मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मायग्रेन… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मायग्रेन… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

कृष्णाबाई मटकन टेबलावर बसल्या.. कडक ऊन होत डोकयावर.. उकाडा होता.. मुलाचं. अनिलचे तिच्याकडे लक्ष गेले..

“का.. बर वाटेना.. ?

‘मळमळल्या सारखं झाल.. ऊन हाये ना कडक.. पाणी दे.

मुलानं पटकन पाणी तिच्या हातात दिलं 

“घरी जातेस का, , ? रिक्षा बोलवतो..

मुलाने अनिलने रिक्षा बोलावली आणि हाताला धरून आईला रिक्षात बसवली आणि रिक्षावाल्याला घरचा पत्ता सांगितला. अनिल मनात म्हणाला.. आता आईला घरी थांबायला सांगायचं.. आता मी आहे दुकान सांभाळायला.. आईने तीस वर्षे हे दुकान बघितलं.. शून्यातून इथपर्यत आणलं.. आता पुरे.. किती वर्षे काम करायच, ?

..

कृष्णबाई घरी आल्या.. घरी सून राधा जेवण शिजवत होती.. नातू कुणाल शाळेत गेला होता.. हुश्यहुश्य करत बाई घरात आल्या.. सुनेने हाताला धरून खुर्चीवर बसवले आणि पाण्याचा ग्लास हातात दिला.

“फोन आलेला यांचा.. बर वाटतं नाही आईला म्हणाले.. रिक्षेतून घरी पाठवलाय म्हणाले.. केवढे ऊन पडलय बाहेर.. आता जाऊ नका दुकानात.. हे बघतात न्हवे?

‘बघतोय ग.. पन मलाच.. कृष्णबाई तिथेच लवंडल्या.

दुपारी त्त्यांचा मुलगा अनिल दुकानातून जेवायला घरी आला. त्याची आई बाहेरच्या खोलीतच झोपली होती. तिच्याकडे पहात तो बायकोला म्हणाला 

“आई जेवली का, ?

“नाही.. आल्यात त्या झोपल्यात.. तुम्ही जेऊन घ्या.. मी थांबते त्यान्च्यासाठी..

हातपाय धुवून अनिल जेवायला बसला. जेऊन तो परत दुकानात गेला. थोडया वेळाने कृष्णबाई जाग्या झाल्या, त्यानी सुनेला विचारले..

“अनिल जेऊन गेला काय ग? मला थोडी झोपच लागली.

“होय.. उठा.. आपण जेऊन घेऊ..

कृष्णाबाई हात धुवून आल्या आणि जेवणाच्या खुर्चीवर बसल्या.

‘आई.. खुप वर्षे काम केलंत. आता सत्तरी जवळ आली.. आता धंदा बरा हाय.. दोन पैसे हाईत गाठीला.. दुकान हाये स्वतःचं. ह्ये घर हाय.. तुमचा पोरगा दुकान बघतो की.. आता करा आराम..

“त्ये हाय ग.. पन काम केलेला जीव..

‘आता देवळात जावा.. कीर्तन ऐका.

बागेत जाऊन बसा..

‘अग काही न्हवत बघ.. तुजा सासरा गेल्ला तवा.. चार वारसाचा अन्या पदरात.. घरच्यांनी पाठ फिरवली.. भाजीची गाडी घातली.. गल्लीत या बाजूने घुसायचं आनी दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचं.. पार वसईची भाजी असायची माझ्या गाडीवर… लोक वाट बघत राहायची माजी.

“होय.. ते मला म्हाईत हाय.. मग हा गाळा घेतलात.. होलसेल भाजी द्यायला लागलात.. दोन टेम्पो घेतलेत.. मग दुसरा गाळा पूर्वेला.. मग हे घर घेतल चार खोल्यांचे.. मला सगळं म्हायती हाय.. पर आता वय झालाय.. आता ईश्रांती नको..

 ‘जमतंय तोपर्यत करायच.. मग हायचं राम राम..

‘पर आता चक्कर आली न्हवं..

‘चक्कर नाय ग. उष्म्याने मळमळ झाली.. म्हणून खाली बसलो.. अन्या घाबरला. बाकी काही नाही.

इतक्यात शाळेत गेलेला तिचा नातू कुणाल घरी आला.. आजीला घरात पाहून तो खूष झाला आणि तिला बिलगला..

“आज्ये.. आज लवकर आलीस..

तेवढ्यात कुणालची आई राधा त्याला म्हणाली ‘आजीला त्रास देऊ नकोस.. तिला बर नाही..

“काय झाल आज्ये?

‘जास्त काही रे बाळा.. ऊन फार आहे ना.. उन्हाळा लागला असेल.. थोडं मळमळलं.. तुजा बाबा घाबरला.. रिक्षा करून घरी धाडला..

आजी घरी असल्याने कुणाल खूष झाला.. त्याचे आणि आजीचे भलतेच गुळपीठ होते. कुणाल मग आजीभोवती फिरू लागला.

रात्री कृष्णाबाईचा मुलगा अनिल घरी आला.. जेवताना आईला म्हणाला 

“आये.. आता दुकानात यायचं न्हाई.. आपली तब्येत संभालायची.. देवळात जा.. ताईकडे जा.. भजनाला जा.. पन उद्यापासून दुकान बंद.

कृष्णाबाई काही तरी सांगायला बघत होत्या, पण मध्येच राधा म्हणाली..

‘होय.. आता घर सांभाळा.. कुठे या वयात पडलाबिडलात तर.. कोन हाय का बघणारे.. आनी तुमी घरी राहिला तर मला कुट तरी जायला मिळल, तुमी घरी असला म्हणजे तुमचा नातू बी खूष असतो.. तवा उद्यापासून दुकान बंद.. तुमचा पोरगा हाय बघणारा..

मग छोटा कुणाल आजीला सांगू लागला.. “आज्ये.. तू आता घरीच रहायचं.. मला गोष्टी सांगायच्या.. बाकी माज्या मित्रांच्या आज्या बघ घरी असतात..

सर्वांनी कृष्णाबाईना घेरलं.. आणि त्याचं दुकानात जायचं बंद केल.

रोजच्या प्रमाणे कृष्णाबाईंना पहाटे चार वाजता जाग आली.. बाकी घरातली सगळी गाढ झोपेत होती.. त्यान्च्या लक्षात आले.. रात्री मुलासुनेने बजावून ठेवलंय.. उद्यापासून दुकानात जायचे नाही.. मग करायचे काय? गेली तीसपस्तीस वर्षे ती सगळं आवरून सकाळी सहाला गाळा उघडत होती.. तोपर्यत भाजीचे टेम्पो दारात हजर होत. ती सगळी भाजी हमालाकडून व्यवस्थित लाऊन घयायची.. मग टेम्पोचे भाडे आणि हमाली देऊन गल्ल्यावर बसायचे… थोडयावेळाने भिक्या आला की त्याला सांगून दुसरा टेम्पो मागवायचा आणि थोडा माल पूर्वेच्या दुकानात पाठवायचा. मग भाजीची गर्दी सुरु होई.. हॉटेल्सची ऑर्डर्स असत. त्यान्च्या ऑर्डर्स प्रमाणे भाजी मोजून रिक्षात भरायची आणि रवाना करायची. दुपारी भाजीचे एजन्ट येत पैसे न्यायला.. हिशेब करून त्याना पेमेंट करायचे.. तोपर्यंत जेवणाची वेळ होई.. सकाळी आणलेल्या डब्यातील चपातीभाजी खायची आणि फळीवरच एक डुलकी काढायची. चार वाजले की एक कप चहा घशाखाली घालायचा तोपर्यत ऑफिस सुटायची वेळ व्हायची आणि बायका पुरुष लगबगिने यायचे आणि पिशवीभर भाजी घेऊन जायचे. रात्री दहा पर्यत गर्दी.. मग हळूहळू आवरायचे आणि घरी यायचे… अनिल लहान होता तेंव्हा शाळेतून परस्पर दुकानात यायचा.. मग दोघे घरी.. भाकऱ्या बडवायच्या आणि भाजी भाकरी खायची.

अनिल मोठा झाला आणि दुकानात बसू लागला. तसे अजून पूर्वेला गाळा घेतला आणि तो पूर्वेच्या दुकानात बसू लागला. मग स्वतःची चार खोल्यांची जागा घेतली आणि अन्या चे लग्न झाले.. राधा घरात आली.. गुणी मुलगी.. सून वाटतच नाही.. लेक.. या बाबतीत आपण नशीबवान. राधाचा भाऊ होता रिकामा.. त्याला धंदा्यात घेतला.. तो पूर्वेचे दुकान बघतो आणि अन्या या दुकानात..

कृष्णाबाई चुळबुळ करत होत्या.. या कुशीवरून त्या कुशीवर.. आता करायच काय? आपल्याला इतर बायकासारखे देवळात जावेसे वाटतं नाही की भजनकीर्तनात रुची नाही. गावात एक मोठी बहीण आहे.. ताई, जिवाभावाची. ती सोडून फारसे नातेवाईक जोडले नाहीत.. दुकानात जायचे नाही तर करायचे काय? एक नोकरी करणारी बाई होती.. रोज संध्याकाळी नोकरीवरून जाताना भाजी न्यायला येई.. मग ती निवृत्त झाली आणि वेड्यासारखे करू लागली. सवाईनुसार ऑफिसात जायची तयारी करी आणि आता ऑफिसत जायचे नाही म्हंटले की कावरीबावरी होई.. तिचा मुलगा सून परदेशी आणि ही एकटी. आपल्याशी बोलायला यायची.. बँकेत जाऊन बसुन राहायची.. बस मधून विनाकारण फिरायची..

मग तिच्या मुलाने तिला वृद्धाश्रमात ठेवले.

कृष्णाबाई उठून ग्यालरीत आल्या.. मुंबई जागी होत होती.. त्याना वाटू लागले पटकन आंघोळ करावी आणि किल्ली घेऊन गाळा उघडावा. सून राधा जागी झाली आणि ग्यालरीत उभ्या असलेल्या सासूला म्हणाली 

‘झोप नाही आली का? रोजची सवय ना. चला चहा करते.. या. सकाळी रेडिओवर गाणी चांगली लागतात.. ती सुनेबरोबर किचनमध्ये आली.. सुनेने रेडिओ लावला.. कुमार गांधर्व गात होते..

‘ पूर्व दिशेला गुलाल उधळत.. न्यान दीप लावीला….

गोरस अरपून.. अवघे गोधन. गेले यमुनेला

उठी उठी गोपाला… उठी उठी गोपाला..

राधाला वाटले कुमार गंधर्वची भूपाळी ऐकून सासूला बरे वाटेल. पण छे.. सासूचे कशात लक्ष नव्हते.. ती सतत घड्याळात पहात होती..

“अन्या उठला न्हाई.. ? गाळा उघडायला नको? टेम्पो दारात हुबे रहाणार. त्याचं भाड.. हमाली..

राधाच्या लक्षात आले.. आपला नवरा अजून दुकानात गेला नाही म्हणून सासू बेचैन झाली आहे..

‘आता दुकानाची चिंता सोडा.. आपलं वय झाल.. आता पुढची पिढी काय बी करेना..

‘अग अस कस.. शिस्त हवी का नको? सातला मी दुकान उघडत होते.. म्हणजे अजून उघडीन पण तुमी जायला देत न्हाई म्हणून.. एवढ्यात अनिल बाहेर आला..

‘आये.. तू चिंता सोड.. मी बराबर धंदा बघणार.. हा मी चाललो पन आता तू आराम करायचा.. चांगल खायच प्यायचं.. सून हाये न्हवं करून घालणारी.. नोकरीवाली कशी पेन्शन घेत्यात.. तशी मी तुला पेन्शन देणार.. कुठ तरी फिरायला जा.. अष्ठविनायक.. शिर्डी. कुठ जाणार बोल?

एवढ्यात तिचा नातू कुणाल बाहेर आला आणि आजीला बिलगला..

त्याला जवळ घेत ती म्हणाली’मी कुट्ट जात न्हाई बघ.. नातवाला जवळ घेत म्हणाली.. ‘हेच माझं पंढरपूर. आनी शिर्डी.

मग राधा जेवणाला लागली.. अनिल दुकानात जायची तयारी करू लागला आणि कुणाल शाळेच्या.

कृष्णाबाई या खोलीतून त्या खोलीत करत होत्या.. मुलगा दुकानात.. नातू शाळेत आणि नवऱ्याला मदत करायला म्हणून राधा पण दुकानात जायला लागली. जाताना राधेने इडली चटणी करून खायला दिली. दुपारचे जेवण करून ती गेली. दुपारी गॅसवर जेवण गरम करून घ्या.. असे सांगायला ती विसरली नाही.

आपल्याला सून चांगली मिळाली याचे त्याना समाधान होते.. पण आता सूनपण दुकानात जाते.. मग आपल्याशी बोलायला कोण? सकाळी सुनेने टीव्ही चालू करून दिला.. पाच मिनिटे त्यानी एक मालिका पाहिली.. पण त्याच्यात सासू दुष्ट दाखवली.. ती सुनेला ठार मारायचा कट करत होती.. शी.. शी. शी.. असल्या मालिका टीव्ही वर दाखवतात.. आपली सून मुलीसारखी.. त्यानी टीव्ही बंद केला आणि त्या नातवाची वाट पाहू लागल्या.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तसली… भाग – ३ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तसली… भाग – ३ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(“माथेरान, महाबळेश्वर कॉमन झालंय. एक नवीन ठिकाण कळलंय. तिथे जाऊया हनिमूनला? ” यांनी आधीच विचारलं होतं. आधी म्हणजे ही भानगड व्हायच्या काही दिवस आधी. त्यावेळी मी ‘चालेल’ म्हटलं होतं.) – इथून पुढे – – –

हॉटेल नवीनच दिसत होतं. छान होतं. शांत, निवांत, मोजकीच लोकं. हनिमूनला योग्य.

रूममध्ये सामान ठेवून तोंड वगैरे धुतल्यावर यांनी विचारलं, “जेवायला जाऊया? ”

“चालेल.”

घरून निघाल्यापासून आमच्यात झालेलं हे पहिलं संभाषण.

रेस्टॉरंटमध्ये थोडीच माणसं होती. तीन जोडपी हनिमूनवाली वाटत होती. दोन कुटुंबंही होती, मुलंबाळंवाली.

माझं यांच्याकडे बारीक लक्ष होतं. प्रवासातही, इथेही. म्हणजे मुलींच्या बाबतीत यांची नजर कशी आहे, वगैरे. पण हे तसे कोणाकडे बघतही नव्हते.

लग्नातही रिसेप्शनच्या वेळी यांची मित्रमंडळी, सहकारी वगैरे आले होते; पण कुठल्या मुलीशी खास सलगी वगैरे असल्याचं जाणवलं नाही…यांच्या वागण्यातून किंवा इतरांच्या बोलण्यातूनही.

माझं जेवणात मनच नव्हतं. कसेबसे चार घास पोटात ढकलले.

पुढे काय वाढून ठेवलंय, कोण जाणे. बहुधा हा हनिमून इतरांना दाखवण्यासाठीच असावा.

रूमवर आल्यावर पटकन ब्रश वगैरे करून मी झोपायच्या तयारीला लागले.

हेही अस्वस्थ असावेत. मध्येच बेडवर बसत होते. मध्येच उठून येरझाऱ्या घालत होते. मध्येच आरशासमोर उभे राहत होते.

“चल, ये. ”

आता लग्न झालं होतं. देवा-ब्राह्मणांच्या, दोन-अडीचशे आप्तेष्टांच्या साक्षीने. माझ्याजवळ ‘नाही’ म्हणण्यासाठी कोणतीही सबब नव्हती.

मनातल्या प्रेमभावना शब्दांतून व्यक्त करत, हळुवार स्पर्शातून रिझवत-खुलवत शृंगार फुलवतात, असं ऐकलं होतं. पण इथे तर वेगळंच घडत होतं. डायरेक्ट शारीरिक सलगी.

पण ज्या प्रकारे ते मला हाताळत होते, त्यावरून ते या बाबतीत अगदीच नवखे वाटत होते. यापूर्वी नक्कीच त्यांचा कोणाशी संबंध आलेला नसणार.

आठ-दहा दिवसांपूर्वी जर कोणी भाकीत केलं असतं की ‘या’वेळी या जवळिकीचं सुख उपभोगायचं सोडून मी अशी चिरफाड करत बसेन, तर माझा अजिबात विश्वास बसला नसता. पण आज ते प्रत्यक्षात घडत होतं. माझं शरीर मी त्यांच्याकडे सोपवून दिलं होतं आणि मी अलिप्तपणे या प्रसंगाची, त्यांच्या वागण्याची चिकित्सा करत बसले होते. माझ्या शरीराच्या संवेदनाच गेल्या होत्या जणू.

किती विचित्र होतं हे सगळं! प्रेमालाप न करताच डायरेक्ट शेवटची पायरी! मी काय ‘तसली’ बाई आहे? मला माझीच किळस आली.

यांना माझा सूड तर घ्यायचा नसेल? ‘मी ‘तसली’ बाई नाहीय! ’, असं सांगून मी त्यांचा अपमान केला होता. त्याचा बदला म्हणून ते मला ‘तसल्या’ बाईसारखं वागवत नसतील ना? यापुढेही ते मला असंच वागवत राहतील? जन्मभर?

नाही, नाही. त्यांनी माझ्याशी असं वागलेलं मला मुळीच चालणार नाही. मी अजिबात सहन करणार नाही ते. मी मुळीच खपवून घेणार नाही. आताच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा, असा निश्चय करून मी त्यांच्याकडे वळले.

ते गाढ झोपले होते. आपला कार्यभाग साधून झोपून गेले होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरागस होते, शांत, समाधानी.

सकाळी मला जाग आली, तेव्हा हे तयार होऊन बसले होते.

“तयार हो. ब्रेकफास्ट करायला जाऊया. ”

मेन्यू छान होता. भूकही लागली होती. खाऊन झाल्यावर यांच्याशी बोलायचं. इथे की बाहेर? नको. बाहेरच.

“मला थोडं बोलायचंय, ” ते म्हणाले.

“इथेss? ” माझ्या प्रश्नाचं त्यांना आश्चर्य वाटलं.

“काय हरकत आहे? ”

आजूबाजूला माणसं होती. अगदी शेजारच्या टेबलावरही. पण त्यांची हरकत नसेल, तर मला काय फरक पडणार होता?

“ठीक आहे. बोला. ”

“तुला माहीत आहे. आपलं मूळ घर लहान आहे. त्यात आई-बाबा आणि दादा-वहिनी. म्हणून मी हे घर घेतलं. पण आईला वाटतं की सुरुवातीचे काही महिने आपण सगळ्यांनी एकत्र राहावं. म्हणजे आमच्या घरच्या रीतीभाती तुला कळतील. घरातल्यांविषयी आपलेपणा वाटेल. हवं तर आपण रात्री झोपायला आपल्या घरी जात जाऊ. म्हणजे आम्ही आधीपासूनच तसं ठरवलंय. पण तुझं मत कळणं, मला आवश्यक वाटतं. तुझी धावपळ होणार असेल, किंवा इतर काही कारणं असतील तर आपण आपल्या घरी राहायला जाऊया. ”

अच्छा! म्हणूनच फक्त बेडरूम सुसज्ज केली होती म्हणायची!

“म्हणजे आताच सांग, असं नाही. विचार करून किंवा काही दिवस एकत्र राहून, कसं वाटतं, ते बघून निर्णय घेतलास तरी चालेल. ”

त्यांचं बोलून झालं आणि पुन्हा आम्ही आपापल्या कोषात गेलो.

ते उठले आणि बाहेर पडले. पाठोपाठ मीही.

हॉटेलच्या आवारात पुष्करिणी बांधण्याचं काम चाललं होतं.

आम्हाला बघताच तिथे देखरेख करणारा माणूस पुढे आला. त्याने स्वतःची ओळख करून दिली. मालक होता तो.

“कसं काय वाटलं हॉटेल? सोयी वगैरे? काही गैरसोयी असतील, तर सांगा. म्हणजे सुधारणा करून घेता येतील. वहिनी, तुम्ही काही नोटीस केलं तर सांगा. या बाबतीत बायकांची नजर फार शार्प असते. आपल्या लक्षातही येत नाहीत, अशा गोष्टी त्या बरोबर मार्क करतात. ”

“तोच तर प्रॉब्लेम आहे ना! ”मी पुटपुटले.

हे चपापले. मालकांनी ऐकलं नसावं.

“फिरायला चाललाय का? असं सरळ गेलात की एक वडाचं झाड लागेल. त्याच्या बाजूने डावीकडे छोटीशी वाट जाते. त्या वाटेने दहा-पंधरा मिनिटं गेलात की एक छान पॉइंट लागतो. ”

वडाचं झाड खूप मोठं होतं. भरपूर पारंब्या होत्या. पारंबीला लटकून झोका घेण्याचा मोह झाला.

बाजूच्या वाटेवरून आम्ही पुढे निघालो. इथे तर निसर्ग खुल्या हाताने सौंदर्याची उधळण करत होता. वेगवेगळ्या प्रकारची वृक्षराजी, रंगीबेरंगी फुलं -फळं-शेंगा, वेगवेगळे पक्षी, रंग-गंध-नादाचा जल्लोष चालला होता. वाटेच्या कडेची झुडपं डोळे विस्फारून आमच्याकडे बघत होती.

चालत चालत आम्ही डोंगराच्या कडेशी पोहोचलो आणि जे दिसलं, ते खरोखरच अवर्णनीय होतं.

खाली हिरवीगार दरी, समोरच्या डोंगरावरून उडी मारणारा छोटासा धबधबा. त्याची पुढे झालेली नदी. लचकत मुरडत वाहणारी. पात्र पावसाळ्यात रुंद असावं. नदीच्या काठावर अंतराअंतरावर तीन-चार ठिकाणी घरांचे पुंजके. छपरातून अलगद बाहेर पडणारा धूर. मध्येमध्ये शेतांचे चौकोन. कुठेकुठे चरणाऱ्या गुरांचे, शेतात काम करणाऱ्या माणसांचे ठिपके.

मन प्रसन्न होऊन गेलं.

जणू येताना मनावरच्या ताणाचं बोचकं त्या वडाच्या फांद्यांना अडकवून ठेवलं होतं.

परतताना मध्येच थांबून ते म्हणाले, “हॉटेलला पोहोचल्यावर आईला फोन करायची आठवण कर. या आठवड्यात गॅस मिळण्याची शक्यता आहे. फोनवरून चौकशी करून ते पाठवणार असतील, त्या दिवशी घरी जाऊन थांबलं पाहिजे कोणीतरी. ”

“पण घराची चावी? ”

“आईकडेच असते. दादा-वहिनी जातात ना दर शनिवारी रात्री राहायला! ”

“काsय? ” मी एवढ्या जोरात ओरडले की त्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, “काय झालं? ”

“काही नाही. ”

मी ‘काही नाही’ म्हटलं खरं, पण डोळ्यांनी दगा दिला. खळकन अश्रू गालांवर ओघळले.

“रडायला काय झालं? ”ते गोंधळून गेले.

“कपाटातले ते कपडे, पावडर-कुंकू वहिनींचं होतं? ”

“होs, तुला काय वाटलं? ”

“…. ”

“ओ गॉड! म्हणून तू लग्न मोडायला निघालीस? ”

“ते तर होतंच. शिवाय नंतरचं तुमचं वागणं…. ”

“तेव्हा तुला एवढं ओव्हररिऍक्ट करायची काय गरज होती? जसं काही मी तुझ्यावर रेप करणार होतो! ”

“मsग? ” माझ्या नकळत माझ्या तोंडून निसटलं.

“काहीतरीच काय? फार फार तर एखादा किस. बस्स! टोकाला पोहोचायला मी काय तुला ‘तसला’ पुरुष वाटलो? ”

त्यांचा ‘तसला’ हा शब्द ऐकून मला एवढं हसू फुटलं, एवढं हसू फुटलं की त्या भरात, ‘ म्हणजे रात्रीचा प्रकार रेप नव्हता? ’ हे विचारायचं राहूनच गेलं….

– समाप्त –  

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तसली… भाग – २ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तसली… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(“मी …अशा माणसाबरोबर…आयुष्य काढू शकत नाही. मोडतेय…मी…हे लग्न. ही घ्या…तुमची अंगठी. ”

बोटातली साखरपुड्याची अंगठी काढून मी त्यांच्या दिशेने भिरकावली. त्या घरात क्षणभरही थांबणं मला शक्य नव्हतं. मी तडक बाहेर पडले.) – इथून पुढे —-

घरी आले आणि आईच्या कुशीत शिरून मी ओक्साबोक्शी रडू लागले.

“अगं, काय झालं? बरी आहेस ना तू?रडतेयस कशाला? झालं तरी काय असं?”

“अगं, बसू दे तिला जरा. मग काय त्या चौकश्या कर. सतीश, तिला पाणी आणून दे आधी, ” बाबांनी सांगितलं.

पाणी प्यायल्यावर माझ्या जीवात जीव आला.

“ मी…म्हणजे…मी लग्न मोडलं, ”कसेतरी तोंडून शब्द बाहेर पडले.

“अरे देवा!”

“काय केलंस हे?”

“असं झालं तरी काय?”

तिघांच्याही चेहऱ्यावर, आवाजात जबरदस्त टेन्शन.

मला पुन्हा एकदा उमाळा आला. आईही रडत होती. बाबा, दादा चक्रावून गेले होते. अगोदर दादा सावरला.

“हे बघ, लता. तू रडणं थांबव आणि काय झालं नक्की, ते नीट सविस्तर सांग. तोंड धुवून ये आधी. म्हणजे शांत वाटेल, ”दादा म्हणाला.

तोंडाला थंड पाणी लागल्यावर थोडं हलकं वाटलं. तोंड पुसून मी बाहेर आले.

“हं. बोल आता. आई, बाबा, तुम्ही शांत व्हा. ”

जे घडलं ते नक्की कसं सांगावं – तेही आई, बाबा आणि दादाला – तेच मला कळेना.

“बोल ना. ”

“कसं सांगू, तेच मला कळत नाहीये. ”

“सुरुवातीपासून सरळ सांगत जा. वाटल्यास माझ्याकडे, आईबाबांकडे न बघता बोल. ”

“ते…. ते एकटेच आले. आई-बाबा येणार, असं सांगितलं होतं. पण ‘त्यांना काम निघालं, ’ म्हणाले. ”

“काम असेलही. चार दिवसांवर लग्न आलंय म्हटल्यावर – आपलीही धावपळ चालू आहेच की!” बाबा म्हणाले.

“घर खरंच घेतलंय ना?”दादाने विचारलं.

“घर आहे. चांगलं आहे. ” थोडं थांबून मी शब्द गोळा केले आणि त्यांचा उच्चार करायला धीरही.

“बेडरूममध्ये गेल्यावर त्यांची माझ्याकडून वेगळीच अपेक्षा होती. ”

आई, बाबा, दादा – तिघांनीही आ वासला.

मी पुन्हा स्फुंदून स्फुंदून रडू लागले.

“मी…मी…त्यांना सांगितलं…आपलं…अजून…लग्न झालेलं नाहीय…पण त्यांना…त्यात काहीच गैर वाटलं नाही…मी…मी…अशा माणसाबरोबर…जन्म…नाही काढू शकणार. अशा माणसाला…मी…माझा नवरा…कसं मानू?”

तिघंही अजूनही अवाकच होते.

“मी सरळ…अंगठी काढून त्यांच्या तोंडावर फेकली…आणि…त्यांना सांगितलं…. ’हे लग्न मोडलं’ म्हणून. ”

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.

“प्रदीप असा निघेल, असं वाटलं नव्हतं. दिसताना सभ्य दिसतो, ”दादा म्हणाला.

आई डोक्याला हात लावून बसली होती. ती बोलायला लागली, “अरे देवा! काय झालं हे! उद्या सकाळी ताईची मंडळी येतील. दुपारी बाबांची भावंडं येणार. त्यांना कसं सांगायचं, लग्न मोडल्याचं? पत्रिका वाटून झाल्यायत. लोकांना काय कळवणार? आणि कोणी विचारलं, तर कारण काय सांगणार?”

“बरोबर आहे आईचं. हे कारण कसं सांगू शकणार आपण लोकांना?”दादा म्हणाला.

“शिवाय प्रदीप थोडाच गप्प बसणार आहे?त्याने हिच्याविषयी भलतंसलतं पसरवलं तर?” बाबांच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे जाणवल्यामुळे आई पुन्हा रडायला लागली, “लोक चार तोंडांनी बोलणार. मग माझ्या पोरीचं दुसरीकडे लग्न जमायचीही पंचाईत. कुमुदसारखी अवस्था होईल तिची. लता, तू आज कुमुदला बोलली होतीस घराचं? तिचीच दृष्ट लागली असणार. ”

“हे बघ. तू आधी शांत हो. आपण सगळेच शांतपणे विचार करूया, ” बाबा म्हणाले.

थोडा वेळ सर्वांनी विचार केला.

“मी विचार केलाय. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, ” मी सांगितलं.

एकदम उत्तर सापडल्यासारखे बाबा बोलायला लागले, “मी काय म्हणतो, लता, तसं काही घडलं नाही ना?”

“नाही.”

“नक्की?”

“नक्की.”

“मग काय बिघडलं?”

“मी काय म्हणतो, बाबा, काही घडलं नाही म्हटल्यावर तर काही बिघडलंच नाही;पण समजा, घडलं असतं, तरी काय फरक पडतोय? चार दिवसांनीच तर लग्न होणार. तेव्हा घडणार, ते आता घडलं म्हणायचं आणि गप्प बसायचं…” दादाचं हे बोलणं आई-बाबांना पटलं.

“पण त्यांचे हे विचार, हे वागणं…”मी माझी बाजू मांडायचा प्रयत्न केला.

“जाऊ दे गं. वयाचा दोष म्हणायचा, ” दादा माझी समजूत घालायला लागला.

‘म्हणजे तूसुद्धा तुझ्या बायकोशी असाच वागशील?’ तोंडात आलेले शब्द ओठाआड अडवायला मला कष्ट पडले.

“हो. वय असतं, वेळ असते. होते माणसाला एखाद्या वेळी दुर्बुद्धी, ” बाबांनी दादाला दुजोरा दिला, “तू लहान आहेस, लता, अजून. जग नाही बघितलंयस तू. ”

“जाऊ दे. डोक्यातून काढून टाकूया सगळं. मन शांत करूया, ”आईने जाहीर केलं.

ही बाब एवढी दुर्लक्ष करण्यासारखी वाटते यांना?समजा, मी खरोखरच मोहाला बळी पडले असते, तर या लोकांनी, ‘चार दिवसांनी होणारच आहे लग्न, ’ म्हणून हे सगळं सहजासहजी नजरेआड केलं असतं?

आणि माझं स्वतःचं लग्न, माझं स्वतःचं आयुष्य याविषयीचा निर्णय घेण्याचा हक्क मला नसावा?की शेवटी नीती-अनीती, आपल्या मुलीच्या भावना, विचार यांपेक्षा समाजाची भीती जास्त महत्त्वाची ठरते?

आई, बाबा, दादा ही जिवाभावाची माणसंही मला परकी वाटू लागली. आपण एकट्याच आहोत या जगात, या कल्पनेने मला अजूनच रडू फुटलं.

तेवढ्यात बेल वाजली. दादाने दार उघडलं. सासू-सासरे आले होते.

आई-बाबांच्या पोटात गोळा आला.

“जा लवकर. तोंड धुऊन ये, ”आई कुजबुजली.

“सॉरी! आम्ही असे उशिरा आलो. पण प्रदीप म्हणाला, ‘आजच जा. ’ सूनबाईला घर आवडलं की नाही?” सासऱ्यांनी विचारलं.

त्यांचं बोलणं, चेहऱ्यावरचे भाव बघून ते सहजच आल्यासारखे वाटत होते.

त्यांच्या प्रश्नाला सासूबाईंनीच उत्तर दिलं, “अहो, आवडलंच असणार. त्याशिवाय का ती झाडझूड करत होती? अगं, तू अंगठी प्रदीपकडे ठेवायला दिली होतीस ना? त्याला घरी गेल्यावर आठवलं. तो म्हणाला, ‘आत्ताच देऊन या. ’ मी दिलीपला पाठवत होते. दमले होते हो मी, दिवसभर फिरून. तर प्रदीप हट्टच धरून बसला, ‘तुम्हीच जा, ’म्हणून. ”

आता कुठे आई-बाबांचा जीव भांड्यात पडला.

ते गेल्यावर आईने माझी दृष्ट काढून टाकली. मीठ-मोहऱ्या जळल्याचा वास आला. लगेच आई म्हणाली, “ बघितलंस ना? केवढी कडकडीत दृष्ट लागली होती त्या कुमुदची?”

आई तशी वाईट नाही;पण परिस्थितीनुसार माणसाचे विचार बदलतात ना!

कुमुदविषयी कळलं, तेव्हा आईला खूप वाईट वाटलं होतं. मुद्दाम प्रयत्न करून ती तिच्यासाठी स्थळंही शोधायला लागली.

मला यांचा होकार आल्यावर कुमुद म्हणाली, “ नीट चौकशी करा हं. पटकन होकार दिला तो. ”

मी हे आईला सांगितलं, तेव्हा पहिल्यांदाच तिच्या मनात किंतू आला, “लते, ती सहजच म्हणाली, की तिला हेवा वाटला तुझा? नोकरी लागून दोन महिनेसुद्धा झाले नाहीत आणि लग्न ठरलं, म्हटल्यावर हेवा वाटणं साहजिकच आहे.” 

“कुमुद हळदीला येणार आहे का गं?”आईने विचारलं.

“नाही. ती बाहेरगावी जातेय तीन-चार दिवसांसाठी. लग्नालाही नाही येणार. अहेराचं पाकीट आजच देऊन टाकलं तिने मला. ”

“बिचारी! सबब असणार ही, ” आई म्हणाली, “एकीकडे हुरहूर वाटते, ती येणार नाही म्हणून आणि दुसरीकडे बरंही वाटतं. ”

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पाहुणे यायला सुरुवात झाली. घर भरून गेलं.

देवकार्य, हळद…. सगळं उत्साहात चाललं होतं.

माझं मन मात्र कशातच नव्हतं. ‘कसं निभावणार आहोत आपण, या असल्या माणसाबरोबर?’ 

मंगलाष्टका सुरू झाल्या.

‘बघ. अजूनही वेळ गेलेली नाही. नीट विचार कर, ’ मी स्वतःला सांगत होते, ‘कसला विचार आणि कसली वेळ?आई-बाबांच्या दृष्टीने तर चार दिवसांपूर्वीच वेळ निघून गेलेली होती. आत्ता या क्षणी जर मी सांगितलं, की ‘मला हे लग्न करायचं नाही’, तर प्रलयच होईल. ’

“शुभ मंगल साssवधाssन!”

अंतरपाट बाजूला झाला. मी यांत्रिकपणे माळ घातली.

आता मात्र खरोखरच वेळ निघून गेली होती. नंतरचे विधी सुरू झाले.

बाप रे! माझ्या मनात कसलं युद्ध चाललंय आणि इथे सात जन्मांचे वायदे!

आजूबाजूला सगळे आनंदात दिसत होते.

माझ्या मनातल्या वादळाची कल्पना नसणारच, तरीही यांना एवढा आनंद होण्याचं कारण काय?

या लग्नाने बदलून जाणार होतं माझं आयुष्य, यांचं आयुष्य आणि थोडंफार दोघांच्या घरच्यांचं आयुष्य. बाकीच्यांना काय फरक पडणार होता माझं लग्न होण्याने, न होण्याने आणि अर्थात मोडण्यानेही?

पण तरीही सगळे, अगदी सगळे आनंद साजरा करत होते. हसत होते, गप्पा मारत होते. बायका-मुली नटूनथटून आल्या होत्या. ठेवणीतले कपडे घालून.

कपडे! कपाटातल्या कपड्यांविषयी मी आई-बाबांना सांगितलं होतं की नाही, तेच मला आठवेना.

कदाचित नसावं. नाहीतर त्यांनी माझ्या म्हणण्याचा विचार केला असता.

असं कसं राहून गेलं सांगायचं?

पण आता काहीच फरक पडणार नव्हता.

गर्भाधान वगैरे विधी व्हायचे असल्याने त्या रात्री प्रश्नच आला नाही.

दुसऱ्या दिवशी सगळे विधी वगैरे आटोपून संध्याकाळी आम्ही बाहेरगावी जायला निघालो. घरातल्या उत्साही मंडळींनी चिडवून खऱ्या अर्थाने हैराण केलं.

“माथेरान, महाबळेश्वर कॉमन झालंय. एक नवीन ठिकाण कळलंय. तिथे जाऊया हनिमूनला?” यांनी आधीच विचारलं होतं. आधी म्हणजे ही भानगड व्हायच्या काही दिवस आधी. त्यावेळी मी ‘चालेल’ म्हटलं होतं.

– क्रमशः भाग दुसरा  

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तसली… भाग – १ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तसली… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आईने सांगितलं होतं, ”कुमुदला बोलू नकोस, ” म्हणून. पण ही मोरपिशी साडी नेसलेय, म्हटल्यावर तिला संशय आलाच.

“काय गं? आज कुठे जाणार आहात?”

मी उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला, पण ती खनपटीला बसली.

शेवटी सांगावंच लागलं तिला, “आज नवीन घर बघायला जाणार आहोत, ” म्हणून.

“अरे वा! दोघंच जाणार?”

“यांचे आईवडीलही येणार आहेत. ”

“मजा आहे बाबा. नाहीतर आमचं नशीब !”

कधीकधी दया यायची तिची. आतापर्यंत साठ-सत्तर नकार पचवूनही तिचं नशीब तृप्त झालं नव्हतं.

आणि माझं लग्न तर पहिल्या फटक्यात जमलं. त्यामुळेच आई घाबरत असते, कोणाची तरी दृष्ट लागेल, म्हणून.

कुमुदची अवस्था आता अशी झालीय, की समोरच्याने होकार दिला तर तो कसाही, अगदी कसाही असला, तरी ही लग्नाला तयार होईल.

मला मात्र ‘बघायला’ आलेली मंडळी बाहेर पडल्याबरोबर आईने विचारलं होतं, “तुला पसंत आहे ना गं?मला तरी बरा वाटला. ”

“ सगळ्यांसमोर कोणीही चांगलंच वागणार ना!”

“पण तुम्ही दोघंच बोललात की आत बसून. ”

“ते काय? दहा मिनिटंच तर बोललो. ”

“काय बोललात गं तुम्ही?” दादाने विचारलं, “माहीत असलेलं बरं. तुझ्यानंतर माझा नंबर लागणार. ”

“विशेष काही नाही. नेहमीचंच. म्हणजे त्यांनी विचारलं, सिनेमा आवडतो का?दर महिन्याला जाता की क्वचितच कधी?”

“मग तू काय सांगितलंस?”दादाने विचारलं.

“मी खरं ते सांगितलं. म्हटलं, ‘दर महिन्याला गेलेलं आई -बाबांना नाही आवडत. मी आपली तीन-चार महिन्यांनी जाते. ’तर ते हसले. मग त्यांनी विचारलं, ‘आराधना’ बघितला का?’ ”

“ हा एकदम टिपिकल प्रश्न. हल्ली कोणीही कोणालाही भेटलं, की हा प्रश्न विचारणारच, ” दादा म्हणाला.

आईला यात अजिबात रस नव्हता – “ते जाऊ दे. तुझ्या नोकरीचं काय म्हणाले?”

“तो विषयच नाही निघाला. ”

“ वाटलंच. बरं झालं, मी त्यांच्या आईशी बोलले ते. त्या म्हणाल्या, ‘आमचं काही म्हणणं नाही. लग्नानंतर तिला नोकरी करायची असली तर करू देत. सोडायची असेल, तरी हरकत नाही. ’ प्रदीपरावांचंही मत कळलं असतं, तर बरं झालं असतं. ”

आईचं म्हणणं मला फारसं पटलं नव्हतं.

अर्थात आपल्याकडे लग्नं अशीच होतात.

आजी-आजोबांच्या काळात मोठी माणसंच सगळं ठरवायची. वधूवरांना काय कळतंय त्यातलं, हे सगळ्यांच्याच मनावर ठसलेलं असायचं. अंतरपाटापलीकडे कोण आहे, याचीही कल्पना नसे.

आई-बाबांच्या काळात, म्हणायला बघण्याचा समारंभ व्हायचा, पण वधूवरांकडे निर्णय स्वातंत्र्य कुठे होतं?

आणि आता, आपल्या पिढीतल्या मेधाताई, प्रशांतदादा यांच्या लग्नांत मला वाटतं, असंच झालं असणार – ‘नाही’ म्हणण्यासारखं काही नाही ना?मग ‘हो’ म्हणा.

मी बसस्टॉपवर पोहोचले, तर ते आधीच येऊन थांबले होते.

“छान दिसतोय हा रंग तुला. शालूही असाच घ्यायला हवा होता. ”

मी लाजले. त्यांना होकार देण्याचा निर्णय घेतला, हे बरंच झालं, असं माझ्या मनात आलं.

“आई-बाबा तिथेच भेटणार आहेत?”

“त्यांना नाही जमणार. कामं खूप राहिलीयत अजून. दोघंच गेलो तर चालेल ना?”

मी मानेनेच होकार दिला.

लॅच उघडलं आणि हाताने, आधी मला आत शिरायची खूण करत ते म्हणाले, “या, राणी सरकार! आपल्या महालात प्रवेश करा. ”

माझं घर! माझं स्वतःचं घर! माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

चार खुर्च्या, टेबल. बाहेरच्या खोलीत एवढंच सामान.

“फर्निचर घ्यायचंय. बेसिक गोष्टी घेऊन ठेवल्यात. बाकीचं घर तू तुझ्या आवडीने सजव. ”

मनात गुदगुल्या झाल्या. तसं माहेरचं घर पण आपलंच होतं. तरीही, ‘नवीन काही घेऊ या, ’ म्हटलं, की पहिला आर्थिक आक्षेप असायचा. नंतर ‘ठेवणार कुठे?’ तेही खरंच. नाही म्हटलं तरी एवढ्या वर्षांच्या सामानाची भरताड होती. ‘तुझ्या घरी गेल्यावर तू हवं ते घे, ’ याने इतिश्री. ‘तिथेही एकत्र कुटुंब असलं तर…’ माझ्या मनातली ही शंका कधी ओठांवर नाही आली म्हणा.

स्वप्न पुरं होण्याच्या मार्गावर होतं. सासू-सासरे, मोठे दीर-जाऊ आधीच्या घरात राहणार होते. यांनी हे नवीन घर घेऊन ठेवलं होतं.

किचन बऱ्यापैकी ऐसपैस होतं. मुख्य म्हणजे रिकामं होतं. त्यामुळे आपल्याला हवी तशी भांडी, वस्तू वगैरे घेऊन मनासारखं घर सजवता येणार होतं.

छान एकसारखे दिसणारे डबे, लागतील तेवढीच भांडी घ्यायची. नाही तर आईकडे, सासूबाईंकडे डब्या-भांड्यांचं म्युझियम झालंय नुसतं.

यांच्या पगारात घर चालवायचं आणि आपला पगार घर सजवायला.

पहिली आवश्यक ती भांडीकुंडी, नंतर बेड आणि कपाट.

कपाटात, लॉंड्रीत लावतात तसे कपडे लावून ठेवायचे. आपल्या साड्या, यांचे शर्ट-पॅंट…यांचे आणि आपले कपडे एकत्र, या विचारानेच मन मोहरून गेलं.

“खूश?” यांनी विचारलं.

उत्तर मी नाही, माझ्या चेहऱ्याने दिलं.

“आज काय मुक्याचं व्रत आहे वाटतं!”

बाप रे! तो शब्द ऐकूनच मी लाजून चूर झाले. माझी मान खाली असूनही यांची माझ्यावर खिळलेली नजर मला जाणवत होती.

“चल. आता खास दालन. ”

खास दालन. म्हणजे बेडरूम!

बेडचं उद्घाटन अगदी सिनेमातल्यासारखं करायचं. बाजूला फुलांच्या माळा, खाली बेडवर गुलाबाच्या पाकळ्या. मुलायम, सुगंधित, रोमॅण्टिक वातावरण. मी घुंगट घेऊन बसलेय आणि…

हो असंच. जेव्हा कधी बेड घेऊ तेव्हा…. मग लग्नानंतर काही महिने झाले असले, तरीही पुन्हा एकदा सुहाग रात साजरी करायची. त्या नव्याकोऱ्या बेडवर. त्या खास दालनात प्रवेश करताना यांनी माझ्या खांद्यावर निसटता हात ठेवला. ठेवला की चुकून लागला? की भास झाला मला?

समोर डबल बेड! चक्क डबल बेड!

पूर्वी चंदूदादाचं नवीन घर बघायला गेलो, तेव्हा असाच डबल बेड होता तिथे. तो बघितल्यावर आपल्यालाच नव्हे, तर आई, मावशीलाही कानकोंडं झालं होतं. आणि आता आपल्या घरात डबल बेड!

“ये ना, आत ये. ”

का कुणास ठाऊक, पण हा बेड वापरलेला असावा, असं मला जाणवलं.

“काय गरम होतंय!” म्हणत त्यांनी अंगातला शर्ट काढला. कपाट उघडून आतला हॅंगर आणि नॅपकीन बाहेर काढला. शर्ट हॅंगरला लावून खुंटीला टांगला. “हात-पाय धुवून येतो, ” म्हणून ते बाथरूममध्ये गेले.

कपाटाच्या फटीतून मला रंगीबेरंगी काहीतरी दिसलं होतं. त्यांनी बाथरूमचं दार लावल्याची खात्री करून घेऊन मी कपाट उघडलं, तर काय? आतमध्ये यांच्या लुंग्या, गंजीफ्रॉक आणि त्यांच्या जोडीला गाऊन, बायकांचे आतले कपडे, शिवाय पावडर, कुंकू, कंगवा. मी पटकन दार बंद केलं.

काय भानगड आहे?, म्हणजे मला जाणवलं, ते खरं होतं. यांनी हा बेड आधी वापरलाय. कोण जाणे कोणाबरोबर?की एकीपेक्षा जास्त…?

 नक्कीच. बेडशेजारी एक छोटं स्टूल होतं. त्या स्टूलवर तांब्या पेला होता. बाजूला एक हेअरपिन पडली होती.

यांच्या मनात आहे तरी काय? घरात यांच्याबरोबर मी एकटीच. खिडकीही बंद आहे. बाप रे!

केस, तोंड खसाखसा पुसत ते बाहेर आले.

“हाsss. बरं वाटलं. तूही तोंड धुऊन घे. ”

“नको. ठीक आहे. ”

त्यांनी खिडकी उघडली.

मला जरा सुरक्षित वाटलं. पण बाहेर बघितलं, तर लांबलांबपर्यंत कोणतीच बिल्डिंग दिसत नव्हती. म्हणजे यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं, तर कोणालाच कळणार नाही. मग कोण येणार माझ्या मदतीला?मला धडकी भरली. उगाच आले यांच्याबरोबर.

पंखा चालू करून ते बेडवर बसले. शर्ट न घालताच. गंजीफ्रॉकमध्ये.

यांना काहीच कसं वाटत नाही?अशा कपड्यात, एका परक्या बाईसमोर…. तशी मी परकीच आहे ना अजून.

“ये ना. बस. ”

“नको. ”

“अगं, ये. ”

मी मानेनेच ‘नाही’ म्हटलं. त्या तसल्या बेडवर मला बसायचंही नव्हतं.

“ये तरी, राणी, ” त्यांनी दोन्ही हात पसरून मला विनवले. “अगं, इतर कोणी नाही इथे. आपण दोघंच तर आहोत. ये ना. ”

मी जागेची हलले नाही. हे काहीतरी विचित्र घडू पाहतंय…माझ्या मनात पाल चुकचुकू लागली.

“ये ना. चार दिवसांनीच तर लग्न होणार आहे आपलं. ”

आणि अचानक मला कंठ फुटला, “होणार आहे. झालं नाहीय अजून. ”

“काय फरक पडतोय! चारच दिवस उरलेयत म्हणजे लग्न झाल्यातच जमा आहे. ”

“ ‘जमा आहे, ’ म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष झालेलं असणं वेगळं. ”

“माझ्यावर अविश्वास दाखवतेयस तू?”त्यांच्या आवाजाला ‘इगो’ची धार होती.

“अविश्वास नाही हा. उलट तुम्ही माझा अनादर करताय. तुम्हाला मी…मी… ‘तसली’… ‘तसली’ बाई वाटले …मी तुम्हाला?” रागाने माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते;पण मी बोलतच गेले, “किचन रिकामं, हॉल… सजवायचाय…आणि…बेडरूम तयार?काय आहे याचा अर्थ?… म्हणजे…माझ्या आधीही इथे कोणी…”

“शट अप! इतकं टोकाला जायची गरज नाही. ”

“मी …अशा माणसाबरोबर…आयुष्य काढू शकत नाही. मोडतेय…मी…हे लग्न. ही घ्या…तुमची अंगठी. ”

बोटातली साखरपुड्याची अंगठी काढून मी त्यांच्या दिशेने भिरकावली.

त्या घरात क्षणभरही थांबणं मला शक्य नव्हतं. मी तडक बाहेर पडले.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवं नातं… भाग-२ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

☆ नवं नातं… भाग-२  ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

(हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सवाला रमा आईसह मारुती मंदिरात गेली होती. जन्मसोहळा झाल्यावर प्रदक्षिणा घालून प्रसाद घेण्यासाठी रमा थांबली होती. प्रसाद घेऊन वळल्यावर तो तरुण तिला दिसला. तिला एकदा वाटले या तरुणांबद्दल आईला सांगावे पण काही न बोलता ती आईसह घाईघाईने देवळातून बाहेर पडली.)  इथून पुढे – – 

एकदिवस कॉलेजमधील काम संपवून ती स्टॉप वर आली. वळवाचा पाऊस पडून गेला होता. अजूनही आकाशात काळे ढग होते. कधी परत पाऊस पडेल याची शाश्वती नव्हती. रमा बस स्टॉप वर येताच बस आली पण ती राजवाडा पर्यंत जाणारी होती. पाऊस येण्यापूर्वी निदान तिथपर्यंत तरी पोचले तरी हरकत नाही असा विचार करून तिने त्या बसने जाण्याचा निर्णय घेतला. राजवाडा स्टॉप येताच ती बसमधून उतरली. पुढील बस पकडण्यासाठी चालू लागली, पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठले होते. कपडे सांभाळत, खड्डे चुकवत रस्ता ओलांडत असताना तिला एका दोनचाकी वाहनाचा धक्का लागला आणि ती खाली पडली. लोक तिच्याभोवती जमा झाले. तिला मदत न करता त्या गाडीचा नंबर पाहिला का? पोलिसांना फोन करून नंबर कळवला का ?अशी नुसती चर्चा करत राहिले. पाठीमागच्या बसने तो तरुण आला. सर्वच बस काही कारणाने स्टॅन्ड पर्यंत न जाता राजवाडा पर्यंतच थांबत होत्या. त्यामुळे तो तरुणही तिथेच उतरला. बसमधून खाली उतरल्यावर गर्दी पाहून थांबला. गर्दीतून पुढे आला त्यावेळी रमा खाली बसली आहे हे त्यांनी पाहिले. त्यांने पटकन रमाला पाणी प्यायला दिले. थोडी तरतरी आल्यावर तिने उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उभे राहता येईना. तेव्हा त्या तरुणाने एक दोन जणांच्या मदतीने रमाला फुटपाथवर आणून बसवले. वेदनेने ती कण्हत होती. त्याने लगेच ऍम्ब्युलन्स ला फोन केला. ऍम्ब्युलन्स येताच तिच्यामधून रमाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. केस पेपर करताना हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी विचारले, ” आपले पेशंटशी नाते काय आहे? तो उदगारला, ” मी यांचा भाऊ आहे”सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर तिला इंजेक्शन देऊन झोपवले गेले, जवळच्या खुर्चीवर तिची पर्स होती. त्याने पर्समधून कॉलेजचे ओळखपत्र काढले. कार्डावर तिचे नाव, घरचा पत्ता आणि घरचा फोन नंबर होता. त्या क्रमांकावर त्यानं घरी फोन केला. फोन तिच्या आईने उचलला. ” मी सोहम कारखानीस बोलतोय, तुमच्या रमाचा अपघात झाला आहे थोडासा मार लागला आहे मी “स्नेह”

 हॉस्पिटल मध्ये तिला दाखल केले आहे. तुम्ही”स्नेह “हॉस्पिटल मध्ये यावे.

मी बातमी ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती झटकन साडी बदलून रिक्षाने दहा मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोचली. सोहम वाट पाहत उभा होताच, एक स्त्री तिच्या चेहऱ्यावर काळजी आहे ते पाहताच सोहम पटकन पुढे झाला, ” आपण रमाच्या आहे का ?”

“हो मी रमा ची आई राधिका सबनीस, रमा कशी आहे ? कुठे आहे?”

“त्या आत मध्ये आहेत, नर्स ने इंजेक्शन दिले आहे त्यामुळे त्यांचा डोळा लागला आहे. काळजी करू नका”.

सोहम सोबत राधिका बाई रमाच्या खोलीत गेल्या. तिच्या चेहऱ्यावरून तिला अजून वेदना होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे तीअजून झोपलली आहे हे त्यांनी जाणले. तिला त्या अवस्थेत पाहतात राधाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले.. सोहमने त्यांना धीर दिला.

दोघेही डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी एक्स-रे पाहून ऑपरेशन करावे लागेल असे सुचवले. “उद्या सकाळी नऊ वाजता ऑपरेशन करूया “असे ते म्हणाले आणि “रक्ताची जरुरी लागल्यास रक्ताची सोय करून ठेवा “असाही त्यांनी सल्ला दिला.

डॉक्टर येऊन जातच नर्सने औषधांची यादी आणून दिली. सोहमने जवळच्या औषधाच्या दुकानातून औषधे आणून दिली. मी उद्या सकाळी साडे आठ वाजता येतो व रक्ताची सोय करतोअसं सांगून सोहमने राधाबाई चा निरोप घेतला. जगातअजूनही माणुसकी शिल्लक आहे याची रमाबाईंना खात्री पटली आणि आज सोहम च्या रूपाने परमेश्वर धावून आला हा विचार त्यांच्या मनात तरळून गेला. रात्री सोहम राधाबाईंसाठी जेवणाचा डबा घेऊन आला.

 शब्द दिल्याप्रमाणे सोहम आठ वाजता आला. , पुढाकार घेऊन सर्व परिस्थिती हाताळत होता. ठरलेल्या वेळी ९ वाजता शस्त्रक्रिया करून प्लॅस्टर घातले गेले. तो पूर्ण दिवस रमा ग्लानीतच होती. दुपारचे जेवण सोहम आणि राधिकाबाईंनी हॉस्पिटल मधील कॅन्टीनमध्येच घेतले. रात्री सोहमची पत्नी, सीमा राधाबाई साठी जेवणाचा डबा घेऊन आली. तिच्यासोबत तिची छोटी मुलगी, स्वरा पण आली होती. ती गोड मुलगी भिरभिरत्या नजरेने एकदा रमाकडेआणि एकदा राधाबाईकडे पहात होती. राधाबाई नी बोलावताच त्यांचया मांडीवर जाऊन बसली. आता रमाची तब्येत जरा बरी होती. सीमाने रमाला स्वतः ची ओळख करून दिली. ” मी सीमा कारखानीस, हे माझे पती सोहम आणि मी आमची छोटी परी, स्वरा. सोहम वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. “

स्वरा तिच्याकडे पाहून गोड हसली. तिने आणलेलं गुलाबाचे फूल रमानेस्वीकारताच तिने रमाला फलाइंगकिस दिला. त्यानंतर सीमाने सांगितले की सोहम मला रोज सांगायचा की आपल्या रमणीसारखी दिसणारी एक मुलगी विलिंग्डन महाविद्यालयात नोकरी करते. ती मला भेटली की मला माझी बहिण, रमणी भेटल्याचा आनंद मिळतो म्हणून मी तिच्या वेळेस बाहेर पडतो. ती साधारणपणे तिच्याच वयाची होती. तिच्यात आणि तुझ्यात खूप साम्य आहे हे मला काल तुला पाहताच लक्षात आले पण आमची रमणी सहा महिन्यापूर्वी किरकोळ तापाचे निमित्त होऊन आम्हाला सोडून गेली. हे ऐकताच रमाने सोहम कडे पाहिले. त्याचे अश्रूंनी भरलेले डोळे पाहून तिचा जीव कळवळला, तिला खूप वाईट वाटले. सोहम आपल्याला बहिणीच्या ठिकाणी पहात होता आणि आपण मात्र त्याला मवाली समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो याची रमाला लाज वाटली. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.

“दादा मला क्षमा कर “हात जोडून रमाने विनवणी केली.

“क्षमा मागण्याचे कारण नाही खऱ्या अर्थानेमला आज माझी बहीण रमणी मिळाली याचा मला आनंद होत आहे. ” मी खरोखर भाग्यवान आहे आज मला अजून एक हक्काचा मुलगा मिळाला, सीमा सारखी गोड सून आणि गोड, लाघवी नात स्वरा. मिळाली “राधाबाई आनंदाने उद्गारल्या. रमाला सर्व गोष्टींचा खुलासा झाला आणि तिच्या 

 मनावर बरेच दिवस असलेले संशयाचे सावट दूर झाले.

– समाप्त –

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवं नातं… भाग-१ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

नवं नातं… भाग-१ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

एप्रिल महिना होता. उन्हाळा मी म्हणत होता, अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. आभाळात ढग यायचे पण पावसाचा पत्ता नव्हता. त्यातच वीज गेल्यामुळे झोपही पूर्ण झाली नव्हती तरी ही रमा उठली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात आलेल्या दूधवाल्या कडून दुधाची पिशवी तिने आत घेतली. दूध तापत ठेवून दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण ठेवून दात ब्रश करायला गेली. दात घासून येईपर्यंत चहा तयार झाला होता. तो तिने दोन कपात ओतला. आणि एक कप आईला देऊन आली. आईची तब्येत बरी नसल्यामुळे पोळी भाजी करून तिला ऑफिस गाठायचे होते. ती कणिक मळून आंघोळ करून आली. पटकन एकीकडे भाजी टाकून पाच पोळ्या करून घेतल्या आपला डबा भरून पर्स मध्ये टाकला तोपर्यंत घड्याळाच्या काट्याने दहा वाजलेले दाखवले.

तिने पटकन गाऊन बदलून निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस चढवला. कंगव्याने केस विंचरून केसांचा पोनी बांधला, चेहर्यावर पावडरचा पफ फिरवला, ओठांवर हलकंस लिपस्टिक लावून पर्समध्ये घड्याळ आणि इअररिंगज टाकून पर्स खांद्याला अडकवली”आई, येते ग! ” म्हणत धावतच घराबाहेर पडली. बस स्टॉप वर आली. प्रवाश्यांची बरीच मोठी रांग होती. आज बहुतेक उशीर झाला त्यामुळे मोठी रांग असावी असा विचार करत ती रांगेमध्ये जाऊन उभी राहिली. आजूबाजूला कोणी ओळखीचे दिसते का? हे पाहण्यासाठी मागे मान वळवली आणि अचानक समोर पाहिले तर तिच्यापुढे चार पाच प्रवासी सोडून एक तरुण उभा होता. त्याच्याकडे तिचे लक्ष जाताच त्याने तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले.

हा तरुण कोण असावा? पूर्वी शेजारी राहत होता का? शाळेत आपल्या वर्गात होता का? असातिने डोक्याला खूप ताण देऊन विचार केला पण तिला काही संदर्भ लागेना. तेवढ्यात बस आली. ती पटकन बस मध्ये चढली. तिने पाठीमागे वळून पाहण्याचे धाडसही तिने केले नाही\विलिंगडन कॉलेजचा स्टॉप येताच पटकन खाली उतरून झपाझप चालायला सुरुवात केली. रसायन शास्त्राचा पहिला तास पहिल्यावर्षाच्या वर्गावर असल्यामुळे तिला बरोबर अकरा वाजता वर्गात पोचायचे होते.

रमाने गेल्या वर्षी याच कॉलेजमधून एम. एससी. ची पदवी घेतली होती. तिची हुशारी, कामावरील तत्परता पाहून व्याख्याती म्हणून कॉलेजने तिची निवड केली होती. तिच्या भावाने, रोहनने दोन वर्षांपूर्वी वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटरमध्ये बी. ई. केले होते. गेल्या वर्षी रोहन एम. एस करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि एम. एस. होतास त्याला तिथे नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे रमा व तिची आई सांगलीमध्ये दोघीजणी राहत होत्या. राधाकृष्ण वसाहतीत त्यांचा छोटासा बंगला होता. मधुरभाषिणी व विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे रमा लवकरच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाली.

डिसेंबरमध्ये मामे बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवस रजा काढून रमा नागपूरला गेली. लग्नघरातील उत्साही वातावरणात आठ दिवस कसे गेले समजलेच नाही. बहिणीची सासरी बिदाई करून रमा. सांगलीला परत यायला निघाली. सांगलीला जाणाऱ्या गाडीत बसता क्षणीच तिला पुन्हा त्या बस स्टॉपवर दिसणाऱ्या तरूणांची आठवण झाली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी ती बस स्टॉप वर आली तेव्हा बस स्टॉप वर तो तरुण उभा होताच. तो दिसायला रुबाबदार, उंच, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा. अगदी सभ्य होता. दोघांनाही एकच बस मिळाली, बस मध्ये बरीच गर्दी होती. त्याला बसायला जागा मिळाली पण रमाला उभ्याने प्रवास करावा लागणार होता हे पाहताच त्याने उभे राहून, ” तुम्ही इथे बसा” असे खुणेने सांगून तो स्वतःउभा राहिला. रमाने प्रथम दुर्लक्ष केले पण त्याने दुसऱ्यांदा विनंती करताच ” “काय शिष्ट मुलगी आहे ” असा इतरांच्या नजरेतील भाव पाहताच तिने त्याच्या विनंतीचा स्वीकार केला आणि त्याने दिलेल्या सीट वर ती बसली. स्टॉप येताच मात्र मागे न पाहता उतरून चालू लागली. असे बरेच दिवस चालले होते. तो कधीही तिच्याशी बोलला नव्हता की त्याने तिची चौकशीही केली नव्हती.

काही दिवसांनी अचानक आज “बस बंद “असा निर्णय घेतला गेला. रमाला या गोष्टीची कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी रमा बस स्टॉप वर आली, पाहते तो काय सर्व बस ओळीने उभ्या होत्या. आता काय करायचे? “अशा संभ्रमात रमा उभी असताना तो तरुण तिच्या जवळ येऊन म्हणाला, “मी रिक्षाने जात आहे तुम्ही येत असाल तर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या थांब्याजवळ सोडून मी पुढे जाईन, आज बस सुरू होतील असे वाटत नाही. “तिने जाणून-बुजून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि घरी निघून गेली कामावर न जाता. तो मात्र रिक्षामध्ये बसून निघून गेला. आपल्याबद्दल काहीही माहिती न देता ओळखत नसूनही हा तरुण आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न का करतोय? हे रमाला उमजत नव्हते. आईला त्याच्याबद्दल सांगून तिला अडचणीत टाकायचे हे रमाला पटत नव्हते. त्यामुळे ती एकटीच होणारा मनस्ताप सहन करत होती.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आपले मनआपल्या मैत्रिणीकडे मोकळे करायचे तिने ठरवले. मैत्रिणीला म्हणाली, “अगं माझ्या बस मध्ये दररोज एक तरुण चढतो. माझी लक्ष त्याच्याकडे जाताच तो माझ्या कडे बघून हसतो, मला मदत करण्याची एकही संधी तो सोडत नाही. मला त्याचा खूप राग येतो अगं तो स्वतःला समजतो तरी कोण? अगदी दुर्लक्ष करुनही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही”

अगं तो कोणीतरी ओळखीचा असेल किंवा त्याचा चेहरा तसा असेल. तो “तुझ्याशी बोलत नाही किंवा त्याने तुला तुझे नाव विचारले नाही. स्वतःबद्दल काही माहिती सांगितली नाही, तुला त्रासही देत नाही. मग तू त्याचा एवढा राग राग का करतेस? “या प्रश्नांची रमाकडे उत्तरे नव्हती.

हनुमान जयंती दिवशी हनुमान जन्मोत्सवाला रमा आईसह मारुती मंदिरात गेली होती. जन्मसोहळा झाल्यावर प्रदक्षिणा घालून प्रसाद घेण्यासाठी रमा थांबली होती. प्रसाद घेऊन वळल्यावर तो तरुण तिला दिसला. तिला एकदा वाटले या तरुणांबद्दल आईला सांगावे पण काही न बोलता ती आईसह घाईघाईने देवळातून बाहेर पडली.

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तथास्तु… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ तथास्तु… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“अरे विनय, कमालच करतोस तू. मी काय लहान बाळ आहे का एवढी काळजी करायला? उलट मला मस्त स्वातंत्र्य मिळतंय त्याचा उपभोग घेऊ दे की. जा खुशाल. रोज आपण फोनवर असूच की. अरे आठच दिवस तर जातो आहेस ना? मी नाही जात आता सांगलीला. तू आलास की मग दोघेही जाऊया.

जा तू. चल बॅग भरते तुझी मी. ” दुसऱ्या दिवशीच विनय विमानाने दिल्लीला गेला.) – इथून पुढे —-

सुजित जपानला अगदी मजेत होता. रोज आईला फोन यायचे आणि गप्पा मारायचे माय लेक.

विनयला जाऊन पाच दिवस झाले आणि सकाळपासून वैशालीच्या पोटात थोडं थोडं दुखत होतं. असेल किरकोळ म्हणून तिने इनो घेतलं, पेन किलर घेतली.

संध्याकाळी मात्र वैशालीला कळा सहन होईनात. असह्य झाल्यावर तिने कविताला फोन केला.

“कविता, कुठे आहेस? ”काकू घरीच आहे मी. आज माझा ऑफ आहे. ”

“बाळा, जरा वर येतेस का? मला पोटात फार वेदना होत आहेत ग”

कविता एका क्षणात वर आली. तिने वैशालीला तपासले. ”काकू घाबरू नका. याआधी कधी असं दुखलं होतं का? नाही ग. हे पहिल्यांदाच होतंय. ”

कविताने तिची कार काढली. हळुवार बोलत बोलत तिला लिफ्ट मधून खाली आणलं.

“ काकू, मला हा युरेटरीक स्टोन चा अटॅक वाटतोय. मी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल मध्ये नेते. मी आहे ना जवळ? घाबरू नका अजिबात. ”

वैशालीच्या सगळ्या तपासण्या, स्कॅन एमआरआय झालं. सगळीकडे कविताने फॉर्मवर सह्या केल्या. वैशालीला ऍडमिट करून घेतलं. कविताला वाटलं तसा वैशालीला युरेटरिक स्टोनच होता.

वैशालीला सलाईन मधून औषधे सुरू केली. उद्याच तिची तो खडा काढायची लिथोट्रिपसी सर्जरी करणार होते.

वैशालीने कण्हत विचारलं,

“ कविता, विनयला बोलावून घ्यायचं आहे का? ”कविता म्हणाली तशी जरूर नाहीये पण मी काकांना कालच फोनवर सगळं सांगितलंय काकू. त्यांचं काम झालंय तिथलं. उद्या ते येतीलच. ”

वैशालीच्या डोळयांत पाणी आलं. न बोलता तिने कविताचा हात कृतज्ञतेने दाबला. विनयची दिल्लीची फ्लाईट तीन तास उशिरा आली. विनय यायच्या आत वैशालीची सर्जरी झाली होती. कविताने फॉर्मस् वर सह्या केल्या, हॉस्पिटलचे ऍडव्हान्स पैसे भरून टाकले. विनय धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोचला तेव्हा वैशालीला स्पेशल रूममध्ये हलवले देखील होते.

ऑपरेशन करणारे डॉ मित्रा म्हणाले, “सगळं छान पार पडलं आहे मिस्टर रानडे. या आमच्या गोड कविताचे आभार माना. माझी हुशार स्टुडंट आहे बरं ही. किती शांतपणे तिने सगळं मॅनेज केलं बघा. अगदी छान आहे तुमची पेशंट आता. तुम्ही पेशंटला भेटू शकता. ”

विनय वैशालीजवळ बसला. अर्धवट गुंगीत असलेली वैशाली म्हणाली, “ कविता, बाळा किती आभार मानू ग तुझे मी. ”

वैशालीला छान बरं वाटायला लागलं. रोज कविता सकाळी रात्री चक्कर मारून जायची.

“ काकू, उद्या तुम्हाला घरी सोडणार आहेत. आता मस्त वाटतंय ना? ”

वैशालीच्या डोळ्यातून धार लागली. “ कविता, अग सख्खी मुलगी करणार नाही इतकं तू केलंस माझ्यासाठी. तुझे आभार कसे मानू समजत नाहीये ग ”

“ ते राहू दे हो काकू. उद्या घरी या आता मस्त. ”

– – वैशाली घरी आली.

नंतरचा आठवडा कविताला तिच्याकडे जायला अजिबात वेळच झाला नाही. त्या नंतरच्या आठवड्यात ती लिफ्टची वाट बघत खाली उभी होती. लिफ्ट खाली येताच तिला मागे सारून मोठी बॅग घेऊन एक तरुण लिफ्ट मध्ये घुसला. ” अहो मिस्टर, आधी मी जाणार आहे. एवढी प्रचंड बॅग घेऊन खुशाल मला ढकलून घुसताय हो? ”

हे ऐकायच्या आत तो तरुण लिफ्ट मध्ये घुसून वर गेलाही. अवाक होऊन रागाने बघत कविता धुमसत परत लिफ्टची वाट बघत उभी राहिली. लिफ्ट खाली आली आणि कविता घरी गेली.

पुन्हा तोच मुलगा दुसऱ्या दिवशी तिला खाली भेटला.

“ सॉरी हं. मी त्यादिवशी तुमच्या आधीच घुसलो लिफ्टमध्ये. माफ करा हं. पण माझी मनस्थिति नीट नव्हती. माझ्या आईचं स्टोनचं ऑपरेशन झालं आणि मी नव्हतो इथं. कशीतरी रजा घेऊन आलोय तिला भेटायला. लगेच मला चार दिवसांनी जपानला जावं लागणार आहे. सॉरी हं. ”असं म्हणत तो गडबडीने निघून गेला.

… ‘ अरेच्या. तर मग वैशाली काकूंचा सुजित तो हाच की. ’ मनाशी हसत कविता म्हणाली.

आज कविताला सुट्टी होती म्हणून कविता वैशालीकडे गेली.

“ ये ग ये कविता. ”

वैशाली म्हणाली. ” काकू बऱ्या आहात ना? अगदी उत्तम आहे ग मी. तुझी कृपा. ”

“ काहीतरी काय काकू? डॉक्टरचं कर्तव्यच नाही का ते? ”

सुजित हातात कॉफी घेऊन आला.

“ या? या तुझ्या डॉक्टर आहेत? ”

कविता हसत म्हणाली “ हो. मग डॉक्टर कशा दिसतात तुझ्या मते? “

सुजित तिच्या सुंदर स्मार्ट हसऱ्या चेहऱ्याकडे बघतच राहिला.

“ती कॉफी माझ्यासाठीच आणली आहे ना? दे ती. गार होईल. ” कविता हसत म्हणाली. नकळत सुजितने कॉफीचा मग तिच्या हातात ठेवला. वैशाली हे सगळं गमतीने बघत होती. कविता वैशालीचा निरोप घेऊन बाय करून निघून गेली.

“ आई, या पोरीने सगळं हँडल केलं? एकटीने? मी, बाबा कोणीही नसताना? पार स्वतः पैसे भरण्यापर्यंत? कमालच आहे हिची. ” सुजितने वैशालीला विचारलं.

“ हो सुजित. अतिशय हुशार तर ती आहेच पण अत्यंत खरी माणूस पण आहे. किती पटापट निर्णय स्वतः घेऊन तिने तुमची वाट सुद्धा न बघता माझं ऑपरेशन करूनसुद्धा घेतलं. नाही तर काय झालं असतं? मोठा होता तो स्टोन. धोका होता माझ्या युरेटरला. अतिशय धीट आहे ही मुलगी. नक्कीच तिचं भविष्य उज्ज्वल आहेच. ” वैशाली भारावून म्हणाली.

त्या संध्याकाळी सुजित कविताच्या फ्लॅटवर गेला.

कविता म्हणाली ” ये ना. कशा आहेत काकू आणि कसा आहेस तू? ”

सुजित म्हणाला ” मी अजिबात ठीक नाहीये. मला नीट तपासा डॉक्टर. सारखं छातीत धडधडत आहे. नीट झोप लागली नाही गेले दोन दिवस. ”

कविताने हसत हसत त्याच्या डोक्यावर टपली मारली.

“ चूप बस. समजतंय मला तुला काय होतंय ते. ”

“ हो ना? मग कविता, माझ्याशी लग्न करशील का? तरच मी बरा होईन”हसत सुजित तिला म्हणाला.

कविताने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली ” पण चालेल का अशी डोईजड बिझी डॉक्टर तुला?

मी माझं करिअर सोडणार नाही. मी घरी बसणार नाही. वाटेल तेव्हा वाटेल त्या वेळी मला कॉल आला की जावं लागेल. मी नुसती घरी बसणारी मुलगी नाही. मी हाऊस वाईफ मटेरियल तर नाहीच. ”

“बाई सगळं मान्य. कविता, मला अशीच मुलगी हवी होती. हो म्हण मला. ”

कविता हसत म्हणाली ” एक सांगू? ज्या दिवशी मला चक्क ढकलून तू लिफ्ट मध्ये घुसलास ना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले. मला नव्हतं माहीत की तू वैशाली काकूंचा लाडका मुलगा आहेस ते. ”

सुजित चार महिन्यांनी जपानहून परत आल्यावर कविता आणि सुजितने त्यांचं गुपित सगळ्याना सांगितलं.

वैशाली म्हणाली ”, सुजित, कविता आपल्या घरी केव्हाच आलीय. म्हटलं होतं ना मी तुला, अचानक हा फ्लॅट मिळाला तशी अचानकच तुझी बायको समोर येऊन उभी राहील? ” वैशालीने कविताला जवळ घेतलं.

“ तुझ्याहून दुसरं कोणी या घरात येऊच शकत नाही ग कविता. ” म्हणत तिने सुजित आणि कविताला जवळ घेतलं. ‘ तथास्तु ‘ म्हणत विनयनेही दोघांना जवळ घेतलं. आणि ते चार हसरे चेहरे मोबाईल मध्ये कैद केले.. “

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तथास्तु… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ तथास्तु… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नीताकडे काल खूप दिवसांनी वैशाली गेली. खूप दिवस सगळ्या मैत्रिणी तिला बोलावत होत्या पण वैशालीला कुठे जावसंच वाटायचं नाही. सगळीकडे गेलं की एकच प्रश्न… 

‘ठरलं का सुजितचं लग्न? मिळाली का सूनबाई? बघ बाई. तिशी गाठली की सुजितने. फार उशीर नको ग बाई करू. मग मुली तरी कुठे चांगल्या उरतात? ‘ 

सुजितचं लग्न हा डोकेदुखीचा विषय झाला होता वैशालीला.

सुजित गुणी मुलगा. नाव ठेवायला जागा नव्हती त्याला. चांगल्या मोठ्या नोकरीत हा इंजिनीअर आयटी मध्ये भरपूर पगार असणारा मुलगा. , पण लग्न ठरताना कुठे घोडं पेंड खात होतं देव जाणे. विवाहमंडळात नाव नोंदवून झालं. , बऱ्याच मुली येत आणि मग पुढे गाडी सरकतच नसे. फोन केले की मुलीची आई म्हणे, “ अजून विचारलं नाही हो तिला. दमून येते ऑफिसमधून उशीरा. , कळवते हं चार दिवसात. ” – ते चार दिवस काही उगवत नसत.

आता मात्र वैशालीला समजेनासं झालं की काय चुकत आहे आपलं.

मग मागच्या आठवड्यात एक मुलगी सांगून आली. चांगली शिकलेली, दिसायला ठीकठाक. नोकरीही चांगली. जन्म शिक्षण सगळं खेड्यात बाहेरगावी झालेलं त्यामुळे तिच्या रहाणीमध्ये शहरी सफाई नव्हती.

आधी सुजित तिला भेटायला तयारच नव्हता. पण नाईलाजाने तो तिला कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला. मग 

दोघेही त्याला चांगले कपडे हवे होते म्हणून मॉल मध्ये गेले. सुजितने ब्रँडेड टी शर्ट्स, ऑफिससाठी शर्ट्स घेतले. सहज नऊ हजार बिल कार्डने देऊन दोघे बाहेर आले.

ही म्हणाली, “बाप रे. एवढा खर्च करतोस तू? नऊ हजार? यात साधे शर्टस् आठ आले असते. मला नाही असली उधळपट्टी आवडत. असाच नेहमी खर्च करतोस का तू?”

सुजित चिडून म्हणाला, ” हो. याहून जास्त सुद्धा. मला रहावं लागतं बरं असं. ऑफिस मध्ये सतत परदेशी लोक येत असतात, मीटिंग्ज असतात. माझे हे शूज पण नऊ हजाराचे आहेत बरं का ”

“हो का? मला असलं आवडत नाही. माणसानं साधं रहावं अशा मताची आहे मी. ”

सुजित म्हणाला, ”हो का? ते दिसलंच की. हा ड्रेस जो घातला आहेस ना तो अगदी वाईट गबाळा आहे. स्टिचिंग अगदी बंडल आहे. असेल तुमच्या गावाकडचा. खेडवळ दिसते आहेसच. ”

तिथल्या तिथे पाठ फिरवून सुजित घरी निघून आला.

घरी येऊन वैशालीला चिडून म्हणाला, ”आई, कसल्या ग मुली बघतेस आणि मला पाठवतेस त्यांना भेटायला? माझं लग्न नाही झालं तरी चालेल पण असली खेडवळ ध्यानं आणत जाऊ नकोस. कसला तो भिकार चुडीदार घालून आली होती. भयानक रंग आणि शिवलेला तरी किती गावरान. वर ओढणी.. शी”

आई बाबा हसले.

“हसू नको आई. काय ती पोरगी ग. अग, सीसीडी मध्ये कॉफीचं बिल आलं नेहमीसारखंच सातशे रुपये तर ही म्हणाली, त्यापेक्षा त्या समोरच्या उडप्याकडे चाळीस रुपयात येते कॉफी. आई, कृपा कर. असली मुलगी मला नकोय ”

सुजित तणतणत आत गेला.

आईबाबा म्हणाले, ”अरे मग तू स्वतः शोध की ऑफिस मधली तुझ्या पसंतीची. आमची परवानगी आहे की. उलट आमचा त्रास वाचेल रोज त्या मंडळात वेबसाईटवर पोरी शोधत बसायचा. ”

सुजित म्हणाला, “ हो. त्या तर एक से एक नकचढ्या. या खेडवळ मुलीपेक्षा उलटीच तऱ्हा त्यांची. नुसत्या शॉपोहोलिक. जणू काही मॉडेलिंग करायला निघाल्यात. जाऊ द्या. असेल माझ्या नशिबात ते येईल समोर ग. नाही तर करणार नाही लग्न. त्यात काय मोठं? ”

सुजित चिडचिड करत झोपला आणि वैशाली आणि विनय हताश होऊन बघत राहिले.

वैशालीच्या खालच्या मजल्यावरचे प्रधान कायमचे परदेशात चालले होते मुलाकडे.

प्रधानबाई वैशालीकडे आल्या आणि म्हणाल्या, ”वैशाली, सगळ्यात आधी तुला विचारते. आम्ही हा फ्लॅट विकतोय. तुला हवाय का? आम्ही मुलाकडे कायमचे अमेरिकेला जातोय. बघ. विचार करून सांग. काय दोन लाख कमी दे पण तू घ्यावास असं वाटतं मला. ”

सुजित आणि विनय ऑफिस मधून आल्यावर वैशालीने हे त्यांना सांगितलं. ”अरे. मग घेऊन टाकूया की हा प्रधानकाकूंचा फ्लॅट आई. मस्तच आहे की.

बाबा, तुम्हाला काय वाटतं? आणि स्वस्तही पडेल आपल्याला. मला हसत लोन देईल माझी कंपनी.

देऊ काही दिवस भाड्याने. नंतर मग बघूया. यावर मात्र सगळ्यांचं एकमत झालं. दोनच महिन्यात ते डील करून आणि फ्लॅटचा ताबा देऊन प्रधान काका अमेरिकेला गेले देखील.

सुजित आईला म्हणाला” बघ आई. गोष्टी नशिबात असल्या की अशा समोर येऊन उभ्या रहातात बघ. स्वप्नात तरी वाटलं होतंका, अचानक आपला दुसरा फ्लॅट होईल? मस्त मिळाला ग आपल्याला. आणि स्वस्त पण. ”

वैशाली म्हणाली, ” हो रे सुजित. अशीच अचानक तुझी बायको समोर येऊन उभी राहील बघ. ” तथास्तु. असं म्हणत विनयने सुजितच्या डोक्यावर टपली मारली आणि सगळे हसायला लागले.

त्या दिवशी अचानक वैशालीकडे सुजाता आली.

”वैशू, तुम्ही म्हणे खालचा फ्लॅट पण घेतला विकत? भाड्याने देणार आहेस का? सहज विचारते हं. आग्रह नाही. माझी भाची मुंबईला आहे. ती पुण्यात एमएस करायला आलीय सर्जरीत. तिला दोन वर्षासाठी देशील का फ्लॅट रेंट ने? माझी बहीण श्रीमंत आहे आणि ही कविता फार हुशार डॉक्टर आहे बघ. तिला स्वतंत्रच फ्लॅट हवाय. तू म्हणशील ते भाडे हे लोक देतील. पण कविता इथे एकटीच रहाणार. तिचे आईबाबा जमेल तसे येत राहतील. बघ. विचार कर. विनय सुजितला पण विचार. ”

सुजाता निघून गेली.

सुजित म्हणाला, आई, तुला सांगणारच होतो, मला कंपनी सहा महिन्या साठी जपानला पाठवतेय. पुढच्याच महिन्यात मी सगळ्या फॉरमॅलिटीज करून जाईन. तर मग बघा. तुला योग्य वाटलं तर देऊन टाक खात्रीच्या लोकांना भाड्याने. ”

पुढच्याच महिन्यात पेठे नवरा बायको येऊन विनय वैशालीला भेटून गेले. फ्लॅट बघून गेले आणि म्हणाले,

”कविता आमची एकुलती एक मुलगी आहे. तिला एकटीला फ्लॅट मध्ये ठेवणं जरा अवघड वाटत होतं. पण तुम्हाला बघितल्यावर काळजी नाही. अर्थात ती डॉक्टर आहे आणि धीट पण आहे. तरीही लक्ष राहू दे”

सुजित जपानला निघून गेला आणि नंतर कविता पेठे खालच्या फ्लॅट मध्ये रहायला आली. दिवसदिवस ती हॉस्पिटल ड्यूटीत आणि अभ्यासात मग्न असायची आणि क्वचितच तिची गाठ पडायची वैशालीशी.

त्या दिवशी विनय ऑफिस मधून घरी आला आणि म्हणाला, अग वैशाली, ऑफिसचं ऑडिट आहे. मला आठ दिवस दिल्लीला जावं लागतंय. मी खूप सांगितलं की मुलगा नाहीये इथे आणि मग बायको एकटीच राहील घरी. पण नाईलाज आहे ग. आठच दिवसांचा प्रश्न आहे. का जातेस माहेरी? सांगलीला? तशीही तू बऱ्याच दिवसात गेलीच नाहीस की”

वैशालीला हसूच आलं. “अरे विनय, कमालच करतोस तू. मी काय लहान बाळ आहे का एवढी काळजी करायला? उलट मला मस्त स्वातंत्र्य मिळतंय त्याचा उपभोग घेऊ दे की. जा खुशाल. रोज आपण फोनवर असूच की. अरे आठच दिवस तर जातो आहेस ना? मी नाही जात आता सांगलीला. तू आलास की मग दोघेही जाऊया. जा तू. चल बॅग भरते तुझी मी.” दुसऱ्या दिवशीच विनय विमानाने दिल्लीला गेला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओळख – मूळ रशियन कथाकार : एंतोन चेखव – मराठी अनुवाद : सुश्री मेधा देव ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ओळख – मूळ रशियन कथाकार : एंतोन चेखव – मराठी अनुवाद : सुश्री मेधा देव ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

ओळख!!! ….

एका शहरात एका आडवळणाच्या बसस्टॉपवर आज मात्र दोघेच होते. एक साधारण सव्वीस – सताव्वीस वर्षांची प्रेग्नंट युवती आणि दुसर्‍या कोपर्‍यात एक वयस्कर साठी पासष्ठीकडे झुकलेला इसम. दोघेही बसची वाट पहात बसस्टॉपवर उभे होते.

तो इसम मघापासून त्या प्रेग्नंट युवती कडे नी तिच्या त्या गोल वाढलेल्या पोटाकडे बघत होता अतिशय कुतूहलाने!! ती युवती मात्र थोडीशी विचलित, पण तरीही शांत!

मघापासून बघत असलेल्या त्या वयस्कर इसमानी थोडसं पुढे होत धीरानेच विचारलं, ” अशा स्थितीत किती दिवस झाले तुम्हाला? ” त्या युवतीचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्याच विचारांत हरवून गेली होती. तिच्या मनावरचा ताण, तणाव तिचं ते फ्रस्ट्रेशन सगळं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होतं. त्या सगळ्या विचारात ती गढून गेली होती. आधी तिने काहीच उत्तर दिलं नाही, मग एकदम भानावर येत थोड्या शांततेने ती अगदी हळुवार पुटपुटली, ” तेवीस आठवडे झाले. “

त्या माणसाने पुन्हा थोडे कुतूहलाने विचारले,

” पहिलीच वेळ आहे? ”

” हो “, ती इतक्या हळू आवाजात म्हणाली की त्याला जेमतेमच ऐकू गेलं.

” काही काळजी नाही करायची, सगळं छान होईल, ” त्यानी तिला धीर दिला. आपला एक हात अलगद आपल्या पोटावर ठेवत तिने समोर कुठेतरी बघितलं. तिच्या डोळ्यात एकीकडे थोडीशी चमक तर दुसरीकडे येणार्‍या अश्रूंना थोपवण्याचा निष्फळ प्रयत्न, तरीही ती उत्तरली, “होप सो “.

तिच्याकडे बघत तो माणूस म्हणाला ” कधीकधी आपण आपल्यावरच्या ताण तणावामुळे खूप भारावून जातो, पार दबून जातो त्याच्याखाली, खूप बाऊ करतो त्याचा, खरंतर काहीच गरज नसते त्याची.

” असेलही तसे, ” दुःखी आवाजात ती पुटपुटते. तिचा तो दुःखद स्वर ऐकून त्याला तिची खूप दया वाटली. अतिशय करूण नजरेनी त्याने तिच्याकडे बघितले. ती खूप अस्वस्थ आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो हळुवार बोलला, ” तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. मनावर खूप ताण आलाय तुमच्या. तुम्हाला हे सारं सहन होत नाहीये. तुमचा नवरा तुमच्याजवळ नाही आहे का? ” तिने तितक्याच निर्विकारपणे पण तुटलेल्या स्वरात उत्तर दिले, ” त्याने चार महिन्यांपूर्वीच सोडलंय मला. ” ” का? “, त्याने विचारले. ” ते सांगणं फार क्लिष्ट, काॅप्लीकेटेड आहे”, ती म्हणाली.

” ओह, साॅरी, पण मग तुमच्या कोणी अगदी जवळचं, तुमच्या जिव्हाळ्याचे मित्र, मैत्रीण, कदाचित तुमच्या कुटुंबातील!! कोणीच नाहीये का तुमच्याजवळचं, तुम्हाला सांभाळून घेणारं? ” तो विचारतो.

ती एक खोल श्वास घेते नी म्हणते, ” नाही, मी एकटीच रहाते माझ्या डॅडी.. , साॅरी वडिलांबरोबर. पण ते आजारी असतात.

खरंतर आता ती खूप कंटाळलेली असते. बसलासुद्धा नेमका उशीर. दोघांचंही लक्ष आता बस येण्याकडे. त्यामुळे कोणीच बोलत नाही. काही काळ दोघांमधे शांतता. पण त्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न??

तो एकदम विचारतो, ” तुम्हाला लहानपणी वाटायचे तसेच आजही तुमचे वडील, डॅडी तुम्हाला तितकेच खमके.. तुम्हाला पूर्णपणे सांभाळणारे, आधार देणारे वाटतात? “.

” हो, ते आजही माझे आधारस्तंभ आहेत, ” ती सांगते.. आणि त्याचवेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटून ते गालावर ओघळतात. ” 

त्यांच्या ह्या अशा आजाराच्या स्थितीतही? “.. तो माणूस आश्चर्याने विचारतो, ” काय झाले आहे त्यांना? “

” त्यांना विस्मरण झालंय. आता काहीच आठवत नाही. ते हे ही विसरलेयत की मी कोण आहे? “.

ती एवढं बोलते तेवढ्यात बस येते. ती त्या बाकावरून उठते. आपल्याच विचारात तीन चार पावलं पुढे जाते नी एकदम आठवून मागे वळते… त्या वयस्कर माणसाच्या अगदी जवळ जाऊन प्रेमाने त्याचा हात आपल्या हातात घेत त्याला उठवत हळुवार म्हणते,

” डॅडी चला, आपली बस आलीय. “…….

मूळ रशियन लेखक : एंतोन चेखव 

अनुवाद : सुश्री मेधा देव

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्ट्रॉबेरी… भाग १ – अंग्रेजी कथाकार : जेम्स हेरियट ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ स्ट्रॉबेरी… भाग १ – अंग्रेजी कथाकार : जेम्स हेरियट ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मकरंद पिंपुटकर ☆

संतोष बारटक्के – गुरांचे डॉक्टर, मुक्काम पोस्ट सांगली. एका लग्नासाठी आज पुण्याला आले होते आणि त्यांच्या सरांचे सर डॉक्टर विष्णू दांडेकर यांना भेटण्यासाठी ते खास वेळ काढून आले होते. दांडेकर सरसुद्धा गुरांचेच डॉक्टर. ७० – ७५ वर्षे वय झालं होतं, परंतु अजूनही स्मृती पूर्णपणे शाबूत होती. त्यांची भेट झाली की त्यांच्या आठवणींच्या पोतडीतून काही ना काही किस्से ते काढायचे आणि त्यातून संतोषला खूप शिकायला मिळायचं.

आजही भेट झाल्यावर दांडेकर सर जुन्या आठवणीत रममाण झाले होते.

“१९८५ – ९० च्या सुमारासचा काळ. भारतामध्ये परदेशी गाई (अधिक दूध देणाऱ्या exotic breed च्या गाई) आणणं हे खूप common झालं नव्हतं. तुला तर माहितीच आहे की देशी गाय जर आठ ते दहा लिटर दूध दिवसाला देत असेल तर या परदेशी गाई जर्सी, एचएफ (होलस्टेन फ्रेशियन) या दिवसाला ८० लिटरपर्यंत दूध देतात. आजची आठवण ही त्या काळच्या अशाच एका परदेशी गायीची आहे, ” दांडेकर सर सांगत होते.

“तुकाराम भोसले हे सासवडचे प्रगतिशील शेतकरी. त्यावेळी तेसुद्धा माझ्यासारखेच २५ – ३० वर्षांचे असतील. आर्थिक परिस्थिती ठीकठाक, परंतु त्या काळातला एक प्रयोगशील आणि विज्ञाननिष्ठ असा शेतकरी. घरची थोडी गुरं होती परंतु जातिवंत गुरं नसल्याने दुधाचे उत्पन्न फारसं नव्हतं. एके दिवशी त्यांनी आवर्जून मला त्यांच्या शेतावरती बोलावलं, मी गेलो, गोठ्यात डोकावलो आणि पाहतच राहिलो. तिथे एक लालचुटूक रंगाची, अतिशय देखणी shorthorn प्रजातीची परदेशी गाय बांधलेली होती. मी अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहतच राहिलो, ” दांडेकर सर सांगत होते,

“मला तसं बघताना बघून तुकारामदादा हसले आणि म्हणाले, डॉक्टरसाहेब हिलाच तर बघायला तुम्हाला बोलवले आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसारखी लालचुटूक दिसते म्हणून आमच्या कारभारिणीने हिचं नाव स्ट्रॉबेरी ठेवलंय.

या अशा महागाच्या गाईसाठी दादांनी पैशांची सोय कुठून केली होती काही कल्पना नव्हती, कारण त्याकाळी अशा जातिवंत विदेशी गाई सहजी उपलब्ध होत नसत. मला कल्पना होती की माझी जबाबदारी वाढली होती, कारण आता हिचा औषधोपचार करण्याची जबाबदारी माझ्यावर येणार होती आणि ती आणि तिच्या कालवडी धष्टपुष्ट आणि दुभत्या कशा राहतील ही काळजीसुद्धा मलाच घ्यायची होती.

नंतर मग मला छंदच लागला, दर आठ दहा दिवसांनी त्या परिसरात गेलो की आवर्जून तुकारामदादांना भेटायचं आणि राजबिंड्या स्ट्रॉबेरीची भेट घ्यायची.

काही कारणाने महिनाभर माझं तिथं जाणं झालं नाही आणि एका दिवशी तुकारामदादांचा मला फोन आला. आवाज काही प्रसन्न वाटत नव्हता. थोड्याशा चिंतातूर आवाजात त्यांनी मला सांगितलं, “डॉक्टरसाहेब, जमेल तेव्हा चक्कर मारून जाल का? थोडं स्ट्रॉबेरीला तुम्हाला दाखवायचं होतं”.

स्ट्रॉबेरीचं काहीतरी बिनसलं आहे म्हटल्यावरती मी दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांच्या शेतावर गेलो. पाहिलं तर तसं सकृत्दर्शनी काळजीच काही दिसत नव्हतं. श्वास घेताना आणि सोडताना स्ट्रॉबेरीच्या घशातून थोडी घरघर ऐकू आल्यासारखं वाटत होतं, तिला लाळ गिळता येत नव्हती.

“डॉक्टर साहेब, दोन दिवस झालेत थोडं खाणं कमी झाल्यासारखं वाटतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय, काळजी वाटली म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं”, तुकारामदादा.

“हरकत नाही, बरोबर केलंत तुम्ही. वेळीच बोलवले आहेत. तिच्या खालच्या जबड्याच्या मागच्या बाजूला बहुधा काही गळू (post pharyngeal abscess) झाला असावा आणि त्यामुळे तिला थोडा श्वास घ्यायला त्रास होतोय असं वाटतं, ” मी त्यांना सांगितलं – दांडेकर सर सांगत होते. “तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक पोटीस बांधून देतो, ते तिच्या मानेला असं बांधून ठेवा. दोन मलमं देतो, ती दिवसातून तीन वेळा लावत जा आणि चोळत जा. म्हणजे ते गळू आतल्या आत फुटेल आणि तिला पुन्हा पहिल्यासारखं चांगलं वाटेल”.

मी त्यांना सोबत आणलेली औषधं दिली आणि तिथून निघालो. आठ दिवसांनी त्या भागात गेलो होतो म्हणून पुन्हा एकदा स्ट्रॉबेरीला भेटायला गेलो आणि गोठ्याच्या दारातच थबकलो. अख्ख्या तालुक्यातली देखणी गाय म्हणून जी प्रसिद्ध होती, ती आता चांगलीच हडकली होती, श्वास घेताना तिला लागणारा दम आणि घरघर इतक्या दूरवर ऐकू येत होती.

माझी चाहूल ऐकून तुकारामदादा तिथे आले आणि मला म्हणाले, ” डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगितलेला इलाज करत आहे पण अजून सुधारणा दिसत नाहीये तेवढी. ” तुकारामदादांनी बहुदा होती नव्हती ती सगळी पुंजी ही गाय विकत घेण्यासाठी पणाला लावली होती आणि तिच्या प्रकृतीची जबाबदारी माझ्यावर सोडली होती. आठ दिवस झाले होते तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, अन्न गिळायला त्रास होत होता, तिचं वजन निम्म्यावर आलं होतं, माझ्या औषधाचा काडीचाही उपयोग होत नव्हता आणि एवढं सगळं असतानासुद्धा माझ्यावर दोषारोप न करता, माझी अक्कल न काढता, तुकारामदादा फक्त एवढंच म्हणत होते, “अजून सुधारणा दिसत नाहीये. ”

त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी काही सार्थ ठरवत नव्हतो, परंतु तरीही ते मला बोल लावत नव्हते.

मी मग आणखीन काही स्ट्रॉंग औषधं लिहून दिली, काही इंजेक्शनं दिली. चार दिवसांनी पुन्हा आलो. पण या नव्या औषधांचाही काही उपयोग झाला नव्हता. स्ट्रॉबेरी आता अगदीच हडकली होती, तिच्या अंगावरचं मांस जणू गळून गेलं होतं, खाणंच नसल्यामुळे प्रकृती अतिशय बिघडलेली होती, हाडांचा अगदीच सापळा उरला होता म्हणाना.

मला काहीच सुचेना.

अशा परिस्थितीतसुद्धा तुकारामदादाच माझं सांत्वन करत होते. “डॉक्टरसाहेब, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुम्ही तुमच्यापरीने सगळे उपचार केले आहेत. नाही एखाद्या वेळेला यश मिळत, त्याला तुम्ही कसे काय दोषी ठरणार? ” 

हा मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार होत होता, त्यापेक्षा तुकारामदादांनी मला चार सणसणीत शिव्या घातल्या असत्या तर मला ते परवडलं असतं.

मी क्लिनिकला परतलो, डोक्यात एकच विचार की हे गळू फोडायचे कसे? हे गळू जर फुटले नाही तर स्ट्रॉबेरी अजून तीन चार दिवससुद्धा जगू शकेल का नाही याचाही भरोसा नव्हता.

दोन दिवसांनी मी चक्कर मारली, स्ट्रॉबेरी आता उभीसुद्धा राहू शकत नव्हती. ती कुशीवर पहुडली होती. प्रत्येक श्वास घेणं हे तिच्यासाठी संकटासमान होतं.

तुम्हा आजच्या मुलांना हे कळणार नाही, ” दांडेकर सर संतोषला सांगत होते, “क्षयरोग (TB) हा त्याकाळी अतिशय प्राणघातक रोग मानला जायचा. त्याच्यावरची औषधं तेव्हा परदेशातही धड विकसित आणि प्रचलित झाली नव्हती. त्यामुळे भारतात ही रामबाण औषधं यायला अजून बराच काळ होता.

त्याकाळी मला हे गळू फोडण्याचा एकमात्र उपाय सुचला तो म्हणजे शस्त्रक्रिया करून जबड्याच्या मागे एक छेद करून स्काल्पेलने (धारदार चाकू) ते गळू फोडणे. पण यात एक मोठ्ठा प्रॉब्लेम होता – मानेच्या – गळ्याच्या त्याच भागात दोन प्रमुख रक्तवाहिन्या वाहत असतात आणि स्कालपेलचं धारदार टोक जरासं जरी त्या रक्तवाहिन्यांना लागलं असतं, तर क्षणार्धात प्रचंड रक्तस्त्राव होऊन ती गाय जागीच मृत झाली असती.

मनाचाही हिय्या करून, दुसऱ्या दिवशी मी तुकारामदादांकडे गेलो. स्ट्रॉबेरीचे डोळे आता खोल गेले होते. प्राण्यांमध्ये, विशेषतः गाईंमध्ये डोळे असे खोल जाणं हे मृत्यू अगदी समीप आल्याचं लक्षण असतं. तुकारामदादांना मी बोलावलं. आज पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावरती हार आणि हताशा मला स्पष्ट दिसत होती. मी त्यांना सांगितलं, “दादा, या घडीला मला एकमात्र पर्याय दिसतोय, तो म्हणजे शस्त्रक्रियेने ते गळू फोडण्याचा. परंतु हे करताना रक्तवाहिनी कापली गेली तर स्ट्रॉबेरी जागच्या जागी मृत होण्याची भीती आहे. काय करू? ” 

तुकारामदादांनी माझ्याकडे पाहिले, “डॉक्टरसाहेब, असाही आता जेमतेम २४ तासांचा खेळ उरलाय. मला नाही वाटत आजची रात्र स्ट्रॉबेरी काढू शकेल. अशी ना तशी ती मृत्यू पावणारच आहे. तुम्ही शस्त्रक्रिया करा, मी तुम्हाला मदत करतो. ” 

मी तिची खालच्या जबड्याच्या मागची बाजू स्वच्छ करून घेतली आणि स्कालपेलने तिथे एक छोटंसं छिद्र पाडलं. परंतु तो धारदार स्काल्पेल त्या छोट्याशा छिद्रातून आत सोडण्याची मला हिम्मत होईना. मग, मी एक चिमटा (फोर्सेप) घेतला आणि तो त्या छिद्रातून आत सोडला. थोडं अंतर आत गेल्यावरती, त्या चिमट्याला काहीतरी अडथळा लागला. त्या अडथळ्यावरती मी चिमट्याने थोडासा जोर दिला आणि फोर्सेपवरून चिकट पिवळसर द्रव बाहेर येऊ लागला. बहुधा मी जिंकलो होतो, मी त्या गळूला फोडलं होतं. मी तो चिमटा रुंदावला. पू बाहेर येऊ लागला, दोन-तीन मिनिटं ती गळती चालू होती आणि मग पू बाहेर येणं थांबलं. आतून आलेली ती घाण बघून तुकारामदादांचे डोळे विस्फारले.

“डॉक्टरसाहेब, किती हो ही घाण. बरोबर आहे, एवढी घाण घशात असताना तिला त्रास होणारच. ” 

मी अँटीसेप्टिकने जखम स्वच्छ केली, ड्रेसिंग केलं, औषधं लिहून दिली. “दादा, उद्या सकाळपर्यंत आपल्याला स्ट्रॉबेरी छान उठून उभी राहिलेली दिसेल, ” दादांना सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या उत्कंठेने मी तिथे गेलो. गोठ्याच्या दारातच पडलेल्या चेहऱ्याने तुकारामदादा उभे होते. मी आत डोकावलो. स्ट्रॉबेरी अजूनही तशीच कुशीवर पडलेली होती, अजूनही श्वास घेताना घरघर ऐकू येत होती, डोळे तसेच निस्तेज होते.

“दादा, अजून आशेचा एक किरण आहे. कदाचित ते गळू इतकं जुनं झालं होतं की त्याच्या ज्या भिंती टणक झाल्यामुळे अजून तशाच राहिलेल्या आहेत पण २४ तासात त्या भिंती कोसळतील आणि तिचा श्वास घ्यायचा त्रास कमी होईल, असं मला वाटतं. ” मी म्हणालो.

“डॉक्टरसाहेब, मी आजवर कधी बोललो नाही परंतु स्ट्रॉबेरीला आणखीन त्रास द्यावा असं मला वाटत नाही. तुम्ही तिला इंजेक्शन देऊन तिची कायमची सुटका करा. ” तुकारामदादांकडून आलेलं हे उत्तर माझ्या हृदयात रुतलं.

मी त्यांच्या हातापाया पडून म्हटलं, “दादा एक दिवस द्या मला. आपण उद्या या विषयावरती बोलू. ” 

मी मुदत मागून घेतली खरी पण ती बरी होईल याबद्दल माझी मलाच खात्री नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी काही आतुरतेने दादांच्या गोठ्यावर गेलो नाही. हातातली कामं संपवत बाकीच्या पेशंटना तपासत मी दादांच्या शेतावर पोचलो, तेव्हा दुपार होऊन गेली होती. काय वाढून ठेवलं असेल पुढ्यात? सांगता येत नव्हतं. स्ट्रॉबेरीचा मृत्यू झाला असण्याचीच शक्यता खूप जास्त होती. ओढत्या पायाने मी गोठ्याच्या दाराशी गेलो आणि पाहतो तर काय!

स्ट्रॉबेरी चक्क उभी होती. समोर ठेवलेलं गवत मानेला हिसडा मारून खात होती. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. म्हणजे त्या गळूच्या भिंती कोसळल्या होत्या तर, श्वास घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

तिचा चेहरामोहराच बदलला होता अजूनही ती बुजगावण्यासारखी हाडांचा सापळाच दिसत होती, परंतु आता तिच्या डोळ्यात तेज होतं, तिला लाळ गिळता येत होती तिला भूक लागत होती, उभं राहण्याचा ताकद तिच्यात होती.

स्ट्रॉबेरी जिंकली होती, तुकारामदादा जिंकले होते, मी जिंकलो होतो.

एवढ्यात दादांनी माझ्या पाठीवर थाप मारली, माझे हात हातात धरले. त्यांनाही शब्द फुटत नव्हते, मलाही बोलवत नव्हतं.

दोन महिन्यानंतर काही कारणासाठी मी पुन्हा एकदा दादांच्या गोठ्यावरती आलो होतो आणि स्ट्रॉबेरी पुन्हा एकदा पहिल्या दिमाखात धष्टपुष्ट होऊन उभे होते.

दांडेकर सरांनी गोष्ट संपवली, “खरंतर ही शस्त्रक्रिया मी आधीच करायला हवी होती, परंतु मी हिम्मत दाखवली नव्हती. माझं नशीब चांगलं म्हणून स्ट्रॉबेरी वाचली. नंतर पुढे दहा एक वर्षांनी अँटिबायोटिक आले, आधुनिक शस्त्रक्रिया आल्या आणि अशा गळूमुळे गायींचा मृत्यू होणं जवळपास शून्यवत झालं. परंतु आमची स्ट्रॉबेरी मात्र मृत्यूच्या दाराला दारावर टकटक करून परत आली होती. ” 

संतोष ऐकत होता, आजही सरांच्या पोतडीतून आठवणींचा एक हिरा त्याच्या ओंजळीत पडला होता.

– क्रमशः भाग पहिला 

(जेम्स हेरियट यांच्या कथेचा स्वैर अनुवाद)

अंग्रेजी कथाकार : जेम्स हेरियट

स्वैर अनुवाद : श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares