सध्या थंडीचे दिवस आहेत. परवाचीच गोष्ट! मी बाहेर माझ्या पोर्चमध्ये आरामखुर्ची टाकून पेपर वाचत बसलो होतो. कोवळे, सुखद आणि उबदार ऊन अंगाला सुखावत होते. माझ्या मनात सहज विचार आला की मी किती भाग्यवान आहे! कोवळ्या उन्हात बसण्याचं हे सुख अनुभवतो आहे. काही काही सुखांची पैशात तुलना करता येत नाही. पैसे देऊनही असे सुख विकत घेता येणार नाही. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांना साधं हे उन्हात बसण्याचं सुख देखील अनुभवता येत नाही. या छोट्याशा परंतु मौल्यवान सुखाला ते पारखे झाले आहेत. कोणाच्या घरात ऊनच येत नाही तर कोणाला उंचच उंच इमारतींमुळे सूर्यदर्शन घडत नाही. कामाच्या धावपळीत अनेकांना त्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. कोणी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला असतो तर कोणी फायलींच्या ढिगार्यात.
संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’. पिढ्यानपिढ्या आपण हेच ऐकत आणि मानत आलो आहोत. पण कधीकधी वाटतं, आपण दुःखाच्या पर्वताकडे इतकं टक लावून पाहतो की, हाताच्या तळव्यावर असलेल्या ‘जवा’एवढ्या सुखाच्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडतो. आणि या दुःखाच्या जाणिवेने आपण विनाकारण स्वतःला गंभीर करून घेत असतो. खरंतर, जर आपण जीवनाकडे डोळस दृष्टीने पाहिलं, तर लक्षात येईल की आपण ज्याला ‘ जवा ‘एवढं म्हणतोय, ते सुख खरं तर पर्वताएवढं विशाल आहे. सुख ही अशी गोष्ट आहे की जी कोणत्याही चलनात मोजता येणार नाही. सुख आणि समाधान विकत मिळत नाही, ते फक्त ‘ अनुभवावे ‘ लागते.
आपण अनेकदा सुखाची व्याख्या ‘ वस्तूंमध्ये ‘ शोधत असतो. आपण जर कुणाला त्याला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करायला सांगितली, तर बहुतेकांच्या यादीत मोठी गाडी, आलिशान बंगला, गडगंज संपत्ती हीच नावे येतील. पण खरंच असं असतं का? जर संपत्तीतच आनंद असता, तर जगातले सर्व श्रीमंत लोक सर्वात आनंदी दिसले असते. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. पैशाने सुविधा विकत घेता येतात, पण समाधान नाही. बिछाना विकत घेता येतो, पण शांत झोप नाही.
खरा आनंद कुठे असतो? तो साध्या साध्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. बाहेर सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत असताना आणि पेपर वाचत असताना बायकोने प्रेमाने वाफाळलेला चहाचा कप समोर ठेवावा, त्याचा आस्वाद घ्यावा. तो केवळ चहा नसतो. त्यात असतं प्रेम आणि काळजी! आपल्या माणसाची. आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचताना त्यात पूर्णपणे हरवून जावं. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना सगळे मुखवटे काढून ठेवून काळ-वेळ विसरावा. लहान मुलांच्या खेळात रमून स्वतःही बालपण अनुभवावं. पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवावा. आपलं आवडतं एखादं गाणं ऐकावं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रचंड ऊर्जा देणाऱ्या असतात.
पण या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे आपण पाहतो का? बऱ्याच वेळा आपण उजळणी करतो ती दुःखाच्या क्षणांची. हा माझ्याशी असं वागला, तो मला असंच बोलला, हीच का माझ्या उपकारांची परतफेड… असे विचार करून आपण स्वतःला दुखी करून घेत असतो. पण जीवनात पदोपदी येणारे हे सुखाचे छोटे क्षण आपण डोळे भरून पाहतो का? त्यांचा आनंद घेतो का? हे सुखाचे छोटे छोटे क्षण जेव्हा आपण एकत्र करतो, तेव्हा सुखाचा एक भलामोठा पर्वत उभा राहतो.
पाऊस पडून गेल्यावर पानांवर पडलेला पाण्याचा थेंब जसा सूर्यप्रकाशात हिऱ्यासारखा चमकतो, तसंच आपलं आयुष्य आहे. फक्त आपली दृष्टी ‘डोळस’ हवी. ज्या दिवशी आपल्याला साध्या साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आणि आनंद दिसायला लागेल, त्या दिवशी आपल्याला जाणवेल की, दुःख कदाचित तात्पुरतं असेल, पण ‘सुख’ हे खरोखरच पर्वताएवढं अथांग आणि विस्तीर्ण आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं एक गाणं आहे. पण खरोखरच सुख म्हणजे नक्की काय ते शब्दात सांगता येणं कठीण आहे कारण ती अनुभवण्याची गोष्ट असते.
चिनी आणि जपानी संस्कृतीतील एक सुंदर कल्पना आहे. ते लोक एकमेकांना शुभेच्छा देताना ” तुम्हाला सर्व सहाही सुखे प्राप्त होवोत ” असे म्हणतात. यातली पहिली पाच सुखे म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार आणि चांगली मुले ही आहेत. तर सहावे सुख म्हणजे वैयक्तिक गोष्ट आहे हे सुख प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असते ते ज्याचे त्याने शोधून काढावे लागते. असाच आपल्या जीवनातील आनंद देखील आपल्याला शोधता आला पाहिजे तेच आपले सहावे सुख असू शकेल!
☆ कोणत्याही सणांपेक्षा राष्ट्रीय सण सर्वात महत्त्वाचे… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
July, August महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••
असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••
महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••
देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, सांजोरया, पूरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••
प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••
याच बरोबर 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.
तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.
आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?
आपल्याच घरच उदाहरण घ्या… घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच ना.
घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.
कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच? हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायला, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. आपल्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलन आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.
जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील 140 करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा…
मग हाच विचार, हीच भावना, असच वागण,, ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही, तर दररोजचचच..
* अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत
**सारे जहां से अच्छा** आहे.
त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.
अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.
मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,… मी किंवा माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच बरोबर नाही.
* सिंदूर * operation च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.
परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••
हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो?? . म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.
ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?
कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••
देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असतात.
मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल. मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..
**ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।**
म्हणतात ना…
Your greatest weapon is your mind. Train it To make right decisions. To make right selectios. To make right choices.
पाटीवर सरस्वतीचे चिन्ह काढून तिची पूजा करून वरील प्रार्थना केली जाते व विद्यार्जनास सुरुवात केली जाते. सरस्वती ही विद्येची देवता आहे. वरील प्रार्थनेचा अर्थ असा आहे की सर्वांच्या सर्व कामना पूर्ण करणारी माता सरस्वती, मी तुला नमस्कार करते. मी आज विद्या ग्रहण करण्यास सुरुवात करत आहे. माझ्या या कार्यात तू मला सिद्धी दे.
ऋग्वेदात सरस्वती देवीला सर्वोत्तम मातृशक्ती, सर्वोत्तम देवी आणि सर्वोत्तम नदी असे म्हटले आहे. वैदिक काळात सरस्वती ही एक प्राचीन नदी होती. सरस्वती देवीला बुद्धी आणि ज्ञानाबरोबरच सर्व नद्या, झरे, वायु, ध्वनी व प्रवाहित जलांची अधिष्ठात्री देवी मानले जाते.
माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी व श्री पंचमी असे म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.
ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करायची ठरवले. त्यावेळी त्याला एका सहचराची मदत हवी होती. तो म्हणाला, मला खराखुरा जोडीदार हवा आहे. त्याने माझ्या कामात जोडीने मदत करायला हवी. शिवाय तो बुद्धिमान, शांत, विद्वान, विद्यासंपन्न, कलानिपुण आणि सुसंस्कृत असावा. त्याची स्वतःची जीभ आणि मन यावर त्याचा पूर्ण ताबा असावा. आणि अहो आश्चर्यम्! एक अत्यंत लावण्यवती स्त्री मधुर स्मित करत त्याच्यासमोर प्रगट झाली. ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या आगमनामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी तुला सरस्वती वाग्देवी आणि वाणी या नावांनी हाक मारेन. तू ज्ञानाचे आणि संवादाचे निधान आहेस. या तिन्ही नावांमधून तुझे हेच गुण प्रतीत होतात. इथून पुढे सर्वच राज्यसृष्टी ज्ञान, कला आणि वाणी यांची देवता म्हणून तुझे आराधना करेल. आणि उभयतांनी एकत्र बसून विश्व निर्मितीच्या कामाचा शुभारंभ केला.
ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वती. ती विद्येची, ज्ञानाची आणि कलेची देवता आहे. ती नेहमी शुभ्र वस्त्र धारण करते. तिच्या हातात नेहमी वीणा असते. ती नेहमी वीणावादन करताना दाखवली जाते. तिला वीणावादिनी असेच म्हणतात. तिच्या एका हातात जपमाला तर दुसऱ्या हातात एक ग्रंथ असतो. आणि तिच्या चेहऱ्यावर कायम मंद असे हसू आपल्याला दिसत असते. तिचे वाहन म्हणजे हंस. सरस्वती शांतीप्रिय देवता आहे. आपल्या भारतातच नव्हे तर इतर अनेक देशातही तिची पूजा केली जाते. तिला वाग्देवी असेही नाव आहे. वाग्देवी याचा अर्थ वाणीची देवता. सरस्वती बुद्धिमत्तेचं, ज्ञानाचं आणि विद्येचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक महान वक्ते, लेखक आणि विद्वान तिचे उपासक आहेत. ती नेहमी मितभाषिणी असते.
सरस्वती ही भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ देवता आहे. तिला वाणी, वाग्देवता, वागेश्वरी, शारदा, भारती, वीणापाणि, ब्रह्मी, विशाला, मेधा, कुटीला अशी ही नावे आहेत. ती ललित कलांची अधीष्ठात्री देवता आहे.
ती शुभ्रवर्ण, शुभ्र वस्त्रधारिणी, अलंकार विभूषित, चतुर्भुज, पुंडरीकमाला, वीणा व कमंडलू धारण करणारी आहे. पुस्तक व वीणा हे तिची प्रमुख आयुधे आहेत. तिच्या मूर्तीशिल्पातून कमळ, हंस, मोर इत्यादी वाहने दाखवली जातात. मात्र हंस आणि मोर ही तिची लाडकी वाहने आहेत. ती कमलासनात बसलेली असते.
ओम् श्री श्री महा सरस्वती देवी भगवती नमः
हा तिचा मंत्र आहे. सरस्वती वंदना खालील प्रमाणे आहे.
या कुंदेदुतुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता ||
या वीणावरदण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै: सदा वंदिता ||
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष्यजाड्यापहा ||
एक दिवस देवी सरस्वती सत्य लोकांमध्ये वीणा वादनात गुंग झाली होती. त्यावेळी असुरांनी तिच्याकडे असलेला ज्ञानाचा ग्रंथ चोरला आणि ते पृथ्वीवर पळाले. सरस्वती देखील त्यांच्या मागोमाग आली पण पृथ्वीतलावर पोचल्यावर तिच्या लक्षात आले, आपण इतर देवदेवतांप्रमाणे लढू शकत नाही. त्यासाठी लागणारी शस्त्रे आपल्याकडे नाहीत. आणि आपली ती क्षमताही नाही. त्यामुळे तिने स्वतःकडे असलेल्या शक्तीचा वापर केला. या असुरांचा नाश करण्यासाठी तिने एका खळाळत वहाणाऱ्या नदीचं रूप घेतलं. आणि आपल्या पाण्याच्या प्रवाहात या असुरांना बुडवून टाकलं. त्या प्रवाहाचा वेग पाहून असुर गर्भगळीत झाले. त्यांनी तो ग्रंथ नदीच्या काठी टाकला आणि सूंबाल्या ठोकला. तो ग्रंथ घेऊन तिनेही त्यांचा नाद सोडला. आता यानंतर तिने ब्रह्मलोकी परत जायची तयारी सुरू केली. पण त्या प्रदेशात रहाणाऱ्या महर्षींना, ऋषीमुनींना तिच्या आगमनाची वार्ता योगसामर्थ्यामुळे कळली. त्यांना तिच्या त्या ग्रंथाविषयी सुद्धा कळलं. ते सर्वजण ताबडतोब तिचे दर्शन घेण्यासाठी आले. तिथे त्यांना हातात ज्ञानाचे पुस्तक घेतलेल्या देवी सरस्वतीचं मूळ रूपात दर्शन झालं. त्यांनी तिची करुणा भाकली. माते, आम्ही अगतिक आहोत. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. तू आमच्या मदतीसाठी इथे पृथ्वीवरच वास्तव्य करून राहशील का? सरस्वती गूढ हास्य करत म्हणाली, मला गेलं पाहिजे. मला ब्रह्मदेवांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी जायलाच हवं. पण तुम्ही मनापासून प्रार्थना केलीत तर ती मला ऐकू येईल. मी इथून परत जाताना माझ्या शक्तीचा छोटाच प्रवाह इकडे सोडून जाईन. तो माझ्या नावाने सरस्वती नदी म्हणून येथे वहात राहील. ही नदी वहात जाऊन प्रयाग तीर्थक्षेत्रावर गंगा आणि यमुना या नद्यांना मिळून तिचा संगम होईल. आम्ही तीन नद्या त्या ठिकाणी भेटू. त्या ठिकाणाला प्रयागराज असे नाव असेल. त्यानंतर माझी ओळख नाहीशी होईल. तेव्हापासून सरस्वती नदी पृथ्वीवर वहात आहे.
… ही नदी काही भागात जमिनीखालून वहात असल्यामुळे तिला गुप्तगामिनी या नावाने ओळखण्यात येते. अशा या विद्येच्या देवतेला कोटी कोटी प्रणाम.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सेरेना विल्यम्स (वय ४४) यांनी अत्यंत शांतपणे आपली उरलेली संपूर्ण ५०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती—सर्व शेअर्स, मालमत्ता, दागिने, अगदी त्यांच्या २३ ग्रँड स्लॅम ट्रॉफीदेखील वितळवून जमा झालेली सर्व रक्कम – लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात बेघर आणि स्वतःचा कुठलाही विमा नसलेल्या लोकांसाठी १, २०० खाटांचे, संपूर्णपणे मोफत असे रुग्णालय उभारण्यासाठी निधी म्हणून वापरली आहे.
बांधकाम कामगार सांगतात की सेरेना गेल्या ११४ दिवसांपासून थेट साइटवरच तंबूत राहत आहेत — नंगेपाय, पहाटे ३ वाजता गाड्या ढकलत काम करत आहेत, आणि या दरम्यान त्या गर्भवतीही आहेत.
– – या रुग्णालयात सर्व काही कायमस्वरूपी १००% मोफत असेल.
– – आणखी विशेष म्हणजे या रुग्णालयासाठी MRI मशीन खरेदी करायचं म्हणून त्यांनी गेल्या आठवड्यात आपला फ्लोरिडातील भव्य बंगला विकला.
आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य फार थोड्यांकडे असतं. , जे सेरेना यांच्याकडे आहे. हे खरे आजचे आदर्श व्यक्तिमत्व… त्यांना मनापासून प्रणाम.
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “रु. १०० ची ‘ती’ नोट आणि बीएमडब्ल्यूची चावी” – लेखक : डॉ. सुजित भरत पाटील ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
रात्रीचे साडेअकरा.
शटर अर्ध्यावर खाली खेचलं होतं. डोळे जड झाले होते आणि दिवसभर पेशंट्स पाहून डोकं जड झालं होतं.
तितक्यात दारात एक सावली दिसली.
कपड्यांवरूनच ओळखू येत होतं—दिवसभर सिमेंट-विटा उचलून आलेला एक बांधकाम मजूर. अंगावरचा शर्ट घामाने चिकटलेला आणि पायातल्या चपलांना सिमेंटचा थर.
त्याच्या कडेवर दीड वर्षाचं पोरगं होतं, जे तापाने फणफणलं होतं.
तो आत आला, पण दारातच थबकला.
त्याची नजर माझ्या केबिनच्या चकाचक टाईल्सवर आणि काचेवर गेली. त्याने संकोचाने स्वतःच्या मळक्या चपला बाहेरच काढल्या आणि अनवाणी पायाने, कोपऱ्यात येऊन उभा राहिला.
त्याच्या मनातली ती भीती मला स्पष्ट दिसत होती, “आपल्यामुळे डॉक्टर साहेबांची केबिन खराब होईल का? “
मी खुणेनेच त्याला बोलावून घेतलं.
बाळाला तपासलं. छाती भरली होती. नशीब, वेळेवर आला होता म्हणून न्यूमोनियाचा धोका टळला होता.
मी औषधं लिहून दिली आणि पाठीवर हात फिरवून सांगितलं, “काळजी नको करू. वाघ आहे तुझा पोरगा. दोन दिवसात ठणठणीत होईल! “
त्याच्या चेहऱ्यावरचा जीवघेणा तणाव निवळला. त्याला वाटलं होतं, डॉक्टर ॲडमिट व्हायला सांगतील, हजारो रुपये लागतील.
त्याने थरथरत्या हाताने खिशातून एक प्लॅस्टिकची पिशवी काढली.
त्यातून जेमतेम एक १०० ची नोट बाहेर आली. घामाने ओलसर झालेली, मळकटलेली आणि शंभरदा हाताळल्यामुळे जीर्ण झालेली ती नोट.
फी पूर्ण भरत नव्हती.
त्याचा चेहरा पुन्हा पडला. ती हतबलता मला बघवली नाही.
मी त्याचा हात पकडला आणि नोट परत करत म्हटलं,
“अरे राहू दे बाबा. फी नको. तू फक्त बाळाला औषधं घे आणि चांगलं खायला घाल. “
त्यावर तो मजूर जे बोलला, त्याने माझ्या अंगावर काटा आला.
तो करारी आवाजात म्हणाला,
“नको साहेब. ही तुमची ‘विद्या’ हाय, आणि हे माझं कष्टाचं ‘दाम’ हाय. फुकट इलाज केला तर माझ्या लेकाला गुण नाही येणार. हे पैसे ठेवा, बाकीचे उद्या कामावरून सुटल्यावर आणून देतो. “
त्याने ती ‘चूरगळलेली शंभरची नोट’ माझ्या टेबलावरच्या पेपरवेटखाली दाबून ठेवली, हात जोडले आणि निघून गेला.
तो गेला… पण मला रात्रभर झोप लागली नाही.
सकाळीच माझ्याकडे एक सुटाबुटातले ‘सुशिक्षित’ गृहस्थ आले होते. ३०० रुपये फीसाठी त्यांनी रिसेप्शनवर १० मिनिटं हुज्जत घातली होती, “आम्ही जुने पेशंट आहोत, काहीतरी डिस्काऊंट द्यायला पाहिजे! “
जाताना त्यांनी खिशात आयफोन ठेवत, बीएमडब्ल्यूची (BMW) चावी फिरवत मला ‘बाय’ केलं होतं.
आणि इकडे हा मजूर?
ज्याला उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे, पण “डॉक्टरांच्या विद्येचा अपमान होऊ नये, ” म्हणून तो आपला घामाचा पैसा हक्काने देऊन गेला.
त्याला सवलत नको होती, त्याला ‘गुण’ हवा होता.
त्या रात्री मला समजलं…
खरी श्रीमंती तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा गाडीच्या ब्रँडमध्ये नसते,
ती तुमच्या ‘संस्कारांत’ असते.
त्या बापाने दिलेली ती ‘चूरगळलेली नोट’ माझ्यासाठी आजवरची सर्वात मोठी फी होती. कारण ते केवळ एक चलन नव्हतं, तर तो एका स्वाभिमानी बापाचा ‘आशीर्वाद’ होता.
☆
लेखक : डॉ. सुजित भरत पाटील
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सामंजस्य, समजूतदारपणा व साहचर्य हे जीवनाचे सूत्र आहे…
सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा ।
बिकट रूप धरी लंक जलावा ।
असाच हा निसर्ग… बजरंगबली
कणकण में है भगवान!
हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. जगात प्रत्येक जागी परमेश्वर भरलेला आहे हे नक्कीच पण त्याचा अनुभव तरी कसा घ्यायचा? म्हणजे त्यासाठी साधना करायला हवी, शिवाय अध्यात्मा विषयी आवड निर्माण व्हायला हवी आणि हे सगळे करायचे तर अध्यात्ममार्ग आहेच पण निसर्गाच्या अभ्यासाने व डोळसपणे अनुभवण्यानेही ते शक्य आहे.
आपल्या नजरेआड काय काय चालले आहे हे जर आपल्याला कळले तर आश्चर्य करून करूनच आपल्या ‘मी’ पणाचा अंत होऊ शकतो. आपल्या जगण्यासाठी निसर्ग किती बारकाईने कार्य करतो आहे हे लक्षात आले तर आपली बोलती बंद व्हायची वेळ येते.
सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो, खिशात मोबाईल वर रेडिओ चालू होता. सकाळी साडेसहा नंतर भक्ती संगीत थांबले आणि पुढे विज्ञान विषयक कार्यक्रम सुरू झाला. सूक्ष्मजीवांचे जग या विषयावर कार्यक्रम लागला नंतर पुढे सलग चार-पाच दिवस पाच-पाच मिनिटांचे त्या कार्यक्रमांचे भाग प्रसारित झाले.
दुरदर्शन वर देखील एका रविवारी सुक्ष्मजीव या विषयावर एक चित्रफीत प्रसारित झालेली पाहिली होती.
‘सामंजस्य – सहजीवन – साहचर्य’
हा विषय मनात आला आणि मला त्या कार्यक्रमांची आठवण झाली. मग काही थोडका अभ्यास केला, ऐकले आणि हा लेख लिहिण्याचे धाडस करत आहे.
न कळत, न बोलता हे सूक्ष्मजीव आपल्या जीवनात अनायास मिसळले गेले आहेत.
सुक्ष्म म्हणजे किती सुक्ष्म? तर त्यासाठी सेंटीमीटर चे ही एक हजार भाग (मायक्रोमिटर) करावे लागतील… व मोजायला लागेल. काही मायक्रोमिटर आकाराचे हे जीव.
खरं तर आपण सर्वजण सूक्ष्मजीवांच्या समुद्रातच राहत आहोत. ईश्वराची करणी अगाध आहे आणि त्या मध्ये एक करणी म्हणजे
सूक्ष्मजीव…
अगदी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहेत म्हणांना! …
अदिकालात म्हणजे पृथ्वीवर जीवन निर्मिती झाली त्या काळात ते होते, आजही ते भरून राहिले आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत ते राहतील यात शंका नाही.
सुक्ष्मजीव नाहीत तर जीवनही चालणार नाही. अक्षरशः हे पंचमहाभूतात सामावले आहेत. ईश्वर कणाकणातून त्यांच्या रूपाने जीवन साकारत आहे. अग्नी, जल, वायू, तेज आणि आकाश हे सर्व सर्व या धुळी कणांच्या पेक्षाही लहान जीवांनी व्यापलेले आहे. सुक्ष्मजीव नाहीत अशी एकही जागा नाही. मग ते आपल्या भोवती आहेत तसेच ते आपल्या आत देखील आहेत. प्रत्येक एका मानवी पेशी मागे दहा ते अकरा सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आहेत आहात कुठे?
जगातील सर्व लोकसंख्येच्या एवढे सुक्ष्मजीव फक्त आपल्या तोंडात असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. असे हे सूक्ष्मजीवांचे आगळे वेगळे जग आपल्या नजरेआड कार्यरत आहे. खरं तर आपण त्यांना साध्या डोळ्यांनी पाहूच शकत नाही. ढोबळमानाने या सुक्ष्मजीवांच्या जगाचे पाच गट करता येतात. एक म्हणजे बॅक्टेरिया किंवा जिवाणू जे मातीची सुपकता आणि अन्न निर्मिती करतात. दुसरे म्हणजे कवके किंवा बुरशी जी अन्य जीवांवर अवलंबून आहे. शेवाळ ही तिसरी अवस्था जी स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करते. चौथे आहे प्रोटोझोवा म्हणजे अमिबा सारखे जीव जे जीव एकपेशीय असतात. आणि शेवटी पाचवा म्हणजे विषाणू आजच्या भाषेत ज्याला व्हायरस असे संबोधले जाते जे योग्य वातावरण मिळताच सक्रिय होतात, वाढतात व रोग निर्माण करतात. हे जनुकीय संशोधनातही वापरले जातात…
अमुक एक साबण वापरला आणि सूक्ष्मजीवांचा 99% पर्यंत नाश झाला व अमुक एका तासांसाठी आपण सुरक्षित झालो, अमुक एक फिनेल वापरले आणि आपले घर सूक्ष्मजंतू विरहित झाले अशा जाहिराती आपण बघितल्या असतील हे बघायला खूप छान आहे. पण खरेच सगळे सूक्ष्मजीव शत्रू आहेत का? धोकादायक आहेत का? हेच शोधायला पाहिजे सूक्ष्मजीव जसे त्रासदायक आहेत तसेच किंवा त्यापेक्षाही कधीतरी प्रमाणात आपल्यासाठी उपकारक आहेत हेच खरे. उलट शत्रू सुक्ष्मजीवांना मारता मारता प्रत्येक मानवाच्या जगण्यासाठी स्वतःचे सर्वस्व, प्रसंगी प्राणही हे मित्र सूक्ष्मजीव अर्पण करतात असे आढळले आहे. यांना जर आपण कायमस्वरूपी नष्ट केले किंवा करू शकलो तर पृथ्वीवर जीवनही चालणार नाही.
आपल्या शरीरात त्वचेच्या आवरणात अनेक थर आहेत. त्या त्वचेच्या थरातील सर्वात वरचा थर फक्त सूक्ष्मजीवांनी निर्माण झाला आहे…
आपल्या त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राखण्याची जबाबदारी हे जीव घेतात. त्वचेवर तेलासारखा एक स्त्राव सोडून आपली त्वचा तुकतुकीत बनवतात. आपल्या देहाला तेज देतात… त्वचा दिसताच आपल्याला सहाय्य करणारे हे जीव त्वचेवर मुक्कामाला येतात व आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या शत्रू सूक्ष्म जीवांना विषाणूंना ते रोखतात. या त्यांच्या वृत्तीने अनायास आपल्या शरीराचेही संरक्षण होते हीच कथा बाकी सर्व अवयवांच्या आतील सूक्ष्मजीवांची आहे.
सूक्ष्म जीवांच्या या अभ्यासाने औषधे ही कल्पनाही बदलली गेली. मित्र सूक्ष्मजीवांचे पोषण व शत्रू सूक्ष्मजीवांचा नाश अथवा प्रतिबंध हेच सूत्र वापरून औषधोपचारांचे नियोजन केले जाते. क्वचित प्रसंगी जिवंत सूक्ष्मजीव औषधाच्या रूपात आपल्या शरीरात पोचवले जातात. सूक्ष्म शत्रू जीव नष्ट करतानाच मित्र सूक्ष्मजीवांचा ही नकळत नाश होत असतो… त्यांची भरपाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात.
पु ल देशपांडे यांच्या ‘म्हैस’ या कथेत येते त्याप्रमाणे
“एका कोंबडींस तीन तांस तर म्हशीस कितीं? झंम्प्या! मोज बोटे…! “
या चालीवर
“आपल्या तोंडात जगाच्या लोकसंख्ये एवढे सुक्ष्मजीव तर पूर्ण शरीरात किती? झंप्या! मोज बोटे! “
असे म्हणावेसे वाटते.
मिलियन, बिलियन, ट्रिलियन या संख्या तर कुठेच नाहीत गणिताच्या कुठेतरी पलीकडे जावे लागेल तेव्हा या सूक्ष्मजीवांची संख्या लिहिता येईल आणि हा लेख म्हणजे एखाद्या अंकावर असंख्य शून्यच लिहायला लागतील. हा लेख मनोरंजक न राहता कंटाळवाणा व आकडेमोडीची कसरतच ठरेल, तेव्हा त्यात न पडणे कधीही श्रेयस्कर…
मानवी देहाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे वजन सूक्ष्मजीवांचे असते. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर 70 किलो वजनाच्या एखादा माणसामध्ये सात किलो वजन सूक्ष्मजीवांचे असायची शक्यता आहे…
अन्नपचन करताना पोटात अनेक सूक्ष्मजीव अन्नपचनासाठी लागणारी रसायने- स्त्राव निर्माण करतात जी मानवी शरीराला अत्यंत उपयुक्त असतात अशी रसायने स्त्राव निर्माण करणे हे मानवी पेशींना शक्यच नाही. केवळ सूक्ष्मजीवच आहेत त्यामुळे आपल्याला अन्न पचू शकते. अन्नाची गरज निर्माण झाली की सूक्ष्मजीव काही विशिष्ट रसायने निर्माण करतात व आपल्या पोटात भुकेची जाणीव निर्माण होते व मेंदूपर्यंत संदेश पोहोचवला जातो आणि मग मेंदू अन्नाची मागणी करतो… वेगळ्या अर्थाने भूक ही भावना निर्माण करण्यात सूक्ष्मजीवांचाच वाटा आहे…
शेतीमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणात मोठ्या प्रमाणात असलेला नायट्रोजन वायू जमिनीत स्थिर करण्याचे मोठे काम केवळ सूक्ष्मजीवांमुळेच शक्य झाले आहे. सर्वच वनस्पती जग हे सूक्ष्मजीवांवरती अवलंबून आहे. सर्वच जीवांमध्ये सूक्ष्मजीव त्यांचे जगणे सुलभ करत आहेत…
शेतीमध्ये लागणारी अनेक प्रकारची खते ही देखील सूक्ष्मजीवांचीच देणगी आहे.
कचरा समस्या ही जागतिक डोकेदुखी ठरली आहे पृथ्वीवर अनेक नष्ट होणाऱ्या पदार्थांचे विघटन करून तो पदार्थ मूळ अवस्थेत माती व वायूत परिवर्तीत करण्यासाठी सूक्ष्मजीवच कार्यरत असतात.
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरा या चालीवर जनन, पोषण आणि मरण किंवा नाश या गोष्टी सूक्ष्म जीवांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने शक्य झाल्या आहेत.
स्वयंपाक घरात सुद्धा दुधाचे दही, ताक, तूप यामध्ये रूपांतर होणे, डोसे, इडल्या, केक करणे, कणिक फुगवणे इत्यादी गोष्टी असोत हे देखील सूक्ष्मजीवांचेच कर्तृत्व आहे.
पृथ्वीवर मद्य निर्माण करण्याचे कार्य देखील सूक्ष्मजीवांचेच हं ते नाहीत तर वाईन, बिअर देखील नाही.
लोणची पापड व टिकणारे अनेक पदार्थ निर्माण करताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते.
अनेक उद्योगात तर सूक्ष्मजीवच काम करतात. अशा उद्योगात सूक्ष्म जीवांचा अभ्यास व वापर करून गोपनीय फॉर्म्युले तयार केले जातात व अशा फॉर्म्युल्यांमूळेच अनेक उद्योग भरभराटीला आले आहेत.
पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यात देखील सूक्ष्मजीवांचे मोठे योगदान आहे
आपल्या ऋषीमुनींनी सूक्ष्म जगताचा खूप अभ्यास केलेला दिसतो व त्यांना जाणलेले दिसते. भगवान महावीरांनी देखील सूक्ष्मजीवांवर मोठे चिंतन केले आहे. जैन तत्वज्ञानात सूक्ष्मजीवांचा खूप बारकाईने विचार केलेला आढळतो
आतापर्यंत फक्त 20% एवढे संशोधन सूक्ष्मजीवांवर झाले आहे. अजून 80 % संशोधन होणे बाकी आहे. तेव्हा नवयुवकहो आपल्याला विद्या क्षेत्र देखील सूक्ष्मजीवांनी उपलब्ध करून दिले आहे.
त्यांच्यातील रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आकाश हीच मर्यादा ठरेल!
कणाकणात वसलेला हा परमात्मा आपल्या सामान्य दृष्टीला दिसत नाही. त्यासाठी तेवढीच सूक्ष्म दृष्टी आणि प्रज्ञेची दिव्यदृष्टी असण्याची गरज आहे.
आपल्याला वाटते ‘आपण जगतो आहोत’ पण बघा ना आपल्याला हे सूक्ष्मजीव जगवत आहेत.
आपल्याला वाटते ‘आपले अन्न आपण निर्माण करतो’ पण ते अन्न निर्माण करण्यात सूक्ष्मजीवच मोठा वाटा उचलत आहेत.
आपला श्वास देखील सूक्ष्मजीवांमुळेच शक्य आहे…
बघा करोनाकडे… ज्याने आपले जीवन धोक्यात आणले होते म्हणजे आपल्या जीवाला धोका निर्माण करणारे हेच ते जग…
सूक्ष्मजीव त्रासदायक असतीलही पण त्यापेक्षा ते कितीतरी मोठ्या प्रमाणात मानवी जीवनास सहाय्यक आहेत हेच खरे…!
उलट शत्रू सूक्ष्मजीवांना मारता मारता एकेका मानवाच्या जीवनासाठी, जगण्यासाठी प्रसंगी स्वतःचे सर्वस्व आणि कधीकधी आपले प्राण देखील अर्पण करतात. आपल्याला आयुष्य मिळावे म्हणून कोट्यवधी सुक्ष्मजीव त्यांचे जीवन वेचतात…
तेव्हा
हे मानवा आता तरी जागा हो! आपला अहंकार सोड! निसर्गाला शरण जा! सकारात्मक जग… आणि सर्वांना सकारात्मक जगू देत.
☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
दुपार कलत आली तशी त्या गावच्या जत्रेसाठी जमलेली गर्दी पांगायला लागली… ‘किसनपूर’ म्हणजे कृष्णपूर हे त्या पंचक्रोशीतलं त्यातल्या त्यात मोठं गाव. या गावात मुरलीधराचं एक बरंच जुनं आणि मोठं देऊळ होतं. दरवर्षी तिथे गोकुळ अष्टमीचा उत्सव दणक्यात साजरा केला जायचा. आणि त्यावेळी भरणाऱ्या जत्रेसाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. खूप गर्दी जमायची… जी दरवर्षी वाढतच होती. त्या देवळात संध्याकाळी कीर्तन होणे हा उत्सवाचा अविभाज्य भाग झाला होता. नारायणबुवा नावाचे एक प्रतिष्ठित कीर्तनकार जणू यासाठीच बऱ्याच वर्षांपासून नेमलेलेच होते. गावात जागोजागी तसे बोर्डही टांगले जायचे.
यावर्षीही सगळं काही रीतीनुसार सुरु होतं. गर्दी कमी झाल्यावर आत्ता कुठे लोकांचं त्या कीर्तनाच्या बोर्डाकडे लक्ष जायला लागलं…आणि लोक आश्चर्यचकित होऊ लागले. यंदा नारायणबुवांच्या जागी हे कुठलं नाव आहे… ‘राजेंद्रबुवा? ’.. आणि शेजारी एका तरण्याबांड कीर्तनकाराचा फोटो? कधी नव्हे ते कीर्तन ऐकण्याची उत्सुकता वाढल्याचं जाणवायला लागलं होतं.
देवळाच्या प्रशस्त सभामंडपाकडे आता श्रोत्यांची पावलं वळू लागली. चक्क गर्दी जाणवायला लागली. हमखास येणारी वृध्द माणसं तर होतीच, पण यंदा चक्क काही तरुण मंडळी कीर्तन ऐकायला (की राजेंद्रबुवांना बघायला?) तिथे आली होती.
ठरल्यावेळी साथीदार आले आणि राजेंद्रबुवा कीर्तनकाराच्या टिपिकल वेषात तिथे दाखल झाले… ‘‘आयला हा बुबा टी शर्ट-जीन्स मध्ये काय फाकडू दिसेल राव ”… गण्या न राहवून बोललाच, पण मित्राने चिमटा काढला आणि गण्या गप्प बसला.
‘‘जय जय राम कृष्ण हरी…” गाभाऱ्यातल्या मुरलीधराला आणि श्रोत्यांना नमस्कार करुन बुवांनी जयघोष सुरु केला… ठेका सुरू झाला… पुढच्या रांगेतली मुंडासी डोलायला लागली… पण १० मिनिटे झाली तरी बुवांचा जयघोष काही थांबेनाच… गण्या आणि कंपनी वैतागली आणि त्यांनी बुवांना खूण केली. बुवाही नाही म्हटलं तरी घाबरलेलेच होते… ‘कीर्तन शिकलो खरा आजोबांच्या हट्टापायी… पण आता एवढ्या लोकांसमोर…’ चतुर गण्याने त्यांची अवस्था नेमकी टिपली आणि ‘हं… करा सुरू…’ असं खुणेनेच सांगितलं… त्यांना त्यांच्या गुरुने परवानगी दिल्याच्या आविर्भावात..
‘‘तर मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळीच कथा सांगणार आहे… ऐका हं… एक आटपाट नगर होतं…”..
.. ‘आता यात काय वेगळं आहे? ’ गण्याचा चेहेराच बोलला.
‘‘एव्हाना त्या नगराचं एक राज्य झालं होतं…” राजेंद्रबुवाही गण्याच्याच वयाचे… ‘‘त्या राज्याचा राजा ‘आदर्श’ म्हणावा असाच… प्रजेसाठी जणू देवच. राणी सरकारही तशाच… प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या… कनवाळू उदार… त्यांना एक मुलगा होता… देखणा… उमदा… पण खुशालचेंडू म्हणावा असा… ‘जय जय रामकृष्ण हरी’ …” पुन्हा २ मिनिटं जयघोष…
‘‘मग पुढे…? ” गण्याला काही गप्प बसवत नव्हतं.
‘‘तर मंडळी असं सगळं उत्तम चाललेलं होतं ते राज्य… दिवसागणिक लौकिक वाढत होता. आणि अचानक एक दिवस… ” बुवांच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलले… अभिनय हा त्यांच्या पेशाचा एक अविभाज्य भाग होता ना… ‘‘मंडळी आणि अचानक एक दिवस अतिशय दु:खद बातमी हा हा म्हणता राज्यभर पसरली… राणीसाहेबांचे आकस्मिक देहावसान झाल्याची बातमी… आणि संपूर्ण राज्यावर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला… ‘जय जय रामकृष्ण हरी’ ”
…. ‘हां इथे हे ठीक आहे’… गण्याने मान हलवली. श्रोतेही जरासे हळहळले…. ‘ पण आता पुढे बोला की बुवा…’.. गण्याने बुवांना खुणावलं. बुवांनाही एव्हाना सावरायला वेळ मिळाला होता…
‘‘त्यावेळी सगळ्यांवर काय परिस्थिती ओढवली होती ते काय सांगावं महाराजा … सगळं राज्य जणू आईविना पोरकं झालं होतं”… या वाक्याने मात्र गण्या जरा दुखावला होता… गप्प बसला… ‘‘ अहो राजेसाहेब विमनस्क अवस्थेत तास न् तास शून्यात बघत बसत होते. पण असं किती दिवस चालणार हो… राज्यकारभाराचा गाडा चालू ठेवायलाच हवा हे त्यांनाही कळत होतं. त्यांनी स्वत:ला कसंबसं सावरलं. राजपुत्रही एव्हाना सावरले होते. हळूहळू सगळं काही पूर्ववत झालं… ‘जय जय रामकृष्ण हरी’…” पुन्हा ठेका धरला गेला. बुवा नव्या कोऱ्या उपरण्याने घाम पुसत होते… गण्या उठण्याच्या बेतात होता… बुवांनी त्याला खुणेनेच बसायला सांगितलं आणि पुन्हा कथा सांगायला सुरूवात केली… ‘‘अहो काळ काही थांबतो का कुणासाठी? सांगा बरं…” बऱ्याच माना हलल्या… ‘‘आता राज्याला साम्राज्ञी हवीच, म्हणून राजेसाहेबांनी इतरांच्या आग्रहाखातर पुनर्विवाह करायला संमती दर्शविली… आणि वधू-संशोधन सुरू झाले…”.. ’पुन्हा जय जय राम कृष्ण हरी…’
पुढची कथा बुवांना आठवत नाहीये हे चाणाक्ष गण्याच्या लक्षात आलं… तो घाईने उठून बुवांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला… ‘‘तुम्ही दमलेले दिसता बुवा… साहजिकच आहे म्हणा… इतका वेळ सारखं बोलल्यावर दम लागणारच हो. मी तुम्हाला मदत करू का? म्हणजे कथा मी सांगतो, तुम्ही मधून मधून ‘राम कृष्ण हरी’ म्हणा…” आणि बुवांनी काही बोलायच्या आत गण्या बोलायला लागला…..
‘‘तर मंडळी आता तुम्हीच सांगा… आता राजेसाहेब वयाने इतके मोठे… म्हणजे राजपुत्र खरं तर लग्नाच्या वयाचा… मग त्यांच्या वयाला साजेशी बायको कशी मिळणार नाही का त्यांना? … म्हणजे तो काळ खूप वेगळा होता ना हो? म्हणून मग त्यांच्या आप्तांनी आणि मंत्रीमंडळानेही पुढाकार घेतला. राजघराण्यातली त्या वयाची वधू मिळणं शक्यच नव्हतं आणि एखादी तरुण राजकुमारी या म्हाताऱ्याशी…” गण्याने जीभ चावली… ‘‘अशा इतक्या वयस्कर राजेसाहेबांशी लग्न करायला कशी तयार होणार ना? आणि मी म्हणतो का म्हणून तयार व्हावं तिने? ” … बुवांनी गण्याला चिमटा काढला आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’.. मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. गण्याने स्वत:चा आवेग कसाबसा थोपवला आणि तो पुढे बोलायला लागला…
‘‘मग जवळच्याच गावातल्या एका गरीब माणसाची मुलगी सापडली. चांगली तरतरीत, नाकी डोळी नीटस होती, आणि हो, थोडीफार शिकलेलीही होती. नीट टापटीप रहाण्याची आवड उपजतच असावी हे लक्षात येत होतं. आणि बोलायलाही चटपटीत होती. भेटायला आलेल्या बड्या लोकांशी न घाबरता डोळ्याला डोळे भिडवून बोलत होती. अखेर वडलांना कर्जातून मुक्त करायचं या कर्तव्यभावनेने नाईलाजानेच लग्नाला होकार दिला त्या बिचारीने ”… गण्याचा घाम पुसून होईपर्यंत बुवा ‘रामकृष्ण हरी’ म्हणत राहिले. ‘आता पुढे मी सांगतो’, ते गण्याला म्हणाले, पण गण्यामधे उफाळून आलेला कथाकार काही थांबायला तयार नव्हता…
‘‘तर मंडळी, अशा तऱ्हेने राजेसाहेबांसाठी दुसरी वधू मिळाली. लग्नाचा दिवस ठरला… भव्य शामियाना… सुंदर सजावट… मोठा रंगमंच…” (‘रंगमंच? ’… श्रोत्यांमध्ये कुजबूज झाली…) पण गण्या थांबला नाही… ‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.
तर मग दे नां मला हंडाभर उत्साहाचं वाण आणि सामर्थ्याचं दान.
— सुखस्वप्नांच्या पायघड्यांवरून चालतांना जोडीदाराची आणि तिच्या कोमल हाताची साथ मला लागेलचं नां! . सुखदुःखात मला तुझीही साथ हवी आहे.
— सरला भूतकाळ सरलं आयुष्य. डोकावतयं वार्धक्य, आता अजून एक मागणं…
चालायला धडधाकट हातपाय हवेत. तसंच बोलतांना खातांना जिभेवर ताबा हा हवाच. मनाचं उधळणारं घोडं आवरायला स्थितप्रज्ञतेचा लगाम देशील नां?
— दुःखाचे कढ जिरवण्यासाठी ओठांवर विलसणारं हंसू दे. लहानपणी दिलंस ना अगदी तसंच बोळक्यातलं निरागस हसू परत द्यायला विसरू नकोस रे बाबा! आतां आयुष्यात तेवढच सुख आणि विरंगुळा आहे.
— बऱ्या वाईट कर्मांचा हिशोब तुझ्यापुढे मांडल्यावर तुझ्या कृपेचं, आरोग्याचे दान पदरात पाडून घ्यायचं आहे,
— अरे देवा! तू अगदी मुक्तहस्ताने, भरभरून देशीलच रे! पण माझीच झोळी फाटकी, अपुरी आहे. पण ऐक ना! मी ती आनंदाच्या तुझ्या नामस्मरणाच्या पवित्र धाग्यांनी भरभक्कम शिवलीय.
— मग टाकतोस ना माझ्या झोळीत तुझ्या कृपेचं, आशीर्वादाचं दान?
बार्गेनिंग हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. बार्गेनिंग मुळे खरंच आपल्याला पैसे कमी मोजावे लागतात का! , का, दुकानदार आधीच तेवढी वरची किंमत सांगतो आणि बार्गेनिंग नि आपल्याला मूळ किमतीवर आणतो, हे कुणीतरी दुकानदारच सांगू शकेल.
रस्त्यावरच्या दुकानात तर सगळेच बार्गेनिंग करतात. सोन्याचांदीच्या दुकानात पण थोडेफार बार्गेनिंग चालतेच. काही जणांना, मी बाटा सारख्या दुकानात पण बार्गेनिंग करतांना पाहिले आहे.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सकाळी सकाळी एका मित्राचा फोन आला. त्याला नवीन स्कुटर घ्यायची होती. चांगली किंमत मिळाली, म्हणून त्यानी आधीची गाडी विकली होती. नवीन गाडीचे मॉडेल वगैरे ठरले होते.
मला म्हणाला – माझ्याबरोबर दुकानात चल, काही बार्गेनिंग जमलं, तर तेवढीच किंमत कमी होईल. तुला बार्गेनिंग टेक्निक छान जमते
मी म्हटलं – अरे स्कुटर च्या किमतीत, मी काय बार्गेनिंग करणार?
मित्र म्हणाला – अरे चल तर, दुकानात गेल्यावर तुला बार्गेनिंग बरोब्बर सुचेल. गाडीची किंमत ५६-५७ हजार आहे. येन – केन २ – ४- ५ हजार कमी झाले, तर तेवढेच पैसे वाचले. “इच्छा असेल तर मार्ग सापडतो” अशी म्हण आहे.
आम्ही ठरवून दुकानात गेलो. गाडी बघितली. टेस्ट राईड घेतली. सेल्समन नी ‘ऑन रोड किंमत’ सांगितली. रु ५६, २५०/-.
मित्रानी डिस्काउंट बद्दल विचारले. संध्या काहीही डिस्काउंट नाही असे त्यांनी सांगितले. या १ तारखेला किमती वाढणार आहेत. आत्ता ३० च्या आत बुक करा, आणि या लोएस्ट किमतीला गाडी उचला.
म्हणजे बार्गेनिंग ला काहीच वाव नव्हता. किंमत खाली कशी आणता येईल? याचे मला उत्तर सापडत नव्हते. म्हणजे “इच्छा असेल तर मार्ग सापडतो” या म्हणीला काहीच अर्थ नाही का? असे मनात म्हणत मी वर बघितले, आणि मला मार्ग सापडला.
मी (मित्राला) : तू इतकी वर्ष गाडी चालवतो आहेस. पण वळताना तू कधीही साईड इंडिकेटर देत नाहीस, मग ते घेतले नाही, तर काय हरकत आहे!
(मित्राला काहीच अर्थबोध झाला नाही)
मी (मित्राला) : तुला गाडीच्या वजनामुळे, गाडी मेन स्टॅन्ड ला लावता येत नाही. तू साईड स्टॅन्ड वापरतो. मेन स्टॅन्ड शिवाय गाडी घेतली तर काय हरकत आहे?
आणि मी मित्राला एक एक प्रश्न विचारात गेलो…
तू रात्री स्कूटर कधीच चालवत नाही, आणि गावात गाडी चालवतांना, हेड लाईट आपण डीपर वरचं ठेवतो. अपर कधीच वापरत नाही. मग आपण एकच डिपर दिवा घेतला तर काय हरकत आहे!
तुझ्या गाडीचे मागचे बघण्याचे आरसे कुठल्याही दिशेला फिरलेले असतात. आणि तसे पण त्या आरशातून मागचे कुणीच कधी बघत नाही. लेडीज ना हा आरसा लागतो – थोड्या थोड्या वेळानी आपल्या चेहेऱ्यावरचा मेक – अप बघायला. तुला तर आता भांग पाडायला केस पण नाहीत! मग ते आरसे पण काढून टाकले तर काय हरकत आहे!
गाडी बरोबर टूल बॉक्स येते. ती पण घेऊ नको. आधीच्या गाडीची असेलच!
आपल्या रस्त्याकरता ट्यूब वाली टायर बरी पडतात. आपण ट्यूब लेस टायर घेतो आणि केंव्हातरी समोरच्या चाकात हवा कमी वाटते म्हणून दुकानात गाडी नेतो. दुकानदार म्हणतो, साहेब आठ पंचर आहेत. ८०० रु होतील. ट्युब टाकू का? , ३०० रु ची? आपण मनात वजाबाकी करतो, आणि फायदा दिसल्यावर, म्हणतो ‘ठीक है, ट्युब डालो, लेकिन अच्छे कंपनीवाला डालो’. मग, आताच ट्युबलेस च्या ऐवजी ट्युब वाले टायर घ्यायला काय हरकत आहे? किंमतीत बऱ्यापैकी फरक असतो.
नुकताच आपल्याकडे ‘नो हॉर्न’ डे साजरा झाला. परदेशासारखी आपल्याकडे पण हॉर्न वर बंदी येणार, हे नक्की. सध्या रस्त्यावर उलटीकडून गाडी आणली, तर दंड होतो. आज -ना- उद्या हॉर्न वाजवला, तरी दंड सुरु होईल. त्यापेक्षा हॉर्न काढूनच टाकला तर काय हरकत आहे.
या गाडीला मोबाईल चार्जर आहे. गाडी चालवतांना फोनवर बोलणं तुझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे तू तो कधीच वापरणार नाही. तो पण काढून टाकू.
या गाडीत स्पीडोमीटर आणि पेट्रोल चे गेज वेगळे वेगळे आहेत. तू गावामध्येच गाडी वापरणार आणि तुझा स्पीड मी २० – ३० च्या वर मी कधीच बघितला नाही. तुझ्या मागून रोड – रोलर आला, तरी तू त्याला हातानी खूण करून, पुढे जा असे सुचवतो. तुला स्पीड, २० आहे, कां २५ आहे, कां ३० आहे, याच्याशी काहीच देणेघेणे नसते. मग हे बघायला स्पीडोमीटर ची काय गरज आहे. त्यांना हे सगळे पार्टस काढून टाकायला सांग आणि सांग की हे सगळे नवीनच आहेत, ते स्पेअर पार्ट म्हणून विका.
मित्र : तुझे सगळेच पॉईंट पटण्यासारखे आहेत. संध्याची गाडी मी साधारण ३ वर्ष वापरतो होतो. पण वळताना साईड इंडिकेटर मी कधीच दिला नाही. आपल्याकडे इंडिकेटर देऊन वळणारी माणसं बोटावर मोजण्याइतकीच असतील. आपल्या समोरच्या गाडीचा डावा इंडिकेटर सुरु दिसतो, म्हणूनआपण गाडी उजव्या बाजूला घेतो आणि समोरचा उजवीकडेच वळतो. काही वेळा समोरच्या गाडीचा उजवा इंडिकेटर सुरु असतो आणि मागे बसलेल्या मॅडम डावीकडे हात दाखवत असतात. काही जणांचा डावा इंडिकेटर कायमच सुरु असतो. त्यामुळे, समोरचा आता डावीकडे वळणार – का वळणारच नाही – का उजवीकडे वळणार, याचा अंदाज लावूनच, मागच्यांनी गाडी चालवायची असते. त्यामुळे साईड इंडिकेटर नाही घेतले तरी चालण्यासारखे आहे.
गाडीच्या वजनामुळे मेन स्टॅन्ड वर गाडी लावायला मला कधीच जमले नाही. पूर्वी बजाज – लॅम्ब्रेटा या गाड्या असतांना, साईड स्टॅन्ड चा शोध लागला नव्हता. त्यामुळे मेन स्टॅन्ड वर गाडी लावतांना दमछाक व्हायची, पण पर्यायच नव्हता. आता साईड स्टॅन्ड सोयीचे आहेत, मेन स्टॅन्ड नाही घेतला तरी चालेल.
साईड च्या आरशातून मी मागचे कधीच बघितले नाही. रस्त्यावरचे खड्डे, उंचवटे, स्पीड ब्रेकर, कुठूनही येणाऱ्या गाड्या, कसाही रस्ता क्रॉस करणारी माणसं आणि इतर अडचणी बघता बघता मुश्किल होते, त्यात मागचे कधी बघू? मागच्या आरशांची खरंतर आपल्याकडे काहीच गरज नाही.
गाडीच्या हेड लाईटचे अपर – डिपर चे बटन तर मी कधीच खाली – वर केले नाही. रस्त्यावर, इतर पण कुणी अपर – डिपर वापरत नाही. बहुतेक गाड्यांचे कायमच अपर चे बटन सुरु असते आणि त्यांचे हेड लाईट समोरच्यांच्या डोळ्यावर अंधारी आणत असतात. काही जणांना तर अपर – डीपर हा काय प्रकार आहे, हे पण माहितच नसते. गाडी विकत घेताना जी पोझिशन असते तीच कायम असते
गाडीच्या स्पीडोमीटर वर गाडीचा वेग दिसतो, पण तो बघून आपण करायचे काहीच नसते. बर, स्पीडोमीटर बिघडला, तर आपण तातडीने कधीच तो दुरुस्त पण करत नाही. मग तो असला काय, अन नसला काय!
गाडीबरोबर मिळालेली टूल्स ची पिशवी कधीच मी उघडली नाही / आत काय काय आहे, हे पण मला सांगता येणार नाही.
बरं, गाडीला स्पीडोमीटर नाही, किंवा आरसा नाही, म्हणून पोलिसांनी कुणाला पकडल्याचे पण बघितले नाही.
मित्र : या गोष्टींची गरज नाही, हे बरोबर आहे. तेवढंच गाडीचं वजन कमी होईल – एव्हरेज पण वाढेल. पण नवीन गाडीत हे कमी कसे करणार? आतापर्यंत असं कुणी विचारलं पण नसेल!
मी : आपण त्यांना हे पार्टस काढायला सांगायचे. हे सगळे कमी केले, तर ५ – ६ हजार च्या आसपास किंमत कमी होईल आणि त्यावरचा १८ टक्के जीएसटी पण कमी होईल. सेल्समन ला हे सगळे सांग.
मित्राला हे एकदम पटले, त्यानी सेल्समनला हे सगळे सांगितले आणि किंमत कमी करायला सांगितली. सेल्समनला हा प्रकार कल्पनेच्या बाहेरचा होता. मित्र म्हणाला, जी गोष्ट मी वापरणार नाही, ती मी कशाला घेऊ. तुम्ही हे पार्टस स्पेअर पार्ट मध्ये विका.
सेल्समन म्हणाला, मी मॅनेजरना विचारून येतो. मित्र म्हणाला – त्यांना सांगा, मंजूर असेल तर आताच गाडी बुक करतो.
सेल्समनला मित्राचे म्हणणे मनातून पटले होते, की, जे वापरायचेच नाही, ते घ्यायचेच कशाला. गाड्या विकण्याचे टार्गेट सेल्समन ला पूर्ण करायचे होते, आणि त्याचा मॅनेजर ला पण. सेल्समन आत गेले आणि मॅनेजर ना घेऊनच बाहेर आले.
मॅनेजर : तुम्ही म्हणता तसे आम्ही पार्ट काढून घेऊ. आम्ही ते स्पेअर पार्ट म्हणून विकू, आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला साईड इंडिकेटर पूर्ण काढता येणार नाही, पण आम्ही आतला बल्ब काढून घेऊ. हेड लाईट मध्ये अपर – डीपर करता डबल फिलॅमेंट चा बल्ब असतो. त्यामुळे तो बल्ब पूर्णच काढावा लागेल. पण आमच्या वर्कशॉप मधला एखादा एक फिलॅमेंट गेलेला बल्ब तिथे लावून देऊ, आणि त्याचे पैसे घेणार नाही. गाडीचे आरसे आम्ही काढून घेऊ, वर्कशॉप मध्ये काही जुन्या डिझाईनचे आरसे पडून आहेत, ते तुमच्या गाडीला लावून देऊ फ्री मध्ये. गाडीचे स्पीडोमीटर/ केबल काढून घेऊ आणि वर्कशॉप मधले एखादे बिघडलेले तिथे लावून देऊ.
मॅनेजर नि कॅल्क्युलेटर बाहेर काढला आणि मित्रासमोर धरला आणि बऱ्याच बेरजा – गुणाकार केले.
मॅनेजर : सर, सगळे मिळून टॅक्ससकट ६२५० कमी होतील. म्हणजे उरलेले ५०००० भरा, आणि गाडी घेऊन जा.
मित्रानी डील फायनल केले.
मित्र : गाडी घ्यायला किती दिवसांनी येऊ.
मॅनेजर : सर, आता दिवसांचा जमाना गेला. पैसे भरा, गाडी पसंत करा. नको असलेले पार्ट्स काढण्याकरता आम्हाला अर्धा पाऊण तास द्या, आणि लगेच टेम्पररी नंबरप्लेट लावून गाडी घेऊन जा.
मी (मित्राला) : अरे, तुझ्या मोबाईलवर गुगल पे ऍप आहे ना. लगेच पैसे ट्रान्सफर कर, गाडी घेऊनच जाऊ.
पेमेंट झाले, किंमत कमी करण्याची एकदम आगळी – वेगळी आयडिया दिल्याबद्दल मॅनेजर नी मित्राचे आभार मानले.
मित्रानी माझ्याकडे वळून मॅनेजरना सांगितले की यांचे आभार माना, आयडिया यांची आहे.
मॅनेजर माझ्याकडे बघून : सर तुमची आयडिया एकदम भन्नाट आहे. इतर मित्रांना पण गाडी घ्यायला घेऊन या, त्यांना पण किंमत कमी करून देऊ. धन्यवाद
मॅनेजर बरोबर आमचा छान चहा झाला. तोपर्यंत गाडी तयार होऊन बाहेर आली.
मॅनेजर नी मित्राच्या हातात चावी दिली, गाडीला हार घातला, गिफ्ट म्हणून मित्राला ५०० रु चा वायरलेस स्पीकर दिला.
मित्र मला म्हणाला बघ, तुझ्यामुळे बार्गेनिंग छानच झाले. मला गाडी पण आवडीची मिळाली. या वायरलेस स्पीकर चा मला फार उपयोग नाही, तुला गाणी म्हणायचा शौक आहे, हा तुझ्याकडेच ठेव.
तिथल्या सगळ्यांना आणि दुकानाला बाय करून, आम्ही नवीन गाडीवर घराकडे निघालो.
गाडीचे सस्पेन्शन मस्तच होते, त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे – उंचवटे जाणवत नव्हते.
आता जातांना गाडीचा स्पीड बघायचा नव्हता, वळतांना कुठेच साईड इंडिकेटर द्यायचा नव्हता आणि हॉर्न पण वाजवायचा नव्हता.
☆ देव दे व्हाऱ्यात नाही…लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
देव देव्हाऱ्यात नाही…
आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवून जातो. आपल्या भवतालात खूप घडामोडी होत असतात. चांगल्या वाईट बातम्या ऐकायला/ वाचायला मिळतात.
एखादी चांगली घटना घडली की आपण आनंदून जातो आणि दुःखद बातमी असेल तर आपण हळहळतो.
२४ जानेवारी, २०२६ हा दिवस मला आणि माझ्या ओळखीतील अनेकांना एक वेगळा अनुभव देऊन गेला.
२३ जानेवारीला दुपारी एका अप्रिय घटनेला सामोरे जावं लागलं.
माझी मैत्रीण, सुप्रिया पाटणकर – भरतनाट्यम् नृत्य शिक्षिका (बदलापूर) हिच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली. तिचे पती सुनील पाटणकर यांचं brain hamorrhage मुळे निधन झालं. मुलुंड येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी सुनीलला ठेवलं होतं. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही अपयश आलं होतं. डॉक्टर हे समाजसेवक असतात… पेशंट हाताळताना आपल्यासारख्यांना देवासमान भासतात. सुनील यांच्या या परिस्थितीत डॉक्टरांनी सुप्रिया आणि त्यांचा मुलगा – संकल्प यांच्यासमोर एक वेगळा प्रस्ताव मांडला – *अवयव दानाचा! *
सुप्रिया आणि संकल्पनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आणि अवयव दानाचा निर्णय घेतला. तिने एकच गोष्ट डॉक्टरांना सांगितली – अवयव दान हे गरजू माणसांना करायचं आहे.
आजवर रक्तदान, नेत्रदान, क्वचित झालेलं देहदान इतपतच बातम्या मला परिचित होत्या… त्या ही लांबच्या, ऐकीवातील व्यक्तींच्या बाबतीत…
२४ तारखेला सकाळी ही procedure सुरू होणार होती. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुप्रिया समोर आल्यावर कसं समोर जायचं, काय बोलायचं ते कळत नव्हतं. एक मनाशी नक्की ठरवलं होतं की, तिच्याबरोबर थांबायचं… तेवढीच मदत करणं माझ्या हातात होतं.
मैत्रीण म्हणून आम्ही रोज भेटत होतो असं नाही पण भेटल्यावर सहज संवाद सुरू व्हायचा तसा कालही झाला. अवयव दानाच्या निर्णयावर ती खूप समाधानाने बोलत होती. माझ्या मनात मात्र अनेक विचारांची गर्दी… सुनील अचानक आजारी कसा पडला इथपासून ते हे सगळं कसं पार पडेल यासारखे अनेक प्रश्न…
घट्ट पकडलेल्या हातातून प्रिया खूप काही व्यक्त झाली होती. तिला हवी असलेली space मी दिली… काहीच विचारलं नाही. मनातून खूप गलबलून आलं होतं पण तिचा निर्धार बघून या परिस्थितीत दु:ख व्यक्त करण्यापेक्षा तिला सोबत करणं महत्त्वाचं होतं.
सकाळी सहा वाजल्यापासून organ removal procedure सुरू झाली होती. अंदाजे आठ एक तास या सगळ्याला लागतील असं डॉक्टर म्हणाले. Emergency ward च्या तळमजल्यावर waiting space मधे आम्ही थांबलो होतो. १२. ३० च्या सुमारास डॉक्टरांनी निरोप पाठवला… आता एकेक अवयव रेड बॉक्समधून ambulance मधे पाठवतील… तुम्हाला सांगतील.
तिथे ड्युटीवर असलेल्या काकांनी त्या पॅसेजमधल्या खुर्च्या बाजूला सारून जागा मोकळी केली. पुढच्या १५ – २० मिनिटात security guards, organ donation team यांच्यासमवेत पहिला रेड बॉक्स आमच्यासमोरून ambulance पर्यंत गेला. सुनीलची एक किडनी कुणासाठीतरी रवाना झाली. त्यानंतरचे दोन तास काही मिनिटांच्या अंतराने असेच बॉक्स बाहेर गेले. प्रत्येक वेळी आम्ही एकच प्रार्थना करत होतो… आता ते योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचू देत आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊदे.
प्रत्येक बॉक्सला अभिमानी नजरेने प्रिया सॅल्युट करत होती. अनेक ठिकाणी पोहोचणाऱ्या सुनीलचा निरोप घेऊन समोर आलेल्या परिस्थितीला स्वतःचं वर्तमान आणि अनेकांचं सुंदर भविष्य ही सकारात्मक खुणगाठ मनाशी घट्ट करत होती.
त्यानंतर एखाद तासात त्याच जागेवर वेगळी धावपळ सुरू झाली. हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ, ज्युनिअर डॉक्टर्स संपूर्ण कॉरीडोअरमधे दुतर्फा उभे राहिले. लीफ्टमधून सुनीलला स्ट्रेचरवरून खाली आणलं. दुतर्फा उभ्या असलेल्या सर्वांनी पांढरे गुलाब वाहून श्रद्धांजली अर्पण केली. एखाद्या सैनिकाला मानवंदना द्यावी तशी सुनीलला सर्वांनी उभं राहून guard of honour बहाल केलं. डोळे, Lungs, Liver, दोन्ही Kidney Pancreas, bones, skin या सगळ्या अवयव दानाची certificates सुप्रिया आणि संकल्पकडे देण्यात आली. प्रत्येक सर्टिफिकेट देताना प्रियाविषयी अभिमान आणि हळहळ अशा संमिश्र भावना तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात दाटून आल्या होत्या. Organ donation team व सुप्रिया यांच्यातील co-ordinator ज्योती मॅडम, नर्सिंग स्टाफ, सुनीलवर उपचारांसाठी अथक प्रयत्न करणारे डॉक्टर्स या सर्वांसाठी प्रिया आज आदर्श ठरली होती. प्रत्येकाच्या बोलण्यात इतकंच होतं… एकाच वेळी इतक्या अवयवांचं दान आजवर बघितलं नाही. प्रत्येक जण सुप्रियाला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत होते. फोर्टीस हॉस्पिटलमधील(मुलुंड) २०२६ या वर्षातील हे पहिले दान होते. या सर्व औपचारिकतेनंतर पार्थिव घेऊन बदलापूरला जायची तयारी झाली – त्याच्या गावात, राहत्या घरी!
सुप्रिया आणि संकल्पबरोबर थांबायचं ठरवलं होतं ते निव्वळ सोबत म्हणून… पण त्या दरम्यान जे अनुभवलं, जे शिकले ते कुठल्याच अभ्यासक्रमात मिळालं नसतं. सुप्रियाचा कणखरपणा, दातृत्वाचं समाधान, तिने फक्त संकल्पवरच नव्हे अनेकांवर कृतीतून केलेला संस्कार हे खूप जवळून बघितलं. सुनीलच्या अचानक जाण्याने मनातून हलले होते तरी सुप्रियाच्या निर्णयाने विचारांना गती मिळाली होती, कक्षा रुंदावल्या. पुण्यकर्माची व्याख्या मनोमन बदलली आणि इतकंच म्हणावसं वाटलं…
देव देव्हाऱ्यात नाही
तव कर्मात मी पाही
मूर्त रूपी जो पूजिला
अमूर्त रूपी जाणिला
तोच तव बुध्दी दाता
तोच कर्ता करविता
अंशरूपी ठायी ठायी
तव निश्चये जो जाई
सचेतन तो राही
लाभे जन्माची पुण्याई
अनेकांना जीवन देई
कृतार्थ तव विचारे
नतमस्तक मी होई…
नतमस्तक मी होई…
सुनीलचा आकस्मिक मृत्यू स्विकारून यातून काय सकारात्मक करता येईल तर ते अवयव दान! हा निर्णय सुप्रियाने घेतला या विचारामागे सुप्रियाच्या आई वडिलांच्या संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे. राधा मावशी आणि नाना काका दुसऱ्यांच्या मदतीला धावणारी, खंबीर मनाची माणसं होती…
तेच अगदी तेच सुप्रियाला बघताना आठवत होतं. आई-वडिलांच्या पश्चात त्यांचे संस्कार जपणं हेच तर महत्वाचं!
सहा महिन्यांपूर्वी सासरे गेले असताना आजारातून बाहेर पडू पाहणाऱ्या सासूबाई, महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर असलेला लेक यांना सांभाळण्यासाठी सुप्रिया स्वतःला सावरत होती. या सगळ्यात सावलीसारखी वावरत होती ती मुग्धा – सुप्रियाची खरं तर धाकटी बहीण!
पण या प्रसंगी आईसम आधार देणारी, वेळोवेळी तिला जवळ घेऊन समजवणारी मुग्धा सगळी procedure पूर्णत्वाला जाईपर्यंत सर्व धावपळ करत होती. मागचे तीन दिवस, तीन रात्र तीच होती आणि आता आयुष्यभर तीच असणार आहे सुप्रियाबरोबर!
कधीतरी गप्पा मारताना सहज अवयव दानाविषयी सुनील बोलून गेला होता ते धैर्याने सुप्रियाने पार पाडलं आणि साहचर्याची एक वेगळी ओळख सुप्रियाकडून बघायला मिळाली.
सुनील आणि सुप्रियाचा प्रचंड जनसंपर्क, प्रेमाने जोडलेली अनेक माणसं तिला मनोमन प्रार्थना करून धीर देत होती.
सदैव हसत खेळत, मनमिळाऊ असलेला सुनील अस्ताला जाताना सुध्दा अनेक घरांमध्ये आनंद वाटून गेला. अनेकांना आयुष्याचं वरदान देऊन गेला. सुनील नावाच्या अर्थाप्रमाणे जगताना तो शांत, आनंदी आणि स्वच्छ मनाचा होताच पण मृत्यूनंतरही अनेकांना सुंदर आयुष्य देऊन गेला.
सुनीलसाठी शब्द सुमनांजली
सुप्रिया आणि संकल्पच्या निर्णयाला सलाम!
लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे
प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈