मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “भास आभास…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “भास आभास…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

यंत्रे आपुली दास की आपण त्यांचे दास.

काय खरे वा खोटे ही व्यक्ती की आभास.

*

आभासी दुनिये मध्ये रममाण जरी क्षणकाल.

विश्वास कुठे ठेवावा कितीतरी भेटले भास.

*

या यंत्रामधून पहातो अमर्याद आकाश.

पण हरवुन गेला कोठे मनातुनी विश्वास.

*

यंत्रात पाहतो दुनिया, रमतो मी तासंतास,

प्रत्यक्ष कुणी ना दिसती, ना ऐकू येती श्वास.

*

गप्पाष्टक येथे घडते, घडे चॅट संवाद,

तरीही होते मैत्री, तरी जागी होते आस.

*

हे सत्य असे की मिथ्या, आवाजांचेही भास.

आभासी दुनिये मध्ये, भासांचे ही आभास.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – आधारावाचुनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – आधारावाचुनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

आधारावाचुनी /

काय सांगशील कहाणी//१//

*

ठावा नाही पंढरीराव /

तोंवरी अवघेचि वाव //२//

*

मानिताहे कोण /

तुझे कोरडे ब्राह्मज्ञान //३//

*

तुका म्हणे ठेवा /

जाणपण एक सवा //४//

*

  – संत तुकाराम.

तुका म्हणे

सामान्यपणे माणसांची समजूत काय असते आणि त्याने ती कशी बदलायला पाहिजे याविषयी सांगताना तुकाराम महाराज स्वानुभवातून आपले विचार मांडताना म्हणतात. तुमच्या जवळ भक्कम आधार असल्या शिवाय तुम्ही कुठलीही कहाणी सांगू शकतनाही. हा वरवरचा अर्थ आहे. पण त्यातून त्यांना , “कोणत्याही बाबतीतले  तत्वज्ञान सांगताना तुमचा त्याविषयीचा परिपूर्ण अभ्यास असल्या शिवाय तुम्ही त्याविषयी काही ही बोलू शकत नाही किंवा मनघडंत कुठल्याही थापा मारू शकत नाही ” हे नेमके पणाने सुचवायचे आहे. पुढे ते म्हणतात “जोपर्यंत तुम्हाला पंढरीरायाच्या सामर्थ्याचे योग्य आकलन होत नाही तो पर्यंत तुम्हाला काहीही बोलण्यास वाव आहे .पण जेंव्हा पांडुरंग तुम्हाला परिपूर्णतेने कळेल तेव्हा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार कराल आणि कुठलीही वायफळ बडबड मुळीच करणाक नाही. जर विठ्ठलाच्या स्वभावाचे आणि त्याच्या गुणसंपन्न तेचे तुम्हाला आकलनच झाले नाही तर तुम्ही सांगत असलेले तुमचे कोरडे ब्रम्हज्ञान कोणीही ऐकून घेणार नाही. कारण या जगात असणारे अनेक शेरास सव्वाशेर तुम्हाला भेटतील. आणि तेव्हा तुमचे ब्राह्मज्ञान त्यांच्या समोर उघडे पडेल. याची जाणीव ठेवा .आधी तुम्ही पांढरीराया निट समजून घ्या आणि तो तुमच्यात आहे असे समजून वागा.म्हजे मग सगळेच सोईस्कर होईल.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६४ – विषय दुःख…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६४ – विजय साहित्य ?

☆ विषय दुःख…!

दुःख असे, पडसाद जणू, दैवी

सुरवात म्हणू की, गान भेरवी.. . !

*

होते पेरण, रोज नव्या दुःखाची

नको सांत्वना, नव्या जुन्या शब्दांची. . !

*

सुख पाहण्या, अधीर होते काया

सुखा भोवती, नव दुःखाची छाया. .. !

*

समाधान नसे, हे दुःखाचे, भोग

कुणी लावला, सुखा मागुती रोग. . . ?

*

दोन पदांचे, जगणे आयुष्याचे .

किती गुंतणे ? प्राक्तन ज्याचे त्याचे. . . !

*

नाही आणि आहे मधले जीवन.

आशा देतसे, दुःखाला आमंत्रण . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रीत तुझी माझी…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रीत तुझी माझीसौ. वृंदा गंभीर

( षडाक्षरी )

प्रीत माझी तुझी

अशी बहरावी

फुला परी वास

सुगंधित व्हावी….. 1

*

दिसावे कुणाला

हेवा हो वाटावा

प्रेमात रंगला

असचं म्हणावा…..2

*

भावना दिसाव्या

उरी उतराव्या

ओसंडून द्याव्या

व्यक्त त्या कराव्या….. 3

*

झालाचं उशिर

नातं दूर जातं

एकमेका धीर

दयाया कोण येतं…. 4

*

बंधने सुटावी

वेळ नको अशी

हात देना हाती

तुझी प्रीत कशी…… 5

*

का रे हा दुरावा

विरह नको तो

सामावून घेना

प्रिया त्रास होतो….. 6

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रूप गणेशाचे… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ रूप गणेशाचे ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गोड तुझे रूपlगोड तुझे ध्यानl

पहाताच मन lतृप्त होई ll१ll

*

लांब तुझी सोंडl आहे एकदंत l

मोदक हातातlदिसे तुझ्या ll२ll

*

रुळे पायापाशीlदुर्वांचा तो हारl

फुलांची बहारl जाई जुई ll३ll

*

दोंद तुझे मोठेlडोळे ते बारीकl

बदाम खारीक lतुझ्यासाठी ll४ll

*

मखरात शोभेl तुझी गोड मूर्तीl

गजानन स्तुती lमुखी येई ll५ll

*

गणेश पाहुणा lयेता मन भरेl

आनंदाचे झरे l मनी वाही ll६ll

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कर्णफुलांची वेल सुमंगल… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कर्णफुलांची वेल सुमंगल…  ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(पादाकुलक वृत्त – मात्रा:- 8+8=16)

कर्णफुलांची वेल सुमंगल

इकडे तिकडे वळसे घाली

नागमोडी ही चाल देखणी

गगन भेदण्या पहा निघाली

*

कृष्णकमळ हे लोभसवाणे

तंतू सारे शंभर कौरव

बीजांडकोश असे द्रौपदी

पुंकेसर दल म्हणजे पांडव

*

तीन किंजले होय सुदर्शन

ब्रह्मा विष्णू महेश पावन

शुभ शकुनाचे सुमन साजरे

उमलताच मग प्रसन्न श्रावण

*

रूप साजरे सौंदर्याचे

प्रेमाचे हे प्रतीक साजे

चरणावरती श्रीकृष्णाच्या

राखी फुल हे पहा विराजे

*

सुगंध देण्या रोज उमलती

निळी पांढरी लाल जांभळी

सहवासाने गोड हासते

कृष्ण सख्याची मूर्त सावळी

*

रिमझिमणाऱ्या पावस धारा

कृष्णकमळ हे त्यात पिसारा

मयुरपंख हा गोजिरवाणा

उमलून येतो पहा सरारा

*

टपटपणारे खळखळ मोती

साद मला हे अविरत देती

कृष्णकमळ हे मोह लावते

सूर निरागस कवेत घेती

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई गं आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल  ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आई गं आई… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

आई गं आई

एवढी का तुला घाई

पावसात हात धरून चाललीस तरातरा

मनी भूभू भिजतय बघ ना तू जरा ||

*

ज्ञानेश्वरांचे पसायदान तूच तर शिकवले

भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे सांगितले

मग मला या दोघांशी मैत्री करू दे

माझ्या छत्रीत दोघांना घेऊ दे ||

*

आता नको म्हणू मस्तीखोर

अगं मीच तुझा ना चित्तचोर

बघ तू माझे मित्र आपल्या बरोबर राहतील

पसायदान ते पण शिकतील ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८३ ☆ गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८३ ?

☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी मानले स्वतःला गंधाळता धुलीकण,

सारे समग्र जीवन केले तुलाच अर्पण

*

त्या पावसात जाता,वारा मुजोर झाला,

सारे ऋतू सुखाचे मी ठेवलेत तारण!

*

गेल्या बुजून तेव्हा साऱ्या वसंतवाटा,

मग शुष्क भावनांनी केली पुन्हा भलावण!

*

नाही,नको म्हणाले घेण्यास उंच झोका,

आकाश चांदण्याचे त्याने दिलेच आंदण!

*

आल्या फुलून बागा,वणवा विझून जाता,

आयुष्य सांजवेळी झाले कसे विलक्षण!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रे देवा गणेशा….! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ रे देवा गणेशा….! ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुला पहाता रे

दुःख जन्माचे विसरते

मनी भक्तीभाव

आत्म आनंदे पसरते

असे गोड रुप

श्रीगणेशा तुझेच देवा

विघ्नहर्ता नाव

शोभे शुभ-लाभाचा हेवा.

वक्रतुंड मुख

लंबोदर कृपेचा हस्त

मोदुक नि लाडू

नैवेद्य आराधका शिस्त.

सुर्यही आज्ञार्थी

तुझा अधिकार त्र्यैलोकी

प्रतिब्रम्ह मान

शिव-उमासूत श्रीमुखी.

मुषक सोबती

लालसा संयमी बोधक

अहंम हवन

चरणी पुजनी साधक.

ब्रम्हांडनायक

ओंकार स्वरुप सुंदर

आगमनी हर्ष

निरोपा दुःखाचा सागर.

मोरया गणेशा

सजीव निर्जीवा पावन

तुझीये आरती

संकट निवारी जीवन.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव /

आपणचि देव होय गुरु//१//

*

पढियें देहभाव पुरवी वासना /

अंती तें आपणापाशी न्यावें //२//

*

मागें पुढें उभा राहे सांभाळीत /

आलिया आघात निवारावे //३/

*

योगक्षेम त्याचें जाणे जडभारी /

वाट दावी करी धरूनियां //४//

*

तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनीं //

पहावें पुराणी विचारूनी //५//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

विठ्ठल हेच तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत, त्याच्यावरच त्यांचा दृढ विश्वास आहे. देवालाच ते आपले सर्वस्व मानतात. म्हणून विठ्ठल त्यांच्या मनीध्यानी सतत वास करत असतो. कारण देवावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे. आपल्या आराध्य दैवतांची स्तूती करतान ते म्हणतात. मी माझ्या विठ्ठलाचा माझ्या विषयीचा प्रेमभाव काय वर्णन करू. तोच माझा देव आहे आणि माझा गुरू सुद्धा तोच आहे. तोच सतत माझे निरीक्षण करतो,माझा देहभाव तोच ओळखतो. माझे मनही तोच वाचतो.व माझी वासना आणि माझी मनोरथे तोच पुरवतो. येवढे सगळे करून मला तोच माझ्या गुणदोषा सह आपल्या जवळही घेतो. तो माझ्या मागेपुढे सदोदित उभा असतो. माझ्यावर आललेल्या संकटांचे ही तोच निवारण करतो. माझा प्रतिपाळ ही तोच करतो. माझ्यावर आललेल्या बिकट परिस्थिती मुळे मी जर माझा स्वीकारलेला मार्गासोडून इकडेतिकडे भटकत राहिलो तर तोच माझा हात आपल्या हाती घेवून मला मार्गस्थ करतो. तो माझी सतत विचारपूस करतो. या गोष्टीवर ज्यांचा विश्वास बसनार नाही त्यांनी आपल्या पुराणातील दाखले शोधून ते वाचावेत. म्हणजे त्याना  तेथे याचे सबळ दाखले सहज मिळतील. व मग खात्री पटेल. महाराजांची देवावर नितांत श्रद्धा होती.जेव्हा देव आणि भक्त दृढ विश्वासाने व द्रढनिश्चयाशे परस्परांना जोडले जातात तेव्हाच मनातील द्वैत भाव नाहिसा होतो व ते समरूप होतात. पण ही स्थिती सहजासहजी प्रात्प होत नाही. त्यासाठी अंत:करणं शुद्ध ठेवून भक्ताला परमेश्वराच्या चरणी लीन होता आले पाहिजे. भक्ताला आपल्या मनो विकारांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares