माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला.
आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे!
आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत.
आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.
“चारित्र्य” आणि “व्यक्तिमत्त्व” या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता?
चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.
पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.
या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला.
एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.
साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव.
सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’
“चारित्र्य” आणि “व्यक्तिमत्त्व” यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.
“जागा आहेस, का नुसताच लोळत पडलायस ?” हे थोडं दरडावणीच्या सुरात, आपल्या कानावर आपण लहान असतांना आईकडून आणि मोठेपणी (आपापल्या) बायकोकडून ऐकण्याचे अनेक प्रसंग आपल्यावर आत्ता पर्यंत नक्कीच आले असणार ! कारण झोपेतून जागे झाले तरी, 99.9% पुरुषांना लोळत पडून रहायची सवय असतेच असते, मग तो कामाचा दिवस असो वा सुट्टीचा ! ही टक्केवारी, मी एखाद्या साबणाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, रोग जंतूचा नाश करण्याच्या त्याच्या क्षमते इतकीच घेतली आहे, हे माझ्या सारख्या चाणाक्ष नवऱ्यांनी लगेच ओळखलं असेलच ! आता हे साबणाचे उदाहरण देण्या मागे सुद्धा माझे स्वतःचे असे एक सबळ कारण आहे, जे तुम्हाला पण 100% पटेल ! आपण जागे झालोय आणि नुसतेच लोळत पडलोय हे नंतर बायकोने ओळखल्यावर, ती आपल्या मागे भुणभुण करून आपल्याला सुद्धा तिच्या मागोमाग उठायला भाग पाडून, तेव्हढयावरच ती थांबली, तर ती अर्धांगिनी कसली ? तिला असं वाटत असतं की, आपल्या नवऱ्याने पण, भूतां सारखे लोळत पडण्यापेक्षा, लगेच उठून आपल्या सारखेच लगेच सुचीरभूत व्हावे ! आता भूतं जाग आल्यावर अशीच लोळत (का झाडावर लटकत?) पडतात, हे तिला कसं कळलं का तिला कोणी (तिची आई?) तसं सांगितलं, हा एक झोप न घेता करायचा संशोधनाचा विषय ठरू शकतो ! या माझ्या विधानाशी, माझ्या सारखे 100% आळशी नवरे, सहमत होऊन भली मोठी जांभई देत, परत आपल्या डोक्यावरून पांघरूण घेऊन गादीला जवळ करतील, याची मला 100% नाही तर 101% खात्री आहे ! आणि या उप्पर जरी नवऱ्याने तिला प्रेमाने (का स्वार्थापोटी ?) म्हटलं “झोप की जरा, आज सुट्टी तर आहे !” तरी 100% बायका, ते जणू ऐकलंच नाही असं भासवत, ते अजिबात मनावर न घेता, लगेच आपल्या रोजच्या कामाला स्वतःला जुंपुन घेतात, हे तमाम नवरे मंडळी मान्य करतील !
असं जाग आल्यावर लोळत पडणं वगैरे बायकांना झेपत नाही, का त्यांना ते जमत नाही, का त्यांची मानसिक घडणंच तशी असते, हे त्या निद्रादेवीलाच माहित ! त्या जाग आल्या आल्या लगेच, कुणीतरी आपल्या पाठीमागे अदृश्यपणे छडी घेऊन उभा आहे या भीतीने, रोजच्याच अंगावळणी पडलेल्या कामाला, वाघ मागे लागल्यागत सुरवात करतात ! तो अदृश्य छडीधारी कोण असेल, याचा मी अनेक वेळा माझ्या (बायकोच्या म्हणण्या नुसार) अल्पमती प्रमाणे शोधायचा अनेक वेळा विफल प्रयत्न केला, पण तो करता करता कित्येक वेळा परत झोपेच्या अधीन कधी झालो, हे माझंच मला कळलं नाही ! शेवटी मी तो नाद सोडून दिला आणि माझ्या मनाची मीच अशी समजूत करून घेतली की, सकाळी उठल्या उठल्या रोजच्या कामाचा तोच तोच व्यायाम केल्याशिवाय, तमाम बायकांना त्यांचा दिवस सुरू झालाय असं वाटतच नाही ! असो !
आता या अशा पेच प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याचा विचार करता करता मला, थोरा मोठ्यांनी जे काही मोठ्या मनाने म्हणून ठेवलं आहे, त्याची आठवण झाली ! जसं, ऐकावे जनाचे (बायकोचे) करावे मनाचे ! म्हणजे तुमच्या लक्षात मतितार्थ आला असेलच, की आपल्याला देवाने जे दोन कान दिले आहेत, त्याचा योग्य वापर करून, म्हणजेच एका कानाने बायकोचे ऐकून, तेच दुसऱ्या कानाने सोडून, डोक्यावर पांघरूण घेवून मस्त ताणून देणे !
☆ अभियंता दिन – भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
१५ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘ अभियंता दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेलेले विश्वेश्वरय्या हे ध्येयवादी आणि थोर देशभक्त होते.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी खेड्यात १५ सप्टेंबर १८६१ ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवासशास्त्री हे विद्वान संस्कृत पंडित होते. आईने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि बंगळूरमधून विशेष गुणवत्ता किताब घेऊन बी.ए केले.
त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड लागली. म्हैसूरच्या राजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन पुण्यात अभियांत्रिकी पदवी साठी पाठवले. अत्यंत कठीण अशी इंजिनीयरिंग ची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून मुंबई राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.स्थापत्य शास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वत्र पसरला.त्याची नोंद घेत सरकारने मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक केली. याच काळात खडकवासला धरणासाठी त्यांनी स्वयंचलित गेटची निर्मिती केली. भारतात प्रथमच हे गेट केले गेले. या डिझाईनला ‘विश्वेश्वरय्या गेट’ हे नाव दिले गेले.
१९०४ साली बढती मिळून देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. संपूर्ण देशातून त्यांचे कौतुक झाले.
वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी २४ वर्षे नोकरी केली आणि १९०७ चाली सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर हैद्राबाद सरकारचे विशेष सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली.मूसा आणि इसा या दोन नद्यांवर धरणे बांधून त्यांनी फार मोठे काम केले.
त्यानंतर म्हैसूरच्या राजांनी मुख्य अभियंता म्हणून त्यांना बोलाविले.ते म्हैसूरला आले ‘ कृष्णराज सागर ‘ या कावेरी नदीवरील धरणाचे काम त्यांनी पूर्ण केले.वृंदावन उद्यान, म्हैसूर सॅंडल ऑईल ॲंड सोप फॅक्टरी, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर या इमारती आणि धरणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे.शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टी , उद्योगांना चालना दिली.समाजोन्मुख कामे केली. ‘कर्नाटकच्या विकासाचा भगिरथ’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांचा गौरव म्हणून म्हैसूर संस्थानचे ‘दिवाण पद ‘त्यांना बहाल केले गेले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात होती. शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी ‘म्हैसूर विद्यापीठा’ची स्थापना केली. सिंचन क्षेत्रासाठी मौलिक असे योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांची देणगी आहे.
भद्रावतीचा लोखंड आणि पोलाद कारखाना ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी ( आत्ताची दि हिंदुस्तान एराॅनाॅटिक्स ) आणि ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेत त्यांनी भाग घेतला. धुळे, सुरत, सक्कर, कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड, विजापूर अशा अनेक शहरांच्या पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेतही त्यांनी भाग घेतला. त्यांनी औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली.
सेवानिवृत्तीनंतर चाळीस वर्षे विविध समित्या आणि संस्थांमध्ये विविध पदांवर अखंडपणे मोलाचे काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.अगदी साधी राहणी होती. म्हैसुरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचा स्वभाव साधा होता.पण काही बाबतीत परखड होता. ‘शिस्त ‘हा त्यांचा परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके आणि स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. माणसात देव आहे आणि माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते.
ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब बहाल केला. अनेक विद्यापीठांनी सन्माननीय ‘डि.लीट’ने गौरविले. वयाच्या ९४व्या वर्षी सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले. बंगळूरचे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ भारतातले सर्वात मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र सरकार तर्फे त्यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ दिला जातो.
ते शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ साली वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे हे अफाट कार्यकौशल्य अत्यंत गौरवास्पद आहे. एका उत्तुंग, महान चरित्राचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम !! ?
हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी तुझ्या भेटीला पण …पण पितांबर लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदणं झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….
☆ विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेश आगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.
हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.
कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको, असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.
या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!
त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते.तरी ती गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो,’ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात,’ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.
तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते. नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते. लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.
जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते.ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो.पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.
गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.
कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!
आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!
संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,
मोरया… चा जयघोष करत ढोल, ताशे, झांज, लेझीम च्या गजरात आगमन व्हायचे आमच्या गल्लीतल्या बाप्पाचे. पालखीत बसून सोवळ्यांने, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आगमन होत असे ह्या विघ्नहर्त्याचे. आम्ही सगळी मुलं त्या पालखी मागून चालत गणरायाला आणायला जात असू. गणपती बाप्पाचे
आगमन एका देवळात होत असे जिथे तो पुढे अकरा दिवस विराजमान होत असे. दररोज दोन वेळा, वेळेवर आरती होत असे आणि ती सर्वांनाच पाठ असल्यामुळे ती एका सुरात आणि एकाच लईतही होत असे.
आम्ही जसा गल्लीतला तसाच घरचा गणपती आणायला सुद्धा दर वर्षी बाबांबरोबर जात असू. आमची मूर्ती ठरलेली असायची. मध्यम आकाराची, पिवळे पीतांबर आणि केशरी शेला परिधान केलेली ,हिरे जडीत मुकुट असलेली, सुंदर बोलके डोळे आणि चेहर्यावर शांत, शीतल, तृप्त असे भाव, एका हातात मोदक आणि दुसर्या हातात कमळ. बरोबर मुषक हवेतच. मूर्ती बघून मनं कसं प्रसन्न होतं असे.
घरी आई आरतीचे ताम्हन घेऊन वाट पहात असायची ह्या एकदंताची. आम्ही पोहोचताच तिच्या चेहर्यावरचा भाव अगदी पाहण्या सारखा असायचा. प्रसन्न मनाने ती बाप्पाला ओवाळायची आणि आमचे बाप्पा विराजमान व्हायचे आम्ही त्यांच्या साठी केलेल्या खास आसनावर.
हे दिवस मात्र आमच्यासाठी खास असायचे कारण एक तर गणपती बाप्पा असे पर्यंत आईचा मूड एकदम झकास असायचा आणि रोज गोडाधोडाचे खायला मिळायचे. त्यात उकडीचे मोदक म्हणजे आहाहा.. बाप्पाला आणि आम्हालाही परम प्रिय. न चुकता आरती, अभिषेक, नैवेद्य अथर्वशीर्षाचे पठण व्हायचे. एकूणच वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक असायचे. पाचवे दिवशी घरी गौर यायची. त्या दिवशी आई खूप खुश असायची जणू तिचीच लेक आली आहे माहेरी. माहेरवाशीणी साठी पुरण पोळी ठरलेली.
हे अकरा दिवस कसे भुर्रकन उडून जायचे. आणि बघता बघता बाप्पाला निरोप द्यायचा दिवस यायचा. आमचा नावडता दिवसं त्या दिवशी सगळेच उदास असायचे. हा पाहुणा आपल्या घरी आता परत जाणार म्हणून खूप वाईट वाटायचे. आज आरती विशेष व्हायची. आईचे नेत्र भरून यायचे.पण काय करणार काहीच इलाज नसायचा. शेवटच्या दिवशी आम्ही सगळे देखावे बघायला जायचो. इतके सुंदर सुंदर देखावे असायचे आणि अनंत चतुर्दशी दिवशी भव्य मिरवणुका असायच्या. रात्रभर आम्ही मिरवणुका बघायचो आणि पहाटे परत यायचो.
आज मिरवणूक पहायला गेले होते गणपतीची आणि आनंद होण्या ऐवजी दुःखच झाले. समोरचं दृश्य पाहून कळेच ना नक्की कशाची मिरवणूक आहे ते. भक्तीगीतं भावगीतं कानी पडायच्या ऐवजी फास्ट ट्रॅक च्या गाण्यावर, धांगडधींगा चालू होता. दारूच्या नशेत बेधुंद होऊन गणपती बाप्पा समोर तरुण पिढी नाचताना पाहून खूप दुःख झाले. त्यांची त्यांनाही शुद्ध नव्हती. चुरमुऱ्यांची उधळण करत ती पायदळी तुडवत मिरवणूक चालली होती.
ते कमी म्हणून फटाकड्यांच्या धुराने सगळे वातावरण दूषित केले होते. मला प्रश्न पडला त्या विघ्नहर्त्याला तरी श्वास घेता येत असेल का ह्या धुरात?? ते दूषित वातावरण आणि कर्ण बधीर करणारा तो बॅंजो चा आवाज ऐकून परत यावं असं वाटत तरी असेल का त्या गणरायाला ?
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबविली होती ती समाजाला संघटीत करण्याच्या उद्देशाने. आज त्यांनी जर हे अस दृश्य पाहिलं असत तर बहुतेक बेधुंद होऊन नाचणार्यांच्याच कंबरेतला पट्टा काढून चांगलं फोडून काढलं असत एकेकाला.
मित्रांनो जरा विचार करा आपण बदलू शकू का हे दृश्य?? राजकारणी लोकं आपलं पद आणि पैसा दाखवण्यासाठी एका गल्लीत तीन तीन गणपती बसवतात. नाही नाही तितकी श्रध्दा आहे म्हणून नव्हे तर माझा मंडप तुझ्या पेक्षा भारी हे दाखवण्यासाठी. मी किती किलोचे चांदीचे दागिने केले आहेत ह्या वर्षी ह्यासाठी,सत्तेसाठी.
आपण सगळे जर एकत्र आलो तर हे नक्की थांबवू शकू. एका गल्लीत एकच गणपती निदान एवढी तरी सुरवात करू शकू. बँजो वर नाचण्या ऐवजी सनई चौघडे, लेझीम आणि ढोलाच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देऊ शकू. नशेत बेधुंद न होता भक्तीत तल्लीन होऊ शकू. चुरमुऱ्यांची उधळण करण्या पेक्षा तेच गोरगरिबांना वाटू शकू.
असं काही तरी करू की आपल्या पेक्षा जास्त गणराया वाट बघेल पुढच्या वर्षी येण्याची.
लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याला शतक सरूनही अनेक वर्षे लोटली. त्या काळात ती एक गरज होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनमत तयार करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी स्वदेशी लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे हेही गरजेचे होते. गणपती आणि शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची दोन दैवते! आणि त्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात हे लोकमान्यांनी ताडले होते. म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याचा फार चांगला परिणाम दिसून आला. लोक एकत्र येऊ लागले. लोकमान्यांचा हेतू साध्य झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा हे दोन्ही उत्सव सातत्याने सुरूच राहिले.इंग्रजांना या धार्मिक भावनेत ढवळाढवळ करणे अशक्य झाले. परिणामी गणेशोत्सव महाराष्ट्रात तरी मोठ्या प्रमाणात सुरूच राहिला.
हे लोण नंतर सर्व देशभर पसरले. महाराष्ट्रातील गावोगावी गणेशोत्सव मंडळे स्थापन करण्यात आली. पुण्यात, मुंबईत तर शतक लोटलेली अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी चढत्या क्रमाने गणेशोत्सव थाटात साजरा केला जातो.
स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत हे सगळे ठीक होते. नियमितपणे गणेशोत्सव शांततेत पार पडायचा. पण गेली साठ सत्तर वर्षे त्यात चढाओढ सुरू झाली. विजेची झगमगाट असणारी रोषणाई, हिडीस गाणी, मोठ्ठे लाऊड स्पीकर या गोष्टीचा अतिरेक झाला. त्यासाठी लागणारी वर्गणी ( काही वेळा जबरदस्तीने) गोळा केली जाऊ लागली. गणपती म्हटलं की लोक वर्गणी देतच होते.
नंतरच्या काळात तर या शांततेची जागा गडबड, गोंधळ, हुल्लडबाजीने कधी घेतली ते कळलेच नाही. लोकमान्यांचा मूळ उद्देश कधीच सफल झाला होता. आता गणेशोत्सवाच्या नावाखाली अहमहमिका, स्पर्धा, नाचगाणी सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात तर सिनेमातली गाणी स्पीकरवर लावून त्यावर हिडीस अंगविक्षेप करत नाचणे ही फॅशन झाली. हे प्रकार फार वाढले.
एकेका गावात अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करतात. पुण्यात मुंबईत तर गल्लोगल्लीत गणपतीचे मंडप उभारले जातात. वाहतुकीचा बोजवारा उडतो.आणि विसर्जन मिरवणुकीचे तर विचारायलाच नको. रात्र रात्र मिरवणूका निघतात. त्यात धार्मिक भावना कमी आणि दिखाव्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. हे कितपत योग्य आहे? हे दहा दिवस कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड ताण पडतो.हेही लक्षात घ्यायला हवे.
हे सगळे बदलायला पाहिजे हे आता हळूहळू लक्षात येत आहे. सगळीच मंडळे हुल्लडबाजी करणारी नव्हती. तेच आदर्श आहे. हे आता काही प्रमाणात ध्यानात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे .हे चांगले लक्षण आहे. बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवाचे पावित्र्य जपले जाते. हुल्लडबाजी फारशी होत नाही. कित्येक कार्यकर्ते म्हणविणारे लोक मंडपात, विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन यायचे. लोकांना आणि लोकमान्यांना हे स्वरूप तर नक्कीच अपेक्षित नव्हते. ते स्पृहणीय ही नाही.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आता धर्मभेद, भेदभाव काही राहिला नाही. सर्व जातिधर्माचे लोक बिनधास्त गणेशोत्सवात सहभागी होतात. ही खूप चांगली सुधारणा आहे. अजूनही काही ठिकाणी गोंधळ घातला जातोच. ते चूक आहे. स्पर्धा सुद्धा निकोप असावी. मुख्य म्हणजे गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे. खरोखरच लोकांनी त्यानिमित्ताने एकत्र यावे. विचारांची देवाणघेवाण करावी.
आता नवीन संकल्पनेनुसार एक गाव एक गणपती या कल्पनेचाही विचार पुढे येतो आहे. यात पर्यावरणाचा समतोल राखणेही महत्वाचे ठरते.गणेशोत्सवाचा मूळ उद्देश मर्यादित न राहता लोकमान्यांनी संकल्प केल्याप्रमाणे अधिक व्यापक असावा. त्यातून अखंड निकोप, निर्वैर, सुसंघटित समाजाचे प्रतिबिंब उमटावे. नवीन पिढीने काही चांगले संस्कार जतन करून चांगले संकल्प सोडावेत. त्यांचा राष्ट् उभारणीच्या कामात या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचा चांगला उपयोग करून घ्यावा. हीच सदिच्छा.
लेकाची बारावीची परीक्षा संपली.सुधाने मोकळा श्वास घेतला.तिला एकदम महिला परिषदेत ऐकलेल्या व्याख्यानाची आठवण झाली.चाळीशीनंतर महिलांनी आपल्या प्रकृतीबद्दल जागरुक रहायला हवं.तिने मनाशी ठरवले उद्या पासून माॅर्निग वाॅकला जायचे.
सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी घराबाहेर पडली.अजून काळोख होता.थोडासा गारवाही जाणवत होता.खूप प्रसन्न वाटले.चार पावले चालली, तेवढ्यात कुत्र्याची कळवळ ऐकू आली.चार- पाच कुत्री एकमेकावर भुंकत होती.जसजसा आवाज जवळ येऊ लागला,तसे सुधाचे पाय लटपटायला लागले.आता ती कुत्री आपल्याच अंगावर आली तर या विचाराने सुधा जागीच थांबली.
मनात आले,आल्या पावली घरी परत जावे.पण घरी जायचा अवकाश , घरातील सगळे हसतील,मी फिरणार म्हणजे हे दोन दिवसाचे नाटक होणार हे समजून आधी तोंडसुख घेतले होते. मी आता घरी परत गेले तर दिवसभर चर्चला विषय.त्यापेक्षा इथंच थांबलेले बरं.पाचएक मिनिटांनी कुत्री बाजूला झाली.तसा सुधाने सुटकेचा श्वास घेतला. पुढे चालू लागली.चार पावले जाते न जाते तोच एका घरातून एक व्यक्ती आपल्या कुत्र्या सोबत बाहेर आली.कंबरे एवढा मोठा कुत्रा होता. जीभ बाहेर काढून दाखवत होता. जरा निरखून पाहिल्यावर दिसले,त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता.तो पट्टा मालकाने धरला होता.आपल्या या कुत्र्यापासून भिती नाही असे म्हणून कपाळावरचा घाम पुसला. पुढे चालु लागली.तो समोरून दोन कुत्री येताना दिसली.अंतर जरा जास्त होते म्हणून तिने स्वत: ला सावरतचं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालायला सुरुवात केली. सकाळी बबसकाळी किती कुत्री असतात रस्त्यात.कसे बरं चालावं? कोण कसे यांना पकडत नाही? किती हा त्रास? मुलेबाळे कशी चालणार या रस्त्यावर?
मोकाट कुत्र्यांचे काही तरी केलेच पाहिजे, असे विचार सुरू असतानाच समोरून येणाऱ्या कुत्र्यानी अचानक वेग घेतला.ती धावत आपल्याच दिशेने येतात असे तिला वाटले.तिने चालण्याचा वेग वाढवला. तशी ती कुत्री अजून जोरात पळत वेगात जवळ येताना दिसली.
आता सर्वांगाला घाम फुटला,पाय लटपटायला लागले.तेवढ्यात दोन शाळकरी मुले त्या कुत्र्यांजवळून बिनधास्त गेली.आता आपण काय करावे? कुठे बसावे? असे वाटू लागले.रस्त्यात चोहोबाजूला पाहिले. बसण्यासारखे काहीच नव्हते.पुन्हा स्तब्ध झाली.
दोन कुत्री समोरच्या मालकाबरोबर चाललेल्या कुत्र्यावर भुंकत होती.ते कुत्रे ही जोरात भुंकू लागले.क्षणभर सुधाला वाटले,ही कुत्री एकमेकांशी बोलत असावीत.आम्ही कसे स्वतंत्र आहोत.हवं तसे हवं तेव्हा कुठे ही फिरतो.लोकांना घाबरवतो, आम्ही मुक्त जगतो.तू मात्र मालकाच्या तालावर जागतोस.त्यांनी फिरायला बाहेर काढले तर फिरणार नाही तर दिवसभर घरात एका जागी बांधून पडणार.मालकांनी दिलं तर खाणार, फिरायला नेहले तर फिरणार,त्याच्या घराची राखण करणार.तोड ते बंधन.हो मुक्त.चल आमच्या बरोबर….हे काय सूचतय मला?या विचाराने तिला हसू आले.
कुत्रा जास्त पायात येताना त्या कुत्र्याच्या मालकाने त्या कुत्र्याला हुसकावून लावले.तशी कुत्री पायात शेपटी घालून लांब निघून गेली.तो मालकही आपल्या कुत्र्या सोबत दुसऱ्या गल्लीत वळला. सुधा भानावर आली.आपला बराच वेळ रस्त्यातच गेला.आता भरभर चालले पाहिजे असे म्हणत ती एका ग्राऊंडजवळ आली.लोखंडी फाटकातून आत पाऊल टाकणार तेवढ्यात समोरून एक कुत्रे आले आणि उडी मारून गेले.हे इतकं अचानक झाले तिला काही कळलेच नाही.भितीने हृदयाचे ठोके मात्र वाढले.फाटकाच्या आधाराने काही क्षण उभारली आणि चालू लागली.तोच दोन कुत्र्यांची पिल्ले जवळून पळत गेली.आज काय कुत्रे डे आहे का?
सकाळपासून सगळीकडे सगळी कुत्री माझ्याच मागे का? काय घोडे मारले मी त्यांचे? या विचारात चालत असताना तिला जाणवले तिची ओढणी कुणी तरी मागून ओढत आहे.तिला पुढे चालता येईना.मागून कुत्री भुंकत आहेत.असा भास झाला.तिची ओढणी कुत्र्यांने तोंडांत धरली आहे असे जाणवले.जवळ जवळ मोठ्याने ती किंचाळली.माॅर्निग वाॅक करणारे लोक थांबले.ते धावतच सुधा जवळ आले.आपल्या काय होतय हे कळायच्या आता तिला भोवळ आली.एकाने तोंडावर पाणी मारले.” मॅडम काय झाले?बरं वाटतंय का?”
आपल्या भोवती माणसांचा गराडा पाहून तिला काय झाले ते कळलेच नाही.
” काय झाले मला?”
” अहो आता तुम्ही किंचाळलात?भोवळ आली तुम्हाला.आम्ही विचारतोय तुम्हाला काय झाले?”
“मला…मी…मला…कुत्रे…कुठाय ?”
” कुत्री… ती काय तिकडे लांब खेळत आहेत.”
तिने पाहीले तर खरंच कुत्री लांब होती.तिने आपली ओढणी बघितली.
” आता माझी ओढणी कुत्र्यांनी पकडली होती ना?”
” नाही.तुमची ओढणी त्या झुडपात अडकली होती.मी काढली.”
हे ऐकून सुधा चांगली ओशाळली.सावरत उठली.इकडे तिकडे न बघता तिने तडक घर गाठले. पुन्हा कधी ही माॅर्निग वाॅकला न येण्याच्या दृढ निश्चयाने.
☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
संकष्टी झाली. गणपतीची आरती झाली. आणि सर्वजण अथर्वशीर्ष म्हणू लागलो. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी——-त्वमेव सर्वम खल्विदं ब्रह्मासी. पूर्ण म्हणून झालं आणि माझ्या मनात गणेश तत्वा बद्दल विचार सुरू झाले. गणपती ,गजानन ,गजमुख, विनायक अशी गणपतीची कितीतरी अर्थपूर्ण नावे आहेत. हत्तीचे मुख असलेली, रत्नजडित किरीट घातलेली, तुंदिल तनु असलेली ,जवळ उंदीर घेतलेली अशी सुंदर पार्थिव मूर्ती हाच गणेश का ? मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी किती तरी जास्तीचा आहे.
प्रत्येक गोष्टीला दोन रूप असतात .एक डोळ्याला दिसणार अस व्यक्त रूप, आणि दुसरं डोळ्याला न दिसणार पण शक्तिमान अस अव्यक्त सूक्ष्म रूप. मला भावलेलं गणेशाचे रूप हे सूक्ष्म आणि भावात्मक स्वरूपाचे ही आहे.
गण याचा अर्थ संख्या किंवा मोजणे, मोजमाप करणे वगैरे. ब्रम्ह हे अनंत ,अपरिमित आहे. ब्रम्हातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला.जे अव्यक्त होत ते व्यक्त झालं. त्यातलंच एक अगदी छोटे आपलं जग. जग हे अनंता पासून सांता पर्यंत व अपरिमिता पासून परिमिता पर्यंत येत, तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होत. न मोजता येणार्या तत्वाला, मोजता येण्यायोग्य बनवण कठीण आहे. गणितज्ञाला हे अनंततत्व, कोणत्या मूळ घटकाचे बनले आहे, किती प्रमाणात काय मिसळलं की काय बनेल ,हे गणन प्रक्रियेतील नैपुण्याचं काम ,आपल्या शिरावर वाहतो तो तज्ञ –इश तोच गणेश. गणितज्ञांचा गणितज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते. जसं की चिकू ,आंबा, फणस, ज्वारी ,बाजरी, प्रत्येकाचं स्वरूप निराळ. याची पानं, फुलं ,फळं, निराळी .आंब्याच्या झाडाला लिंबू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई ,जुई लागत नाही. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे. ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप ,ज्वालामुखी, आवर्षण, पूर, रोगराई या गोष्टी व्हायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्राता तोच गणेश.
आपले जग हे पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहा तत्वांनी बनले आहे .ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून, त्याचे पंचीकरण झाले. उदा:– अर्ध्या आकाश तत्वात ,उरलेली चारही तत्वे प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली .या गणनेच्या मूळाशी असलेली अधिष्ठात्री देवता (त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम् ) ती शक्ती म्हणजेच गणेश.
सर्व सृष्टीची निर्मिती ही ओमकारातून झाली आहे. गणेशाचे रूप , नाद स्वरूप ओमकार प्रधान आहे .गणेशाला गजमुख असेही म्हणतात. अर्थमय नाद करणे, असा अर्थ गजधातूतून व्यक्त होतो. गणेशोत्तर तापिनी उपनिषदात गणेशाला गणनाकार नाद म्हटले आहे. तो गणनाकार नाद करतो, म्हणून तो गजमुख. प्रत्येक गोष्ट ओमच आहे .असे मांडुक्य उपनिषदात सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस –जलतत्व , आकाशाकडे झेपावणार्या ज्वाळा हे अग्नितत्व, या दोन्हीमधील गाठ हे पृथ्वीतत्व ,त्यातून येणारा प्रवाह हे वायुतत्व. त्यावरील चंद्रकोरीची दोन्ही टोके, मन आणि बुद्धी. त्यावरील टिंब हे चैतन्य आणि हे सगळं ज्यामध्ये सामावलंय ते आकाश तत्व. अशीही अष्टधा प्रकृती तोच गणेश.
गणेशाचा एक वैज्ञानिक अर्थही मला भावला .पदार्थाचा ,वस्तूचा, सगळ्यात लहान घटक म्हणजे अणू. अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो .व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून स्थिर होण्याची धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी, पूरक बनून ,त्याची आठ आकड्यापर्यंत गणना करुन देतो, ती शक्ती म्हणजेच गणेश.
गुर पासून गौरी म्हणजे ,सतत उद्यमशील शक्ती किंवा उर्जा. ऊर्जेने धारण केलेली , ती गौरी. सृष्टी निर्माण करणारी ,गणना कार नादमय सृजनशक्ती ईश्वरी शक्ती म्हणजे गौरी नंदन गणेश.
निर्मिती करणारा ब्रम्हा, सातत्य राखणारा विष्णू आणि विलयाला नेणारा महेश या सर्व शक्ती म्हणजेच गणेश. आपण तरी काय करतो ! पार्थिव गणपतीचे आगमन करतो. आनंदाने ,अपूर्वाईने त्याची पूजा करतो. उत्सव करतो. आणि विसर्जन ,म्हणजे पुन्हा पृथ्वीतत्त्वात विलय करतो .हे चक्र निसर्गात सतत चालू आहे. झाडे ,पर्वत ,समुद्रातील बेटे, यांचीही उत्पत्ती होते. स्थित रहाते. आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म! या सगळ्या साठी लागणारी शक्ती तोच गणेश.
या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती, म्हणजे एक फार मोठे रहस्य आहे. एक गूढ आहे . उलगडणे ही तितकेच अवघड व कठीण काम आहे .आणि ते काम करणारा ज्ञानमय ,विज्ञानमय असा गणेशच असतो.
गणेशोत्सव जवळ आला आहे. सर्व शक्तींच्या प्रतीकाची, पार्थिव गणेशाची पूजा करत असताना ,या निसर्गाचा र्हास, न करता ,
त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा खऱ्या अर्थाने पूजा होईल आणि गणेश प्रसन्न होईल.