मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

आजचा आमच्या सहलीचा पाचवा दिवस होता. कौसानीच्या निसर्गरम्य परिसराचा आज आम्हाला निरोप घ्यायचा होता. निघण्यासाठी मन राजी नव्हते. पण सहलीच्या नियोजित कार्यक्रमानुसार निघावेच लागणार होते. पहाटे लवकर उठून परत एकदा कौसानीचा सुंदर सूर्योदय अनुभवला. ती दिव्य पहाट नेत्रात साठवली. निसर्गातील भव्यतेत आणि सौंदर्यात आपल्याला परमेश्वराचाच साक्षात्कार होत असतो. विविध रूपात तो प्रकट होत असतो. फक्त तो अनुभवता आला पाहिजे. हॉटेल सुमन रॉयल रिसॉर्टच्या खाली असलेल्या बागेत आम्ही परत एक फेरफटका मारला. सहकाऱ्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. नाश्ता घेतला आणि तयार होऊन बसमध्ये बसलो. आज आम्ही रानीखेत या ठिकाणी भेट देऊन पुढे जिम कॉर्बेटला जाणार होतो. आजही दिवसभर प्रवासाची तयारी ठेवावी लागणार होती.

डोंगरातील अरुंद पण निसर्गरम्य रस्त्यातून वाट काढत बस भराभर रानीखेतच्या दिशेने वाटचाल करीत होती. वेळोवेळी आमच्या बस चालकाचे कुशल सारथ्य निदर्शनास येत होते. कौसानी ते रानीखेत अंतर साधारणपणे ५८ किमी असले तरी डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांमुळे तिथे पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. राणी पद्मिनी हिच्या नावावरून रानीखेत हे नाव पडल्याचे सांगितले जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे ६००० फूट उंचीवर वसलेले हे एक शांत आणि निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे. उत्तराखंड मधील अलमोडा जिल्ह्यात ते आहे.

इथे कुमाऊं रेजिमेंटचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात उंचीवरील उपट गोल्फ कोर्स हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे. आम्ही गेलो त्या दिवशी मात्र काही कारणाने हे गोल्फ कोर्स बंद होते. त्यामुळे आम्हाला ते पाहता आले नाही. परंतु आमच्या विनंतीनुसार बसने या गोल्फ कोर्स मैदानाला एक फेरी मारली. त्याचा परिसर अतिशय भव्य आणि विशाल असल्याचे त्यातून लक्षात आले.

रानीखेतला त्याचे एक आगळेवेगळे सौंदर्य आहे. सर्वत्र सुंदर हिमालयाच्या शिखरांचे दर्शन घडते. देवदार, बलुत आदी उंचच उंच वाढलेले वृक्ष आपले स्वागत करतात. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. झुलादेवी, मनकामेश्वर, बालाजी आदी मंदिरे आहेत. आम्ही येथील कुमाऊं रेजिमेंट सेंटरला भेट दिली. १९७० च्या दशकात स्थापन झालेले हे एक युद्ध संग्रहालय आहे. येथे कारगिल युद्धाशी संबंधित गोष्टी, कागदपत्रे, ऐतिहासिक शस्त्रे, नाणी आदी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कुमाऊं रेजिमेंट मधील आपले शूर सैनिक आणि अधिकारी यांची शौर्यगाथा या ठिकाणी आपल्याला वाचायला, बघायला मिळते. ते पाहिल्यानंतर ऊर अभिमानाने भरून येतो.

हे पाहून झाल्यानंतर आम्ही जिम कॉर्बेटच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी जेवणाचा आनंद घेतला. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही जिम कॉर्बेटला पोहोचलो. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रामनगर या शहराजवळ हा जिम कॉर्बेट पार्क आहे. इथे आमचा मुक्काम द बनियान रिट्रीट या आलिशान हॉटेलमध्ये होता. या हॉटेलचा परिसर अत्यंत विशाल आणि भव्य आहे. अनेक इमारती आहेत. राहण्याच्या खोल्या, जेवणाचे हॉल, लॉन्स इ. गोष्टी अत्यंत देखण्या आणि प्रेक्षणीय आहेत. इथे पोहोचल्यावर हे सगळे वातावरण पाहूनच आमचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी जेवणाच्या हॉलमध्ये एकत्र आलो. तो दिवस होता २३ एप्रिलचा. योगायोगाने याच दिवशी माझा वाढदिवस होता. आमचा टूर मॅनेजर अक्षय आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र येऊन मला शुभेच्छा दिल्या. एका आगळ्यावेगळ्या वातावरणात वाढदिवस साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच जिम कॉर्बेटच्या जंगल सफारीसाठी जायचे होते. जिम कॉर्बेटचे जंगल कसे असेल, तिथे कोणते प्राणी दृष्टीस पडतील या गोष्टींची उत्सुकता होतीच. या विचारात केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. 

– क्रमशः भाग चौथा 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

आज आमच्या प्रवासाचा तिसरा दिवस होता. सकाळी लवकरच जाग आली. पक्ष्यांचे कूजन सुरु होते. भीमताल येथील ही दुसरी आल्हाददायक पहाट आम्ही पाहत होतो. लवकरच आम्हाला सगळे आवरून चेक आउट करायचे होते आणि पुढील प्रवासासाठी निघायचे होते. भीमतालचे हे सौंदर्य, समोरचे रम्य भीमतालचे तळे, त्यातील आरसपानी पाण्यात पडलेले भोवतालच्या झाडांचे प्रतिबिंब, डोंगरातून वर येणारा सूर्य असे सकाळचे नयनरम्य दृश्य नेत्रात साठवून घेत होतो. पुन्हा इथे यायला मिळणार नव्हते. जमेल तेवढे फोटो घेतले. कधी कधी खूप फोटो घेण्यापेक्षा जे समोर दिसते आहे ते हृदयात साठवून घेणे महत्वाचे वाटते. ते तर करीतच होतो. आपला डोळा हा असा एक सुरेख कॅमेरा आहे की ज्याची बरोबरी कोणत्याच कॅमेऱ्याने होणार नाही. नजर जाईल तिथपर्यंतच दृश्य हा कॅमेरा सदैव जसंच्या तसं टिपत असतो. या कॅमेऱ्यात रोल सदैव टाकलेलाच असतो. त्याला ना बॅटरीची गरज असते, ना चार्जिंगची! तुमचं मन फ्रेश असलं तर समोरचं दृश्य तुम्हाला फ्रेश वाटतं. आपलं मन किंवा हृदय ही अशी एक जागा आहे की जिथलं स्टोरेज कधी फुल्ल होत नाही. लहानपणीपासूनचा आठवणींचा चित्रपट हवा तेव्हा उलगडत जातो.

मनसोक्त नाश्ता आटोपून आम्ही बसमध्ये बसलो. आज आम्ही कौसानी या निसर्गरम्य  ठिकाणी जाणार होतो. हा प्रवास साधारणपणे १३५ ते १४० किमीचा होता. पण डोंगरातील रस्त्यांचा विचार करता या प्रवासासाठी आम्हाला पाच ते सहा तास प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागणार होती. पण डोंगरातील हा प्रवास तसा जाणवत नाही. भव्य हिमालय पर्वत, हिरवीगार वृक्षराजी आपली सदैव सोबत करत असते. वाटेत ५० ते ६० किमी वर असलेल्या मुक्तेश्वर या ठिकाणी आम्ही जाणार होतो. मुक्तेश्वर हे छोटंसं गाव पहाडात वसलेलं आहे. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य वातावरणात. इथे एक प्राचीन भगवान शंकराचे मंदिर आहे. मुक्तेश्वर धाम म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे मंदिर उंच पहाडावर आहे. ते ३५० वर्षांपूर्वीचं आहे. परंतु येथील शिवलिंग जवळपास साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकरानी इथे एका राक्षसाचा वध करून त्याला मुक्ती दिली होती. म्हणून हे मुक्ती धाम! असेही म्हटले जाते की पांडवांनी आपल्या अज्ञातवासात या मंदिराची स्थापना केली होती. या ठिकाणी भगवान शंकरांसोबत पार्वती, नंदी, गणपती, हनुमान, ब्रह्मा, विष्णू आदींच्या पण मूर्तींचे दर्शन घडते. पण हे दर्शन घेण्यासाठी आपल्याला जवळपास शंभर सव्वाशे पायऱ्या चढण्याची तयारी ठेवावी लागते. पण या पायऱ्या चढून एकदा वर पोहोचलो की आजूबाजूचे दृश्य पाहून मन प्रसन्न होते. श्रम नाहीसे होतात. येथून हिमालयाच्या अन्य शिखरांचे पण दर्शन घडते.

हे दर्शन आटोपून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. वाटेत एका ठिकाणी थांबून भोजनाचा आस्वाद घेतला. संध्याकाळी कौसानी इथे पोहोचलो. कौसानी हे शांत आणि नितांत सुंदर असे हिल स्टेशन आहे. आपल्याला नैनिताल माहिती असते. पण त्यामानाने कौसानीची माहिती आपल्याला फारशी नसते. ज्याला शांत निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हे उत्तम ठिकाण! हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नयनरम्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आमचा मुक्काम सुमन रॉयल रिसॉर्ट या हॉटेलमध्ये होता. हे दुमजली हॉटेल आहे. भोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे हे वेगळे सांगायला नकोच. रूम साध्याच पण स्वच्छ होत्या. सर्व व्यवस्था उत्तम होती. तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हा सर्वांचे अतिशय प्रेमाने स्वागत केले. स्वागतासाठी फळांपासून बनवलेली दोन तीन प्रकारची सरबते हजर होती. रात्री इथे छान जेवण मिळाले.

आता प्रतीक्षा होती ती सकाळच्या नयनरम्य सूर्योदयाची. सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी कोणत्या पॉइंटला जावे लागेल अशी चौकशी करता असे समजले की आम्ही हॉटेलच्या ज्या रूममध्ये थांबलो होतो, तिथल्याच मागील बाजूच्या गॅलरीतून आम्हाला सूर्योदय दिसणार होता. सकाळी पाच सव्वापाचलाच उजाडले. आम्ही सुद्धा लवकर उठून पाठीमागच्या गॅलरीत येऊन बसलो. समोर हिमालयाची भव्य शिखरे दिसत होती. मध्ये कोणताही अडथळा नव्हता. साधारण साडेपाचच्या सुमारास उगवतीच्या रंगानी पूर्व दिशा उजळली. डोंगराआडून सूर्यदेव वर येत होते. सगळीकडे सोनेरी प्रभा पसरली होती. समोर हिमालयातील त्रिशूल, नंदादेवी आदी बर्फाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन घडत होते. सूर्योदयाचे हे सुंदर दृश्य आम्ही हृदयात साठवून घेतले. जंगलात एक दोन दिवसांपूर्वी मोठा वणवा पेटला होता. त्याचा धूर आणि थोडे धुक्याचे साम्राज्य होते. त्यामुळे समोरची हिमशिखरे स्पष्टपणे दृष्टीपथात येत नव्हती. पण तरी जे काही पाहिले ते सुंदरच होते! समोर दिसणारी हिमालयाची रांग आणि नंदादेवी, त्रिशूल आदी शिखरे पहाटेच्या वेळी एखाद्या शांत, ध्यानस्थ योग्यासारखी वाटत होती.

सहलीचा आमचा आजचा चौथा दिवस होता. आज कौसानी येथील अन्य ठिकाणे पाहण्यासाठी आम्ही जाणार होतो. अंघोळी, नाश्ता वगैरे आटोपून आम्ही साधारण साडेआठ वाजता बसमध्ये बसलो. आता आम्ही बैजनाथ मंदिर समूहाकडे निघालो होतो. बैजनाथ ग्रुप ऑफ टेम्पल्स म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात गोमती नदीच्या काठी हा मंदिर समूह आहे. ही मंदिरे १२ व्या शतकातील असून त्यांचे दगडी बांधकाम अत्यंत प्रेक्षणीय आहे. ही मंदिरे भगवान शंकरांना समर्पित आहेत. त्यासोबतच इथे माता पार्वती, गणेश, कुबेर, चंडिका आणि सूर्यदेव आदी १७ मंदिरे आहेत. संपूर्ण परिसर अतिशय प्रसन्न, शांत आणि निसर्गरम्य आहे. मंदिराजवळून वाहणाऱ्या गोमती नदीचे पात्र अतिशय स्वच्छ आहे. मंदिराच्या समोर बैजनाथ लेक आहे. या तळ्याच्या भोवती गर्द झाडी आहे. तळ्यामुळे इथला परिसर खूप सुंदर आणि देखणा वाटतो.

ही मंदिरे पाहून आम्ही आता तेथील चहाच्या मळ्याला भेट देण्यासाठी निघालो. एका उंच अशा टेकडीवर हा मळा आहे. इथे सशुल्क प्रवेश आहे. डोंगर उतारावर चहाची सुंदर लागवड केली आहे. हा चहाचा मळा पाहण्यासाठी थोडे चढावे लागते. उत्तराखंड हा मुलुखच डोंगराळ असल्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला चालण्याची किंवा चढण्याची तयारी ठेवावी लागते. या चहाच्या बागेत वर गेल्यानंतर आजूबाजूच्या पर्वतशिखरांचे सुंदर दृश्य नजरेत भरते. डोंगराच्या कुशीत वसलेली छोटी गावे दिसतात. त्या गावांकडे जाणाऱ्या नागमोडी वळणे घेणाऱ्या पायवाटा नजरेत भरतात. अगदी एखादे रेखीव चित्र पाहावे तशी ही गावे आणि पायवाटा भासतात. ‘ ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा… ‘ या गीताच्या ओळी हटकून आठवाव्यात असे हे दृश्य! चहाच्या रोपांचा एक अनामिक सुगंध वातावरणात दरवळत असतो. इथे विक्रीसाठी ग्रीन टी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फ्लेवर्सच्या चहा पावडर्स उपलब्ध आहेत. शिवाय काही मसाल्याचे पदार्थ देखील विक्रीसाठी ठेवले आहेत.

हा चहाचा बाग पाहून आम्ही खाली उतरलो. रस्त्याच्या पलीकडल्या बाजूस काही शॉल फॅक्टरीज आणि त्यांचे आउटलेट्स आहेत. आमच्यातील काही पर्यटकांनी या ठिकाणी खरेदीचा आनंद घेतला. आता आम्हाला आमच्या हॉटेलवर जाऊन जेवण करायचे होते. पण आमच्या बसमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. बऱ्याच खटपटीनंतर बस सुरु झाली. हॉटेलवर जाऊन आम्ही जेवण घेतले. थोडा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी बरोबर पाच वाजता पुन्हा बसमध्ये बसलो. हॉटेलपासून अनासक्ती आश्रम अगदी जवळ आहे. पाच मिनिटातच आम्ही तिथे पोहोचलो. इथूनच सूर्यास्ताचे दृश्यही छान दिसते. गांधीजींच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आले. त्यामुळे गांधी आश्रम म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

गांधीजी १९२९ मध्ये इथे आले होते. इथले निसर्गसौंदर्य पाहून ते या ठिकाणाच्या प्रेमातच पडले. ‘ हे भारताचे स्वित्झर्लंड आहे ‘ असे उद्गार त्यांनी काढले. इथे ते दोन आठवडे राहिले. या ठिकाणी त्यांनी ‘ अनासक्ती योग ‘ या पुस्तकाचे लेखन केले. त्यांच्या जीवनातील छायाचित्रांचे एक छोटे प्रदर्शन, एक वाचनालय आणि ध्यान केंद्र इथे आहे. आश्रमाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. विविधरंगी गुलाबांचे ताटवे फुललेले आहेत. ते पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. समोर हिमालयाची शिखरे आपल्या दर्शन देत असतातच. आता सूर्यास्ताची वेळ होत आली होती. मावळतीच्या रंगांनी पश्चिम दिशा आरक्त झाली होती. समोरील पर्वतशिखरांवरून सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. आपले दिवसभराचे कामकाज आटोपून नारायण आता स्वगृही जाण्यासाठी निघाले होते. लवकरच ते दृष्टीआड होणार होते. उगवतीच्या रंगाएवढेच मावळतीचे रंगही छान होते. मी मनोमन त्या ‘ मावळत्या दिनकराला ‘ प्रणाम केला.

कौसानीच्या निसर्गसौंदर्याने आम्हाला भरभरून आनंद दिला होता. या सगळ्या आठवणी जपतच आम्ही हॉटेलवर परतलो. 

– क्रमशः भाग तिसरा

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

निसर्ग हा माझा आवडता विषय. निसर्ग कोणाला आवडत नाही? प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. म्हणून वेळ मिळेल तेव्हा निसर्गाच्या सहवासात आपण जात असतो. जोडून सुट्या आल्या की एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण जातो. कोणी गिर्यारोहण करतं, कोणी ट्रेकिंग, कोणी किल्ल्यांची भ्रमंती तर कोणी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देतं. या सगळ्यातून निसर्गच नानाविध रूपांनी आपल्यासमोर येत असतो. यापूर्वी अनेकदा मी वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या लेखातून निसर्गाबद्दलची माझी आवड व्यक्त केली आहेच. या सहलीत तर निसर्गाचा अगदी जवळून सहवास मला लाभला. एखादा जिवलग मित्र खूप दिवसांनी भेटावा आणि मग त्याबद्दलचा आनंद कसा व्यक्त करावा असा प्रश्न पडतो. तसेच काहीसे माझेही झाले. माझ्या निसर्गमित्राला मी डोळे भरून हृदयात साठवून घेत होतो.

आधीच्या लेखात भीमतालच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन मी केले आहे. ताल म्हणजे तलाव किंवा सरोवर. महाभारतातील भीमाच्या नावावरून या तळ्याला भीमताल असं नाव मिळालं आहे. पांडव वनवासात असताना त्यांना कोठे पाण्याचा स्रोत आढळत नव्हता. सगळे तहानलेले होते. अशा वेळी भीमाने आपल्या गदेचा प्रहार या भूमीवर केला. मोठा खड्डा निर्माण होऊन या ठिकाणी पाणी उत्पन्न झाले. म्हणूनच हा भीमताल ! भीमताल हे ठिकाण नैनितालपेक्षाही प्राचीन मानले जाते. या परिसरातील हा सगळ्यात मोठा जलाशय. सकाळी लवकर उठलो. साडेपाचलाच छान उजाडलं होतं. सूर्यदेव आपल्या रथावर स्वार होऊन अवघ्या परिसराला आपल्या सहस्त्र किरणांनी सुवर्णस्नान घालीत होते. उगवतीच्या रंगांनी साऱ्या दिशा उजळल्या होत्या. भीमतालचा परिसर आणि अवघी सृष्टी जागी झाली होती. विविध रंगी फुले फुलली होती. पक्षी गाऊन आपला आनंद व्यक्त करीत होते. इथं शहरातील गर्दी नाही, हॉर्नचे आवाज नाहीत. इथे निसर्गच तुमच्याशी संवाद साधतो. तुम्ही मात्र त्यासाठी तयार असायला हवं. एकदा इथं आलं की इथून निघण्याची इच्छाच होऊ नये असं हे ठिकाण ! नैनिताल तर प्रसिद्धच आहे. पण त्यापेक्षा कमी गर्दीचं हे ठिकाण. इथे खाण्यापिण्याचेही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. भीमतालच्या तलावात आपल्याला जलविहार करता येतो. आपल्याकडे वेळ असेल तर इथून जवळच असलेल्या नौकुचियाताल, विक्टोरिया बांध, आणि भीमेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणांना आपण भेट देऊ शकतो.

इथल्या हॉटेलमध्ये आमचा भरपेट नाश्ता झाला. भरपेट म्हणण्याचे कारण म्हणजे येथे नाश्त्यासाठी देखील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. फळे, फळांचे ज्यूस, पोहे, उपमा, इडली सांबार, वडा सांबार, ब्रेड, चहा कॉफी. ज्याला जे आणि जेवढे हवे ते घ्या. प्रत्येक पदार्थाची नुसती चव घ्यायचे म्हटले तरी पोट भरून जाते. आता आमची बस नैनितालला जाण्यासाठी सज्ज होती. नाश्ता झाल्यावर सगळेजण आपापल्या जागी बसमध्ये जाऊन बसले. आता निसर्गरम्य डोंगर रांगातून आमची बस वाटचाल करीत होती. रस्ते चांगले पण अरुंद होते. सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी झालेली दिसत होती.

नैनिताल इथे जाताना वाटेत कैंची धाम म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणी संत निम करोली बाबा यांचा आश्रम आहे. नीम करोली बाबा २० व्या शतकातील एक महान संत होऊन गेले. त्यांचे वागणे बोलणे अतिशय साधे होते. उत्तर प्रदेशातील नीम करोली या गावी त्यांनी तपश्चर्या केली. म्हणून त्यांना नीम करोली बाबा या नावाने ओळखले जाते. त्यांना कंबलीवाले बाबा म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांच्या अंगावर कायम पांढऱ्या रंगाची घोंगडी असे. ते हनुमंताचे परमभक्त होते. लोक त्यांना हनुमानाचा अवतार म्हणूनच ओळखत. ते लोकांना रामनामाचा उपदेश देत असत. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देखील त्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन घेतले होते असे सांगितले जाते. कैंची धामला दरवर्षी बाबांचे लाखो भक्त भेट देतात. आश्रमात श्रीराम आणि हनुमानजी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. बाबांबद्दल अनेक चमत्कारिक आणि अद्भुत कथा सांगितल्या जातात. या ठिकाणी थांबून आम्ही दर्शन घेतले. हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

तेथील दर्शन आटोपून आम्ही नैनितालच्या दिशेने निघालो. तिथे थेटपर्यंत बस जात नाही. त्यामुळे साधारण तीन किमी अलिकडे बस उभी करून स्थानिक जीपच्या साहाय्याने तिथे जावे लागते. एका जीपमध्ये साधारण सहा माणसे बसतात. केवळ पंधरा मिनिटांचा प्रवास करून आम्ही नैनिताल शहरात प्रवेश केला.

पौराणिक कथेनुसार भगवान शंकर सतीचे म्हणजे पार्वती मातेचे शव कैलासावर घेऊन जात असताना तिचे काही अवयव विविध ठिकाणी पडले. त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. सतीचे डोळे या ठिकाणी पडले म्हणून या ठिकाणी नैना देवीचं मंदिर निर्माण झालं. भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. भाविकांसाठी हे एक पवित्र आणि जागृत ठिकाण आहे. नयना देवीचे मंदिर असल्याने या ठिकाणाला नैनिताल असं म्हटलं जातं. येथील तळ्याला नैनी असं म्हटलं जातं.

अतिशय सुंदर आणि विशाल असा हा तलाव आहे. याच्या जवळपास इतरही अनेक तलाव आहेत. पण याचे सौंदर्य आपल्याला आकर्षित करते. म्हणूनच कदाचित ‘ तालोमें ताल नैनिताल ‘ असे म्हटले जात असावे. या ठिकाणी पर्यटक बोटिंगचा आनंद घेतात. या तलावाच्या उत्तर दिशेला नैना देवीचं सुंदर मंदिर आहे. इथे उंच असं हिमालयातील नैनी शिखर आहे. मल्लीताल इथून या ठिकाणी जाण्यासाठी रोपवेची सोय आहे. रोपवेतून आपण निसर्गाचा आनंद घेत या पर्वतशिखरावर पोहोचतो. इथे फिरण्यासाठी साधारण एक तास दिला जातो. आपल्याला परत रोपवेने खाली यावे लागते.

इथं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे पाळण्याचा किंवा मेरी गो राउंड सारख्या चक्राचा. त्यासाठी वेगळे पैसे भरून आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. एका खांबाभोवती एक विशाल चक्र आहे. त्यात उभे राहायचे. हे चक्र हळूहळू आकाशाच्या दिशेने वर जाते. अनेक फूट उंचावर जाताना एक वेगळाच थरार अनुभवास येतो. वर जाताना अप्रतिम निसर्ग तर दिसतोच पण वर गेल्यानंतर आणखी एक जादू घडते. हे चक्र हळूहळू ३६० अंशात फिरते. आजूबाजूचा सगळा परिसर आपल्या दृष्टीपथात येतो. जणू बर्ड आय व्ह्यू आपल्याला प्राप्त होतो. आम्ही हाही आनंद घेतला. इथून हिमालयाच्या रांगा, शहरातील वस्ती, तळे, तळ्यातील बोटिंग या साऱ्या गोष्टी दिसत होत्या. या ठिकाणी लंडन आय व्हीलची आठवण झाली. लंडन आय मधूनही असेच सुंदर दृश्य दिसते.

उन्हाळ्यात इथलं वातावरण आल्हाददायक असतं. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतात. इथे देखील खाण्यापिण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. इथला मॉल रोड शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. तसेच टिफिन पॉईंट, चायना पॉईंट, स्नो व्ह्यू पॉईंट यासारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. आपल्याला वेळ असेल तर ही ठिकाणे पाहता येतात. नैना लेकमध्ये जलविहाराचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या भीमताल या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. 

– क्रमशः भाग दुसरा

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

– – भीमताल

कधी कधी आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक प्रवासाचा असा एखादा योग येतो की तो एका वेगळ्याच वातावरणात आपल्याला घेऊन जातो. असेच काहीसे आमचे नैनिताल सहलीबाबत घडले. एप्रिल महिन्याच्या सुटीत पुण्याला गेलो असताना माझ्या मुलाने आम्हां दोघांना नैनिताल, कौसानी वगैरे निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही जाऊन या म्हणून आग्रह केला. एवढे करूनच तो थांबला नाही, तर आम्हाला स्वतः ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आणि १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान आमचे गिरिकंद हॉलिडेज तर्फे नैनिताल, कौसानी, रानीखेत, जिम कॉर्बेट या ठिकाणी जाण्याचे ठरले देखील ! सहलीला जाण्याच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा आम्ही गिरिकंदच्या ऑफिसला भेट दिली. आम्हाला ज्या काही शंका होत्या, त्यांचे निराकरण करून घेतले. यावेळी माझी मुलगी सौ सारिका आमच्यासोबत आली होती.

दोन तीन दिवस आधीपासूनच प्रवासाची तयारी सुरु होती. आठवणीने प्रत्येक गोष्ट घ्यावी लागत होती. कुठेही जायचे तर हल्ली आधार कार्ड, फोटो इ. गोष्टी लागतातच. ते आठवणीने घेतले. तिथे थंडी असणार असे आम्हाला सांगितले गेले होते. त्यामुळे थंडीचे कपडे, बूट मोजे या सगळ्या गोष्टी आवर्जून घेणे भाग पडले. विमानतळावर सामान चेक होते म्हणून लगेज बॅगमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या, केबिन बॅग मध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या याचा विचार करून बॅगा भरल्या जात होत्या. १९ एप्रिलचा दिवस अक्षय तृतीयेचा होता. पण आमच्या प्रवासाची सुरुवातच त्या दिवशी होणार होती. मनात म्हटले ‘ प्रत्येक वेळी अक्षय तृतीया आपण घरीच साजरी करतो. यावेळी ती प्रवास करून साजरी करू या. १९ तारखेला पहाटे तीन वाजताच उठावे लागले. पुण्याहून सकाळी साडेसात वा. इंडिगो विमानाने प्रवास ठरला होता. साडेचारला तयार होऊन कॅबने विमानतळावर पोहोचलो.

चेकिंगच्या सर्व सोपस्कारातून यशस्वीपणे पार पडलो. आमचे विमान येणार त्या नियोजित गेटजवळ येऊन थांबलो. आमचा एकूण १८ जणांचा ग्रुप होता. त्यातील दोन व्यक्ती मुंबईहून परस्पर येणार होत्या. आमच्याजवळ असलेल्या कंपनीच्या ठराविक हॅन्डबॅग आणि कॅप यांच्या साहाय्याने विमानतळावरच आम्ही आमच्यासोबत सहलीला येणाऱ्या सहप्रवाशांना ओळखले. बरोबर पावणेसातच्या सुमारास आम्हाला विमानात प्रवेश देण्यात आला. आणि ठरलेल्या वेळेला म्हणजे सकाळी साडेसातला विमानाने हवेत झेप घेतली. ९. ४५ ला आम्ही दिल्ली विमानतळावर होतो. तिथून सामान घेऊन बाहेर पडल्यानंतर आम्हा सर्वांना एका ठिकाणी थांबण्यास सांगितले होते.

आमचा टूर मॅनेजर अक्षय गुप्ता बाहेर आमच्या स्वागतासाठी उभाच होता. त्याने आपल्या सहज संवाद साधण्याच्या पद्धतीने थोड्याच वेळात आम्हा सगळ्यांना आपलेसे केले. थोड्याच वेळात गिरिकंदची बस आली. आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि आमचा दिल्ली ते भीमताल असा प्रवास सुरु झाला. हा प्रवास साधारणपणे ७ ते ८ तासांचा आहे. दिल्ली ते भीमताल हे अंतर ३११ किमी आहे. आमची बस दिल्लीतील प्रमुख रस्त्यांवरून धावत होती. अकबर रोड, इंडिया गेट, दिल्लीतील vip लोकांचे बंगले आमच्या दृष्टीस पडत होते. आमचा टूर मॅनेजर अक्षय आम्हाला अधूनमधून त्याबद्दल माहिती देत होता. एकदा मध्ये थांबून चहा नाश्ता झाला. परत एकदा जेवणासाठी बस एका ठिकाणी थांबली. त्याठिकाणी उत्तम गरमागरम जेवणाचा आनंद सर्वांनी घेतला. उत्तर प्रदेश मधून उत्तराखंडकडे बस धावत होती. आम्ही जाणार होतो तो सगळा भाग कुमाऊं रिजनमध्ये येतो. हा सगळा भाग हिमालयाच्या पर्वतराजीने समृद्ध आणि नटलेला आहे. दिल्लीतून बाहेर पडताना मोठमोठे फ्लायओव्हर्स, अनेक पदरी रस्ते होते. त्यामुळे बस भराभर पुढे वाटचाल करीत होती. एकामागून एक गावे मागे पडत होती.

उष्ण प्रदेश मागे टाकून आमची वाटचाल थंड प्रदेशाकडे होत होती. लवकरच हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये बसने प्रवेश केला. मोठे भव्य रस्ते आता मागे पडून पहाडातील अरुंद रस्ते दृष्टीस पडत होते. साहजिकच बसचा वेगही कमी झाला होता. घाटातील रस्त्यांवर आमच्या बसचा ड्रायव्हर अतिशय कौशल्यपूर्वक बस चालवत होता. शहरी वर्दळ, इमारतींचे जंगल मागे पडले होते. खरेखुरे जंगल आणि हिरवीगार वृक्षराजी आमचे मन मोहून घेत होती. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्षांमध्ये जणू स्पर्धा लागली होती. त्यामुळे एकमेकाला न दुखवता ते आपली उंची वाढवत होते. दुसऱ्याच्या पुढे जायचे असेल तर त्याची रेघ लहान न करता आपली रेघ मोठी करावी हेच वृक्ष अप्रत्यक्षरीत्या तर सांगत नव्हते ? 

आता संध्याकाळ होत आली होती. नैनितालपासून साधारण बावीस किमी अलीकडे असणाऱ्या भीमताल या ठिकाणी आमचा आजचा मुक्काम होणार होता. बसने आता भीमताल या ठिकाणी प्रवेश केला आणि तिथे ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होणार होता, त्या हरशिखर हॉटेलच्या दिशेने आमची बस धावत होती. हॉटेल हरशिखर उंचावर आहे. शिखरच जणू ! तिथे पोहोचले आणि तिथून जे काही दृश्य डोळ्यांना दिसले, त्यामुळे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले. जणू स्वर्गच धरतीवर अवतरला होता !हॉटेलच्या समोरच भीमताल लेक होते. त्याच्या पाठीमागे हिमालयीन पर्वतराजी. सरोवरातील पाणी, त्यात पडलेले मावळत्या सूर्याचे मनमोहक प्रतिबिंब या सगळ्यांवरून नजर हटत नव्हती. सगळ्यांचे कॅमेरे फोटो काढण्यात व्यस्त होते. कोणत्याही अँगलने कोठलाही फोटो घ्या. तो छानच येणार यात काही शंका नव्हती.

हॉटेलच्या प्रवेशद्वारापर्यंत थोडेसे चालत जावे लागते. या रस्त्यात आणि हॉटेलमधील प्रत्येक ठिकाणी विविधरंगी फुले लक्ष आकर्षून घेत होती. निसर्गाने आपल्या सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेली होती. हा फोटो घेऊ की तो घेऊ असे प्रत्येकाला झाले होते. आता अंधार पडत आला होता. इथे संध्याकाळ इतकी छान दिसते तर सकाळ कशी असेल हा प्रश्न मला पडला होता. पण आम्ही भाग्यवान होतो. सकाळी हा सगळा नजारा आम्हाला मनसोक्त बघायला मिळणार होता. दोन दिवस आमचा इथे मुक्काम होणार होता. हॉटेलच्या स्टाफने आम्हा सर्वांचे हसतमुखाने आणि मनापासून स्वागत केले. वेगवेगळ्या फ्लेवरची सरबते आम्हाला दिली गेली. ज्याला जे आवडेल, ते त्याने घ्यायचे. हॉटेलच्या रुमदेखील अतिशय देखण्या आणि स्वच्छ. अत्यंत सुखद असे थंड वातावरण होते. रात्री विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. उद्याचा दिवस कसा असेल असा विचार करीत झोपी गेलो. दिवसभरचा प्रवासाचा थकवा असल्याने केव्हा निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेही नाही.

– क्रमशः भाग पहिला 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – पग-पग नर्मदा यात्रा – भाग – ३४ ☆ श्री सुरेश पटवा ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। अब आप प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकते हैं यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर)

? यात्रा संस्मरण – सगरमाथा से समुन्दर – पग-पग नर्मदा यात्रा – भाग- ३४ ☆ श्री सुरेश पटवा ?

7.पग-पग नर्मदा यात्रा

तिलवारा घाट से भेड़ाघाट: 14 अक्टूबर 2018…

रामायण काल में राम को केवट ने नदी पार कराई थी। निषाद राज उन्हें दूर तक छोड़ने गए थे उनसे उनके वनराज्य में वनवास बिताने का आग्रह करते रहे परंतु राम न रुके। महाभारत काल में वे धीवर कहलाने लगे। महाभारत कथा की जड़ में एक धीवर कन्या सत्यवती ही है। उसके लिए कौरव-पांडव से थोड़ा पीछे जाना पड़ेगा। चद्रवंशी राजाओं में एक प्रतापी राजा हुए थे शान्तनु, उनका राज्य गंगा के दोनों किनारों पर फैला हुआ था। वे अक्सर गंगा किनारे घूमने जाया करते थे। गंगा नदी देवी रूप में प्रकट होकर उनसे मिलीं तो वे उन पर आसक्त हो गए। विवाह का निवेदन किया जिसे गंगा ने नकार दिया लेकिन दैहिक सम्बंध आज की सहनिवासी (Living Together) तर्ज़ पर स्थापित हो गए। गंगा ने शर्त रखी कि वह जो कुछ भी करेगी शान्तनु कोई प्रश्न नहीं करेंगे। यदि सवाल किया  तो वे उन्हें छोड़कर चली जाएँगी। उनके सात पुत्र हुए जिन्हें पैदा होते ही गंगा ने नदी को अर्पित कर दिए उन सात पुत्रों की कहानी सप्त ऋषियों के उद्धार से जुड़ी है। जब आठवाँ पुत्र हुआ तो शान्तनु से नहीं रहा गया। उन्होंने गंगा को टोक दिया। गंगा ने वह पुत्र शान्तनु को दे दिया और हमेशा के लिए चलीं गईं। उस पुत्र का नाम देवव्रत रखा गया। वे बाद में भीष्म पितामह कहलाए।

एक मत्स्यगंधा धीवर कन्या सत्यवती अपने पिता के साथ यमुना में नाव खेती थी। एक दिन उसके पिता नदी किनारे नहीं थे वह अकेली नाव पर बैठी थी। तभी पाराशर ऋषि आए उन्होंने उससे गंगा पार उतारने का निवेदन किया। पिता जी को आने में विलम्ब हो रहा था अतः सत्यवती ख़ुद नाव खे कर पाराशर ऋषि को गंगा में उतर गई। गंगा का पाठ चौड़ा था। सत्यवती का उत्तरीय उसके वक्ष से उड़-उड़ जा रहा था उसने उत्तरीय को क़स कर कमर में बाँध लिया। अब उसके वक्ष पर एक कंचुकी भर थी। वह पसीने से तरबतर नाव खेते जा रही थी। पसीने से उसकी कंचुकी का अस्तित्व समाप्त सा हो देह का उभार निखर आया, उसकी बाहों की गोलाई और वक्ष की कसावट पर पाराशर ऋषि की निगाह पड़ी। उसके गीले बदन से मत्स्य गन्ध की मादकता पाराशर ऋषि की नथुनों में समायी तो वे कामाशक्त हो गए। सत्यवती भी ऋतुश्राव से निवृत हुई थी। नाव में समागम हुआ जिससे वेद व्यास जी का जन्म हुआ, जिन्होंने महाभारत लिखी थी। इस वास्तविक घटना को तर्क-वितर्क का जामा कथावाचक पहनाते रहते हैं कि सत्यवती की देह से आती दुर्गंध से निजात पाने के लोभवश वह तैयार हुई थी। पाराशर ऋषि और सत्यवती मिलन से  वेद व्यास का जन्म हुआ था। पाराशर ऋषि सत्यवती को छोड़कर सन्यासी की राह चले गए।

राजा शान्तनु के जीवन से गंगा जा चुकी थी वे नदी किनारे उदास घूमते थे। उनकी निगाह सत्यवती पर पड़ी और सत्यवती ने उनको देखा। प्रेम अंकुर फूटते देर न लगी। शान्तनु ने उसके पिता से विवाह का प्रस्ताव रखा तब तक गंगापुत्र देवव्रत को अगला राजा बनाना तय हो चुका था। सत्यवती के पिता ने विवाह के लिए शर्त रखी कि सत्यवती की संतान ही अगला राजा बनेगी,  जिसे शान्तनु ने मान लिया। फिर सवाल उठा कि देवव्रत की संतान भी राजा का दावा कर सकती है। शान्तनु चुप रह गए। पिता को उदास देखकर देवव्रत ने प्रतिज्ञा की, कि वह आजीवन अविवाहित रहकर सिंहासन की सेवा करेंगे। उस भीष्म प्रतिज्ञा से वे भीष्म कहलाए। शान्तनु और सत्यवती से एक पुत्र विचित्रवीर्य नाम का हुआ। उसके विवाह के लिए काशी राजा की तीन कन्याओं अम्बे, अम्बा और अम्बालिका को भीष्म भरे स्वयंवर से उठा लाए। अम्बे का प्रेम प्रसंग किसी अन्य राजकुमार से था तो उसे वापस जाने दिया। उसे प्रेमी राजकुमार ने नकार दिया तो वह शिखंडी बनी। अम्बा और अम्बालिका से संतान पैदा नहीं हो रही थी। सत्यवती ने पाराशर ऋषि से उत्पन्न अपने पुत्र वेद व्यास से नियोग द्वारा अम्बा से धृतराष्ट्र और अम्बालिका से पाण्डु पैदा करवाए और एक दासी से विदुर पैदा हुए। यहीं महाभारत युद्ध की नीव पड़ गई। धीवर कन्या सत्यवती कौरव-पांडव की राजमाता थीं। पुराणों में आर्य-अनार्य सम्मिलन की अनेकों घटनाओं में से यह एक घटना है। यही हमारा पौराणिक इतिहास है। धीवर आदिवासी कन्या थी। आदिवासी प्रारम्भ से भारत के निवासी रहे थे आर्यों ने उनको अपने में मिलाने के लिए बेटी व्यवहार का तरीक़ा अपनाया था।

राजा दुष्यंत की कहानी में कालिदास ने शकुंतला की अँगूठी ढीमर द्वारा पकड़ी गई मछली के पेट में मिली बताई थी। उस समय तक धीवर नाम बदलकर ढीमर हो चुका था। मध्ययुग में वही ढीमर बड़ी-बड़ी नाव गंगा में खेने लगे थे अतः वे मल्लाह कहलाने लगे। अंग्रेज़ों के आने के बाद बंगाल में डोली उठाने के लिए और लुटेरों के क़हर से निपटने के लिए वे मेहनतकश लोग कहार कहलाने लगे। उन्नीसवीं सदी में अंग्रेज़ों ने आसाम में चाय के बाग़ लगाए तब कलकत्ता से उन मल्लाहों को आसाम ले गए वहाँ मल्लाहों ने एक प्रचलित ब्राह्मण उपनाम बरुआ अपना लिया क्योंकि उनको लाने वाला एक बरुआ ब्राह्मण ही था और अंग्रेज़ उन्हें बरुआ कहकर बुलाते थे। अतः निषाद समाज बरौआ कहलाने लगा। उन्ही बरुआ को त्रिपुरा में बर्मन बुलाते थे। जैसे सचिन देव बर्मन और उनके पुत्र आर.डी.बर्मन। आज़ादी के बाद बरौआ शब्द बर्मन में बदल गया। नर्मदा किनारे के सभी नाविक अब बर्मन कहलाना पसंद करते हैं।

इस समाज को कहीं आदिवासी माना जाता है, कहीं हरिजन और कहीं पिछड़ा वर्ग। इनके बच्चे बचपन से ही शराब, जुआँ और ग़लत लतों में पड़कर चालीस साल की उम्र तक बुढ़ा जाते हैं। शाम होते ही कच्ची शराब की गन्ध, बिड़ी के धुए के साथ, भूनी मछली की महक इनके गाँवों के आसपास फैलने लगती है। राजनीतिज्ञों के लिए इस समाज के लड़के प्रचार-प्रसार के लिए कच्चा माल हैं। सभी राजनैतिक दल मंच सजाने, भीड़ जुटाने, दौड़ भाग में इनका उपयोग ख़ूब खुलकर करते हैं। इनके जवान बच्चे 2,000-3,000 रुपए मासिक पर मिल जाते हैं। नेताओं की गाड़ियों में भरकर बाहुबली प्रदर्शन में इनका उपयोग किया जाता है। परिक्रमा के दौरान ये लोग खेतों को गोडकर रबी की फ़सल के लिए खेतों को तैयार करते नज़र आए। कुछ युवक ग़ैरक़ानूनी रूप से रेत माफ़िया के लिए नावों में रेत भरते नज़र आए। राजनीतिज्ञ, अफ़सर, पुलिस और पत्रकारों का एक नेक्सस याने गिरोह बन गया है जो बड़ी बेरहमी से नर्मदा के पेट से रेत निकाल कर उसके प्राकृतिक स्वरूप को बिगाड़ने में लगा है। बर्मन समाज भी उनके विरुद्ध आवाज़ नहीं उठा सकता क्योंकि वे ख़ुद सरकारी ज़मीन पर क़ब्ज़ा जमाए खेती कर रहे हैं। यदि वे आवाज़ उठाएँगे तो अगले दिन ज़मीन से बेदख़ल। जिन लोगों पर भौगोलिक वातावरण को अक्षुण बनाए रखने की ज़िम्मेदारी है वे ख़ुद मिलकर उसे उजाड़ने में लगे हैं। जब बागड ही खेत खाने लगे तो फिर सुअरों की आवश्यकता नहीं रह जाती। इस मामले में जनता में कोई जागृति नहीं है। नर्मदा के बहाव की दिशा में किनारे पर बेशुमार पोलिथिन और प्लास्टिक बोरियाँ पेड़ों पर लदी हुई मिलीं। रेत खनन और पोलीथिन प्लास्टिक से नर्मदा की नैसर्गिकता को जो भयानक नुक़सान हो रहा है उसकी भरपाई मुश्किल है।

शाम को चार बजे धुआँधार पहुँच गए। डूंडवारा से पसर कर बहने वाली नर्मदा अचानक लजा कर सिमट गई। उसका पानी सिमट कर गहरे खड्ड में तेज़ी से गिरने लगा तो वह छोटे कणों में बदलकर धुएँ की शक्ल में दिखने लग गया। यही जबलपुर की शान धुआँधार जलप्रपात है। पंचवटी तट स्थित नेपाली कोठी, जहाँ हमारे ठहरने की व्यवस्था अरुण जी के रिश्तेदार सुधीर भाई ने की थी, वहीं रात्रि विश्राम किया। यहाँ से हमारे एक अन्य साथी अविनाश दवे भी जबलपुर लौट गये।

क्रमशः…

© श्री सुरेश पटवा 

भोपाल, मध्य प्रदेश

संस्थापक सम्पादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ७ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ७ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘वादी बानी खालिद’च्या नैसर्गिक तळ्यामध्ये बराच काळ आम्ही डुंबत आणि नैसर्गिक ‘पेडिक्युअर’ करून घेत राहिलो. आम्ही आल्यापासून तीन तास होत आले होते. आमचा पाय निघत नव्हता. पण वेळेचे भान ठेवून, पाण्यातून बाहेर पडावेच लागले. माझे सासरे, म्हणजे ती. दादा आमच्याबरोबर येऊ इच्छित नसल्याने ते मिनिबसमधेच थांबले होते. आम्ही परत येताच दादांची चौकशी केली. त्यांनी सांगितले की अल नसरने त्यांना केळी, केक आणि थंड पेय आणून दिले होते. शिवाय दोन वेळा त्यांना स्वच्छतागृहापर्यंतही नेऊन आणले होते. साधारण दादांच्या नातवाच्याच वयाच्या त्या ओमानी तरुणाने जणू काही स्वतःच्याच आजोबांची काळजी घेत असल्याप्रमाणे दादांना पाहिले होते हे जाणवून आम्ही भारावून गेलो.

संध्याकाळपर्यंत आम्ही मस्कतच्या ‘फ्रेझर स्युईटस’ मध्ये पुन्हा येऊन पोहोचलो. आमचे ओमानभ्रमण जवळजवळ पूर्ण झाले होते. पुढचा एक दिवस मस्कतमध्ये शॉपिंगसाठी राखीव होता आणि त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी मुंबईला परतायचे होते.

ओमानसफरीवर निघण्यापूर्वी, “ओमानला कसे काय चाललात?” “तिथे काही पाहण्यासारखे आहे का?” “अगदीच ऑफ-बीट जागा कशी निवडलीत तुम्ही?” असे अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले होते. त्या-त्या वेळी सुचतील ती उत्तरे देऊन आम्ही वेळ मारून नेली होती. परत आल्यावर मात्र, “भटो भटो, काय पाहिलंत?” असा प्रश्न कुणी विचारायच्या आतच आपण ‘ओमाननामा’ लिहून काढायचा असे ठरवून, मी ‘ओह मॅन’ हे प्रवासवर्णन लिहायला सुरुवात केली. ओमानमध्ये वेळोवेळी भेटलेल्या काही लोकांशी झालेल्या संवादाचे ओझरते उल्लेखच फक्त केले असल्याने त्याबद्दल जरासे विस्ताराने लिहिणे आवश्यक आहे.

ओमानमध्ये आम्हाला ठिकठिकाणी अनेक दक्षिण आशियाई लोक भेटले. अधिकांश लोक भारतीयच किंवा बांगलादेशी असल्यामुळे भाषेची अडचण कुठेच आली नाही. मस्कतमध्ये ‘फ्रेझर स्युईटस’च्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांशी येता-जाता गप्पा व्हायच्या. श्रीलंकेचा एक तरुण आणि एक तरुणी रोजच भेटत असत. आम्ही त्यांना म्हटले, “आम्ही गेल्या वर्षी मलेशियाला जात असताना, कोलंबोजवळच्या नेगोंबो या उपनगरात आम्ही एक रात्र राहिलो होतो. जाता-येताना जेवढे काही नेगोंबोचे दर्शन झाले ते फार छान होते आणि आम्हाला पुन्हा श्रीलंकेला जायची इच्छा आहे. ” आमच्याकडून हे शब्द ऐकताच, मातृभूमीच्या आठवणीने ते दोघेही अगदी हरखून गेले होते.

बांगलादेशी लोक तर आम्हाला ‘फ्रेझर स्युईटस’मध्ये, मस्कत किंवा सूरमधल्या कापड बाजारात, भाजी बाजारात आणि इतरही अनेक ठिकाणी भेटले. त्यावेळी नुकत्याच बांगलादेशात झालेल्या सत्तापालटासंबंधी आम्ही सहजच विचारल्यासारखे करून त्यांचे मत जाणून घेतले. जे झाले त्याबद्दल बहुतेकांनी हळहळ बोलून दाखवली. एका तरुणाने तर खूपच चीड व्यक्त करत म्हटले, “शेख मुजिबुर रहमान आणि त्यांची मुलगी शेख हसीना यांनी आमच्या देशासाठी जे केले, त्याला तोड नाही. अमेरिकेने फुसलावून आमचा देश भडकवलेला आहे आणि सत्तापालट करवून आणलेला आहे. पण आज ना उद्या, जनता त्यांना योग्य उत्तर नक्की देईल! “

सूरमधल्या हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर, सफाईदार इंग्रजीत बोलणारी एक तरतरीत पाकिस्तानी महिला गिरीशला भेटली होती. आम्हाला हॉटेलांमधून भेटलेल्या सर्वच मुला-मुलींनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले असल्याने, गिरीशने तिलाही विचारले, “तू कुठे ग्रॅज्युएशन केलेस? पाकिस्तानातच का?” त्यावर ती हसून म्हणाली, “सर, यू विल नॉट बिलीव्ह, पण मी फक्त चौथीपर्यंत शिकलेली आहे! ” काहीशा अविश्वासानेच गिरीशने तिच्याबद्दल माहिती विचारली. तिने सांगितले की पाकिस्तानात झेलम नदीच्या पश्चिम तीरावरच्या ‘झेलम’ नावाच्या (भारत-पाक सीमेजवळच्या) गावी तिचा जन्म झाला होता. वडील तिच्या लहानपणीच वारले होते. केवळ कानावर पडेल ते ऐकून-ऐकून ती इंग्रजी बोलायला शिकली होती. कुणाच्या तरी मदतीने, दुबईमध्ये काम करण्यासाठी गेली आणि तिथे अंगावर पडेल ते काम करत तिने हळूहळू प्रगती केली. दुबईमध्ये तिने बरीच वर्षे काम केले होते. पण तिथल्यापेक्षा ओमानमध्ये कामाचे प्रेशर कमी आणि पगारदेखील चांगला असल्याने ती इथे आलेली होती. गिरीशने सहजच तिला पाकिस्तानबद्दल काही प्रश्न विचारले. पाकिस्तानात सर्वच बाबतीत, सैन्यदलांच्या असलेल्या वर्चस्वावर तिने खूप टीका केली. ती असेही म्हणाली की भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र होऊनदेखील आज भारत पाकिस्तानपेक्षा सर्वच बाबतीत कैक पटींनी वरचढ झाला आहे. पाकिस्तानातली एकंदर परिस्थिती इतकी वाईट आहे की तिच्या झेलम गावातल्या घराचे विजेचे बिल घरभाड्यापेक्षा जास्त येते!

ओमानमध्ये भेटलेल्या भारतीयांकडूनही आम्हाला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. सूरच्या हॉटेलात भेटलेली वेट्रेस शौमिता आणि सुपरवायझर शॉप्तर्षि चॉक्रोबॉरती या दोघांनीही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले होते. शौमिता मला म्हणाली की तिला प्रवासाची खूप आवड आहे. पण जगभर फिरता-फिरताच पैसे कमवण्याची तिची इच्छा होती. भारतात, तसेच सिंगापूर व मलेशियामध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ती ओमानमध्ये आली होती. शॉप्तर्षिनेही भारतात नोकरी केली होती व काही काळ तो पुण्याजवळ शिरूरला राहिलेला होता. श्री. मित्रा नावाचे एक बंगाली गृहस्थ सूरमधल्या त्या हॉटेलचे जनरल मॅनेजर होते. त्यांच्या शिफारशीने अनेक बंगाली कर्मचारी त्या हॉटेलात नोकरीसाठी आलेले होते. एक केरळी कर्मचारी तर त्याच हॉटेलात गेली २५ वर्षांहून अधिक काळ कामाला आहे!

वाहिबा सँड्स वाळवंटामधल्या Thousand Nights कँम्पमध्येही काळे नावाचे नाशिकचे गृहस्थ जनरल मॅनेजर होते. त्यांच्या ओळखीने अनेक मराठी मुले तिथे कामाला लागलेली होती. नाशिकच्या एयरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट (AHA) कॉलेजमध्ये शिकलेली आणि ओमानमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरी करत असलेली किमान १५ ते १८ मुले-मुली आम्हाला भेटली. जेमतेम २१ वर्षे वयाच्या त्या मुलांना वर्षातून एकदा भारतात जाण्या-येण्याचा विमानखर्च मिळत होता. कँम्पमध्येच राहून व जेवूनखाऊन, दरमहा सुमारे पंधरा ते पंचवीस हजार रुपये (करमुक्त) त्यांना वाचवता येत होते. जगभरातल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव मिळत होता तो वेगळाच! त्या सगळ्या मुलांकडून एकमुखाने हेच ऐकू आले की या देशातली कार्यसंस्कृती खूपच चांगली आहे.

ओमानमध्ये आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मोठमोठ्या जाहिरातींचा एकही बोर्ड आम्हाला दिसला नाही. रस्त्यांवर प्लास्टिकचा कचरा किंवा घाण पडलेली नव्हती. शहरांमध्ये स्वच्छ उद्याने होती. अगदी लहान गावांमध्येही सरकारी शाळांच्या पक्क्या आणि नेटक्या, दुमजली, वातानुकूलित इमारती होत्या. प्रत्येक शाळेच्या आवारात खेळांची मैदाने, तसेच अगदी लहान मुलांसाठी घसरगुंड्या/झोपाळे वगैरे होते. दुकानांमध्ये आणि इतरत्र ठिकठिकाणी पुरुषांसोबत बायकादेखील काम करीत होत्या. आम्हाला जागोजागी दिसलेले-भेटलेले ओमानी लोकदेखील मृदुभाषी वाटले. संयुक्त अरब अमिरातीप्रमाणेच ओमानमध्येही खनिज तेलाचा मुबलक पैसा आहे. इथेही अनेक श्रीमंत लोक आहेत. मस्कतमध्ये मोठमोठे मॉलही आहेत. पण आम्हाला कुठेही श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन दिसले नाही किंवा कुणामध्येही पैशाचा माज जाणवला नाही. कदाचित ओमानमध्ये शिक्षणाला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा तो परिणाम असू शकेल, किंवा या देशाची एकंदर संस्कृतीच अशी असेल.

ओमानमध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे, आणि त्या देशाकडून खूप काही शिकण्यासारखेही आहे.

आमच्या ओमान सफरीबद्दल ऐकून एक मित्र मला म्हणाला, “बापट, हाऊ डिड यू गो टू ओमान, ऑफ ऑल द प्लेसेस?”

मी त्याला इतकेच म्हणालो… “ओह मॅन , यू टू मस्ट गो देअर वन्स! “

– समाप्त – 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ६ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ६ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘Thousand Nights’ कँम्पच्या समोर आमची गाडी थांबली आणि वाळवंटात अचानक समोर दिसलेले ते ‘रिसेप्शन लाउंज’ पाहून गंमतच वाटली. आजच्या जमान्यात प्राणवायूइतकेच अत्यावश्यक झालेले ‘वाय-फाय’ कनेक्शन इथे उपलब्ध आहे म्हटल्यावर ‘हुश्श’ झाले. काउंटरवरची मुलगी ‘वाय-फाय’चा पासवर्ड सांगू लागताच, तिच्या उच्चारांची ढब मला ओळखीची वाटली. सहजच मी तिच्याकडे पाहून म्हटले, “अरे वा! सोप्पा पासवर्ड आहे” त्यावर डोळे विस्फारत ती शुद्ध मराठीत म्हणाली, “हो SSS ! अगदीच सोपा आहे!” ती नाशिकची ईशा नावाची मुलगी होती. तिच्याच शेजारी असलेला, नाशिकचाच हर्षवर्धनही लगबगीने पुढे आला. ओमानच्या वाळवंटी रिसॉर्टमध्ये आमच्या चक्क मराठीत सुरू झालेल्या गप्पा आवरत्या घेणे भाग होते, कारण सूर्यास्ताच्या आत आम्हाला वाळवंटातले काही विशेष अनुभव घ्यायला जायचे होते.

खास वाळवंटात चालणाऱ्या स्कूटरवरून किंवा उंटांवरून फेरफटका मारता येणार होता, ‘Dune Bashing Ride’ घेता येणार होती. अर्थात, यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार होते. Dune Bashing म्हणजे काय, तर एका ४ X ४ गाडीत बसवून वाळूच्या टेकड्यांवर रफ राईड! आर्मीच्या नोकरीत असताना, ईशान्य भारतात आणि राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या ‘रफ राइड्स’ मी केलेल्या असल्याने, पैसे भरून हाडे खिळखिळी करून घ्यायची मला अजिबात इच्छा नव्हती.

सर्वप्रथम ताजे-तवाने होण्यासाठी आम्ही तंबूत गेलो. त्या वातानुकूलित तंबूमध्ये सर्व पंचतारांकित सोयी होत्या. खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. मी आणि गिरीश पाय मोकळे करायला अल नासरसोबत बाहेर पडलो. स्वाती दादांजवळ थांबली. अल नासर सहजच म्हणाला, “चला, आपल्याच गाडीतून तुम्हाला सूर्यास्त पाहायला नेतो. कोणत्या पॉईंटवरून बेस्ट दिसेल ते मला माहिती आहे !”

जो अनुभव पैसे भरून मी घेणार नव्हतो, तो फुकटात (आणि मुख्य म्हणजे आम्हाला हव्या त्या वेगाने) घ्यायला मिळतोय म्हटल्यावर आम्ही आनंदाने निघालो. वाळूच्या टेकडीवर चढायला रस्ता असा नव्हताच, पण घाटामध्ये घेतात तशी वळणे घेत-घेत गाडी सफाईदारपणे चढत निघाली. पण टेकडीवर गेल्यावर मात्र ‘योग्य जागे’च्या शोधात अनेक खड्ड्यांमधून आणि उंचवट्यांवरच्या अरुंद मार्गावरून आमचा बैदू चालक हिंडत निघाल्यामुळे आम्हालाही थोडेफार Dune Bashing करता आले. अर्थात, वेग जास्त नसल्यामुळे हाडे मात्र शाबूत राहिली! गाडीतून अनवाणी पायांनी उतरल्यावर मऊसूत वाळूत पावले लोळवत फिरायलाही मजा आली. अल नसरला अचानक मला ‘शेख’ बनवण्याची हुक्की आल्याने त्याने माझ्या डोक्यावर खास ओमानी पद्धतीचा फेटा बांधून माझा फोटोही काढला!

आसपास चिटपाखरूही नव्हते. वाऱ्यामुळे वाळूच्या टेकडीच्या कपाळावर पडलेल्या सुबक आठ्या मोजण्यात, आणि त्यावरून चालत गेलेल्या किड्यांच्या पायांच्या ठशांचा माग काढता-काढता, माझ्या आयुष्याची अनेक वर्षे नकळतच गळून पडली आणि मी पुन्हा शाळकरी मुलगा झालो! हळूहळू खाली जात चाललेल्या सूर्याकडे पाहत, ‘कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा’ असे म्हणेपर्यंत निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसल्यानंतर अल नसरने घोषणा केली की आता आपण वळणे-वळणे घेत नव्हे तर वाळूच्या उभ्या कड्यावरून सरळ खाली उतरणार आहोत! कड्यांवरून गाड्या चढवण्या-उतरवण्याच्या अशा ‘साहसी खेळां’चे व्हिडिओ मी पूर्वी पाहिले होते, पण अनुभव कधीच घेतलेला नव्हता. जी टेकडी चढायला आम्ही १५ मिनिटे घेतली होती, ती अक्षरशः तीस सेकंदात उतरून आम्ही खाली आलो आणि पुढच्या दोन मिनिटात कँम्पमध्ये परत पोचलोदेखील! तो अनुभव थरारक खरा, पण पुन्हा-पुन्हा घ्यावासा वाटण्यासारखा होता.

वाळवंटातली संध्याकाळ तिथल्या दिवसाच्या तुलनेमध्ये खूपच आल्हाददायक असते, कारण तापमान बरेच खाली येते. रिसेप्शनला लागूनच एक ‘कँम्प फायर’ची जागा होती. तिथे सात वाजल्यापासून शेकोटी पेटवलेली होती. त्या भोवती गोल रिंगण करून गाद्या घातलेल्या होत्या. लोक शांत बसून ‘माहौल’ चा आनंद घेत होते. शेजारी काही बैदू लोक आगीवर भाजलेल्या छोट्या-छोट्या गरम रोट्या खायला देत होते. तिथेच भेटलेल्या मुंबईच्या एका तरुण जोडप्याबरोबर माझ्या छान गप्पा झाल्या. ते नवरा-बायको उत्साही पर्यटक होते आणि आजवर दोघे-दोघेच अनेक देश हिंडलेले होते. आता तर त्यांच्या वर्षभराच्या तान्ह्या मुलाला सोबत घेऊन, स्वतःच भाड्याची गाडी चालवत ओमानमधे सगळीकडे हिंडत होते! 

जवळच जेवणाच्या हॉलमध्ये बुफे लावलेला होता. पंचतारांकित हॉटेलात असतात तशा प्लेट्स, काटे-चमचे आणि सजावट होती. जेवणाचा मेनूदेखील पंचतारांकित आणि भरगच्च होता. तिथे जेवण बनवणारे, बुफे लावणारी मुले आणि तिथला केटरिंग व्यवस्थापक हे सगळे भारतीय व बांगलादेशी होते. त्यामुळे आमची विचारपूस ते अधिक आपुलकीने करीत होते. व्यवस्थापकानेही आवर्जून येऊन आम्हाला काय हवे-नको ते विचारून तशी सोय केली.

जेवण झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एका हेलिपॅडवर गेलो. अहमद नावाचा एक खगोलशास्त्राचा अभ्यासक आमच्यासोबत होता. आसपास मनुष्यवस्ती अजिबात नसल्याने गडद अंधार होता. आकाशदर्शनाची मला तशी फारशी कधी गोडी लागलेली नाही. पण अहमद इतक्या उत्साहाने सगळी माहिती सांगत होता की मलाही त्यात रस वाटला.

अल नासरने रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला बजावून सांगितले की, “उद्या मस्कतच्या वाटेवर, ‘वादी बिन खालिद’ या जागी आपण थांबायचे आहे. तिथल्या स्वर्गीय अनुभवासाठी तुम्हाला तीन तास देखील कमीच पडतील. त्यामुळे इथून सकाळी लवकर निघू या. ” 

‘वाहिबा सँड्स’ मधल्या ‘Thousand Nights’ कँम्पची सकाळ जराशी थंड होती आणि आसपासचे वाळवंट धुक्याची चादर लपेटून शांत बसलेले होते. स्वाती नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर फिरायला गेलेली होती. पण बराच वेळ ती न आल्याने मला जरा काळजीच वाटू लागली. तिचा फोनही लागत नव्हता. काही वेळानंतर ती परत येताना मला दिसली. चालता-चालता अचानक ‘धुक्यात हरवली वाट’ अशी तिची अवस्था झाली होती. मोकळ्या वाळवंटात दिशाहीन भटकण्याचा थरारही काही काळ तिने अनुभवला होता!

कँम्पमध्ये भरपेट नाश्ता करून आम्ही ‘वादी बानी खालिद’च्या वाटेला लागलो. या वादीमध्ये पाण्याचे बारमाही झरे आहेत. खडकांमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्याची, काही खोलगट भागांमध्ये लहान-लहान तळी झालेली आहेत. ओमानवासीयांसाठी असे ठिकाण म्हणजे पर्यटनाचे एक मोठे आकर्षणस्थळ असल्यास काय नवल?

गाडी मुख्य रस्त्यावर ठेवून, एका उंच-सखल व खडकाळ रस्त्याने, सुमारे चार-पाचशे मीटर चालत झऱ्यापर्यंत जायचे होते.

दोनेकशे मीटरवर जरासे विस्तीर्ण तळे दिसले. “स्थानिक रीती-रिवाजानुसार, संपूर्ण अंगभर कपडे घालूनच तळ्यामध्ये पोहणे अपेक्षित आहे” अशा मजकुराचे बोर्ड तळ्याजवळ लावलेले होते. अल नासरने आम्हाला आधीच सांगितले होते की ज्या स्त्री-पुरुषांना पोहण्याच्या वेषात (Swimming Costumes घालून) डुंबायचे असेल त्यांनी पुढे झऱ्याजवळच्या भागात जावे. त्यामुळे, जराश्या उंचीवर असलेल्या धबधब्याकडे आम्ही चढत गेलो. डोंगरातून पडणारा धबधबा आणि त्याचे स्वच्छ निळेशार पाणी पाहताच आमचे मन उल्हसित झाले.

पाण्याच्या एका बाजूच्या कड्यालगत, एका व्यक्तीला जेमतेम उभे राहून कपडे बदलता येतील इतपत मोठे असे दोन तंबू लावलेले होते. “तंबू वापरल्यास पेटीमध्ये स्वेच्छेने काही पैसे टाकावेत” असे लिहिलेली एक दानपेटी बाहेर ठेवलेली होती. मात्र, कोणीही मनुष्य पैसे-वसुलीसाठी तिथे नव्हता. हे पाहून मला जरा नवलच वाटले.

पाण्याची खोली कडेकडेने पायाच्या घोट्याएवढी, तर प्रवाहाच्या मध्यभागी, काही ठिकाणी ८-१० फुटांइतकी होती. ते निळे पाणी इतके स्वच्छ होते की तळातले सफेद, गुळगुळीत गोटे आणि पाण्यात पोहत असलेले लहान-लहान मासे अगदी सहज दिसू शकत होते.

क्षणार्धात मला जाणवले की अनेक लहान-लहान माश्यांनी माझ्या पावलांना बारीक-बारीक चावे घ्यायला सुरुवात केली होती. आधी जरा विचित्र वाटले खरे, पण थोड्या वेळाने सवय झाली. चावे घेऊन तळपायाची मृत कातडी ते मासे खाऊन टाकतात आणि आपले पाय स्वच्छ होतात. त्या नैसर्गिक ‘पेडिक्युअर’चा लाभ घेत मी बराच वेळ तिथे उभा राहिलो. देशोदेशीचे लोक वादी बानी खालिदमध्ये डुंबायला आलेले होते. एक वयस्कर बाई आणि तिच्यासोबतची काही मंडळी पूर्व युरोपमधल्या लिथुआनिया देशातले होते. एक मध्यमवयीन पुरुष, त्याची पत्नी आणि तरुण मुलगी केरळी हिंदू परिवारातले असावेत असा माझा कयास होता. त्यांच्यासोबत माझा काही जुजबी संवाद झाला. तो मनुष्य मूळचा केरळमधील पालघाट या गावाचा होता (आता त्या गावाला पालक्कड म्हणतात). पण गेली बरीच वर्षे तो ओमानमध्येच स्थायिक होता.

आमच्या जवळच, पंजाबी-मिश्रित हिंदी भाषेत बोलणारी काही मुले लाईफ जॅकेट्स घालून कड्यावरून पाण्यात उड्या टाकत होती. प्राची खोल पाण्यात जायला बिचकत असल्याने त्यातल्या एका तरुणाला, त्याचे जॅकेट थोडा वेळ वापरायला देण्याची विनंती केली. परंतु, “यहाँ बाहर ही किराए पर आपको मिल जायेगा” असे उत्तर मिळाले. नंतर त्याला काय वाटले कोण जाणे? त्याने वरूनच ते जॅकेट टाकले. आम्ही त्याला ‘धन्यवाद” असे म्हणताच तो तरुण प्रसन्नतेने हसला आणि म्हणाला, “हम पाकिस्तान से हैं, पर आप के दुश्मन नहीं है!” 

– क्रमशः भाग ६  

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ चीन की ग्रेट वॉल- एक अद्भुत अनुभव ☆ डॉ प्रतिभा मुदलियार ☆

डॉ प्रतिभा मुदलियार

☆ संस्मरण ☆ चीन की ग्रेट वॉल- एक अद्भुत अनुभव ☆ डॉ प्रतिभा मुदलियार ☆ 

प्रिय अर्नेस्टा मोशा,

आज का इमेल मोशा के नाम है।

चीन जाने से बहुत पहले ही मेरे मन में उस देश के प्रति एक विशेष आकर्षण था। बचपन से ही इतिहास और यात्राओं से संबंधित पुस्तकें पढ़ने की आदत रही है। उन्हीं दिनों कभी रेशम मार्ग (Silk Route) की कथाएँ पढ़ीं, कभी बौद्ध भिक्षुओं फाह्यान और ह्वेनसांग के भारत-आगमन के वृत्तांत, तो कभी महान दीवार और निषिद्ध नगर (Forbidden City) के चित्र देखे। उन पन्नों में उभरता चीन मुझे हमेशा एक रहस्यमय, प्राचीन और अनुशासित सभ्यता के रूप में दिखाई देता था। लगता था कि यह ऐसा देश है जहाँ हजारों वर्षों का इतिहास और आधुनिक विकास एक साथ चलते हैं। भारत में रहते हुए चीन के बारे में हमारी जानकारी प्रायः कुछ निश्चित बातों तक सीमित रहती है। उसकी विशाल जनसंख्या, प्राचीन संस्कृति, चीनी मिट्टी के बर्तन, रेशम, चाय और महान दीवार। मुझे ज्ञात था कि वह संसार के सबसे अधिक जनसंख्या वाले देशों में से एक है, जहाँ करोड़ों लोग मुख्यतः मंदारिन (Mandarin) भाषा बोलते हैं। यह भी सुन रखा था कि चीनी भाषा की लिपि वर्णमाला पर आधारित न होकर चित्रात्मक चिन्हों पर आधारित है, जिसके हजारों अक्षर होते हैं। मुझे हमेशा आश्चर्य होता था कि इतनी जटिल प्रतीत होने वाली भाषा में लोग कितनी सहजता से संवाद करते होंगे। चीन के खान-पान के बारे में भी अनेक धारणाएँ थीं। नूडल्स, डम्पलिंग्स, ग्रीन टी और विविध प्रकार के व्यंजन इन सबकी चर्चा सुन रखी थी, परंतु वास्तविक चीन कैसा होगा, यह जानने की उत्सुकता बनी रहती थी। वहाँ के लोग कैसे होंगे? क्या वे उतने ही औपचारिक होंगे, जितना उनके बारे में कहा जाता है? उनकी दिनचर्या, पारिवारिक जीवन और सांस्कृतिक परंपराएँ कैसी होंगी? ऐसे अनेक प्रश्न मन में उठते रहते थे।

विश्व के प्राचीनतम सभ्यता-केन्द्रों में भारत और चीन दोनों की गणना होती है। शायद इसी कारण चीन को देखने की इच्छा केवल एक पर्यटक की जिज्ञासा नहीं थी, बल्कि एक पड़ोसी और सांस्कृतिक रूप से समृद्ध राष्ट्र को निकट से समझने की आकांक्षा भी थी। जब तुमने बीजिंग में आयोजित संगोष्ठी में भाग लेने का प्रस्ताव रखा, तब मुझे लगा कि वर्षों से मन में संजोई हुई वह जिज्ञासा अब वास्तविक अनुभव में बदलने वाली है। और फिर वह दिन आया, जब विमान की खिड़की से नीचे फैली चीन की धरती पहली बार दिखाई दी। मुझे लगा जैसे इतिहास की किसी पुस्तक का एक पृष्ठ अचानक जीवंत होकर मेरे सामने खुल गया हो।

कभी-कभी कोई यात्रा हमारी स्मृतियों में केवल दृश्यों के कारण नहीं, बल्कि उनके पीछे की भावनाओं के कारण बस जाती है। बीजिंग की वह यात्रा मई की वह उजली सुबह, हवा में फूलों की महक, और मेरा उत्साह से दमकता चेहरा! आज इतने सालों बाद जब मैं याद करती हूँ, तो लगता है जैसे हम अभी-अभी उस पुराने स्टेशन से निकले हैं और सामने ग्रेट वॉल की ओर जाती बस हमारी प्रतीक्षा कर रही है।

2007 का वह समय मेरे जीवन का एक सुंदर अध्याय था। हांकुक युनिवर्सिटी ऑफ फ़ोरन स्टडीज, सियोल, वहाँ का वातावरण, विद्यार्थियों की जिज्ञासा, और मोशा तुम्हारे साथ बिताए हुए वे अनगिनत पल…आज भी मन में एक मधुर झंकार छोड़ जाते हैं। मोशा, तुम्हारे साथ घूमना, कोरिया के रीतिरिवाज़, खान-पान, उनकी विनम्र संस्कृति..सब कुछ सीखने जैसा था। और फिर, तुम्हारे कारण ही तो मुझे बीजिंग की उस संगोष्ठी में जाने का अवसर मिला था। जब हमने जाने की योजना बनाई थी, तुमने कहा था…“मई में बीजिंग बेहद सुंदर होता है, हवा में ठंडक और धूप में कोमल चमक।” वह तुम्हारी बात सच निकली। बीजिंग पहुँचते ही वह ताज़गी भरी हवा जैसे शरीर को नहीं, आत्मा को भी छू गई थी। तापमान सुखद था, पेड़ों पर नए पत्तों की हरियाली, और हर गली में खिले गुलाबी-पीले फूलों की सुगंध यह सब मिलकर बीजिंग को किसी प्राचीन कविता-सा बना रहे थे।

हमारे गेस्ट हाऊस की खिड़की से दूर-दूर तक फैली इमारतें दिखाई देती थीं। पुराने बीजिंग का सौंदर्य और आधुनिक चीन की तेज़ रफ़्तार, दोनों का अद्भुत संगम। सड़कों पर साइकिल चलाते लोग, हवा में उड़ते पतंगें, और हर मोड़ पर ताज़े सूप की खुशबू… यह सब कुछ नया और सजीव लग रहा था।

संगोष्ठी का पहला दिन समाप्त हुआ तो हमारे भीतर उत्साह दुगुना हो गया। हम बस तीन दिन के लिए आए थे.. इसलिए ग्रेट वॉल देखना हमारी चेक लिस्ट सबसे ऊपर था। अगले दिन ग्रेट वॉल देखने जाना था। सुबह-सुबह उठे… बाहर हल्की धूप और मंद हवा थी। तुम हमेशा की तरह जल्दी तैयार थीं, मुस्कुराते हुए बोलीं..“Let’s go! The Wall is waiting for us!” मैं हँस पड़ी। उस दिन हम कुल पाँच लोग थे..तुम, मैं, एक कोरियाई स्वहेली प्रोफेसर किम, और चीन के दो स्वहेली विद्यार्थी। वे दोनों उत्साहित थे कि अपने देश का यह चमत्कार हमें दिखाने का अवसर उन्हें मिला है। हमने हल्की जैकेटें, टोपी और सनग्लास पहने और बस में सवार हुए। बीजिंग से बाहर निकलते ही जैसे एक अलग संसार खुल गया.. शहर की भीड़ पीछे छूट गई और सामने फैले हरे-भरे पहाड़, जिनकी गोद में कहीं वह दीवार हमारा इंतज़ार कर रही थी।

रास्ते में तुमने बताया कि अफ्रीका में भी एक ‘ग्रेट वॉल’ की कथा प्रचलित है, पर वह दीवार नहीं, एक प्रतीक है.. लोगों के साहस और एकता का। मैंने मुस्कुराकर कहा, “और आज हम वास्तविक दीवार देखने जा रहे हैं…जो हज़ारों सालों से इतिहास की गवाही दे रही है।” जब हमारी गाडी मुड़ी और हमने पहली बार दूर से दीवार की झलक देखी, तो हम सब कुछ देर के लिए मौन हो गए। वह ग्रेट वॉल सामने थी … पहाड़ों की शृंखलाओं पर सर्प सी लिपटी हुई, हरी धूप में चमकती, समय की तरह फैली हुई।

जिस भाग की ओर हम जा रहे थे, वह ग्रेट वॉल का बादालिंग (Badaling) खंड था, जो बीजिंग से लगभग 70–80 किलोमीटर उत्तर-पश्चिम में स्थित है और राजधानी के सबसे निकट तथा सर्वाधिक लोकप्रिय भागों में गिना जाता है। चीन की महान दीवार वास्तव में एक अकेली दीवार नहीं, बल्कि विभिन्न राजवंशों द्वारा अलग-अलग कालखंडों में निर्मित दीवारों, किलों और सुरक्षा-रेखाओं का विशाल तंत्र है। इसके प्रमुख खंडों में बादालिंग, मुतियान्यू (Mutianyu), जिनशानलिंग (Jinshanling), सिमाताई (Simatai) और जियायुगुआन (Jiayuguan) विशेष रूप से प्रसिद्ध हैं। आधुनिक सर्वेक्षणों के अनुसार इसकी कुल लंबाई लगभग 21,000 किलोमीटर से अधिक मानी जाती है। पहाड़ों, रेगिस्तानों, घास के मैदानों और घाटियों से होकर गुजरती यह संरचना मानो पूरे उत्तरी चीन के भूगोल को अपने भीतर समेटे हुए है। दूर से देखने पर इसकी घुमावदार रेखा सचमुच किसी विशाल अजगर की भाँति पर्वत-शृंखलाओं पर लहराती प्रतीत होती है।

इसका इतिहास भी बड़ा रोचक हैं। ग्रेट वॉल का निर्माण तीसरी शताब्दी ईसा पूर्व में शुरू हुआ था, जब चिन शी हुआंग ने अपने साम्राज्य को उत्तर से आनेवाले मंगोल आक्रमणों से बचाने के लिए यह दीवार बनवाई थी। उस समय इसकी लंबाई लगभग पाँच हजार किलोमीटर थी, बाद में परवर्ती राजवंशों ने इसे बढ़ाते-बढ़ाते तेरह हजार किलोमीटर से अधिक विस्तृत कर दिया। मिट्टी, ईंट और पत्थरों से बनी यह दीवार केवल सुरक्षा का प्रतीक नहीं, बल्कि मानव धैर्य और परिश्रम की अद्भुत मिसाल है। कहा जाता है कि इसके निर्माण में लाखों मजदूरों ने अपने प्राण गंवाए। उनकी स्मृति जैसे आज भी उस दीवार के पत्थरों में साँस लेती है।

यद्यपि महान दीवार के आरंभिक भाग तीसरी शताब्दी ईसा पूर्व में चिन सम्राट चिन शी हुआंग के शासनकाल में बनाए गए थे, परन्तु आज जो मजबूत ईंट-पत्थरों वाली दीवार दिखाई देती है, उसका अधिकांश भाग मिंग राजवंश (1368–1644) के समय निर्मित हुआ। दीवार केवल सैनिक सुरक्षा का साधन नहीं थी, यह संदेश-प्रेषण, व्यापारिक मार्गों की निगरानी और साम्राज्य की सीमाओं के नियंत्रण का भी महत्वपूर्ण माध्यम थी। प्रहरी-दुर्गों पर आग और धुएँ के संकेतों द्वारा दूर-दूर तक सूचनाएँ भेजी जाती थीं। इस दृष्टि से यह अपने समय की एक अत्यंत विकसित संचार-व्यवस्था भी थी।

दीवार की ओर बढ़ते हुए हवा में पत्तों की सरसराहट थी, ऊपर नीला आसमान, और नीचे लहराती घाटियाँ। हर मोड़ पर एक नया दृश्य… कहीं जंगली फूलों की महक, कहीं दूर से आती चिड़ियों की आवाज़। कुछ सीढ़ियाँ इतनी ऊँची थीं कि एक कदम चढ़ने में साँस फूल जाती, फिर भी हम हँसते हुए आगे बढ़ते रहे। तुम कभी आगे निकल जातीं, कभी मुड़कर कहतीं, “Come on, don’t stop! You’ll regret if you don’t reach the top!” मैं हँसते हुए जवाब देती – “I’m coming, Professor of Energy!” हमारे साथ के विद्यार्थी हँसते, फ़ोटो खींचते, कभी फूलों की पंखुड़ियाँ हवा में उड़ाते। किसी मोड़ पर जब हमने पीछे मुड़कर देखा.. दीवार पहाड़ों के बीच लहराती चली जा रही थी। वह दृश्य अविश्वसनीय था। प्रकृति और मानव निर्माण के बीच इतनी सुंदर संगति शायद ही कहीं देखी हो।

ऊँचाई पर पहुँचते ही हवा और तीखी हो गई। हम सब एक पत्थर की मेहराब के पास बैठ गए। कैमरा, मोबाइल, और मुस्कानें..सब एक साथ सक्रिय हो गए। तुम्हारे कैमरे से निकली हर क्लिक में एक कहानी थी.. कभी मैं दीवार पर खड़ी हँस रही थी, कभी तुम आसमान की ओर देखतीं मानो बादलों से बात कर रही हो। 

वहीं पास में एक छोटा-सा चायघर दिखाई दिया। लकड़ी का बना हुआ, उसकी खिड़कियों से ताज़े चाय की भाप उठती दिख रही थी। हम अंदर गए.. गर्म ग्रीन टी का पहला घूँट जैसे सारी थकान को पिघला गया।

मैंने कहा, “इस स्वाद में जैसे इतिहास घुला है।” औऱ तुमने कहा, “और यादें भी।”

दीवार के ईंट-पत्थर, उनकी जोड़ाई, चौकियाँ, प्रहरी दुर्ग.. सबकुछ अत्यंत सटीक था। जहाँ-जहाँ निगरानी के लिए टॉवर बने थे, वहाँ से दूर-दूर तक फैली घाटियाँ दिखाई देती थीं। दीवार पर खड़े होकर चारों ओर दृष्टि दौड़ाने पर समझ में आता है कि इसे केवल शत्रुओं को रोकने के लिए नहीं, बल्कि साम्राज्य की सामूहिक शक्ति और संगठन का प्रतीक बनाने के लिए भी निर्मित किया गया था। शायद इसी कारण 1987 में यूनेस्को ने इसे विश्व धरोहर सूची में शामिल किया। दुनिया के लगभग हर देश से आने वाले पर्यटक यहाँ पहुँचते हैं और उन पत्थरों को स्पर्श कर उस इतिहास से जुड़ने का प्रयास करते हैं जिसने सदियों से मानव कल्पना को आकर्षित किया है।

वास्तव में यह केवल एक दीवार नहीं, बल्कि एक जीवित स्थापत्य था.. जिसमें हर युग ने अपनी छाप छोड़ी थी। कुछ स्थानों पर पत्थर पुराने और क्षीण थे, कुछ पर नए मरम्मत के निशान। धूप उन सब पर समान रूप से पड़ी थी.. मानो समय ने सबको एक-सा बना दिया हो।

तुम्हें याद है, वहाँ लगे एक शिलालेख पर लिखा था कि “जो व्यक्ति ग्रेट वॉल पर नहीं चढ़ा, वह सच्चा वीर नहीं।” यह कथन चीन में अत्यंत प्रसिद्ध है। उस समय हम मुस्कुराए थे, किंतु दीवार की ऊँची-नीची सीढ़ियाँ पार करने के बाद उसके अर्थ का अनुभव भी हुआ। वास्तव में यह केवल एक ऐतिहासिक स्मारक नहीं, बल्कि धैर्य, साहस और मानवीय संकल्प का जीवंत प्रतीक है। जब हम नीचे लौटे, शाम होने लगी थी। सूरज ढल रहा था और उसकी सुनहरी किरणें दीवार पर पड़कर उसे स्वर्णिम आभा दे रही थीं। वह दृश्य मैं आज भी नहीं भूल पाई हूँ। थकान शरीर में थी, पर मन में एक अद्भुत तृप्ति थी.. मानो शताब्दियों पुराने रहस्य को हमने स्वयं छू लिया हो। तुमने लौटते हुए कहा था.. “इतिहास किताबों में नहीं, इन पत्थरों में साँस लेता है।” मैंने धीरे से कहा.. “और हर यात्रा हमें थोड़ा और जीवित बना देती है।”

गेस्ट हाउस में लौटने के बाद हमने देर रात तक बातें कीं। कमरे में एअर-कंडीशनिंग की ठंडी हवा थी, पर बाहर की वसंत भरी रात खिड़की से झाँक रही थी। तुमने अपने देश तंज़ानिया की पहाड़ियों का ज़िक्र किया, मैंने अपने देश के ऐतिहासिक किलों का! हम दोनों ने यही सोचा कि दूरी चाहे कितनी भी हो, अनुभव हमें जोड़ देते हैं।

रात गहराती गई, और हमारी हँसी में बीजिंग की वह वसंतमयी हवा घुलती गई। आज इतने वर्षों बाद, जब मैं अपनी यात्राओं के बारे में सोचती हूँ, तो तुम्हारी और हमारी उस यात्रा की याद स्वतः लौट आती है। खुद से ही कहती हूँ कि इतिहास केवल किताबों में नहीं, बल्कि यात्राओं में, दोस्ती में और उन क्षणों में जीवित रहता है जब कोई व्यक्ति किसी नए देश की मिट्टी को अपने हाथों से छूता है। ग्रेट वॉल तो वहीं है उतनी ही भव्य, उतनी ही शांत, पर शायद अब वहाँ हमारी हँसी की गूँज भी कहीं बाकी होगी। 

प्रिय मोशा, दुनिया चाहे कितनी भी बड़ी क्यों न हो, सच्ची दोस्ती और खोज की भावना हमें हर जगह घर जैसा एहसास देती है। कभी फिर मिलें तो चलें, किसी नई दीवार, किसी नए पहाड़ की ओर जहाँ हवा महकती हो और समय ठहर-सा जाए।

*********

©  डॉ प्रतिभा मुदलियार

पूर्व विभागाध्यक्ष, हिंदी विभाग, मानसगंगोत्री, मैसूरु-570006

306/40, विमल विला, निसर्ग कॉलोनी, जयनगर, बेलगाम, कर्नाटक

मोबाईल- 09844119370, ईमेल:    mudliar_pratibha@yahoo.co.in

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ५ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ५ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

सफरीच्या पाचव्या दिवशी, ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर मस्कतपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर नावाच्या शहराकडे आम्ही निघालो. वाटेत एक-दोन प्रेक्षणीय ‘वादियाँ’ पाहत दुपार-संध्याकाळपर्यंत सूरला पोहोचायचे होते. आमचा गाईड, अल नासर आमच्यासोबत होताच. मस्कत सोडल्यानंतरचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगत जात नसल्याने, आजूबाजूचे निसर्गचित्र रुक्षच दिसत होते. चाकाखालचा रस्ता तेवढा मऊसूत असल्याने प्रवासाचा शीण अजिबात जाणवत नव्हता.

मस्कतपासून अंदाजे १०० किलोमीटर अंतरावर हमरस्ता किनाऱ्याच्या दिशेने वळला आणि समुद्रकिनाऱ्याला समांतर धावू लागला. किनाऱ्यापासून सुमारे ६०० मीटर आत असलेल्या ‘बिम्माह सिंक-होल’ नामक ठिकाणी आमची बस थांबली. या जागेचे वर्णनदेखील आम्ही आधी वाचलेले होते. या भागात चुनखडीच्या दगडांचे प्रमाण खूप आहे. कदाचित हजारो वर्षांपूर्वी, एका ठिकाणची चुनखडी भुसभुशीत होऊन ती जमीन खचली आणि एक मोठा खड्डा तयार झाला. त्या खड्ड्याखाली पाण्याचा झराही असल्याने तिथे एक छोटे सरोवर तयार झाले. जमिनीपासून सुमारे ६०-६५ फूट खाली असलेले, नीलमण्याच्या रंगाचे हे तळे सव्वादोनशे फूट लांब आणि दीडेकशे फूट रुंद आहे. कडे-कडेने पाण्यातून चालत जाण्यासारखे किंवा डुंबण्याजोगे असले तरी मध्यभागी त्या तळ्याची खोली अंदाजे ३०० फूट आहे असे वाचले होते. जमिनीवरून खाली तळ्याजवळ उतरण्यासाठी जिना केलेला होता. आम्ही पाहिले तेंव्हा त्या सिंक-होल’मध्ये काही पर्यटक डुंबत असलेले दिसले. एक मनुष्य तळ्याशेजारच्या कपारीतून वर चढत जाऊन त्या तळ्यात उड्यादेखील मारत होता. कडक उन्हाची वेळ असल्याने जमिनीवर तापमान बरेच होते. पण खाली तळ्याजवळ उतरताच आल्हाददायक गारवा जाणवला. पुढे प्रवास करायचा असल्याने, कितीही मोह झाला तरी आम्हाला डुंबायला वेळ नव्हता. फक्त फोटो काढले आणि तिथून परत फिरलो.

पुढे सूरपर्यंतचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगतच होता. आम्हाला अल नासरने सांगितले होते की सूरच्या अलीकडे ‘वादी शब’ आणि आणि ‘वादी तिवी’ अशा दोन ‘वादियाँ’ पाहण्यासारख्या होत्या. वाळवंटातल्या लोकांना दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व माहीत असल्यामुळे वादीचे अप्रूप असणे स्वाभाविकच आहे, कारण, डोंगरात एखादा झरा असल्यास त्याचे पाणी वादीमधूनच वाहत येते. ‘वादी शब’जवळ पुष्कळ पर्यटक दिसले. वाहत्या पाण्यातून ते लोक बोटीने कुठेतरी जात होते. बोटीची फेरी करून परत येणाऱ्या एका भारतीय तरुणाकडून मी माहिती घेतली. १०-१५ मिनिटे बोटीतून जाऊन पलीकडच्या तीरावर ते डोंगरावर चढून आले होते. पण विशेष वेगळे असे काही पाहण्यासारखे नव्हते असे तो म्हणाला. थोडा वेळ तिथे थांबून आणि फोटो काढून आम्ही ‘वादी तिवी’च्या दिशेने पुढे निघालो.

‘वादी तिवी’ मध्ये मात्र खूपच हिरवाई आणि फुलाफळांच्या बागा दिसत होत्या. आम्हाला बसमधून उतरवून अल नासर एका खासगी फार्ममध्ये घेऊन गेला. आपल्यासारख्या देशातील लोकांना अशा बागांचे फारसे कौतुक असायचे कारण नाही. पण या रुक्ष देशात फिरत असताना अचानक समोर आलेली, केळी, संत्री, पपयांनी लगडलेली झाडे व डेरेदार आंब्याची झाडे पाहून मन प्रसन्न झाले. पाणी साठवण्याकरता उंचावरच्या भागात हौद बांधून घेतलेले होते. एकमेकांना जोडणारे उभे-आडवे पाट संपूर्ण बागेतून काढलेले होते. उपलब्ध होणारे सगळे पाणी खुबीने वापरण्याची योजना केलेली होती. या वादीच्या दोन्ही बाजूंना बागा करण्यासाठी, ओमान सरकारने स्थानिक रहिवाश्यांना जमीन वाटून दिलेली आहे. इथे इतर व्यवसायाशी संबंधित बांधकामे करायला मनाई आहे, अशी माहिती अल नासरने आम्हाला पुरवली.

सूरमध्ये पोचायला दुपार होऊन गेली असल्याने भूक कडाडली होती. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका बऱ्यापैकी हॉटेलात बसून आम्ही अरबी जेवणावर ताव मारला. आता सूरमध्ये पाहण्यासारखे असे एकच महत्वाचे ठिकाण राहिले होते – ते म्हणजे काही शतकांपासून इथे कार्यरत असलेला बोटींचा कारखाना.

सहाव्या शतकापासूनच ओमानमधल्या ग्वादर, मस्कत, सूर, सलालाह येथील बंदरांचे महत्व व्यापाऱ्यांना समजलेले होते. बलुचिस्तानमधल्या कलात राज्याच्या खानाने अठराव्या शतकात, ग्वादर हे बंदर सांभाळण्यापुरते ओमानच्या राजाला देऊ केले होते. ते पुढची १५० वर्षे ओमानच्याच कब्जात राहिले. १९४७ नंतर बलुचिस्तानमधील सर्व संस्थाने पाकिस्तानात विलीन केली गेली. ओमानकडून ग्वादर बंदर परत मिळवण्यात पाकिस्तानला १९५८ साली यश आले. आज पाकिस्तानच्या संमतीनेच, चीनमधील शिंजियांग प्रांतातून ग्वादर बंदरापर्यंत, ३००० किलोमीटरचा थेट रस्ता बांधला जात आहे. आणि भारतासाठी दुर्दैवाची, आणि चीड आणणारी गोष्ट अशी, की पाकिस्तानने व्यापलेल्या, गिलगिट-बाल्टिस्तान या भारतीय भूभागातून तो ‘China-Pakistan Economic Corridor’ नावाचा रस्ता काढला जात आहे!

पूर्वीच्या काळी ओमानच्या मार्गाने होत आलेला व्यापार पाहता, सूरमध्ये बोटींचा कारखाना (Dhow Factory) उभारला गेला नसता तरच नवल वाटले असते. सध्या अस्तित्वात असलेला कारखाना सतराव्या शतकात सुरु झाला. त्यामध्ये पूर्वीपासून काम करणारे पुष्कळसे कारागीर भारतीय होते आणि आजही आहेत. या कारखान्यात आता लाकडी सांगाडा असलेल्या मोटरबोटी बनवल्या जातात. गेल्या तीन वर्षांपासून तिथे बनत असलेली एक मोठी लक्झरी बोट आम्ही पाहिली. सुमारे २१ कोटी रुपयांची ती बोट एक ओमानी व्यापारी बनवून घेत आहे असे समजले.

त्या फॅक्टरीच्या आवारातच एक भेटवस्तूंचे दुकान आणि एक छोटेसे संग्रहालय आहे. दुकानामध्ये बोटींच्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या ज्यांची लांबी हातभरापासून ते ४-६ फुटांपर्यंत होती. घरोघरी किंवा संस्थांच्या दर्शनी दालनात काचेच्या शोकेसमध्ये घालून त्या ठेवता येण्यासारख्या होत्या. खलाश्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या सुकाणू सारख्या इतरही अनेक वस्तू तिथे विकायला ठेवल्या होत्या. संग्रहालयामध्ये हिंडताना खूप नवीन माहिती मिळाली. बोट कारखान्याचा सतराव्या शतकांपासूनचा इतिहास, बोटी बनवताना वापरले जाणारे साहित्य आणि त्याची कृती, पूर्वापार होत आलेल्या सागरसफरींमध्ये वापरलेल्या विविध वस्तू, खलाशांनी वापरलेले जुने नकाशे, अनेक फोटो, शंभर वर्षांपूर्वीचे बोटीचे तिकीट, अशा अनेकविध वस्तू आम्ही पाहिल्या.

दिवसभराची आमची भटकंती पूर्ण झालेली होती. सूरमध्ये फक्त रात्रीपुरता मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहिबाच्या वाळवंटाकडे कूच करायचे होते. हॉटेलमध्ये गेल्या-गेल्या समोर वेलकम ड्रिंक घेऊन एक मुलगी उभी होती. तिच्या ड्रेसवर लावलेले ‘सौमिता’ हे नाव वाचून ती बंगाली असावी असा मी अंदाज केला आणि हात जोडून ‘धोंनोबाद’ म्हटले. पाहुण्यांनी तिच्या मातृभाषेत आभार मानल्यामुळे अर्थातच ती सुखावली होती. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेला शौमिता आणि शॉप्तर्षि या दोघांसोबत माझ्या थोड्या गप्पा झाल्या. दरम्यान गिरीश काउंटरवरून आमच्या खोलीच्या किल्ल्या घेत होता. तिथे ड्यूटीवर असलेल्या पाकिस्तानी तरुणीकडून त्याला काही आश्चर्यकारक माहिती मिळाली.

सूरमधल्या हॉटेलात नाश्ता उरकून आम्ही ओमानच्या शार्किया प्रांतात असलेल्या ‘वाहिबा सँड्स’ च्या दिशेने निघालो. आम्ही आज जिथे राहणार होतो ते ‘रिसॉर्ट’ एका वैराण वाळवंटाच्या आत होते. तिथपर्यंत जायला एक कच्चा वालुकामय रस्ता होता. अशा रस्त्यांवर साध्या मोटरगाड्या किंवा बसेसची चाके घसरतात. त्यामुळे आम्हाला ‘४ X ४, किंवा फोर व्हील ड्राइव्ह’ गाडीने जाणे भाग होते (जिच्या चारही चाकांना इंजिनाची चाल मिळते अशी गाडी). आम्हाला ‘बिदियाह’ नावाच्या गावातल्या एका पूर्वनियोजित ठिकाणापासून पिकअप करायला आमच्या रिसॉर्टनेच दोन ४ X ४ गाड्यांची व्यवस्था केलेली होती.

त्या गावाजवळच आम्ही एका ठिकाणी हलके अरबी जेवण जेवलो आणि आमची बस ‘बिदियाह’ गावात येऊन थांबली. आम्हाला घेऊन जायला आलेल्या दोन मोटारगाड्या तिथे येऊन आधीच थांबलेल्या होत्या. बिदियाह गावापासून ‘Thousand Nights’ कँम्प सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. आमच्या गाडीचा ड्रायव्हर स्थानिक ‘बैदू’ जमातीतला एक तरुण होता. त्याच्या बोलण्याचा ‘लहेजा’ निश्चितच अल नासर किंवा इतर ओमानी माणसांच्यापेक्षा वेगळा होता. अल नासरसोबत त्याची टकळी अखंड चालू होती. त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो त्या वालुकामय रस्त्यावरून वेगात पण अत्यंत सफाईदारपणे गाडी चालवत होता. आमच्या गाडीत दादा असल्यामुळे, “गाडी शक्यतो कमी वेगात आणि हादरे बसणार नाहीत अशा पद्धतीनेच चालवावी लागेल” ही आम्ही अल नसरला दिलेली सक्त ताकीद त्याने ड्रायव्हरला कळवली असावी असे वाटले. कारण आमच्या कुटुंबाचीच दुसरी गाडी सुसाट पुढे निघून गेली होती.

चहूकडे रेताड जमीन आणि वाळूच्या टेकड्या दिसत होत्या. अधूनमधून ‘वाळवंटातली जहाजे’ – म्हणजे उंट-चरताना दिसत होतेच. एका झोपडीवजा घरापाशी आमची गाडी थांबली. त्या झोपडीशेजारीच तारांच्या कुंपणाच्या आत उंट होते. “ही वाळवंटातच वास्तव्य करणाऱ्या ‘बैदू’ लोकांची झोपडी आहे. त्यांच्या ‘जीवनशैलीचे दर्शन’ होऊ शकेल” असे अल नासरने आम्हाला सांगितले होते. मात्र, ‘बैदू’ जीवनशैलीचा आभास निर्माण करण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता इतकेच मला जाणवले. तिथे आलेले काही गोरे पर्यटक मात्र त्या वातावरणामुळे ‘भारावून गेलेले’ वाटले. पुढच्या वाटेला लागल्यावर अल नासर हळूच म्हणाला, “आजकाल या वाळवंटांमध्ये ‘बैदू’ राहतच नाहीत. तुम्ही बिदियाह गावात एक पक्क्या घरांची वस्ती पाहिलीत ना? हे ‘बैदू’ तिकडे राहतात आणि दिवसा फक्त उंट चारायला वाळवंटात येतात!” 

काही वेळातच, ‘Thousand Nights’ कँम्पच्या समोर येऊन गाडी थांबली.

– क्रमशः भाग ५.

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ “ओह मॅन ! …” भाग – ४ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ४ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

मत्रा ‘सूक’ हा आमचा दिवसभरातला शेवटचा थांबा होता. सर्वसाधारणपणे पर्यटकांना आकर्षित करणारी जी दुकाने गावोगावी असतात तशीच तिथेही होती. ‘आलोच आहोत तर काहीतरी घ्यावे’ अशा विचाराने प्रेरित होऊन काहींनी तिथे अत्तरे, ‘लोबान’ वगैरे खरेदीही केली. परतीच्या वाटेवर जुना राजवाडा, म्हणजे ‘अल आलम पॅलेस’ आम्हाला बाहेरूनच पाहता आला. आत जाण्याची परवानगी नसल्याने, राजवाड्यासमोर उभे राहून आम्ही फोटो मात्र काढून घेतले.

ओमान सफरीमधला आमचा चौथा दिवस ‘सागरसृष्टी-दर्शना’साठी राखीव होता. लवकर नाश्ता उरकून, आठ वाजायच्या आत समुद्रकिनाऱ्यावरच्या, अल मौज येथील ‘मोला-मोला डायव्हिंग सेन्टर’ ला पोहोचणे आवश्यक होते. हॉटेलमधून समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणे आणि संध्याकाळी परत येणे, इतकाच प्रवास असल्याने, ‘जाण्या-येण्यासाठी टॅक्सी करू’ असा विचार करून आम्ही आमच्या मिनीबसला सुट्टी दिलेली होती. पण मस्कतमध्ये ‘ऊबर’ उपलब्ध नाही. स्थानिक ऍप वापरून मागवलेल्या टॅक्सी लवकर येत नाहीत. कशाबशा आम्हाला दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही वेळेत अल मौज येथे पोचलो.

देवाशीषने ‘मोला-मोला डायव्हिंग सेन्टर’ सोबत आगाऊ संपर्क करून, मोटरबोट सफर, स्कुबा डायव्हिंग, आणि स्नॉर्केलिंग चे आयोजन केलेले होते. स्कुबा-डायव्हिंगसाठी माझ्या डॉक्टरांची पूर्वपरवानगी मी घेतलेली नसल्याने मी फक्त स्नॉर्केलिंग करणार होतो. बाकी सगळे स्कुबा-डायव्हिंगचा अनुभव घेणार होते. दादा, म्हणजे माझे ९२ वर्षाचे सासरे समुद्रात उतरणार नसले तरी ते आमच्यासोबत बोटीवर येणार होते. मनाने अजूनही तरुण असल्याने, ते हसून म्हणाले, “तुम्हा सर्वांना मजा करताना पाहण्याची मजा मी घेणार आहे!” तरीही आयोजकांनी तीन-तीनदा आम्हाला विचारून खात्री करून घेतली की दादा निश्चितपणे बोटीवर येऊ इच्छित आहेत आणि त्यांना मोटारबोटीच्या प्रवासाचा त्रास होणार नाही. दादांनी ठासून होकार दिल्यानंतर आयोजकांना त्यांचे खूप कौतुक वाटल्याचेही जाणवले.

‘मोला-मोला’ च्या बोटीवर चढण्यापूर्वी आम्हाला आमचे ‘किट’ दिले गेले. बोटीवर कप्तानाव्यतिरिक्त सुमारे २५ पर्यटक आणि ‘मोला-मोला’ चे चार मदतनीस/प्रशिक्षक होते. आमच्याव्यतिरिक्त इतर सर्व पर्यटक आणि ‘मोला-मोला’चे चारपैकी तीन मदतनीस युरोपमधल्या वेगवेगळ्या देशातले होते. एकमेव भारतीय (आणि आशियाई) गट म्हणजे केवळ आमचाच परिवार होता. ‘विल’ (कदाचित विल्यम) नावाचा एक उंचापुरा आणि बलदंड तरुण त्या चौघांचा नेता होता असे दिसले. जेमतेम पंचविशी-तिशीच्या त्या तरुणांनी ओमानसारख्या परदेशात राहून चालवलेला हा उपक्रम कौतुकास्पद होता. बोट सुटण्याआधी एका मदतनीसाने सर्व पर्यटकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर प्रत्येकाला एकेक ‘संमतीपत्र’ दिले गेले जे वाचून प्रत्येकाने सही करणे भाग होते. समुद्रात ज्या धाडसी क्रीडाप्रकारात आम्ही सहभागी होणार होतो त्यातील धोक्यांसंबंधी आम्हाला कल्पना आहे व आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर त्यात सामील झालो असल्याचे ते पत्र होते.

त्यानंतर त्या मदतनीसाने आम्हा सर्वांना दिवसभराच्या कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. सकाळच्या सत्रात एकदा आणि दुपारच्या सत्रात एकदा, असे दोन वेळा आम्हाला स्कुबा-डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करता येणार होते. आमचे दुपारचे जेवण बोटीवरच असणार होते. एका शीतपेटीमधे पाण्याच्या बाटल्या व थंड पेये, आणि शेजारीच चिप्सची पाकिटे, केळी वगैरे ठेवलेले होते. मनाला आवडेल ते, हवे तेंव्हा खायची-प्यायची मुभा होती. पुरुष व स्त्रियांसाठी एकेक टॉयलेटही बोटीवर होते. बोटीच्या टपावर गाद्या अंथरलेल्या होत्या व एका वेळी दहा जणांना टपावर बसण्याची (लोळण्याचीही) सोय होती.

अल मौजपासून सुमारे ३० किलोमीटर दूर समुद्रात असलेल्या, ‘अल दिमानियात’ नावाच्या एका द्वीपसमूहाच्या दिशेने आमची मोटरबोट निघाली. आम्ही आनंदात गप्पा मारत, हास्यविनोद करत होतो, फोटो काढत होतो. अधूनमधून कुणी खाद्यपेयांचा आस्वाद घेत होते.

आमच्यापैकी दोघा-दोघांना एकत्र बोलावून ‘विल’ काही सूचना देऊ लागला. स्कुबा डायव्हिंगचे किट व पाठीवरचा ऑक्सिजन सिलिंडर घालण्याची पद्धत, पाण्याखाली जाताना आणि गेल्यावर करायच्या (आणि न करायच्याही) हालचाली, त्या संपूर्ण काळात बाळगायची सावधगिरी वगैरे तो समजावून सांगत होता. डोळ्यांवर लावायचा चष्मा व त्यालाच जोडलेला, नाकावर लावायचा मास्क आम्हा सर्वांच्या किटमध्ये होताच. पर्यटकांपैकी काहीजण अगदी सराईत पाणबुडे असावेत असे वाटले. त्यांना कोणत्याच सूचनांची गरज नव्हती आणि त्यांच्या किटमध्ये तर रबरी डायव्हिंग सूटदेखील होता जो त्यांनी अंगावर चढवला. आपापले किट व ऑक्सिजन सिलिंडरही अंगावर चढवून ते झटकन तयार झाले.

‘अल दिमानियात’ द्वीपसमूहापैकी एका बेटाच्या बरेच अलीकडे आमची बोट थांबली. पर्यटकांपैकीच २-४ सराईत पाणबुडे (Deep Sea Divers) समुद्रात उतरले आणि खोल पाण्यात बुडून दिसेनासे झाले. मग बोट जराशी पुढे जाऊन त्या बेटाजवळ उभी राहिली. तिथे पाण्याची खोली काही ठिकाणी सुमारे २० फूट तर काही ठिकाणी ४० फूट होती. आमचा प्रशिक्षक, ‘विल’, आमच्यापैकी दोन-दोन अननुभवी पर्यटकांना एकाचवेळी बरोबर घेऊन पाण्याखाली जात होता. कमी-अधिक फरकाने, ५ ते १५ मिनिटे पाण्याखाली राहून लोक वर येत होते. पाण्याखाली जाण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येकाच्याच मनातला काहीसा घाबरलेला, अनिश्चिततेचा भाव चेहऱ्यावर दिसत असल्याने, त्यांचे चेहरे ‘फोटो काढण्यासारखे’ झालेले होते. बुडी मारून वर आल्यानंतर मात्र एका नवीन, व चित्तथरारक अनुभवामुळे मिळालेला आनंद, आणि ‘आपण हे करू शकलो’ अश्या अर्थाची त्यांची विजयी मुद्राही कॅमेऱ्यात टिपण्यासारखी होती.

‘विल’सोबत जोड्या-जोड्या डायव्हिंगसाठी जात असताना, ‘ऍना’ नावाची दुसरी प्रशिक्षक उरलेल्या लोकांचा गट घेऊन स्नॉर्केलिंगसाठी निघाली. मीही त्याच गटात होतो. दोन वर्षांपूर्वी मी थायलंडच्या सफरीवर असताना, आयुष्यात पहिल्यांदाच स्नॉर्केलिंग केलेले होते. त्यामुळे ते कसे करायचे याची माहिती होती. स्नॉर्केलिंग करताना आपण पाण्याच्या पृष्ठभागाच्या थोडेसेच खाली बुडून पोहत जायचे असते. आपल्या डोळ्यांवर पाण्यात घालायचा चष्मा आणि नाकावर मास्क लावलेला असतो. एक फूटभर लांबीची, कडक प्लॅस्टिकची नळी चष्म्याच्या जोडलेली असते. त्या नळीचे एका टोकाकडचे भोक तोंडात घेऊन, दातांखाली पक्के दाबून तोंड मिटायचे असते. नळीचे दुसरे भोक पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहते, ज्यातून आपण तोंडाद्वारे हवा खेचत व सोडत राहायचे असते. या सर्व काळात नाक मास्कचा आत बंदिस्त असते व नाकाने श्वासोच्छवास करता येत नाही. पोहताना सावधगिरी म्हणून, हवे असल्यास अंगात लाईफ जॅकेट घालता येते.

पाण्याखालची जीवसृष्टी आणि समुद्रातळाशी असलेले प्रवाळ (Corals) पाहताना वेळेचे भानच सुटते. मला विविध रंगांचे लहान-मोठे मासे आणि कासवे दिसली. एक मोठे कासव खालून वर पोहत-पोहत अगदी माझ्या नाकाखालीच येऊ लागले. पण अगदी जवळ येताच त्याने मार्ग बदलला आणि माझ्याशेजारीच त्याने पाण्याबाहेर डोके काढले. थोडा वेळ हवेत श्वास घेऊन ते पुनः पाण्याखाली गेले. मग मी त्याच्या पाठलागावर निघालो. पुढे पोहत निघालेल्या त्या कासवाच्या मानेभोवती एक मोठा मासा सतत गिरक्या घालत-घालत पोहत होता. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता. जणू काही जमिनीवरून त्यांच्या जगात फिरायला आलेल्या माझ्यासारख्या पाहुण्याचे मनोरंजन करण्याची जबाबदारी त्या दोघांनी उचलली होती! स्नॉर्केलिंग करताना नुसते वेळेचेच नव्हे, तर वयाचेही भान सुटते हे नंतर माझ्या लक्षात आले!

दुपारच्या जेवणात केळी, पिटा ब्रेड व हम्मस, दोन-तीन तऱ्हेच्या चटण्या व सॉस, शाकाहारी व मांसाहारी कबाब अशा गोष्टी होत्या. आम्हाला एक गोष्ट खूपच कौतुकास्पद वाटली. विल, ऍना, आणि इतर दोघा युवा आयोजकांनी आम्हाला सकाळी बोटीवर घेण्यापासून ते समुद्राच्या पाण्यामध्ये नेऊन आणण्यापर्यंत सर्व कामे केली होती. त्यांचीही बरीच दमणूक झालेली होती. तरीही जेवणाच्या वेळी अतिशय चपळाईने हालचाली करत, त्या छोट्याश्या बोटीच्या मध्यभागी त्या चौघांनीच एक बुफेचे टेबल मांडले. त्यावर टेबलक्लॉथ घालण्यापासून ते जेवणाच्या बशा मांडून सर्वांना आग्रहाने जेवू घालण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली. आम्ही या सफरीचे पैसे भरलेले असल्यामुळे या सेवा आम्हाला मिळणे अपेक्षितच होते. परंतु, ज्या उत्साहाने, हसतमुखाने आणि आपुलकीने ते तरुण ही कामे करीत होते ते वाखाणण्याजोगे होते. विलने तर स्वतःच्या मनानेच आमच्या दादांना पिटा ब्रेड व कबाबचा रोल करून खायला दिला आणि अगदी स्वतःच्या वडिलांप्रमाणे वागणूक त्यांना दिली.

जेवणानंतर पुन्हा दुपारच्या सत्रातले सागरभ्रमण करून झाले. परतीची वेळही झाली होती आणि सगळेच दमलेलेही होते. मोटारबोट वेगाने किनाऱ्याकडे येत असताना बहुतांश पर्यटक काहीसे अंतर्मुख झालेले जाणवले. काही जण दिवसभरातल्या थरारक अनुभवांची उजळणी करत असावेत, तर काहींना नुसतेच परतीचे वेध लागले असावेत. मी आणि गिरीश बोटीच्या कप्तानासमोर असलेल्या छोटयाश्या डेकवर बसून अथांग सागराच्या दर्शनाचा आणि बोटीच्या वेगाचा आनंद घेत होतो. आमच्या बोटीशी जणू स्पर्धा करत असल्याप्रमाणे, काही पक्षी शेजारून उडत चालले होते. दूरवर मस्कतचा किनारा दिसायला लागला तसे आमच्यासह सगळेच पर्यटक आनंदी झालेले दिसले. गिरीशच्या व माझ्या मनात एकदमच विचार आला तो शेकडो वर्षांपूर्वी आपले घर-दार सोडून अज्ञाताच्या प्रवासावर निघणाऱ्या खलाशांचा! 

अनेक दिवसांच्या सागरी प्रवासानंतर किनारा दिसल्यावर त्यांना तर किती आनंद होत असेल?

पण त्याच वेळी मला कुसुमाग्रजांनी लिहिलेले ‘कोलंबसाचे गर्वगीत’ही आठवले…

 “अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला… “

– क्रमशः भाग ४  

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares