मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे… ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे… ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

चिंतने अचिंत राहिलो निश्चिल

तेचि किती काळ वाढवावे

अबोल्याच्या काळ आता ऐशावरी

वचनाची उरी उरली नाही

 *

करू आला तो तो केला लवलाहो

उरोचि संदेह दिला नाही

 *

तुका म्हणे मोहे परतेचिना मागे

म्हणुन त्याने त्याग झाला

 *

तुका म्हणे

जन्मभर केलेल्या चिंतनाने मनातील चिंताच नष्ट झाली आहे. त्याच्या मुळे चंचल असनारे मन शांत झाले आहे. आता हे असेच पुढे ही चालायचे. आता मौन पाळायचे आत्मबल प्राप्त झाले आहे. जे काही करण्यासारखे होते ते सर्व केले. बोलण्यासारखे जवळ काही राहिलेले नाही. मनात संभ्रमच उरला नाही. भोग भोगण्याचे मनाचे भोगही आता लांब गेलेत. ते परत येणारच नाहीत. मी स्थितप्रज्ञ झालो आहे. म्हणून आता त्यागाला ही त्यागले आहे.

तुकाराम महाराजांनी आपली  मनस्थिती येथे कथन केली आहे.

ही मनस्थिती तपसाधनेच्या पराकोटीच्या अवस्थेने प्राप्त होते. चिंतन मनाने कोणतीही चिंता चिंताच वाटत नाही. मन, तन स्थितप्रज्ञ होऊन जाते. कोणाशी काहीही बोलण्याची आणि चर्चा करण्याची उर्मीच नष्ट होते. उरतो तो फक्त चिंतनाचा आत्मानंद. मग उरत नाहीत कोणतेच प्रश्न.

आणि यालाच म्हणतात पराकोटीचा त्याग.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी तरी अशी कशी ???? ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी तरी अशी कशी ???? ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे

एकादशी दुप्पट खाशी … तरीही म्हणे मी उपाशी ???

 

एकादशी म्हणून जराशीच लवकर उठले … पटापट आवरून पुजेला बसले

हार – फुलांनी विठूला सजवले … पण ..

पण लक्ष सगळं चुलीशी ..

पोट ओरडतंय ना ..  मी कधीपासून उपाशी …..

 

पटापट केली भगर नि दाण्याची आमटी

खमंग आणि खिचडी जराशी .. अन पित्त नको म्हणून गोडशी लापशी ..

अंमळ जास्तच झालं म्हणत .. सुपारीही खाल्ली की चुकून जराशी ..

तरी का वाटतंय मला . मी आहे उपाशी …..

 

आज भजनाचा स्पेशल क्लास .. आहे ना हो एकादशी ..

मग वामकुक्षी सोडून उठले पटदिशी ..

मेकअप आवरला अगदी झटदिशी ..

साडी नेसले ठेवणीतली झकासशी …

पण निघतांनाही वाटत होतं .. आहे मी उपाशी …

 

संध्याकाळी ‘फक्त’ थालीपिठं खमंगशी ..

चापून खाल्ली लोणकढ्या तुपाशी ..

मागचं आवरून टाकलं अगदीच  पटदिशी ..

टी. व्ही. पहायला अन आडवारले जराशी …

तरी अजून का वाटतंय असल्यासारखं उपाशी ????

 

नकळत डोळा लागला अन मनाला जाग आली जराशी …

पोटात अडकलेले विचार .. हळूच निसटून गेले मनात .. अन दचकलेच जराशी …

मनाचा देव्हारा तर रिकामाच होता .. विठुरायाचा मागमूसही नव्हता ..

त्यालाच नेमकी विसरले कशी … खंत दाटून आली मनाच्या तळाशी ….

 

. अन अचानक कुणीतरी बोललं कानाशी …

उठून बसले मी पटदिशी …

उपास उपास म्हणत दुप्पट की खाल्लंस …

आणि माझ्याकडे नेमकं दुर्लक्ष केलंस ..

असू देत आता यावेळी .. माफ करून टाकतो तुला ..

खाण्याच्या नादात पुन्हा मला विसरलीस तर मात्र …

जन्मात मी कधीच भेटणार नाही तुला …

 

माझ्याखेरीज मनात इतर भरताड करतेस कशाला ..

तिथे असू दे जागा फक्त माझ्या नामाला ..

मन भरून सतत मला आठव .. विसरून जा स्वतःला ..

मग मात्र नक्की म्हणशील … मन स्वानंदाने गच्च भरलंय …

नंतर खुशाल म्हण ना की … एकादशी दुप्पट खाशी …

आणि आता मीही नाही मुळीच उपाशी …..

सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ही तर वाहती गंगा ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ही तर वाहती गंगा !! ? श्री आशिष  बिवलकर ☆

नेहमीच येतो पावसाळा,

नेहमीच पडतात खड्डे |

भ्रष्टाचारासाठी वसतात,

रोज नवनवीन अड्डे |

*

रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता,

प्रश्न सर्वसामान्यांना पडतो |

प्रवासात धक्के खात खात,

सहनशील नागरिक घडतो |

*

रस्त्यावर खड्डे पडले रे पडले की 

ज्याचे त्याचे मात्र चांगलेच फावते |

आंदोलकांची तोडपाणी एक्सप्रेस,

या खड्ड्यांवरूनच सुसाट धावते |

*

कोणी करी वृक्षारोपण,

कोणी वाढदिवस तिथेच साजरा |

सेटलमेंट झाल्यावर,

कंत्राटदाराला घाली मानाचा मुजरा |

*

मीठापेक्षा पाण्यामध्ये,

डांबर लवकर विरघळते |

रस्ता दुरुस्तीचे टेंडर,

त्याच्यामुळेच तर मिळते |

*

पुण्यातला जंगली महाराज रस्ता,

त्याला फक्त एक अपवाद आहे |

सज्जन कंत्राटदार कायमचा,

पालिकेच्या यादीतून बाद आहे |

*
रस्त्यात पडणारे खड्डे नसून,

विकासकामांची वाहती गंगा आहे |

वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी,

इकोसिस्टम मधला जो तो नंगा आहे |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “एकादशी वारी…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ एकादशी वारीसौ. वृंदा गंभीर

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

वारकरी आम्ही पंढरीचे

गळ्यात माळ तुळशीची

हाती पताका पांडुरंगाची

गोडी लागली अभंगाची

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… 1

*

पाऊले चालती माऊली संगे

नाम मुखी गातो विठुरायाचे

वारकरी तल्लीन भजनात रंगे

ज्याचे घरी वारी पुण्य कुळाचे

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…. 2

*

डोही तुळस मुखी नाम साजे

विणेकरी मधोमध चाले

टाळ मृदूंग वाजती नागरे

पंढरपूरात वैकुंठ आवतरले

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… 3

*

रींगणाने शोभा दिंडीत येते

माऊली घोड्यावर स्वार होते

तो नयनरम्य सोहळा पाहावा

पंढरीचा वारकरी व्हावा

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… 4

*

एकादशी वारी जीवनी घडावी

पांडुरंगा ची आस मनी जडावी

वृंदा विठूच्या चरणी पडावी

विठूने मनीची आस पूर्ण करावी

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… , 5

 

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुंदर विठ्ठल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुंदर विठ्ठल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कैसी रे सुंदर ऐसीया रे मुर्ती

विश्वाला रे स्फूर्ती जन्म-मोक्ष.

कुणी केला ऊभा पंढरी भुलोकी

विटेवरी सुखी पांडुरंग.

ऐसीया रे वर्ण सावळा रे काळा

विष्णूच रे भोळा जणू तोची.

धन्य-धन्य भक्त मायावीचा देव

नेत्र स्तब्ध भाव तेजस्वीत.

काय थाट-माठ जप पुजा-पाठ

चंद्रभागे काठ अभंगात.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य – रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर + संपादकीय निवेदन – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

🪻 अभिनंदन 🪻

मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनलवर वर्षभर सातत्यपूर्ण विविध नामांकित कवी कवयित्रींच्या कवितांचे उत्कृष्ट रसग्रहण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कविता रसग्रहण पुरस्कार तसेच मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान आयोजित विशेष राज्यस्तरीय युट्युब काव्य सादरीकरण स्पर्धेत *तृतीय क्रमांक * असे दोन पुरस्कार आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. रेणुका मार्डीकर यांना प्राप्त झाला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ✒️💐🌹

🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य  आणि  रसग्रहण

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? काव्यानंद : पुरस्कार प्राप्त रसग्रहण ? 

☆ शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य  ☆ रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆ 

(मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान आयोजित विशेष राज्यस्तरीय युट्युब काव्य सादरीकरण स्पर्धेत पुरस्कार प्राप्त कविता आणि रसग्रहण)

☆ मूळ कविता – शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला – कवी – शंकर वैद्य ☆

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला

दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुख सारा

दिशा दिशा भेदिक धावल्या खड्गाच्या धारा

हे तुफान स्वातंत्र्याचे

हे उधाण अभिमानाचे

हे वादळ उग्र विजांचे

काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला

 *

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान

जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण

रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे

शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे

शिवराय भाग्य देशाचे

हे संजिवन प्राणांचे

हे रूप शक्तीयुक्तीचे

हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला

 *

गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या

शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या

धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार

अधीर हृदयातुनी उमटला हर्ष जयजयकार

 *

 प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस

 सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज

 *

शिवछत्रपतींचा जय हो

श्री जगदंबेचा जय हो

या भारतभूमीचा जय हो

जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला

 

   रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

शंकर वैद्य यांचा जन्म ओतुर महाराष्ट्र येथे जून 15, 1928 साली झाला. जुन्नरला प्राथमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य आधी नागपूर नंतर पुणे व शेवटी मुंबई असे ते नोकरीनिमित्त अध्यापन करत राहिले. त्यांचा कालस्वर हा पहिला काव्यसंग्रह अत्यंत सोपे आणि सहज सुंदर शब्द हे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, कवी लेखक समीक्षक अशा विविधांगी भूमिकांसोबतच ते उत्कृष्ट वक्ते आणि प्रभावी सूत्रसंचालक म्हणून ज्ञात होते.

प्रवासी पक्षी या कुसुमाग्रज यांच्या व कवी मनमोहन यांच्या आदित्य काव्यसंग्रहाचे संपादन शंकर वैद्य यांनी केले. शंकर वैद्यांच्या पत्नी सरोजनी यादेखील प्रतिभाशाली कवयित्री व चरित्र लेखिका होत्या. त्यांच्या मुलाचे नाव निरंजन.

 शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे इत्यादी अनेक त्यांच्या गाजलेल्या कविता

शंकर वैद्य यांची गाजलेली पुस्तके

  • आला क्षण गेला क्षण हा कथासंग्रह
  •  कालस्वर हा कवितासंग्रह
  •  दर्शन हा कवितासंग्रह

शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार

कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मास्टर दिनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार

मुग्ध रसिल्या कवितेचे धनी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते कवी शंकर वैद्य. शंकर वैद्य यांच्या वृत्तीतला समतोल आणि अनाग्रही स्वभाव त्यांनी कधी सोडला नाही. परंपरेतील सत्वशीलतेचा कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता बदलत्या काळातील कवितेशी कुठे सांधा जुळविता येईल याचा त्यांनी चिंतनशील वृत्तीने वेध घेतला होता. वास्तवाचे भान ठेवून सशक्त सौंदर्यवादी काव्यधारेची उपासना करणारे शंकर वैद्य हे कवी होते.

 बीज अंकुरते कसे

 नाजुकल्या वेदनांनी

 मुळे पृथ्वीच्या धमन्या

 होता वृक्ष ये फुलोनी

 लागे मातीच्या इर्षेला

 नव्या जन्माचा डोहाळा

 तिचा जीव वृक्षातून

 रंग गंधात व्यक्तला

 नव बदलाची जाणीव असणारा कवी म्हणून शंकर वैद्यांना ओळखले जाते.

 आई दिसली, उभी उंच सरस्वती

 देवळातल्या चाफ्याची उंच माळ तिच्या हाती

 हात वर धरलेला, तरी माळ रुळे पायी

 अधांतरी चांदण्यात कशी ती चालत जाई

यासारख्या ओळीतून आपल्या आईला रेखाटत हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असणारे कवी शंकर वैद्य म्हणजे विविध भाववृत्ती आपल्या कवितेतून सहजगत्या पकडणारे कवी म्हणून साहित्य वर्तुळात, काव्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध होते. कवितेची कोवळीक जपणारे कविवैद्य यांनी कधीच आपल्या कवितेत आक्रमकपणा आणला नाही. शंकर वैद्य हे मराठी कवितेतलं एक वेगळंच रसायन होतं. पाडगावकर झगमगता माणिक असतील तर वैद्य म्हणजे माजघरातील मंद दिव्याची वात होते. मराठीतील सर्व वृत्तं आणि छंद त्यांना ज्ञात होते.

 शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला

 दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला

अनेक शतकांच्या या महायज्ञातून उठलेली एक केशरी ज्वाला म्हणजे आपले शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज. केवळ एका पूर्व दिशेला नव्हे तर दहा दिशांमधून आज अरुणोदय झाला आहे. शिवछत्रपतींना पाहण्यासाठी दहाही दिशा उजळल्या आहेत. हे स्वराज्य जिथे शिवप्रभूंची केवळ नजर फिरताच सारा मुलुख उभा राहतो. राजांनी इशारा करताच दिशा दिशांनी हातात तलवारी घेऊन इथला मावळा गनिमांवर तुटून पडतो.

 शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा

 दिशा दिशा भेदित धावल्या खड्गांच्या धारा

 हे तुफान स्वातंत्र्याचे

 हे उधाण अभिमानाचे

 हे वादळ उग्र विजांचे

 काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला

हे तुफान स्वातंत्र्याचे आहे. हे उधाण आहे शिवरायांप्रति स्वराज्याप्रति अभिमानाचे. हे वादळ आहे जे धर्मासाठी स्वातंत्र्यासाठी उग्र विजांचे लोळ होऊन आलेले आहे. या उग्र विजांमुळे तममय अशा गनिमांचे तट कोसळले आहेत. चिरा चिरा ढळला आहे.

 कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान

 जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण

 रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे

 शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे

 शिवराय भाग्य देशाचे

 हे संजीवन प्राणांचे

 हे सर्व शक्तीयुक्तीचे

 हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला

आज या सह्याद्रीच्या कडेकपारीतून विजयाचे गान घुमू लागले आहे. अनेक वर्ष आलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे इथली भूमी मृतवत झाली होती पण आज या भूमीत स्वराज्य स्थापन करून माझ्या शिवाजीराजांनी पुन्हा नवे प्राण फु़ंकले आहेत. पुन्हा ही भूमी तेजोमय झाली आहे. रायगडावर माझ्या राजाचा राज्याभिषेक होणार आहे. खडा चौघडा वाजू लागला आहे. शिंगांच्या ललकारीवरती भगवे झेंडे अभिमानाने फडकत आहेत. शिवराय हे माझ्या देशाचे भाग्य आहेत. ते मृतवत झालेल्या स्वराज्यात प्राण फुंकणारे जीवन देणारे प्राणांचे संजीवन आहेत. शक्ती आणि युक्तीच्या बळावर स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती हे देवरूप आहेत. शिवाजीराजा नावाचा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला आहे आणि हा सारा मावळ प्रांत तेजोमय झाला आहे.

 गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या

 शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या

 धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार

 अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

 प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज

 शिवछत्रपतींचा जय हो

 श्री जगदंबेचा जय हो

 या भारतभूमीचा जय हो

 जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला

सप्त नद्याच्या जलाने शिवरायांना स्नान घालून गागाभट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला. शिवराय जेव्हा सिंहासनारूढ झाले तेव्हा अधीर अशा सर्व स्वराज्याच्या हृदयातून शिवरायांचा जयजयकार होऊ लागला.

प्रौढप्रताप पुरंदर- हे शिवाजी महाराजांना महान शौर्य आणि विशिष्टतेचे व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाते. जे युद्धातील त्यांच्या पराक्रम व प्रतिष्ठेला उजागर करते. क्षत्रिय कुलावतंस- यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराज क्षत्रिय योद्धा होते जे परंपरीकपणे भारतीय समाजात योद्धा भूमिका आणि कुलिनतेशी संबंधित असतात. सिंहासनाधीश्वर- याचा अर्थ सिंहासनाचा स्वामी असा होतो जो शासक आणि राजा म्हणून या पदासाठी अगदी सुयोग्य असतो. महाराजाधिराज- याचा अर्थ राजांचा राजा असा होतो जो राज्यकर्त्यांमध्ये त्याचे वर्चस्व दर्शवितो. महाराज श्रीमंत ही एक सन्माननीय पदवी आहे जगामध्ये श्रीमंत म्हणजे श्रीमंत किंवा थोर असे आदरयुक्त दर्जा दिला जातो. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचे पूर्ण नाव आहे श्री हा आदर्श उपसर्ग आहे व छत्रपती म्हणजे राजा किंवा सम्राट की जय याचा अर्थ विजय असो. छत्रपतींचा जगदंबेचा व भारत मातेचा जयजयकार कवींनी प्रस्तुत कवितेचा शेवट करताना केला आहे ज्या जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले, त्या भारतभूचे ते सुपुत्र होते, त्यांचा जयजयकार असो अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक सहा जूनला रायगडावर झाल्यावर जय जय कारातून शतकांच्या विजयी माला उजळल्या त्याची स्मृती म्हणून आज ही शंकर वैद्यांची कविता शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला ही मी रसग्रहणासाठी घेतली आहे.

शेवटी शिवरायांना वंदन करून माझ्या कवितेच्या चार ओळींनी समारोप करते.

 माझ्या राजा, तुझ्यासाठी

 गडकिल्ल्यावर

 पाठवीन पुन्हा पुन्हा

 स्वराज्य समर

© सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पंढरीची वारी…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पंढरीची वारी…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

घण घण घण नभ वाजे.. रुणू झुणू रुणू पवन गाजे

गुणगुणत मनी माझ्या.. भोळी मम भक्ती साजे……

*

आतुर विठू- भेटीला.. ज्ञानराज हे जाती

अवतीभवती त्यांच्या मन माझे दुडदुडे……

*

फिकीर नाही देहाची.. लाजही ना जगताची

देहभान विसरून मन माऊलीस आसावे……

*

पायघड्या घाली धरा.. नभ धरी हे छत माथी

अनवाणी पाऊल मग पुढती पुढती झेपावे……

*

वारा वाजवी संबळ.. जलधारांच्या टिपऱ्या

नामाचा गजर मुखी.. तालातच मन नाचे…….

*

मन धावे अती वेगे.. वाटही मागे पडली

चंद्रभागेच्या सवे हे.. आनंदे मन लहरे……..

*

सगुण रूप माऊलीचे जरी दिसले ना डोळा

चहूकडेच माऊलीचे रूप दिसू लागले…….

 मज चहूकडेच माऊलीचे रूप दिसू लागले…….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिरवाई… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ हिरवाई… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

हिरवी शेते, हिरवे डोंगर, हिरवी ही वनराई

तुझ्या कृपेने आज पाहते

होऊ कशी उतराई ||

 

देण्याचा हा नित्य वसा रे

घेशी तू वरुणा

ग्रीष्मातील त्या उष्ण धरेची

पुरविशी तू करुणा ||

 

पृथ्वी माता हिरवा शालु,

लेते अंगावरी

फळा फुलांचे साज मढवुनी

गंधही दिगंतरी ||

 

गवतफुलांसह, वड, पिंपळ नि अबोली,

चाफा, जाई जलधारांच्या वर्षावाने

चिंब-चिंब होई ||

 

बळीराजासह प्राणीमात्रा

हर्ष मनी होई

घेण्या जीवन, देण्या जीवन

तटिनी झेप घेई ||

 

सृष्टीच्या या विविध रुपातुनी

मानव विस्मित होई

ईशकृपेची करणी सारी

शास्त्र अचंबित होई ||

 

भाग्य आज हे मला लाभले

दीप्ती ही गुण गाई

गाता-गाता, हिरवाई सह

मनी धन्य होई ||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विठू माझा लेकुरवाळा…. संत जनाबाई ☆ रसग्रहण… सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

? काव्यानंद ?

विठू माझा लेकुरवाळा…. संत जनाबाई ☆ रसग्रहण… सौ शालिनी जोशी ☆

विठू माझा लेकुरवाळा l संगे गोपाळांचा मेळा ll

 निवृत्ती हा खांद्यावरी l सोपानाचा हात धरी ll

 पुढे चाले ज्ञानेश्वर l मागे मुक्ताई सुंदर ll

 गोरा कुंभार मांडीवरी l चोखा जीवा बरोबरी ll

 बंका कडियेवरी l नामा करांगुळी धरी ll

 जनी म्हणे गोपाळा l करी भक्तांचा सोहळा ll

  – संत जनाबाई

संत जनाबाईंचा देवाचे भक्तावरील वात्सल्य व प्रेमाचे वर्णन करणारा हा अभंग आहे. दासी जनी, नामयाची दासी, जनी नामयाची तर कधी नुसतं जनी ही अशी जनाबाईंची नाममुद्रा. या विठ्ठलाचे अनेक रूपे जनाबाईच्या अभंगातून व्यक्त होतात. तोच त्यांचा मायबाप, सखा, सांगाती झाला होता.

या अभंगात गुणगान करताना जनाबाई विठ्ठलाला लेकुरवाळा करून टाकतात. सर्व संतांना अंगाखांद्यावर खेळवणारी बाळे करून त्या विठ्ठलाला संसारात गुंतवितात. त्याला मातृभाव देतात. विठ्ठलाची विठाई होऊन तो साऱ्यांचे कुशल मंगल पाहतो. आषाढी कार्तिकीला आईच्या भेटीला आतूर होऊन सर्व भक्त पंढरपूरला जमा होतात. माऊलीच्या अवतीभवती करतात. मातृकाविठाई त्यांचे लाड करते. निवृत्तीला खांद्यावर घेते. तर सोपानचा हात धरते. ज्ञानेश्वर पुढे चालतात. त्याने उजळलेल्या मार्गावरून मुक्ताई चालते. गोरा कुंभार मांडीवर बसतो. चोखा बरोबर चालतो. मग बंकाला कडेवर घेते. तर नामाचा हात धरते. अशा प्रकारे प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे ही माऊली आधार देते.

अठरा पगड जातीचे हे भक्त. पण जात, पंथ भक्तीच्या आड आला नाही. नामस्मरण हाच धर्म आणि विठ्ठल ही जात. त्या माऊलीच्या छत्राखाली सर्व एकत्र आले. पंढरपूरला आपल्या माहेरी ते जमतात. चंद्रभागेत स्नान, वाळवंटात फेर, फुगड्या, आनंदाने भजन करत, नाचत, नामस्मरणात दंग होतात. हा सगळा भक्तीचा सोहळा होऊन जातो. एकात्मतेचेच हे प्रतीक. विठाई आनंदाने पाहते. तिच्यासाठी हा सोहळाच असतो.

खरं पाहता विठ्ठल वेगळा नाही. संतांच्या रूपात येऊन तोच लिला दाखवतो. संत हेच देव. प्रत्यक्ष भगवंतच जगाच्या कल्याणासाठी संतांचे रूप घेऊन अवतरतात. हे जनाबाईंना या अभंगातून सांगायचं आहे. त्यासाठी त्यांनी लेकुरवाळ्या विठ्ठलाचे रूपक केले. हा लेकुरवाळा विठ्ठल मराठी भावकाव्यात अजरामर झाला.

संत जनाबाई नामदेवांपेक्षा मोठ्या होत्या. सर्वच संतांचा सहवास जनाबाईंना घडला. त्यामुळे विठूमाऊलीला संतांच्या मातेच्या रूपात त्या पाहतात. म्हणून संताना विठोबाच्या अंगाखांद्यावर खेळताना पाहण्याची कल्पना सुचली. त्यांच्यासाठी तो भक्तीचा सोहळा झाला. प्रपंच करूनही परमार्थ करता येतो हेच या रूपकातून जनाबाईंना सुचवायचे असावे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आली ज्येष्ठ कृष्ण नवमी 

गेला विठू आनंदूनी ।

माझा ज्ञाना निघे आज

आता अलंकापुरीतून ।।१।।

*

निवृत्ती सोपान आणि

मुक्ता चित्कलिका ।

संगे येतील घेऊन 

नामा जना आणि एका ।।२।।

*
विसो गोरा बंका 

संत गजानन चोखा ।

भक्त येतील घेऊन 

साऱ्या संतांच्या पालख्या ।।३।।

*
संत मांदियाळी 

आता येईल पंढरी ।

भक्त नाचतील 

हरिनामाच्या गजरी ।।४।।

येता एकादशी । 

आता दक्षिण ती काशी ।

जाई फुलुनी भक्तांनी । 

देव बोले रखुमाईसी ।।५।।

*
राही माझी बाळे

आता येतील माहेरी ।

दुमदुमेल माझ्या 

आता नावाने पंढरी ।।६।।

*
भक्त येतात चालत । 

मनीं दर्शनाचा हेत ।

संतांच्या पालख्या 

खांद्यावरुनी वहात ।।७।।

*
नाही पावसाची पर्वा

नाही उन्हाची गणती ।

भूक तीही विसरून 

भक्त मार्ग तो चालती ।।८।।

*
देई वस्त्रे नवी

आणि शेला तो पैठणी ।

कोणते दागिने 

घालू राही अंगावरी ।।।९।।

*
नाथ सोन्याच्या ह्या माळा 

आणि कंठा मोतियांचा ।

मुकुट मस्तकी 

ठेवा कौस्तुभ रत्नांचा ।।१०।।

*
कंठामधे घाला

हिऱ्यामाणकांचे हार।

आणि कानामधे घाला 

स्वामी कुंडले मकर ।।११।।

*
मग तुमचे रुपडे । 

अति दिसेल सुंदर ।

आल्या भक्तावरी घाला 

तुम्ही शेल्याने पाखर ।।१२।।

*
प्रसाद वाटण्या 

रांधू सांगा काय देवा ।

खीर, घावन घाटलं

की मिठाई नि मेवा ।।१३।।

*
उडे लगबग मग

राही आणि विठ्ठलाची ।

करिती तयारी दोघे 

भक्त स्वागताची ।।१४।।

*
येता एकादशी 

ठेवी हात निढळावर ।

जणु भक्ताचे दर्शन 

घेण्या विठूची अधीर ।।१५।।

*
येता एकादशी 

भक्त पोचती पंढरी ।

नाचती आनंदे 

विठुनामाच्या गजरी ।।१६।।

*
झाली दर्शनाची बारी ।

भेटे भक्ता उरोउरी ।

भक्तही सुखावे 

रूप पाहुनी अंतरी ।।१७।।

*
भक्ताच्या पायासी

लावी राही तेल प्रेमे ।

हळूवारपणे 

हात विठूचा तो फिरे ।।१८।।

*

श्रम भक्तांचे ते मग

होऊनिया लुप्त ।

सांगता सोहळा होई 

विठूच्या घरात ।।१९।।

*
आला दिवस काल्याचा । 

बसे भक्तांची पंगत ।

राही करीतसे नाना- । 

विध पक्वान्नांचा बेत ।।२०।।

*
लाडू जिलबी घीवर

आणि पुरणाच्या पोळ्या ।

शेवटी तो मिळे 

दहीपोह्याचाही काला ।।२१।।

*
पार पडता सोहळा 

आला वियोगाचा दिन ।

दुःख भक्तांचे अंतरी । 

मुख विठूचेही म्लान ।।२२।।

*
निरोप देण्यासी । 

देव येई वेशीप्रत ।

भक्त जाता दूरी 

मुख लपवी शेल्यात ।।२३।।

*

भक्त जाईल रमून । 

राही फिरूनी संसारी ।

वाट पाहणे नशिबी । 

मम पुन्हा वर्षभरी ।।२४।।

*

एक दिसाचा आनंद । 

मज येत असे बळ ।

मग राही विटेवरी 

सर्व सोसूनिया कळ ।।२५।।

कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares