मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथ टागोर व संगीत

रविंद्रनाथांना जन्मजात लाभलेल्या रूपसौंदर्यासारखंच सूर सौंदर्य देखील लाभलं होतं. ब्राह्मो समाजाचे आद्य गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती हे त्यांचे पहिले गायन गुरू. यदुभट्ट यांच्याकडेही त्यांचे संगीत शिक्षण झाले मात्र कोणत्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही. त्यांनी जवळ जवळ २२३० स्वरचित गाण्यांना चाली लावल्या.

रविंद्रनाथांच्या कविता; नाद, सूर, लय घेऊनच त्यांच्या लेखणीतून प्रकट होत. ते त्यांच्या कवितेला कधी कविता म्हणत नाहीत, गीत म्हणतात. इंग्रजी गीतांजलीतील कविता खरंतर prose poetry किंवा गद्य काव्य या प्रकारातील आहेत पण तरीही त्यांनी तिला ‘गीतांजली, song offering’ म्हटलंय. कदाचित मूळ बंगाली कविता, ह्या गेय असल्यामुळे असेल. कविता व गेयता यांचं नातं अनादि कालापासून भारतीयांनी अनुभवलेलं आहे. आपली वेद, उपनिषदे सुद्धा गेय काव्य रूपातच आहेत.

रविंद्रनाथांनी सुरांचे सामर्थ्य लहानपणीच ओळखलं होतं. त्यांच्या कवितेचा भाव; सुख-दु:ख, हर्ष- शोक, भक्ती- प्रीती कोणताही असो, त्यांचे शब्द, सुरांचा साज लेऊनच वहीच्या मंचावर नर्तन करीत प्रवेश करत. कवितेचं गाणं होताना सुरांतून इंद्रधनुष्य निर्माण होत असतं असं त्यांना वाटे.

“मला गायला कधी येत नव्हतं असं मला आठवतच नाही. ” असं ते म्हणायचे. गाणं रचताना ते गात गात रचावं व रचता रचता तद्रूप होऊन जावं अशी तन्मयता, उन्मादावस्था त्यांनी अनेकदा अनुभवली व एकदा एका खाजगी पत्रात वर्णिली पण आहे. ही अलौकिक अशी अध्यात्मिक परमावस्था नाही काय?

रविंद्रनाथांना भारतीय अभिजात संगीताची चांगली जाण होती. अनेक रागरागिण्यांचे संस्कार घेऊन त्यांची गीतं प्रकट होत. पण लोकसंगीताच्या देखील असंख्य चाली त्यांच्या गीतांमध्ये दिसतात. बंगाली लोकसंगीत मुळात अतिशय समृद्ध आहे. बाऊल, भटियाली, कीर्तन, काका, कविगान, श्यामा संगीत, फकिरांची गाणी, सूफी गाणी, वैष्णव भक्तांची गाणी, भादू सारखी कहाण्यांची गाणी, पाँचालि, जात्रापाला असे अनेक प्रकार त्यात आहेत. आपल्या संगीतासाठी ख्याल, ध्रुपद, ठुमरी, दादरा, टप्पा इथपासून लोकसंगीतापर्यंतच्या; इतकंच नव्हे तर पाश्चात्य संगीतावर आधारित चाली देखिल वापरण्याची रविंद्रनाथांची प्रतिभा पाहून अभ्यासक देखील चकित होतात.

रविंद्र संगीताचा बंगाली संगीतावरील प्रभाव आज देखील ठळकपणे जाणवतो किंबहुना खरंतर रविंद्र संगीतापासून बंगाली संगीत वेगळं करताच येणार नाही. त्यांच्या संगीताकडे चित्रपट क्षेत्रातील सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, नितीन बोस, तपन सिन्हा, कुमार साहनी यांच्यासारखे अतिरथी, महारथी आकर्षित झाले नसते तरच नवल! त्यांनी आपल्या चित्रपटात रविंद्रनाथांची गाणी वापरली. इतकेच नव्हे तर कांही ब्रिटिश, युरोपियन व ऑस्ट्रेलियन चित्रपटांत देखील त्यांची गाणी वापरली गेली आहेत. मात्र आपल्या गीतातील शब्दच काय पण सूर देखील बदलणं त्यांना मंजूर नव्हतं. आज सुध्दा त्यांची गाणी जशीच्या तशी गायली जातात.

 (संदर्भ: रविंद्रनाथ तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

——

गीत : ७३

DELIVERANCE is not for me in renunciation. I feel the embrace of freedom in a thousand bonds of delight.

Thou ever pourest for me the fresh draught of thy wine of various colours and fragrance, filling this earthen vessel to the brim.

My world will light its hundred different lamps with thy flame and place them before the altar of thy temple.

No, I will never shut the doors of my senses. The delights of sight and hearing and touch will bear thy delight.

Yes, all my illusions will burn into illumination of joy, and all my desires ripen into fruits of love.

——

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७३

☆ 

सर्वसंगपरित्याग करुनि

कशास मी मुक्त व्हावे ?

हजार बंधनात सुखाच्या,

मुक्तीला आलिंगन द्यावे॥

 *

काठोकाठ रस तू भरिशी 

मातीच्या या घटाघटातुनी

अनेक रंगी तिला रंगविशी,

अनेक तशा सुवासातुनी॥

 *

तव ज्योतीने दीप उजळतील

मम जगती, राऊळी लावण्या

पंचेंद्रिये मम सजग राहतील

तुझे शब्द, स्पर्श जाणण्या॥

 *

तव दर्शनास आसुसलो रे,

कसा करीन मी बंद लोचना

सारी सुखे ही तुझी देणगी

याच जाणीवा आणि भावना॥ 

 *

आनंद इतुका मला हवा की

आभास सारे त्यात मिटावे

तव प्रेमाच्या अंतर्यामी

मनोरथ माझे फलित व्हावे॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆  गीत : ७४ ☆ 

THE day is no more, the shadow is upon the earth. It is time that I go to the stream to fill my pitcher.

The evening air is eager with the sad music of the water. Ah, it calls me out into the dusk. In the lonely lane there is no passer by, the wind is up, the ripples are rampant in the river.

I know not if I shall come back home. I know not whom I shall chance to meet. There at the fording in the little boat the unknown man plays upon his lute.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७४ ☆ 

☆ 

लांब गेल्या सावल्या अन्

क्षितिजी टेकला दिनमणी

मावळतीची सुवर्णलाली

जलात नदीच्या आरसपानी॥

 *

सांजवेळी नदी किनारी,

घडा भराया जाईन म्हणते

उत्सुक सायंकाळ परंतु 

उदासवाणे गीत गाते॥

 *

तिन्हीसांजेच्या या प्रहरी

दूर कोण मज साद देते

वात लहर ती अवखळ भारी

पाण्यावर तरंग उठविते॥

 *

जाईन म्हणते, नसे माहिती 

परतुनि येईन की नाही

नदी किनारी, कुणा भेटण्या

जीव अनावर होतच राही॥

 *

गेले धावत निर्जन मार्गे

तोच उमटले मधु सूर बासुरी

एकल नावेमधे बैसला

अनोळखी जरी, खचित मुरारी॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆   गीत : ७५ ☆ 

THY gifts to us mortals fulfil all our needs and yet run back to thee un-diminished.

The river has its everyday work to do and hastens through fields and hamlets; yet its incessant stream winds towards the washing of thy feet.

The flower sweetens the air with its perfume; yet its last service is to offer itself to thee.

Thy worship does not impoverish the world.

From the words of the poet men take what meanings please them; yet their last meaning points to thee.

—–

☆   मराठी भावानुवाद : गीत : ७५ ☆ 

☆ 

 दान तुझे तुळस मंजिरी

उणे न कांही तुझ्या मंदिरी

भरभरुनि तू देतच जाशी

परतुनि ये ते तुझ्याच पाशी॥

 *

नदी वाहते शेतामधुनी

शमते तृष्णा गावामधुनी

अविरत वाहे, अखेर सरिता,

पादाभ्यंगा तुझ्याच करिता॥

 *

कुसुम गंधा पवन वाहतो

आसमंत हा पुलकित होतो

ध्येय अंतिम परंतु त्याचे

तुझ्याच पायी लीन व्हायचे॥

 *

तुझ्या पूजना सर्वस्व वाहतो

इथे परि कुणी नच गरीब होतो

भरभरून सुख जीवनी वेचतो

तुझीच किमया हे ही जाणतो॥

 *

 कवीच्या गीतांमधुनी अर्था

जो तो शोधी, पुरवित स्वार्था

परि अखेर जी गीते बोलती

कृष्ण भावना तुझीच की ती॥

☆ 

– क्रमशः भाग २५..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा

– – – आणि काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री!

वर्ष १९६५. आपल्या जन्मजात शत्रूने अर्थात पाकिस्तानने १९४७ नंतर १८ वर्षांनी पुन्हा फणा उभारला आणि भारतावर आक्रमण करण्याचा मनसुबा प्रत्यक्षात आणला ! –

– – आपल्या पंजाब सीमेवरील फिरोजपूर जिल्ह्यातलं, सतलज नदीच्या अगदी अंगाखांद्यावर खेळणारं आणि पाकिस्तानातील गंडासिंगवाला गावच्या अगदी समोर असलेले हुसैनीवाला गाव. अमृतसर पासून हे स्थळ सुमारे ११० किलोमीटर्स भरते. हुसैन नावाच्या मुस्लिम संताच्या नावावरून या गावाचे नाव पडले आहे.

या गावाला एक विशेष इतिहास लाभला आहे. क्रांतीपुरुष भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिशांनी फासावर चढवले. या तिघांवर सतलज काठावरील एका ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. भारतीय जनमत या बलिदानांनी विदग्ध झालेले होते… या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जमाव जमून काही विपरीत घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी ठरलेल्या दिवसापेक्षा एक दिवस आधीच गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची योजना आखत या तिघांची शवं तिथे पोहोचवली… पण याचीही खबर लोकांना लागली… मोठाच तणाव निर्माण झाला… यामुळे ब्रिटिशांनी हे तीन मृतदेह जागेवरच ठेवून तिथून पळ काढला. मग स्थानिक नागरिकांनीच या देहांवर अंत्यसंस्कार केले! इथे पुढे प्रेरणा स्थळ स्मारक उभारले गेले.

भगत सिंह यांच्या मातोश्री, विद्यावती देवी यांनी आपले अंतिम संस्कार मुलाशेजारीच केले जावेत, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार त्यांच्या देहावर भगत सिंग यांच्या स्मारकाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले… मूल आईच्या कुशीत शिरते… इथे आई मुलाच्या कुशीत शिरून चिरनिद्रा घेती झाली! क्रांतिवीर बी. के. दत्त यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली होती… त्यांनाही इथे अंतिम विश्रांती देण्यात आली.

१९४७ च्या फाळणीत हुसैनीवालासह येथील बारा गावे पाकिस्तानात गेली. नतद्रष्ट पाकिस्तान्यांनी इथून जाताना भारतात असलेला कैसर ए हिंद हा स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला सुंदर पूल नष्ट केला!

मुंबईतून हुसेनीवाला मार्गे पाकिस्तानमध्ये जाणारी पंजाब मेल दिल्लीवरून फिरोजपूरला वळवण्यात आली.. हुसेनीवाला रेल्वे स्टेशन तिथे जतन करून ठेवलेले आहे.

फाळणीमुळे पाकिस्तानात गेलेल्या शहीद प्रेरणास्थलाची अवस्था खराब झाली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रयत्न करून तो भाग भारतात घेतला आणि त्या बदल्यात नदीचा आणि जलव्यवस्थेचा काही भाग पाकिस्तानला दिला! 

१९५६. प्रचंड पावसाने महापूर आलेला होता, येथील ब्रिटिशकालीन पूल वाचवण्यासाठी अभियंते झटत होते. परिस्थितीचा गैरफायदा घेत पाकिस्तानने या पुलावर हल्ला चढवला. ४, जम्मू काश्मीर रायफल्सच्या सैनिकांनी पाकिस्तान्यांना हुसकावून लावले!

आणि यानंतर दहाच वर्षांनी पाकिस्तान पुन्हा उलटून आला.. !१९६५ मध्ये पाकिस्तान ही जागा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची खबर भारतीय सैन्यास लागली. या भागाच्या रक्षणासाठी २, मराठा लाईट इन्फंट्री या आपल्या चपळ सैन्यदलास इथे घाईघाईने तैनात करण्यात आले.

– – या काळ्या पाचवीच्या नेतृत्वाची जबाबदारी लेफ्टनंट कर्नल टी. टी. ए. नोलान साहेबांच्या भक्कम खांद्यांवर होती. खरं तर मराठा सैनिक इथे संरक्षणात्मक पवित्रा घेतील अशी इतरांची कल्पना होती!

काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री या नावाला एक अर्थ आहे. या सैनिकांच्या गणवेशात काळया रंगाचे प्राबल्य आहे. सह्याद्रीचा रंगही करडा, काळा कभिन्न! आणि इथं जन्मलेली शरीरं आणि मनं कणखर! वायुवेगाने हालचाली करीत शत्रूच्या गोटात शिरून त्याच्या राईराई एवढ्या चिंधड्या उडवाव्यात त्या मराठ्यांनीच! यशाचे धनी असलेले मराठा गडी लष्करात विशेष वकूब राखून आहे. पूर्वी आपल्याकडे गणपत हे नाव प्रचलित असे. त्यावरून अधिकारी लोकांनी प्रेमाने आपल्या सैनिकांना Ganpats हे नाव दिले होते! आता दुसरी असलेली ही इन्फंट्री पूर्वी पाचवी होती. लष्करात प्रत्येक दलाला विशिष्ट क्रमांक दिलेले असतात.

पाकिस्तान पूर्ण ताकदीने या हल्ल्यात उतरले असताना नोलान साहेबांनी आक्रमक पवित्रा घेतला! मराठे त्वेषाने लढले… एक विरुद्ध शंभर अशी स्थिती असताना एक मराठा शंभर पाकिस्तान्यांना भारी पडला! हल्ले परतवून लावले जातच होते… एके दिवशी नोलान साहेब युद्धाची व्यूहरचना करीत असताना त्यांच्या अगदी जवळच बाँब पडला आणि आपण एका शूर अधिकाऱ्यास मुकलो. त्यांच्यासह वीस सैनिक, अधिकारी हुतात्मा झाले. नेता धारातीर्थी पडलेला असताना मराठे आणखी जोरदार लढले आणि पाकिस्तान शेपूट घालून माघारी पळून गेला!

या लढाईतील कामगिरी मुळे २, मराठा लाईट इन्फंट्रीला Husseniwala Battle Honour प्राप्त झाला. स्थानिक नागरिकांनी विशेष मानपत्र प्रदान केले!

 १९७१ मध्ये सुद्धा पाकिस्तानने इथेच हल्ला चढवला होता. पंजाब बटालियनने यावेळी शौर्य गाजवून त्यांना खूप काळ रोखून धरले होते! पण यावेळी पाकिस्तानची ताकद आणि तयारी तिप्पट होती… त्यांनी हुसेनीवाला पूल उडवून लावला आणि परिसर ताब्यात घेतला… मात्र शिमला करारात भारताने हा भाग पुन्हा मिळवला!

या जागेचे महत्त्व व्यापारीदृष्ट्या सुद्धा अधिक होते आणि आहे. भारत – पाकिस्तान – अफगाणिस्तान यांच्यात जो काही व्यापार होतो… तो बराचसा इथून होतो. परस्पर संवाद वाढवा, सौहार्द वाढावे म्हणून सीमा सुरक्षा दलाचे तत्कालीन इन्स्पेक्टर जनरल अश्विनीकुमार शर्मा साहेबांनी १९७० मध्ये आटारी बॉर्डर सारखी The Beating The Retreat Ceremony सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि ही परेड सुरू झाली.. आणि १९७१ पासून ही नियमित झाली!

माहितीचा किंवा प्रसिद्धीचा अभाव या कारणांनी अनेक भारतीय नागरिकांना ही जागा माहीत नाही. खरं तर हुतात्मा भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांची बलिदाने, भगत सिंग यांच्या मातोश्री यांना वंदन करण्यास लोकांनी गेले पाहिजे… हे एक पवित्र स्थळ आहे. भारतीय सैनिकांनी इथे बलिदाने दिली आहेत… मराठी अधिकाऱ्यांनी इथे अनुभव पणाला लावला आहे. त्यांना वंदन म्हणून इथे भेट द्यायला पाहिजे!

सैनिक आणि नागरिक यांनी आता अधिकाधिक जवळ आले पाहिजे… कारण पाकिस्तान सुधारणार नाही… आपण सदैव दक्ष असले पाहिजे! सैन्य आहेच तैनात! जय हिंद.. जय हिंद की सेना!

(सेवानिवृत्त सैन्याधिकारी श्री. संजय सहस्रबुद्धे साहेबांनी या लेखासाठी प्रेरणा दिली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मरीन ड्राईव्ह बांधणारा आणि दादरची स्मशानभूमी दान देणारा ‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला विचारलं की मुंबईची शान असलेला मरीन ड्राईव्ह कोणी बांधला? तर अनेकांना उत्तर माहीत नसेल. पण स्वतःच्या खिशातले लाखो रुपये खर्चून मुंबईसाठी मरीन ड्राईव्ह बांधणारा, आणि दादरमध्ये स्मशानभूमीसाठी तब्बल ५ एकर जागा दान देणारा एक महान मराठी माणूस होता !

ते होते : श्रीमान भागोजी शेठ कीर ! 

रत्नागिरीतल्या एका अत्यंत गरीब भंडारी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्राने स्वतःच्या जिद्दीवर मुंबईत साम्राज्य उभं केलं. आज दादरमध्ये ज्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘चैत्यभूमी’ आणि ‘सावरकर स्मारक’ डौलाने उभं आहे, ती ५ ते ६ एकर जागा भागोजी शेठ कीर यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन स्मशानभूमीसाठी दान केली होती.  

इतकेच नाही, तर मरीन ड्राईव्हची समुद्राचे पाणी अडवणारी भिंत, मुंबई सेंट्रल स्टेशन आणि ब्रेबॉर्न स्टेडियम या मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंचे बांधकाम त्यांनी शापूरजी पालनजी यांच्यासोबत भागीदारीत केले.

नुसता पैसाच नाही तर समाजसुधारणेतही ते पुढे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःच्या खर्चाने रत्नागिरीत देशातले पहिले ‘पतित पावन मंदिर’ बांधले आणि सर्व जाती-धर्मांसाठी खुले करून अस्पृश्यता निवारणाचा मोठा लढा उभारला.

ज्या माणसाने मुंबईच्या जडणघडणीसाठी आपली संपत्ती पणाला लावली, त्यांचं साधं एक भव्य स्मारक आज मुंबईत नाही, हे आपलं दुर्दैव आहे ! 

पण हा इतिहास इथवरच थांबता कामा नये.

… भागोजी शेठ कीर यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने सांगा! 

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ७ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ७. ☆ प्रा.भारती जोगी ☆

तिनं एकवार बैठकीवर पाहिलं. ती चरकली. गोंधळली. बैठकीवर फक्त टाळ आणि चिपळ्या… बुवांशिवाय! तिला आठवले बुवांचे शब्द, ” आवले, ज्या दिवशी या टाळ-चिपळ्या माझ्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्या दिवशी समज तुझा तुकाराम या जगात नाही “!

 चरकली ती… टाहो फोडला… धनी… धनी… तिचा आकांत ऐकून विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप झाला, पायाखालची वीट थरारली… इंद्रायणी क्षणभर वहायची थांबली!!

हो… हीच ती… टाहो फोडून कोसळलेली, मनानं ढासळलेली… तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी… जिजाबाई, जिला तुकोबा प्रेमाने आवली म्हणत!

… हीच ती आवली जिला तुकोबांनी कधीतरी मनाच्या तरल मनस्थितीत, ज्यात त्यांना वाटे… ” विठो तुझे माझे राज्य, नाही दुस-याचे काज”!… मग अशा वेळी त्यांनी एका अभंगात म्हंटले…

स्त्री द्यावी गुणवंती, तरी तीते गुंते आशा,

म्हणून कर्कशा लावी पाठी”! 

– – झालं… त्यानंतर सगळेच मग आवली कडे कर्कशा पत्नी म्हणूनच बघू लागले. आजही बघतात. पण त्याच तुकोबांनी अजून एका अभंगात म्हंटलंयं…

 ” तुका म्हणे शोधून पाह्य,

 बायको नव-याची माय.

 तिजविण विसावे नाही,

 क्षणार्ध सुद्धा! 

 म्हणोनी संसार थोर! “

पण समाजधुरिणांनी, किर्तनकार, प्रवचनकार, सगळ्यांनीच आवलीवर ‘कर्कशा’… हे शिक्कामोर्तब केले ते केलेच! हाच शिक्का, हीच उमटवलेली मोहोर… पुसण्याचा हा प्रयत्न! तुकोबांच्या परमार्थ कार्य यज्ञात, आयुष्यभर… बोलंत-म्हणंत, त्याना जगरहाटी शिकवंत, लोकांपासून सावध रहाणं सांगंत, प्रापंचिक जबाबदा-यांची जाणीव देत… आणि स्वतः कोंड्याचा मांडा करून प्रपंच नेटका करण्याचा सतत प्रयत्न करंत… कधी पेटंत, कधी धुमसंत, तर कधी धगधगंत पण कुटुंब कबिल्यासाठी चेतती राहिलेली ही… समिधा!!! 

पुण्याच्या गुळवे सावकाराची, खात्या-पित्या घरातली ९-१० वर्षांची लेक… जिजाई! लग्न होऊन तुकारामांच्या घरात येते आणि साखरे सारखी विरघळून जाते त्यांच्या संसारात. द्वितीय पत्नी म्हणून आलेली असूनही, सवतीवर… रखुमाबाईंवर अगदी मनापासून प्रेम आणि तिच्या तब्येतीची काळजी घेणं, तिच्या मुलावर अपत्यवत प्रेम करणं… मोठ्या जावेवर बहिणीसारखी माया केली तिनं! जावेच्या पती विरहाच्या अव्यक्त दु:खानं दु:खी होणारी ही आवली!! प्रपंच मात्र नेटाने आणि नेटका, निगुतीचा करत होती. मोठ्या आत्मविश्वासाने संसार केला तिनं! 

पण तुकाराम मात्र एकापाठोपाठ एक पिता आणि माता यांचं छत्र हरवणं, मोठ्या भावजयीचं अकस्मात जाणं, मोठ्या भावाचं त्या दु:खात, विमनस्क अवस्थेत दूर कायमचं निघून जाणे, पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि पहिल्या मुलाचा ही मृत्यू, पडलेला भयंकर दुष्काळ, होणारी उपासमार, बुडलेली सावकारी आणि प्रतिष्ठेचे निघालेले दिवाळे… या सगळ्या आपत्ती, विपत्तींच्या झंझावातात कोलमडून पडले. आणि परमार्थाची वाट धरली त्यांनी, प्रपंच जणू वा-यावर सोडून दिला. आणि दोघांच्या जगण्याच्या पातळ्याच भिन्न झाल्या. आवली ढासळली मनाने. हिंमत खचल्या सारखी झाली. आणि मग मात्र तिचा संयम कधी तरी संपला तर तिची चिडचिड होणं साहजिकच नाही कां? आपल्या नव-यानं चारचौघांसारखा संसार करावा असं त्या काळातल्या कुणाही बाईला वाटणाऱच ना? मग आवलीचं संतापणं, चिडणं, पराकोटीला ही गेलं असेल समजा… तरी तो उद्रेक तर घरा-घरांत आजही बघायला मिळतोच की! मग तिलाच ‘कर्कशा’ ठरवून, आणि तुकोबांनीच… तिच्या पतीनेच म्हंटलय़ं… असा पवित्रा घेत… आवलीचं पत्नी, सून, जाऊ, माता, गृहिणी म्हणून असलेलं समर्पण दुर्लक्षित नाहीच ना करता येणार? 

तुकोबांनी एकच उरवून आणलेला ऊस… संतापात तिने, भावनेच्या उद्रेकात फेकला, भिरकावला असेल ही त्यांच्या दिशेने… पण त्याचा विपर्यास करून… पाठीत मारला… असं म्हणणं… ही किंवदंती, आख्यायिका ही असू शकते की कदाचित! हा ही एक विचार असूच शकतो ना? पण म्हणून तिच्या या धगी पेक्षा… तिची ऊब, तिची मायेची, पती प्रेमाची पाखर त्याचा तो अलवार स्पर्श ही कधीतरी जाणवून घ्यावा ना? 

हीच आवली… भंडा-याच्या डोंगरात काटे-कुटे तुडवत तुकोबांच्या भुकेची भाकर झाली. तुकोंबावर मनापासून निरतिशय प्रेम केलं तिनं… म्हणूनच तर चिंतनासाठी कधी… भांबनाथ तर कधी भंडारा अशा विविध डोंगरावर, न सांगता गेलेल्या तुकोबांचा पत्ता तिला बरोबर कळे, आणि मग जाई ती थेट त्यांच्या पर्यंत भाकर घेऊन. तुकोबांच्या पोटात घास गेल्याशिवाय आवलीने कधीच एक घास ही खाल्ला नाही.

तुकारामा सारख्या तेजस्वी सूर्याची किरणे आवली पर्यंत नाही पोहोचू शकली. ती सतत त्यांची सावली बनून राहिली तरीही!! पण तरीही आवलीने एका अभंगात आपल्या आध्यात्मिक ज्ञानाची चुणूक, झलक दाखवलीच आहे असं वाटतं… बघा ना…

तुकारामाची कांता सांगे लोकांपाशी

 जातो पंढरीशी स्वामी माझा,

 फुटकाची वीणा त्याला दोन तारा

 घालितो येरझारा पंढरीच्या!”

– – – आवलीने आध्यात्मिक सत्यच सांगितले आहे ना यात… नऊ ठिकाणी छिद्रे असलेली ही देहरूपी वीणा आणि श्वास-उच्छवास या दोन तारा छेडीत माझा स्वामी पंढरीसी कां जातो? कळेना!! 

आवलीने… “देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग! “… हेच तर सांगितलयं ना? 

तुकोबांचं सांगणं… ” आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने! “… हे नसेल उमगलं तिला… पण तरीही तिनं तुकोबांच्या भक्तीचं वादळ पेललंच ना? आभाळ झेललं तिनं!! पण तिचं हे… पेलणं, झेलणं, घराचा सरा होऊन आख्खं घर तोलणं आणि कुटुंबाचा कणा होऊन ताठ उभं करणं… हे जगाने ओळखलंच नाही.

तुका आकाशाएवढा असेलही, आहे ही… पण आवली तर पृथ्वी सिद्ध झाली, जिच्या सोशिकतेने दगडाला ही पाझर फुटावा!!! 

कविवर्य बोरकरांनी सुद्धा तिचा महिमा वर्णिला आहे… म्हणतात…

तुक्याच्या पायाची व्हाया जिने वीट

 केली पायपीट चौ-यांशीची.

 *

 पोचवाया त्याच्या भूकेला भाकर

 काट्यांचे डोंगर पालाणिले.

 *

न चुकावी त्याची पंढरीची वारी

म्हणून वोसरी नोलांडिली!! “

*
आणि पुढे कविवर्य लिहितात…

 *

सार्थक होऊन, तुक्याच्या जन्माचे

 विमान देवाचे आले दारी,

 *

असून गर्भार पाचा महिन्यांची

 गाभण म्हशीची आई व्हाया,

 *

आलीये मुक्ती ला लाविले माघारी

 तुक्याहून थोरवी जिजाई ची!! 

अशी ही आवली तुकयाची सावली, गोठ्यातील गाभण म्हशीची माऊली… स्वतः गर्भार असूनही पतीबरोबरच मुक्ती पांडुरंगाने सुचविली, पण तिने नाकारिली… असंही म्हंटलं जातं. ही आख्यायिका जरी असली तरी, एक गोष्ट तर खरीच ना… की… तुकोबांनंतर ही आवलीने संसाराचा गाडा पुढे नेला. पती विरहाचं दु:ख पचवलं आणि त्यानंतर ४ महिन्यांनी जन्माला आलेल्या नारायणा वर अतिशय सुंदर संस्कार केले. आवलीला पतीचे महात्म्य कळले होतेच. फक्त तिची इच्छा होती की तुकोबांनी प्रपंच सांभाळून परमार्थ करावा. पण तसे नाही होऊ शकले. पण तरीही आवलीने, नारायण बापा सारखा व्हावा म्हणून त्याला वारकरी पंथाची शिकवण दिली. नारायणाचा… नारायण महाराज झाला. वारकरी पंथाची पताका तुकोबारायांनंतर नारायण महाराजांनीच खांद्यावर घेतली. ” ग्यानबा-तुकाराम”… हा गजर, नारायण महाराजांनी लिहिला, सुरू केला आणि माऊली -तुकोबांची एकत्रित पालखी ही त्यांनीच सुरू केली. म्हणूनच ते… पालखी सोहळा जनक:- तपोनिधी नारायण महाराज म्हणून ओळखले जातात. दिंडी सोहळ्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात करण्याचं श्रेय त्यांच्याकडेच जाते.

– – – या सोहळ्याची पताका फडकविणा-या हातांच्या पाळण्याची दोरी मात्र त्या आवली माऊली च्याच हाती होती… हे विसरून नाही ना चालायचं! तिचेच संस्कार भिडले ना, गजर बनून थेट आभाळाला!! या… तिन्ही लोकीं च्या गुंडा पुत्राची माता… आवली… ‘कर्कशा’ कशी असेल ना मग?? 

तुका वारकरी संप्रदायाचा कळस झाला, पण त्या कळसाच्या तेजाचं स्फुल्लिंग… पाया मात्र आवलीच ठरावी, मानावी… असं वाटतं!! 

… ही बायको… तुकोबाची माय बनली, आपल्या लेकरांबरोबरंच, म्हणूनच तुकोबांच्या म्हणण्यानुसार च ते… प्रभु चरणी विसावू शकले.

हा विसावा देणारी त्यांची सावली… आवली… शेवटी त्या पांडुरंगाच्याच चरणी विसावली. खरं म्हणजे पांडुरंगाला तुकोबांपेक्षा तीच जास्त प्रिय होती… तिची विरोधी भक्ती, त्याच्या वरील रागामागचा भक्तीमय अनुराग… जाणला होता त्यानं… म्हणूनच तर ना… काटा निमित्त होते, घेई देव भक्ताचे पाय हाती!! 

– – अशी ही थोरवी त्या आवली ची ! स्वयं दीप होऊन जळत राहणाऱ्या समिधेची !!! 

– लेख क्र. ७.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

… आपण कुठे जास्त सुखी आहोत?

आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपल्याला अमेरिका, लंडन किंवा स्वित्झर्लंडचे फोटो पाहून वाटतं, “काय नशीब आहे या लोकाचं””! किती सुंदर बर्फ आणि किती स्वच्छ हवा!” पण मित्रांनो, एक डॉक्टर म्हणून आणि निसर्गाचा अभ्यासक म्हणून मी तुम्हाला सांगेन, ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.

आज आपण जगातील मोठ्या देशांची हवामान स्थिती आणि आपला भारत किती ‘नशिबवान’ आहे, याचा वास्तववादी आढावा घेऊया.

१. स्वित्झर्लंड: केवळ पर्यटनासाठी सुंदर, जगण्यासाठी कठीण!

स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो पांढराशुभ्र बर्फ. पण विचार करा:

गोठलेले आयुष्य: तिथे वर्षातील ७ ते ८ महिने कडाक्याची थंडी असते. जो बर्फ फोटोंमध्ये छान वाटतो, तोच बर्फ जेव्हा घराच्या दारासमोर ३-४ फूट साचतो, तेव्हा तो काढताना नाकी नऊ येतात.

शेतीचा अभाव: हवामानामुळे तिथे आपल्यासारखी विविध कडधान्ये, फळे किंवा भाजीपाला पिकवणे अशक्य आहे. त्यांना बहुतेक अन्नधान्य आयात करावे लागते.

२. लंडन (यूके): सूर्यप्रकाशासाठी आसुसलेले लोक लंडनच्या हवामानाचा भरवसा कोणीच देऊ शकत नाही.

नेहमीचा पाऊस: तिथे कधीही पाऊस पडतो, त्यामुळे लोक सतत छत्री घेऊन फिरतात. पण तो पाऊस आपल्यासारखा ‘चिंब भिजवणारा’ नसतो, तर तो हाडे गोठवणारा आणि ओलसर असतो.

विटामिन-डी ची कमतरता: तिथे कित्येक आठवडे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे तिथल्या लोकांमध्ये हाडांचे आजार आणि ‘डिप्रेशन’ (उदासीनता) मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच तिथे उन्हाळ्यात थोडा जरी सूर्य दिसला की लोक पार्क मध्ये धावतात.

३. अमेरिका: निसर्गाचा रुद्रावतार

अमेरिका हा देश जेवढा प्रगत आहे, तेवढाच तो नैसर्गिक आपत्तींनी घेरलेला आहे.

बर्फाची वादळे (Blizzards): अमेरिकेत जेव्हा बर्फाची वादळं येतात, तेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, हीटिंग सिस्टम बंद पडते आणि लोक घरातच गोठून मृत्यू पावल्याच्या घटना दरवर्षी घडतात.

टोर्नेडो : तिथल्या काही राज्यांमध्ये इतकी भयानक चक्रीवादळं येतात की अख्खी घरं हवेत उडून जातात. अशा भीतीखाली जगण्यापेक्षा आपला भारत कितीतरी पटीने सुरक्षित आहे.

४. रशिया आणि कॅनडा: उणे ५० अंशांचा छळ

या देशांतील काही भागांत तापमान उणे ४० ते ५० अंशांपर्यंत जातं. तिथे साध्या पाण्याचा बर्फ व्हायला काही सेकंद लागतात. अशा ठिकाणी राहणं म्हणजे निसर्गाशी रोजचं युद्ध असतं.

मग आपला भारत ‘नशिबवान’ का?

आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राहणारे लोक खरंच भाग्याचे आहोत,  

कारण: न मोजता मिळणारा सूर्यप्रकाश: आपल्याला वर्षभर मोफत ‘व्हिटॅमिन-डी’ देणारा सूर्य मिळतो, जो जगातील निम्म्या देशांना मिळत नाही.

मोजून चार-चार महिने: निसर्गाने आपल्याला बदलायची संधी दिली आहे. उन्हाळ्यात आपण आंबे खातो, पावसाळ्यात निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेतो आणि हिवाळ्यात आल्हाददायक वातावरणात काम करतो.

अतिरेक नाही: आपल्याकडे रशियासारखा हाडे गोठवणारा बर्फ नाही की दुबईसारखं अंगाची राख करणारं ऊन नाही. आपल्याकडे ‘मध्यम’ मार्ग आहे.

अन्नधान्याची श्रीमंती: आपल्या हवामानामुळे आपण वर्षातून ३-३ पिके घेऊ शकतो. ताज्या भाज्या, फळे जे आपल्याला सहज मिळतात, ते परदेशात ‘लक्झरी’ मानले जातात.  

डॉक्टरांचा सल्ला:

परदेशाचे फोटो पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. आपण अशा भूमीत जन्माला आलो आहोत जिथे निसर्ग आपली ‘माय’ बनून काळजी घेतो, ‘वैरी’ बनून नाही. या सुवर्ण हवामानाचा आनंद घ्या, व्यायाम करा आणि निरोगी रहा.

 

लेखक: डॉ. सुशांत पाटील

(मोरया क्लिनिक, अक्कोळ)

संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४५ – – – 

जयाचेनि संगे समाधान भंगे |

अहंता अकस्मात येऊनि लागे |

तये संगतीची जनी कोण गोडी |

जिये संगतीने मति राम सोडी |४५|

अर्थ : ज्यांच्या संगतीत मनाचे समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढीस लागतो अशा लोकांची संगत चांगली नाही. ज्यांच्या संगतीत आपण बुद्धीने परमेश्वरापासून दूर जातो अशांच्या संगतीत राहण्यात गोडी ती कोणती ?

विवेचन : या श्लोकात समर्थांनी अप्रत्यक्षपणे सत्संगतीची महती सांगितली आहे. व्यवहारात आणि परमार्थातही संगत अतिशय महत्त्वाची असते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचे गुण किंवा दोष आपल्याला लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात …..

ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला

कुसंगे नाडला साधू तैसा ||

हिरा अत्यंत कठीण असतो परंतु त्याला ढेकणाचे रक्त लागले की तो भंग पावतो असे म्हणतात. त्याप्रमाणेच दुर्जनांच्या संगतीत राहिले की साधू देखील बिघडतो एवढे संगतीचे महत्त्व आहे. ‘संगती संग दोषेंण’ असे म्हटले जाते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, ” सत्संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो” व्यसनी माणसाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे आपल्यालाही व्यसन लागण्याची शक्यता असते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहत असू तर आपल्याला तसे वागणे योग्यच वाटायला लागते. श्रीमंत व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यालाही तसेच श्रीमंत व्हावेसे वाटते. या सगळ्या अशा प्रकारच्या संगतीत आपण भगवंताला मात्र विसरतो आणि आपला अहंकार मात्र वाढत असतो. ‘मी ‘पणाला खतपाणी मिळते.

संत नामदेवराय म्हणतात ….

अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णुदासा | भाविकांसी ||

क्षमा हे वीराचे भूषण आहे. नम्रता हे विद्येचे भूषण आहे. गर्व नसणे हे श्रीमंतीचे भूषण आहे. परंतु ज्या माणसांना हे माहिती नसते त्यांचा अहंकार बळावतो. अशांच्या संगतीत राहिल्याने आपलाही अहंकार आपण जोपासत राहतो. संत कबीर यांचा एक दोहा फार सुंदर आहे…

बडें बडाई न करे, बडे न बोले बोल| हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||

मैं मैं बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग| कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’

समर्थ म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. ” अहंकारामुळे काम, क्रोध आदी दुर्गुण वाढीस लागतात. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीमुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. परंतु शांतता आणि समाधान मात्र हरवलेले दिसते. आपल्याला त्यांची प्रगती जरी आकर्षक वाटली तरी त्यातील फोलपणा समजून घेतला पाहिजे.

तात्पर्य, ज्या संगतीने भगवंताचे नाम मुखात येऊन ते संगत म्हणजे सत्संगत ! सत्संगती धरली तर सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.

स्वसंवाद :: 

१) ज्या लोकांच्या सहवासात गेल्यानंतर मला अशांत वाटते किंवा स्वतःबद्दल उगाचच बडेजाव (मीपणा) मिरवावासा वाटतो, असे लोक माझ्या लक्षात येतात का ?

२)माझ्या मित्रांच्या किंवा परिचितांच्या वर्तुळात गेल्यानंतर आमचा संवाद भगवंताकडे/सद्गुणांकडे वळतो की केवळ परनिंदा आणि ऐहिक सुखांच्या गोष्टींकडे ?

३) श्रीमंतांच्या संगतीत स्वतःबद्दलचा न्यूनगंड आणि सत्ताधीशांच्या संगतीत वाढलेला माझा अहंकार मला जाणवतो का ? (हे देखील समाधान भंग पावण्याचे लक्षण आहे).

४) ‘अहंकाराचा वारा’ लागून माझी बुद्धी रामापासून (सत्यापासून) दूर जात आहे, हे ओळखण्याची सतर्कता माझ्यात आहे का?

– – – –

श्लोक क्र. ४६ – – 

मना जे घडी राघवेवीण गेली |

जनी आपुली ते तुवा हानी केली |

रघुनायकावीण तो सीण आहे|

जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे|४६|

अर्थ : हे मना, जो क्षण राघवाच्या स्मरणाशिवाय गेला त्याने तू आपले नुकसान करून घेतले असे समज. ज्या गोष्टीत रामाचे अधिष्ठान नाही अशा गोष्टी करणे म्हणजे व्यर्थ शीणणे असे समजून या जगात तू अत्यंत सावधपणे वावर.

विवेचन : श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. एक क्षणही आपण श्रीरामाच्या स्मरणाशिवाय घालवावा असे त्यांना वाटत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील हेच आपल्याला सांगतात. आपण जर स्वतःला साधक मानत असू आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय एक क्षणही व्यर्थ घालवू नये. असा वाया घालवलेला वेळ म्हणजे साधकाने आपले स्वतःचेच करून घेतलेले नुकसान.

आपल्याला दृश्य गोष्टी जास्त आकर्षित करतात. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची ओढ आपल्याला वाटत नाही. त्यासाठीच संतांनी आपल्याला सगुण भक्ती करायला सांगितले आहे. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणि चित्तात त्याचेच ध्यान अशी साधकाची अवस्था असावी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अशी संत परमेश्वराला प्रार्थना करतात यासाठीच.

विज्ञानाच्या प्रगतीने आणि भौतिक समृद्धीने माणसाला ज्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातच माणूस सुख मानतो. त्या प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय समजतो आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्या परमेश्वराला आपण विसरतो. भगवंताशिवाय आपल्या हिताचे कोणी नाही आणि उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही हे साधकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये कोणते तरी ध्येय असते हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला त्या ध्येयाचा विसर पडून चालत नाही म्हणजेच त्या ध्येयाकडे सतत लक्ष असावे लागते. ते साध्य होण्यासाठी दक्ष असावे लागते. परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे हे विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागते. इतर गोष्टींमध्ये आपला फार वेळ जाणार नाही याबाबत दक्ष असावे लागते. एखाद्याला उत्तम गायक व्हायचे असेल, तर त्याला रोजचा रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गळ्याचे आरोग्य बिघडणार नाही याबाबतीत त्याला दक्ष असावे लागते. थंड, तेलकट पदार्थ खाल्लेले त्याला चालत नाहीत.

त्याप्रमाणेच साधकाने देखील सदैव दक्ष असावे असे समर्थ म्हणतात. सर्वत्र सावधानता बाळगावी असा समर्थांचा आग्रह आहे. मग साधना मार्गावर तर सावधानता अत्यंत आवश्यक आहे. कारण साधकाला आपल्या मोहात पाडून त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी विवेक हवा.

रोज मी भगवंताच्या नामस्मरणासाठी किती वेळ देतो याचा विचार प्रत्येक साधकाने करायला हवा. आजकाल सगळ्या गोष्टी आपण अतिशय घाईने उरकतो. भगवंताची पूजा, नामस्मरण यासारख्या गोष्टी रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात. ज्या गोष्टी मनापासून किंवा समर्पण भावनेने केल्या जात नाहीत, त्या गोष्टी उपचार ठरतात. इतरही अनेक गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवत असतो. परंतु समर्थ म्हणतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय वेळ घालवणे म्हणजे आपली हानी आपण करून घेणे. तो केवळ ‘ सीण आहे ‘ म्हणूनच आपण आपला एक क्षणही परमेश्वराच्या स्मरणाशिवाय जाणार नाही याबाबत दक्ष असले पाहिजे.

स्वसंवाद (नवीन)

१) मी स्वतःला साधक मानतो का?

२) माझी पूजा, नामस्मरण या गोष्टी मनापासून होतात की केवळ रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात ?

३) ध्येयापासून विचलित करणाऱ्या कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत असे मला वाटते ? त्याबाबत मी खरोखर दक्ष आहे का ?

– क्रमशः श्लोक ४५ आणि ४६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वन रुपी इडली ट्रस्ट” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वन रुपी इडली ट्रस्ट” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

कोणीच घेत नव्हतं. वर्ष २०२६. एका रुपयात चॉकलेटही मिळत नाही—आणि इडली? लोक त्यांना वेडा समजून हसत होते.

माझं नाव अरविंद. मी एका Infosys सारख्या आयटी कंपनीत काम करतो. रात्रीची शिफ्ट संपवून घरी जात होतो. एसी गाडी, चांगली नोकरी… पण भूक लागली होती. स्टेशनवरील स्टॉलवर इडली ₹५० ला मिळत होती.

त्या आजोबांकडे लक्ष गेलं. टोपलीत साधारण १०० इडल्या. एकही ग्राहक नाही. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं.

मी खाली उतरलो.

“आजोबा, एक रुपयाला इडली? तोटा होत नाही का?”

ते हसले.

“बाळा, हा तोटा नाही. हा नफा आहे. ”

“कसा आजोबा? तांदूळ, गॅस, सगळ्याचे भाव वाढले. एक इडली किमान ₹५ ला पडते. तुम्ही ₹१ ला विकता?”

ते टोपली बंद करून म्हणाले,

“एक गोष्ट सांगतो. ”

“१९७५ साल. मी २५ वर्षांचा. रेल्वेत हमाल होतो. महिन्याला ₹१०० पगार. एक दिवस जोरदार पाऊस. काम नाही. पैसे नाहीत. सलग ३ दिवस उपाशी. स्टेशनच्या बाकावर बेशुद्ध पडलो. ”

“तेव्हा एक बाई आली—ती प्लॅटफॉर्मवर इडली विकायची. एक रुपयाला. तिने मला उचललं, पाणी शिंपडलं, ४ इडल्या खायला दिल्या. पैसे विचारले नाहीत. ”

“मी रडलो… म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. ती म्हणाली— ‘बाळा, मीही एकदा अशीच उपाशी होते. कुणीतरी मला खायला दिलं. म्हणून मी व्रत घेतलं—मरेपर्यंत एक रुपयाला इडली विकणार, जेणेकरून भुकेल्याला अन्न मिळेल. तूही मोठा झालास की एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. ’”

आजोबांनी डोळे पुसले.

“ती १९९५ मध्ये गेली. शेवटच्या क्षणी माझा हात धरून विचारलं—‘वचन पाळशील ना?’ मी हो म्हटलं. ”

“त्यानंतर मी रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. चांगले पैसे कमावले. तीन घरे. दोन मुलं. दोघेही United States मध्ये. पण १९९५ पासून आजपर्यंत—दररोज पहाटे ३ वाजता—१०० इडल्या. एक रुपया. याच स्टेशनवर. ३० वर्षे. ”

माझ्या अंगावर काटा आला.

“आजोबा… रोज ₹४०० तोटा. महिन्याला ₹१२, ०००. वर्षाला ₹१. ५ लाख. ३० वर्षांत ₹४५ लाख!”

ते शांतपणे म्हणाले,

“पैशाने पाहिलं तर तोटा. मनाने पाहिलं तर नफा. ३० वर्षांत किती लोकांना खाऊ घातलं असेल? १० लाख इडल्या. १० लाख पोटं. १० लाख आशीर्वाद. त्याची किंमत किती कोटी?”

इतक्यात एक १२ वर्षांचा मुलगा धावत आला. फाटका शर्ट.

“आजोबा… इडली… ३ दिवसांपासून काही खाल्लं नाही. आई हॉस्पिटलमध्ये. पैसे नाहीत. ”

आजोबांनी ४ इडल्या पानात ठेवल्या, चटणी घातली.

“हळूहळू खा बाळा. ”

तो मुलगा खात होता… आणि रडत होता.

“उद्या पैसे देतो…”

“नको. तू मोठा झाल्यावर एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. तेवढंच पुरे. तीच किंमत. ”

तो मुलगा त्यांच्या पाया पडला.

“वचन देतो आजोबा. मीही एक रुपयाला इडली विकेन. ”

मी ₹१००० ची नोट काढली.

“आजोबा, कृपया… सगळ्या इडल्या मी घेतो. ”

ते हसले.

“या एका माणसासाठी नाहीत. भुकेल्यांसाठी आहेत. तुला भूक असेल तर एक इडली घे. एक रुपया ठेव. ते पुरे. ”

मी ₹१ ठेवलं. एक इडली घेतली. आयुष्यात खाल्लेली सर्वात चविष्ट इडली होती. डोळ्यांत पाणी आलं.

मी विचारलं,

“तुमच्या मुलांना काही वाटत नाही? पैसे वाया जातात असं?”

त्यांनी फोन काढला. व्हिडिओ कॉल. मुलगा अमेरिकेत.

“अप्पा, इडल्या विकल्या? तब्येत कशी? डॉक्टर काय म्हणाले?”

“ठीक आहे. आज एक तरुण भेटला. गोष्ट ऐकली. ”

त्यांचा मुलगा माझ्याकडे पाहून हसला.

“सर, धन्यवाद. कृपया माझ्या वडिलांची काळजी घ्या. आम्ही दर महिन्याला ₹५०, ००० पाठवतो—इडल्यांसाठी. त्यांची इच्छा म्हणजे आमचं भाग्य. त्यांचं व्रत म्हणजे आमचं व्रत. ”

आजोबा म्हणाले,

“पाहिलंस? माझी मुलंही वचन पाळत आहेत. मी गेल्यावरही ही टोपली थांबणार नाही. एक रुपयाची इडली थांबणार नाही. ”

आज २०२६ आहे. ते आजोबा आता हयात नाहीत. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. जाण्यापूर्वी त्यांनी माझा हात धरून सांगितलं—

“बाळा, टोपली सांभाळ. वचन पाळ. ”

आता दररोज पहाटे ३ वाजता, त्याच बाकावर, Chennai Central railway station मध्ये मी बसतो. टोपलीभर इडल्या. एक रुपया.

मी नोकरी सोडली नाही. पण रोज २ तास… इडल्यांसाठी देतो.

माझ्या कंपनीत २०० कर्मचारी आहेत. प्रत्येक जण महिन्याला ₹१०० देतो.

“वन रुपी इडली ट्रस्ट. ”

तो १२ वर्षांचा मुलगा—गणेश—आता बारावीत शिकतो. संध्याकाळी येतो आणि मदत करतो.

“अण्णा, मीही वचन घेतलं आहे. मोठा झाल्यावर मीही हेच करणार. ”

मित्रांनो, पैसा कमावणं मोठेपण नाही. पैशाचा उपयोग करून पुण्य कमावणं हे खऱ्या अर्थाने मोठेपण आहे.

घरात मुलं असतील तर एक छोटा डबा ठेवा.

“₹१ ची पेटी. ”

दररोज ₹१ टाकायला सांगा. महिन्याला ₹३० होतील. त्या पैशातून एखाद्या भुकेल्याला जेवण द्या.

कारण तुमच्यासाठी ₹३० कदाचित किरकोळ खर्च असेल…

पण कोणासाठी तरी ते ३० दिवसांच्या अन्नासारखं असू शकतं.

एक संकल्प करा — किमान एका भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या.

पैसा जाईल… पण पुण्य राहील.

टोपली रिकामी होईल… पण मन भरून जाईल.

 

लेखक : अज्ञात 

संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४३ आणि ४४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४३ आणि ४४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४३ – – – 

मना सज्जना एक जीवी धरावे|

जनी आपुले हीत तुवा करावे|

रघूनायकावीण बोलो नको हो |

सदा मानसी तो निजध्यास राहो|४३|

अर्थ : हे सज्जन मना, आपल्या जीवाशी एक खूणगाठ बांधून ठेव. जीवनामध्ये आपले तू कल्याण करून घे. एकदा भगवंताशिवाय अन्य गोष्टी बोलण्याचे सोडून दे. सदासर्वदा आपल्या मनाला त्याचाच ध्यास लागू दे.

विवेचन : आपले कल्याण व्हावे ही समर्थांची तळमळ मनाच्या श्लोकांमध्ये ठायी ठायी जाणवते. म्हणून पुनरुक्तीचा दोष पत्करून काही गोष्टी ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपल्या मनाला उपदेश करताना ते म्हणतात, ” हे सज्जन मना, एक गोष्ट आपल्या जीवाशी निश्चित करून ठेव. तुला जर तुझे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुनायकाचा म्हणजे भगवंताचा ध्यास घे. त्याच्याशिवाय दुसरे काही बोलू नको. “

व्यवहारात आपल्या वाणीला म्हणजे बोलण्याला अतिशय महत्त्व असते. आपल्या बोलण्यावरून आपले व्यक्तिमत्व लोकांना समजते. म्हणून व्यवहारात लोकांशी आवश्यक तेवढे बोलावेच लागेल. व्यवहार सोडता येणार नाही. समर्थांनी देखील “आधी प्रपंच करावा नेटका” असे सांगितले आहे. पण जेव्हा व्यवहारातील बोलणे संपेल तेव्हा आपल्या मुखातून भगवंताचे नामच बाहेर पडले पाहिजे. असे नाम सातत्याने येण्यासाठी मनामध्ये त्याचा विचार हवा कारण जसा विचार, तसा उच्चार आणि तसा आचारही होतो.

हा झाला बाह्य आचार. एक वेळ मुखात भगवंताचे नाम येणे, भगवंताबद्दल बोलणे सहज जमू शकते. पण आपल्या अंतरंगात भगवंताचे अनुसंधान टिकवणे सोपे नाही. त्याच्यासाठी सतत जागेपणी जेवढे शक्य होईल तेवढे भगवंताचे नाव घेत राहण्याचा अभ्यास करायला हवा. इंग्रजी शब्दांचा वापर करून सांगायचे झाले तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन भगवंताच्या नामाचा ध्यास असायला हवा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही जागेपणी मनाला नाम घेण्याची सतत सवय लावून घ्या. एकदा हे साधले की मग तुमच्या झोपेत किंवा तुमच्या आजारपणात देखील आपोआप हे नाम घेतले जाईल.

हे विवेचन वाचत असताना आपल्याला असे वाटेल की हे म्हणजे फारच झाले व्यवहारात आपल्याला एवढे शक्य नाही. परंतु समर्थांचे हे सांगणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच आहे. आपण भगवंताचे नाम का घ्यायचे ?त्याची भक्ती का करायची ? तर आपण साधना मार्गावर चालणारे साधक आहोत. सुरुवातीलाच समर्थांनी आपल्याला “गमू पंथ अनंत या राघवाचा” असे सांगितले आहे. ही गोष्ट एकदा मान्य केली की मग समर्थांचा उपदेश सहज पचनी पडतो.

जसे रोग्याला डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणे त्याच्या हिताचे असते, तसेच साधकाला देखील काही गोष्टींची पथ्ये असतात. ती त्याने सांभाळायला हवीत. तुकाराम महाराज म्हणतात, ” जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी. ” आपण साधक आहोत आणि परमेश्वराची प्राप्ती हे आपले साध्य आहे. हे जीवनध्येय एकदा ठरले की मग पुढील वाटचाल सोपी होते. परमेश्वराच्या नामात रममाण व्हायचे की लोकांमध्ये मिसळून आपला वेळ अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ घालवायचा ? यातील कोणती गोष्ट निवडायची हे खऱ्या साधकाला सांगावे लागत नाही. आपल्या परमार्थाला हानिकारक होतील अशा गोष्टींपासून खरा साधक दूरच राहतो. “विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो… ” असे संत नामदेव म्हणतात. तसेच आपलेही झाले पाहिजे.

स्वसंवाद :: 

१) माझ्या दिवसातील किती वेळ भगवंताचे नाम किंवा विचार माझ्या मनात असतो – प्रामाणिकपणे सांगायचे तर किती टक्के ?

२) “जसा विचार, तसा उच्चार, तसा आचार” – माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का ?

३) साधकाला पथ्य असते – माझ्या परमार्थाला हानिकारक कोणती सवय मी अजून सोडलेली नाही ?

४) गोंदवलेकर महाराज म्हणतात जागेपणी नामाची सवय लावा – मी आज या क्षणापासून हे सुरू करण्यास तयार आहे का ?

– – – – 

श्लोक क्र. ४४ – – 

मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी |

कथा आदरे राघवाची करावी |

नसे राम ते धाम सोडोनी द्यावे |

सुखालागि आरण्य सेवीत जावे |४४|

अर्थ :  हे मना, समाजात वावरताना शक्यतो मौन धारण करावे. बोलायचेच झाले तर अत्यंत आदराने श्रीरामाचे गुणगान करावे. ज्या ठिकाणी श्रीरामाबद्दल म्हणजेच भगवंताबद्दल प्रेम नाही अशा ठिकाणी राहू नये. ते ठिकाण तत्काळ सोडून द्यावे. भगवंताच्या नामातील सुख प्राप्त करण्यासाठी खुशाल अरण्यात जाऊन राहावे.

विवेचन : मन म्हणजे विचार करणे. ज्याला मन आहे तो माणूस ! म्हणजेच जो विचार किंवा चिंतन करू शकतो तो माणूस होय. मौन हा शब्द देखील मन या धातूपासून तयार झाला आहे. केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे तर ज्याच्या अंतरात भगवंताच्या नामाचे चिंतन सुरू आहे आणि अन्य काही बोलण्याची ज्याला आवश्यकता राहत नाही अशी गोष्ट म्हणजे मौन. अशी व्यक्ती केवळ भगवंताचे गुणगान करण्याकरताच बोलते. त्याचीच कथा सांगते.

मौनाचा हा अर्थ साधकांसाठी सांगितला आहे. अनेक लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी सोयीस्कर मौन धारण करतात. त्या अर्थाने मौन हा शब्द इथे अपेक्षित नाही. “मौनम् सर्वार्थ साधनं” असे एक प्रसिद्ध संस्कृत वचन आहे. मौनाने सर्व काही साध्य होते असा त्याचा अर्थ आहे. जे लोक मौन पाळतात आणि वायफळ बडबड करत नाहीत, अशांच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. आपण बोलून जे साध्य करू शकत नाही ते मौनाने साध्य होते. अशा वेळी मौन हेच शस्त्र आणि शास्त्र ठरते. सतत बडबड करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला लोक फारशी किंमत देत नाहीत.

काही अपवादात्मक साधुसंत खरोखरच साधनेसाठी मौन धारण करतात. परंतु बरेचसे साधू मौन तर धारण करतात, परंतु त्यांच्याकडे कोणी आले आणि त्यांना काही विचारले तर ते हातवारे करून बोलतात किंवा आपले म्हणणे पाटीवर लिहून सांगतात. काही साधुसंतांनी मौनाच्या काळात ग्रंथ देखील लिहिल्याचे ऐकण्यात येते. असे मौन खऱ्या अर्थाने पूर्ण मौन म्हणता येणार नाही.

समर्थांनी जनी मौन्यमुद्रा धरावी असे म्हटले आहे. एक वेळ एकांतातील मौन सोपे आहे परंतु भोवती लोकांची गर्दी असताना सोपे नाही. विपश्यना शिबिरात तर खुणेने देखील बोलायचे नसते. अशा ठिकाणी माणसे दहा दिवस कसाबसा धीर धरतात. परंतु एकदा शिबिर संपले की दहा दिवसांची भर काढून घेतात.

जो खरा साधक असतो तो भगवंताच्या चिंतनात अंतर्बाह्य बुडालेला असतो. त्यामुळे त्याला इतर अनावश्यक बडबड करण्याची आवश्यकता भासत नाही. तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या वाणीने भगवंताच्या गुणांचे वर्णन करतो, भगवंताचे कीर्तन करतो.

जेथे त्याला सुखाने राहून भगवंताचे गुणगान करता येते असे ठिकाण म्हणजे त्याच्या दृष्टीने स्वर्ग. परंतु अशीही काही ठिकाणी असतात की जेथे भगवंताचे चिंतन नामस्मरण केलेले आवडत नाही. भगवंताला न मानणारी माणसे अशा ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी खऱ्या भक्ताला राहणे कठीण होते. अशा ठिकाणी त्याचा आणि भगवंताचा देखील अवमान होतो. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो आहे, निंदा होते आहे असे दिसले तर ते ठिकाण तत्काळ सोडावे.

अशाप्रसंगी वनात जाऊन देखील राहण्यास हरकत नाही तेथे सुखाने भगवंताचे नाम घेता येते त्याच्या स्मरणात राहता येते संत तुकाराम महाराज म्हणतात, ” येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. ” साधकाला मग अशा एकांतातील सुख अनुभवता येते कुठलाही व्यत्यय न येता परमेश्वराचे नामस्मरण घडते. परमेश्वराच्या चिंतनासाठी अनेक संतांनी जनामध्ये राहणे सोडून वनामध्ये निवास केला त्याचे कारण हेच आहे.

सध्या काळ बदलला आहे. हल्ली समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वनात जाऊन निवास करणे सर्वसामान्य माणसांसाठी सोपे नाही. हल्ली रोजच्या व्यवहारात शांतता मिळणे कठीण झाले आहे. तीर्थस्थानांना देखील बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे सुखाने भगवंत चिंतन करता येईल अशा जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी आरण्य सेवन याचा अर्थ एकांत सेवन असा घ्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी सुखाने आपल्याला हरीचे नाम घेता येईल असे ठिकाण म्हणजे अरण्यच असे म्हटले तर हरकत नाही.

स्वसंवाद :: 

१) माझ्या बोलण्यात किती वेळ भगवंताचे गुणगान असते आणि किती वेळ निरर्थक गोष्टी असतात ?

२) मला भगवंत चिंतनासाठी मौन आवश्यक आहे ही गोष्ट पटते का ?

३) ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो अशा ठिकाणी राहणे मला जड जाते का, की मी त्याशी तडजोड करतो ?

४) माझ्या दैनंदिन जीवनात “आरण्य” म्हणजे एकांताची जागा कोणती आहे आणि मी ती नियमितपणे वापरतो का ? 

– क्रमशः श्लोक ४३ आणि ४४. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कहाणी सिद्धीविनायक मंदिराची – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ कहाणी सिद्धीविनायक मंदिराची –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

अंबानीही रांगा लावतात ते सिद्धिविनायक मंदिर कुणी बांधलंय माहितीये_ इतिहास ऐकून रडू येईल!

आज कोट्यवधी भक्तांच्या पदरात सुख टाकणारं मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर… एका अशा मराठी माऊलीने बांधलंय, जिला स्वतःला कधीच आई होता आलं नाही! 

१९ नोव्हेंबर १८०१ रोजी दादर-प्रभादेवीत _देऊबाई पाटील आणि लक्ष्मण विठू पाटील या सधन आगरी-कोळी दांपत्याने स्वतःच्या पैशाने हे मंदिर बांधलं. देऊबाईंना स्वतःला मूलबाळ नव्हतं. वांझोटी म्हणून समाजाने दिलेले टोमणे त्यांनी निमूटपणे सहन केले. पण, जे दुःख माझ्या वाट्याला आलं, ते इथल्या इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, बाप्पाने प्रत्येकीची ओटी भरावी याच एका उदात्त हेतूने त्यांनी हे सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले !

आज याच मंदिरात अंबानींपासून ते सुपरस्टार्सपर्यंत सगळेच अनवाणी पायाने रांगा लावतात. पण स्वतः मातृत्वाला पारख्या झालेल्या आणि कोट्यवधी लोकांना आशेचा किरण देणाऱ्या या मराठी माऊलीचा इतिहास मात्र कुठेतरी हरवलाय.

– – हा अंगावर काटा आणणारा इतिहास बाप्पाच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचलाच पाहिजे !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र क्र. ८२, ८३, ८४. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ८२, ८३, ८४. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे ८२ – – 

गुणमाहात्म्यासक्ति रूपासक्ति पूजासक्ति स्मरणासक्ति दास्यासक्ति सख्यासक्ति वात्सल्यसक्ति कान्तासक्ति आत्मनिवेदनासक्ति तन्मयतासक्ति परमविरहासक्ति रूपाएकधा अपि एकादशधा भवति ॥८२॥”

अर्थ: भक्ती (प्रेमरूप भक्ति) एकच असूनही ती अकरा प्रकारे प्रकट होते. श्रीमहाराज एका ठिकाणी भक्ति बद्दल म्हणतात, “प्रपंचात जशी आसक्ति, तशी भगवंतावर प्रीती, त्या नाव भक्ति. “ प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असल्याने प्रत्येक व्यक्तीची आसक्ति कुठे असेल ते सांगणे कठीण आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपापल्या आसक्तीचा विचार करून, त्या आसक्तीला भगवंताकडे वळविता आले की त्याचे अर्धे काम झाले असे म्हणता येईल. श्रीमहाराज म्हणायचे की भगवंताशी काहीतरी नाते जोडावे. त्याला भाऊ, बहीण, आई, बाबा, पुत्र किंवा अन्य कोणतेही. त्याचा भक्तिमार्गात खूप उपयोग होतो.

आसक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  1. गुण माहात्म्यासक्ति :

भगवंताचे गुण, महिमा, दया, करुणा, सौंदर्य, सामर्थ्य इ. श्रवण करून, मनन करून त्याच्यावर प्रेम करणे. नारद मुनी आणि महर्षी व्यास यांची भक्ति वरील प्रकारात मोडते.

  1. रूपासक्ति :

भगवंताच्या सुंदर स्वरूपावर प्रेम करणे. त्याच्या मूर्तीचे, दर्शनाचे, सौंदर्याचे चिंतन करणे. गोकुळातील गोपींची भक्ति या प्रकारची आहे असे मानले जाते.

  1. पूजासक्ति :

भगवंताची सेवा, पूजा, आरती, अभिषेक, अलंकार इत्यादींमध्ये प्रेम वाटणे.

  1. स्मरणासक्ति :

सतत भगवंताचे नामस्मरण, गुणस्मरण, लीला चिंतन करणे हेच जीवनाचे ध्येय मानणे.

  1. दास्यासक्ति :

आपण भगवंताचे सेवक आहोत, ही भूमिका घेत त्याची सेवा करणे.

  1. सख्यासक्ति :

भगवंताशी मित्रभाव ठेवून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणे.

  1. वात्सल्यासक्ति :

भगवंताच्या लीलांचे बालरूप धरून त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम करणे.

  1. कान्तासक्ति :

भगवंतावर पतीप्रेमासारखे गाढ, उत्कट, अनन्य प्रेम करणे.

  1. आत्मनिवेदनासक्ति :

स्वतःचे सर्वस्व भगवंताला अर्पण करणे. “तूच सर्वकाही आहेस, मी नाहीच” असे मनोधारणे.

  1. तन्मयतासक्ति :

भगवंतात इतके एकरूप होणे की स्वतःचा विसर पडणे.

  1. परमविरहासक्ति :

भगवंताच्या वियोगाने अतीव तगमग, विरह, वेदना याचा अनुभव घेणे.

समर्थ रामदास भक्तीचे नऊ प्रकार सांगतात.

भक्ती एकच असते ते भगवंतावरचे प्रेम. पण “व्यक्ती तितक्या प्रकृती” या उक्तीप्रमाणे भक्तीचे अनंत प्रकार होऊ शकतात.

जशी भक्ताची भावना, तशी त्याची भक्तीची अभिव्यक्ती!”

जय जय रघुवीर समर्थ

– – – – 

भक्ति सूत्रे ८३ – – 

इत्येवं वदन्ति जनजल्पनिर्भयाः एकमताः कुमार व्यास शुक शाण्डिल्य गर्ग विष्णु कौण्डिण्य शेषोद्धवारुणि बलि हनुमद् विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३॥”

अर्थ : सनत्कुमार, वेदव्यास, शुकदेव, शाण्डिल्य, गर्ग, विष्णु, कौण्डिन्य, शेष, उद्धव, अरुणि, बलि, हनुमत्, विभीषण आदि भक्तीचे आचार्य लोकांच्या निंदा स्तुतीची पर्वा न करता (भीती न बाळगता) एकमताने असेच सांगतात की भक्तीच श्रेष्ठ आहे.

विवेचन : भक्तीमार्ग हा एक प्राचीन, समन्वयपूर्ण आणि अनुभवाधारित भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारद मुनींनी ही सूत्रे लिहिली आहेत, ती त्यांच्या अनुभूतीची आहेत. भक्तीची रचना त्यांनी केलेली नाही, त्या आधीच्या ऋषि आणि पूर्वसुरींनी भक्तिशास्त्राची रचना केली. आणि ती परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे. हा मागील कालावधी एका अर्थाने अनंत असा आहे. या भक्तिमार्गाचे काही प्रमुख आचार्य आहेत, त्यांची नावे वरती दिलेली आहेत. आपण या सर्वांना भक्तिमार्गाचे प्रमुख “वारकरी” (वाहक, प्रचारक) म्हणू शकतो. भक्तीच्या या पवित्र मार्गावर चालताना लोकांच्या टीकेची भीती न बाळगता भगवंताच्या प्रेमाला प्राधान्य देत निष्ठेने भक्ती करणे हे जीवनाचे सार आहे.

ज्या प्रमुख वारकऱ्यांचा उल्लेख नारद महर्षींनी केला आहे, त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊ.

सनत्कुमार:

महाविष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टि रचनेचा संकल्प केल्यावर प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनातकुमार हे चार कुमार प्रकट झाले. हे नारद मुनींचे सद्गुरू. भक्तिशास्त्राच्या आचार्यांचे वर्णन करण्याआधी नारद महाराज आपल्या सद्गुरुंचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत आहेत.

व्यास :

महर्षी नारद हे कीर्तन कलेचे उद्गाते आहेत, तसे वेदव्यास हे प्रवचन कलेचे उद्गाते मानले जातात. जिथे कीर्तन केले जाते त्याला नारदाची गादी म्हटले जाते तर जिथे प्रवचन केले जाते त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. व्यास हे एक महान ऋषी. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेज संपादन केले. त्यांनी महाभारतादि अनेक ग्रंथ लिहिले. पण इतके सारे लिहून त्यांना समाधान लाभले नाही. मग सद्गुरू नारद मुनींनी महर्षी व्यासांना भगवंताचे गुणवर्णन करणारे भागवत त्यांना लिहायला सांगितले. भागवत लिहिल्यावर त्यांना मनःशांती लाभली असे वर्णन आहे.

शुक :

व्या‍सांचे पुत्र, ते जन्मतःच वैराग्य संपन्न होते. श्रीमद्भागवताचे ते आद्य वक्ते मानले जातात. त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितले.

शाण्डिल्य :

शाण्डिल्य ऋषींची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनींनी त्यांचा उल्लेख 18व्या सूत्रात केला आहे.

गर्ग :

कृष्णाचे नामकरण करणारे ऋषी. यांनी सुद्धा भक्ति सूत्रे लिहिली होती, पण काळाच्या पोटात ती गडप झाली असे म्हणावे लागते.

विष्णु :

हे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.

कौण्डिन्य :

धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याचे प्रमुख कौडिन्य ऋषी होते असा उल्लेख आढळतो.

शेष :

क्षीरसागरात महाविष्णू शेषावर शयन करतात. लक्ष्मणाला शेषाचा अवतार मानले जाते.

उद्धव :

यादव कुळातील हा कृष्णाचा परमभक्त. गोपींनी त्याला भक्ति शिकवली.

आरुणि :

छादोंग्य उपनिषदात यांचा उल्लेख आहे.

बलि :

भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन यांचा हा मुलगा. हा महान भक्त होता. वामन अवतारात त्याला पाताळाचे राज्य भगवंताने त्याला देऊ केले.

हनुमान :

एका शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते असे करता येईल… रामदास (हनुमान).

बिभीषण : रावणाचा भाऊ. महान भक्त. रामभक्तीने चिरंजीव पद प्राप्त केले.

– – या सर्व महान भक्तांच्या चरित्राचे स्मरण करून प्रत्येकाने या पवित्र अशा भक्तिमार्गावर अनुसरण करायचा प्रयत्न करावा.

जय जय रघुवीर समर्थ

– – – – – 

भक्ति सूत्रे ८४ – – 

य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धत्ते स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४॥”

अर्थ : जो मनुष्य नारदांनी सांगितलेली ही शिवमय, कल्याणकारक शिकवण (भक्तिमार्ग) श्रद्धेने व विश्वासाने स्वीकारतो, तो सर्वोत्तम असलेल्या भगवंताची प्राप्ती करतो.

विवेचन : भक्ति करणे जरी शास्त्र असले तरी भक्ति करायला सांगणे, सुचवणे हा उपदेश नव्हे.

भक्ति हे गुह्य ज्ञान आहे. ते सुलभ साध्य आहे, पण सहजसाध्य नाही. इथे वाचकांचा घोळ होऊ शकतो. निसर्गात हवा आहे आणि ती सर्वांना सुलभ आणि सहज साध्य आहे. पण भक्तीच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे. भक्ति करण्यासाठी कोणतीही अट नाही, पण ती करावी लागते, त्यासाठी काही अथवा किमान नीतीनियम पाळावे लागतात. तसे हवेच्या बाबतीत म्हणता येत नाही. प्रयत्न केले, सांगितलेले नीती नियम पाळले तर भक्तीची प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल.

“जितकी भक्ति तितकी प्राप्ति” हे सूत्र आपण पाहिले आहे. नारद महाराज स्वतः ठामपणे सांगतात की, जो भक्तीच्या या मार्गावर श्रद्धा ठेवतो, तो “प्रेष्ठं”( सर्वोत्तम गोष्ट) ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.

या जगात आपण नव्हतो, तेव्हा भगवंत होता. आज आपण आहोत, भगवंत आहे. उद्या कदाचित आपण नसू, पण भगवंत नक्कीच असेल. कारण न बदलणारा एकमेव भगवंत आहे. तो आपल्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या अंतर्यांमी तो स्थित आहे. त्याला जाणून घेणं हे मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट आहे. आपल्याला नरदेह लाभला आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अन्यथा, आपण जन्ममरणाच्या चक्रात फसलेले आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्गासारखा सुलभ मार्ग नाही.

महर्षी नारद ऋषींनी सामान्य मनुष्याचे दुःख दूर होण्यासाठी, नव्हे तर प्रत्येक मनुष्याला शाश्वत सुखाचा मार्ग मिळावा म्हणून ही परमप्रेमा भक्ति सांगितली आहे.

माझ्या सारख्या अल्पमती मंदबुद्धि असलेल्या मनुष्याने नारद भक्ति सूत्र विवेचनाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस केले ते माझ्या सद्गुरूंच्या आधाराने. हे विवेचन करण्यात जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे आणि जे काही चांगले असेल तो मात्र माझ्या श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद आहे अशी माझी श्रद्धा आहे. आपण हा कृपा प्रसाद गोड मानून घ्यावा आणि भक्तीमार्ग आचरावा.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– – क्रमशः भक्तीसूत्रे – ८२, ८३, ८४. (समाप्त)

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares