मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फुले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “फुले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

किती छान लिहिले आहे फुलांविषयी. केवढी क्रियापदे की विशेषणे… कमाल आहे आणि प्रत्येक गोष्ट पटते!

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची!

कवी / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ताठ कणा एकच सांगतो… कवी : श्री प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. भारती माटे ☆

डॉ. भारती माटे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ताठ कणा एकच सांगतो… कवी : श्री प्रमोद जोशी ? प्रस्तुती : डॉ. भारती माटे ☆

वाफाळलेला भात नाही,

तव्यावरची नाही पोळी!

पुढ्यात घास, मागून शिरते,

बंदुकीची अज्ञात गोळी!

*

आवडलं तर मागणं नाही,

नावडलेलं टाकणं नाही!

ताठ कणा एकच सांगतो,

मृत्युसमोर वाकणं नाही!

*

डायनिंग टेबल सोडाच राव,

ताट नाही, पाट नाही!

मरण मात्र येतं तेव्हा,

एवढा मोठा थाट नाही!

*

पांढरं कफन आपलं आणि,

तिरंग्यातून त्यांचा देह!

प्रत्येक क्षण घाताचा पण,

मातीवरती सच्चा स्नेह!

*

आपण खातो खाण्यासाठी,

त्यांचं जितं ऱ्हाण्यासाठी!

बर्फात कुठलं ऊन पाणी,

रसिकपणे न्हाण्यासाठी?

*

सगळं नको तसंच असून,

तक्रारीचा नाही सूर!

दिवा तेवतो वंशाचा तो,

हजार मैल असतो दूर!

*

त्यांच्या डोळ्यात तेल तरी,

आपल्या डोळ्यात नसतं पाणी!

त्यांच्या घरात शोक म्हणून,

आपल्या ओठात सुरेल गाणी!

*

पगार मिळतो मरणासाठी,

अशी दुसरी नोकरी नाही!

थोडीतरी उब आहे,

अशी यांची भाकरी नाही!

*

“भारत माँ की जय! “म्हणताच,

रक्त आतूर सांडण्यासाठी! …

कवी : श्री प्रमोद जोशी 

देवगढ़ 

© प्रस्तुती : डॉ. भारती माटे

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – असाही एक जाब… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? असाही एक जाब… ? श्री आशिष  बिवलकर ☆

केएफसी  च्या दारात,

जाब विचाराया उभा कोंबडा |

विचार करुन आलाय,

इथेच घालीन आज मोठा राडा |

*

करोडो कुकूट वंशीयांना,

क्रूरतेने यांनीच केले हलाल |

माझ्या पूर्वजांना मारून,

झालेत सगळे मालामाल |

*

मेलेल्या कोंबड्याला,

नसते आगीचे भय |

जिवंतपणे करणार नाही,

यांची कसलीच गय |

*

जहरील्या विंचवाला देखील,

मारून सहज आम्ही पचवतो |

टोच मारून मारून आज,

केएफसी च्या म्हाताऱ्याला संपवतो |

*

आजवर झालेल्या अन्यायाविरुद्ध,

जोशात एल्गार मी इथेच पुकारणार |

आद्य क्रांतीकारक कुकुट म्हणून,

माझेच नाव भविष्यात झळकणार |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ निरोप… ☆ सुश्री शोभना आगाशे

(गौतमबुद्ध ज्ञानप्राप्ती साठी घर सोडून गेले त्या प्रसंगावर आधारित)

सखे प्रियतमे, तुला सोडुनि अज्ञात स्थळी मज आहे जाणे

प्रेमपाश गे तुझे तोडुनि, जाईन शोधित प्रकाश किरणे

*

सुखस्वप्नांच्या निद्रेमध्ये अशी अचानक थरथरसि का?

विरहवेदना भविष्यातली स्वप्नातच तू अनुभवसि का?

*

उषःकाली तू नेत्र उघडता, अजाणतेपणी मला शोधशील

सत्य क्रूर ते पडता कानी, तेच नेत्र अश्रूंनी भरतील

*

उदास नजर अन् ओठ गुलाबी, इच्छित बोलू, बोल प्रीतीचे

परंतु कांही बोलू न शकतील, जाणून घेता सत्य आजचे

*

प्रीतपाखरू उडून जाईल, लंघुनि सागर दिगंतराला

मागे सोडून सुंदर घरटे, सुखमय जरी त्या संसाराला

*

आकाशातून हाक येतसे, ज्ञानमार्गी मज प्रभू नेतसे

प्रेमपाश गे तुझे तोडुनि, जाईन जिकडून प्रकाश येतसे

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निशाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ निशाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कुरवाळावी उगीकशाला जखम मनाची भळभळणारी

सोसायाची करू तयारी करून सारी दुनियादारी

*

नकली झाला लळा जिव्हाळा लबाड करतो फसवाफसवी

त्यांना थोडी इजा करूया टपून बसले सर्व मदारी

*

बदलायाला हवेच आता लढायचे तर अन्यायाशी

सांगायाला नकोच काही जमेल तेव्हा घ्या तलवारी

*

आली आहे समोर संधी दयाघनाला विनवायाची

या नवसाची करू तयारी जमाव जमला देवादारी

*

केला आम्ही ठराव आहे इथेच बांधा मंदिर साधे

जाणे येणे नको कुठेही जमेल तेव्हा करतो वारी

*

सत्ता आहे तयार झाली विरोध नाही कोठे काही

सारे काही लुटायला ही करावयाची खास तयारी

*

दारावरची पुसा निशाणी जुनी कशाला ठेवायाची

आता स्वप्ने नजाकतीची बघू जराशी पुढची भारी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अप्सरा ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ अप्सरा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

गवाक्षात तू प्रभात समयी, गुंफीत होती वेणी

मुखचंद्रावर मेघ दाटले, भास होतसे मनी

ओले कुंतल, बिंदू टपकती, जल सिंचन भुवरी

मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||१||

*

काजळ नयनी, कुंकुम भाळी, कर्णफुले साजरी

उभार वक्षावरी रुळतसे, मोत्यांची गळसरी

मंद वायुने आंचल ढळता, नजर होई बावरी

मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||२||

*

उषा रंगली तव गालावर, कमल उमलले जळी

तेज तनुचे पाहून लाजे, न्हालेली चांदणी

केशकलापी तुवा खोवली, पुष्पे नानापरी

मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||३||

*

लावण्याची लतीका भासे, भूवरची अप्सरा

तुला घडवतां ब्रम्हाचा ग, मूड लागला खरा

प्रसन्न वदना, चंचल नयना, दृष्टी फेक मजवरी

मन झुरते अन् तुला बघुनी कविता स्फुरे अंतरी ||४||

*

केशभुषा तव सरे साजणी, बघशी जव दर्पणी

भास होतसे तुला मनाशी, कुणी बघते चोरुनी

नागीण काळी घेऊन हाती, वक्षावर झटकिशी

वेणीसंगे मला गुंफिले, चतुराई तव कशी ? ||५||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सम्यक अष्टमार्ग ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

सम्यक अष्टमार्ग ☆  डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

आज बुद्ध जयंती निमित्त तथागत गौतम बुद्धांनी शिकवण दिलेली चार आर्यसत्ये आणि सम्यक अष्टांगिक मार्ग विशद करणारा अभंग सादर करीत आहे.

☆ सम्यक अष्टमार्ग ☆

तृष्णे पोटी दुःख | पदरी ना सुख ||

वासनेची राख | करा मनी ||१||

*

चार आर्यसत्य | जाणून घ्यावीत ||

दुःखांचा तो स्रोत | ज्ञात होई ||२||

*

आयुष्याची गोष्ट | क्लेश दुःख कष्ट ||

करावाया इष्ट | अष्टमार्ग ||३||

*

सम्यक ती दृष्टी | ज्ञानाची हो वृष्टी |

शांतिपूर्ण सृष्टी | जोपासावी ||४||

*

संकल्प करावे | सम्यक असावे ||

दुजा रिझवावे | स्वार्थ नको ||५||

*

नच दुखवावे | मधुर बोलावे ||

मित ते वदावे | सम्यक वाचा ||६||

*

सम्यक कर्मांत | ना गुंती मोहात||

परक्याचे त्यात | चित्त नको ||७||

*

नको कुविचार | लावा त्यांसी घोर ||

नवे दुर्विचार | जन्मो नये ||८||

*

सुविचारा जोम | द्यावा नव्या जन्म ||

सम्यक व्यायाम | मनासाठी ||९|| 

*

आजीव सम्यक | समाजाशी एक |

हिताची ही भाक | मोडो नये ||१०||

*

जाणावे देहासी | दुःखासी, सुखासी |

ओळखी चित्तासी | स्वच्छ दृष्टी ||११||

*

हाव इंद्रियांना | विषय बंधना ||

नाहीसे करण्या | स्मृती सम्यक ||१२||

*

सम्यक समाधी | करुणेची वृत्ती ||

पंचमहाभूती | चित्ती असो ||१३||

*

तथागत येती | अवतार घेती ||

भूतलावरती | देती ज्ञान ||१४||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाट… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ पहाट… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

फुलले गुलाब ते पहाटे पहाटे

रुततील काटे पहाटे पहाटे

*

श्रावणी मधुमास ऋतुचा महिना

भ्रमर गुंजतो पहाटे पहाटे

*

जाळीदार पाने झडे श्रावण धारा

रंगली मेहंदी पहाटे पहाटे

*

खुलला आता शुभ्र शुक्रतारा

नक्षत्रांचे देणे पहाटे पहाटे

*

पश्चिमेचा वारा मेघ जर्द निळा

आळवीत मल्हार पहाटे पहाटे

*

वर्षात भिजे तनमन पक्षी

काढून नक्षी पहाटे पहाटे

*

भिजली माती हळदी उन्हाने

सर्वांगी सजली पहाटे पहाटे

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तू चालत रहा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “तू चालत रहा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

काट्यांवरून चालत रहा

थांबलास जरी तू तरी

ते टोचायचे थोडेच थांबणार आहेत

*

दमलास तरी पुढेच जात रहा

गेलास जरी मागे तरी

मैलाचे दगड दिसणारच आहेत

*

डोळ्यासमोर फुले ठेव

काटे जसे आहेत इथे तशी

कुठेतरी फुले असणारच आहेत

*

….. आणि चालण्यावाचून दुसरा मार्ग आहे का

कारण जेव्हा थांबतोस तेव्हाही,

एका थंड.. निर्जीव अवस्थेकडे

तू जातच असतोस …

*

त्यापेक्षा पुढेच जात राहून

एकदाच वळून बघायचे आहेस

अंतर दिसेल तुला सहस्रकांचे

बघ कुठून कुठे आला आहेस….

*

कळेल मग तुला आपोआप

काय तुझे कर्तव्य आहे

रस्ताच दाखवेल तुला की

कुठे तुला पोहोचायचे आहे….

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बकुळी… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि कवी : अज्ञात – प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे ☆ ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बकुळी… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि कवी : अज्ञात – प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

इवले इवले बकुळफुल

परंतु मंद गंधाचे भंडार

वळेसर बनुनी माळता

कचसंभारी अलंकार

*
प्रेमभारल्या आठवणींना

बकुळ फुलाची उपमा

दिवस कितीही लोटले तरी

गंध जाणिवाची प्रतिमा

*

काळजाच्या कुपीत जपती

मंदगंधीत आठवणींना

एकांती कुपी हळू उघडता

पुन्हः प्रत्यय येतो पुन्हा

*

 बकुळ फुलासम आठवणी 

वर्तमानी जगण्या बळ देती

हळू डोळे मिटून घेता

रिता खजिना आपुल्या पुढती

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

☆ बकुळी… – ☆ सुश्री कवी : अज्ञात – प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे

( २ )

बकुळीच्या झाडाखाली वेचत असता फुले 

मनाच्या ओंजळीतून खूप काही सांडले 

*

वेचता वेचता फुले लहानपण आठवले

उशीर झाला म्हणून पाठीतले धपाटे आठवले

*
एक फूल माझ्याशी व्यथा मांडून गेले 

तेव्हापासून मनात त्याचे दुःख कोरले गेले

*

हल्ली मला उचलून घ्यायचे कष्ट कुणी घेत नाहीत

तसंही मला माळण्यासाठी लांब केसही उरले नाहीत

*
दोन वेण्या घातलेली परकरी नात बघता बघता गायब झाली

सर ओवत बसलेली आजीही नजरेआड गेली

*
बरं झालं तू आलीस ओंजळ तुझी भरली 

कुणीतरी आमची दखल आज घेतली

*
माहिती आहे मला माझे जीवन एका दिसाचे 

पण व्रत मात्र आमचे अव्याहत सुगंध लुटायचे

*
रोज झाडावरून ओघळून जमिनीकडे झेपावतो

तेव्हाच मनात आमच्या विचार एक येतो

*

असो जीवन एक दिवसाचे, आपण सुगंध लुटावा

प्रत्येकाच्या आयुष्याचा माझ्यापरी बकुळ व्हावा 

*

सुकून गेलो तरीही गंध मागे ठेऊन जातो

प्रत्येकाच्या हृदयात अविरत मी दरवळतो

☆ ☆ ☆ ☆

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : मेधा सहस्त्रबुद्धे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares