मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घड्याळाचे महत्त्व… ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

स्वाती विकास गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ घड्याळाचे महत्त्व... ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

☆

घड्याळाचे काटे तीन…

तास, सेकंद आणि मिनिट!!

* 

धावती एकमेकापाठी सतत..

होती गाठीभेटी हलत डुलत!!

 *

सेकंद काट्याचा वेगच फार..

धावतो एका दमात तालेवार!!

 *

मिनिट काटा श्वास घेत घेत चालतो..

पण एका तालासुरात धावतो!!

 *

 तास काट्याचा वेग असा असतो..

जणू कासवाच्या गतीनेच तो चालतो!!

 *

भेटतात मधून अधून तास मिनिट एक दुसऱ्यास..

विचारतात ख्याली खुशाली एकमेकास!!

 *

माणसाच्या आयुष्यात घड्याळाचे महत्व..

जसे सूर्याचे पृथ्वीवर असे महात्म्य!!

 ☆

© स्वाती विकास गाडेकर

ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३ मो ९८३३७००५७१

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६७ आणि ६८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६७ आणि ६८  ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र.  ६७ – – 

घनःश्याम हा राम लावण्यरूपी ।

महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।

करी संकटी सेवकाचा कुडावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।।

अर्थ – –  पावसाळी मेघाप्रमाणे श्यामल वर्ण हा राम अत्यंत सुंदर आहे.  तो महा धैर्यवान आणि गंभीर असा असून अत्यंत पराक्रमी आहे.  संकटात आपल्या भक्ताचे तो रक्षण करतो.  अशा या श्रीरामाचे पहाटे चिंतन करावे.

(कुडावा – रक्षण)

विवेचन – – मनाच्या श्लोकांमधील श्लोक ६६ ते ७६ हा दहा श्लोकांचा एक वेगळा गट आहे.  याचे वैशिष्ट्य असे की या श्लोकांमध्ये समर्थ रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात.  आपल्याला त्याचे ध्यान करायला सांगतात.  परमेश्वराची निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ आणि सूक्ष्म मानली जाते.  परंतु सगुण भक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी सुलभ आहे.  म्हणून सुरुवात करायची झाली तर ती सगुण भक्तीपासून करावी.  या पृथ्वीवर आपण देह धारण करून आलो आहोत.  परमेश्वर देखील जेव्हा जेव्हा या धरतीवर अवतीर्ण झाला तेव्हा तेव्हा त्याने देह धारण करूनच आपले कार्य केले.  त्यामुळे परमेश्वराच्या सगुण रूपाची कल्पना करणे आपल्याला सोपे जाते.  म्हणूनच समर्थ या दहा श्लोकांच्या माध्यमातून श्रीरामाचे (परमेश्वराचे) सगुण रूप आपल्यासमोर ठेवताहेत.

श्रीरामाचे रूप कसे आहे? तर पावसाळी मेघाप्रमाणे सावळा.  ‘ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी… ‘ त्या सावळ्या रंगात विलक्षण सौंदर्य आहे.  वेद आणि पुराणात वर्णिल्याप्रमाणे आपले बहुतेक देव सावळेच आहेत.  विष्णू, विठ्ठल, श्रीराम हे सावळेच आहेत.  ‘ सावळे सुंदर, रूप मनोहर.  राहो निरंतर हृदयी माझ्या… ‘ असे संत तुकाराम म्हणतात.  तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.  श्रीरामाचे रूप वर्णन करताना समर्थांनी राम सुंदर आहे असे न म्हणता लावण्यरूपी असे म्हटले आहे.  ‘ लावण्य ‘ या शब्दात आणखी खोल, गहन असा अर्थ आहे.  त्यात माधुर्य आहे.  म्हणून संतांनी देखील विठ्ठलाला लावण्याचा गाभा असे म्हटले आहे.

या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत समर्थ श्रीरामाचे गुण वर्णन करताना म्हणतात, ‘ महा धीर गंभीर पूर्णप्रतापी. ‘ ‘ महा ‘ हे विशेषण धीर आणि गंभीर या दोन्ही शब्दांसाठी लागू होते.  तो अत्यंत धैर्यशाली आहे.  तसेच तो अत्यंत गंभीर देखील आहे.  इथे गंभीर या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही.  तर जीवनातील सर्व संकटांचा सामना करताना जे धैर्य आणि गांभीर्य लागते, त्या अर्थाने हा शब्द इथे आला आहे.  दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीरामांचे धैर्य आणि शौर्य सागराप्रमाणे अपार आहे.  सागराजवळ अमर्याद जलसाठा आहे.  पण तरीही तो आपले गांभीर्य म्हणजेच आपली मर्यादा सोडत नाही.  तसेच सर्वगुणसंपन्न श्रीराम आहेत.  ते पूर्णप्रतापी आहेत म्हणजे अत्यंत पराक्रमी आहेत.  श्रीराम म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, धैर्य आणि गांभीर्य, पराक्रम! असे अनेकविध गुण त्याच्या ठिकाणी वसतात.

अशा या धीर गंभीर आणि पूर्णप्रतापी श्रीरामांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सेवकाच्या संकटात धावून जातात, त्याचे रक्षण करतात.  ते भक्तवत्सल आहेत.  ज्या ज्या भक्तांनी संकटकाळी त्यांचा धावा केला, त्यांच्या साहाय्याला ते तात्काळ धावून गेले आहेत.  पण परमेश्वरावर दृढ श्रद्धा हवी.  त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती करावी लागते.  अनन्यभावाने म्हणजे ‘ हे परमेश्वरा, मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही.  तूच माझे सर्वस्व आहेस. ‘ अशा प्रकारची वृत्ती हवी.  श्रीरामांचे किंवा श्रीकृष्णाचे भक्त हे अशा प्रकारचे होते.  हनुमंताला तर एका रामाशिवाय दुसरे काहीच नको होते.  अशा या रामाचे (भगवंताचे) पहाटे चिंतन करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत.

रात्रीची शांत निद्रा आटोपली की पहाटेच्या वेळी आपले मन एखाद्या नदीच्या डोहासारखे शांत असते.  पाणी जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसते.  त्याचा तळ दिसतो.  पहाटेच्या वेळी अशा शांत आणि इतर विचारांची गर्दी नसलेल्या मनात रामाचे चिंतन करावे.  त्याचेच प्रतिबिंब आपल्या मनात पडावे.  सकाळ जर अशी पवित्र आणि सुंदर झाली तर दिवसही चांगला जाईल.  आपण जेव्हा त्याचे चिंतन करू तेव्हा त्याचे रूप आणि गुण आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.  आपली सकाळ मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्याने बऱ्याच वेळा होते.  त्यातील अपघात, खून, दरोडे, अत्याचार, राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप इ.  नकारात्मक बातम्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात न करता श्रीरामाच्या चिंतनानेच करावी.

स्वसंवाद – – 

१) माझ्या दिवसाची सुरुवात कोणत्या विचारांनी होते? चिंतेने की चिंतनाने?

२) पहाटेच्या शांत वेळेत मी स्वतःसाठी आणि भगवंतासाठी काही क्षण राखून ठेवतो का?

३) संकटसमयी माझी भिस्त भगवंतावर असते का?

४) मी दिवसभरात जास्त कोणत्या गोष्टी मनात साठवतो? नकारात्मक बातम्या की सकारात्मक चिंतन?

५) रामाचे धैर्य, गांभीर्य आणि करुणा हे गुण माझ्यातही यावेत असे मला वाटते का? (क्रमशः)

===== 

श्लोक क्र.  ६८ – – – 

बळे आगळा राम कोदंडधारी ।

महां काळ विक्राळ तोही थरारी ।

पुढे मानवा किंकरा कोण केवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।।

अर्थ – – धनुष्य धारण केलेला राम हा पराक्रमाने आगळावेगळा आहे.  सर्व प्राणिमात्रांचा विनाश घडवून आणणारा महाकाळ सुद्धा या रामापुढे थरथर कापतो.  तर अशा या रामापुढे (भगवंतापुढे) सामान्य माणसाची काय कथा? म्हणूनच प्रभात समयी रामाचे चिंतन करावे.

(कोदंडधारी – धनुष्य धारण केलेला, महाकाळ – काळाचाही काळ जो अखिल विश्वाचा विनाश घडवून आणतो, किंकर -दास/सेवक, केवा – महत्व)

विवेचन – – समर्थ या श्लोकाची सुरुवात करताना ‘ बळे आगळा राम कोदंडधारी ‘ असे म्हणतात.  श्रीरामाने कोदंड म्हणजे धनुष्य धारण केले आहे.  त्याच्या धनुष्याचा टणत्कार ऐकल्यावर काळाचा देखील थरकाप होतो.  सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी श्रीरामाने धनुष्य धारण केले आहे.  समर्थांच्या काळात जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले होते, तेव्हा सगळा समाज दुर्बल झाला होता.  गुलामगिरीची वृत्ती निर्माण झाली होती.  अशा वेळी समर्थांनी या धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श समाजापुढे ठेवला.  तेव्हा साहजिकच श्रीरामाची केवळ पूजा न करता त्याचे गुण देखील अंगी बाणवणे आवश्यक ठरते.  म्हणूनच तर ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ असे समर्थ म्हणतात.

श्रीराम महापराक्रमी तर आहेच पण तो ‘ बळे आगळा का? ‘ तर ज्याची भिती कळीकाळालाही वाटते असा राम आपल्या शक्तीचा उपयोग सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी करणारा आहे.  ज्यांच्याकडे शक्ती, सामर्थ्य आहे असे बरेचसे लोक अनादिकालापासून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. रावणाजवळही सामर्थ्य होते, पण त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला.  महाभारतात देखील कंसाने आपल्या शक्तीच्या साहाय्याने समाजातील सज्जनांना त्रास दिला. आज समाजात ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती आहे अशी बरीचशी मंडळी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात.  म्हणून श्रीराम ‘ बळे आगळा ‘ आहे.

जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे.  काळ हा सर्वशक्तिमान आहे.  सामान्य माणसासाठी यम म्हणजे काळाचेच एक रूप.  सामान्य माणूस यमाचे नुसते नाव जरी काढले तरी घाबरतो.  पण ज्याला सर्वच घाबरतात असा काळ देखील भगवंतापुढे थरथर कापतो.  तर सामान्य माणसाची त्यापुढे काय कथा? म्हणून आपण जर अनन्यभावाने भगवंताची आराधना केली तर अशा सर्वशक्तिमान काळाच्या कचाट्यातून, मरणाच्या भीतीतून देखील तो आपल्याला मुक्त करील.  जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करील.  मग काळाचा प्रभाव आपल्यावर राहणारच नाही.  तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामांच्या गुणांचे चिंतन कर.

स्वसंवाद – – 

१) मी श्रीरामाची भक्ती करताना केवळ पूजा करतो, की त्याच्या गुणांचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतो?

२) माझ्याकडे असलेली शक्ती, ज्ञान, पैसा, पद किंवा अधिकार मी इतरांच्या हितासाठी वापरतो का?

३) माझ्या जीवनात “बळ” म्हणजे काय? इतरांवर प्रभाव टाकणे की स्वतःवर संयम ठेवणे?

४) माझ्या दिवसाची सुरुवात प्रभाती सकारात्मक चिंतनाने होते का?

– क्रमशः श्लोक श्लोक ६७ आणि ६८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पहिली सर… – कवी : भालकवी ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

श्री मंगेश जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पहिली सर… – कवी : भालकवी ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

☆

 आळसावलेली सकाळ कशी चिंब भिजून गेली होती,

आज माझ्या सोबतीला पावसाची पहिली सर होती …

 *

थेंब एका लयीमध्ये तडतड ताशा वाजवीत होते,

अंधारलेल्या अवकाशाला आणखीन गडद करत होते,

हात पसरून त्या थेंबांना झेलायची इच्छा होती,

आज माझ्या सोबतीला पावसाची पहिली सर होती …

 *

दाटलेल्या ढगांनी आकाशी काळी नक्षी काढली होती,

क्षितिजावर शुभ्र बगळ्यांची माळ संथ सरकत होती,

काळ्यावर पांढरे करण्याची निसर्ग किमया और होती,

आज माझ्या सोबतीला पावसाची पहिली सर होती …

 *

मधमाती मारव्याचा कोमल रिषभ मनात हुरहूर जागवित होता,

असोशीने पाहिलेल्या वाटेची परत आठवण देत होता,

बाहेर घडणारी ओली किमया आतून भिजवून जात होती,

आज माझ्या सोबतीला पावसाची पहिली सर होती …

  ☆ ☆ ☆ ☆

कवी : भालकवी

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०० – जागा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव #३००  – विजय साहित्य ?

☆ जागा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

विषय : माझा गाव

 (वृत्त : लवंगलता – मात्रा विभाग : ८-८-८-४ = २८)

☆

गावासंगे नाळ जोडली शिवार माझी आई

वेशीवरची, दाट बाभळी, आठवणींची शाई…!१

*

गावदेवता नव्या मंदिरी वाट पाहते जेव्हा

उरूस जत्रा, जमतो मेळा, माळावरती तेव्हा…!२

*

सहा ऋतूंचे, सहा सोहळे, पार वडाचा पाही

नदी किनारी,औदुंबर तो,‌ सवे‌ ऋतूंच्या राही…!३

*

घरे गावची, नटली थटली, शहरी वारा, प्याली

सुख सोयींनी, रमा पाहुणी, वाजत गाजत आली…!४

*

शाळा,रस्ते , ग्राम चावडी, कात टाकली वाटे

जुन्या नव्याची, ऊन सावली, उरात क्षणभर दाटे…!५

*

रूप बदलले मम गावाचे, नसे बदलली,माया

परस्परांच्या, दिठी मिठीला आतुर होते, काया…!६

*

जितराबाने, भरला गोठा, दुध दुभत्याने,चरवी

सणवाराला,आपुलकीने, भरून जाते पडवी…!७

*

अजून येतो, वास फुलांना, साद घालती वाटा

अजून येते,धावत कोणी, रूतता पाई काटा…!८

*

संस्कारांची, जुनाट वसने, गावकुसावर, मुरली

पाय धुळीच्या, पायघड्यांवर, माया ममता,उरली…!९

*

गाव घराचे,नवीन वासे, माणुसकीचा धागा

अजून ठेवली मम गावाने, हृदयामध्ये जागा…!१०

☆

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाडांनो तुमच्यासाठी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ झाडांनो तुमच्यासाठी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

☆

होउन कोवळी उन्हे

पानांचे करीन सोने.

झाडांनो तुमच्यासाठी.

*

होउन सुगंधी वारा

मोहरुन पर्णसंभारा.

झाडांनो तुमच्यासाठी.

*

होउन पक्षी उन्मुक्त

गाईन छंदमुक्त.

झाडांनो तुमच्यासाठी.

*

होउन चंद्र पूनवेचा

वर्षाव करीन चांदण्याचा.

झाडांनो तुमच्यासाठी.

*

होउन पाऊस थेंबथेंब

भिजवीन अंग चिंब.

झाडांनो तुमच्यासाठी.

*

होउन शिशिर अंतरीचा

ऋतू खास पानगळीचा.

झाडांनो तुमच्यासाठी.

*

होउन झाड जगेन

मैत्रेयाचे भान ठेऊन.

झाडांनो तुमच्यासाठी.

 ☆

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरपूरचे वर्णन

संत तुकारामांच्या पाच हजाराहून अधिक अभंग असलेल्या या गाथेत आपण त्यांनी हाताळलेले विविध विषय आजपर्यंत पाहिले, त्यावर विचार केला आणि जमेल तेवढा अभ्यास केला. पंढरपूर हे तुकारामांचे माहेर, माऊली विठ्ठलाचे निवासस्थान! माहेर कोणाला प्रिय नसते? तुकाराम महाराजांनाही ते अत्यंत प्रिय! अशा त्यांच्या या माहेराचे वर्णन महाराजांनी अनेक अभंगातून केल्याचे गाथा वाचताना लक्षात येते. अशाच माहेरच्या वर्णनाच्या आणि मोठेपणाच्या काही अभंगांचा आपण आज परामर्श घेऊया.

पांडुरंग कुठे, कसा आणि कशासाठी उभा आहे, हे तुकाराम महाराज सामान्य माणसाला सांगत आहेत. ते म्हणतात,

 आता उघडी डोळे/ जरी अद्यापी न कळे/

 तरी मातेचिया खोळे/ दगड आला पोटासी/

 मनुष्य देह ऐसा निध/ साधीलते साधे सिद्ध/

 करुनी प्रबोध/ संत पार उतरले//

 नाव चंद्रभागे तिरी/ उभी पुंडलिकाचे द्वारी

 * कर धरूनिया करी/ उभा उभी पालवी*//

 * तुका म्हणे फुकासाठी/ पायी घातलीया मिठी*/

 होतो उठा उठी/ लवकरीच उतार//

या अभंगातून सामान्य संसारी माणसाला ते डोळे उघडायला सांगतात. तुला काहीच कसे कळत नाही, खरोखरच तुझ्या आईच्या पोटी तू दगड म्हणूनच जन्माला आलास का? असा प्रश्न त्याला विचारतात. ते म्हणतात, ” अरे तुला माणसाचा जन्म मिळाला आहे, त्याचा तू सदुपयोग का करून घेत नाहीस? या देहात तुझी सिद्धी करून घेशील ती तुला साधेल, ” असा बोध करून संत स्वतः विवेक करून संसाराच्या पार उतरले आहेत. तुला तरायचे असेल तर एक नौका आहे, ती चंद्रभागेच्या तिरावर पुंडलिकाच्या दारात कमरेवर हात ठेवून उभी आहे, आणि ती सर्वांना उभ्या-उभ्याच बोलावीत आहे. या नौकेला कोणत्याही प्रकारचे भाडे मोजावे लागत नाही. एकनिष्ठ भावाने देवाच्या पायाला मिठी घातल्यास या भवसिंधुतून पार पडता येते. ” थोडक्यात काय तर पंढरपुरासी, चंद्रभागेच्या काठी पांडुरंग प्रपंचाची नौका पार करून देण्यासाठी भक्तांच्या सेवेला हजर आहे.

महाराजांचा विठ्ठल चरणी किती हा दृढ विश्वास आहे, हे या अभंगातून सहज समजते.

रे नामाची भरली पेठ/ वाहती वाट मार्ग/

वघेची येती वाण/ अवघे शकुन लाभाचे//

अडचणी केल्या दुरी/ देण्या उरी घेण्याच्या/

तुका म्हणे जोडी झाली/ ते आपुली आपणा//

या अभंगात पंढरपूरचे वर्णन करताना महाराज म्हणतात–

पंढरी ही भक्तांना इनाम म्हणून मिळालेली पेठ आहे. या पेठेत भक्तांचे थवेच्या थवे आहेत, तिकडे जाण्याचे मार्गही भक्तांनी भरलेले आहेत

(आषाढी- कार्तिकी वारीचा यात संदर्भ असावा) या पेठेत सर्व काही उपलब्ध आहे. लाभाचे शकून भक्तगणांना होतात. भक्तांच्या देण्या घेण्याच्या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत.. लाभ करून घेतला, जे जे या पंढरपुर क्षेत्री गेले, त्या सर्वांना फायदा झालेला आहे.

अनुपम असे कार्तिकी वारीचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करतात.

कार्तिकीचा सोहळा/ चला जाऊ पाहू डोळा*/

आले वैकुंठ जवळा/ सन्निध पंढरीये//

पीक पिकले घुमरी/ प्रेम न समाये अंबरी/

अवघी मातली पंढरी/ घरोघरी सुकाळ//

चालती स्थिर स्थिर/ गरुड टकयांचे भार/

गर्जती गंभीर/ टाळ श्रुती मृदुंग//

मिळाली या भद्र जाती/ कशा आनंदे डुलती/

शूर उठावती/ एक एक आगळे//

नामामृत कल्लोळ/ वृंदे कोंदली सकळ/

आले वैष्णव दळ/ कळी काळ कापती//

आज करिती ब्रह्मादिक/ देखुनी वाळवंटीचे सुख/

धन्य धन्य मृत्यू लोक/ म्हणती भाग्याचे कैसे//

स्मरण मुक्ती वाराणसी/ पितृ ऋण गया नासी/

धार नाही पंढरीसी/ पायापाशी विठोबाच्या//

तुका म्हणे आता/ काय करणे आम्हा चिंता/

सकळ सिद्धीचा दाता/ तो सर्वथा नुपेक्षी//

कार्तिकीच्या वारीचे वर्णन करताना सोबतच्या भक्तांना उद्देशून म्हणतात,

चला हो आपण हा वारीचा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहू या. या पंढरपुरात प्रत्यक्ष वैकुंठ आपल्याजवळ आले आहे. हरी नामाचा घोष आसमंतात घुमतो आहे, हेच मोठे पीक पिकले आहे. प्रेम आकाशात मावेनासे झाले आहे. हरीच्या प्रेम भावनेने सर्व पंढरपूर दुमदुमले आहे. घरोघरी परमार्थाचा सुकाळ चालू आहे. वैष्णव जन आनंदाने भजन करत हळूहळू थांबत थांबत चालत आहेत. त्यांनी गरुडचिन्हे असलेले ध्वज धारण केले आहेत. टाळ, मृदुंग, एकतारी, वीणा यांच्या साथीने श्रीहरीच्या नामाची गर्जना चालू आहे. मोठमोठे हत्ती गजदळात जसे डोलत असावेत, तसे एकाहून एक श्रेष्ठ विष्णू भक्त आघाडीवर चालत आहेत. भक्त जन समुदाय हरिनामाच्या अमृतघोशाने न्हाऊन निघाला आहे. विष्णू भक्तांचे हे सैन्य पाहून कली आणि काळ थरथर कापत आहेत. पंढरीच्या वाळवंटातील भजनाचे सुख आपल्याला मिळावे अशी सर्व देवांची इच्छा आहे. मृत्युलोक धन्य आहे, तेथील लोक भाग्यवान आहेत. काशीमध्ये मरण आले तर मुक्ती मिळते, पण या पंढरपुरात सर्व काही रोखीने इथेच मिळते. मग चिंता कशाची?

हा संपूर्ण अभंग वाचताना आपणही त्या वारीचाच एक भाग आहोत अशी भावना दृढ होते आणि देवाच्या द्वारी मुक्ती मिळाल्याचा पराकोटीचा आनंद मिळतो.

हे भू वरील वैकुंठ कसे आहे ते आता तुकारामांच्या वाणीतून ऐकूया.

जया दोषा परिहार/ नाही नाही धुंडीता शास्त्र/

ते हरती अपार/ पंढरपूर देखीलिया//

ज्या दोषांची प्रायश्चित्ते कोणत्याही शास्त्रात सापडत नाहीत, अशी पातके जरी हातून घडली तरी नुसत्या पंढरपुराच्या दर्शनाने ती नाहीशी होतात असा महिमा आहे.

धन्य धन्य भीमातीर/ चंद्रभागा सरोवर/

पद्म तिर्थी विठ्ठल वीर/ क्रीडा स्थळ वेणू नाद//

सकळ तीर्थांचे माहेर/ भू वैकुंठ निर्विकार/

नामाचा गजर/ असूर काळ कापती//

पंढरपूर हे भूतलीचे वैकुंठ आहे, सर्व तीर्थांचे जन्मस्थान आहे, तेथे कोणताही विकार नाही, तेथे हरी नामाचा गजर होतो त्यामुळे असुरांना, कळी काळाला कंप सुटतो.

नाही उपमा द्यावया/ समतुल्य आणिक ठाया/

धन्यवाद जया/ जे पंढरपूर देखती//

या क्षेत्राला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. ज्यांना ज्यांना पंढरपूरचे दर्शन झाले, ते सर्व धन्य होत.

उपजोनी संसारी/ एक वेळ पाहे पा पंढरी/

महादशा कैची उरी/ देवभक्त देखीलिया//

जन्माला येऊन एकदा तरी पंढरीचे दर्शन घ्यावे. येथील पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्या दर्शनाने महापातके नष्ट होतात.

ऐसी विष्णूची नगरी/ चतुर्भुज नर नारी/

सुदर्शन घरटी करी/ रीघ न पुरे कळी काळा//

ते सुख वर्णावया गती/ एवढी कैची मज मती/

जे पंढरपुरा जाती/ ते पावती वैकुंठ//

अशी ही विष्णूची नगरी आहे. तेथील स्त्री-पुरुष चतुर्भुज संपन्न आहेत. सुदर्शन त्यांचे रक्षण करीत आहे, त्यामुळे काळाला इथे प्रवेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पंढरपुराचे सुख वर्णन करण्याइतकी बुद्धी मजपाशी नाही. जे पंढरपुरास जातात त्याला वैकुंठप्राप्ती होते.

तुका म्हणे या शब्दांचा/ जया विश्वास नाही साचा/

तो अधम जन्मांतरीचा/ जया पंढरी नावडे//

त्यांचे असे म्हणणे आहे की या गोष्टींवर ज्यांचा विश्वास नाही आणि ज्यांना पंढरीची आवड नाही तो पूर्वजन्मीचा अधम होय.

तीर्थ केली कोटीवरी/ नाही देखिली पंढरी/

जळो त्याचे ज्यालेपण/ न देखेची समचरण//

योग याग अनंत केले/ नाही समचरण देखिले/

तुका म्हणे विठ्ठल पाई/ अनंत तीर्थे घडली पाही//

पंढरपूरचा महिमा महाराज सांगत आहेत. कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या तरी ज्याने पंढरी पाहिली नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही

(आग लागो त्याच्या जगण्याला) कारण विटेवरी पांडुरंगाच्या समचरणांचे दर्शन ज्यांना लाभले नाही त्यांनी कितीही योगयाग केले तरी सारे व्यर्थ आहे. एका पांडुरंगाच्या चरणस्पर्शातच अनंत तीर्थे केल्याचे पुण्य आहे.)

क्रमशः… २७ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ४ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ४ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

श्लोक ३१ ते ४० 

☆

श्ववृत्तिव्यासङ्गो नियतमथ मिथ्याप्रलपनं

कुतर्केश्वभ्यासः सततपरपैशुन्यमननम् ।

अपि श्रावं श्रावं मम तु पुनरेवं गुणगणा-

नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम् ॥ ३१॥

*
विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं

न याभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः ।

अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो-

र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः ॥ ३२॥

*

विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः

पतन्ति द्राक् पापा जननि नरकान्तः परवशाः ।

विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ जनपदे

न यत्र त्वं लीलादलितमनुजाशेषकलुषा ॥ ३३॥

*

अपि घ्नन्तो विप्रानविरतमुशन्तो गुरुसतीः

पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकम् ।

विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा-

मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः ॥ ३४॥

*

अलभ्यं सौरभ्यं हरति सततं यः सुमनसां

क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतहृदाम् ।

त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्

पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम् ॥ ३५॥

*

कियन्तः सन्त्येके नियतमिहलोकार्थघटकाः

परे पूतात्मानः कति च परलोकप्रणयिनः ।

सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयं

जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः ॥ ३६॥

*

भवत्या हि व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्

परित्राणस्नेहः श्लथयितुमशक्यः खलु यथा ।

ममाप्येवं प्रेमा दुरितनिवहेष्वम्ब जगति

स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः ॥ ३७॥

*

प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटा-

तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसन्तानविधुतिः ।

बिलक्रोडक्रीडज्जलडमरुटङ्कारसुभग-

स्तिरोधत्तां तापं त्रिदशतटिनीताण्डवविधिः ॥ ३८॥

*

सदैव त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं

यदि त्वं मामम्ब त्यजसि समयेऽस्मिन्सुविषमे ।

तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते

निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा ॥ ३९॥

*

कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः

पुरारेः प्रेङ्खन्त्यो मृदुलतरसीमन्तसरणौ ।

भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा

करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः ॥ ४०॥

☆

मराठी भावानुवाद – – 

सारमेय वृत्ती ठेवुन मी सैरभैर सर्वदा

असत्य भाषण कुतर्कामध्ये गर्क राहतो सदा

सज्जन दुर्जन चाड न ठेवुन करितो परनिंदा

नाम तुझे मी सदैव घेतो पाही मज एकदा ॥३१॥

*

सुंदर नेत्र आकर्ण जरी नाही तुला देखिले

लाभ न काही विशाल नयनी तन्वांग न पाहिले

तव लहरींचे सुरेल संगीत निनादूनी आले

कर्णांची अवहेलना तयांनी ना ऐकले ॥३२॥

*

द्युलोकी जाती पुण्यात्मे बसुन विमानात

पापि जनास स्थान असते केवळ नरकात

कृपेने तुझ्या गङ्गामाते पाप नष्ट होत

तुझा वास नाही तेथे जीवन अशूभ होत ॥३३॥

*

ब्रह्महत्या मद्यपी तथा सुवर्ण शर्विलक

गुरुपत्नीची अभिलाषा मनि असे घोर पातक

अंत्यकाळी परि विलीन होती तव प्रवाही माते

सुरांसि वाञ्छित मोक्षाचे पद प्राप्त होई त्यांते ॥३४॥

*

वियोगशस्त्राने घायळ त्याचा घेई प्राण

अलभ्य सुगंध पुष्पांमधला सदैव ने चोरून

वायूदेवे चंचल लहरी करी त्यांही पावन

पवित्र होती तव लाटांनी विश्वलोक तीन ॥३५॥

*

परोपकारासाठी जगती कितीक या जगतात

पावन आत्मे परलोकाची आंस मनी धरतात

इह-परलोक भार तुजवरी निःशंके सोपवी

जगन्नाथ सुखनिद्रा शांत निवांतशी घेई ॥३६॥

*

नीच पतित पाखंड्यांचे तू करी परित्राण

त्याग तयांचा करणे तुजला होते महाकठीण

पापाचरणी अतीव जडला मोह माझिया मनी

त्याग करणे अशक्य असतो स्वभाव सकल जनी ॥३७॥

*

नर्तन करता त्रिपुरारीच्या जटा जशा विखुरल्या

जटांवरी लहरींच्या तुझिया भुजा रुंद पसरल्या

गुंफेतुनी जलडमरू करतो ध्वनी मधुर सुरेल

शिवतांडव हे दुःख जगाचे खचीत हटवील ॥३८॥

*

विसंबुनीया आर्द्र दयेवर उभा तुझ्या पायाशी

त्यागशील जर मजशी माते घात विश्वासासी

त्रैलोक्यासी तव करुणेचा असे महाऽधार

निष्कपटी करुणेचा होइल उध्वस्त आधार ॥३९॥

*

अर्धांगिनी प्रेमाची वसते वामांगी शिवाच्या

सवति मत्सरे क्रोधित किरणे नयनातून उमेच्या

प्रकट जाहल्या जटेजटेतुन लहरी गङ्गेच्या

विजयी होवो लोभस लहरी देवी भागिरथीच्या ॥४०॥

– क्रमशः भाग चौथा  

☆ ☆ ☆ ☆

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ परागीभवन… ☆ वर्षा बालगोपाल ☆

वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? परागीभवन… ?  वर्षा बालगोपाल ☆

☆

फुलात पराग 

परागात मिलिंद 

मकरंद वेडा 

सरसावला 

*

मकरंदाची साथ 

परागाची वात 

बसताच त्यावर 

पकडला 

*

अद्वैत मिलन 

करी परागीभवन 

नवीन पराग 

जन्मा आला 

☆

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नदीवर सांज ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ नदीवर सांज… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

☆

लाटांवर लोळते सांज

केशर नदीत बुडते

काठावरच्या झुडपांची

दाट सावली लांबते

 

सांज शांत नदीवरी

लाट केशरी थरथरते

काचोळ्या पदरात नदी

निळी निळाई झेलते

 

निळ्या नभीचे केशर

थरथर लाटांवर सांडते

बगळ्यांची रांग तेंव्हा

उंच नभात रेंगते

 

येतो किनारा अंधारून

पाखरू घरटं शोधते

नदीकाठच्या झुडपात

सांज किलबिल गाते

 

मंद पावलात सांज

अंधाराला बिलगते

शुभ्र चांदणे झेलण्या

नदी भारावून जाते

☆

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बिब्याच्या बिब्बोट्या फुला… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बिब्याच्या बिब्बोट्या फुला… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत (वर्ण संख्या १६ यति ८ व्या अक्षरावर))

☆

सांगते मी ऐक ना रे बिब्याच्या बिब्बोट्या फुला

गोड झाला तुझ्यामुळे माझा आठवण झुला ||ध्रु||

*

शाळेतून येता येता दर्शन तुझे व्हायचे

पाच दहा रुपयात तुला विकत घ्यायचे 

टोपलीत हसणाऱ्या पिवळ्या धम्मक डुला 

गोड झाला तुझ्यामुळे माझा आठवण झुला ||१||

*

थंडीमध्ये येतोस तू शरिरास उब देण्या

संक्रांतीच्या वाणामध्ये मान पहिला रे घेण्या 

औषधाचा खजिनाच तू केलास की रे खुला

गोड झाला तुझ्यामुळे माझा आठवण झुला ||२||

*

पिवळसर पांढुरकं रूप तुझं हिरवट

जपलय मनात रे नाही झालं धुरकट

अजूनही आठवून हसते रे मी तुला

गोड झाला तुझ्यामुळे माझा आठवण झुला ||३||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares