उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी भाषेतली अटळ बहुभाषिकता – – – भाग – २ – लेखिका : डॉ. उषा रामवाणी गायकवाड ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

(मोसंबी हे फळ प्रामुख्याने इंडोनेशिया व चीन या प्रांतांतलं आहे. भारतात मेघालय, नागालँड या प्रांतांतही मोसंबीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. पण ‘मोसंबी’ला ‘मोझांबिक’ या देशाच्या नावाचं भ्रष्ट रूप मानलं जातं.) 

इथून पुढे – – 

युद्धाच्या वेळी वा मिरवणुकीच्या वेळी सर्वात पुढे असणाऱ्या हत्तीच्या तोंडावर स्वसंरक्षणार्थ ‘ढाल’ बांधली जात असे. असा ढाल बांधलेला हत्ती सर्वात पुढे चाले. त्यावरून प्रत्येक गोष्टीत पुढेपुढे करणाऱ्या स्त्रीला ‘ढालगज भवानी’ असं नाव पडून वेगळाच अर्थ प्राप्त झाला. हल्ली एखाद्या धीट, भांडकुदळ, उद्धट, पुढे करणाऱ्या स्त्रीचं वर्णन करण्याकरता हा शब्द उपहासाने वापरतात. घंगाळे हे विशिष्ट आकाराचं तांब्यापासून बनवलेलं भांडे. गंगेचं पाणी ज्या भांड्यात आहे त्याला ‘गंगालय’ असं नाव पडलं. ‘गंगालय’ या सुंदर शब्दाचं आपण ‘घंगाळे’ बनवून टाकलं. उलगडा न होणारी, न कळणारी एखादी बाब म्हणजे भानगड. राजस्थान राज्यातल्या अलवर जिल्ह्यातला हा प्रसिद्ध किल्ला. याचं मूळ नाव ‘भानगढ’. गौरवशाली इतिहासापेक्षा हा किल्ला भुताटकीच्या बाबींसाठी प्रसिद्ध आहे. एखादी बाब समजत नसेल तर काय भानगड आहे, असा शब्द यावरून प्रचलित झाला. कर्तृत्वहीन, बावळट, मूर्ख, नेभळट माणूस. अजा या शब्दाचा अर्थ ‘बोकड’ असा आहे. बोकडाच्या गळ्याला दोन स्तन लोंबत असतात. खरंतर, ते निरुपयोगी असतात. दूध देण्यास असमर्थ असून ते दिसतातही विचित्र. यावरून कर्तृत्वहीन, बावळट व्यक्तीला ‘अजागळ’ असं म्हटलं जातं. घिसाडी ही महाराष्ट्रातली लोखंडी काम करणारी फिरती जमात. ती कुऱ्हाडी, कुदळी, टिकाव, फावडी बनवते. हत्यार बनवताना लोखंड गरम करून लालभडक लोखंडावर घणाचे घाव घालून त्याला ते हवा तसा आकार देतात. लोखंड गरम असतानाच त्यावर घाव घालून त्याला आकार देता येतो. लोखंड थंड पडल्यास आकार देता येत नाही. म्हणून घिसाडी गरम लोखंडावर भरभर घण मारण्यासाठी ‘घाई’ करतात. यावरून ‘घिसाडघाई’ हा शब्द बनला. ज्याला फसवता येणं सहज शक्य आहे अशा माणसाला ‘आंडूपांडू’ असं म्हणतात. खरंतर, आंडू आणि पांडू असे दोन शब्द आहेत. वऱ्हाडी भाषेत आंडू म्हणजे लहान मूल.

अनेक राष्ट्रांचा समूह यावरून महाराष्ट्र (गोप, अश्मक, मल्ल, कुंतल, विदर्भ, कोकण) हे नाम अस्तित्वात आलं. मराठी म्हणजे (मऱ्हाटी) मर + हट्ट. ‘मर’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘झाडी’. हट्ट = हाट = म्हणजे वास्तव्य, बाजार, व्यापार. झाडीत राहणारे ते मराठी. जुन्या काळात या प्रदेशाला ‘झाडी मंडळ’ असं नाव होतं. मुंबई बेट इंग्रजांना आंदण मिळण्यापूर्वी ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज भाषेत उत्कृष्ट बंदराला ‘बोम्बो बेहिया’ (बॉम् बहिया) असं म्हणतात. याच शब्दावरून ‘बॉम्बे’ हा शब्द तयार झाला. मुंबईत गाईगुरांना चरण्यासाठीची जागा एका भारतीय नागरिकाने विकत घेतली. तिथे गुरं चरण्यासाठी नियमित जात त्यावरून चरणी – ‘चर्नी रोड’ असं नाव प्रचलित झालं. मुंबई बेटावरून माझगावकडे जाताना पूर्वी खाडी ओलांडून जावं लागे. माझगाव बेटाकडे खाडी ओलांडल्यावर चिखलाने भरलेले पाय धुण्यासाठी खास व्यवस्था होती. तोच विभाग ‘पायधुणी’ म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. गवालिया टैंक हा खरंतर गवळी तलाव. या ठिकाणी मुंबईतले गवळी गाई, म्हशींना पाणी पाजण्यासाठी व धुण्यासाठी घेऊन जात. इंग्रजांनी या गवळी तलावाचं ‘गवालिया टँक’ असं नामकरण केलं. दादर हा गुजराती न्हंशेतला शब्द. हे मुंबईतलं एक मध्यवर्ती ठिकाण. ‘दादर’ म्हणजे जिना ; वरळी आणि माहीम या दोन बेटांना जोडणारा भाग. या दोन बेटांमधली जुन्या काळातली छोटी खाडी ओलांडण्यासाठी तयार केलेला जिना म्हणजेच दादर. माटुंगा हा दक्षिण भारतीयांची वस्ती असलेला भाग. इथल्या मंदिर परिसरात, विशेषतः प्रत्येक सण, उत्सवात, मिरवणुकीत हत्तीला विशेष मानाचं स्थान असे. हत्तीलाच ‘मतंग’ म्हणतात. हत्तींच्या राहण्याच्या ठिकाणावरून ‘माटुंगा’ या शब्दाची निर्मिती झाली आहे. इंग्रजी राजवटीत ‘क्रॉफर्ड मार्केट’ म्हणजेच आजच्या महात्मा फुले मंडईपर्यंत ‘फोर्ट’ विभाग होता. तिथूनच किल्ल्याची तटबंदी होती. आजच्या भेंडी बाजार या जागेचा उल्लेख त्यावेळचे इंग्रज ‘बिहाईंड द बझार’ (बाजाराच्या मागची जागा) असा करत. याच ‘बिहाईंड द बझार’चा पुढे भेंडी बाजार असा वेगळाच अपभ्रंश तयार झाला. ‘भाये’ नावाच्या माणसाचं मासे सुकवण्याचं खळं ज्या ठिकाणी होतं त्या शहराला ‘भायेंचे खळे’वरून ‘भायखळा’ असं नाव पडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ या उपनगराचा आंग्लाळलेल्या मराठीजनांकडून ‘सँटा क्रूज़’ असा उच्चार होतो. वास्तविक, त्या भागाला ते नाव पोर्तुगीज भाषेतून पडलं. ‘सांताक्रूझ’ हाच उच्चार त्या नावाच्या मूळ पोर्तुगीज उच्चाराशी अधिक मिळताजुळता असावा. शीव या उपनगराचं स्पेलिंग इंग्रजानी SION असं केलं. त्याचा उच्चार आता सरसकट सायन असा केला जातो. वान्द्रा या उपनगराच्या नावातलं ‘व’ हे अक्षर उत्तरभारतीय लोकांना उच्चारता येत नसल्यामुळे ते त्याला बान्दरा असं म्हणू लागले. नवमुंबईकरांनी त्याचं नाव बांद्रा असं करून स्पेलिंगप्रमाणे बँड्रा असं उच्चारायला सुरुवात केली. बऱ्याचदा उत्तरभारतीय आणि वंग बंधू ड या अक्षराचं स्पेलिंग आर + एच असं करतात. त्यामुळे पुण्यातल्या घोरपडी या स्थानकाचं स्पेलिंग GHORPURI असं करून ठेवलं. प्रतापगडचंदेखील नाव Pratapgharh असं केलं.

परभाषांवर मराठीचा किती प्रभाव आहे, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय! परभाषिकांचे मराठी उच्चार हा वेगळाच अभ्यासाचा विषय. दाक्षिणात्य मंडळी हिमालया, रामा, शिवा, गोविंदा असे आकारान्त उच्चार करतात. I am हे शब्द आय यम असा उच्चारतात. अनेक लोक झेड या इंग्रजी वर्णाचा उच्चार ज करतात. जी टीव्ही, रिजल्ट, कन्ज्युमर, रॅप हा शब्द परभाषिक बऱ्याचदा रेप असा करतात. विशेषतः गुजराती लोक श च्या ऐवजी स म्हणतात. सेव – शेव, सेम – शेम.

मराठीवर इतर भाषांचे जे परिणाम झाले किंवा होत आहेत त्यामुळे मराठी बिघडली, भ्रष्ट झाली किंवा मरणोन्मुख झाली असं म्हणणं बरोबर नाही. भाषाविकासाच्या दृष्टीने बऱ्याच शब्दांसंबंधी अट्टाग्रहाची भूमिका सोडणंच सयुक्तिक ठरेल. मराठी वाङ्मयाबद्दल बहुजनसमाजाला आज जास्त जिव्हाळा वाटू लागला आहे. सगळ्यांना सोशल मीडियाच्या भाषेतून व्यक्त व्हायचं असतं. त्यामुळे मराठी भाषेतली बहुभाषिकता अटळ आहे! खरंतर, हा विषय इतका खोल, उद्बोधक आणि मनोरंजक, आहे की यावर लिहावं तितकं कमीच!

संदर्भ –

१ आधुनिक भाषाविज्ञान (संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक) – संपादक : डॉ. कल्याण काळे / डॉ. अंजली सोमण.

२ रंजक मराठी – रमेश तांबे.

३ आंतरजालावरील विविध संदर्भ.

— समाप्त —

☆

लेखिका : डॉ. उषा रामवाणी – गायकवाड

ठाणे.

प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted