मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असे हे मराठी प्रतिभावंत – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ असे हे मराठी प्रतिभावंत – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम व अफलातून किस्सा:

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत.

संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु. ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीच वातावरण होतं.

त्यावेळी साहीर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले- अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।

पु. ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवल आणि म्हणाले, “साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

मग साहीरजींनी तो शेर ऐकवला – 

“एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,

एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,

रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी। 

सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,

खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?

अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,

रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।”

… आणि साहीरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांनी तो पूर्ण शेर मराठी रुपांतर केलेला होता.

“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,

एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी

ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी 

सेजेशी समई मी लावू कशाला?

जुळत्या जीवालागी जळती कशाला?

अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,

रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”.

ह्यातील *’झुंझुरता’* ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा…

… आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु. ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

असे हे आपले मराठी प्रतिभावंत…

… एक नंबरी सोनेरी नाणं…

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गीतांजलीतील कविता वाचत असताना कवी आणि देव यांच्या भावनिक नात्यांतील वैविध्यतेचे पदर जसजसे उलगडत जातात तसतसा एक प्रश्न वाचकांच्या मनात रुंजी घालू लागतो; तो म्हणजे या दोघांचं नातं तरी कोणतं आहे? आणि आश्चर्य म्हणजे हाच प्रश्न टागोरांना देखील पडतो. गीत क्र. ७७ मधे ते देवाला म्हणतात, “तू माझा कोण आहेस? पिता आहेस? बंधू आहेस? सखा आहेस? तू आहेस तरी कोण? समजा मी तुला पिता मानलं तर या नात्यातला जो आदर आहे तो मला तुझ्यापासून लांब ठेवेल. मग मी तुझ्याजवळ कसा येऊ? तुझा हात कसा धरू? तुला जर सखा मानलं तर मी कायमचा तुझ्याजवळ राहू शकणार नाही. तुला जर बंधू मानलं तर माझं जे संचित आहे त्यात तुला वाटणी द्यावी लागेल. ती कशी देऊ? शेवटी कवी म्हणतो मी तुला सरळ माझं जीवन समर्पित करतो. म्हणजे या नात्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही कारण मग मी तुझ्याशी एकरूप होऊन जाईन. ”

देव पिता म्हणून:-

ते देवाला पिता मानून प्रार्थना करतात की जिथे मनात भीती नसेल, मान ताठ असेल, जिथे ज्ञान मुक्त असेल, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात मला घेऊन चल. तिथे सत्य, शांती, प्रेम, अहिंसा यांचेच राज्य असेल. (गीत ३५)

देव माता म्हणून:-

ते देवाला माता मानतात. त्यांना मातेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होते. पण त्यांच्या लक्षात येतं की, सुख, आनंद, कीर्ती, संपत्ती या गोष्टी तर तिनेच दिल्या आहेत. त्याच तिला कशा परत द्यायच्या. त्यामुळे ते म्हणतात, माझ्या दुःखावर फक्त माझी सत्ता आहे. म्हणून त्या दुःखाश्रूंची माळच मी तुला वाहीन. ती तुझ्या वक्षावर रूळत राहील आणि तुझ्या हृदयाशी हितगुज करेल. (गीत ८३)

देव बालक म्हणून:-

त्यांना कधी कधी देव हा बालकाच्या रूपातही दिसतो. कवीने सागर किनारी वाळूत खेळणाऱ्या बालकांना वैश्विकरूप दिले आहे. त्या बालकांच्या निरागसपणात कवीला देव दिसतो. बालकांच्या हास्यात, नृत्यात, गोबऱ्या गालात त्यांना देवाची किमया दिसते, निसर्ग दिसतो आणि तो सर्व व्यापी परमेश्वर भेटतो. (गीत ६०, ६१)

देव पती म्हणून:-

मधुरा भक्ती ही आपल्या अध्यात्मात महत्त्वाची मानली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभू! या भक्तीमध्ये देव प्रियकर म्हणजे जोडीदार असतो. कवी स्वतः पत्नीच्या भूमिकेत जाऊन प्रियकराच्या रूपात देवाला पाहतो. या कवितेत (गीत ५२) कवीला म्हणजे पत्नीला वाटतं प्रियकराच्या गळ्यात असणारा हार खूप सुंदर आहे. पण त्याला विचारायचं कसं, देतोस कां म्हणून? पण सकाळ झाल्यावर तिला वाटतं तो आपल्यासाठी काहीतरी आठवण म्हणून नक्की ठेवून जाईल. तो जाता क्षणी ती धावत शेजेकडे येते. निदान एखादं फूल, निदान फुलाची‌ पाकळी ठेवून जाईल. प्रत्यक्ष पाहते तो एक तळपणारी तलवार ठेवलेली असते. प्रेयसी/पत्नी (म्हणजे कवी) खूप घाबरते. पण तिच्या लक्षात येतं की ज्याअर्थी प्रियकराने दिलेली वस्तू आहे त्या अर्थी त्यामागे काहीतरी त्याचा उद्देश असेल. या तलवारीने आता आपल्याला पाश तोडण्याची भीती वाटणार नाही आणि एकदा पाश तोडले की आपण आपलं सगळं आयुष्य त्याच्यावर ओवाळून टाकू शकतो. तोपर्यंत ही तलवार जपून ठेवायला हवी.

(अपूर्ण, पुढील भागात)

—–

गीत : ८८

DEITY of the ruined temple! The broken strings of Vina sing no more your praise. The

bells in the evening proclaim not your time of worship. The air is still and silent about you.

In your desolate dwelling comes the vagrant spring breeze. It brings the tidings of

flowers ⎯ the flowers that for your worship are offered no more.

Your worshipper of old wanders ever longing for favour still refused. In the eventide, when fires and shadows mingle with the gloom of dust, he wearily comes back to the ruined temple with hunger in his heart.

Many a festival day comes to you in silence, deity of the ruined temple. Many a night of worship goes away with lamp unlit.

Many new images are built by masters of cunning art and carried to the holy stream of

oblivion when their time is come.

Only the deity of the ruined temple remains unworshipped in deathless neglect.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ८८

तुटल्या तारा अन् भग्न वीणा।

इथे न भाकित कोणी करूणा॥

*

पूजन, अर्चन कधी नसे जरी।

सहजच कोणी घंटानाद करी॥

*

भग्न तुझ्या या मंदिरी निर्जन।

उनाड वारा, बनुनी सज्जन॥

*

पुष्पांचा गंधीत निरोप आणी।

जी नच पडली तुझिया चरणी॥

*

जो होता कधी तुझा पुजारी।

कृपाप्रसादा वंचित तो मुरारी॥

*

मनःशांती त्या कुठे मिळेना।

म्हणुनि येई तुझिया स्तवना॥

*

येई परतुनि तो भग्न मंदिरी।

घेऊनि तशीच आर्तता उरी॥

*

संध्याप्रकाश अन् छाया जेंव्हा।

मिसळत धूलीकणांशी तेंव्हा॥

*

असो दिवाळी, दसरा, होळी।

कुणी न दर्शना ये वेळोवेळी॥

*

काळोख्या रात्री अंधारातून।

कोणी न लावी समई परतून॥

*

लबाड, व्यवहारी लोकांनी।

मंदिरे निर्मिली, जुनी त्यागुनि॥

*

विस्मरतील सारे, ती ही नंतर।

दुर्लक्षाचे दुर्लक्षित अंतर॥

*

भग्न न होई पुन्हा, भग्न ते।

मृतास पुन्हा, मरण न येते॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत : ८९

NO more noisy, loud words from me ⎯ such is my master’s will. Henceforth I deal in

whispers. The speech of my heart will be carried on in murmurings of a song.

Men hasten to the King’s market. All the buyers and sellers are there. But I have my

untimely leave in the middle of the day, in the thick of work.

Let then the flowers come out in my garden, though it is not their time and let the midday bees strike up their lazy hum.

Full many an hour have I spent in the strife of the good and the evil, but now it is the

pleasure of my playmate of the empty days to draw my heart on to him; and I know not why is this sudden call to what useless inconsequence!

—–

मराठी भावानुवाद : गीत : ८९

हळुवार सुरांनी, गाईन गाणी

बोल हृदीचे, गीतात गुणगुणी॥

*

नित्यच येथे चाले, देणे घेणे

मी परि जाईन, येता बोलावणे॥

*

ऐनपणाच्या भरात असता

साद तयाची, कानी घुमता॥

*

वसंत नसता, फुले फुलावी

मधु त्यातला, भ्रमरा खुणवी॥

*

काळ जातो, भल्याबुर्‍या कलही

सखा सौंगडी, भेटो लवलाही॥

*

असे अचानक त्याचे बोलवणे

असो सार्थ वा अर्थहीन भेटणे॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत ९०

ON the day when death will knock at thy door what wilt thou offer to him?

Oh, I will set before my guest the full vessel of my life ⎯ I will never let him go with empty hands.

All the sweet vintage of all my autumn days and summer nights, all the earnings and gleanings of my busy life will I place before him at the close of my days when death will knock at my door.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९०

पुसे मज आज, सखा पांडुरंग।

पाहुणा यमासम, येता दारी सांग॥

*

करिसि का स्वागता, तुझ्या घरी।

दडपुनि दार का, पाठवी माघारी॥

*

शिकवण हीच, देई मम संस्कृती।

पाहुणा न जाये, रिकाम्या हाती॥

*

दिस शरदाचे, ग्रीष्मातल्या रात्री।

गोड समजुनी, वाढीन मी पात्री॥

*

ठेवीन सामोरी आयुष्याचा पेला। 

कमाई नि कोठी देईन त्याजला॥

*

मृत्यूचे दूत, माझ्या दारी आले।

स्वागता तयांच्या, प्राण माझे दिले॥

*

– क्रमशः भाग ३०

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “रानभूल रानफूल बकुळ…” – लेखिका : सुचिता पाटील ☆ संग्राहिका / प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

 बकुळीची फुले वेचतांना कविता आठवते…

 या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया

 बकुळीचा गजरा आणि बकुळीचा अत्तर मला फार आवडत.

पहाट होताच मंद धुंद वाऱ्यातून एक एक पाकळी उमले चराचरात

 रंगमार्दव पिवळसर हिरवा

भ्रमरही भिरभिरती चाखावया मधुर मकरंद

कधीन हिरमुसता फुले फुलती *

 गंधीत व्हावी दुःखे अवघी

 रहावी सुखा सवे आनंदी

 

 ओच्यात वेचता नाजूक फुले

 ओंजळीत घेता गंधाने वेडावे मन

मोत्या सम नाजूक फुले सुरेख 

एकेक फूल ओवताना

बहरात येई गजरा

 जपून मनाच्या कुपीत त्याचा गंध

लावे त्याचा तो वेगळाच छंद

येता सर पहिली पावसाची बकुळही मोहरे भरभरून

राधा ही वाट पाहे माधव देईल मज कधी फुल

नाजूक पाकळीत वाटे नक्षत्र अवतरले धरेवर

बहरतो बारमाही, औषधीय गुणधर्म आयुर्वेदात

बारमाही फुलणारं औषधीय गुणधर्माचं आणि पावसाळ्यात अधिकच भरणार बकुळ.

या फुलाला मराठीत बकुळी मालवणी मध्ये ओवळा कोकणी ओमवाल अस म्हणतात तर हिंदीत मौलसरी, बंगाली बकुल, गुजराती बरसोळी तामिळ मगिळहंबू, आदिवासी वोवळ, कानडी मध्ये रंजक, मल्याळम इळन्नी, उर्दू किराकुली.

बकुळ वृक्ष 

बकुळीची फुले त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत मुलांना ही फुले गोळा करायचा छंद असतो त्याचबरोबर धार्मिक ग्रंथात या वृक्षाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे रामायण महाभारत यामध्ये याचे उल्लेख आहेतच पण बुद्ध, जैन धर्मीय सुद्धा या वृक्षाला पवित्र मानतात बकुळीची फुले सुकली तरी त्याचा सुगंध टिकून राहतो तसेच आकारही फारसा बदलत नाही.

हा वृक्ष मूळचा भारतीय उपखंडातील असून ऑस्ट्रेलिया मध्ये ही आढळतो साधारण पाणथळ जागा सोडल्यास उष्णकटिबंधात याची चांगली वाढ होते याचे वनस्पतीशास्त्रीय नाव Minusops elengi linn असून कुळ नाव Sapotaceae आहे इतर नावे बकुल, बोलसरी, चिरपुष्प, ओवळी, इंडियन मेडलर, बुलेट वूड इत्यादी आहेत हा वृक्ष सदाहरित असून 30 ते 50 फूट उंच वाढतो खोड गोलाकार गुळगुळीत असते फांद्या गोलाकार पसरतात पाने चकचकीत हिरव्या रंगाची असतात पाने एक आड एक अशी येतात सुमारे दोन ते चार इंच लांब तर एक ते तीन इंच रुंदीची असून लांबट टोकदार असतात फुले मळकट पांढऱ्या रंगाची असून गोलाकार असतात आतला पुष्प मुगुट उठून दिसतो फुले आकर्षक सुगंधी असतात फळे लांबट गोल मासाल असतात त्यांचा रंग भगवा पिवळा असतो फुले व फळे साधारण जानेवारी ते जुलै या कालावधीत येतात फळे खाण्यासाठी वापरतात त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत फळे चवीला तुरट गोड असतात 

या वृक्षाचे अनेक औषधी उपयोग आहेत दंतविकार, वेदना नाशक, ज्वरनाशक, डांग्या खोकला, आव या विकारांमध्ये या वनस्पती पासून औषधे बनवली जातात तसेच फुलांपासून अत्तर बनविले जाते तसेच फुलांपासून हार व गजरे बनवितात लाकूड टणक टिकाऊ असल्यामुळे बांधकामात त्याचा वापर केला जातो दाट सावली व सुगंधी फुले यामुळे हा वृक्ष मंदिर, बागा, तसेच सावलीसाठी रस्त्याच्या कडेला लावला जातो अशा आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेला हा वृक्ष.

लेखिका : सुचिता पाटील

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तो गजराज अजून जिवंत आहे…  – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ तो गजराज अजून जिवंत आहे…  – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पंचवटीतला फोन खणखणला, समोरून कुठल्यातरी वृत्तपत्राचा पत्रकार बोलत होता, विचारणा झाली ‘ग. दि. माडगूळकर’ यांचे निधन झाले ही बातमी खरी आहे का? . फोन उचलणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वतः गदिमा होते! . स्वतःची मरणवार्ता स्वतःच ऐकत होते. मंगरुळकर, माडखोलकर अथवा मंगुडकर नावाच्या एका कवींचे निधन झाले होते, नाव साधर्म्यामुळे ‘कविवर्य माडगूळकर’ यांचे निधन झाले अशी वार्ता पसरली होती. गदिमा नुकतेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून सावरत होते, त्यात पुण्यातील साहित्य संमेलनातील दुर्गाबाई भागवत यांच्या अनाठायी टीकेमुळे ते व्यस्थित होते, त्यातूनच त्यांच्या लेखणीतून झरझर कविता कागदावर उतरली… “तो गजराज अजून जिवंत आहे…

☆ तो गजराज अजून जिवंत आहे ☆

तो गजराज अजून जिवंत आहे

आपल्याविषयी,

अशा अफवा का अकारण पिकतात,

याचीच त्याला खंत आहे.

त्याचा देह पहाडासारखा.

रंग आकाशीच्या आषाढासारखा.

त्याचा एकेक दात दधिचीच्या हाडासारखा.

दृष्टी गरुडासारखी.

कान,

अनाहत ऐकतील असे,

शक्तिशाली.

त्याचे पाऊलच मोठे 

म्हणून चाल संथ आहे.

तो गजराज अजून जिवंत आहे.

 

वाऱ्यावर वार्ता वावरत होत्या,

की 

अपघाती मरणाने तो मेला.

कोणा एका अवघड घाटातल्या,

वानरांच्या वेडावण्याने,

त्याचा तोल गेला.

तो बावचळला.

खोल खोल,

दरीत खाली कोसळला.

त्याचे गंडस्थल फुटले.

कान फाटले.

दात तुटले.

दरीच्या गवताळ तळात,

रक्ताच्या थारोळ्यात,

त्याचे गवसले,

केवळ कलेवर.

 

असत्य,

पांढरे स्वच्छ असत्य.

त्याच्या जितेपणी त्याने त्याची,

मरणवार्ता ऐकली (लोकोक्तीनुसार) 

त्याचे आयुष्य अनंत आहे.

तो गजराज अजून जिवंत आहे.

 

एक सत्य, की 

अथांग अरण्यात मनसोक्त हिंडणारा 

तो चतुर चतुष्पाद,

एका कसरतीच्या खेळात,

शिक्षिका शिकविल तसे वागतो.

रिंगणातल्या रिंगणातच स्वातंत्र्य भोगतो.

त्याच्या चिटुकल्या डोळ्यात 

एक अनामिक अग्नी मात्र ज्वलंत आहे.

तो गजराज अजून जिवंत आहे.

┉❀꧁꧂❀┉

कवी : श्री. ग. दि. माडगूळकर

 (पूरिया काव्यसंग्रहातून)

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १२ – यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १२ – यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर. ☆ प्रा.भारती जोगी ☆

यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर 

तीस वर्षांचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे आत उभा… जो कदाचित आता पुढच्या जन्मीच भेटणार. आणि अलीकडे उभी आहे सव्वीस वर्षांची त्याची पत्नी, जिने नुकताच पुत्र वियोग साहिला आहे.

निरोप देण्यातल्या आणि घेण्यातली ताकद बघा… नवरा सांगतोयं, ” माई, स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायचा असेल तर आपल्या घराचा धूर नको कां करायला? पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप! “

… हे शब्द कानी पडताच त्या पत्नीनं पटकन जाळीतून हात आत घालून त्याच्या पायाला हात लावला, ती धूळ आपल्या मस्तकी लावली आणि म्हणाली, ” हे पाय बघून ठेवते पुढच्या जन्मी चुकायला नकोत म्हणून! “

निरोप घेणा-या या होत्या यमुनाबाई उर्फ माई सावरकर!

आणि निरोप देणारे होते विनायक सावरकर उर्फ तात्यासाहेब!

यमुनाबाई जव्हार संस्थानचे तत्कालीन दिवाण भाऊसाहेब चिपळूणकर यांच्या ज्येष्ठ कन्या. देशसेवेचे व्रत घेतलेल्या, धाडसी, कणखर आणि परिश्रमी!

सावरकर आणि चिपळूणकर घराण्यांत आधीपासूनच घरोबा होता. त्यामुळे यमुनाबाईंना सावरकरांच्या कुटुंबातील देशभक्ती विषयी, त्यांच्या क्रांतिकारक विचारांविषयी पूर्वकल्पना होतीच. विनायकांशी विवाहबद्ध होतांनाच यमुनाबाईंनी देशसेवेचे व्रत अगदी ” की घेतले न व्रत हे आम्हीं अंधतेने”… अशाच बाण्याने अंगिकारले. त्या सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाशी अगदी एकरूप झाल्या.

पती बॅरिस्टर होण्याचं स्वप्न बघणा-या यमुनाबाईंना जेव्हा त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाल्याचे कळले तेव्हापासूनच यमुनाबाईंनी आपल्या पतीच्या समाजसुधारणेच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. कारण सावरकरांच्या अर्धांगिनीला हे चांगलेच ठाऊक होते की, स्वातंत्र्याचा लढा हे त्यांचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळेच पतीला खंबीर साथ देत राहिल्या.

तात्यासाहेबांनी रचलेले पोवाडे, देशभक्ती ची पदे, रचलेल्या आर्या… हे सगळं काव्य यमुनाबाई आपल्या मोठ्या जाऊबाईंबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या *आत्मनिष्ठ युवती समाज* या संस्थेच्या बैठकीत करत.

स्त्रियांसाठी सहभोजन, हळदीकुंकू समारंभ घडवून आणत. मुलांची मुंज, लग्न ही लावून देत. स्त्रियांना धीट होण्याचा उपदेश करत.

भगूर येथील पैतृक वाड्यावर जप्ती आली, घरातील स्त्रिया रस्त्यावर आल्या, हालाखीची परिस्थिती… पण तरीही ही यमुना वहायची थांबली नाही. न डगमगता आल्या संकटाला हिंमतीने तोंड देत राहिली. स्वाभिमानी यमुनाबाईंनी माहेरचा ही आधार घेतला नाही. कारण त्यांनी लग्न लागल्या क्षणापासूनच जणू निश्चयच केला होता…

घातले गळा मी मंगळसूत्र पवित्र

तेव्हाच गुंफिले त्यागाचे ही सूत्र

पदरात दडविल्या अपमानाच्या ज्वाळा

स्वातंत्र्यवीराचे कुंकू लावूनी भाळा

– – अशी ही स्वातंत्र्य लढ्यातील एक अदृश्य नायिका… जिच्या जीवनाची सुरुवातच पतीपासून वेगळं होण्याने झाली… शेकडो मैलांवर, समुद्रापलीकडे अंधा-या कोठडीत पती, पत्नी प्रकाशमय खोलीत पण अंधारलेल्या आयुष्यात एकटी! सगळं आयुष्य वेदना, संघर्ष, सामाजिक बहिष्कार… यांनी व्यापलेलं… पण ही समिधा स्वातंत्र्य होम कुंडात समर्पित होतच राहिली,

आदरणीय श्री. बाजपेयीजीं नी सावरकरांबद्दल काढलेले गौरवोद्गार… यमुनाबाईंनाही लागू व्हावेत असंच त्यांचं कर्तृत्व! त्यासुद्धा होत्या…

तेज, तप, तितीक्षा!!

… सावरकरांची सावली बनल्या, आपल्या जाऊबाईंची ही सावली बनल्या. निर्माल्य बनून समर्पित झाल्या.

… म्हणूनच म्हंटलयं… *दिव्यत्वाच्या स्पर्शानं उजळून निघालेला तेजस्वितेचा अंश म्हणजे माई! त्यागाचा अबोल आदर्श म्हणजे माई! *

– लेख क्र. १२ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६५ आणि ६६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६५ आणि ६६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ६५ – – 

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।

अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ।

धरी रे मना आदरे प्रीती रामी । 

नको वासना हेमधामी विरामी ।६५।

अर्थ :: भक्तीविना जीवन म्हणजे दीनवाणे जगणे. ज्या मुर्खांना हे कळत नाही, त्यांचे दुःख वाढतच जाते. म्हणून हे मना, आदरपूर्वक रामावर प्रेम करायला शीक. सोन्याचे घर जरी असले पण त्यात रामाचा निवास नसला तर त्याची कामना काही उपयोगाची नाही.

(भक्तिऊणे – भक्तीशिवाय, जिणे – जगणे, दूणे – दुप्पट, हेमधामी – सोन्याचे घर, विरामी – ज्यात राम नाही असे)

विवेचन :: आधीच्या श्लोकात समर्थांनी अति काम किंवा अति लोभामुळे काय होते ते सांगितले. या श्लोकामध्ये ते आपल्याला भक्ती विना जीवन म्हणजे काय हे सांगत आहेत. ज्याप्रमाणे अति काम आणि क्रोध यांच्यामुळे व्यक्तीचे जगणे लाचारीचे होते, त्याप्रमाणेच भक्तीशिवाय जीवन म्हणजे दैन्यवाणे जगणे. भक्ती म्हणजे शक्ती! ती दिसत नाही पण जो ती मनापासून करतो, त्याला ती जाणवते. सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र जरी असला तरी प्रामुख्याने तो त्याचा भक्त होता. जवळ पैसा, वैभव नव्हते पण भक्तीचे तेज होते, शक्ती होती. अनेक संतांना विपरीत परिस्थितीत दिवस कंठावे लागले. त्यांच्याजवळ सत्ता, संपत्ती, वैभव यांचा अभाव होता. पण भक्तीची दौलत अपार होती. या भक्तीचे तेज त्यांच्या मुखावर विलसत होते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहण्याची त्यांची वृत्ती होती.

पण ज्यांची भगवंतावर श्रद्धा नाही, असे लोक भक्तीविना जगतात. अशा लोकांचा कोणीही सहज बुद्धिभेद करू शकतो. देव कुठे आहे? उगाचच त्यावर श्रद्धा ठेवून कशाला जगायचे? जीवन आहे तोपर्यंत मौजमजा करून घ्या. असे सांगणारे लोक भेटतात. आपल्याला अशा गोष्टी लवकर पटतात. त्यामुळे भगवंतावरील श्रद्धा विसर्जित करून आपण ऐहिक जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. पण ऐहिक जीवनात जेव्हा पदोपदी अपयशाचे, अपमानाचे प्रसंग येतात, संकटे येतात तेव्हा माणूस खचतो. कारण कुठेही श्रद्धा नसते. कुठलाही आधार नसतो. ‘ Faith can move mountains ‘ अशी एक इंग्रजी म्हण आहे. श्रद्धेचे सामर्थ्य अपार असते. श्रद्धा तारक आहे. प्रल्हादाची भगवंतावर श्रद्धा होती. या श्रद्धेनेच त्याला सर्व प्रसंगातून तारून नेले. परंतु श्रद्धाहीन माणसाच्या जीवनात दुःखाचा गुणाकार होतो. म्हणूनच समर्थ तळमळीने आपल्याला आदरपूर्वक रामावर श्रद्धा ठेवायला, प्रेम करायला सांगतात.

हेमधामी आणि विरामी ही दोन विशेषणे समर्थांनी फार सुंदर योजली आहेत. हेमधामी म्हणजे सोन्याचं घर, राजवाडा. विरामी म्हणजे रामाशिवाय. हल्ली काही घरांमध्ये ‘ हे घर श्री महाराजांचे आहे ‘ अशी पाटी लावलेली आढळते. म्हणजे राहणाऱ्यांची अशी श्रद्धा असते की या घरात महाराज किंवा भगवंत राहतो. हे त्याच्याच मालकीचे आहे. म्हणजे भगवंताच्या छत्रछायेत आपण राहत असतो. आणि इथे भगवंत आहे ही भावनाच किती सुंदर! असे घर म्हणजे मंदिरच! हीच कल्पना थोडी आणखी विस्तारली तर आपला देह म्हणजे सुद्धा भगवंताचे निवासस्थान असेही आपल्याला म्हणता येते. त्याच्या श्रद्धेविना असलेला देह म्हणजे फक्त हाडामांसाचे शरीर!

घर सोन्याचे असले तरी घरात राहणाऱ्यांची जर भगवंतावर श्रद्धा नसेल, तर असे घर म्हणजे चार भिंतींचा एक तुरुंग! सोन्याचे घर म्हणजे राजवाडा, वैभव! पण जिथे राम नाही त्या घराची किंमत शून्य. ज्या दगडांवर रामनाम लिहिले जाते, ते दगड सुद्धा तरतात. रामावर म्हणजे भगवंतावर श्रद्धा नसलेली व्यक्ती म्हणजे मूढ पाषाणच! या संसार सागरात ती बुडणारच हे ठरलेले आहे! महाभारत युद्धाच्या प्रसंगी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी जातात. भगवंत म्हणतात, ” एका बाजूला निःशस्त्र असलेला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना. त्यातून ज्याला जे हवे ते त्याने मागून घ्यावे. ” या प्रसंगी दुर्योधन नारायणी सेना मागून घेतो आणि अर्जुन भगवंताला. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अर्जुनाची भगवंतावर दृढ श्रद्धा होती. म्हणून मला भगवंतच हवा असे त्याला ज्या तीव्रतेने वाटले तसे दुर्योधनास वाटणे शक्यच नव्हते. नारायणाशिवाय नारायणी सेना काय कामाची? म्हणून अर्जुनाला जसे तीव्रतेने वाटले की मला भगवंतच हवा तसे आपल्यालाही वाटले पाहिजे. तेव्हा हे मना, आदरपूर्वक रामरायावर प्रेम करायला शीक हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१) माझ्या जीवनात श्रद्धेचा आधार किती आहे? संकटाच्या वेळी मी खचतो की स्थिर राहतो?

२) मी ‘नारायणी सेना’ (संपत्ती, साधने) निवडतो की ‘नारायणाची ‘ निवड करतो?

३) माझे घर ‘हेमधामी’ आहे की ‘रामधामी’?

४) माझ्या आनंदाचा स्रोत बाह्य गोष्टींमध्ये आहे की अंतर्मनातील भक्तीत?

– – – – 

श्लोक क्र. ६६ – – 

नव्हे सार संसार हा घोर आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।

जनीं वीष खाता पुढे सूख कैचें?

करी रे मना ध्यान या राघवाचे ।६६।

अर्थ :: हे मना, हा संसार अनित्य आणि असार आहे. घोर म्हणजे भयंकर आहे. तूच याचा जरा विचार करून सत्य शोधून काढ. एखाद्याने विष भक्षण केले तर ते वाईट परिणाम केल्यावाचून कसे राहील? तेव्हा तू भगवंताची भक्ती कर.

विवेचन :: 

या श्लोकामध्ये संसाराचा फोलपणा समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. हा संसार असार आहे. विनाशी आहे. संसारात सुखी झाला आणि सुखदुःखे भोगावी लागली नाही असा मनुष्य आढळणे कठीण! त्यातून संसार घोर म्हणजे भयंकर आहे. संत या सगळ्यातून गेले आहेत. संत तुकारामांना भयंकर असा दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यात मुलेबाळे, पत्नी यांची आहुती गेली. पण संसाराचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळेच त्यातून बाहेर काढणारी एकच गोष्ट त्यांना माहित होती. ती सारभूत गोष्ट म्हणजे विठ्ठल. त्याचाच ध्यास त्यांनी घेतला होता. सर्वच संतांनी संसाराचा हा फोलपणा लक्षात घेऊन जनसामान्यांना ईश्वरभक्तीचा उपदेश केला. आम्हाला संतांचे सांगणे समजत नाही असे नाही. पण त्यातील फोलपणा ध्यानी घेऊनही आम्ही या विषाचा अनुभव घ्यायला तयारच असतो. विष खाल्ले की ते त्याचे परिणाम दाखवणारच! विष खाल्ले आणि चांगला अनुभव आला असे कधी होऊच शकत नाही. ते त्याचा प्रभाव दाखवणारच. इथे विष म्हणजे विषयासक्ती असाही अर्थ घेता येईल.

म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतात, ” हे मना, दुसऱ्यांचे सांगणे तुला पटत नसेल तर तू स्वतः अनुभव घेऊन बघ. तू स्वतः त्यातील सत्य शोधून काढ. कधी कधी माणसे दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होत नाहीत. म्हणून स्वतःला जो अनुभव येतो, त्यावर सारासार विचार करून त्यातून तरी योग्य निष्कर्ष आपल्याला काढता आला पाहिजे. समर्थ आपल्याला संसाराचा त्याग करा असं सांगत नाहीत तर त्यातील फोलपणा ध्यानी घेऊन त्यातील आसक्ती कमी करा असेच त्यांचे सांगणे आहे. संसाराकडे साक्षीभावाने आपल्याला पाहता आले पाहिजे. पाण्यात आणि चिखलात राहूनही जसे कमळ त्यापासून अलिप्त असते तसेच आसक्तिरहित आपल्याला संसारात राहता आले पाहिजे.

एकदा सत्य लक्षात आल्यानंतर मग त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. संसार करताना आपल्या लक्षात येतं की आपल्याला समजायला लागल्यापासून आपण या प्रपंचात किती गुंतत चाललो आहोत. सगळ्यांची मने सांभाळताना आपली किती ओढाताण होते आहे! किती दिवस ही लटकी नाती जपायची? कोणाकोणाचा अहंकार जपायचा? पैसा कमवायचा तरी किती? किती पैसा मिळवला म्हणजे तो पुरे झाला असे होते? ही संपत्ती, हे घरदार मी कोणासाठी कमावतो आहे? हे सगळे तर इथेच ठेऊन जावे लागणार आहे. आपल्यापुढे दोनच पर्याय असतात. एकतर ठेऊन जा, नाहीतर देऊन जा. बरोबर घेऊन जाण्याचा पर्याय आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही. बरं, ज्यांच्यासाठी हे सर्व करावं, ती पोरंबाळं तरी नंतर आपल्याला विचारतील याची काय खात्री आहे? गेल्यानंतर काही दिवस आपली तसबीर भिंतीवर लागेल. तिची पूजा होईल. काही दिवसांनी तीही निघून जाईल. हे जगच अनित्य आणि मर्त्य आहे. आधीच्या श्लोकांत समर्थांनी सांगितल्यानुसार ‘ मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ‘ अशी परिस्थिती असते. तरी आपल्याला केवढा गर्व असतो, आपल्या पैशाचा, रूपाचा, सत्तेचा!

हा सगळा विचार कदाचित कोणाला निराशावादी वाटण्याची शक्यता आहे. पण वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली तरी वस्तुस्थिती थोडीच बदलते! उलट वस्तुस्थिती समजली तर त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. यावर एकच उपाय आहे. असार संसाराला बाजूला सारून जे सार म्हणजे रामनाम आहे, तेच जीवी धरावे. धान्य पाखडण्याचे सूप आपल्याला माहिती असेल. धान्य पाखडताना ते त्यातील असार म्हणजे खडे, केरकचरा आदी बाहेर टाकून देते. आणि सार म्हणजे जे धान्य आहे ते धरून ठेवते. आपणही सुपाची भूमिका करावी. असार सर्व सोडून द्यावे आणि सार म्हणजे भगवंत त्यालाच घट्ट धरून ठेवावे. रामरायाचे ध्यान सर्व सुख देणारे आहे. ते ‘ मंगल दर्शन पूर्णविराम ‘ असे आहे. ” म्हणून हे मना, या राघवाचे ध्यान कर “असे समर्थ तळमळीने आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

१) मी संसार करताना त्यात अडकतो आहे का, की त्याकडे साक्षीभावाने पाहतो आहे?

२) “विष” म्हणून सांगितलेली विषयासक्ती माझ्या जीवनात कोणत्या रूपात आहे?

३) मी इतरांच्या अनुभवातून शिकतो का, की स्वतः धडपडूनच शिकतो?

४) माझ्या आयुष्यात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मी रोजच्या जीवनात भगवंताच्या स्मरणासाठी वेळ काढतो का, की तो पुढे ढकलतो?

– क्रमशः श्लोक श्लोक ६५ आणि ६६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”शब्दांचे तापमान…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे तापमान… ☆ संध्या बेडेकर ☆

“शब्दांचेही तापमान असते. शब्द मनाला स्पर्श करतात. ”

काल मी व‌ माझी मैत्रीण छाया खूप दिवसांनी भेटलो. छान गप्पा रंगल्या होत्या आमच्या. जवळ जवळ सर्व विषय झाले होते. अगदी देशातील राजकारणा पासून ते घराच्या राजकारणापर्यंत. मनसोक्त गप्पा व त्याच बरोबर दोन दा चहा, कांदा भजी, पावसाळी हवा, मज्जा आली. एकुण आम्ही दोघी ‘recharge ‘ झालो. व आता मला माझे घर व‌ घरातली काम दिसत होती.

मी निघणारच तेवढ्यात बेल वाजली. छाया ने दरवाजा उघडला. एक स्मार्ट दिसणारी छान, ऊंच स्त्री कोणाचा तरी पत्ता विचारत होती.

ती म्हणाली,  इथे मेधा कुलकर्णी कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे का??

कोण मेधा कुलकर्णी??? मला नाही माहित. असं छाया ने उत्तर दिले.

तेव्हा तिने मेधा चे वर्णन केले म्हणाली,

अहो, ती अशी काळी, लठ्ठ चष्मा लावते. बुटकी आहे‌. बघा. असं तिने मेधा चे वर्णन केले व हावभाव पण तसेच केले.

मला थोड खटकलच. थोडा रागही आला.

आम्हाला मेधा कोण??? माहिती नाही. तिच्या शी कधी आमचा सम्बन्ध येईल की नाही हे ही माहित नाही. मेधा कोणाची मुलगी,? कोणाची बायको? काहीच माहीत नाही. पण तिचे असे वर्णन ऐकून, मनात मेधा ची एक इमेज मात्र नक्की तयार झाली. उद्या काही कारणाने जर हिचे नाव पुन्हा कोणी घेतले तर माझ्या समोर तिचे हेच चित्र उभे राहणार.

कदाचित मेधा असेलही तशीच पण तिची अजून दुसरी ओळख नसेलच का?????

तीचा ‘flat no??? वगैरे. किंवा हेच वर्णन दुसऱ्या शब्दांत ही होऊ शकलं असतं ना Medium height, सावळीशी, चष्मा लावते. (सावळेपणाची डिग्री कमी जास्त होऊ शकते.) असे मेधा चे वर्णन ऐकले असते, तर मनात एक वेगळीच इमेज तयार झाली असती.

ही स्त्री मला आधुनिक वाटली. ‘ well dressed ‘ तर होतीच पण सुसंस्कृत होती का????

त्या स्त्री च्या अशा बोलण्याचे खूप अर्थ निघतात. तिच्याच व्यक्तिमत्त्वाची पुसटशी कल्पनाही येते. स्वतः सुंदर असल्याचा अहंकार? अभिमान? की दुसऱ्या ला कमी लेखणे. उगीच दुसऱ्या ची इमेज खराब करणे. अपमान करणे. की काही ही विचार न करता बोलणे, जे मनात येईल ते.

जर तुम्ही सुंदर अहात तर ती देवाची तुमच्या वर थोडी extra कृपाच म्हणायची. त्यात तुमचे असे विशेष कर्तुत्व काय????

काही लोकांना दुसर्याना कमी पाहण्यात, त्यांच्या चूका काढण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. समाधान मिळते. त्यांचे नेहमी अर्ध्या रिकाम्या ग्लास कडेच लक्ष जाते. तुम्ही दिसायला छान सुंदर उंच म्हणजे सर्वगुणसंपन्न नाही. व व दुसर्याच्या रंग रूपावर बोलण्याचे सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेलेही नाही.

किंवा असेही असू शकते, की कधी तरी मेधा ने या बाईचा अपमान केला असावा व हे त्याचे प्रत्युत्तर असेल. पण ते तिसऱ्या व्यक्ती समोर कशाला?????

पण काही ही कारण असू दे, हे असे बोलणे चूकच आहे. शब्दांचे पण तापमान असते. शब्द मनाला स्पर्श करतात. तुम्ही दुसऱ्या चा अपमान केला, तर त्यांचा अपमान होतो की नाही माहीत नाही. पण तुम्ही तुमचा मान मात्र नक्की कमी करता.

खूप लोकांची सवय असते ते चार चोघात मुद्दाम असे विषय काढतात व एखाद्याला टार्गेट करतात. त्याच्या उपस्थितीत किंवा कधी त्याच्या अनुपस्थितीत.

अपमान कधी कोणी विसरत नाही. जेव्हा मौका मिळतो. तेव्हा तो व्याजासकट परत करतात. हे नक्की, आता अशी देवमाणसे दिसत नाही, जे एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करतील. उलट चार मारतील.

आपण स्वतः ला सुशिक्षित, आधुनिक समजतो मग व्यवस्थित बोलणे हे त्यात येत नाही का? आपल्याला शब्दांची मांडणी बरोबर करणे जमत नाही का? बोलताना विचार करत नाही का? समोरचा उत्तर देत नाही. म्हणजे त्याला बोलता येत नाही. असे नाही. तो सभ्य आहे हे कारण आहे त्याचे

समाजात मिळुन मिसळून राहण्यासाठी या बेसिक गोष्टी आहेत. याकरिता उच्च शिक्षण, आधुनिक राहणी, हे नसले तरी चालेल. थोडे ‘common sense ‘हवे बस, पण अडचण येथेच आहे ना ‘common sense is most uncommon ‘.

तुमची भाषा अशुध्द असू शकते. उच्चार चूक असू शकतात. आवाज खूप मधुर नाही, हे पण मान्य आहे. पण भाषेतला भाव छान ठेवणे, हे तर आपल्याच हातात असते ना.

चार पुस्तके कमी वाचली तरी चालेल. पण कोणाच्या कमी वर वार करणे चूकच आहे.  खरं तर, लक्षात ठेवाव

शब्दांचा तोल सावरला की बोलांना आपोआप मोल येत.

माणसाला मोजायचा मापदंड, त्याची ओळख, म्हणजे फक्त त्याचे रुप रंग हेच आहे का? कर्तुत्व, स्वभाव इतर गुणही महत्वाचे असतातच.

प्रथम दर्शनी तुमचे‌ रंग रूपच जरी दिसत असले, तरी पाठोपाठच तुमचे बोलणे पण असतेच ना.

‘Be positive ‘ आपण म्हणतो. मी किती ‘Positive ‘ आहे? अस स्वतः चे गुणगान करणारे तर खूप भेटतात. रोज सकाळी what’s app वर येणारे सुविचार ही खूप वाचतो. अशा मेसेजेस ना like करतो thumb’s up पण करतो..

म्हणतात ना

 सिर्फ़ सुविचारों को पढ़कर कोई परिवर्तन नहींआता,

 विचारों पर चलकर ही परिवर्तन आता है ।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६३ आणि ६४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६३ आणि ६४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ६३ – – 

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।

हरीबोध सांडूनि वेवाद लागे ।

करी सार चिंतामणी काचखंडे ।

तया मागता देत आहे उदंडे । ६३ ।

अर्थ :: एखाद्याच्या घरी कामधेनू आहे. पण तो दुसऱ्याच्या घरी ताक मागू लागला तर ही हास्यास्पद गोष्ट ठरते. त्याप्रमाणे आपल्यापाशीच असणाऱ्या भगवंताकडे दुर्लक्ष करून एखादा व्यर्थ वाद घालू लागला तर त्याचे जीवन वाया जाते. एखाद्याच्या हातात चिंतामणी आहे, परंतु तो त्याच्याकडे केवळ काचेच्या तुकड्यांची मागणी करू लागला तर अशा माणसाचे वागणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे ठरते.

(हरीबोध – परमेश्वराचे ज्ञान, वेवाद – व्यर्थ /निष्फळ वाद, काचखंडे – काचेचे तुकडे)

विवेचन :: या आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला निजध्यास तुटला म्हणजे काय हे सांगितले. या श्लोकातही तोच मुद्दा पण वेगळ्या शब्दात ते आपल्याला समजावून सांगत आहेत. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा ठरतो तो त्याला मिळालेल्या बुद्धीच्या वरदानामुळे. या बुद्धीचा वापर करून तो आत्मज्ञान करून घेऊ शकतो. नराचा नारायण होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. असे असताना कधी कधी तो अगदी हास्यास्पद वागतो. घरी कामधेनू आहे म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी गोमाता आहे. पण याला त्याची जाणीवच नाही. हा दुसरीकडे ताक मागत फिरतो. इथे कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा भगवंत. तो सदैव आपल्याजवळच असतो. पण याची जाणीव नसलेले अज्ञानी जीव मात्र त्याला शोधत इकडेतिकडे फिरतात. भोंदूबाबा, साधूंच्या नादी लागतात. भगवंत आपल्याजवळ आहे. त्याला शोधायला खरं तर कुठेच जायची गरज नाही. ‘ मंदिरात अंतरात तोच नांदताहे… ‘ पण ही गोष्ट आमच्या लक्षातच येत नाही. आम्हाला परमेश्वरासंबंधी जे काही ज्ञान झाले आहे, ते सोडून देऊन आम्ही व्यर्थ, कोरडे आणि निष्फळ वादविवाद करत बसतो.

समर्थ जसे कामधेनूचे उदाहरण देतात, तसेच ते चिंतामणी रत्नाचेही देतात. चिंतामणी हे एक दिव्य रत्न असून त्यामुळे जे हवे ते प्राप्त होते. परंतु काही मूर्ख माणसे मात्र अशा या दिव्य चिंतामणीच्या संपर्कात आले असताना देखील त्याच्याकडे काचेच्या तुकड्याची मागणी करतात. कामधेनू किंवा चिंतामणी ही रूपके समर्थांनी वापरली आहेत. परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू किंवा चिंतामणी! इच्छिलेले देणारा. पण आम्हाला त्याचे महत्वाच कळत नाही. एकदा परमेश्वराची कृपा झाली की काही मिळवायचे बाकी राहत नाही. पण आम्ही मात्र जवळ कस्तुरी असूनही कस्तुरीच्या शोधात फिरणाऱ्या कस्तुरीमृगासारखे रानोमाळ भटकत राहतो. ‘ तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी ‘ अशी आमची अवस्था होते.

हरीबोधाइतकी मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. आम्हाला हे समजते पण उमजत नाही. आमची श्रद्धा डळमळीत होऊ लागते. हरीबोध किंवा परमेश्वराची प्राप्ती ही इतक्या सहजासहजी होणारी गोष्ट नसते. त्यासाठी विवेक आणि श्रद्धा आवश्यक असतात. संयमाने उपासना सुरु ठेवावी लागते. पण एकदा का श्रद्धा डळमळीत झाली की नाना प्रकारच्या शंका मनात घर करू लागतात. या आधीच्या श्लोकात समर्थांनी निजध्यास सुटला म्हणजे काय घडते ते सांगितले होते. तेच अशा वेळी घडते. मग परमेश्वर आहे का? तो मला प्राप्त होईल का? मी एवढा वेळ कशाला वाया घालवायचा? त्याऐवजी माझ्या हातात जे आनंदाचे क्षण आहेत, ते मी का गमवावे? असा मनुष्य संतांशी देखील व्यर्थ वादविवाद करीत बसतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता वाचणारे त्यातील सांगितलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून त्याचे अनुकरण करण्यापेक्षा मला किती कळते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत बसतात. ‘ ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक तरी ओवी अनुभवावी ‘ असे म्हटले जाते. पण आम्ही तिची अनुभूती घेण्यापेक्षा व्यर्थ, कोरडे वादविवाद करत बसतो. खरे ज्ञान तेच की हृदयापर्यंत पोहोचते.

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” मला विद्वानांबद्दल आदर आहे पण प्रेम नाही. “त्याचे कारण हेच आहे. विद्वान माणसे आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. पण भगवंत प्राप्तीसाठी जी तळमळ, श्रद्धा आणि प्रेम लागते, तिचा अभाव त्यांच्यामध्ये असतो. भगवंत उदंड देणारा दाता आहे. त्याच्याकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. भगवंताच्या रूपाने आपल्याकडे सर्वस्व असते. तोच असतो कामधेनू आणि चिंतामणी. तेव्हा त्याच्याकडे क्षुद्र गोष्टी कशासाठी आणि का मागायच्या? पैसा, संसार, मुलेबाळे, सत्ता, प्रसिद्धी, कीर्ती हे तर सारेच मागतात. पण मला भगवंत हवा आहे हे मला तीव्रतेने वाटले पाहिजे. त्यासाठीच समर्थांची ही तळमळ!

स्वसंवाद :: 

१) माझ्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींची (श्रद्धा, ज्ञान, साधना) मला खरी जाणीव आहे का?

२) मी बाहेर बाहेर शोधण्यात जास्त वेळ घालवतो का, की अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो?

३) मी आध्यात्मिक ज्ञान फक्त “समजून” घेतो, की खरोखर “जगतो”?

४) मी वाचन, चर्चा, वाद यांत अडकतो का, की प्रत्यक्ष साधना करतो?

५) माझ्या मनात शंका जास्त आहेत का, की श्रद्धा दृढ आहे?

६) मी “चिंतामणी” हातात असूनही “काचखंडे” मागत तर नाही ना याचा कधी विचार केला आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ६४ – – 

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।

अती काम त्या राम चित्ती वसेना ।

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।

अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।६४।

अर्थ :: मूढ म्हणजे मूर्ख मनुष्य. अशा व्यक्तीला आपले हित कशात आहे हे कळत नाही. त्याच्याजवळ साहजिकच दृढ बुद्धी म्हणजे निश्चयाचा अभाव असतो. ज्याच्या मनामध्ये विषयवासना मोठ्या प्रमाणात घर करून असतात, त्याच्या मनात साहजिकच भगवंताला स्थान मिळणे शक्य नसते. अती लोभी माणसाला शेवटी क्षोभाला म्हणजे क्रोधाला सामोरे जावे लागते. विषय विकारांच्या अती अधीन झालेला माणूस लाचार आणि दीनवाणा असतो.

विवेचन :: ‘अति सर्वत्र वर्जयेत ‘असे संस्कृत वचन आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो सर्वनाशाला कारणीभूत होतो. एखादी गोष्ट आरोग्याला हितकारक जरी असली तरी तिचा अतिरेक झाला तर तो घातक ठरतो. उत्तम प्रकृतीसाठी शरीराला व्यायाम आवश्यक असतो. पण त्याचा अतिरेक झाला तर अंतिमतः हानीच होते. त्याप्रमाणे सर्वच गोष्टींचे आहे. अती खाणे, अती बोलणे, अती निद्रा, अती उर्मटपणा अशी कोणतीही गोष्ट अती झाली की नुकसानच होते. ‘अती तिथे माती ‘ असे आपण म्हणतो ते यामुळेच.

कामवासना किंवा विषय सेवन आपल्या आयुष्यात जेवढे आवश्यक असते, तेवढे करण्याची परवानगी आपल्याला आपली संस्कृती देते. त्यासाठी एक विशिष्ट चौकट आपल्या संस्कृतीने आखून दिलेली आहे. त्यासाठी विवाह संस्कार आहे. तात्पर्य एका मर्यादेत विषय सेवन शास्त्रास मान्य आहे. परंतु विषय सुखाच्या अधीन होऊन त्यापलीकडे दुसरे काहीच न दिसणे हे तामसी वृत्तीचे लक्षण आहे. पशुसुद्धा आवश्यक तेवढाच कामवासनेचा आधार घेतात. प्रजोत्पादन हे त्यांचे उद्दिष्ट असते. परंतु माणूस मात्र कोणतीही मर्यादा पाळत नाही. कामातुराणां न भयं न लज्जा असे एक संस्कृत वचन आहे. सध्या विविध माध्यमांमुळे माणसांच्या वासना भडकवल्या जातात. त्यांचा अतिरेक झाला तर काय होते याचे प्रत्यंतर आपल्याला रोजच्या बातम्या पाहिल्या तरी येते.

अती विषयी माणूस हा मूढ बुद्धी असतो. मूढ बुद्धी म्हणजे आपल्या हिताचे न कळणारा. त्याला कोणी कितीही समजावून सांगितले तरी ते पटत नाही. पटले तरी ऐकण्याची तयारी नसते. रावण हा स्त्रीलंपट होता. विषयलोभी होता. त्यातूनच त्याने सीतेसारख्या पतिव्रतेला उचलून आणण्याचे पातक केले. बिभीषण, मंदोदरी आदींनी त्याला वेळोवेळी समजावून सांगितले पण त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असल्याने त्याला आपल्या हिताचा सल्ला देखील रुचला नाही.

ज्यांच्या मनात सदैव विषयवासनेनेच ठाण मांडलेले असते, त्यांच्या चित्तात राम म्हणजे भगवंत राहीलच कसा? परमेश्वर प्राप्तीसाठी शुद्ध आणि निर्मळ चित्त हवे. बऱ्याच वेळा अशी काही माणसे भगवंताचे नाम घेताना दिसतात. पण ते लोकांची दिशाभूल करीत असतात. त्यांचा अंतर्गत हेतू वेगळाच असतो. मुहमें राम बगलमे छुरी अशी स्थिती असते. अशा माणसांपासून सावध राहिलेले बरे.

जशी अवस्था अती कामी माणसाची होते, तशीच अवस्था अती लोभी माणसाची होते. अग्नीत जेवढे तूप टाकले तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. काम आणि लोभ यांचे देखील असेच आहे. कुठे थांबायचे हे कळत नाही. गरज आणि लोभ यात अंतर आहे. गरजा मर्यादित असतात. लोभ किंवा हाव यांना कोणतीही मर्यादा नसते. लोभापोटी माणसाच्या हातून अनेक अपराध आणि नको त्या गोष्टी घडतात. आपल्या प्रपंचासाठी जेवढे आवश्यक तेवढे मिळवणे हे प्रापंचिक माणसाचे कर्तव्यच आहे. ते देखील योग्य मार्गाने! पण लोभी माणसाचा विवेक हरवलेला असतो. त्यामुळे माझे ते माझे पण तुझे तेही माझेच अशी त्याची वृत्ती होते. येनकेन मार्गाने तो ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी या गोष्टींची हाव माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाते आणि त्याचे अध :पतन घडवून आणते.

आपल्याला हवी ती गोष्ट नाही मिळाली की मग अशा माणसांचा संताप होतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘ अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. ‘ दुर्योधनाला राज्य आणि सत्तेची एवढी हाव होती की त्याने पांडवांच्या हिश्याचे राज्य तर सोडाच परंतु त्यांना पाच गावेही देण्यास नकार दिला. दुष्ट शकुनीच्या बदसल्ल्याला तो बळी पडली. त्याच्या हिताचे सांगणाऱ्या भीष्म, विदुर, श्रीकृष्ण आदींच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे त्याला मनःशांती नव्हती. त्याचे चित्त क्षोभाने व्यापलेले होते. शेवटी सत्ता आणि संपत्ती यांच्या अतिलोभाने त्याचा घातच केला.

म्हणूनच दासबोधात समर्थ सांगतात की ‘ अती सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुनि वर्तावे. ‘ धर्माने घालून दिलेल्या मर्यादेत सर्व गोष्टींचा उपभोग घ्यावा. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तोचि तो मानवी धन्य होतो. ‘ असेच वागणे आपल्या हिताचे आहे. जे अती विषयी माणसे असतात त्यांची अवस्था व्यवहारात अत्यंत दीनवाणी होते. त्यांना किंमत राहत नाही असे समर्थ म्हणतात. दैनंदिन जीवनातही अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यांच्या लोभ किंवा कामवासनेच्या अतिरेकामुळे लोकांमध्ये त्यांची छी थू होते. माणूस जेव्हा विषयांच्या अधीन होतो, तेव्हा तो त्याचा मालक न राहता गुलाम होतो. मग ही गुलामगिरी त्याला वाटेल तसे वागण्यास भाग पाडते. त्यात आपण लाचार किंवा दैन्यवाणे होत जात आहोत हेही त्याच्या लक्षात येत नाही.

स्वसंवाद :: 

१. माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचा ‘अतिरेक’ होतोय का? (उदा. सोशल मीडिया, खाणे, राग किंवा कामाचा अट्टाहास) 

२. माझी कोणतीही कृती ही ‘गरज’ आहे की ‘लोभ’, हे मी ओळखू शकतो का?

३. जेव्हा मला माझ्या आवडीची गोष्ट मिळत नाही, तेव्हा माझ्यात ‘क्षोभ’ (राग) निर्माण होतो का? तो शांत करण्यासाठी मी काय करतो?

४. माझे चित्त ‘निर्मळ’ ठेवण्यासाठी मी दिवसातला किती वेळ स्वतःला आणि परमेश्वर चिंतनाला देत

– क्रमशः श्लोक ६३ आणि ६४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘इंद्रगोप’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘इंद्रगोप’ ☆ श्री दिवाकर बुरसे

पावसाच्या पहिल्या सरींसोबत अवतरणारा लाल मखमली निसर्गदूत

पहिला पाऊस पडतो… ग्रीष्माच्या तप्त उन्हाने करपलेल्या धरतीवर अचानक आकाशातून पाण्याचे टपोरे थेंब येवून आदळतात. क्षणार्धात भूमीच्या उदरात दडलेला गंधकोश भंगतो आणि मातीचा रम्य गंध आसमंतात दरवळतो. झाडांच्या फांद्यांवरची नवी पालवी थरथरते. सृष्टीच्या अंगावर जणू नवजीवनाची शाल पांघरली जाते. अंबरात सप्तरंगी अर्धगोल इंद्रधनुष्य प्रकटते आणि अशाच वेळी, काळ्या आईच्या कुशीत वर्षभर लपून बसलेले काही लालभडक, मखमली जीव अचानक धरतीवर प्रकटतात. हिरव्यागार गवतावर विखुरलेले ते लाल ठिपके पाहताना वाटते, जणू निसर्गाने धरतीच्या भाळी कुंकवाची उधळण केली आहे! हा जीव म्हणजे ‘इंद्रगोप’.

पर्जन्याचा देव इंद्र. कदाचित म्हणूनच आपल्या रसिक पूर्वजांनी पावसाळ्यात आकाशात उमटणाऱ्या सप्तरंगी कमानीला ‘इंद्रधनुष्य’ आणि धरतीवर प्रकटणाऱ्या या लाल मखमली जीवाला ‘इंद्रगोप’ अशी नावे दिली असावीत.

हा इंद्रगोप म्हणजे — मराठीतला आपला परिचित मृगकिडा. मृग नक्षत्रात तो दिसू लागतो म्हणून त्याला ‘मृगकिडा’ म्हणतात. महाराष्ट्रात गोसावी किडा, किटकुल अशीही त्याची नावे आहेत. संस्कृतमध्ये तो इंद्रगोप आणि वीरबहूती, तर इंग्रजीत Red Velvet Mite म्हणून ओळखला जातो. भारतीय लोकजीवनात त्याचे आगमन म्हणजे पावसाळ्याची चाहूल. म्हणूनच तो केवळ एक जीव नसून ऋतू परिवर्तनाचा लाल मखमली संदेशवाहक मानला गेला आहे.

कालिदासाच्या काव्यातला लाल ठिपका

भारतीय काव्यविश्वात निसर्गाच्या सूक्ष्म छटा शब्दबद्ध करणाऱ्या महाकवी कालिदासांनी इंद्रगोपालाही आपल्या ‘मेघदूत’, ‘ऋतुसंहार’ आणि ‘कुमारसंभव’ या प्रमुख रचनांत वर्णन करून अमर केले आहे.

‘मेघदूता’च्या पूर्वमेघ, श्लोक ४० चा आरंभ _’रक्तैरिन्द्रगोपैश्चितां’_ अशा शब्दांनी पर्वताच्या शिखराच्या सांध्यावर, लाल इन्द्रगोप किड्यांनी सजलेल्या, ‘कामरूपा’ नावाच्या हिरण्य नदीचे वर्णन केलंय.

तपःक्लेशक्षामां… संनद्धैरिन्द्रगोपकणैरिव ॥

या ‘कुमारसंभव’ – सर्ग ३, मधील २६ व्या श्लोकात पार्वतीच्या तपस्वी वेशाला सौंदर्य देण्यासाठी इंद्रगोपाची उपमा दिली आहे. तपस्विनी असूनही तिच्या शरीरावर पडलेली फुलं म्हणजे वेलीवर बसलेले इन्द्रगोप!

‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकात विरहाने व्याकूळ झालेला राजा पुरूरवा आपल्या प्रिय उर्वशीचा शोध घेत अरण्यात भटकत असतो. हिरव्या गवतावर पसरलेल्या लाल इंद्रगोपांकडे पाहून त्याला क्षणभर वाटते— उर्वशीच्या लाल किनारीच्या वस्त्राचा एखादा तुकडाच तर इथे पडलेला नाही ना?

प्रेम आणि विरहाच्या भावनांना निसर्गाच्या रंगांत मिसळून पाहण्याची ही कालिदासांची अद्वितीय दृष्टी.

‘ऋतुसंहार’मध्ये त्यांनी पावसाळ्यातील भूमीचे वर्णन करताना म्हटले आहे…

श्लोक:

इन्द्रगोपकचित्राङ्गा प्रावृट्काले च मेदिनी ।

भाति सम्प्रति सा देवी रत्नाभरणभूषितेव ॥

(सर्ग २ प्रावृट् /वर्षा वर्णन श्लोक २)

अनुवाद: पावसाळ्यात ही पृथ्वी इंद्रगोप नावाच्या लाल किड्यांनी आणि रानफुलांनी चित्रविचित्र नटलेली असते. त्यामुळे ती आता रत्नजडित अलंकारांनी भूषवलेल्या देवीसारखी शोभून दिसते.

आजही पहिल्या पावसानंतर लाल मखमली इंद्रगोपांनी सजलेली हिरवीगार भूमी पाहताना कालिदासांच्या उपमेची प्रचिती येते.

किडा नव्हे, अष्टपादी चमत्कार

लोकभाषेत त्याला किडा म्हटले जाते; पण प्रत्यक्षात तो कीटक नाही. इंद्रगोप हा Trombidiidae कुळातील अष्टपादी (Arachnid) प्राणी आहे. कोळी आणि गोचीड यांचा तो दूरचा नातलग. वर्षातील बहुतांश काळ तो जमिनीखाली, ओलसर बिळांमध्ये लपून राहतो. पहिल्या दमदार पावसानंतर मोठ्या संख्येने बाहेर येणारा हा जीव पूर्वीपासून पावसाचा नैसर्गिक दूत मानला जातो.

धरतीचा लाल प्रहरी

इंद्रगोपाचे सौंदर्य जितके मोहक, तितकेच त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. तो वाळवी, मुंग्या, मावा आणि इतर अनेक सूक्ष्म किड्यांची अंडी खातो. त्यामुळे शेतीतील हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात राहते. मातीतील सूक्ष्म जीवसृष्टीचे संतुलन राखण्यातही त्याचा मोठा वाटा असतो. उपयुक्त जीवाणू, बुरशी आणि सेंद्रिय पदार्थांच्या विघटन प्रक्रियेसाठी तो अप्रत्यक्षरीत्या हातभार लावतो. म्हणूनच इंद्रगोप हा निरोगी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा जैविक निर्देशक मानला जातो. शेतकऱ्याचा हा इवलासा मित्र नकळतपणे जैविक कीडनियंत्रणाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.

रेशमी प्रेमबाग

निसर्गात प्रेम व्यक्त करण्याच्या किती विलक्षण पद्धती असतात याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे इंद्रगोप. मीलनाच्या काळात नर माइट रेशमासारख्या धाग्यांचा मार्ग तयार करतो. त्यावर पाने, काटक्या आणि सूक्ष्म वस्तूंनी सजावट करतो. या रेशमी मार्गावर तो शुक्रपुटिका ठेवतो आणि नृत्यसदृश विभ्रमांनी मादीला आकर्षित करतो. या लहानशा जीवाने उभारलेली ती प्रेमबाग म्हणजे निसर्गातील एक अद्भुत प्रणयकथा आहे.

अळी ते शिकारी

अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्यांना आरंभी सहा पाय असतात. या अवस्थेत त्या अळ्या इतर सूक्ष्म किटकांवर परजीवी म्हणून जगतात. नंतर वाढीच्या प्रक्रियेत त्यांना आणखी दोन पाय येतात आणि ते पूर्ण विकसित अष्टपादी बनतात. त्यानंतर ते स्वतंत्रपणे जमिनीत राहून सूक्ष्म प्राण्यांची शिकार करतात.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारी त्यांची भूमिका निसर्गातील परस्परसंबंधांची सुंदर जाणीव करून देते.

माणसांचा मित्र

लाल रंगामुळे अनेकांना हा जीव धोकादायक वाटतो; परंतु तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे. तो माणसांना किंवा पाळीव प्राण्यांना चावत नाही, दंश करत नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी तो केवळ कडू आणि दुर्गंधीयुक्त द्रव्य स्रवतो. त्यामुळे पक्षी आणि इतर शिकारी त्याच्यापासून दूर राहतात. त्याचा लाल रंग आक्रमणाचे प्रतीक नसून, निसर्गाने त्याच्या अस्तित्वाभोवती उभारलेली एक सावधगिरीची खूण आहे.

या लाल रत्नांचे जतन करूया

रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक हा इंद्रगोपांसाठी सर्वांत मोठा धोका आहे. व्यापक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अनेक कीटकनाशकांमुळे हे उपयुक्त जीव नष्ट होतात. जैविक उपायांचा वापर, कमी नांगरणी, सेंद्रिय आच्छादन आणि मातीतील ओलावा टिकवून ठेवणे यांमुळे त्यांचे संरक्षण होऊ शकते. निसर्गातील अशा लहान जीवांचे रक्षण म्हणजे शेतीचे, मातीचे आणि पर्यावरणाचे रक्षण होय.

धरतीच्या उदरातील जीवंत रत्ने

पूर्वी ग्रामीण भागात इंद्रगोपाला हळद-कुंकू वाहून मान दिला जाई. त्यामागे अंधश्रद्धा नव्हती; तर निसर्गातील प्रत्येक जीवाशी असलेले आत्मीय नाते होते.

आज विज्ञानाने इंद्रगोपाचे पर्यावरणीय महत्त्व सिद्ध केले आहे; परंतु आपल्या पूर्वजांनी ते खूप आधी ओळखले होते. पहिल्या पावसाच्या सरींनंतर जेव्हा हिरव्यागार धरतीवर हे लाल मखमली जीव विखुरलेले दिसतात, तेव्हा वाटते—आषाढाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी भूमातेने आपल्या ओंजळीतली माणकं, पोवळ्यांची भरभरून उधळण केली आहे. त्यातील प्रत्येक रत्न, प्रत्येक कण जणू निसर्गाने जपून ठेवलेला एक छोटासा चमत्कार असतो. तोच हा इंद्रगोप—पावसाचा दूत, मातीचा मित्र आणि सृष्टीच्या सौंदर्याला लाभलेला लाल मखमली स्पर्श!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ३ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ३ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक २१ ते ३० 

श्लोक

समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखा-

न्निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने ।

अथाऽयं व्यासङ्गो हतपतितनिस्तारणविधौ

न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगति ॥ २१॥

*

नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कतमया

पुराणां संहर्तुः सुरधुनि कपर्दोऽधिरुरुहे ।

कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालि सलिलै-

स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः ॥ २२॥

*

विधत्तां निःशङ्कं निरवधि समाधिं विधिरहो

सुखं शेषे शेतां हरिरविरतं नृत्यतु हरः ।

कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदानयजनैः

सवित्री कामानां यदि जगति जागर्ति जननी ॥ २३॥

*

अनाथः स्नेहार्द्रां विगलितगतिः पुण्यगतिदां

पतन् विश्वोद्धर्त्रीं गदविगलितः सिद्धभिषजम् ।

सुधासिन्धुं तृष्णाकुलितहृदयो मातरमयं

शिशुः सम्प्राप्तस्त्वामहमिह विदध्याः समुचितम् ॥ २४॥

*

विलीनो वै वैवस्वतनगरकोलाहलभरो

गता दूता दूरं क्वचिदपि परेतान् मृगयितुम् ।

विमानानां व्रातो विदलयति वीथिर्दिविषदां

कथा ते कल्याणी यदवधि महीमण्डलमगात् ॥ २५॥

*

स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसञ्जातजटिल-

ज्वरज्वालाजालज्वलितवपुषां नः प्रतिदिनम् ।

हरन्तां सन्तापं कमपि मरुदुल्लासलहरि-

च्छटाचञ्चत्पाथःकणसरणयो दिव्यसरितः ॥ २६॥

*

इदं हि ब्रह्माण्डं सकलभुवनाभोगभवनं

तरङ्गैर्यस्यान्तर्लुठति परितस्तिन्दुकमिव ।

स एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलो

जलानां सङ्घातस्तव जननि तापं हरतु नः ॥ २७॥

*

त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृतिविधौ

करं कर्णे कुर्वन्त्यपि किल कपालिप्रभृतयः ।

इमं त्वं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये

पुनाना सर्वेषामघमथनदर्पं दलयसि ॥ २८॥

*

श्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलितै-

र्विमुक्तानामेकं किल सदनमेनःपरिषदाम् ।

अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं

तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः ॥ २९॥

*

न कोऽप्येतावन्तं खलु समयमारभ्य मिलितो

यदुद्धारादाराद्भवति जगतो विस्मयभरः ।

इतीमामीहां ते मनसि चिरकालं स्थितवती-

मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणय नः ॥ ३०॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद – – 

पद्मासम सुंदर विष्णूपद नखापासुनी जन्म

अनंगारिच्या जटाजुटात तुझे निवास स्थान

उद्धारास्तव पतितांच्या त्या जीवनात तू मग्न

उत्कर्ष श्रेष्ठतम आहे तव या समस्त विश्वातून ॥२१॥

*

दुजी नगनदी नाही केली शिवशंभू धारण

कोण्या नदीने नाही केले केशवपद क्षालन

अशी न सरिता ठायि जिच्या तव उपमेचा लेश

सर्वश्रेष्ठ हे भागीरथी तू दिव्यत्वाचा अंश ॥२२॥

*

विरंचि लावो समाधि त्याची निरंतर वा अनंत

शेषशयन हरि करो वा हर तांडव ते नृत्य

यज्ञ दान तप कशास प्रायश्चित्ताचे कांड ते

जगात जोवर तुझी जननी गे जागृती जागते ॥२३॥

*

अनाथ गतिहिन व्याधीग्रस्त मी पातकी जरी

तृषार्त स्नेहासी होउनिया आर्त मनी मी उरी

सुधासिंधु वैद्यसिद्ध ते समस्त जग उद्धरी

शिशू पातला शरण तयासी भले तेच तू करी ॥२४॥

*

अवतरली अवनीवरती तव गाथा मंगलदायी

यमनगरीतिल पापिजनांचा आक्रोशहि कमी होई

अस्तित्व तुझे नाही तेथे दूत यमाचे जाती

पतीत पापी कुठे मिळति का याचा शोध घेती ॥२५॥

*

क्रोधे उद्भवलेल्या जटिल तेज ज्वरांच्या ज्वाला

संतापाने जाळित अमुच्या जर्जर देहाला

पवन प्रवाहे चंचल तुझिया जलकण लहरींनी

ताप हरो हा सदैव अमुचा माते तू प्रतिदिनी ॥२६॥

*

ब्रह्माण्डाचा आश्रय सकल भुवनासी सर्वत्र

ज्याच्या लहरींनी आहे स्थित जणू तेंदूपत्र

शिवजटेतुनी जटिल जाहला जलप्रवाह जेथे

नाश करो तापांचा अमुच्या शांती असो येथे ॥२७॥

*

उद्धारास्तव समस्त तीर्थे माझ्या संकोचती

भस्मविभूषित शिवशंकरही कानी कर ठेविती

अंतर्यामी अनुकंपा तव पावन मज करिशी

तीर्थांचा अन् महादेवाचा गर्व सर्व हरिशी ॥२८॥

*

पापाचरण करू ना करु संदेही पापी मी

ऐसा सागर घोर नीच कृत्यांचा आहे मी

उद्धरण्यास्तव मम पतिताला कसे आळवू मी

स्तवन तुझे गे कसे करावे नरपशू आहे मी ॥२९॥

*

आजवरी ना कधी गवसला पतीत येथ जगात

उद्धाराने ज्याच्या होईल आश्चर्यावर मात

माझ्यारूपे आज पातला ऐसा पापी प्राप्त

कृपा करुनी मजसि उद्धरी पुरवी मनोरथ ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा 

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares