मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- परतीच्या प्रवासात माझ्या मनात प्रमोशन मिळेल कीं नाही हा विचार नव्हताच. गेले चार महिने आपण घेतलेल्या अविरत कष्टाचं, आपल्या अथक प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं, यानिमित्ताने थेट रिपोर्टिंग सेंट्रल ऑफिसला झाल्याचं समाधानच माझ्या मनाला उभारी देत राहिलं. अनपेक्षितपणे घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमांमागे ‘तो’च होता याची पुढे लगेचच आलेली *प्रचीति ‘देता घेशील किती दो कराने’ अशी भावना माझ्या मनात आपसूकच निर्माण व्हावी अशीच होती!! )

आणि हे सगळं घडलं ते अकल्पित असा सुखद धक्का बसावा तसं. त्या सगळ्याच घटना इतक्या एकामागोमाग एक घडत गेल्या होत्या आणि त्या घटनाक्रमांमधल्या धाग्यांची वीणही इतकी घट्ट होती कीं प्रत्येक क्षणी हे खरंच घडतंय कां अशी शंका मनाला चाटून जायची इतकं ते अकल्पित होतं! ‘हे एखादं स्वप्न तर नसेल..? या सुखस्वप्नातून अचानक कोणत्याही क्षणी जाग येईल आणि पुन्हा तेच चटके देणारं हे वास्तव… ‘ अशा विचारांशी मी चाचपडत रहायचो. ते सगळं आठवलं की आजही मी आश्चर्याने थक्क होतो आणि त्यात लपलेल्या ‘त्या’च्या कृपालोभाच्या जाणीवेने पूर्णत: निश्चिंतही..!

माझ्या उत्कर्षाच्या वाटेवरचं या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने समोर आलेलं हे वळण माझ्यासाठी कांहीसं संभ्रमात टाकणारंच होतं. इकडं आड न् तिकडं विहीर अशीच अवस्था. प्रमोशन म्हणजे पुन्हा बदली आलीच. एक्झिक्युटिव्ह पोस्ट म्हणजे जवळपास बदली होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. शिवाय कुठं, कशी होणार हे पुढं ऐनवेळी ठरणाऱ्या सेंट्रल आॅफिसच्या पाॅलिसीवर अवलंबून. इंटरव्ह्यूचे निकाल अगदी आज, उद्या असे कधीही येऊ शकणार होते. अगदी कोणत्याही क्षणी. रोज घरून बॅंकेत जाताना तिथं काय वाढून ठेवलं असेल हाच विचार मनात दबा धरून बसलेला असे.

माझ्या बाबतीतली अनिश्चितता तर इतरांच्या तुलनेत अधिकच काटेरी होती. कारण माझं आधीचं अहमदनगरचं फार तर वर्षभराचं आणि नंतर अचानक स्विकारावं लागलेलं हे चार महिन्यांपासूनचं अकोल्याचं वास्तव्य! या दोन्ही ब्रॅंचेसमधली आधीपासूनच साठून राहिलेली पेंडिंग कामं आणि तिथले मी चार्ज घेण्यापूर्वीच आलेले अॅडव्हर्स आॅडिट रिपोर्टस् हे माझ्यासाठी जड झालेल्या ओझ्याइतकेच पुढे मला अडसर ठरु शकणारे फार मोठे अडथळेही ठरणार होते! कारण नेमके त्याचवेळी आमचे नवीन डी. जी. एम्. (झोनल हेड) परप्रांतातून ट्रान्स्फर होऊन नुकतेच पुण्याच्या झोनल आॅफिसमधे रिपोर्ट झाले होते. या दोन्ही ब्रॅंचेसमधल्या निगेटीव्ह मॅटर्सना मी जबाबदार नसूनही माझ्या, शिवाय माझ्यासारख्या या झोनमधल्या इतरांच्या बाबतीतही त्यांचा अॅप्रोच सरधोपट, पूर्वग्रहदूषित आणि टोकाचा नकारात्मकच असायचा. ब्रॅंच मॅनेजर म्हणून याची झळ कांहीही चूक नसताना मलाच सहन करायला लागायची. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, कौतुकाची अपेक्षाच नव्हती. शिवाय एक दिवसाआड फाॅलोअपच्या निमित्ताने येणारा त्यांचा प्रत्येक फोन मला फटकारणाराच असायचा. तोवर आजपर्यंत सर्वांकडून मिळणाऱ्या कौतुक आणि प्रोत्साहनामुळेच मी यशाच्या पायऱ्या अतिशय सक्षमतेने भराभर चढत आलो होतो. मात्र यानंतरचं आपलं मार्गक्रमण मात्र अतिशय बिकट वाटेवरच्या खाचखळग्यातून वाट काढतच करावं लागणाराय आणि त्याची मानसिक तयारी करण्याशिवाय पर्यायही नाही हे मी गृहितच धरलं होतं. तरीही या नवीन आलेल्या डीजीएम् साहेबांची असमर्थनीय नाराजी आणि राग यांचे चटके इतर ब्रॅंचमॅनेजर्सच्या तुलनेत या दोन्ही ब्रॅंचेसमुळे मलाच अधिक बसायचे. ब्रॅंचमॅनेजर्सच्या पहिल्याच मिटींगमधे तर सेंट्रल आॅफिसकडून येणाऱ्या सततच्या तगाद्यांमुळे ते आम्हा सर्वांवर प्रचंड संतापले होते. त्या रागाच्या भरात माझ्यासकट अनेकांना..

“नाऊ यू फरगेट फ्यूचर प्रमोशन्स. आय वील टीच यू अ लेसन माईंड वेल. युवर अॅप्रेझल रिपोर्टस् आर इन माय हॅ़ंडस्.. ” ही त्यांनी केलेली दमदाटी कांहीही कारण नसताना सरसकट फर्मावलेली जबरदस्त शिक्षाच ठरणार होती आमच्यासाठी! नागपूर रिजनमधली ही अकोला ब्रॅंचही त्यांच्या पुणे झोनच्या अखत्यारीतच येत असल्याने माझी त्यांच्या तावडीतून सुटका नव्हतीच. कारण माझे अप्रेझल रिपोर्टही त्यांच्याच हातात असणार होते!

या सगळ्याच नकारात्मक पार्श्वभूमीवरचा नुकताच झालेला माझा तो एक्झिक्यूटिव्ह पोस्टचा इंटरव्ह्यू! निदान यावेळीतरी प्रमोशनच्या शक्यतेवर डीजीएम् साहेबांकडून गेलेल्या माझ्या अॅप्रेझल रिपोर्टमधल्या कमी स्कोअरिंगच्या शक्यतेचं सावट मला जाणवत होतंच. अशा परिस्थितीतही प्रमोशन मिळालंच तर कमी स्कोअरींगमुळे माझी आउट आॅफ स्टेट पोस्टींगची दाट शक्यता आणि नाही मिळालं तर अकोला ब्रॅंचला अजून किमान अडीच वर्षे असंच खिचपत पडणं! हे किंवा ते मला दोन्हीही नको होतं. त्यामुळे रोज ब्रॅंचमधे पाऊल ठेवताना आज पुढं काय वाढून ठेवलंय हीच भीतिने काळवंडलेली उत्सुकता मनात असायची. इंटरव्ह्यू देऊन आल्यापासून अशा मन:स्थितीत चारपाच दिवसच गेले असतील. कारण त्याच आठवड्यांत अचानक हातात पडला सेंट्रल आॅफीसमधल्या स्टाफ डिपार्टमेंटकडून माझ्या वैयक्तिक नावावर आलेला एक बंद लिफाफा!

त्या लिफाफ्यात माझं भविष्य बंदिस्त होतं! याआधी सविस्तर उल्लेख केलेल्या सर्व पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त नकारात्मकच सगळं गृहीत धरलेल्या माझ्या मनात या बंद पाकीटात काय असेल याबद्दलची भीती नव्हती तशीच उत्सुकताही नव्हती. ती वेळच अशी होती कीं जे घडेल ते कितीही गैरसोयीचं असलं तरी स्विकारण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता‌. समोरची अनिश्चितता संपवण्यासाठी तो लिफाफा उघडून बघणं एवढंच माझ्या हातात होतं! तोपर्यंत असा क्षण मी कधीच अनुभवला नव्हता. सगळं उध्वस्तही होऊ शकेल हे गृहित असूनही कसा कुणास ठाऊक पण मनात भीतिचा लवलेशही नव्हता. शिक्षाच होणार असेल तर ती मी न केलेल्या चुकीचीच जर असणाराय तर त्यातही मला सुखरुप सांभाळणारा ‘तो’ आहेच कीं! आणखी काय हवं? मी शांतपणे लिफाफा ओपन केला. आतलं पत्र झरझर वाचताना अनपेक्षित अशा सुखद धक्क्याने मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो होतो! त्या गोठून गेलेल्या मन:स्थितीत त्यातला शब्द न् शब्द हा एक चमत्कारच होता माझ्यासाठी! होय. मला प्रमोशन मिळालं होतं आणि आॅल इंडिया पातळीवर निवड झालेल्या एक हजार जणांच्या मेरीट-लिस्टमधे मी पहिल्या शंभरात होतो!! त्यामुळे अर्थातच होणारं पोस्टींग परराज्यात होणार नव्हतं. याही पेक्षा आश्चर्य हे कीं पुढे दोनच दिवसांनी माझी पोस्टींग-ऑर्डरही आलीच. त्यानुसार चीफ मॅनेजर म्हणून मला तात्काळ झोनल आॅफीस, पुण्याला जाॅईन व्हायचं होतं!

‘त्या’ने उदार अंत:करणाने मला असं भरभरून दिलं होतं आणि नेमक्या शब्दात सांगायचं तर ‘ देता घेशील किती दो कराने.. ‘ अशीच माझी अवस्था झाली होती! पण या अत्युत्तम सुखातही एक अनामिक अशी रुखरुख रेंगाळत होतीच. त्यामुळे इतकं सगळं अनपेक्षित घडलेलं असूनही, क्षणार्धात सुरू झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावातही मी मात्र आतून कोरडाच होतो! कां ते माझं मलाच समजत नव्हतं. गेल्या चारपाच महिन्यात एकदाही सांगलीला घरी जाऊ न शकलेला मी आता पुण्याला म्हणजे घरापासून हाकेच्या अंतरावरच तर जाणार होतो, अकोल्यातून माझी मला हवी तशी कायमची आणि तीही अशी सन्मानाने सुटका होणार होती, आणि तरीही मनाला आनंद नव्हताच झाला. कां ते मलाच समजत नव्हतं आणि म्हणून मी मात्र सगळं मनासारखं घडूनही असं कां होतंय या विचारात अस्वस्थ!

त्या अस्वस्थतेमागचं नेमकं कारण मला अचानक उमगलं ते त्या रात्री मी अंथरुणाला पाठ टेकून शांतपणे अलगद डोळे मिटले तेव्हा! मनातली रुखरुख मग अधिकच तीव्र झाली. एखादं अनामिक असं संकट पुढं दबा धरून बसल्याची ती चाहूल मला स्वस्थ झोपू देईना. मी ताडकन् उठलो. आत आलो. दिवा लावला. देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. समोरच्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित तसंच होतं. आता जे कांही सांगायचं ते इथंच आणि याच क्षणी! समोर पाटावर बसून मी हात जोडले. अलगद डोळे मिटले आणि…..? मनात रुतून बसलेली, मला नुकतीच जाणवलेली ती रुखरुख नि:शब्दपणे ‘त्या’च्या समोर व्यक्त होत राहिली. मन शांत झाल्यावर मी अलगद डोळे उघडले तेव्हा मनातली रुखरुख नाहीशी झाली होती! आता जे होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच या विचाराच्या स्पर्शाने मनातला अंधार विरुन गेला होता! मनावरचं ओझं त्याच क्षणी हलकं झालं. पण माझ्या आयुष्यातल्या नव्या पर्वाची तो क्षण हीच आश्वासक सुरुवात ठरणाराय याची मात्र मला कल्पना नव्हती..!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भक्तांनो, केव्हा होणार सावधान?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भक्तांनो, केव्हा होणार सावधान?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

एखादा बुवा सपशेल उघडा पडतो आणि चौकशीनंतर त्याच्या या आधीच्याही अनेक भानगडी उजेडात येऊ लागतात. अशा वेळी बेगडी संताबद्दलची समाजात असलेली अंधश्रध्दा गळून पडायला हवी अशी आपण अपेक्षा करतो. पण नेमके होते याच्या उलटच. अशा तथाकथित संतांच्या समर्थनार्थ आंदोलने होतात. त्याला वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर येतात. त्याने बळकावलेल्या जमिनी-अतिक्रमणे त्याचे भक्त कायदेशीर मार्गाने परत घेऊ देत नाहीत. लोक कायद्यांपेक्षा आणि संविधानापेक्षा एखाद्या व्यक्तीला मोठे समजू लागतात. अमूक एक संत म्हणजे धर्म असे लोक मानू लागतात. तो संत कितीही उघडा पडला तरी त्याच्यासारख्या दुसर्‍या बुवांच्या प्रसिध्दीला येतो… ओहटी लागत नाहीच. पण ज्याच्यावर आरोप होतात तोही संत म्हणून जनमानसाच्या मनातून उतरत नाही. त्याचे स्थान अढळ राहते. बाकीचे स्वयंघोषित तथाकथित संतही ह्या बुवाचे समर्थन करतात. कालची घटना आज लोक सहज विसरून जातात. हा काय प्रकार आहे? हा कोणत्या प्रकारचा विश्वास आहे? हे कोणते गारूड आहे? ही कोणती श्रध्दा आहे? ही कोणती मानसिकता आहे? कळायला मार्ग नाही.

तथाकथित संत, त्यांच्या लीला, त्यांचे सत्संग, दरबार, सोहळे पाहिले तर कुबेराचे वैभव कशाला म्हणतात ते लक्षात येते. तीच गोष्ट आजच्या सार्वजनिक उत्सवांची. सगळ्या सार्वजनिक उत्सवांचा आपण बट्याबोळ करून टाकलाय. इतक्या प्रंचड गर्दीतून दर्शनाला येणारे तथाकथित भक्त स्त्रियांना नको तिथे स्पर्श करत असलेले दिसतानाही कोणीही आक्षेप घेत नाही. हे जास्त धक्कादायक आहे. याच गणपती उत्सवाच्या काळात पूर्वी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम केले जात. अजूनही लोकांना विविध क्षेत्रातील प्रबोधनाची नितांत गरज आहे हे रोज लक्षात येऊनही असे कार्यक्रम आखले जात नाहीत.

गणपती उत्सव, गोकुळाष्टमीची दहीहंडी आणि नवरात्रीतल्या गरब्यांचे आज पूर्णपणे मार्केटींग झाले आहे. या उत्सवप्रियतेतील कर्मकांडांनाच आपण धर्म म्हणू लागलो आहोत… उधळपट्टीच्या उत्सवांना आपण श्रध्दा म्हणू लागलो आहोत… चंगळवादाला आपण संस्कृती म्हणू लागलोत… ‍अतिशय नियोजनबध्दपणे लोकांच्या धार्मिक श्रध्दांचे मार्केटींग करणार्‍यांच्या हातचे आपण दिवसेंदिवस बाहुले बनत चाललोत. हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही?

तुकारामादी संतांनी सांगितले आहे की, धर्म म्हणजे तत्व, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे समाजात वागण्याची आचारसंहीता. धर्म म्हणजे नीती-नियम. धर्म आणि श्रध्दा ह्या सार्वजनिक जीवनात अरेरावी पध्दतीने मिरवण्याच्या गोष्टी नाहीत. धर्माची सां‍केतिक कर्मकांडे पाळायची तर ती आपल्या घरात पाळायची असतात. धार्मिक स्थळांमध्ये पाळायची असतात. पण धर्म आता आक्रमकपणे रस्त्यावर येऊ लागला आहे. शाळा-कॉलेजात येऊन बसू लागला आहे. विधीमंडळात, संसदेत वावरू लागला आहे. कार्यालयांतही घुसू लागला आहे. एवढेच काय पण मोठमोठ्या इमारतींच्या संकुलातसुद्धा घुसला आहे. जसे ग्लोबलायझेशनमुळे साध्या दुकानांच्या जागी मॉल येऊ लागलेत तशी धार्मिक स्थळेही चकाचक होऊन मार्केटींग करू लागलीत. धर्मात मार्केट सुरू झाले की मार्केटात धर्म गेला हे समजायला मार्ग उरला नाही. या सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आधी फक्त समाजकारणात राजकारण होत असे. आता कोणत्याही क्षेत्रात राजकारण होऊ शकते. म्हणून सावधान.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “धर्म ज्याचा त्याचा…!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “धर्म ज्याचा त्याचा…!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

धर्म हा खर तर इतका मोठा विषय आहे त्याच्यावर किती जणांनी तरी मोठे मोठे विचार मांडून ठेवलेले आहेत आपण काय बोलणार फक्त सहज विचार आला, अनेक वाचलेले आठवले, म्हणून हा विचार….. आपल्या घरामध्ये अनेक खोल्या असतात… म्हणजे झोपायची खोली स्वयंपाकाची खोली धान्याची खोली आणि इतर अन्य खोल्या तशी एखादी हवेची खोली असं असत नाही कारण प्रत्येक खोलीत हवा असतेच तसा धर्म सुद्धा वेगळा करता येत नाही तो व्यवहारातही असतो, प्रत्येक व्यवहारात असतो.

मातृधर्म पितृ धर्म पुत्रधर्म पुत्रधर्म शेजारधर्म आचार्य किंवा अध्यापक धर्म ज्यामध्ये उत्तम आचरणाचेच मार्ग सांगितलेले असतात उदाहरणार्थ मुलाने आपल्या मात्यापित्या संबंधात कुटुंब संबंधात कसे वागले पाहिजे कशा जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत आई-वडिलांना कसे सांभाळले पाहिजे आणि हे सगळं त्याने आयुष्यात व्यवस्थित केलं की त्याचा पुत्र असण्याचा धर्म त्यांनी पाळला. शेजार धर्म… शेजाऱ्यांना गरजेप्रमाणे वेळोवेळी ते आपले नातलगच आहेत असे समजून किंवा ते कुटुंबातीलच आहेत असे समजून मदत करणे मदतीला धावून जाणे त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना आधार देणे अशा अनेक गोष्टी आपण करत असतो त्यामुळे आपल्या नातलगा पेक्षाही शेजारी महत्त्वाचा असतो कारण मदतीला येणार तो पहिला आहे. आशा माणसासाठी सुद्धा धर्मांन काही कर्तव्य सांगितले आहेत शेजारी दुःखद घटना घडली तर आपण आपल्या घरात जेवत बसत नाही आपणही त्या दुःखद घटनेत सामील असतो त्यानंतर त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यांना सर्व तोपरी मदत करतो मानसिक आधार देतो नातेवाईक चार दिवसानंतर निघून जातात पण खरा मदतगार असतो तो शेजारी…. त्यासाठी धर्म सांगितला आहे

व्यापारातही धर्म आहेत प्रत्येक उद्योगाचा एक धर्म आहे आता गवळ्याने आपल्याला म्हशीचे किंवा गायीचे उत्तम दूध द्यावे हा त्याचा धर्म आहे पण त्यांनी आपला धर्म सोडला त्यामुळे त्याचा धंदा झाला आणि व्यवसाय संपला लोकांच्या जीवाची परवा न करता एखादी गोष्ट विकणे हे व्यवसायात बसत नाही हे व्यवसाय धर्माच्या विरोधात आहे. तारखा निघून गेलेल्या वस्तूच्या तारखा बदलून म** विकणे हा अधर्म आहे ही संकल्पना जवळजवळ संपत आली….. मला आठवते माझे वडील सांगायचे ती गोष्ट… सोलापूरमध्ये एक मारवाडी गृहस्थ, टिळक चौकात त्यांचे दुकान होते ते ऋषिपंचमीचे सामान विकत पंचमीचे व्रत करणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी तेथूनच सामान घेऊन जात त्यामध्ये भगर काही भाज्या याचा समावेश असे त्याचे वैशिष्ट्य असे की त्या दिवशी बैलाच्या कष्टाचे काही खावयाचे नाही या गृहस्तांची सोलापूर पासून जवळच शेती होती आणि त्या शेतामध्ये ते खास या व्रत्तासाठी पीक काढत असत ते रेल्वेने सोलापूरला आणले जाई पण एके वर्षी नव्याने नेमलेल्या त्यांच्या मुनीमाने ते रेल्वे स्टेशन ते टिळक चौक येथे बैलगाडीत घालून आणले त्यांना त्या गोष्टीचे खूप वाईट वाटले कारण ते आता बैलाच्या कष्टाचे धान्य झाल्यामुळे विकू शकत नव्हते आणि त्यांनी यंदा ऋषीपंचमीचे सामान मिळणार नाही असा बोर्ड लावला याला म्हणतात व्यवसाय धर्म वास्तविक पाहता हे गृहस्थ तो म** विकू शकले असते बैलगाडीत घालून आणले हे लोकांना कुठे कळणार होते पण त्यांचा व्यवसाय धर्म त्यांना हे करू देत नव्हता आता ही निष्ठा कुठे राहिली आहे तेव्हा व्यवसायातही धर्म पाळणारे लोक होते

वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी एक डॉक्टर पाहिले त्यांची विवेकानंदांवर विलक्षण श्रद्धा होती त्यांच्या दवाखान्यात विवेकानंदांचा फोटो होता ते प्रत्येक पेशंटसाठी औषध देताना ते औषध ठेवत विवेकानंदांना नमस्कार करत प्रार्थना करत आणि लवकर बरे वाटावे अशी कामना व्यक्त करून त्या पेशंटला औषध देत या त्यांच्या निष्ठेमुळे पन्नास टक्के प्रभाव पेशंटवर पडत असे ही त्यांची वैद्यकीय क्षेत्रावरची भक्ती होती हा त्यांचा धर्म होता

अमेरिकेमध्ये एकदा एक 12/ 14 वर्षाचा मुलगा जो वसतिगृहात राहत होता त्याने खोकल्याच्या औषधाची बाटली घेतली आणि तो गेला दुकानदाराच्या लक्षात आले की शेक वेल म्हणजे औषध घेण्यापूर्वी ते हलवून घ्या याचे लेबल त्याच्यावरती लावले गेले नव्हते त्यांनी ताबडतोब त्या मुलाच्या वसतीगृहाचा शोध घेतला पण त्या काळात मोबाईल नव्हते त्या वसतिगृहात जाऊन तातडीने त्या मुलाला भेटून औषध घेण्याची माहिती दिली हा झाला त्याचा विक्रेता धर्म अशी धर्मपरायण माणसे आजही पाहायला मिळतात धर्म म्हणजे रंग नव्हे, रंगाचा बेरंग करणे हे नव्हे, कुठल्यातरी रंगाचा उल्लेख दहशतवाद असा करणे तेही चुकीचे आहे. धर्म म्हणजे नीतीने वागणे आणि इतके आपल्याला समजले तरी धर्म समजला म्हणावयास हरकत नाही.

// शुभम भवतु //

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डोकेदुखी आणि गोळी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “डोकेदुखी आणि गोळी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

मी थोडासा बेचैन होतो. कारण माझं डोकं दुखत होतं. आता माझ्या चेहर्‍यावरुन कदाचित काहीतरी दुखतयं हे जाणवत असेल. पण सांगता येत नव्हत. याला महत्वाची दोन कारणं होती.

पहिलं कारण, मंडळीपण सकाळचं पटापट आवरुन वेळेवर ऑफिस गाठण्याच्या तयारीत समोर येइल आणि दिसेल ते काम हातावेगळं करण्याच्या धावपळीत होती. रोजची रस्त्यावरची शिस्तबद्ध बेशिस्त रहदारी, आणि चुकवू म्हटले तरी मधे येणारे खड्डे या डोकेदुखीत माझ्या डोकेदुखीची डोकेदुखी तिच्या डोक्याला नको… असाच विचार होता. माझ्या डोकेदुखीची डोकेदुखी तिला नको… असा विचार मनात आल्यावर प्रसार आणि विस्तार या शब्दांची उगाचच आठवण झाली. तसच ज्योत से ज्योत जलाते चलो… हे इथे समर्पक नसलेले गाणंसुध्दा आठवलं.

दुसरं कारण… त्यांच म्हणणं असतं… घाईगर्दीत कमीतकमी मनाला पटेल अशी कारणं सांगत जा… उगाचच वेळ जातो.

हे म्हणजे माझ्या दुखण्यापेक्षा त्यांचा माझ्या डोक्याबद्दल असलेला नितांत आदर आणि विश्वास होता. आणि या आदर आणि विश्वासाला तडा जाणं कठिण होत.

माझं डोकं या बद्दल त्यांना असलेला आदर हा कायम महागाईच्या वाढत्या निर्देशांकासारखा वाढताच होता. त्यात घसरण कधी दिसलीच नाही. आणि दिसली तरी इतकी अल्पकाळ होती की जाणवली नाही. आता जाणवायला परत डोक्याचा संबंध आलाच…

पण कसं कोणास ठाऊक, माझी डोकेदुखी तीने हेरली असावी. जाताजाता तीने पटकन एक औषधाची गोळी टेबलवर ठेवली. आणि तोंडाने फक्त… हं… येवढाच पण विश्वास असणारा आवाज ऐकू आला. हं… या विश्वासदर्शक आवाजाची आता इतकी सवय झाली आहे की वेळ… काळ… आणि स्थळ… कुठलही असलं तरी हं… हा आवाज आल्यानंतर आता आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा अंदाज घेण्याआधीच कधी कधी कृतीला सुरुवात होते. इतका विश्वास त्यांच्या नुसतं हं… म्हणण्यात आहे.

टेबलवरची गोळी हातात घेत मी सहज विचारलं. कोणती गोळी आहे. आणि होती घरात. मला लक्षातच नाही…

त्यावर परत ऊत्तर. मागच्याच आठवड्यात तुमचे गुडघे दुखत होते तेव्हा डाॅक्टरांनी लिहून दिलेलीच आहे. आणि या गोळीने गुडघा दुखायचा थांबत असेल तर डोकं का थांबणार नाही. नाहीतरी कधीतरीच ते जागेवर असतं. बाकी त्याचा मुक्काम तिथेच जाणवतो. आणि थोड्यावेळाने गुडघे दुखायची तक्रार होइलच. कारण आज सकाळपासून बराच वेळ गॅलरीत ऊभे राहून येरझारा जास्तच झाल्या आहेत. दोनदा तर चार मजले उतरुन चढून झाले आहेत. कशासाठी? … ते सावकाश सांगते संध्याकाळी. पण एकाच गोळीत दोन्ही कामं होतात का बघू…

मी निघते. ऊशीर होतोय. गोळी घेतलीत तर दोन्ही दुखणी थांबली नाहीत तरी एक थांबायला हंव. या विश्वासाने ओतप्रोत भरलेल्या वाक्याने समारोप झाला असला तरी, संध्याकाळच्या चर्चेची नांदी त्यात जाणवली.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मोदक…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ मोदक… ☆ सौ शालिनी जोशी ☆

भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते प्रसन्न गणेश मूर्ती. आणि गणेश म्हटलं की मोदक हवाच. जिथे गणेश तिथे मोदक. मोदक करायला तसा अवघड. गृहिणीच्या कलागुणांना मुक्त वाव येथे आहे.

स्वच्छ धुतलेल्या बासमती तांदुळाची शुभ्र पिठी आणि गुळ व खोबरे यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण शिजवून केलेले सारण ही याची पूर्वतयारी. त्या सारणात सुकामेवा, वेलदोडे, जायफळ, खसखस घातल्यास त्या खमंग सारणाला अपूर्व सुगंधही येतो. गणपतीच्या आधीच चार दिवसापासून ही तयारी सुरू असते. कारण स्वागताच्या पहिल्या दिवशीच्या नेवैद्याला २१ मोदकांचे ताट गणेशा पुढे ठेवायला गृहिणी उत्सुक असते. या मोदकाचे वैशिष्ट्य म्हणजे उकड. पीठ व पाणी यांच्या योग्य प्रमाणाला चांगली वाफ आली की उकड तयार. हाताने मळलेल्या उकडीचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पापडी करायची. त्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि सुंदर कळ्या पाडून मोदकाचे तोंड बंद करायचे. कळ्या जेवढ्यां नाजूक आणि त्यांची संख्या जास्त, तेवढे करणाऱ्याचे कौशल्य जास्त. असा हा मोदक वाफेवर उकडला जातो. त्यामुळे त्याची चव वाढते. तुपाबरोबर तर छानच. असा हा मोदक गणपतीला आवडतो आणि त्याच्यामुळे सर्वांनाच मोदकाचा भोग घेता येतो. मोठ्या मोदकावर लहान मोदकही करतात. हे कौशल्याचे काम.

पुराण कथा मधूनही मोदकाचा उल्लेख आढळतो. त्यातील एक कथा. अत्री ऋषींची पत्नी अनुसया. तिने आदराने भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणेश यांना भोजनाला निमंत्रित केले. विविध पक्वान्न युक्त भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पाची भूक भागली नाही. मग तिने झटपट करून एक नवीन पदार्थ तयार केला. आणि अहो आश्चर्य! त्याच्या सेवनाने बाप्पाचे पोट भरलं. त्याने २१ वेळा ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली. देवी पार्वतीने कुतूहुलाने पदार्थाची कृती व नाव विचारले. तोच हा मोदक. तेव्हापासून २१ मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवल्या जातो.

आता उकडीच्या आणि तळणीच्या मोदकाखेरीज सुकामेवा, चॉकलेट, खवा यांचे विविध रंगाचे मोदकही केले जातात. ओरिसा, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ मध्येही मोदक करतात. नावे वेगळी करण्याची पद्धत थोडी वेगळी.

परमार्थात मात्र या मोदकाला वेगळा अर्थ आहे मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे लहानसा भाग. म्हणून आनंद प्राप्त करून देणारा मोदक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत गणेशाच्या सहा हाताना सहा दर्शने म्हणतात आणि त्यातील वेदांत दर्शन रूप हातात मोदक दाखवतात. वेदांत दर्शन हे परमानंदाची, ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारे, त्याची थोडीशी झलक किंवा थोडीशी अनुभूती देणारा हा मोदक. मोदक खाल्ल्यावर कुणाला आनंद होत नाही? मोदकाने मिळणाऱ्या आनंदाच्या कितीतरी पट आणि अखंड आनंद म्हणजे ब्रह्मानंद. मोदकाची चव थोडा वेळ जिभेवर राहते थोडा काळ आनंदाची अनुभूती देते पण ब्रह्मानंद अखंड आनंद देतो, प्रसन्नता देतो. म्हणून अशा आनंदाचे प्रतीक असा हा मोदक.

मोदक हे ज्ञानाचे प्रतीक. ज्ञान प्रथम थोडे वाटते. पण अभ्यास करू लागल्यावर त्याचा विस्तार लक्षात येतो. तसाच मोदक टोकाकडून खाली खाली मोठा मोठा होत जाणारा. गोडी व आनंद वाढविणारा. एकंदरीत गणेश व त्याचा मोदक म्हणजे ज्ञानाचा व आनंदाचा कंद.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यमेव जयते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ सत्यमेव जयते…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

पुरणकाळापासून ज्या एका गोष्टीला अत्यंत महत्व दिले आहे ते म्हणजे सत्य. खरे बोलणे, खरे वागणे सत्याची कास न सोडणे या गोष्टी फार महत्वाच्या मानल्या जातात.

त्यामुळेच नेहमी खरे बोलणारा राजा जेव्हा नरोवा कुंजरोवा असे अर्धसत्य बोलतो तेव्हा मरणोत्तर त्याला त्याची शिक्षा भोगायलाच लागली होती.

भगवान श्रीकृष्णाने धर्म युद्धात सत्याची साथ दिली होती.

हे जरी खरे असले तरी सत्याची व्याख्या कोणाला करता आली नाही.

संत ज्ञानेश्वर यांनी देखील सत्याचे अनन्यसाधारण महत्व जाणून ज्ञानेश्वरांच्या मते, सत्य म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा शोध घेणे आणि त्याद्वारे ईश्वराशी एकरूप होणे. हे एक आंतरिक आणि अनुभवात्मक ज्ञान आहे, जे भक्ती आणि योगाच्या माध्यमातून प्राप्त होते असे सांगितले आहे. ते असेही म्हणतात “जे खऱ्या अर्थाने सत्य जाणतात, ते नेहमी आनंदी आणि समाधानी असतात. “

सत्याची एक व्याख्या अशी सुद्धा केली जाते की सत्य हे ईश्वर आहे, ईश्वर सुंदर आहे, म्हणून जे जे सुंदर आहे, ज्यात ईश्वराचे वास्तव्य आहे ते सत्य आहे. यातूनच सत्यम शिवम सुंदरम संकल्पना येऊन पुढे हेच शब्द घेऊन त्याचे एक गाजलेले गीत बनले.

परंतु सगळ्यात आधी मुंडक उपनिषेदात सत्याचा नेहमी विजय होतो हे सांगणारा सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः/ येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्//. असा श्लोक आहे. संपूर्ण मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.. सत्याचाच नेहमी विजय होतो, असत्याचा नाही.. सत्य द्वारेच देवांना यात्रा पथचा जो मार्ग आहे तो विस्तीर्ण झाला, ज्या मार्गाचा आपण सर्वांनी उपयोग केला तर आपण आपले अंतिम ध्येय गाठू शकतो तसेच ऋषी गण यांनी या मंत्राचा उपयोग करूनच सत्याच्या आधारे लक्ष परमधाम प्राप्ती केली आहे. उपनिषदचे हे वाक्यांतील अंश ‘सत्यमेव जयते’ हे आदर्श वाक्य म्हणून याचा राष्ट्रीय प्रतीकात समावेश केला गेला आहे.

आपल्या राष्ट्रीय चिन्हावर हे वाक्य आपल्याला पहायला मिळते. सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य मानले जाते त्याचा अर्थ आहे, सत्याचा नेहमी विजय असे म्हटले जाते की सत्यमेव जयते हे वाक्य राष्ट्रपटलावर मान्यता मिळवण्यासाठी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारल्या गेल्यानंतर राष्ट्रीय प्रतीकांचा स्वीकार केला गेला. खरे तर अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते हे वाक्य लिहिलेले असते.

आहे. 26 जानेवरी 1950 रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेल्यानंतर या राष्ट्रीय प्रतीकांना स्वीकार केला गेला. त्यामध्ये हे वाक्य सुंदर वाक्य म्हणून त्याचा राष्ट्रीय चिन्हात समावेश केला गेला.

गांधीजींनी सुद्धा सत्याचा आग्रह धरला. किंबहुना सत्यासाठी उचललेल्या प्रत्येक पावलाला सत्याग्रह म्हटले गेले. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र्यालासुद्धा माझे सत्याचे प्रयोग हे आहे.

तसेच सत्य हे न मरणारे शाश्वतवाटल्याने ज्योतिबा फुले यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.

जगातील त्रिकाला बाधित सत्य जन्मलेला तो मरणार आहे हे मानलेले असले तरी त्याहूनही मोठे असे सत्यमेव जयते हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते.

तसेच सत्याचा मोठा फायदा म्हणजे आपण काय बोललो होतो ते कधी लक्षात ठेवावेलागत नाही.

सत्यमेवची फोड सत्यम एव अशी आहे. एव म्हणजे ‘च ‘ त्वमेव माता पिता त्वमेव तूच माता तूच पिता, एकमेव एकच तद्वतच सत्यमेव म्हणजे सत्यच. सत्यमेव जयते सत्यच विजयी होते.

हे खरे आहे की सत्याच्याच मार्गावर असंख्य अडचणी असतात म्हणून लोक खोट्याचा सहज उपलब्ध असलेला पर्याय निवडतात. पण त्याची किती मोठी शिक्षा नंतर भोगावी लागते हे सत्य समोर आल्यावर कळते. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. म्हणूनच प्रत्येकानेच सत्याची कास धरली तर……

करा विचार आणि म्हणा सत्यमेव जयते

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ६ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग ६ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

श्रावणी रविवार

श्रावण महिना संस्कार, माहिती, धार्मिकता, आयुर्वेद या सर्वच दृष्टीने अत्यंत महत्वाचा वाटतो. बाहेर पाऊस असतो. दिवसा पण अंधारून आलेले असते. उन्हाचे प्रमाण तसे कमीच असते. आणि आपल्याला प्रत्येक दिवसाचे महत्त्व माहिती व्हावे या दृष्टीने या महिन्यातील व्रते, पूजा महत्वाच्या असतात. आपल्या पूर्वजांनी याचा विचार केलेला होता. आणि अशी व्रते आपल्या कडून करून घेतली होती.

सूर्य व त्याची उपासना याचे महत्व सांगणारे हे व्रत आहे. या दिवसात सूर्य दर्शन कमी होते. अशा वेळी सूर्य दर्शन व्हावे, सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेता यावी या दृष्टीने हे व्रत महत्वाचे असते. स्नान केल्यावर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्त चंदनाने काढून त्याची पूजा करावी. गायत्री मंत्राचा जप करावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. हे सगळे करणे शक्य नसेल तर सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसून मानस पूजा करावी व गायत्री मंत्राचा जप करावा.

श्रावणी रविवारला  वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे.  सूर्याला ऊर्जा आणि जीवनाचा स्रोत मानले जाते. त्यामुळे या व्रतामुळे आरोग्यासाठी चांगले फायदे मिळतात, असे मानले जाते.

श्रावणी रविवारचे वैज्ञानिक महत्व:

ऊर्जा आणि आरोग्य:

श्रावणी रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते, असे मानले जाते.

नैसर्गिक क्रिया:

श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने, वातावरणात ओलावा असतो. रविवारी सूर्याची उपासना केल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते.

नैसर्गिक समतोल:

श्रावण महिना निसर्गाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. या महिन्यात उपवास आणि व्रतांमुळे शरीराचे नैसर्गिक चक्र व्यवस्थित राहते, असे मानले जाते.

मानसिक शांती:

श्रावणी रविवारी आदित्य राणूबाई व्रत केल्याने मानसिक शांती आणि स्थिरता मिळते, असे मानले जाते.

श्रावणी रविवारी व्रताचे महत्व:

सूर्य उपासना:

श्रावणी रविवारी सूर्याची पूजा करून व्रताचे पालन केले जाते. यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

आदित्य राणूबाई व्रत:

हे व्रत विशेषतः स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी करतात.

व्रताचे फायदे:

या व्रतामुळे घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते, असे मानले जाते.

श्रावणी रविवार हा एक महत्वाचा दिवस आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्ट्या दोन्ही दृष्टीने महत्व आहे.

असे आहे श्रावणी रविवारच्या व्रताचे महत्त्व!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लक्ष्मण रेषा आपली आपली…” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “लक्ष्मण रेषा आपली आपली…” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

लक्ष्मण रेषा म्हणजे काही नियम, मर्यादा यांचे पालन करणे म्हणजे ठराविक मर्यादा ओलांडू नये.

साधारणपणे चाळीस वर्षांपूर्वी शाळेत पाचवी ते सातवी पर्यंत मुलींना फ्रॉक किंवा स्कर्ट घालण्याची मुभा असायची पण त्यानंतर साडी नेसणे सक्तीचे होते. माता, गुरु आपल्यावर संस्कार करत म्हणजेच आपले जीवन सुखमय, निर्वीघ्न व्हावे यासाठी ती लक्ष्मण रेषाच होती. त्याकाळी नियम काटेकोरपणे पाळले जात.

आता मात्र या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. हल्ली हवे तसे पोशाख केले जातात. पूर्वी गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घातली तर दारिद्र्याचे लक्षण समजले जायचे पण हल्ली फॅशनच्या नावाखाली सर्रास गुडघ्यावर फाटलेल्या पॅन्ट घालून मुले मुली वावरताना दिसतात.

पूर्वी संध्याकाळी मुलांनी सातच्या आत घरी यावे असा नियम होता. घरी आल्यावर तिन्ही सांजेला शुभम करोति, मारुती स्तोत्र, रामरक्षा यांचे पठण पुढे करत त्यानंतर पाढे असा क्रम होता. हल्ली मुले केव्हाही घरी येतात, पाढे येतच नाहीत मग राम रक्षा वगैरे दूरच! आले की मुले जेवणाचे ताट घेऊन टीव्ही समोर बसतात किंवा मोबाईल मध्ये डोके खूपसून असतात. त्यामुळे संवाद कमी झाले आहेत, नातेसंबंध दुरावले आहेत.

बोलताना सुद्धा मर्यादा पाळायला हवी. “शब्द कधी वज्राहून कठोर तर कधी फुलाहून कोमल असतात” याचे भान ठेवले पाहिजे. कटू शब्द मनावर ओरखडे उठवतात. हल्ली प्रत्येकाचा इगो आड येतो. , त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे म्हणून स्त्री असो वा पुरुष असो बोलताना शब्द जपूनच वापरले पाहिजेत. खरचं जगताना प्रत्येकाने आपापली लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे.

द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाचा अपमान केला. नसता, दुर्योधनाला “अंधे का पुत्र अंधा “असे वर्मावर घाव घालणारे वाक्य बोलली नसती तर द्रौपदी वस्त्रहरण झाले नसते, युद्धही टाळले असते. तसेच सीतेने लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा ओलांडली नसती तर रामायण घडले नसते. म्हणून

“लक्ष्मण रेषा बंधनांची

आपणच आखावी

स्वैर मनाला लगामाची

संवय घालून घ्यावी”.

सौ. अर्चना देशपांडे, पुणे

लेखक – अज्ञात.

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मी, चारधाम, आणि घोडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मी, चारधाम, आणि घोडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

त्यांनी निर्णय घेतला. चारधामला जायचं आणि सोबत मलाही न्यायचं.

याच यात्रेत बर्याच वर्षांनी माझा आणि घोड्याचा परत एकदा संबंध आला तो केदारनाथला जातांना.

पहिल्यांदा बहूतेक जणांचा घोड्याशी संबंध येतो तसाच माझाही आला होता. हो बरोबर……. लग्नात. त्यावेळी घोड्यावर बसल्यानंतर येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायचे आहे हे माहीत होत. त्याची शारिरीक व मानसिक तयारी होती. आणि एक आनंदाची सळसळ मनात होती. पण यावेळी घोड्यावर बसल्यानंतर कोणत्या प्रसंगाला तोंड द्याव लागेल हे खरंच सांगतायेत नव्हत. आणि आता परत घोड्यावर बसून काय तोंड देणार……. कारण पहिल्या प्रसंगानंतर तोंड देण्याची वेळ वारंवार आली तसंच तोंडावर पडण्याची वेळही खूपदा अनुभवली होती.

पहिल्यांदा मी कोणाचातरी नाथ होणार म्हणून घोड्यावर (स्वत:हून) बसलो होतो. आता केदारनाथला जातांना मात्र मला अक्षरशः उचलून, जवळपास टांगाटोळी करतच कसबस घोड्यावर चढवल होतं. सगळ्या प्रवासात चढवणे आणि उतरवणे हा कार्यक्रम एकूण सहावेळा झाला. कदाचित या कार्यक्रमाला तो घोडाही कंटाळला असावा.

प्रवास संपल्यावर मी एकदाचा उतरल्यावर घोड्यावरच पाठीवरचंच काय मनावरचही ओझं उतरलं असेल. माझ्या ऐवजी घोड्यानेच सुस्कारा टाकला असेल. पण आम्ही दोघंही सुटलो होतो.

केदारनाथला जाणारी शेकडो माणसं होती. आणि बरेचजण घोड्यावर जातात. त्यामुळे तिथे जाणारे, घोडे, आणि घोड्यावर बसवून नेणारे यांची यात्रा नव्हे तर बाजार भरल्यासारखं वाटत होतं. घोडेवाले घोड्यांची आणि जाणारा त्यावर बसायची किंमत आपल्यापरीने ठरवत होता. राजकारणात घोडेबाजार हा शब्द ऐकला आहे. त्याची थोडी कल्पना आली.

तो घोडा आहे का खेचर हेच या घोड्याला म्हणजे मला समजलच नाही. पण सगळे घोडा म्हणत होते म्हणून मी पण त्याला घोडाच म्हणत होतो.

वाढत्या वयानुसार कोणी तसं वागलं नाही तर आपण सहजपणे म्हणतो. नुसता वाढला आहेस घोड्यासारखा…….. पण घोडा माणसाला काय म्हणत असेल? ……. असा प्रश्न पडला. पण घोडाच तो. काय म्हणेल? ….. घोडाच म्हणेल… अशी मी माझीच समजूत काढली.

सगळेच मला म्हणत होते, घोड्यावर नीट बैस… हे इतक्यावेळा सांगून झालं, की नंतर माझ्याबद्दल घोड्यालाही शंका आली असावी. आणि तो सुध्दा मनातल्यामनात मला म्हणाला असेल. घोड्या….. वर नीट बैस……..

पहिल्यांदा घोड्यावर बसलो होतो त्यावेळी घोड्याकडे आणि त्याच्या काही सवयींकडे नीट लक्ष दिलं नव्हत. गरज वाटली नव्हती. आता घोड्यावर चार पाच तास बसायचं असल्याने त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत होत्या.

पहिलं असं लक्षात आलं की इथे घोड्यांची काही कमी नाही…… आणि शक्यतो ते सतत आपल्या जोडीदाराबरोबरच राहण्याचा प्रयत्न करतात. काही कारणाने त्यांच्यात अंतर पडलच तर हर प्रकारे प्रसंगी थोड धावत पळत, वाट मिळेल तिथून, गरज पडल्यास मधे येइल त्याला हलकासा धक्का देत, इतरांच्या जोडीकडे दुर्लक्ष करत, आपल्या आणि आपल्याच जोडीदारासोबत राहतात. गर्दीतही आपला जोडीदार सोडत नाहीत.

आणि आपण……. गर्दीतही आपला जोडीदार सोडत नसलो, किंवा तो बरोबर असला तरी दुसर्यांचे जोडीदार कसे आहेत हे बघायचा मोह सोडत नाही.

या प्रवासात मला घोड्यावर शारिरीक धक्के खूप बसले. पण त्यांच हे बरोबरीने राहणं हा मला घोड्यान धक्का न देताही बसलेला धक्का होता.

पहिल्यांदा घोड्यावर बसलो तेव्हा….. आणि आता…… केव्हा एकदा खाली उतरतो असंच झालं होतं. फक्त दोन्हीवेेळा परिस्थिती आणि कारणं वेगळी होती.

इथे सगळेे पायी, घोड्यावर, डोलीने, पीट्टू करुन जातात. पीट्टू म्हणजे एक वेताची खूर्ची असते. त्यात बसवून ती खूर्ची पाठीवर ठेउन घेऊन जातात. पण कसाही केला तरी प्रवास सोप्पा नाही. कारण रस्ताच धड नाही. त्यातही चढाव आणि उतार. वातावरणाचा तसा भरवसा नाही.

पाउस असेल तर रस्ता ओला, निसरडा असतो. काही ठिकाणी थोडेफार वाहणारे किंंवा अंगावर उडणारे पाणी असते. डोंगरावरून घसरून आलेले थोडे दगड माती असते. घोड्यांनी केलेले नैसर्गिक विधी. (हे विधी साफ करायला ठिकठिकाणी माणसं असतात. पण जाणारे येणारेही काही कमी नसतात.) एकाच रस्त्यावर सगळेच, जाणारे आणि परत येणारे, घोडे, डोली, पीट्टू, रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थवाले. त्यात एका बाजूला डोंगर, पर दुसर्‍या बाजूस खोल दरी.

त्यातही मोबाईलवर फोटो काढणारे, शूटिंग करणारे, आणि व्हिडिओ काॅल करणारे. यांचा उत्साह पराकोटीचा होता. पण घोड्यावर बसून प्रवास करणार्‍या काही लोकांचे चेहरे खरच फोटो काढण्यासारखे होते. कदाचित माझाही चेहरा तसाच असेल. पण तो न काढल्याने घोड्याच्या एका बक्षीसपात्र फोटोस सगळेच मुकले.

डोली म्हणजे पाय थोडे लांब करुन बसतायेइल अशा खुर्चीला बाजूला दोन दांडू आणि त्या दांडूंना पुढे आणि मागे एक आडवा दांडू असतो. आणि पुढे दोन आणि मागे दोन असे चारजण मिळून उचलून घेऊन जातात. वर सांगितलेल्या गर्दीच्या आणि व्यवस्थित नसलेल्या रस्त्यावरून ते चौघं डोलीत बसलेल्या माणसाचं वजन सांभाळत घेऊन जातात. चढ आणि उतार काहिही असलं तरी वजन सांभाळत आपसात समन्वय साधत प्रवास पूर्ण करणं कठीण आहे. वजन घेउन चढतांना धाप लागते, आणि उतारावर तोल, वेग, आणि रस्त्यावर असणारी गर्दी सांभाळावी लागते.

त्यामुळे दोन्ही बाजूचा प्रवास सुखरुप झाला, तर देव भेटला. नाहीतर आपणच देवाला भेटण्याची तयारी करावी.

सगळा एकूण प्रवास (गौरी कुंडला पोहोचण्या पासून केदारनाथ पर्यंत) जवळपास वीस किलोमीटर.

मी केदारनाथला गेलो तेव्हा थोडा पाउस आणि वातावरणात गारवा होता. मी तर स्वेटर चढवून त्यावर रेनकोट घातला होता. शिवाय हाताशी आधाराला काठी होतीच. पायी जाणारे जवळपास सगळेच काठी घेतातच.

आम्ही पैसे देऊन दर्शन घेणार होतो. पण त्याची वेळसुद्धा पहाटे साडेतीन वाजता होती. आम्ही रात्री दोन वाजताच तयार झालो असलोतरी पैसे न देता दर्शन घेणाऱ्यांची चाहूल रात्रभर होती. अंधारात सुध्दा ते जात असले तरी त्यांच्यासाठी मंदिराची दारं मात्र पहाटे पाचलाच उघडणार होती.

चारधाम ला जायचं तर चारदाम खर्च होणार हे गृहीत होत. याच कारण दुकानदारांना चहा, साखर, मीठ ते पाण्याची बाटली आणि सिलेंडर अशा सगळ्याच गोष्टी खालूनच वर आणि माणूस किंवा घोडा यांच्याच मदतीने पैसे मोजून वर न्याव्या लागतात. चहा जरी तीस रुपयांना मिळत असला तरी पाण्याची बाटली मात्र ऐंशी नव्वद रुपयांना मीळते.

तसच परिस्थिती नुसार घोडे, डोली, पीट्टू यांचे भावही (दर) बदलत असतात. आम्ही केदारनाथ उतरायला सुरुवात करणार तेव्हातर पाऊस होता. वातावरणात झालेल्या बदलामूळे फक्त वरुन खाली जाऊ देत होते. खालून वर सोडत नव्हते. त्यामुळे उतरायला घोडे जवळपास मिळतच नव्हते. आणि डोली व पीट्टू यांचेही दर वाढले होते. काही जणांनी पायी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कारण वातावरण परत केव्हा निवळेल याची वाट बघण्यात वेळ जाणार होता. आणि परत एकाचवेळेस गर्दी वाढणार होती. आता निदान खालून वर येणार्यांची गर्दी नव्हती.

पण निसर्ग सौंदर्य अफाट आहे. ऊन, पाऊस, धबधबे, गारवा, हिरव्यागार डोंगरावर दिसणारा थोडा बर्फ, ढगाच्या वरुन जाणारा रस्ता. सगळच खास आहे. आमच्याबरोबर असणार्या तरुण मंडळींनी ते सौंदर्य पायी जातांना आणि येतांना अनुभवल. पण सहज आणि सोप्प आहे असं नाही.

चारधाम यात्रेत यमुनोत्री हि सराव परीक्षा आहे, तर केदारनाथ वार्षिक परीक्षा. कारण यमुनोत्री चं अंतर फक्त तीन चार किलोमीटर आहे. पण गंगोत्री आणि बद्रिनाथ सहज सोप्प आहे. तिथे सहज पायी जातायेत. चढाव उतार आणि अवघड रस्ता नाही.

अजूनही बरच काही सांगण्यासारखं आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आशा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? विविधा ?

☆ आशा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

संत गाडगेबाबा म्हणतात ज्याच्या मनात आशा नाही तो जगाचा राजा आशा नसलेली व्यक्ती सापडणे दुर्मिळच. मला तर वाटते माणसाला कळायला लागते तेव्हापासून त्याच्या मनाला आशा चिकटते. आशा करणे वाईट नाही. आशेच्या आहारी जाणे तसेच आशा सोडणे हे दोन्ही वाईट. मनात जर आशेची पालवी असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड  असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते आशावाद नेहमी जगायला बळ देतो असतो. आशावाद म्हणजे सकारात्मक ऊर्जा. मनातील विचार नेहमी सकारात्मक ठेवले तर आपले प्रयत्न ही योग्य दिशेने चालू राहतात आणि एक दिवस यशाचे शिखर निश्चित गाठता येते.

कोशिश करने वालों की हार नही होती प्रयत्न करण्यासाठी मात्र मनात प्रबळ इच्छा पाहिजे. म्हणजेच आशा पाहिजे.

आशा संपणे म्हणजे उमेद हरणे आशा संपणे म्हणजे नैराश्य येणे आशा संपणे म्हणजे आत्मविश्वास गमावणे जिथे आत्मविश्वास असतो तिथे अशा कधीच संपत नाही. आशा आहे म्हणून आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आहे म्हणून आशा आहे.हे चक्र नेहमी माणसाच्या मनात चालू राहिले म्हणजे आत्मविकास होऊन कार्यसिद्धी होते. आत्मविश्वासाला उमेदीची पंख असतील तर ध्येयपूर्ती निश्चित होते आशेचा एक किरण बुडणाऱ्याला आधार देतो. आशा, निराशा जीवनाच्या दोन बाजू आहेत. अपेक्षित गोष्ट झाली नाही की निराशा येथे आणि निराशा आली की आत्मविश्वास कमजोर पडतो. काही वेळेस टोकाचे निराशा येऊन जीवन उध्वस्त होण्याची भीती असते. म्हणून मनामध्ये नेहमी आशा तेवत ठेवली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

उषःकाल होता होता काळरात्र झाली

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares