मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंढरपूर वारीचा इतिहास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

 

 

? इंद्रधनुष्य ?

☆ पंढरपूर वारीचा इतिहास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

“…आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत! ” – – – गडबडू नका, बरोबर वाचलंत!

वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये हि वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ, तळमळ! कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो हि भावना मानस साद घालत असते.

वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला. घटना होती इसवीसन १५०८ ते १५११ दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी (सध्याचे नाव हंपी) येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्रीसंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले देवा, ” अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास? तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ति प्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत! ” दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडआरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरु झाली. राजाने फर्मान सोडले कि, जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.

कोरडीये काष्ठी अंकुर फुटले! येणे येथे झाले विठोबाचे!!

सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना, ” पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ” च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा! पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले कि, ” तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील. ” त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वरा प्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले कि चार खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले कि सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळखांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध १४ या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजाअर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो.

संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्त्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणांस पंढरीत होत आहे. म्हणूनंच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता ‘हंपीची वारी’ करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती कि ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्याठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते कि ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.

हा इतिहास ८०% भाविकांना माहित नाहीये. त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून हि अत्यंत महत्वाची माहिती पोचवा. कीर्तनकार असाल तर हि माहिती आपल्या कीर्तनातून लोकांना सांगा. आपल्या पांडुरंगाच्या भक्तांचे सामर्थ्य काय आहे ते इतरांपर्यंत पोचवा. राम कृष्ण हरी 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हूल दिवस – संथालांचा नरसंहार…” ☆ माहिती संग्राहिका व लेखिका – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “हूल दिवस – संथालांचा नरसंहार…” ☆ माहिती संग्राहिका व लेखिका – सुश्री शोभा जोशी ☆

(इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो लोकांनी प्राणांचं बलिदान दिलं आहे हे आपल्याला ज्ञात आहेच. १८५७ चा उठाव – खरं तर ते पहिलं स्वातंत्र्य युध्द मानलं जातं, पण त्याही आधीपासून हे प्रयत्न सुरू होते. लोकांनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलेले काही प्रसंगच किंवा काही वीरांची नावंच आपल्याला माहित आहेत. पण जनजातीतील शेकडो लोकांनी दिलेलं बलिदान कधी आपल्या समोर आलंच नाही.)

स्वातंत्र्य युध्दात, संथाल परगाण्यात म्हणजेच आत्ताच्या छत्तीसगडमध्ये, ३० जून १८५५ला संथालांकडून झालेलं युध्द हा मैलाचा दगड आहे. त्या ही पूर्वीपासून स्वातंत्र्य युध्दाची सुरूवात झाली होती.

संथाल परगणा हे शेतीप्रधान वनवासी क्षेत्र आहे. हे वनवासी लोक धर्मप्रेमी, निसर्गप्रेमी आणि साधेभोळे आहेत. जमीनदार याचा फायदा नेहमीच उठवत. जंगलांमधील किमती वस्तू (उदा. मध, वनौषधी, डिंक इ.) त्यांच्याकडून घेऊन त्या बदल्यात त्यांना स्वस्तातल्या काही किरकोळ वस्तू त्यांना देत.

इंग्रज आल्यानंतर हे जमीनदार त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळे या लोकांवर दुहेरी संकट आले. या जनजाती, घरगुती कारणांसाठी ५ ते ५० टक्क्यांपर्यंत व्याज देऊन सावकारांकडून कर्ज घेत आणि उपजीविका चालवत.

१७८४ मध्ये संथालांमधील तिलका मांझी या शूरवीराने आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरूध्द अनेक वर्षं संघर्ष केला होता. जनजाती समाजात त्यांना मान होता. इंग्रजांनी त्यांना पकडून भागलपूरमध्ये घोड्याच्या शेपटीला बांधून, फरफटत फरफटत नेऊन त्यांना अर्धमेले केले आणि भागलपूरमध्ये एका झाडावर फाशी दिले. यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सिध्दू- कान्हू, चाॅंद- भैरो, फुलो – झानो या बंधू भगिनींनी हा लढा पुढे चालू ठेवला.

३० जून १८५५ ला संथालांनी पंचकठीया गावात हूल क्रांतीला सुरूवात केली, जी पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात पसरली. हे आंदोलन हूल क्रांतीची सुरुवात होती. या आंदोलनामुळे इंग्रजांना कित्येक ठिकाणी माघार घ्यावी लागली आणि संथालांचा विजय झाला.

एक वेळ अशी आली की या क्रांतीचा संदेश घरोघरी पोहोचला. याचा परिणाम असा झाला की, त्या क्षेत्रांमधून इंग्रज शासन संपले. यामुळे उत्साहित होऊन एके दिवशी ५०००० संथालांनी इंग्रजांना मारत, काटत कलकत्त्याच्या दिशेने पिटाळून लावले.

अर्थातच इंग्रजांना हे सहन झाले नाही. त्यांनी मेजर बुरीच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. ५ तासांच्या रक्तरंजित लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि संथालांनी पाकडू जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले. शेकडो इंग्रज सैनिक मारले गेले. त्यामुळे साहजिकच इंग्रज अधिकारी घाबरले. त्यांनी मार्शल लाॅ लाऊन तो सारा प्रदेश सेनेच्या स्वाधीन केला. त्यामुळे इंग्रज सेनेला रान मोकळे मिळाले. इंग्रज सेनेकडे आधुनिक शस्त्रे होती आणि संथालांकडे धनुष्यबाण होते. त्यामुळे बाजी पलटली. सगळीकडे रक्ताचे पाट वाहू लागले. जवळ जवळ २०,००० संथालांनी प्राणांची आहुती दिली.

प्रसिध्द इतिहासकार हंटरने या युध्दाविषयी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘संथालांना आत्मसमर्पण सारखा शब्द माहित नव्हता. जोपर्यंत ढोल वाजत राहिला तोपर्यंत ते लढत राहिले. अगदी शेवटी एक माणूस राहिपर्यंत ते लढत राहिले. इंग्रज सेनेमध्ये एकही सैनिक असा नव्हता की जो या साहसापुढे लज्जीत झाला नाही. ‘

या संघर्षात सिध्दू- कान्हू बरोबरच त्यांचे भाऊ चाँद- भैरो सुध्दा मारले गेले. या घटनेचे स्मरण म्हणून दर वर्षी ३० जून हा हूल दिवस मानला जातो. या दिवशी ठिकठिकाणी लोक एकत्र येऊन या क्रांतीवीरांना श्रध्दांजली अर्पण करतात.

कार्ल मार्क्स या लेखकाने आपल्या ‘नोटस् ऑफ इंडियन हिस्ट्री ‘ या पुस्तकात ‘जन- क्रांती‘ असे या घटनेचे वर्णन केले आहे.

या शूर वीरांना जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगरातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

माहिती संग्राहिका व लेखिका : सुश्री शोभा जोशी.

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्याकरण योद्धा… लेखिका : सुश्री नंदिनी लोंढे ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ व्याकरण योद्धा… लेखिका : सुश्री नंदिनी लोंढे ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

बऱ्याच वर्षांपूर्वी भूलशास्त्राशी संबंधित ब लेख वृत्तपत्रात छापायचे होते. लेख तयार झाला; पण तो कोणाकडून तरी तपासून घेतला पाहिजे असे वाटले. माझ्या विभागप्रमुख मदतीला धावल्या. ‘मम्मीकडून तपासून घेते, ‘ एवढेच उत्तर मिळाले. तपासून झालेल्या लेखांचे टिपण दोन-तीन दिवसांत हाती आले. अधूनमधून दुरुस्त्या दिसल्या अन् शेवटी शेरा होता… ‘ ‘भाषाशैली सुरेख ! मांडण्याची पद्धत उत्तम.!’ तोपर्यंत ‘मॅडमच्या मम्मी’ म्हणजे नक्की कोण याची माहिती मी काढली होती. व्याकरण क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आणि ‘बालभारती’च्या मराठी व्याकरणासाठी झटणाऱ्या वाङ्मयीन लढवय्या अशी बिरुदे मिरवणाऱ्या यास्मिन शेख यांच्याबद्दल वाचत गेले तशी मी थक्क होत गेले!

त्या दरम्यान आमच्या विभागप्रमुख डॉ. शमा भागवत यांच्या घरी जाण्याचा योग आला. दुमदार हिरवाईने नटलेल्या, उच्च अभिरुचीने सजविलेल्या घराच्या दारातच प्रसन्न तेजःपुंज व्यक्तिमत्त्व सामोरे आले. गुलाबी नितळ म्हणावा असा गोरा रंग, गुलाबी साडी, कृश; पण निरोगी ताठ बांधा, स्निग्ध प्रेमळ डोळे आणि चेहेऱ्यावर विलसणारे ऋजू स्मितहास्य. बघता क्षणी मनावर छाप पाडणारे हे राजस आणि लोभस व्यक्तिमत्त्व होते यास्मिन शेख. बोलताना सतत जाणवत होते, ते त्यांचे मराठी भाषेवरील निरतिशय प्रेम, आस्था आणि मनापासून कळकळ.

भूतकाळात डोकावून पाहता विस्मयचकित करणारा त्यांचा इतिहास समोर आला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा जॉन रुबेन. जन्माने ज्यू. जगभर पांगलेले ज्यू भारतातही पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आले. बघता बघता इथलेच होऊन गेले. इथली संस्कृती, भाषा अवगत करून इथेच रुळले. जेरुशा जन्माने नाशिककर; पण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याची जडणघडण झाली. श्री. पु. भागवत, वसंत कानेटकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या प्रभावाखाली मराठी भाषेत त्यांनी बी. ए. ला सुवर्णपदक पटकावले. अध्यापनाची आवड जोपासण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागल्या. या दरम्यानच कानेटकरांच्या मध्यस्थीने समान आवड असणाऱ्या अझीझ शेख यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि जेरुशा रुबेन यास्मिन शेख झाल्या. शुद्ध आणि सुरेख मराठी बोलताना समोरच्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य टिपताना त्या नेहमीच म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. ज्या राष्ट्राने तुम्हाला आसरा दिला, ज्याने तुमची स्वतःची ओळख पटवून दिली, त्या राष्ट्राची भाषा हीच मातृभाषा असते. ‘

कागदोपत्री, वैचारिक किंवा वैज्ञानिक लेखनासाठीची मराठी ही प्रमाण भाषाच असली पाहिजे याबद्दल त्या आग्रही आहेत. भावभावना पोहोचवण्यासाठी बोली भाषा अवश्य असावी; पण त्यामध्येही इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे, याबाबतीत त्या ठाम आहेत. मराठीच्या दुर्दशेसाठी आपण सारेच कारणीभूत आहोत असे त्या मानतात. त्यावरच्या उपायांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. व्याकरणावरील त्यांची पुस्तके ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ आदर्श मानली जातात. अतिशय रूक्ष वाटणारा हा विषय त्यांनी सहजतेने उलगडून सोपा केला. त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

आजही तेवढ्याच जोमाने त्यांचे लेखन-वाचन सुरू आहे. वर्तमानपत्रात व्याकरणाचे सदर लिहितात. ‘अंतर्नाद’ मासिकात व्याकरण सल्लागाराच्या भूमिकेत भरीव कामगिरी करून उच्चतेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. मुद्रिते तपासताना सकारात्मक राहून सतत कार्यमग्न राहणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे. आज वयाची शंभर वर्षे पार करताना शरीराबरोबरच त्यांच्या प्रसन्न, नम्र मनाचेही कौतुक वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण अफलातून स्मरणशक्ती यांची दैवी देणगी त्यांना लाभल्याचे पुन्हा पुन्हा जाणवते. स्वतःच्या हाताने लिहिण्यातील आनंद त्यांना अनेक वर्षे लाभो. त्यांनी हाती घेतलेली ही व्याकरणाची दिंडी घराघरांत जावो आणि यास्मिन शेख यांना नव्या उमेदीने जगण्याचे बळ देवो.

लेखिका : सुश्री नंदिनी लोंढे

प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमेरिकेतलं ‘सुदर्शन चक्र‘… लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ अमेरिकेतलं ‘सुदर्शन चक्र‘… लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

“मराठी आणि महाराष्ट्र मनात घेऊन अमेरिकेत फिरणारं “सुदर्शन चक्रं…”

नाटकाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर वेगवेगळी माणसं भेटतात. ह्या अमेरिका दौऱ्यात क्लिव्हलंड शहरात “सुदर्शन साठे…” भेटले…!

काय, किती आणि कसं बोलायचं ह्यांच्याविषयी…???

आधी भौतिक श्रीमंती सांगतो… म्हणजे तुमचा वाचण्यातला इंटरेस्ट वाढेल … 

फूटबाॅल ग्राऊंडपेक्षा २ पावलं कमी भरेल इतकं मोठं ह्यांचं घर … घराच्या दाराशी ठेवलेल्या “रागावलेल्या सिंहाच्या पुतळ्यापासून ते घराच्या मागे, टेनिस कोर्टच्या शेजारी ठेवलेल्या “8 Hours chair”, म्हणजे ८ तास बसलं तरी ; बूडाला आणि बूडाच्या मालकाला कंटाळा येणार नाही अशा खुर्चीपर्यंत सगळं अत्यंत विचारपूर्वक आणि मौल्यवान … 

ज्या ज्या महागड्या गाड्या पाहून माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या भूवया उंचावतील त्या त्या सगळ्या गाड्या घरांत… बाहेर पडायचं निमित्त काय आहे …? त्यानुसार गाडी बदलायची अन् काढायची… 

2 BHK फ्लॅट च्या २ बेडरूम मिळून जेवढी जागा असेल तेवढं ह्यांचं कपड्यांचं कपाट… बूट, चष्मा वगैरे ह्यांची व्हरायटी नकोच बोलायला…

उंची जवळपास ६ फुट… DON मधल्या बच्चन साहेबांच्या रूबाबाला टक्कर देणारी ह्यांची चाल अन् स्टाईल … 

आता खरी श्रीमंती…, श्रीमंती क्रमांक २ सांगतो… नीट वाचा …

समर्थ रामदासांचा दासबोध, भगवत् गीता, रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, संत तुकारामांचे अभंग ह्या सगळ्यांचा प्रचंड अभ्यास … पाठांतरासहीत … छ. शिवाजी महाराजांच्याविषयी खूप आदर, अभ्यास… 

महाराष्ट्रात राहुन आपण तरी काय शुद्ध बोलतो अशी स्वच्छ मराठी… भारत देशाबद्दल प्रचंड अभिमान… देशांतर्गत मुद्दे, महाराष्ट्र, राजकारण, खेळ, कला ह्या सग्गळ्याविषयीची ऐकीव नाही तर, अभ्यासलेली माहीती, प्रचंड वाचनातून आलेलं ज्ञान … वागायला अत्यंत नम्रं … प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकायची तयारी… ४५ वर्षं अमेरिकेत खूप कष्टं करून कमावलेली माणसांची, विचारांची, ज्ञानाची श्रीमंती… 

त्यांनी विचार करून, प्रत्येक शब्दाचा मान राखून बोललेल्या प्रत्येक वाक्यात आयुष्याचं सार सापडावं असे मुद्दे … 

मी विस्मयचकीत झालो, भारावलो, सुखावलो आणि काय काय झालो…

त्यांना त्यांचे आई वडील, आई वडीलांनी दिलेली शिकवण आणि केलेल्या संस्कारांची स्वत:च्या वयाच्या सत्तरीनंतरही ताजी आठवण आणि जाण… 

बायकोविषयी प्रचंड आदर आणि प्रेम… जगातल्या सगळ्याच नवऱ्यांना पटत नाही तसा त्यांना जरी त्यांच्या बायकोचा मुद्दा नाही पटला तरी, सांगायची पद्धत सुद्धा फार आदर देणारी … 

आणि कित्तीही व्यस्तता असली तरी रोsssज त्यांच्या ठरलेल्या “गजानन महाराजांच्या पोथीतला” एक अध्याय वाचण्यावरची त्यांची श्रद्धा … देवावरचा प्रचंड, दृढ विश्वास… श्रीराम, श्रीकृष्ण ह्यांना “आलो तुमच्या पायाशी” म्हणुन लीन झालेलं त्यांचं अंतःकरण… 

कुणालाही कुठल्याही तराजू मध्ये न तोलणारी, सगळ्यांशी एकसारखी वागायची त्यांची पद्धत … 

समोरच्याला सतत आनंद देण्याचा, त्यांच्या ज्ञानात, माहितीमध्ये भर घालणारा त्यांचा दानशूरपणा… 

आणि हे सगळं त्यांच्याकडे असतांनाही मी त्यांच्यासमोर पहिल्यांदा आलो तेंव्हा माझा हात हातात घेउन मला म्हणाले “सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या माणसाचा स्पर्शं झाला… आता मलाही आशीर्वाद मिळेल …” … हे ऐकल्यावर मला भारी वाटलं होतं पण, जसा जसा ह्या माणसाचा सहवास लाभला त्यानंतर मात्र माझ्यासाठी वापरलेल्या त्या वाक्यावरून त्यांची विनोद बुद्धीही कमाल असल्याची मला खात्री पटली.

३ दिवसांत मी ह्या माणसासमोर भक्त होऊन बसलो, त्यांना ऐकलं… सतत असं काहीतरी सांगायचे कि, मोत्यांचा पाऊस पडला तर कोणता मोती वेचावा ह्या गोंधळातच वेळ जावा तसं माझं झालं… तिसऱ्या दिवशी मी कागद पेन घेऊन बसलो आणि चक्क ते बोलतात ते लिहित गेलो… 

निघतांना त्यांना म्हणालो, “ सुदर्शन सर मला तुम्ही खूप आवडलात … मला आशीर्वाद द्या…” त्यांनी समर्थ रामदासांचा दासबोध दिला.

त्यांचा निरोप घेतांना का कोण जाणे मला खूप रडू येत होतं… 

मी निघतांना त्यांना घट्ट मिठी मारली, मला त्यांना अजिबात सोडवत नव्हतं … 

त्यांनी पाठीवरुन त्यांचा हात छान फिरवून गाडीत बसण्यापूर्वी एक हात वर करुन एकदम स्टाईलीश बाय केला आणि त्यांच्या शर्टच्या पांढऱ्या रंगाला मॅच होणाऱ्या पांढऱ्याशुभ्र महागड्या गाडीत निघून गेले…

आपण नुसते मराठी, महाराष्ट्र, धर्म असा गवगवा करतो पण, पण, सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही मनात, वागण्यात, कर्तृत्वात, मराठी भाषा, महाराष्ट्र आणि भारत घेउन फिरणारं “सुदर्शन चक्रं” मला अनेक अर्थांनी चक्रावून गेलं … धन्यवाद …!!

☆

लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सामाजिक जाणिवेचा एक दुर्मिळ आविष्कार…– लेखक : श्री शिरीष वा. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सामाजिक जाणिवेचा एक दुर्मिळ आविष्कार…– लेखक : श्री शिरीष वा. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

गेल्या शुक्रवारी सकाळी ग्राहक पंचायतीच्या न्यायालयीन कामासाठी फोर्टला कोर्टात जात होतो. त्या दिवशी कोर्टात फारसं काही होणार नव्हतं. त्यामुळे वाटेत मोबाईल वरचे मेसेजेस वाचायाला भरपूर वेळ होता. आलेल्या मेसेजेस मधे एक Hindustan Times मधे प्रसिद्ध झालेला लेखही होता. त्या लेखातील फोटो बघुन मी आश्चर्यचकितच झालो. अरे, हा तर आपला राघव! आणि तो चक्क एका Ambulanceमधे ड्रायव्हरच्या सीटवर बसून मस्त खुशीत हसतोय. आता अशा या Ambulanceमधे राघव हसत काय करतोय आणि तेही ड्रायव्हरच्या सीटवरुन? लगेच लेख झरझर वाचून काढला आणि मी अक्षरशः थक्क झालो. राघव प्रत्यक्ष समोर असता तर मी त्याला चक्क मिठीच मारली असती.

न राहवून मी राघवला फोन‌ केला आणि त्याचं भरभरून कौतुक केलं. पण तरी सुद्धा माझे शब्द कुठे तरी कमी पडत होते असं‌ वाटत होतं. मी त्याला तसं बोलूनही दाखवलं.

साहजिकच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राघवने असा काय पराक्रम केला की माझी ही स्थिती व्हावी.

राघवने स्वतःच्या खिशातले १७ लाख खर्च करुन चक्क एक ambulance विकत घेतली होती आणि १०० रुपयांत अॅम्ब्युलन्स सेवा नवी मुंबईतील रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिली. गेले तीन महिने राघव ही सेवा ड्रायव्हरच्या मदतीने नवी मुंबईतील रुग्णांना देतोय आणि त्याबाबत त्याला अतीव समाधान आहे.

राघवला हे सगळं करण्यासाठी नक्की काय कारण झालं? ड्रायव्हरसकट ambulanceच्या देखभालीचा महिन्याचा खर्चच साधारणपणे ३० हजार रुपये! असा आतबट्ट्याचा व्यवहार राघव किती काळ करणार?

राघव मला सांगत होता, चार‌ वर्षांपूर्वी त्याच्या आईला हाॅस्पिटल मधे नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. त्यावेळी त्याला ambulance साठी भरमसाठ किंमत मोजावी लागली होती. त्यावेळीच त्याच्या मनाने घेतले की या ambulance सेवेबद्दल काहीतरी करायला हवं. आणि चार वर्षांनंतर राघवला स्वतःलाच करोना संसर्ग झाला तेव्हा त्याने निश्चयच केला. करोनातून बरा होताच राघवने थेट स्वतःच्या पैशातून ambulance खरेदी केली आणि ठरवलं की नवी मुंबईत रुग्णांना १०० रुपयांत ही सेवा मी रुग्णांना उपल्ब्ध करुन देईन.

आणि आता गेले ३ महिने राघव नवी मुंबईतील रुग्णांना १०० रुपयांत ही ambulance सेवा उपलब्ध करुन देतोय. गेल्या तीन महिन्यांत ७७ फेऱ्या झाल्यात. कसा काय आहे राघवचा आजवरचा अनुभव? अतिशय मानसिक समाधान देणारा, राघव मला सांगत होता. रात्री खुप छान झोप लागते. आपण कोणासाठी काहीतरी मदत करु शकतो हे खुप सुखावणारं आहे. पण त्याहीपेक्षा ज्यावेळी त्या रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना भेटतो तेंव्हा त्यांच्या भावना ते ज्या शब्दांत व्यक्त करतात ते खूप सुखावणारं असतं.

राघव सांगत होता, एक २२ वर्षांचा कॅन्सरचा रुग्ण होता. रेडिएशन थेरपी साठी त्याला नवी मुंबईतील उळवे येथून सानपाडा येथे १३ वेळा जाऊन परत यायचे होते (१४ km चे अंतर). त्यासाठी त्याच्या वडिलांना एका ambulance सेवा देणार्याने खास सवलतीचा दर म्हणून प्रत्येक रिटर्न ट्रिपसाठी ७००० रुपये सांगितले. म्हणजे १३ ट्रिप्स साठी चक्क ९१ हजार रुपये! अर्थात या गरीब वडीलांना हे परवडणारे नव्हते. म्हणून अखेर त्यांनी एका cargo van ने त्या मुलाला रेडिएशन थेरपी साठी नेण्याची व्यवस्था करायचे ठरवले. पण सुदैवाने त्यांना त्याचवेळी राघवच्या १०० रुपयांच्या ambulance सेवेची माहिती मिळाली. आणि त्यांना राघवने (१३X२) २६ फेऱ्यांसाठी केवळ २६०० रुपयांत अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करुन दिली. कुठे तथाकथित विशेष सवलतीतील ९१ हजार रुपये आणि कुठे नाममात्र २६०० रुपये!

राघव ही अॅम्ब्युलन्स सेवा अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध करुन देऊन थांबला नाहीये. अनेक वेळा तो रुग्णांबरोबर त्या अॅम्ब्युलन्स मधून त्यांच्या मदतीसाठी स्वतःसुद्धा जातो.

रुग्णांना अशी १००रुपयांत ambulance सेवा देऊन समाजाप्रती आपले देणे देणारा हा राघव नक्की कोण आहे? ४७ वर्षांचा तरुण राघव आज एका बहुराष्ट्रीय कंपनीचा Managing Director आहे. राघवच्या या अनोख्या सामाजिक योगदानाबद्दल मी त्याला आणखी बोलता केला तेंव्हा राघव म्हणाला आर्थिक दृष्ट्या मी खूपच चांगल्या परिस्थितीत आहे. माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक पर्याय स्वतःसाठी नवी कोरी मर्सिडीज घ्यायची आणि दुसरा पर्याय ambulance विकत घ्यायची. मी दुसरा पर्याय निवडला, मी ambulance विकत घेतली आणि आज मी खुप सुखात आहे, राघव सांगत होता. व्यावसायिक स्पर्धेत टिकून करीअर करुन सर्वोच्च पदावरील एखादा तरुण असाही विचार करु शकतो आणि त्यापुढे जाऊन कृतीही करु शकतो हे आजच्या जगात खरंच दुर्मिळ आणि म्हणूनच कौतुकास्पद.

राघवला मी म्हटलं राघव तू जे करतोयस हे फार दुर्मिळ आहे. तुझ्या वयातले तरुण आज फक्त करीअर आणि पैशाच्या मागे लागलेले दिसतात. मोठमोठे 3 BHk, 4 BHK luxury अपार्टमेंट, बाहेर कुठे तरी फार्म हाऊस, मर्सिडीज, BMW ही त्यांची आजची स्वप्नं आणि status symbols असतात. सभोवतालच्या अशा वातावरणात तुझ्याकडे हे सर्व समाजासाठी करण्याची संवेदना कशी काय आली? 

राघव त्याचं श्रेय अर्थात त्याच्या आई-वडिलांना, त्याच्या पत्नीला आणि बहिणीला न विसरता देतो. साने गुरुजींची शिकवण, आई-वडिलांनी केलेले न पुसले जाणारे संस्कार, पत्नीची तगडी साथ आणि बहिणीचाही भक्कम पाठींबा यांच्या जोरावर मी हे सगळं करु शकलो असं राघव नम्रपणे सांगतो. आणि त्याचबरोबर मुंबई ग्राहक पंचायतीच्या मुशीत मी वाढलोय याचीही मला न विसरता आठवण करुन देतो.

होय, हा राघव म्हणजे आपला राघव नरसाळे. आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि आपल्या गिरगाव विभागाच्या अध्यक्षा अनुराधाताई नरसाळे यांचा सुपुत्र. ही राघवची एक ओळख. पण दुसरी ओळख म्हणजे राघव आपल्या संस्थेचा बरेच वर्षे सक्रीय कार्यकर्ताही होता. मला वाटतं साधारणपणे १९९१ ते १९९५ या काळात मी, विवेक पत्की, वर्षा राऊत यांनी तरुणाईला ग्राहक पंचायतीत आणण्यासाठी Young Consumer’s Club (YCC) स्थापन केला होता. त्यातील एक स्वयंप्रकाशी तारा म्हणजे राघव नरसाळे आणि दुसरा म्हणजे पराग रेडकर (सध्याचा कार्यकारीणी सदस्य).

राघव आज अभिमानाने सांगतो त्याचा हा ambulance प्रकल्प त्याने “शून्य अनुभव आणि अपार उत्साह” या जोरावर सुरु केलाय. तरुणांना त्याचं सांगणं आहे की एखादी कल्पना डोक्यात आली तर त्याचा नुसता विचार करत बसु नका. Just do what you believe in and the things will fall in place. And secondly, don’t wait for some one to help you. First help yourself and then see how people rush to help you.

असा आपला हा राघव नरसाळे. एका बहुराष्ट्रीय कंपनीचा MD असुनही समाजासाठी आपलं नि:स्वार्थी योगदान देण्यासाठी १०० रुपयांची ambulance सेवा गरजू, गरीब रुग्णांसाठी राबवून आजच्या तरुण, यशस्वी नवश्रीमंतांना एक चांगली दिशा दाखवतोय. सर्वच तरुणाईला यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

राघवचे संपूर्ण मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे जाहीर कौतुक करताना मला आज खूप आनंद होतोय आणि सार्थ अभिमानही वाटतोय. त्याचबरोबर अनुराधाताईंचे खास अभिनंदन. पुत्र असावा तर असा, असंच कोणाही मातेला वाटेल असे हे राघवचे समाजाप्रती योगदान. राघवला त्याच्या या संवेदनशील सामाजिक प्रकल्पाच्या भविष्यातील यशासाठी खुप खुप शुभेच्छा.

(या १०० रुपयांच्या ambulance सेवेसाठी 9820770021 या क्रमांकावर गरजूंनी संपर्क साधावा. ही सेवा सध्या नवी मुंबई क्षेत्रासाठीच उपलब्ध आहे.)

लेखक : श्री शिरीष वा. देशपांडे

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ जगन्नाथ अष्टकम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ जगन्नाथ अष्टकम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(जगन्नाथ यात्रेचे औचित्य साधून सादर करीत आहे.) 

☆ ☆ ☆ ☆

कदाचित् कालिन्दी तट विपिन सङ्गीत तरलो

मुदाभीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः

रमा शम्भु ब्रह्मामरपति गणेशार्चित पदो

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥१॥

 *

भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे

दुकूलं नेत्रान्ते सहचर-कटाक्षं विदधते ।

सदा श्रीमद्‍-वृन्दावन-वसति-लीला-परिचयो

जगन्नाथः स्वामी नयन-पथ-गामी भवतु मे ॥२॥

 *

महाम्भोधेस्तीरे कनक रुचिरे नील शिखरे

वसन् प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना ।

सुभद्रा मध्यस्थः सकलसुर सेवावसरदो

जगन्नाथः स्वामी नयन-पथ-गामी भवतु मे ॥३॥

 *

कृपा पारावारः सजल जलद श्रेणिरुचिरो

रमा वाणी रामः स्फुरद् अमल पङ्केरुहमुखः ।

सुरेन्द्रैर् आराध्यः श्रुतिगण शिखा गीत चरितो

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥४॥

 *

रथारूढो गच्छन् पथि मिलित भूदेव पटलैः

स्तुति प्रादुर्भावम् प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः ।

दया सिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धु सुतया

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥५॥

 *

परंब्रह्मापीड़ः कुवलय-दलोत्‍फुल्ल-नयनो

निवासी नीलाद्रौ निहित-चरणोऽनन्त-शिरसि ।

रसानन्दी राधा-सरस-वपुरालिङ्गन-सुखो

जगन्नाथः स्वामी नयन-पथगामी भवतु मे ॥६॥

 *

न वै याचे राज्यं न च कनक माणिक्य विभवं

न याचेऽहं रम्यां सकल जन काम्यां वरवधूम् ।

सदा काले काले प्रमथ पतिना गीतचरितो

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥७॥

 *

हर त्वं संसारं द्रुततरम् असारं सुरपते

हर त्वं पापानां विततिम् अपरां यादवपते ।

अहो दीनेऽनाथे निहित चरणो निश्चितमिदं

जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भवतु मे ॥८॥

 *

जगन्नाथाष्टकं पुन्यं यः पठेत् प्रयतः शुचिः ।

सर्वपाप विशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति ॥९॥

 *

☆ ॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं जगन्नाथाष्टकं संपूर्णम् ॥ ☆

*

☆ मराठी भावानुवाद : जगन्नाथ अष्टक ☆

 *

यमुना तटी कधी घुमते मधूर सुरेल तान

स्वाद घेत भृंग प्रमुदित गौळण कमलानन

ब्रह्मा गणेश शिव रमा इंद्र करीत पादार्चन

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥१॥

 *

मुरली वामहस्ते मोरपीस शिरावरी शोभते

कटीवर शेला कटाक्ष मोहक गोपाळ जनांते

वृंदावनी वास लीला सदैव ऐसा परिचय ज्ञान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥२॥

 *

सागरतीरी नील शिखरावर सुवर्णलोभस

बलशाली बलभद्रासहित प्रासादे निवास

सभद्रा मध्ये, सेवा संधी सर्व देवतांसी दान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥३॥

 *

कृपासागर सुंदर जलयुक्त मेघसमूह समान 

सरस्वती रमा राम तेजोमय पावन कमलानन

देवेंद्र पूजित ज्ञानी श्रुतिगण करिती चरितगान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥४॥

 *

रथारूढ मार्गावरती विद्वान समूहा देई दर्शन 

दयार्णव होत प्रकट पदोपदी ऐकोनी भक्तस्तवन 

करुणानिधी सखा जगताचा लक्ष्मीसह निकेतन

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥५॥

 *

नयन मनोहर प्राप्त जयासी परम ब्रह्मज्ञान

वास नीलाद्रीवरी शेषाशिरी सुस्थित ते चरण

राधेसी आमोदे सुंदर रसानंदी देहालिंगन 

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥६॥

 *

नाही याचना राज्य ऐश्वर्य नको माणिक सुवर्ण

वांच्छित नाही सकलांसम सुंदर साथी कोण

सदैव गाइन प्रमथपतीच्या स्तवनाचे गुणगान

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥७॥

 *

मुक्ती द्यावी शीघ्र सुरपते सारहीन संसारातुन 

पापांच्या राशीपासून हे यदुनाथा करावे विमोचन

तव चरणांची कृपा भोगिती अनाथ वा दीन

जगन्नाथ स्वामी द्यावे सदैव मजला दर्शन ॥८॥

 *

शुचिर्भूत श्रद्धा पठण करता पवित्र जगन्नाथाष्टक

विशुद्धात्मा विष्णुलोकी विलीन होउन नाश सर्वपातक ॥९॥

*

☆ ॥ इति श्रीमत् शंकराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित जगन्नाथाष्टक संपूर्ण ॥ ☆

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वारी ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ वारी ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

वारी म्हटली की शब्द आठवतो दिंडी. दिंडी म्हणजे माउली आणि तुकोबांच्या पालखी सोबत वारी करणारी असंख्य मंडळी आणि व्यावहारिक भाषेत बोलायचे झाल्यास वारकऱ्यांच्या विविध तुकड्या. शाळेतील वर्गाला कशा तुकड्या असतात अगदी तसेच… !!

वारीचा हेतू काय, तर परब्रह्म पांडुरंगाची गळाभेट घेणे, त्याला डोळे भरून पाहणे…

वारी अनेक शतके अव्याहत चालू आहे…. ! जगात अनेक उलथापालथी झाल्या, राजेशाही गेली, लोकशाही आली, पारतंत्र्य गेले, स्वातंत्र्य आले आणि अशा अनेक गोष्टी सांगता येतील….

पण वारी अव्याहत चालू….

वारीचा एक अर्थ असा घेता येईल की वारी म्हणजे प्रवास.

हा प्रवास मात्र थोडा वेगळा आहे. माउली, तुकोबांसारख्या महान संताच्या संगतीत पांडुरंग परमात्म्याची भेट होण्यासाठी प्रवास करायचा…. ! प्रवास आला की पूर्वतयारी आली. परदेशांत जायचे असल्यास लोकं किमान सहा महीने आधीपासून तयारी करतात. मग पांडुरंगाची भेट व्हायला हवी असेल तर तयारी किती करावी लागेल…. ?

इथे एक काम सोपे आहे. विठुमाउली आपल्या अन्य भक्तांकरवी प्रत्येकाच्या पोटाची व्यवस्था करीत असते. मनुष्याला फक्त मनाची तयारी करता आली तर उत्तम. ज्याला ती करता येते तो वारीत असतोच. कधी मनाने तर कधी देहाने….

आषाढी/कार्तिकी/ माघी वारी करता आली तर उत्तमच. पण दैनंदिन वारी करता आली तर…

आता ही वारी कशी करायची?

दिवस उजाडला की वारी सुरू आणि दिवस मावळला की वारी समाप्त. पहाटे उठलं की आपल्या आईशी बोलतो तसे विठुमाउलीशी बोलावे. तिच्यासमोर निवेदन करावे, माउली आज दिवसभरात जे जे माझ्या हातून घडेल ते ते तुझी वारी घडावी म्हणून करीत आहे. तूच माझ्याकडून योग्य ते करवून घे. प्रत्येक गोष्ट विठुमाउलीला सांगून करावी आणि झोपताना, दिवस सरताना दिवसभरातील सर्व बरीवाईट कर्मे माउलींच्या चरणी समर्पित करावीत. आणि निश्चिंत मनाने निद्राधीन व्हावे.

ही वारी भगवंताला नक्की आवडेल….!

आपण प्रयोग करून पाहू.

|| जय जय राम कृष्ण हरि ||

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गांधारी – लेख क्र. ३☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गांधारी – लेख क्र. ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

मी गांधारी ! गांधार देशाचा राजा, सुबल याची कन्या! बालपणापासून मी शिवभक्त होते. सौंदर्य आणि शालीनता यांचा सुरेख संगम माझ्यात आहे असे सारे म्हणायचे. म्हणायचे, राजाला काहीच काळजी नाही, एखादा सुशील, सुकुमार, राजकुमार येऊन तिला घेऊन जाईल. राग, द्वेष, मत्सर, भेदभाव या गोष्टी कधी माझ्या मनाला शिवल्याच नाहीत. जे योग्य आहे, सत्य आहे, मानवतेचा सन्मान करणारे आहे, त्याच गोष्टी रुचल्या.

पितामह भीष्म यांनी दूताकारवी हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्र, यांच्यासाठी आमचा हात मागितला. पिताश्री खुश झाले. कारण गांधार देश लहान पण समृद्ध होता. त्यामुळे सतत आक्रमणांना तोंड द्यावे लागे. जर ही सोयरीक झाली तर आपलं बळ वाढेल. कोणी आक्रमण करण्याचे धाडस करणार नाही. पण धृतराष्ट्र अंध आहेत हे ऐकल्यावर मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. काय करावं, अशा द्विधा मनस्थितीत ते होते. इतकी चांगली सोयरीक तोडायची हेही अवघड होतं. पिताश्रींची अडचण माझ्या लक्षात आली. मी म्हणाले, “तुम्ही एखादा पराक्रमी राजकुमार पाहिला असता आणि उद्या युद्धात तो अपंग झाला असता तर ? राज घराण्यातील स्त्रियांना कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. माझी ती आहे. तुम्ही मनात कोणताही किंतू न आणता, विवाह निश्चित करावा असं मला वाटतं. ” पिताश्रींना गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि विवाह झाला पण एक निश्चय मी मनाशी पक्का केला होता जे सुख माझ्या पतीला मिळत नाही ते सुख मी घेणार नाही. त्यांचं दुःख ते माझं दुःख असेल. आणि मी डोळ्यावर आजन्म पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. एका पतिव्रतेचे हेच तर कर्तव्य असते ना! मग त्यात वैषम्य वाटण्याचं कारण काय?

मला शंकराकडून मिळालेल्या वरानुसार शंभर मुलगे झाले. शंभर मुलांचा जन्म, त्यांची निगराणी यात दिवस कसे जात होते कळत नव्हतं. राजमहालाच्या शिस्तीप्रमाणे मुलांना युद्ध कलेचे, राज्य कारभाराचे धडे मिळत होते. राजा पंडूच्या मृत्यूनंतर राणी कुंती आपल्या पाच मुलांना घेऊन हस्तिनापूरला आली आणि त्या‌‌ मुलांनाही युद्ध कलेचे धडे सुरू झाले. त्या मुलांचं येणं आमच्या मुलांना खटकलं. त्यांचा शूरपणा, कौशल्य पाहून त्यांच्याबद्दल प्रेम वाटण्याऐवजी असूया निर्माण झाली. त्या मुलांना त्रास द्यायला दुर्योधन, दुःशासन यांच्या खोड्या सुरू झाल्या. आम्ही रोज सगळ्यांना एकत्र बसवून नीतिमत्तेचे धडे देत होतो. चांगल्या वर्तणुकीच्या गोष्टी सांगत होतो. पण त्याचा काही उपयोग होतांना दिसत नव्हता. मुलं जशी मोठी होत होती तसा मत्सर वाढतच चालला. त्यातच उद्या हे पांडव, ऐश्वर्याचे वाटेकरी होणार हे नक्की होतं. त्यामुळे तर राजा धृतराष्ट्र, भाऊ शकूनी यांनी या द्वेशात भर टाकायला सुरुवात केली. मुलं कुठे चुकतात हे बघून दुरुस्ती करायची सोडून ती कशी बरोबर आहेत हेच मला पटवायला सुरुवात केली.

सर्वांचे पांडव नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. रोज एक एक गोष्टी ऐकून माझ्या काळजाला घरे पडत होती. जे चालले आहे हे चांगलं नाही कुठेतरी थांबलं पाहिजे. याने काही चांगलं घडणार नाही. ही सर्वनाशाची नांदी आहे, हे कळत होतं. सगळ्यांना हे सांगून सांगून आम्ही दमलो. धृतराष्ट्र स्वतः अंध असल्याने त्यांच्या मनात प्रथम पासूनच आपण ज्येष्ठ असून राजा होऊ शकत नाही त्यामुळे पंडू राजांवर राग होताच. शकुनी नवे नवे डाव रचण्यात मातब्बर होता. त्याचे डाव सफल करण्यासाठी आमची प्रजा होतीच. मत्सर हा असा रोग आहे की तो कधीच कमी होत नाही. काळा बरोबर वाढत जातो. वैषम्य या गोष्टीचं वाटत होतं की, मी ना धृतराष्ट्रांचं, ना शकुनीचं, ना आमच्या मुलांचं मतपरिवर्तन करू शकले. आई म्हणून मुलांना चांगले विचार देण्यास असमर्थ ठरले. पांडवांच्या चारित्र्यवान, सत्शील, सदाचारी वर्तणुकी पाहिल्या की कुंतीचं कौतुक वाटायचं. आणि आपलं कांहीतरी चुकतंय, या गोष्टीची खंत वाटायची. आम्ही शिवाला साकडं घातलं तरी ते ही प्रसन्न झाले नाहीत. सगळ्या गोष्टी बिघडतच गेल्या. युद्धाची ठिणगी पडली. मुलांना वाटत होतं, भीष्म पितामहांपासून सगळे आपल्या बाजूने लढणार आहेत. तर पांडव व त्यांच्या तोकड्या सैन्याचा पराभव करणे फारच सोपं आहे. युद्ध टाळायचे आम्ही खूप प्रयत्न केले कारण कोणीही हरलं तरी नाश हा कुरुवंशाचाच होणार होता. हीच शक्ती राज्याचा विस्तार करण्यासाठी, काही विधायक कामासाठी खर्ची पडली असती तर! 

युद्धाला जाण्यापूर्वी नमस्कार करण्यासाठी पांडव आले. आशीर्वाद देताना ‘यशस्वी व्हा’ म्हणायला जीभ धजावली नाही, ‘पराजित व्हा ‘असं म्हणणं मनातही येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही ‘सत्याचाच विजय होवो’ असाच आशीर्वाद देऊ शकलो. युद्धात रोज कुणीतरी धारातीर्थी पडल्याच्या बातम्या येत होत्या. युद्धावर न गेलेले आम्ही सर्व रोज एक मरण मरत होतो. युद्ध संपलं. जी भीती होती तेच झालं. डोळ्यावर पट्टी असून सुद्धा आम्हाला रणांगणावर पडलेला शवांचा खच दिसायचा. त्यांच्या विधवा, त्यांची मुले यांचा आक्रोश ऐकू यायचा. सगळ्या जाणिवाच बधिर झाल्या होत्या. डोकं सुन्न झालं होतं. दुष्टपणा इतक्या पराकोटीला पोहोचला होता की नवजात अर्भकांचीही त्यातून सुटका झाली नाही. आता डोळ्यातून बाहेर पडायला अश्रुही शिल्लक नव्हते. अन्न पाणी तोंडात घेण्याची इच्छा होत नव्हती. जेव्हा कृष्ण व पांडव समोर आले त्यावेळी माझ्या मनात पांडवांबद्दल खरं म्हणजे खूप राग होता. कारण युद्धाचे नियम मोडून त्यांनी सर्व तुल्यबळ योद्ध्यांचे वध केले होते. पण शेवटी असं वाटलं की युद्ध करायला तर आपणच भाग पाडले आणि नियमबाह्य कृत्य करायला कृष्णाने सांगितले. त्यामुळे पांडवांना दोष देण्यात काय अर्थ?कृष्ण मात्र हे युद्ध टाळू शकले असते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा राग मात्र मी रोधू शकले नाही आणि त्यांना शाप दिला. “जसं भावा-भावात युद्ध घडवून कुरुवंशाचा संहार केलात, तसंच तुमचे यादव ही परस्परात भांडून नष्ट होतील. ” माझ्या, एका सर्वस्व गमावलेल्या मातेच्या, शापात तेवढं बळ होतं की तो खरा ठरेल.

शेवटी आम्ही तिघांनी, मी, धृतराष्ट्र राजे, कुंती, वानप्रस्थाश्रम घेऊन वनात जायचं ठरवलं आणि कांहीं दिवसांतच आम्हाला दावानलाने घेरलं, आमची राख झाली. जे जे आम्ही भोगलं ती आमच्या पापांची फळं असतील तर, हे सदाशिवा!आम्हाला यापेक्षाही वाईट मरण दिलं असतंस तरी चाललं असतं पण आता पुढच्या जन्मी भोगण्यासाठी काही शिल्लक ठेवू नकोस.

माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्ही देऊ शकाल कां? मुलांचे माता पिता म्हणून आम्हीच या संहाराला जबाबदार आहोत कां हो? मी आई म्हणून पूर्ण हरले आहे कां? मुलांना काही चांगल्या गोष्टी सांगणे त्यांचे मन वळवणे एवढंच असतं ना आपल्या हातात? मी माझं कर्तव्य करण्यात कमी पडले कां? कां माझं काहीच संचित नव्हतं, कि हा संहार थांबू शकेल? की डोळ्यावर पट्टी बांधण्याचा माझा निर्णय चुकला होता? सगळ्या प्रश्नांचा भुंगा मेंदू पोखरतोय. कशाचीच उत्तरे सापडत नाहीत!!

मी हरले, पूर्ण हरले!

☆

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राहून गेलला अंतराळ-स्पर्श !… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ राहून गेलला अंतराळ-स्पर्श ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री रविश मल्होत्रा

तो अगदी त्याच्यासारखा. दोघांत फरकच करायचा झाल्यास तसा तो करताही आला असता, किंबहुना केला सुद्धा गेला. पण हे दोघेही एकमेकांना पर्याय होते, याचाच अर्थ दोघांत काडीचाही फरक नव्हता. पण लाखांत एक असणे वेगळे आणि लाखांत पहिले असणे वेगळे.

लढाऊ विमाने जमिनीपासून जास्तीत जास्त साठ हजार फुटांपर्यंत वर जाऊ शकतात. SR-71 black bird नावाच्या air craft ने चक्क ऐशी हजार फुटांचा टप्पा गाठल्याचे बोलले जाते. काहीवेळा तर प्रयोग म्हणून नव्वद हजारांपर्यंतही उंची गाठली गेल्याचे समजते. इथून अंतराळ केवळ एक हजार फुटावर म्हणजे जमिनीपासून साधारण शंभर किलोमीटर्सवर सुरु होते.

पण लढाऊ विमानांचे ध्येय इतक्या उंचीवर जाण्याचे नसतेच. त्यामुळे हे दोघेही त्यांना उपलब्ध असलेल्या विमानांच्या क्षमतेच्या अत्युच्च पातळीपर्यंत निश्चित जाऊन यायचे… विमानांच्या चाचण्या घेणे, हे त्यांच्या कामाचा एक भाग होता.

पण एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून भारतीय वैमानिकांना अंतराळात जाण्याची संधी समोर येऊन उभी ठाकली. हजारो वैमानिकांमधून या दोघांची निवड झाली… आणि आधी भारतात आणि पुढे परदेशात या दोघांचे अतिशय आव्हानात्मक प्रशिक्षण सुरु झाले! दोघांपैकी कुणा एकालाच भारताचा पहिला अंतरालावीर होण्याचा बहुमान प्राप्त होऊ घातला होता. दोघांनाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सज्ज राहणे अपरिहार्य होते…. अगदी अंतराळात प्रत्यक्ष झेप घेण्याच्या काही तास आधीपर्यंत! अर्थात दोघांत स्पर्धा होतीच. पण स्पर्धा या शब्दाचा खरा अर्थ एकत्रित प्रयत्न करीत पुढे जाणे, असा आहे. दुस-याला मागे ढकलून स्वत: पुढे जाणे नव्हे.

 दुस-यालाही पुढे घेऊन जात जात ध्येयाच्या दिशेने प्रामणिक प्रयत्न करीत राहणारा एक माणूस चाळीस वर्षांपूर्वी भारताने अनुभवला…. रविश मल्होत्रा! स्पर्धा या शब्दाचा आताचा अर्थ दुस-याच्या पुढे जाणे, असा आहे. पण खरे तर 

एकत्रित प्रयत्न करणे याला स्पर्धा म्हणतात. असो.

दुस-यालाही पुढे घेऊन जात जात ध्येयाच्या दिशेने प्रामणिक प्रयत्न करीत राहणारा एक माणूस चाळीस वर्षांपूर्वी भारताने अनुभवला…. रविश मल्होत्रा! ३ एप्रिल, १९८४ रोजी राकेश शर्मा साहेब रशियाच्या Soyuz T-11 मधून बैकानूर येथून बहुदा भल्या सकाळी अंतराळात झेपावले.

आणि ‘मल्लू’ अर्थात रविश मल्होत्रा साहेब मागे राहिले! स्पर्धेत दुस-या क्रमांकावर राहणे विजेत्यांच्या मनातही नसते. परंतु भारतीय अंतराळ कार्यक्रम ही काही धावण्याची स्पर्धा नव्हती. आणि हाच विचार राकेश शर्मा साहेब आणि रविश मल्होत्रा साहेबांच्या मनात पक्का रुजलेला होता…. कुणीतरी एकच अंतराळात जाऊ शकला नसता… पण जर एकच अंतराळवीर निवडला गेला असता आणि त्यालाच ऐनवेळी काही झाले असते तर? सर्व योजना कोसळून पडली असती… आणि भारताची संधी गमावली गेली असती! रविश मल्होत्रा साहेबांचे हृदय पहिल्या क्षणाला गांगरून गेले असेलच, निराश झाले असेलच. पण सैनिकाचे हृदय त्यांचे. दुस-याच क्षणी त्यांनी नैराश्य झटकले… आणि केवळ राकेश शर्मा यांच्या सकुशल प्रवासासाठी ते प्रार्थना करू लागले… ! पुढे घडला तो इतिहास. पण रविश मल्होत्रा साहेबांसारख्या मोठ्या मनाच्या माणसामुळे हा देश सारे जहां से अच्छा आहे… हेही तेव्हढेच खरे.

 आज पंचाहत्तर-शहात्तर वर्षांचे असलेले रविशजी अगदी फीट आहेत. रोज तासभर नियमित आणि माजी सैनिकाला साजेसा व्यायाम करतात… आठवड्यात पस्तीस किलोमीटर्स चालतात.. रशियात लागलेली सवय आजही कायम आहे!

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहराच्या जरा बाहेर वसवल्या गेलेल्या star city मध्ये शर्मा आणि मल्होत्रा या आडनावांच्या, केवळ नशिबाने एकत्र आलेल्या दोन पंजाबी तरुणांचे प्रशिक्षण सुरु होते… हा तळ त्यावेळच्या रशिया-अमेरिका शीतयुद्धाच्या काळात अतिगुप्त ठेवण्यात आला होता… अर्थात रशिया याबाबतीत तेथील हवामानासारखाच अतिशीत होता.

दोन एप्रिल, १९८४. तिकडे दुपारचा एक वाजून आठ मिनिटे झालीत… यान काहीच क्षणांत झेप घेणार आहे! आणि तसेच झाले! 

२५ डिसेंबर, १९४३ रोजी जन्मलेले रविशजी यांचे पालक मूळचे लाहोरचे रहिवासी. पण रविशजी यांच्या जन्मानंतर केवळ चारच वर्षांत त्यांना भारतात यावे लागले, भावाच्या आधारावर राहावे लागले. पुढे ते व्यवसायानिमित्त कोलकात्यामध्ये स्थिरावले. रविशजी राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एन. डी. ए. पुणे येथे निवडले गेले. त्यांना त्यांच्या इतर भावांप्रमाणे नौसेनेमध्ये जायचे होते.. पण नशिबाने धाडले वायुसेनेत. १९६३ मध्ये ते “Vampire Squadron” मध्ये commissioned झाले. विविध लढाऊ विमाने उडवनायाचा अनुभव गाठीशी असलेल्या रविशजी यांनी १९७१च्या भारत-पाक युद्धात दिमाखदार कामगिरी बजावली. त्यांनी सुखोई सारखी अत्याधुनिक विमाने उडवली… एकूण १७ यशस्वी उड्डाणे घेऊन शत्रूवर हल्ले चढवले… कित्येकवेळा त्यांचे विमान शत्रूच्या हल्ल्यात सापडले सुद्धा… पण ते परतले. विंग कमांडर दिलीपजी परुळकर यांच्यासोबत यांनी काम केले. परुळकर साहेब पाकिस्तानच्या कैदेत वर्षभर होते… पुढे ते निसटलेसुद्धा होते.. आणि पुन्हा पकडले सुद्धा गेले होते! 

रविशजी पुढे रशिया भारत संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी निवडले गेले… शंभर कोटी भारतीयांमधल्या निवडक लोकांमधील एक असणे म्हणजे काय, हे त्यांनी अनुभवले. अंतराळ शिक्षणाचे भाषा माध्यम अर्थातच रशियन होते… ही भाषा त्यांनी आणि राकेश शर्मा यांनी आत्मसात करून घेतली. सबकुछ रशियन… कुणीही इंग्रजीचा एक शब्द जाणत नव्हते.. किंवा उच्चारत नव्हते. सिम्युलेटर अर्थात छद्म वातावरणात, परिस्थितीमध्ये प्रशिक्षण सुरु होते. अंतराळात असते तसे वातावरण इथे तयार केले गेले, अनेक सराव केले गेले… त्यामुळे प्रत्यक्षात अंतराळ स्थानकात काहीही समस्या आली नाही.

राकेशजी आणि रविशजी बंगळूर मध्ये एकमेकांचे सहकारी होते काही दिवस, पण रशियात ते आणखी जवळ आले… राकेश रिकी बनले तर मल्होत्रा मल्लू.

पुढे रविशजी भारतीय हवाई दलात त्यांच्या आधीच्या लढाऊ वैमानिक कामगिरीवर रुजू झाले. पण त्यांची अंतराळात जाण्याची इच्छा अजूनही आहे. रशियाने त्यांना १९८४ मध्ये order of friendship बहाल केली. तर भारताने त्यांना १९८५ मध्ये कीर्ती चक्र प्रदान केले!

यशापेक्षा यशासाठी केलेल्या प्रयत्नांना खरे तर जास्त महत्त्व असते. पण दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असते. अगदी मन:पूर्वक प्रचंड मेहनत घेऊन, प्रचंड सराव करून शेवटी नकाराला मोठ्या धैर्याने सामोरे जाण्या-या श्री. रविश मल्होत्रा यांना सलाम! त्यांची शेवटच्या क्षणी निवड झाली नाही, म्हणून तमाम भारतीय हळहळले होतेच. १९८४ मध्ये पी. टी. उषा सेकंदाचा शंभरावा भाग मागे राहिली लॉस एन्जेलिस ऑलिम्पिक्स च्या ४०० मीटर्स अडथळा शर्यतीतील कांस्य पदकापासून… पण तिची मेहनत सर्वांच्या मनात भरली. रविश मल्होत्रा साहेब आणि उषा यांची तुलना नाही… पण दोघांनीही अपयश स्वीकारले.. आणि पुढे वाट चालत राहिले! अंतराळापर्यंत हात पोहोचवण्याची हिंमत तर दाखवलीच… स्पर्श होणे न होणे… हा नशिबाचा भाग.

आपले अंतराळ वीर शुभांशु शुक्ल येत्या काही दिवसांत अंतराळात भरारी घेतील.. त्यांच्यापुढे रविशजी सारख्या मोठ्या दिलाच्या माणसांचा आदर्श असेलच…. खूप खूप शुभेच्छा… जय हिंद. !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ९ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ९  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषूदासीनता च ॥ ९ ॥

 अर्थ : आणि (निरोध म्हणजे) त्या भगवंताचे ठिकाणी अनन्यता आणि त्याच्या प्रतिकूल विषयाचे ठिकाणी उदासीनता ठेवणे.

 विवेचन: अनन्यता आणि उदासिनता या दोन शब्दाची योजना नारद महाराजांनी इथे केली आहे. एक शब्द नकारात्मक म्हणता येईल तर दुसरा सकारात्मक.

 भक्त भगवतांना असे म्हणतो की मला तुझ्याशिवाय अन्य कोणी नाही. एक तूच माझा आहेस, बाकी इथे कोणीही माझे नाही. ज्याप्रमाणे पतिव्रतेला फक्त आणि फक्त आपला नवरा पुरुष वाटतो आणि बाकीचे पुरुष तिला तिची लेकरे वाटतात, तशी *मनोभूमिका साधकाची असावी. इथे आपल्या इतिहासातील एक छान प्रसंग आठवतो. अनुसया मातेच्या कुटीत त्रिदेव भिक्षा मागायला जातात आणि थोडीशी विचित्र अट (निवस्त्र होऊन) 

ठेवून तिला भिक्षा वाढायला सांगतात. (अनुसया म्हणजे जिने असुयेवर विजय मिळविला आहे.) माता अनुसयेला फक्त आपले पती ऋषी अत्रि हेच पुरुष वाटत असतात आणि अन्य सर्व तिची बालके. तिची श्रद्धा आणि उपासना इतकी उच्चकोटीची असते की या त्रिदेवांना तान्हुले व्हावं लागते आणि मग माता त्यांना आपले अमृतमय स्तन्य पाजते…. !*

– – मला या प्रसंगात माता अनुसयेची अनन्य भक्तीचे दर्शन घडते… ! 

 मनुष्याचे मन फार चंचल आहे. त्याला जिकडे जाऊ नको म्हणून आपण सांगू, नेमके ते तिकडेच धाव घेते….. !

संत तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव पुढील अभंगात मांडतात… 

 सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥

म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु. ॥

काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चिंत्ता उपजतें ॥२॥

तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार ठाकीं ॥३॥

अर्थ: माझ्या मनाला मी चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते काही माझे ऐकत नाही या उलट हे चांडाळ मन माझ्या घाता वर टपलेले आहे. म्हणून मी या संसार डोहामध्ये तरेल की बुडेल हेच पाहत आहे कारण मनावर मी ताबा ठेवू शकेल एवढे तरी बळ अजून माझ्यात नाही. मी माझे पूर्व संचित पाहतो तर ते मला काही कळत नाही आणि विद्या ग्रहण करावे म्हटले तर माझी बुद्धी मंद आहे त्यामुळे या संसार डोहातून मी कसा तरुन जाईल याविषयी चिंता माझ्या मनामध्ये उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंगी असे बळ नाही की मी वेगाने हा संसार डोह पार करून तुझ्या ठिकाणी येऊन पोहोचेल

(संदर्भ: अभंग क्रमांक. १८४२, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

ज्या गोष्टी साधकाला, मनुष्याला मोहात पाडतात किंवा चित्त विचलित होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्याविषयी साधकाने उदासीन असावे असे नारद महाराज आपल्याला या सूत्रात सांगत आहेत.

भागवतांच्या सेवेत विघ्न आणणारे प्रत्येक वेळी बाहेरील लोकं असतात असे नाही तर आपल्या कुटुंबातील देखील असतात. आणि प्रामुख्याने आपणच आपले शत्रू असतो. आधी आपला आपल्यालाच विरोध असतो, मग आपल्या कुटुंबातील लोक आपल्याला विरोध करतात अशी आपण तक्रार करीत असतो.

काही उदा. पाहू.

रामायण आपल्याला सर्वांना माहित आहे. भरताने रामापासून दूर जावे म्हणून कैकयीने अनेक प्रयत्न करून पाहिले. थोडक्यात भरताला त्याच्या राम सेवेत त्यांच्या आईचा अडथळा होता, भरताने आईचा त्याग केला नाही तर तो तिच्या बाबतीत उदासीन राहिला.

संत तुकाराम महाराजांची पत्नी थोडी खाष्ट होती, पण त्यांनी आपल्या साधनेत काही खंड पडू दिला नाही. ते तिच्या बाबतीत उदासीन राहिले. जीवनाच्या अखेरच्या क्षणी वैकुंठाला जाताना, तिला येतेस का असे विचारायलाही विसरले नाहीत… !!

मानवी जीवनाला अनेक कंगोरे आहेत. मानवी जीवन दिसते तितके सरळ नाही. त्यामुळे व्यक्ती परत्वे प्रत्येकाच्या आयुष्यात नानाविध घटना घडत असतात, घडत असतील. अशावेळी साधकाने आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय (भगवतांची प्राप्ती) कायम लक्षात ठेवून तात्कालिक लाभहानीचा विचार न करता आपली साधना जोमाने सुरू ठेवावी. राम कृपा केल्याशिवाय रहाणार नाही असे सर्व संत सांगतात

– – आपण प्रयत्न करून पाहू. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ९ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares