डॉ. सुनीता यवतकर
मनमंजुषेतून
☆ अमृतवाहिनी प्रवरा- माझ्या गावाचं भूषण… ☆ डॉ. सुनीता यवतकर ☆
(हृद्य आठवणी!!! )
जन्मदात्री आईविषयी शेवटच्या श्वासपर्यंत, जसं प्रेम वाटतं ना, तसंच काहीसं प्रेम, आपलं बालपण ज्या गावात गेलं त्या गावाविषयी, गावातील लहान -मोठया गोष्टींविषयी, तिथल्या निसर्गाविषयी वाटतं…!!
काही जणांना अनेक गावं फिरावी लागतात. वडिलांची बदलीची नोकरी, कधी समोर येणारी परिस्थिती इत्यादी अनेक कारणांनी…!!
तरी जे गाव, ज्या व्यक्ती आपलं बालपण जपतात ते कायम लक्षात रहातं…!!
त्यातही गावात एखादी नदी असेल तर अनंत आठवणी तिच्याशी जोडल्या जातात…
पंचमहाभूतांनी बनलेल्या या देहातील इंद्रियांना, मनाला, नेहमीच बाह्यसृष्टीतील पंचमहाभूतांचे आकर्षण, ओढ…!!
म्हणूनच पहाटे प्रसन्न वातावरणातील उषःकाल, सुर्योदय आपल्यातील चैतन्य प्रफुल्लीत करतो.. , वाऱ्याची छानशी झुळूक मन प्रसन्न करते.. , एखाद्या हिरव्यागार शेतात किंवा डोंगरमाथ्यावर चित्तवृत्ती उल्हसित होतात…
शेवटी आपणही त्याचाच एक भाग ना…??
शीच ओढ असते ती पाण्याची…!! कारण ते तर आपल्याला पोसतं, तारतं, जीवनच ना शेवटी ते…!!
आईच्या गर्भात असल्यापासून त्याचं आणि आपलं सख्य..!!
ते अंतिम समयी मुखात गंगाजल घालेपर्यन्त…!!
या जलाची महती काय सांगावी…??
वाळवंटी, दूरवर नजरेच्या टप्प्यात पाणी न दिसणाऱ्या आणि तहानेनं व्याकुळ झालेल्याला विचारा…
अशा स्थितीत पाण्याचा एक घोट अमृतच…!!
तर गावात एखादी नदी असेल किंवा आयुष्याचा काही काळ तरी नदी, समुद्राच्या काठावरील गावात घालवायला मिळाला तर ते पियुष आयुष्य संजीवन करतं…!
अशीच माझी माय, पुण्यसलीला, अमृत वाहिनी प्रवरा नदी…!!
मला की नाही, हा
पुण्यसलीला*
शब्द खूप आतो.. केवळ उच्चारणानं, नदीचं, दोनही तीरांची मर्यादा पाळणारं… अथांग पात्र… शांत, संथ वाहणारं नितळ स्वच्छ पाणी अशी प्रवरा मायेची, वत्सलतेची परिपूर्ण,
“सालंकृत स्त्री मुर्ती “
डोळ्यासमोर उभी करतो…!!
जणू ती सांगत आहे, “आयुष्याच्या या प्रवाहात माझ्या सारखीच वाहत रहा… , तुझ्या आयुष्यातील कधी वर उचंबळणाऱ्या तर कधी तळ गाठणाऱ्या, सुख-दु:खरुपी लाटांवर स्वार हो…!!! जीवनाचा आनंद घे..!! तीराचं बंधन मात्र विसरू नकोस… सर्वांना प्रेमरूपी जलाने सुफलाम कर…!!
तर हि माझी प्रवरा माय उगम पावते, अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात अमृतेश्वर इथे… संगमनेरला ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते..
पूर्वी जेव्हा, गावात नळ नव्हते तेव्हा पहाटे पाच वाजताच, गावातील माय-बहिणींचा दिवस सुरु व्हायचा.. आन्हिक उरकून दारात सडा रांगोळी करून मोठाले हंडे घेऊन, बायका नदीवर पाणी आणायला जायच्या…!!
नदीच्या वरच्या घाटांवर प्यायचं पाणी भरायचं, त्या खालील घाटांवर कपडे धुणं, भांडी घासणं,.. तिथंच पण जरा मधील जागेत आंघोळी… त्याखालील घाटांवर… जनावरांच्या आंघोळी…!!
हे नियम अंगवळणी पडलेले.. आपोआप सांभाळले जाणारे…!!!
दुसऱ्या गावाहून वाहत येतांना हे पाणी आपल्यातील कचरा, घाण बाजूला सारून स्वच्छ झालेलं…
जणू एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी लोभ, मोह, मत्सर, अहंकार सगळं – सगळं बाजूला सारून फक्त माया, प्रेमच घेऊन यावं… तसंच…!!
नदीवर पहाटे च आंघोळीसाठी जाणारे खूप सारे…
पहाटेचं, गार, अंगाला सुखावणारं —- वारं…!! आकाशात अजूनही साखरझोपेत असणाऱ्या चांदण्यांचा सडा… , पुर्वेला क्षितिजावर येणाऱ्या उषेची चाहूल…!!
जणू एखाद्या ऋषी पत्नीने आश्रमातील साखरझोपेत असणाऱ्या शिष्यांना मायेचा हात मस्तकी फिरवून जागं करावं.. तशी ही चांदण्यांना जागं करायला आलेली उषा…!!
आकाशीच्या अंगभर झगमगत्या चांदण्या ल्यायलेल्या काळया चंद्रकलेला जणू केशरी झगमगती किनार लावणारी उषा…!!!
नदीतीरावर असणाऱ्या वृक्षराजींवर जाग्या झालेल्या, आणि सृष्टीला आपल्या मधुर कुजनाने जागे करणाऱ्या विहंगांचा मधुर कलकलाट…!! जणू ते ही उषा आगमनाप्रित्यर्थ
उषासुक्त गात आहेत…!!
नदी मार्गावरील आणि तीरावरील मंदिरातून येणारे.. , परमचैतन्याला जीवात्मतत्वाशी तादात्म्य पावायला लावणारे काकड आरती चे… नादमय स्वर… , त्यावेळी होणारा *शंखनाद*..
*घंटानाद* *…!! * वातावरण एकदम पवित्र करत असे…
अशा वातावरणात नदीच्या, अजूनही ऊन- ऊन पाण्याने स्नान..!! शरीर, मन दोन्ही एकदम ताजेतवाने करीत असे..
शरीराचा मळ तर निघायचा पण मनाचा मळही नदीच्या पाण्याबरोबर वाहून जायचा…!!
काही विशेष प्रसंगी म्हणजे सणवार, अधिक मास, कार्तिक मास यावेळी ही गर्दी वाढायची.. या महिन्यांमध्ये महिनाभर पहाटे नदीस्नान करणारे खूप जण..
धर्म शास्त्र, निसर्ग, आणि आरोग्य यांची केवढी ही अफलातून जोड…!
पवित्र वातावरणात जेव्हा सगळ्या सृष्टीमध्येच *एक सकारात्मकता* भरुन राहिलेली असते, तेव्हा त्याचे साक्षीभूत होऊन आपणही ती आपल्या रोमारोमात भरून घ्यावी हाच पूर्वासुरींचा उद्देश…!!
आपण तो आता नीट समजून घेऊन आचरणात आणायला हवा… नाही का…???
या स्नानानंतर मग नदीची जगन्माता, पालन-पोषणकर्ती, म्हणून कृतज्ञतापूर्वक पूजा…!!
तिचे देवीस्वरूपात पूजन.. , तिला हळदी कुंकू वहायचं, खणा- नारळानं तिची ओटी भरायची..
तिच्या प्रवाहात तेवते दिवे ठेवलेले द्रोण सोडायचे… आणि म्हणायचं, *”बाई ग, जीवनदायिनी गंगे, तुझी कृपा… आमच्यावर असू दे…! * चुकलं-माकलं पदरांत घे… आमच्यावर रागावू नकोस…!! “
असं म्हणून लांबपर्यंत तरंगत जाणाऱ्या त्या ज्योतींना उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने डोळ्यात साठवून ठेवायचं… ती उर्जा घेऊन तीरावरील सर्व देवांचे दर्शन घेऊन घरी यायचं… आपल्या दैनंदिन कामकाजाला…!!
काय बिशाद मन, बुद्धी काही चुकीचे करेल…?
हीच कृतज्ञता विसरलो का आपण…?
नदीकिनारी नारायणाचं… मंदिर…!!
तिथं आवळ्याची झाडं.
कार्तिक महिन्यात या झाडाखाली आवळी भोजनासाठी जायचं..!!!
घरून भाजी-भाकरी, गोड-धोड, चटण्या, लोणची, आवळ्याचे बरेचसे रूचकर पदार्थ बरोबर घ्यायचे..
घरातले, शेजारी-पाजारी, सगळ्यांना घेऊन नदीवर जायचं.
पहिलं देवदर्शन,… ज्यानं या पृथ्वीवर आपल्याला जन्माला घातलं, जो भरभरून देतो, त्याचे आभार नको का मानायला..??
मग आवळ्याच्या झाडाची पूजा… , आसपास असणाऱ्या पक्षांना, प्राण्यांना घास घास देऊन सगळ्यांनी आणलेले एकत्र ठेऊन आवळीभोजनाचा आनंद घ्यायचा..
*आवळा* आयुर्वेदातील जगन्मान्य असं रसायन…!!
स्वास्थ्य देणारं, प्रतिकारशक्ती वाढवणारं, आयुष्य वाढवणारं फळ…!!
त्याची पूजा करून सेवन. , पुन्हा आलंच यामागे आरोग्यशास्त्र…
ज्याला धर्माची उत्तम सांगड…!!
व्यक्तीगत, शारीरिक मानसिक, कौटुंबिक, सामाजिक… पर्यायाने वैश्विक स्वास्थ्याचा उत्तम विचार…!!
अहो, वृक्षांचीही पूजा करायला सांगणारी, पशू-पक्षांनाही आपण जेवण्यापूर्वी घासभर द्यायला सांगणारी, एकत्रित पणे निसर्गातील धन संपत्ती चा संयमाने आनंद घ्यायला सांगणारी आपली संस्कृती…!! आणि हे सगळं आपल्याला मुक्तहस्ताने देणाऱ्या त्या निसर्गरूपी परमेश्वरा चे आभार मानायला शिकविणारी आपली संस्कृती…!!
ते ही लहानपणापासून असे चांगले संस्कार देणारी…!!!
काही विसरतोय का आपण…??
हातातून काही निसटत चाललंय का…??
या प्रवरेच्या तीरावरच्या गर्द शेतातल्या, महादेव मंदिराची, महाशिवरात्रीची यात्रा अशीच खूप मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवलेली… खूप मोठी यात्रा…
एका बाजूला प्रवरेचं विशाल पात्र… चहूबाजूला हिरवीगार ऊसाची किंवा घासाची शेती, मंदिराच्या चहूबाजूला भरलेली यात्रा…
साखरेची खेळणी, पाळणे, झोके, गुडीशेव, रेवडी, शेव-मुरमुरे, गरम गरम भजी… आणि बरोबर आई-दादा, भाऊ, बहिणी,… आख्खा वाडा… *देवा, मला परत एकदा लहान करशील… का… रे…? *
गणपती विसर्जन हा नदीतीरावरचा आणखी एक सोहळा..!! हो, सोहळाच..!
गणरायाला मनापासून, परत येण्यासाठी आनंदाने दिलेला निरोप…!!
दादांबरोबर आम्ही भाऊ, बहिणी सगळे जायचो. रस्ताभर, “गणपती बाप्पा मोरया..! ” चा जयघोष.. घंटा वाजवून.. आणि “पुढच्या वर्षी लवकर या. ” म्हणून बाप्पाची विनवणी…!! *
नदीतीरावरील वाळूवर बाप्पा ची आरती, नैवेद्य…
दादा, गणेश मूर्ती घेऊन कमरभर पाण्यात जाऊन, तिचे विसर्जन करायचे… काठावरुन भरल्या डोळ्यांनी आम्ही मुलं त्याला निरोप द्यायचो…
पार्थिव पावित्र्याचं आप तत्त्वात विसर्जन…!!
प्रवाहातील ते पावित्र्य मग नदीच्या पात्रातील पाच छोट्या दगडांद्वारे घरी आणायचं… कृतज्ञतापूर्वक… घरची बाप्पाची जागा… सुनी सुनी वाटू नये म्हणून…!!!!
कधीं कधीं आई नदीवर जातांना भाकरी, भाजी, चटणी बरोबर घ्यायची.. आश्चर्य वाटायचं… पण नदीवर गेल्यावर कळायचं… एखादी उपाशीपोटी सासुरवाशीण भल्या मोठ्या घमेल्यात सगळ्या घरादाराचं धुणं घेऊन आलेली असायची…
आई तिला म्हणायची, “घे खाऊन थोडं, उपाशीपोटी राहू नये जास्त वेळ…! “यामागे फक्त — केवळ माया आणि* *काळजी* *.. no gossip… nothing…!!! *.
हे माते, किती दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुझ्या कुशीत पहुडलेय मी… घाटावर धुणी धुणं, पाठीला डबा बांधून पोहणं, तीरावरील झाडांच्या चिंचा, आवळे, वठ, बोरं खाणं…!!
कधी नुसतंच घाटाच्या पायरीवर बसून लांबवर दिसणारी शेतं न्याहाळणं, लांबवर दिसणाऱ्या पुलावरची रहदारी बघत बसणं…
मंदिरातल्या आरतीचे, स्तोत्रपठणाचे सूर मनात खोलवर भरून घेणं… किती सुख… केवळ अवर्णनीय…!!
असं किती– किती, काय — काय तूही पाहीलंस… किती पोटात साठवलंस…? किती तीरावर टाकलंस…??
तरी तू अनंतकाल वाहतेच आहेस… आयुष्याचं गाणं गायला आम्हाला शिकवतेच आहेस…
आईसारखेच तुझ्याही आठवणीने डोळे पाणावतात.
… हे माहीत असूनही कि तू सदैव आहेस, माझ्या पाठीशी… , तुझे आशिर्वाद आहेत माझ्या शिरी…!!
असेच असू देत माते, शेवटी तुझ्या सारखंच
त्या परमात्मरूपी सागरात एकरूप होण्यासाठी…
!!!!
कधी कधी मात्र तू कोपायचीस.. आई नाही का चिडत लेकरांवर…!!!
मग तू बेफाम व्हायचीस.. तीराचं बंधन तोडून टाकयचीस… , बाजूच्या शेतीचा, एखाद्या जीवाचा ग्रास घ्यायचीस… मग तुझी मार्ग भरकटलेली लेकरं परत शहाण्यासारखं वागायची… काय चुकतंय आपलं — याचं मनोमन परीक्षण करायची.!! त्याची खूप गरज आहे नाही का गं…? अधूनमधून हे परीक्षण व्हायला हवं… नाहीतर अती लाडावलेलं पोरं वाया जातं कधी कधी…!!
तुझ्या बरोबर तुझी धाकटी बहीण *म्हाळुंगी नदी* गावाच्या दुसऱ्या टोकाकडून वाहते…
तिच्याही तीरावर जायची मी… , धुणं धुवायला, भांडी घासायला, रांगोळीचे दगड गोळा करायला, हरतालीकेच्या पूजेसाठी शिवलिंग करायला वाळू आणायला…!!
थोडं एकटी वहाते ती पण, तुझा विरह सहन न झाल्याने, गावाच्या दुसऱ्या टोकाला तुझ्या गळ्यात गळा घालते… मग दोघी छानपैकी एकरूप होऊन पुढल्या गावाला जाता…
तुमच्या दोघींच्या संगमामुळे तर गावाचं नाव *संगमनेर*… या तुमच्या संगमावर पर्वकाळी स्नानाला खूप गर्दी…!
पुण्यांच असतं ना ते…!!
तुझ्या किनारी गावाच्या बाहेरच्या बाजूला अमरधाम..!!
लौकिक जग सोडून जातांना त्या जीवाला तुझा वात्सल्यरूपी हात शिरी हवाच ना ग…?
त्याला जणू तू सांगतेस, *”अरे, हे फक्त एक आयुष्य नाही बाळा.. हा अनेक जन्मांचा निरंतर वाहणारा प्रवास आहे… *. *जन्मापासून मोक्षापर्यंतचा…!! *
माझ्या सारखं… वहात रहा… , कचरा, मलिनता काठाशी टाकत… मग त्या परमात्मरुपी सागराला मिळणारच आहेस तू…!!
*मी आहे तुझ्याबरोबर, तुझी प्रेरणा… वाहत रहा… जीवनप्रवास चालत रहा…! *
आज हे पुण्यसलीले, , अमृत वाहिनी प्रवरे, तुझी मनाच्या तळापासून आठवण आली.. तुलाही धन्यवाद माझ्या माता-पित्यांप्रमाणे…
कारण तू जीवन देणारी, आयुष्य सुजलाम सुफलाम करणारी…
सासरी, दुसऱ्या गावी जातांना आनंदाच्या, सुखाच्या आठवणींची
शिदोरी—- माझ्या पदरी बांधणारी…!
आई दादां सारखी मला माहेरची ओढ लावणारी…!!!!!!
© डॉ. सौ. सुनीता यवतकर
मो 9881183200
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






