मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“माऊलींची माया हाये ओ आमच्यावर. ती तुमास्नी नाय कळायची. ” असं तो म्हणाला अन् डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रूंचे दोन चार थेंब ओघळले. समोर माऊलींच्या तळावर तंबूचे कळस दिसत होते अन् त्या कळसांकडे पाहून हात जोडून तो आनंदानं रडत होता. नेमकं काय घडलं होतं, ते त्याला अन् माऊलींनाच ठाऊक. त्यांचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचं काही ना काहीतरी नातं असतंच.

“त्यांच्यामुळं तरलो बगा यंदा. ” असं म्हणत त्यानं हात जोडले. माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्याचं आपलं स्वतःशीच बोलणं सुरु होतं. तो इतका भावूक झाला होता की, कुणी नुसता स्पर्श जरी केला असता तरीही त्याच्या भावनांचा बांध फुटला असता.

माऊलींशी आणि तुकोबारायांशी असा भावनिक संवाद साधणारे कितीतरी वारकरी आपल्याला दिसतील. इतक्या सहजतेनं ते माऊलींशी मनातलं सगळं सगळं बोलतात, सुख-दुःखाच्या गूजगोष्टी करतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांचा सल्ला घेतात, कधी कधी त्यांच्यावर रागावतात सुद्धा. पण हेही तितकंच खरं आहे की, त्यांना त्या संवादातून मार्ग सापडतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात, रस्ते दिसतात, आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी घडलेल्या चुकांची जाणीव होते. अशावेळी, पटकन क्षमा मागून मोकळेही होतात.

वारी हा स्वतःला अधिकाधिक निर्मळ, अधिकाधिक सात्विक करण्याचा एक प्रवास आहे. शुद्ध सकारात्मक वातावरणात महिनाभर राहण्याचा अनुभव मोठा विलक्षण असतो. अत्यंत साध्या जीवनशैलीत राहायचं, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जगण्याचं शहाणपण शिकवणाऱ्या संतांच्या अभंग रचना गात गात चालायचं, निश्चित वेळी मोजकं आवश्यक तितकंच खायचं, आवश्यक तेवढंच पाणी घ्यायचं, संपूर्ण स्वावलंबी आयुष्य जगायचं, आपल्यापासून कुणाला उपद्रव त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घ्यायची, तोंडून चुकून सुद्धा एकही अपशब्द येऊ द्यायचा नाही, ऊन- वारा- पाऊस- थंडी जे जे अनुभवाला येईल ते गोड मानून घ्यायचं, कुठल्याही अपेक्षांमध्ये अडकून पडायचं नाही, असं जगणं आपल्या जगण्याचा पाया दिवसेंदिवस भक्कम करत जातं.

रोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलं की, पालखी तळावर कीर्तन असतं. आपण एकटेच असतो. दिवसभर चालून पाय थकलेले असतात. पण मन मात्र थकलेलं नसतं. अशावेळी साध्या पण अत्यंत मार्मिक संतवचनांमधून जगण्याचं प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रासादिक वाणीचा प्रभाव पडतोच. संतांची चरित्रं उलगडली जातात. पुस्तकी साक्षरता आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी मूल्यं यांच्यात किती फरक असतो, याची जेवढी अनुभूती कीर्तनातून होते, तेवढी अन्य कोणत्याही माध्यमातून होणं कठीण. आपण माणूस म्हणून स्वतःमध्ये आणखी किती सुधारणा करायला हवी, याची फार रोखठोक जाणीव कीर्तनकार करुन देतात. कीर्तनानंतर हरिपाठ झाला की, धरणीवर अंग टाकून द्यायचं. एका क्षणात आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. वारीच्या वीस दिवसांत जशी गाढ झोप लागते, तशी पुन्हा वर्षभर लागत नाही, असा अनुभव तुम्हाला कित्येकजण सांगतील. म्हणूनच, आपली विस्कटलेली आयुष्यं अन् चुकलेली जीवनशैली ताळ्यावर आणण्यासाठी वारी केली पाहिजे.

“काय झालं माऊली? ” मी अगदी शांतपणे विचारलं.

“काय नाय ओ. माऊलींनी माजं भिजत पडलेलं घोंगडं निस्तारलं बगा. ” तो रडत म्हणाला.

“कसलं घोंगडं? ” मी विचारलं. वारीत मुक्कामाच्या जागी असा संवाद होतोच. पण, एक फार मोलाची आणि आपण शिकण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली की, खरा वारकरी कधीही रडगाणं गात नाही. तोही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत. पण समस्या, अडचणी यांना आहे तसं स्वीकारुन पुढं पाऊल टाकण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्याकडं आहे.

“अवो, पोरगा गेली तीन वर्षं ऐकतच नव्हता. यंदा तयार झाला. ” असं तो म्हणाला, पण मला काहीच उलगडा झाला नाही.

“जरा विस्कटून सांगा की. ” 

“काय नाय. बारावीला दोनदा नापास झाला. मी त्याला सांगत हुतो, आपल्याला जे जमंल ते करावं. उगं दुसऱ्यानं अमकं केलं म्हंजे आपनही त्येच करायला जाऊ नये. पन ऐकायला तयारच नई. “

“मग? “

“मी लई गोष्टी सांगून बघितल्या. इलेक्ट्रिक काम शिक, मोटार मेकॅनिकी शिक, टेलरिंग शिक. पन ते काय त्येला समजत नव्हतं. त्येच्या डोक्यात एकच खूळ – फॉरेनला जायचं अन् भरपूर पैसा मिळवायचा. ” 

“पण हे फॉरेनचं अचानक कुठून आलं डोक्यात? ” 

“अवो, मोबाईलवर काय ते बघायचं अन् तेच धरुन बसायचं. फॉरेनला जाऊन मोठ्या हॉटेलात काम करतो असं म्हनायचा. आता माजी धा एकर शेती, वीस पंचवीस जनावरं हयेत. एक पिठाची चक्की हाये. एक दुकान गाळा भाड्यानं दिलाय. उन्हाळ्यात ऊसाचं गुऱ्हाळ असतंय. डेअरीला दूध घालतो. थोडीफार तरकारी केली तर ती विकतो. आजून काय पायजेल सांगा. “

एक मिनिटभर मला काही कळलंच नाही. माझ्या शेजारी साध्या प्लॅस्टिकच्या कागदावर बसलेला तो माणूस. पायात साधी चप्पल, शेजारी एक कपड्याची पिशवी. दोन जोड कपडे, एक पंचा, एक पांघरुणाची गुलाबी शाल, एक टाळ एवढ्यावर पंचवीस दिवस पायी प्रवास करणारा एकदम कॉमन मॅन. त्याचं वार्षिक उत्पन्न बारा-चौदा लाख रुपये असेल असं मलाच काय, पण कुणालाच खरं वाटलं नसतं.

“पण मग हा तिढा सुटला कसा? “

“असल्या गोष्टीत घाई करुन उपयोग नसतोय, हे मी आमच्या मंडळीला अगोदरच सांगितलं होतं. त्यामुळं, घरी आमी त्याला काय टोचत बिचत नव्हतो. एक दिवस मी आमच्या चक्कीवर बसलो होतो. मनात विचार आला, हा गुंता माऊलींना सांगाया पायजे. घरी बोललो. दुसऱ्या दिवशीची एसटी धरली अन् पोराला घेऊन आळंदीला गेलो.” 

“मग? “

“देवापाशी डोकं टेकीवलं अन् अजानबागेपाशी सावली धरुन बसलो. मी पोराला म्हनलं, ‘हे काय खरं नाय गड्या. दोन वर्षं झाली, आपन अडकलोय. काई तरी तोड काडली पायजेल. मला काय वाटतं तुला सांगू का? ‘” 

“मग पोरगा काय म्हणाला? ” 

“पोरगा म्हनला ‘सांगा.’

“मी म्हनलं, भायेर जाऊन नोकरी करायची, यापतुर आपलंच कायतरी सुरु करु. हा अभ्यास काय तुला झेपत नई. मग कशाला वेळ काढायचा? मी म्हनलं, ते पोराला पटलं. इचार करु म्हनला. ” 

“मग जमलं का? “

“जमलं तर. दुसऱ्या दिवशी गडी एकटाच कॉलेजात गेला. बारावीला बाहेरुन बसायचा फॉर्म भरला. विषय बदलले. त्येचं तेनीच केलं. कॉलेजातले सर म्हनले, कुठं काय अडलं तर मी सांगतो. कामच झालं. रोज संध्याकाळी मी डेअरीला दूध घालून येईस्तोवर चक्कीवर बसायचा. दुपारी अभ्यास करायचा. “

“व्वा. चांगलं झालं की माऊली. तुमचं टेन्शनच गेलं. ” मी म्हटलं.

“तर ओ. फेब्रुवारीत परीक्षा पार पडली. दुसऱ्या दिवसापासून आमच्या एका मित्राच्या हॉटेलात त्येच्या हाताखाली कामाला जायला लागला. वडे, भजी, पुऱ्या तळायला शिकला. दीड दोन महिन्यात चांगला तयार झाला. लग्नसराई जोरदार सुरु होती. मसालेभात, रस्सा करायला शिकला. चांगला खुश असायचा. रात्री दमून भागून येऊन गाढ झोपायचा. त्येच आमचं सुख. ” 

मी एकदम गहिवरुन गेलो. कुणालाही न लुटता, न लुबाडता, खोटारडेपणा फसवाफसवी न करता, इमाने इतबारे कष्ट करुन, आपलं पोरगं दमून गाढ झोपलंय, यातच सुख मानणारा बाप मी बऱ्याच वर्षांत पहिल्यांदाच बघत होतो. सरळमार्गानं जग अन् हवा तेवढा मोठा हो, एवढीच अपेक्षा होती त्याची. “जिथे राबती हात तेथे हरी” इतकाच त्या वडिलांचा साधा सिद्धांत..!

बऱ्याचदा मुलांच्या त्यांच्या आयुष्याविषयीच्या अवास्तव अपेक्षा तयार होतात, त्याला कारणीभूत असतात पालकच..! पण इथं प्रकरण उलटं होतं.

“बारावी सुटला की नाही? ” माझी उत्सुकता तिथंच घुटमळत होती.

“सुटला? चांगल्या मार्कानी सुटला. साठ टक्के पडले. स्वतःच्या हातानं शिरा केला, सगळ्याना खाऊ घातला. आता दिवसभर हॉटेलात काम करुन नाईट कॉलेजात शिकायचं म्हनतोय. तर आपन कशाला अडवा? चांगलंच ठरवलंय त्यानं. “

“हे सगळ्यात बेस्ट. काम करत करत शिकलेलं चांगलं. त्याचं त्याला जाणवलं, हेच सगळ्यात महत्त्वाचं. पण मग आता डोळ्यात पाणी कशाला आणताय? ” 

“मी तुमाला काय म्हनलं, माऊलींची माया हाये आमच्यावर. इतरांना ती कळायची न्हाई. यंदा वारीला निघालो. आठ तारखेला प्रस्थान. मी तीन दिवस आधीच जात असतो, पन यावर्षी पाऊस जोरदार झाला. आळंदीला कुठनं जानार? पुन्यातच थांबायचं ठरत होतं. तर आमचा लेक आला पुढं अन् म्हनला, मी येतो दिंडीत. आचाऱ्याच्या हाताखाली काम करीन. मी कशाला नाई म्हनतोय? म्हनलं चला. पोरगं मार्गी लागतंय. आज रात्रीचा दीडशे मानसांचा पिठलं भाताचा सैपाक त्येनं एकट्यानं केलाय. सगळी दिंडी जेवून झोपली. नंतरच दोन घास खाऊन झोपलाय बगा तिथं. आता पहाटं तीनाला उठून चहा करंल. ” 

मी मागं वळून बघितलं. सामानाच्या ट्रकबाहेर एक विशितला पोरगा बसल्याजागी गाढ झोपून गेला होता..

“आपन एकदा त्यांना मनातलं सांगितलं की, मार्ग काढायची जबाबदारी त्यांची. ते बरोब्बर वाट दावत्यात. बसल्याजागी काय सुदा मिळत नाई ओ. आता पोरगं फॉरेनला जाईल नायतर नाई जाईल, पन आज घाम गाळाया शिकलं ना.. हुईल की तयार हळूहळू. बाकी काय का असंना, आज मोबाईल मधून भायेर आला, काम कराया लागला. परीक्षा पास झाला. आपनहून वारीला आला. आता देवानं अजून काय द्यावं म्हनता? सांगा.. “

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । 

रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ 

*

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । 

रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ 

*

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । 

तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ 

*

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । 

नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

 हा माऊलींचा शब्द त्यांनीच सकळ सिद्ध करुन दाखवला. गुरु आपल्याला आपला हात धरुन योग्य वेळी योग्य मार्गे नेतातच, याची खात्री पटण्यासाठी आणखी दुसरा कुठला दृष्टांत हवा?

“चित्ती असो द्यावे समाधान” चा खरा अर्थ मला माऊलींच्याच तळावर माऊलींच्याच समोर साक्षात अनुभवायला मिळाला होता. शिबी आणि मिडास दोघेही राजेच होते. पण शिबी राजाला त्याचं कर्तव्य पूर्ण समजलं होतं अन् मिडास राजा मात्र सोन्याच्या मोहातून बाहेरच येऊ शकला नाही. जितक्या कमी अपेक्षा, जितक्या कमी महत्त्वाकांक्षा, तितकं समाधान जास्त.. दोघांपैकी कुणाची निवड करायची, याचा निर्णय आपणच घ्यायचा. मी शिबी राजाची निवड केली. माऊलींच्या सहवासात, त्यांच्या प्रकाशात…

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”कभी हां कभी ना” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कभी हां कभी ना!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे नातवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्य मोठा कार्यक्रम होता. तसा आता थोडक्यात कार्यक्रम करायची पद्धत राहिलेली नाहीच. कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रम लहानसा असू शकतो पण तो event म्हणून जोरदार पद्धतीने साजरा होतो.

एकतर आता एकच एक चा जमाना आहे ना. म्हणजे मुलगा एक, त्याचे सर्व कार्यक्रम एकदाच, मग त्या मुलाचा मुलगा.. तो पण एकटाच. म्हणून कोणताही कार्यक्रम एकदाच करायचा, त्यामुळे तो event म्हणून करायचा असतो. पैसा भरपूर आहे, जवळचे मित्र मैत्रिणी High status चे मग… त्यांच्या status प्रमाणे करायचे असते. या अशा कार्यक्रमात कधी बायको, तर कधी नवरा दबक्या आवाजात विरोध करत असतो. पण शेवटी एकदाच तर करायचय… अस म्हणत सर्व तामझाम होतोच.

मित्र मैत्रीणिंच्या गृपमध्ये कार्यक्रम करायचा म्हणजे पाकिटावर जरा जास्त भार पडतो. कारण तेंव्हा स्वतःचे social status चा पण विचार असतो / किंवा दाखवायचे पण असते…

 नातेवाईंकासाठी करायचा असेल तर… त्यावेळेस नातेवाईकांचे status बघून कार्यक्रम होतो. Status प्रमाणे मेन्यू ठरतो. कोणाला बोलवायचे? कोणाला नाही? हे ठरत. status प्रमाणे हाॅटेल ठरत. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे लक्ष दिलच पाहिजे, अशी जबाबदारी वगैरे नसते. किंवा कधी कधी तर दुर्लक्ष केल तरी चालत.. कभी हां कभी ना कॅटेगरीतील नातेवाईकही असतातच की.

म्हणजे काही नातेवाईक असे असतात, म्हणजे बोलवाव लागतय म्हणून बोलवलय.

बाकी खूप लक्ष वगैरे द्यायची गरज नसतेच. पण असे लोक जेंव्हा नात कस असाव? या विषयावर बोलतात, तेंव्हा आ हा हा!!!. ऐकत रहावस वाटत. म्हणजे एवढी समज असलेले great च नाही का? म्हणजे मला वाटत राज्य स्तरीय स्पर्धेत या भाषणाला पहिल बक्षीस नक्की मळेल.

 हे लोक आयुष्यात कस वागतात? हे त्यांनाही माहित असत आणि आपल्यालाही. ते अगदीच तस वागत नाहीत, अस म्हणता येणार नाही. काही specific मोजक्या लोकांबरोबर तस वागतात. वेळ पडली तर झुकतात. आपला फायदा लक्षात ठेवून चमचेगीरी पण व्यवस्थित करतात.

शेवटी Status हा एक Issue सध्या खूप महत्वाचा झालाच आहे. दुसर्यांच status तेच ठरवतात.

पैसा बोलता है। म्हणतात ना ते खरच आहे.

 status issue म्हणजे पैसा, मोठ्ठ घर rather बंगला, मोठी कार, आणि मुख्य म्हणजे तो कामाचा आहे का? हे सर्व त्या माणसापेक्षा जास्त महत्वपूर्ण असत. अशा माणसाबरोबर काढलेली Selfie म्हणजे पण एक achievemet च असत. त्या माणसाबद्दल रंगवून रंगवून सांगण, हा त्यांचा छंद असतो.

 कधी बोलवून अपमान होणे, किंवा न बोलवून अपमान करणे ही या so called / self proclaimed high status वाल्यांचे common behavior असत. केंव्हा पलटी मारतील ते सांगता येत नाही.

काल एक so called/ self proclaimed श्रीमंत नातेवाईक भेटले. मागच्याच आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न झाले. या वेळेस आम्ही कभी ना या option category त होतो. आम्हाला म्हणाले… तुम्ही आला नाहीत हो लग्नाला.

 खर म्हणजे ही गोष्ट खूप जूनी विसरण्यासारखी नव्हतीच.

मी आणि ताई एकमेकींकडे बघतच राहिलो. अरे! म्हणजे तुम्ही काहीही करा, चूक आमचीच.

अशा लोकांच काय करायच? समजत नाही.

एकदा वाटत स्पष्ट उत्तर द्याव. हे आपल्याला बुद्धु समजतात बहुतेक.

आपली चूक पण दुसर्यांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात

We r different. असा समज असणारे हे लोक 

Occasion प्रमाणे this time only few dignitaries r invited. Not everyone. अस सहज वागतात…

ही अशी कभी हां कभी ना. वाली नातेवाईकांची category पण असते बर का…

आपण नाही का? काही वस्तू गरजेनुसार वापरतो, गरज संपली की आपण सहज म्हणतो… आता जरा बाजूला, वर माळ्यावर ठेवा. सध्या आपल्याला यांची गरज नाही ना, मग नंतर जर गरज लागली तर, तेंव्हा बघू. असा विचार करून ती वस्तू बाजूला ठेवतो.

ही वस्तुंची कभी हां कभी ना वाली कॅटेगरी झाली.

तसच माणसांच्या बाबतीत पण असत.

कभी हां, कभी ना.

हे असे equations समजायला वेळ लागतो. एकदा समजल्यावर त्रास होतो. रागही येतो. स्वतःशीच खूप वाद/ संवाद होतात. एका दृष्टीने बर होत. आपल्याला आपली पूढची line of action ठरवायला सोप्प होत. आपल्यालाही कुठे लाईन ओढायची हे ठरविता येत.

समोरच्याला आता आपण नकोय हा विचार मानसिक त्रास देणारा नक्कीच आहे.

उद्या या म्हणतील, तेंव्हा आपण नाही गेलो तर तुम्ही आला नाहीत? का बर?

म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी.

या अशा परिस्थितचा आनंद घेणारे/ आग लावणारे पण असतातच की. लगेच कधी कधीच फोन करणारे, पण अशा वेळेस नक्कीच फोन करतात…

हो का? अग बाई! तुम्हाला मेसेज नाही मिळाला का? अस नक्कीच म्हणतील…

वाढत्या वयाबरोबर, अनुभवांवरून बरच काही समजू लागल आहे.

नात सांभाळण ही फक्त एकाच पार्टीची जबाबदारी नाही/ नसते.

हे खरय… At the same time…

You cannot force someone to 

respect you. but you can choose to walk away when they don’t. and that decision can change the direction of your life.

हर तकलीफ से इंसान का दिल दूखता बहुत है। पर हर वह तकलीफ से वो सीखता भी बहुत है।

आजकाल दिवसातून शंभरदा फोनवर डिलीट चे बटन दाबतोच ना. आपण unwanted messages delete कतोच ना.. तसच आपले विचार शांतमनाने फिल्टर करायचे, आणि आपली माणसांची लिस्ट Review करायची आणि जिथे आपल्याला

 value नाही, त्यांना महत्व द्यायची गरज नाही. तेथे डिलीट चे बटन दाबायचे. Option कॅटेगरीत स्वःतला ठेवायचे नाही.

तिथे आपला वेळ एनर्जी, वाया घालवायची गरज नाही. लगेचच आपल्या महत्वाच्या कामांची लिस्ट काढायची आणि त्यावर फोकस करायचे.

Distance is the new and only answer for such people.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके 

शिवरायांचा ‘गनिमी कावा’ पुढे चालवणारे ब्रिगेडीअर बसंत पंवर! 

 भारताला पाकिस्तान आणि चीनसोबतची समोरासमोरची थेट युद्धे जंगलात लढावी लागली नाहीत. परंतु नक्षलवादी, माओवादी, विघटनवादी इत्यादी शक्तींशी लढताना मुख्य लढाई घनदाट जंगलातच होती आणि आहे. अर्थात भारतीय जनमानस या संघर्षाला अजूनही लढाई आणि त्यात लढणा-यांना सैनिक मानत नाही, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. जनमानसात युद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमापार प्रचंड हल्ले, मोठी शस्त्रे… लढाई आणि हारजीत! 

 त्यामुळेच आरंभी मुघल शिवरायांच्या मावळ्यांना सैनिक आणि त्यांच्या समूहाला सैन्य मानत नव्हते… पुढे शिवरायांच्या गनिमी काव्याने मुघलांच्या साम्राज्याची राखरांगोळी केली, हा इतिहास आहे. छत्रपती महाराज साहेबांनी विकसित करून प्रचंड यशस्वी करून दाखवलेला हा गनिमी कावा म्हणजेच Guerrailla warfare!

 जंगलात लढण्यासाठी विशिष्ट पद्धतीची युद्धनीती अवलंबावी लागते. Guerra म्हणजे लढाई आणि illa म्हणजे छोटी… लहान! guerrailla म्हणजे लहान लढाई… चकमक! 

 ही युद्धनीती आरंभी भारतीय सैनिकांना आरंभी तितकीशी अवगत नव्हती आणि ही नीती शिकवण्याची कोणती व्यवस्था. ही कमतरता भरून काढली ती ब्रिगेडीअर बसंत पनवर साहेबांनी. साहेब त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य. त्यांचे वडील मेजर देवीसिंग पनवार दुस-या महायुद्धात सहभागी होते. तर आजोबा म्हणजे आईचे वडील कर्नल मंगल सिंग हेही पहिल्या महायुद्धात सैनिकी अधिकारी होते. मामा कर्नल अजित सिंग, लेफ्ट. कर्नल ओंकार सिंग, मेजर रामसिंग हेही सैन्याधिकारीच होते!

 साहेबांना अगदी शालेय वयापासून घोडेस्वारीची आवड होती. आपण एक घोडा विकत घ्यावा, असं त्यांना कायम वाटे. आणि पुढील आयुष्यात त्यांनी खरोखरीच एक घोडा विकत घेतलाही. घोड्यावरून खेळले जाणारे अनेक साहसी खेळ साहेब लीलया खेळत असत! 

 साहेबांच्या वडिलांची बदली होई त्या शहरात साहेबांचे शिक्षण होत गेले… पण कळत्या वयात त्यांना पुण्याच्या बिशप्स स्कूल बोर्डिंगमध्ये राहण्याची संधी प्राप्त झाली.. ज्या ठिकाणी ब्रिटीश आर्मीमधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. खेळांमध्ये प्रगती साधता आली. पुढे साहेब वडिलांकडे आग्रह करून सैनिकी शाळेत आणि तिथून पुढे एन. डी. ए. खडकवासला येथे प्रवेश घेते झाले. ते एन. डी. ए. मध्ये जिमनास्टीक्स, घोडेस्वारी या प्रकारांत अव्वल होते. त्यामुळे एन. डी. ए. चा अभ्यासक्रम आणि पुढे आय. एम. ए. चाही अभ्यासक्रम सहजी पूर्ण झाला!

मेरीटमध्ये उत्तीर्ण झाल्याने साहेबांना कुठल्या पलटणमध्ये जायचे हे ठरवण्याची विशेष सवलत मिळाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी ज्या पलटणीमध्ये कारकीर्द घडवली होती त्या फर्स्ट मराठा पलटणीत प्रवेश मिळवला! ही पलटण जंगी पलटण म्हणजे लढाऊ पलटण म्हणून ख्यातकीर्त आहे. साहेबांना पहिली नेमणूक मिळाली ती Nagaland मध्ये.

३, सप्टेंबर, १९७०. पंवर साहेबांनी यंग ऑफिसर्स नुकताच पूर्ण केला होता. नागा बंडखोरांनी त्यावेळी तिथे प्रचंड उच्छाद मांडला होता, सैनिकांना कोंडीत पकडून त्यांचा अनन्वित छळ केला होता. आणि याच ठिकाणी पंवर साहेब दाखल झाले होते.

इथे नागा बंडखोर अतिरेक्यांनी भारतीय सैन्याला मुद्दाम त्यांच्या एका प्रशिक्षण शिबिराची माहिती मिळेल अशी व्यवस्था केली… जेणेकरून एकाच वेळी अनेक सैनिक त्यांच्या तावडीत सापडू शकतील!

 त्यावेळी तरुण तडफदार सेकंड लेफ्टनंट पदावर असलेल्या पंवर साहेबांनी या छावणीवर त्यांच्या अगदी जवळ जात हल्ला चढवला. बंडखोर पळून आत जंगलात जाऊन लपले. आपल्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला, प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली… त्यामुळे नागा बंडखोरांच्या मनात भारतीय फौजेविषयी धाक निर्माण झाला! 

 पुढे १९७१ मध्ये पाकिस्तानशी घोषित युद्ध सुरु होण्याआधी साहेबांनी सीमापार घुसत, स्थानिक मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना हाताशी धरून पाकिस्तानी फौजेवर डोन मोठे छुपे हल्ले चढवले आणि यशस्वी करून दाखवले… पुढे होणार असलेल्या युद्धाची ही एक चुणूकच म्हणावी लागेल… पंवर साहेबांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. इतका का ते मोहिमेवर जाताना चक्क स्वत:चा कॅमेरा घेऊन जात आणि फोटो घेत.

 आपल्याला या वयातच युद्धावर जाण्याची संधी मिळणार आहे, याचा त्यांना खूप अभिमान वाटला होता! अशा अनेक चकमकी सुरु झाल्या. अशाच एका संघर्षात आपल्या सैनिकांनी २३४ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले… आणि त्यामुळे त्यांचे उर्वरीत सैन्य त्यांच्या कमांडरसह ढाक्यामध्ये पलायन करते झाले! याचवेळी मुक्ती वाहिनीच्या सैनिकांची आणि आपल्या सैनिकांची भेट झाली.. त्यांनी विचारले… दुश्मन किधर है? पंवर साहेब म्हणाले… दुश्मन भाग रहा है! पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि मग पंवर साहेबांना थोडी उसंत मिळाली… तोवर ते कॅप्टन पदी पोहोचले होते. पण लगेचच एक महत्त्वाची जबाबदारी दिली गेली… ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, मद्रास येथे प्रशिक्षक नेमले गेले… इतरांपेक्षा साहेबांचा अनुभव चार-पाच वर्षांनी कमी असला, त्यांचे प्रशिक्षणार्थी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी साहेबांनी त्यांच्या दर्जेदार प्रशिक्षण, स्वत: उदाहरण बनून दाखवल्याने त्यांचा कार्यकाल खूप यशस्वी झाला! घोडेस्वारी करता करता खेळला जाणारा अतिशय रोमांचक आणि अवघड खेळ, पोलो या खेळामध्ये कॅप्टन साहेबांना खास गती होती.. त्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले. राष्ट्रपती भवनातल्या घोडदळ दलामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. पुढे देशाच्या अनेक भागांत, अनेक जबाबदा-या पार पाडत पाडत साहेब त्रिपुरा मध्ये आसाम रायफल्समध्ये आले.

त्या भागात भारतविरोधी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. साहेबांनी बंडखोरांना सक्त ताकीद दिली… भारतीय सेनेविरोधात तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही… हत्यारे खाली ठेवा! 

पुढे Nagaland, मिझोरम मध्ये साहेबांनी उत्तम काम करून दाखवले. मिझोरममधल्या जोराम्थांगा सरकारशी त्यांनी बोलणी केली. जोराम्थांगा हे मुख्यमंत्री होते, जे पूर्वाश्रमीचे सशस्त्र आणि भूमिगत बंडखोर होते. आणि त्यांनी guerrilla युद्धनीतीने भारतीय सैन्याशी संघर्ष केला होता… सुमारे वीस वर्षे. ते पुढे राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले व राजकरणात येऊन मुख्यमंत्री बनले. पंवर साहेबांनी याच जोराम्थांगा यांना भारतीय सेनेने स्थापन केलेल्या अतिरेकी विरोधी कारवायांना कसे तोंड द्यायचे यासाठी स्थापन केलेल्या सैन्य शैक्षणिक संस्थेत ‘गनिमी कावा’ युद्ध अर्थात guerrilla युद्ध कसे करावे? या विषयावर व्याख्यान द्यायला येण्याचे आमंत्रण देण्याचे धाडस दाखवले होते! 

 पंवर साहेबांनी त्यांचे हे युद्धकौशल्य पुढे अमेरिकन सैन्यातील काही सैनिकांनाही शिकवले… त्यावर त्यांच्या संरक्षणमंत्र्यां प्रशंसोद्गार काढले होते. पुढे भारत-अमेरिका संयुक्त सैन्य सरावात guerrilla warfare आणि पंवर साहेब हे एक समीकरण बनले होते.

 पुढे २००४ वर्ष उजाडले आणि पंवर साहेबांच्या हातून एक मोठे कार्य पार पडण्याचे दिवस आले… नक्षलवाद विरोधी अभियान! साहेबांना छत्तीसगढमध्ये आमंत्रित करण्यात आले. पोलिसांना जंगलात नक्षली बंडखोरांशी नेमके कसे लढावे याचे प्रशिक्षण फारसे नव्हते. साहेबांनी सुरुवातीला १०० पोलिस आणि पुढे आणखी काही पोलिस अधिका-यांना प्रशिक्षित केले. साहेबांच्या सेवानिवृत्तीला त्यावेळी केवळ दोन महिने उरले होते. छत्तीसगढ सरकारने पंवर साहेबांना पोलिसांना प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यावेळी खरंतर साहेबांना कांगो या आफ्रिकी देशात जाण्याची इच्छा होती… पण भारतातही तसेच जंगल आहे आणि आपली इथे खूप गरज आहे, हे त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात आले आणि साहेबांच्या आणि नक्षलवाद विरोधी चळवळीला एक नवे वळण प्राप्त झाले… जे खूप महत्त्वाचे ठरले! 

३१ मार्च, २००५ रोजी भारतीय सैन्यातून साहेब निवृत्त झाले… कुटुंबियांना घरी सोडले आणि आणि साहेब रायपूर साठी रवानाही झाले… इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या पदाची सूत्रे हाती घेतली! आणि त्यांनी पहिला आदेश काढला… नक्षलवाद्यांशी लढायचे ते सैनिकी वेशात… खाकी रंगाचा गणवेश नको… combat uniform वापरायचा! यामुळे पोलिसांच्या आत्मविश्वासाला मोठी झळाळी आली.

मग साहेबांनी प्रशिक्षणासाठी विशेष जागा पाहिजे म्हणून आग्रह धरला. तीन मोठ्या डोंगरांच्या मध्ये असलेली जागा निवडली. जणू ही प्रत्यक्ष युद्धभूमीच होती. नक्षली ज्या वातावरणात राहतात… तसे वातावरण तयार करून घेतले… ते जसे हल्ले चढवतात, तसेच हल्ले आपणही करायचे… एवढेच नव्हे जंगलात सैनिकांसाठी शौचालये किती आकाराची बांधायची, तयार करायची याची मोजमापे ठरवून दिली. आरंभी केवळ शंभर एक एकर जमीन मिळाली होती या कामासाठी… ती विविध प्रयत्न करून तीनशे एकरांवर नेली. वनखात्याची जमीन वापरात आणली. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर संघर्षही केला. विशेष helipad बांधून घेतले… विशिष्ट रुंदीचा रस्ताही बांधून घेतला… या रस्त्याला ELG नाव दिले. याचा full form कित्येक लोकांना लवकर समजला नाही… emergency landing ground! ज्याचा पुढे अनेकांना उपयोग झाला. जखमी सैनिकांना वेगाने रुग्णालयात नेता येऊ लागले. परिसरात ८५ हजार झाडे लावली… जंगल आणखी घनदाट केले. साडेचार महिन्यात जंगल युद्ध प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. हे भारतातील पहिले प्रशिक्षण केंद्र होते… गनिमी कावा शिकवणारे! 

 प्रशिक्षण अतिशय कडक. कुणी सलग तीन दिवस अनुपस्थित राहिले की त्याने संपूर्ण अभ्यासक्रम पहिल्यापासून पुन्हा करायचा असा दंडक घालून दिला! शारीरिक व्यायाम तर होताच, पण मानसशास्त्रीय कसोट्यासुद्धा घेतल्या गेल्या… स्वत:वर नियंत्रण कसे आणावे, रागावर काबू कसा ठेवावा, कठीण परिस्थितीत निर्णय कसे घ्यायचे याचे वस्तुपाठ घालून दिले साहेबांनी. त्यामध्ये त्यांचा स्वत:चा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या शब्दांना धार आणत होता.

 या प्रशिक्षणातून तयार झालेल्या सर्वांना पोलिस ते सैनिक असा बदल अनुभवाला येऊ लागला. अतिरेक्यांसोबत चकमकी तर होतच होत्या, पण त्यात पोलिसांची हानी लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली, बहादुरी गाजवणा-या पोलिसांना पदके प्रदान केली जाऊ लागली. या भागात नेमणूक म्हणजे शिक्षा हा समज हळूहळू कमी होऊ लागला.

 पंवर साहेबांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती मग झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी दहा राज्यांनी केली.. साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपापल्या पद्धती विकसित केल्या. पूर्वी नक्षली अतिरेकाविरोधात भारतीय सैन्य बोलवावे, त्यांची मदत घ्यावी अशी मागणी होत असे. आता सैन्यासारखीच क्षमता पोलिसांमध्येही ब-याच प्रमाणात आल्याने तशी फारशी वेळ आली नाही… पोलिसांचे रुपांतर सैनिकांत होऊ लागले होते… पंवर साहेब या कार्यात थोडीथोडकी नव्हेत… अठरा वर्षे सक्रीय राहिले! सैन्यातील प्रत्यक्ष सेवा आणि नंतरची ही सेवा मिळून साहेबांनी किमान पन्नास वर्षे देशसेवा बजावली. यावर्षी नक्षलवादी सशस्त्र संघर्ष जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत… येत्या काळात सर्वच नक्षलवादी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील.. अशी आशा आहे. पण ही प्रक्रिया कित्येक वर्षांपूर्वी सुरु झाली होती… त्यात ब्रिगेडीअर बसंत पंवर (पन्वर) या महान योध्याच्या कार्यकुशलतेचा, नियोजन, नेतृत्व आणि मुख्य देशसेवेच्या अपार इच्छाशक्तीचा सिंहाचा वाटा होता… हे काळाला मान्यच करावे लागेल! 

आपल्याकडे महान माणसांची महती त्यांच्या मृत्यूनंतरच सामान्य लोकांना समजते… ब्रिगेडीअर साहेबांचेही काही निराळे झाले नाही… १ फेब्रुवारी, २०२३ रोजी साहेबांनी या दीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली… कारण मिशन पूर्ण झाले होते! शरीराला आरामाची आवश्यकता होतीच… शिवाय कुटुंब आता वाट पहात होते… २०११ मध्ये अर्धांगिनी स्वर्गवासी झाल्या होत्या. दोन सुपुत्र तर सेनेत अधिकारी बनून सीमेवर सेवा करीत होतेच. त्यामुळे तेही फारसे घरी नसत. पण आई वाट पहात होती. त्या बिचारीने ७१ च्या लढाईतून आपला पोर सहीसलामत परत यावा यासाठी देवाला साकडे घातले असेल… पोरगं लढत राहिले पुढची कित्येक वर्षे. साहेबांनी २०२३ मध्ये २७ फेब्रुवारीला अत्यंत वृद्ध झालेल्या आईच्या गळ्यात हार घातला… आणि चरणस्पर्श केला! आई… मी घरी आलो आहे… सुरक्षित! 

 साहेबांना विशिष्ट सेवा मेडल तर मिळाले होतेच… पुढे अति विशिष्ट सेवा मेडलही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते दिले गेले… त्याही वयात साहेबांनी उत्कृष्ट परेड चाल म्हणजे विशिष्ट सैनिकी पद्धतीने चालत जात राष्ट्रपती महोदयांना अभिवादन केले होते! 

७७ वर्षे, ४ महिने आणि २४ दिवसांच्या देदीप्यमान आयुष्यानंतर २७ जुलै, २०२६ रोजी ब्रिगेडीअर बसंत पंवर साहेबांनी या जगाचा निरोप घेतला… हाती घेतलेलं कार्य तडीस नेले… असे सैन्याधिकारी देशाला लाभले हे आपले मोठेच सुदैव. साहेबांना करावे तेवढे अभिवादन कमीच पडेल! Maratha Light Infantry मधून सैनिकी जीवन सुरु करणा-या या महान सैनिकाने बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा जयजयकार खरा करून दाखवत शिवरायांची युद्धनीती जगून दाखवली आणि 37 हजार जवानांना शिकवली सुद्धा! Fight a guerrilla like a guerrilla पोलिसांतून कमांडो निर्माण करणारे ब्रिगेडीअर पंवर साहेब आपले भूषण आहेत. जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९१ – – 

नको वीट मानू रघुनायेकाचा ।

अती आदरे बोलिजे राम वाचा ।

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।

अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, ” हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा (वीट) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.

(वाचा – मुखाने, न वेचे – खर्च करावे लागत नाही)

विवेचन :  मनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.

ते नाम किती सोपे आहे! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ‘ नाम ‘ हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात, ” सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ” सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.

समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ‘ जानकीवल्लभ ‘ हे ते नाम! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम!अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. “अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।” या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल. गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ‘ केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ‘अनुभवून तर बघा!

स्वसंवाद :: 

१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला ‘वीट’ (कंटाळा) का येतो?

२. “नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे, ” या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का?

३. जानकीवल्लभ श्रीरामांचे नाम केवळ ओठांवरून उच्चारण्याऐवजी, मी कधी पेढ्यासारखी त्याची आंतरिक गोडी अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?

४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ ‘आवडीने आणि आदराने’ त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो?

=====

श्लोक क्र. ९२ – – 

अती आदरे सर्व ही नामघोषे ।

गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।

हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात)

(गिरिकंदरी – पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु – थांबून राहतो, तोषणे – संतोष/आनंद होणे, पिसे – वेड)

विवेचन : भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.

भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात

नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥

– – श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ‘ जेथे नाम तेथे माझे प्राण ‘ असे म्हणतात.

नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात.  

रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात…

उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।

स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥

भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो.  

स्वसंवाद :: 

१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय?

२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत ‘यांत्रिकपणे’ भटकत राहते का? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे?

३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, “जेथे नाम तेथे माझे प्राण” यावर माझा विश्वास आहे का?

४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का?

– क्रमशः श्लोक ९१ आणि ९२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थवा पक्ष्यांचा… – लेखक : डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थवा पक्ष्यांचा… – लेखक : डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम

मानवी जीवनाचे वास्तव:

एके सकाळी एक मुलगा आपल्या आजोबांसोबत शेतात फिरायला गेला.

अचानक त्याच्या नजरेस आकाशात इंग्रजी व्ही (‘V’) आकारात उडणारा पक्ष्यांचा एक मोठा थवा दिसला.

मुलाने कुतूहलाने विचारले,

“आजोबा, हे पक्षी नेहमी थव्यानेच का उडतात? प्रत्येकाने आपापल्या मार्गाने उडालं तर चालणार नाही का? ”

आजोबा हसले.

ते म्हणाले,

“बाळा, निसर्ग कधीच विनाकारण काही करत नाही.”

ते पुढे म्हणाले,

“हे स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात.

ते जेव्हा ‘व्ही’ आकारात उडतात, तेव्हा सर्वात पुढचा पक्षी हवेला चिरत पुढे जातो. त्यामुळे त्याच्या मागच्या पक्ष्यांना कमी प्रतिकार सहन करावा लागतो आणि त्यांची ऊर्जा वाचते.

पण एक गोष्ट लक्षात घे…

पुढचा पक्षी कायम पुढे राहत नाही.

तो दमला की शांतपणे मागे जातो…

आणि दुसरा पक्षी त्याची जागा घेतो.

असं करत करत…

संपूर्ण थवा एकमेकांच्या बळावर हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो.

 

मुलगा आश्चर्याने ऐकत होता.

 

तेवढ्यात एक पक्षी थव्यापासून थोडा दूर गेला.

क्षणभर तो स्वतंत्रपणे उडत राहिला.

पण लवकरच त्याला वार्‍याचा जास्त प्रतिकार जाणवू लागला.

त्याचा वेग कमी झाला…

दिशा डळमळू लागली…

आणि काही क्षणांतच तो पुन्हा थव्यात येऊन सामील झाला.

 

आजोबा हसून म्हणाले,

“बघितलंस? पंख त्याच्याकडे आधीही होते… पण? सोबत नव्हती.”

आपलं आयुष्यही असंच आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाकडे स्वतःची क्षमता असते.

पण…

जीवनाचा लांब प्रवास फक्त क्षमतेवर पूर्ण होत नाही.

त्यासाठी साथ लागते…

विश्वास लागतो…

आधार लागतो…

आणि आपली माणसं लागतात.

कुटुंब…

मित्र…

समाज…

हे आपल्या आयुष्याचे ‘थवे’ आहेत.

जेव्हा आपण थव्यात असतो…

तेव्हा कधी आपण इतरांचा भार हलका करतो…

तर, कधी इतर आपल्या थकलेल्या पंखांना बळ देतात.

म्हणूनच…

समूहातील एखादी व्यक्ती काही दिवस दिसत नसेल…

तर तिची चौकशी करायला हवी.

कदाचित ती आयुष्याच्या वार्‍याशी एकटी झुंज देत असेल.

तिला दोष द्यायला नको…

तिला पुन्हा थव्यात घेऊन यायला हवे.

 

कारण, नैसर्गिक नियम हाच आहे—

की, पक्षी जसा एकटा तर उडू शकतो…

पण तोच थव्याने अधिक दूर, अधिक सुरक्षित आणि अधिक सक्षमपणे प्रवास करु शकतो.

 

माणसांचंही तसंच आहे.

एकट्याने यश मिळवता येईल…

पण आयुष्य जिंकण्यासाठी अखेर माणसं लागतात.

म्हणून…

कोणालाही मागे राहू द्यायला नको.

कोणाला हरवू द्यायला नको.

कारण…

जसे, एकत्र उडणारे पक्षी फक्त अंतर पार करत नाहीत…

तर ते एकमेकांना गंतव्यापर्यंत पोहोचवतात.

म्हणूनच…

जीवनाचं खरं सौंदर्य “मी” मध्ये नसतंच…

ते नेहमी “आपण” मध्येच असतं.

 लेखक : डॉ. शिरीष राजे

मानसशास्रतज्ज्ञ

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘मामा’ (माहेरचा समृद्ध दुवा)

‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ आणि आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’ अनुभवले. या महावस्त्रात एक अत्यंत हसरा, मनमोकळा आणि प्रेमाचा सुंदर रंग भरणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘मामा’! या पदराची झळाळी अत्यंत विलक्षण आणि नजरेत भरणारी असते; कारण हा नात्यांमधील अतिशय महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि विलोभनीय असा पदर आहे.

‘झुक झुक झुक अगीनगाडी… मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं ज्याला माहिती नाही, असा मराठी माणूस विरळाच! मामाबद्दलचे प्रेम आणि आदर आपण अगदी लहानपणापासूनच शिकतो. आकाशात दिसणारा चंद्र बाळाला दाखवताना आई त्याला प्रेमाने ‘चांदोमामा’ म्हणते. तो भलेही आपल्यापासून लाखो मैल दूर असतो, पण त्याच्याशी आपण लहानपणी नकळत कितीतरी गुजगोष्टी करतो! चंद्राची ती शीतल सावली आपण प्रत्यक्ष मामाच्या प्रेमात अनुभवतो. लहान मुलांच्या गोष्टींतही अनेक प्राणी ‘मामा’ बनून बोलू लागतात; तर खेळांमध्ये ‘माझ्या मामाचं पत्र आलं, ते मला सापडलं’ अशी सुंदर गाणी असायची. आजच्या काळात पत्रलेखनच बंद झाल्यामुळे आपण अशा अनेक चांगल्या गोष्टींना मुकलो आहोत.

‘मामा’ हा शब्द उच्चारताच कोणाच्याही चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणि आपुलकी उमटल्याशिवाय राहत नाही. आपण कधी विचार केला आहे का, ‘मा-मा’ या शब्दात दोन वेळा ‘मा’ शब्द का येतो? पहिला ‘मा’ म्हणजे आईची अथांग ‘माया’ आणि दुसरा ‘मा’ म्हणजे आईचे ‘माहेर’! या दोन ‘मा’ अक्षरांच्या सुरेख मिलनातून साकार झालेला शब्द म्हणजेच मामा! संस्कृतमध्ये ‘मम’ म्हणजे ‘माझे’. जो पूर्णपणे आपला असतो, जिथे कोणत्याही मुखवट्याची किंवा संकोचाची गरज नसते, तो ‘मामा’! आईच्या माहेरची समृद्ध आठवण आणि भाच्यांच्या विश्वातला हक्काचा सखा म्हणजेच मामा असतो.

मला तीन मामा होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती तशी अगदी बेताचीच होती, पण त्यांच्याजवळील प्रेमाचा आणि संस्कारांचा झरा मात्र अक्षय—म्हणजेच कधीही न आटणारा होता! लहानपणी ‘मामा घरी येणार आहेत’ एवढं जरी ऐकलं, तरी मला जो आनंद व्हायचा, तो अक्षरशः अवर्णनीय असायचा. सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायला मिळणे हा मोठा उत्सव असायचा. तिथे मामा आणि मामी माझे खूप लाड करायचे, मला आवडणारे खाद्यपदार्थ हटकून बनवले जायचे. याच मामांनी मला प्रेमासोबतच संस्कारांची खरी शिदोरी दिली. माझे धाकटे मामा तर माझे मामा कमी आणि मित्रच जास्त होते! त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करायचो; तेही मला योग्य-अयोग्य काय, हे नेहमी समजावून सांगायचे.

त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक असताना सुद्धा मामांनी माझ्या आईला तिच्या प्रत्येक अडचणीत वेळोवेळी खूप मदत केली. तिचे आई-वडील तर ती लहान असतानाच वारले होते; त्यामुळे मामाच तिचे आई-वडील झाले. त्यांनीच तिला सांभाळले, शिकवले आणि योग्य वेळी लग्न करून दिले.

आई आणि मामा यांच्यातील अतूट व जिव्हाळ्याच्या बंधनाचा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग मला आजही आठवतो. एकदा आई खूप आजारी होती, त्यावेळी मी लहान होतो. मामा शहरात राहत असल्याने आईला त्यांच्याकडेच ठेवावे लागले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिचे एक मोठे ऑपरेशन झाले. त्या दरम्यान तिला प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी माझे मामा तिथे देवासारखे धावून आले. त्यांनी स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचे प्राण वाचवले! अशा कधीही न विसरता येणाऱ्या मामांच्या अनेक आठवणी माझ्या आठवणींच्या कप्प्यात जपलेल्या आहेत.

लहानपणीच्या आठवणींचा पट उलगडला, की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि ‘मामाचं गाव’ हे समीकरण सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं. ‘मामाच्या गावाला जाऊया, तिथे जाऊन मजा करूया’ ही बालगीतातली ओळ प्रत्येक लहान मुलाच्या आवडीची असते. मामाचं घर म्हणजे मुलांसाठी कडक शिस्तीतून मिळालेली एक हक्काची ‘मुक्त शाळा’! जिथे आई-बाबांचा ओरडा नसतो, अभ्यासाची कटकट नसते; असतो तो फक्त आणि फक्त भाचेमंडळांचे लाड पुरवणारा मामा! आई जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी नकार देते, तेव्हा भाचेमंडळी आपला हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ज्याच्याकडे विश्वासाने धाव घेतात, तो मामाच असतो. भाच्यांच्या आनंदासाठी स्वतः लहान मूल होणारा, सुट्ट्यांमध्ये त्यांना फिरायला नेणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा मामा प्रत्येक मुलाच्या बालपणाला आनंदाचे इंद्रधनुषी रंग देऊन जातो.

मामाच्या या अथांग मायेचा आणि बालपणीच्या आनंदाचा विचार करताना एका अत्यंत महत्त्वाच्या नात्याचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही—ते नातं म्हणजे ‘मामी’! मामा जे लाड करतो, बहिणीला धीर देतो किंवा भाच्यांच्या पाठीवर हात ठेवतो; या सगळ्यामागे ‘मामीची साथ आणि तिचे औदार्य’ खूप मोठे असते. मामी जर संकुचित वृत्तीची असेल, तर मामाचं घर भाच्यांसाठी कधीच उघडं राहू शकत नाही.

मामी ही केवळ मामाची पत्नी नसते, तर नावातच दडल्याप्रमाणे ती भाच्यांसाठी ‘मा-मी’ म्हणजे आईसारखीच दुसरी माउली असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी भाचेमंडळी घरी आल्यावर, अजिबात कपाळावर आठी न आणता, हसतमुखाने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारी, त्यांचे कौतुक करणारी मामी खऱ्या अर्थाने त्या घराचे घरपण जपते. प्रसंगी ती स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करून भाच्यांचे लाड पुरवते! नणंदेच्या संसारातील दुःखात तिला आपल्या सख्या बहिणीसारखा मायेचा आडोसा देणारी मामीच असते. म्हणूनच, मामाच्या माहेरचा हा ‘सुगंध’ टिकवून ठेवण्यात मामीचे योगदान अनन्यसाधारण आणि वंदनीय आहे!

मामा या नात्याचे रूप केवळ लाड पुरवण्यापुरते मर्यादित नाही; तर कठीण प्रसंगात तो कुटुंबाचा भक्कम कणा बनतो. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील वारल्यानंतर, विस्कळीत झालेल्या कुटुंबाला आणि दुःखात बुडालेल्या आईला खऱ्या अर्थाने सावरणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलांचा मामाच असतो. अशा वेळी मामीसुद्धा आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्या भाच्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सामावून घेते.

याचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक उदाहरण म्हणजे भारताचे महान सुपुत्र, पहिले थोर इंजिनियर भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! सर विश्वेश्वरय्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. अशा अत्यंत बिकट आणि कठीण प्रसंगात त्यांच्या आईला आणि बाल-विश्वेश्वरय्यांच्या शिक्षणाला त्यांच्या मामाने विश्वासाचा आणि भक्कम आधार दिला. मामाने लावलेल्या या विश्वासाच्या रोपट्यातूनच पुढे देशाचा एक महान शिल्पकार घडला!

मामा-मामी आणि भाच्यांचे हे प्रेम केवळ भावनांपुरते मर्यादित न राहता व्यवहारातही अगदी मूर्त स्वरूपात दिसते. आपल्याकडे अनेक हॉटेल्स, दुकाने किंवा व्यवसायांची नावे ‘मामा-भाचे’ अशी असलेली आपण आवर्जून पाहतो. ही केवळ व्यावसायिक नावे नसतात, तर एकमेकांवरील अथांग विश्वास, साथ आणि प्रेमाचे ते जिवंत प्रतीक असतात.

आपल्या संस्कृतीच्या इतिहासात पौराणिक कथांमध्ये या नात्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही छटा दिसतात. एका बाजूला स्वतःच्याच बहिणीच्या अपत्यांची निर्दयपणे हत्या करणारा आणि श्रीकृष्णाला मारण्यासाठी कपट-कारस्थाने रचणारा दुष्ट कंस मामा, तसेच भाच्यांना कपटाने युद्धाच्या गर्तेत लोटणारा कारस्थानी शकुनी मामा यांसारख्या कुप्रसिद्ध प्रवृत्ती होत्या; तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाचे अर्जुनाच्या आणि पांडवांच्या पाठीशी असलेले खंबीर मार्गदर्शकाचे नातं होते. कृष्णाने भाच्यांवर म्हणजे अभिमन्यूवर केलेले प्रेम आणि दाखवलेला धर्ममार्ग आजही नात्यांचा आदर्श मानला जातो.

मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते, तेव्हा तिच्या माहेरची खरी ताकद आणि आधार तिचा भाऊ आणि वहिनी असतात. बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा, तिच्या मुलांच्या लग्नसमारंभात किंवा शुभकार्यात ‘माहेरचा मान’ म्हणून आस्थेने पुढाकार घेणारा मामा कुटुंबातील नात्यांची वीण अधिक घट्ट करत असतो.

कधी कधी आपले काम साधून घेण्यासाठी लोक एखाद्याला ‘मामा’ म्हणतात, त्यावरूनच बहुधा ‘कामापुरता मामा’ ही म्हण आली असावी. पण खरा मामा हा कामापुरता कधीच नसतो! तो कायमच आपल्या नात्याचं भान आणि जबाबदारी सांभाळत असतो. बहिणीकडे सगळ्या कार्यक्रमात तो हक्काने राबत असतो—अगदी पु. ल. देशपांडे यांच्या कथेतील ‘नारायण’सारखा! त्याच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा यांनी अंतरपाट धरल्याशिवाय तर आपल्याकडे लग्नच लागत नाही! तो एक प्रकारे मामाने भाच्याला आणि भाचीला दिलेला प्रेमळ आशीर्वादच असतो. भाच्यांच्या लग्नात मंडपात ‘मामाचा मान’ आणि त्यांनी दिलेली भेट ही केवळ वस्तू नसते, तर त्यात आपल्या बहिणीच्या संसाराबद्दलची अखंड कृतज्ञता साठलेली असते. बऱ्याच समाजात अजूनही मामाची मुलगी करण्याची प्रथा आहे. जेव्हा मामांची मुलगी लग्न होऊन आत्याकडे सून म्हणून येते तेव्हा त्या निमित्ताने दुसरी पिढी पुन्हा जोडली जाते. नात्यांचा गोफ आणखी घट्ट होतो.

आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले, तरी ‘मामा-मामी’ या नात्यातील ओलावा आणि आपुलकी आजही तशीच टिकून आहे.

आजच्या बदलत्या काळातही भाच्यांशी मित्रासारखे नाते जपणारा, त्यांच्या करिअरच्या आणि आयुष्याच्या टप्प्यावर पाठीवर विश्वासाचा हात ठेवणारा मामा आणि मायेची सावली देणारी मामी आजही तितकेच हवाहवासे वाटतात. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मामा-मामीचा पदर माहेरच्या मायेचा समृद्ध सुगंध घेऊन येतो. हा पदर जेवढा प्रेमाने आणि आदराने जपला जाईल, तेवढं आपलं कुटुंब आणि आपले आयुष्य अधिक आनंदी व सुकर होईल!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाढदिवस… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाढदिवस… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(प्यायला बसले की पाचपाच हजाराची दारु ते पिऊन जातात असं शेठजींच्या कानावर आलं होतं. आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते) इथून पुढे – – 

” मी पवार साहेबांशी सहमत आहे ” पारेख उठून म्हणाले ” गरीबांना अशा गोष्टींची सवय लावायचीच कशाला? अशाने ते शेफारतात. एकदा सेलेब्रेट केल्यावर पुढच्या वर्षीही त्याची तीच अपेक्षा राहिल”

” तसं काही होणार नाही पारेख साहेब. पुढच्या वर्षी तो मोठा होईल त्याला आपोआपच जाणीव होईल ” शेठजी ठामपणे म्हणाले

” मला वाटतं आपण करावा वाढदिवस” वानखेडे उठून म्हणाले ” आपण सगळेच सधन आहोत. काय हरकत आहे दोनदोन हजार द्यायला. अहो तेवढ्या रकमेचं तर आपण जेवणच करणार आहोत. शेठजी बरोबर म्हणताहेत “

आता चर्चा रंगू लागली. प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात बोलणारे तावातावाने आपली बाजू मांडू लागले. आपल्या प्रस्तावाला थोडाही विरोध होणार नाही अशी अपेक्षा घेऊन आलेले लोढाशेठ समोरचे वादविवाद पाहून क्षुब्ध झाले. माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं.

” शेठजी मी निघू का? मला शाॅपिंगला जायला उशीर होतोय ” गव्हाणेबाई अस्वस्थ होऊन म्हणाल्या तसे अध्यक्ष पाटील उठले

” दोन मिनिट थांबा गव्हाणे मॅडम. एकमत न झाल्यामुळे आपण मतदान घेऊ. दिनूचा वाढदिवस साजरा करावा असं किती जणांचं मत आहे त्यांनी हात वर करावा”

समोरच्या बारा जणातून फक्त कुलकर्णी, वानखेडे, चव्हाण, गव्हाणेबाई यांनी हात वर केले. पवार, महाजन, जोशी, पारेख, लोखंडे, सुलक्षणेबाई यांनी हात वर केला नाही. फक्त चार हात वर आलेले पाहून लोढाशेठ चिंतातूर झाले

“चार जण. अध्यक्ष आणि मी आमचं मत धरुन सहा जण होताहेत. म्हणजे सहा विरुद्ध सहा असा बिकट मामला झालाय”

” आता यावर उपाय काय? “सुलक्षणे बाईंनी विचारलं

” सोपं आहे. आज जे आले नाहीत त्यांना मी मेसेज पाठवून निर्णय विचारतो. जर नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त झाली तर मी स्वतः सगळा खर्च करुन त्या मुलाचा वाढदिवस करेन “शेठजी थोडेसे चिडूनच दृढनिश्चयाने म्हणाले तसे पवार उठून म्हणाले

“जर तुम्हांला वाढदिवस करायचाच होता तर आम्हांला बोलावलं कशासाठी? फालतू आमचा वेळ घालवला”आणि ते उठून बाहेर चालायला लागणार तेवढ्यात शेठजी म्हणाले

“एक मिनिट. माझी सर्वांना विनंती आहे की निर्णय काहिही होवो, या विषयाचा उल्लेख दिनू किंवा एकनाथजवळ करु नका. आपल्याला त्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचंय “

“ठिक आहे “सर्व म्हणाले आणि पवारांच्या मागे सर्वजण निघून गेले.

“बघा मी तुम्हांला म्हंटलं नव्हतं की सगळे नमुने आहेत. पैसे देणार नाहीत. ठिक आहे. मेसेज पाठवून बघा सगळ्यांचा काय निर्णय होतो ते आणि मला कळवा”पाटीलसाहेब उद्वेगाने म्हणाले.

शेठजींना काय बोलावं ते कळेना. त्यांनी फक्त मान डोलावली.

घरी येऊन हा विषय त्यांनी बायकोला सांगितला. बायको रागाने मारवाडी भाषेत म्हणाली

“तुम्हांलाही नको त्या उचापत्या सुचतात. खरंच काय गरज आहे त्या पोराचा वाढदिवस करायची. असा कोणता तो मंत्रीसंत्री लागून गेलाय? मान्य आहे तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे, विशेष म्हणजे तो कुणाच्याही मदतीला धावून जातो पण या लोकांना असं डोक्यावर चढवायचं नसतं हे माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगलं समजतं कारण एवढं मोठं सुपरशाॅप तुम्ही चालवता ते उगाच नाही. आणि तुम्हांला एवढं त्याच्याबद्दल वाटतंच आहे तर त्याला घरी बोलवा. एखादा ड्रेस आणि मिठाईचा बाॅक्स त्याच्या हातात द्या बस झालं. पुर्ण सोसायटीच्या लोकांना बोलावून आपल्या सनीसारखा वाढदिवस साजरा करायची काहीच गरज नाही. दुसरं तुम्ही प्रत्येकाकडून दोन हजार घ्यायचं म्हणताय. अहो गणेशोत्सवासाठी आणि नवरात्राच्यावेळी वर्गणीचे साधे पाचशे रुपये द्यायलासुध्दा हे लोक त्रास देतात ते तुम्हांला काय दोन हजार काढून देणारेत? “

“वर्गणीची गोष्ट वेगळी आहे. तिथे भावना नसतात. पण इथे हा मुलगा सगळ्या कुटुंबांशी जोडला गेलाय. तू म्हणते तसा त्याचा वाढदिवस तर आपण कधीही करु शकतो. पण त्या पोराने जे स्वप्न बघितलंय ते पुर्ण करावं असं मला मनापासून वाटतंय”

“तुम्ही पण ना!एकदा काही ठरवलं की त्याच्यावरच अडून बसता”असं म्हणत ती तणतणत किचनमध्ये निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शेठजींनी बाकीच्या छत्तीस परीवारांना मेसेज पाठवला. दिनूचा वाढदिवस साजरा करण्यामागची आपली भुमिका सविस्तर मांडून प्रस्तावाच्या बाजूने मत द्यायचं आवाहन केलं. तीनचार दिवस तर कुणाचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर लोकांनी “कशासाठी हा उपद्व्याप करताय? , अशा अनिष्ट प्रथा पाडू नका, इतका खर्च का येतोय त्याचा हिशोब द्या, दोन हजार फार होतात, शंभरदोनशेत जे करायचं ते करा” अशा संतापजनक प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रस्तावाच्या बाजूने फक्त आठ तर विरोधात सोळा मतं पडली. बाकीच्या बारा जणांनी सर्वसहमतीने जे ठरेल त्याला आम्ही राजी आहोत असं तटस्थ मत नोंदवलं. या तटस्थ लोकांचा शेठजींना भयंकर राग आला. हे तटस्थ लोकच चांगल्या कृत्यांच्या बाजूला उभं न रहाता वाईट कृत्यांना एक प्रकारे समर्थनच देतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी परत एकदा या लोकांना मेसेज पाठवून “फक्त हो किंवा नाही एवढंच कळवावे “अशी विनंती केली. पण तिचा काही उपयोग झाला नाही. अशा लोकांना कुणाच्याच नजरेत वाईट व्हायचं नसतं किंवा उघडपणे कोणतीही भुमिका घ्यायचं धैर्य त्यांच्यात नसतं. शेवटी सात दिवस वाट बघून शेठजींनी मतांची गणना केली. चौदा विरुद्ध चोविस मतांनी ते हरले होते. त्यांना खुप वाईट वाटलं. दिनू फुकट सर्वांची कामं करत होता त्याची लोकांनी शुन्य किंमत केली होती. याच कामाकरीता जर नोकर ठेवला असता तर महिन्याला तीनचार हजार त्याने सहज घेतले असते आणि या लोकांनी न कुरकुरता ते दिले असते. एकदम त्यांच्या डोक्यात सणक आली आणि त्यांना वाटलं, जावं आणि दिनूला सांगावं की “तुझ्या उपकाराची या लोकांना जाण नाही. यापुढे कुणाचंही काम करणं बंद कर”. पण त्यांनी मन आवरलं. शेवटी ते सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांना असं करणं शोभणारं नव्हतं.

दोनतीन दिवसांनी अध्यक्ष पाटिलसाहेबांचा फोन आला

“मग ठरलं का दिनूचा वाढदिवस साजरा करायचं? “

त्यांना काय उत्तर द्यावं ते शेठजींना कळेना. शेवटी त्यांनी खरं सांगायचं ठरवलं

” प्रस्तावाच्या बाजूने फक्त चौदा मतं पडली साहेब. त्यामुळे वाढदिवस कॅन्सल करावा लागणार”

पाटिलसाहेब जोरजोरात हसले

“मी म्हंटलं होतं ना तुम्हांला आपल्या सोसायटीत एकूण एक नमूने आहेत म्हणून. तुम्ही त्यादिवशी म्हंटला होतात की कुणी नाही केला तरी मी करणारच, मग कॅन्सल का करताय? जे तयार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या, उरलेले तुम्ही टाका आणि करुन टाका वाढदिवस”

“तसं करता येईल पण ते योग्य दिसणार नाही. ठिक आहे बघतो मी काय करायचं ते ” असं म्हणून त्यांनी पाटिलसाहेब काही म्हणायच्या आत फोन कट केला.

एकेक दिवस निघायला लागला तशी शेठजींच्या मनाची घालमेल वाढली. “कुणी नाही दिले पैसे तर मी माझ्या पैशाने वाढदिवस करीन”असे ते जोशात म्हणून तर गेले होते पण आता त्यांना तेवढे पैसे खर्च करणं जीवावर येत होतं. चौदा जणांनी पैसे दिले तरी उरलेले सत्तर बहात्तर हजार पदरचे

खर्च करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण ते बोलून चुकलो याचा त्यांना आता पश्चात्ताप होऊ लागला.

एक दिवस एक गडबड झाली. संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाईक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला. पाचच मिनिटात परत येऊन त्याला बाहेर जायचं होतं. दुर्दैवाने तो गाडीची चावी गाडीलाच विसरुन गेला. घरात गेल्याबरोबर त्याच्या मैत्रीणीचा फोन आला. तिच्याशी गप्पा मारतामारता आपण गाडी बाहेरच लावलीये हे तो विसरला. त्याच सुमारास एक बाईक चोर तिथं आला. बाईकला लागलेली चावी पाहून त्याला आनंदाचं भरतंच आलं. सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता. त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताठ झाला. जोशींच्या मुलाला त्याने मगाशीच वर जातांना पाहिलं होतं. एका सेकंदात तो गेटच्या बाहेर आला. बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाईकस्वारावर जोरात ओरडला. बाईकचोराने बाईक वळवून मेन रोड वर जशी घातली दिनू जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळाला. बाईक आपल्या हातात लागणार नाही हे पाहून त्याने एक झेप घेऊन तीची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला. बाईकचोराने बाईकचा वेग वाढवला. दिनूने ते पाहून पायात घातलेल्या चपला रोडवर ताकदीने दाबून धरल्या. बाईकचा स्पीड कमी झाला पण दिनू आता फरपटत पुढे जाऊ लागला. सुदैवानं समोरुन येणाऱ्या दोन बाईकस्वारांचं लक्ष या प्रकाराकडे गेलं. त्यांना यात काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. एकाने आपली बाईक सरळ बाईकचोराच्या समोर उभी केली. दुसऱ्याने चपळाईने खाली उतरुन बाईकचोराच्या बाईकची चावीच हस्तगत केली.

” हा चोर आहे. गाडी चोरुन घेऊन चाललाय “दिनू ओरडला तसा एका बाईकस्वाराने बाईकचोराच्या मुस्काटात दोन थपडा मारल्या. आता बरेच लोक जमा झाले. सिक्युरिटी गार्डही धावत आला. कुणीतरी पोलिसांना फोन लावला. बाईकचोराला लोकांनी पकडून ठेवलं.

“कुणाची गाडी आहे रे ही? “सिक्युरिटी गार्ड रामने दिनूला विचारलं

“त्या जोशीसाहेबांची आहे”दिनू म्हणाला. तेवढ्यात जोशींचा मुलगा धावत आला. बाईक पाहून त्याला हायसं वाटलं.

घरी जाऊन जोशींच्या मुलाने झालेला सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला.

“बाबा त्या दिनूची कमाल म्हंटली पाहिजे. त्याची चप्पल तुटली, पॅंट फाटली तरी त्याने गाडी सोडली नाही. बाबा दिनूला काहितरी बक्षीस दिलंच पाहिजे”

“पाचशे रुपये देऊन टाक”

“बाबा आपली दिड लाखाची गाडी त्याने चोरी जाण्यापासून वाचवली आणि फक्त पाचशे रुपये द्यायचे? “

“अरे गाडी नेली असती तरी आपण चोवीस तासात

शोधून आणली असती. पोलीस खात्यात आपल्या ओळखीच आहेत तशा ” जोशी अभिमानाने म्हणाले

“हो. ते ठिक आहे पण पोलिसांनाही तुम्हांला एकदिड हजार बक्षीस म्हणून द्यावेच लागले असते ना? “

पोरगा ऐकत नाही हे पाहून जोशींचं डोकं तापलं

“हे बघ चूक तुझी आहे. तुला गाडीची चावी काढता येत नव्हती? आता मला उगीच मनस्ताप देऊ नकोस नाहीतर तुझी गाडीच मी विकून टाकेन ” बापाने दम भरल्यावर पोरगा चुप बसला पण कुठेतरी त्याच्या मनाला ते पटलं नव्हतं.

दोनतीन दिवसांनी अजुन एक घटना सोसायटीत घडली. सुलक्षणेबाईंची गांवातच रहाणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली होती. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली. रात्री दहा वाजता तिचा सुलक्षणे बाईंना फोन आला.

“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे” ती रडकुंडीला येऊन बोलत होती

 – क्रमशः भाग दुसरा

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

या धावपळीच्या जगात आपण इतरांच्या यशाचे कौतुक करायला कधीच विसरत नाही. मित्राने पदोन्नती मिळवली की आपण टाळ्या वाजवतो, कुणी छान जेवण बनवले की आपण त्याची स्तुती करतो. पण, कधी आपण आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यांत बघून “शाब्बास! ” म्हटलं आहे का?

… स्वतःचे कौतुक करणे म्हणजे स्वतःला जगापेक्षा श्रेष्ठ समजणे नव्हे, तर स्वतःमधील चांगल्या गुणांची प्रांजळ कबुली देणे होय.

… आपण दिवसभरात कितीतरी लहान-मोठ्या लढाया लढतो. कधी मनातील नैराश्यावर मात करतो, तर कधी थकलेले असतानाही कुटुंबासाठी हसून काम करतो. या प्रत्येक छोट्या विजयासाठी आपण कौतुकास पात्र आहोत.

… आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की;”स्वतःची स्तुती स्वतः करू नये. “

.. पण विचार करा, जर आपणच स्वतःच्या कष्टाची किंमत जाणली नाही, तर जग तरी ती का जाणेल? स्वतःचे कौतुक केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की;”मी आजचा कठीण प्रसंग धैर्याने हाताळला, “तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते.

… आज तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण केले? स्वतःची पाठ थोपटा.

.. आपण माणूस आहोत, चुका होणारच पण, त्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याच्या वृत्तीचे कौतुक करा.

.. दिवसातून एकदा आरशात पाहून स्वतःला एक छान स्मितहास्य द्या. म्हणा की;”तू जसा आहेस, तसा उत्तम आहेस. “

… स्वतःचे कौतुक करणे ही एक मानसिक गुंतवणूक आहे. यामुळे आपण केवळ आनंदीच राहत नाही, तर इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो.

.. लक्षात ठेवा, या जगाच्या रंगमंचावर तुमची भूमिका तुमच्याइतकी उत्तम दुसरं कोणीच साकारू शकत नाही.

.. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि हक्काने स्वतःचे कौतुक करा! कारण….

.. कारण तुम्ही ‘खास ‘आहात.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी 

सोलापूर शहर हे 60 /65 वर्षांपूर्वी गिरणीवर चालणारे गाव होतं. गिरणगाव या नावानेच ते ओळखलं जायचं. सरकारी कार्यालयातील कर्मचारी म्हणजे सरकारी नोकर, एसटीतील कर्मचारी, रेल्वेतील कर्मचारी आणि उरलेली तमाम जनता जुनी गिरणी नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल आणि फुटाणे गिरणी नावाची गिरणी होती. मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीये पण तिचं नाव मी ऐकले आहे..

हे संपूर्ण शहर आर्थिक व्यवस्थापनासाठी गिरण्यांवर अवलंबून होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला, एसटी वाल्यांचा पगार सात तारखेला, आणि सर्व गिरण्यांचे पगार मात्र दहा तारखेला होत. त्यामुळे दहा तारखेला सोलापुरात दिवाळी..! 

75 टक्के गाव हे गिरणीवर अवलंबून… वडिल कुठे काम करतात विचारलं तर वर्गातील किमान 30 पोरं तरी सांगायची गिरणीमध्ये काम करतात. गिरणीचा पगार हा दहा तारखेला होत असे त्यामुळे दहा तारीख ही सर्व कामगार वर्गाच्या आयुष्यामध्ये दिवाळीची तारीख असायची… म्हणजे किशोर कुमारच गाणं आहे की खुश है जमाना आज पहिली तारीख है तस आज दस तारीख है.. अशी परिस्थिती होती.

दहा तारखेला सकाळपासूनच घरामध्ये आज वडिलांचा पगार होणार म्हणून मुल आनंदी, नवऱ्याचा पगार होणार म्हणून बायको आनंदी, लेकराचा पगार होणार म्हणून आई बाप आनंदी! त्यादिवशी सगळे गाव आनंदाच्या आगमनाच्या लगबगीत असायचं कारण शेवटचे चार-पाच दिवस हे उसनवारीत गेलेले असायचे. त्यामुळे दहा तारखेचा उत्साह वेगळा असायचा. तो केवळ घरातच नाही तर गावातही वेगळा असायचा. गिरणीत जाणारा प्रत्येक माणूस येताना खिशात पगार घेऊन येत असे त्यामुळे जाताना त्याचे चेहरे आशावादी आणि येताना प्रफुल्लीतच…. असं शहराचं वातावरण…!

अगदि हे तसंच असायचं गिरणीच्या रस्त्यावर…. संध्याकाळी दुतर्फा मिठाईच्या गाड्या लागलेल्या या गाड्यावर रंगीबेरंगी दाणे असलेले बुंदीचे लाडू.. शेवेने भरलेली गच्च ताट… तिच्यातही बारीक शेव जाडी शेव गोडी शेव असे प्रकार…. चिवड्याची टोपली… जिलबीची केशरी परात…. त्या सगळ्यांना रंगीबेरंगी कागद..! गाडीवाल्याच्या गाडीत वजन मापाचा काटा… वर्तमानपत्राची रद्दी आणि सुताचा गुंडा इतकं सामान…! प्रकाशाची फारशी व्यवस्था नसलेल हे गाव त्या दिवशी या गाड्यांवरती पेट्रो मॅक्स म्हणजे बत्त्या किंवा टेंभे यानी झगमगून जायचे. बाजूला असणाऱ्या फाटकावर, मरीआई चौकात, भैया चौकात भरपूर भाज्या घेऊन बसलेले भाजीवाले अस एक फार उत्साही दृश्य असायच. त्याचबरोबर बाहेर उभी असणारी काही दांडगट माणसंही असायची… ते असायचे रोहिले पठाण…. हे या गरीब कामगारांना व्याजाने कर्ज द्यायचे…. कामगाराकडे महिन्याचा पगार जेमतेम कुटुंब भागवणे एवढा असायचा. जुजबी आजारासाठी गिरणी दवाखाने मोफत होते पण मोठ्या आजारावर बाहेरचा औषध उपचार करावा लागायचा त्याला पैसा खर्च व्हायचा असे विमे वगैरे त्या काळात नव्हते. त्यासाठी, पोरबळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा प्रपंचाला कमी पडतं म्हणून ्या बिचार्‍या गरीब कामगारांना कर्ज काढावच लागायचं… या कर्जाला व्याज असायचा आणि त्या व्याज वसुलीसाठी ही पठाण मंडळी दहा तारखेला गिरणीच्या दारात उभे….! प्रत्येक गिरणीच्या दाराशी असे पठण दिसायचे त्याची नजर चुकवून जाणं केवळ अशक्य..! तिथेच त्या पगारातले व्याजापुरते रक्कम काढून द्यावी लागायची आणि मग उरलेला पगार तो कामगार घरी घेऊन यायचा….!तरीही येताना आपल्या लेकरा बाळांसाठी लाडू चिवडा ते वर्तमानपत्राच्या दोऱ्याने बांधलेल्या पुडयात आनंदाने घेऊन यायचा.

लेकर बाळ दारामध्ये बापाची वाट बघत बसलेली असायची. तिथेच जुन्या गिरणीच्या चाळी नरसिंग गिरजि चाळी आहेत. भैय्या चौकात हीआहेत सगळी गिरणीच्या आसपास राहणारी मंडळी. प्रत्येक घरातलं पोर बापाला लांबून येताना पाहून आनंदित व्हायचं बापाच्या हातातली पिशवी घेण्यासाठी ते आनंदाने धावायचे जगातली सगळी सुख देणारा बाप त्यांना त्या दिवशी खूप मोठा वाटायचा…. कारण त्याच्या हातात जिलबी शेव चिवडा लाडू ही स्वप्नवत वाटणारी खाद्य श्रीमंती असायची…! आज या पदार्थाकडे डुंकुनी न पाहणारी पिढी पाहिली की आमचे दिवस आम्हाला आठवतात. जिलब्यांच्या वेटोळ्या प्रमाणे गोल गोल फिरणार आमचा आयुष्य तिथेच रिंगणात राहणार होतं. बुंदीच्या लाडवातला एकही बुंदीचा कण सांडणार नाही अशी दक्षता घेऊन आणि ते खाद्यपदार्थावर कागदाच्या तुकड्यावर संपवत असू.

प्रत्येक घरातला बाप आणलेला पगार खिशातून काढून म्हाताऱ्या आईच्या हातात ठेवत असे. देवाजवळ दिवा लावून ती सुद्धा पांडुरंगा समोर तो पगार ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे आणि मग तो पैसा घर खर्चाला वापरला जायचा. त्या तोकड्या पैशात ते घर समाधानांन भरून जायचं कारण… घरात विठ्ठल रुक्माई सारखे आईबाप आणि श्रीकृष्ण पेंद्या यांच्यासारखाच गोकुळ असायचं. घरात आजीच्या भोवती गोळा झालेली मुलं बापान आणलेला खाऊ आजीने वाटून दिला की आनंदाने खाऊन पसार व्हायची. फार पैसा नसला तरी समाधान होतं आणि त्या समाधानाच सुखही ही मोठं होतं.

त्यादिवशी चाळीतल्या भजनाला मोठी रंगत यायची किती थोड्या पैशात किती समाधानी होती माणसं..! आमच्या घरी त्या दिवशी बेकरीतला मोठा ब्रेड यायचा तो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर खायला मिळायचा त्यामुळे रात्री ब्रेड खाण्याचे स्वप्न उराशी घेऊन आम्ही झोपायचं.. इतकं साधं जीवन होतं पगाराच्या दुसऱ्या दिवशी गिरणीच्या बाजूचे चौक फुललेले असायचे. भैया चौकात कॅन्टीनस सगळी भरलेली असत भजी आणि चहा यांच्यावर ताव मारत… विविध पक्ष संघटना तिथे चर्चा करायच्या.. कामगारांच्या हक्काच्या… त्यांना काय काय मिळालं पाहिजे याच्या. कामगार पुढारी तिथे असायचे ते आपल्या मागण्यांसाठी काही कार्यक्रम आखायचे… आंदोलन व्हायची चळवळी व्हायच्या… चहा पिणारे चहाचे हॉटेलात…. दारू पिणारे दारूच्या गुत्त्यात जायचे पण… दारूबंदीच कार्य प्रभावी असल्यामुळेदारू झोकून माणसअशी राजरोस रस्त्यावरून फिरत नव्हती किंवा त्याला आळा तरी होता. दुकानातून औषधाची बाटली विकत आणावी इतकी सहजासाची दारू उपलब्ध नव्हती आणि दारू प्यायला जाणारा माणसाला समाजात फारसा मान नसायचा त्यामुळे ते सगळं चोरून व्हायचं. एकत्र कुटुंब असल्यामुळे आई बापाचा धाक असायचा. मोठा भाऊ बापाच्या जागी त्यामुळे एक चांगली भीती असायची. गिरणीतली तरुण पोर सहजासहजी चुकीच्या मार्गाला जात नव्हती खरं तर ही गिरणीत काम करणारी मंडळी शेजारच्या खेड्यातन आलेली एक भाऊ थोडी शेती करतोय दुसरा नोकरी करायला आला त्यांन आणखीन आपल्या धाकट्या भावाला बोलवून घेतलं अशी त्यांची कुटुंब शहरात वाढलेली. गिरणीच्या मालकाने त्यांच्यासाठी चाळी बांधून दिलेल्या त्यामुळे जुनी गिरणीच्या चाळी, नरसिंग गिरजीच्या चाळी अशा चाळीने त्यांच्या घराच्या राहण्याचे प्रश्न सोडवूनच टाकले होते पाणी दोन्ही वेळा यायचं कारण गिरण्या तीन पाळ्यात चालायच्या त्यामुळे पाण्याच व्यवस्थापनही त्यांच्या वेळेनुसार असायचे गिरणीच्या भोंग्यानी शहर जागे होत असल्यामुळे शहराला उद्योगाचे वळण होते.

कामगारांच्या विकासासाठी सरकारने स्थापलेली कामगार कल्याण केंद्र असायची ते अशाच गिरण्यांच्या आसपास किंवा कामगारांच्या वसाहतीत होती. ती केंद्र तरुण मुलातून खेळाडू तयार करायचे गिरणीतल्या तरुण मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वर्तमानपत्र आणि उत्तम पुस्तक ठेवायचे म्हणजे त्यांचे ग्रंथालय होते खेळाचे सामने भरवायचे… नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या…! दुपारच्या वेळेला हेच केंद्र महिलांसाठी उघडे असायचे. तिथे शिवण वर्ग, विविध कलाकुसर शिकवणारे शिक्षक येऊन शिकवायचे, महिलांच्या विविध विषयावर वेगवेगळ्या व्याख्यातांना बोलवून व्याख्यानं व्हायची, त्यामध्ये मुलाचे संगोपन कसे करावे… गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी… यासारख्या असंख्य विषयावर मार्गदर्शन होत असे… शिवण्याच्या मशीन असायच्या त्यामुळे बायका कपडे शिवून घेऊन जायच्या… मुलींची त्यांची नाटकं व्हायची छोट्या मुलांना सिनेमे दाखवले जायचे… सिनेमा म्हणजे ते माहितीपट असायचे.. पण केंद्रात सिनेमा आहे म्हटलं की सगळी पोरं धूम केंद्रात पळायची. केंद्र चालवणारी मंडळी खूप छान होती तळमळीने काम करणारे होती. ह्या कामगार कल्याण केंद्रा संदर्भात एक स्वतंत्र विषय करून लिहीन तेव्हा अशी कामगार कल्याण केंद्र ह्या गिरणीतल्या कामगारांच्या कलागुणांना वर्धिष्णू करीत मनोरंजन करीत आणि संस्कारही करीत होते… त्यावेळी कामगारात गुंड होते गटबाजी करणारे होते पक्ष वाले होते त्यांच्या त्यांच्यात इंटक वगैरे अशी काही संघटनांची आम्ही नाव ऐकत असू व्यंकप्पा मडूर हे चळवळीतलं नाव अशी बरीच नाव त्यावेळेला कानावर येत होती त्यांचे मोर्चे असायचे आंदोलन असायची पण गिरणी पेटवली… गिरणी जाळली… गिरणीत दगडफेक झाली… असे मात्र होत नव्हते. कारण काम करायच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा होती हे हिंसक प्रकार आंदोलनात नव्हते… काय ते रस्त्यावर थोडे व्हायचे… अर्थात हे शहर धाडसी मर्दांच होतं आहे. प्राणाची पर्वा न करता लढणारी माणसं या शहराने दिली. खून व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या तशी थोडी सोलापूरची दहशत होती लोकांना, अगदी इंग्रजांना सुद्धा…! आम्हाला असं सांगायचे की इंग्रज, वर्तमानपत्रात सोलापूर हे नाव वाचले तर त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र कापायचं इतकी दहशत नावात होती. इंग्रजांच्या नकाशात लाल रंगाने स्पॉट केलेल आपलं गाव होतं पहिला हुतात्मा या देशाला सोलापूर ने दिलाय तो शंकर शिवदारे… त्यांच्या आत्मसमर्पणाने स्वातंत्र्य चळवळीला ही उधाण आले होते.. अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कामगारांचे जगत असलेले गाव…. सगळ्या गिरण्या राजकीय निष्क्रियतेमुळे कटकारस्थानामुळे हळूहळू बंद पडल्या.

तीन मोठ्या गिरण्यांची मिळून झालेली एक सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल म्हणजे जुनी गिरणी पहिल्यांदा बंद पडली ती अनेक वेळा बंद पडत होती पण 64 स*** पूर्ण बंद झाली खूप आंदोलन झाली चळवळी झाल्या माणसं 50 दिवस उपोषणाला बसली लोक भाबडे आणि गरीब होते आणि नेते लबाड होते आपलीच गिरणी बंद पाडून स्वस्तात विकत घेणारे मुरारका यांना मदत करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे नेतेही होते. बघता बघता एक एक गिरणी बंद पडत गेली सोलापूर बेकारीच्या खाईत गेलं… मधले अनेक वर्ष सोलापूरचा विकास थंड झाला… त्याला कारण उद्योग नाही!आजही फरशा उद्योगाची निर्मिती नाहीच आहे…

असो एकेकाळी चारच्या भोंग्याला उठणारे गाव निवांत म्हणून ओळखलं जाऊ लागलं याचं वाईट वाटतं डोळ्यात फक्त समाधानी होण्याचं स्वप्न घेऊन झोपणारा सोलापूरकर गिरणी बंद पडल्यानंतर ना सुखी झाला ना समाधानी राहिला. मधल्या एका पिढीच्या अफाट संघर्षानंतर गिरणगाव ही ओळख संपत आली तिथे काम करणारे आणि गिरणीवर अवलंबून असलेली गिरणीच्या पगारावर मोठी झालेली आणि गिरण्या बंद झाल्यानंतर होरपळून निघालेली तीआमची पिढी आता संपत आली. आता सोलापूर नवनविन उद्योगाने पुन्हा भरारी घेत आहे. चांगले नेते मिळाले तर कदाचित सोलापूरला हे पुनर्वैभव प्राप्त होईल. दुर्दैव हे आहे की आम्हाला मतदानापुरतं वापरलं जातं असो तो आजचा विषय नाही. आता सोलापुरात पगार एक तारखेला होतात विविध चांगल्या वाईट उद्योगातून सोलापूरकर मुलांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत तरुणांनी आपापले छोटे छोटे उद्योग शोधले आहेत माणसं पोट भरत आहेत काहीनी पुणे मुंबई जवळ केली तरीही सोलापूरची लोकसंख्या वाढली दोन तीन लाख वस्तीचं गाव बारा लाख वस्तीत रूपांतरित झाले. खूप चांगले बदल झालेत पण दहा तारखेची ती मजा ते पेट्रोल मॅक्स च्या गाडीतले हिरवे पिवळे कागद गुंडाळलेले लाडू जिलबी शेव चिवडा त्याच्या त्या गाड्या… भरगच्च भरलेली भजनी मंडळी हे सारं सार आजही डोळ्यासमोर येतं आणि दर दहा तारखेला वर्तमानपत्राच्या पुड्यात खाऊ बांधून आनंदाने आपल्या लेकरांसाठी हातात घेऊन येणारा बाप डोळ्यासमोर दिसतो… फार छान होते दिवस… सुखाचे नसतील पण समाधान मात्र होते कॅलेंडर वरची दहा तारीख पाहताना आजही गाणं तोंडावर येतं…

‘खुश आहे जमाना आज दसवी तारीख है…!’

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ग्रंथालयाचे मनोगत” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “ग्रंथालयाचे मनोगत” – लेख क्र. १७ ☆ प्रा.भारती जोगी ☆

” मुसळधार पाऊस बघतीयेस ना खिडकीतून… मग असाच साहित्य-संस्कृतीचा ही अखंड पाऊस आहे. आत.. प्रवेश करून पहा की जरा! 

हात लांबव, काढ त्या कपाटातील पुस्तकं, झटक त्यांची धूळ, फिरव त्यावर पारखी नजर, आणि मग…

 पहा त्या सगळ्यांची आठवण येते का?

 पैस, शेला, मृद्गंध, विशाखा,

 व. पु, पुल अन् अत्रे,

 आंबेडकरांचे राजगृह‘, अन् सावरकरांच्या कविता!

दुर्बोध ग्रेस, अन् सुबोध बहिणाबाई

. .. शांताबाईंच्या शब्द खुणा अन् महानोरांची हिरवी बोली.

प्राचीन ग्रंथांचा सांस्कृतिक ठेवा, धार्मिक, सामाजिक, पौराणिक वारसा…

 हे सगळं आणि अशी कितीतरी अफाट, अमाप, अगणित मेळविलेली अक्षरे डोळ्यांनी प्यायलीस ना आजवर… पोहोचवलीस, उतरवलीस ना थेट हृदयांतरी!….

मग… आता…

 माझ्या जिरत्या पानांशी तुझी कां न उरली मैत्री?

कां दिवसेंदिवस आम्ही ओस पडत चाललो आहोत. बंद पडायच्या वाटेवर आहोत? अगं, काय सांगू…

ग्रंथालयातील पुस्तकांचा श्वास रोज येतो कंठी

वाचकहो, तुमच्या साठी, वाचकहो तुमच्या साठी!

मान्य आहे गं मला, आज काळ बदलला. डिजिटल युग आलं. E Book चा जमाना आला. ग्रंथालयातील पुस्तके भ्रमण ध्वनीत एका टचवर मागे पुढे होऊ लागली. किंडल मध्ये नव्या रूपात, नव्या परिवेषात उभी राहिली. पण तुम्ही लोक एक महत्वाची गोष्ट विसरता की, आज माहितीचा प्रचंड स्फोट झालेल्या या युगात… मीच… म्हणजे ग्रंथालयच सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखून योग्य माहिती मिळविण्याचे योग्य आणि विश्वसनीय साधन आहे. ग्रंथालय हे फक्त पुस्तक घर नसून ते एक संस्कार केंद्र आहे. विचारांची देवाणघेवाण, चिंतन, मनन, सर्जनशीलतेला चालना देणारे आलय आहे.

पुस्तके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे आणि ग्रंथालय हे त्यांचे बंदर आहे.

हे विसरू नकोस ना! 

माझ्या पुस्तकांनी काळानुरूप झालेला बदल ही स्विकारलायं ना… मग तुम्ही ही एक लक्षात घेतले पाहिजे की…

ग्रंथालयांच्या मदतीने, पुस्तकांच्या सहवासात, शांत, स्थिर वातावरणात मानसिक समाधान मिळवत… तुम्ही ग्रंथालय- पुस्तके-वाचक… हे अ-क्षर नाते जपा. कारण Byte मधले शून्य ही तेच, अन् एकेरीचे आखर ही तेच! 

म्हणून ग्रंथालये ही वाचनालये कशी बनतील आणि ‘e’ च्या नव्या वेषात ही आपली भेट ग्रेट कशी होईल हा प्रयत्न करू यात! चल बराच वेळ झाला, येतीयेस ना माझ्या पाठोपाठ, पुस्तकांच्या दुनियेत! 

 आ चल, के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो, आंसूं भी ना हो, बस् प्यार और सच्चा ज्ञान ही पले!!!  .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares