५२ पत्ते याबद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा. पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो- ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.
पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात.
बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.
— पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा, याशिवाय 2 जोकर असतात.
१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे
२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु.
प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.
३) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४
४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.
५) २ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.
६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने
७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.
पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महेश
३) चौकी म्हणजे चार वेद — (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेद)
४) पंजी म्हणजे पंचप्राण — (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)
५) छक्की म्हणजे षडरिपू — (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)
६) सत्ती- सात सागर
७) अठ्ठी – आठ सिद्धी
८) नववी- नऊ ग्रह
९) दश्शी – दहा इंद्रिये
१०) गुलाम- मनातील वासना
११) राणी- माया
१२) राजा-सर्वांचा शासक
१३) एक्का- मनुष्याचा विवेक
१४) समोरचा भिडू – प्रारब्ध
मित्रांनो, लहानपणापासून पत्ते बघितले. असतील काहींनी खेळले असतील. परंतू त्या पत्त्यांच्या संचाबद्दल अशा प्रकारची माहिती होती का ?
त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.?
पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला, तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते !!!
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.
त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “Coordination Cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”
हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार.
पांचच मिनिटांत पुन्हा वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला. “Duty Manager please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.”
आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.”
यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मै तुम को जमीन मे जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?”
मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले. “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मै आप की मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी मे ठीक तरह से बातचीत करने नही आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उन की तरफ से माफी मांगता हूं . ”
माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली पण चढ्या आवाजांत म्हणाली “मेरे दांत मे बहोत दर्द है . मै सफर नही कर सकुंगी. बस इतना मैने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये है ? मै उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”
मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.
मी बॅनर्जीला म्हणालो, “यार पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?”
यावर बनर्जीने जे उत्तर दिले ते ऐकून मला हंसावे की रडावे ते कळेना.
तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मै वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैने लेडी को बोला टांग उपर करो. असं म्हणून बनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिटमे दोर्द गायब होता है.”
अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जीभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा.
लेखक : श्री अनिल रेगे
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं !
मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!
दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!
रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!
घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात !! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घराच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!
शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं!
लेखक : अज्ञात
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ उसळ-चपाती… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.
तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या. . !”
रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली. . मंडळी गाडीतून उतरली.
अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. . !
अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं. . अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही. . ‘ अण्णा कानडीतनं बोलत होते.
रामण्णाही ओळखीचं हसले. . थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. . आणि त्यांचा निरोप घेतला. .
साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –
“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.
स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा. . आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.
“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.
रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार. . !”
“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा. . !”
“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.
रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती. . साथीदार मंडळी गप्प होती. . गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते. .
रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.
तात्पर्य – हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत.🙏🏻
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पाण्याची expiry date? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
जिथे रोज नळाला पाणी येते, तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची.
जिथे दिवसाआड पाणी येते, तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते
जिथे 8 दिवसांनी पाणी येते तिथे ते 8 दिवसांनी expire होते.
लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली, की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expire होते आणि फेकून दिली जाते.
वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही, तोपर्यंत जवळचे पाणी चालते..
धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते.
जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते…
जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते – expiry date शेकडो वर्षे.
जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात, तिथे ते हजारो वर्षांपूर्वी भूगर्भात साठलेले असते, तरीही ते चालते..
एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धिमत्तेवर Flash जाते…😢
पाणी जपून वापरा, आपले विचारच आपला घात करतील…
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकाळी सातची वेळ, शांतारामअण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.
अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे. ओव्हरटाईम करुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.
आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले; पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,”रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?” काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे, याहून क्लेशदायी काही नाही.
“आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?” अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले;पण त्यांना आत्ता थोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं. अण्णा दहा मिनटं झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोकवू लागला.
शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आताशा अर्ध्या अधिक दंताजींचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून रहावे लागे. त्यांचे पायही वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करुन बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच,”काय हे अण्णा? सकाळीसकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता. आत्ता पेपर घेऊन बसलात. मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आत्ता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही.”
“हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार?”
“काय ती तुमची नोकरी, अण्णा! कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आत्ता रिटायरमेंटनंतर भरघोस पेंशन मिळाली असती. पीएफ,ग्रेज्युइटी मिळाली असता. टुबीएचके घेता आला असतं आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्या वर्षी रिटायर झालेत. त्यांनी लेकाला टुबीएचके घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्महाऊस घेतलंय,एक होंडा सिटी घेतली. बढाया मारत होता लेकाचा. अण्णा, तुम्ही काय केलंत हो माझ्यासाठी?”
अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले. मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकीशेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पहात बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरून आलं. मधुराने(सुनेनं)चहा आणून दिला. तो कसातरी गळ्याखाली उतरवला त्यांनी.
अण्णांची सौ., लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं,साडीचोळी नेसवणं,आरती करणं हे सारं ती भक्तीभावाने करायची. अण्णा रिटायर्ड झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मुड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यांतून दोन मोती ठिबकले.ते पाहून मधुराला गलबलून आलं.
मधुराला वडील नव्हते; पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती.
संध्याकाळी मधुरा,मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्यसोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला, तसा मयंक मधुराशेजारी येऊन बसला. मधुराने मयंकजवळ सकाळचा विषय काढला. ती म्हणाली,”मयंक, तू लग्न झालं, तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं होतंस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे; पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला,तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाऊंट्ससाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू ‘अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?’ या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे. मयंक,अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते, ते माझ्यासारखीला विचार, जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत.”
आर्य मम्मीपप्पांजवळ कधी येवून बसला, त्यांना कळलंच नाही.
आर्य म्हणाला,”खलंच, पप्पा. तुम्ही फाल वाईट्ट वादलात आजोबांशी. आजोबा ललत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपाली जेवलेपन नाही.”
मयंकला अगदी भरुन आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला,”आपला बाथरुम मोठा आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया अण्णांसाठी आणि थोड्या वर्षांत जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेन. माझं असं कधी परत चुकलं, तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा.”
घरी गेल्यावर मयंक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसालेभात व मठ्ठा केला. चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व तो त्यांना ‘सॉरी’ म्हणाला.
आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला. तो आजोबांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला,”बाबा,यू आल आलवेज वेलकम.” अण्णांचे डोळे पुन्हा भरुन आले; पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते. हे तर आनंदाश्रू होते.
एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, “we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same”
म्हणजे,
“आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे.”
किती सुंदर वाक्य आहे, नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे, तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत, त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखील कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो… अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!
“जिंदगी एक बार मिलती है”
“बिल्कुल गलत है!”
सिर्फ मौत एक बार मिलती है!
जिंदगी हर रोज मिलती है !!
बस जीना आना चाहिए!!
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈