मराठी साहित्य – विविधा ☆ प्रवाह आणि लाटा! ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी  ☆

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

अल्पपरिचय 

प्रतिमा रवींद्र कुलकर्णी .

शिक्षण – B Com,  B J, M Phil ( मराठी साहित्य )

  • १९९८ पासून आकाशवाणीवरून  विविध कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण
  • गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने दिवाळी अंकासाठी कथा, कविता व नियतकालिकांमधून सदरलेखन  प्रसिद्ध

प्रकाशित साहित्य : (४ पुस्तके)

  • स्वप्नझुला (कवितासंग्रह)
  • कविता उलगडताना (आस्वादक समिक्षा संग्रह)
  • सोनबावरी (ललितलेख संग्रह) व
  • रुजवाई (कथासंग्रह )

? विविधा ?

☆ प्रवाह आणि लाटा! ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी ☆

☆

‘काय करु, ताई ? कालपासून गिऱ्हाईकच नाही. ’ फळवाला नाराजीने म्हणाला.  गिऱ्हाईक या शब्दाचे मूळ काय बरं असेल ? मी विचारात पडले आणि मला संस्कृतमधला ग्राहक हा शब्द आठवला आणि मग याच्यासारखेच कितीतरी शब्द आठवले.  संस्कृतमधल्या मिष्ट म्हणजे गोड चे मराठीत गोडमिट्ट झाले.  मुष्टीचे मुठीत रूपांतर झाले.  पत्रल चे पातळ झाले आणि ‘शाटी’चे साडी झाले.  संस्कृतमधून मराठीत येताना शब्दांचे रूपरंग बदलते.  अभिजनांच्या भाषेतून आलेल्या मूळ शब्दाला लोकभाषेचा मुलामा चढतो.  पण अशा बदललेल्या शब्दांना बोलीभाषेत अपभ्रष्ट शब्द म्हटले जाते.  भ्रष्ट होणे म्हणजे खाली पडणे किंवा घसरणे.  भ्रंश म्हणजे विकृत होणे किंवा बिघडणे.  त्यामुळे मूळ संस्कृत शब्दाच्या बिघडलेल्या रुपाच्या शब्दाला अपभ्रंशाने आलेला शब्द असे म्हटले जाते.  असे कितीतरी शब्द आता आपल्या भाषेत रुळून गेलेले आहेत कि त्याचे मूळ रुप आठवावे लागते.  आपल्या बोलीभाषेतल्या या शब्दांत आपल्या मातीचा गंध जाणवतो.  उदा.  ग्रामीण भागात उशीर या अर्थी वाढूळ (किंवा वाढवेळ) हा शब्द सहजतेने वापरला जातो.  त्याचे मूळ संस्कृतातल्या ‘वृध्दवेला ‘ (म्हणजे वाढलेला (वाढीव ) वेळ ) या शब्दात आहे.  काळाच्या प्रवाहात शब्दांची ही बदलत गेलेली रूपे !

अपभ्रंश ही संज्ञा केवळ शब्दांसंदर्भात वापरली जाते असे नाही, तर ते विशिष्ट काळातल्या भाषेचे नाव होते.  संस्कृत भाषेतून प्राकृत आणि त्यातून आधुनिक भाषा परिणत होत असतानाचा एक टप्पा म्हणजे अपभ्रंश भाषा.  साधारणतः सहाव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत ती बोलली जात असे.  विशेषतः पाली, मागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषांच्या या काळातल्या रूपांना अपभ्रंश भाषा म्हटले जाते.  सिद्ध, जैन, बौद्ध अशा धर्मोपदेशकांनी जनसामान्यांची बोली अनुसरत आपले कार्य केले.  पुढे परिणत होऊन आधुनिक बंगाली, गुजराती, मराठी यासारख्या विकसित भाषांचा जन्म झाला.  संस्कृतमधून आलेले मूळ शब्द अपभ्रंश प्राकृतच्या संगतीने मराठीत परिणत झाले.  संस्कृतमधून प्राकृत आणि त्यांचे मराठीकरण झालेल्या शब्दांची काही उदाहरणे – अग्रतः – अग्गदो – आघाडी.  सत्यम् – सच्छम – साच.  मयूर – मोरो – मोर.  ही रुपे पाहताना प्राकृत -अपभ्रंश भाषेची आपल्या आजच्या मराठीशी जवळीक लक्षात येते.

भाषेतली ही स्थित्यंतरे त्यांच्या लिखित नमुन्यांमधून जाणवतात.  प्रत्येक काळानुरूप तिच्यात झालेले वैशिष्टपूर्ण बदल जाणवतात.  मंगळवेढयाच्या ताम्रपटातली( इ. स.  ४८८ – शके ४१०) शके ६५८ मधील चिकुर्डे ताम्रपटातली आणि शके १०५१ च्या चालुक्यराज सोमेश्वर रचित अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथातली भाषाशैली वेगळी जाणवते.  शके १११० च्या विवेकसिंधू (मुकुंदराज ) मध्ये ‘ जैसे अमृत चाखे आपुले चवी । तैसे स्वसुख अनुभवी ” असे अध्यात्मज्ञान येते.  

शके ११२८ मधल्या पाटणच्या शिलालेखात ‘कापासी दामाचा विसोवा, आसुपाठी मगरे दिन्हला ‘ आसू म्हणजे त्यावेळचे चलन व कापूसविक्रीसंदर्भात हे लेखन असावे.  बारा-तेराव्या शतकातल्या महानुभाव ग्रंथात – आबैसी गोसावियाते पुसिले ( आबाईसा नावाच्या शिष्येने चक्रधरांना विचारले ) अशी भाषा येते.  याच काळातल्या ज्ञानेश्वरीप्रमाणेच उकारांत वळणाची भाषा तेराव्या शतकातल्या पंचतंत्र (मराठी ) मध्ये ‘पिंगलकु पुसे, दमनकु सांघे ‘ पहायला मिळते.  यानंतरच्या काळातल्या रामदास, तुकाराम, एकनाथ अशा संतांच्या मांदियाळीने विपुल लेखन केले त्यातून त्या त्या काळातील समाजभाषेचे दर्शन घडते.  बखरवाङमयातून, ऐतिहासिक पत्रव्यवहारातून वापरलेल्या भाषेतून अरबी, फारसीचा प्रभाव जाणवतो.  पेशवाई काळापासून मोरोपंत, महीपती, वामनपंडित यांच्या काव्यातून संस्कृतप्रचुरता आढळते.  त्यानंतरच्या काळात इंग्रजांच्या प्रभावामुळे इंग्रजी शब्दांचा वापर वाढत गेला.

भाषेची ही प्रत्येक शतकांत बदललेली रूपे म्हणजे बदलत गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब ! संस्कृतीचे बदलत गेलेले रूप भाषेच्या इतिहासातून उलगडत जाते.  त्या काळातले लेखन आणि शब्दसंपत्तीवरून अनेक गोष्टींचा अंदाज येतो.  समाज, संस्कृती आणि भाषा यांच्यावर इतरांचा प्रभाव पडणे हे अपरिहार्य असते.  त्यामुळे प्रारंभापासून अखेरपर्यंत तिचे स्वरूप एकसारखे राहत नाही.  नव्या कल्पनांसोबत नव्या शब्दांची भर पडत जाते.  कधी जुन्या शब्दांचे नवे अर्थ रूढ होतात तर कधी कल्पना कालबाह्य झाल्यामुळे शब्दही नाहीसे होतात.  शब्दांच्या या भरती आणि ओहोटीमुळे भाषेच्या प्रवाहात लाटांचे उसळणे अपरिहार्य ठरते.

 

© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वारकरी आणि रामदासी : महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेतील दोन समन्वयी प्रवाह’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘वारकरी आणि रामदासी : महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेतील दोन समन्वयी प्रवाह’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

प्रस्तावना

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात संतपरंपरेचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मध्ययुगीन भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीने समाजजीवनात नवा आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोन निर्माण केला. या चळवळीने धर्माचे तत्त्वज्ञान केवळ शास्त्र आणि मठांच्या मर्यादेत न ठेवता ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.

महाराष्ट्रात या भक्तिप्रवाहाचे विविध स्वरूप दिसून येते. वारकरी संप्रदाय, महानुभाव परंपरा, दत्तसंप्रदाय, नाथसंप्रदाय आणि समर्थ रामदासांनी प्रेरित केलेला रामदासी संप्रदाय हे या व्यापक भक्तिपरंपरेचे महत्त्वाचे घटक आहेत.

यांपैकी वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय हे दोन प्रवाह विशेष प्रभावी मानले जातात. वरवर पाहता या दोन्ही परंपरांमध्ये काही तात्त्विक व आचारभेद दिसतात; तथापि सखोल अभ्यास केल्यास असे आढळते की या दोन्ही परंपरांचा उगम भागवत वैष्णव भक्तीच्या समान तत्त्वज्ञानातून झाला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतील भिन्नता ही मुख्यतः त्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे.

वारकरी संप्रदाय : भक्ती, समता आणि लोकधर्म

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात व्यापक आणि लोकाभिमुख असा भक्तिपंथ आहे. या संप्रदायाचे केंद्रस्थान पंढरपूर येथील श्रीविठ्ठल मंदिर आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी पंढरपूरला जाऊन विठ्ठलदर्शन घेतात. या यात्रेला ‘वारी’ असे संबोधले जाते.

वारकरी भक्तीमध्ये विठ्ठल हा विष्णू किंवा श्रीकृष्णाचे रूप मानला जातो. भक्त आणि देव यांच्यातील संबंध अत्यंत आत्मीयतेचा असतो. विठ्ठल हा भक्तांचा सखा, मायबाप, बंधू किंवा कुटुंबातील सदस्य म्हणून अनुभवला जातो.

वारकरी परंपरेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समता आणि सर्वसमावेशकता. या संप्रदायात जातिभेद, सामाजिक उच्च-नीचता किंवा धार्मिक संकुचितपणा यांना स्थान नाही. संतज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई इत्यादी संतांनी आपल्या अभंगांद्वारे भक्तीचा संदेश सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला.

संतज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाद्वारे भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले. संत तुकारामांच्या अभंगांनी वारकरी भक्तीला व्यापक लोकाधार मिळवून दिला.

समर्थ रामदास आणि सतराव्या शतकातील सामाजिक परिस्थिती

सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींचा उदय झाला. त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करून समाजजीवनाचे निरीक्षण केले. त्या काळात भारतातील अनेक प्रदेशांवर परकीय सत्तेचे वर्चस्व होते आणि सामाजिक तसेच राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.

या परिस्थितीत समाजात आत्मविश्वास, नैतिकता आणि संघटन यांची गरज निर्माण झाली होती. समर्थांनी भक्तीच्या आधारावर समाजजागृती आणि संघटन यांचा कार्यक्रम हाती घेतला.

समर्थ रामदासांचा दासबोध हा ग्रंथ त्यांच्या विचारांचा प्रमुख स्रोत मानला जातो. या ग्रंथात भक्ती, विवेक, वैराग्य, कर्तव्य आणि समाजधर्म यांचे महत्त्व स्पष्टपणे मांडलेले आहे.

रामदासी संप्रदाय : भक्ती आणि कर्तृत्वाचा समन्वय

समर्थ रामदासांनी श्रीराम आणि हनुमान यांच्या उपासनेचा मार्ग समाजासमोर ठेवला. श्रीराम हे धर्मसंस्थापन आणि आदर्श राजधर्माचे प्रतीक आहेत, तर हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि स्वामिनिष्ठेचे प्रतीक मानले जातात.

समर्थांनी देशभर अनेक मठ आणि मारुती मंदिरे स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी समाजात बलोपासना, संघटन आणि कर्तव्यभावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यातून ‘रामदासी संप्रदाय’ किंवा ‘समर्थ संप्रदाय’ विकसित झाला.  

या संप्रदायात भक्तीबरोबरच समाजधर्माची जाणीवही महत्त्वाची मानली जाते.

वारकरी आणि रामदासी संप्रदाय : तुलनात्मक दृष्टिकोन

घटक: वारकरी संप्रदाय ‘ वा’

रामदासी संप्रदाय ‘ रा’

आराध्य देव

वा: विठ्ठल (विष्णू/कृष्ण)

रा: श्रीराम व हनुमान

प्रमुख संत

वा: ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम

रा: समर्थ रामदास

मुख्य साधना

वा: नामस्मरण, अभंग, वारी

रा: उपासना, शिस्त, बलोपासना

तत्त्वज्ञान

वा: भक्ती आणि समता

रा: भक्ती आणि कर्तव्य

सामाजिक कार्य

वा:लोकधर्म आणि समता

रा: संघटन आणि नैतिक जागृती

या तुलनेवरून स्पष्ट होते की दोन्ही संप्रदायांचे मूलतत्त्व भक्ती आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत मात्र काळानुसार भिन्नता दिसते.

राम आणि विठ्ठल : तात्त्विक एकात्मता

समर्थ रामदासांनी रामभक्तीचा पुरस्कार केला असला तरी त्यांनी विठ्ठल आणि राम यांना तात्त्विकदृष्ट्या वेगळे मानले नाही. पंढरपूर येथे विठ्ठलदर्शन घेताना त्यांना विठ्ठलामध्येच श्रीरामाचे दर्शन झाल्याची परंपरा सांगितली जाते. त्या प्रसंगी त्यांनी उच्चारलेले शब्द प्रसिद्ध आहेत —

“येथे का उभा श्रीरामा

मनमोहन मेघश्यामा।”

या काव्यरचनेत राम आणि विठ्ठल यांचे मूलतत्त्व एकच असल्याची भावना व्यक्त होते.

 समारोप

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा विचार करताना वारकरी आणि रामदासी या दोन परंपरांचा समन्वय लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाने भक्तीचा लोकाभिमुख मार्ग समाजासमोर ठेवला, तर समर्थ रामदासांनी भक्तीबरोबरच संघटन, नैतिकता आणि कर्तृत्वाचा संदेश दिला.

या दोन परंपरा विरोधी नसून परस्परपूरक आहेत. विठ्ठल आणि श्रीराम हे विष्णूच्या एकाच तत्त्वाची भिन्न रूपे मानली जातात. त्यामुळे वारकरी आणि रामदासी हे भक्तिपरंपरेचे दोन समन्वयी प्रवाह आहेत असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

 

©️ लेखकः दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५ ५ २६ २ ९२ ४ ५

 

🌼🌼🌼

 

संदर्भग्रंथ

१. रा. चिं. ढेरे — श्रीविठ्ठल : एक महासमन्वय

२. रा. चिं. ढेरे — महाराष्ट्राचा देव्हारा

३. ग. ह. खरे — समर्थ रामदास

४. डॉ. ह. गो. तुळपुळे — संतसाहित्याचा इतिहास

५. दासबोध — समर्थ रामदास

६. ज्ञानेश्वरी — संत ज्ञानेश्वर

७. तुकाराम गाथा

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

(सामान्यांविषयी तुकारामांचे मत)

आजच्या भागात समाजातील सामान्य जनतेविषयी तुकाराम महाराजांचे काय मत होते, त्याविषयीच्या अभंगांचा विचार करू. सामान्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखे, संसारात गुरफटलेले, एका ठराविक चक्रातून अहोरात्र फिरणारे.

आपल्याच फुंदे/ जेथे तेथे घेती छंदे//

पडला सत्याचा दुष्काळ/ बहु फार झाली घोळ//

विश्वाचे माठ/ त्याचे कपाळी ते नाट//

तुका म्हणे घाणा/ मूढा तीर्थी प्रदक्षिणा//

 या अभंगाचा अर्थ काय? तर तुकारामांच्या मते असे अनेक लोक आहेत की ते त्यांच्या गर्वाने प्रत्येक वेळी दुराग्रह धरतात. परमार्थातील खरी तत्वे काय आहेत ती त्यांना समजली नसल्यामुळे सगळाच घोळ होतो. या नश्वर जगताचा खोटा अभिमान धरून त्यांचे आचरण चालू असते. उदाहरणार्थ- आपल्याला आवडलेली वस्तू न मिळता जर ती दुसऱ्याला मिळाली, तर अत्यंत दुःख होते, पण हे कळत नाही की त्या वस्तूचे अस्तित्व किती काळ असणार आहे? मग विनाकारण दुःख का करायचे आणि स्वतःस त्रास करून का घ्यायचा? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जसा घाण्याचा बैल घाण्याभोवती फिरतो तसा तो मूर्ख मनुष्य जगातल्या सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घालत बसतो, परंतु त्याच्या अशा वागण्याने त्याला हरीच्या प्राप्तीचे भान आणि ज्ञान नसते.

 अहंकार तो नासा भेद/ जगी निंद्य ओवळा//

 नातळे तो धन्य यासी/ जाला वंशी दीपक//

करवितो आत्महत्या/ नेदी आत्मा आतळो//

तुका म्हणे गुरुगुरी / माथा थोरी धरुनी//

या अभंगात महाराज जनतेला हेच समजावून सांगत आहेत की माणसाचा अहंकार, म्हणजे मी पणा, हे माझे आहे, हे मी केले आहे, हा गर्व

त्याचा विनाश करतो. माणसामाणसात भेदभाव निर्माण करणारा अहंकार अगदी मलीन आहे, तो ओवळा म्हणजे अशुद्ध आहे, निंदनीय आहे. सगळा घात या अहंकारानेच केला आहे. ज्याने या अभिमानाचा विटाळ होऊ दिला नाही, त्यानेच वंशाचे नाव उज्वल केले आहे व तोच धन्य आहे असे समजावे. अहंकारानेच आत्मा स्वतःचा अपारपणा विसरतो आणि या मर्यादित देहाला कवटाळतो. जसा काही तो आत्मघातच करतो. या अभिमानामुळेच खऱ्या श्रीहरीची भेट होऊ शकत नाही. यामुळे माणूस स्वतःकडे मोठेपणा घेऊन उगीचच गुरगुरत राहतो.

तुकाराम महाराजांचे सामान्य माणसांना कळकळीचे हेच सांगणे आहे की आपण सामान्य माणसे म्हणजे एक साधन आहोत, कर्ता- करविता तो एक श्रीहरीच आहे.

आस निसरली गोविंदाचे भेटी/

सवंसारी तुटी पुढीलिया//

पुढे पाठविले गोविंद गोपाळ/

देऊनी चपळ हाती गुढी//

हाका आरोळी या देऊनी नाचती/

एक सादाविति हरी आला//

आरंधी पडिली होती तया घरी/

संकीर्ण त्या नारी नरलोकां//

लोकां भूक तहान नाही निद्रा डोळा/

रूप वेळोवेळा आठविती//

आहा कटा मग करिती गेलिया/

आधी ठावा तया नाही कोणा//

* आधी चुकी मग घडे आठवण/*

* तुका म्हणे जन परिचय*//

सर्वसामान्य माणसांची पद्धतच आहे, की कोणतीही गोष्ट करताना सखोल विचार न करता ती करायची. कधी कोणाच्या सांगण्यावरून करायची, नंतर त्याचे परिणाम काय होतील याचा सारासार विचार करायचा नाही आणि नंतर अंगाशी आले की देवाला आळवायचे. आपल्याकडे म्हणच आहे करून करून भागले अन् देवपूजेला लागले संत तुकाराम नेमकी सामान्य जनांची हीच ओळख त्यांच्या या अभंगातून देत आहेत.

ते म्हणतात की, गोविंदाची भेट झाल्याने सर्व आशा नाहीशी होऊन पुढच्या संसाराचा संबंध सुटला. गोविंदाने चपळ गोपाळांच्या हाती पताका देऊन त्यांना पुढे पाठवले. मोठमोठ्याने हाका, आरोळ्या देऊन ते नाचू लागले व एकमेकांना हरी आला म्हणून सावध करू लागले. आपापल्या घरी ते स्त्री-पुरुष उद्विग्न होते. त्या लोकांची तहानभूक निद्रा नाहीशी होऊन ते वेळोवेळी हरीचे रूप आठवीत असत. हरि डोहात गेल्यावर कृष्ण किती चांगला होता म्हणून आक्रोश करू लागले परंतु पूर्वी त्याचे मोठेपण कोणी जाणत नव्हते. तुकाराम महाराज हेच सांगतात की आधी चुका करायच्या नंतर पश्चातापाने पोळायचे हा जगाचा स्वभावच आहे.

भारवाही न ओळखती या अनंता/

जवळी असता अंगसंगे//

 अंगसंगे तया न कळे हा देव/

कळोनी संदेह मागुताला//

मागुते पडती चिंतेचिये डोही/

जयाची हे नाही बुद्धी स्थिर//

बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण/

आशाबद्ध जन लोभिकांची//

लोभिका न साहे देवाचे करणे/

तुका म्हणे तेणे दुःखी होती//

या अभंगात साध्या सरळ संसारी माणसाचे वर्णन महाराजांनी केल्याचे आपण पाहतो. जी माणसे प्रपंचाचा गाडा वाहत आहेत, ती माणसे परमेश्वर कितीही जवळ असला तरी त्याला पाहू शकत नाहीत. देहात असलेल्या देवाला ती ओळखत नाहीत. अंग संगतीने असलेला देव त्यांना कळत नाही आणि यदाकदाचित समजलाच तर त्याविषयी त्यांच्या मनात संशय निर्माण होतो. ज्यांची बुद्धी स्थिर नाही ते काळजीच्या डोहात बुडतात. जे लोभी आहेत, नारायण त्यांची बुद्धी स्थिर होऊ देत नाही. लोभी माणसांना देवाचे हे कृत्य सहन न झाल्यामुळे ते कायम दुःखीच राहतात.

थोडक्यात सांगायचे तर संसारात राहूनही लोभ, मोह… इत्यादी शड्रिपुंना दूर ठेवले तर हरिनारायण आपली बुद्धी स्थिर ठेवील आणि देहातील देवाची जाणीव होऊन सर्व दुःखे नाश पावतील.

क्रमशः… ३० 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(नात्यांचं महावस्त्र : ‘आजी’ (संस्कारांची शिदोरी))

☆

माझ्या कल्पनेतील आजी अशी आहे… 

मायेचे आगर, प्रेमाचा सागर,

ज्ञानाची घागर असे आजी!

आजीची पोतडी गोष्टींनी समृद्ध,

आजीचा बटवा औषधांनी…

 

 शुभ्र केसांचा मऊ अंबाडा, बोलणे तिचे प्राजक्ताचा सडा.

 दातांची जरी कवळी, मनाने सदा राही देवाजवळी.

 

सुरकुत्यांचे जाळे अंगावरी पण

बोलण्यातून फुलती हास्य लकेरी.

 

आईबाबा नसता, आजीचा फिरे हात,

प्रेमाची ती साथ सुरक्षेची!

 

आजीच्या हाताला चव फार,

दुधात साखर असे आजी!

 

आजी म्हणजे फक्त नाव नसतं

वर्तमानाला भूत आणि भविष्याशी जोडणारं एक गाव असतं.

आजची आजी त्या मानाने अधिक आधुनिक आणि आपले आरोग्य उत्तम राखणारी आहे पण तिच्या मनातील नातवंडांबद्दलचे प्रेम आणि सगळ्यांबद्दलची माया कायमच असते!

 ‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आईची ‘मायेची पैठणी’ आणि बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आपण पाहिली. पण या वस्त्राला पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची, परंपरेची आणि बिनशर्त प्रेमाची जरतारी किनार देणारं एक अथांग नातं म्हणजेच ‘आजी’! आजी म्हणजे मूर्तिमंत माया आणि प्रेम! अनुभव आणि ज्ञान, प्रेम आणि शिस्त, अध्यात्म आणि व्यवहार या सगळ्या गुणांची अनोखी सांगड म्हणजे आजी.

खरं तर, आज्यासुद्धा दोन असतात—एक वडिलांची आई आणि दुसरी आईची आई (आजोळची आजी). या दोन्ही आज्यांची नावं जरी वेगवेगळी असली, तरी दोन्हीकडे मिळणारी मायेची ऊब मात्र एकच असते. एक आजी घरात राहून आपल्यावर रोज संस्कारांचे सिंचन करते, तर दुसरी आजोळची आजी सुट्ट्यांमध्ये लाड पुरवून बालपणात आनंदाचे रंग भरते. या दोन्ही आज्यांच्या छायेत वाढणारं मूल आयुष्याच्या बाजारात कधीच अपयशी ठरत नाही. खरं तर नातवंडांना दुधावरची साय म्हटलं जातं, पण अंगावर सुरकुत्या पडलेल्या आजीची माया या दुधावरच्या सायीसारखीच घट्ट आणि समृद्ध असते!

मला माझी आजी आठवते. तिच्याबद्दल या ठिकाणी थोडं सांगणं नक्कीच अनुचित होणार नाही. माझं बालपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेलं. मी साधारण चौथीच्या वर्गात असेपर्यंत माझी आजी आमच्यासोबत होती; त्यामुळे मला ती अगदी स्पष्ट आठवते. आजी फारशी शिकलेली नव्हती, पण तिच्याजवळ पारंपरिक आणि अनुभवजन्य ज्ञानाचे अथांग भांडार होते. ती अतिशय प्रगत विचारांची होती, नवीन चांगल्या गोष्टींना तिचा कधीच विरोध नसायचा.

मी बाहेरून खेळून आलो की आजी मला आधी सक्तीने हातपाय धुवायला लावायची; त्याशिवाय पाणी पिण्यासाठी माठाकडे जाऊ देत नसायची. मला तर खेळून आल्यामुळे तीव्रतेने तहान लागलेली असायची, त्यामुळे त्यावेळी मला कधी कधी तिचा खूप राग यायचा. पण आज मोठं झाल्यावर, जगाचा अनुभव आल्यावर कळतं की तिचं ते सांगणं आरोग्याच्या दृष्टीने किती बरोबर होतं! कोरोनाच्या भीषण काळात तर आपण सर्वजण याच गोष्टीबाबत अगदी दक्ष राहायला लागलो होतो, जी शिस्त आजीने आपल्याला बालपणीच लावली होती.

लहनपणी आम्हाला ‘आजीचे घड्याळ’ या नावाची एक सुंदर कविता होती. माझी आजी अगदी तशीच होती! तिच्याजवळ घड्याळ नव्हतं, पण तिच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी व्हायच्या. सकाळी पहाटे लवकर उठून धार्मिक वाचन, जप या गोष्टी ती नित्यनेमाने करायची. संध्याकाळी मला देवाजवळ हक्काने बसवून ‘शुभंकरोती’ म्हणायला लावायची आणि देवादिकांच्या रंजक गोष्टी सांगायची. आजी म्हणजे संस्कारांची एक चालतीबोलती पाठशाळाच होती.

पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर होत असत. माझी आई सांगते की, तिचं लग्न माझ्या मामांनी ती अवघ्या १४-१५ वर्षांची असतानाच करून दिलं होतं. तिचे आई-वडील ती लहान असतानाच वारले होते, त्यामुळे मामांनीच तिला मायेने वाढवलं. खरं तर तिचं ते वय शाळेत जाण्याचं आणि बागडण्याचं होतं; पण परिस्थितीमुळे तिला फार शिक्षण घेता आलं नाही. लग्न होऊन नवीन घरात आल्यावर तिला स्वयंपाक वगैरे गोष्टी फारशा येत नव्हत्या. पण माझी आजी, जी नात्याने तिची सासू होती, ती तिची खऱ्या अर्थाने ‘आई’ झाली! तिने माझ्या आईला अगदी पोटच्या मुलीसारखं मानून स्वयंपाकापासून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मायेने शिकवल्या. सासू-सुनेच्या नात्याला आई-मुलीचं रूप देणाऱ्या माझ्या अशा आजीचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो.

आई-बाबांचे जग हे सहसा शिस्तीचं, कर्तव्याचं आणि आजच्या काळात खरं तर खूप धावपळीचं असतं. अशा वेळी घरात आजी असणे म्हणजे दुधात साखर पडण्यासारखे आहे. आई-बाबा घरात नसले, तरी पाठीशी आजी असल्यामुळे त्यांना मुलांची अजिबात चिंता नसते. आई-बाबांच्या शिस्तीचा आणि ओरड्याचा उन्हाळा जेव्हा मुलांच्या वाटेला येतो, तेव्हा आजीच्या पदराची सावली हिमालयासारखी शीतल आणि उबदार ठरते. आईने रागवून हात उगारला की मुलं रडत जिथे जाऊन लपतात, ते जगातील सर्वात हक्काचं आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे आजीची कुस!

आजीचे ते पिकलेले पांढरे शुभ्र केस हे केवळ वयाचे लक्षण नसते, तर त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या शेकडो उन्हाळ्या-पावसाळ्यांच्या समृद्ध अनुभवाचे ते संचित असते. म्हणूनच, जेव्हा घरावर किंवा प्रपंचावर एखादे संकट येते, तेव्हा आजीचा हा प्रदीर्घ अनुभव घरातील माणसांना संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा दाखवतो. आजीचा तो जुना लाकडी बटवा आजही अनेकांना आठवत असेल. त्यात केवळ खोबरेल तेल, सुंठ, वेखंड किंवा लवंग नसायची; तर बालपणातल्या प्रत्येक लहान-सहान आजारपणावर फुंकर घालणारा ‘मायेचा परिसस्पर्श’ असायचा. आजच्या ‘अलोपॅथी’च्या काळातही आजीच्या बटव्यातल्या काढ्याची जी चव आणि गुण होता, तो कोणत्याही महागड्या औषधात मिळू शकत नाही. आजकालच्या बऱ्याच नवीन लग्न झालेल्या आणि नुकत्याच माता बनलेल्या आधुनिक स्त्रियांना त्यांचं मूल रडू लागलं की त्या घाबरून जातात, अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. पण घरात जर सासूबाईंच्या रूपाने आजी हजर असेल, तर आजीकडे अशा प्रत्येक प्रसंगाचे हमखास आणि शांत करणारे उत्तर तयार असते.

आजी आणि नातवंडं यांच्यातलं सर्वात मोठं आणि सोनेरी माध्यम म्हणजे ‘गोष्टी’! आजीची ती जुनी पोतडी नेहमीच अद्भूत गोष्टींनी समृद्ध असायची. रात्रीच्या वेळी आजीच्या कुशीत शिरून चांदोबाच्या गोष्टी, परिकथा, इसापनीती किंवा रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या कथा ऐकणे हा बालपणीचा सर्वात सुंदर महोत्सव असायचा. त्या गोष्टींमध्ये जो निखळ आनंद होता, तो आजच्या दूरचित्रवाणीवरील ‘कार्टून्स’मध्ये नक्कीच नाही. आजी केवळ गोष्टी सांगत नसायची, तर त्या गोष्टींच्या रंजक माध्यमातून ती मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर ‘नैतिकतेची’ आणि ‘संस्कारांची’ पेरणी करत असायची. तिने लावलेली ‘शुभंकरोती’ची आणि रामरक्षेची सवय मुलांच्या आयुष्याला अंतर्गत शुद्धता देऊन जाते आणि आयुष्यभर हे संस्काराचे देणे माणसाला सुखद जगण्यासाठी उपयोगी पडते.

पण कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आजी-आजोबांसारखे मायेचे वटवृक्ष आज घराघरातून नाहीसे होताना दिसत आहेत. आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र तर खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजीच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत.

आई-बाबा दोघेही नोकरीवर गेल्यावर मुले पाळणाघरात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेली दिसतात. मोबाईलवरील ‘यूट्यूब’च्या स्क्रीनवर निर्जीव आवाजात गोष्टी ऐकणे आणि आजीच्या उबदार कुशीत तिच्या हृदयाची जिवंत धडधड ऐकत गोष्ट ऐकणे, यातील जमीन-अस्मानाचा फरक आजच्या डिजिटल पिढीला समजणार कसा?

आजच्या काळाची ही मोठी शोकांतिका आहे की, ज्या आजीच्या पंखांखाली संपूर्ण घर सुरक्षित राहायचे, ती आजी आज अनेक ठिकाणी वृद्धापकाळात एकाकी पडलेली दिसते. आयुष्याच्या या संध्याकाळी तिला पैशांपेक्षा आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या दोन गोड शब्दांची, त्यांच्या वेळेची भूक असते. ज्याप्रमाणे वाळलेल्या पानांनी कधीकाळी आपल्याला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती, तसेच आजीच्या पिकलेल्या केसांचा आणि तिच्या सुकून गेलेल्या हातांचा आदरयुक्त सन्मान करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा आजी नावाचा पदर आपल्या संस्कृतीचे खरे वैभव आहे. ही आपली ठेवणीतली पैठणी आहे. ही मायेची सावली घरात जपणे आणि तिच्या अनुभवाचे गाठोडे पुढच्या पिढीकडे आदराने सुपूर्द करणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे. संस्कृती, संस्कार आणि प्रेम जपायचं असेल आणि ते पुढील पिढीकडे सुरक्षित सुपूर्द करायचं असेल, तर ‘आजी’ ही गोष्ट कुटुंबातून कधीही ‘माजी’ होता कामा नये! ही तुमची, आमची आणि या समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुपर वूमन सिंड्रोम” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “सुपर वूमन सिंड्रोम…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजातील अनेक स्त्रियांमध्ये तथाकथित “सुपर वूमन सिंड्रोम” दिसून येतो, असे काही समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ मानतात. याचा अर्थ असा की, स्त्रीने एकाच वेळी आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श आई, आदर्श कर्मचारी, आदर्श गृहिणी आणि परंपरेची कट्टर रक्षक अशा सर्व भूमिका निर्दोषपणे पार पाडल्याच पाहिजेत, अशी अपेक्षा ती स्वतःकडून आणि समाज तिच्याकडून ठेवतो. हा केवळ वैयक्तिक स्वभावाचा प्रश्न नसून सामाजिक संस्कार, लिंगाधारित अपेक्षा आणि सांस्कृतिक दबाव यांचा परिणाम असू शकतो.

पतीपरायणतेच्या संकल्पनेत वाढलेल्या अनेक स्त्रिया पतीची सेवा, उपवास-व्रते, धार्मिक विधी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणे हेच स्त्रीत्वाचे सर्वोच्च लक्षण आहे, असे मानतात. परिणामी, त्या स्वतःवर कामाचा, त्यागाचा आणि जबाबदाऱ्यांचा एवढा मोठा बोजा अंगावर घेतात की त्याला जणू ‘सुपर वूमन’ बनण्याची स्पर्धाच समजू लागते. घरातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ठेवण्याचा, प्रत्येक नाते जपण्याचा आणि प्रत्येक धार्मिक परंपरा पाळण्याचा भार त्या स्वतःच्या खांद्यावर घेतात. या नादात त्या स्वतःचे स्वत्व मात्र गमावून बसतात. स्वतःच्या इच्छा आकांक्षांना दडपून लोक काय म्हणतील किंवा लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील या आवास्तव इच्छेपोटी ‘सुपर वुमन’ होण्याचा प्रयत्न करतात.

याच मानसिकतेतून काही स्त्रिया संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारीही प्रामुख्याने स्वतःवर घेतात. कोणते व्रत करायचे, कोणता सण कसा साजरा करायचा, कोणते कपडे घालायचे, मुलांना कोणते संस्कार द्यायचे, कुटुंबाची परंपरा कशी टिकवायची या सर्व बाबींमध्ये त्या स्वतःला संस्कृतीच्या पहारेकरी समजू लागतात. प्रत्यक्षात संस्कृती ही स्त्री किंवा पुरुष अशा एकाच घटकाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक निर्मिती असते. तरीही इतिहासात स्त्रियांवरच संस्कृतीचे ओझे अधिक टाकले गेले आहे.

आजच्या काळात खरी गरज ‘सुपर वूमन’ किंवा ‘सुपर मॅन’ घडवण्याची नाही, तर समान जबाबदारी स्वीकारणारे, परस्पर आदर राखणारे आणि विवेकाने परंपरांचा विचार करणारे कुटुंब घडवण्याची आहे. संस्कृती टिकवायची असेल तर ती भीती, अपराधभाव किंवा एकाच लिंगाच्या त्यागावर नव्हे, तर समता, संवाद आणि मानवी मूल्यांवर टिकली पाहिजे. तेव्हाच संस्कृती जिवंत राहील; अन्यथा ती केवळ स्त्रियांसाठी कर्मकांडांचे ओझे बनून राहील

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाची मनमानी ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

☆ मनाची मनमानी ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

‘मन’ या एका शब्दात सामावलेली ही दोन अक्षरे! एवढीच का यांची ओळख आहे? बाराखडीतील इतर अक्षरांप्रमाणे का ह्या दोन अक्षरांचा समूह आहे? अक्षरे जरी दोन असली तरी सारे ब्रम्हांड यामध्ये सामावलेले आहे. मन म्हटले की, कोणताही आकार आपल्या समोर येत नाही. मोहून टाकणारा गंध जाणवत नाही. कोणताही रंग लेवून एखादी आकृती समोर येत नाही. तरीही त्याची आपल्या शरीरातील उपस्थिती सातत्याने जाणवते. आपल्या सोबत सक्रिय राहून प्रत्येक कार्यात सहभागी होत असते. हवा आपणास दिसत नसली तरीही तिचे अस्तित्व विविध प्रकारातून जाणवते. आत्मा हाही तसा अदृश्य असला तरी त्यामुळे शरीर जिवंत असते असे आपण मानतो. ईश्वरालाही भक्तांनी भावेल, आवडेल तसे रूप दिलेले आहे. त्यामुळे कदाचित ईश्वराला आकार प्राप्त झाला असेल. तो दृश्य झाला असेल. आत्म्याचे तसे नाही. त्याचे अस्तित्व फक्त जाणिवेच्या रूपाने सोबत असते. आकारहीन, गंधहीन असा आत्मा असला तरी त्यामुळे शरीर सचेतन आहे, सजीव आहे. मनाचेही तसेच आहे. आजीवन शरीरात असूनही आपणापासून दूर असल्याप्रमाणे आहे. आपण मनाला पाहू शकत नाही, परंतु त्याच्याशी संवाद मात्र साधू शकतो. ‘मनातल्या मनात’ बोलणे हा संवाद साधण्याचाच एक प्रकार! मनाशी संवाद साधत असूनही आपण आपल्या मनाला पूर्णपणे ओळखू शकत नाही, ओळखू शकणार नाही.

अदृश्य असले तरी कसे आहे मन? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नेहमीच पडतो. कधी वाटते मन अथांग सागराप्रमाणे आहे. दुसऱ्याच क्षणी वाटते, मन विस्तीर्ण आकाशाप्रमाणे आहे. कधीकधी मन एवढे चंचल भासते की, जणू पत्नीप्रमाणे, प्रेयसीसम! दुसऱ्याच क्षणी मनाची अस्वस्थता जाणवते, अस्थिरता समोर येते. त्याचवेळी त्याची तत्परता आपल्या लक्षात येते. कधी ते हसतं, डोलतं, गातं, नाचतं तर कधी त्याची घाई-गडबड, धांदल, धांदरटपणाही आपल्या समोर येतो. मध्येच मन हे एखाद्या अणुप्रमाणे भासते तर कधी ते पर्वतासम जाणवते. मन मायाळू, प्रेमळ, लाजरे-बुजरे आहे तसेच ते कोपिष्ट, रागीट, संतापी, आडमुठही आहे. मन जसे कीर्तनात रमते तसेच ते तमाशातही रममाण होते. कधी मन क्रियाशील जाणवते तर बऱ्याचवेळा ते प्रचंड आळशी असल्याचे दिसून येते. मन म्हणजे जणू जवळचा मित्र, बरेवाईट याची जाणीव करुन देणारा पण मधूनच त्याला काय होते ते कळत नाही. एखाद्या वैऱ्यासारखे वागते. समोर जो कुणी असेल त्याच्याशी शत्रुगत् वागते. त्याच्या बद्दल नको नको असे विचार करते. म्हणूनच म्हणतात, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’!

मन आणि स्वप्न यांचा फार जवळचा संबंध जाणवतो. जागेपणी आपण जे विचार मनातल्या मनात करतो, ते प्राप्त करण्याचा, साध्य करण्यासाठी बरेच काही करतो तसे विचार मनात घोळत असताना अनेकदा ती गोष्ट आपण स्वप्नात मिळवतो, पाहतो, अनुभवतो. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ती हिच अवस्था! प्रयत्नांती जागेपणी जे मिळत नाही किंवा एखादी गोष्ट भरपूर प्रयत्न करूनही उपलब्ध होत नाही अशी गोष्ट मिळविण्यासाठी स्वप्न मदतीला धावून येते. म्हणूनच मनाला ‘कल्पवृक्ष’ ही उपमा दिली तर ती अनाठायी ठरू नये. असे म्हणतात की, एकेकाळी या कल्पवृक्षाकडे एखादी वस्तू मागितली तर ती तत्काळ मिळत असे. तसे पाहिले तर आजच्या मानवासाठी कल्पवृक्ष म्हणजे तरी काय तर एक स्वप्नील अवस्था! सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाजवळ असलेला कल्पवृक्ष म्हणजे मन! तुम्हाला काय पाहिजे ते मागा, प्रत्यक्षात जरी मिळाले नाही तरी कल्पनाविश्वात म्हणजेच स्वप्नात ती बाब निश्चितपणे मिळणार. आजकाल स्मार्टफोन आणि गुगलचा जमाना आहे. स्मार्टफोन हे एक शरीर मानले तर गुगल म्हणजे त्याचे मन… कलियुगातील कल्पवृक्ष! गुगलकडे तुम्ही जी माहिती मागाल ती तुम्हाला दुसऱ्याच क्षणी घरबसल्या मिळू शकते.

‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असे म्हटले जाते. मन प्रसन्न, आनंदी, समाधानी असेल तर तुम्ही जे कोणते काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल, कार्यसिद्धीचा आनंद प्राप्त होईल. असा या वचनाचा अर्थ होऊ शकतो. व्यवहारात तरी दुसरे काय आहे? आपले मन प्रसन्न असेल तर आपण करीत असलेल्या कामात चुका होत नाहीत, एकच कृती वारंवार करण्याची गरज पडत नाही. मन आनंदी असेल तर शरीर लवचिक बनून जोमाने, आगळ्यावेगळ्या स्फूर्तीने काम करू लागते. मात्र हेच मन काही कारणास्तव आळसावलेले, दुखावलेले, कष्टी असेल तर दररोजच्या कामालाही वेग मिळत नाही, वारंवार चुका होतात, काहीही करावेसे वाटत नाही. मनाची अवस्था सैरभैर झालेली असते. प्रसंगानुरूप मन नेहमीच जगण्याची दुर्दम्य शक्ती शरीरात चेतवते. परंतु हेच मन कधीकधी मानवाला नको ते पाऊल उचलायला, अनिष्ट अशी कामे करायला भाग पाडते. का होत असावी मनाची ही अशी अवस्था? का मधूनच मन नको त्या गोष्टींंची पेरणी करते आणि ‘जनी निंद्य’ ते करायला भाग पाडते? मन जसे भावनाशील आहे तसेच ते भावनाशून्य आहे. मन दोलायमान असले की मनाची एक वेगळीच अवस्था समोर येते. मनाच्या या रुपाला दुसरे मन असे म्हणतो. शेजारी राहणाऱ्या या दोन मनांचे द्वंद्व आपण नेहमीच अनुभवतो. मुख्य किंंवा पहिले मन कणखर, निर्भय, निर्भीड असले की, दुसऱ्या मनाचे काहीही चालत नाही. परंतु पहिले मन थोडेेसेही कमजोर झालेे की मग दुुसऱ्या मनाचे साम्राज्य पसरते आणि मग बऱ्याचवेेळा नको ते घडून जाते. ही दोन मने म्हणजे नेमके काय? भिन्न, परस्परविरोधी विचारधारेचा समन्वय. सकारात्मक आणि नकारात्मक विचारधारा असेही आपण म्हणू शकतो. चांगले गुण, तशी विचारसरणी असलेले मन म्हणजे सकारात्मक किंवा पहिले मन! त्याउलट वाईट विचार आणि अवगुणांचा समुच्चय असलेले ते दुसरे मन…. नकारात्मक मन! या दुसऱ्या मनानेे केेलेेेलेे कार्य ही ‘मनमानी’ ही असू शकते.

तसे पाहिले तर मन एक गुंता आहे. तो कुणालाही तसा सुटलेला नाही. अगदी समर्थ रामदास महाराजांनी ‘मनाचे श्लोक’ या सर्वोत्तम विचारधारेची निर्मिती केली असली तरी मन हे शेवटी मनच आहे. कधी ते देवाप्रमाणे वागते, कधी त्याची वागणूक मानवाप्रमाणे सरळ-साधी असते तर मधूनच हेच मन राक्षसीवृत्ती धारण करते. म्हणूनच… 

मनाचिये मनमानीतून

सांगा सुटका कुणाची

मनाचिया गुंता सोडविण्या

सांगा सरशी कुणाची?

 ००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस आणि पक्षीजीवन ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ पाऊस आणि पक्षीजीवन ☆ शालिनी जोशी ☆

४/७/२६. पाऊस आणि पक्षीजीवन

अलीकडे आठ दिवस पाऊस सुरू झाला आहे. प्रतीक्षा करून थकलेल्यांना दिलासा मिळाला. पण माझ्या मनात एक वेगळाच विचार. पक्षी जीवन पूर्णपणे झाडावर अवलंबून. घरा शेजारचे आंब्याचे झाड माझ्या डोळ्यासमोर. त्यामुळे पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून सुरू होणारी पक्षी जीवनाची सुरुवात माझ्या परिचयाची. ही सुरुवात सध्या कोकीळ आणि कोकिळेच्या संवादाने. तो अधून-मधून दिवसभर चालूच. कधी सुसह्य तर कधी असह्य, कधी आर्त तर कधी श्राव्य. इतर पक्षांची हालचाल असतेच. बुलबुल आणि नाचण(fan tail) कायमचे रहिवासी. खारुताईची वटवट तर अखंड. शेवटी सांगावे वाटते, बाई आता गप्प बसायला काय घेशील? पुरे कर तो शेपटीचा तुरा घडवणे आणि त्या तालावर आवाज करणे. पोपट दिसत नाहीत पण पोपटपंची मधून मधून ऐकू येते. सुर्यपक्षी कोणाच्या अध्यात ना मध्यात. ते आपल्याच नादात, फुले असलेल्या झाडांच्या आसपास वावर. क्वचित चष्मेवाला, मैना, राॅबिन, टिट यांचेही दर्शन. मी आहे सांगणारी कावळ्यांची कावकाव कधी दूर तर कधी जवळ. अधून मधून भारद्वाजाचा भारदस्त आवाज. असे हे पक्षी जीवन, घरात बसणारी मी त्यामुळे त्यांचा विचार हाच माझा एक छंद.

पण पाऊस सुरू झाला की हे सर्व पक्षी मंडळी कोठे गायब होतात कळत नाही. आवाज नाही, दिसत नाहीत. हिरव्या पानात कसे लपून जातात कळत नाही. आणि पाऊस थांबला की परत जागृती. हालचाल सुरू. यांना पाऊस कसा लागत नाही? भिजणे, थंडी नाही का? कारण घरटे बांधले तरी त्याचा उपयोग अंडी ठेवण्यासाठी. पिल्लूला पंख फुटले उडू लागली की घरटे निकामी. मग भर पावसात पक्षी कोठे झोपतात? काय खातात? आपण छत्री रेनकोट केवढा थाट करतो. गरम चहा, भजाचा आस्वाद घेतो.

पक्षांचे कौतुक कोण करणार? त्यांचे किती हाल होत असतील? पण न कुरकुरता त्यांचे जीवन सुरू असते. असं वाचलं की पक्षांच्या शेपटी जवळ ग्रंथी असतात. त्यातून तेलकट द्रव पाझरतो. आपल्या चोचीने पक्षी तो सर्व अंगाला लावतात. त्यामुळे त्यांचे अंग भिजत नाही. निसर्गाने किती छान योजना केली आहे. त्यालाच सर्वांची काळजी. आपण मात्र मी शहाणाच्या अभिमानात. पण पक्षी काही कुरकुर न करता मिळेल ते खाद्य, पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा, मिळेल त्या आडोशाला निवास, कुणाशी भांडण नाही. अन्नाची साठवण नाही. आनंदाने एकाच झाडावर सर्व राहतात.

पिल्लू उडायला शिकली, स्वावलंबी झाले की त्यांनी कुठेही जावं. आई वडील कर्तव्यातून मोकळे. म्हणून म्हणतात पक्षासारखं जगावं. कर्तव्य करावं पण प्रपंचात अडकू नये. मिळेल त्यात समाधानी असावं. हव्यास तेथे ईर्षा तेथे असमाधान.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वयंप्रामाणिकता : धर्मभयापलीकडील नैतिकता” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “स्वयंप्रामाणिकता : धर्मभयापलीकडील नैतिकता” ☆ श्री जगदीश काबरे ☆

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याला विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या कृतींचे परिणाम भोगण्याची क्षमता निसर्गाने दिलेली आहे. तरीही शतकानुशतके माणसाने आपल्या नैतिक आचरणाचा आधार बाहेरच्या कोणत्यातरी शक्तीवर, कोणत्यातरी भीतीवर, कोणत्यातरी परलोकाच्या कल्पनेवर ठेवला आहे. धर्मसंस्काराने माणसाला प्रामाणिक बनवता येते, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात एक मूलभूत विसंगती आहे. भीतीतून निर्माण होणारी नैतिकता ही खरी नैतिकता नसते. जो माणूस केवळ देवाची किंवा धर्माची भीती बाळगून सत्शीलपणे वागतो, तो मुळात आतून अनैतिकच असतो. अशा माणसाला इंग्रजीमध्ये otherwise gentleman असे म्हणतात. कारण त्याच्या अनैतिकतेला बाहेरून एक धार्मिक आवरण चढवलेले असते. खऱ्या नैतिकतेचा उगम भीतीत नाही, तर स्वतःच्या मनाशी असलेल्या प्रामाणिकतेत आहे.

धर्म आणि नैतिकता यांचा संबंध माणसाने युगानुयुगे गृहीत धरला आहे. धर्मग्रंथ सांगतात की चांगले वाग, नाहीतर नरक भोगशील. देव पाहतो आहे, म्हणून वाईट करू नकोस. परलोकात जाब द्यावा लागेल, म्हणून इहलोकात सावध राहा. या सगळ्या शिकवणींचा आधार एकच आहे, तो म्हणजे भीती. माणसाला त्याच्या स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवण्याऐवजी एका बाहेरच्या अदृश्य शक्तीच्या नजरेची भीती दाखवून नियंत्रित करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु विचार करा, जेव्हा कोणी पाहत नसेल, जेव्हा देवही गाफील असेल असे वाटेल, तेव्हा या भीतीच्या आधारावर उभी राहिलेली नैतिकता टिकेल का? इतिहास सांगतो की ती टिकत नाही. धर्माच्या नावावर झालेले अत्याचार, धार्मिक माणसांनी केलेल्या अनैतिक गोष्टी, हे सगळे याचेच पुरावे आहेत.

मग स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणे म्हणजे नक्की काय तर आपल्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक विचाराची, प्रत्येक निर्णयाची जाणीव ठेवणे. स्वतःशीही खोटेपणाने न वागणे. आपली प्रेरणा काय आहे, आपला हेतू काय आहे, हे स्वतःपासून लपवून न ठेवणे. जेव्हा माणूस स्वतःशीच खरा असतो, तेव्हा त्याला इतरांशीही खरे राहणे सहज शक्य होते. कारण खोटेपणा खोट्या गोष्टीची एक साखळी बनवतो. एक खोटे दुसऱ्या खोट्याला जन्म देते. पण जो माणूस स्वतःशीच पारदर्शक आहे, त्याची नैतिकता आतून येते. धर्माच्या भीतीखाली जगणारा माणूस सतत दुभंगलेल्या अवस्थेत असतो. आतून काहीतरी वेगळे वाटते, बाहेरून वेगळे वागावे लागते. मनात एक असते, बोलण्यात दुसरे. कृतीत आणखी वेगळे. या दुभंगलेपणातून माणसाला कधीही आंतरिक शांती मिळत नाही. तो सतत एका अव्यक्त अपराधभावनेच्या सावलीत जगत असतो. धर्माने सांगितलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी तो जे करतो ते मनापासून नसते, ते केवळ दंड टाळण्यासाठी असते. अशा माणसाला नैतिक म्हणता येईल का? खरे पहाता, तो केवळ नैतिकतेचे नाटक करत असतो.

परलोकाची संकल्पना आणि त्यावर आधारित नैतिकता याबद्दलही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. परलोक खरोखर अस्तित्वात आहे की नाही, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. तरीही करोडो माणसे परलोकाच्या भीतीने जगतात. स्वर्ग मिळेल म्हणून चांगले वागतात, नरकाची भीती वाटते म्हणून वाईट गोष्टी करणे टाळतात. पण हा व्यवहार आहे, नैतिकता नव्हे. ज्या माणसाला परलोकाचे बक्षीस लुभावत असते तो मुळातच नैतिक नसतोच. नैतिकता ही अटी-शर्तींवर उभारलेली नसते. खरी नैतिकता ही निःस्वार्थ असते, ती स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असते म्हणून पाळली जाते, कुठल्या बक्षिसाच्या अपेक्षेने नव्हे. देवावर अंधश्रद्धा ठेवणारा माणूस हळूहळू स्वतःच्या विचारशक्तीवरचा विश्वास गमावतो. कारण त्याला सतत सांगितले जाते की, तू काहीच करू शकत नाहीस, देवाच्या इच्छेशिवाय पान हलत नाही. हे सतत कानीकपाळी पडल्यामुळे तो आपल्या स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ लागतो. अपयश आले तर देवाची इच्छा म्हणतो, यश आले तर देवाची कृपा म्हणतो. या दोन्हींमध्ये तो स्वतःला कुठेच ठेवत नाही. मग त्याच्या आयुष्यात प्रगती होणार कशी? प्रगतीसाठी लागते आत्मपरीक्षण, स्वतःच्या चुका स्वीकारण्याची तयारी, आणि त्या बदलण्याची हिम्मत. पण जो माणूस सगळे देवावर ढकलतो, तो ही तिन्ही कारणे टाळतो.

समाजात नियम असतात, कायदे असतात. काही माणसे हे नियम केवळ पोलिसांच्या भीतीने पाळतात. काही माणसे समाजाच्या निंदेच्या भीतीने पाळतात. आणि काही माणसे धर्माच्या भीतीने पाळतात. या तिन्ही प्रकारच्या माणसांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांच्या वर्तनाचे मूळ भीतीत आहे. भीती हे नैतिकतेचे मूळ असू शकत नाही. भीतीतून जन्मलेली नैतिकता ही एखाद्या वाळूच्या घराप्रमाणे असते, जी थोड्याशा वाऱ्याने कोसळते. याउलट, स्वतःच्या विवेकातून, स्वतःच्या जबाबदारीच्या जाणिवेतून आलेली नैतिकता ही दगडाच्या भिंतीप्रमाणे असते. ती कोणत्याही परिस्थितीत टिकते. कारण तिचा आधार बाहेर नाही, माणसाच्या आत आहे. स्वतःची जबाबदारी ओळखणे हे प्रगल्भ माणसाचे लक्षण आहे. जेव्हा माणूस म्हणतो की, माझ्या आयुष्यात जे घडते त्याला मीच जबाबदार आहे, माझ्या चुका माझ्याच आहेत, माझे यश माझेच आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने कूच करतो. कारण जेव्हा माणूस आपल्या कृतींचे परिणाम स्वतः भोगायची तयारी ठेवतो, तेव्हा तो अधिक विचारपूर्वक वागतो, तो धर्माच्या भीतीशिवायही नैतिक राहू शकतो. त्याला कोणत्या धार्मिक ग्रंथाची, कोणत्या कर्मकांडाची, कोणत्याही उपासनेची गरज लागत नाही.

विवेकी माणूस म्हणजे केवळ बुद्धिमान माणूस नव्हे. विवेक म्हणजे बुद्धी आणि भावना यांचा समतोल. विवेकी माणूस हा इतरांच्या दुःखाला संवेदनशीलतेने समजतो. तो जाणतो की माझ्या कृतींचा दुसऱ्यावर काय परिणाम होणार आहे. हे जाणणे म्हणजेच सहानुभूती, आणि सहानुभूती हे नैतिक वर्तनाचे मूळ आहे. सहानुभूती ही भीतीतून येत नाही, ती मनाच्या गाभ्यातून येते. असा माणूस धर्मभयाने वागणाऱ्या माणसापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नैतिक असतो. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे आपली जबाबदारी एका अदृश्य शक्तीकडे सोपवणे. पण स्वतःच्या कर्तृत्वावर आत्मविश्वास ठेवणे म्हणजे जबाबदारी स्वतः उचलणे. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, तो आव्हानांपुढे खचत नाही, तो स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि पुन्हा त्या चुका होऊ नये म्हणून दक्ष राहतो. असाच माणूस प्रगती करतो, जीवनात अर्थ शोधतो. त्याचे नैतिक आचरण त्याच्या विकसित होत जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा एक घटक बनते. त्याउलट जो देवाधर्माच्या भीतीमुळे नैतिकतेने वागतो तो संधी मिळताच अनैतिक कृत्य करायला धजावतो. समाजाची रचना, लोकशाहीचा पाया, मानवी नात्यांची दृढता, हे सगळे स्वयंप्रेरित नैतिकतेवर अवलंबून असते. जर माणसे आतून नैतिक असतील, तर कोणतीही बाह्य शक्ती त्यांना अनैतिक बनवू शकत नाही.

जी मुले केवळ शिक्षेच्या भीतीने चांगली वागतात, ती मोठी झाल्यावर पालकांच्या नियंत्रणातून बाहेर गेल्यावर बिघडण्याची शक्यता जास्त असते. जी मुले नैतिकतेचे मूल्य समजून-उमजून वागतात, ती आयुष्यभर त्या मूल्यांशी बांधील राहतात. म्हणूनच मुलांना धर्माच्या भीतीने नव्हे, तर कारण-परिणामाच्या समजुतीतून नैतिकता शिकवणे हे खऱ्या अर्थाने संस्कार करणे आहे. त्यांना सांगा की, दुसऱ्याला दुखवू नका कारण त्यामुळे त्यांना वेदना होतात, देव रागावेल म्हणून नव्हे, तर त्यांना सांगा की खरे बोला कारण खोट्याने नाती मोडतात. नरकात जाल म्हणून सतशीलतेने वागू नका तर तो तुमचा अंगभूत गुणधर्म झाला पाहिजे. हे शिक्षण मुलाला आयुष्यभर पुरते. थोडक्यात, नीतिमत्तेने जगणे हा माणसाचा अंगभूत गुणधर्म बनणे हेच खऱ्या नैतिकतेचे ध्येय आहे. हे घडण्यासाठी धर्मसंस्काराची नव्हे, तर विवेकी संस्काराची गरज आहे. माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची, स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्याची, दुसऱ्याच्या वेदनांना संवेदनशीलतेने समजण्याची सवय लागणे, हेच खरे मानवी उन्नतीचे लक्षण आहे. देवाच्या भीतीखाली वाकणारा माणूस कधीही पूर्णपणे ताठ उभा राहू शकत नाही. स्वतःच्या विवेकावर विसंबणारा माणूस मात्र कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहतो. म्हणून स्वयंप्रामाणिकता ही धार्मिक संस्कारांपेक्षा मानवी प्रगल्भतेचा, माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा, आणि सच्च्या नैतिकतेचा एकमेव विश्वासार्ह आधार आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “युद्ध, इतिहास, आणि मी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “युद्ध, इतिहास, आणि मी …” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

युध्द म्हंटल कि ते करण्यापूर्वी, आणि झाल्यावर त्याचा अभ्यास होतो, नाहीतर करावा लागतो. अगोदर युध्द करायचं का, कसं, कधी असा विचार करणारे अभ्यास करतात. आणि नंतर झालेलं युध्द का, कसं, किती दिवस झालं आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास विचारवंत करतात. पण विद्यार्थ्यांच तस नसतं. त्यांना मात्र दोघांनी केलेला अभ्यास अभ्यासावा लागतो. युध्दाचे चांगले वाईट परिणाम नंतर दिसतातच. पण वाईट परिणाम मात्र बर्‍याच काळापर्यंत चांगलेच दिसतात. चांगल दिसणं, आणि वाईट परिणाम चांगलेच दिसणं यातला फरक स्पष्ट होतो.

माझ्या जन्माअगोदर, नंतर, मला समजायला लागेपर्यंत नक्की किती युध्द झाली हे सांगता आलं नाही तरी शाळेत वरच्या वर्गात जात होतो तस छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या युध्दापासून दुसर्‍या महायुद्धाचा अभ्यास होता. जसजसं वरच्या वर्गात जात होतो तसतशी लुटुपूटूची लढाई घनघोर युध्दाच रुप धारण करायची. बर्‍याचदा यांच्या सनावळी, तह, आक्रमण, आपापसात ठरलेल्या काल्पनिक रेषा यांचा वास्तवाशी संबंध वाटलानाही तरीही युध्दपातळीवर अभ्यास केला होता.

निजामशहा, आदिलशहा, शाहिस्तेखान, अफझलखान यांच्या काळात घोडदळ, पायदळ, तलवार, भाला, दाणपट्टा, गनिमीकावा यांच्या सहाय्याने खेळलेलं युध्द, नंंतर विमानाने हिरोशिमा, नागासाकीवर केव्हा बाॅॅम्ब टाकून गेले ते लक्षातच आलं नाही.

पेशव्यांनी अटकेपार झेंडा फडकवला असेल, पण आम्ही इतिहासात पास झालो की आमचा झेंडा डौलायला लागायचा आणि वर्ष पार पडायचं.

या व्यतिरिक्त दोन युध्द, यांचा अभ्यास करावा लागला नाही तरी अभ्यासाइतकेच प्रश्न त्या बाबतीत विचारले जायचे. ही युध्द म्हणजे अर्थातच रामायण आणि महाभारत. रामायणात प्रभु श्रीराम व रावण यांच्यात, म्हणजे दोन वेगवेगळ्या राजांमधे युध्द झाल होतं. पण महाभारतात झालेलं युध्द मात्र नातेवाईकांमधलच होत. आणि इतिहासात कमी मार्क मिळाले की त्या कमी मिळालेल्या मार्कांवरुन घरात वाक् युध्द सुरु व्हायचं. म्हणजे इतिहासावरुनच घरात महाभारत घडायचं. थोडक्यात महाभारतातली आपसात लढाई करायची परंपरा कमी मिळणार्‍या मार्कांमुळे पुढे घरात सुरुच राहिली. युध्दात सामान्य जनता विनाकारण होरपळते तसंच यांच्या युध्दाचा आमचा अभ्यास कमी झाल्याने शाब्दिक चटके बसायचे. यानंतर धर्मयुद्ध, गृहयुध्द, वाक् युध्द, शीतयुद्ध असे युध्दाचे उपप्रकार असतात हे लक्षात आलं.

मावळ्यांंनी लढाईत झालेले वार अंगावर झेलले. आम्ही इतिहासामुळे झालेले वार पाठीवर झेलले. पाठीवर वार करणं भ्याडपणाच लक्षण समजल जात असेल, पण आमच्या बाबतीत सगळेच निधड्या छातीने सहसा पाठीवरच वार करायचे. आणि त्यात कोणालाही म्हणजे वार करणारा आणि झेलणारा यांना भ्याडपणा वाटालाच नाही. आता आपल्या पाठीवर वार होणार हे समजायचं. मावळ्यांकडे वार चुकवायला ढाल असेलही. पण आमची पाठ मात्र ढोल वाजवल्यासारखी बदडली जायची. थोडक्यात इतिहास शिकवला तेव्हा आम्ही कुंभकर्णासारखे झोपलो होतो. आणि जाग आली तेव्हा इतिहास घडून गेला होता, आणि मिळालेले मार्क आमचा अभ्यासाचा इतिहास सांगायला सिध्द होते.

रामायण, महाभारत यात वाली, सुग्रीव, अंगद, जांबुवंत, बिभीषण, द्रोणाचार्य, भिष्म, विदुर, शकुनी, युधिष्ठिर, दुर्योधन, दुश्यासन आणि इतर… यांच्या नावाचा गोंधळ व्हायचा. तर नंतर जर्मन, ईटली, पोलंड, रशिया, अमेरिका, जापान, चिन या देशांपैकी मित्र कोण आणि शत्रु कोण याच्यात गोंधळ व्हायचा. याच गोंधळामुळे आम्ही एक वेगळा इतिहास तयार करायचो आणि त्यावर परत मार मिळायचा.

युध्द म्हंटल की वैर हिच भावना लक्षात येते. पण आमचे सर म्हणायचे तुमच्या अभ्यासासाठी दुसरं महायुद्ध फक्त तोंडओळख आहे. युध्दाची तोंडओळख करायची काय गरज. नंतर काय आपसात चहापाण्याचा कार्यक्रम करायचा होता… पण ही तोंडओळखसुध्दा जुलूमाचा रामराम केल्यासारखी वाटायची. पण यातली दोस्तराष्ट्र ही संकल्पना जवळची वाटली. कारण असेच कमी मार्क मिळालेले आम्ही काहीजण एकत्र आलो, आणि नंतर एकमेकांचे दोस्त बनलो. आणि ही दोस्ती कायम राहिली. आजही गोलमेज परिषदेसारखं चर्चा करायला आम्ही टेबलवर एकत्र येतो. चर्चा वेगळ्या गोष्टींवर असली तरी त्यात शाळेचा इतिहास व सध्या सुरु असलेली युध्द हा विषय डोकावतोच.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

तुकारामांचा युक्तिवाद

दिवस रात्र विठू माऊलीचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांची त्यांच्या देवाचे कधी दर्शन घडते आणि माऊलीच्या चरणी त्यांना कधी आसरा मिळतो अशी मनाची अवस्था झाली असताना त्यांनी त्यांच्या काही अभंगांतून खूप छान युक्तिवाद मांडला आहे. आज आपण असे काही अभंग पाहूया.

 नवां नवसांची/ झालो तुम्हासी वाणीची//

 कोण तुझे नाम घेते/ देवा पिंडदान देते//

 कोण होते मागे पुढे/ दुजे बोलाया रोकडे//

 तुका म्हणे पांडुरंगा/ कोणा घेतोसी वोसंगा//

देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात,

” अहो देवा, आम्ही तुमची नवसासायासाने झालेली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव घेणारे दुसरे कुणी आहेत का? आम्ही नसतो तर तुमचे पिंडदान कोण करणार? तुम्हाला परखड शब्दात जाब विचारणारे, रोखठोक बोलणारे आमच्या शिवाय दुसरे कोणीतरी आहे का? पांडुरंगा, आम्ही जर तुमची मुले नसतो तर तुम्ही कोणाला तुमच्या पदरात घेतले असते? “

आहे की नाही महाराजांचा हा मस्त युक्तिवाद? आम्ही तुमचे भक्त नसतो तर देवच जसा एकटा पडला असता, ही पांडुरंगाची मुले आहेत म्हणून त्यांना माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळण्याचा अधिकार आहे.

 आता हा दुसरा अभंग पहा.

 जेणे तुज जाले रूप आणि नाव/

 पतीत हे दैव तुझे आम्ही//

 नाही तरी तुज कोण हो पुसते/

 निराकारी तेथे एकाएकी//

 अंधारे ते दीपा आणियेली शोभा/

 माणिकाची प्रभा कोंदणाची//

 धन्वंतरी रोगे आणिला उजेडा/

 सुखी काय चाडा जाणावे त्या//

 अमृतासी मोल विषाचिया गुणे /

 पितळ तरी सोने उंच नीच//

 तुका म्हणे आम्ही असोनिया जाण /

 तुज देवपण आणियेले//

 रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन तुकाराम देवाला सांगतात, ” अरे देवा, आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत म्हणून तुझी ओळख आहे. ” ते काय म्हणतात? आम्ही पतीत आहोत. आणि आमच्यासाठीच देवा तुम्ही हे रूप धारण केले आहे. म्हणून आम्ही पतीतच तुझे दैवत आहोत. आम्ही जर नसतो तर तुझ्या निराकार, निर्गुण स्थितीला कोणी मानले असते? जसे की, अंधार आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशाची शोभा आहे. वैद्याला रोग्यामुळे प्रसिद्धी मिळते. जर सर्व लोक निरोगी असते तर वैद्याची गरजच काय? विषामुळे अमृताची गोडी आहे, आणि पितळ आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे. तसेच आम्ही पतीत आहोत, म्हणून तुझे हे सगुण सुंदर रूप आहे.

या अभंगातून तुकाराम महाराज एक प्रतिभावंत कवी होते असे आपल्याला दिसून येते. परमेश्वराला मनविण्याची ही मोठी चतुर बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच होती.

माणूस मायेच्या जंजाळात अडकून पडला आहे, जी माया अत्यंत नीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव खरंतर फार चांगला होता, परंतु या मायेने त्याला सुद्धा बिघडवले आहे. या मायेच्या संगतीत राहून देव लोकांना फसवण्याचे अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे शिकला आहे. या मायेमुळे याच्यावर जगाचे कर्ज झाले म्हणून लोक याच्या नावाने हाका मारतात. ईश्वरा जवळ कोणी काही मागितले की ही माया ज्याचे त्याला मिळू देत नाही, उलट ती मागणाऱ्याला भ्रम निर्माण करण्याकरता त्याच्या अंगावर धावते.

थोडक्यात काय तर मायेत गुरफटलेल्या माणसाने ईश्वरालाही सोडले नाही, त्यालाच मायेच्या पाशात अडकविले. या कारणाने आम्हा भक्त मंडळींना परमेश्वराची भेट होत नाही.

हा फार मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सामान्य जनतेला पोट- तिडकीने सांगितला आहे.

 बहु होता भला/ परी या मायेने नासीला//

 बहु शिकला रंग चाळे/ खरे खोटे इचे वेळे //

 नव्हते आळविते कोणी/ तिने केला जग ऋणी//

 ज्याचे त्यासी नेदी देऊ/ तुका म्हणे धावे खाऊ//

विठ्ठलाची भक्ती करीत असताना वेद पठण केलेल्या पंडितांना ते मुळीच मानत नाहीत. ते म्हणतात,

पंडित म्हणता थोर सुख/

परी तो पाहता अवघा मूर्ख//

काय करावे घोकिले/

वेदपाठ वाया गेले//

वेदी सांगितले न करी/

समब्रह्म नेणे दुराचारी//

हा वेदींचा अनुभव/

तुका देखे जीव शिव//

एखाद्याला कोणी पंडित म्हणून संबोधिले तर त्याला त्याच्या विद्वत्तेचा अभिमान वाटतो पण विचारांती तो मूर्खच असतो. कारण नुसत्या वेदांची घोकंपट्टी करून त्याचा अर्थ कळत नसेल तर तो कसला पंडित? मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे वेदपठण व्यर्थच आहे. वेदात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाने ब्रह्म विलसत असते, परंतु असा अनुभव येत नाही म्हणून असे पंडित हे खरंतर दुराचारीच. वेदातील मुख्य अनुभव म्हणजे जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष असा अनुभव आला आहे. त्यांच्या दृष्टीने खरा पंडित असा असतो.

पंडित तोची एक भला/ नित्य भजे जो विठ्ठला//

अवघे समब्रम्ह पाहे/ सर्वांभूती विठ्ठल आहे//

रिता नाही कोणी ठाव/ सर्वांभूती वासुदेव//

तुका म्हणे तोचि दास/ त्या देखिला जाती दोष//

तुकाराम महाराज म्हणतात की जो खऱ्या खुऱ्या भावाने विठ्ठलाची नित्यनेमाने भक्ती करतो, तोच खरा पंडित, कारण तो विठ्ठलाला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने पाहतो. तो हे जाणतो की वासुदेव सर्वत्र व्यापून आहे. रिकामे असे कोणतेच ठिकाण नाही. असा मनुष्यच खरा विठ्ठलदास आहे, त्याच्या दर्शनाने सर्वदोष नाश पावतात.

संत तुकारामांचे जनतेला हेच आवाहन आहे की, जन हो, हातात टाळ घ्या, वीणा घ्या, त्यांना विठ्ठल स्वरूप माना आणि विठ्ठल नामाचा मुखाने सतत गजर करा.

क्रमशः… २९

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares