मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानतपस्वी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ज्ञानतपस्वी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मा. श्री. आबासाहेब अमृतकार

माझे गुरुवर्य *ज्ञानतपस्वी आबासाहेब अमृतकार* हे आपल्या वयाची ८५ वर्षे पूर्ण करीत आहेत ही आम्हा सर्व शिष्यगणांसाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षाही अधिक वय असलेले आणि निवृत्त होऊन अनेक वर्ष झालेले त्यांचे विद्यार्थी आजही त्यांच्याबद्दल आदराने बोलतात. सरांची भेट झाली तर आदराने वाकून नमस्कार करतात. आपण म्हणतो की ज्या पायांवर डोके ठेवावे असे पाय आज दिसत नाहीत. परंतु आमचे गुरुवर्य आबासाहेब अमृतकार सर हे या वाक्याला अपवाद ठरावे असे व्यक्तिमत्व! त्यांनी असे विद्यार्थी घडवले की ते विद्यार्थी या गुरुसमोर आपोआपच नतमस्तक होतात.

उंच, सडपातळ शरीरयष्टी, अंगावर साधेच पण स्वच्छ कपडे आणि चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज असे आमचे आबासाहेब त्यांनी वर्गात प्रवेश केला की वर्गातील मुले आपोआप शांत होत. आज त्यांच्याकडून नवीन काय ऐकायला मिळते किंवा शिकायला मिळते अशी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच असायची. विषय कोणताही असो तो विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवणे यात आबासाहेबांचा हातखंडा. वाणी तर अतिशय शुद्ध. त्यांच्या आडनावात असलेल्या अमृत शब्दाप्रमाणेच त्यांची अमृतवाणी विद्यार्थ्यांची ज्ञानतृष्णा भागवत असे.

शाळेच्या आवश्यकतेप्रमाणे आबासाहेबांनी अनेक विषय शिकवले. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, संस्कृत यासारख्या विषयांचा समावेश होता. कोणताही विषय केवळ पाठ्यपुस्तकापुरता त्यांनी शिकवला नाही. तो शिकवत असताना अवांतर माहिती देणे, ती माहिती देता देता विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होतील अशा प्रकारची शिकवण देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

शाळेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच साजरे होत. या कार्यक्रमांना आबासाहेबांची व्यासपीठावर आवर्जून उपस्थिती असायची. ते जेव्हा शिक्षक होते आणि नंतर अधिकारी झाले तेव्हाही ते व्यासपीठावर उपस्थित असायचे. अशा प्रसंगी विविध विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण बोलणे ऐकणे ही उपस्थितांसाठी मेजवानीच असायची. त्यांनी बोलत रहावे आणि त्यांचे बोलणे संपू नये असे वाटत असायचे. त्यांच्या आवाजाची फेक लांबवर जात होती. ध्वनिक्षेपक नसला तरी त्यांचा आवाज अगदी शेवटी बसलेल्या विद्यार्थ्यापर्यंत सहज ऐकू जात असे.

आपल्या सहकारी शिक्षकांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी ते सहज करत असत. एखादा नवीन लागलेला शिक्षक व्यासपीठावर एखाद्या विषयावर बोलायला आला तर त्याचे हमखास कौतुक आबासाहेबांकडून व्हायचेच. अशा शिक्षकाच्या बोलण्यात काही चुका असल्यास किंवा त्याला काही मार्गदर्शन करायचे असले तर तेही आबासाहेब आवर्जून करीत. परंतु ते सर्वांसमोर कधीच नाही. तर त्या व्यक्तीला ते आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत, त्याला प्रेमाने बसायला सांगत बऱ्याचदा त्याच्यासाठी चहा देखील मागवत आणि मग बोलता बोलता सहजपणे त्याला मार्गदर्शन करीत अशी त्यांची समजावून सांगण्याची पद्धत होती. मुख्याध्यापक किंवा अन्य अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाला बोलावले असेल तर आपले काही चुकले का अशी भीती त्याला वाटत असे. परंतु आबासाहेबांनी बोलावले असले तर अशी भीती कोणाला कधीच वाटली नाही. एखाद्या शिक्षकाला आपली काही अडचण किंवा समस्या विचारायची असेल, मार्गदर्शन हवे असेल तर त्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे आबासाहेब अमृतकार सर!

शिक्षकांसाठी डीएड आणि बीएड अशी दोन प्रकारची प्रशिक्षणे असतात. परंतु त्यातून खरा शिक्षक घडतोच असे नाही. खरा शिक्षक हा अनुभवातून घडत जातो आणि अशा नवीन शिक्षकांना घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असायची ती आबासाहेबांची! नवीन शिक्षकांना विविध प्रकारे प्रोत्साहन देऊन, समजावून सांगून, कधी कधी त्यांच्यासमोर स्वतः पाठ घेऊन त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.

सेवाकाळात शासनाच्या आणि शिक्षणखात्याच्या वतीने शिक्षकांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जात असत. अशा प्रशिक्षणांमध्ये आबासाहेब नियमितपणे तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विविध अनुभवी, अननुभवी शिक्षक, मुख्याध्यापक आदींना होई. शिक्षणात आलेले नवनवीन विचारप्रवाह, पद्धती यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसे शिकवता येईल याचाच विचार त्यांच्या डोक्यात नेहमी असायचा.

सुरुवातीला आम्हाला ते मराठी विषय शिकवायचे. पण त्यांचे मराठी शिकवणे केवळ पाठ्यपुस्तक शिकवण्यापुरते मर्यादित कधीच नसायचे. शिकवत असताना विविध प्रकारची माहिती मग ती त्या लेखाबद्दल असेल किंवा लेखकाबद्दल, कवीबद्दल असेल ते ती सांगत असत. त्यांच्या या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच आम्हाला अवांतर वाचनाची गोडी लागली. त्यांनी शिकवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता, बालकवींच्या कविता, किंवा मंगेश पाडगावकर बा भ बोरकर, भा रा तांबे यासारख्या कवींच्या कविता आजही लक्षात आहे. त्या कवितांमधील सौंदर्य त्यांनी शिकवताना उलगडून दाखवले. इंग्रजी विषय शिकवण्यात तर सरांचा हातखंडा होता. इंग्रजीच्या तासाला सोप्या इंग्रजीतून ते पाठ किंवा कविता समजावून देत आणि विद्यार्थ्यांची परीक्षेच्या दृष्टीने आपोआप तयारी होत असे. व्याकरण शिकवताना देखील असेच सोप्या पद्धतीने विविध उदाहरणे देऊन ते शिकवत असत.

मी आबासाहेबांचा विद्यार्थीही होतो आणि नंतर त्यांच्या हाताखाली काम करणारा सहकारी शिक्षक देखील. त्यांच्या उपस्थितीत शिक्षक म्हणून काम करणे हीसुद्धा माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब होती.

पुराणांमध्ये देवांसाठी कार्य करणाऱ्या नवीन सुंदर अशा सृष्टीची निर्मिती करणाऱ्या शिल्पकाराला देवशिल्पी विश्वकर्मा असे म्हटले जाते. आमच्यासाठी सर म्हणजे देवशिल्पी विश्वकर्मा! असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आपल्या शिकवणुकीने आकार देणारा हा विश्वकर्मा! त्यांच्या हातांचा परिस स्पर्श ज्यांना ज्यांना झाला, त्यांचे त्यांचे जीवन घडले. देणाऱ्याने देत जावे या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या उक्तीप्रमाणे ते विद्यार्थ्यांना भरभरून देत गेले. त्यांनी काही धनदौलत, पैसा दिला का? त्यांनी वाटला तो ज्ञानाचा प्रकाश आणि संस्कारांची शिदोरी. ही जगातली अत्यंत दुर्मिळ गोष्ट! विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. ती ज्याच्याजवळ असेल, तोच ती इतरांना भरभरून देऊ शकतो. हा प्रकाश आणि ही शिदोरी आजही अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याच्या वाटेवर मार्गदर्शन करीत आहे. देणाराने देत जावे या उक्तीनुसार ते भरभरून देत गेले आणि आम्ही आमच्या पात्रतेप्रमाणे घेत गेलो. खरं तर हे दान घेण्यासाठी आमची ओंजळ अपुरी पडली. त्यांचा वारसा यथाशक्ती, यथामती पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो आहे.

कधी कधी बोलताना आबासाहेब त्यांच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल सांगत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले सुखदुःखाचे अनेक आघात त्यांना काळाच्या ओघात झेलावे लागले. सुरुवातीला उत्तम असणारी दृष्टी नंतर अधू झाली. त्यांनी त्यासाठी अनेक उपाय केले परंतु काही उपयोग झाला नाही. परंतु आपली जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या अधू-दृष्टीच्या व्यंगावरही मात करून आपल्या विद्यार्थ्यांना डोळसपणे घडवले हे त्यांचे मोठेपण आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि संकटे यामुळे ते कधी खचून गेले नाहीत किंवा हताश झाले नाहीत. आपले आनंदी मनोवृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी कायमच जागृत ठेवला. त्याची पेरणी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये केली. आबासाहेबांचे अनेक विद्यार्थी आज देशात आणि परदेशात मोठ मोठ्या पदांवर उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.

पडद्यावरील हिरो आणि रियल लाईफ हिरो यात फार मोठा फरक आहे. पडद्यावरील नायक फक्त ती भूमिका जगत असतो. परंतु वास्तव जीवनातील हा नायक अनेक अडीअडचणींना तोंड देऊन समाजाला प्रगतीपथावर नेत असतो. अमृतकार सर हे असे रियल लाईफ हिरो आहेत. करोडो रुपयांची संपत्ती असणारा एखादा कारखानदार किंवा नेता समाज मान्यता पावत असेल किंवा प्रतिष्ठा मिळवत असेल परंतु ज्यांचे पाय आवर्जून धरावे असे पाय आज मात्र अभावाने दिसतात. असे पावन पवित्र असे चरण सरांचे आहेत की ज्यांना हजारो विद्यार्थी आदराने वंदन करतात. आजही बाहेरगावचे किंवा परदेशातील विद्यार्थी चाळीसगावी आले की सरांची आवर्जून भेट घेतात. त्यांचे आशीर्वाद घेतात.

काही कारणामुळे आबासाहेब शाळेचे मुख्याध्यापक जरी होऊ शकले नाहीत तरी ती उणीव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली आणि आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या प्रति समाजामध्ये प्रचंड आदर होता संस्थेची ज्यावेळी निवडणूक झाली, त्यावेळी सभासदांनी भरभरून मते देऊन त्यांना संचालक म्हणून निवडून दिले. हीच त्यांच्या कामाची पावती होती. ते चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक झाले आणि या संचालक पदावर काम करत असताना देखील विद्यार्थी, शिक्षक पालक आणि संस्थेचे अन्य संचालक यांना आजही वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे ते मार्गदर्शन करीत असतात. वयाच्या ८५ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत. आपल्या कार्यपूर्तीचे समाधान त्यांच्याजवळ नक्कीच असेल. अशा या ज्ञानतपस्वी असलेल्या गुरुवर्य आबासाहेब अमृतकार सरांना परमेश्वर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेतील त्यांचा काव्यसंग्रह ‘गीतांजली’ १९१० साली प्रकाशित केला. या संग्रहात १५० हून अधिक कविता आहेत. या संग्रहातील ५३ व त्यांच्या ‘नैवेद्य’, ‘खेया’ अशा पूर्वप्रकाशित पुस्तकातून तसेच नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या पन्नास अशा एकूण निवडक १०३ कवितांचे स्वत: रविंद्रनाथांनी इंग्रजीत भाषांतर करून ‘गीतांजली’ ‘song offerings’ हे पुस्तक सन १९१२ मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकाला प्रसिद्ध इंग्रजी कवी W B Yeats यांची प्रस्तावना लाभली आहे. याच इंग्रजी काव्यसंग्रहाला सन १९१३ मधे नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

——————–

गीत : १०

Here is thy footstool and there rest thy feet where live the poorest, and lowliest, and lost.

When I try to bow to thee, my obeisance cannot reach down to the depth where thy feet rest among the poorest, and lowliest, and lost.

Pride can never approach to where thou walkest in the clothes of the humble among the poorest, and lowliest, and lost.

My heart can never find it’s way to where thou keepest company with the companionless among the poorest, the lowliest, and the lost.

————–

भावानुवाद : गीत १०

*

तू असशी तव भक्तांजवळी 

जे असती तव पायांजवळी।

*

हाकेस त्यांच्या देशी उत्तर 

मज भासे तव दर्शन दुस्तर।

वाकुनि करतो तुजला नमना

पाहू न शकतो तुझिया चरणा।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

*

शाल पांघरून विनम्रतेची

सेवा करिसी त्या सर्वांची।

अहंकारी मी करित वल्गना

अधीर तरीही तुला भेटण्या।

तुझिया पाशी कसा येऊ रे

अडला नडला, शरण मी नच रे।

चरणांपाशी असती जमले 

दीन, दुबळे, भरकटलेले॥

*

तुला भेटण्या आतुर अंतर

मार्ग शोधितो इथे निरंतर।

कसा मी येऊ जिथे तू असशी

शरणागतांसि मार्ग दाविसी।

उन्मत्ताला मार्ग न मिळतो

तुझियापाशी येऊ न शकतो।

चरणांपाशी असती जमले 

दीन, दुबळे, भरकटलेले॥

*

षड्रिपूंचा त्याग करुनि

जावे शरण तयालागुनि।

अशाच भक्ता आश्रय देतो

त्यांच्यासाठी जन्मा येतो।

चरणांपाशी असेच जमती

दीन, दुबळे जे अहं त्यागती॥

*

भावानुवाद: © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

———

गीत : ११

Leave this chanting and singing and telling of beads! Whom dost thou worship in this lonely dark corner of a temple with doors all shut? Open thine eyes and see thy God is not before thee!

He is there where the tiller is tilling the hard ground and where the path-maker is breaking stones. He is with them in sun and in shower, and his garment is covered with dust. Put off thy holy mantle and even like him come down on the dusty soil!

Deliverance? Where is this deliverance to be found? Our master himself has joyfully taken upon him the bonds of creation; he is bound with us all for ever.

Come out of thy meditations and leave aside thy flowers and incense!

What harm is there if thy clothes become tattered and stained? Meet him and stand by him in toil and in sweat of thy brow.

——————

भावानुवाद: गीत ११

*

अंधाऱ्या गाभार्‍यात

देवळाच्या कोपर्‍यात

मंत्रपठण करीत

भक्तीगीते गात

जपमाळ ओढत

त्याची वाट बघत

उपासना करतोस का?

वेडा आहेस का?

उघड डोळे, बघ नीट

नाही विठ्ठल, नाही वीट

*

तो तर आहे तिथं

शेतकरी शेतात जिथं

मशागत करतोय,

रस्त्यात मजूर जिथं

दगड फोडतोय

देव आहे फक्त तिथं

भिजणाऱ्या पावसात

भाजणाऱ्या उन्हात

धुळीत, मातीत,

दगड धोंड्यात

*

शांतव नंदादीप

ये मातीच्या समीप

करिसी भक्ती

मागसी मुक्ती

बंधक जगती

देवही असती

निर्मिती, क्षती

करण्यासाठी

बंधन भक्तांप्रती

मोदे स्विकारती

*

नको प्रार्थना,

नको याचना,

नको फुले, नको धूप

नको पत्री, नको दीप

ये धुळीत तू ही,

मळोत वस्त्रे तुझी ही

त्याची सोबत कर

गरजूंना मदत कर

सुखदुःखाचा प्रहर

त्यांच्याच बरोबर

*

भावानुवाद: © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

———

गीत : १२

*

The time that my journey takes is long and the way of it is long.

I came out of the chariot of the first gleam of light, and pursued my voyage through the wildernesses of worlds leaving my track on many a star and planet.

It is the most distant course that comes nearest to thyself, and that training is the most intricate which leads to the utter simplicity of a tune.

The traveller has to knock at every alien door to come to his own, and one has to wander through all the outer worlds to reach the innermost shrine at the end.

My eyes strayed far and wide before I shut them and said “Here art thou! “

The question and the cry “Oh, where? ” melt into tears of a thousand streams and deluge the world with the flood of assurance “I am! “

————

भावानुवाद : गीत १२

*

हा मार्ग जो नेतो मला

तुझियापाशी, नंदनंदना

प्रवास तो अती दूरचा

संपता रस्ता संपेची ना॥

*

मी उषेच्या प्रथम किरणी

मार्गस्थ झालो, मधुसूदना 

निर्मनुष्य, ओसाड प्रदेशी

लांघून जात तीनही भुवना॥

*

खडतर या अशा प्रवासी

तुजसाठी निघालो, जनार्दना

मार्गी जाता, ग्रहताऱ्यांवर

उमटत जाती पाऊलखुणा॥

*

वाट अनोखी अज्ञाताची

तुजकडे नेईल, मनमोहना

तुझीच शिकवण ध्यानी ठेवून

करीत जाईन मार्गक्रमणा॥

*

सूरतालाच्या गुंतागुंती

तूच शिकविसी, कमलनयना

शेवटी नंतर हाती येई

सुबोध, सरल ती स्वररचना॥

*

निजधामाचे द्वार शोधण्या

अनोळखी द्वारी, अजन्मा

तूच फिरविशी भुवनोभुवनी

मनमंदिरी तव अंती येण्या॥

*

भरकटलो मी अनेक वेळा

जाणवसी परी, कंसमर्दना

अंती माझ्या मिटल्या नयना

दिससी तू रे अंतश्चक्षुंना॥

*

कोठे अससी या प्रश्नाला

उत्तर देई अश्रूंचा पूर

हमी मिळतसे अस्तित्वाची

प्रतिध्वनित हो तुझेच उत्तर॥

*

– क्रमशः भाग चौथा 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “७७,४०० सुवर्ण नाण्यांनी झाकलेली स्मशानभूमी!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “७७,४०० सुवर्ण नाण्यांनी झाकलेली स्मशानभूमी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

(२६ डिसेंबर. साहिबजादा जोरावर सिंग, साहिबजादा फतेह सिंग बलिदान दिन – विशेष लेख!)

मातीतून जन्माला आलेला देह शेवटी मातीतच मिसळून जातो…. हे वैश्विक सत्य! मानवी देहाला जमीन किती लागते तर तीन हात उभी आणि दोन हात आडवी. जमिनीच्या पोटात देह गाडून ठेवले जातात ती जागा बराच काळ तशी अडवून ठेवली जाते…. पण जिथे देह अग्नीच्या स्वाधीन केले जातात, ती जमीन तर काही घटकांतच पुन्हा रिकामी होऊन जाते…. दुस-या देहाची राख करण्यासाठी!

‘श्म’ म्हणजे मृत देह आणि ‘शान’ म्हणजे शय्या… इति श्मशान! देहाच्या क्षणभराच्या शय्येची ही जमीन कुणी विकेल का? आणि कुणी विकत घेईल का?

आपल्या इतिहासाने मात्र हे आक्रीत उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे… आजपासून सुमारे ३२० वर्षांपूर्वी हा सौदा झाला होता!

परमेश्वराच्या शोधाच्या प्रयत्नांत गुरु नानक साहेबांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी आत्मबोध झाला आणि त्यांनी त्यांना लाभलेली शिकवण… सीखांच्या अर्थात त्यांच्या शिष्यांच्या हाती सोपवली… आणि एका नव्या धर्माचा… शीख धर्माचा उदय झाला! या जगात एका पेक्षा अधिक धर्म असावेत ही या जगाच्या निर्मात्याचीच योजना आहे, अशी या धर्माची धारणा आहे… परमेश्वराला जाणण्याचा आणखी एक मार्ग, जो दुस-या धर्माचा मार्ग छेदून जात नाही, अशी शिखांच्या गुरुंची शिकवण. पण ही शिकवण मान्य नसणा-या धर्माचे अनुयायीसुद्धा होतेच आणि आहेतही.

शिखांना १४६९ मध्ये गुरु नानक देव यांच्या रुपात पहिले गुरु लाभले. ही परंपरा १७०८ पर्यंत चालली ती दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग साहेबांपर्यंत. श्री गुरु गोबिंद सिंग साहेबांनी पवित्र ग्रंथ शिखांना प्राप्त करून दिला…. तोच ग्रंथ आता गुरु म्हणून प्राणांपलीकडे पूजला जातो.

प्रस्थापित धर्म आणि त्यांचे अनुयायी व सीख धर्माचा संघर्ष होणे अटळ ठरले. या संघर्षाची परिसीमा श्री गुरु गोबिंद सिंग साहेबांच्या कारकीर्दीत झाली. १६६५ मध्ये नववे गुरुजी तेग बहादूर साहेबांनी आनंदपूर साहिब राज्याची स्थापना केली. त्यांच्या हत्येनंतर श्री गुरु गोबिंद सिंग यांनी सूत्रे हाती घेत १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. मुघल आणि स्थानिक पहाडी हिंदू राजांनी खालसा विरोधात एकत्र येत युद्ध पुकारले आणि आनंदपूर येथे स्थित असलेल्या सीख सेनेची कोंडी केली. अनेक दिवस झाडपाल्यावर गुजराण करण्याची वेळ आल्यावर अगदी नाईलाजाने गुरु गोबिंद सिंग यांना मुघल आणि त्यांच्यासोबत असलेल्या राजांचा प्रस्ताव मान्य करावा लागला…. सुरक्षित निघून इतरत्र निघून जाण्याचा! पण मुघलांनी आणि या राजांनी विश्वासघात करीत श्री गुरुंचा पाठलाग करीत त्यांच्यावर हल्ला चढवला. श्री गुरुजी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात ताटातूट झाली. युध्दाच्या धुमश्चक्रीत त्यांच्या चार पुत्रांपैकी दोन पुत्र, साहिबजादा (अर्थात गुरुंचे पुत्र) अजित सिंग आणि जुझार सिंग एका बाजूला आणि उर्वरीत दोन पुत्र, जोरावर सिंग आणि फतेह सिंग आणि श्री गुरुंच्या मातोश्री गुजरी दुस-या बाजूला पांगले. पैकी अजित सिंग आणि जुझार सिंग युद्धात कामी आले. ही बातमी श्री गुरु गोबिंद सिंग यांना समजताच त्यांनी ही घटना म्हणजे मुघलांच्या राज्याच्या अंताची नांदी ठरेल अशी भविष्यवाणी केली… जी पुढे प्रत्यक्षात आली!

पण इकडे साहिबाजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग दुर्दैवी घटनाक्रमामुळे मुघलांच्या तावडीत सापडले. मुघलांचा अधिकारी वजीर खान याने जोरावर सिंग, फतेह सिंग आणि माता गुजरी यांना अटक केली. इस्लामचा स्वीकार केल्यास जीवदान देऊ अशी लालूच दाखवली. त्याला जोरावर सिंग, फतेह सिंग आणि माता गुजरी बधले नाहीत. यावर, काही मोठ्या दरबा-यांचा विरोध असतानाही वजीर खानाने जोरावर सिंग, (वय ९ वर्षे))फतेह सिंग (वय ६ वर्षे) या दोन्ही अल्पवयीन मुलांना मृत्युदंड फर्मावला! इंग्रजी तारीख २६ डिसेंबर, १७०५ रोजी (हे वर्ष १७०४ होते, असेही काही अभ्यासक मानतात) भिंतीमध्ये चिणून त्यांना ठार मारण्याची आज्ञा दिली गेली.. पण ही दोन बालके अजिबात घाबरली नाहीत… ते पाहून संबंधित मुघल सैनिकांनी या दोघांचाही शिरच्छेद केला, असे सांगितले जाते! नातवांची हत्या झाल्याचे समजताच आजी माता गुजरी यांनी प्राणत्याग केला!

पूर्वी शाहजहांच्या पदरी महसूल खात्यात अधिकारी राहिलेले एक गर्भश्रीमंत व्यापारी तोडरमल जैन सरहिंद या वजीर खानाच्या राज्यात वास्तव्यास होते. यांनी हे दोन्ही गुरुपुत्र आणि गुरु माता यांच्या देहांवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याची अनुमती मागितली. वजीर खानाने अंत्यसंस्काराची जागा विकत घ्यावी लागेल, असे छदमीपणाने सांगितले. जागेची किंमत म्हणून ती जमीन झाकली जाईल इतकी सोन्याची नाणी पाहिजेत, अशीही अट घातली…. आणि सोन्याची नाणी अधिक संख्येने लागावीत यासाठी ही नाणी पालथी न ठेवता उभी करून ठेवावीत, असाही आदेश दिला. तोडरमल जैन यांनी आपली सर्व संपत्ती यासाठी खर्ची घातली….. ती जागा सोन्याच्या नाण्यांच्या ऐवजात विकत घेतली…. आणि एक ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले!

बालकांना मृत्यूदंड देणे, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमीनही विकत घ्यायला लावणे ही मनोवृत्ती एका बाजूला आणि स्वत:च्या धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणे, मृतदेहांचा सन्मान राखण्यासाठी स्वत:ची सारी संपत्ती खर्च करणे ही मनोवृत्ती यांतील अंतर ध्यानात घेण्यासारखे आहे.

ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी सांप्रत काळी फतेहपूर सिंग साहिब गुरुद्वारा हे तीर्थ स्थळ आहे. या स्थळातील एका सभागृहाला तोडरमल यांचे नाव दिले गेले आहे. तोडरमल यांना वजीर खानाने राज्यातून हद्दपार केल्याचा उल्लेख आहे. जेंव्हा श्री गुरु गोबिंद सिंग यांची आणि तोडरमल यांची भेट घडली, त्या भेटीत गुरुजींनी तोडरमल यांना वरदान मागावयास सांगितले… त्यावर मी निपुत्रिक राहो, जेणे करून माझ्या वंशात माझ्या संपत्तीवर गर्व सांगणारा कुणी उरणार नाही, असा वर मागितल्याचे सांगितले जाते!

वरील घटनाक्रमानंतर उलटून गेलेला कालावधी सुमारे तीनशे वर्षांचा आहे. यामुळे तपशीलात लक्षणीय बदल, मतभेद, दंतकथा संभवतात… पण बालकांचे बलिदान मात्र नि:संशय खरे आहे! या दोन्ही सुपुत्रांना वंदन!

या बलिदानांचा प्रतिशोध घेणा-या बंदा सिंग बहादूर यांची कहाणीही मोठी रोमांचकारी आहे.

२६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून जाहीर झाला आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण सीख बांधवांच्या भारताच्या संरक्षण आणि इतर क्षेत्रातील त्यागाचेही स्मरण व्हावे. सत श्री अकाल….!

(विविध लेख, बातम्या आणि उपलब्ध साहित्यावर आधारीत, केवळ सामान्य वाचकांच्या माहितीस्तव हा अराजकीय लेख आहे. लहान मुलांना ही कथा ऐकवली गेली तर उत्तम. ऐतिहासिक तथ्ये ज्यांना तपासायची असतील त्यांनी मूळ साहित्य स्वत: तपासून पहावे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ नार्सिस आणि आपण… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ नार्सिस आणि आपण… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

ग्रीक पुराणातील नार्सिसची (Narcissus) गोष्ट मोठी मजेशीर आणि बोधप्रद आहे. नार्सिस अत्यंत देखणा आणि बांधेसूद शरीराचा आहे. तो शिकारी आहे. तो इतका देखणा आहे की स्त्रियाच काय परंतु पुरुष देखील त्याच्यावर मोहित होतात. परंतु आपल्या रूपाचा आणि शरीरसौष्ठवाचा त्याला अहंकार होतो. हा अहंकार इतक्या पराकोटीला पोहोचतो की तो समोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आणि तिरस्कार करायला लागतो. एकदा तो जंगलात शिकार करत असताना एका तळ्याकाठी येतो. तिथे त्याला इको ही अप्सरा भेटते. ती अत्यंत सुंदर असते पण तिला देखील तो तिरस्कार आणि दूर लोटतो.

या इकोची कहाणी सुद्धा मोठी मजेशीर आहे. ग्रीक देवांचा राजा झ्युस (Zeus) हा भोगविलासी असतो. तो नेहमी अप्सरांच्या बरोबर वेळ घालवत असतो. त्याच्या नाचगाण्यात मग्न असतो. अशावेळी बऱ्याचदा त्याची पत्नी हेरा (Hera)येते आणि त्याच्या नाचगाण्यात आनंदात व्यत्यय येतो. ती त्याला त्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न करते. झ्युसला ही गोष्ट आवडत नाही आणि तो हेराला दूर ठेवण्यासाठी इकोची मदत घेतो. इको ही खूप बोलणारी आणि गप्पिष्ट असते. ती आपल्या गोड बोलण्यात हेराला गुंतवून ठेवते. पण लवकरच तिचे हे कारस्थान हेराच्या लक्षात येते आणि ती तिला शाप देते. ती म्हणते, ” यापुढे तुला बोलता येणार नाही इतरांनी बोललेल्या वाक्याचा शेवटचा भागच तुला बोलता येईल. “

शाप मिळाल्यानंतर इको कोणाशीही नीट संवाद साधू शकत नव्हती. एके दिवशी तिने जंगलात शिकारीसाठी आलेल्या सुंदर नार्सिसला पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. ती नार्सिसचा पाठलाग करू लागली, पण शापामुळे ती स्वतःहून त्याला साद घालू शकत नव्हती.

जेव्हा नार्सिसने विचारले, “इथे कोणी आहे का? ” तेव्हा इको फक्त शेवटचा शब्द बोलू शकली, “आहे का? ” नार्सिसने तिला बाहेर येण्यास सांगितले, पण जेव्हा ती त्याच्या समोर गेली आणि तिने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गर्विष्ठ नार्सिसने तिचा धिक्कार केला आणि तिला तिथून निघून जाण्यास सांगितले.

या गोष्टीचा बिचाऱ्या इकोच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. आतापर्यंत असा अनुभव तिला कधी आला नव्हता. तिला काही सुचेना. ती शोकमग्न झाली आणि एका गुहेत जाऊन बसली. तिने खाणे-पिणे सोडले. हळूहळू तिचे शरीर नष्ट होत गेले आणि उरला फक्त तिचा आवाज! त्यालाच आपण इको (Echo) म्हणतो. पर्वतावरील दऱ्याखोऱ्यातून हा आवाज आपल्याकडे परत येतो.

परंतु यामुळे नेमेसिस ही सुडाची देवता संतापली तिने नार्सिसला शाप दिला. ” तू ज्या व्यक्तीवर प्रेम करशील ती व्यक्ती तुला कधीच प्राप्त होणार नाही. ” नार्सिस तळ्याच्या काठी बसला होता. तळ्यातील स्वच्छ पाण्यात त्याचे सुंदर प्रतिबिंब पडले होते तो स्वतःच्या प्रतिबिंबावर इतका मोहित झाला की ते प्रतिबिंब आपले स्वतःचेच आहे हे त्याच्या लक्षातही आले नाही आणि ती व्यक्ती (म्हणजे प्रतिबिंबातील) आपल्याला मिळावी अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. परंतु तो आपल्या जागीच स्थिर झाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. काही लोकांच्या मते त्याने आपले प्राण त्यागले. त्याचा ज्या जागी मृत्यू झाला त्या जागी सुंदर डॅफोडील्सची सुंदर फुले उमलली. सौंदर्याचा गर्व शेवटी निसर्गात विलीन होतो असेच यातून सूचित होते.

या पुराणकथेतील देवांचा राजा झ्युस याचे आपल्या पुराणकथेतील स्वर्गाचा राजा इंद्र याच्याशी साम्य दिसते. इंद्र नेहमी असाच भोगविलासात मग्न असलेला दिसतो. झ्युस ची पत्नी हेरा आणि इंद्राची पत्नी शचि यांच्यातही साम्य वाटते. दोन्हीही पतिव्रता आणि शाप देण्याचे सामर्थ्य असलेल्या आहेत.

परंतु नार्सिस आणि इको यांची कथा आपल्याला खूप काही शिकवून जाणारी आहे. नार्सिस म्हणजे स्वमग्न असणाऱ्या व्यक्तींचा प्रतिनिधी! अशा माणसांना स्वतः खेरीज दुसरे काही सुचत नाही इतरांना ते महत्त्वच देत नाहीत. मी आणि माझं याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. त्यांच वर्तुळ मर्यादित असतं. त्यातून अहंकार जन्माला येतो मग तो अहंकार रूपाचा, सत्तेचा, पैशाचा किंवा आणखी कशाचाही असू शकतो. या अहंकारापोटी ही माणसे दुसऱ्याला तुच्छ समजू लागतात. नार्सिसला स्वतः पलीकडे काही दिसत नव्हते. प्रेमाने जवळ आलेल्या इकोला त्याने दूर लोटले. अशी माणसे शेवटी स्वतःचाच नाश करून घेतात. आपल्याकडील रावणाची कथा अशीच आहे. त्याला स्वतःच्या शक्तीचा सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! मी सर्व शक्तिमान आहे. माझ्या विरोधात कोणीच लढू शकत नाही असा गर्व त्याला झाला होता. प्रत्यक्ष भगवान शंकरांना देखील आव्हान देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. या अहंकारातूनच त्याचे हातून चुका घडत गेल्या. विद्वान आणि सगळे काही जाणत असूनही त्याने नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. प्रभू रामचंद्रांना तो एक तुच्छ मानव समजत होता. त्यांच्या हातूनच त्याचा अंत झाला.

अशी अनेक उदाहरणे आजही बघायला मिळतात. जी माणसे स्वतःतून बाहेर पडू शकत नाही आणि इतरांसाठी ज्यांना काही करता येत नाही अशी माणसे स्वतःच अडकून बसतात आणि त्यांची पुढची प्रगती थांबते, विकास थांबतो. इको म्हणजे प्रतिध्वनी! तिचे पुराणकथेतील पात्र प्रतीकात्मक घ्यायला हवे. हे पात्र कर्माचा सिद्धांत सांगते. जसा प्रतिध्वनी आपल्याकडे परत येतो तसे आपण जसे कर्म करू तसे ते आपल्याकडे परत येते. इको स्वतःचे अस्तित्व हरवून बसली. स्वतःचे कर्तव्य विसरली. जी व्यक्ती स्वतःचे अस्तित्व हरवून बसते, आपले कर्तव्य विसरते, तिचा देखील इकोसारखाच विनाश होतो. या सगळ्या व्यक्तिरेखा पौराणिक असतीलही परंतु त्या आपल्याला खूप काही सांगून जातात.

नार्सिससारखी प्रवृत्ती असणे म्हणजे नार्सिसिझम. आजच्या सोशल मीडियाचा प्रभाव असणाऱ्या काळात खूप लोक स्वतःच्या प्रतिमेत अडकलेले दिसतात. वारंवार स्वतःची सेल्फी घेणे, स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, स्वतःला मिळालेले लाईक यामध्ये समाधान मानणे यातच ते अडकलेले दिसतात. रस्त्यावर एखादा अपघात झालेला असेल तर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी ते त्याचा व्हिडिओ बनवणे किंवा रील तयार करणे यात मग्न दिसतील. मग तो सोशल मीडियावर टाकून आपल्याला किती लाइक्स मिळतात यावर समाधान मानतील. अशा व्यक्तींना इतरांनी मदतीसाठी पसरलेले हात दिसत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नार्सिसिझम हा एक असा तुरुंग आहे ज्याच्या भिंती आरशांनी बनलेल्या असतात. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो आरसा फोडून समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे, प्रसंगी आपले दुःख बाजूला ठेवून इतरांना मदत करणे. मी ऐवजी आपण सर्व अशी भावना ठेवणे, आभासी जगाऐवजी वास्तवाचे भान ठेवणे, इतरांना निरपेक्ष भावनेने मदत करणे, इतरांबद्दल कृतज्ञता बाळगणे यासारख्या अनेक गोष्टी करता येतील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आद्य मराठी ‘शायर…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

`

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आद्य मराठी ‘शायर…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आज २९ डिसेंबर, यवतमाळचे आद्य मराठी शायर अॅड भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्मदिन.

मराठीत ‘शायरी’ हा शाही काव्यप्रकार यशस्वीपणे हाताळणारे भाऊसाहेब हे पहिले मराठी शायर!

आपल्या शायरीविषयी त्यांना किती आत्मविश्वास होता पहा. ते म्हणतात…

शायरी ऐकून माझी सांगेल जो, ‘ आता पुरे’

तो रतीच्या चुंबनाही सांगेल की, ‘ आता पुरे! ‘

ते साक्षात ईश्वरालाही ठणकावून सांगतात….

*

नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही

भगवन्, तुझ्या दुनियेस काही देउनी गेलो अम्ही

शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती

दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती!  

इष्क, जीवन, मृत्यू, विनोद, वार्धक्य अशा अनेक विषयांवरची त्यांची शायरी विलक्षण सुंदर आहे. ‘मृत्यू आणि वास्तव’ या विषयावरची शायरी वाचल्यावर कोणाही सहृदय व्यक्तीचे मन गलबलून जाते!

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले

मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले ।

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये

होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये॥

*

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला

एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला ।

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी

जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी॥

*

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले

श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले ।

थोडे जरी का दु:ख माझे, असते कुणाला वाटले

जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले॥

*

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी

कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही ।

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला

झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला॥

*

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला

रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला ।

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली

चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली ।।

स्वतः नैय्यायिक व शास्त्रपंडीत असणाऱ्या भाऊसाहेबांची दार्शनिक शायरीही अतिशय प्रगल्भ व रमणीय आहे. पत्त्याच्या खेळाच्या रूपकातून त्यांनी हसत खेळत मांडलेले गंभीर तत्वज्ञान पहा…

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो

कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो ।

पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे

सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे॥

*

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला

पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला ।

राणीसही जाणीव काही और होऊ लागली

लाजलि नव्हती कधी ती, आज लाजू लागली॥

*

दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला

पंजा म्हणे चौ-र्यास आता श्रीमंत वाटू लागला ।

विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले

भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले॥

*

नुसता उपाधी भेद, कोणी राजा नव्हे राणी नव्हे

आणखी सांगू पुढे, तो खेळही अमुचा नव्हे ।

खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी

म्हणती तयाला ईश, म्हणति आल्ला कुणी, येशू कुणी॥

*

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले

एका परी पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले ।

आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्त्यातला

आहे जरी पत्त्यातला तो, नाही तसा पत्त्यातला॥

*

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी

ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी ।

हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा

आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा ।।

अशा या ‘ मस्तवाल ‘, ‘ बेगुमान ‘, ‘ प्रतिभावान ‘ ‘ पंडित ‘ शायराच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

🙏🏽🙏🏽🙏🏽

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कुट्टनीमतम् – समाजदर्शन आणि व्यंग्य…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कुट्टनीमतम् – समाजदर्शन आणि व्यंग्य…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कुट्टनीमतम् — समाजदर्शन आणि व्यंग्य

संस्कृत साहित्यातील काव्यप्रकार बहुधा अलंकार, रस आणि भावनांनी परिपूर्ण असतात. परंतु काही ग्रंथ असे आहेत, ज्यांनी समाजातील वास्तव आणि त्यातील ढोंग यांचे निर्भीड चित्रण केले आहे. दामोदरगुप्त यांचे “कुट्टनीमतम्” हे असेच एक विलक्षण व्यंग्यात्मक काव्य आहे.

लेखक व काल

“कुट्टनीमतम्” या ग्रंथाचे लेखक दामोदरगुप्त हे काश्मीरचे कवी होते. त्यांचा काळ इ. स. ८वे शतक, म्हणजेच राजा जयापीडचा काळ मानला जातो. हा संस्कृत साहित्यातील पुनरुज्जीवनाचा सुवर्णकाल होता.

ग्रंथाचे स्वरूप

‘कुट्टनीमतम्’ म्हणजे “कुट्टनीचे मत”. कुट्टनी म्हणजे वेश्या व्यवसाय चालवणारी मध्यस्थ स्त्री. या ग्रंथात ती आपल्या मुलीला उपदेश करते, परंतु त्या उपदेशामधून लेखकाने संपूर्ण समाजाचे वास्तव उभे केले आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ कामकाव्य किंवा शृंगारचित्र नव्हे, तर एक सामाजिक व्यंग्य आहे.

समाजदर्शन

या काव्यातून ८व्या शतकातील काश्मीरचे नगरजीवन जिवंत होते. कवीने त्या काळातील व्यापार आणि धनलालसा, धर्म आणि नैतिकतेतील ढोंग, राजकारणातील भ्रष्टाचार, स्त्रीजीवनाचे सामाजिक आणि आर्थिक पैलू यांचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे.

स्त्रियांना केवळ सौंदर्याचा विषय मानणारा समाज, धर्मगुरूंचा बाह्याचार, आणि संपत्ती मिळविण्यासाठी कोणतेही मार्ग स्वीकारणारा व्यापारी वर्ग, हे सर्व या ग्रंथात स्पष्ट दिसते. म्हणून “कुट्टनीमतम्” हा केवळ साहित्यिक नव्हे, तर सांस्कृतिक संदर्भग्रंथ आहे.

व्यंग्यात्मकता

दामोदरगुप्त यांचे लेखन विनोद, व्यंग्य आणि तटस्थ वास्तववादाने ओथंबलेले आहे. कवी थेट उपदेश करत नाही; तो केवळ आरसा दाखवतो. कुट्टनीच्या तोंडून समाजातील विकृतींवर अप्रत्यक्ष भाष्य होते. एक प्रसिद्ध श्लोक पहा –

अर्थानामार्जने दुःखं, अर्थानां रक्षणे भयम्

भोगे क्लेशो व्यये दुःखं, नार्थः कञ्चिद् सुखावहः॥

अर्थ:- धन मिळवताना दुःख (कष्ट) असते,

त्या धनाचे रक्षण करताना भय असते, त्या धनाचा उपभोग घेताना क्लेश असतो, आणि ते धन खर्च करताना देखील दुःख होते. म्हणून धन काहीही खरे सुख देत नाही.

सारांश: धनामुळे माणसाला सतत काही ना काही चिंता, कष्ट आणि भय असते; म्हणून खरे सुख पैशात नाही.

यातून धनलालसेच्या व्यर्थतेवर कोरडे हसणारा दृष्टिकोन दिसतो.

उदाहरण म्हणून या ग्रंथातील पाच सुंदर श्लोक पुढे देत आहे

१.

यत्र स्त्रियो न रमन्ते नानृतं तत्र वच्यते।

लोभो न दृश्यते यत्र तत्कुट्टनीनां गृहम्॥

अर्थ:- जिथे स्त्रियांना आनंद मिळत नाही, खोटं बोललं जात नाही, आणि लोभही नाही — असं घर असतंच नाही; असं घर म्हणजे कुट्टनीचं घर होय! हा श्लोक समाजातील दांभिकतेवर विनोदी व्यंग करतो.

२.

अलंकारैरलंकृता नारी यदि न हसति न वदति न चलति चक्षुभ्याम्।

तस्याः सौन्दर्यमपि रजःसंवलितं फलं यथा धान्यम्॥

अर्थ:- जर स्त्रीने अलंकार धारण केले तरी ती न हसली, न बोलली, न डोळ्यांनी भाव व्यक्त केले — तर तिचं सौंदर्यही धुळीत माखलेल्या धान्याप्रमाणे व्यर्थ आहे. स्त्रीसौंदर्य हे तिच्या भावभंगिमेतून प्रकटते, केवळ अलंकारातून नव्हे.

३.

यत्र धर्मो न वित्तेन, प्रेम न प्रतिश्रुत्या च।

तत्र लोको न रमते, किमु द्यूतं मद्यं वा॥

अर्थ:- जिथे धर्म पैशाने विकला जात नाही आणि प्रेम वचनांनी खरेदी होत नाही, असा जगात कोठे आनंद राहील? मग जुगार आणि मद्य यांचीच का निंदा करावी? हा श्लोक समाजातील नैतिक अधःपतनावर उपरोधिक भाष्य करतो.

४.

मुखं चन्दनचर्चितं वदनपङ्केरुहं स्मितं चारु।

किन्तु हृदयं विषमयम्, तदपि लोका न जानन्ति॥

अर्थ:- चेहरा चंदनाने सुगंधित, हसू मोहक — पण अंतःकरण विषारी; हे लोक ओळखत नाहीत. बाह्य सौंदर्य आणि अंतर्गत कपट यातील विरोधाभास.

५.

नृणां हृदये स्त्रियः स्थिता, स्त्रीणां हृदये मनोऽन्यस्य।

यत्र परस्परं संगमः, तत्रैव स्नेहबन्धनम्॥

अर्थ:- पुरुषांच्या हृदयात स्त्रिया आणि स्त्रियांच्या हृदयात दुसरेच पुरुष असतात; जेव्हा हे विचार एकत्र येतात, तेव्हाच स्नेहबंध तयार होतो. मानवी संबंधांतील अस्थिरता आणि परस्पर स्वार्थ यांचे सूक्ष्म निरीक्षण. हे सर्व श्लोक ‘कुट्टनीमतम्’ या ग्रंथातील रस, विनोद आणि वास्तवदर्शीपणाचं सुंदर दर्शन घडवतात.

काव्यगुण

“कुट्टनीमतम्” मध्ये सुमारे ७३० श्लोक असून भाषाशैली सजीव, विनोदी आणि नाट्यपूर्ण आहे. संवादरचना आणि पात्रचित्रण हे त्याचे मोठे बलस्थान आहे. प्रत्येक ओळीत कवीची चातुर्यपूर्ण निरीक्षणशक्ती आणि वास्तव जाणणारी दृष्टि दिसते.

समारोप

थोडक्यात, “कुट्टनीमतम्” हे संस्कृत साहित्यातील अद्वितीय यथार्थवादी व्यंग्यकाव्य आहे. कवीने वेश्या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवरून संपूर्ण समाजाचा आरसा उभा केला आहे. धर्म, सत्ता, पैसा आणि नीतिमत्ता या चौघांतील संघर्ष त्याने कुशलतेने दाखवला आहे. म्हणूनच हा ग्रंथ केवळ साहित्यकृती नसून एक सामाजिक आरसा आणि सांस्कृतिक साक्षीदार मानला जातो.

🙏🏽🙏🏽🙏🏽

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

तस्याः साधनानि गायन्त्याचार्याः ॥ ३४॥

अर्थ : ही परा भक्ति साध्य होण्यासाठी आचार्य त्या भक्तीची अनेक साधने सांगतात.

विवेचन : 

भक्ति करून मुक्ति मिळवावी असे मुमुक्षूच्या लक्षात आले की भक्तीचे नवनवीन मार्ग त्याला दिसू लागतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने जितक्या व्यक्ती, तितके भक्तीचे मार्ग असू शकतात.

अनेक आचार्यांनी सांगितलेले अनेक मार्ग आपल्याला माहित आहेत. त्यातला अमुक एक मार्ग तितका चांगला आणि बाकीचे गौण असे म्हणता येत नाही.

मागील सूत्रात भक्ती हेच साधन व भक्ती हेच फल असे सांगितल्यानंतर पुन्हा तिची साधने भक्त्याचार्य सांगतात – नव्हे गातात – असे म्हणण्याचे कारण काय अशी शंका येईल. भक्ती हेच साधन, भक्ती हेच फल जरी म्हटले आहे तरी साधनरूपा भक्ती अंतःकरणात प्रगट होण्याकरिता त्याच्या आड जे प्रतिबंध येतात ते दूर केलेच पाहिजेत. रोगनिवृत्तीकरिता योग्य औषध दिले तरी योग्य अनुपान व पथ्यकारक पदार्थांचे सेवन अवश्यच असते. वेदात, शास्त्रात मोक्षाचे साधन ज्ञान हे सांगितल्यावर त्या ज्ञानाकरिता श्रवण, श्रवणाधिकार प्राप्त होण्याकरिता विवेक-वैराग्यादी व इतर काही अंतरंग व बहिरंग साधने सांगितली आहेतच. फलस्वरूपा भक्तीचे पराभक्तीचे अपराभक्ती हे साधन मानले तरी ती भक्ती प्रत्येक मानवाच्या अंतःकरणात उत्पन्न होतेच असे नाही. ‘नराणां क्षीणपापाना कृष्णे भक्तिर्हि जायते ।’ ‘ज्याची पापवासना नष्ट झाली आहे त्यांच्याच ठिकाणी कृष्णभक्ती उत्पन्न होते. ‘ अशी अनेक वचने आहेत. तसे नसते तर मागील सूत्रात ‘मुमुक्षुभिः’ असे पद घालण्याचे कारण नव्हते. पामर विषयी पुरुष भक्तीकडे वळतच नाहीत. साधने दोन प्रकारची असतात. साध्यप्राप्तीत काही अडथळे आले तर ते दूर करणारी, आणि साध्याला पुष्टी देणारी. प्रतिबंध दूर करणारी दोन साधने पुढील पस्तिसाव्या सूत्रात सांगितली असून पुष्टी देणारी साधने छत्तीस व सदतिसाव्या सूत्रात दाखविली आहेत. तसेच आणखीही एका महत्त्वाच्या साधनाचा अडतीस ते चाळिसाव्या सूत्रात विचार केला आहे तो पुढे येईलच.

सूत्रात “गायन्ति” असे पद आहे ते महत्त्वाचे आहे. साधने सांगतात असे न म्हणता गातात असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे त्या साधनाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. साधनाची स्तुती केल्यासारखे होते. साधनात गोडी आहे हे सिद्ध होते. कारण जेथे गोडी, रुची निर्माण होते तेथेच गायन होते. तसेच साधनात उपदेश किंवा आज्ञा नसून सूचकता असावी असे वाटते. गायन हे श्रोत्यांच्या संतोषाप्रमाणे आत्मतुष्टीचेही साधन आहे असेही सूचित होते. म्हणून ‘गायन्ति’ या पदातून अनेक अभिप्राय प्रगट होतात. हृदयातील ज्या संवेदना असतात त्या जेव्हा प्रेमाचे स्वरूप धारण करून बाहेर पडतात तेव्हा त्यास गायन म्हटले जाते. प्रेमाची बोली संगीत म्हटली जाते व प्रेमाची चाल (गती) तिला नृत्य म्हणतात. हे भक्त्याचार्य भक्तीचे परमप्रेमी आहेत म्हणून भक्तिविषयक साधनाचे गायन करीत असतात.

ज्ञान, कर्म आणि योग याद्वारे भगवंताला कदाचित प्राप्त करता येईल की पण त्यामुळे

भक्तीचे प्रेम लाभलेच असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

भक्तीचा प्रत्येकाच्या अंतरात असते असे म्हणता येईल का? यात थोडा गोंधळ होऊ शकतो, पण प्रत्येकाच्या अंतरी प्रेम आहे का? तर याचे उत्तर हो असेच असेल. प्रत्येकाच्या अंतरी प्रेम भावना आहे. प्रत्येकाला प्रेमाची भूक आहे. आपल्यावर कोणी प्रेम करावे अशी प्रत्येकाच्या सुप्त इच्छा असल्याचे आपल्याला जाणवेल.

कोणाचे आपल्या पतीवर जिवापाड प्रेम असेल तर कोणाचे पत्नीवर, कोणाचे आईवर, कोणाचे बाबावर, कोणाचे बहिणीवर, कोणाचे पाळलेल्या कुत्र्यावर, कोणाचे एखाद्या वस्तूवर, एखाद्या खाद्य पदार्थावर…..,

ही यादी कितीही लांब होऊ शकते….

भक्ति करायची म्हणजे बाकींच्यावर असलेले प्रेम भगवतांकडे वळवायचे…! वाचायला एकदम सोपे पण आचरणात आणायला थोडे जड असे हे सूत्र आहे.

प्रेमाने जग जिंकता येतं असे सर्व संत सांगतात.

आदरणीय श्री. यशवंतराव केळकर यांच्यावर लिहिलेले एक पुस्तक आहे. *”माणूस नावाचे काम”* त्यात एक वचन आहे.

“मनुष्य असो अथवा धातू, दोघेही वितळू शकतात, पण आवश्यक तितकी स्नेहाची ऊर्जा आपल्याला देता आली पाहिजे…! “

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ३४

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मीही हुतात्माच!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “मीही हुतात्माच!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

स्काड्रन लीडर अभिमन्यू राय

मी ही हुतात्माच!

धार्मिक विचारांसाठी आपले प्राण देणाऱ्यास धर्मानुसार विविध मरणोत्तर उपाध्या दिल्या जातात. इस्लाममध्ये शहीद, ख्रिस्त धर्मात martyr तसेच हिंदू धर्मात हुतात्मा इत्यादी.

भारतीय सैन्य धर्मनिरपेक्ष तत्त्वावर काम करीत असल्याने या उपाध्या अधिकृतरित्या वापरल्या जात नाहीत. तर थेट शब्दांत killed in action, battle casualty, Died of Wound असे शब्दप्रयोग केले जातात.. आणि या शब्दांना परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अर्थाच्या छटा असतात, असे समजते!

सैनिकी कर्तव्य पार पाडत असताना सैनिकाला आलेला मृत्यू हा विशेष सन्मानाचा असतो. पण जनमानसात प्रत्यक्ष युद्धात शत्रूशी लढत असताना सैनिक धारातीर्थी पडला की त्याचे महत्त्व जास्त असते. शिवाय विविध पुरस्कार प्राप्त झालेले सैनिक, अधिकारी लोकांच्या जास्त नजरेत असतात. विशेषत: परमवीर चक्र, शौर्य चक्र इत्यादी प्राप्त सैनिक, अधिकारी! खरे तर देशासाठी गेलेला प्रत्येक जीव आपल्यासाठी सदैव नमस्कारणीय आणि प्रिय! असो.

भारतीय लष्कर आपल्या मित्रदेशांतील सैनिकांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण प्रदान करत असते. यांत प्रामुख्याने आशियाई, आफ्रिकी देशांतील सैनिकांचा, अधिकाऱ्यांचा समावेश असतो. जागतिक राजकारण, युद्धनीतीदृष्ट्या हे अत्यावश्यक आहे. चीनला शह देण्यासाठी व्हिएतनाम या देशाशी सुद्धा आपले मैत्री संबंध असून त्यांचा एक तरुण भारतात दिंडीगल हैदराबाद येथील हवाई प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी होता. पण हा प्रशिक्षणार्थी काही कारणांनी त्याच्याकडून अपेक्षित असलेला दर्जा राखू शकत नव्हता. प्रशिक्षण कालावधी जवळजवळ संपत आला होता. तरीही या प्रशिक्षणार्थी पायलटची मन:स्थिती पूर्ण तयार नव्हती. त्याचे प्रशिक्षण अर्धवट सोडून जाणे योग्य दिसणार नव्हते. शिवाय भारताच्या प्रशिक्षण संस्थांच्या इभ्रतीचा प्रश्न होताच. अशावेळी हे चक्रव्यूह भेदायला एक अभिमन्यू स्वयंस्फूर्तीने पुढे आला… अभिमन्यू राय! ग्रुप कॅप्टन श्री. अमिताभ राय यांचे सुपुत्र. लहानपणी त्यांनी पायलट होण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षात उतरवले. एन. डी. ए. खडकवासला येथे १२३व्या तुकडीत त्यांनी प्रवेश प्राप्त केला आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ते इंडियन एअर फोर्स फ्लाइंग ब्रांच १९२ मध्ये निवडले गेले. आणि २०१३ मध्ये एक अत्यंत कुशल वैमानिक बनून देशसेवेत रुजू झाले! अंगभूत कौशल्याच्या बळावर अभिमन्यू २०१५ मध्येच फ्लाईट लेफ्टनंट बनले. मालवाहक जड विमाने उडवण्यात अभिमन्यू यांनी विशेष कौशल्य प्राप्त केले होते! त्यांना Sqadran Leader पदावर पोहोचायला विलंब लागला नाही.

माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय पंतप्रधान महोदय अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई ताफ्यात अभिमन्यू साहेबांनी उत्तम सेवा बजावली होती. लवकरच हवाई प्रशिक्षक म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. भारताने पाकिस्तानमधील बालाकोट वर केलेल्या धाडसी हवाई हल्ल्यात अभिमन्यू साहेबांनी शौर्य गाजवले होते!

वर्ष २०२३. अभिमन्यू राय साहेब Dundigal Airbase हैदराबाद येथे कार्यरत होते.

चार डिसेंबर, २०२३. सकाळचे सव्वा आठ वाजले आहेत. Pilatus PC 7 Mk II हे प्रशिक्षण लढाऊ विमान सज्ज आहे. विमानात व्हिएतनाम मधून आलेले प्रशिक्षणार्थी पायलट वुहान थाईन तयार आहेत. त्यांना अभिमन्यू साहेब आज जादाचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष वेळ आणि परवानगी काढून विमानात उपस्थित आहेत…. आज कमी उंचीवरून वेगात उडण्याचा सराव करायचा आहे… उड्डाण करून चाळीस मिनिटे झालीत…. सर्वकाही ठीक सुरू असताना… विमान जमिनीकडे अत्यंत वेगाने निघाले… खाली लोकवस्ती होती… कोणत्याही क्षणी विमान जमिनीला धडकेल अशी स्थिती… अभिमन्यू साहेब यावेळी bail out करून अर्थात seat eject करून.. हवाई छत्री वापरून स्वतःचा जीव वाचवू शकत होते… पण अभिमन्यू साहेबांनी त्यांचे सर्व कसब पणास लावले आणि विमान लोकवस्ती पासून दूर नेण्यात यश मिळवले.. पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती..

एका मोठ्या खडकावर त्यांचे विमान आपटले आणि क्षणार्धात आगीचा गोळा बनले… दोन्ही वैमानिक विमानातच अडकून होते.. त्यांचे देहावसान झाले… भारताने एक समर्थ, देखणा, शूर, उमदा वैमानिक, प्रशिक्षक गमावला. व्हिएतनामने एक भावी वैमानिक गमावला. वीरमाता चित्रलेखा यांनी एकुलता एक मुलगा गमावला.. आणि फ्लाईट लेफ्टनंट अक्षिता आणि Sqadran Leader अभिमन्यू राय यांचा काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार असा अकाली संपला! अभिमन्यू साहेबांच्या सहधर्मचारिणी भारतीय हवाई दलात सेवेत आहेत!

त्यादिवशी कमी उंचीवरून विमान उडवण्याचा सराव करताना प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण बहुदा सुटले असावे, असे म्हटले जाते.

अभिमन्यू साहेब वेगवेगळ्या जातीची सहा विमाने उडवू शकायचे.. ही गोष्ट अत्यंत कठीण समजली जाते.

अभिमन्यू साहेबांच्या घरचे आणि त्यांच्या पत्नीच्या माहेरची सुमारे चाळीस माणसे भारतीय सैन्यात विविध पदांवर आणि विभागात सेवेत आहेत!

सामान्य माणसांचे मरणे आणि सैन्यसेवेतील माणसांचे मरणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. एक सैनिक तयार व्हायला प्रचंड कष्ट, वेळ आणि पैसे लागतात. सैनिकाच्या जडण घडणीत आई वडिलांचा सिंहाचा वाटा असतोच असतो. सैनिकाचे लग्न होईपर्यंत त्याचा आणि आई वडिलांचा सहवास सर्वाधिक असतो.. भावनिक नाते घट्ट असते. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख डोंगराएवढे म्हणावे लागेल. पण यावेळेपर्यंत आई वडिलांचे आयुष्य निम्म्यावर पोहोचलेले असते.. तर सैनिकाचे आणि त्याच्या पत्नीचे जीवन ऐन बहरात असते. पत्नीपुढे तिचे सबंध आयुष्य पडलेले असते. त्यामुळेच विवाहित सैनिकाची पत्नी हीच सैनिकाची Next of Kin अर्थात जवळची व्यक्ती समजली जाते.. तशी कायद्यात तरतूद आहे. वरवर यात काहीही गैर दिसत नाही!

अभिमन्यू साहेबांच्या मृत्यूने आई, वडील आणि त्यांची पत्नी यांचे झालेले भावनिक नुकसान कधीही भरून न येणारे असेच आहे. त्यांना नियमानुसार आर्थिक नुकसानभरपाई मिळाली असेलच. पण देशसेवेत असताना आपला मुलगा गेला.. त्याला कुणी हुतात्मा समजत नाही.. याचे शल्य विशेषकरून आई वडिलांना आहे! जनतेचे जीव वाचावेत म्हणून अभिमन्यू साहेब त्या जळत्या चक्रव्यूहात थांबून राहिले… त्यांनी ते विमान लोकवस्तीपासून दूर नेले हा पराक्रमच नव्हे का? असा आई वडिलांचा समाजाला सवाल आहे!

अभिमन्यूच्या आई वडिलांनी जिथे अभिमन्यू साहेबांचा मृत्यू झाला त्या जागेवर स्मारक उभारले आहे आणि स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यास स्वखर्चाने स्मृतिवन तयार करण्याचीही त्यांची इच्छा आहे! साहेबांचे वडील श्री. अमिताभ राय आजही तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात! राय पती-पत्नी व्हिएतनाम मध्ये जाऊन त्या वैमानिकाच्या घरी भेट देऊन आले आहेत… दोन्ही परिवार जीवनाने नव्हे पण मृत्यूने असे एकत्र आले! अभिमन्यू साहेबांच्या मातोश्रींनी त्यांच्या या बहादुर मुलाचे चित्र त्यांच्या हातावर गोंदवून घेतले आहे… permanent tatoo! हा tatoo काढणाऱ्या कलाकाराने यासाठी मानधन नाकारले होते!

हुतात्मा सैनिकाच्या पत्नीसह सैनिकाच्या आईवडिलांना सुद्धा तेवढाच सन्मान दिला जावा.. अशी त्यांची व्यवस्थेकडे मागणी आहे… जी रास्तच आहे! जनतेने सुद्धा सर्वच हुतात्मा सैनिकांचा सारखाच सन्मान राखला पाहिजे… त्यांच्या कुटुंबीयांकडे आत्मियतेने लक्ष दिले पाहिजे!

हुतात्मा अभिमन्यू राय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सामान्यांची असामान्य दानत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सामान्यांची असामान्य दानत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

इस्रो चंद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग केले.

आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार झालो!

 या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे.  त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…

कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला.  गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….

श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.

मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!

आयआयटी धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये  इस्रो ने त्याची निवड केली.

त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.

श्री भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम.  कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन.. 

लेखक : अज्ञात  

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

गुरूदेव टागोर गीतांजलीत अनेक ठिकाणी म्हणतात की काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंचा त्याग करून त्या विश्वनियंत्याला भक्तीभावाने शरण गेल्यावरच शाश्वत सुखाची चिरशांतीची प्राप्ती होते. ऐहिक गोष्टी, ऐहिक सुखं हा भक्तीमार्गतला अडसर आहे.

—-

गीत : ७

My song has put off her adornments.

She has no pride of dress and decoration. Ornaments would mar our union. They would come between thee and me; their jingling would drown thy whispers.

My poet’s vanity dies in shame before thy sight. O master poet, I have sat down at thy feet. Only let me make my life simple and straight, like a flute of reed for thee to fill with music.

—-

भावानुवाद: गीत : ७
*
माझी गाणी नाही नटली
आभूषणांनी नाही सजली
*
कंकण, पैंजणांची रुणझुण
अन् गीताची सुरेल गुणगुण
*
कलरव बहु हे नाद करतील
हळु बोल तव त्यात विरतील
*
दागदागिने अडसर बनतील
मीलन अपुले तदा न होईल
*
महाकवी तू रे युगायुगांचा
यःकश्चित मी असेन साचा
*
वृथा अभिमान तो त्यागुनि
आलो तव चरणी धावुनि
*
मी पणाची मम आवरणें
सांडुनि धरिली तुझी चरणें
*
रंभागर्भी अवकाश वसे
तसाच मी ही अंतरी असे
*
पोकळ वेळूची मी बासुरी
संगीत तुझे हरी, त्यात भरी
*
स्वर्गसुखाचे द्वार मुरारी
उघडी मजसाठी लवकरी
*
भावानुवाद: कवयित्री : ©️शोभना आगाशे
संपर्क: ९८५०२२८६५८

—-

गीत : ८

The child who is decked with prince’s robes and who has jewelled chains round his neck loses all pleasure in his play; his dress hampers him at every step.

In fear that it may be frayed, or stained with dust he keeps himself from the world, and is afraid even to move.

Mother, it is no gain, thy bondage of finery, if it keep one shut off from the healthful dust of the earth, if it rob one of entrance to the great fair of common human life.

—-

☆  भावानुवाद: गीत : ८
*
जरतारी वस्त्रे राजेशाही

आणि भूषणे रत्नजडित ही

सोनसाखळ्या कंठाभवती

बालकास जणु जखडून देती

बालसुलभ ते खेळ खेळता

वस्त्रे न आवरू शके धावता

मळती, फाटती या भीतीने

खेळ न खेळी कधी गमतीने
*
अवती भवती नितांत सुंदर

विश्व, त्यात सवंगडी निरंतर

स्वातंत्र्य परि तो गमावित असे

मंचकी अपुल्या उदास होतसे

जीवनयात्रा सामान्यांची

नाळ राखते या धरणीची

नकोच मजला थाटमाट तो

मातीपासून जो दूर लोटतो

भावानुवाद: वयित्री: ©️शोभना आगाशे
संपर्क: ९८५०२२८६५८
—-

गीत : ९

O Fool, to try to carry thyself upon thy own shoulders! O begger, to come to beg at thy own door!

Leave all thy burdens on his hands who can bear all, and never look behind in regret.

Thy desire at once puts out the light from the lamp it touches with its breath.

It is unholy —– take not thy gifts through its unclean hands. Accept only what is offered by sacred love.

—-

☆  भावानुवाद: गीत: ९
*
स्वतःचेच ओझे वाहतोसि स्वतः

स्वतःच्याच दारी याचक तू स्वतः
*
नच जाणसी तू, अज्ञानी व मूढ,

विश्वाचे ते ओझे वाहणारा गूढ
*
टाकी तुझे ओझे त्याच्यावरी सदा

नाही पश्चाताप करशील कदा
*
विझवेल दीप वासनेचा वारा

करशील कसा दूर अंधःकारा?
*
प्राप्त जे होतसे वासनेच्या पोटी

देई ते सोडुनि, नाम घेई ओठी
*
नको घेऊ कांही वासनेत लिप्त

भेटी देई हरी पावित्र्याने युक्त

– भाग तिसरा

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares