मी इथं छान आहे आणि तुम्ही सर्व छानच असाल अशी आशा करतो. मी २८ मे रोजी तुमच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सर्वजण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेल्याचे समजले.
मी २९ तारखेलाच इथं पोहोचलो. इथं सर्वकाही आलबेल असून तुम्ही माझी काहीही चिंता करू नका.
मी बहुदा या महिना अखेरीस दिल्लीत परतेन. तुम्हांला माझ्या लग्नाची घाई झालेली असेल तर, मी दिल्लीत आल्यावर तुम्ही माझं लग्न ठरवू शकाल! अ
आता मला तुम्हांला फोन करणे शक्य होणार नाही, मी पत्रं लिहित राहीनच. मनूदादा आणि वहिनीला माझा नमस्कार सांगा. त्यांचा कुठं आणि कधी फिरायला जाण्याचा बेत आहे?
तुमचा,
अमोल
पंजाबातील रोपड जिल्ह्यातल्या नांगल गावात २६ फेब्रुवारी, १९७४ रोजी जन्मलेले अमोल कालिया पुढे भारतीय सैन्यातील JAK.. JAMMU AND KASHMIR LIGHT INFANTRY दलात प्रवेश करीत पुढे कॅप्टनपदी पोहोचले. श्री. सत्पाल आणि श्रीमती उषा कालिया यांच्या पोटी जन्मलेल्या अमोल यांच्या धाकट्या भावानेही, अमन कालिया यांनीही भारतीय वायू दलात प्रवेश मिळवला होता. एकाच कुटुंबातील दोन सुपुत्र भारतमातेच्या रक्षणार्थ तैनात होते. १९९९.
पाकिस्तानने कारगिल पर्वत परिसरातील भारतीय सैन्यचौक्या कपटाने ताब्यात घेऊन तिथवर पोहोचू पाहणा-या भारतीय रसद वाहनांवर वरून अचूक हल्ले करायला प्रारंभ केला. बटालिक नावाच्या परिसरातील सुमारे १७०० फूट उंचीचा पर्वत पाकिस्तानी सैन्याने बळकावला होता. तेथून त्यांना खाली गोळीबार करणं अगदी सहज शक्य होत होतं. त्यामुळे आपल्या सैन्याच्या वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले होते. शत्रूला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य झाले होते. पण यासाठी पर्वतांवर चढून जाऊन लढाई करू शकणा-या सैनिकांची आवश्यकता होती.
कॅप्टन अमोल नेमके याचवेळी त्यांच्या सैन्यासह चंडीगढ येथे पोहोचले होते आणि पुढे त्यांना आराम करण्यासाठी शांतता क्षेत्रात पाठवले जाणार होते. पण एवढ्यात युद्ध पेटल्याने त्यांची सुट्टी रद्द झाली आणि त्यांच्या दलाला कारगिलमध्ये तातडीने बोलावून घेण्यात आले. कारण त्यांची J. A. K. L. I. डोंगर-द-यांत लढण्यासाठी प्रशिक्षित केली गेली होती. कॅप्टन अमोल कालिया तर पट्टीचे गिर्यारोहक आणि सैनिकी नेता होते… ते तातडीने युद्धक्षेत्राकडे निघाले. त्या दिवसाच्या आधी कॅप्टन साहेबांनी वर उल्लेख केलेले पत्र त्यांच्या घरी पाठवण्यासाठी संबंधित संपर्क यंत्रणेकडे सोपवले होते.
७ जूनच्या मध्यरात्री कॅप्टन अमोल कालिया यांच्या मातोश्री अचानक जाग्या झाल्या… त्यांनी त्यांच्या पतीला, जे सेवानिवृत्त शिक्षक होते, झोपेतून हलवून जागे केले… म्हणाल्या, ”आपल्या मुलांची खूप आठवण येते आहे… हे दोघेही ठीक असतील ना? ” कालिया सरांनी आपल्या पत्नीची कशीबशी समजूत काढली!
कालिया साहेबांच्या कुटुंबियांना हे पत्र ९ जून रोजी मिळाले… आणि एक अत्यंत धक्कादायक बातमी!
इकडे कारगिलमध्ये ७ जूनचा दिवस बुडाला मध्यरात्र झाली… ८ जून सुरु झाला… पहाटेचे तीन वाजले होते. कॅप्टन अमोल कालिया आपल्या १३ सैनिकांना सोबत घेऊन तो १७ हजार फुटांचा पर्वत चढू लागले. अंधार, बर्फाळ वाट आणि प्रचंड थंडी… खडा पहाड… एक एक पाऊल वर चढत सैन्य आगेकूच करीत होतं. काही वेळातच वर आरामात बसलेल्या शत्रूला यांची चाहूल लागली… आणि… पाकिस्तानी सैन्याने वरून यांच्यावर तुफान गोळीबार आरंभला. याही वादळी गोळीबारात कॅप्टन अमोल थांबले नाहीत… ते सर्वांच्या पुढे होते… शत्रूच्या अगदी जवळ पोहोचलेही होते… त्यांच्या सैनिकांपैकी LIGHT MACHINE GUN मधून गोळीबार करणारा सैनिक धारातीर्थी पडल्यावर कॅप्टन साहेबांनी स्वत: त्या GUNचा ताबा घेत तीन पाकिस्तानी सैनिक ठार मारले… आणि तितकेच जखमी केले!
सकाळी ९ वाजेपर्यंत हा संघर्ष सुरु राहिला… कॅप्टन साहेबांच्या तुकडीत असलेल्या १३ पैकी १० सैनिकांनी… हवालदार राजिंदर सिंग, नाईक पवन कुमार, लान्स नाईक लियाकत अली, लान्स नाईक मोहमद खान, रायफलमन दर्शन लाल आणि अब्दुल सलाम दार, रविंदर सिंग, ईश्तीयाक अहमद यांनी सर्वोच्च बलिदान दिले होते… आणि हवालदार कर्तार सिंग आणि रायफलमन तर्सैम लाल प्राणांतिक जखमांनी विव्हळत पडले होते… स्वत: कॅप्टन साहेबही प्रचंड जखमी झालेले होते… तरीही त्यांनी गोळीबार थांबवला नाही. पाकिस्तानी सैन्य यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक संख्येने आणि मोक्याच्या जागी होते… त्यांचे नेम चुकत नव्हते! कर्तार सिंग आणि तर्सेम लाल काही वेळातच देवाघरी गेले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे नेतृत्व करणारे बहादूर कॅप्टन अमोल कालिया साहेबही. साहेबांच्या मातोश्रींना पडलेले स्वप्न अशा रीतीने खरे झाले होते… त्यांनी त्यांचा सुपुत्र गमावला होता! भारतीय सैन्याला हा एक मोठा धक्का होता. पुढे आपल्या इतर सैनिकांनी आणखी बलिदाने देत हा ५२०३ बटालिक पर्वत २१ जूनला जिंकून घेतला! आणि यामुळे भारताची लढाई आणखी परिणामकारक होण्यात साहाय्य झाले!
पुढे १३ दिवस या वीरांचे मृतदेह कारगिलच्या त्या पर्वतांवर पडून होते… पाकिस्तानी सैन्याच्या तोफांच्या मा-यामुळे हे मृतदेह खाली आणणे अशक्य झाले होते! पुढे युद्ध थांबल्यावर हे काम करण्यात आले… तोवर कालिया कुटुंबीय प्रतीक्षेत राहिले… आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहण्यासारखी कठीण गोष्ट जगात अन्य नसावी… त्यांच्या पार्थिवाला खांदा देत त्याच्या चितेला अग्निडाग देणे तर महाकठीण. वीरपिता श्री. सत्पाल सिंग यांनी हे कर्तव्य पार पाडले. वीरमाता उषा यांनी आपल्या लाडक्या लेकाला अंतिम मानवंदना दिली… त्याच्या विवाहाचे स्वप्न त्यांच्यासमोर चितेवर जळत जळत भस्म झाले! देशाने कॅप्टन अमोल कालिया यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याला वंदन केले!
कारगिल युद्धात कालिया आडनावाचे दोन सैनिक भारताने गमावले… आधी कॅप्टन सौरभ कालिया आणि नंतर कॅप्टन अमोल कालिया. या अधिकारी आणि सैनिकांच्या बलिदानांच्या पायावर आजची आपली स्वातंत्र्याची इमारत भक्कमपणे उभी आहे… आपण स्वतंत्र श्वास घेतो आहोत! आज २ जून, २०२६. कॅप्टन साहेबांनी त्यांच्या माता-पित्यांना लिहिलेल्या पत्रास सत्तावीस वर्षे पूर्ण झालीत… पत्र आलं… पण कॅप्टन साहेब हुतात्मा होऊन स्वर्गाकडे प्रयाण करते झाले!
☆ “आडनावांचा इतिहास…” – माहिती संग्राहक / लेखक : मोरेश्वर कुंटे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆
☆
आपले आडनाव किती जुने असेल? दोनशे वर्षे? पाचशे वर्षे? काही चित्पावन आडनावांचा इतिहास थेट हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटांपर्यंत पोहोचतो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल..!
एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना राजे, युद्धे किंवा राज्यकारभार यांच्याइतकाच महत्त्वाचा विषय म्हणजे त्या समाजातील व्यक्तींची नावे आणि आडनावे. कारण आडनावे ही केवळ ओळख नसते; ती स्थलांतर, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक परंपरांची साक्ष देत असतात. चित्पावन ब्राह्मण समाजाच्या आडनावांचा मागोवा घेतला असता काही आश्चर्यकारक ऐतिहासिक धागे समोर येतात.
आज सर्वपरिचित असलेली अनेक चित्पावन आडनावे किमान हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, याचे पुरावे ताम्रपट, शिलालेख आणि तत्कालीन कागदपत्रांतून मिळतात. चित्पावन आडनावांचा सर्वांत जुना उल्लेख गुजरातमधील जुनागढ परिसरात सापडलेल्या शिलादित्य राजाच्या ताम्रपटात आढळतो. गुप्त संवत २८६ (शके ५२७, इ. स. ६०५) च्या या ताम्रपटात बापट (वपटक) आणि भानू या आडनावांचा उल्लेख आहे. आजही चित्पावन समाजात प्रचलित असलेली ही आडनावे किमान चौदाशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, हे या पुराव्यावरून स्पष्ट होते.
त्यानंतरचा महत्त्वाचा पुरावा रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सापडलेल्या शके ९८२ (इ. स. १०६०) च्या मराठी ताम्रपटात दिसतो. या ताम्रपटात देवल आणि घेसास या आडनावांचा उल्लेख आहे. मराठी भाषेतील प्रारंभीच्या ताम्रपटांपैकी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
गोव्यातील मांद्रे परिसरातील जमिनींच्या जुन्या नोंदी आणखी एक वेगळा धागा देतात. तेथे भाटले लिमये, भाटले गोखले, भाटले पटवर्धन आणि भाटले गाडगीळ अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जमिनींची नोंद आढळते. या जमिनींना त्या कुटुंबांची नावे प्राप्त झाली होती. यावरून इ. स. १४९८ पूर्वीच या घराण्यांची तेथे वस्ती झालेली असावी, असा निष्कर्ष काढला जातो.
पटवर्धन हे नाव हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखात सापडते, तर गोखले या उपनावाचा उल्लेख इ. स. १४८८ मधील एका पत्रात आढळतो. याचप्रमाणे शिदोरे आणि बर्वे ही उपनावे इ. स. १५२४ च्या चौलच्या अधिकाऱ्यांच्या दप्तरी नोंदलेली दिसतात.
आडनावांच्या इतिहासात भाषाशास्त्रीय निरीक्षणेही महत्त्वाची ठरतात. गोठणे परिसरातील एका जुन्या गोत्रावळीत ‘निमये’ असा उल्लेख सापडतो. हेच नाव पुढे ‘लिमये’ झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते. संस्कृत व्याकरणातील ध्वनीबदलांच्या नियमांच्या आधारे या परिवर्तनाचा विचार करता येतो.
आडीवरे गावातील श्री सत्येश्वर देवस्थानाशी संबंधित एक उल्लेख विशेष लक्षवेधी आहे. शके १२५० मध्ये मंदिरातील प्रमुख धार्मिक कार्यातील ‘ब्रह्मा’ या मानाच्या पदाचे अधिकार तेथील एका प्रतिष्ठित लिमये घराण्यास बहाल करण्यात आले होते. या परंपरेची आठवण म्हणून त्या घराण्यातील मंडळी स्वतःचा उल्लेख ‘लिमये ब्रह्मे’ असा करीत असत, अशी नोंद उपलब्ध आहे.
या सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार केला असता एक गोष्ट स्पष्ट होते—चित्पावन आडनावांचा इतिहास हा पेशवाईपासून सुरू होत नाही. त्याची मुळे शिलाहार, कदंब आणि यादवकालीन महाराष्ट्र-कोकणाच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. प्रत्येक आडनावामागे केवळ एक कुटुंब नसून स्थलांतर, वसाहत, धार्मिक संस्था आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा अनेक शतकांचा प्रवास दडलेला आहे.
☆
माहिती संकलक / लेखक: मोरेश्वर कुंटे
(संदर्भ – देव दर्शन, जिल्हा रत्नागिरी)
प्रस्तुती : प्रभा हर्षे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सहजीवन श्रद्धा.. – लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या व्हिजीटर्सकडून फी वसूल करून ती रूग्णांच्या बिलातून वजा करतात अशा आशयाचा एक व्हॉट्सॲप मेसेज वाचला, तेव्हा आमचे धुळ्याचे परममित्र व मार्गदर्शक धरमचंद चोरडीया यांनी पक्ष-कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला फार पूर्वीचा एक किस्सा आठवला.
शहाद्याचे डॉ. कांतीलाल टाटीया हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्ण वेळ झोकून दिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे – एक ज्येष्ठ स्वयंसेवक व भाजपाचे कार्यकर्ते. जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातील आदिवासी गावे, पाडे, अतिदुर्गम भागातील लहानलहान वस्त्या येथे ते जाऊन पोहोचायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलिस या ठिकाणांची असंख्य कामं, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रूग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचारांची व्यवस्था करणे, अशा कुणालाही माहित नसलेल्या रचनात्मक कामांमध्ये ते अहोरात्र बुडालेले असायचे.
भौगोलिकदृष्ट्या अवघ्या जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना जगायला सर्व मदत ते मनापासून आणि जमेल तेवढी करायचे आणि हे सगळं त्यांच्या जुनाट मोटरसायकलवर फिरून. उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडीवाऱ्याची अजिबात पर्वा न करता प्रचंड प्रवास करून घराघराशी संपर्क, लग्नकार्य, उत्सव, सुखदुःखात ते सतत सामील होत.
– – – पण हे निवेदन प्रामुख्याने फक्त डॉ. टाटीयांविषयी नाही.
त्यांच्या याच वाहनाने एकदा दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झाला. पायाचे हाडच मोडल्यामुळे प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर खिळून राहणे भाग होते.
त्यांच्या अपघाताची बातमी खेडोपाडी पोहोचायला बराच वेळ लागला. पण ती पोहोचली, तेव्हा ते दाखल असलेल्या हॉस्पिटलपुढे एक मोठीच समस्या उभी राहिली. डॉ. टाटीयांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची जत्रेसारखी रीघ लागली.
त्यात उघडेवाघडे पुरूष होते, ठिपक्याठिपक्यांच्या तांबड्या ‘फडक्या’ डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे, म्हाताऱ्या, तरूण मुलं, मजूर झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रूपयांची नोट कशीबशी पहायला मिळणारी, ३-४ रूपये रोजावर कंबरतोड मेहनत करणारी, ही शापित माणसं.
भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या–भाकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी परत जात.
उसनेपासने घेतलेले पैसे बसभाड्यासाठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोन् मैल रस्ता अनवाणी पायांखाली तुडवत रस्ता विचारत विचारत ही माणसं डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती..
भेटणंही कसं असे? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत, आवाज न करता. डॉ. टाटीयांचा हात हातात घेई. आयाबाया त्यांची बला घेत, म्हातारी कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेनं हात फिरवीत आणि गहिंवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत…
पण हा प्रत्येक ‘व्हिजिटर’ एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की, त्यांचा हात डॉक्टरांच्या उशीखाली जाऊन बाहेर येई.
टाटीया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय सुरू आहे? एकाला विचारले, तर उत्तर आलं, “काही नही भाऊ, आहेर करना पडस. आजारी मानुसले. ”
हे ऐकताक्षणी डॉ. टाटीयांनी चट्कन उशी बाजूला करून पाहिलं. सगळे उपस्थित थक्क झाले आणि डोळ्यांत पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रुधारा आणि हुंदक्यांत रूपांतर झालं…
उशीखाली एक रूपया, दोन रूपये, पाच रूपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आण्याची, अगदी दहा-वीस पैशांचीदेखील काही नाणी होती.
आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसं यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं या धारणेतून निर्माण झालेली “आजारपणाच्या आहेरा”ची पिढ्यान् पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटीयांच्या बाबतीतही इमानाने पाळत होती.
खरं तर हॉस्पिटलचं बिल बरंच होणार होतं आणि टाटीया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही ‘आहेराची’ सगळी रक्कम मोजली तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रूपया, दोन रूपयांची किंमत काय असते हे धुळे जिल्हयातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय आपल्यातल्या कुणालाही अजिबात कळणार नाही.
हे सगळं सांगतांना धरमचंदच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या आणि आमच्यासारख्या तरूण कोवळ्या कार्यकर्त्यांना देखील ऐकतांना अश्रु अनिवार झाले. त्या क्षणी सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपणही डॉ. टाटीयांसारखंच व्हायचं.
तो निर्धार आता अनेक कारणांनी इतिहासजमा झाला. पण त्या तीव्र आणि अपूर्ण इच्छेच्या सावल्या भुते बनून अद्यापही माझ्याप्रमाणेच सर्वांना त्रास देत असणार हे नक्की.
शहरी भागात कितीही कष्ट उपसले तरीही एवढी कृतज्ञता, एवढा सन्मान, एवढं प्रेम कुणाही सामाजिक कार्यकर्त्याच्या नशिबी क्वचितच येतं.
कुणीही कसलीही भाषणं, प्रवचनं न देता, कुठलाही थोर संत न लाभलेल्या या मंडळींची चांगुलपणावरची, सत्कृत्यावरची ही श्रद्धा.
जिथे ते या जगात आले, वाढले, आणि जिथे त्यांचा जन्मभराचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही ‘सहजीवन श्रद्धा’ आहे. नाही का?
अशी ‘मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रु पूर्वजांना शेकडो वर्षांपूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रूपांतर झालं असणार.
आपणां तथाकथित सुविद्यांना देखील असं काही सुचेल, तो सुदिन!
परमेश्वरा, पुढील जन्मी मला फार मोठा माणूस नको बनवूस. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर तेवढंच निष्कपट प्रेम करणारा, वेळ पडली तर त्या प्रेमापोटी अगदी न झेपणारा देखील त्याग करणारा असा त्या गर्दीतील एखादा उपाशीपोटी, अशिक्षित पण कृतज्ञ आदिवासी बनलो, तरी मी तुझा आभारी राहीन.
☆
लेखक : श्री मिलिंद हिरे
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २७ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
नाटककार रविंद्रनाथ – २
वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच १८८१ साली त्यांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ हे गीत नाट्य लिहिले. त्या काळात प्रसिद्ध असलेल्या बिहारीलाल रचित ‘शारदा मंगल’ या दीर्घ काव्यावर हे नाटक बेतलेले होतं. त्याच वर्षी २५ फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग ठाकूर कुटुंबाच्या जोराशांको वाड्याच्या गच्चीवर झाला. टागोरांच्या विशाल कुटुंबातील लोक, मित्रपरिवार व बंकिमचंद्रांसारखे अनेक सुजाण रसिक आमंत्रित होते. या नाटकातील सर्व गाणी रविंद्रनाथांनी संगीतबद्ध केली होती. कांही गाणी रागदारी वर आधारित होती तर काही चक्क इंग्रजी बॅन्ड च्या चालीवर बांधली होती. या नाटकामुळे टागोर कुटुंबीय काळाच्या पुढे एक पाऊल असल्याचं सिद्ध झालं. कारण या नाटकात स्वतः रविंद्रनाथांनी वाल्मिकीची तर त्यांची पुतणी प्रतिभा हिने सरस्वतीची भूमिका केली होती. एकोणिसाव्या शतकात कुलीन घरच्या मुलींनी रंगमंचावर पाऊल टाकणे ही गोष्ट क्रांती पेक्षा कमी नव्हती. यावर वर्तमानपत्रांतून टागोर कुटुंबावर टीका देखील झाली.
आपल्या अन्य नाटकातून देखिल त्यांनी समाजसुधारणेचा एल्गार केला होता. ‘रथयात्रा’ मध्ये चातुर्वर्ण्य पद्धतीवर टीका आहे तर ‘रक्तकरबी’ मध्ये स्वातंत्र्याच्या कल्पनेविरोधातली राजसत्ता दाखवली आहे. ‘राजा’ नाटकात सामान्य जनतेचा सत्तेत सहभाग असण्या विषयीचा आग्रह आहे. ‘विसर्जन’ मध्ये देवीला बळीचे रक्त वाहण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध संघर्ष आहे. ‘अचलायतन’ मध्ये पोपटपंचीलाच ज्ञान म्हणणाऱ्या शिक्षण पद्धतीवर भाष्य आहे. ‘डाकघर’ मध्ये नियतीचे कठोर दर्शन आहे. ‘फाल्गुनी’ नाटकातल्या कवीच्या तोंडी एक वाक्य आहे, “काव्यरचनेचं रसग्रहण करण्यापेक्षा तिच्या निर्मितीतला आनंद साजरा केला पाहिजे. ” ‘जत्रा’ नाटकात संस्कृत नाटकातल्या सूत्रधारासारखं एक सर्वगामी पात्र आहे.
‘राजा’ नाटकात प्रजासत्ताकाची कल्पना मांडल्यामुळे, हा इंग्रजांविरोधातला राजद्रोह आहे अशी हाकाटी तथाकथित राजनिष्ठांनी मारली होती. गीतनाटक, नृत्यनाटक याबरोबरच त्यांनी रोचक विनोदी शैलीत नाटकं लिहून आपल्या सर्वांगीण मुक्तीच्या विषयाचा पुरस्कारही केला आहे. ‘वैकुंठेर खाता’, ‘छात्रेर परिक्षा’, ‘सूक्ष्म विचार’, ‘अन्त्येष्टी संस्कार’
अशी उपहासात्मक विनोदी नाटके लिहून त्यांनी प्रचलित सामाजिक रूढींवर प्रहार केला आहे. ‘ताशेरे देश’, ‘शोध बोध’, ‘चिर कुमार प्रभा’ ही देखील अशीच सामाजिक रूढींवर, अंधानुकरणावर विनोदी अंगाने प्रहार करणारी नाटके आहेत.
चित्रांगदा हे नृत्यनाट्य त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी लिहिलं, ते सुद्धा अवघ्या सात दिवसांत! ‘प्रकृतीर परिशोध’ या नाटकात, मुक्तीच्या शोधात संसारातून पळून जाणं म्हणजे भ्याडपणा असल्याचं प्रतिपादन आहे. नाट्यक्षेत्रात एवढी मोलाची भर घालणाऱ्या रविंद्रनाथांना; नटश्रेष्ठ शिशिर भादुरी व श्रेष्ठ नाट्यदिग्दर्शक शंभू मित्रा यांचा अपवाद वगळता, व्यावसायिक बंगाली रंगभूमीने मात्र साथ दिली नाही.
(संदर्भ- रविंद्रनाथ तीन व्याख्याने ले. पु ल देशपांडे)
—–
☆ गीत : ७९ ☆
IF it is not my portion to meet thee in this my life then let me ever feel that I have missed thy sight ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my
dreams and in my wakeful hours.
As my days pass in the crowded market of this world and my hands grow full with the
daily profits, let me ever feel that I have gained nothing ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.
When I sit by the roadside, tired and panting, when I spread my bed low in the dust, let me ever feel that the long journey is still before me ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.
When my rooms have been decked out and the flutes sound and the laughter there is
loud, let me ever feel that I have not invited thee to my house ⎯ let me not forget for a
moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.
I AM like a remnant of a cloud of autumn uselessly roaming in the sky, O my sun everglorious! Thy touch has not yet melted my vapour, making me one with thy light, and
thus I count months and years separated from thee.
If this be thy wish and if this be thy play, then take this fleeting emptiness of mine, paint it with colours, gild it with gold, float it on the wanton wind and spread it in varied wonders.
And again when it shall be thy wish to end this play at night, I shall melt and vanish away
in the dark, or it may be in a smile of the white morning, in a coolness of purity transparent.
☆ भुताटकीची सायकल आणि बरंच काही – – ☆ श्री मकरंद पिंपुटकर☆
सुरत, गुजरात. गल्ली क्रिकेट रंगात आलेलं. पण अचानक मुलांनी क्रिकेट खेळणे थांबवले. समोर रस्त्यावरून एक सायकल येत होती. पण त्या सायकलवर कोणीही स्वार नव्हता. फक्त बाहुल्यांचे पोकळ पाय स्वतःच पॅडल मारत होते आणि सायकल चालत होती.
सुरतमध्ये ही भुताटकीची सायकल आता सगळीकडे दिसू लागली होती.
आणि या भुताटकीच्या सायकलीचा जनक होता शिवम मौर्य.
या सगळ्याची सुरुवात झाली ती शिवमच्या इलेक्ट्रिक सायकलने. तो १५ वर्षांचा असताना शाळेत सायकलने जाताना त्याला एक चढाव चढावा लागायचा, त्यात त्याची चांगलीच दमछाक व्हायची. त्यावर उत्तर म्हणून या शाळकरी मुलाने नववीत असताना, महिनोन्महिने आपले पॉकेटमनीचे पैसे वाचवले आणि आपल्या गच्चीवर त्या सायकलीला इलेक्ट्रिक सायकल बनवली.
आता चढ चढण्यासाठी, जोर लाऊन पायडल मारायची गरज नव्हती.
आता शिवमला हा छंदच जडला. त्याचे आई-वडील “शिक्षणावर लक्ष केंद्रित कर” असे म्हणत असताना, शिवम यूट्यूबवरून स्वतःच इंजिनिअरिंग शिकत होता. आपल्या प्रयोगाचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पुढचे प्रयोग करत होता.
शिवमने इंजिनियरिंग डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर भगवान महावीर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. केले. वयाच्या २४ व्या वर्षी, शिवमचे “क्रिएटिव्ह सायन्स” नावाचे यूट्यूब चॅनल होते आणि तेव्हापान, त्यावर तो आपली एकाहून एक भन्नाट संशोधने सादर करत असतो.
मित्र गुरप्रीत अरोरा आणि गणेश पाटील यांच्यासोबत, त्याने एक वर्ष आणि १.८ लाख रुपये खर्च करून “गरुडा” तयार केली. ही भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणारी चालकविरहित सुपरबाईक होती. बॅटमॅनच्या मोटारसायकलसारखी (बॅटपॉड) हबलेस चाके. या मोटारसायकलचे निम्म्याहून अधिक भाग अक्षरशः भंगारातून घेतले होते, ही बाईक रिमोटने, तोंडी आदेशानुसार (व्हॉइस कमांड्स) आणि अगदी चालकाशिवायसुद्धा चालू शकते. तिच्यातील वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाने ती सेल्फ-बॅलन्सिंग आहे, स्टँडशिवाय सुद्धा ती न पडता उभी राहू शकते.
आज तक चॅनेलने या बाईकला “मेक इन इंडिया इनोव्हेशनचे प्रतीक” म्हटले.
याच्यानंतर आली ती भुताटकीची सायकल. फक्त ३५,००० रुपये खर्चात ३ महिन्यांत शिवमने ही तयार केली.
एका तिचाकीच्या (ट्राय-सायकल) पुढच्या चाकाला मोटर त्याने लावली आणि पॅडलला रोबोटिक मॅनक्विनचे पाय जोडले. जेव्हा मोटर पुढचे चाक फिरवत असे, तेव्हा मागची चाके चेन फिरवत. चेन पॅडल हलवत असे. पॅडल पाय हलवत. आणि यामुळे, डोके आणि धड नसलेला एक स्वार सुरतमधून पॅडल मारत जात होता असं दिसत होतं.
ही तिचाकीसुद्धा रिमोटने किंवा मोबाईल ॲपने नियंत्रित करता येते किंवा एका विशिष्ट मार्गावर, विशिष्ट स्थळी पोचण्यासाठी चालण्यासाठी तिला प्रोग्रामसुद्धा करता येते. मुले त्याच्या मागे धावत असत.
त्याने रिक्षा खेचणारा यंत्रमानव बनवला, एक चाकाची स्कूटर बनवली, एका चाकाची मोटारसायकल बनवली, इलेक्ट्रिक कॅपसुल कार बनवली, केळ्याच्या आकाराची “बनाना कार” बनवली.
आणि या सगळ्या भन्नाट उत्पादनांचे वैशिष्ट्य हे आहे की शिवमने याचे तंत्रज्ञान ना गुपित ठेवले ना त्याचे पेटंट केले. आपली ही उत्पादने कशी बनवायची याची अथपासून इतिपर्यंतची माहिती तो त्याच्या “क्रिएटिव्ह सायन्स” या यूट्यूब पेजवर शेअर करत असतो.
त्याच्या या अनोख्या पेजला तब्बल २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
डॉलर्स कमावण्यासाठी परदेशात जाऊन स्थायिक होणं म्हणजेच यशस्वी होणं या सरधोपट मान्यतेला शिवमने धोबीपछाड दिली आहे, आणि भारतातच राहून आपले तंत्रज्ञान सर्वांना देऊ करून आत्मनिर्भर “मेक इन इंडिया” ला भरघोस आणि सक्रीय पाठिंबा दिला आहे.
शिवमचे अभिनंदन आणि त्याला हार्दिक शुभेच्छा!!
श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “World Password Day – माझा पासवर्ड” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
दरवर्षी मे महिन्याचा पहिला गुरुवार हा जागतिक पासवर्ड दिवस म्हणून सर्वत्र साजरा होतो. नुकताच आपण सगळ्यांनी हा पासवर्ड डे साजरा पण केला असणार
लॅपटॉप उघडायला पासवर्ड पाहिजे, मोबाईल ला पासवर्ड पाहिजे, इंटरनेट बँकिंग ला पासवर्ड पाहिजे, गुगल करता पासवर्ड पाहिजे, थोडक्यात काय तर जमाना पासवर्ड चा आहे.
वापर करताना पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग असावा, सगळ्यांनी सुरक्षित पासवर्ड वापरण्याकडे वळावे, आणि आजच्या स्पॅम युगामध्ये सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि हे महत्त्व पटवण्याकरता जागतिक पासवर्ड दिवस सुरू झाला.
मी अगदी सुरुवातीला जेव्हा इंटरनेट बँकिंग सुरू केले, तेव्हा विचार केला – बायकोचे नाव पासवर्ड ठेवावे, पण लगेचच लक्षात आलं की हा पासवर्ड कोणी पण ओळखू शकेल. मग विचार केला की मैत्रिणीचे नाव पासवर्ड म्हणून ठेवावे, पासवर्ड मेघना ठेवला.
३ महिन्यानंतर लॉगिन करायला गेलो, तर मेसेज आला your password has expired. नवीन पासवर्ड म्हणून दुसरी मैत्रिण मनवा हे नाव टाकले.
३ महिन्यांनी पासवर्ड एक्सपायर झाला. म्हणून आधीचाच पासवर्ड मेघना टाकला. लगेच मेसेज आला – password cannot be same as earlier one. म्हणून मैत्रिण छाया हे नाव पासवर्ड म्हणून टाकले. नंतर सुनीता हे नाव टाकले. अशी चार मैत्रिणींची नावं टाकून झाली. प्रत्येक वेळा पासवर्ड एक्सपायर झाला, आणि चार पैकी एक नाव टाकले की मेसेज यायचा password cannot be same as last two/three passwords. दुसरे नाव टाकले तरी तोच मेसेज. मी टाकलेल्या मैत्रिणींच्या नावांचा काय सिक्वेन्स होता हे लक्षात नसायचे. त्यामुळे आधीची दोन नाव काय होती हे लक्षात नसायचे.
तीन वेळा पासवर्ड चुकीचा टाकला तर अकाउंट होल्ड वर जातो आणि बँकेत जाऊन पुन्हा ऍक्टिव्हेट करावे लागते.
विचार केला की पासवर्ड लिहून ठेवावे पण नंतर लक्षात आले की मिस युज टाळण्याकरता पासवर्ड लिहून ठेवायचा नसतो.
आधीचे किती पासवर्ड चालत नाहीत ते समजण्याकरता गुगलवर गेलो. तिथे समजलं की आधीचे चार पासवर्ड चालत नाहीत.
विचार केला कॉलेजमधल्या मित्राला फोन करून त्याच्याकडून काही गायडन्स घ्यावे आणि मित्राला फोन लावला.
मित्र : तुला पांडवांची नावं माहित आहेत का? आणि सगळ्यात मोठा कोण नंतरचा कोण हे माहीत आहे का?
मी : तुझी कल्पना एकदम बढीया आहे. आधी युधिष्ठिर पासवर्ड ठेवायचा, आणि नंतर एक एक जणाचे नाव ठेवत जायचे, आणि सहदेव पासवर्ड एक्सपायर झाला, की पुन्हा युधिष्ठिर पासवर्ड ठेवायचा.
मित्र : एकदम परफेक्ट.
मी : कल्पना एकदम मस्त आहे. पण एक अडचण आहे – सध्या आधीचे ४ पासवर्ड चालत नाहीत, काही दिवसात हा आकडा ५ वर जाईल, ६ वर जाईल. पुढचे प्लॅनिंग म्हणून १० पर्यंत आकडा जाईल असे धरून चल आणि त्याकरता काय करावे ते सांग. आणि महत्त्वाचे म्हणजे पासवर्ड मध्ये मैत्रिणींची नावं टाकता आली पाहिजेत.
मित्र : दोन मिनिटांनी तुला फोन करतो. बायकोने चहा आणला आहे, तो घेतो आणि काहीतरी आयडिया सुचेल. आणि फोन कट झाला
दोन मिनिटांनी –
मित्र : वर्षामधल्या इंग्रजी महिन्यांची नावे पाठ आहेत ना!
मी : आहेत. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी असे पासवर्ड ठेवायचे का. कल्पना मस्त आहे पण मैत्रिणींच्या नावाचं काय.
मित्र : कुठल्याही महिन्याच्या स्पेलिंग मधली पहिली तीन अक्षरं घ्यायची. पहिलं अक्षर कॅपिटल. नंतर तुझ्या मैत्रिणीचं नाव पूर्ण, आणि या दोघांच्या मध्ये एखादा सिम्बॉल आणि एक अंक
जसे Jan@2Chaya.
जो चालू पासवर्ड आहे तेवढाच लक्षात ठेवायचा. सध्या कुठला महिना चालू आहे याचा पासवर्डची काही संबंध नाही.
पासवर्ड एक्सपायर झाल्यावर, किंवा मध्येच तुला पासवर्ड बदलावा असं वाटलं, तर पुढचा महिना पासवर्ड मध्ये घ्यायचा- Feb#5Manava.
Feb च्यापुढे तू कुठलाही सिम्बॉल टाक, कुठलाही अंक टाक, कुठल्याही मैत्रिणीचं नाव टाक, काही प्रॉब्लेम नाही.
आधीच्या पासवर्ड मध्ये कुठली मैत्रीण होती, कुठला सिम्बॉल होता हे लक्षात ठेवायची गरज नाही.
चालू पासवर्ड जर Jan पासून सुरु होत असेल तर पुढच्या पासवर्ड Feb पासून सुरू झाला पाहिजे, Aug पासून असेल तर पुढचा पासवर्ड Sep पासून सुरू करायचा. आणि एक एक महिना पुढे जात जायचं.
आपल्या कॉलेजमधली स्नेहलता किंवा प्रियंवदा, यांची नावं टाकता येतील की नाही हे चेक करावे लागेल, कारण स्पेलिंग खूप लांब आहे, आणि काही बँकेमध्ये पासवर्ड चे किती कॅरेक्टर्स याचे लिमिट असते.
यापुढे तुला बँकेकडून your password can not be same as previous 2/3/4/5… passwords असा मेसेज कधीही येणार नाही.
मी जरी पासवर्ड कसा ठेवायचा हे तुला सांगितलं असलं, आणि तुझ्या शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींची नावे मला माहित असली तरी तुझा पासवर्ड काय असेल हे मला कधीच समजणारच नाही, काळजी करू नको.
जागतिक पासवर्ड दिनाचं औचित्य साधून तुझ्या मित्र-मैत्रिणींना आणि ग्रुप वर पण ही आयडिया दे. म्हणजे सगळ्यांचेच पासवर्ड स्ट्रॉंग राहतील.
इंटरनॅशनल पासवर्ड दिवसाच्या तुला शुभेच्छा. बाय-बाय झाले आणि फोन बंद झाला.
☆ शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी☆ श्री विश्वास देशपांडे ☆
माझं लहानपण एका खेड्यात गेलं. माझी आई फार शिकलेली नव्हती पण तिला लिहिता वाचता येत होतं. त्या जोरावर ती वाचायला शिकली. अनेक पुस्तके तिने वाचली. ती बहुश्रुत होती. बोलताना तिच्या तोंडातून सहज बोलीभाषेतील अर्थपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार बाहेर पडत. सुरुवातीला त्या म्हणींचा किंवा वाक्प्रचारांचा सखोल अर्थ कळण्याइतके माझे वय नव्हते. पण जसजशी समज वाढू लागली, तसतसा त्यांचा अर्थ कळू लागला. पानातली चटणी कशी चटकदार असते तशाच या छोट्याशा अर्थपूर्ण म्हणी. खेडेगावातील लोकही विशेष करून बायका अशा म्हणी वापरत. त्या सहजच कानावर पडत. त्यामुळे नाही म्हटलं तरी भाषिक जाण समृद्ध व्हायला मदत झाली.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अशाच एका अवलियाची जन्मशताब्दी या वर्षी आहे. कोण बरं हा अवलिया? तर त्याचं नाव आहे विश्वनाथ दिनकर नरवणे. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी भारतीय कहावत कोश आणि भारतीय व्यवहार कोश तयार केला. तोही सोळा भाषांमध्ये. ज्या काळात संगणक, इंटरनेट यासारख्या गोष्टी आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या त्या काळातील त्यांचे हे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे. विश्वनाथजी म्हणजे एकखांबी तंबू होता. साध्या बसने किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांनी अवघा देश पिंजून काढला.
विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशात फिरताना भाषांची अडचण त्यांना जाणवली. पण अशी अडचण आपल्या देशबांधवांना येऊ नये, भाषा हा देशाच्या प्रगतीतील अडसर बनू नये अशा तळमळीतून त्यांनी हे प्रचंड कार्य उभे केले. विविध लोकांना ते भेटले. देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. नेताजींनी देशवासियांना जसे, ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा “असे आवाहन केले होते. त्या धर्तीवर त्यांनी लोकांना, ” तुम मुझे शब्द दो, मै तुम्हे धन्यवाद दूंगा, ” असे म्हणून लोकांकडून शब्द आणि म्हणी गोळा केल्या. त्यांचे तीन खंड प्रकाशित केले. या तीन खंडांची पृष्ठसंख्या तब्बल तीन हजार पाने एवढी प्रचंड आहे. आपल्या या कार्यामुळे ते डॉ श्रीधर व्यंकटेश केतकर, वा शि आपटे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यासारख्या मान्यवर कोशकर्त्यांच्या पंक्तीत आदराने जाऊन बसले.
रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे या गावी १८ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय खडतर होते. आधीच आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य. त्यात वडील बालपणीच वारले. आता घरात येणारी आर्थिक आवक बंद झाली. गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केली.
त्यांचं आरोग्य अत्यंत उत्तम होतं. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये त्यांना गती होती. मैदानी खेळांसोबतच मल्लखांब, पोहणे आदी क्रीडाप्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. शाळेतील शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांची कवायत घेण्यास सांगत. राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान त्यांच्या नसानसात भिनला होता. एकदा ते अशीच कवायत घेत असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांच्या कौशल्यावर तो बेहद्द खुश झाला आणि त्यांना म्हणाला, ” सैन्यात भरती होण्यास तयार आहेस का? ” तेव्हा देशभक्ती रक्तातच असलेल्या विश्वनाथने त्या अधिकाऱ्याला बाणेदारपणे उत्तर दिले. ” आमच्या देशाला गुलाम करणाऱ्या ब्रिटिशांची चाकरी मी कदापिही करणार नाही. ”
शालेय शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी बडोदा गाठले. तेथे त्यांनी खेळांचे प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून शिक्षण घेतले. याच सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. ते त्याच्याशी जोडले गेले ते कायमचेच! दादरा -नगर-हवेलीच्या मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. संघाचे प्रचारक म्हणून देशाच्या विविध भागात भ्रमंती केली. स्वामी विवेकानंदांच्या कार्याबद्दल त्यांना अतीव आदर होता. कन्याकुमारीच्या समुद्रात ज्या खडकावर ध्यानस्थ बसल्यानंतर पुढील कार्याची प्रेरणा मिळाली, त्या खडकाचे दर्शन त्यांनी पाच ते सहा वेळा पोहून तिथपर्यंत जाऊन त्यांनी घेतले.
भारतातील विविध प्रांतात फिरताना त्या त्या भागातील शब्द, वाक्प्रचार त्यांनी गोळा केले. भारतातील कोणत्याही प्रांतात फिरताना कोणालाही अडचण येऊ नये म्हणून विविध भाषांतील समानार्थी वाक्ये त्यांनी एकत्र केली. त्यांच्या या सगळ्या प्रचंड खजिन्याचे रूपांतर भारतीय व्यवहार कोशात त्यांनी केले. विशेष म्हणजे देवनागरी लिपी ज्या कोणालाही वाचता येते, त्याला हा कोश वाचून कोणतीही भाषा शिकता येईल. कोठे काही अडणार नाही आणि देशातील बहुतेक सर्व प्रांतात सहजतेने वावरता येईल. तामिळ असो की तेलगू, बंगाली असो की आसामी… प्रत्येक भाषेतील शब्दाला त्यांनी देवनागरीचे सुंदर अस्तर लावले. जणू काही वेगवेगळ्या रंगांची फुले त्यांनी देवनागरीच्या एकाच सुवासिक धाग्यात ओवून भारताची एक सुंदर भाषिक माला तयार केली!
विश्वनाथजींचा शिकण्याचा आणि काम करण्याचा आवाका प्रचंड होता. इंग्रजीसह सोळा भारतीय भाषा त्यांना अवगत होत्या. ज्या भाषा त्यांना येत नव्हत्या, त्या शिकून घेण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. बडोद्यात शिक्षण घेतल्याने गुजराती भाषा त्यांना उत्तम येत होती. बंगाली शिकण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात ते राहिले आणि बंगाली भाषा आत्मसात केली. उर्दू शिकण्यासाठी लखनौ, हैदराबाद इ. ठिकाणी राहिले. काश्मीरी, पंजाबी, मल्याळम, कानडी या भाषादेखील अशाच प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्या.
त्या काळी ते भाषेच्या संवर्धनासाठी घेत असलेल्या कष्टांची जाणीव फारच थोड्याना होती. सरकारकडून मदत मिळणे तर दूरचीच गोष्ट! स्वतःच प्रांताप्रांतात फिरणे, मिळालेली माहिती लिहून ठेवणे, तिचे वर्गीकरण करणे, छापून आणण्यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय त्यांना एकट्यालाच कराव्या लागल्या. मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे, मिळेल ते खाणे यासारख्या गोष्टी त्यांनी आनंदाने स्वीकारल्या. शिवाय त्याचे भांडवल केले नाही. हातामध्ये एक जुनी सॅक, डोळ्यांत एक अद्भूत स्वप्न आणि अंत:करणात भारताच्या विविध भाषांबद्दल अपार आदर घेऊन या माणसाने सतत एक तप देशाच्या कानाकोपऱ्यात पायपीट केली. एका राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात जाताना बदलणारी माती, तिथली संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या कुशीत जन्मलेले ‘शब्द’ गोळा करण्याचा हा प्रवास एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नव्हता. त्यांच्या या अफाट कार्यात त्यांना आणखी एका व्यक्तीचे मात्र सहकार्य मिळाले. ती व्यक्ती म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती प्रा. कविता नरवणे. कविताबाई या विद्वान तर होत्याच पण आपल्या पतीच्या कार्याचे मोल जाणणाऱ्या होत्या.
त्यांच्या कार्याची दखल घेणारी आणखी एक व्यक्ती त्यांना योगायोगाने मिळाली. ती व्यक्ती म्हणजे एक भाषाशास्त्रज्ञ होती. त्या व्यक्तीने त्यांचा गौरव भारतीय डॉ जॉन्सन म्हणून केला. ही बातमी लंडन टाइम्समध्ये प्रकाशित झाली. योगायोगाने ती तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंच्या वाचनात आली. त्यांनी विश्वनाथजींच्या कार्याची दखल घेऊन अत्यंत आदरपूर्वक विश्वनाथजींना बोलावून घेतलं. त्यामुळे त्यांना पुढील कार्यात मदत प्राप्त होऊन सरकारी पातळीवर आपल्या कोशाची विक्री करता आली. आपल्या या कार्यामुळे त्यांचे अनेक थोर मान्यवर व्यक्तींसोबत संबंध आले. त्यामध्ये डॉ राजेंद्रप्रसाद, स. का. पाटील यांच्यासारख्या व्यक्ती होत्या. परंतु त्यांच्या संबंधाचा वैयक्तिक फायदा त्यांनी कधीही करून घेतला नाही. आपल्या कामाच्या संदर्भात मात्र त्यांचे आवश्यक ते सहकार्य अवश्य घेतले. काही काळ त्यांनी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. प्रेमचंद, शरदचंद्र आणि सरोजिनी नायडू यांच्या साहित्यावर त्यांनी केलेले लेखन त्यांच्यातील प्रगल्भ रसिकतेची साक्ष देते.
विश्वनाथजींनी कोषनिर्मितीचे एवढे प्रचंड कार्य केले तरी त्यांची वृत्ती एका कवीची होती. शेष सुंदर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या देशभक्तीचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या काव्यसंपदेखेरीज मुन्शी प्रेमचंद यांचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे. भारतीय व्यवहार कोश आणि भारतीय कहावत संग्रह हे तर त्यांचे चिरंतन प्रेरणादायी असे कार्य! आज पुण्यातल्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या जवळून जाताना रस्त्यातील एका पाटीवर लक्ष स्थिरावते’कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे रस्ता’. गजबजलेल्या शहरातील त्या पाटीकडे पाहून मन क्षणभर थबकते. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. ही पाटी आपल्याला ओरडून सांगतेय की, ही केवळ एका व्यक्तीच्या नावाची पाटी नाही, तर ती साक्ष आहे एका माणसाच्या निस्सीम, मूक, एकहाती आणि झाकोळलेल्या महातपस्येची!
कलंदर आणि रसिक असे हे विश्वनाथजी आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी अखेरपर्यंत धडपडत राहिले. वयाच्या ७८ व्या वर्षी दि. ८ मे २००३ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे अनेक संकल्प मात्र मृत्यूमुळे अपूर्ण राहिले. परंतु असे असले तरी आपल्या अद्वितीय आणि हिमालयाएवढ्या कार्यामुळे ते अजरामर आहेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला त्यानिमित्ताने वाहिलेली ही आदरांजली.
सन १८५७… स्वातंत्र्य समर पेटलेलं… ब्रिटिश जनरल ह्यू रोज ने संधी साधून झाशी वर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईंच्या किल्ल्याला वेढा घातला, सैनिक किल्यात शिरण्याच्या प्रयत्नात… राणी विचारात पडलीये, तात्या टोपे पराजित झाल्यामुळे, पेशव्यांकडून मिळणा-या मदतीची आशा ही मावळली होती. अशा वेळी *ती* पुढे येते… म्हणते…
” राणी साहेब, तुम्ही लहानग्या दामोदर रावांना घेऊन किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघून जा. मी बघून घेईन इंग्रजांना! “
राणी लक्ष्मीबाईंना हा प्रस्ताव मंजूर नसावा. कारण त्यांना ठाऊक आहे की, ती समर यज्ञात समर्पित व्हायला निघालेली आहे. त्यांना असं सगळ्यांना संकटात सोडून जाणं रूचेना! राणी सद्गदित होऊन म्हणाली, ” झलकारी, अगं तू सावली, छाया ना माझी! मग सावली देहापासून दूर कशी गं होणार”? राणी जागची हालत नाही असं बघून ती पुन:पुन्हा झाशीच्या आणि दामोदर च्या भविष्याची ग्वाही देते, विनवते आणि राणीला निघून जायला भाग पाडते. अगदी बाजीप्रभू चा तोच बाणेदारपणा दिसला तिच्या शब्दांत… लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा जगो!
राणी जड अंत:करणाने ती चा निरोप घेते… उराउरी भेटते… जणू… तिच्या उरातलं देभक्तीचं आणि झाशीच्या जबाबदारीचं स्फुल्लिंग ; थेट चेतवून, प्रज्वलित करणारी चेतना ते हृदयीचे ये हृदयी घालते… जणू झाशीच्या जबाबदारी चं पदच तिला बहाल करून, घोड्यावर स्वार होऊन, दामोदर ला पाठीशी बांधून निघून जाते…
कोण होती ती? जिच्या हाती झाशी सोपवून जाण्याइतका विश्वास, खात्री कमावलेली…
ती… झाशीच्या राणीच्या खांद्याला खांदा लावून लढलेली, तिच्या बरोबर सावली सारखी राहून, अगदी सर्वार्थाने तिची सावली झालेली, तिची प्रतिच्छाया, तिचंच प्रतिबिंब वाटावं, इतकी, अगदी तिचीच झलक… झलकारीबाई!!
झाशीच्या इतिहासाच्या मोठ्या पुस्तकातील एका छोट्याशा ओळीतलं, छोटंसं नाव! ऐतिहासिक दस्तावेजांच्या चळतीच्या थरांखाली दडलेलं… दबून गेलेलं… दाबलं गेलेलं नाव! पण तिच्या संपूर्ण कर्तृत्वावर दृष्टी टाकली तर लक्षात येतं ते…
तिच्या सावली चं मोठेपण! आणि आपसूकच मुखातून निघतं…
तिची मोठी सावली!!!
झलकारीबाई… बुंदेलखंड मधील भोजला गावच्या, कोळी समाजातील सदोवरसिंग आणि जमुना देवी या दांपत्याच्या घरी, २२ नोव्हेंबर १८३० या दिवशी जन्माला आलेली ही कन्या! एका निर्धन घरात, संघर्ष आणि कष्टमय जीवन असलेलं तिचं बालपण! तिच्या दुर्दैवाने त झलकारी दोन वर्षांची असताना, तिची आई तिला सोडून गेली. आईची मायेची पाखर गेली तिच्या माथ्यावरची!
पण तिच्या पित्याने तिच्या या दु:खाला तिच्या कमकुवतपणात परिणत न होऊ देता, तिची ताकद बनवलं! दु:खावेगाला प्रवेगाची दिशा दिली. तिला मुलासारखी वाढवली. तिच्या हातात बांगड्या नाही तर घोड्याचा लगाम दिला. तिला युद्ध कौशल्य शिकवून पारंगत केले. घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजी, शिकवली. याचाच परिणाम म्हणून झलकारी एक साहसी, निडर, आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी घडत गेली… घडली. तिचं बालपण म्हणजे साहसकथाच! १० वर्षांची असतांना, एकदा जंगलात नेहमीसारखीच लाकडे तोडायला गेली असतांना, एका वाघाने तिच्यावर हल्ला केला, तर हीने आपल्या कु-हाडीने त्याला ठार मारले. गावात ही वार्ता पोचली, गावक-यांनी तिला दुर्गा देवीचा अवतार म्हणून गौरवले.
हे साहस कमी होतं म्हणून की काय… एकदा गावात आलेल्या डाकूंना ही मोठ्या हिंमतीने, एखाद्या विरांगनेसारखं, पळता भुई थोडी केलं!
यथावकाश झलकारी चा विवाह तिच्या योग्य अशाच… झाशीच्या राणीच्या सैन्यातील आणि तोफ चालविणा-या शूर वीराशी.. पूरण कोळी शी होतो. आणि झलकारी झाशीत येते. हाच तो क्षण असावा जो एक स्फुल्लिंग ठरला, एक समिधा चेतविणारा!!
बालपणी मातीचा किल्ला बनवण्यात रममाण होणारी झलकारी एक दिवस झाशीच्या किल्ल्यात प्रवेशते. राणी लक्ष्मीबाईंची दृष्टी तिच्या वर पडते आणि राणी… आश्चर्याने बघतंच रहाते… अगदी असाच प्रसंग…
उटूनि दोन्ही आरिसे | वोडविलिया सरिसे |
कोण कोणा पाहातसे | कल्पावे पां?
राणी आपलंच प्रतिबिंब, हुबेहूब डोळ्यासमोर बघून स्तंभित झाली. चौकशी केल्यावर पूरण कडून तिच्या साहसकथा, युद्ध कौशल्यात तरबेज असणं, घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी… सगळंच कळलं. राणीने झलकारी ला आपल्या दुर्गादला ची सेनापती बनवलं. भोजला गावातील दुर्गावतार सेनापती च्या वेषात अवतरणं हा निव्वळ योगायोग नसावाच! काहीतरी संकेत असावा तो विधिलिखिताचा! राणी लक्ष्मीबाई ने त्या काळात, जात पात न बघता, एक क्रांतीकारी पाऊल उचललं आणि…
गावाकडच्या चुलीतल्या ज्वाळांना, क्रांतीच्या ज्वाळांचं रूप दिलं!! जंगलातून लाकडे तोडून आणणा-या झलकारी लाच जणू राणीने चंदनाची समिधा म्हणून आपल्या जवळ ठेवून घेतली.
हीच ती सांभाळलेली समिधा झलकारीबाई!! हीनेच राणीचं प्रतिबिंब असण्याचा, राणी सारखं दिसण्याचा फायदा घेण्याचा निर्णय घेऊनच, राणीला किल्ल्यातून सुखरूप बाहेर काढले. आणि…
उभी ठाकली थेट जनरल ह्यू रोज समोर भेटीला!
सैनिकाने विचारले, ” कोण तू? “
झलकारी ने उत्तर दिले,…
मी राणी लक्ष्मीबाई!!
ऐकताच, सैनिकांनी घेरले तिला, सगळीकडे राणी पकडली गेल्याची वार्ता पसरली. झलकारी ह्यू रोज समोर उभी… त्याने विचारले, ” कोण आहेस तू? ” झलकारी ने पुन्हा तेच उत्तर दिले खड्या आवाजात… मी राणी लक्ष्मीबाई!! राणी जोपर्यंत सुखरूप सुरक्षित जागी पोहोचत नाही तोपर्यंत यांना गुंतवून ठेवायचा तिचा विचार. पण तेवढ्यात एका फितुराने ती राणी नसल्याचे सांगितले. जनरल च्या आपण फसविले गेलो हे लक्षात आले, संताप झाला खूप. कारण रणनीतीत ली चलाखी असलेला अधिकारी होता तो! पण एका स्त्रीने त्याच्या डोळ्यात जणू धूळ फेकली आणि राणी सुरक्षित जागी पोचली.
असं म्हणतात की ह्यू रोज ने तिला विचारले की, ” तुझ्या बाबतीत मी काय निर्णय घ्यावा असं तूला वाटतं? “
त्यावर झलकारी उत्तरली, ” तुम्ही हवं तर मला फाशी देऊ शकता. मला काहीच भिती नाही. कारण, जीव जायची भीती त्यांना असते, ज्यांचा जीव त्यांच्या देहात असतो. माझा जीव तर झाशीत आहे. मग मला तो जाण्याची मला भीतीच नाही ना! “
असं म्हणतात की झलकारी ला सोडून देण्यात आलं. कारण त्यांना झाशी आणि झाशीची राणी याचा कब्जा हवा होता.
झलकारी झाशी च्या दिशेने परतताना समरांगणावरील शवांत तिला आपल्या पतीचे… पूरण चे शव दिसले. त्याच्या शवाजवळ बसली, आणि वदली, “पूरण, तू माझ्या पेक्षा मोठ्या भाग्यशाली ठरलास रे! झाशी साठी माझ्या आधी जीव अर्पण केलास!… बस्स्… आवरला तिने शोक आणि जख्मी वाघिणी सारखी तुटून पडली अत्यधिक त्वेषाने!! तिच्या त्या दुर्गावताराचं वर्णन कवींनी केलयं…
“जाकर रण में ललकारी थी,
वह तो झांसी की झलकारी थी!
झलकारी की झलक देखकर
वो बूंदेले भी हां गये,…
जब उतरी वे समर भूमी में,
गोरे भी थरथर कांप गये!
रानी झांसी को बचा गयी,
ऐसी सन्नारी थी झलकारी!
फिर लौट के घर ना आई,
ऐसी नारी थी झलकारी!!
अशी ही झलकारी बाई! … दाखवून दिलं, सिद्ध केलं तिने की, खरी वीरता महालांत नसते तर ती रोमा-रोमात सळसळणा-या रक्तातल्या देशभक्तीच्या चैतन्यात असते. राणी सारखी दिसत होती, राणी तिच्यावर झाशी चं राज्य सोपवून गेली, पण तिला राज्य आणि राणी पदाचा मोह नाहीच झाला, तिचं खरं प्रेम होतं ते… झाशीच्या भूमीवर, मातीवर!! इस मिट्टी में मिल जांवां… हेच वेड लागलं होतं तिला!! तिच्या साठी ताज नाही तर त्याग महत्वाचा होता. ती राणीची सल्लागार, महत्वपूर्ण निर्णयांची भागीदार बनली. युद्धाच्या कठीण प्रसंगी… धैर्य आणि शौर्य यांचा योग्य समन्वय साधत ती ढाल बनली राणी लक्ष्मीबाई ची! जौहार करणा- या स्त्रियांना आत्मरक्षणासाठी लढण्याचे बळ दिले. स्वातंत्र्याचा अलख जागवण्यासाठी तिने राणीचं वाचणं महत्त्वाचे मानले.
पण झलकारीबाई चं दुर्दैव बघा… तिच्या नावाचा कुठेतरी फक्त छोटासा उल्लेख मिळतो, जो दिसून ही न दिसल्या सारखाच! नगण्य! दुर्लक्षित! उपेक्षित!! जिचं साहस बघून जनरल ह्यू रोज नी सुद्धा तसं पाहिलं तर… गौरवोद्गार च काढले होते की,
” भारतातील १% महिला जरी हिच्या सारख्या बनल्या तर इंग्रजांना भारत सोडून जाव लागेल.! “
असं असूनही आपल्याला मात्र या समिधेचं समर्पण दिसलं नाही.
आता- आता कुठे तिच्या समरपणाचं तेज, त्याची आच, सामाजिक धग, जाणवल्या मुळे असेल… पण २००१ मध्ये सरकारने पोस्टाचे एक तिकीट झलकारीबाई च्या नावाने काढलं.
अशी ही झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई ची प्रतिछाया, झाशीची सावली झाली, तिची कहाणी एक प्रेरणा आहे! एक चैतन्य शलाका आहे जी समिधा बनून समर्पित झाली.
झलकारीबाई एक ज्वाला होती, धगधगती!!
नाही मिळाली तिला जागा, ऐतिहासिक दस्तऐवजांत, कुठल्या पाठ्यपुस्तकात… पण ती आजही लोकगीते, लोककथा आणि बुंदेलखंड च्या लोक हृदयात अढळ पदावर विराजमान झालेली आहे हे ही नसे थोडके!!!
६ एप्रिल २०२६, पहाटे ४ वाजताचा सुमार, श्रीलंकेतील तलईमन्नारजवळचा समुद्र. आजूबाजूच्या गावातले बहुतेक सगळेजण गाढ झोपेत होते. पण नागपूरची १७ वर्षांची ईश्वरी पांडे पूर्ण तयारीनिशी तिथल्या उरमलाई पॉइंटवर उभी होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पाक सामुद्रधुनीत (Palke Strait) उतरली.
सभोवताली फेसाळणाऱ्या लाटा तिला दिसत नव्हत्या, त्या तिला फक्त जाणवत होत्या. कारण ती जन्मापासून अंध आहे.
पुढील ११ तास आणि १५ मिनिटे ईश्वरीने जगातील सर्वात किचकट, क्लिष्ट आणि बेभरवशाच्या समुद्री पट्ट्यांपैकी एकामधून पोहत प्रवास केला.
समुद्री प्रवाह तिला मार्गापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करत होते, जेलीफिश तिच्या शरीराला स्पर्श करत होते, मुसळधार पाऊस कोसळत होता. पण ती एकाग्रतेने पोहत होती. सोबतच्या बोटीमधून तिचे प्रशिक्षक संजय बटवे लाऊडस्पीकरवरून तिला सतत सूचना देत होते — “डावीकडे, थोडं डावीकडे… स्थिर राहा… तू छान करते आहेस! ”
संजयसरांशिवाय भावी राजगीरे, ईशांत पांडे, संदीप वैद्य, निरव आणि डॉ. अभय राजगीरे हे तिचे सहकारी, कधी पोहत तर कधी होडीतून, तिच्या दोन्ही बाजूंनी तिला साथ देत होते.
दुपारी ३ च्या सुमारास भारतातील धनुषकोडीचा किनारा दिसू लागला. आणि ३:१५ च्या सुमारास जेव्हा तिचे पाय अरिचलमुनईच्या (धनुषकोडी) वाळूत टेकले, तेव्हा ईश्वरीने २९ किलोमीटर अंतर पार करून इतिहास घडवला होता.
पाक सामुद्रधुनी पार करणारी ती जगातील पहिली पूर्णपणे अंध व्यक्ती ठरली.
नागपूरमध्ये तिचे आई-वडील कमलेश आणि अरुणा यांना आपल्या मुलीचा हट्टी आणि जिद्दी स्वभाव चांगलाच माहिती होता. लहानपणी ती पोहायला शिकली, पोहणे सोपे होते म्हणून नव्हे, तर अंधत्वामुळे आपल्याला मर्यादा याव्यात हे तिला मुळी मान्यच नव्हते म्हणून.
२०२४ साली तिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हा १७ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला होता. पण पाक सामुद्रधुनी वेगळीच होती — शार्क, डॉल्फिन्स आणि सतत बदलणारे समुद्री प्रवाह, अनेक दृष्टी असलेल्या पोहणाऱ्यांनाही यांनी नमविले आहे.
धनुषकोडीहून ती जेव्हा नागपूरला परतली, तेव्हा फिटनेसप्रेमी, ज्येष्ठ जलतरणपटू, नातेवाईक आणि उत्साही नागापूरकर नागपूर रेल्वे स्थानकावर जमले होते. ईश्वरीचे जल्लोषात स्वागत झालं, तिची खुल्या जीपमधून मिरवणूक निघाली. मेडिकल कॉलेज चौकात, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे, रंग आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तिचे स्वागत केले. अंतिम टप्प्यात अश्वारूढ होऊन तिने मानवंदना स्वीकारली.
तिला गर्दी दिसत नव्हती. पण ती आवाज ओळखत होती, त्यांची नावे घेत होती.
आता तिचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदले गेले आहे. पण ईश्वरी इथे थांबणारी नाही. तिचे लक्ष्य आता आंतरराष्ट्रीय पॅरा (दिव्यांग) जलतरण स्पर्धांकडे आहे.
तिनं दाखवून दिलंय, स्वप्नं नुसती डोळ्यांनी बघायची नसतात, तर ती जिद्दीने साध्य करायची असतात.
ईश्वरीचे अभिनंदन आणि तिला शुभेच्छा!
माहिती संग्राहक / लेखक : श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈