मराठी साहित्य – विविधा ☆ “जन्माष्टमीचा अनुभव – लागोसच्या मंदिरात…” ☆ श्री रविंद्र सदानंद कामत ☆

श्री रविंद्र सदानंद कामत

अल्प परिचय 

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट वित्तीय क्षेत्रात आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये ३२ वर्षांचा व्यापक अनुभव.

वित्ततज्ज्ञ -शिवाय संगीतकार, समाजसेवक, आणि क्रीडाप्रेमी. समाजाभिमुख उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय राहिले आहेत.

नायजेरियामध्ये गेली १९ वर्षे कार्यरत असून, त्यांनी विविध नायजेरियन संस्थांमध्ये FC (Finance Controller), GFC (Group Finance Controller), CFO (Chief Financial Officer) आणि MD (Managing Director) अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

? विविधा ?

☆ “जन्माष्टमीचा अनुभव – लागोसच्या मंदिरात” ☆ श्री रविंद्र सदानंद कामत ☆

१६ ऑगस्ट २०२५, जन्माष्टमी. लागोसच्या हिंदू मंदिरात दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव साजरा केला जात होता. आजही तसाच उत्साह होता. शेकडो भक्तगण मंदिरात येऊन जन्माष्टमी साजरी करत होते.

श्रीकृष्णाची पूजा, आरती, भजन, आणि त्यानंतर बालगोपालांना घेऊन दहीहंडीचा कार्यक्रम झाला. सर्व कार्यक्रम एकामागोमाग, सुरळीत आणि विघ्नहीन पद्धतीने पार पडत होते.

मला ऑफिसमधून मंदिरात पोहोचायला थोडा उशीर झाला. दहीहंडी संपून शेवटची आरती सुरू होती. आरतीनंतर लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम होता. भक्तांची संख्या मोठी असल्यामुळे जेवणासाठी दोन काउंटर लावले गेले होते.

नेहमीप्रमाणे, मी एका काउंटरच्या मागे उभा राहिलो. माझ्या वाट्याला भात आला होता (महाप्रसाद वाटण्यासाठी). आरती संपल्यावर जेवण वाढायला सुरुवात झाली. शेकडो लोक दोन रांगेत उभे होते. जेवण वाटले जात होते. नेहमीचे संवाद, शुभेच्छा यांच्यात वाढण्याचा कार्यक्रम सुरू होता.

अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे, थोडं थोडं (पण पाहिजे तितक्यांदा) वाढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लोक परत परत येऊन प्रसाद घेत होते.

काय कोणास ठाऊक, एवढ्या गर्दीतही एक माणूस तिसऱ्यांदा भात घ्यायला आला होता, हे माझ्या लक्षात आलं.. जेवण कमी पडू नये, या विवंचनेमुळे त्याचं तिसऱ्यांदा येणं थोडं खटकत होतं. पण लगेचच तो विचार बाजूला ठेवून मी सेवा करत राहिलो.

थोड्या वेळाने तो चौथ्यांदा भात घ्यायला आला. आणि या वेळी मी त्याला अगदी आनंदाने भात वाढला — मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता.

भात संपल्यावर मी गुलाबजामच्या काउंटरच्या मागे उभा राहून गुलाबजाम वाढू लागलो. पंगत संपत आली होती आणि तेव्हाच, तीच व्यक्ती पुन्हा माझ्याकडे आली आणि गुलाबजाम मागितले. पुन्हा, मनात कुठलाही भाव न ठेवता मी त्याला गुलाबजाम दिले.

सगळं जेवण जवळपास संपलं होतं. थोडा भात, डाळ आणि एक वडा घेऊन मी स्वतःचा प्रसाद घेतला, जेवलो आणि घरी आलो.

घरी आल्यावर पाय घरात टाकताच लक्षात आलं — ज्या जन्माष्टमीच्या पूजेसाठी मंदिरात गेलो होतो, त्या श्रीकृष्णाचं दर्शनच घेतलं नव्हतं मी…

मनात प्रचंड अपराधीपणाची भावना निर्माण झाली.

तडक घरच्या मंदिरात गेलो आणि तिथल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करून क्षमा मागितली.

पण त्या क्षणी मला असं जाणवलं की श्रीकृष्ण माझ्याकडे स्मितहास्य करत पाहत आहे. पुन्हा पुन्हा पाहिलं तरी तोच भाव…

मी डोळे मिटून “सॉरी” म्हटलं…

डोळे उघडल्यावर पाहिलं तर तोच…

‘माझ्याकडे मिश्कीलपणे पाहणारा माझा श्रीकृष्ण’…

जणू काही तो मला सांगत होता…

“तू मला मंदिरात येऊन भेटला नाहीस… पण त्याऐवजी तू माझ्या भक्तांची सेवा करत होतास ना… म्हणूनच मीच तुला पुन्हा पुन्हा भेटत होतो…”

म्हणजे तो माणूस… जो माझ्याकडे चार-पाच वेळा येऊन प्रसाद घेत होता… तो…

तो… माझा श्रीकृष्ण होता…!!!!!!!!!

© श्री रवींद्र कामत

स्थळ: लागोस, नायजेरिया

दिनांक: १६ ऑगस्ट २०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुभव हा गुरु…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ अनुभव हा गुरु… ☆ सौ शालिनी जोशी

‘गुरु’ म्हणजे अज्ञान दूर करणारा, या दृष्टीने आपण ज्यांचे पासून काही शिकतो ते सारे गुरुच असतात. ‘जो ज्याचा गुण तो मी गुरु केला जाण’ असे सांगून अवधूत आपल्या २४ गुरूंची नावे सांगितात. खरे पाहता आई हा आपला पहिला गुरु. मग वडील, शिक्षक, समाज, निसर्ग, मित्र इत्यादी. प्रत्येकाकडून शिकण्यासारखे काहीतरी असते. अशी गुरूंची मोठी यादी त्याला अंत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ‘ जे जे यातिचा व्यापारु। ते ते त्याचे तितके गुरु। याचा पाहता विस्तारू उदंड आहे। दा. ५/२/७१. हे सगळे खरे असले तरी हे सगळे गुरु झाले परके, आपल्या व्यतिरिक्त.

आयुष्याचा खरा अर्थ समजण्यासाठी ‘अनुभव हाच खरा गुरु’ आहे. दुसऱ्याने दिलेली धनाजी पुंजी किंवा शिकवलेली अक्कल कधीही पुरेशी नसते. पण स्वानुभावावर मिळवलेले शहाणपण महत्त्वाचं. तेच आत्मविश्वास निर्माण करते. कायमच मनावर कोरले जात. कितीही वाटलं तरी कमी होत नाही. भूतकाळातील अनुभवाची शिदोरी वर्तमान आणि भविष्यातही मार्गदर्शक ठरते. म्हणून अनुभवासारखा गुरु नाही.

जन्मल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत आपण अनुभव घेत असतो. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. समाजात वावरत असताना जे अनुभव येतात ते बरेच काही शिकवून जातात. हा गुण लहानपणापासून असतो. स्वाभाविक असतो. भूक लागल्यावर रडले की दूध मिळते हे तान्ह्या बाळालाही कळते. शिकवावे लागत नाही. तो त्याचा अनुभव त्याला तशी बुद्धी देतो. वय वाढेल तशी अनुभवाची शिदोरी वाढत जाते. शेजारी कसा आहे, याचा अनुभव आला की आपण त्याच्याशी संबंध ठेवायचा का नाही ठरवतो. कामात प्रथम चुक होवू शकते पण एकदा अनुभव आला की आपण ती चूक परत करत नाही. अनुभवातून मिळालेले ज्ञान ध्येयपूर्तीपर्यंत नेते. एडिसनने (थॉमस हल्वा एडिसन) बरेच शोध लावले. फोन, ग्रामोफोन, बल्ब इत्यादी. पण बल्बचा शोध लावताना त्याला १000 वेळा प्रयत्न करावा लागला. याचा अर्थ त्याचे आधीचे प्रयत्न फुकट गेले असे नाही. तर प्रत्येक प्रयत्नात तो नवीन नवीन शिकत गेला. अनुभवत गेला. तेव्हा बल्ब लागला. दिव्याला हात लावला की भाजते. असा एकदा अनुभव माझ्यावर लहान मुलही दिव्याला हात लावायला जात नाही. तो अनुभव कायम लक्षात राहतो. मेंदूवर कोरला जातो. अनुभव डोळसपणे पाहिला की अनेक सूचना आपोआप मिळत जातात. अनुभव हाच शिक्षक होतो. सांगितलेल्या वेळेला एखादा आपल्या घरी आला, नाही तर आपली तारांबळ उडते. पुढील सर्व कार्यक्रम विस्कळीत होतात. यातून दिलेल्या वेळेच्या महत्त्वाचा धडा आपल्याला मिळतो. आपण वेळेच्या बाबतीत तत्पर होतो. अनुभवातून मिळणारे ज्ञानग्रहण करायची, योग्य वेळी त्याचा उपयोग करायची इच्छाशक्ती हवी. पारख करायची दृष्टी हवी. अशा प्रकारे अनुभव हा स्वतःच्या ताब्यात असलेला गुरु. म्हणून इतर गुरूंचे महत्त्व कमी होत नाही. पण त्या यादीत आणखीन एक भर.

गुरु किंवा शिक्षक यांचा आधी थिअरी मग प्रॅक्टिकल असा मार्ग असतो. पण अनुभव हा एकमेव गुरु आहे, जो आधी प्रॅक्टिकल देतो आणि मग थेअरी आपली आपण घोकावी लागते.

आपली भारतीय संस्कृती अनुभवजन्य ज्ञानाला महत्त्व देते. संतांच्या विचारांना, अभंगांना महत्त्व प्राप्त होते. कारण त्याला अनुभूतीचा स्पर्श असतो. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात ‘प्रत्ययाचे ज्ञान तेचि प्रमाण। येरे अप्रमाण सर्वकाही। तर संत तुकाराम म्हणतात, ‘ नका दंतकथा येथे सांगो कोणी। कोरडे ते मानी बोल कोण।।अनुभव येथे पाहिजे साचार। न चलती चार आम्हा पुढे।।’आम्हाला पुराणातील दंतकथा सांगू नका. अनुभवाशिवाय कोरडे ज्ञान कामाचे नाही. अनुभव संपन्न माणसाची यश नेहमीच पाठराखण करते. जीवन परिपक्व व परिपूर्ण बनते. अनुभव ज्याचे त्यानेच घ्यायचे असतात. त्यामुळे मिळणारी अनुभूती श्रेष्ठ असते.

अशाप्रकारे अनुभव हा गुरु व्यवहारात, प्रपंचात, समाजात, व्यवसायात आणि परमार्थातही क्षणोक्षणी नवीन अनुभव देणारा असतो. घेणाऱ्यावर त्याचे पूर्ण जबाबदारी असते. सर्वच बाबतीत हे शक्य होत नाही. तेव्हा मात्र मार्गदर्शक दुसऱ्या गुरूची गरज भासते. एकंदरीत अनुभव असो किंवा दुसरा कोणी गुरु असो, ‘गुरुवीण कोण दाखवील वाट?’ हेच खरे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ५ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ५ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या पूजेत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे उपयोग खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच या वनस्पती पूजा व व्रते यात समाविष्ट केल्या जातात.

बेल

बेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पचन सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, बेलाचा उपयोग अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

बेलाचे फायदे:

पचन सुधारते:

बेलामध्ये फायबर भरपूर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते:

बेलामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

शरीराला थंडावा:

उन्हाळ्यात बेलाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्माघातापासून बचाव होतो.

मधुमेहासाठी फायदेशीर:

बेलामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

त्वचेसाठी फायदेशीर:

बेलाचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

इतर फायदे:

बेल हृदय, किडनी आणि यकृतासाठीही चांगले मानले जाते.

बेलाचा उपयोग कसा करावा:

बेलाचा रस:

बेलाचे फळ खाणे किंवा त्याचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बेलपत्र:

रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात.

बेलपानांचा काढा:

बेलाच्या पानांचा काढा करून प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक आजार बरे होतात.

पिंपळाच्या झाडाचे फायदे:

मधुमेह

पिंपळाच्या पानांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

दात आणि हिरड्यांसाठी

पिंपळाच्या पानांचा रस दात आणि हिरड्यांसाठी खूप गुणकारी आहे. त्यामुळे दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्या कमी होतात.

पचनक्रिया

पिंपळाच्या सालीचा काढा पोटाचे विकार आणि अपचन यासाठी उपयुक्त आहे.

त्वचा रोग

पिंपळाच्या सालीचा वापर त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी होतो.

श्वसनक्रिया

पिंपळाच्या सालीचा काढा आणि पानांचा वापर श्वासाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी होतो.

मानसिक शांती

पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते, असे मानले जाते.

रोगप्रतिकारशक्ती

पिंपळाच्या पानांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत.

पर्यावरणासाठी

पिंपळाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते, ज्यामुळे पर्यावरणाची शुद्धी होते.

पिंपळाचा वापर:

पिंपळाच्या झाडाचा उपयोग विविध प्रकारे करता येतो. पानांचा रस, सालीचा काढा, फळे यांचा वापर औषध म्हणून केला जातो. तसेच, पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

पिंपळाच्या वापरासाठी खबरदारी:

पिंपळाचा वापर करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

गर्भवती महिला:

गर्भवती महिलांनी पिंपळाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

इतर औषधे:

जर तुम्ही इतर कोणतीही औषधे घेत असाल, तर पिंपळाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

निष्कर्ष:

पिंपळाचे झाड एक उपयुक्त औषधी वनस्पती आहे. त्याचे विविध फायदे आहेत, ज्याचा उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी करू शकतो.

रुई, ज्याला मंदार किंवा अर्क म्हणूनही ओळखले जाते, हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने, फुले आणि मुळे विविध उपचारांसाठी वापरली जातात.

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व:

रुईच्या पानांचा उपयोग पूजेमध्ये केला जातो, विशेषतः शनिवारी मारुतीला पाने वाहिली जातात.

काही जातींमध्ये, वधू लग्नात वराला रुईच्या फुलांची माळ घालते.

आरोग्य फायदे:

सांधेदुखी:

गरम केलेल्या रुईच्या पानांचा सांधेदुखीवर लेप लावल्यास आराम मिळतो.

दमा:

रुईची पाने आणि सैंधव एकत्र करून त्याची भट्टी बनवून दमा (ॲस्थमा) झाल्यावर वापरली जाते.

त्वचा विकार:

रुईच्या चिकाचा हळद आणि गुलाबपाणी सोबत वापर त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी होतो.

पचनासाठी:

रुईच्या पानांचा उपयोग पचनासाठी देखील होतो.

अशा विविध वनस्पतींचा होणारा उपयोग लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी पूजे साठी या वनस्पतींचा वापर केला. आणि त्यांचे महत्व आपल्या लक्षात आणून दिले आहे. ही व्रते करताना या वनस्पती किती पूजनीय आहेत हेही दाखवून दिले आहे. हे लक्षात घेऊन आपण ही व्रते डोळसपणे आचरणात आणली तर त्याचे सर्वार्थाने फायदे मिळतील.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कबुतर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कबुतर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

सध्या सगळीकडे कबुतरांचाच विषय सुरु असल्याने आमच्याही गप्पांमधे तो आलाच. एखाद्या विषयावर जास्त चर्चा नको असेल तर आपण म्हणतो बास….. आता या विषयाला ऊगाचच खतपाणी घालू नका. हा कबुतरांचा त्यातही न्याय प्रविष्ट असल्याने आता या विषयाला खतपाणी ऐवजी ऊगाचच दाणापाणी घालू नका असं म्हणत विषय थांबवला.

पण एक मित्र होताच. त्याच लग्न झालेलं नाही. आणि आता होणं कठिण आहे. तो मधेच हा विषय परत काढायचा. थोडक्यात तो विषय थांबवा असं ठरल्यावर सुध्दा त्याला अनधिकृृपणे दाणापाणी मिळाल्यासारखं हा परत सुरु व्हायचा. पण हे दाणापाणी म्हणजे चर्चेला घातलेलं खतपाणी हे कबुतरांच्या विरोधासाठीच होतं.

कोणी, कोणावर, किती, कसं प्रेम कराव हे आपण ठरवू शकत नाही. पण शांतीदूत समजल्या जाणाऱ्या, एके काळी एकमेकांची पत्र पोहोचवत होती असा समज असणाऱ्या कबुतरांविषयी त्या मित्राला प्रेम नाही.

कारण एकेकाळी अशाच कबुतराच्या सहाय्याने अनेक वेळा अनेेक ठिकाणी पत्र पाठवण्याचा त्याने केलेला प्रयत्न या कबुतरांनी सफल केला नाही.

अशी कबुतरं त्याच्या घरासमोर, छपरावर बर्‍याचदा बसली. त्याच्या घराच्या वरच्या भागात त्यांनी घरं सुध्दा केली. पण याचं घर बसवायला त्यांची हवी ती मदत झाली नाही.

मी त्याला म्हणालो, अरे अशी पत्र पोहोचवणारी कबुतरे फक्त गोष्टीत नाहीतर सिनेमात असतात. प्रत्यक्षात असतील असं मला वाटत नाही. आणि असली तरी त्यांना तसं शिकवलं जात असेल.

त्यावर त्याच ऊत्तर. अरे शिकवल्यावर ते योग्य त्या ठिकाणी पत्र पोहोचवत असतील कबूल. पण न शिकवल्यामुळे त्यांनी चुकीच्या ठिकाणी पण माझी पत्र पोहोचवली नाहीत. मला पत्र पोहोचवणं महत्वाच होतं. ठिकाण बरोबर का चुकीच हे नंतर ठरवता आलं असत की.

अरे, दोनचार वेळा मी लिहिलेली ती गुलाबी कागदाची सुगंधित पत्रं घेऊन ते उडाले सुध्दा. काही वेळाने दोन कबुतर गुटर घू आवाज करत स्वतः भोवती गोल गोल फिरतांना सुुध्दा मी पाहिलं. मला वाटलं ते मलाच काहितरी सांगायचा प्रयत्न करताहेत. चला कुठेतरी पत्र पोहोचलं असं वाटून त्यांच्याच सारखा मी पण एकटाच माझ्या भोवती फिरलो. अगदी ‘ घालीन लोटांगण वंदिन चरण’ असं म्हणतांना गोल फिरतो, टाळ्या वाजवत नमस्कार करतो, तशाच टाळ्या वाजवल्या, नमस्कार पण केला, त्यांचे चरण पण पाहिले. पण……

पण काय?……. आमच्यातल्या एक दोन जणांनी अधिरतेने विचारलं….. कारण आता आम्हालाही ऊत्सुकता होती…….

अरे काही नाही. काही दिवसांनी मी वरच्या मजल्यावर गेलो तर तिथे यांची घरटी. आणि त्या घरट्यात पाहिलं तर खाली माझी सुगंधित पत्रं. म्हणजे माझं घर बसाव म्हणून लिहीलेल्या पत्रांनी यांनी यांचच घर सजवलं होतं. राग आला मला.

एकदा तर एक कबुतर माझं पत्र घेऊन गेल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं……

मग काय झालं…… परत आमची ऊत्सुकता जागी झाली.

काय झालं?…. दोनचार दिवसांनी एक लग्न पत्रिकाच समोर पडलेली दिसली……

आता त्याला चिडवण्याचा मुड एकाचा झाला. तो म्हणाला छानच झालं. अंधळा मागतो एक डोळा. देव देतो दोन डोळे. तू पत्र पाठवलं, तिकडून पत्रिकाच आली. मग झालं काय?…. का केलं नाहीस लग्न. ?

मुर्खा, पत्रिकेत नवरा दुसराच होता.

याच मित्राला कबुतरांचा दुसरा त्रास होता. तो त्यांच्या घाण करण्याचा. म्हणजे कबुतर बसायची शेजारच्या घरावर. पण घाण करायची याच्या दारासमोर. कुंपणाला आवडीने दिलेला लाल विटांसारखा दिसणारा रंग कबुतरांनी इतका घाण केला होता की तो रंग लाल दिसण्याएवजी आता पांढरा पण काळवंडलेल्या संगमरवरा सारखा वाटत होता. हे सांगतांना त्याने गाण्याची चालच वापरली. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. या धर्तीवर बसती कबुतरे शेजारी, घाण मात्र माझ्या दारी. असं म्हणाला. त्याचा राग स्वाभाविक होता.

अनेक कार्यक्रमात, शांतीदूत म्हणून कबुतरं उडवली जातात. अशा कार्यक्रमात तो आवर्जून कबुुतर उडवायला जायचा. न जाणो कबुतर उडवण्यामुळे तरी कोणी आपल्याला पाहिल आणि भेटायला येइल ही अपेक्षा. पण याची ही आशाही कबुतरांसारखीच हवेत उडाली. याला हवी असणारी शांती मिळालीच नाही. पण आता हा मात्र कबुतरांपासून शांती मिळावी म्हणून आलेली कबुतर उडवत असतो. आणि आत्ता कारण काहीही असो. पण हळूच म्हणतो, भगवान के घर देर है| अंधेर नही है|.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – या सगळ्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या कडक उन्हासारखेच चटके देणाऱ्या अशा अनुभवांमुळे मन उद्विग्न असतानाच त्या दिवशी अकल्पितपणे उल्हसित करणारा गारवा स्पर्शून गेला तो बाहेरच्या उन्हाला शांतवण्यासाठीच आल्यासारख्या अचानक बरसू लागलेल्या वळवाच्या पाऊसधारांमुळे! त्या गारव्याने मनातलं मळभ नकळत विरूनच गेलं. त्याक्षणी मला हे माहितच नव्हतं कीं हा पाऊस माझ्या आयुष्यांत येणाऱ्या एका अनपेक्षित सुखद घटनेचं शुभसूचनही करतोय!)

इथल्या सगळ्याच नकारात्मक पार्श्वभूमीवर काजळी धरू पहाणाऱ्या, अंधारून येणाऱ्या माझ्या मनाला उल्हसित करणारे असे क्षणही अधूनमधून कां होईना पण यायचे म्हणून तर मी इथं तग धरून राहू शकलो होतो. अकोल्याला जाॅईन होऊन मला चारएक महिनेच तर झाले होते आणि इथलं अजून अडीच-तीन वर्षांचं गृहित वास्तव्य मला वाकुल्या दाखवत भिववू पहात असतानाच बाहेरच्या उन्हाच्या काहिलीबरोबरच मलाही शांतवू पहाणारा, अचानक बरसू लागलेला हा वळवाचा पाऊस! तो माझ्या आयुष्याला लवकरच सकारात्मक कलाटणी देऊ पहाणाऱ्या एका सुखद क्षणाचं शुभसूचन करायलाच आला असल्याची जाणिव माझ्यापर्यंत तोवर पोचलीच नव्हती. तो सकारात्मक क्षण, शिपायाने आजच्या इनवर्ड मेलमधली सर्व एन्वलप्स् फोडून त्यातल्या पत्रांचा मला मोठा गठ्ठा चिमटा लावून बऱ्याच वेळापूर्वी माझ्या टेबलवर आणून ठेवला होता त्याच पत्रांच्या गर्दीत तेव्हापासूनच ताटकळत थांबलेला होता जसा कांही.

माझ्या टेबलवर ठेवलेल्या इनवर्ड-मेलमधील सर्व पत्रे/सर्क्युलर्स एक एक करून वाचून हातावेगळी करीत असताना अचानक समोर आलं ते माझ्या वैयक्तिक नावावर आलेलं एक बंद एन्व्हलप! मी ते उत्सुकतेने हातात घेतलं. पाहिलं तर ते आमच्या सेंट्रल ऑफिसकडून आलेलं होतं. म्हणून मग ते तातडीने न उघडताच मी बाजूला ठेवलं. कारण क्रिमिनल केसेस सारख्या महत्त्वाच्या कामांचा प्रगती-अहवाल तातडीने मागवणारी अशी लेटर्स ठराविक अंतराने नेहमीच यायची. आज मात्र याचं मला अजिबातच दडपण जाणवलं नाही, कारण नेहमीसारखं कांही मोघम उत्तर न देता याबाबतीतली सर्व कामं मार्गी लागल्याचा अहवाल आज मी पाठवू शकत होतो. कारण आजच अतिशय अनपेक्षितपणे सर्व क्रिमिनल केसेस् कोर्टात दाखल झालेल्या होत्या! त्याबाबतचं रिपोर्टिंग हे पत्र आलं नसतं तरीही मी आमच्या रिजनल व झोनल ऑफिसेस् प्रमाणे सेंट्रल ऑफिसलाही करणार होतोच. ते आता या पत्राला उत्तर म्हणून करू असा विचार करून ते एन्व्हलप मी बाजूला ठेवून दिलं आणि समोरचं शिल्लक राहिलेलं इतर इनवर्ड मेल हातावेगळं करू लागलो. त्यात पुन्हा समोर येणाऱ्या इतर कामांचा अविरत ओघ सुरू होताच. या सगळ्यातून बाहेर पडेपर्यंत लंच टाईम झाली. मघाशी बाजूला ठेवलेल्या त्या एन्व्हलपकडे लक्ष जाताच मी ते उघडलं. आतलं पत्र उलगडून नजरेसमोर धरताच लखकन् वीज चमकावी तसंच झालं. ते पत्र नव्हतं. ते माझ्या ध्यानीमनी नसताना अतिशय अकल्पितपणे इथल्या सभोवतालच्या असह्य वातावरणातून मला सन्मानपूर्वक बाहेर पडण्यासाठी समोरचं बंद दार थोडं किलकिलं करणारा तो एक शुभशकूनच होता!

हे पत्र म्हणजे एक्झिक्यूटिव्ह पोस्टच्या प्रमोशन प्रोसेसमधली पहिली पायरीच होती माझ्यासाठी. हो. लवकरच होणाऱ्या प्रमोशनच्या इंटरव्ह्यूसाठी मला आमंत्रित करणारं ते पत्र म्हणजे समोरचा मिट्ट काळोख नाहिसा करणारा एक प्रकाशकिरणच होता!

इंटरव्ह्यूची तयारी करण्याइतका वेळ मला पुढच्या आठ दिवसांत मिळालाच नाही. मुंबईची जातायेताची रिझर्वेशन्स मिळवेपर्यंतच इंटरव्ह्यूची तारीख हाकेच्या अंतरावर आलेली होती!

इंटरव्ह्यूज् आमच्या नरिमन-पॉईंट येथील सेंट्रल ऑफिसमधे होते. अठ्ठावीस वर्षांपूर्वी माझ्या करिअरची सुरुवात झाली होती ती याच वास्तूमधील स्टाफ-डिपार्टमेंट मधे. आणि योगायोगाने आज माझ्या करिअरमधील एका अनिश्चित वळणावर या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी त्याच डिपार्टमेंटमधे आलेलो होतो. अर्थातच आजूबाजूला एकही ओळखीचा चेहरा नव्हता. पण माहोल सगळा तोच. तिथे सलग तीन वर्षे मी तेव्हा काम केलेलं होतं. तेव्हाच्या आपण विसरून गेलोय असं वाटणाऱ्या बारीकसारीक कितीतरी आठवणींनी मन भरून आलं. माझ्याही नकळत इंटरव्ह्यूचं दडपण त्यातच हरवून गेलं. अचानक माझं नाव पुकारलं गेलं तेव्हा कुठं मी भानावर आलो आणि स्वत:ला सावरत पटकन् उठून ए. सी. केबिनचं दार उघडून आत गेलो तेव्हा इंटरव्ह्यू पॅनेलमधले तीन एक्झिक्युटिव्ज् मी आत गेल्या क्षणापासून मला जोखत असल्यासारखे एकटक माझ्याकडेच पहात होते. त्याला कारण होतं माझी अकोला ब्रॅंच! अर्थातच त्यांच्यासमोरच्या माझ्या पर्सनल डिटेल्सवरून मी अकोला ब्रॅंचमधून आल्याची त्यांना कल्पना असल्याने मला विचारला गेलेला पहिला प्रश्न होता तो त्याच अनुषंगाने..

“सोs.. यू आर् फ्राॅम अकोला ब्रॅंच…! ” इतर दोघांकडे सूचक नजरेने पहात त्यातील एकाने मला विचारलं. त्यांचा उपरोधिक स्वर ऐकताच मी सावध झालो. तिघांच्याही गंभीर झालेल्या चेहऱ्यांवरून अकोला ब्रॅंचच्या आॅडिट रिपोर्टची झळ थेट सेंट्रल आॅफिसमधील या सिनिअर्सनाही चटके देत असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यासंबंधातल्या पहिल्याच प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना आधीच मी ‘याच कारणाने तातडीने करावयाच्या कार्यवाहीसाठी माझे कांही महिन्यांपूर्वीच अचानक अकोल्याला पोस्टींग झालंय ‘ असं सांगताच पुढे विचारलेले गेलेले सगळेच प्रश्न त्याच संदर्भातले असले तरी ते माझी परीक्षा घेण्यासाठी विचारलेले नव्हते, तर ती त्यानंतरच्या कार्यवाही बाबतची त्यांच्या मनात असणारी उत्सुकता ध्वनित करणारे होते! मी अकोला ब्रॅंचचा चार्ज घेतल्यापासूनच्या अल्पकाळात त्यादृष्टीने केलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली आणि आॅडिट रिपोर्टमधे अधोरेखित केलेल्या सर्व अकरा कर्जदारांविरूध्द कोर्टात क्रिमिनल केसेसही नुकत्याच दाखल केल्याचेही नमूद केले. ते ऐकताच त्या सर्वांचं दडपण कांहीसं कमी झाल्यासारखा त्यांचा अॅप्रोच पूर्णपणे बदललाच. पुढचे जुजबी प्रश्न म्हणजे केवळ उपचारच होता. तो इंटरव्ह्यू नव्हताच. एक मनमोकळा संवाद होता फक्त!

परतीच्या प्रवासात मनामधे प्रमोशन मिळेल कीं नाही हा विचार नव्हता. गेले चार महिने आपण घेतलेल्या अविरत कष्टाचं, आपल्या अथक, प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं या निमित्ताने थेट रिपोर्टिंग सेंट्रल आॅफीसला झाल्याचं समाधान माझ्या मनाला उभारी देत राहिलं. अनपेक्षितपणे घडत गेलेल्या या सगळ्या घटनाक्रमांमागे ‘तो’ च होता याची पुढे लगेचच आलेली प्रचिती ‘देता घेशील किती दो कराने’ अशी भावना माझ्या मनात आपसूकच निर्माण व्हावी अशीच होती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ४ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ४ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

श्रावण – ३

आपले पूर्वज खरोखरच निसर्गाचा अभ्यास करून प्रत्येक सण, वार याचे महत्व व पूजा यांची सांगड घालत होते. काही व्यक्ती विज्ञान मानतात तर काही देव, व्रते या वर विश्वास ठेवतात. या दोन्हींची सांगड आपल्या पूर्वजांनी मोठ्या हुशारीने घातली होती. कोणत्याही भावनेने ही व्रते केली तरी त्याचे फायदेच मिळणार आहेत.

शुक्रवारच्या जिवती पूजे विषयी लक्षात घेतले तर प्रत्येक प्रथा अर्थपूर्ण आहे. या जिवती पूजेची पद्धत सर्वांना माहिती असेलच. श्रावणी शुक्रवार या दिवशी ही पूजा केली जाते. ही पूजा करताना जिवतीच्या चित्राला गंध, हळद कुंकू लावतात. आघाडा दुर्वा यांचा हार घालतात. कापसाच्या मण्यांची माळ घालतात. तिची आरती करतात. जिवतीची कहाणी मोठ्या भक्तीने पठण केली जाते. त्यात मुख्यत्वे मुला बाळांचे सुख, रक्षण व्हावे हा भाव असतो व त्या साठी प्रार्थना असते. या दिवशी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाची आरती (दिवे) करून त्या दिव्यांनी आरती केली जाते. व घरातील मुलांचे औक्षण केले जाते. पुरणाचे दिवे प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात. याच दिवशी घरात महिलांचे हळदी कुंकू आयोजित केले जाते. त्यात फुटाणे, दूध, साळीच्या लाह्या प्रसाद म्हणून दिले जाते.

या पूजेतील सर्व वस्तू व पदार्थ बघितले तर सगळे उपयुक्त असल्याचे लक्षात येते.

आघाडा ही एक औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकला, कफ यावर याचा काढा उपयुक्त असतो. या वनस्पतीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता दूर होते. दात दुखीवर आणि हिरड्यांच्या समस्येवर, दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्या मजबूत करण्यासाठी याच्या काड्यांचा उपयोग होतो. त्वचेच्या समस्येवर याच्या पानांचा लेप उपयुक्त असतो. याच्या पानात दाह कमी करण्याचे गुण असतात. त्या मुळे सूज, वेदना कमी होतात. पानाचा एलर्जी व त्वचा विकार, ताप, डोकेदुखी, पोटातील कृमी यावर उपयोग होतो.

मुत्रविकार, मुतखडा यावर आघाड्याच्या मुळांचा उपयोग होतो.

पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणूनही केला जातो.

वास्तूशास्त्रा नुसार ही वनस्पती घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि सुख समृध्दी वाढते.

दुसरी वनस्पती दुर्वा याचेही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे उपयोग आहेत.

दुर्वा, ज्याला बर्म्युडा गवत देखील म्हणतात, एक औषधी वनस्पती आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. दुर्वांमध्ये अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

दुर्वाचे औषधी उपयोग:

दुर्वा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्वचेवरील खाज, जळजळ, इसब आणि पुरळ यांसारख्या समस्यांवर दुर्वा वाटून लावल्यास आराम मिळतो. पचनक्रिया सुधारते. दुर्वांचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुर्वांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुर्वांचा रस उपयुक्त आहे. दुर्वांचा रस मूळव्याधीच्या समस्येवर गुणकारी आहे. यामुळे रक्तस्त्राव थांबतो आणि वेदना कमी होतात. दुर्वा शरीराला थंडावा देतात. त्यामुळे ताप आल्यास दुर्वांचा रस प्यायल्याने आराम मिळतो. दुर्वा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. नाकातून किंवा तोंडून रक्त येत असल्यास दुर्वांचा रस पिळल्याने रक्तस्त्राव थांबतो. दुर्वा डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. डोळ्यांची जळजळ किंवा इतर समस्यांसाठी दुर्वांचा वापर केला जातो.

देवाला अर्पण केलेल्या दुर्वा प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात.

या दिवसात पचनशक्ती मंदावते म्हणून साळीच्या लाह्या खाल्ल्या जातात. उपास केले जातात. आणि पुरण खाल्ले जाते. पुरणाची पोळी खाण्याचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेत फरक पडतो. पोळीसाठी लागणारं पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. त्यामुळे केवळ तूर मूग याच डाळी खाणारे लोकांच्या पोटात हरभरा जातो. पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. विशेष म्हणजे याने वजन वाढत नाही.

असे उपयुक्त घटक घेऊन येणारा श्रावण! कोणी कोणत्याही दृष्टीने साजरा केला तरी त्याचे फायदेच मिळणार!

अशीच काही माहिती बघू पुढील भागात.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चक्रव्यूह… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ चक्रव्यूह… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माणसाला जगणं महत्त्वाच वाटत. पण त्याला कर्तव्याचा वाटा तुडवताना पडणारा ताण घयाळ करतो. किती केलं तरी काम सरत नाही आणि मनातली मोठेपण घेवून जगण्याची हाव ही मरत नाही. ससेहोलपट सहन करत ताणतणावात गुरफटलेलं जगणं नकोसं वाटतं नाही. यालाच तर माणसांची जिद्द म्हणतात ती जोपर्यंत जोमात आहे तो पर्यंत धडपडत तो नवनवे मार्ग शोधत प्राप्त परिस्थितीसोबत झट्याझोंब्या खेळत तिला नामोहरम करण्यातच आपलं आयुष्य खर्ची घालत असतो. माणसांना कर्तृत्ववान बनवते ती आशा.

ती मोठी चिवट आणि चिकट असते. ती त्याला जन्म जातच चिकटून बसलेली असते, स्फूर्ती देते, कुठल्या तरी ध्येयाचे अमीश दाखवून त्याला कार्यतत्पर बनवते. गती मान करून धावायला लावते. मग माणूस दमत नाही, थकत नाही झपाटल्या सारखा ध्येयाचा ध्यास घेवू धावथच रहातो जगण्याचे सार्थक करण्या साठी. ठरवलेल्या ध्येयाच उदिष्ट पदरी पडलं की त्याचा जीव भांड्यात पडतो. महत्वाकांक्षी माणूस प्रयत्नशील असतो. पूर्वसुरींचा मागोवा घेत तो अनुभव संपन्न होत तो यशस्वी होतो. आपला आवाका ओळखून ‌तो आपल्या भोवती आपणच मारलेल्या रिंगणात आनंदी रहायला शिकतो. पण आशा त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती पुन्हापुन्हा त्याला नवे उदिष्ट देवून धावायला लावते. यालाच मानवी जीवनचक्र म्हणतात पण ते जीवनचक्र नसून जगण्यासाठीचा चक्रव्यूह असतो हे माणसाला फार उशिरा कळतं.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपले पूर्वज खरोखरच निसर्गाचा अभ्यास करून प्रत्येक सण, वार याचे महत्व व पूजा यांची सांगड घालत होते. काही व्यक्ती विज्ञान मानतात तर काही देव, व्रते या वर विश्वास ठेवतात. या दोन्हींची सांगड आपल्या पूर्वजांनी मोठ्या हुशारीने घातली होती. कोणत्याही भावनेने ही व्रते केली तरी त्याचे फायदेच मिळणार आहेत.

शुक्रवारच्या जिवती पूजे विषयी लक्षात घेतले तर प्रत्येक प्रथा अर्थपूर्ण आहे. या जिवती पूजेची पद्धत सर्वांना माहिती असेलच. श्रावणी शुक्रवार या दिवशी ही पूजा केली जाते. ही पूजा करताना जिवतीच्या चित्राला गंध, हळद कुंकू लावतात. आघाडा दुर्वा यांचा हार घालतात. कापसाच्या मण्यांची माळ घालतात. तिची आरती करतात. जिवतीची कहाणी मोठ्या भक्तीने पठण केली जाते. त्यात मुख्यत्वे मुला बाळांचे सुख, रक्षण व्हावे हा भाव असतो व त्या साठी प्रार्थना असते. या दिवशी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाची आरती (दिवे) करून त्या दिव्यांनी आरती केली जाते. व घरातील मुलांचे औक्षण केले जाते. पुरणाचे दिवे प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात. याच दिवशी घरात महिलांचे हळदी कुंकू आयोजित केले जाते. त्यात फुटाणे, दूध, साळीच्या लाह्या प्रसाद म्हणून दिले जाते.

या पूजेतील सर्व वस्तू व पदार्थ बघितले तर सगळे उपयुक्त असल्याचे लक्षात येते.

आघाडा ही एक औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकला, कफ यावर याचा काढा उपयुक्त असतो. या वनस्पतीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता दूर होते. दात दुखीवर आणि हिरड्यांच्या समस्येवर, दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्या मजबूत करण्यासाठी याच्या काड्यांचा उपयोग होतो. त्वचेच्या समस्येवर याच्या पानांचा लेप उपयुक्त असतो. याच्या पानात दाह कमी करण्याचे गुण असतात. त्या मुळे सूज, वेदना कमी होतात. पानाचा एलर्जी व त्वचा विकार, ताप, डोकेदुखी, पोटातील कृमी यावर उपयोग होतो.

मुत्रविकार, मुतखडा यावर आघाड्याच्या मुळांचा उपयोग होतो.

पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणूनही केला जातो.

वास्तूशास्त्रा नुसार ही वनस्पती घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि सुख समृध्दी वाढते.

दुसरी वनस्पती दुर्वा याचेही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे उपयोग आहेत.

दुर्वा, ज्याला बर्म्युडा गवत देखील म्हणतात, एक औषधी वनस्पती आहे. त्याचे अनेक उपयोग आहेत. दुर्वांमध्ये अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे, अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

दुर्वाचे औषधी उपयोग:

दुर्वा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्वचेवरील खाज, जळजळ, इसब आणि पुरळ यांसारख्या समस्यांवर दुर्वा वाटून लावल्यास आराम मिळतो. पचनक्रिया सुधारते. दुर्वांचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुर्वांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुर्वांचा रस उपयुक्त आहे. दुर्वांचा रस मूळव्याधीच्या समस्येवर गुणकारी आहे. यामुळे रक्तस्त्राव थांबतो आणि वेदना कमी होतात. दुर्वा शरीराला थंडावा देतात. त्यामुळे ताप आल्यास दुर्वांचा रस प्यायल्याने आराम मिळतो. दुर्वा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते. नाकातून किंवा तोंडून रक्त येत असल्यास दुर्वांचा रस पिळल्याने रक्तस्त्राव थांबतो. दुर्वा डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. डोळ्यांची जळजळ किंवा इतर समस्यांसाठी दुर्वांचा वापर केला जातो.

देवाला अर्पण केलेल्या दुर्वा प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात.

या दिवसात पचनशक्ती मंदावते म्हणून साळीच्या लाह्या खाल्ल्या जातात. उपास केले जातात. आणि पुरण खाल्ले जाते. पुरणाची पोळी खाण्याचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेत फरक पडतो. पोळीसाठी लागणारं पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. त्यामुळे केवळ तूर मूग याच डाळी खाणारे लोकांच्या पोटात हरभरा जातो. पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. विशेष म्हणजे याने वजन वाढत नाही.

असे उपयुक्त घटक घेऊन येणारा श्रावण! कोणी कोणत्याही दृष्टीने साजरा केला तरी त्याचे फायदेच मिळणार!

अशीच काही माहिती बघू पुढील भागात.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

? विविधा ?

☆ सेल्फी… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

आज-काल कधीही कुठेही आणि निमित्त असो वा नसो.. सेल्फी काढणारे दर्दी नेहमीच दिसतात. तोंडाचा चंबू करून सेल्फी काढण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो. आताशा आरशाची जागा या सेल्फीने घेतली आहे. मोबाईल मधल्या कॅमेऱ्याच्या सेल्फी मोडवर थांबूनच मेकअप करायचा, केशरचना बदलायची आणि सेल्फी काढायचा. दुसऱ्या मिनिटाला नेमके आपण कसे दिसतो? असं पाहायचं…. मनानं ते पसंत केलं तर ठीक. नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंंचावन्न! रोल, कॅमेरा, ॲक्शन असा मनानं ‘ग्रीन सिग्नल’ दिला की मग क्लिक होतो हा सेल्फी. इथवर हे हौशी थांबत नाहीत… फोटो ‘पोस्ट’ करून त्याला किती ‘लाईक’ मिळाले हाही छंद हे सेल्फी प्रेमी जपतात..

फोटोत स्वतःला बंदिस्त करून घेण्याची ही टेक्नॉलॉजी नवीन म्हणता म्हणता जुनी होऊ लागली आहे पण त्याचं फ्याड मात्र वाढत चाललं आहे. त्याचा आनंद घेता घेता दुष्परिणामही दिसायला लागलेत. सेल्फीचं फ्याड इतकं की त्यापासून झालेल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ जेव्हा आपण पाहतो तेव्हा हृदयाचा थरकाप होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. या छंदाचा अतिरेक आता मनोविकारात गणला जाऊ लागलाय…

शरीराचं बाह्य रूप जोवर मनाजोगंत होत नाही तोवर त्याचा मेकअप करून अनेकदा सेल्फी काढला जातो. एकूणच मनाची पसंती येईपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो. परंतु जे मन सरते शेवटी या क्लिकला हिरवा कंदील दाखवतं त्या मनाचा सेल्फी काढावा असं त्या शरीराला कधी वाटत नाही का? आपल्या मनाचा सेल्फी आपल्याला काढता आला तर? …. असा कधी आपण विचार केलाय का? आपण जेव्हा कोणाही व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहतो तेव्हा सर्वप्रथम आपण त्याचं बाह्यरूप पाहतो. याच शरीराला नियंत्रित करणारे ‘सॉफ्टवेअर’ म्हणजे मन आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. शरीराच्या सेल्फीत मनाचं प्रतिबिंब धूसर दिसतं. शरीर सुडौल दिसावे यासाठी आपण जिम्नेशियम, योगासनं, झुंबा अशा विविध गोष्टींचा आधार घेतो. चेहरा सुंदर दिसावा यासाठी मेकअप करतो. प्लास्टिक सर्जरी करतो. हे सर्व करताना मन शरीराला साथ देतं. तेच मन स्थिर करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, मनःशांतीसाठी आपण काही वेगळे करतो का? नाही ना? मनाला आपण गृहीत धरतो… डावलतो….

आरसा आपल्या शरीराचं प्रतिबिंब दाखवतो. न की मनाचं….. निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणं आपल्या अवतीभवती असलेले लोक आपल्याला आरसा दाखवत असतात. अंतर्मनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी अंतरंगाच विश्लेषण करणारे हे बाहेरच्या जगातले प्रवासी! त्या आरशातलं आपलं प्रतिबिंब पहायची आपल्याला गरज भासत नाही. थोडक्यात आपण त्या लोकांकडे दुर्लक्ष करतो. शरीर सौंदर्य हे सर्वांना जन्मतः मिळालेलं आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपलं मनही जन्मतः सुंदरच असतं परंतु जगरहाटीत ते कलुषित होत जातं कारण त्यावर सभोवतालच्या वाईट विचारांची पुटं चढत जातात ती दूर करून त्याचं मूळ सुंदर रूप आपल्याला गवसलं तर त्या सारखा आनंद दुसरा नाही. त्यासाठी आपल्याला मनाला सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.. सुंदर मनाचा सेल्फीही किती सुंदर असेल ना?

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दहीहंडी…!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

 

☆ “दहीहंडी…!” ☆ सुश्री शीला पतकी 

काल टीव्ही वरती सर्वत्र दहीहंडी दाखवण्याचा कार्यक्रम होता वेगवेगळ्या स्तरावरती मोठ्या धाडसाने मुलं चढत होती. बघणार्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. मोठे मांडव, मोठे स्टेज त्यावर वाद्यरुंदाचा प्रचंड मोठा आवाज. गोविंदा हिरीरीने वर चढत होते आणि त्या मंडळाने बांधलेली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. दहीहंडी फोडणाऱ्याला लाखांनी बक्षीस होते. तरुण मुलांनी अनेक दिवस सराव केलेला हा खेळ मुंबईत खूपच लोकप्रिय आहे. मोठाली बक्षीस लावली जातात, व्यासपीठावरती चित्रपट सृष्टीतील अनेक नावाजलेली मंडळी हजेरी लावतात, राजकीय व्यासपीठावरील मंडळी तिथे दिसतात. मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तींच्या नावाने मंडळांनी बक्षीसं ठेवलेली असतात आणि हजारोंच्या संख्येने लोक ते पाहायला आलेले असतात. हा सगळा थरार काल टीव्हीवरून पाहत होते महिला मंडळही मागे नव्हतेच तरुण मुलीही या खेळात हिरीरीने पुढे होत्या. सगळ्यात कौतुक होते त्या छोट्या मुलाचे जो वरच्या थरावरती जाऊन आपले दोन्ही हात सोडून नमस्कार करून हंडी फोडत होता. सगळेच जीवघेणे होते. 95 गोविंदा जखमी झाले आणि एका गोविंदाचा मृत्यू झाला हे दरवर्षी ठरलेलेच असते. दहीहंडी याचा अर्थ हा नाहीच मुळी. कृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे पूर्वी शाळा शाळातून छोटे कृष्ण तयार करून मध्ये बाजूला आणखीन छोटे कृष्णा किंवा गोप गोपिका तयार करून त्याच स्टुला वर तो छोटा कृष्ण उभा राहत असे ती छोटी बांधलेली दहीहंडी फोडत असे. हे दृश्य आम्ही पाहिले किंवा जास्तीत जास्त दोन तीन थराची हंडी पण काल दहा थराच्या हंडी ने पारितोषिक प्राप्त केले असे दोन गट निघाले. हि बातमी मी टीव्हीवर पाहिली. त्याशिवाय टीव्हीवर जे दिसत होते ते खूप भयानक होते अनेक नृत्यांगना हिडीस नृत्य करत होत्या समोरच्या मॉबला प्रोत्साहित करत होत्या. कंबर लचकवणे, शरीराचे वेडे वाकडे अंग विक्षेप ज्याला म्हणतो ते करणे चालू होते. मागे तसेच भयानक गाणी लावली जात होती. समोरची 17 /18 वर्षाची मुले त्याच्या मागे बसलेले तरुण ही आपली सगळी तरुणाई कंबर लचकावून दोन्ही हात बाजूला घेऊन शरीर घुसळून नाचत होती आणि विचित्र हातवारे करत होते. क्षणभर वाटला हा आपला भारतीय संस्कारच नव्हे! पण हे कोण सांगणार? हे दृश्य पाहून खूप वाईट वाटले.

दहीहंडीचा खरा अर्थ एका कीर्तनकाराने फार सुंदर सांगितला श्रीकृष्णाच्या काल खंडात दहीहंडीचे जे वर्णन आहे त्यामध्ये चार थराची दहीहंडी चौथ्या थरावर श्रीकृष्ण, आणि ती दह्याची लोण्याची हंडी फोडून श्रीकृष्ण तो ती हंडी फोडून तळ्यातल्या माणसाला पहिल्यादा खायला देतो. इथे समाज व्यवस्थेवरती खूप छान भाष्य केलं गेल आहे ते म्हणतात, ” समाजात त्या काळात चातुर्वर्ण रचना होती ती कर्मानुसार होती म्हणजे कामानुसार भाग्यानुसार नाही मग या चारही थरामध्ये चौथ्या थरावर चढून जाणारा जो आहे तो या तिन्ही थरांच्या मदतीने वर गेलेला आहे त्याची जबाबदारी आहे की तळागाळातल्या प्रत्येक माणसाला त्या हंडी मधला ऐवज मिळाला पाहिजे पहिल्यांदा तो तृप्त झाला पाहिजे नाहीतर मी हंडी फोडतोय मीच तिथे बसून लोणी खाणार असं कृष्णाने कधीच केलं नाही त्या हंडीतल्या धारा सगळ्या तळामध्ये प्रथम येत असत आणि त्यानुसार प्रत्येक थरातल्या माणसाला ते सर्व मिळाले पाहिजे हा अट्टाहास होता. वरच्या थरामधल्यानेच बसून सगळं खायचं नाही”. उत्तम संदेश आहे ना आज चातुर्वर्ण जरी नसेल तरी विचार किती सुंदर आहे की अगदी समाजातल्या तळातल्या माणसाला सुद्धा जे मी खाणार आहे ते मिळाले पाहिजे आणि त्यांनी खाल्ल्यानंतर मला ते उपलब्ध झाले पाहिजे किंवा त्याला दिल्याशिवाय मी खाता कामा नेये. त्याचे पोट भरणे ही माझी जबाबदारी आहे किती सुंदर संदेश मला त्या कीर्तनकारांचा हा खुलासा अतिशय आवडला. हंडी अशी श्रद्धेने झाली पाहिजे पण आज त्याला काही अर्थ उरला नाही आज हे सगळे सण इव्हेंट झालेत. राजकीय पक्षांचे तरुणाईला आपल्याकडे खेचण्याचे व्यासपीठ ठरले आहेत आणि त्या सणांना वाईट रूप आले आहे. गोविंदा आपलं कसब आपली कला आपलं कौशल्य दाखवत असतात त्यासाठी मेहनत करतात हे प्रेक्षणीय आहे पण त्या त्या स्टेजवर चाललेला धिंगाणा अत्यंत वाईट आहे ही सगळी राजकीय शर्यत आहे आपल्या राजकारण्यांनी अशा अनेक ठिकाणी घुसखोरी केली आहे आणि त्या सणांच पावित्र्य नष्ट केलय. सरकार पक्षाला नामोहरम करणे इतकंच काम उरल आहे. उलट अशा सणांच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा एकत्रितपणे काम करून आपल्या तरुणाईला आपल्या संस्कृतीला साजेचा उत्सव साजरा करायला प्रोत्साहन देणे हे त्यांचे काम असायला हवे. न की बाया नाचवणे ती सुंदर नृत्य असती तरी छान वाटले असते परंतु त्या नृत्यांमधला नृत्य हा शब्द मी चुकीचा वापरते त्या नाचा मधला भडकपणा अंगवीक्षेप बाईच्या प्रत्येक अवयवाचे दर्शन अत्यंत वाईट पद्धतीने दाखवले जात होते ही आपली संस्कृती नाही हा आपला संस्कार नाही हे या तरुण पिढीला कोण सांगणार? आणि सांगणारा असला तरी त्यांना पटणार का? हा प्रश्न आहे कुठे जाणार आहोत आपण? …..!

मंडळी तुम्हाला काय वाटतं……?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares