मराठी साहित्य – विविधा ☆ ललित – आठवणींच असच असतं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ विविधा: ललित – आठवणींच असच असतं…☆

संपादकांचा फोन आला आणि नाही म्हटलं तरी मी सुखावलोच. दिवाळी अंकासाठी काही ना काही लिहून पाठवल्याशिवाय ते काही गप्प बसणार नाहीत,हे माहित होत मला. आता मस्त एखादी दीर्घकथा लिहावी आणि द्यावी पाठवून अशा विचारात मी होतो. पण यंदाचा दिवाळी अंक अगदी छोटासा निघणार आहे, त्यामुळे काहीतरी छोटंसं पाठवा, एखादी जुनी आठवणही चालेल असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी जरा हिरमुसलोच. तरी त्यांना होकार दिला आणि फोन ठेवला.

आता छोटंस काय बरं लिहावं? जुनी एखादी आठवण लिहायची म्हटलं तरी ते सोपं नव्हतं. कारण थोडं जरी मागे वळून बघितलं तरी आठवणी कशा झुंडीन पुढं येतात. त्यातली नेमकी कोणती सांगायची हे ठरविणं खूप अवघड असतं.  प्रत्येक आठवणीच महत्व,सौंदर्य वेगळंच असतं. खर तर,सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की जरा गोंधळायलाच होतं. अशा वेळी आठवणी या स्त्री सारख्या वाटू लागतात.

खरंच, आठवणी या स्त्री सारख्याच असतात. स्त्रीची जशी अनेक रुपं पहायला मिळतात,तशीच आठवणींनाही विविध रुपं असतात. अल्लडपणानं बागडणारी बालिका,उमलत्या कळीप्रमाणे षोडशा,यौवनाने बहरलेली युवती, तारुण्याच्या उंबरठ्यावरून सौख्याचं माप ओलांडून संसारात पदार्पण करायला उत्सुक असणारी नवोढा, मातृत्वाने तृप्त झालेली माता, सर्व काही सोसून प्रौढपणाची जबाबदारी संयमाने पेलणारी गृहिणी आणि वृद्धत्वाकडे झुकत असताना नातवंडांच्या आगमनाने उल्हासित होणारी आजी ! स्त्रीची किती ही विविध रूप!

आठवणींचही असच असतं. त्यांच प्रत्येक रूप मोहविणारच असतं. बालपणीच्या आठवणींनी मन बागडत नाही असं कधी झालय का ? तारूण्यातल्या आठवणी त्यावेळच्या स्वप्नांना घेऊन येत असतात. तुमची स्वप्न सत्यात उतरलेली असोत किंवा नसोत, त्यांच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा तुम्ही पुन्हा त्या काळात जाऊन पोहोचता. तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी एखादी आठवण असेल तर तुमच्या मनाला नव्याने बहर येईल. तुमच्या कर्तृत्वाच्या आठवणी, तुम्ही भोगलेलं, तुम्ही सोसलेलं, तुम्ही मिळवलेलं आणि काही वेळेला तुम्ही अगदी गमावलेलं सुद्धा ! सगळं सगळं तुम्हाला जेव्हा आठवायला लागतं तेव्हा त्या त्या काळातंल ते ते चित्रच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुमचं वय जसं वाढत जाईल तशी या आठवणींची किंमत वाढतच जाईल. म्हणून तर या आठवणी मनाच्या खोल कप्प्यात अगदी नाजूकपणे जपून ठेवायच्या असतात. सौख्याच्या आठवणी सर्वांना वाटाव्यात तर सोसलेलं सारं आपल्यासाठी ठेवावं.

आणि हो, या आठवणी आणखी एका बाबतीत अगदी स्त्री सारख्या असतात बरं का !

तुमची खरीखुरी सखी जशी तुमच्यापासून दूर जात नाही तशाच या आठवणी सुद्धा तुम्हाला कधी अंतर देत नाहीत. अगदी शेवटपर्यंत तुमच्याच होऊन राहिलेल्या असतात. आणि मग ? मग आपल्यानंतर आपण स्वतः दुसर्यासाठी आठवण बनून जातो. आठवणी जपण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी. !

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली
मो 9421225491

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कपिल साहित्य – सु…शांत ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते.  आज प्रस्तुत है स्व सुशांत सिंह राजपूत जी की स्मृति में युवा लेखक श्री कपिल जी के ह्रदय के उदगार उनके आलेख  सु…शांत के माधयम से।) 

 ☆ कपिल साहित्य – सु…शांत ☆

बातमी हादरावून सोडणारी होती. काही काम नसल्याने दुपारी झोपलो होतो. जाग आली तेव्हा सवयीने मोबाईल घेतला. मोबाईल डेटा ऑन करून व्हाटसअॅप सुरू केले. सकाळपासून सूरू न केल्याने  एकशे दहांवर समूह व वयक्तीक मॅसेज येऊन पडले होते.

असो. एकेक समूहातून शक्य तेवढे मॅसेज वाचायला सुरुवात केली. एका न्यूज चॅनलचा स्क्रीन शाॅट होता.  ज्यात स्पष्ट लिहीलं होतं. कि ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या’ खरं तर विश्वास बसला नाही. कारण अफवा पसरवणारे एडिटींग काही अशा प्रकारे करतात की बघणा-याला विश्वास करावाच लागतो. म्हणून ती न्यूज अफवा म्हणुन दुर्लक्षित केली.

यु-ट्यूब वर जाऊन एका न्यूज चॅनलची लाइव वेबसाईट ओपन केली. तेव्हा बातमी खरी होती. ते एकून धक्काच बसला. ‘एम.एस. धोनीची’ शूटिंग सुरू असतांना शूटिंग दरम्यान औरंगाबादला त्याला पाहिलं होतं. नंतर अनेक चित्रपट, शो मध्ये पाहीलं. त्याच्या चेह-यावरची स्माईल अशी काही होती की बघणारा कितीही तणावात असला तरी त्याला तणावातून बाहेर काढण्याची क्षमता त्यात होती. आणि अभिनय तर कौतुकास पात्र होताच.

आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणारा हा हरहुन्नरी अभिनेत्याला असा कोणता तणाव होता. की त्यातून त्याला जगण्याचा मार्गच सापडू नये. त्यानंतर बाॅलीवूड मधली काही बडी मंडळीवर त्याला डावलल्याने तो डिप्रेशन मध्ये गेला आणि त्यातून त्याने हे पाऊल उचलले असे मिडियात येऊ लागले. ते काही असेल ती कारणे पोलिस शोधणारच. पण बातमी हैराण करणारी होतीच. कारण एक चांगला कलाकार आपण गमावला होता.

काही इतरही मॅसेज वाचले. ज्यात लिहीलं होतं की 2020 हे सालंच मनहूस आहे. एक तर कोरोना महामारीने अख्या जगाला  वैताग आणला असतांना ॠषी कपूर, इरफान खान, वाजिद आणि इतरही काही बाॅलीवूड मधील कलाकार सोडून गेली आणा त्यात सुशांत ही शांत झाला. त्यांचही म्हणनं योग्यच आहे. पण कोणत्या गोष्टींवर कीती आणि कोणती दोषण द्यावीत. हे किती योग्य आहे.

काळाने आपल्या विशिष्ट वेळेवर अनेक महान व्यक्तींना परत बोलावले आहे. या आधीही खुप वेळा मानव जातीला घातक अशा परिस्थिती अवनीवर आले आहेत. त्यात काही अशा होत्या की ज्यांनी त्यावेळची मानवी संस्कृतीच नष्ट करण्याचे काम केलंय.

पण जे झालं ते कधीही समर्थनास पात्र  नाही. भलेही कोरोनाने जगभरात थैमान घातले असले तरी ताणतणावांना एवढे कधीही प्रभावी होऊ देऊ नये की त्याने आपल्याकडून आपली जगण्याची उमेदच हिरावून घेईल.

तसं पाहिलं तर निसर्ग विशिष्ट काळानंतर दिलेले श्वास परत घेणारच आहे. पण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत भरभरून जगायला शिकायला हवे. जगात अगणित लोक आली आणि गेली. त्यातून काही मोजकीच लोकं इतिहासाच्या पानांवर सापडतात. बाकीची लोकं आली तशीच गेली. प्रत्येकाला प्रत्येक इच्छित गोष्ट मिळत नाही. म्हणून हा अट्टाहास सोडायला हवा आणि आहे त्यात खूश राहण्याचा प्रयत्न करायला हवा. असो.

बाॅलीवूडच्या  या हरहुन्नरी अभिनेत्यांला भावपुर्ण श्रद्धांजली

 

 © कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे # 37 –सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्त – सहनशीलतेचा सागर माझी आई  ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  दिनांक 11 जून  को आदरणीय स्व सदाशिव पांडुरंग साने जी  जो कि आदरणीय साने  गुरूजी के नाम से प्रसिद्ध हैं,  उनकी पुण्यतिथि  के अवसर पर आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी की रचना  “ सहनशीलतेचा सागर माझी आई ”।  श्रीमती उर्मिला जी के शब्दों में – “सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्त लिहिलेली माझ्या आईबाबचा लेख आहे “. उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ केल्याने होतं आहे रे # 37 ☆

☆ सहनशीलतेचा सागर माझी आई  ☆ 
 
‘ आई ‘ म्हणजे ईश्वर,वात्सल्याचा सागर,मायेचा आगर गोड्या पाण्याचा झरा . . . हे सर्व कवितेत येत त्याला भरपूर लाईक्स पण मिळतात. पण ” प्रेमस्वरुप आई. . . ही कविता म्हणून गेलेली आई परत येत नाही पण तिच्या प्रेमळ स्मृती मात्र आपल्या हृदयात कायम कोरल्या जातात.  प्रत्येकाची आई अशी कुठल्याना कुठल्या अंगाने छान असते.

माझी आई नावाप्रमाणेच सरस्वती साधी शांत सोज्वळ मूर्ती,नवुवार  सुती साधं पातळ डोईवर पदर सावळी पण नेटकी अशी माझी आई .   शिक्षण फक्त दुसरीच पण अक्षर  मोत्यासारखं ! तिला लहानपणी वडील नव्हते तर तिने तिच्या मामांकडून घरीच इंग्रजी शिकली. आम्हाला ती घडघडा म्हणून लिहून दाखवायची. आणि शिकवायचीही. तिच्या सुंदर अक्षरामुळेच आम्हा भावंडांच्या अक्षरांना सुंदर वळण लागलं.

आम्हाला ती नेहमी एका कृष्णभक्त विधवा गरीब आईच्या ‘गोपाळ ‘ नावाच्या मुलाची गोष्ट सांगायची. छोट्या गोपाळला जंगलातून शाळेत जावे लागायचे त्याला वडील नव्हते. आईने त्याला सांगितले जंगलात शिरण्यापूर्वी तू दादा अशी हाक मार तुझा दादा येईल व तुला सोडेल व परत आणेल. त्या मुलाने आईवर विश्र्वास ठेवला. त्याला आईच्या उत्कट भक्तीमुळे श्रीकृष्ण  शाळेत आणणे नेणे सर्व मदत करीत असे. हे ऐकल्यापासून आमचीही देवावर श्रद्धा बसली व आज तिच्या कृपेने श्रीसद्गुरुकृपेचा लाभ झाला. व आयुष्यभर साधं सरळ वागण्याचं बाळकडू तिच्याकडूनच आम्हाला  मिळालं.

आकाश कसं अगदी स्वच्छ निरभ्र असीम अमर्याद आईच्या मायेनं भरल्यागत असतं तशी माझी आई होती. त्या आकाशात कधी गडगडाट नाही कधी कडकडाट नाही झाला. ती इतकी सोशीक आणि सहनशील होती की,ती गेल्यावर माझी एक बालमैत्रीण मला भेटायला आल्यावर म्हणाली. . ” मालू ,तुझी आई नां नको इतकी गरीब होती गं. . ! माणसानं इतकं गरीब पण  नसावं. . !”

पण ती होती हे खरं !

आमचं एकत्र कुटुंब होतं. घरात मोठे काका काकू व आम्ही. काका पेन्शन नसलेले पेन्शनर व वडिलांचं टेलरिंगचं दुकान. त्यामुळे हातातोंडाशी गाठ. !

काकू घरातलं स्वयंपाक पाणी गाईंच्या धारा इ. व आई वरचं सगळं पडेल ते काम उन्हं,पाऊस थंडी वारा या कशाचाही बाऊ न करता अखंड काम करत रहायची. दुसऱ्या कुणी मदत करावी ही अपेक्षा नाही व कितीही काम पडलं तरी तक्रार नाही.

जेवताना ती आम्हाला साने गुरुजींच्या गोष्टी सांगायची. विशेषत्वानं लक्षात राहिली ती ” अळणी भाजी ” व आयुष्य जगताना ती उपयोगीही पडली.

गंमत म्हणजे सत्तरीनंतरही आम्हा सर्व भावंडांच्या जन्मतारखा,वेळा , व वार हेही ती पटापट सांगत असे.

आईला मधूमालतीची फुलं खूप आवडायची म्हणून तिनं माझं नाव मालती व भावाचं मधू ठेवलं. झाडाफुलांची तिला खूप आवड.

आम्ही आठ भावंडं माझा धाकटा भाऊ गजानन जन्मला तेव्हा मी नववीत होते. शाळा सुटल्यावर येताना दवाखान्यात बाळाला बघायला गेले तर आई म्हणाली हा बघ माझा आठवा कृष्ण. ! आणि खरंच तिनं फक्त जन्म दिला पण तो पहिल्यापासून वाढला माझ्या काकूच्या कुशीत. तिला मूलबाळ नव्हतं तिनं आम्हा सर्वांना संगोपन आईच्या मायेनं केलं.

माझी काकू व आई दोघीही बहिणीप्रमाणे वागायच्या आमचं घर म्हणजे कृष्णाचं गोकुळच जणूं.

 

©️®️उर्मिला इंगळे

सातारा

दिनांक: ९-६-२०

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ डॅल्गोना’ कॉफी आणि बरंच काही ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

( ई- अभिव्यक्ति में युवा मराठी साहित्यकार श्री अमोल अनंत केळकर जी का हार्दिक स्वागत है। आप मराठी व्यंग्य  विधा (विडंबन)  के सशक्त हस्ताक्षर हैं। मैं समझता हूँ इस विधा में अभिरुचि केअतिरिक्त  एम बी ए  (मार्केटिंग)  शैक्षणिक योग्यता निःसंदेह पृष्ठभूमि में कार्य करती ही है। श्री अमोल अनंत केळकर जी के ही शब्दों में  उनका परिचय –  “सध्या राहणार बेलापूर नवी मुंबई. ठाण्याजवळ  स्टील कंपनीत नोकरीला. प्रासंगिक लेखन/ विडंबन / चारोळ्या ललित लेखन. ‘माझे टुकार ई-चार ‘ ( www.poetrymazi.blogspot.in)  आणि ‘ देवा तुझ्या द्वारी आलो’ ( www.kelkaramol.blogspot.in) हे दोन ब्लाॅग. यावर नियमीत लेखन. जोतिष शास्त्राची आवड”।  आपका लेखन नितांत सहज  एवं धाराप्रवाह है। आज प्रस्तुत है उनकी विशिष्ट रचना डॅल्गोना’ कॉफी आणि बरंच काही .)
डॅल्गोना’ कॉफी आणि बरंच काही .

मंडळी मला कल्पना नाही ‘डॅल्गोना’  हा शब्द मी बरोबर लिहिला आहे की नाही पण सध्या याची जबरदस्त क्रेझ सोशल मिडियावर पहायला मिळत आहे.  ‘डॅल्गोना कॉफी ‘ ते “डॅल्गोना व्हिस्की” पर्यत झेप या प्रकाराने घेतली आहे. त्यामुळे अर्थातच आम्हाला ही याची दखल घेणे भाग पडले आहे.

तुम्ही म्हणाल काय गरज आहे का दखल घ्यायची?  पण मला सांगा छान “फिल्टर कॉफी” फार तर “नेस कॉफी ” अगदीच मोठी झेप म्हणजे “कोल्ड कॉफी” असताना काय गरज होती का हे ‘डॅल्गोना कॉफी ‘ वगैरे पॅटर्न पाडायची?

माझ्यामते चहा, कॉफी या भावंडांच्यात कोण श्रेष्ठ हा लढा वेगळ्या वळणावर येऊन थांबला आहे. या बहिण भावंडांच्यात कॉफी हे शेंडेफळ. कायमच हीचे जास्त लाड होतात हे साधारण निरीक्षण. मग टीव्ही शोच्या नावात काॅफी आली, तिथे चर्चा करणारे पुढ्यात मोठ्ठा मग्गा घेऊन एकदम स्टाईलीश चर्चा करु लागले. अर्थात त्यामुळे हीचा भाव थोडा चढलेलाच.

हळूहळू हळूहळू ‘चहा’ ने ही कात टाकली. ब्लॅक, रेड, अद्रक, ग्रीन अशा स्वरूपात मिळू लागला. पुर्वी ठराविक ‘अमृततूल्य’ , किंवा गाड्यांवर असणारा चहा वेगवेगळ्या व्यावसायिक आऊटलेट रुपाने नावाजला जाऊ लागला. मग कॉफीला कुठल्या तरी नव्या अवतारात येणे आवश्यकच होते.  ‘शो मस्ट गो ऑन’ असंच काहीस असाव

आता या डॅल्गोना चा सरळ गावठी अर्थ जो मी समजलो तो असा की कॉफी जी आपल्यासमोर येते त्यात दोन द्रव्यांचे थर वेगवेगळे दिसणे. हाच तो डॅल्गोना पॅटर्न. थोडक्यात सांगायचे

तर करुन  घ्या द्रव्यांचे,

वेगवेगळे लेअर

मग फोटो काढून करा,

डॅल्गोना कॉफी  शेअर

हा डॅल्गोना पॅटर्नचा # ट्रेंड आत्ता आल्यानंतर जरा विचार केला की अरे अनेकवेळा आपण या साच्यातून गेलोय की. अगदी लहानपणी बाबा रोज पहाटे “राम मंदीर “ते “विश्रामबाग ” फिरायला घेऊन जायच्याआधी जबरदस्तीने दूध अंड द्यायचे. एका ग्लासात ते  अंड फोडायचे आणि वरुन दूध घातलं की झकास डॅल्गोना पॅटर्न बनायचा. अगदी सहज तीन लेअर म्हणजे खाली पिवळा बल्क, वर द्रव्य (अंड्याची ग्रेव्ही म्हणूया का?  )  आणि तिसरा थर दुधाचा.  ते तिन्ही थर नुसते बघत बसावे असे वाटायचे. (कारण चव फारसी आवडलेली नसायची )  मग बाबा स्वत: उशीर होईल म्हणून पटापट ते तिन्ही थर एकजीव करुन प्यायला लावायचे. ही या पँटर्न शी झालेली पहिली ओळख.

शाळेतल्या मास्तरांनी तोंडावर उठवलेल्या चार बोटांचा थर इतर चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसत असताना याला ‘डॅल्गोना पॅटर्न’ मधे घ्यायचे का हे तुम्हीच सांगा.

शाळेतील बीजगणित+ भूमिती, इतिहास+ नागरिकशास्त्र +भूगोल,  हिंदी +संस्कृत असे वेगवेगळ्या थरातील पण एकमेकांशी संबंधित विषय हे माझ्या दृष्टीने ‘डॅल्गोना पॅटर्नच”

आम्ही दहावीत असताना समजा भूमितीचा पेपर रद्द झाला असता तर आम्ही अशी चारोळी नक्कीच केली असती

इतिहास म्हणाला नागरिकशास्त्राला

‘आयसोलेशन’ मधे आहे ‘ज्योग्राफी’

या दु:खात दोघे मिळून

चल घेऊ “डॅल्गोना कॉफी’

आता जास्त वेळ न दडवता तुम्हाला सरळ घेऊन जातो केमिकल इंजिनियरींगच्या रसायनशास्त्र प्रयोग शाळेत. या ठिकाणी चार वर्षात असंख्य टेस्ट ट्यूब फोडल्यात. किती केमिकल्स, किती प्रकारे, किती प्रमाणात छोट्याशा त्या नळकांडीत घालून या डॅल्गोना पॅटर्नद्वारे घडवलेत याची गणती नाही. त्या चार वर्षात शनी-मंगळ युती कडून ही एवढे धडाम-धूम स्फोट झाले नसतील एवढे आम्ही स्फोट प्रयोगशाळेत केले. बरं हे कळलं, जेंव्हा अंतीम वर्षानंतर कॉलेजमधून परत जाताना मिळणा-या डिपोझीटचा आकडा वरील करामतींमुळे सर्रकन खाली आला तेंव्हा.

बाकी तुम्हीही अनेक प्रकारे हा पॅटर्न अनुभवला असणार. काही नशीबवान असतील ज्यांनी खरोखरच अशी कॉफी पिली असेल. काही जणांनी सूर्योदय, सूर्यास्तावेळी आकाशात दिसणाऱ्या “डॅल्गोना छटा” बघितल्या असतील किंवा अगदीच कुणीतरी ओरडून ते बघ असं दाखवलेलं ‘इंद्रधनुष्य’ असेल.

आता यातलं कुणी काहीच केलं नसलं तरी तुम्ही नक्कीच नशीबवान आहात की गेली अनेकवर्षे तुम्ही ललित,विडंबन,कविता,चारोळी युक्त ‘टुकार डॅल्गोना पॅटर्न  ललित’ वाचत आलात, आणि जे आत्ताही केलंतं

©  श्री अमोल अनंत केळकर

१३/०४/२०२०

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 46 – पत्रलेखन  – ‘आये,  काळजीत नगं काळजात रहा.’ ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है  उनका एक समसामयिक भावनात्मक  “पत्रलेखन  – ‘आये,  काळजीत नगं काळजात रहा.’”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #46 ☆ 

☆ पत्रलेखन  – ‘आये,  काळजीत नगं काळजात रहा.’☆ 

कोरोनाच्या संकटामुळे भयभीत झालेल्या  गावाकडील आईस ,  शहरात कामधंद्यासाठी आलेल्या  एका तरूणाने पत्रलेखनातून दिलेला हा बोलका दिलासा जरूर वाचा.

पत्रलेखन

‘आये,  काळजीत नगं काळजात रहा.’

आये. . पत्र लिवतोय तुला. . .  जरा  निवांत बसून वाच. शेरात कामधंद्यासाठी आल्या पासून  आज येळ मिळाला बघ तुला पत्र लिवायला. आधी डोळं पूस. मलाबी हिकडं रडायला येतया.

आये . . तू काळजी.करू नकोस मी बरा आहे सध्या शहरात सगळं काही बंद आहे. त्या कोरोना इषाणू मुळं.आये तुझी माया मला कळतीया.परं गावाकडं प्रवास करून येताना ह्या कोरोनाचा धोका जास्त हाये बघ. ह्यो साथीचा रोग आहे. ‘माणसान माणसाला टाळल तर ह्याची लागण हुणार नाय  आसं जाणकार सांगत्यात.’

आये ,आमच्या कामगारांची मालकानं हाॅटेल मध्येच रहायची सोय केली हाय बघ. जेवना ची काय बी आबाळ होत नाय तवा काळजी करू नगस. माझा इचार करू नगंस. पगार पाणी माझं चालू रहाणार हाय . हिथं शेरात एका हाॅटेलात आमी चार पाच   जणं राह्यतोया.आक्षी चारा छावणीत राह्यलाय वानी वाटतयं बघ . चहा, नाश्ता, जेवण सारं बैजवार अन येळच्या येळी  मिळतया. आये तू माझी काळजी करू नगंस.

आये तू बी थोडं दिस घरीच थांब .शेताकडं जाताना तोंडाला एखाद फडकं बांधून जात जा. बा ला  बी सांग. जनावरांना चारापानी दिल्यावर ,  घरात येताना हात साबनान चांगलं धू.. .तोंडावर रूमाल बांधून राह्य.  हळद घालून दूध दे समद्यास्नी. सकाळी फक्कड  आल  आन गवती चहा घालून चाय दे समद्यास्नी. हसू येतय नवं?  अशीच हसत राह्य. आये ही येळ काळजी करण्याची नाय तर सोताची काळजी घेण्याची हाय. म्या हिथं माझी काळजी घेतोया.तकडं तुमीबी जीवाला जपा. खोकला, सर्दी जास्त दिस अंगावर काढू नगं.

आये.. मी गाव सोडून

शहरात येताना

तूझ्या डोळ्यात

पाणी का दाटून आलं होत

ते आज कळतंय…

आज खरंच गावाकडची खूप आठवण येतेय

पोटाच्या भुकेच्या प्रश्नाचं

उत्तर शोधत

मी ह्या शहरातल्या

उंच इमारतीच्या गर्दीत

कधी हरवून गेलो कळलंच नाही

पण आता परिस्थिती समोर

नक्की कुठे जावं कळत नही…

माझी अवस्था तुह्या  किसना सारखी झालीया

त्याला  जन्म देणारी देवकी पण हवीय

आणि संभाळणारी यशोदा सुध्दा.

आये ,हिथं तुझ्या वानी राधा मावशी हाय आमच्या जेवणाची काळजी घ्यायला.मलाबी सध्या निस्तं बसून रहावं लागतया. मनात नगं नगं त्ये इचार येत्यात.वाटत आत्ता  उठावं. . .   आनं मिळेल त्या वाहनानं  गाव गाठावं आनं तुला येऊन भेटावं. परं आये तुच म्हनती नव्हं ? “हातचं सोडून पळत्या पाठी धावायचं नाय” आये ,आक्षी खरं हाय तुझं. त्यो  कोराना (त्ये महामारी सावट ) जसं आलं तसं निघून बी जाईल.  आपून त्याच्या पासून दूर राह्यचं हाय. त्यांन मरणाच्या भितीनं सा-या जगाला नाचवलय. पर आये त्याला काय धिंगाणा घालायचा त्यो घालू द्येत. आपून  त्या नाचात  सामिल हुयाचं नाय. दुरूनच तमाशा पघायचा आन सोताला जपायचं ह्ये ध्यानात ठेवलंय.

आये. .  समजून घेशील नव्हं ? म्या हिथं सुखरूप हाय. , ‘काळजीत नगं काळजात रहा,,’ ह्ये तुझं बोल ध्यानात ठ्येवलय. तू  दिलेली गोधडी  काळीज म्हणून पांघरलीया. लई आठवणी जाग्या झाल्यात बघ.  आता  एकटं वाटत नाय . आये ह्ये कोरीनाचं सावट दूर झालं की भेटू  आपण तवर सोत्ताची ,  बा ची आन धाकल्या भावडांची काळजी घेऊ, घेशील नव्हं. म्या इथं सुखरूप हाय ध्यानात ठेव. पत्र लवकरच तुला मिळंल. तवा रडू नगं.  सावर सोताला. नमस्कार करतो. आये असाच आशिर्वाद राहू दे.

                                                              ..तुझा लाडका

                                                                  ..सुजित

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – विजय साहित्य – सौंदर्याचा  आरसा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है  आपका एक मराठी आलेख “सौंदर्याचा  आरसा” )

☆  सौंदर्याचा  आरसा ☆

गाव बदललं, गावातली माणसं बदलली, पण मनातल गाव, गावातलं घर, ते मात्र जसंच्या तसं राहिलं. आठवण झाली  . . . कुठं काहीही कार्यक्रम नसताना, कविसंमेलनाच कारण सांगून घराबाहेर पडलो, नीट तडक गावची एसटी धरली.

जवळ जवळ दहा वर्षांनंतर गावी येत होतो. गावच्या घरापर्यंत  आता टमटम जात होत्या. मला गाव पहायचा होता. गावातले बदल जवळून पहायचे होते. तेली आळीतला लाकडी घाणा. वेशीवरचा मारूती, शाळेजवळचा पिंपळाचा पार, दत्त मंदिर, राम मंदिर, बाजारपेठ, लालू शेठची पतपढी,कासार आउट, मोमीन  आउट, पोस्ट ऑफीस, ग्रामपंचायत कार्यालय, सार सार नजरेखालून घालायचं होत. गावात उतरलो अन् टवाळ पोरागत भिरभिरत्या नजरेने गाव बघू लागलो.

माणस भेटत होती. ओळखीचं हसत होती. जुजबी चौकश्या करीत  आपापल्या कामाला लागत होती. पारावरचे म्हातारेही हातची तंबाखू,  अन तोंडचा विषय सोडायला तयार नव्हते. .

”एकलाच आलासा जणू? पोराबाळांना तरी  आणायचं,  आरं, आंबे, फणसाचा सिझन हाय. . . गावचा रानमेवा तुमची पोरं खाणार कवा ?घेऊन यायचं त्यानला बी , म्होरल्या बारीला ध्यानी ठेव बर. ” असा जिव्हाळ्याचा संवाद करीत ,गावच्या मातीचा सुगंध मनात भरून घेत गावच्या घरात शिरलो.

गावाकडं एक बरं असत. . .  अचानक जाऊन भेटण्याची मजा काही औरच  असते. थोडी गडबड, धावपळ, धांदल  उडते. काहिंची थोडक्यात चुकामूक होते, त्यांना भेटण्या साठी मुक्काम वाढवण्याचा  आग्रह होतो. मी ही मुक्काम वाढवला. कार्यक्रम  उशीरा संपणार असल्याची  आणखी  एक लोणकढी थाप पचवली. अन गावी जाण अपरिहार्य  असल्याचं पटवून दिलं. अन् गावच्या माणसात हरवून गेलो. मनातल्या गावातनं ,प्रत्यक्ष वास्तवात जाताना थोड  अवघड जातं. पण जुन्या आठवणी न भेटलेल्या माणसांची  आठवण भरून काढतात.

गावातल्या घरान गावकी, भावकी जीवापाड जपली होती. वाटण्या झाल्या होत्या. वेळप्रसंगी  मन दुखावली तरी  माणस दुरावली नव्हती. माझ जाण नसल तरी भाऊ , पत्नी,  आई , वहिनी, काका, काकी, आज्जी, यांनी घरोबा जपला होता. वाडवडिलांनी राखलेली वाडी,  फुलवलेलं परसदार, आजही  सणावाराला वानवळ्याच्या रूपात भरभरून प्रतिसाद देत होतं.

भावकीतले चार हात शेतीत, फुलमळ्यात, फळबागेत, परसात, राबायचे, त्यांच्या कष्टान काळ्या मातीचं सोनं व्हायचं. ज्या मातीत लहानपणी खेळत लहानाचे मोठे झालो ती माती राबणारा हातांना भरभरून यश देत होती. माझं गावाकडं प्रत्यक्ष येणं नसलं तरी गावची भावकी संपर्कात होती. घरातले कुणी ना कुणी तरी गावाकडे फेरफटका टाकायचे. त्यामुळे ख्याली खुशाली कळायची. पण रानवारा प्रत्यक्ष श्वासात भरून घेण्याचा  आनंद काही औरच  असतो. त्याचा आनंद मी घेत होतो.  जमेल तितके गाव नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो.

शहरातील बरीचशी खरेदी माझ्याच सल्ल्याने व्हायची. कथा, कविता, जशी माणसाला जगायला शिकवते ना तसा हा निसर्ग, गावच घर जोडून ठेवण्यात यशस्वी ठरला होता. कुणी फुले, फळे, दूध, दही, ताक, लोणी, तूप, खवा, खरवस,  अंडी ,नारळ ,सुपार्माया मागायला यायचं. बाहेर पेक्षा निम्मा किमतीन परसबागेत फुलवलेलं विकलं जायचं. धार्मिक कार्यात तर सढळ हाताने हा दानधर्म व्हायचा.

साहित्यिक जसा साहित्यात रमतो ना, तसं गावच घर या निसर्गरम्य परिसरात व्यस्त झालं होत. लेखकाने कागदावर लेखणी टेकवावी अन  (मोबाईलची बटणे दाबावीत..) अन प्रतिभा शक्तीने भरभरून दान पदरात घालाव तशी गावच्या घरी चारदोन जण मशागत करायची. घरातली जुनी जाणती परसबाग फुलवायची. कुणाला रोजगार मिळाला होता. कुणाला आधार मिळाला होता. गावचा निसर्ग माझ्या आठवणींशी स्पर्धा करीत मला  एकट पाडीत होता. निसर्ग त्याच काम चोख करीत होता.  करवंद , आंबा, काजू, फणस, केळी, पेरू, नारळ, पोफळी यांची वर्णन मी जितक्या उत्स्फूर्ततेने करायचो, तितक्याच  उत्कटतेने निसर्ग त्या त्या ऋतूत भरभरून फुलायचा.

दोन दिवसांनी जेव्हा भरभरून रानमेवा घेऊन घराकडे निघालो ना, तेव्हा त्या जडावलेल्या पिशव्यांसारखच मनही भरून  आलेलं. दहा वर्षानंतर अचानक मला पाहिल्यावर आजीच डोळही असंच भरलेलं.  या गावान शब्दा शब्दातून जीवन जगायला शिकवले. माझ्यातला कवी, लेखक,कलाकार जिवंत ठेवला तो याच निसर्ग सौंदर्याने.  ह्रदयाच्या दाराला  अक्षरलेण्यांच तोरण बांधल ते इथल्याच अनुभूतीनी . निसर्गाच हे देणं , मांगल्याचं समृद्धीचं लेण अजमावून घेण्यासाठी मी ठरवल.  आता जास्तीत जास्त वेळा, वेळ काढून गावाकडे यायचंच. गावाकचं हे घर  म्हणजे  आमच्या वाडवडिलांच्या पूर्वसंचिताचा वारसा  आणि  …आणि या घरात राहणा-या माणसांच्या अंतरंगातील आणि भोवतालच्या निसर्गातील सोंदर्याचा आरसा

(श्री विजय यशवंत सातपुते जी के फेसबुक से साभार)

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 48 – लाॅकडाऊन चे दिवस  ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  “लाॅकडाऊन चे दिवस ।  सुश्री प्रभा जी एवं विश्व में कई लोगों  के जीवन में  ऐसे अनुभव आये हैं जब हमने जीवन का एक नया भयाक्रांत स्वरुप देखा है। पारिवारिक संबंधों  में प्रगाढ़ता एवं जीवन जीने का नया सलीका सीखा है या कहें कि समय ने हमें सिखा दिया है। मानव मन परिवर्तनशील है । भीषण आपदा से गुजरने के बाद शिक्षा लेने के बजाय  बुरे दिन जल्दी ही भूल जाता है । ईश्वर करे उसे सद्बुद्धि दे ।  आरोग्य से बढ़ कर कोई धन नहीं ।  आइये हम सब मिल कर सुश्री प्रभा जी की प्रार्थना की दो  पंक्तियों को सामूहिक स्वरुप दें ।  कहते हैं सामूहिक प्रार्थना  ईश्वर अवश्य सुनते हैं। इस  मानवीय संवेदनाओं से पूर्ण रचना लिए उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 48 ☆

☆ लाॅकडाऊन चे दिवस ☆ 

22 मार्च ला “कोरोना विषाणू”  चा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र कर्फ्यू ठेवण्यात आला. आम्ही पुण्यात सोमवार पेठेत रहातो, माझा मुलगा, सून, नातू पिंपळेसौदागर ला! सध्या मुलगा कंपनी च्या कामासाठी सिंगापूरमध्ये आहे, या शैक्षणिक वर्षात सून आणि नातू सिंगापूरला जाणार होते, तसं प्लॅनिंगही झालं पण अचानक आलेली ही “कोरोना” ची आपत्ती, कर्फ्यू च्या आदल्या दिवशी सून आणि नातू पिंपळेसौदागरहून सोमवार पेठेत रहायला आले..

अलीकडे माझी तब्येत बरी असत नाही, शुगर, बीपी बरोबरच  आता कमरेचं दुखणं, कर्फ्यू नंतर कामवालीला येऊ नकोस म्हणून सांगितलं…..

सून सुप्रिया आणि नातू सार्थक आल्यामुळे घराला घरपण आलं,आल्या आल्या सूनबाईंनी सफाई मोहिम हाती घेतली, तिच्या येण्यानंच घर उजळून निघालं, आज महिनाभर आम्ही एकत्र आहोत , भांड्याला  भांडं ही लागलं नाही की आवाज ही झाला नाही,  सारं कसं सुरळीत चाललंय…तू तू मै मै करायची मानसिकताच नाही….

“कोरोना” चं हे जागतिक संकट…सगळेच हवालदिल, सतत टीव्ही वर “कोरोना” बाधितांचे आणि मृतांचे आकडे…..या संकटाचं निवारण व्हावं म्हणून ईश्वराची प्रार्थना!

नातवाची घरातली किलबिल सुखावणारी, सुरूवातीचे काही दिवस तो कंटाळायचा…एकटाच ना  ! खेळायला मित्र नाहीत…पण त्याला वाचनाची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, तो वाचतो, चित्र काढतो, टेरेसवरच्या बागेत जातो, व्यायाम करतो, घरातल्या कामातही मदत करतो, आम्ही पत्ते खेळतो, सापशीडी, कॅरम खेळतो,

आम्ही टीव्ही वर सिनेमा, रामायण, महाभारत पहातो! घरातली सगळी कामं स्वतः करावी लागताहेत, बराचसा भार सूनबाईंनी पेललाय!

अमंगळ टळेल, जगरहाटी परत सुरू होईल, पण हे लाॅकडाऊन चे दिवस ….समजूतदार दिवस कायम आठवणीत रहातील. एखाद्या “गढी” मध्ये  रहाणा-या बायका जशा पूर्वी रहायच्या चार भिंतीत तसंच….फरक इतकाच की नोकर चाकर कुणी नाही, धुणी भांडी, स्वयंपाक पाणी, झाडू पोछा….सारं कसं बिनबोभाट….चार भिंतीत! सतत कानावर येतंय, घरात रहा, सुरक्षित रहा! तेच स्विकारलंय,गरजा खुप कमी झाल्यात…..एक वेगळं जग पहातोय, अनुभवतोय…. शेवटी हे कळतंय जान है तो जहां है!

हे निवांत आयुष्य पुन्हा वेग घेईल ! परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवेल शहाणं करेल, लाॅकडाऊन चा “हा सिझन” मोठी कामगिरी करून दाखवेल. ॥शुभम् भवतु ॥

सा-या जगाचसाठी मागेन दान देवा

आरोग्य दे  इथे हा लाभो अमोल ठेवा

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा……. भाग -2 ☆डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी का मराठी के सुप्रसिद्ध साहित्यकार  स्व कृष्ण गंगाधर दीक्षित जो कि कवी संजीव उपनाम से  प्रसिद्ध हैं  के  व्यक्तित्व एवं कृतित्व पर सारगर्भित मराठी आलेख  कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा……..। आदरणीय कवी संजीव जी का जन्म 12 अप्रैल को सोलापुर के वांगी गांव में हुआ था। मराठी साहित्य के इस महत्वपूर्ण दस्तावेज की लम्बाई को देखते हुए इसे दो भागों में प्रकाशित करने का निर्णय लिया है। आज प्रस्तुत है इस आलेख का प्रथम भाग। कृपया इसे गम्भीरतापूर्वक पढ़ें एवं आत्मसात करें। )

 

☆  कवी‌ संजीव यांची जयंती….. त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा…….. भाग -2 ☆

१९८० च्या गझलगुलाब नंतर, कवी संजीवांनी *मराठी साहित्य विश्वात नवीन प्रयोग केला,* उर्दु साहित्यात शायरीची अक वेगळी उंची आहे,  त्या उर्दु शायरीचे उन्मत्त सौदर्य व कल्पनाविलास आपण मराठी साहित्यातही दे्वु शकतो याची प्रचीती *१९८३ साली प्रकाशित झालेल्या मराठी शायरी ने साहित्यरसिकांना दिली.*  मराठीच्या प्रकृतीला केवळ भक्तीगीते व वीरगीतेच शोभुन दिसतात अशा विधानाला छेद देण्याचे काम *शाहिर राम जोशी होनाजी बाळा याच्या बरोबरीने कवी संजीवांनी केले.*

संजीवांनी रंगबहार या संग्रहात *कुपी घेतली उर्दुकडून पण तिच्यात अत्तर भरले ते मात्र स्वताच्या ह्रदयातुन…*

कवी संजीव रंगबहार मध्ये लिहीतात……

 

*पहाटेच्या पायऱ्या ऊतरून*

*सुर्य थोडा खाली आला*

*फुलानं विचारलं रात्र कशी ?*

*सुर्य लाजुन गुलाबी झाला*

 

या कवितेच्या तारुण्याचा गंध किती नाविन्यपुर्ण आहे..  *टवटवित आहे…. जणु एखादं तलम वस्त्र..*

शायरी लिहीताना *शृंगार, प्रेम, मीलन, विरह* या निरनिराळ्या छटांचे दिग्दर्शन संजीवांनी यामध्ये साधलेले आहे.

 

*खिडकी आता लावू नकोस*

*चंद्र जरी ढळला आहे*

*तोही सखे माझ्यासारखाच*

*तुझ्यासाठी जळला आहे……*

 

दुसरी शायरी….

याच्याहीपुढे जाते….

 

*बाटलीभर अत्तरासाठी*

*लाख फुलांचा जातो बळी*

*लाख शृंगार सांगुन जाते*

*गालावरची एकच खळी………*

 

शायरी,

*उर्दु शायरी पेक्षा ही मराठी कुठेही कमी वाटत नाही…….*

 

संजीवांच्या शायरीला *विनोदाची सुद्धा तितकीच सुंदर* झालर लाभली आहे….

 

*डॉ्क्टर साहेब औषध कशाला*

*मरणार नाही होईन बरा*

*माझ्या समोर एकदा तीला*

*गजरा घालुन हजर करा…,,*

 

अशा रितीने रंगबहार ची बहार कवी संजीवांच्या काव्यात दिसुन येते….

 

१९८६ साली कवी संजीवांच्या पत्नी *सौ. विमल दिक्षीत यांनी विनंती केली, नव्हे हट्ट केला असे म्हटले तरी चालेल,* आणी त्या स्त्री हट्टापुढे सपशेल शरणागती स्विकारत पत्नीच्या हट्ट पुर्ण करण्यासाठी संजीवांनी *देवाचिये द्वारी हा अभ्ंग संग्रह* प्रकाशीत केला….  या त्यांच्या अभंग संग्रहाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या वयाच्या *७४ व्या वर्धापनदिनानिमीत्त प्रकाशीत करण्याचा योगायोग साधला….* या अभंग रचनेत सुद्धा कवी संजीव त्यांचे वेगळेपण जपतात आणी जनतेलाच सवाल करतात…

 

*गाथा तुकोबारायाची बुडविता वर आली*

*ओवी ज्ञानेशाची कशी सांगा अमृतात न्हाली*

*मीरा लाडकी शामाची सांगा कसे विष प्याली*

*झाला वाल्मिकी महर्षी वाल्या पापाचा तो वाली*

*याचे द्यावया उत्तर झाले किती निरुत्तर*

*युगा युगांनी मांडला जन्म मरणाचा फेर….*

 

१९८६ साली प्रकाशित झालेला *”आघात हा काव्यसंग्रह,”* माणसाच्या मनावर आघात केल्याशिवाय रहात नाही….

 

कवी सहजच आपलं दुख सांगताना मनातील *सल बोलुन जातो…..

*धुंदीत आसवांच्या  दुखास भेटलो मी*

*आरक्तली फुले ही  काट्यात फाटलो मी*

 

*जखमा खिरापतीच्या    मी वाटील्या स्वहस्ते*

*सर्वांगी विद्ध होता       शौर्यास भेटलो मी*

 

*संघर्ष यात्रीकांचा   हल्ले छुपे कुणाचे*

*शब्दास धार येता  युद्धास पेटलो मी*

 

*सारे असेच आहे  स्पर्धा अशा अडाणी*

*त्याच्या कुठे पताका ?  चिंध्यास भेटलो मी ….*

 

तर कधी कधी हा कवी *माणसाच्या मानवतेवरच आघात* करतो आणी लिहीतो…..

 

*गर्दीत माणसांच्या    माणुस सापडेना*

*लाटेत सागराच्या   जलबिंदू सापडेना*

 

*अपुल्याच पालखिचे       सारे लबाड भोई*

*बेवारशी शवाला       खांदेकरी मिळेना….,*

 

*माणुसकी न येथे      मनी हाय हाय होई*

*देशात या कुठेही    काळीज सापडेना….*

 

आघात मांडताना हा कवी मानवतेपुढे हजारो प्रश्नचिन्ह उभे करतो…..,

 

कवी संजीव यांनी *कविता-लावण्या-अभंग* याबरोबरच काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या *‘भाऊबीज’* या चित्रपटातील बहारदार गाणी आजही सर्व अबालवृद्धांच्या ओठावर आहेत.

*‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’,*

*‘असा कसा खटयाळ तुझा,*

 *‘खुलविते मेंदी माझा रंग गोरापान गं’,*

*’चाळ माझ्या पायात पाय माझे तालात नाचते मी तो-यात मोरावानी’,*

*‘पडला पदर खांदा तुझा दिसतो गं कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो’,*

*‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे’,*

 

या गीतांना स्वरांचा साज *आशा भोसले* यांनी चढवला आहे.

 

संगीताचा साज *वसंतकुमार मोहिते* यांनी दिला आहे त्याचप्रमाणे *‘थोरातांची कमला’* या चित्रपटातील *‘कधी शिवराय यायचे’, ‘झुळझुळे नदी बाई’* ही गीतेही लोकप्रिय ठरली. या गीतांना *दत्ता डावजेकर* यांनी संगीतबदद्ध केले असून *उषा मंगेशकर* यांनी ही गीते गायली आहेत.

 

तसेच *‘आवाज मुरलीचा आला’* हे भावगीतही *माणिक वर्मा* यांच्या स्वरांनी लोकप्रिय झाले. या गीताला *डी. यू. कुलकर्णी* यांनी संगीतबद्ध केले आहे.

 

कवी संजीव यांनी एकंदर ५० वर्षे सातत्याने लिखाण करून सोलापूरच्या काव्यविश्वात *कवी कुंजविहारीनंतरचे ख्यातप्राप्त कवी म्हणून सर्वश्रृत झाले.* त्यामुळे सोलापूर हीच त्यांची जन्मभूमी व कर्मभूती आहे.

 

दि. २८ फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काव्यगगनातील एक तारा निखळला. पण ते त्यांच्या बहारदार गीतातून आजही अजरामर आहेत.

 

जेथे जेथे मराठी बाणा आहे, तेथे तेथे त्यांची गीते भविष्य

काळातही गायली जातील, यात शंका नाही; पण *मराठी साहित्य परिषदेला त्यांचा विसर पडला असून त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी होऊ नये,* हे दुर्दैव!

 

पुरोगामी महाराष्ट्रालाही याची आठवण होऊ नये, यात नवल ते काय?

 

*कवी संजीवांसारख्या उत्तुंग प्रतिभावान साहित्यिकांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वंदन!*

 

© ® डॉ. रवींद्र वेदपाठक

कवी, लेखक, प्रकाशक

सूर्यगंध प्रकाशन, पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा…….. भाग – 1 ☆डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी का मराठी के सुप्रसिद्ध साहित्यकार  स्व कृष्ण गंगाधर दीक्षित जो कि कवी संजीव उपनाम से  प्रसिद्ध हैं  के  व्यक्तित्व एवं कृतित्व पर सारगर्भित मराठी आलेख  कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा……..। आदरणीय कवी संजीव जी का जन्म 12 अप्रैल को सोलापुर के वांगी गांव में हुआ था। मराठी साहित्य के इस महत्वपूर्ण दस्तावेज की लम्बाई को देखते हुए इसे दो भागों में प्रकाशित करने का निर्णय लिया है। आज प्रस्तुत है इस आलेख का प्रथम भाग। कृपया इसे गम्भीरतापूर्वक पढ़ें एवं आत्मसात करें। )

☆  कवी‌ संजीव यांची जयंती….. त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा…….. 

मराठी साहित्यातील काव्य क्षेत्रात अनेकांनी आपला ठसा उमटवला आहे. आद्य कवी केशवसुतांपासून ते अगदी आजपर्यंत अनेकांनी आपल्या दर्जेदार काव्याची निर्मिती करून वाचकांना जणू भुरळच घातली आहे. या काव्य क्षेत्रात आपल्या लीलया लेखणीने मुशाफिरी करून कवितेबरोबरच *लावणी, अभंग, शायरी इ. प्रकार निर्माण करून काव्यगगनात ध्रुवता-याप्रमाणे अढळ झालेले थोर गीतकार म्हणजे संजीव!*

*कृष्ण गंगाधर दीक्षित* यांचा जन्म दि. १२ एप्रिल १९१४ रोजी दक्षिण सोलापुरातील वांगी या गावात झाला. बालपणीचं त्यांचे पितृछत्र हरपल्यामुळे ते त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे *प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्र. १ येथे १९२१ ते १९२५ या काळात झाले.* पुढे मॅट्रिक झाल्यावर, मुंबई येथील पूर्वीचे बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे आताचे सर जे. जे. कलामहाविद्यालय, येथे कलाशिक्षणाकरिता त्यांनी प्रवेश घेतला.

१९३९ साली त्यांनी *जी. डी. आर्ट* ही पदवी संपादन केली. ते व्यवसायाने *छायाचित्रकार व मूर्तिकार होते.* त्यांची अनेक तैलचित्रे, व्यक्तिचित्रे, पुतळे प्रसिद्ध आहेत. सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांनी साकारलेले पुतळे बसवले आहेत. काही काळ त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत *कला शिक्षक* म्हणून नोकरी केली. पूर्वीच्या काळी *छायाचित्रकाराचा* व्यवसाय म्हणजे एकेकाळी रोजचेच हातावर पोट असे; पण संजीव काव्याच्या नादात असत.

*कै. तात्यासाहेब श्रोत्रीय* हे त्यांचे काव्य क्षेत्रातील गुरू. त्यांनी संजीवना काव्यशास्त्राचे पाठ दिले व वृत्तछंदाची गोडी निर्माण केली. संजीवांनी *प्रथम गणेशोत्सवातील मेळयासाठी गाणी लिहिली. तसेच गद्य-पद्य संवादही लिहिले.*

*॥ माझा राजबन्सी राणा॥*

*॥ कोणी धुंडून पहाना॥*

१९३० साली लिहिलेले त्यांचे हे पहिले गीत. त्या काळातील *सुप्रसिद्ध गायिका मेहबूबजान* यांनी या गीताला स्वरसाज चढवून हे गीत लोकप्रिय केले. या गीतच्या अनेक *ध्वनिमुद्रिका* निघून त्या घरोघरी पोहोचल्या.

त्यानंतर

*१९३५ साली ‘दिलरुबा’* हा त्यांचा *पहिला काव्यसंग्रह* त्यांनी स्वत:च प्रकाशित केला.

या काव्यसंग्रहाला *औंध संस्थानचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधी यांची प्रस्तावना आहे.*

या काव्यसंग्रहात एकंदर *४४ कविता* आहेत. कवी संजीव शारदेला अभिवादन करताना म्हणतात,

*विश्वमोहिनी ! हंसवाहने!*

*सुकाव्य संजीवने ! शारदे ॥*

*संजीवाची असोत तुजला ! अनंत अभिवादने॥*

याचप्रमाणे त्यांचे *प्रियंवदा (१९६२), माणूस (१९७५), अत्तराचा फाया (१९७९), गझल गुलाब (१९८०), रंगबहार (१९८३), आघात (१९८६) देवाचिये द्वारी (१९८६) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.*

त्यांच्या *‘दिलरुबा’ या काव्यसंग्रहातील ‘गोफणीवाली’* ही सुंदर कविता –

*॥ ही नार सुंदर सदा हासरी लाजरी नजर॥*

*॥ होईल पाहता हिला कुणाची नजर॥*

कवितेतील गोफणीवाली ही *निर्दोष आणि आनंदायक* आहे. यातील *शब्द आणि कल्पना* यांचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे या कवितेवरून गोफणीवालीचे चित्र कोणत्याही चित्रकाराला सहज काढता येईल.

*१९३५ साली आलेल्या दिलरुबा* नंतर दुसरा कविता संग्रह रसिकांच्या हातात येण्यासाठी जवळ जवळ *२५-२६ वर्षे वाट पहावी लागली* व रसिकांना मिळाला *प्रियवंदा* हा संग्रह…. संजीवांची अप्रतिम विचारशक्ती व कल्पनाशक्ती या संग्रहात अवतरली आहे….

जाता जाता कवी सांगुन जातात

*हसण्यापेक्षा कधी कधी*

*रडणे मला प्यारे आहे*

*वसंताहुन ठिबकणारी*

*आषाढाला धार आहे…..*

वसंताचा निसर्ग, आषाढाचा पाऊस  या दोन्हीतील सुक्ष्म फरक कवीने खुप रितीने मांडला आहे….

त्याच जोडीला *प्रियवंदा मध्ये शृंगाराचे वर्णन* करताना संजीव सांगतात…

*वितळू ये चल आपण दोघे, पार्थिवतेचे होवो पाणी*

*या पाण्याला अलग कराया, जगात नाही समर्थ कोणी…….*

अशा प्रकारच्या रचना हा कवी *संजीवांचा प्रांत..* या कविता लिहीताना कवी संजीव एक वेगळेच व्यक्तीमत्त्व होवुन जातात

त्यांच्या ‘प्रियंवदा’ या काव्यसंग्रहात एकूण *१६५ कविता आहेत.*

*”माणुस १९७५ साली प्रकाशित केला…..”* त्याला अभिप्राय  आहे थोर विचारवंत *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,* तर *”माणुस ला प्रस्तावना दिली ती कवी संजीवांचे मित्र मा. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे”*  यांनी.

*१९७५ साली यामध्ये सुशिलकुमार शिंदे* लिहीतात कवी संजीव यांच्या कवितांचा मी शालेय जीवनापासुनच चाहता आहे, आणि त्यानंतर त्यांच्या सहवासात घालवलेल्या काही चागल्या क्षणांचा माझ्यावर परिणाम झाला आहे…. या *”माणुस संग्रहात”* कवी संजीवांनी मानवी जीवनाच्या लक्षवेधी जीवनाची विविध मनोहारी रुपे व त्यांच्या *आत्म्याच्या आक्रंदनाचे प्रखर अविष्कार*  मांडले आहेत. जो एक प्रकारचा चटका लावुन जातो…..

यामध्ये *ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी* बद्दल ते लिहीतात….

*’ की हा जो जयजयकार होतो आहे, तो  माझ्याहुन महान कविचा आहे…. पण त्याची आणी माझी जात एकच आहे….” कवीची.*

गणेशाला कवी संजीव लिहीतात….

*व्यासांचा तु लेखणिक झालास*

*मला तुला कारकुनु करायचे नाही*

*तु देव आहेस देवच रहा*

*आशिर्वाद देशील न देशील*

*किमान आमचे कौतुक तरी पहा….,*

तर *माया या मुक्तछंद कवितेत* थोडक्यात ते घराचे घरपण सांगुन जातात…

*अंगठा तुटतो चांभार म्हणतो*

*माया कमी आहे, शिवता येत नाही खिळाच ठोकतो*

*शिंपी म्हणतो, झंपरला कापड कमी पडते*

*कापडात माया कमी पडते, याचं सुरकचं शिवतो*

*लाकडात माया कमी पडते,*

*सुतार म्हणतो आकार लहान करतो*

*दगडात माया कमी पडते*

*तेव्हा गवंडी चुना सिमेंट भरतो*

*आणी अशी ही माया आतड्याची कातड्याची कमी पडते*

*तेव्हा घराचा चिरा चिरा निखळतो.*

*जानेवारी १९७९ साली तमाशा कला कलावंत विकास मंदिर मुंबई* या संस्थेने तमाशा कलावंतांसाठी नवे साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना *वग, लावण्या, गणगौळण, फार्स इ.* साठी साहित्य मिळावे या हेतूने काव्य लेखन स्पर्धा घेतली होती, त्या स्पर्धेतुन जास्त साहित्य मिळाले नाही परंतू  त्यातून *कवी संजीव यांनी तमाशा कलावंतांसाठी लेखन करायचे ठरवले आणी त्यातुन जन्म झाला अत्तराचा फाया या लावणी संग्रहाचा.*

जवळ जवळ *४५ लावण्यांचा हा अप्रतिम दर्जेदार लावणी संग्रह,* राम जोशी यांच्या सोलापुरातच लावणीने पुन्हा मुळ धरले…..

*अत्तराचा फाया* या संग्रहात..

*हिरव्या मिरचीला पांढरी लसणी गं*

*मी कुटायला बसले चटणी……!!*

*लवंगी मिरची घाटावरची*

*पहिली तोड ही आहे वरची*

*आहे तिखट नाही मी अळणी*

*हिरव्या मिरचीला पांढरी लसणी गं*

*मी कुटायला बसले चटणी…..!!*

*ठेचुन ठेचुन ठेचा केला*

*कुटून कुटून मऊ किती झाला*

*असा आणावा लागतो वटणी…..!!*

अशा लावण्यांनी तमाशा कलावंतांसाठी व तमाशा रसिकांसाठी साहित्याचे दालन उघडे केले..

संजीवांनी लिहिलेल्या विपुल *लावण्यात रसाळ ढंग, मार्मिक आणि नेमकी अचूक शब्दरचना, कुशल अशी वजनदार लेखणी, काव्याला आवश्यक असणारे ओजमाधुर्य, प्रासादिक रचना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभावी रसाविष्कार आणि गेय शब्दांची सुयोग्य गुंफण* हे गुण त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने आढळतात.

१९८० साली आलेला काव्यसंग्रह *गझलगुलाब,*

याच गझल गुलाब मधील एक शेर आपण सर्वजण पहात आहात…

*यात्रा तुझी नी माझी आनंद वर्धनाची*

*गोवर्धना धराया किमया करांगुलीची*

या गझल गुलाब मध्ये  *गुलाबी गझल* येणे हो ओघानेच येते…. यात कवी संजीव लिहीतात……

*आज सखी न्हाऊन आली उजळण्याची उजळणी*

*रम्य ऋतू रत्नांकितेची आजा आली पर्वणी*

*अलक पुलकी गंधविणा    स्वैरली वीणावती*

*साज विसकटला तरी ही    मुक्त कच ती वारूणी*

*वारुळातुन नाग आले स्वर्ण चंपक अंगणी*

*गंध दंशित अष्टअंगी भारली सौदामिनी*

*स्पर्श गंधे वायू पेटे  परिसरला मंत्रुनी*

*आणि या आमंत्रणाला संपलो स्विकारुनी….*

आणी त्याच *गुलाबी गझल बरोबर, माऊली, तांडव, शोध* अशा वेगळ्या गझलही वाचायला मिळतात,

*कृष्णार्पण या गझल* मध्ये कवी संजीवांचे शब्द थेट मनाला भिडतात…

*भोगलेले सोसलेले  सर्व तुजला अर्पिले*

*म्हणुनी कृष्णार्पण स्वहस्ते  उदक आता सोडीले*

*ना धरेची ना नभाची     क्षितीज रेषा राहीले*

*घेवुनी रेषाच साऱ्या     आकृती मी जाहले*

*आकृतीला प्रकृतीचे     सर्व काही लाभले*

*भोगलेले…….*

*कधी फुलावे कधी गळावे   पुष्पिता मी वंचीता*

*मी व्रतस्था म्हणुनी कोणा    फुल नाही वाहीले*

*उधळिलेल्या अक्षतांना      शुभ सुमंगल गायीले*

*भोगलेले…….*

*अक्षतेची अक्षता मी    तशीच तबकी राहीले*

*त्या रित्या तबकांत आता  काय शिल्लक राहीले *

*राहीले मी फक्त शिल्लक  आणी प्रभुची पाऊले….*

 

त्यांच्या कविता या *उच्च दर्जाच्या* आहेत. त्यांच्या कवितेत *ईश्वरविषयक, सामाजिक भान, जीवनाविषयक चिंतन प्रकट करणारे गुण आढळतात.*

तसेच त्यांनी

*स्त्री जीवनातील बारकाव्याचे सूक्ष्म निरीक्षण होते.* स्त्री जन्माची चित्रविचित्र कहाणी ही तिच्यातील संमिश्र भावभावनांनी भरलेली एक अमर कहाणीच आहे.

*॥ धार दुधाची डोळयात एका॥*

*॥ डोळयात एका पाणी॥*

या त्यांच्या शब्दातून जणू जगन्माताच बोलते आहे, असे वाटते.

……. क्रमशः भाग 2 —–

 

© ® डॉ. रवींद्र वेदपाठक

कवी, लेखक, प्रकाशक

सूर्यगंध प्रकाशन, पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती विशेष – आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। आज प्रस्तुत है परम आदरणीय  बाबासाहेब भीमराव आम्बेडकर जी  की जयंती के अवसर पर उनका विशेष आलेख  आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव। 

 

☆ आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव☆

 

सध्या जगभरात कोरोनाने जो हाहाकार माजवला आहे. त्यात जगभरातून लाखांवर बळी गेलेत. एका जागी कधी न थांबणारा माणसाने स्वतःला एका जागी कोंडून ठेवलेय. आणि याचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून जगभरातील सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. आणि सगळ्या जगाला कळून चुकले की स्वतःला घरात ठेवण्या शिवाय सध्यातरी पर्याय नाहीये. म्हणूनच लाॅकडाऊनचा पर्याय सध्या प्रभावी मानला जातोय आणि भारताने सुद्धा हाच पर्याय निवडला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 144 देशात लागू आहे. आणि पुर्णपणे संचारबंदी लागू आहे.

अशा परिस्थितीत श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव. वरिल दिवस म्हणजे भारतीय संस्कृती आणि प्रत्येक भारतीयांसाठी सणच. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणे, सामाजिक बंधूत्वाची भावना वाढीस आणून आपापसातील सामाजिक एकोपा निर्मान करणे हा उद्देश असतो. आणि दरवर्षीच जगासाठी ही मिसाल बनून जातो.

पण अशा उत्सव काळात ‘लाॅकडाऊन ‘ सुरू असल्यामूळे एकत्र येऊन उत्सव साजरा करणे धोक्याचे आहे. हे जाणून या वर्षी एकदम आगळं- वेगळं असं ऑनलाइन जयंतीचं उदाहरण भारताने पुन्हा एकदा जगासमोर ठेवले. एकीकडे जगभरात लाखांवर लोक गेली. आणि लाखो ग्रसित असतांना जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर असणारा भारतात मात्र ही संख्या आटोक्यात आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटींवर असून सुद्धा काही हजार रूग्ण आहेत म्हणून भारत त्यामानाने सुदैवी आहे. पण गाफील राहुन चालणार नाही. म्हणून विविध उपाययोजना सरकार करतेय. आणि शासनामार्फत खबरदारीसाठी जे काही निर्णय घेण्यात येत आहेत. मग त्यात काही कठोर निर्णयही आहेत. ते अगदी योग्य आहेत. आणि जनतेने त्यांना स्विकार केले आहेत. जनतेचा आणि सरकारचा हा समन्वय खरोखर कौतुकास्पद आहे.

बाबासाहेब नेहमी म्हणायचे की ‘मी प्रथमतः आणि अंतीमतः भारतीय आहे’. वैचारीक पातळीवर विरोध असला तरी. बाबासाहेबांचं वरिल वाक्य आज जनतेने सुद्धा अबाधित ठेवले आहे. आणि आपण किंवा एखादा समुदाय किंवा आपला धर्म याही पेक्षा ‘देश’ मोठा आहे. हे जनतेने आणि शासनाने मिळून सिद्ध केले आहे.

आणि म्हणून या भिम जन्मोत्सवच्या शुभ समयी भारतीय जनतेने एका ठिकाणी न जमता ऑनलाइन पद्धतीने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. सोशल मिडिया द्वारे विविध स्पर्धा असतील, निबंध लेखन असेल, बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रश्नावली असेल, असे अनेक उपक्रम राबवून हा भिमोउत्सव साजरा केला जातोय. आणि आंबेडकरी जनतेने खरोखर जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

याबद्दल जनजागृतीसाठी शासकीय पातळीवर, आणि इतरही सामाजिक संघटनांमार्फत, राजकीय पक्षांमार्फत आणि जनतेनेही वयक्तीक रित्या जनजागृती करून जयंती घरीच साजरी करायची असे आवाहन केले. त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो. कारण प्रत्येकाने निस्वार्थ पणे आपापली जबाबदारी पेलली आहे. सामाजिक एकोपाचे हे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले. आणि हाच एकोपा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचा संकल्प या जयंतीवेळी मी यापुढेही करणार आहे.

असेच सामाजिक बंधूत्व टिकवून ठेवा. घरीच राहा. सुरक्षित राहा. सर्व भारतीयांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

जय भिम जय भारत

 

वंदीतो बाबा तुम्हास मी

होऊनी चरणी नतमस्तक

बीज रूजवले तूम्ही समतेचे

लिहून घटनेचे पुस्तक

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

Please share your Post !

Shares