डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘कॅनव्हासचे कवीराज…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
कॅनव्हासचे कवीराज… सर्जनशील डिखोळे सर
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चित्रकार माननीय कै. श्री नामदेव बळीरामपंत डिखोळे सरांची ५ ऑक्टोबर २०२६ रोजी १०३वी जयंती होती. त्याच सुमारास, २ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या गांधीनगर येथील त्यांच्या घरी जाण्याचा सुवर्णयोग आला. माझ्या अजाणत्या वयापासून तर त्यांच्या निधनापर्यंत, म्हणजे जवळपास १९५८-२०१३ या काळात ज्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला, त्या सरांच्या घरी गेल्यावर गत स्मृतींच्या प्रवाहाला जणू उधाण आले. १९६० ते २००८ या वर्षांतील वेगवेगळ्या काळात त्यांची विद्यार्थिनी असण्याचा अभिमान दाटून येत आहे. लौकिकार्थाने त्यांच्याकडून सलग चित्रकला शिकण्याचे सौभाग्य मला लाभले नाही, इतर शैक्षणिक प्राधान्यामुळे मी चित्रकलेची नितांत आवड असूनही या श्रेष्ठ गुरूंकडून समर्पित चित्रकलेचे प्रशिक्षण घेऊ शकले नाही याचे निश्चितच वैषम्य आहे. एखाद्या महासागरातून नशिबाने कांही मोजकेच थेंब प्राप्त व्हावे तसे मी त्यांच्याकडून चित्रकला शिकले. त्यांचेच अर्ध्य मी त्यांच्या चरणी आदरपूर्वक समर्पित करीत आहे.
आम्ही १९५०-७० च्या दशकात नागपूरच्या शिवाजीनगर भागात राहत असू. जवळच ‘१३८, त्रिकोणी मैदान, मारुतीच्या देवळासमोर, गांधीनगर’ या पत्त्यावर डिखोळे कुटुंब राहत असे. १९५८ सालापासून ते २००८ पर्यंत त्यांची शिष्या होण्याचा सन्मान मला मिळाला. तेव्हा चित्रकलेत मानक अशा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन परीक्षा असत. सप्टेंबर महिन्यात त्या द्याव्या लागत. मात्र या परीक्षांत उत्तीर्ण झाल्यावरही ११वी पर्यंत सरांच्या क्लासमध्ये मी अखंड जातच राहिले. सकाळी ७. ३० वाजता सरांच्या गांधीनगरच्या घरी चित्रकलेच्या वर्गात माझे जाणे असे. जवळच सरस्वती विद्यालय ही शंकरनगर येथील ११. ४०ची शाळा असे, शिवाय होमवर्क किंवा शाळेच्या अभ्यासाचे लोड वगैरे घेण्याची विद्यार्थ्यांत आणि पालकांत पद्धत नव्हती.
सर किती मोठे चित्रकार आहेत, हा विचार कधी कधी मनात डोकावून जात असे. मात्र ते आमच्याशी आमच्याच कुवतीनुसार आमच्या वयाला अनुरूप असे मार्गदर्शन करत. आम्ही ५-६ विद्यार्थी त्यांच्या घरी शिकत असू. मात्र संध्याकाळी ३०-४० मुलांचा चित्रकला वर्ग बर्डीवरील प्रसिद्ध पंचशील चित्रपटगृह संकुलाच्या पहिल्या मजल्यावर भरत असे. सरांची पत्नी म्हणजेच माझी लाडकी (नात्याने दूरची पण हृदयाने अतिशय जवळची) त्रिवेणीताई देखील जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, मुंबई मुंबईच्या पदविका अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. १९५० च्या दशकापासून ताई मोठ्या आत्मविश्वासाने ते वर्ग चालवीत असे.
विद्यार्थ्यांचे वय, त्याची कुवत आणि त्याचा चित्रकलेतील अनुभव हे सर्व ध्यानात घेत त्याला आठवड्यातील तीन दिवसांच्या २ तासांच्या काळात अचूकपाणे मार्गदर्शन करणे ही कलाच आहे. आमच्या चित्रांवर पेन्सिल किंवा कुंचल्याने सर भराभर दुरुस्त्या करत, आवश्यक असेल तर कलात्मकरित्या रंगांचे लीलया मिश्रण करून योग्य नंबरचा ब्रश वापरून दोनचार फराटे इकडे अन दोनचार फराटे तिकडे अशा प्रकारचे या अस्सल आणि अट्टल अवलिया चित्रकाराचे मास्टरस्ट्रोक कागदावर बसले की अस्ताव्यस्त उडणाऱ्या केसांच्या पोरसवदा रानटी पोरीसारखे माझेच चित्र एखाद्या सौंदर्यवती नवयुवतीसारखे रूप धारण करी. माझ्या प्रत्येक चित्रावर सरांनी शेवटचा हात फिरवला नसता तर त्यांचे सांप्रत देखणे रूप दिसतेच ना!
मेडिकलचे शिक्षण झाल्यावर इंटर्नशिपच्या काळात (१९७४-७५) मी परत चित्रकलेकडे वळले. आता डिखोळे सरांनी मला छंद म्हणून कॅनव्हासवर तैलचित्र काढण्याचा अभ्यास करायला प्रवृत्त केले. त्या सहा महिन्यात तैलरंगांचे मिश्रण करण्याची अद्भुत कला सरांकडून मी शिकले. जलरंगांपेक्षा माझे तैलरंगांशी अधिक अद्वैत जुळले, कारण इथे मर्यादित प्रमाणात एका वाळलेल्या थरावर दुसरा थर देऊन चूक सुधारायची थोडीफार संधी मिळत होती. सरांकडे असंख्य चित्रअल्बम होते. त्यातील व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे एक चित्र काढल्याचे स्मरते.
माझ्या मिस्टरांचे निधन झाले आणि मुले शिक्षणासाठी मुंबईत गेली. मी एकटीच नागपुरात होते, आणि मग २००४ ते २००८ या वर्षात परत एकवार मी कॅनवास वर ऑइल पेंटिंग करायच्या निर्धाराने सरांच्या क्लासकडे वळले. निसर्गचित्रांच्या निमित्ताने त्यांच्याकडून चित्रकलेचे बरेच बारकावे शिकले. मला शिकवतांना आभाळाची आणि पाण्याची निळाई, वृक्षराजी, घरे, घाट इत्यादींचे प्रतिबिंब रंगवतांना ते तल्लीन होत! ते मला नेहमी सांगत “मीना, कुठलाही काळा किंवा पांढरा रंग निखळ नसतो. त्यात खूप शेड्स असतात. ते प्युअर रंग कॅनवासवर ओतू नको. लक्षपूर्वक बघून त्यांच्या विविध रंगछटा ओळखायला शीक. मी कांहीतरी करायची, तेव्हा ते प्रयोगशाळेत जशी वेगवेगळी रसायने मोजमाप करून घेतात तद्वतच पॅलेटवर ठेवायचे आणि हळुवारपणे त्यांचे मिश्रण तयार झाले की स्मितहास्य करीत. कुंचल्याद्वारे कॅनवासवरील रंगमिश्रणाच्या खेळाद्वारेच ते माझ्याशी संवाद साधायचे. एक मान्यवर कलाकार असूनही माझ्यासारख्या नवशिक्या विद्यार्थिनीला ते किती म्हणून आत्मीयतेने शिकवत. त्यांचा ‘मिडास टच’ असलेली मोजकीच चित्रे माझ्याकडे आहेत. पण त्याहूनही माझ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्यांवर त्यांनी माझे आयुष्य किती समृद्ध केले त्याची मोजदाद मी करू शकत नाही.
या महान चित्रकाराचा परिचय करून देतांना अभिमानाने मन भरून आले आहे. येवली, अमरावती येथे ५ ऑक्टोबर १९२३ साली जन्मलेल्या “श्री. नामदेव बळीराम डिखोळे” यांचे वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपले. त्यानंतर सरांच्या माउलीने मोठ्या धैर्याने कठीण परिस्थितीचा सामना करत त्या काळी शिक्षिकेची नोकरी पत्करली. सरांनी आपले प्राथमिक शिक्षण वर्धा येथून आणि माध्यमिक शिक्षण हिंगणघाट येथून पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. नागपूर स्कूल ऑफ आर्ट मधून घेतली. सेवासदन आणि धरमपेठ कन्या शाळेत त्यांनी कांही काळ नोकरी केली. जेव्हा त्यांनी १९५२ साली मुंबईच्या प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश मिळवला, तेव्हां त्यांच्या कलासक्त कुंचल्याला कलाशिक्षणाचे योग्य वळण मिळाले. जे जे मधील प्रसिद्ध चित्रकार प्रा. संभाजी कदम, इंदोर स्कूल ऑफ आर्टचे डी. डी. देवळीकर आणि शांतिनिकेतन येथील चित्रकार विनायकराव मसोजी या दिग्गजांकडून खऱ्या अर्थाने त्यांच्यात चित्रकलेची सूक्ष्मदृष्टी विकसित झाली.
चित्रकार म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्याच्या निर्धाराने डिखोळे सरांनी नोकरी सोडून १९६३ साली नागपूरच्या पंचशील चित्रपटगृहाच्या परिसरात ‘महाराष्ट्र कला विद्यालय’ची स्थापना केली. येथील वर्गांच्या माध्यमातून त्यांनी अविरत ५५ वर्षे प्रशिक्षण देत अनेक प्रसिद्ध शिष्य तयार केलेत. त्यांच्या १३८, गांधीनगर या घरातील आर्ट गॅलरीत ते माझ्यासारख्या मोजक्याच विद्यार्थ्यांना आपल्या घरी शिकायची परवानगी देत. दिल्ली, मुंबई, कोलकाता चेन्नई आणि बंगरूळू येथील आंतरराष्ट्रीय कला-प्रदर्शनात चित्रप्रदर्शनाद्वारे त्यांचा सहभाग होता. इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांची देशभरात ४० हून अधिक चित्रप्रदर्शने झाली. नेपाळ, इंग्लंड, फ्रान्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि बँकॉक येथेही चित्रप्रदर्शनांत त्यांचा सहभाग होता. २००० साली त्यांच्या १९३८-२००० पर्यंतच्या चित्रांचे नागपूर येथील चित्रप्रदर्शन खूप गाजले.
६ दशकांहून अधिक काळ चाललेल्या कलाप्रवासात सरांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय बहुमान प्राप्त झाले. त्यांच्या वास्तववादी चित्रशैलीसाठी आणि उत्कृष्ट रेखाटनासाठी त्यांना ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ कडून, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य शासनातर्फे (२००८) तसेच ‘भावसार समाज भूषण’ पुरस्कार लाभले. सरांची तैलचित्रे’ ‘अजब बंगला’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या संग्रहालयात व भारतातील अनेक नामांकित आर्ट गॅलरीजमध्ये दिमाखाने प्रस्थापित आहेत. त्यांचा हा कलेचा वारसा त्यांची कलाकार मुलगी प्रतिमा आणि विश्वास हा त्यांचा आर्किटेक्ट मुलगा चालवीत आहेत.
त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. मला आठवते की, ते ‘गंधर्व कलानिधी’ परवीन सुलतानाच्या गायकीचे खूप मोठे चाहते होते. गायक-नट के एल सैगल यांची गाणी देखील त्यांना अतिशय प्रिय होती.
वयाच्या ९०व्या वर्षी वृध्दापकाळाने डिखोळे सरांचे नागपूर येथे १३ मे २०१३ रोजी निधन झाले. अशा या सर्जनशील चित्रकाराला माझे शतश: प्रणाम!
विलक्षण योगायोग असा की आता डिखोळे सरांचे आणि माझे गुरु-शिष्येचे नाते पुढील पिढीत हस्तांतरित झाले आहे. अहमदाबादच्या प्रख्यात एनआयडीची स्नातक आणि तेथेच स्थायिक झालेली सरांची कलाकार कन्या प्रतिमा ही सांप्रत ठाणे येथील अनुभूती या माझ्या नातीला एनआयडीच्या प्रवेशपरीक्षेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देते आहे.
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







