मराठी साहित्य – विविधा ☆ शक्ती आणि भक्ती… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ शक्ती आणि भक्ती… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

नवरात्रोत्सवास सुरूवात होत आहे. गेले पाच सहा दिवस दोन विषयांवरील चर्चा सर्व ठिकाणी ऐकायला मिळतात. एक म्हणजे साड्यांचे नऊ दिवसांचे नऊ रंग आणि रात्री उशिरा पर्यंत चालणारा दांडिया. अनेक ठिकाणी स्त्रीयांचा उत्साह फक्त यांतच दिसून येतो किंबहुना फक्त त्यासाठीच नवरात्र असावे अशी भूमिका घेतली जाते. आपल्या संस्कृतीतील उत्सवामागील इतिहास, हेतू या गोष्टी पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

एक आख्यायिका अशी आहे की, महिषासूर राक्षसाने “तुझा फक्त स्त्री कडूनच वध होईल “ हा वर मिळवला होता. देवांना त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. युद्ध करून नि: शस्त्र केले. देवांनी यांवर उपाय म्हणून स्वतः च्या शक्तीतून देवी दुर्गा निर्माण केली. देवी दुर्गेने नऊ दिवस नऊ रात्री युद्ध करून महिषासुराचा नवव्या दिवशी वध केला. म्हणून या नवरात्राला शक्तिचे नवरात्र म्हणतात. देवांची शक्ती म्हणजेच सरस्वतीची पूजा म्हणून त्याचे नाव शारदीय नवरात्र हे आहे.

दुसरी आख्यायिका रामायणातील आहे. रामाने रावणावर विजय मिळविण्यासाठी चंडी मातेची पूजा केली होती. नऊ दिवस त्याने नवरात्र केले. दहाव्या दिवशी रावणवध केला. रामाने भक्ती केली म्हणून या नवरात्राला भक्तीचे नवरात्र म्हणतात. म्हणजे हे नवरात्र शक्ती आणि भक्तीचे द्योतक आहे.

नवरात्रात देवीची नऊ दिवस नऊ रूपांत पूजा केली जाते.

१. शैलपुत्री – पर्वत स्वरूप आहे. म्हणजे मानसिक दृष्ट्या पर्वताप्रमाणे सहनशील रहा म्हणजे स्थिरता येईल असा संदेश देते.

२. ब्रम्हचारिणी – संयम, तप, आत्मअनुशासन हे गुणधर्म आहेत. योग्य आहार, झोप, व्यायाम यांतून वरील गोष्टी आत्मसात करा असा संदेश देते.

३. चंद्रघंटा – शांती आणि धैर्य, आत्मविश्वास हे गुणधर्म आहेत. चंद्राची लयबद्धता व घंटेचा नाद यांतून निर्माण होणारी सकारात्मकता मस्तिष्क तरंग निर्माण करते आणि शांती प्राप्त होते. न्युरोसायन्सशी निगडीत हा संदेश आहे.

४. कुष्मांडा – सृजनात्मक ऊर्जा आणि नवप्रवर्तन हे गुणधर्म आहेत. मस्तिष्कामधील जैविक घटकाचा संबंध सृजनात्मक घटकांशी व्हावा आणि नवनिर्मिती व्हावी. यासाठी उर्जा मिळावी म्हणून या रूपाची पूजा करतात.

५. स्कंदमाता – मातृत्व, करूणा, संरक्षण हे गुणधर्म आहेत. मातृत्वानंतर प्रसवणारे हार्मोन्स, सामाजिक बांधिलकीसाठी निर्माण होणारा ऑक्सिटोसिन हार्मोन्स या जैव घटकांचे संतुलन रहावे म्हणून या रूपाची पूजा करतात.

६. कात्यायनी – धर्म रक्षण, न्याय आणि सक्रियता हे गुणधर्म आहेत. सामाजिक न्याय व्यवस्था व समाजाची आर्थिक स्थैर्यता यांसाठी लागणारे सामाजिक व आर्थिक वर्तन यांचे व्यक्तिमत्वे संतुलन रहावे म्हणून या रूपाची पूजा करतात.

७. कालरात्री – अंधाराचा नाश आणि भयमुक्ती हे गुणधर्म आहेत. प्रकाशावर आधारित असलेल्या उपाय योजना कराव्यात मग त्या शारीरिक, मानसिक कोणत्याही असतील त्यातून उत्साह निर्माण होतो व भयनाश होतो म्हणून या रूपाची पूजा करतात.

८. महागौरी – नैतिकता, शांती हे गुणधर्म आहेत. सार्वजनिक स्वास्थ्य, स्वच्छता, आरोग्य, सामुहिक नैतिकता पाळाव्यात असा संदेश ही देवी देते.

९. सिद्धिदात्री – सिद्धी, पूर्णता आणि आत्मसाक्षात्कार हे गुणधर्म आहेत. शिक्षण, विज्ञान, कला आणि धर्म यांचा सुवर्णसंगम साधावा. यांची साधना केल्यास शांती मिळते. सामाजिक उन्नती होते व पर्यायाने विकास होतो म्हणून या रूपाची पूजा करतात.

घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रात देवीला सालंकृत सजवून, घटाची पूजा करून त्या भोवती मातीत बीया रूजविल्या जातात. नऊ दिवस पिकाची काळजी घेऊन वाढवितात. भारत शेतीप्रधान देश आहे. पिकांची सुबत्ता यावी. बळीराजाची कृपा व्हावी. सुगीचा हंगाम सुरू होणार असतो म्हणून प्रार्थना केली जाते. नवरात्रात उपवास करतात. या उपवासामुळे शरीर चांगले रहाण्यास मदत होते. त्याचबरोबर आत्मसंयमनही शिकता येते. हिंदूधर्मातील या परंपरांच्या मागचे अर्थ नीट समजावून घेतले पाहिजेत. त्याकडे फारसे लक्ष न जाता मेसेजेसचा वर्षाव करण्यावरच जास्त भर दिसतो. रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्या दांडियांमुळे अनैतिकता, चोरी, मारामारी या सारखे प्रकार शहरांमधून वाढलेले दिसून पण येतात. पोशाख, मेक अप यांकडेच जास्त लक्ष दिले जाते.

नवरात्रातील परंपरा आपल्याला स्त्री शक्ती कडे आदराने, मांगल्याने पहायला शिकवितात. स्त्रीयांची तेजस्विता ही सौंदर्यात कमी आणि पवित्रता, मातृत्व आणि क्षमता, सामर्थ्य आणि सहनशीलता यांत आहे. पुढील पिढीतील मुलींना यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी संस्कृतीचे भान राखून देवीचा आशीर्वाद घेऊन शक्ती भक्ती चा संगम घडवूया.

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ नवरात्र… ☆ सौ शालिनी जोशी

अश्विन – नवरात्र हे हिंदू धर्मातील देवीशी संबंधित असे व्रत आहे. ही आराधना प्रामुख्याने वर्षातून दोन वेळा केली जाते. १) वासंतिक नवरात्र– चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमीपर्यंत, वसंत ऋतूच्या सुरुवातीला. २)शारदीय नवरात्र –अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत, शरद ऋतुच्या सुरुवातीला. इतरही नवरात्र आहेत उदाहरणार्थ नरसिंहाचे, शाकंबरीचे इ. यातील शारदीय नवरात्र जास्त प्रचलित आहे.

गणपती संपले की नवरात्राच्या तयारीला सुरुवात होते. यावेळी पावसाळा संपून पिके तयार झालेली असतात. पहिले पीक घरात आलेले असते. म्हणून हा कृषीविषयक लोकोत्सव म्हणजे निसर्गोत्सव किंवा सूर्जनाचे पूजन, निर्मिती शक्तीची उपासना. हा नऊ दिवसांचा उत्सव. येथे नऊ या संख्येचा निर्मिती शक्तीशी संबंध आहे. जमिनीत धान्य रुजत घातल्यावर नऊ दिवसांनी उगवते. गर्भधारणा झाल्यावर नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. म्हणून या दिवशी नऊ धान्यांची घटात माती घालून पेरणी करतात किंवा पत्रावळीवर माती पसरून त्यात नऊ धान्ये पेरतात. मध्ये घटावर कुलदेवतेची किंवा कुलदेवाची प्रतिमा ठेवतात. त्याची पूजा करतात. काही लोकांकडे फक्त कुलदेवतेच्या किंवा कुलदेवाच्या प्रतिमेची पूजा करतात. फुलांची माळ देवावर बांधतात. अखंड नऊ दिवस नंदादीप लावतात. नऊ दिवसानंतर उगवलेले शेत देवाला वाहतात. असा हा सृष्टीतील परिवर्तन शक्तीचा खेळ. धनधान्य, सुख, संपत्ती देणारा, आरोग्यवर्धन करून समाधान देणारा हा उत्सव.

या उत्सवाला दुसरेही एक अंग आहे. महिषासुरांच्या व इतर राक्षसांच्या त्रासाने प्रजा त्रस्त झाली होती. तेव्हा सर्व देवांचे तेज एकवटून एक शक्ती निर्माण झाली. तिने आपल्या पराक्रमाने महिषासुराचा वध केला. हे युद्ध नऊ दिवस चालले. म्हणून त्या देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात आणि नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. तिच्या शक्ती रूपाची ही पूजा. वाघावर आरुढ झालेली, हातात खड्ग आदी शस्त्रे व धारण केलेली असे या देवीचे रूप. म्हणून म्हणतात ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिताl नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नमःll

या देवीचे रोज वेगवेगळे रूप कल्पून तिला वेगवेगळी नावे दिली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिधात्री अशी ही नऊ नावे. किंवा ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या या शक्ती म्हणून पहिले तीन दिवस सरस्वती, नंतर तीन दिवस महालक्ष्मी आणि नंतरचे तीन दिवस महांकालीचे असे हे म्हणतात.

एकंदरीत दुष्ट प्रवृत्ती बरोबर लढून समाजाला सुखी करणाऱ्या स्त्री शक्तीचा हा गौरव म्हणजेच नवरात्रोत्सव. ही शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण व्हावी ही यामागील भावना. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदीमायचे सगुण रूप म्हणजेच ही देवी. यावरून भारतीय संस्कृतीतील स्त्रीचे महत्व अधोरेखित होते. या काळात मंदिरातील देवीचे भक्ती केली जाते. तसेच घरात वावरणाऱ्या देवीकडे म्हणजे गृहिणीकडेही दुर्लक्ष करू नये. आर्थिक व्यवहाराचे शिक्षण घेऊन ती महालक्ष्मी होते. सरस्वती रूपाने ती सुशिक्षित झाली की मुलांवरती चांगले संस्कार करण्यास समर्थ होते. ती आरोग्य संपन्न होऊन स्वतःचे व घराचे संरक्षण करणारी महांकालीही होते. अशाप्रकारे नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीचा आदिशक्तीचा उत्सव, म्हणजेच स्त्री शक्तीचे सामर्थ्य ओळखून तिला चालना देण्याचा काळ. तिचा गौरव करून तिला प्रोत्साहन देण्याचा, ती शक्ती जागृत करण्याचा काळ.

हा उत्सव भारतभर साजरा केला जातो. पद्धत वेगळी असली तरी भाव एकच. संयम व उपासनेने शारीरिक व आत्मिक शुद्धी मिळवण्याचा हा काळ. म्हणून काही लोक नऊ दिवस उपवास करतात. तर काही धान्य फराळ करतात, जोगवा मागतात, देवीचा गोंधळ करतात. पंचमीला ललिता पंचमी व्रत करतात. अष्टमीला महालक्ष्मी व्रत करतात. कुमारी पूजन, ब्राह्मण व सवाष्ण भोजन करतात. होम हवन करतात.

नववा दिवस हा विशेष महत्त्वाचा याला खंडे नवमी म्हणतात. या दिवशी पांडवांनी शमीवृक्षात लपवलेले शस्त्रे बाहेर काढली. विराटाच्या वतीने कौरवांची लढून विजय मिळवला. म्हणून या दिवशी शस्त्र पूजन करतात. आता बदलत्या काळानुसार प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात लागणाऱ्या यंत्रांचे, अवजारांचे, पुस्तकांचे, वाहनांचे पूजन करतात.

आता गणपतीप्रमाणे नवरात्र उत्सवही सार्वजनिक स्वरूपात साजरा करतात. मनोविकार, पापवाचना, दुष्टबुद्धी या शत्रूंचा नाश होण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे या पवित्र भावनेतून हा सण साजरा व्हावा. 🙏.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मामाच पत्र हरवलं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मामाच पत्र हरवलं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

अगोदर काही गोष्टी छापूून आलेल्याच वाचाव्या लागत होत्या. आताही वाचतोच. पण आत्ताच्या गोष्टी या सहसा वेगवेगळ्या माध्यमातून पोस्ट केल्या आहेत अस म्हणतो. अशीच एक पोस्ट पोष्टाच्या पेटीबद्दल वाचली. अखेरचा हा तुला दंडवत….. असा मथळा होता.

०१ सप्टेंबर २०२५ पासून पोष्टाच्या पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पेटीबरोबरच काही गोष्टी आठवणींंच्या पेटीत (कदाचित कायमच्या) बंद होणार आहेत. या मुळेच अशाच एका (जवळपास बंंद होत जाणाऱ्या) गोष्टीची आठवण झाली.

शाळेत असतानाची आठवण. हो तेव्हा ती शाळाच होती. नंतर शाळेेचा के. जी., स्कूल व पुढे इंटरनॅशनल स्कूल असा प्रवास किंवा प्रगती झाली, हल्ली ग्रामपंचायत असलेल्या गावात इंटरनॅशनल स्कूल असते. पण माझी आठवण शहरातल्या शाळेतलीच आहे.

तेव्हा शाळेत खेळाच्या वेळेत एक खेळ खेळायचो. माझ्या मामाच पत्र हरवलं…. आम्हाला नाही सापडलं….. किंंवा शेवटी… ते आम्हाला सापडलं….. असा तो खेळ होता. या खेळात मामाच पत्र असा ऊल्लेख असला तरी प्रत्यक्षात एक रुमालच वापरला जायचा. पत्र तिथेही नव्हतच.

आता असं पत्र ज्या पेटीतून यायचं तीच पेटी बंद करायचं ठरलंय. त्यामुळे आधीच काळाच्या पडद्यामागे जाऊ लागलेला हा मामाच्या पत्राचा खेळ सुध्दा बंद होईल अस वाटतं. (कदाचित झालाही असेल.) कारण असं हरवणार पत्र येणार कशातून आणि मामा टाकणार कशात हाच प्रश्न आहे. आता कोणी म्हणेल कुरीयर आहे की. पण त्यामुळे खरा प्रश्न सुटणार नाही. कारण….. कारण पुढे समजेलच.

पण आता असा खेळ खेळायचा तास तरी कुठे शिल्लक आहे. असलाच तर तो पी. टी. चा तास असतो. आणि ज्या दिवशी असा तास असतो तो सहसा स्पोर्ट्स डे असतो. आणि त्यात असे पत्रांचे खेळ नसतात.

पत्राची पेटी बंद करण्याची वेळ आत्ता आली असली तरी याची कारणं बर्‍याच आधीपासूनच जाणवली नसली तरी हळूूहळू पुढे सरकत होती. कदाचित हि अतिशयोक्ती वाटेल पण त्यात तथ्य नाहीच असही नाही.

हल्ली बर्‍याचशा कुटुंबात एकच मुलगा किंवा मुलगी असते. जिथे एकच मुलगा आहे तिथे आत्या, किंंवा काका. आणि एकच मुलगी आहे तिथे मामा किंवा मावशी हे नातं येणार कुठून. सध्या कदाचित चुलत, मावस, आत्ये, मामे भाऊ बहीण असतीलही. पण पुढे… ती असतीलच का……

आणि मग मामाच नाही, तर मामाच पत्र येणार कुठून, आणि येणारच नसेल तर ते हरवेल कशाला….. आणि मामाच नाही, पत्रच नाही तर मामाच पत्र हरवलं हा खेळ तरी कसा राहील……

त्यामुळेच केवळ पोष्टाची पेटीच नाही, तर या पेटीत पडणारं पत्र, आणि काही नाती या सगळ्याच बाबतीत अखेरचा हा तुला दंडवत असं म्हणावं लागेल.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “व्हायरस आणि लस…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “व्हायरस आणि लस…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Inject HOPE in everyone’s life. ”

And you will get miraculous results. ••••

 

काल हे वाक्य वाचल. एकदम ‘ powerful. ‘

सद्य परिस्थितीला साजेसे.

आणि कुठे तरी वाचलेली एक गोष्ट आठवली. बहुतेक खरी असावी. •••••

 १९५० साली हार्वर्ड मधे शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. काही उंदीरांना त्यांनी पाण्यात टाकले, हे बघायला की ते किती वेळ पोहू शकतात ?? साधारण पंधरा मिनिटांनी उंदीरांची पोहण्याची शक्ति कमी झालेली बघून, त्यांना बाहेर काढलं, पुसले, थोड्या वेळ आराम करू दिला व नंतर पुन्हा एकदा त्यांना पाण्यात टाकले. ••••

आणि काय आश्चर्य !!!यावेळी उंदीर किती वेळ पोहले असावेत ??? वीस मिनिटे, तीस मिनिटे ???

 

” तब्बल ‘साठ तास ‘पोहू शकले “. ••••

 या प्रयोगातून निश्कर्ष हा काढला गेला की, जेंव्हा उंदीरांना हे कळलं की त्यांना वेळेवर वाचविल्या गेले. तेंव्हा त्यांच्यातील विश्वास वाढला. कोणीतरी पाठीशी आहे ही आशा जागृत झाली. व उंदीरांनी त्यांची maximum क्षमता पणाला लावली. त्यांना ही त्यांच्या या क्षमतेबददल कदाचित कल्पना नसावी. ••••

या प्रयोगातून एक प्रमूख गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, •••• Hope / आशा / विश्वास यांनी उंदिर सारख्या लहान जीवाला त्याच्या कल्पनेच्या बाहेर जाऊन काम करायची प्रेरणा मिळाली. त्यांची maximum क्षमता बाहेर आली. ••••

 हाच विश्वास, हीच आशा जर तुमच्या आमच्या मधे जागृत झाली तर रिझल्ट्स ‘अविश्वसनीय आश्चर्यकारक ‘असतील. ••••

 आईने मुलांच्या पाठी वर विश्वासाने, कौतुकाने ठेवलेला हात, जादुई असतो.

 डॉक्टर ने पेशंटला म्हंटलेले एक वाक्य, •••• ” तुम्ही नक्की बरे व्हाल, ” काळजी करूं नका. बोललेले हे शब्द, डोळ्यात दाखविलेला विश्वास, पेशंटमधे बरे होण्याची उम्मीद निर्माण करतो. •••

 आॅफिस मधे बॉसने आपल्या सहकाऱ्याला विचारलेले एक वाक्य, ••••

कसे आहात ?? घरी सर्व मजेत ना. कधी काही गरज लागली तर निःसंकोचपणे सांगा बरं. तुमचे काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. अभिमान आहे मला तुमचा ••••

 सहकाऱ्या बरोबर बोललेली ही चार वाक्ये त्याला जास्त इमानदारीने मन लावून काम करायची प्रेरणा देतात.. •••

 शिक्षकाने विद्यार्थ्यांमधे विश्वास दाखवून त्यांच्या कडून केलेली आशा. विद्यार्थी वर्गात पोझीटीव्ह उर्जा निर्माण करते. ••••

 सर!! तुम्ही मला म्हणाला, •••म्हणून मी करू शकलो. सर!! तुमच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही हे ठरवलं होतं मी. •••

 डॉक्टर च्या एका वाक्याने जादू होते, पेशंट प्रगती करतो. कधी कधी अशा ठिकाणी खोटे बोलले तरी चालतं. ••••

 अरे व्वा !! काका, आज तर तुमचा चेहरा छान दिसतोय. तुम्हाला ट्रीटमेंट देणारा डॉक्टर आत्ता भेटला व म्हणाला तुम्ही लवकर बरे होणार. असं ऐकताच पेशंट ची बरे होण्याची ‘Hope ‘वाढते. लवकर बरा होतो. •••••

 प्रसिद्ध वैज्ञानिक आइनस्टाइन बद्दलची एक गोष्ट, •••••शिक्षकाने तुमचा मुलगा मंद बुद्धी चा आहे. त्याला तुम्ही घरीच ठेवा. त्याला शाळेत पाठवू नका. अस पत्र घरी पाठविले होते.

 पण तेच पत्र त्यांच्या आईने असे वाचले, ••••• ती वाचते, ••••

 ” तुमचा मुलगा खूप हुशार आहे. आमच्या शाळेत त्याला शिकवू शकतील असे योग्य शिक्षक आमच्या कडे नाहीत. तेंव्हा त्याच्या शिक्षणाची सोय तुम्ही घरीच करावी. “••••

 आईने वाचलेल्या पत्राचा चमत्कार, प्रभाव अविश्वसनीय ठरला. आईने मुलात भरलेली उर्जा, दाखविलेली आशा, विश्वास. हेच कारण असावं. ••••

 खूपदा आपण आपली क्षमता कमी लेखतो. स्वतः ला ‘ under estimate ‘ करतो. •••••

 आपली क्षमता ओळखणारा, सांगणारा, आपल्यात विश्वास दाखविणारा, प्रोत्साहन देणारा, मधून मधून कौतुक करणारा, योग्य वयात, योग्य वेळी एखादा गुरू भेटला तर आपलं भाग्यच उजळेल. शेवटी प्रयत्न मात्र आपल्यालाच करायचे असतात. फक्त प्रयत्न कोणत्या दिशेने करायचे ??? हे समजले तरी उत्तम. •••

 आपण अनेक लोकांच्या संगतीत असतो. सकारात्मक विचार करणारे बरोबर असतील तर चांगले. खरी माणसे ओळखता आली पाहिजे. प्रेरणादायी शब्द बोलून, आशा निर्माण करणारे, साथ देऊन विश्वास दाखविणारे, विश्वास ठेवणारे लोकांच्या संगतीत राहिले तर जगात अशक्य असे काहीच नाही. ••••

 ठरवलं तर आपण चाळणीतून पाणी नेऊ शकतो फक्त पाण्याचा बर्फ होत पर्यंत संयम ठेवावा लागेल एवढंच.. झेप घेण्याची वृत्ती असावी. एकदा का मनाने ठरविले तर अशक्य काही च नाही. मनाची शक्ती अफाट असते. ••••

 माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते, ••••

“मला अडचणीं बद्दल बोलता येत नाही. मला नन्ना चा पाढा येतच नाही. “•••••

मला तिचे हे वाक्य खूप आवडते. ••••

 गोष्ट/ काम कोणते ही असू दे, मला जमणार नाही वगैरे तिच्या मनात येतच नाही. “करून तर बघते “हीच सुरुवात असते तिची.

 स्वतः वरचा विश्वास म्हणतात याला. ••••

 शब्दांचा प्रभाव पडतो. तेंव्हा बोलताना शब्द पारखून घ्यावे. शब्द मोफत जरी असले तरी त्यांचा वापर सांभाळुन करायचा असतो. शब्दांचेही तापमान असते. शारीरिक जखम भरते पण मनावर शब्द नेहमी करिता कोरले जातात. ••••

 ” Words can be constructive as well as destructive. “••••

 

 ” कौतुकाचे दोन शब्द प्रेरणा देतात तर आधाराचे दोन शब्द विश्वास निर्माण करतात” कौतुक करायला जास्त बोलायची गरज नसते पण मन मात्र मोठे असावे लागते. •••••

 आपल्या आजूबाजूला बरेच लोक असे आहेत. सर्व आहे त्यांच्या कडे. फक्त दोन शब्द बोलायला, , ऐकायला माणसे नाहीत.

” कसे आहात काका काकू. ???मजेत ना. कधी काही गरज पडली तर सांगा “

एवढी

” Hope and Help ” पूरेशी आहे त्यांना आनंदाने जगायला. ••••

So, •••••

 “Inject HOPE in everyone’s life “

 

” Hope is Decision ”

 ” If you decide not to be defeated, then we can not get defeated. So let’s inject hope in people that ••••this will pass and we can win over situation. “••••

 

 

 म्हणतात ना, ••••

 

 “भीती पेक्षा मोठा कोणताही ‘वायरस’ नाही

 आणि ‘हिमतीपेक्षा’ मोठी कोणतीच लस नाही. संयम पाळा सर्व ठीकच होणार आहे. “••••

 खेळपट्टी वर जमून रहा. धावा आपल्या आप निघतील. •••••

 

“वायरस अदृश्य हैं, अवश्य डरिए । पर ईश्वर भी तो अदृश्य हैं भरोसा रखिए ।”•••

(COVID, काळात लिहिलेला लेख)

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात अनेकदा येणाऱ्या अनपेक्षित अडचणीच्या वेळी प्रत्येकाची सर्वसाधारण प्रतिक्रिया नकारात्मकच असते.मीही त्याला अपवाद नव्हतो.माझ्या अकोला ब्रॅंचला झालेल्या बदलीच्या संदर्भात मीही तसाच विचार करत होतो. माझ्या त्या दृष्टीकोनातली निरर्थकता पुण्याला झालेल्या माझ्या पोस्टींगमुळेच मला समजू शकली. तोवर माझ्या बाबतीत घडलेल्या सगळ्याच तेव्हा प्रतिकूल वाटणाऱ्या घटनाही माझ्या कशा हिताच्या ठरल्या आहेत हे इथे आल्यामुळेच मला लख्खपणे जाणवलं!)

हे मला जाणवलं, त्यालाही निमित्त ठरली ती इथं माझ्यावर सोपवली गेलेली पी.अॅण्ड डी. (प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट)ची जबाबदारी. पुणे झोनल-आॅफिसच्या अधिकारात येणाऱ्या अडीचशे ब्रॅंचेसमधल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या सर्व प्रकारच्या बाबींचं व्यवस्थापन करणारा एक विभाग माझ्या पी.अॅंड डी. डिपार्टमेंटच्या अखत्यारीतच होता.त्यामुळेच पहिल्या डी.जी.एम्. साहेबांची अशा पद्धतीने एक्झिट होण्यामागची कारणे व पार्श्वभूमी मला अतिशय विश्वसनीयरित्या समजू शकली. आम्हा सर्वच अधिकाऱ्यांच्या प्रमोशन रिझल्टसवर तत्कालीन डी.जी.एम् साहेबांची त्यांनी अॅप्रेझल रिपोर्ट्समधे मार्क्स देताना दाखवलेली सरसकट नकारात्मकता दूरगामी परिणाम करणारीच ठरली असल्याचे चित्रही माझ्या अधिकारातील या स्टाफ डिपार्टमेंटमुळेच मला स्वच्छपणे दिसू शकले होते.

त्या डी.जी.एम् साहेबांची पुढे अशी अपमानास्पद एक्झिट होणं ही त्यांच्याच एकंदर नकारात्मक अॅप्रोच आणि मानसिकतेचीच परिणती होती. तथापी आश्चर्य हे किं याचा अतिशय वाईट परिणाम इतर अनेक अधिकाऱ्यांना त्रासदायक ठरला असला, तरी डी.जी.एम् साहेबांच्या मला त्रास देण्यासाठी घेतलेल्या सर्वच निर्णयांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला मात्र नकळत काव्यगत न्यायच मिळाला होता, आणि तो तसा मिळावा याचसाठी वेळोवेळी मला सहन करावी लागलेली अडचणीची परिस्थिती हा ‘त्या’ने निर्माण केलेलाच एक भुलभुलैय्या होता हेही सगळं वादळ शांत झाल्यावर मी मनोमन केलेल्या विश्लेषणातून नेमकेपणाने माझ्या लक्षातही आलं होतं.

मी अहमदनगरला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं नव्हतं, तरी तिथला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच, मी तिथे चार्ज घेण्यापूर्वीच्या ऑडिट

रिपोर्टमधील त्रुटी व साचून राहिलेली महत्त्वाची कामे याला मीच जबाबदार असल्याप्रमाणे मला अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन माझी अकोला ब्रॅंचला केली गेलेली ट्रान्सफर, तिथे प्रतिकूल परिस्थितीत तग धरून रहाताना माझी झालेली ओढताण आणि घुसमट, मला अतिशय अन्यायकारक वाटली होती. मी न केलेल्या गुन्ह्याची ती शिक्षाच समजत होतो मी. पण ती शिक्षा नव्हती तर पुढे येऊ पहाणाऱ्या संकटापासून माझं रक्षण करणारं, ‘त्या’ने माझ्यासाठी आवर्जून निर्माण केलेलं एक सुरक्षाकवच होतं. हे माझ्या तेव्हा लक्षात येणं शक्य नसलं तरी ते तसंच होतं!

माझी अकोल्याला झालेली आणि मला तेव्हा त्रासदायक वाटत राहिलेली बदली, आणि डी.जी.एम.साहेबांनी अन्यायकारक पध्दतीने अॅप्रेझल रिपोर्टमधे दिलेले कमी मार्कस् या मुख्यत: माझ्या करिअरसाठी अडचणीच्या ठरु शकणाऱ्या दोन घटनांदरम्यानच्या सर्व प्रसंगांची ‘त्या’ने केलेली गुंफण केवळ माझं हित जपण्यासाठीच कशी केली होती हे समजून घ्यायला त्या सगळ्याच घटनाक्रमांचा मागोवा घेणे अगत्याचे आहे.

या सगळ्याची तर्कसंगत मांडणी करायची तर बॅकेच्या कार्यपध्दतीतील संबंधित तांत्रिक आणि क्लिष्ट वाटू शकतील अशा दोन गोष्टींची थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे.एक म्हणजे अॅप्रेझल रिपोर्ट्समधे वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले मार्कांचं प्रमोशनसाठीचं महत्त्व आणि सेंट्रल ऑफिसकडून ठरवली जाणारी प्रमोशन पोस्टिंग संदर्भातली पॉलिसी.

अॅप्रेझलमधील मार्कांचं स्कोअरींग प्रमोशन मिळण्यासाठी आवश्यक गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अखेरच्या तीन वर्षातील अॅप्रेझल रिपोर्टसमधील मार्कांची सरासरी ग्राह्य धरली जाते.

अगदी माझ्या हितसंबंधांपुरता विचार केला तरी माझं हित आणि समाधान फक्त प्रमोशन मिळण्यावरच नव्हे तर त्याच्याइतकंच प्रमोशननंतरचं माझं पोस्टिंग कुठं होणार यावरही अवलंबून होतंच.

डी.जी.एम् साहेबांच्या जेमतेम दीड वर्षांच्या इथल्या कार्यकाळात स्टाफ मॅटर्समधल्या थेट हस्तक्षेपामुळे तोवर चांगलं रेकाॅर्ड असणाऱ्या कितीतरी अधिकाऱ्यांचं करिअर पणाला लागलं होतं. त्यांच्यापैकी अर्थात मीही एक होतोच. तरीही इतरांपेकी बरीच जणं त्यांना प्रमोशन न मिळाल्याने बळीचा बकरा तरी ठरले होते किंवा काहींचे अॅप्रेझल रिपोर्टमधील कमी मार्कस् मेरीट लिस्टमधे मागे पडायला निमित्त झाले होते. त्यामुळे आऊट आॅफ स्टेट पोस्टिंग झाल्याने ते न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत राहिले.

इतर अनेकांच्या अशा पार्श्वभूमीच्या तुलनेत डी.जी.एम्. साहेबांचा अॅप्रोच माझ्याबाबतीतही तितकाच नकारात्मक असूनसुद्धा मेरीट लिस्ट आणि प्रमोशन पोस्टिंग दोन्ही बाबतीत त्यांचा तथाकथित नकारात्मक अॅप्रोचच माझ्या पथ्यावर पडला होता तो केवळ ‘त्या’ने माझ्यासाठी निर्माण केलेल्या सुरक्षाकवचामुळेच!

माझे आधीच्या दोन वर्षांमधील अॅप्रेझल्समधील मार्कांचे स्कोअरिंग खूप चांगले असूनही तिसऱ्या वर्षातील डी.जी.एम्. साहेबांनी दिलेल्या अतिशय कमी मार्कांमुळे तीन वर्षांच्या सरासरीवर प्रतिकूल परिणाम होऊन मेरिटलिस्ट मधला माझा नंबर पहिल्या पन्नासांत येऊ शकला असता तो बराच मागे पडल्याने कसाबसा पहिल्या शंभरात आला होता. तो पहिल्या पन्नासात नसणे जसे माझ्या हिताचे ठरले तसेच ते पहिल्या शंभरात कसाबसा असणेही अतिशय पूरक ठरले. कारण पहिल्या पन्नासमधे असणाऱ्या जवळजवळ सर्वांचेच पोस्टिंग मेट्रोपॉलिटन सिटीज् मधल्या अतिशय मोठ्या, क्रिटिकल ठरू शकणाऱ्या हेवी ब्रॅंचेसमधे केले गेले जे माझ्यासाठी आगीतून उठून फोफाट्यात पडण्यासारखेच ठरले असते. शिवाय पहिल्या शंभरात आल्यामुळे माझे पोस्टिंग आऊट ऑफ स्टेट न होता, फक्त आऊट ऑफ रिजन झाले. म्हणजेच नागपूर रिजनमधून पुणे रीजनमधे. अकोल्याला माझी झालेली बदली आणि जेमतेम पाच ते सहा महिन्यांचा तिथला कार्यकाळ हा केवळ ‘नागपूर रिजनमधील प्रमोटी’ हा शिक्का बसण्यापुरताच होता आणि त्यामुळे नागपूरमधे खिचपत न पडता मला पुण्याला सोयीचे पोस्टिंग मिळू शकले. शिवाय अकोला ब्रॅंचमधील कामाचे दडपण व प्रतिकूल परिस्थितीही मला तेव्हा अडचणीची वाटली असली तरी माझ्यासाठी तीच प्रयत्नपूर्वक प्रामाणिक कष्ट करायला पूरक ठरली. आणि त्यामुळेच इंटरव्यूमधेही तो कळीचा मुद्दा ठरुन, त्या इंटरव्हृयूमधले मार्कस् निश्चितच माझ्या प्रमोशनसाठी निर्णायक ठरले!

माझे आधीच्या दोन वर्षांमधील अॅप्रेझल्समधील मार्कांचे स्कोअरिंग खूप चांगले असूनही तिसऱ्या वर्षातील डी.जी.एम्. साहेबांनी दिलेल्या किरकोळ मार्कांमुळे तीन वर्षांच्या सरासरीवर प्रतिकूल परिणाम होऊन मेरिटलिस्ट मधला माझा नंबर पहिल्या पन्नासांत येऊ शकला असता तो बराच मागे पडल्याने कसाबसा पहिल्या शंभरात आला होता. तो पहिल्या पन्नासात नसणे जसे माझ्या हिताचे ठरले तसेच ते पहिल्या शंभरात कसाबसा असणेही अतिशय पूरक ठरले. कारण पहिल्या पन्नासमधे असणाऱ्या जवळजवळ सर्वांचेच पोस्टिंग मेट्रोपॉलिटन सिटीज् मधल्या अतिशय मोठ्या, क्रिटिकल ठरू शकणाऱ्या हेवी ब्रॅंचेसमधे केले गेले जे माझ्यासाठी आगीतून उठून फोफाट्यात पडण्यासारखेच ठरले असते. शिवाय पहिल्या शंभरात आल्यामुळे माझे पोस्टिंग आऊट ऑफ स्टेट न होता, फक्त आऊट ऑफ रिजन झाले. म्हणजेच नागपूर रिजनमधून पुणे रीजनमधे. अकोल्याला माझी झालेली बदली आणि जेमतेम पाच ते सहा महिन्यांचा कार्यकाळ हा केवळ ‘नागपूर रिजनमधील प्रमोटी’ हा शिक्का बसण्यापुरताच होता आणि त्यामुळे नागपूरमधे खिचपत न पडता मला पुण्याला सोयीचे पोस्टिंग मिळू शकले. याउलट मी अहमदनगर ब्रॅंचलाच असतो तर ‘पुणे रिजनमधील प्रमोटी’ म्हणून माझे प्रमोशन पोस्टिंग नागपूर किंवा मुंबई रिजनला होणे अपरिहार्यच ठरले असते जे माझ्यासाठी सर्वार्थानी गैरसोयीचेच होते.शिवाय अकोला ब्रॅंचमधील कामाचे दडपण व प्रतिकूल परिस्थितीही मला तेव्हा अडचणीची वाटली असली तरी माझ्यासाठी तीच प्रयत्नपूर्वक प्रामाणिक कष्ट करायला पूरक ठरली. आणि त्यामुळेच इंटरव्ह्यूमधेही तो कळीचा मुद्दा ठरुन तिथे मिळालेले मार्कस् निश्चितच माझ्या प्रमोशनसाठी निर्णायक ठरलेले होते!

या सगळ्याच घटनाप्रसंगांचा मागोवा हा दिलासा देणारा ‘त्या’चाच हळुवार स्पर्श असावा तसा मला आयुष्यातल्या पुढील वाटचालीतही दिलासा देत रहाणार होता!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ मूळ’ याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ ‘ मूळ’ याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न… ☆ सौ शालिनी जोशी

एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे हा मराठी भाषेचा अलंकार आहे. ‘मूळ’ या शब्दाचा हे विचार करता तो बऱ्याच अर्थाने वापरला जातो असे लक्षात आले. मूळ म्हणजे झाडाचे मूळ रूढार्थ. त्यावरून मूळ म्हणजे आधार असाही अर्थ होतो. मूळ म्हणजे आदिकारण, या अर्थाने सुरुवात जेथून होते ते मूळ म्हणून वंशाचे मूळ, धर्माचे मूळ, मूळप्रकृती, मूळपीठ, शब्दाचे मूळ इत्यादी बरेच शब्द तयार होतात. यातूनच मुळाक्षरे हा शब्द आला असावा. मुळाक्षरे म्हणजे वर्णमाला जे शब्दाचे मूळ आहे. तसेच गणितात मूळ संख्या असतात उदाहरणार्थ एक, तीन, पाच —- तसेच वर्गमूळ, घनमूळ असते. आरोग्यशास्त्रात ‘मूळव्याधी’ वरचा आजार आहे. २७ नक्षत्रात मूळ नक्षत्र आहे. योग शास्त्रात तीन बंधात एक ‘मूळबंध’ आहे. लग्न झालेल्या मुलीला आणायला जो माणूस जातो त्याला ‘मूळ’ म्हणतात किंवा मुराळी. मूळ म्हणजे आरंभ, उगम, प्रारंभ, सुरुवात या दृष्टीने नदीचे मूळ म्हणजे उगमस्थान. मनाच्या श्लोकात गणेशाचे वर्णन मूळारंभ असे केले.मूळ यावरून शब्दावरून बरेच वाक्प्रचार आहेत. मुळाशी हात घालणे, निर्मूळ करणे, मुळावर जन्मणे, मूळनक्षत्रावर जन्मणे, मुळावर उठणे. ज्ञानेश्वरीत मुळवणे म्हणजे समूळ नायनाट करणे हा नवीन शब्द सापडला.’ संसार दुःख मुळवणेl विकृतीविणे l’ संसार दुःखाचे सहजपणे उच्चाटन करणे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र व मार्केटिंग फंडे… लेखक : वे. भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

? विविधा ?

☆ नवरात्र व मार्केटिंग फंडे… लेखक : वे. भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे.

हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढिला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतोय.

काल प्रसिध्द हिंदुत्ववादि लेखक, भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांतिज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.

परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनी द्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली. गुरुजी नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात व देवीची नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?

काही महिलांनी तर नउ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले, गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचे ही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असं काही दिलंय का? असे विचारले.

गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात की त्याने “लक्ष्मी प्राप्त “होईल अशाही चर्चा होताहेत.

यात सत्यता आहे का? गुरुजी ! धर्मशास्त्रात हे दिलंय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.

मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगीतले की ऑफीस मध्ये नउ दिवस नउ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार असे घालावेत असं ठरतंय “मी गरीब आहे, शिपाई पदावर काम करते, नवरा सतत आजारी असतो, मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? “देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर? हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व ठरवलं की यावर एक लेख लिहावाच.

4 वेद, त्यांचे 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ, जवऴपास 60 स्मृतिग्रंथ यात कोठेहि नवरात्रात नउ दिवस नउ रंगांच्या साड्या परीधान करा असं दिलेलं नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा (सकच्छ म्हणजे नउवार साडी असेल तर उत्तम) असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. मँचींग हवंच अस नाही.

मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाउन त्यात बिभत्सपणा आलाय.

आपल्या सण उत्सवात प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा. महाराष्ट्रात “घटस्थापना ” ही प्रधान असते त्याच सोबत अखंड नंदादिप, काहिजणांकडे त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे अशा पध्दतीने नवरात्र होते.

ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेहि धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.

कर्नाटकात दसरा मोठा असतो,

कच्छ सौराष्ट्र गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करुन रात्री जागरण, गरबी ( म्हणजे छोटा दिवा ) मधोमध लावून त्या भोवती फेर धरून गरबा खेळणे – यात देवीची सुंदर भजने असतात. तसंच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात.

प. बंगाल मध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. तिथे शक्तीपूजेचे खूप महत्व आहे.

इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो किवा शास्त्रीय आधारही नसतो व दुर्दैव म्हणजे त्यात देवीची उपासना हा सर्वात मुख्य भागच नसतो.

प्रत्येक प्रांताचं एक वैशिष्ट असतं, परंपरा असतात त्या जपल्याच पाहिजेत अन्यथा काही वर्षांनी आपली मुले नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. हा मातृशक्तीचा उत्सव आहे हे त्यांना कऴणारच नाही.

मी हिंदू आहे याचा म्हणजे माझे आचार विचार संस्कृती माझ्या धार्मिक परंपरा यांचा मला एकदा विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा काहीच फरक पडणार नाही. ( यामुळे माझे – पुढच्या पिढ्यांचे – धर्मांतर करणे अगदि सहज सोपे व सुलभ होणारे) नेमकी हीच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काही झालं तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.

एखाद्या गरीब भगिनीला हे “हाय फाय “नवरात्र जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल. (यांचं धर्मांतर करणे अगदि सोपे होईल)

एकीकडे धर्मशिक्षणाचा अभाव आणि दुसरीकडे श्रीमंती वाढून मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या “डिजे व गरबा दांडियालाच” नवरात्र समजतील. कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाही. त्यामुळे यांचंही धर्मांतर करणं सोपं जाईल.

थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपण हिंदू समाजच कारण आहोत.

काही वर्षांपूर्वी “डे “संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा “गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या ” आपल्या देशात आल्या तेव्हापासन हे “डे “च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे, वेलेंटाईन डे. या दिवसात करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे की मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगावं लागतं हे “डे “मात्र ते लक्षात ठेवतात.

गोकुळाष्टमी तर “राजकीय पुढारी “मंडळींच्या कृपेने अशीच “डिजे व मद्यमय “झाली आहे.

किमान आईचा उत्सव असा होता नये असे वाटतेय.

चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे.

या युध्दाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही आणि केवऴ नाचतो)

या काळात महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रुपातील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादिप, माऴबांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना विद्या व बुध्दि वाढावी म्हणून करुन घ्यावी.

धनधान्य सुबत्ते करता महालक्ष्मी उपसना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.

मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधीक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत ऐकावेत.

आज काऴाची ही गरज आहे.

हिरॉईन सारखं नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जीजाबाईं सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे आणि आज गरज त्याचीच आहे.

नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.

या दांडिया व गरब्याच्या काऴात “संतति नियमन साधनांची “विक्रि दुप्पट होतेय व नंतर शालेय व कॉलेज तरुणींचॆ गर्भपात प्रमाण ही वाढतंय. या बाबत काही सेवाभावी संस्थानी सर्व्हे करुन अहवाल सादर केलेत ते विदारक आहेत.

लव्ह जिहाद याच काऴात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुला मुलींना या धोक्यांची जाणीव करुन देणे हे कर्तव्य आपले आहे.

तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बऴी न पडता सात्विक पणे आनंदाने आपल्या परीस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करावी व देवीची कृपा प्राप्त करावी ही कळकळीची विनंती.

वरील माहितीत चूक असेल तर क्षमस्व !

वे. भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

9404170656

(वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्य समुहावर देउ शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाही)

संग्रहिका: सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ या कातरवेळी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ या कातरवेळी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या कातरवेळी

कातर म्हणजे अस्थिर किंवा कमी होणारी गोष्ट. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य प्रकाश कमी होतो. म्हणून ही कातरवेळ. आपले कवी पण किती हुशार होते. त्यांनी ही वेळ व त्यावेळची असलेली मनस्थिती काव्यात गुंफली आहे. जसे मानवी मनाचा एकटेपणा वर्णन करणारे गीत, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी दिवस व रात्र यांच्या मधील काळ म्हणून संधिकाळ. व त्या वरील गीते. संधिकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा ही वेळ उन्हे उतरणे, सूर्य मावळणे आणि संधीप्रकाश पडणे या तीन सांज मिळून तिन्ही सांजा या तिन्ही सांजा लक्षात घेऊन तिन्ही सांजा सखे मिळाल्या असे म्हणत सखीला वचन दिले आहे.

तर पत्नी झाल्या तिन्ही सांजा म्हणत साज शृंगार करुन पतीची वाट बघत आहे. हीच वेळ कुणाला गाई वासरांच्या परतण्याची सावळ्याची सावली वाटते. आणि सांज ये गोकुळी सारखे गाणे तयार होते. ही वेळ संध्याकाळची विविध रूपे घेऊन येते. खरे तर ती वेळ, तो सूर्य, संधीप्रकाश सर्वत्र एकच असतो. पण प्रत्येकाच्या मनस्थिती प्रमाणे संध्याकाळ प्रत्येकाला वेगळी भासते.

याच वेळी घरात दिवेलागण होऊन शुभंकरोती म्हंटले जाते. लक्ष्मीला आवाहन केले जाते. अंगणात दिवा लावला जातो. उदबत्तीचा सुगंध दरवळतो. जणू मरगळ, उदासीनता प्रार्थना करुन दूर केली जाते.

एकाच वेळेची इतकी रूपे आणि विविध भावभावना असतात. या मागेही विज्ञान आहे. आपल्या शरीराचे एक दैनंदिन घड्याळ असते. आपले शरीर सर्केडियन लयीला प्रतिसाद देत असते. या वेळी शरीरात मेलाटोनीन संप्रेरक तयार व्हायला सुरुवात झालेली असते. ते तंद्री आणते आणि झोपेसाठी आपले शरीर तयार करते. पण आपली झोपेची वेळ झालेली नसते. म्हणून या वेळी बरेचदा उदास, एकटे, चिंताजनक वाटणे, हुरहूर वाटणे अशा भावना निर्माण होतात. प्रत्येकाची त्या भावनांना प्रतिसाद देण्याची, विचार करण्याची पद्धत वेगळी असते.

त्यामुळे प्रत्येकाच्या मनात विविध भावभावना निर्माण होत असतात. दिवसभर काम करुन शरीर दमलेले असते. आणि आपल्या विसाव्याच्या ठिकाणी जायला आतुर झालेले असते. हा प्रत्येकाचा विसावा भिन्न असतो. म्हणूनच आपल्याला विविध मूड असलेली सांजवेळची गाणी लाभली आहेत.

काही कवींनी ही वेळ थेट उतार वयाशी जोडली आहे. पण त्यातूनही मधुघट सारखे उत्तम काव्य निर्माण केले आहे. हे उतारवय पण असेच असते. कर्तव्याची पूर्तता झालेली असते. जरा स्थिरता आलेली असते. पैलतीर दिसू लागलेला असतो.

मुले बाळे आपल्या विश्वात रमलेली असतात. कधी कधी आपली गरज कोणाला आहे का? असेही वाटून जाते. पण याच वेळी भोवती नातवंडे असतील तर उदास विचार दूर होतात. आणि आपले बाल्य त्यात गवसते.

आपले पूर्वज किती हुशार होते याचा आपण नेहेमी अनुभव घेतो. या सगळ्या भिन्न भावभावना नष्ट व्हाव्यात आणि चांगले विचार मनात यावेत या साठी यावेळी घरातील सर्वांनी एकत्र येऊन दिवा लावणे, काही स्तोत्रे म्हणणे. एकत्र वेळ घालवणे यातून सर्वांचीच मनस्थिती बदलते. आणि घराला घरपण येते. दमलेल्या, एकाकी वाटणाऱ्या मनाला उभारी देते. माझी कोणीतरी वाट बघत आहे ही भावना खूप महत्वाची असते. म्हणूनच ही वेळ सर्वांनी घरी परतण्याची असते.

म्हणूनच असे वाटते, ये शाम मसतांनी आणि कोणीतरी खेचल्या प्रमाणे घराकडे पावले ओढली जातात. अशी विविध रंगाने नटलेली संध्याकाळ आपण लोभस, सुंदर आणि हवीहवीशी करु या. आणि त्या नंतर येणाऱ्या व तनमनाला विश्रांती देणाऱ्या रात्रीचे स्वागत करु या. रात्र शांत झोपेची गेली तर उद्याचा उष:काल प्रसन्न होतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘एक हळुवार शेर’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘एक हळुवार शेर’ ☆ श्री दिवाकर बुरसे

महत्प्रयासाने अखेच दोघांचे लग्न ठरते. उद्याचा मुहूर्त निश्चित झालाय. दोघेही आनंदात आहेत. केवळ उद्याची प्रतीक्षा. एकच दिवस उरला आहे. मीलनापूर्वी प्रियकराला तडपविण्यात नायिकेला विशेष आनंद वाटत असतो. सुंदर स्त्रियांची ही रीतच असते. प्रियकराची परीक्षा घेण्याच्या हेतूने प्रेयसी एक डाव रचते.

अत्यंत अवघड व मिळायला दुरापास्त अशा वस्तूंची एक भली मोठी यादी प्रियकराच्या हाती सोपवून त्या वस्तु संध्याकाळपर्यंत आण असा आदेश देते. हे काम करण्यास तो अयशस्वी झाला तर “त्याची कशी जिरवली” याचा आनंद तिला मिळणार होता.

यादी मिळताच प्रियकर त्वरित कामाला लागतो. सकाळीच घोडा घेऊन बाजारात जातो.भरपूर पायपीट करून शेवटी सर्वच्या सर्व वस्तु घेऊन तो परत फिरतो. त्याला आपल्या कर्तृत्वाचे प्रदर्शन करून प्रेयसीला प्रभावित करायचे असते. सगळ्या वस्तु मिळविण्यात तो यशस्वी झाला आहेच.

इकडे नायक गेल्यानंतर काही वेळाने नायिका स्वतःशीच विचार करू लागते. तिला हे ठाऊक आहे की आपला प्रियकर कर्तृत्ववान आहे. दिलेले कोणतेही काम तो पूर्ण करू शकतो. मी सांगितलंय म्हटल्यावर तर ते नक्कीच पूर्ण करणार, आणि त्याने ते काम खरंच पूर्ण केलं तर? तर काय, आपलं नाकच कापलं जाणार की! या विचाराने ती अस्वस्थ होऊ लागते. पुढे पुढे तर तिची अस्वस्थता इतकी वाढते, ती इतकी निराश होते की येणारे हे अपयश असह्य होऊन प्रणत्याग करते!

प्रियकर आनंदाने परत येतो. बघतो तो काय? लगिनघरात भयाण शांतता! तो चटपटतो. उत्सुकतेने घरात पाऊल टाकतो अन् समोर प्रियतमेचे कलेवर पाहून हादरतोच! आणि त्याच्या मुखातून पुढील शेर बाहेर पडतो….

माना के जाने जहाँ इस नामुरादीमे।

जो कफन लाना भूल गया सामान-ए-शादीमे!॥

स्वैरार्थः-

हे प्रियतमे, तुला मानलं. तूच जिंकलीस शेवटी. अगं, लग्नाच्या सामग्रीत मी तुझ्यासाठी कफन आणायचेच विसरलो की!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “साफसफाई…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “साफसफाई…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

गणपती बाप्पांचा मुक्काम संपला. आणि दरवर्षीप्रमाणेच परत एकदा वेध लागले ते साफसफाईचे. गणपतीच्या आधी ती झाली होती असं म्हणण्यापेक्षा त्यावेळी अडगळ काही प्रमाणात लपवली होती. आता मात्र नवरात्र व पुढे येणारी दिवाळी यासाठीच मोहीम उघडली जाणार होती ती साफसफाईची. थोडक्यात लपवलेली अडगळ झटकून परत नीट लपवायची होती.

ग्रहणाच्या आधी वेेध लागतात, आणि यावेळी मंदिरांची दारं म्हणजे कपाटं दर्शनासाठी बंद करतात. तसेच साफसफाईचे पण वेध लागतात, आणि असे वेध लागले की घरातल्या माळावरच्या, दिवाणाखाली केलेल्या, व इतर कपाटांची दारं उघडतात. चारधामच्या क्षेत्रांची दर्शनासाठी कपाटं उघडण्याचा जसा एक ठराविक कालावधी असतो, तस्साच घरातली काही कपाटं उघडण्याचा कालावधी असतो. आणि या काळात लपवलेल्या अडगळीचं सहकुटुंब शक्य झालं नाही, तर सपत्नीक दर्शन घडतं.

ग्रहण काळात नामस्मरण करायच असतं. तर साफसफाईच्या काळात मागच्या वर्षी काय आवरलं होतं, आणि आवरलेलं कुठे, कसं ठेवलं होतं याच्या (काम) स्मरणात काही काळ जातो. बर्‍याच आवरलेल्या वस्तू नेमक्या याचवेळी आपल्याशी लपंडाव खेळत असतात.

अशी साफसफाई करतांना उंच स्टूल, छोटी पण सहज हलवता येईल अशी शिडी याची जमवाजमव करावी लागते. आपल्याकडे असेल तर ठिक. पण शेजारची मागायची असेल तर त्यांच्याकडचे याच कामासाठिचे वेध कधी लागणार याचा वेध घेतला जातो. आणि आपल्याकडची शेजारचे मागणार आहे असा अंदाज आला तर….. आपले साफसफाईचे वेध त्यांच्या वेळातच लागण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण मागच्या अनुभवाचे देतो.

आपल्याकडे उंच स्टूल किंवा शिडी नसेल तर मग घरात असणारी (प्लास्टीकची) खुर्ची, त्यावर जेमतेम मावणारा जूना स्टूल अशी व्यवस्था करत दहिहंडीसारखा अनुभव घ्यावा लागतो. अशा अनुभवात खुर्ची त्यावर स्टूल आणि स्टूलवर आपण, यात वर चढल्यावर आपले लटपटणारे पाय, आणि स्टूलचे डुगडूगणारे पाय सौं.नी हलक्या हाताने घट्ट धरलेले असतात. आणि खालूनच वर मान करून तीच्या हुकूम दिल्यासारख्या सुचना सुरु असतात.

यात साफसफाई किती, कशी, आणि केव्हा होते याचा विचार तेवढा नसलातरी एक आंतरिक समाधान दोघांना असतं. एकतर तीने आपले पाय धरलेले असतात. यात आपलं समाधान. आणि ती तोंड वर करून बोलते यात तीला समाधान.

अशा सामानात मग पुढच्यावेळी लागतील म्हणून आठवणीने ठेवलेल्या, पण पुढच्यावेळी हमखास न सापडलेल्या पणत्या, प्लास्टीक फुलांचे हार, दारावर लटकवायची तोरणं, रंगीत रांगोळ्यांच्या पुड्या सापडतात. नवीन पायपुसणं ते देवाचं आसन सगळ जवळपास सारख्याच अवस्थेत असतं. यावेळी त्या प्लास्टीक फुलांचे बारीक तुकडे हातात येत असल्याचं लक्षात येतं. थोडक्यात आपल्या व्यवस्थित ठेवण्यापेक्षा व्यवस्थित राहण्यात त्या फुलांच्या हाराने हार मानलेली दिसते. आणि रांगोळ्यांच काय….. त्या पुड्या फुटून एकत्र झालेल्या असतात. व्यवस्थित ठेवण्याच्या नादात आपण नकळत किंवा काहि होत नाही या फाजील आत्मविश्वासाने त्यांच्यावर जड वस्तू ठेवत त्यांची रंगपंचमी साजरी केलेली असते. आणि आता त्याची राखरांगोळी झाली असते. आणि तोरणांच काय….. ते दारावर लटकवण्याच्या ऐवजी स्वत:च कशाच्यातरी आधारावर लटकलं असल्यासारखं वाटतं.

अशावेळी रांगोळीची झालेली राखरांगोळी पाहून होणारी चिडचिड वेगळ्या पध्दतीने व्यक्त होते. कारण नेमक्या त्याच वेळेस आपल्या काही आपणच लपवलेल्या गोष्टी समोर येतात. आपण मग सारवासारवी करतो….. हं….. ती….. ती बाटली नं…… ती दिवाळीत बाण उडवण्यासाठी आणली होती. पण आपला बाण फुसका ठरल्याचं लक्षात येतं. कारण ऊत्तर येत,

ती बाण उडवायची बाटली मोठी आणि रिकामीच होती…… या बाटलीत जे काही शिल्लक आहे ती बाणातली आहे का… आणि बाणात अशी पातळ वापरतात का…. आणि बाण पेटवायला सिगारेट कधीपासून वापरतात……

अरे ती…… ती….. ते माझं नाही. त्या बाळ्याचं आहे….. ठेवायला दिलंय…..

बाळ्याचं…… ठेवायला दिलंय…… का त्याच्या घरात जागा नाही….. आणि बाळ्याला सांगा…. नावा प्रमाणेच बाळ्या रहा. तेवढ्यावर प्रकरण थांबत. जास्त वाढत नाही. खरंतर चढत नाही.

आणि परत एकाचवेळेस गोष्टीची नासाडी होते. अशा सगळ्या ठेवलेल्या वस्तूंची नासाडी झालेली पाहिली की त्या व्यवस्थित ठेवलेल्या वस्तू व्यवस्थित बाहेर येतात, आणि यावर्षी काहि वेगळ आणि नवीन घेऊ म्हणून एक तोंडी यादी तयार होते.

मग पुढचा नंबर असतो तो लागतील म्हणून घेऊन ठेवलेल्या भांड्यांचा. यात काही भांडीतर लागतील म्हणून जी घेऊन ठेवली आहेत ती आजपर्यंत लागलीच नाहीत. आवरतांना फक्त हातालाच लागली. ती तशीच ठेवलेली सापडतात. फक्त त्यांची जागा काहीवेळा बदलते. या भांड्यांवरुन बोलतांना काहीवळा भांडणाचा सुर जाणवतो. त्यामुळे ती लवकर आवरावी लागतात. त्या बाबतीत अरेरावी चालत नाही.

इतक आवरुन झाल्यावर आपला ऊत्साह संपतो. पण इथूनच त्यांच्या ऊत्साहाची सुरुवात होते. कारण पुढचा नंबर असतो तो कपड्यांच्या कपाटाचा. हे कपडे कधी घेतले, कोणी, केव्हा दिले याचा सगळा इतिहास त्यांच्या लक्षात असतो. या इतिहासात काही कडूगोड आठवणीपण असतात. आणि यातले आता कोणते होत नाही यावरून अप्रत्यक्ष स्वत:च्या भूगोलाची प्रगती सांगितली जाते.

यातले काही कपडे काढून टाकू असं म्हणत थोडी जागा रिकामी केली जाते. पण या जागेवर काय ठेऊ या विचारात नवीन कपडे कोणते घ्यावे याचा विचार सुरु होतो.

आणि मग सुरु होते पुढच्या वर्षी आवराआवर कराव्या लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदिची तयारी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares