☆ “डॉ. आनंद नाडकर्णी गेले?” – लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ शोभा जोशी ☆
बाप रे… ज्यांना आपल्या नावाचा अर्थ परफेक्ट लागू होतो असा “आनंदी” चेहरा लाभलेलं हे व्यक्तिमत्त्व!
परिचय नसतानाही काही माणसं “आपली” वाटून जातात त्यांपैकी हे एक प्रसन्न, हसरं व्यक्तिमत्त्व. जी मराठी माणसं समाजात असल्याचा अभिमान बाळगावा त्यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! मला ज्याम आवडायचा हा माणूस. सावकाश नेमके शब्द वापरत समोरच्याला समजावणं भारीच!
मागे एका ‘वेध’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘स्व’ कसं घडतो ते किती छान सांगितलं होतं – “नेचर, नर्चर, कल्चर आणि युनिकनेस” – या चार गोष्टींनी ‘स्व’बनतो!
थोडक्यात- ‘नेचर’ म्हणजे आपण आपल्या पूर्वसुरींचं गुणसूत्रांतून काय घेऊन येतो, ‘नर्चर’ म्हणजे आपल्यावर होणारे संस्कार, ‘कल्चर’ म्हणजे अर्थातच आजूबाजूचं वातावरण किंवा संस्कृती आणि याबरोबरच आपली अशी जी एक खासियत असते ती म्हणजे आपलं ‘युनिकनेस’!”
आईशप्पथ! किती मस्त बोलून गेलेत डॉक्टर!
आणि डॉक्टरांचं लेखन? ते तर प्रेमात पाडणारंच्च! त्यांचं पहिलं पुस्तक मी वाचलं त्यालाही पस्तीसेक वर्षं होत आली. आणि त्यावेळी त्याला कारणीभूत ठरली होती माझी मैत्रिण शमा! खळखळून हसणाऱ्या शमाशी पहिल्याच भेटीत मैत्र जुळलं! आवडीनिवडी सारख्या असल्यामुळे आमच्या अखंड गप्पा रंगायच्या आणि त्यातच एकदा शमाने सरप्राईझ दिलं. “मैत्रिणीचं नातं” या शीर्षकाचा अफलातून लेख लिहिलेले तीनचार फूलस्केप्स माझ्या हातात ठेवले. मी चाट! आधीच शमाचं सुंदर अक्षर आणि त्यात तो अफलातून लेख! तो वाचला आणि डाॕ. आनंद नाडकर्णींच्या प्रेमातच पडलो. लगोलग जाऊन तो लेख असलेलं डाॕक्टर नाडकर्णींंचं “गद्धेपंचविशी” विकत आणलं. झाली बरीच वर्षं.
आता डॉक्टरांच्या स्मृतींना नमन करत आज परत एकदा “गद्धेपंचविशी”कडे वळेन…
“गद्धेपंचविशी” – मिश्कील, चुरचुरीत, टवटवीत लेखांचं हे पुस्तक!
डॉक्टर आनंद नाडकर्णींना का कुणास ठाऊक ‘आनंदबाबू’च म्हणावंसं वाटतंय. पण शून्य ओळख असल्यामुळे उगाच सलगी नको नै का! तर, डाॕक्टरांनी आपल्या पत्नीला पुस्तक अर्पण करताना पाब्लो नेरुदाच्या एका कवितेतल्या ओळीं दिल्यात आधी त्याच्यातच अडकलोय मी काही क्षण-
” I want to do with you
what spring does —
— to the cherry trees!.. “
आह्ह!. दोन ओळींतच किती गहिरी भावना! अर्पणपत्रिका वाचूनच खूष होत मी पुढचं पान उलटतो तर “दुसऱ्या आवर्तनाच्या निमित्ताने” हे मनोगत समोर येतं. त्याच्या शेवटाकडची ही वाक्यं अगदीच्च पटणारी –
“… आता पन्नाशीच्या आतबाहेर असणारे ‘पहिले’ वाचक हे पुस्तक ‘नव्याने’ जवळ घेतील आणि ‘नव्या’ पिढीचे वाचक पहिल्या वाचनासाठी या पुस्तकाला आपलं मानतील अशी आशा व्यक्त करुन, नव्या कपड्यातल्या पण ओळखीच्या दोस्ताला तुमच्या हाती सोपवतो… “
अगदीच डॉक्टर ! तुमचा विश्वास सार्थ आणि यथार्थ ठरवत मी घेतलंच आहे या दोस्ताला जवळ पुन्हा एकवार!
अवघ्या १२४ पानांचं, २१ लेखांचं हे छोटेखानी पुस्तक! पण त्यातनं ताजेपणा.. धमाल.. मिश्किलता… जोष… तारुण्यातला उत्साह जाणवतो. मन प्रसन्न होतं!
८०च्या दशकातले गद्धेपंचविशीतले तरुण जे उद्योग करायचे ते सगळं आलंय यातल्या लेखांमधे! त्याकाळात व्हिसीआर असायचे आणि मग प्रोजेक्टर आणून खोलीतच पडदा लावून पन्नासेक तरुण मित्रांनी धडधडत्या छातीने आणि कमालीच्या औत्सुक्यानं “ब्ल्यू फिल्म्स BF/ ब्ल्यू प्रिंट BP” बघण्याचा प्रसंग आणि बघितल्यावर मनांत उठणारे भावनिक कल्लोळ धमाल शब्दांत मांडलेत डाक्टरांनी!
डाक्टरांचे अनेक पैलू आहेत. डाक्टरकी, कौन्सेलींग करत असताना त्यांनी आपल्यातला नाटककारही छान जपला होता. “आम्ही जगतो बेफाम”, “जन्मरहस्य”, ” रंग माझा वेगळा” सारखी लोकप्रिय नाटकं लिहिणारे नाटककार, कालेजकाळात नाटकं करण्यासाठी काय काय उचापती करायचे ते “इनर्शिया आणि किडा” लेखात समजतं. नाटकातल्या साउंडसाठी जीव धोक्यात घालून मित्रांबरोबर लोकलच्या रुळांवरुन धडधडत जाणाऱ्या लोकलचा आवाज टेप करणं असो, नाटकातल्या अँन्टिएअरक्राफ्ट गनसाठी भंगारातला एअरकंडिशनर मिळवणं असो, एका एकांकिकेच्या प्रत्येक प्रयोगासाठी बांबूच्या कुंपणाच्या नेपथ्यासाठी दरवेळी ताज्या वेली आणणं किंवा प्रयोगाआधी तीनतास कुष्ठरोग्यांसाठीचा मेकअप असो. असे अनेक किडे त्यांनी या लेखात जिवंत केलेत.
मेडिकल कालेजमधला संप, प्रसिद्ध डाक्टरना घेराव.. ती सगळी तयारी… गंमत… अस्वस्थता… पूर्ती.. हे सगळं “आपरेशन ब्लिट्झक्रिग” लेखात आलंय. त्यातलं सुरूवातीचं वाक्य माझ्या डोक्यात घुसलंच एकदम -“हरण्याची खात्री असताना लढाई लढायला जिगर लागते.. ”
मित्राच्या लग्नासाठी त्याच्या प्रेयसीच्या वडिलांशी बोलून केलेल्या यशस्वी मध्यस्थीवर “माझी मध्यस्थी” हा लेख आणि आयुष्यात मुलीकडून नकार पचवायचा आलेली वेळ किंवा त्यांनाच समोरचीला नकार देताना मनात उभे राहिलेले अनेक विचार.. प्रश्न “नकार” या लेखात समोर येतात.
आणि मग समोर येतो तो “मैत्रिणीचं नातं” हा लेख!माझ्या मनात कायमचा घर करुन बसलेला! अवघ्या तीन-चार पानांचा लेख पण ज्या तरल, संवेदनशीलतेनं लिहिलाय डाक्टरांनी की क्या केहने! त्यातली काही वाक्यं इथे द्यायचा मोह होतोय –
“मैत्रिणीच्या नात्याची गंमत कळायला तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागतं. मैत्रीण याचा अर्थ “पोरी फिरवणं” असा घेतला तर मात्र सगळंच संपतं. मुलींवर “इंप” मारणं असा घेतला तर त्यातली सारी नजाकतच जाते. सगळीच नाती उत्क्रांत होत जाण्याची एक प्रक्रिया असते. त्या उत्फुल्ल प्रक्रियेचा एक भाग बनून जेव्हा येतं ना हे नातं, तेव्हा त्यात मजा असतो. हा मजा आस्वादायचा असेल तर एक मात्र करावं, या नात्याला चौकटीत बसवू नये. “मानलेली बहीण” वगैरे बनवू नये. मैत्रिणीच्या नात्यामधल्या सेक्शुअलिटीच्या किनारीने आपण का धास्तावतो नेहेमी? अशी किनार या नात्याला असणारच की! मला वाटतं, या धास्तीचं एक कारण असं असावं की सेक्शुअलिटीची म्हणजे लैंगिकतेची किनार असलेल्या प्रत्येक नात्याचा परिपाक ‘समागमातच’ व्हायला पाहिजे अशी आपली रुढ समजूत. लैंगिकता आणि तिचे पदर “समागमापुरते” नसतात. लैंगिकतेच्या तरल किनारींना सामोरं जाण्यासाठीसुद्धा दिलखुलासपणा लागतो.. दोन्ही बाजूंनी.. !”
“… स्पर्शाला आपण घाबरतो. कारण प्रत्येक स्पर्श जणू शरीरसंबंधांचं आमंत्रण. त्यामुळे स्पर्श आपणहून चोरटा आणि भित्रा बनतो. दोन भिन्नलिंगी व्यक्तिंमध्ये मैत्रीचा जवळिकीचा स्पर्श असू शकत नाही हे प्रमेय कोणी सिद्ध केलं आहे?.. “
“… संधिकालच्या धूसरतेचं कुणी गणिती समीकरण मांडू नये, तसं मैत्रिणीच्या नात्यालासुद्धा नेहेमीच्या मोजपट्ट्या लावू नयेत. नेहेमीच्या मोजपट्ट्या जर लटक्या ठरवायच्या असतील तर मात्र या नात्यासारखं दुसरं नातं नाही.. “
व्वाह्… काय सुरेख लिहिलाय हा लेख तुम्ही डाक्टर!
त्यापुढचा “रिलेटिव्हिटी माझी आणि आईनस्टाइनची” हा लेखही भावणारा! आपल्याला “nice किंवा छान” वाटणारं समोरच्याला वाटेलच असं नाही. ते सापेक्षच वगैरे सांगणारा लेख! डाक्टर लिहितात, ” मला जी ‘छान’ वाटेल ती दुसऱ्याला वाटेलच असं नाही. कदाचित ‘छान’ शब्दामधे फक्त सौंदर्यच अभिप्रेत नसतं म्हणून. जेव्हा सौंदर्य नात्याच्या जाणिवेतून, साथ-संगत शोधण्याच्या उर्मीतून आणि संवादाच्या ओढीतून पाहिलं जातं, तेव्हा त्याचं स्वरुप बदलतं. आता “छान वाटणं” म्हणजे “प्रेम” का? मला वाटतं, प्रेम जमण्याच्या वाटेवरचा पहिला मैलाचा दगड म्हणजे “छान वाटणं”.. प्रेम नावाचा प्रोसेस असतो. त्याला हिरवा कंदील मिळतो तो ‘छान’ वाटण्याचा… प्रेम वगैरे जमो न जमो, तो “छान वाटण्याचा” अनुभव अतिशय जपून ठेवावा असा असतो… “
“मुलगी: एक पाहणे” मधे डाक्टरांनी “ट्रिंग ट्रिंग” होण्याच्या अनुभवाविषयी लिहिलंय. तो मजेदार आहे. “ट्रिंग ट्रिंग” झालं की प्रेम जमतंच असं नाही. पण प्रेम जमायचं असेल तर “ट्रिंग ट्रिंग” व्हावंच लागतं.. ” वगैरे.
आणि असेच सारे. सगळे मिळून २१ छोटे छोटे भावणारे लेख!
डाक्टरांचं हसरं, खेळकर व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या बुद्धिमान प्रतिक्रियांमधून उलगडणारं. त्यांच्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि उमद्या लेखणीतनं उतरलेलं हे पुस्तक सदैव टवटवीत राहणारं आणि गद्धेपंचविशीतल्याच नव्हे तर कोणत्याही वयातल्या कुणालाही आपलंसं वाटणारं!
डॉक्टरांना आदरपूर्वक नमन!
लेखक : श्री प्रसन्न पेठे
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मावळतीवर… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆
☆
प्रत्येक आरंभाचा अंत निश्चित, अटळ व अनिवार्य आहे. किंबहुना ते त्याचे प्राक्तनच असते म्हणा ना ! अर्थात जो उगवतो ,उदय पावतो तो मावळतो. जो जन्माला येतो त्याचे मरण अटळ असते.अशा प्रकारे उदय -अस्त व जन्म -मरण हे चक्र सृष्टीत, चराचरात अव्याहतपणे चालू असते .जातस्य हि ध्रुवो मृत्यु: हे संस्कृत वचन सारे जण जाणतो.तो निसर्गाचा नैसर्गिक नियमच आहे हे आपणास ज्ञात आहे. या जगात कोणीही अविनाशी ,अमर नाही. मात्र जेव्हा या जाणीवेचा, भावनेचा जगण्याशी ,आयुष्याशी संबंध जोडला जातो तेव्हा मन कातर होते. अनामिक भयाचे भय अंतरी दाटून येते. कळीकाळाचे कालातीत भय काळजाला वेदना देवून त्याला उदासीन बनवते. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी की अशा प्रकारे अंताच्या नियमाला अपवाद नसला तरी अंताकडे कसे पाहावे , त्या संदर्भात दृष्टिकोन कसा ठेवावा हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत जाणीवांवर व नेणीवांवर अवलंबून आहे.विचारशक्ती, बुध्दिमत्ता यांना वास्तव भावनेची जोड असेल तरच हे जमू शकते. अंत या संकल्पनेकडे तटस्थ बुद्धीने पाहणे व सत्याच्या जाणिवेचे आकलन झाल्याने तिचे भान ठेवणे शक्य होते. प्रत्यक्ष मरणापेक्षाही “पॅसेज टू डेथ “हा माणसाला जास्त भिवविणारा व घाबरवणारा असतो.आयुष्याच्या या प्रवासाकडे सजगतेने पाहणे , विचार करणे व तसे आचरण करणे यासाठी माणूस वेगळ्या मुशीचाच असावा लागतो असे म्हटले तर वावगे ठरू नये . माणूस मावळतीवर जरी आला तरी असा वेगळा दृष्टिकोन व विचार जाणीवपूर्वक विकसित केला तर तो स्वतःचे आयुष्य समाधानी वृत्तीने जगू शकतो.सर्वांना आपल्याशा आणि जवळच्या वाटणाऱ्या या विषयावरची डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या “मावळतीवर” या कवितेचा आज रसास्वाद घेऊ या.
यथार्थ व अत्यंत समर्पक काव्य शीर्षक देण्याचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे साहित्यिक भान व कसब या कवितेच्या शीर्षकातही जाणवते. कवितेच्या अंतरंगाकडे व आशयाकडे हे काव्यशीर्षक सुस्पष्टपणे निर्देश करते. “मावळतीवर” या काव्यशीर्षकातून काव्यवाचकांना साधारणतः या कवितेतील व कवितेचा विषय लक्षात येतो . त्यासाठी आवश्यक असलेली मानसिकताही तयार होते व त्याचे शब्दरूप व भावरुप जाणून घेण्याची उत्कंठा प्रकर्षाने होते.
अंत,शेवट हा जरी अटळ असला तरी त्याचीही एक प्रक्रिया आहे. उदय हा अस्त होण्याआधी मावळतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतो. निसर्गातील ही बाब अतिशय सहजगत्या घडताना दिसते.हा संध्यासमय ,ही कातरवेळ नेहमीच मनाला स्पर्शून जाणारी असते कारण यावेळची भावावस्था काहीशी उदासीन, निराशाजनक होते. अशा परिस्थितीत व याच वेळेला अत्यंत विचारपूर्वक वागणे गरजेचे असते. निसर्गाचे रूपक घेऊन कवी हीच भावना आयुष्य जगताना ही अशाच प्रकारे जतन करावी हा संदेश सांकेतिक स्वरूपात देत आहे . आयुष्याच्या या टप्प्यावर कसे आचरण असावे याचा वस्तुपाठ देणारी ही कविता आहे.
मनात उदासीन भावनांना थारा न देता सकारात्मक विचार जपणे, जोपासणे गरजेचे असते. कवीच्या मनात या संदर्भात जे काही भावभावनांचे तरंग उमटले आहेत ते कवीने शब्दांकित केले आहेत. स्वतःच्या आयुष्याचा पट स्पष्टपणे मांडलेला दिसून येतो .कवी खरोखरच अशा पद्धतीने जगला आहे.ही केवळ कवी कल्पना वा कल्पनेचे मनोरे नाहीत तर त्याला वास्तविक सत्याचा स्पर्श झालेला आहे.
निसर्गाने नेमलेल्या नियमाने व नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत कवीने आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा केली आहे. असे करताना कधीच ,कुठल्याही प्रकारे का , कधी , केव्हा , कसे अशा पद्धतीचा विचारही त्याच्या मनाला शिवलेला नाही. अतिशय सहजतेने जीवनाची ही वाट त्यांनी अंगीकारलेली आहे व त्यावर वाटचाल केलेली आहे.नियतीने ,प्राक्तनाने अर्थात विधिलिखित असलेली कर्मे करणे व तसे करताना संपूर्ण समर्पित भावना व निरपेक्ष बुद्धी निरंतर जपणे हे सत्य मांडले आहे . विहित कर्मे ही पूर्णपणे पूर्वसंचितानुसार प्राक्तनी लिहिलेली असतात.ही सर्व कर्मे करत करत आता कवी मावळतीच्या समीप येऊन पोहोचलेला आहे. ही गोष्ट अगदी सहजपणे त्याच्याही नकळत घडून गेलेली आहे हेही स्पष्ट केले आहे. अशी ही सहज नैसर्गिक भावना जपणे ,जाणणे हे शक्य आहे हे स्वतःच्या आचरणातून जाणवून दिलेले आहे. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करणे शक्य नाही व तसा विचार व्यावहारिक ही नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. नियम पाळताना त्याला मनाने ,अंतर्गत विरोध केलेला नाही. प्रत्यक्षात,वास्तवात तर नाहीच नाही. त्यांचे काटेकोर पालन करून नियतीने दिलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याची चाकोरी असते ती स्वीकारून जीवनक्रमणा केली असे म्हणताना ती आयुष्याने केली असे म्हटले आहे. इथे साधलेला हा चेतना गुणोक्ती अलंकार अतिशय समर्पक आहे. जे काही केले, घडले यात “मी” पणाचा अजिबात लवलेश नाही.यामुळे कवीच्या मनातील निरपेक्ष भावना ठळकपणे लक्षात येते.कवीने नियतीप्रती पूर्णतः समर्पित भावना व्यक्त केली आहे. व असे करताना कर्माप्रतीची प्रीती व श्रद्धा जाणीपूर्वक जपली व जोपासली आहे.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार आश्रम व्यवस्था मानण्यात आली आहे.
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम मानवजातीच्या जगण्यातील चार महत्त्वाचे टप्पे मानले आहेत.प्रत्येक टप्प्यावर त्या समयी कोणती कर्तव्ये उचित व अपेक्षित आहेत यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.बालपण ,तारुण्य , गृहस्थाश्रम आणि जरा अर्थात म्हातारपण हा आयुष्याचा जीवनक्रम जसा आला तसा कवीने स्वीकारला आहे . या कवितेत मांडलेला विचार हा संन्यासाश्रमाच्या मुक्कामी पोहचल्यावर पार केलेल्या आधीच्या तीन आश्रमाचे सिंहावलोकन आहे.त्यावर टाकलेला सहेतुक दृष्टिक्षेप आहे.चाकोरी या शब्दावरील श्लेषात्मक अर्थ अतिशय यथार्थ आहे.या शब्दातून जीवनाच्या या चार अवस्था ,हे चार आश्रम व त्यातील सर्वांच्या बाबतीत असलेली समानता सूचित केली आहे. यात कोणाच्याही बाबतीत कसलाही बदल होत नाही या अर्थाने हे चाकोरीबद्ध आयुष्य असा भावार्थ अपेक्षित आहे. तसेच ही चाकोरी नियतीने आखून दिलेली आहे. त्या अंतर्गतच आयुष्य सीमित आहे, मर्यादित आहे हे लक्षात आणून दिले आहे.
“जीवनक्रम” यामधील श्लेष ही अतिशय सुंदर आहे.जीवनाचा क्रम आणि ज्या क्रमाने तो येतो तो भाव जाणून तसे जगणे , मार्गक्रमणा करणे हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत. अतिशय मार्मिकतेने व तितक्यात सहजतेने कवितेचा भाव जपून कवितेतील आशय वृद्धिंगत केला आहे.”विहित”या शब्दातून अपेक्षित तसेच शास्त्र व समाज यांनी मान्य केलेली आणि मनाने निर्धारित केलेली कर्मे करणे हा विचार सुस्पष्टपणे व्यक्त केला आहे. तसेच पूर्व संचिताकडे निर्देश केला आहे.
कवीने कुठल्याही अनैतिक वा गैरमार्गाचा वापर व तशी कृत्ये केलेली नाहीत हा गर्भितार्थ लक्षात येतो. कुठल्याही प्रलोभनांशी हात मिळविणी केलेली नाही. नैतिकतेशी समझोता केलेला नाही.नैतिकता व सद्सदविवेक बुद्धीला स्मरून,जागून सरळ मार्गाने जीवनक्रमणा केली. एवढेच नव्हे तर असे आचरण करताना निरपेक्ष बुद्धीने त्यांच्या फळाची अपेक्षा न ठेवता श्रद्धापूर्वक आयुष्य जगण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे.”इदम न मम” तसेच “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”ही श्रीभगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाची शिकवण ग्राह्य धरून, अंगीकारून तसे आयुष्य जगण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. केलेल्या कर्माची फळे स्वतः करता आहेत,असतात अशी अपेक्षा केली नाही व ती समाजाप्रती, ईश्वराप्रती समर्पित केली. आणि अशा तऱ्हेने अतिशय उच्च दर्जाचे श्रद्धापूर्ण व कर्माधिष्ठीत जीवन जगता जगता मावळतीच्या क्षितिजापर्यंत म्हणजेच जीवनाच्या संध्यापर्वात कवीने प्रवेश केला आहे. मावळतीच्या उंबरठ्याची समीपता कवीला कळाली आहे हे सूचित केले आहे. अर्थात हे सारे अगदी सहजगत्या घडले आहे, निसर्ग नियमानुसार घडले आहे हा भाव व्यक्त केला आहे. मावळती म्हणजे पश्चिम दिशा, ज्या दिशेला सूर्य अस्त पावतो. क्षितिज हे असीम ,अमर्याद, अथांग, अज्ञात आहे. अशा या क्षितिजाची समीपता जाणवल्याने सहजपणे त्याच्याही नकळतच वास्तवाची जाणीव झालेली आहे. अत्यंत सहजतेने अत्यंत मनःपूर्वक व रूपकात्मक पद्धतीने निसर्ग नियमानुसार , नियतीने आखून दिलेला जीवनक्रम व तसे विहित कार्य करणे हा अतिशय महत्त्वाचा मानवधर्म कवीने अंतःकरणापासून निरंतर जपला आहे. व त्यानुसार जगण्याचा प्रामाणिक, प्रांजल प्रयत्न केलेला आहे.
या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती मुक्त छंदात रचलेली प्रथम पुरुषी एकवचनी कविता आहे.निसर्गाने नेमलेल्या नियमांनी यामधील अनुप्रास अतिशय लोभस आहे. यथोचित उपमा ,रूपके , श्लेष व चेतनागुणोक्ती यांची अर्थपूर्ण मांडणी कवितेतील आशय मनावर पूर्णपणे ठसविण्यात यशस्वी होते. कवितेतील भावनेला सुयोग्य ,समर्पक साहित्यिक अलंकारांचा साज सुशोभित करतो. व असे करताना त्यातील सुलभपणा जपलेला जाणवतो. साहजिकच यातून कवीचा विचारातील प्रामाणिकपणा, प्रांजळपणा व विषयाशी असलेली बांधिलकी प्रकर्षाने लक्षात येते.
उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे
मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन
हळू हळू कसे क्षीण होत गेले
मावळतीच्या क्षितिजावर
समजलेच नाही
“मावळती” ही या कवितेची मुख्य कल्पना व संकल्पना आहे . तदनुषंगिक झालेला, घडलेला आयुष्याचा प्रवास समांतर पद्धतीने या कवितेत शब्दबद्ध केलेला आहे. साहजिकच सूर्याचे उगवल्यानंतरचे हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन, त्याचा सोनसळी स्पर्श, त्याची चमक मनाला मोहून टाकते तसेच जीवनाचे झालेले आहे. सुंदर हवेहवेसे वाटणारे साजिरे बालपण सुखात ,आनंदात व्यतीत होते. आयुष्यातील नानाविध क्षेत्रे खुणावत असतात. जीवन हे मोहक आहे असे वाटू लागते. अर्थात ते तसे आहे ही.परंतु तेव्हा जीवनातील संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागतो ही भावना बालमनाला माहीतच नसते .तारुण्य आणि गृहस्थाश्रम यात पदार्पण केल्यानंतर मात्र त्या भवसागरातील अडचणींचा, समस्यांचा ,आपदांचा ,विपदांचा सामना करणे अटळ ठरते आणि या सर्वांची तुलना मध्यान्हीच्या रणरणत्या उन्हाशी केलेली आहे. अतिशय सुयोग्य, अर्थवाही व अर्थपूर्ण रूपकातून ही भावना व्यक्त केली आहे. सूर्याच्या सुरुवातीच्या कोमल , उबदार, आश्वासक स्पर्शानंतर त्याचे मध्यान्हीचे ऊन भोगणे क्रमप्राप्तच असते. सूर्योदयानंतर साऱ्या चराचराला जगण्याची प्रेरणा व चेतना मिळते हीच भावना आयुष्याच्या सुरुवातीला असते. जसजसा सूर्य माथ्यावर तळपू लागतो व त्या बरोबरीनेच आयुष्य ही चालू राहते तेव्हा त्याची दाहकता ,धग, झळ ,अफाट व अटळ असते. ती सोसणे , अनुभवणे याला तरणोपाय नाही. चढल्यानंतर उतरणे क्रमप्राप्त आहे. जीवनाची उन्नत व प्रगत अवस्था उपभोगल्यानंतर शारीरिक दृष्टीने आयुष्य उतरणीला लागते . सूर्याची मध्यान्हीची सर्वात उंच अवस्था हळूहळू लोप पावू लागते. त्यातली दाहकता, त्याचे तेज, त्याचा तेजस्वीपणा हळूहळू क्षीण होत जातो.जोश , उत्साह व त्याची प्रभा क्षीण होत होत,मंदावत संपूर्णपणे समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. हे सर्व होताना नेहमीप्रमाणेच सूर्यास्त होतो आणि तो क्षितिजापार अंतर्धान पावतो हे मानवी मनाने सहजपणे स्वीकारलेले आहे. किंबहुना त्याकडे एखादी वेगळी घटना म्हणूनही पाहिले जात नाही, ती अत्यंत नैसर्गिक बाब आहे हे मनाने जाणून घेतलेले आहे. तद्वतच आयुष्याचे मावळतीवर येणे ही भावनाही अत्यंत सहज व नैसर्गिक आहे हे कवीने लक्षात आणून दिले आहे. या सर्व घटना नकळतच सहजरीत्या घडत असतात त्यामुळे त्याची जाणीव मनाला त्या स्थितीपर्यंत आल्यानंतरही सहजपणे ध्यानात येत नाही. ही कविता मुक्तछंदातील असूनही त्यातील लय व नाद कवीने जपलेला आहे त्यामुळे ती कुठेही क्लिष्ट वाटत नाही .तिला गेयतेचा सुंदर स्पर्श झालेला आहे.
तरीही याच लोभसवाण्या
भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून
हातून सुटलेले कित्येक छंद
जाणवतायत मोहकशी साद घालतांना
माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना
उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना
किती आतुरतेने
काही अंशी नव्हे खरे तर बऱ्याच प्रमाणात व तीव्रतेने भेडसावणारी व त्यामुळे मनाला उदासीन बनवणारी अवस्था सामोरी ठाकली असतानाही कवीला मात्र ती जाणीव मनात असूनही विविध सकारात्मक भावना साद घालत आहेत.
लोभसवाणा हा अत्यंत सुंदर शब्दयोजून हवाहवासा ,त्याकडे खेचणारा ,आकृष्ट करणारा, आमंत्रण देणारा असा अपेक्षित भाव अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलेला आहे.आयुष्याच्या क्षितिजावर प्रसन्न आभा पसरलेली आहे आणि हातातून निसटून गेलेले क्षण काही छंद मन कातर करत आहेत. मावळण्याची हुरहुर आहे व “संध्या छाया भिवविती हृदया” अशी मनाची भावावस्था झालेली आहे.
भेडसावणारा हा ही अत्यंत अर्थवाही शब्द आहे. त्यात लपलेल्या विविध छटा कवितेतील आशयाला पूरक आहेत .घाबरवणारा ,दहशत घालणारा, भीती देणारा, भिवविणारा ,धमकी देणारा असे विविध भाव या एका शब्दातून आपल्याला समजतात.त्याबद्दल कवीच्या मनात कुठलाही त्रागा, खंत ,खेद वा दुःख नाही. उलट पक्षी हे मावळतीचे क्षितिज त्याला लोभसवाणे वाटते आहे.मनातली उमेद अजूनही ताजीतवानी, जागी व सक्षम ही आहे. सुटून गेलेली, राहिलेली, कालौघात ,जीवनाच्या रहाटगाडग्यात,संसारात व व्यवसायात गुरफटल्याने समाजास दृगोचर न झालेली, दृष्टीस न पडलेली ,संधी न मिळाल्याने प्रगट न झालेली कौशल्ये त्याला खुणावत आहेत. उदयोन्मुख या शब्दातूनही प्रथम
प्रादुर्भूत होणारे ,अस्तित्वात येणारे, दिसणारे ,विकसित होणारे या अर्थाच्या सर्व अपेक्षित छटा अधोरेखीत होतात. छंदांवषयी त्याच्या अंतरंगातली ओढ त्याला जाणवते आहे. अर्थात ते राहिले म्हणून त्याला वाईट अजिबात वाटत नाही. कारण त्यावेळी मनापासून स्वीकारलेल्या पेशाप्रती शंभर टक्के योगदान देण्याचा त्याचा प्रयत्नही तितकाच प्रांजळ व मनापासूनचा होता. त्यामुळे काही “सुटून गेल्या” मधील खेदाचा भाव अजिबात मनात बाळगलेला नाही. साहजिकच या भेडसावणाऱ्या क्षितिजाला घाबरून न जाता त्यातील लोभसपणाकडे आकर्षित होऊन कवीच्या मनात अजूनही काही ठोस,भरीव कामगिरी करण्याची भावना आहे. व्यावसायिक पेशातील कार्यबाहुल्यामुळे व व त्या प्रती अतिशय समरसून काम करताना वेळेअभावी जपता न आलेले , सुटून गेलेले अंतरीचे छंद त्याला मोहकशी, मोहात पाडणारी साद घालत आहेत. शारीर अवस्थेपेक्षाही प्रबल असलेली ही भावनिक अवस्था जपणे व जाणणे ही अतिशय कौतुकाची बाब आहे.अंगातील विविध कला कौशल्य उदयोन्मुख होण्यासाठी, उदयास येण्यासाठी त्याला नुसती खुणावत नाहीत तर आव्हान देत आहेत. ही कला कौशल्ये आत्मसात करून त्यांच्यातही कसब प्राप्त करणे हे अजूनही शक्य आहे ही भावना खूप महत्त्वाची आहे आणि हे सर्व काही अतिशय आतुरतेने , आनंदाने घडत आहे. साहजिकच जीवनातील विविध अंगांचा, अंगातील सुप्त कलागुणांचा पाठपुरावा करणे हा मोह व त्याचे आकर्षण कवीला या वयातही पडत आहे. मावळतीच्या उंबरठ्यावर असतानाही अस्ताची भीती न बाळगता या भेडसावणाऱ्या क्षितिजापलीकडील वेगळेच क्षितिज त्याला साद घालत आहे. आव्हाने पेलण्याची त्याची मानसिक ताकदही अजून अस्तित्वात आहे, शिल्लक आहे हे लक्षात येते.
तिन्हीसांजेला उषःकालासाठी
मध्यरात्रीला भेटावेच लागेल
निसर्गाचे हे चक्र
उलटे कसे फिरेल माझ्यासाठी
पुन्हा उदयाची आंस असली तरी
परतीचा मार्ग
केव्हाच बंद झाला आहे
तिन्ही सांज अर्थात कातरवेळ येऊन ठेपलेली आहे. या समयी साधारणत: सूर्यास्ताची वेळ असते .सकाळ व दुपार हे दोन समय सरून गेलेले असतात. व रात्रीच्या पर्वाला सुरुवात होण्याआधीचा हा तिसरा समय म्हणून त्यास तिन्ही सांज संबोधतात. हेच कालचक्र माणसाच्या आयुष्याशी निगडित आहे.
यथावकाश अंताकडे वाटचाल होणार आहे .उत्पत्ती नंतर लय व लयानंतर उत्पत्ती या नियमानुसार रात्री नंतर येणाऱ्या उषःकालासाठी रात्रीला नव्हे तर मध्यरात्रीला म्हणजे रात्रीच्या परमोच्च बिंदूलाही आता भेटावेच लागणार आहे. रात्रीची नुसती सुरुवात होऊन उपयोग नाही तर तिचा चरमबिंदू साधला गेल्यानंतरच उषेचे सोनेरी सुप्रभातीचे सत्य प्रत्यक्षात येणार आहे. मध्यानंतर परत सामोऱ्या येणाऱ्या उतरत्या किंवा चढत्या अवस्थेला सामोरे जावे लागते ,त्या अवस्थेतून भ्रमण करावे लागते. निसर्गाचे हे चक्र नियमित व अटळ आहे. निसर्गाचा हा नियम पाळल्यानंतरच ते निसर्गाचे चक्र त्याने घालून दिलेल्या चाकोरी प्रमाणे चालू राहणार आहे. साहजिकच कवी म्हणतो की केवळ माझ्यासाठी हे निसर्गाचे चक्र उलटे कसे फिरेल ,अर्थातच ते फिरणार नाही याची जाणीव त्याला मनोमन आहे.. उदयाची आस कितीही तीव्र व खरी असली तरी त्या साचेबद्ध चाकोरीतून गेल्याशिवाय म्हणजेच अस्ताविना परत उदयाला येणे, अस्तित्व लाभणे हे होणे नाही .मध्यातून परतीचा मार्ग केव्हाच बंद झालेला आहे हे निमूटपणे व मनापासून मान्य करणे हेच केवळ हातात उरलेले आहे.त्यामुळे मरणाची भीती न बाळगता त्याला सामोरे जाणे, त्याला भेटणे, त्याच्यात सामावून जाणे हे गरजेचे आहे. त्याला पर्याय नाही.येथे क्षणभंगुर देह नष्ट होऊन अविनाशी आत्म्याचा उदय परत होणार असा अर्थही अभिप्रेत असावा असे वाटते.पुनरपि जननम् पुनरपि मरणम् मधील आशावाद मनात रुंजी घालत आहे.भारतीय परंपरेत पुनर्जन्म मानला जातो.नष्ट वा अंत झालेल्या देहातील आत्मा अमर आहे व तो पुन्हा जन्म घेतो या कडे कवीने लक्ष वेधले आहे.या दृष्टीने या कवितेचे भावनिक मोल अमूल्य आहे.
निसर्गातील रूपकांचा दाखला देत संपूर्ण मानवी जीवनाचा चलपट शब्दांकित केलेला आहे. सहज सोपे सुलभ शब्द वापरून अत्यंत मोठा जीवनविषयक अर्थ या कवितेतून मांडलेला आहे.
पुन्हा प्राचीवर यायला
मावळतीच्या क्षितिजा पलीकडे
बुडी मारायलाच हवी
पश्चिमेला मावळायालाच हवे
अस्त करून घ्यायलाच हवा.
मावळतीवर पोचल्यावर दृष्टिकोन कसा असावा, कसा ठेवावा याचे विवेचन करून झाल्यानंतर त्याचे सार या शेवटच्या कडव्यात सांगितले आहे. संपूर्ण कवितेचा कळसाध्याय म्हणता येईल असे हे कडवे आहे. पुन्हा प्राची (पूर्वेला) उगवण्याकरता सूर्याला जसे मावळतीला (पश्चिमेला) क्षितिजा पलीकडे बुडी मारणे गरजेचे आहे तद्वतच अगदी तसाच दृष्टिकोन माणसाने जीवनाप्रती ठेवला पाहिजे ही जाणीव सुस्पष्टपणे करून दिलेली आहे .व ती करून देताना अत्यंत सकारात्मक भावना ठेवलेली आहे .दुःखाचा लवलेशही त्यात नाही. “बुडी मारणे” या शब्दातून पूर्णतः ,संपूर्णतः हा भाव स्पष्टपणे सांगितला आहे. ही जाणीव हृदयातून पूर्णपणे स्वीकारायला हवी ,अंशतः नाही हे लक्षात आणून दिले आहे. पुन्हा उदयाची आस मनात ठेवल्याने वा असल्याने मावळतीच्या मार्गे अस्ताला पोहोचणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अज्ञात , अथांग ,असीम क्षितिजाच्या पलीकडे बुडी मारल्या विना ,पश्चिमेला मावळल्याविना पूर्वेला उदय होणार नाही हे लक्षात घेणे किती गरजेचे आहे हे ध्यानात येते. सूर्य व माणसाचे जीवन यांचा आयुष्यपट समांतर तऱ्हेने मांडून जीवनाची उकल सोपी ,सहज करून सांगितली आहे . प्रत्येकाला आपला जीवनक्रम डोळ्यासमोर येतो तेव्हा हीच गत होते. त्यामुळे या भावनेशी संबंध जोडला जातो ,ती भावना अंतःकरणापासून उमगते.
संपूर्ण कवितेत जगण्याचे भान दिले आहे. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वर्णिला आहे .कर्म करता करता फळाची अपेक्षा न धरता निसर्ग नियमाने चालावे ,वागावे व अटळ सत्याकडे डोळसपणे पाहण्याचे ध्येय बाळगणे श्रेयस्कर आहे हे स्पष्ट केले आहे. आयुष्यामध्ये रुसवा ,राग , कुठल्याही प्रकारचा सवाल उपस्थित करणे योग्य नाही. पूर्णपणे आशावाद आणि सकारात्मकता जागवणारी ही कविता आहे. जीवनाचा दर्जा ,जीवनमान ,जीवनस्तर चांगल्या प्रतीचा होण्याकरिता जो मार्ग अनुसरायला हवा तो सोदाहरणातून कवीने दाखवला आहे. म्हातारपणाकडे नेणारा अटळ प्रवास दुःखदायी होणार नाही याकरता विचारांची व आचारांची सहेतुक सांगड घालणे हा महत्त्वाचा संदेश यात दिलेला आहे. कवितेतील यथार्थ शब्दयोजना अत्यंत महत्त्वाची आहे. कवितेत योजलेला शब्द न शब्द त्याचा स्वतःचा विशिष्ट अर्थ घेऊन काव्यवाचकांच्या समोर प्रकट झाला आहे .अर्थातच त्यामुळे कवितेत मांडलेल्या भावनेला कमालस्तर प्राप्त झाला आहे. व कवितेच्या अर्थाला उंची व खोली लाभलेली आहे. कवितेचा काव्यरसिकांच्या मनावर होणारा परिणाम परिणामकारकतेने साधला गेला आहे. मुक्तछंदातील या काव्यरचनेला लय ताल लाभलेला आहे .उगाचच साहित्यिक अलंकारांचे अवडंबर व अवास्तव आग्रह न धरता,सर्वांना सहजपणे सुलभतेने कळेल अशी ही रचना केलेली आहे. व असा दृष्टिकोन कवितेतील आशयाला व भावार्थाला अनुरूप आहे. या कवितेतील अर्थ सजगपणे ,सखोलपणे ,सूज्ञपणे व समंजसपणे समजून घेतला तर मावळतींचा उंबरठा उदासीन कुणाला ही बनवणार नाही. भूत व वर्तमान यांचे भान ठेवून भविष्यकाळाचा वेध घेणारी नजर कवीला लाभली आहे. आपल्यालाही अशी नजर लाभावी असा विचार नक्कीच मनात डोकावतो. ही कविता म्हणजे आयुष्याच्या प्रवासाचे सुंदर व लोभस प्रतिबिंब आहे. त्यात सरणारा काळ आणि माणसाच्या प्रतिभेचा व आवडीचा आविष्कार व त्याच्या शोधातला पाठपुरावा यामधला प्रवास स्पष्ट केला आहे. भाषा संपन्न, अलंकारिक व उद्बोधक आहे .जीवनचक्र त्यातील चढ-उतार यांना सूर्याच्या रूपकातून स्पर्श करण्याची कल्पना प्रेरणादायी व विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. सूर्योदय ते सूर्यास्त हा सूर्याचा जीवनक्रम माणसाच्या जीवन चक्राशी साधर्म्य दर्शवतो. सांजवेळ ही संध्या प्रकाश दाखवते तर क्षितिज हे आयुष्याची सीमा दर्शवते. ही कविता प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करते. मातृभाषेतून व्यक्त केलेली भावना संस्कृतीला व परंपरेला धरण्याचे महत्त्वाचे कार्य करते .कवितेचा आकृतीबंध व रचना कवितेचा सर्वांगीण व सर्वंकष प्रभाव वाढवते.
☆ नाविन्य, अपेक्षा, आणि वास्तव… ☆ विभावरी कुलकर्णी ☆
सुरुवातीला विशेष आकर्षक वाटणारी गोष्ट, मिळाल्या नंतर सामान्य का वाटते?
असे बऱ्याच ठिकाणी आढळते. मानवी स्वभावच असा आहे की, जे मिळत नाही त्याची ओढ वाटते आणि एकदा ते मिळालं की त्यातील नाविन्य संपल्यामुळे त्याचा कंटाळा येऊ लागतो. यालाच ‘मानवी तृष्णेचा विळखा’ म्हणता येईल.
या साठी एक गोष्ट आठवते.
सोनरी पिंजरा आणि राघू
एका श्रीमंत सावकाराला पक्षी पाळण्याची खूप आवड होती. एकदा बाजारात त्याला एक अतिशय देखणा, मखमली पिसांचा आणि गोड बोलणारा पोपट दिसला. त्या पोपटाचा रंग इतका हिरवागार होता की सावकार त्याच्यावर मोहित झाला. त्याने खूप पैसे देऊन तो पोपट विकत घेतला.
घरी आल्यावर सावकाराने त्या पोपटासाठी एक सोन्याचा पिंजरा बनवून घेतला. सुरुवातीचे काही दिवस सावकार खूप उत्साहात होता. तो रोज पोपटाशी गप्पा मारायचा, त्याला बदाम-पिस्ते खायला द्यायचा. पोपटही नवीन घर आणि सोन्याचा पिंजरा पाहून सुरुवातीला खुश होता.
पण काही दिवसांनी सावकाराचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू सावकाराला त्या पोपटाच्या त्याच त्या शब्दांचा कंटाळा आला. “किती तेच ते बोलतो हा!” असं म्हणून त्याने पोपटाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. जो पोपट आधी ‘अद्भूत’ वाटत होता, तो आता फक्त एक ‘शोभेची वस्तू’ बनला.
पोपटाची स्थिती पण काहीशी तशीच झाली. पोपटाचाही त्या सोन्याच्या पिंजऱ्यावरून जीव उडाला. त्याला आता ते बदाम नकोसे झाले आणि बाहेरच्या साध्या कडुनिंबाच्या झाडावरची फळं गोड वाटू लागली. ज्या सोन्याच्या पिंजऱ्याने त्याला सुरुवातीला आकर्षित केलं होतं, तोच आता त्याला ‘तुरुंग’ वाटू लागला.
या उदाहरणातून काही गोष्टी लक्षात येतात.
नाविन्याचा फुगा असतो. कोणत्याही भौतिक गोष्टीचे आकर्षण हे त्यातील ‘नाविन्या’वर अवलंबून असते. एकदा का आपण त्या गोष्टीशी सरावलो की तिचे महत्त्व कमी होते.
दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. आपण वस्तू किंवा व्यक्तीला ‘मिळवण्यावर’ जास्त लक्ष देतो, पण ती ‘टिकवून ठेवण्यावर’ किंवा त्यातील आनंद शोधण्यावर मेहनत घेत नाही.
जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा आपण तिचे फक्त फायदे पाहतो. मिळाल्यावर तिचे मर्यादा आणि दोष दिसू लागतात, ज्यामुळे कंटाळा येतो.
थोडक्यात सुरुवातीला चमकणारी प्रत्येक गोष्ट ‘हिरा’ वाटू शकते, पण जीवनाचा खरा आनंद हा ती गोष्ट मिळाल्यावर तिचा कंटाळा न येऊ देता, त्यातील समाधान शोधण्यात असतो. म्हणूनच म्हणतात, “दुरून डोंगर साजिरे!” पण त्याचे खरे स्वरूप डोंगरा जवळ गेल्या शिवाय कळत नाही.
ही मानवी स्वभावाची एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याला मानसशास्त्रात ‘हेडोनिक अडॅप्टेशन’ (Hedonic Adaptation) असे म्हणतात. एखादी गोष्ट मिळेपर्यंत आपली ओढ तीव्र असते, पण ती प्राप्त झाली की तिचे नाविन्य संपते.
यामागे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील:
१. मनाला ‘नाविन्याचा’ शोध असतो.
मानवी मेंदूला नेहमी नवीन गोष्टींचे आकर्षण वाटते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा आपला मेंदू त्याबद्दलची स्वप्ने रंगवतो. पण एकदा ती गोष्ट रोजच्या जगण्याचा भाग झाली की, मेंदू तिला ‘गृहीत’ धरू लागतो (Adaptation). त्यामुळे सुरुवातीचा तो उत्साह ओसरतो.
२. अपेक्षा आणि वास्तव यांतील फरक लक्षात येतो.
अनेकदा आपण एखाद्या गोष्टीचे अवास्तव चित्र मनात रंगवलेले असते. ती गोष्ट मिळाल्यावर आपल्याला मिळणारा आनंद हा कल्पनेतील आनंदापेक्षा कमी असू शकतो. ‘ती गोष्ट मिळाल्यावर माझे आयुष्य पूर्णपणे बदलेल’ हा भास जेव्हा संपतो, तेव्हा त्या गोष्टीचे विशेष वाटेनासे होते.
३. ‘डोपामाइन’चा प्रभाव असतो.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा करतो किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन स्रवते, जे आपल्याला ‘थ्रिल’ किंवा आनंद देते. एकदा का ध्येय गाठले की, या रसायनाचा स्तर कमी होतो आणि आपण पुन्हा पुढच्या नवीन ध्येयाकडे धावू लागतो.
४. सवयीची शक्ती फार मोठी असते. त्यामुळे सवयीच्या गोष्टींचा कंटाळा येतो.
कोणतीही मोठी सुखद घटना असो किंवा दुःखद, माणूस कालांतराने आपल्या मूळ स्वभावाकडे (Baseline Happiness) परत येतो. नवीन गाडी, नवीन घर किंवा नवीन पद भूषवल्यानंतर काही दिवसांनी ती आपली ‘सवय’ बनते. सवयीमुळे त्यातील ‘विशेष’ काहीतरी असण्याची भावना संपून जाते.
यावर उपाय
कृतज्ञता (Gratitude):
ज्या गोष्टी आपण मिळवल्या आहेत, त्या आपल्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव वारंवार स्वतःला करून देणे.
वर्तमानात जगणे:
केवळ ‘मिळवण्याच्या’ आनंदापेक्षा, त्या गोष्टीचा रोजच्या आयुष्यात ‘उपभोग’ घेण्यावर लक्ष केंद्रित करणे.
प्रवासाचा आनंद:
ध्येयापेक्षा ते गाठण्याच्या प्रवासाचा आनंद घेणे शिकले, तर प्राप्त झाल्यावर येणारी रिक्तता कमी जाणवते.
थोडक्यात सांगायचे तर, मिळवण्याची ओढ ही ‘इच्छे’तून येते, तर टिकवून ठेवण्याचा आनंद हा ‘तृप्ती’तून येतो. जर तृप्ती नसेल, तर प्रत्येक गोष्ट मिळवूनही ती साधारणच वाटत राहील.
मंडळी, सध्या बाजारात आम्रफल म्हणजेच आंबा आलेला आहे. अजून कुठे कुठे कच्च्या कैऱ्या आहेत, तर कुठे कुठे नव्हे सर्वत्र पिकलेले आंबे सुद्धा आपल्याला दिसू लागले आहेत. हा फळांचाच राजा. आंबा केवळ फळांचाच राजा नाही, तर तो सर्व तऱ्हेने राजा आहे असं मी म्हणेन.
आंबा आपण घराच्या अगदी जवळ लावू शकतो. कारण आंब्याचं मूळ हे दंडाकार असतं. म्हणजे ते जमिनीत खोलवर जातं. त्याचा घराला घराच्या पायव्याला त्रास होत नाही. धोका होत नाही. याउलट वड – पिंपळ – चिंच हे महावृक्ष ! यांची मुळे ही शाखाकार असल्यामुळे ती घराच्या पायव्याच्या खाली ही जाऊ शकतात. म्हणूनच कदाचित हे सर्व महावृक्ष आपल्याला गावाबाहेर / नदीकाठी / तळ्याकाठी किंवा जंगलात आढळतात. अर्थात यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. कारण चिंचेवर – पिंपळावर भूत असतं म्हणून घाबरवलं जातं. ही भूते अर्थातच आपल्या घराशी संबंधित आहेत / सुरक्षेसाठी आहेत. हे खरं कारण आहे. जेव्हा शास्त्रीय कारण लोकांना पटत नाही, तेव्हा त्यांच्या मनाशी खेळ करून ही कारणं त्यांच्या गळी उतरवली जातात, हे आपल्याला ठाऊक आहे.
हे झालं मुळांबद्दल ! यापुढे जाऊन आंबा हा बारा महिने हिरवागार असतो. खरं तर आपला भारत देश हा मोसमी हवामानाचा प्रदेश आहे. म्हणजेच शिशिर ऋतू लागला की, पानझड सुरू होते. अगदी सागवानाची जंगलं बघितली तरी या ऋतूत पानांवर जाळी पडलेली आणि पुढे जाऊन ती सगळी पानं गळून पडलेली आपण बघतो. अर्थात पुढे वसंत ऋतू लागला की खरी पालवी येते हे खरे आहे. मात्र आंबा – आम्रवृक्ष आपल्या भरगच्च पानांनी बाराही महिने हिरवागार असतो.
सर्वांनाच ठाऊक आहे की आंब्याची पाने ही शुभ मानली आहेत. आंब्याचं खोड हे घरासाठी अवजारांसाठी असं वापरलं जातं. पण याही पुढे जाऊन आंब्याच्या संबंधात एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे.
आम्रफूल पत राखत / मोह फूल पत खोय
नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय
वरील चरण मी लहान असताना एका कीर्तनात, कीर्तनकार बुवांच्याकडून ऐकलं होतं. अर्थात त्यावेळी जी समज होती त्याप्रमाणे मला त्याचा अर्थ लागला. पण आज त्याचा खरा खरा अर्थ कळतोय.
आपण प्रथम चरण बघूया ! “आम्रफूल पत राखत ” – म्हणजे ज्यावेळी आंब्याला फुले येतात म्हणजे मोहर येतो, त्यावेळी सुद्धा आंबा हा आपल्या हिरव्या गार पानांनी नटलेला असतो म्हणजे आंब्याची फुलं ही आंब्याची पानं यांचं रक्षण करत असतात. अर्थात पत या शब्दावर श्लेष अलंकार आहे. पत म्हणजे तुमची प्रतिष्ठा ! म्हणजे आंब्याची फुले तुमची – त्या झाडाची प्रतिष्ठा राखतात. आता दुसरं चरण बघूया !
” मोह फूल पत खोय “ म्हणजेच मी आधी सांगितल्याप्रमाणे मोसमी हवामानाच्या प्रदेशामुळे आपल्याकडे मोह या वृक्षाला जेव्हा फुले येतात, त्यावेळेस मोहाची पाने झडतात पानगळीमुळे. म्हणजेच मोहाची पाने ज्यावेळेला झडू लागतात त्यावेळेसच मोहाची फुले येतात. याचा अर्थ असा की मोहाची फुले आपल्या वृक्षाची पाने घालवतात. म्हणजेच पत / प्रतिष्ठा घालवतात. आता पुढे बघा
नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय ?
“ना पत का रस चाखत “ हे चरण घेऊ या ! म्हणजेच मोहापासून / मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते हे सर्वांना ठावूक आहे.. जी फुले आपल्या झाडांची पत – प्रतिष्ठा राखत नाहीत, अशा फुलांचा रस – म्हणजे दारू प्राशन केल्यानंतर त्या माणसाची पत कोणीही राखू शकत नाही.
सरळ भाषेत सांगायचं तर, दारू पिणाऱ्या माणसाची पत अजिबात राहत नाही. पण हे सांगण्यासाठी कवीने हे अतिशय सुंदर चरण सांगितलेले आहे.
या दृष्टीने आंब्याची पत राखणारा मोहर पुढे येणाऱ्या आंबा याची /आपल्या वृक्षाची / आपल्या घराची पत राखतात. प्रतिष्ठा जाणतात. लोकांना सावली देतात. आंब्याला नवीन पालवी फुटायला अगदी वसंत ऋतूची वाट बघावी लागत नाही. कालमानाप्रमाणे आंब्याची पाने सुद्धा जुनी झाली की ती गळतात आणि नवी पालवी उगवत असते. त्यासाठी कुठल्याही ऋतूची हवामानाची आंब्याला वाट बघावी लागत नाही. मात्र मोह वृक्षाचं नेमकं उलट आहे. त्याला फुलं येतात तेव्हा मोहाची सर्व पाने गळून गेलेली असतात.
त्यामुळे आपण स्वतः लक्षात ठेवायचे आहे की, जतन कोणाचं करायचं ? आपल्या घराचं की, आपल्या घराचं वाटोळं करणाऱ्या लोकांचं ? स्वतःच जगून पहा ! जगून घेताना एवढं मात्र लक्षात ठेवा की, तुम्ही कुठेही, कितीही दूर गेलात तरी मोहांच्या फुलांसारखे होऊ नका /तर आंब्याच्या फुलासारखं वागत चला. घराची प्रतिष्ठा वाढेल असंच वागत चला ! म्हणजेच जगणं सोपं होईल.
☆ “असं काही पाहिलं की छान वाटतं !!…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
आमची सोसायटी मुख्य रस्त्याला पासून थोडी आतल्या बाजूला असल्यानं गाड्यांचा आणि इतर आवाजांचा बिलकुल त्रास नाही. बऱ्यापैकी शांतता असते. त्यामुळेच थोडासा आवाज, गोंगाट सुद्धा सहन होत नाही. दुपारच्या वेळेला तर नाहीच नाही.
दुपारी जेवण उरकून वामकुक्षीच्या अगोदर पुस्तक वाचत बसलेलो तेव्हाच मुलांचा गलका ऐकायला आला. खिडकीतून पाहिलं तर सोसायटीतल्या शेडमध्ये मुलं खेळत होती. जाम वैतागलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे डोक्याला ताप. त्यात शेड आमच्या खिडकीच्या जवळ असल्यानं सगळा गोंगाट थेट कानावर आदळत होता. शांततेची इतकी सवय झालीये की थोडासा आवाज सहन होतं नव्हता. चिडचीड आणि बेचैनी वाढली. दोनतीन वेळा खिडकीतून पाहत ओरडलो पण मुलांवर काहीही परिणाम झाला नाही. राग अनावर होऊन बडबडायला लागलो. ते ऐकून बायको म्हणाली.
“अति करताय”
“त्रास होतोय म्हणून बोलतोय. उगाच नाही. ”
“मुलं खेळताना गोंगाट करणारच आणि आता तर सुट्ट्या आहेत. ”
“त्यांचे आईबाप निवांत आणि आपल्या डोक्याला ताप”
“वयानं नाही पण विचारांनी पक्के म्हातारे झालात. पन्नाशीतच ही अवस्था. पुढं अवघडयं”
“काहीही काय बोलतेस. ”
“जरा स्वतःचे बालपण आठवा. तेव्हासुद्धा कुणाला त्रास होत असणारच की… ”बायकोच्या बिनतोड मुद्द्यावर मी निरुत्तर.
“मुलांचा गोंगाट यात नवीन काही नाही पण सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं. ”
“कशाबद्दल?”खिडकीतून पाहत मी विचारलं.
शेडमध्ये दहा-बारा वर्षांची मुलं-मुली ग्रुप करून खेळत होते. त्यांचे खेळ पाहून आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. जे दिसलं ते फारच अविश्वसनीय होतं. एक ग्रुप पत्ते खेळत होता, दुसरा नवा व्यापार आणि तिसरा ग्रुप चक्क ‘काचा-कवड्या’ खेळत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच्याही हातातच नाही तर जवळपास सुद्धा “मोबाइल” नव्हता आणि सगळेजण भान हरपून खेळण्यात तल्लीन झालेले. मोबाईल वेडाच्या काळात असं काही ‘हटके’ पहायला मिळणं हे खरोखर सुखद होतं. खूप कौतुक वाटलं. माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खिडकीतून पाहत मुलांच्या खेळात मीसुद्धा कधी गुंग झालो कळलंच नाही.
तिनं एकवार बैठकीवर पाहिलं. ती चरकली. गोंधळली. बैठकीवर फक्त टाळ आणि चिपळ्या… बुवांशिवाय! तिला आठवले बुवांचे शब्द, ” आवले, ज्या दिवशी या टाळ-चिपळ्या माझ्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्या दिवशी समज तुझा तुकाराम या जगात नाही “!
हो… हीच ती… टाहो फोडून कोसळलेली, मनानं ढासळलेली… तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी… जिजाबाई, जिला तुकोबा प्रेमाने आवली म्हणत!
… हीच ती आवली जिला तुकोबांनी कधीतरी मनाच्या तरल मनस्थितीत, ज्यात त्यांना वाटे… ” विठो तुझे माझे राज्य, नाही दुस-याचे काज”!… मग अशा वेळी त्यांनी एका अभंगात म्हंटले…
” स्त्री द्यावी गुणवंती, तरी तीते गुंते आशा,
म्हणून कर्कशा लावी पाठी”!
– – झालं… त्यानंतर सगळेच मग आवली कडे कर्कशा पत्नी म्हणूनच बघू लागले. आजही बघतात. पण त्याच तुकोबांनी अजून एका अभंगात म्हंटलंयं…
” तुका म्हणे शोधून पाह्य,
बायको नव-याची माय.
तिजविण विसावे नाही,
क्षणार्धसुद्धा!
म्हणोनी संसार थोर! “
पण समाजधुरिणांनी, किर्तनकार, प्रवचनकार, सगळ्यांनीच आवलीवर ‘कर्कशा’… हे शिक्कामोर्तब केले ते केलेच! हाच शिक्का, हीच उमटवलेली मोहोर… पुसण्याचा हा प्रयत्न! तुकोबांच्या परमार्थ कार्य यज्ञात, आयुष्यभर… बोलंत-म्हणंत, त्याना जगरहाटी शिकवंत, लोकांपासून सावध रहाणं सांगंत, प्रापंचिक जबाबदा-यांची जाणीव देत… आणि स्वतः कोंड्याचा मांडा करून प्रपंच नेटका करण्याचा सतत प्रयत्न करंत… कधी पेटंत, कधी धुमसंत, तर कधी धगधगंत पण कुटुंब कबिल्यासाठी चेतती राहिलेली ही… समिधा!!!
पुण्याच्या गुळवे सावकाराची, खात्या-पित्या घरातली ९-१० वर्षांची लेक… जिजाई! लग्न होऊन तुकारामांच्या घरात येते आणि साखरे सारखी विरघळून जाते त्यांच्या संसारात. द्वितीय पत्नी म्हणून आलेली असूनही, सवतीवर… रखुमाबाईंवर अगदी मनापासून प्रेम आणि तिच्या तब्येतीची काळजी घेणं, तिच्या मुलावर अपत्यवत प्रेम करणं… मोठ्या जावेवर बहिणीसारखी माया केली तिनं! जावेच्या पती विरहाच्या अव्यक्त दु:खानं दु:खी होणारी ही आवली!! प्रपंच मात्र नेटाने आणि नेटका, निगुतीचा करत होती. मोठ्या आत्मविश्वासाने संसार केला तिनं!
पण तुकाराम मात्र एकापाठोपाठ एक पिता आणि माता यांचं छत्र हरवणं, मोठ्या भावजयीचं अकस्मात जाणं, मोठ्या भावाचं त्या दु:खात, विमनस्क अवस्थेत दूर कायमचं निघून जाणे, पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि पहिल्या मुलाचा ही मृत्यू, पडलेला भयंकर दुष्काळ, होणारी उपासमार, बुडलेली सावकारी आणि प्रतिष्ठेचे निघालेले दिवाळे… या सगळ्या आपत्ती, विपत्तींच्या झंझावातात कोलमडून पडले. आणि परमार्थाची वाट धरली त्यांनी, प्रपंच जणू वा-यावर सोडून दिला. आणि दोघांच्या जगण्याच्या पातळ्याच भिन्न झाल्या. आवली ढासळली मनाने. हिंमत खचल्या सारखी झाली. आणि मग मात्र तिचा संयम कधी तरी संपला तर तिची चिडचिड होणं साहजिकच नाही कां? आपल्या नव-यानं चारचौघांसारखा संसार करावा असं त्या काळातल्या कुणाही बाईला वाटणाऱच ना? मग आवलीचं संतापणं, चिडणं, पराकोटीला ही गेलं असेल समजा… तरी तो उद्रेक तर घरा-घरांत आजही बघायला मिळतोच की! मग तिलाच ‘कर्कशा’ ठरवून, आणि तुकोबांनीच… तिच्या पतीनेच म्हंटलय़ं… असा पवित्रा घेत… आवलीचं पत्नी, सून, जाऊ, माता, गृहिणी म्हणून असलेलं समर्पण दुर्लक्षित नाहीच ना करता येणार?
तुकोबांनी एकच उरवून आणलेला ऊस… संतापात तिने, भावनेच्या उद्रेकात फेकला, भिरकावला असेल ही त्यांच्या दिशेने… पण त्याचा विपर्यास करून… पाठीत मारला… असं म्हणणं… ही किंवदंती, आख्यायिका ही असू शकते की कदाचित! हा ही एक विचार असूच शकतो ना? पण म्हणून तिच्या या धगी पेक्षा… तिची ऊब, तिची मायेची, पती प्रेमाची पाखर त्याचा तो अलवार स्पर्श ही कधीतरी जाणवून घ्यावा ना?
हीच आवली… भंडा-याच्या डोंगरात काटे-कुटे तुडवत तुकोबांच्या भुकेची भाकर झाली. तुकोंबावर मनापासून निरतिशय प्रेम केलं तिनं… म्हणूनच तर चिंतनासाठी कधी… भांबनाथ तर कधी भंडारा अशा विविध डोंगरावर, न सांगता गेलेल्या तुकोबांचा पत्ता तिला बरोबर कळे, आणि मग जाई ती थेट त्यांच्या पर्यंत भाकर घेऊन. तुकोबांच्या पोटात घास गेल्याशिवाय आवलीने कधीच एक घास ही खाल्ला नाही.
तुकारामा सारख्या तेजस्वी सूर्याची किरणे आवली पर्यंत नाही पोहोचू शकली. ती सतत त्यांची सावली बनून राहिली तरीही!! पण तरीही आवलीने एका अभंगात आपल्या आध्यात्मिक ज्ञानाची चुणूक, झलक दाखवलीच आहे असं वाटतं… बघा ना…
” तुकारामाची कांता सांगे लोकांपाशी
जातो पंढरीशी स्वामी माझा,
फुटकाची वीणा त्याला दोन तारा
घालितो येरझारा पंढरीच्या!”
– – – आवलीने आध्यात्मिक सत्यच सांगितले आहे ना यात… नऊ ठिकाणी छिद्रे असलेली ही देहरूपी वीणा आणि श्वास-उच्छवास या दोन तारा छेडीत माझा स्वामी पंढरीसी कां जातो? कळेना!!
आवलीने… “देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग! “… हेच तर सांगितलयं ना?
तुकोबांचं सांगणं… ” आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने! “… हे नसेल उमगलं तिला… पण तरीही तिनं तुकोबांच्या भक्तीचं वादळ पेललंच ना? आभाळ झेललं तिनं!! पण तिचं हे… पेलणं, झेलणं, घराचा सरा होऊन आख्खं घर तोलणं आणि कुटुंबाचा कणा होऊन ताठ उभं करणं… हे जगाने ओळखलंच नाही.
तुका आकाशाएवढा असेलही, आहे ही… पण आवली तर पृथ्वी सिद्ध झाली, जिच्या सोशिकतेने दगडाला ही पाझर फुटावा!!!
कविवर्य बोरकरांनी सुद्धा तिचा महिमा वर्णिला आहे… म्हणतात…
” तुक्याच्या पायाची व्हाया जिने वीट
केली पायपीट चौ-यांशीची.
*
पोचवाया त्याच्या भूकेला भाकर
काट्यांचे डोंगर पालाणिले.
*
न चुकावी त्याची पंढरीची वारी
म्हणून वोसरी नोलांडिली!! “
* आणि पुढे कविवर्य लिहितात…
*
” सार्थक होऊन, तुक्याच्या जन्माचे
विमान देवाचे आले दारी,
*
असून गर्भार पाचा महिन्यांची
गाभण म्हशीची आई व्हाया,
*
आलीये मुक्ती ला लाविले माघारी
तुक्याहून थोरवी जिजाई ची!!
अशी ही आवली तुकयाची सावली, गोठ्यातील गाभण म्हशीची माऊली… स्वतः गर्भार असूनही पतीबरोबरच मुक्ती पांडुरंगाने सुचविली, पण तिने नाकारिली… असंही म्हंटलं जातं. ही आख्यायिका जरी असली तरी, एक गोष्ट तर खरीच ना… की… तुकोबांनंतर ही आवलीने संसाराचा गाडा पुढे नेला. पती विरहाचं दु:ख पचवलं आणि त्यानंतर ४ महिन्यांनी जन्माला आलेल्या नारायणा वर अतिशय सुंदर संस्कार केले. आवलीला पतीचे महात्म्य कळले होतेच. फक्त तिची इच्छा होती की तुकोबांनी प्रपंच सांभाळून परमार्थ करावा. पण तसे नाही होऊ शकले. पण तरीही आवलीने, नारायण बापा सारखा व्हावा म्हणून त्याला वारकरी पंथाची शिकवण दिली. नारायणाचा… नारायण महाराज झाला. वारकरी पंथाची पताका तुकोबारायांनंतर नारायण महाराजांनीच खांद्यावर घेतली. ” ग्यानबा-तुकाराम”… हा गजर, नारायण महाराजांनी लिहिला, सुरू केला आणि माऊली -तुकोबांची एकत्रित पालखी ही त्यांनीच सुरू केली. म्हणूनच ते… पालखी सोहळा जनक:- तपोनिधी नारायण महाराज म्हणून ओळखले जातात. दिंडी सोहळ्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात करण्याचं श्रेय त्यांच्याकडेच जाते.
– – – या सोहळ्याची पताका फडकविणा-या हातांच्या पाळण्याची दोरी मात्र त्या आवली माऊली च्याच हाती होती… हे विसरून नाही ना चालायचं! तिचेच संस्कार भिडले ना, गजर बनून थेट आभाळाला!! या… तिन्ही लोकीं च्या गुंडा पुत्राची माता… आवली… ‘कर्कशा’ कशी असेल ना मग??
तुका वारकरी संप्रदायाचा कळस झाला, पण त्या कळसाच्या तेजाचं स्फुल्लिंग… पाया मात्र आवलीच ठरावी, मानावी… असं वाटतं!!
… ही बायको… तुकोबाची माय बनली, आपल्या लेकरांबरोबरंच, म्हणूनच तुकोबांच्या म्हणण्यानुसार च ते… प्रभु चरणी विसावू शकले.
हा विसावा देणारी त्यांची सावली… आवली… शेवटी त्या पांडुरंगाच्याच चरणी विसावली. खरं म्हणजे पांडुरंगाला तुकोबांपेक्षा तीच जास्त प्रिय होती… तिची विरोधी भक्ती, त्याच्या वरील रागामागचा भक्तीमय अनुराग… जाणला होता त्यानं… म्हणूनच तर ना… काटा निमित्त होते, घेई देव भक्ताचे पाय हाती!!
– – अशी ही थोरवी त्या आवली ची ! स्वयं दीप होऊन जळत राहणाऱ्या समिधेची !!!
☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
… आपण कुठे जास्त सुखी आहोत?
आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपल्याला अमेरिका, लंडन किंवा स्वित्झर्लंडचे फोटो पाहून वाटतं, “काय नशीब आहे या लोकाचं””! किती सुंदर बर्फ आणि किती स्वच्छ हवा!” पण मित्रांनो, एक डॉक्टर म्हणून आणि निसर्गाचा अभ्यासक म्हणून मी तुम्हाला सांगेन, ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.
आज आपण जगातील मोठ्या देशांची हवामान स्थिती आणि आपला भारत किती ‘नशिबवान’ आहे, याचा वास्तववादी आढावा घेऊया.
१. स्वित्झर्लंड: केवळ पर्यटनासाठी सुंदर, जगण्यासाठी कठीण!
स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो पांढराशुभ्र बर्फ. पण विचार करा:
गोठलेले आयुष्य: तिथे वर्षातील ७ ते ८ महिने कडाक्याची थंडी असते. जो बर्फ फोटोंमध्ये छान वाटतो, तोच बर्फ जेव्हा घराच्या दारासमोर ३-४ फूट साचतो, तेव्हा तो काढताना नाकी नऊ येतात.
शेतीचा अभाव: हवामानामुळे तिथे आपल्यासारखी विविध कडधान्ये, फळे किंवा भाजीपाला पिकवणे अशक्य आहे. त्यांना बहुतेक अन्नधान्य आयात करावे लागते.
२. लंडन (यूके): सूर्यप्रकाशासाठी आसुसलेले लोक लंडनच्या हवामानाचा भरवसा कोणीच देऊ शकत नाही.
नेहमीचा पाऊस: तिथे कधीही पाऊस पडतो, त्यामुळे लोक सतत छत्री घेऊन फिरतात. पण तो पाऊस आपल्यासारखा ‘चिंब भिजवणारा’ नसतो, तर तो हाडे गोठवणारा आणि ओलसर असतो.
विटामिन-डी ची कमतरता: तिथे कित्येक आठवडे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे तिथल्या लोकांमध्ये हाडांचे आजार आणि ‘डिप्रेशन’ (उदासीनता) मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच तिथे उन्हाळ्यात थोडा जरी सूर्य दिसला की लोक पार्क मध्ये धावतात.
३. अमेरिका: निसर्गाचा रुद्रावतार
अमेरिका हा देश जेवढा प्रगत आहे, तेवढाच तो नैसर्गिक आपत्तींनी घेरलेला आहे.
बर्फाची वादळे (Blizzards): अमेरिकेत जेव्हा बर्फाची वादळं येतात, तेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, हीटिंग सिस्टम बंद पडते आणि लोक घरातच गोठून मृत्यू पावल्याच्या घटना दरवर्षी घडतात.
टोर्नेडो : तिथल्या काही राज्यांमध्ये इतकी भयानक चक्रीवादळं येतात की अख्खी घरं हवेत उडून जातात. अशा भीतीखाली जगण्यापेक्षा आपला भारत कितीतरी पटीने सुरक्षित आहे.
४. रशिया आणि कॅनडा: उणे ५० अंशांचा छळ
या देशांतील काही भागांत तापमान उणे ४० ते ५० अंशांपर्यंत जातं. तिथे साध्या पाण्याचा बर्फ व्हायला काही सेकंद लागतात. अशा ठिकाणी राहणं म्हणजे निसर्गाशी रोजचं युद्ध असतं.
मग आपला भारत ‘नशिबवान’ का?
आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राहणारे लोक खरंच भाग्याचे आहोत,
कारण:न मोजता मिळणारा सूर्यप्रकाश: आपल्याला वर्षभर मोफत ‘व्हिटॅमिन-डी’ देणारा सूर्य मिळतो, जो जगातील निम्म्या देशांना मिळत नाही.
मोजून चार-चार महिने: निसर्गाने आपल्याला बदलायची संधी दिली आहे. उन्हाळ्यात आपण आंबे खातो, पावसाळ्यात निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेतो आणि हिवाळ्यात आल्हाददायक वातावरणात काम करतो.
अतिरेक नाही: आपल्याकडे रशियासारखा हाडे गोठवणारा बर्फ नाही की दुबईसारखं अंगाची राख करणारं ऊन नाही. आपल्याकडे ‘मध्यम’ मार्ग आहे.
अन्नधान्याची श्रीमंती: आपल्या हवामानामुळे आपण वर्षातून ३-३ पिके घेऊ शकतो. ताज्या भाज्या, फळे जे आपल्याला सहज मिळतात, ते परदेशात ‘लक्झरी’ मानले जातात.
डॉक्टरांचा सल्ला:
परदेशाचे फोटो पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. आपण अशा भूमीत जन्माला आलो आहोत जिथे निसर्ग आपली ‘माय’ बनून काळजी घेतो, ‘वैरी’ बनून नाही. या सुवर्ण हवामानाचा आनंद घ्या, व्यायाम करा आणि निरोगी रहा.
लेखक: डॉ. सुशांत पाटील
(मोरया क्लिनिक, अक्कोळ)
संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ठरवलं तर माणूस काहीही करु शकतो. पण हे ठरवणंच सोप्प असत का. ?… कधी सोप्प, तर कधी कठीण असतं. फक्त हे सोप्प आणि कठीण आपण ठरवलय, का आपल्याबद्दल कोणी ठरवलंय यावर अवलंबून असत.
आपण कोणासाठी काही ठरवलं असेल तर त्यात बराच अर्थ असतो. पण कोणी आपल्याबद्दल काही ठरवलं असेल तर त्यात आपण अर्थ शोधायचा प्रयत्न करतो.
हे ठरवणं म्हणजे लग्नासारख्या मोठ्या गोष्टींच नाही. तर इतर गोष्टींचच आहे. पण यातही… लहान लहान गोष्टी ठरवायला तुम्ही कशाला पाहिजे… असं म्हंटल की मोठेपणा मिळाल्या सारख वाटत. पण त्याच बरोबर मोठ्या गोष्टी ठरवण्या इतका मोठेपणा कोणी देत नसल्याचही लक्षात आणून दिल जात. शेवटी काय ठरवण्यात आपला सहभाग असावा कि नसावा हे सुध्दा माझ्याबद्दल दुसरेच ठरवतात.
माणसानं स्वप्न सुध्दा मोठ्ठी पहावीत अस म्हणतात. याचप्रमाणे मी काहितरी मोठ्ठ ठरवाव अस वाटलं. पण मी जे ठरवत होतो ते काहितरी मोठ्ठ नव्हतच, काहीही ठरवण्याइतका मी मोठा झाल्याचं मला आठवतच नाही. आणि मी इतरांच्या बाबतीत काही ठरवावं इतके लहान दुसरे वाटलेच नाही. माझ्या बाबतीत इतरांनी माझ्यासाठी ठरवलेल्याच गोष्टी माझ्याकडून ठरवून होतात.
लहान असतांना कोणत्या शाळेत जायचं, अभ्यास कसा, कितीवेळ करायचा हे ठरवलं होत. पण मी नाही. खेळायचं काय हे आम्ही ठरवत असलो तरी खेळायची वेळ मी ठरवत नव्हतो. गणवेश शाळा ठरवत होती. तर कपडे कुठे, कसे, कोणते घालायचे हे घरचे ठरवत होते. त्यावेळी आजच्या सारखा ऑनलाईन जमाना नव्हता, उलट बर्याचदा तर सगळ्यांना म्हणजे लायनीने सारखेच कपडे असायचे. आजकाल कपडे आणि केस यावरून मुलगा आहे का मुलगी हे सुध्दा पटकन ठरवता येत नाही. पण आमच्या लहानपणी नुसत्या कपड्यावरून आम्ही भावंड आहोत हे सगळ्यांना सहज समजत होत. बर्याच घरी हीच स्थिती होती. त्याचा परिस्थितीशी संबंध असलाच पाहिजे अस काही नव्हत. माझ्या मुलांच्या बाबतीत हे मी ठरवण्याचा प्रश्न आलाच नाही.
नोकरीत मी कोणतं काम करायचं, हे त्यांंच ठरलं कि मला सांगितल जायचं. हं, हे करा. कदाचित मी कोणतं काम नीट करेन हाच प्रश्न त्यांना असावा. किंवा जे काम करायला कोणाला आवडत नसेल ते मला देण्याच ठरत असाव.
मुलांच्या बाबतीत काही ठरवावं, तर त्यांच आधीच काय करायच ते ठरलेलं असत. मग मी आपला त्यांनी ठरवलय तेच करायच ठरवतो. उगाच वेगळं कशाला ठरवा… आणि ठरवलं तरी ऐकणार कोण…
मी चारचाकी शिकावी अस मीच ठरवलं, आणि तसा क्लास लावणार अस सांगितल. तर आता चारचाकी काय दुचाकीसुध्दा अगदी गरज असेल तरच चालवायला द्यायची असच आम्ही ठरवलंय अस घरातून सांगण्यात आलं. फारतर व्यायाम म्हणून सायकल चालवा अस सांगितलं. आणि मी माझ्याचसाठी सायकल चालवायचं ठरवण कठीण होतं.
खाजगी बस ठरलेल्या अचूक वेळेला प्रवास सुरु करेल यावर जितका विश्वास असतो, तेवढाच विश्वास मी ठरवलेल्या गोष्टींबद्दल असतो.
या गोष्टीनंतर माझं वय हा शब्द कायम ऐकायला यायला लागला. आता वय किती हे सुध्दा कॅलेंडरच ठरवतो. आणि या वयात काय करायचं, आणि काय करायचं नाही हे माझ्याबाबतीत डाॅक्टर ठरवतात. काय खावं, किंवा किती खायला पाहिजे हे ते ठरवत नसले तरी सांगतात मात्र तेच. वर तुम्ही ठरवा… अस मला सांगतात. आणि ते सहज आणि आपलेपणाने सांगितल तरी… त्यासाठी फी किती आकारायची हे सुध्दा तेच ठरवतात. फक्त तो ठरवलेला आकार माझ्या खिशाचा किती आकार कमी करतो हे मी ठरवतो.
आता माझी झोपायची, उठायची, फिरण्याची वेळ. खायचं काय, किती, केव्हा हे. यासारख्या अनेक गोष्टी ठरवल्या गेल्या आहेत. व त्या गोष्टी त्या वेळात करायचं मी ठरवलंय. तरीही रोज रात्री उद्या सकाळी लवकर उठायचं असं ठरवतो. पण लवकर म्हणजे नक्की किती वाजता… हेच ठरत नाही. दुसर्या दिवशी ऊठतो तेव्हा लवकर हा शब्द हरवलेला असतो, आणि उठायला ऊशीरच झाल्याच लक्षात येतं.
रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कितीतरी छोट्या छोट्या असतात ज्या मनात आणलं तर ठरवता येऊ शकतात. पण ठरवायचच असेल तर छोट्या गोष्टी ठरवण्यात काय मजा… अस म्हणत मी त्या ठरवायच टाळतो… आणि मोठ्या गोष्टी… राहू देत. नंतर सांगतो…
पण माझं ठरवण हे हाॅटेल मधे जेवायला जाण्यासारखं असतं. हाॅटेल मधे ते काय देणार हे त्यांनी ठरवलेलं असत व तेच मेनूकार्ड वर असत. त्यावरून आपल्याला काय, आणि किती मागवायच हे आपण ठरवतो. तसच घरात काय ठरलं आहे, व त्यातलं काय, व किती मी (वेळेत) करु शकतो हे पाहून ते करायचं मी ठरवतो.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
मश्लोक क्र. ४५ – – –
जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनी कोण गोडी |
जिये संगतीने मति राम सोडी |४५|
अर्थ :ज्यांच्या संगतीत मनाचे समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढीस लागतो अशा लोकांची संगत चांगली नाही. ज्यांच्या संगतीत आपण बुद्धीने परमेश्वरापासून दूर जातो अशांच्या संगतीत राहण्यात गोडी ती कोणती ?
विवेचन :या श्लोकात समर्थांनी अप्रत्यक्षपणे सत्संगतीची महती सांगितली आहे. व्यवहारात आणि परमार्थातही संगत अतिशय महत्त्वाची असते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचे गुण किंवा दोष आपल्याला लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात …..
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला
कुसंगे नाडला साधू तैसा ||
हिरा अत्यंत कठीण असतो परंतु त्याला ढेकणाचे रक्त लागले की तो भंग पावतो असे म्हणतात. त्याप्रमाणेच दुर्जनांच्या संगतीत राहिले की साधू देखील बिघडतो एवढे संगतीचे महत्त्व आहे. ‘संगती संग दोषेंण’ असे म्हटले जाते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, ” सत्संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो” व्यसनी माणसाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे आपल्यालाही व्यसन लागण्याची शक्यता असते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहत असू तर आपल्याला तसे वागणे योग्यच वाटायला लागते. श्रीमंत व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यालाही तसेच श्रीमंत व्हावेसे वाटते. या सगळ्या अशा प्रकारच्या संगतीत आपण भगवंताला मात्र विसरतो आणि आपला अहंकार मात्र वाढत असतो. ‘मी ‘पणाला खतपाणी मिळते.
क्षमा हे वीराचे भूषण आहे. नम्रता हे विद्येचे भूषण आहे. गर्व नसणे हे श्रीमंतीचे भूषण आहे. परंतु ज्या माणसांना हे माहिती नसते त्यांचा अहंकार बळावतो. अशांच्या संगतीत राहिल्याने आपलाही अहंकार आपण जोपासत राहतो. संत कबीर यांचा एक दोहा फार सुंदर आहे…
‘बडें बडाई न करे, बडे न बोले बोल| हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||
“मैं मैं” बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग| कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’
समर्थ म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. ” अहंकारामुळे काम, क्रोध आदी दुर्गुण वाढीस लागतात. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीमुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. परंतु शांतता आणि समाधान मात्र हरवलेले दिसते. आपल्याला त्यांची प्रगती जरी आकर्षक वाटली तरी त्यातील फोलपणा समजून घेतला पाहिजे.
तात्पर्य, ज्या संगतीने भगवंताचे नाम मुखात येऊन ते संगत म्हणजे सत्संगत ! सत्संगती धरली तर सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.
स्वसंवाद ::
१) ज्या लोकांच्या सहवासात गेल्यानंतर मला अशांत वाटते किंवा स्वतःबद्दल उगाचच बडेजाव (मीपणा) मिरवावासा वाटतो, असे लोक माझ्या लक्षात येतात का ?
२)माझ्या मित्रांच्या किंवा परिचितांच्या वर्तुळात गेल्यानंतर आमचा संवाद भगवंताकडे/सद्गुणांकडे वळतो की केवळ परनिंदा आणि ऐहिक सुखांच्या गोष्टींकडे ?
३) श्रीमंतांच्या संगतीत स्वतःबद्दलचा न्यूनगंड आणि सत्ताधीशांच्या संगतीत वाढलेला माझा अहंकार मला जाणवतो का ? (हे देखील समाधान भंग पावण्याचे लक्षण आहे).
४) ‘अहंकाराचा वारा’ लागून माझी बुद्धी रामापासून (सत्यापासून) दूर जात आहे, हे ओळखण्याची सतर्कता माझ्यात आहे का?
– – – –
श्लोक क्र. ४६ – –
मना जे घडी राघवेवीण गेली |
जनी आपुली ते तुवा हानी केली |
रघुनायकावीण तो सीण आहे|
जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे|४६|
अर्थ : हे मना, जो क्षण राघवाच्या स्मरणाशिवाय गेला त्याने तू आपले नुकसान करून घेतले असे समज. ज्या गोष्टीत रामाचे अधिष्ठान नाही अशा गोष्टी करणे म्हणजे व्यर्थ शीणणे असे समजून या जगात तू अत्यंत सावधपणे वावर.
विवेचन : श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. एक क्षणही आपण श्रीरामाच्या स्मरणाशिवाय घालवावा असे त्यांना वाटत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील हेच आपल्याला सांगतात. आपण जर स्वतःला साधक मानत असू आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय एक क्षणही व्यर्थ घालवू नये. असा वाया घालवलेला वेळ म्हणजे साधकाने आपले स्वतःचेच करून घेतलेले नुकसान.
आपल्याला दृश्य गोष्टी जास्त आकर्षित करतात. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची ओढ आपल्याला वाटत नाही. त्यासाठीच संतांनी आपल्याला सगुण भक्ती करायला सांगितले आहे. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणि चित्तात त्याचेच ध्यान अशी साधकाची अवस्था असावी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अशी संत परमेश्वराला प्रार्थना करतात यासाठीच.
विज्ञानाच्या प्रगतीने आणि भौतिक समृद्धीने माणसाला ज्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातच माणूस सुख मानतो. त्या प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय समजतो आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्या परमेश्वराला आपण विसरतो. भगवंताशिवाय आपल्या हिताचे कोणी नाही आणि उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही हे साधकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये कोणते तरी ध्येय असते हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला त्या ध्येयाचा विसर पडून चालत नाही म्हणजेच त्या ध्येयाकडे सतत लक्ष असावे लागते. ते साध्य होण्यासाठी दक्ष असावे लागते. परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे हे विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागते. इतर गोष्टींमध्ये आपला फार वेळ जाणार नाही याबाबत दक्ष असावे लागते. एखाद्याला उत्तम गायक व्हायचे असेल, तर त्याला रोजचा रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गळ्याचे आरोग्य बिघडणार नाही याबाबतीत त्याला दक्ष असावे लागते. थंड, तेलकट पदार्थ खाल्लेले त्याला चालत नाहीत.
त्याप्रमाणेच साधकाने देखील सदैव दक्ष असावे असे समर्थ म्हणतात. सर्वत्र सावधानता बाळगावी असा समर्थांचा आग्रह आहे. मग साधना मार्गावर तर सावधानता अत्यंत आवश्यक आहे. कारण साधकाला आपल्या मोहात पाडून त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी विवेक हवा.
रोज मी भगवंताच्या नामस्मरणासाठी किती वेळ देतो याचा विचार प्रत्येक साधकाने करायला हवा. आजकाल सगळ्या गोष्टी आपण अतिशय घाईने उरकतो. भगवंताची पूजा, नामस्मरण यासारख्या गोष्टी रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात. ज्या गोष्टी मनापासून किंवा समर्पण भावनेने केल्या जात नाहीत, त्या गोष्टी उपचार ठरतात. इतरही अनेक गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवत असतो. परंतु समर्थ म्हणतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय वेळ घालवणे म्हणजे आपली हानी आपण करून घेणे. तो केवळ ‘ सीण आहे ‘ म्हणूनच आपण आपला एक क्षणही परमेश्वराच्या स्मरणाशिवाय जाणार नाही याबाबत दक्ष असले पाहिजे.
स्वसंवाद (नवीन)
१) मी स्वतःला साधक मानतो का?
२) माझी पूजा, नामस्मरण या गोष्टी मनापासून होतात की केवळ रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात ?
३) ध्येयापासून विचलित करणाऱ्या कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत असे मला वाटते ? त्याबाबत मी खरोखर दक्ष आहे का ?