सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “मराठी भाषा दिन…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
फक्त वेलांटी जर बदलली… दिन या शब्दाची तर आजची अवस्था वर्णन करायला पुरेसे आहे… पण वेलांटी बदलून परिस्थितीचे वर्णन करणारे शब्द मराठी भाषेतच आहेत. असो आज आपण आजच्या लेखात मराठी भाषेने दिलेले काव्य आणि गाणे याचा विचार करूयात आणि आपण किती समृद्ध आहोत हे लक्षात येईल आपल्या घरची समृद्धी लक्षात न घेता लोकांच्या प्लास्टिकच्या डब्याचं वर्णन करायच अशी आज आपली गत झाली आहे असो..!
संपूर्ण मराठी भाषेचा विचार केला तर पुस्तक तयार होईल.. फक्त मराठी भाषेत असलेल्या काव्य आणि गाण्यांचा आपण येथे विचार करणार आहोत
अगदी साडेसातशे वर्षांपूर्वी पासून चा विचार केला तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हरिपाठ अनेक वारकऱ्यांच्या मुखातून रोज सकाळी प्रसवतो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.. किंवा पैलं तो गे काऊ कोकता हे… मोगरा फुलला… आणि विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले पसायदान म्हणजे भारतीय माणूस देवाकडे काय मागतो आणि विश्व कल्याणाची चिंता करतो याचे उत्तम उदाहरण आहे. तुकोबांच्या गाथांचा मोह तर इंद्रायणीलाही झाला आणि त्या त्यामधे बुडालेल्या असतानाही वर तरुन आल्या. चोखामेळ्याचे अभंग जनाबाईचे अभंग तुकारामाचे अभंग आपली अभंग ठेव आहे. मन अस्वस्थ झालं की शांततेचा तो एकमेव मार्ग आहे नुसता हरिपाठ म्हणला तरी मन शांत होईल
पुढील काळात अनेकांनी त्यात भर घातली अनेक काव्य मुखामुखी झाली जात्यावरच्या ओव्यांनी बायकांचा दुःख बोलून दाखवलं माहेर सासरची महती गाईली त्यानंतरच्या येणाऱ्या काळात मोरोपंतांच्या आर्या आल्या खाडीलकरांची नाट्यपद आहेत संगीत नाटकांचा जमाना आला आणि त्यांनी लोकांना वेड लावला. आजही ती नाट्य गीते ओठावर आहेत संगीत मानापमान संगीत सौभद्र अशा अनेक नाटकाने त्या काळातली दुनिया संगीतमय करून टाकली आणि तो काळ मराठी भाषेच्या नाट्यकलेचा वैभवशाली काळ समाजाला गेला त्यानंतर येणाऱ्या मर्ढेकर आणि त्यांचे समकालीन कवी यांनी आशय संपन्न कविता दिल्या पुढे त्या काही कविताना चाल लावून त्याची गाणी झाली गाण्याच्या बाबतीत असं म्हणतात की गाण्यांना जन्म आहे मृत्यू नाही.. ती अमर आहेत. मराठी भाषेतील अवीट गोडीची ही गाणी हे काव्य खरोखर अजरामर आहेत…
जन पळभर म्हणतील हाय हाय… हे भा रा तांब्यांचे काव्य अजरामर आहे.. परी जयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती… या कवितेतला विनम्र भाव आणि कृतज्ञता किती सुंदर आहे! अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना… या काव्यामागची कथा वेगळी आहे.. काव्यमागे अनेक कथा असणारी गाणी तत्कालीन कवीनी दिली… पुढे चित्रपटांचा काळ जसा सुरू झाला तशी सुंदर चालीची अनेक गीते आणि भावगीते तयार झाली. प्रत्येक गीताला एक कथा सांगावी इतका ऐवज आहे प्रत्येक गाण्याला कथा आहे कवीची संगीतकाराची पण ते लिहिण्याचा एक स्वतंत्र विषय करावा लागेल.
कौसल्येचा राम बाई… हे काव्य लिहून झाल्यावर पु ल देशपांडे यांनी त्याची चाल बांधली होती माणिक बाईने ते गाणं गायलं आणि या गाण्याला अमरत्व लाभलं ग दि मा ने दिलेली कित्येक गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत…
प्रेमा भाग्य दिले तू मला… त्या बदल्यात नायिका विचारते आहे की मी तुला काय देऊ? .. प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का? का जळवंती च्या जलाची निळी ओढ ती तुला हवी का? अशा अनेक सुंदर ओळी या काव्यात आहेत आणि तितकीच सुंदर चाल… तितके सुंदर संगीत..! ही सगळी अमरत्व लाभलेली गाणी…
खळ्यांचे श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा… भर मे महिन्यात ट्रेनमध्ये बसून दुपारच्या वेळेला लिहिलेले हे गाणं म्हणजे कवीच्या कल्पनाविलासाचे उत्तम उदाहरण आहे. लताबाईने ते तितक्याच ताकतीने गायलेला आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे?
घन घन माला नभी दाटती या गाण्यातील..
कोणी विरहिणी राधा गवळण
तिला अडवते कवाड अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले
विरले जलधारा…! काय सुंदर काव्यरचना आणि प्रसंग. अत्यंत कलात्मक…! हा एवढा खजिना सोडून इंग्रजी माध्यमाकडे का वळता रे बाबांनो…?
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. अ अ आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका… दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी अवघ्या दत्त विराजे… बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला… वाट पाहणाऱ्या दोन प्रेमी युगोलांसाठी अजरामर झालेले गीते… जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते.. जे वेड मजला लागले तुजला ही ते लागेल का माझ्या मनाची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? … उडत्या चालीची, तरुण मनाची,… तुझी चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु किंवा लपवलास जरी हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का… मालती पांडे यांनी गायलेले सुंदर गीत… नाच नाच नाचुनी अति मी दमले… बाई मी विकत घेतला शाम… जग हे बंदी शाळा… जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे… रामायणातील राम जन्मला ग सखे राम जन्मला त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करणारे अप्रतिम गीत, जोवर राम आहेत कृष्ण आहेत तोवर या गीतांना मरण नाही ती अमर आहेत. हा माझा मार्ग एकला हे शांत चालीचं गाणं.. जीवनाचा सत्य सांगून जातं. “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया” हे गाणं डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही… जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा प्रत्येक मुलीच्या लग्नात वाजणार हे गीत अख्या मांडवाला रडवून जायचं… अमर भूपाळी मधली घनःशाम सुंदरा ही भूपाळी… सांगा मुकुंद कुणी हा पाहिला हे गाणं… गगन सदन ही प्रार्थना.. सुवासिनी मधले येणार नाथ आता.. बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत… जीवनात ही घडी अशीच राहू दे.. आम्ही जातो आमच्या गावा मधलं… देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा… आराम हराम आहे या चित्रपटातलं आकाशी झेप घे रे पाखरा… तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले… एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात… अष्टविनायका तुझा महिमा कसा… किती असंख्य गाणी..! विरह गीत, प्रेम गीत, भक्तीगीत, भावगीत, मराठी कवींनी लिहिली संगीतकाराने चाली लावल्या संगीत दिलं आणि ती गाणी अजरामर झाली केवढा मोठा खजिना आहे. हे मी इथे लिहिते ते अगदी वरवरचे आहे याची जाणीव मला आहे या खजिन्याचा आनंद घ्यावा… तोच आनंद पदरात भरून माघारी फिरावं.. खजिन्याचा आनंद लुटावा खजिना नव्हे.. कारण तो अमाप आहे.
… हे इतक सुंदर मराठीत असताना हे सगळं सौंदर्य हा आस्वाद हा संस्कार आमची पुढची पिढी मात्र घेणार नाही कारण ते रेन रेन कम अगेन, मेरी हॅड अ लिटिल लॅम्प.. डॅफो डीलस्.. अशा कविता पाठ करते ज्या त्यांच्या मातृभाषेत नसल्यामुळे त्यांना त्याचा अर्थही समजत नाही आजच्या दिवशी या सगळ्या कवी लेखकांचे स्मरण करा त्यानी आपल्याला काय दिले हे दहा मिनिटे बसून मनोमन आजमवा. आमची पिढी भाग्यवान मातृभाषेत शिकली आणि फर्ड इंग्रजी येत नाही म्हणून कुठेही अडलं नाही मराठी साहित्यातला हा आनंद आम्ही आज उपभोगतोय. नुसती गाणी नाहीत हा संस्कार आहे, इतिहास आहे, पुराण आहे.. त्याच्या कथा आहेत, त्या भावभावनांचे वर्णन आहे.. आम्ही हे मनसोक्त उपभोगले… श्यामची आईचे चिंधीच्या गाण्याने घराघरात प्रेमाचा संस्कार रुजला होता आणि द्रोपदीशी बंधू शोभे नारायण.. हे भावा बहिणीचे प्रेम सांगितलं होतं …
हे सगळं लुप्त होता कामा नये. हा निखळ आनंद सर्व मराठी कुटुंबाला मिळालाच पाहिजे. किमान अशी प्रार्थना आपण देवाजवळ आजच्या दिवशी करू…
या लेखात मी फक्त काव्याचा परामर्च घेतला आहे.. तोही अगदी वरवर. पण थोडा आनंद तो नक्कीच मिळवून देईल. आजच्या दिवशी ज्ञानेश्वर तुकाराम जनाबाई सर्व संत सज्जन त्यानंतरचे कवी कुसुमाग्रज माडगूळकर खळे काका भारा तांबे मर्ढेकर अत्रे देशपांडे अशा असंख्य लेखकाना, कवीना मनापासून वंदन ज्यानी ही भाषा समृद्ध केली, त्या माय मराठीला सौंदर्य प्राप्त करून दिले, त्या सर्वांना आजच्या दिवशी मनापासून वंदन.
… लक्षात ठेवा नाणी संपतात पण गाणी संपत नाहीत. ती अमर आहेत.. अगदी अजरामर…!
आपल्या लाडक्या लेकाला लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत तरी शिकवा रे.. एवढी आग्रहाची विनंती आहे, नाहीतर ते या खजिन्याला मुकतील आणि त्यांची यंत्र होतील.
– – बघा जमलं तर…
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



















