मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८४ ☆ प्रार्थना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८४ ?

☆ प्रार्थना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(काव्य प्रकार – सायली)

मी

करते आहे

प्रार्थना तुझी देवा

सफलता मिळो

आज !

*

आहे

आजारी पती 

वैद्यकीय इलाजा

यावी सफलता

लवकर !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागतांना या कळ्यांना… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ जागतांना या कळ्यांना... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

जागताना या कळ्यांना दु:ख कधी ना वाटते

खेद नाही, आयुष्य यांना अल्पसे जरी लाभते

फुल होता रुप आणि रंग सारे उधळिती

गंध लाभे जीवनाला जरी पाकळ्या कोमेजती

बोध घ्यावा, तत्त्व ऐसे जीवनाचे सांगती

कर्म मोठे! व्यर्थ सारे सांगणे,

मी पहा जगलो किती

मी पहा जगलो किती.

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – तेथे नाही उरो आले अवतार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – तेथे नाही उरो आले अवतार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

तेथें नाही उरों आलें अवतार /

ते पामर जीव किती//१//

*

विषयाचे झणी व्हाल लोलिंगत /

चेवलिया अंत न लगे मग //२//

*

वाहोनिया भार कुंथसील ओझे /

नव्हे तेचिं माझें थीता त्याग //३//

*

तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज /

संती केशीराज साधिकेला//४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

येथे धरतीवर अवतार घेऊन आलेले भले भले देव दानवही कायमचे टिकले नाहीत.मग पामरांची तरी येथे काय गनती. विषयसुखात कायमचे गुंतून पडाल‌ तर अंतकाळ वाट्याला येणार हे ठरलेलेच आहे. मग तेच ओझे पाठीवर वहात कुंथत बसाल. खरेतर ते ओझे तुम्हाला पेलण्या सारखे नाही. त्याचा तर तुम्ही त्यागच करायला पाहिजे.

येथे मोठमोठ्या व्यक्ती, दानव,देव,इतकेच नव्हे तर देवानी घेतलेले दशावतारही टिकले नाहीत. त्यांचे नाव तरी त्यांच्या मागे किती काळ टिकले? मग तुम्हीच सांगा त्यांच्या समोर सरळ साध्या भोळ्या जीवांची ती कथा काय,?

तेथे किती आले आणि किती गेले. कसे गेले. याची मोजदाद तरी आहे काय? हेच येथले खरे सत्य आहे हे लक्षात ठेवावे. विषय सुखात आणि विषय उपभोगात गुंतण्यासाठी काही कष्ट पडत नाहीत आणि त्याला फारसा वेळही लागत नाही. तेथे गुंतल्यावर दुसरे काही करणेही सूचत नाही. सत्कर्मे करण्यासाठी वेळच मिळत नाही. विषयसुखांचे जडशीळ ओझे अंगावर पडल्यामूळे तेथेच तुम्ही कुंथत बसता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सामान्य माणसाने जेवढे ओझे पेलेल तेवढेच उचलावे. जे जमेल तेवढेच करावे, शोभेल तेच ल्यावे. व पचेल तेच खावे. असा मोलाचा सल्ला तुकाराम महाराज आपल्याला आवर्जून देताना दिसतात.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०० ☆ जोखड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०० ?

☆ जोखड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मानेवरती कायम येथे जोखड आहे

जगण्यासाठी तरी चालली धडपड आहे

*

सारे प्राणी गुलाम आणिक अल्ला मालिक

जनास प्यारा कुरबानीचा बोकड आहे

*

माय समजुनी काल पोसली गाय गोजिरी

कसाबास ती देऊ झाली भाकड आहे

*

कष्टकरी मी वतनदार तो ऐट मिरवितो

डोळ्यांवरती श्रीमंतीची झापड आहे

*

विहिणीसाठी केवळ मी तो तुपात तळला

तरी म्हणाली किती वाकडा पापड आहे

*

पिंडीवरती जल चढवावे भाव मनीचे

खांद्यावरती श्रम श्रद्धेची कावड आहे

*

रोकड म्हणजे जीवन आहे त्याच्यासाठी

माणुसकी सोडून वागतो हेकड आहे

अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुलक्षणे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सुलक्षणे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

ऊन्हाळे-पावसाळे व्यर्थ सारे

स्वतःचे लौकिकात सार्थ खरे.

आदर न ठेवावा कुणाचा कधी

श्रीमंतासारखे जगावे बरे.

*

माघार न घ्यावी प्रतिष्ठा धर्म

हरवावे प्रत्येका शक्ती शौर्ये.

करावा संघ गट जगताना

खेचावीत दुजांचे बल धैर्ये.

*

हिच निती सत्य यशस्वी मंत्र

सृजनाचा वेडा क्षणात हारे.

जातीचा बघावा माणूस नित्य

जातीच्याच माणसा हार-तुरे.

*

माणूसकी काय न देई सर्व

ताठ मानेने जगावे ही सूत्रे.

किंमत का द्यावी कुणा उगाची

निंदा करता जिंके सत्तांतरे.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘दुर्गा..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘दुर्गा..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

🌻 दुर्गा 🌻

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवीच्या नवरात्र उत्सवाचा, घटस्थपनेचा दिवस. पुढील नऊ दिवस विश्वात देवीचा शक्तिरूपाने वावर होणार. तिचा ‘उदो, उदो’ होणार. भुत्ये नाचणार, दिवट्या फुरफुरणार, कवड्याच्या माळा चकाकणार, संबळी कडाडणार! संध्याकाळी अंगणात मुली – लेकी – सुनांच्या भोंडल्यांचे फेर धरले जाणार. आपले दुखरे गुढगे सांभाळत दुडक्या चालीनं आज्या सुद्धा त्यात सहभागी होणार!

आईचे आगमन होणार, ती आमच्या घरी उत्सवाला येणार. भक्तांची केवढी लगबग, धांदल उडालीय पहा.

उठा, सिद्ध व्हा, चला

दुर्गैचे स्वागत करायला!॥

🌻 राग दुर्गा🌻 कवी: दिवाकर बुरसे 🌻 

🌻 

सडे कुंकवाचे दारी, उठा चला घाला

उत्सवास येई “दुर्गा”, चला स्वागताला॥ ध्रु॥

*

हरित वसन ल्याली, माथा शोभतो किरीट

मुक्त कुंतलांची शोभा, मेखला कटीस

हळद-कुंकुमाचे लेपन लाविले कपाळा

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥१॥

*

विमल हास्य वदनी विलसे धवल चंद्रिकेचे

विलग अधर, त्यातुन दिसती रदन हीरकाचे

पुष्ट उरोजांवर रुळती कनक, रत्नमाला

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥२॥

*

अष्टभुजा धारण करिती विविध आयुधांना

चक्र, खड्ग, अंकुश, पाश,चाप, बाण, भाला

शीघ्र गती चाले माता जणू अग्निज्वाला!

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला॥३॥

*

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आत्मचिंतन… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आत्मचिंतन…? श्री आशिष  बिवलकर ☆

राहिला केर काढायचा,

काळजाला किती कोपरे |

शोधत त्यात स्वतःला,

आपल्या घरात आपणच उपरे |

*

शुचिर्भूतता दाखवता दाखवता,

आतून छळते ती मलीनता |

दाखवायचे आणि खायचे,

यातच मानते ती धन्यता |

*

तिमिर सारता सारता,

दिव्याखाली लपतो अंधार |

चमचमत्या पदराला,

सलते टोचणारी किनार |

*

चढवित एक एक मुखवटे,

खरा चेहरा हरवून जातो |

एकांताच्या दर्पणात पाहता,

आपणच विन्मुख होतो |

*

परमार्थ साधता साधता,

न कळत चिकटतो स्वार्थ |

धर्मरक्षणाच्या रणांगणावर,

सगेसोयरे यात अडकतो पार्थ |

*

अंतरात्म्यातला श्रीकृष्ण,

पदोपदी गीताच सांगत असतो |

कर्तव्याच्या पुण्यपथावर,

मोहपाशात आपणच फसतो |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मौन… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “मौन…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

सोबत असे तरी, स्वप्नी येतेस तू

स्वप्नातही मौन का धरतेस तू?

*

असेल तुला बोलायचे मनातले

अबोला कधी कुठे सोडतेस तू?

*

अमाप व्यग्रता तुला कर्तव्यातले

गंध फुलांचा कसे एकवटतेस तू?

*

जबाबदारीची अगणित फुले काटे

उन्हाळे सक्षमतेने कसे पेलतेस तू?

*

अमाप रंग तुजपाशी फुलपाखरांचे

किती काटेरी झूल पांघरतेस तू !

*

विषय अनेक स्पर्श वाटती तोकडे

किती सांगोपांग जगणे रचतेस तू !

*

तृप्त जरी वाटे,ओठांवरील हसणे

विपत्तीत नभाशी, मैत्री करतेस तू

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ वसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सोंग सजवणे जमले नाही

मन तेथे ही झटले नाही

*

वसा घेतला जनसेवेचा

तेच व्यसन मग सुटले नाही

*

हवे तेवढ्या धावपळीने

मन केंव्हाही शिणले नाही

*

लक्षठरवले अजिंक्य व्हावे

मनाप्रमाणे घडले नाही

*

अवघड जगणे केले सोपे

म्हणून कोठे अडले नाही

*

भाळा वरती भाग्य कोरले

पण ते केंव्हा दिसले नाही

*

रान पाखरू भिरभिरणारे

थव्यात कुठल्या घुसले नाही

*

रामायण तर वाचून झाले

राम पचवणे जुळले नाही

*

स्वाभिमान तो प्राण वाटतो

पण मीपण ही सरले नाही

*

जगलो जगणे परावलंबी

स्वतंत्र घरटे विनले नाही

*

कळले नश्वर जगणे आहे

मग मरणाने छळले नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझिया गीतात वेडे… कवी : सुरेश भट ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी

? काव्यानंद ?

☆ माझिया गीतात वेडे… कवी : सुरेश भट ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆

“माझिया गीतात वेडे

दुःख संतांचे भिनावे”

ही कविता मी रसग्रहणासाठी निवडली आहे.

मा. सुरेश भट हे प्रामुख्याने गझल मराठीत रुजविणारे कवी म्हणून ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांचे काव्य देखील उत्कृष्ट असेच आहे. आपल्या कविते मधून मानवतेची मूल्ये त्यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडली आहेत. हा कवी माणूस म्हणून अतिशय संवेदनाशील होता. मराठीत काव्य लिहिताना संतांचे खूप मोठे योगदान आहे हे त्यांना मान्य आहे. म्हणूनच ते म्हणतात…

“माझिया गीतात वेडे, दुःख संतांचे भिनावे

वाळल्या वेलीस माझ्या, अमृताचे फूल यावे”

संत नेहमीच समाजाचे मार्गदर्शक असतात. आपले जीवन वेचून संघर्ष करून विरोधाचे दुःख पत्करून, ते  समाजाचे दीपस्तंभ होत असतात.अशाच अनुभूतीतून संत काव्य ही निर्माण होत असते‌ सुरेश भटांचीही तीच इच्छा आहे की मी संतांप्रमाणे जगेल तेव्हाच ते माझ्या काव्यात येईल.आज मी वाळल्या वेलीप्रमाणे आहे. संतांइतका संवेदनाशील नाहीय. पण मी तसे व्हावे आणि त्याला अमृताचे फूल यावे म्हणजेच मी संतांसारखे दुसऱ्यांचे दुःख जाणणारा झालो तर त्यानंतर मी लिहिलेले वाङ्मय अमृताच्या फुलाप्रमाणे अमर राहील. खरंच त्यांचे काव्य तसेच आहे.

म्हणूनच ते पुढे म्हणतात की आशयाचे खूप मोठे आकाश माझ्या छोट्या शब्दांमध्ये भरले जावे. मी जर समाजाशी एकरूप होऊन जगत नसेल तर आता तरी तसे जगावे समाजाचे  देणे फेडले तर जीवनाच्या माधुर्यात मी न्हाऊन निघेल.

याच काव्यात ते पुढे म्हणतात ज्ञानेश्वरांच्या दुःखांची स्पंदने माझ्या वक्षात यावी आणि इंद्रियां वाचून इंद्रिय मी भोगून घ्यावी. म्हणजेच ज्ञानदेवांनी अतिशय कमी वयात खूप मोठी दुनिया बघितली दुःख जगले व त्यातून त्यांचे अक्षर वाङ्मय जन्माला आले तेच मला पण प्राप्त व्हावे असे कवी म्हणतात.

पुढे ते म्हणतात नामदेवांप्रमाणेच जीवनाच्या सगळ्या अंगांना मी स्पर्श करावा एकनाथांनी त्यांच्या पंगतीला  मला बसवून घ्यावे व नामदेवांप्रमाणे सर्व समावेशक चविष्ट गोपालकाला माझ्या जीवनाचा व्हावा.

कवी पुढे म्हणतात की तुकाराम महाराजांचे डोळे मला प्राप्त होऊन रंजला गांजल्यांचे दुःख मला बघता यावे. व तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे……

“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

उदास विचारे वेच करी”

असा चोख व्यवहार माझ्यात भिनावा व शेवटी हे ह्या कवितेत ते  पांडुरंगाची विनवणी करतात आणि म्हणतात की पांडुरंगा  मी वर मांडलेले मागणे तुला मागितले आहे. त्याशिवाय आणखी मला काहीच नको. फक्त एवढीच मागणी तू पूर्ण कर.आणि ही मागणी तू पूर्ण करावी यासाठी मी तुझ्या दारात दंगा मांडलेला आहे.

या पूर्ण काव्यातून कवींची स्वतःची जीवनमूल्ये आपल्याला जाणवतात समाजातली रंजल्या गांजल्यांची दुःखे त्यांनी नेहमी आपलीच मानली व तसेच जगले. याचाच परिपाक म्हणून त्यांनी शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

सुरेश भटांच्या कवितेत आशयाचे सौंदर्य तर असतेच. परंतु त्यांच्या बहुतांश कविता वृत्तबद्धच असतात.आपल्या अतिशय सरळ भावना व्यक्त करण्यासाठी  त्यांनी या काव्यात अतिशय सरल असे मनोरमा हे वृत्त निवडले आहे. या काव्याची भाषा मधुर तर आहेच.परंतु अतिशय सरल सोपी कुणालाही समजेल अशी प्रासादिक आहे. अतिशय सुंदर शब्दांची पखरण काव्यात त्यांनी केली आहे.

जसे की…

” स्पंदने ज्ञानेश्वरांची माझिया वक्षात यावी “

“माझ्यासाठी जगाचे जाते रोज  घर्घरावे “

” ह्याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा”

अशा अतिशय सुंदर व सरल शब्दातून काव्य मधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच गझल व काव्यामध्ये येणारी ही वैशिष्ट्ये या काव्यातही येतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काव्य लिहिताना ते वृत्त अतिशय काटेकोरपणे व नीट सांभाळतात. त्याचप्रमाणे काव्यात ऱ्हस्व दीर्घाच्या चुका अजिबात नसणे हे देखील त्यांच्या काव्यातले एक वैशिष्ट्य आहे. याही काव्यात आपल्याला ते जाणवते.

प्रामुख्याने ते गझलकार आहेत.या गझल काराबद्दल शेवटी मी असे म्हणेल की……

“दिली भटांनी मला ओसरी शिकणे कविता आहे

फुटकळ माझे, काव्य तयांचे तर बहुमोली आहे”

© सौ. ज्योती प्रकाश कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares