करुन घेतली. महाराष्ट्राच्या वनखात्यात नोकरी सुरु केली. सुरवातीच्या दिवसांमध्ये वडगाव (मावळ, पुणे) इथं नियुक्ती मिळाली. गो. नी. दांडेकर तेव्हा जवळच तळेगाव मुक्कामी होते. चितमपल्लींनी ‘गोनीदा’ वाचलेले. त्या प्रेमापोटी त्यांनी गोनीदांची भेट घेऊन त्यांना वन खात्याच्या विश्रामगृहात पाहुणचाराचं आमंत्रण दिलं. गोनीदांनी ते स्विकारलं. दोघांमध्ये गप्पागोष्टी व्हायच्या. एकदा गप्पांच्या ओघात गोनीदा चितमपल्लींना म्हणाले, “संत तुकारामांचा अभंग आठवला – जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥”

चितमपल्ली विचारात पडले. गोनीदांनी मला हे का सुनावलं? नेमका हाच अभंग का सांगितला? विचार केल्यावर त्यांना जाणवलं, की मावळात अनेक समृद्ध जंगलं आहेत. ती अनेकदा गोनीदांच्या पायाखालून गेली आहेत. तिथल्या अनेक वनाधिकाऱ्यांचे अनुभव त्यांनी घेतले असणार. म्हणूनच गोनीदांनी तुकारामांचा अभंग सांगून मला गुरुमंत्रच दिला. उत्तम व्यवहार करुनच धन मिळवायचं आणि त्याची आसक्ती न बाळगता ते खर्च करायचं. थोडक्यात भ्रष्टाचार करायचा नाही. चितमपल्लींचं पहिलं मोठेपण हे, की त्यांनी गोनीदांच्या सुचकतेमधून नेमका अर्थ उचलला. दुसरं मोठेपणं म्हणजे त्याचं तंतोतंत पालन केलं. नवेगाव बांधमधल्या नितळ झऱ्याप्रमाणं चितमपल्लींची कारकीर्द वनखात्यात असूनही निर्मळ राहिली.

गोनीदांनी तेवढंच सांगितलं नाही. फॉरेस्ट खातं ही ब्रिटिशांची देणगी. ब्रिटिशांनी भारतीय जंगलांचं जेवढं शोषण केलं तेवढं कोणीही केलेलं नाही. अक्षरशः लूट आणि नासधूस. ब्रिटिश आमदानीपासून फॉरेस्ट खातं जंगलातल्या प्रत्येक झाडाकडं, स्त्रोताकडं ‘ॲसेट’ म्हणून पाहतं. ‘प्रत्येक झाडाचं व्यापारी महत्त्व, बाजार मूल्य ओळखायचं म्हणजे वनविद्या’, ही ब्रिटिश नीती. आपल्या काळ्या इंग्रजांनी तीच पुढं रेटली. चितमपल्ली म्हणतात- “जंगलांकडं व्यवहारी, व्यावसायिक वृत्तीनं पाहण्याचं शिक्षण मी घेतलं होतंच. पण मी शिकलेलं जंगल आणि गोनीदांनी मला दाखवलेलं जंगल यात जमीनअस्मानाचा फरक होता. जंगलाचं खरं सौंदर्य गोनीदांनी मला दाखवलं. वृक्ष वाढतात कसे, त्यांची हिरवाई येते कुठून, त्यांची फुलं, पाखरांची गाणी हे सगळं तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. एखादी कला तुमच्या हाती पाहिजे, हे भान गोनीदांनी मला दिलं. लेखकाला आवश्यक असणारी सौंदर्यदृष्टी गोनीदांनी दिली. गोनीदांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. तुकाराम गाथा वाचायला सांगितली. त्यातले कुठले अभंग पाठ करायचे हे सांगितलं. पुढच्या भेटीत ते माझ्याकडून या अभंगांची उजळणी करून घेत. त्यांचा अर्थ समजावून सांगत. “

नंतर चितमपल्लींची नांदेडला बदली झाली. तिथं नरहर कुरुंदकर, राम शेवाळकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. नांदेडच्या संस्कृत पाठशाळेत ते गेले, जिथं यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे होते. चितमपल्लींनी त्यांच्याकडं संस्कृतचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली. पण ‘हे साहेब फॉरेस्टमधले म्हणजे मांसमच्छी, दारू असा सगळा यथेच्छ कार्यक्रम होत असणार, ‘ असं शास्त्रींना वाटलं. ‘यांच्यामुळं आपल्या पाठशाळेचं वळण बिघडायचं, ‘ असं वाटून शास्त्रींनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. चितमपल्लींनी हे सगळं कुरुंदकरांच्या कानावर घातलं. मग कुरुंदकरांनी मध्यस्थी केली. हे फॉरेस्टमध्ये असले तरी पूर्ण शाकाहारी आहेत. मद्याला शिवत नाही. विडीकाडी नाही. हे कळल्यावर यज्ञेश्वरशास्त्रींच्या पाठशाळेत चितमपल्लींचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. संस्कृत शिकायला सुरुवात केली तेव्हा चितमपल्ली चाळीस वर्षांचे होते, पण त्यांनी मोठ्या जिद्दीनं संस्कृत शिकून घेतलं. प्राचीन संस्कृत ग्रंथांमधली वनविद्या अभ्यासण्यासाठी या ज्ञानाचा त्यांना पुरेपूर उपयोग झाला. केवळ पशुपक्षिशास्त्रावर आधारीत सविस्तर म्हणावा असा हंसदेवविरचित ‘मृगपक्षिशास्त्र’ हा एकमेव प्राचीन संस्कृत ग्रंथ भारतात उपलब्ध आहे. या ग्रंथात पहिल्या खंडात १२७ पशूंची आणि दुसऱ्या खंडात ९७ पक्ष्यांची माहिती हंसदेवानं दिलीय. मोठ्या कष्टानं हा ग्रंथ मराठीत आणून चितमपल्लींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. या ग्रंथातल्या पशुपक्ष्यांची वर्णनं वाचल्यानंतर एकट्या मनुष्यप्राण्यानं किती प्रजाती मुळापासून संपवल्या याचीच खंत दाटते.

प्राचीन भारतात मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हतं. त्यामुळं त्याकाळी ऋषीमुनींची संख्या जास्त होती. प्रचंड अध्ययन करुन व्यासंगी होण्यासाठीचा अवधी त्यांना मिळत असे. निसर्ग निरीक्षण करत राहायचं आणि मिळणारे निष्कर्ष गुरु परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या नोंदवले जात. प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून हे ज्ञानभांडार आहे. त्याच ऋषीमुनींची जातकुळी सांगणारे आजचे फार दुर्मिळ संशोधक त्याचा पाठपुरावा करतात. उदाहरणार्थ : कावळ्याच्या घरटं बांधण्याच्या सवयीचं निरीक्षण करून वराहमिहीर, गार्ग्य, पराशर या मंडळींनी पाऊसमानाचा अंदाज व्यक्त करण्याचे ठोकताळे मांडले. पहिला ठोकताळा असा – की कावळ्यानं पिंपळ, करंज, अर्जून, आंबा, कडुनिंब या झाडांवर घरटं केलं तर पाऊस चांगला पडतो. बोर, खैर, बाभूळ, काटेसावर अशा काटेरी झाडांवर कावळ्यानं घरटं केलं की दुष्काळ पडणार. दुसरं निरीक्षण असं, की पूर्व, उत्तर, नैऋत्य आणि वायव्य या दिशांना घरटी केली तर पाऊस चांगला, पण हीच घरटी पश्चिम, दक्षिण, आग्नेय आणि झाडांच्या मधोमध असली तर पाऊस कमी पडणार. तिसरं निरीक्षण असं की या घरट्यात कावळीनं अंडी किती घातली? तीन-चार अंडी घातली तर पाऊस चांगला, एखादंच अंडं असेल तर दुष्काळ पडणार.

चितमपल्ली यांनी हे ठोकताळे संस्कृतमध्ये वाचले. स्वतः अनेक वर्षं निरीक्षण करुन ते ताडून पाहिले. त्यानंतर ते म्हणतात, “हे ठोकताळे अचूक असल्याचा अनुभव मी घेतला आहे. ” डॉ सलीम अली या दिग्गजाच्या सहवासात राहून त्यांनी शास्त्रोक्त पक्षी निरीक्षण आणि जागरुक पक्षी प्रेम म्हणजे काय हे शिकून घेतलं. अली साहेबांनी आधुनिक पक्षी निरीक्षण शास्त्र त्यांच्याकडून घोटवून घेतलं.

संस्कृत काव्यांमधून राजहंस, सुगरण, शुक, काक, गरूड आदी पक्ष्यांची वर्णनं आहेत. मग चकोर हा खरोखर चांदणं टिपतो का, चातक पक्षी मेघाचे थेंब पिऊनच तहान भागवतो का, राजहंसाकडं खरोखरच निरक्षीर विवेकबुद्धी असते का? . . . की या सगळ्या केवळ कवीकल्पना आहेत? याचा रहस्यभेद चितमपल्ली त्यांनी केलेल्या अभ्यासातून मांडतात तेव्हा ते वाचायला मजा येते.

***** 

चितमपल्ली म्हणतात त्याप्रमाणं त्यांनी अखंड तपश्चर्या केली. नाहीतर माझ्यासारख्या मराठी माणसाला जंगलातलं गूढ घरी बसून कसं उलगडलं असतं? पशुपक्ष्यांच्या गमतीजमती कळल्या असत्या का? त्यांच्या सवयी, लकबी आणि खोड्या मी कुठं अनुभवल्या असत्या?

कोकणातल्या खाजणाच्या जंगलापासून ते हिमालयातल्या देवदारच्या जंगलापर्यंतची जगातल्या कुठल्याही राष्ट्रात नसलेली सोळा प्रकारची जंगलं फक्त भारतात आढळतात, हे चितमपल्लींनी मला सांगितलं. नवेगाव बांध येथील प्रख्यात शिकारी माधवराव पाटील यांच्याशी त्यांनी स्वतःहून मैत्र जुळवलं. नवेगावात ते बारा वर्षं होते, तोपर्यंत दोघांनीही हा दोस्ताना घट्ट जपला. या माधवरावांनी चितमपल्लींना जंगल वाचायला शिकवलं. “माधवराव आणि नवेगावच्या गोंड आदिवासींकडून मी अरण्यविद्या शिकलो, ” या शब्दात चितमपल्लींनी ऋण व्यक्त केलं आहे. ते आदिवासी पाड्यांवर गेले, त्यांच्यासोबत राहिले. त्यांची भाषा शिकले. त्यांच्याकडून जंगलं, पशुपक्ष्यांचं परंपरागत ज्ञान टिपून घेतलं. दंतकथा, लोककथा, अनुभव ही शिदोरी चिकाटीनं गोळा केली. ती सोप्या तरीही रंजक, थरारक, वेल्हाळ मराठीतून माझ्यासमोर ठेवली. गुगल किंवा एआयलाही जे शक्य नाही ते चितमपल्ली यांनी माझ्यासाठी करून ठेवलं आहे.

वाघ, सांबर आदी वन्यप्राणी स्वतःचं मूत्र, शरीर गंध, नखांनी केलेल्या खूणा आदींच्या माध्यमातून जंगलातल्या त्यांच्या चतुःसीमा निश्चित करतात. ते त्यांचं राज्य असतं. तिथं दुसऱ्या नराला राहण्याची परवानगी नसते. निमूटपणानं निघून जायचं. तिथंच राहण्याचा त्यानं प्रयत्न केला तर दोघांमध्ये घनघोर युद्ध होतं. घनघोर म्हणजे ‘एक तर तू राहशील किंवा मी या पद्धतीचं आरपार. ‘ या क्रौर्याच्या थरारक कहाण्या चितमपल्ली मला समजावून सांगतात.

पण अलिकडं कित्येक मूर्ख वाघ पाहायला जंगल सफारी करतात. तिथं घुसखोरी करुन फोटो काढतात. ‘वाघ दिसला, बछडे पाहिले, ‘ म्हणून कौतुकानं मिरवत बसतात. वनखात्याच्या या बिनडोक ‘टायगर शो’ला चितमपल्लींचा स्पष्ट विरोध होता. लोकांना वाघ दिसावेत यासाठी ते त्यांच्या जागा सोडून येणं आवश्यक असतं. त्यासाठी सरकारी अर्धवटांनी नैसर्गिक अधिवासाच्या, पाणवठ्याच्या जागा नष्ट करुन कृत्रिम जागा निर्माण केल्या. हेतू हा की माणसांनी तयार केलेल्या ‘स्पॉट’च्या अवतीभोवती वाघांनी यावं. तसंच घडतं. नाईलाजानं वाघ सापळ्यात अडकतात आणि मूर्खांची ‘टायगर सफारी’ सफळ संपूर्ण होते.

*****

पशुपक्ष्यांची भाषा समजली पाहिजे हा माणसाचा पुरातन हट्ट आहे. अनेकांना तो साधतो देखील म्हणे. प्राचीन भारतात ही एक विद्या शाखा होती. पशुपक्ष्यांचं बोलणं समजणं, त्यांच्याशी संवाद साधता येणं या शास्त्राला ‘निळावंती’ म्हटलं जातं. चितमपल्ली म्हणतात, “माझी आई म्हणे, तुला पशुपक्ष्यांचं कळतं म्हणजे तुला ‘निळावंती’ येते. पण या ‘निळावंती’सोबत एक शापसुद्धा येतो. ‘निळावंती’ जाणणाऱ्याचा निर्वंश होतो. जगातल्या सगळ्या पक्षीतज्ज्ञांचा बायोडाटा मी पाहिला. त्यातल्या कित्येकांना मूल नाही किंवा फक्त मुलगीच आहे. ” मारुती चितमपल्ली यांनाही एक मुलगीच होती. दुर्दैवानं तीही चितमपल्ली यांच्याआधीच मरण पावली. तिच्या जाण्याचं दुःख चितमपल्लींच्या वाट्याला आलं. चितमपल्ली एकटेच मागं उरले होते.

पण त्यांचा निर्वंश झाला असं कसं म्हणणार?

ज्यांनी आयुष्यभर तुडवलेल्या जंगलांमधली जादुई दुनिया त्यांच्या अठरा-वीस पुस्तकांमधल्या मोहक मराठीतून तुमच्या-माझ्यासमोर अमर केली. आयुष्याच्या संध्याकाळी ‘मत्स्यकोश’ लिहिण्याच्या जिद्दीनं अथांग सागरात डुबकी मारली. वृक्षकोश, प्राणीकोशाचं काम केलं. माणूस, पशू, पक्षी आहेत तोवर मारुती चितमपल्ली स्वतः जिवंत राहणार. वृक्षदेवता, जलदेवता, वनदेवता या संकल्पनांवर त्यांचा विश्वास होता. हा विश्वास आपल्यात वाढीस लावणं ही मारुती चितमपल्लींना खरी आदरांजली असेल.

समाप्त –  

लेखक : श्री सुकृत करंदीकर

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आता आम्ही दोघंच असतो…” लेखक : श्री राजेंद्र खरात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आता आम्ही दोघंच असतो…” लेखक : श्री राजेंद्र खरात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆ 

…. 

“एक वर्षापूर्वी या घरात आम्ही तिघे असायचो. गेल्या वर्षी पत्नी गेली. आता दोघंच असतो. मी आणि बाबासाहेब आंबेडकर.”

प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत सतिश कुलकर्णी यांना काल वाई येथे त्यांच्या ‘शिल्पकार’ नावाच्या निवासस्थानी भेटलो. कधीकाळी लहानपणी आंबेडकरांचे पाय घराला लागले आणि या ब्राह्मणाचं अवघं आयुष्य आंबेडकरमय झालं. तेव्हापासून गेली सत्तर वर्षे हा माणूस बाबासाहेबांच्या पुस्तकांच्या आणि विचारांच्या सावलीत जगतो आहे.

हजारो पुस्तकांनी भरलेलं घर, त्यातील अर्धी अधिक आंबेडकरांवरची, बाबासाहेबांची समग्र ग्रंथसंपदा, भाषणाचे खंड, विश्वकोशापासून कालपरवा आलेल्या आंबेडकरांवरील पुस्तकांपर्यंत हजारो पुस्तकांची श्रिमंती असलेला हा माणूस. या माणसाचं प्रत्येक वाक्य बाबासाहेबांच्या विचारांनी, कोट्सनी भारावलेलं. सहजपणे तोंडावर येणारे शेकडो संदर्भ. अगदी अलिकडे वाचलेल्या ‘आभाळालाही वर बघावं लागतं इतकी भिमा तुझी उंची’ किंवा ‘माझ्यासारख्या दगडाचा तू अजिंठा केलास’ अशा कवितांमधील ओळी ऐकवून स्तिमित करणारा ऐंशी वर्षाचा भिमाचा खराखुरा वारसदार.

मी विचारलं ‘सर, तुमची मुलं इतक्या लांब,तुम्ही एकटे कसे राहता,यावर त्यांचं ऊत्तर- ‘ मी एकटा कुठं आहे? माझ्या अवतीभोवती बाबासाहेब असतात.जीथं जाईल तीथं ते बरोबर असतात’.

बाबासाहेबांच्या प्रेमामुळं पछाडलेलं ऐंशी वर्षाचं अवघं आयुष्य. आणि या म्हातार्याचं अत्यंत कृतार्थतेनं भारावलेलं संभाषण ऐकलं की आपल्या टीचभर विद्रोहाची लाज वाटू लागते. आपण अजून जातीय कोशापलिकडचे सार्वकालिक थोर आणि सर्वहारा आंबेडकर समजूनच घेवू शकलो नाही याचं वाईट वाटतं. कुणी याला या ऐंशी वर्षे वयाच्या बामणाची समरसता म्हणेल, पण जेव्हा माझ्या चळवळीतल्या डाव्या माणसाला मी प्रश्न विचारतो-तुम्ही आंबेडकर वाचलेत का? तर तो हो म्हणतो, मात्र काय वाचलंय विचारल्यावर त्याच्याकडं उत्तर नसतं. 

हायस्कूलला असताना ‘ महापुरूषांचा पराभव’ हा डॉ.बाबासाहेबांचा धडा होता.त्यात अनुयायीच कसे महापुरूषांचा पराभव करतात यावर भाष्य होतं. मी आज खात्रीने सांगतो, ‘सतीश कुलकर्णी’ यांच्यासारखे अनुयायी असतील तर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरूषाचा पराभव जगात कुणीच करू शकत नाही.

लेखक : श्री राजेंद्र खरात 

(सौजन्य…मिशन बौद्धमय भारत…. )

 Nitin … 91 9833539126

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाराष्ट्राचा लोकोत्सव.. वारी – एक अनुभव!… माहिती संग्राहक : श्री सदानंद पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ महाराष्ट्राचा लोकोत्सव.. वारी – एक अनुभव!… माहिती संग्राहक : श्री सदानंद पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

वारीमध्ये चालणारा एक ते दीड लाख लोकांचा समूह म्हणजे, एक फिरते गावच… या गावाला सुविधा पुरविणारा व्यावसायिकांचा वर्ग पालखीसोबत असतो. वारीचा मार्ग हा अनेकांचा पोटापाण्याचा मार्ग आहे. यामध्ये चहाच्या गाडय़ा, नाश्ता-जेवणाची दुकाने, दाढी कटिंग करणारे, प्रवासातील गरजेची गोष्ट म्हणजे, चप्पल दुरुस्ती, बॅगा दुरुस्ती, मोबाईल चार्जिग करून देणारे, असे अनेक व्यावसायिक आहेत. याशिवाय स्थानिक लोकांसाठीसुद्धा जत्रेमध्ये असतात तशी दुकाने असतात. हे लोकसुद्धा वारीसोबत व्यवसाय करत फिरत असतात…..

पालखी सोहळ्यात ओळख असो अथवा नसो, एकमेकांचा उल्लेख ‘माऊली’ असा केला जातो, हे तर सर्वाना माहीत आहेच… येथे विठ्ठलच विठाई होतो. संत ज्ञानेश्वर वारक-यांसाठी ज्ञानेश्वर माऊली बनतात. हा लिंगबदल फक्त नावापुरता राहत नाही. कामाची वाटणीसुद्धा काही प्रमाणात बदलते…..

शहरामध्ये पुरुषांचा घरकामातील सहभाग आता वाढत असला व तो कौतुकाचा नसून त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे याची जाणीव निर्माण झाली असली, तरी सर्वत्र अशी परिस्थिती नाही…..

अनेक पुरुषांचा घरी ज्या कामांशी संबंध येत नाही, अशी कामे ते वारीमध्ये करतात… स्वयंपाकामध्ये मदत करणे – भाजी खरेदी, चिरणे, बनवणे, भात लावणे क्वचित प्रसंगी शिरा, भजी वगैरे पदार्थ बनवण्यात पुरुष सहभागी होतात, मदत करतात. पंगत वाढण्याची जबाबदारी मुख्यत्वे पुरुषांकडे असते. चपाती, भाकरी बनवण्याचे काम मात्र अजून महिला वर्गाकडे आहे. वारीत सहभागी होणा-या स्त्रिया अनेकदा विसाव्याच्या ठिकाणी ओव्या म्हणतात. अनेक लोकदैवतांचे वर्णन ओव्यांमधून आले आहे. पण विठ्ठलाविषयी असलेल्या लोकगीतांचे वैशिष्टय़ म्हणजे यामधील विठ्ठल- रुक्मिणीला घरकामात मदत करणारा आहे…..

रुक्मिणी धुणे धुवायला चंद्रभागेवर जाते, तेव्हा कपडे घासण्याचे, पिळण्याचे काम विठ्ठलाकडे असते… ‘चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोनियाचा विळा, रुक्मिणी धुणं धुते, देव विठ्ठल देतो पिळा’ किंवा ‘रुक्मिणी धुणं धुते देव घसा-याला बसं, दोघांच्या प्रीतीचं चंद्रभागेला हसू येतं’ सर्व संतांना त्यांची नित्यकर्म करताना देवाने मदत केल्याचे दाखले संतसाहित्यामध्ये आले आहेत…..

यामध्ये जनाबाईंना आंघोळीला पाणी काढणे, त्यांची वेणी घालणे वगैरे कामे आहेत… स्त्रियांनी रचलेल्या या लोकगीतात रुक्मिणीला मदत करणारा देव उभा केला आहे…..

वारीमध्ये नवीन येणा-या लोकांना वरील गोष्टी तर अनुभवायला मिळतातच… शिवाय महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या जीवनशैली असणा-या, वेगळ्या आर्थिक स्तरातून येणा-या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. कोकणी, अहिराणी, खान्देशी, तेलुगू-कन्नडमिश्रित अशा वेगवेगळ्या महाराष्ट्री भाषा बोलणा-या लोकांची गाठ पडते. आता नवीन पिढीच्या पोषाखामध्ये सर्वत्र एकसारखेपणा येतो आहे. पण जुन्या पिढीत पोषाखाची विविधता बघायला मिळते…..

सर्व संतांच्या समाधीस्थानापासून त्या-त्या संतांचे पालखी सोहळे निघतात… अर्थात यामध्ये ज्ञानेश्वरमाऊली व तुकाराम महाराजांचा पालखीसोहळा अधिक प्रसिद्ध आहे…..

या पालखी सोहळ्यामध्ये लाखांहून अधिक लोक सहभागी असतात… एवढय़ा लोकांच्या सामान वाहतुकीसाठी चार हजारांहून अधिक ट्रक व पाण्यासाठी टँकर, आरोग्यसेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स व काही छोटी वाहने अशी पाचशेएक वाहने या सोहळ्यात असतात…..

पालखीसोबत वारक-यांचा प्रवास सुरू झाला की, गर्दीमुळे वाहनांना पुढे जाणे शक्य नसते… त्यामुळे तंबू व इतर सामानाची वाहतूक करणा-या वाहनांना सकाळी पालखीची वाटचाल सुरू होण्याआधी, पुढच्या गावासाठी निघावे लागते. त्यामुळे तंबूमध्ये मुक्काम करणा-या वारक-यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. त्यानंतर प्रात:विधी उरकून, सोय असल्यास अंघोळ वगैरे उरकून घेतात. पाऊस नसेल, तर झाडाखाली किंवा मुक्कामाच्या जागीच प्लास्टिकचा कागद अंथरून एखादी डुलकी घेतात. पूर्वी घोंगडी व आता ज्याला कागद म्हणतात ती प्लॅस्टिकची खोळ ही वारीमधील एक बहुपयोगी वस्तू आहे…..

झोपताना, बसताना खाली अंथरण्यासाठी व पाऊस आला की, छत्रीऐवजी याचा उपयोग होतो… हा कागद अंगावर घेतला की, छत्रीप्रमाणे हात अडकून राहत नाही, त्यामुळे पाऊस चालू असतानासुद्धा टाळ-मृदंग वाजवता येतो. स्वत:बरोबर टाळ, मृदंग, वीणा, पिशवी या सर्वाचेच पावसापासून संरक्षण होते. पाण्याची सोय नसेल, तर आंघोळ पहिल्या विसाव्यापाशी होते. सकाळी प्रवास सुरू झाला की, साधारण दीड तासाने ठरलेल्या ठिकाणी पहिला विसावा होतो. स्थानिक भाविक पालखीचे दर्शन घेतात, तर वारकरी नाश्ता करून घेतात. नाश्त्याची सोय दिंडीतर्फे केली जाते. स्थानिक लोकांतर्फेसुद्धा अन्नदान केले जाते…..

त्यानंतर पुन्हा प्रवासास सुरुवात होते. दुपारी जेवणासाठी विसावा होतो… पाऊस नसेल, तर शेतात, माळावर मोकळ्या जागेत छान पंगती बसतात. पाऊस असेल, तर मात्र जेवणाची तारांबळ होते. अशा वेळेस डोक्यावर कागद पांघरून जेवण करतात. काही दिंडय़ांनी मंदिर, कार्यालय, एखाद्या इमारतीचे पार्किंग अथवा तत्सम ठिकाणाची व्यवस्था केलेली आहे. अर्थात लहान गावांमध्ये सर्व दिंडय़ांना अशी व्यवस्था मिळणे शक्य नाही…..

संध्याकाळी चारच्या सुमारास पुन्हा एक विसावा होऊन रात्री सहा ते सातच्या सुमारास पालखी मुक्कामी पोहोचते… तंबू व इतर सामान घेऊन जाणारे ट्रक आधीच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. ट्रकसोबत पुढे गेलेले लोक तंबू ठोकणे, स्वयंपाकाची तयारी वगैरे करतात. तंबू ठोकण्यापूर्वी पाऊस झाला असेल, तर चिखल बाजूला ओढून मग तंबू ठोकतात. तंबूच्या कडेने चर काढतात, त्यामुळे तंबू ठोकल्यावर पाऊस झाला, तर पाणी तंबूमध्ये न येता कडेने वाहून जाते. दिवसभर दमून चालून आलेले लोक जेवण करून, गप्पा मारत लवकरच झोपी जातात…..

या नित्यक्रमाशिवाय उभे रिंगण, गोल रिंगण, धावा, भारुडं वगैरे नैमित्तिक गोष्टीसुद्धा असतात… यापैकी रिंगणांचे आकर्षण तर खूपच आहे…..

अनेक वर्षे एकाच दिंडीमध्ये चालणा-या लोकांचे एक मैत्रीचे नाते तयार होते… एकाच तंबूत राहणा-या लोकांचा तर एक परिवारच तयार होतो. वर्षाने होणारी गाठभेट. मग सुरुवातीचे एक-दोन दिवस एकमेकांची विचारपूस करण्यात जातात. सध्या सोशल मीडियाच्या काळात नवीन पिढी एकमेकांच्या संपर्कात आहे. पण, अजूनही अनेक लोकांचा संपर्क व भेट फक्त वारीमध्ये होते…..

वारकरी असलेल्या किंवा वारकरी संप्रदायाविषयी आस्था असणा-या लोकांना दहा-पंधरा दिवस भजन करण्याचा, ऐकण्याचा आनंद मिळतो… नवीन भजनी मंडळींना वारीमध्ये भजनाचे प्राथमिक धडे मिळतात व वारक -या किमान जे काही अभंग पाठ असणे आवश्यक आहे, ते अभंग पाठ होतात. तर इतरांना नवीन चाली शिकण्याची संधी मिळते. संतविचारांवर, सोहळ्यातील बदलत्या गोष्टींबद्दल चर्चा होते. पालखीसमोर रोज कीर्तन होते. दिवसभराचे चालणे व पालखीपासून मुक्कामाचे ठिकाण दूर असल्याने उपस्थिती तशी कमी असते. पण, काही लोक नियमित अथवा जमेल तसा याचा लाभ घेतात. याशिवाय काही दिंडय़ांमध्ये प्रवचने होतात. याचाही लाभ होतो. या सर्वज्ञात अनुभवासोबत अनेक वेगळे अनुभव घेण्यासाठी लोक वारीमध्ये सहभागी होत आहेत…..

वारीमध्ये सुख-सोयी वाढल्या असल्या तरी, याचा अर्थ वारीमधील दिनक्रम अगदी आपल्या रोजच्या घरच्याप्रमाणे असतो असे नाही… किमान मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या आहेत, पण तरीही अनेक तडजोडी कराव्या लागतात. अर्थात हे अपेक्षितच आहे. या वेगळेपणामुळेच वारी अनुभवण्याची उत्सुकता अनेकांना आहे…..

वारकरेतर वर्गामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी व निवृत्त नोकरदारांमध्ये या सामूहिक प्रवासाचे आकर्षण वाढत आहे… रोज १५ ते २५ किमी चालणे, तंबूमध्ये, मंदिरात, ओसरीवर तर कधी उघडय़ा माळावर मुक्काम, आपले कपडे आपण धुणे, दिवसभर प्रवासात व पावसाळी हवेत ते वाळण्याची दक्षता घेणे, आपल्यापेक्षा वेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील लोकांशी संवाद साधणे, भजन, भोजन सर्व गोष्टी सामूहिक, कोणी आजारी पडले, तर त्याची काळजी घेणे, एकमेकांची सुख-दु:ख जाणून घेणे, या अनुभवाचे आकर्षण लोकांना वारीकडे ओढत आहे…..

काही लोक पालखीसोबत चालण्याऐवजी ट्रकसोबत पुढे जाऊन मुक्कामाची पूर्वतयारी करतात… यामध्ये तंबू ठोकणे, तंबूभोवती चर खोदणे, आधीच पाऊस झाला असेल, तर चिखल बाजूला करणे, लाईटची व्यवस्था करणे, अनुदानित गॅस, रॉकेल विक्रीकेंद्र शोधून तेथून गॅस, रॉकेल वगैरे आणणे, भाजी खरेदी, स्वयंपाक वगैरे गोष्टी येतात. अपवादात्मक काही दिंडय़ांनी यासाठी सेवक वर्ग नेमला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी व इतर भाविक वारीमधे सहभागी होतात; किंबहुना ‘ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र’ अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या इरावती कर्वे यांनी केली आहे…..

महाराष्ट्राच्या विविध भागातून व काही प्रमाणात गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लोक वारीमधे सहभागी होतात… १९६५ च्या सुमारास आळंदीच्या पालखीमध्ये पाचेक हजार लोक सहभागी होत, असा उल्लेख दि. बा. मोकाशींच्या पुस्तकात आहे. मधल्या काही वर्षामधे सुकर झालेला प्रवास, वारीच्या मार्गावर वाढलेल्या सुविधा, दळणवळणाची व संपर्काची वाढलेली साधने यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या लोकांची संख्या वाढली आहे…..

लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातला कोलाहल कमी करणारा लेख…! – भाग-१ – लेखक : श्री सुकृत करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनातला कोलाहल कमी करणारा लेख…! – भाग-१ – लेखक : श्री सुकृत करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. अंजली दिलीप गोखले

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली की व्यंकटेश माडगूळकर? नक्की आठवत नाही. प्रत्यक्ष जीवनात घट्ट मित्र असणाऱ्या या दोघांपैकीच एकानं कुणीतरी लिहिलंय. सगळे शब्द जसेच्या तसे नाहीत, पण आशय हाच आहे – “जंगली कळपातला हत्ती जेव्हा वृद्ध होतो. थकतो. गात्रं शिथिल होतात. आपलं मरण जवळ आलंय याची चाहूल त्याला लागते. तेव्हा तो स्वतःहून सगळ्या आप्तेष्टांपासून, कळपापासून अलगद दूर होतो. शेवटचे दिवस एकांतवासात काढतो. अखेरच्या क्षणी एखाद्या उंच कड्यावरून स्वतःला झोकून देतो. किंवा नदीच्या अगदी डोहात जाऊन उभा राहतो आणि मृत्यूला कवटाळतो. आपलं कलेवरसुद्धा कोणाच्या नजरेला येऊ नये याची काळजी तो घेतो.” 

जंगलांच्या, प्राण्यापक्ष्यांच्या संगतीत राहिलेल्या मारुती चितमपल्ली या अवलियानं शक्य झालं असतं तर कदाचित माणसांच्या गर्दीपासून दूर जात प्राण सोडले असते असं मला वाटून गेलं. ९३ वर्षांच्या शरीरानं बुधवारी (१८ जून) निरोप घेतला. या दीर्घायुष्यात मराठी ज्ञान आणि साहित्यविश्वात किती मोलाची भर टाकली त्यांनी. साहित्यिक म्हणून तर ते थोरच आहेत, पण त्यांना ‘ज्ञानवंत संशोधक’ही म्हटलं पाहिजे. काही दिवसांपूर्वीच जयंत नारळीकर गेले, ज्यांनी खगोल, अवकाशाचं विश्व मराठीत आणलं. वसुंधरेच्या अंगाखांद्यावरचं माझ्यासारख्याला रोज दिसूनही अगदी अपरिचीत असणारं पशुपक्ष्यांचं, वनांचं विश्वदर्शन चितमपल्लींनी घडवलं. मराठी साहित्यात हिरवकंच, सदाहरित जंगल लावून गेले चितमपल्ली. किती संकल्पना, शब्द त्यांनी मराठीत नव्यानं आणले! त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक ‘केशराचा पाऊस’ असतं. ‘आठवांच्या पारंब्या’, ‘मृत्यूचे संमोहन’, ‘शब्दांनाही वास असतो’ यासारखी खोल, अर्थगर्भ शीर्षकं त्यांच्या लेखांना असतात.

“माणूस जसजसा म्हातारा होतो, तसा तो कुरुप होतो. झाडांचं तसं नसतं. झाडं जेवढी जुनी होत जातात तेवढी ती अधिक सुंदर होत जातात,” हे बहारदार निरीक्षण चितमपल्ली सहज नोंदवतात.

सध्या आभाळ धो-धो बरसतंय. चितमपल्लींनी लिहिलंय – “पृथ्वीला ‘गंधवती’ म्हटलं आहे. त्याचा प्रत्यय येतो पहिल्या पावसामध्ये. पावसापूर्वी ती ‘पुष्पवती’ होते. जंगलातील सारे वृक्ष फुलू लागतात. या सर्व पुष्पांचा वास कुठे जात असावा? सुगंध देखील सृष्टीतील एक ऊर्जा आहे. नियमाप्रमाणे ऊर्जा नष्ट होत नाही. ती उंच उंच आकाशाच्या गाभाऱ्यात जात असावी. किती प्रकारचे गंध त्या गाभाऱ्यात साठत असावेत! आणि हे सारे लक्षावधी गंध पावसाच्या पाण्याबरोबर मातीवर पडले की पुन्हा त्यांना बहर येत असावा. म्हणून पहिल्या पावसानं माती ओली झाली की जो गंध अनुभवता येतो ना त्याचं वर्णन करता येत नाही कारण तो संमिश्र असतो.” याला ललित म्हणायचं, अध्यात्मिक की शास्त्रीय? खरं तर पहिल्या पावसासारखंच आहे हे, शब्दात न येणारं. 

टिटवीचा आवाज मी लहानपणापासून कैकदा ऐकला. तिच्या घरट्याच्या आसपास कितीदा वावरलो. तिचं तुरुतुरू धावणं पाहिलं. पण चितमपल्लींना दिसलेली टिटवी मला कधी दिसली नाही. त्यांनी लिहिलं – “टिटवीचा आवाज मी अनेक वर्षं अनेक ठिकाणी ऐकला आहे. नदीकाठच्या वन विश्रामगृहात मुक्कामाला आहे. जिकडेतिकडे विलक्षण शांतता आहे. वाहणाऱ्या नदीचा नादमधूर आवाज येतोय. मला हळूच जाग येते ती टिटवीच्या दुःखाच्या सुरानं. मध्यरात्र होऊन गेलीय. दुरून येणारा आवाज ऐकत, ऐकत मला कधीतरी झोप लागते. तो आवाज मी सागर किनाऱ्यावर असणाऱ्या वाडीतील घरातून ऐकला आहे. बाहेर पिठासारखं चांदणं पडलं आहे. समुद्राच्या लयबद्ध गाजेतून अंतरिक्षात जाणारा टिटवीचा विश्रांत स्वर ऐकू येतोय. मराठवाड्यात क्षितिजापर्यंत पसरलेली माळरानं आहेत. अशा माळरानातच टिटवीची घरटी आढळून येतात. एखाद्या वटवृक्षाच्या सावलीत पुरातन हेमाडपंती देऊळ उभे आहे. पहाटे आणि संध्याकाळी देवळाच्या पायऱ्यांवर बसून माळरानाकडं पाहणं हा एक अद्भूत अनुभव असतो. अशा समयी टिटवी आपल्या आवाजानं सारं माळरान निनादून टाकत असते. टिटवी जीवन आणि मृत्यूचं प्रतिक आहे. तिचा आवाज ऐकला की मरणाची आठवण येते. परंतु जीवनावर अफाट प्रेम करणारी टिटवी आहे. येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवित असताना ती अशीच ओरडली. पण त्या दयाघनाला वाटलं, की ती आपली चेष्टा करतेय. म्हणून त्यानं तिला शाप दिला, ‘तू अनिकेतन होऊन अशीच भटकत राहशील.’ खरोखर तिच्याइतकं अनिकेतन पाखरू कोणी नसावं.”

चितमपल्लींचे शब्द भिडतात कारण मी ते अनुभवलेले आहेत याची जाणीव मला त्यांना वाचल्यावर होते. काही गोष्टी माझ्या जाणीवेत असतील-नसतील पण नेणिवेत असतातंच. निसर्ग निरीक्षण तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सहजच घडतं. मात्र सगळ्यांकडे चितमपल्लींची दृष्टी नसते. ‘निसर्ग निरीक्षण’ या छंदाचा पाठलाग त्यांच्यासारखा करता येत नाही. यामागं तपश्चर्या असते ती कशी हे चितमपल्लींनी एका लेखात मार्मिकतेनं सांगितलं. “मी सत्तरीच्या घरात प्रवेश करतोय,” असं सांगून चितमपल्ली म्हणतात – “छंद जोपासण्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. जंगलातली भटकंती सावकाश आणि डोळसपणे केली आहे. पर्वतावर हळुहळू चढताना आजुबाजूचं सृष्टीसौंदर्यही पाहिलं आहे. वनविद्या मला सावकाश मिळाली. ही विद्या प्राप्त करुन घेण्यासाठी शॉर्टकट नाहीच. ते पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. हे सारं काही एका संस्कृत सुभाषितात मार्मिकपणानं सांगितलं आहे.

शनै: पन्था: शनै: कन्था शनै: पर्वतमस्तके।

शनै: विद्या शनै: वित्तं पंचैतानि शनै: शनै: ।।

अर्थात – प्रवास, मार्गक्रमण सावकाश करावं. गोधडी सावकाश शिवावी लागते. पर्वतशिखरावर हळूहळू चढावं लागतं. अध्ययनही सावकाश आणि स्वस्थ चित्तानं करावं लागतं. तसेच धनसंचयही एकदम होऊ शकत नाही. तोही, हळूहळूच होत असतो. (इथं धन म्हणजे विद्या) पक्षी निरीक्षण, वन्यप्राणी निरीक्षण, वन्यजीव निरीक्षण, वनस्पती निरीक्षण, अरण्यवाचन, वनविद्या, आकाश दर्शन, वाचन, ग्रंथ संग्रह आणि लेखन असे कितीतरी छंद मला आहेत. या सर्व छंदांचं एकाच वाक्यात वर्णन करायला सांगितलं तर मी म्हणेन मला निसर्ग निरीक्षणाचा छंद आहे. हे सर्व छंद एकमेकांना पूरक आहेत.”

***** 

चितमपल्ली यांना पहिल्यांदा वाचलं तेव्हा साहजिकच प्रश्न पडला. सोलापूरसारख्या कोरड्या, दुष्काळी गावात जन्माला आलेल्या या माणसाला वन्यविद्येची भूल कशी पडली? त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात आहे. चितमपल्ली आईच्या सहवासात जास्त वाढले. त्यांच्या आईला शब्दांचं विलक्षण ज्ञान होतं. तिच्या बालपणापासून तिनं तिच्या अवतीभोवतीची रानं, शेतं, फार डोळसपणे पाहिली होती. तिला रानवाटांची भारी ओढ. ती गोष्टीवेल्हाळ होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर ती मारुतीला आणि त्याच्या भावंडांना गोष्टी सांगायची. त्या गोष्टी जंगलातल्या असायच्या. त्या गोष्टींमध्ये वाघ, खोकडं, कोल्हे, लांडगे असायचे. ‘लांडगा बाईला भीत नाही, पण पुरुषाला घाबरतो’, ‘हुप्प्या वानर स्त्रीपुढे चित्कारतो, पुरुषापुढं गप्प बसतो’, अशी तिची म्हणून स्वतःची निरीक्षणं त्या गोष्टींमध्ये असायची. वाघाच्या डोळ्याला ‘रुपया’ म्हणायची ती. तिनं अस्वलं, कोल्हे-लांडगे, साप-नाग प्रत्यक्ष पाहिले होते. आईकडून ऐकलेल्या या गोष्टींचं चित्र मारूतीच्या बालमनावर बिब्याचा चीक उतावा तसं पक्कं उमटलं होतं. चितमपल्लींचे वडील शिंदी प्यायचे. शिंदीच्या बनात सोबतीला मारुतीलासुद्धा घेऊन जायचे. मारूती शिंदी प्यायला नाही, पण ओढ्याच्या कडेला शिंदीला लटकलेली सुगरणीची घरटी न्याहाळण्याचा छंद लावून घेतला.

बालपणातले अनुभव त्यांच्या साहित्यात उमटतात…आणि मग म्हटलं तर अत्यंत चमकदार आणि म्हटलं तर अगदी तत्त्ववेत्याच्या थाटातलं वाक्य ते सहज लिहून जातात – “पक्षी जसं स्वतःचं घर स्वतः बांधतात, तसं माणसांनाही स्वतःचं घर स्वतःला बांधता यायला हवंच.”

 – क्रमशः…

लेखक : श्री सुकृत करंदीकर

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares