☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३१ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
मागच्या भागात आपण पाहिलं की, देव- पिता, माता, बालक, पती या रूपात टागोरांना कसे भेटतात. या भागात आपण टागोरांना जाणवणारी देवाची अन्य रूपे पाहू…
देव प्रियकर म्हणून:-
प्रियकर – प्रेयसी यांच्यातील अनोख्या नात्यांचं उदाहरण राधा कृष्ण यांचं आहे. गीत क्र. २३ मधे कवीला वाटतं, प्रियकर रूपातला देव प्रेमरथावर स्वार होऊन येईल. म्हणून प्रेयसी रूपातला कवी त्याची वाट पहात आहे. तो कोणत्या वाटेने येईल? चुकामूक तर होणार नाही नां? त्याच्या भेटीसाठी ती आसुसलेली आहे.
देव मित्र म्हणून:-
गीत क्र.९७ मधे कवी म्हणतो तू बालपणीचा माझा सखा! तू रोज यायचास. आपण एकत्र रानावनात फिरत होतो. तुझी गाणी मी ऐकायचो आणि त्या सुरांच्या वर्षावात माझा मनमोर नाचू लागे. पण तुझं नांव गाव मला काहीच माहित नव्हतं. आज जाणवतं की, लहानपणी ज्याच्याबरोबर आपण खेळलो तो कोणी सामान्य नव्हता हे आपल्याला कळलंच नाही. तो प्रत्यक्ष देवच होता.
देव गायक म्हणून:-
कवीला कधी कधी देव गायकाच्या रूपात दिसतो. तो म्हणतो, तुझी गाणी, तुझं संगीत यांची अवीट माधुरी मला कधी कळलीच नाही. मी अल्पमती होतो. कडे कपारीतून वाहणाऱ्या पाण्याचा नाद म्हणजे तुझेच गीत आहे. आकाशात होणारा गडगडाट, कडकडाट ही पण तुझीच गाणी आहेत. हे मला समजले नाही. तू मात्र तुझ्या गीत संगीताच्या वर्षावानं मला मंत्रमुग्ध करत होतास. (गीत ३)
देव श्रोता म्हणून:-
कधी देव कवीला गीत गाण्याची आज्ञा देतो तर कधी तो कवीची गाणी ऐकायला श्रोता म्हणून येऊन बसतो, कवी म्हणतो तुझ्याच कृपेमुळे मी ही गीते गाऊ शकतो. (गीत २). गीत क्र. ४९ मध्ये कवी देवाला म्हणतो, ” तुझ्या दरबारातली यक्षकिन्नरांची गाणी सोडून तू माझी बेसूर गाणी ऐकायला येऊन बसतोस कारण त्या गीतांतला भक्तीभाव तुला भावतो. तू माझी गाणी फक्त ऐकत नाहीस तर तुला ती आवडली म्हणून जाताना मला बक्षीस म्हणून एक फूल पण देऊन जातोस.”
देव दाता म्हणून:-
देव दाता म्हणूनही काही गीतांत दिसतो. कवी म्हणतो (गीत १), तूच ह्या देहात चैतन्य भरून देतोस (जन्माला घालतोस) आणि एक दिवस हा चैतन्याचा घट रिकामाही करतोस (मृत्यू). माझा आत्मा वेष बदलून पुन्हा पुन्हा या धरणीवर येतो आणि पुन्हा पुन्हा तू त्याची झोळी भरतोस. असा मी युगायुगांचा याचक आहे आणि तू कल्पांतापर्यंत हे दान देतच राहतोस. अशी सुंदर कल्पना ते करतात. तसंच दुसऱ्या कवितेत ते म्हणतात, (गीत ५०) “मी एक भिक्षेकरी! तुझा सुवर्ण रथ दिसल्यावर मला वाटलं की तू सुवर्ण मुद्रा उधळशील आणि मी त्या गोळा करेन आणि खूप श्रीमंत होईन. पण अचानक तुझा रथ माझ्यासमोर थांबला आणि तूच माझ्याकडे भिक्षा मागितलीस. मी बावरलो. माझ्या झोळीतले चार दाणे तुला काढून दिले. असं वाटलं की असला कसला राजा, भिकाऱ्याकडेच भीक मागतो. घरी गेलो. झोळीत असणारा एखादा दाणा भुकेल्या पोटाला द्यावा म्हणून झोळी झाडली तर त्यातून सुवर्णाचे दाणे पडले. मला कळलेच नाही की, तू गरिबांसाठी न मागता दान देणारा दाता असतोस.(कविता ५०)
देव दास म्हणून:-
कवी देवाला भक्तांचा सेवक म्हणूनही पाहतो. गीत क्र. ८१ मधे ते म्हणतात, कामामध्ये वेळ वाया जातो म्हणून दु:खी कशाला व्हायचं? सगळा भार त्याच्यावर टाकून आपण मुक्त व्हायचं. जसा तो संत जनाबाईला कामात मदत करायचा तसा तो आपल्यालाही करेल. दीन दुबळ्यांच्या जवळ तो बसतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्यासाठी उन्हापावसात, धुळीत, मातीत काम करतो. मात्र जे माझ्यासारखे उन्मत्त, अहंकारी आहेत त्यांना त्याचे चरण देखील दिसत नाहीत. (गीत १०,११)
देव राजा म्हणून:-
आपले संत म्हणतात तसं परमेश्वराला आपल्याकडून फक्त भक्तीभाव हवा असतो, दुसरं काहीही नको असतं. (अर्थात आपण त्याला काय देणार? कारण आपलं असं काहीच नसतं. सगळं त्यांनंच दिलेलं असतं.) एका कवितेत त्यांना देव राजाच्या रूपात दिसतो. राजा रथारूढ होऊन येत आहे हे कळताच कवी घाबरून जातो. त्याला वाटतं आता राजाचं स्वागत कसं करायचं? सिंहासन कुठून आणायचं? दिवे, झुंबर कुठून आणायचं? गालीचा कुठून आणायचा? माझ्याकडे तर फक्त एक फाटकी चादर आहे. ती कशी घालू त्याच्या स्वागताला? पण शेवटी कवीचा अंतरात्मा त्याला सांगतो की काही काळजी करू नकोस. त्याला हे काही नको आहे. तो फक्त भावाचा भुकेला आहे.
(कविता ५१)
देव मोक्ष दाता म्हणून :-
सगळ्यात उच्च प्रतीची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती! यामध्ये आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होतं. द्वैत रहातच नाही. एका कवितेमध्ये कवी म्हणतो मला पाहिलं की तुझ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम जागृत होतं. मी नसतो तर तू कोणावर प्रेम केलं असतंस? मला जे जे आवडतं ते ते सगळं मला देतोस. माझं मन जिंकण्यासाठी अनेक रूपे घेऊन माझ्यासमोर येतोस. आता सुद्धा तुझं सर्वस्व मला अर्पण करून माझ्या हृदयात बसला आहेस. कळलंच नाही मला, तुझ्यात मी आणि माझ्यात तू कधी विलीन झालो. जीवा – शिवाचे मीलन झाल्यामुळे मला आता मुक्ती मिळाली आहे.(गीत ५६)
– – – अशाप्रकारे आपल्याला विविध रूपातील परमेश्वर टागोरांच्या गीतांतून पहायला, अनुभवायला मिळतो. ही निरनिराळी रूपे रेखाटताना त्यांचा सुंदर कल्पनाविलास, रूपकांचा वापर, शब्दांची योग्य निवड, मांडणी, मनाला मोहून जाते. अनेक नैसर्गिक घटनांमधून, नैसर्गिक आवाजात त्यांना विधात्याचा भास होत असतो. कवीला सर्वत्र प्रेम प्रतिबिंबित झालेले दिसते. त्यांनी देवाची निरनिराळ्या प्रकारे भक्ती केली असली तरीही अंधश्रद्धेच्या पायावर उभा असलेला कोणताही भक्तीमार्ग त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांची अध्यात्मिक उंची त्यांच्या कवितांमधून जाणवते.
—–
☆ गीत : ९१ ☆
O THOU the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me!
Day after day have I kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life.
All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. One final glance from thine eyes and my life will be ever thine own.
The flowers have been woven and the garland is ready for the bridegroom. After the wedding the bride shall leave her home and meet her lord alone in the solitude of night.
KNOW that the day will come when my sight of this earth shall be lost, and life will take its leave in silence, drawing the last curtain over my eyes.
Yet stars will watch at night, and morning rise as before, and hours heave like sea waves casting up pleasures and pains.
When I think of this end of my moments, the barrier of the moments breaks and I see by the light of death thy world with its careless treasures. Rare is its lowliest seat, rare is its meanest of lives.
Things that I longed for in vain and things that I got ⎯ let them pass. Let me but truly possess the things that I ever spurned and overlooked.
शुभंकरोती साहित्य परिषद या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृत्तबद्ध काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अरुणा मुल्हेरकर यांना त्यांच्या ‘संघर्ष’ या गझलेसाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई-अभिव्यक्ती समुहातर्फे श्रीमती मुल्हेरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
आज त्यांची पुरस्कार प्राप्त गझल ‘संघर्ष’ प्रकाशित करत आहोत.