मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘खरमास…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘खरमास…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

प्रस्तावना

भारतीय संस्कृतीत कालगणना ही केवळ दिवस–महिने मोजण्याची पद्धत नसून ती निसर्ग, आकाशीय घडामोडी आणि मानवी जीवन यांचा सखोल समन्वय दर्शवते. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे यांच्या गतीवर आधारित हिंदू पंचांग हे याचे उत्तम उदाहरण आहे. या पंचांगातील एक महत्त्वाचा, पण अनेकदा केवळ “शुभकार्य निषिद्ध” एवढ्यापुरताच समजला जाणारा कालखंड म्हणजे खरमास. प्रत्यक्षात खरमास हा धार्मिक, खगोलशास्त्रीय, सामाजिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर विचार करण्यासारखा विषय आहे.

खरमास म्हणजे काय?

खरमास हा शब्द दोन भागांनी बनलेला आहे — खर आणि मास. येथे खर म्हणजे गाढव (खर) आणि मास म्हणजे महिना. सूर्य जेव्हा धनु (Sagittarius) किंवा मकर (Capricorn) राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो काळ खरमास म्हणून ओळखला जातो. पारंपरिक मतानुसार सूर्यदेव या काळात “खरावर आरूढ” असतात, असे रूपक वापरले जाते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता, या काळात सूर्याची उत्तरायण–दक्षिणायणाशी निगडित गती, पृथ्वीच्या अक्षाचा कल आणि दिवस–रात्रीच्या लांबीतील बदल यांचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो.

खगोलशास्त्रीय आधार

खरमासाचा पाया पूर्णपणे सौर गतीवर आधारित आहे.

सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा धनु संक्रांती होते.

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती होते.

या दोन संक्रांतींमधील काळ म्हणजे खरमास.

डिसेंबर–जानेवारी हा कालखंड पृथ्वीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो:

उत्तर गोलार्धात हिवाळा कळसाला पोहोचतो

दिवस सर्वात लहान, रात्री सर्वात मोठ्या असतात

सूर्यकिरण तिरपे पडतात, उष्णता कमी मिळते

या बदलांचा थेट परिणाम मानवी शरीर, शेती, अन्नसाखळी आणि मानसिक स्थितीवर होतो.

खरमास आणि ‘ शुभाशुभ’ ही संकल्पना

खरमासाला ‘अशुभ’ म्हणण्यामागे अंधश्रद्धेपेक्षा नैसर्गिक निरीक्षणे अधिक कारणीभूत आहेत.

प्राचीन काळात शेतीप्रधान समाज होता. हिवाळ्यात पिके वाढीच्या अवस्थेत असत. लोक शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असत. रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी होत असे. अशा परिस्थितीत विवाह, प्रवास, मोठे समारंभ टाळणे हे व्यवहार्य होते. त्यामुळे “शुभकार्य निषिद्ध” ही धारणा निर्माण झाली.

खरमासात काय निषिद्ध आहे ?

परंपरेनुसार खालील संस्कार टाळले जातात. विवाह, मुंज (उपनयन), गृहप्रवेश, नवीन उद्योग, नवीन बांधकाम. हे नियम सक्तीचे नसून समाजशास्त्रीय संकेत आहेत.

खरमासात काय श्रेष्ठ आहे ?

खरमास हा निषेधाचा नव्हे, तर आत्मचिंतनाचा काळ आहे. म्हणूनच:,दानधर्म, जप, नामस्मरण, विष्णू उपासना, व्रत, संयम, साधेपणा यांना विशेष महत्त्व दिले जाते.

भागवत पुराणात सांगितले आहे की खरमासात केलेले दान शतपटीने फलदायी ठरते. यामागे मानसशास्त्रीय कारण असे की हिवाळ्यात गरिबांना मदत अधिक आवश्यक असते.

खरमास आणि भगवान विष्णू

खरमासाचा विशेष संबंध भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो. विष्णू हे स्थितीचे, संतुलनाचे आणि पालनाचे प्रतीक आहेत. जेव्हा निसर्ग अस्थिर असतो, तेव्हा स्थिती टिकवणे आवश्यक असते — हेच विष्णू तत्त्व. त्यामुळे विष्णू सहस्रनाम, श्रीमद्भगवद्गीता पठण, एकादशी व्रत यांना खरमासात विशेष महत्त्व आहे.

खरमास आणि आहार–विहार

शास्त्रीय दृष्टीने खरमास हा ऋतुचर्येचा भाग आहे. आयुर्वेदानुसार या काळात पचनशक्ती मंद असते, जड, तेलकट अन्न टाळावे. तिळ, गूळ, उष्ण पदार्थ लाभदायक व संयमित आहार आवश्यक. मकर संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व याच कारणामुळे आहे.

खरमासाचा सामाजिक अर्थ

खरमास समाजाला थांबायला शिकवतो. सतत उत्सव, लग्न, खर्च याऐवजी अंतर्मुख होणे, नातेसंबंध जोपासणे, गरजूंचा विचार करणे ही मूल्ये समाजात रुजवतो. आजच्या धावपळीच्या युगात खरमास आपल्याला थांबण्याची परवानगी देतो.

आधुनिक काळात खरमासाचे महत्त्व

आज विज्ञानाने प्रगती केली असली, तरी ऋतूंचे परिणाम अजूनही तितकेच आहेत. मानसिक ताण हिवाळ्यात वाढतो. नैराश्य, थकवा जाणवतो. अशा वेळी खरमासातील साधेपणा, ध्यान, संयम हे आधुनिक मानसशास्त्राशी सुसंगत आहेत.

अंधश्रद्धा की वैज्ञानिक परंपरा?

खरमासाला अंधश्रद्धा म्हणणे योग्य ठरणार नाही. तो निसर्ग निरीक्षणातून  तयार झालेला, समाजहिताचा विचार करणारा, जीवनशैली नियंत्रित करणारा असा कालखंड आहे. मात्र, त्याचा अतार्किक भयाने स्वीकार न करता समजून स्वीकार आवश्यक आहे.

समारोप

थोडक्यात, खरमास हा केवळ “लग्न न करण्याचा महिना” नाही. तो आहे निसर्गाशी संवाद साधणारा काळ, आत्मचिंतनाचा अवधी, दान, संयम आणि करुणेचा संदेश

भारतीय संस्कृतीने काळालाच गुरु मानले आहे. खरमास हा त्या गुरुकडून मिळणारा संयमाचा आणि समतोलाचा धडा आहे. आजही, विज्ञानाच्या प्रकाशात पाहिले तरी खरमासाची संकल्पना कालबाह्य नसून कालसुसंगत वाटते — हीच त्याची खरी महानता आहे!

या वर्षी २०२५ – ० २६  मध्ये खरमास हा काळ हिंदू पंचांग आणि इंग्रजी (Gregorian) कॅलेंडरप्रमाणे पुढीलप्रमाणे आहे: २०२५ . २०२६ खरमास तिथी सुरू होतो:

१६ डिसेंबर २० २५ (मंगळवार) — जेव्हा सूर्य धनु (Sagittarius) राशीत प्रवेश करतो.

समाप्त होतो:

१४ जानेवारी २०२६ (बुधवार) — मकर संक्रांतीच्या दिवशी, जेव्हा सूर्य मकर (Capricorn) राशीत जातो.

या कालावधीत साधारण ३० दिवसांचा खरमास मानला जातो.

🙏🏽🙏🏽🙏🏽

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांना संगीताचं सखोल ज्ञान होतं. ते स्वत: लिहिलेल्या गीतांना स्वत: संगीतबद्ध करत. अशी दोन हजारहून अधिक वैशिष्ट्यपूर्ण गाणी ‘रविंद्र संगीत‘ या नावाने भारतात व भारताबाहेरही प्रसिद्ध आहेत व गायली जातात. टागोरांनी सहा नवीन तालांची निर्मिती देखिल केली आहे. कदाचित म्हणूनच गीतांजलीत वारंवार गायन, वादनाचे उल्लेख आढळतात.

————-

गीत : ४

Life of my life, I shall ever try to keep my body pure, knowing that thy living touch is upon all my limbs.

I shall ever try to keep all untruths out from my thoughts, knowing that thou art that truth which has kindled the light of reason in my mind.

I shall ever try to drive all evils away from my heart and keep my love in flower, knowing that thou hast thy seat in the inmost shrine of my heart.

And it shall be my endeavour to reveal thee in my actions, knowing it is thy power gives me strength to act.

———

 मराठी भावानुवाद : गीत : ४

*

माझ्या जीवनी तूच वससि

प्राण रूपे अससि विधाता

*

मनुष्य जीवन तुझी देणगी

जपून ठेवीन त्याची शुचिता

अंतर माझे प्रकाशित करी

तुझे रूप, अंतीम सत्यता

*

मनात माझ्या पाप नसे

अभद्र विचारा वाव नसे

हृदयमंदिरी वास तुझा रे

अमंगलाला स्थान नसे

*

तूच प्रेरणा मम कार्याची

कृतीत माझ्या तुझा भास हो

आश्वासित तुज प्राणपणाने

सत्कर्माची मला आस हो

*

भावानुवाद : कवयित्री : ©️मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—— 

गीत : ५

I ask for a moment’s indulgence to sit by thy side. The works that I have in hand I will finish afterwards.

Away from the site of thy face my heart knows no rest nor respite, and my work becomes an endless toil in a shoreless sea of toil.

To-day the summer has come at my window with its sighs and murmurs;and the bees are plying their minstrelsy at the court of the flowering grove.

Now it is time to sit quiet, face to face with thee, and to sing dedication of life in this silent and overflowing leisure.

————-

मराठी भावानुवाद : गीत ५

*

ऐहिक काजामधुनि फुरसत

क्षणभर विश्रांतीची ऐपत

देशील का मज हे रघुराया॥

*

बसेन तुझिया समीप म्हणतो

लाड मनाचे पुरविन म्हणतो

कधी देशी मज संधी सखया॥

*

पाहीन शुभ तव मुखमंडल

दर्शन लाभो तुझे सुमंगल

पूर्ण करीन मग विहित कार्या॥

*

संग तुझा मज कसा मिळेना

तुझ्यावरून मम दृष्टी हटेना

विसाव्याचे क्षण हेच माझिया॥

*

गवाक्षी माझ्या ग्रीष्म उसासे

मधमाशांची लगबग भासे

निवांत प्रहरी येशील का या॥

*

जीवनगाणे तुजला अर्पून

देईन मी कुडी ही समर्पून

दृष्टी तुजवर अंती सुखावया॥

*

भावानुवाद : कवयित्री : ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

 –—————————–

गीत : ६

Pluck this little flower and take it, delay not! I fear lest it droop and drop into the dust.

It may not find a place in thy garland, but honour it with a touch of pain from thy hand and pluck it while there is time.

——————

भावानुवाद: गीत : ६

*

फुले उमलती, सुगंध पसरती

गळुनि पडता, धुळीत मिळती

*

खुडुनि तयांना घेऊन जा तू

जीवन त्यांचे न व्यर्थ दवड तू

*

हारात असणे जर नसे प्राक्तनी

करूण स्पर्श दे वेदना जाणुनि

*

दिवस आजचा सरण्या आधी

वेळ पुजेची टळण्या आधी

*

खुडुनि तयांना प्रभुचरणांशी

वाहुनि जातील निर्माल्याशी

*

सार्थक होईल त्या फुलण्याचे

सार्थक होईल त्या जगण्याचे

*

रूप देखणे नसेल त्यांना

सुगंध मोहक नसेल त्यांना

*

खुडुनि आणी पूजेस्तव ती

जाण्यापूर्वी वेळ टळुनि ती

*

— क्रमशः भाग दुसरा

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘अचाट, अद्भुत!’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘अचाट, अद्भुत!’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..? ’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…!

याच श्रेणीतला असा एक अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..!

मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे –

राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद चिकित्सक धरणेन्द्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर – तुमकुर रेल्वे मार्गावरील दोड्डबेले नावाच्या लहानश्या गावात रहायचे. या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली, तरी याचं महत्त्व ते जाणून होते. म्हणूनच आपले मित्र, चंदा पंडितांबरोबर ते ‘सिरी भूवलय’ या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.

या व्याख्यानांमुळे, बंगळूर च्या ‘येल्लप्पा शास्त्री’ ह्या तरुण आयुर्वेदाचार्याला, हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले. या ग्रंथासंबंधी येल्लप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते. तेंव्हा हा ग्रंथ मिळवायचाच, हा निश्चय पक्का होता. मग काहीही करून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येल्लप्पा शास्त्रींनी, दोड्डाबेला ला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.

पुढे १९१३ मधे धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले. पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फारच खराब झालेली होती. म्हणून त्यांच्या मुलाने, धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या. त्यात ‘सिरी भूवलय’ हा ग्रंथ ही होता. अर्थातच आनंदाने येल्लप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्या साठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती. १२७० पानांच्या ह्या हस्तलिखितात सारेच अगम्य होते. पुढे १९२७ ला प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले. त्यांच्या मदतीने ह्या ग्रंथाची किवाडं काहिशी किलकिली झाली.

या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत, त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे जावी लागली. सन १९५३ मधे कन्नड साहित्य परिषदेनं ह्या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं. ग्रंथाचे संपादक होते – येल्लप्पा शास्त्री, करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव. यातील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.

असं काय महत्वाचं होतं ह्या ग्रंथात, ज्या साठी लोकं आपलं आख्खं आयुष्य वेचायला तयार होती..?

…. हा ग्रंथ, इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिलेला नाही. तर हा अंकांमधे लिहिलेला आहे. हे अंक ही १ ते ६४ मधील आहेत. हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ कर्त्याच्या, अर्थात मुनि कुमुदेन्दुंच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.

हा ग्रंथ म्हणजे अक्षरशः विश्वकोश आहे. ह्या एका ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत. गणित, खगोलशास्त्र, रसायन शास्त्र, इतिहास, वैद्याक, तत्वज्ञान सारख्या अनेक विषयांवरील ग्रंथ ही या एकाच ग्रंथात वाचता येतात.

या ग्रंथाची १६,००० पाने होती असा ग्रंथातच कुठे उल्लेख आहे. त्यातील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या ह्या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड, तामिळ, तेलुगु, संस्कृत, मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधुनच हा ग्रंथ वाचता येतो. एखाद्या संगणकीय विश्वकोशा सारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे. ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेंव्हा उलगडली जाईल, तेंव्हा त्याची प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट होऊ शकतील.

हा ग्रंथ लिपीत नसून आकड्यात आहे, हे आपण बघितलंच. त्यातही फक्त १ ते ६४ अंकांचाच वापर केलेला आहे. आता कुमुदेंदू मुनिंनी फक्त ६४ पर्यंतच आकडे कां घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत, ज्यात ऱ्हस्व, दीर्घ आणि लुप्त मिळून २५ स्वर, क, च, न, प सारखे २५ वर्गीय वर्ण, य, र, ल, व सारखे अवर्गीय व्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.

या संख्यांना २७ X २७ च्या चौकोनांमध्ये मांडल्या जाते. आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात, त्यांना ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून-वर, वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि त्यांना त्या भाषेच्या वर्ण क्रमानुसार मांडले (उदा – ४ हा अंक असेल तर मराठी तील वर्ण ‘घ’ येईल. क, ख, ग, घ.. प्रमाणे), तर छंदोबध्द काव्य अथवा धर्म, दर्शन, कला.. वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो..!

काय अफाट आहे हे…!

आणि किती अद्भुत..! आपण आपल्या ‘सुडोकू’ चा लहानसा चौकोन तयार करायला संगणकाची मदत घेतो. अन इथे हजार / बाराशे वर्षांपूर्वी एक जैन मुनि आपल्या कुशाग्र आणि अद्भुत बुध्दीचा परिचय देऊन फक्त अंकांमधून विश्वकोश तयार करतात..!

– – सारंच अतर्क्य..!!

या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ X २७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे. या चौकोनाला चक्र म्हणतात. अशी १२७० चक्र सध्या उपलब्ध आहेत. या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे. या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेले १२७० चक्र हे पहिल्या खंडातीलच आहेत, ज्याचं नाव आहे – ‘मंगला प्रभृता’. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर ८ खंडांची फक्त ओळख आहे. अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत. यातून ६ लाख श्लोक तयार होतात.

या प्रत्येक चक्रात काही ‘बंध’ आहेत. बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पध्दत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पध्दत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ‘बंध’ म्हणजे तो श्लोक, किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली (किंवा पासवर्ड) आहे. या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकांमधला पेटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो. या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे – चक्र-बंध, नवमांक-बंध, विमलांक-बंध, हंस-बंध, सारस-बंध, श्रेणी-बंध, मयूर-बंध, चित्र-बंध इत्यादी.

गेल्या अनेक वर्षांपासून ह्या भूवलय ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचे काम चालू आहे. अनेक जैन संस्थांनी हां ग्रंथ, प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे. इंदूर ला जैन साहित्याच्या संशोधनाचं ‘कुन्द्कुंद ज्ञानपीठ’ उभं राहिलंय, जिथे डॉ. महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे. आय. टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे, पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचं काम केलं जातंय. अगदी लहान प्रमाणात त्याला यश ही आलंय.

मात्र तरीही…

… आज एकविसाव्या शतकाचं सोळावं वर्ष संपत असतानाही, जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असतानाही, प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही…

.. ह्या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय ‘डी-कोड’ होऊ शकले आहेत…

मग हजार – बाराशे वर्षांपूर्वी, आजच्या सारखी कसलीही साधनं हाताशी नसताना, मुनि कुमुदेन्दुंनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते. मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..?

… आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुध्दिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?

‘इंडोलॉजी’ च्या क्षेत्रातलं, भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, श्री एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४ – १९७४). त्यांनी ‘भूवलय’ ह्या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय – “हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटक च्या इतिहासावर प्रकाश टाकतो. भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखिल उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भागवत गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलय मध्ये सापडू शकतात”.

ह्या ग्रंथाची माहिती जेंव्हा आपले पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना मिळाली, तेंव्हा त्यांचे उत्स्फूर्त उद्गार होते – ‘हा श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..! ’

… एका अर्थानं हे खरंय. कारण जगाच्या पाठीवर कुठेही असा ‘एकात अनेक ग्रंथ’ असलेला, कूट पद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही.

आपलं दुर्दैव इतकंच की भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता..?

*******

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लोक संस्कृतीचा गाभारा… ☆ माहिती संग्राहक व मांडणी : श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ लोक संस्कृतीचा गाभारा…  ☆ माहिती संग्राहक व मांडणी : श्री सुहास सोहोनी ☆

“विकिस्रोत” मधला “लोक संस्कृतीचा गाभारा” काल उघडून पाहिला आणि डोळे दिपले! विविधांगी लोकसाहित्याचे डोंगराएवढे दर्शन त्यातून घडले. त्यातले चार-दोन मासले सोबत पाठवलेत, ते बघा. असे शेकडो मासले त्यात आहेत.

☆ तिखट-खारट भांडण ☆

मीठ मिरचीचं मोठ्ठ भांडानं

ऐका रोज खटखटीनं जी

मिरची अंगी लईच ताठा

म्हनतीया मी लई तिखट जी

त्या दोघांनी घरोघरींची

पुरवली की हो पाठ जी

मिरची म्हणे माझ्याविना

न्हाई कोणंच म्होट्ट जी

जोर लाविता मिठानं ऐसा

मिरची झाली खारट जी

आनि मिटंना तंटा त्यांचा

हायकोडती ग्येली जी

खाली पाटा वरी वरूटा

चेंदा मेंदा झाला जी

मिटला तंटा सरलं भांडान

चटका खर्डा झाला जी

मिरची आणि मीठ दोन्ही स्वत:चं महत्त्व पटवत राहतात; पण त्यांचा तंटा कधी मिटतो, तर शेवटी त्या दोघांनाही एकत्रित पाट्यावर वरवंट्याखाली वाटलं जातं तेव्हा. अशी विनोदप्रचुर गाणी अधूनमधून म्हटल्यामुळे गाणी ऐकणारी लोकंही रमून जायची.

खूप प्रकारची कूटकाव्य/कोडी सुद्धा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह बघायला मिळाली.

ती कोण? … ओळखा…

नांदे एकाक्षरी कुमारी

मेंदूच्या ती वरी

हिरण्यकश्यपूच्या मौते

मेली टचकन् खरी

या कोड्यामध्ये एकाक्षरी आणि स्त्रीलिंगी असलेते नांव आहे आणि असं सुचवलं आहे की ती स्त्री मेंदूच्या जवळपास राहते आणि तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूसारखा झाला आहे. न अस्त्र, न शस्त्र असं ते हत्यार. हे कूटकाव्य मोठ्याच चातुर्यानं रचलेलं आहे.

… आता उत्तर तुम्ही ओळखा आणि सांगा…

☆ संशय खट झोटिंग महा ☆

इठ्ठलाचे दुखती पाय

रुक्मिनि मार्जिति लोण्यानं

खर सांगा, माझी आण

जनी तुमची हाये कोण?  

इठ्ठल म्हनतो रुक्मिनी

नको असं पाप धरू

आपुल्या आसऱ्याला जनी

कसं सुखाचं पाखरू

रुक्मिनि म्हनते देवा आता

दावा तुम्हिच लाज थोडी

गादी फुलांची सोडून

वाकळाचि काय गोडी

रुक्मिनि म्हनते देवा येतो

तुमचा भारी राग

तुमच्या शेल्यावरी जनीच्या

काजळचा काळा डाग

.. स्त्रीसुलभ मत्सर, नवऱ्यासबंधीचं प्रेम, हे जितकं सर्वसामान्य माणसांच्या संसारात दिसतं, तसंच ते देवांच्या संसारातही असतं, असं मांडण्याचा प्रयत्न ही ओवी गाणारी स्त्री करते. जनीबदल विठ्ठलाला वाटणारं प्रेम आणि त्या प्रेमामुळे रुक्मिणीला वाटणारा मत्सर, हे विकार माणसांप्रमाणे देवांनाही असतात, असं या काव्यपंक्ती सांगतात.

आणखी अशाच एका ओवीत वर्णन येतं —

अगं तुळशी ग बाई,

तुला न्हाई नाक डोळे

अशा आगळ्या रूपाला

कसा गोविंद गे भुले

अगं तुळशी ग बाई

काय तुजं ग हे जिनं

द्येव गोविंदाच्या संगे

दर वर्षाला लगीन

अशा ओव्या मानवी मनाची देवाशी असणारी आगळी सलगी व्यक्त करतात. देवावर जशी श्रध्दा ठेवतात. तशीच त्याला सखा मानून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.

लोकसाहित्यात रुचि असणाऱ्या वाचकांनी डॉ. राजेंद्र माने यांनी उघडून दाखवलेला हा खजिना आवर्जून पहावा असाच आहे. तो पाहण्यासाठी पुढील लिंक वापरता येईल…

लोक संस्कृतीचा गाभारा – विकिस्रोत https://share. google/A4wGcLlxyeUvcEfp2

☆

माहिती संग्राहक व मांडणी : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातली पहिली यशस्वी ‘ॲपेंडेक्टॉमी’..! – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ जगातली पहिली यशस्वी ‘ॲपेंडेक्टॉमी’..! – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

क्लॉडियस एमॅंड

जगातली पहिली यशस्वी ‘ॲपेंडेक्टॉमी’..!

*साल असावं १७३५. लंडनमधले संध्याकाळचे पाच वाजले होते.. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दगडी भिंतींना थंडीनं जणू गोठल्या होत्या पण बालविभागातून येणारा आरडाओरड्याचा आवाज मात्र थांबण्याचं नावच घेत नव्हता. *

*“मला मरायचं नाही.. आई.. , मला वाचवऽऽऽ! ”*

*अकरा वर्षांचा कोवळा विल्यम ब्लॅकमन बेडवर वेदनेनं अक्षरश: तडफडत होता. *

*त्याचा चेहरा जणू आगीच्या भट्टीतून आल्यासारखा लालबुंद झाला होता, डोळे पांढरेफटक पडले होते आणि पोटात बेंबीच्या खाली उजव्या बाजूला भयंकर वेदना होत होत्या. *

*पोट कडक झालं होतं, जिथं दुखत होतं तिथं एक कडक गठ्ठा तयार झाला होता, हात लावायचा उशीर बंदुकीतून गोळ्या निघाव्या तश्या उलट्या सुरू! *

*एव्हाना तापही १०४ वर पोहोचला होता, प्रत्येक श्वास घेताना त्याच्या तोंडून नुसता आक्रोश बाहेर पडत होता. *

*बाहेर व्हरांड्यात उभ्या असलेल्या शल्यचिकित्सकांनी खाली मान घालत नकारात्मकपणे हलवली. हर्निया बर्स्ट झालाय. *

*वेदनेचा शेवटचा टप्पा.. हा थोड्याच वेळचा पाहुणाय.. ”*

*तेवढ्यात गर्दीतून एक माणूस पुढं आला. लांब काळा कोट, काळी हॅट, डोळ्यात चमक असलेला क्लॉडियस एमॅंड! *

*राजाचा वैयक्तिक शल्यचिकित्सक, युद्धभूमीवर शेकडो गोळ्या काढणारा, हातं कापणारा पण कधीही मागं न हटणारा.. एखाद्या योद्ध्यासारखा. *

तो फक्त एक वाक्य बोलला, *”त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये न्या.. मी बघतो! ”*

सर्व एकमेकांकडं बघू लागले.. *”पण सर… ही केस हाताबाहेर आहे… आतडं फिरलंय.. कुणीही हात लावत नाहीये.. ”*

क्लॅाडियसनं डोळे वटारले, *”मी म्हणालो ना, मी करतोऽऽ! ”*

*ऑपरेशन थिएटरमधे फक्त तेंव्हाच्या मंद दिव्यांचा पिवळा प्रकाश पसरला होता. *

*विल्यमला लाकडी टेबलावर बांधलं गेलं.. त्याचे हात-पाय घट्ट दोरीने बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा ठासून दिला. म्हणजे ओरडताना जीभ ही चावणार नाही, आणि ओरडण्याचा आवाजही येणार नाही. *.

*आणि भूल?? *

*तेव्हा भूलशास्त्र विकसितच झालं नव्हतं! फक्त एक मोठा ग्लास अफूचं पाणी पाजलेलं होतं आणि नातलगांनी देवापुढं हात जोडले होते. *

*क्लॅाडियस ने चाकू हातात घेतला. त्याचे सहाय्यक जाम घाबरले होते, भर थंडीत त्यांना घाम फुटला होता.. *

*”पण.. सर.. जर आतडं फाटलं तर…” कुणीतरी चाचरत पुटपुटलं! *

*“मग मरू द्या दोघंही! पण मी हार मानणार नाही. ”*

*पहिला चीरा पडली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. चाकू खोलवर गेला होता.. आत जे काही दिसलं, ते बघून सगळे जागीच थिजले! *

*एक हर्नियाचं पाऊच आणि त्यात अडकलेला अन् सुजून टम्म झालेला काळानिळा ॲपेंडिक्स.. आणि फक्त एवढंच नव्हतं! *

*त्यातून चमकली एक चंदेरी पिन.. या पठ्ठ्यानं पूर्वी कधीतरी, खेळता-खेळता गिळलेली! *

*पिन थेट ॲपेंडिक्समध्ये घुसली होती आणि तिथं प्रचंड संसर्ग झाला होता.. ॲपेंडिक्स फाटून हर्नियात अडकला होता.. मृत्यूचं परफेक्ट जाळं तयार झालं होतं! *

*क्षणभर क्लॅाडियसचाही हात थरथरला.. फक्त एक सेकंद तो दात-ओठ खात म्हणाला.. हा भागच कापायचाय! *

*पूर्ण.. शेवटपर्यंत! *

*चाकू फिरला.. ॲपेंडिक्स बाहेर काढलं गेला.. त्याच्यातून ग्लासभर पस निघाला त्याची दुर्गंधी पसरली अन् एक सहाय्यक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. *

शेवटचा टाका पडला…रक्त थांबलं…विल्यम अजून श्वास घेत होता.. हळूहळू.. पण घेत होता..

रात्रभर क्लॉडियस त्या मुलाच्या बाजूला बसला राहिला..

सकाळचे सात वाजले तेव्हा विल्यमने डोळे किलकिले केले आणि हळू आवाजात म्हणाला, *”मला.. दुखत नाहीये आता…! ”*

क्लॅाडियसच्या डोळ्यात पाणी तरळलं.. त्यानं आवंढा गिळत फक्त मान हालवली..

*ती रात्र आणि तो चिरा वैद्यकीय इतिहासात कायमचा कोरला गेला.. जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी..! *

*एक अकरा वर्षांच्या कोवळ्या मुलानं आणि एका धाडसी शल्यचिकित्सकानं मृत्यूला चक्क मागं लोटलं होतं. *

आज आपण जेव्हा ॲपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणतो तेव्हा हसतो..

*पण त्या रात्री लंडनच्या त्या अंधाऱ्या खोलीत खरंच एक युद्ध झालं होतं, अन् त्या युद्धात माणूस जिंकला होता..! *

*तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५! *

****

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा – – 

— — ” तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा… क्रमशः स्वरूपातील ही सिरीज!

पूर्वीच्या काळी इतक्या सुरेख चालीरीती होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही पोस्ट सिरीज!! बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेनच पण आज सांगतोय… “तांब्या पोटावर, उपाय पोटदुखीवर “… या संकल्पनेबद्दल!

या नावातच त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं की, पूर्वीच्या काळी “आजीबाईचा बटवा” नावाची संस्कृती घरोघरी होती. म्हणजे काय तर आजीजवळ एक छोटी चंची (बटवा) पिशवी कायम कमरेला खोचलेली असायची. ज्यात किरकोळ आजारावर गुणकारी ठरणारी जडीबुटी टाईप अनेक औषधी गोष्टी असायच्या. अगदी ओव्यापासून खडीसाखरेपर्यंत आणि लवंग विलायची पासून जायफळ, सुंठीपर्यंत… थोडक्यात तो एकप्रकारचा त्याकाळचा “फर्स्ट एड बॉक्स” होता. पोट दुखी, डोकेदुखी, मळमळ, ओकारी, चक्कर येणे अशा आजारावर आजी मग तिच्या ज्ञानातून योग्य ती गोष्ट बटव्यातून काढून द्यायची. उदा. कुणाचे डोकं दुखत असेल तर बटव्यातील वेखंडाचा तुकडा सहाणेवर उगाळून कपाळाला ती लावत असे अन थोड्या वेळात डोकेदुखी छू ssss व्हायची. आजीकडे ते ज्ञान तिच्या आधीच्या पिढीकडून आलेलं असायचं अन ते ज्ञान ती मग सुनांना देऊन त्यांनाही शहाणे करत असे.

किती छान होत ते सगळं तेव्हा!!

मात्र बटव्यामधील काही गोष्टी वापरून उपचार जसे केले जायचे तसेच पण बटव्यातील नाही तर डोक्यातील ज्ञान व पूर्वजांनी सांगितलेली हातोटी यातून काही वेगळे प्रकारही केले जायचे. आजच्या काळात त्याला फारतर :”मायनर ऑपरेशन” असं म्हणता येईल.

तर त्याकाळी विशेषतः लहान मुलांना अरबट चरबट काहीतरी खाल्याने महिन्यातून एकदोनदा तरी गॅसेस, अपचन,. पोट घट्ट होणे, असं काहीतरी हमखास व्हायच. मलाही ते व्हायचच व्हायच.

मग माझी आई जमिनीवर एक सतरंजी टाकून मला म्हणायची… “बनियन काढून झोप यावर उताणा”

आणि मी तसे झोपल्यावर आई गव्हाच्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याचा एक छोटा दिवा बनवायची. दिवाळीत अभ्यंगस्नान वेळी ओवाळताना बनवतात तसा साधारण! आणि मग त्या दिव्यात थोडं गोडेतेल टाकून वात त्यात भिजवून ती वात ठेवलेला तो दिवा आई मग माझ्या पोटावर (म्हणजे बरोब्बर बेंबीवर) अलगद ठेवायची. आणि वात पेटवून त्यावर पटकन पितळीचा जाड तांब्या ठेवून द्यायची.

दोन पाच मिनिटांनी तो तांब्या मग पोटाला घट्ट चिकटून जायचा. तो आई हलवून पाहायची. खूप घट्ट तो तांब्या बसलाय असं दहा मिनिटांनी जाणल्यावर आई मग त्या तांब्याच्या तोंडाशी एखादे बोट हळूच खुपसायची त्याबरोबर “पॉक्क ssss” असा आवाज यायचा. जो मला खूप आवडायचा पण!

तांब्या बाजूला केल्यावर तिथं विझलेला तो दिवा आई मग काढून बाजूला ठेवायची. त्यात थोडस तेल शिल्लक असायचं ते दोन तीन कोमट थेम्ब आई मग बेंबीत सोडून “उठू नको लगेच, पडून राहा पाच मिनिट” म्हणायची.

आणि मग पाच मिनिटांनी अस्मादिक एकदम फ्रेश झालेले असायचे. पोटदुखी गायब झालेली असायची.

तर अशी हि तांब्या ठेवण्याची साधारण प्रथा होती.

आपल्या पूर्वजांनी घरगुती जगण्यात विज्ञान इतक्या चपखलपणे बसवले होते की ज्याची बरोबरी आजच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही होणार नाही.

तर त्या तांब्या ठेवण्यामागचे विज्ञान काय होत?

तर जेव्हा दिवा पेटवून त्यावर तांब्या ठेवला जातो, तेव्हा तांब्याच्या आतली हवा संपून जाते आणि तिथं निर्वात पोकळी निर्माण होते. आणि बऱ्यापैकी व्हॅक्युम तयार होऊन पोटाला बाहेरून ओढल्यासारखं घडत. बेंबीच्या भोवतीच्या पोटातल्या नळ्या, आतडी जी अपचन अथवा अन्य कारणाने मिस्प्लेस झालेली असायची ती सगळी गपगुमान त्या निर्वात पोकळीने ओढल्या गेल्याने आपापल्या जागेवर येऊन बसायची. आणि दुखणं थांबायचं. काहीवेळा हल्ली डॉक्टरलोक अशा पोटदुखीबद्दल बोलतात सुद्धा की “आतड्यावर आतडी चढली आहेत… डिसलोकेट झाली आहेत त्यामुळे असं दुखत आहे”

तर तेच सगळं त्याकाळी घडलं तरी घरोघरी तांब्या मेथडने त्यावर उपचार व्हायचाही.

आजकाल असे घरगुती पण गुणकारी उपाय करताना फारसे कुणी दिसत नाही. त्यामुळेच कदाचित तांब्यासारख्या उपायाची प्रथा जी आता लुप्त होत जातेय असं वाटत. अर्थात अजूनही ग्रामीण भागातील काही स्त्रिया हि प्रथा, हा रिवाज जपताना आढळतात. माझ्याही पाहण्यात आहेत अशा स्त्रिया! मात्र ते प्रमाण वरचेवर कमी होत जातेय हे नक्की!असो… कालाय तस्मेय नमः!!

डॉ. डीडी क्लास : आताच्या पिढीला हे कदाचित माहित नसेल म्हणून सांगितलं आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या महिलांना त्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतील म्हणून हि पोस्ट! आता मुळात असे उपाय एक तर कुणाला माहीतच नाहीत अन माहित असले तरी डेअरिंग केली जात नाही. किरकोळ पोटदुखी असेल तरी लगेच मेडिकलवाल्याकडे जाऊन गोळ्या आणल्या जातात किंवा जास्त दुखायला लागलं तर थेट हॉस्पिटलचं! मात्र आपल्या भारतीय वैद्यक परंपरेत असे कितीतरी उत्तम उपाय होते, आहेत… जे त्या त्या वेळच्या वैद्यांनी आणि आज्जीबाई लोकांनी आमच्या आईसारख्या मागच्या पिढीला सांगून ठेवले. आणि ती प्रथा टिकून राहिली गेली. मात्र ता लुप्त होतेय… हे नक्की!

धन्यवाद! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या रिवाजाबद्दल!

तोवर स्टे ट्यून!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पाच देहांमध्ये जगणारी कनिष्का” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाच देहांमध्ये जगणारी कनिष्का” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

कनिष्का गौड

जोधपूर येथे जन्मलेल्या या कनिष्का गौड नावाच्या कन्येचा हा गोड चेहरा पुढे जाऊन लष्करी गणवेशातल्या करारी, सेवाभावी, देशप्रेमी महिला अधिका-याच्या रुपात आपल्याला बघायला मिळाला असता… राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. खडकवासला) मध्ये प्रवेश मिळवायची जिद्द तिने मनाशी बाळगली होती… आणि तिची तयारीही जोरात सुरु होती. पण वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी… १२ नोव्हेंबरला ती एका अपघातात हे जग सोडून निघून गेली.

पण तिच्या देहातील अवयव अजून चैतन्य जागवीत जिवंत राहिले होते. आपली लाडकी लेक अशी अवेळी निघून गेल्याचा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतानाही कनिष्काच्या आई-वडिलांनी, श्री. अशोक आणि सौ. संगीता यांनी, तिला आणखी काही देहांत जिवंत पाहण्याचा निश्चय केला. आज पाच देहांमध्ये कनिष्का श्वास घेते आहे… एका रुग्णाला तिचे यकृत, दोन रुग्णांना तिचे एक एक मूत्रपिंड, दोन अंधांना तिचे एक एक नेत्रपटल दान दिले गेले. जयपूरच्या ए. आय. एम. एस. रुग्णालयात हे अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले. कनिष्काचे मूत्रपिंड पोहोचवण्यासाठी विशेष वेगवान रस्ता मार्गिका राखून ठेवत जोधपूर ते जयपूर हे सुमारे साडे पाच तासांचा प्रवास असलेला, साडे तीनेशे किलोमीटर्सचे अंतर असलेला टप्पा सलग पार करण्यात आला!

सैनिक अधिकारी होऊ पाहणा-या कनिष्काची ही मृत्यूनंतरची देशसेवा परमेश्वरचरणी निश्चित रुजू झाली आहे! भावपूर्ण नमन, कनिष्का!

देहदान, अवयवदान ही काळाची गरज आहेच… आणि प्रक्रियाही सोपी आहे. देहदानात तर देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी उपयोग करून झाल्यावर त्या देहावर अत्यंत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात!

केवळ नेत्रदान करावयाचे झाल्यास, संपूर्ण डोळा नव्हे तर केवळ नेत्रपटल काढून घेतले जाते. शरीराची कोणत्याही प्रकारे विटंबना होत नाही, केली जात नाही. श्रीलंका हा छोटा देश दरवर्षी किमान एक लाख नेत्रपटले निर्यात करतो… हे ध्यानात घेण्यासारखे आहे. असो.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३१ व ३२☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३१ व ३२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ३१ व ३२

राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्वात ॥ ३१ ॥

न तेन राजपरितोषः क्षुच्छांतिर्वा ॥ ३२ ॥

अर्थ : राजवाडा असो भोजन जो पर्यंत आपण त्याची अनुभूती घेत नाही, तोपर्यंत राजा असण्याचा आनंद आणि अन्नाची खरी चव कळू शकत नाही.

विवेचन : 

ज्ञान हे भक्तीचे साधन आहे हे जे काही लोकांचे मत मागे सांगितले त्याचा प्रतिवाद करण्यासाठी व भक्ती ही स्वयं-फलरूपा आहे या आपल्या मताच्या पुष्टीसाठी नारदमुनी येथे दृष्टांत देतात. वरील दोन्ही सूत्रांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध असल्यामुळे त्याचा येथे एकत्रच विचार केला आहे.

या सूत्रात राजवाड्याचे उदाहरण दिलेले आहे. मनुष्य राजवाडा पाहायला गेला, त्याने संपूर्ण राजवाडा पाहिला, राजवाड्याची पूर्ण माहिती घेतली. त्याला राजवाड्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल माहित झाला. इतके सर्व त्याने केले म्हणजे त्याने राजाची मर्जी संपादन केली असे होत नाही. राजाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याला वरील माहितीचा उपयोग होण्याची शक्यता आहे. पण राजाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याला राजाची सेवा करावी लागेल, पहा पटतंय का?

एक उदाहरण पाहू.

एका राज्यात एका मनुष्याने चोरी केली. शिपायांनी त्याला पकडले आणि कैदेत टाकले. यथावकाश त्याची राजापुढे सुनावणी झाली. राजाने त्याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. कैदेत असताना त्याला राजाच्या बागेत काम दिले गेले. तो मनुष्य बागकाम करण्यात कुशल होता. त्याने आधी जो बगीचा होता, त्यात चांगली वाढ केली. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावली. त्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. एकदा राणी त्या बागेत विहार करण्यासाठी आली. तिला तेथील फुले फार भावली. तिने तेथील कामगाराची चौकशी केली. या चोराचे नाव सांगितले गेले. राणीने त्याचे बागकाम पाहून राजाकडे त्याच्यासाठी शिफारस केली. राणीच्या आग्रहामुळे राजाने त्याची शिक्षा माफ केली आणि त्याला त्या बागेचा प्रमुख माळी केले.

इथे आपल्या लक्षात येईल की नुसती माहिती घेऊन उपयोग होत नाही, पण सेवेने मात्र प्रचंड लाभ होऊ शकतो.

एखाद्याने पाकशाळेत प्रवेश घेतला. श्रीखंड कसे करायचं याची कृती त्याने तोंडपाठ केली. पण, जोपर्यंत तो ते श्रीखंड तयार करून चाखत नाही, तोपर्यंत त्याचा खरा फायदा शून्य.

भक्तीच्या ज्ञानाने किंवा ज्याची भक्ती करावयाची त्याच्या ज्ञानाने भक्तिसुखाची प्राप्ती होत नाही किंवा ती त्या ज्ञानावर अवलंबूनही नाही. भक्तीत ज्ञान असेल आणि असावे हे ठीक आहे पण ज्ञान झाल्याने किंवा ज्ञानाच्याद्वारे भक्तीची प्राप्ती होतेच असे नाही, म्हणून ज्ञान हे भक्तीचे साधन नाही. कारण भक्ती ही ‘स्वयंफलरूपा’ आहे. भक्तीच भक्तीचे साधन आहे. भक्ती केल्यानेच भक्तीप्रेमानंदाचा लाभ होतो. जे जे साध्य असते त्याचे साधन त्याच्यापेक्षा वेगळे असते असा सर्वसाधारण नियम असता भक्तीचे साधन भक्ती स्वतःच कशी असू शकेल अशी त्यावर शंका येईल. त्यावर श्रीनारदांचे उत्तर असे की ती परमप्रेमरूपा आहे आणि प्रेम हे अनुभवरूप आहे – म्हणजे अनुभवानेच कळणारे आहे, शब्दज्ञानाने नव्हे. कोणतेही सुख हा अनुभवाचाच विषय असतो, ज्ञानाचा नसतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

*”भक्तीप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ 

आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्यां ॥२॥

तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥”*

(अभंग क्रमांक १०९९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

सुखाची साधने कळल्याने सुख होत नाही तर सुखाचा अनुभव घेतल्याने सुख होते. राजवाडा पाहून त्यातील सुखाच्या अनेक साधनाचे ज्ञान होऊन त्यापासून राजाला जे सुख होते ते आपल्याला होईल काय? त्याचा अनुभव घेण्यानेच ते सुख आपणास कळेल. त्याचप्रमाणे भोजनाचेही आहे. जेवल्याशिवाय पोट भरत नाही. भक्ति केल्याशिवाय भक्ति कळत नाही.

इथे संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग पाहू.

प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥ १ ॥ 

*

कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ २ ॥

*

पोटामध्ये कोणे सांगितलें सर्पा । उपजत लपा ह्मणऊनि ॥ ३ ॥ 

*

बालों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥ ४ ॥ 

*

तुका ह्मणे बरें विचारावे मनीं । आणीक भल्यांनी पुसों नये ॥ ५ ॥

*

“जितकी भक्ति तितकी भक्तीची प्ती”

।।जय जय रघुवीर समर्थ।। 

.. – क्रमशः लेख क्र. ३१  

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रवि’ला शिशिर नाही…” – भाग -२ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘रवि’ला शिशिर नाही…” – भाग -२ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

(इथं संबंध येतो विद्वत्तेचा, व्यासंगाचा, नैपुण्याचा. हे तीन गुण तुमच्याकडं असतील आणि त्याला कार्यमग्नता, विवेक आणि सहृदयता या तीन स्वभाववैशिष्ट्यांची जोड असेल तर तुम्हाला नाकारणं हे जगासाठी सोपं नसतं. हे तीन गुण आणि तीन स्वभाववैशिष्ट्यं यांचं एकत्र रसायन असलेल्या एकाही व्यक्तिमत्वाला जग नाकारू शकलेलं नाही. स्वत:च्या व्यक्तिमत्वात ह्या सहा गोष्टी विकसित केलेली व्यक्ती स्वत:चं स्थान निर्माण करतेच.) 

इथून पुढे – – – 

साठच्या दशकात सचिन देव बर्मन, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, खय्याम, रोशन, सलील चौधरी, नौशाद असले एकाहून एक श्रेष्ठ संगीतकार आपापल्या प्रतिभेनं भारतीय चित्रपटसृष्टी गाजवत होते. रसिक आजही ती गाणी विसरू शकलेले नाहीत, इतकी गुणवान संगीतनिर्मिती होत होती. अशात नव्या माणसाचा शिरकाव होणं ही गोष्ट किती कठीण असेल याची कल्पना करून पाहिली तरी अंगावर सरसरून काटा येतो. समजा, एखादं काम मिळालं तरी त्याची गुणवत्ता कणभरानंही कमी असून चालणारच नाही, ही एक अलिखित जबाबदारीच होती. रसिकांची मनं आणि कान सर्वोत्तमाला सरावलेले होते, त्यांना सर्वसाधारण दर्जा सहन होण्यासारखी परिस्थितीच नव्हती. या सगळ्या वातावरणात जीवघेणी स्पर्धा नव्हती, एकमेकांचा पाय खेचण्याची कुणाची वृत्ती नव्हती. चित्रपटसृष्टीला घाणेरड्या राजकारणाचा स्पर्शही झालेला नव्हता. यातून स्वत:चं स्थान निर्माण करणारा आणि ते राखणारा संगीतकार खरोखरच विशेष मानला पाहिजे.

हेमंत कुमार यांचा सहायक संगीतकार म्हणून रवि यांनी शर्त, सम्राट, जागृति, नागिन, चंपाकली, दुर्गेश नंदिनी अशा चित्रपटांसाठी काम केलं. त्यातही ‘नागिन’ आणि त्या चित्रपटात वाजलेली बीन श्रोते अजूनही विसरू शकलेले नाहीत. ही किमया रवि यांचीच होती.

फिल्मिस्तान स्टुडिओ च्या अधिकारी वर्गाला ही चाल प्रचंड आवडली आणि त्यांनी २५० रूपये प्रति महिना पगाराची नोकरी रवि यांना देऊ केली. हेमंत कुमार सुद्धा त्यांना २०० रूपये पगार देऊ लागले होते.

याच दरम्यान हेमंतदांनी रवि यांना सुचवलं की, त्यांनी आता स्वत: स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरूवात करायला हवी. रवि घाबरून गेले. ‘आपली नोकरी गेली’ असं त्यांना वाटलं. पण हेमंतदांनी त्यांना समजावून सांगितलं की, “स्वतंत्रपणे काम केलं तरच मोठा संगीतकार होशील. ” हाच रवि यांच्या कारकीर्दीतला महत्वाचा क्षण होता.

एकेकाळी फूटपाथवर राहणाऱ्या या तरूणानं बी. आर. चोप्रा, रामानंद सागर, एस. डी. नारंग, देवेन्द्र गोयल, नाडियाडवाला, गुरुदत, ओ. पी. रल्हन सारख्या मोठमोठ्या चित्रपटनिर्मात्यांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम केलं.

अत्यंत विलक्षण गोष्ट अशी की, रवि यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण, तरीही शास्त्रीय रागदारीच्या आधारावर अवीट गोडीच्या श्रवणीय आणि निरंतर स्मरणात राहतील अशा शेकडो सुरावटी त्यांनी बांधल्या. संगीतकार म्हणून चार-चार पिढ्या श्रोत्यांच्या पहिल्या पसंतीत राहणं ही किमया रवि यांना साधली. त्यांच्या सुरावटी कालसुसंगत नसून भावसुसंगत आहेत. म्हणूनच, त्या काळाच्याही डोक्यावर पाय देऊन उभ्या आहेत.

‘कालजयी संगीतकार’ असा विचार करायचा झाला तर रवि ला त्यामध्ये अढळपदाचा मान आहे. काव्य आणि शायरी यांची उमज जितकी प्रगल्भ होती, तितकीच त्यांची प्रतिभासुद्धा उत्कृष्ट होती. म्हणूनच तर त्यांची गाणी गुणवत्तेच्या मापदंडांच्याही पलिकडे गेली आहेत.

गाण्यांचं संगीत संयोजन करण्याची रविची स्वत:ची अशी खास शैली होती. त्यांच्या शैलीवर अन्य कुणाचा प्रभाव दिसत नाही. जगावेगळं करून दाखवण्याचा अट्टाहास नसणं हेच तर रविचं बलस्थान होतं. गाण्यानं सर्वतोपरी त्याची स्वत:ची उंची गाठली, स्वत:चं अस्तित्व टिकवलं, आणि स्वत:चं सार्थक केलं, अशीच गाणी करणाऱ्या दुर्मिळ, मोजक्या संगीतकारांमध्ये रवि यांचं नाव आहे.

संगीतरचना करण्याची शैली आणि विशेषत: त्यातून माणसांच्या भावनांना थेट स्पर्श करण्याची हातोटी या कौशल्यात तर रवि अक्षरश: उस्ताद होते. सूर, शब्द, आणि कथानक यांची त्रिमिती जुळवताना त्यांनी ‘स्वर’ ही चौथी मिती सुद्धा इतक्या प्रभावीपणे वापरली की, रवि च्या गाण्यांमुळे अनेक गायक-गायिकांना त्यांची स्वत:ची अशी वेगळी ओळख मिळाली.

रविने केवळ संगीतकार म्हणूनच काम केलं असं नाही, त्यांनी गीतकार म्हणूनही काम केलं आणि गायक म्हणूनही काम केलं. आणि या तीनही भूमिकांमध्ये ते यशस्वी कलावंत म्हणून डौलानं विहरत राहिले.

चित्रपटउद्योगात त्यांचा कुणी गाॅडफादर नव्हता. त्यांनी आयुष्यात जे जे यश मिळवलं ते ते सगळं स्वत:च्या मेहनतीनं आणि प्रतिभेच्या जोरावर मिळवलं.

रवि यांची आणखी दोन महत्वाची वैशिष्ट्यं म्हणजे, एकाच चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी लोकप्रिय आहेत, असेच अनेक चित्रपट त्यांनी केले. आणि दुसरं म्हणजे, एकाच शब्दरचनेसाठी अनेक चाली करण्याचं त्यांचं अद्वितीय कौशल्य. ‘गुमराह’ सिनेमातल्या ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों’ या अजरामर गीतासाठी त्यांनी थोड्याथोडक्या नाही तर ३१ चाली केल्या होत्या.

‘चौदहवीं का चांद’, ‘घराना’, ‘चाइना टाउन’, ‘गुमराह’, ‘ख़ानदान’, ‘व़क्त’, ‘दो बदन’, ‘फूल और पत्थर’, ‘हमराज’, ‘आंखें’, ‘नील कमल’, ‘एक फूल दो माली’, ‘निकाह’ हे रवि यांनी संगीत दिलेले प्रमुख चित्रपट.

संपूर्ण कारकीर्दीमध्ये रवि यांना अनेक पुरस्कार मिळाले. पाच वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आणि त्यातील दोन वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७१ साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. लता मंगेशकर पुरस्कार, कवि प्रदीप शिखर सम्मान, अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

वय वाढत जातं, वाढत्या वयाबरोबर विचारांमधली लवचिकताही कमी कमी होत जाते. पण रविच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. त्यांचं वय वाढत गेलं तरी त्यांच्या संगीताचं तारूण्य मात्र अक्षय राहिलं. हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीचे आयाम बदलत गेले. मनाचा ठाव घेणाऱ्या प्रभावी काव्यरचनांचं प्रमाण कमी कमी होत गेलं. चिंतनशीलता आटायला लागली. ‘झटपट काम अन् ढीगभर दाम’ हे सूत्र सगळेचजण सर्रास वापरायला लागले. गुणवत्तेशी एवढी मोठी तडजोड करणं रवि यांच्या स्वभावात बसणारी गोष्टच नव्हती. साहजिकच, ते प्रसिद्धीपासून दूर होत गेले. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांकरिता संगीत दिग्दर्शन सुरू केलं. तिथंही त्यांची प्रतिभा तळपत राहिली. मल्याळी सिनेसृष्टीमधल्या अग्रगण्य संगीत दिग्दर्शकांमध्ये ते ‘बाॅम्बे रवि’ या नावानं ख्यातकीर्त आहेत.

दीर्घ आजारानं ७ मार्च, २०१२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आज रविजी विद्यमान नाहीत. पण, अंगभूत क्षमतेच्या बळावर अमरत्व मिळवता येतं, हा त्यांनी घालून दिलेला वस्तुपाठ मात्र प्रत्येकानं मनावर कोरून ठेवावा, असा आहे….!

– समाप्त – 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रवि’ला शिशिर नाही…” – भाग -१ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘रवि’ला शिशिर नाही…” – भाग -१ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

खरं तर त्याला व्हायचं होतं गायक. पण, नियतीनं पुढचा प्रवास काही वेगळाच लिहून ठेवला होता. जन्मजात

सृजनशीलतेनं त्याला संगीतकार म्हणून नवी ओळख दिली.

१९२६… दिल्ली.. आपल्या मुलांकडून किती आणि कुठपर्यंत अपेक्षा करायच्या, याची कल्पना पुरेशी सुस्पष्ट असणाऱ्या पालकांचा तो काळ होता. भारतातली सामाजिक परिस्थिती तर अतिशय गुंतागुंतीची आणि अस्थिर होती. सतत नवनवी स्थित्यंतरं घडत होती. ब्रिटीशांच्या सत्तेविरूद्ध भारतीयांचा प्रखर संघर्ष सुरू होता. सर्वसामान्य भारतीय कुटुंबांमधलं वातावरण मुलांना त्यांच्या मनाप्रमाणं करिअर करू द्यावं, कलागुणांना वाव द्यावा, मुलांचा व्यक्तिमत्व विकास करावा, अशा मानसिकतेतलं नव्हतंच. मानसिक, सामाजिक, आर्थिक अशा कुठल्याच पातळीवर निकोप वातावरण नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर या मुलाच्या बालपणाची वर्षं यथातथाच गेली. घरची परिस्थिती फार सधन किंवा गर्भश्रीमंत नव्हती. पण एक वेळ शिजवलेलं दोन वेळा खायला लागावं, इतकीही बिकट नव्हती. मुलांना ‘भोपळ्यात बी’ पद्धतीनं वाढवण्याइतपत श्रीमंती किंवा उपभोगात्मक दृष्टीकोन नव्हते, पण मुलांची शारीरिक-मानसिक-बौद्धिक-सामाजिक-सांस्कृतिक आबाळ होऊ नये, याची काळजी घेणारं पालकत्व त्या काळात अस्तित्वात होतं.

उत्तम साहित्यिक अभिरूची, सभ्य आणि विद्वत्प्रचुर भाषाशैली याचे संस्कार या मुलावर कळत-नकळत होत गेले. वडील उत्तम भजने गात असत. साहजिकच कानावर आणि गळ्यावरही तो प्रभाव पडत गेला. शालेय वयात रेडीओवर एक भजन या मुलानं ऐकलं. त्याला ते इतकं आवडलं की, त्यानं ते चालीसकट तोंडपाठ केलं. शाळेमध्ये आणि इतरांसमोर गाऊन दाखवून अनेकांची शाबासकीही मिळवली. लोक त्याच्या आवाजाचं कौतुक करायला लागले. त्याचा परिणाम असा झाला की, आपण गायक व्हावं, असं स्वप्न त्या मुलाच्या मनात रूंजी घालायला लागलं.

वयात आलेल्या मुलाचं मन चोवीस तास सूर आणि संगीत यांच्यातच रमायला लागलं आणि शालेय अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होत त्यातला रस आटून गेला. अभ्यासात गती दिसेना. शेवटी, दिल्लीतल्या एका कारखान्यात नोकरी धरली. पगार होता १५ रूपये महिना.! पण परिस्थितीचे चटके बसूनही गाण्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही.

पुढे, दिल्लीच्या डाक-तार विभागात इलेक्ट्रीशिअन म्हणून नोकरी धरली. पगार होता १९६ रूपये महिना..! (त्या काळी १९६ रूपयांत महिनाभर चौकोनी कुटुंबाला जगता यायचं, आता तेवढ्या पैशात फक्त दोन लिटर पेट्रोल येतं..! असो..) १९४५ ते १९५० अशी पाच वर्षं नोकरी केली. गाण्याची हौस होतीच. सोबतच दिल्ली आकाशवाणी केंद्रावर गायन ही करू लागला.

कुठं काही साधतंय का ते पहावं, म्हणून या मुलानं काही दिवसांची रजा घेतली आणि मुंबई गाठली. गादीवर झोपून साखरझोपेत स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात आणणं महाकठीण आहे, याचा प्रत्यय त्याला येऊ लागला. पावलोपावली प्रचंड संघर्ष.. हिराबाग धर्मशाळेत त्यानं आपलं चंबूगबाळं ठेवण्यापुरता आणि रात्रीच्या झोपण्यापुरता आसरा मिळवला. पण जेव्हा तिथं जागा मिळत नसे, तेव्हा स्टेशनच्या फलाटावर, बंद दुकानाच्या फळीवर, फूटपाथवर, थोडक्यात जिथं जागा मिळेल तिथं झोपावं लागायचं. सारखी वाढीव रजा मागून मागून शेवटी कंपनीने ‘रजा मिळणार नाही’ असं स्पष्ट सांगितलं तेव्हा ह्यानं सरळ नोकरीच सोडून दिली..!

आता जगायचं कसं? पोट भरण्यासाठी खावं तर लागणार. पण खिसा रिकामा. मग हा तरूण पंखा दुरूस्ती, इस्त्री दुरूस्ती, वीज उपकरणांची किरकोळ दुरूस्ती अशी कामं करून पोटापुरतं मिळवायचा आणि रात्री उघड्या आभाळाखाली झोपायचा. अशी दोन-अडीच वर्षं गेली….!

मुंबईत पहिलं भाड्याचं घर त्यांनी घेतलं, ती एक पत्र्याची खोली होती. तिथं वीज नव्हती. सूर्यास्तानंतर सगळा अंधारच अंधार. शेजारी मिरची आणि सिमेंटची तीन गोदामं होती. मिरचीचा खाट टाळण्यासाठी ते सिमेंटच्या गोदामाच्या बाजूला राहत. पैसे वाचवण्यासाठी एकवेळ जेवत. घर सोडल्याचं दु:ख तर होतं, शिवाय अंधारातला एकटेपणा, पोटातली भूक, कफल्लक अवस्था आणि स्वप्नं मात्र मोठी अशा विचित्र कात्रीत ते अडकले होते.

१९५१ साली पहिलं काम मिळालं ते कोरस गायक म्हणून. साहिर लुधियानवी यांची गाणी आणि सचिन देव बर्मन यांचं संगीत असलेला चित्रपट होता ‘नौजवान. ’ लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, किशोर कुमार अशी मातब्बर गायकांच्या आवाजातली एकाहून एक सरस गाणी असलेला हा चित्रपट होता. आणि हा तरूण त्यातल्या एका गाण्यात कोरस मध्ये उभारून गायला. तेव्हा या पैकी कुणाला माहीत होतं की, एके दिवशी याच तरूणाच्या संगीत दिग्दर्शनाखाली आपल्याला गायचं आहे म्हणून…?

एक वर्षानं १९५२ साली दुसरं काम मिळालं, तेही कोरस गायक म्हणूनच. सिनेमा होता ‘श्रीमती जी. ’ श्यामा आणि नासिर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा. या सिनेमासाठी तीन संगीतकार होते. त्यापैकी एक होते जिम्मी. याच सिनेमाच्या वेळी या तरूणाची गायक-संगीतकार हेमंतकुमार यांच्याशी भेट झाली, ओळख झाली. हेमंतकुमार पार्श्वगायनही करत असत आणि चित्रपटांना संगीतही देत असत. त्याच वेळी ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारित सिनेमाचं संगीत करत होते. या चित्रपटातल्या ‘वंदे मातरम्’ या गाण्यात कोरसमध्ये गाण्याची संधी त्यांनी या तरूणाला दिली.

एके दिवशी हेमंतदा गात होते, पण गाण्यातल्या एका ऊर्दू शब्दाचा उच्चार चुकत होता. ह्या तरूणानं त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली, योग्य उच्चार सांगितला आणि सुधारूनही घेतला. एक सहायक संगीत दिग्दर्शक होण्यासाठी जे जे गुण आवश्यक असतात, ते ते सगळे गुण ह्या तरूणामध्ये आहेत, हे हेमंतदांनी ताडलं.

“माझा सहायक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करशील? ”

“हो. पण.. ”

“माझं काम तर करच. पण, बाहेरही कामं मिळाली तर करत रहा. माझी हरकत नाही. ”

आणि या तरूणानं हेमंत कुमार यांचा सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरूवात केली. त्यावेळी त्याला एका गाण्याचे २० रूपये मिळत आणि एका रिहर्सलचे २ रूपये मिळत असत. साधारणपणे महिन्याला ६० रूपयांची मिळकत सुरू झाली तेव्हा त्यानं त्यातून तबला आणि पेटी खरेदी केली. या तरूणाचं नाव रविशंकर शर्मा….. संगीतकार, गायक, गीतकार रवि…!

‘कुठल्याही क्षेत्रात काम करा पण ज्या क्षेत्रात काम कराल त्यात शिखरावर जा’ असं सगळेचजण म्हणतात. पण त्या शिखरावर जायचं कसं? त्याचा रस्ता कुठला? तो कसा शोधायचा? तो मिळाल्यावर पुढं काय करायचं? या प्रश्नांची ठराविक, छापील अशी उत्तरं नसतात. ज्याची त्याची उत्तरं ज्याला त्याला स्वतंत्रपणे शोधावी लागतात.

प्रतिभेच्या क्षेत्रात करिअर करणं ही तर फारच अवघड गोष्ट आहे. कारण, तिथं सगळीच्या सगळी भिस्त आपल्या प्रतिभेवरच अवलंबून असते आणि प्रतिभा सतत कार्यरत ठेवणं, उत्तमतेचा आलेख सतत चढता राहणं ही गोष्ट अजिबातच सोपी किंवा सहजसाध्य नाही.

‘संधी’ ही एक फार मोठा मुद्दा आहे. संधी मिळणं आणि संधी शोधणं या दोन पूर्णत: वेगवेगळ्या गोष्टी असतात. अनेकदा संधी आपणहून चालून येतात, पण काही काही क्षेत्रच अशी अथांग पसरलेली असतात की, तुमच्यापर्यंत संधीनं आपणहून चालत यायला आपण एकमेव टिकोजीराव थोडेच असतो? उलट कितीतरी वेळा असा अनुभव येतो की, ‘संधी मिळेल-संधी मिळेल’ च्या आशेचा प्रभाव इतका वाढलेला असतो की, ‘संधी शोधणं’ राहूनच जातं. साहजिकच, संधी मिळण्याची वाट पाहत राहणाऱ्यांची आयुष्यच वाया जाण्याचा किंवा प्रतिभेला गंज चढण्याचा धोका फार मोठा असतो.

‘मला सगळं मनाजोगं तयार मिळालं पाहिजे किंवा कुणीतरी मला काम दिलं पाहिजे, मग दाखवेन मी काय चीज आहे ते’ अशी आपली धारणा असेल तर करिअर घडण्याऐवजी ते बिघडतंच. ‘संधी शोधणं’ हेच ज्यांना जड वाटतं, त्यांच्यासाठी ‘संधी निर्माण करणं’ ही गोष्ट म्हणजे बैलाचं दूध..! काहीही हातात नाही, समोर काही दिसत नाही, आजूबाजूचं वातावरण पूरक नाही, कुणाचा आधार नाही, अशा परिस्थितीत धीर यायच्याऐवजी खचतोच.

त्यातही व्यावहारिक जग तुमच्याशी फार वेगळे डाव खेळत असतं. तुम्ही जन्मला नव्हतात, तेव्हाही ते सुखेनैव चालतच होतं. आज तुम्ही इकडची काडी तिकडं न करता घरात बसलात, तरीही ते सुरूच आहे. उद्या तुम्ही या जगात नसलात, तरीही जग असंच सुरू राहणार. एकूण काय, जगाला आपल्या असण्या-नसण्याशी काही देणं-घेणंच नाही. आपल्या महत्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्या पूर्ण करण्याचा मार्ग मिळायला नको का? “तू कितीही हुशार असलास तरी, मला तुझी आवश्यकता नाही” असं जर जग म्हणायला लागलं तर माणसानं करायचं काय?

इथं संबंध येतो विद्वत्तेचा, व्यासंगाचा, नैपुण्याचा. हे तीन गुण तुमच्याकडं असतील आणि त्याला कार्यमग्नता, विवेक आणि सहृदयता या तीन स्वभाववैशिष्ट्यांची जोड असेल तर तुम्हाला नाकारणं हे जगासाठी सोपं नसतं. हे तीन गुण आणि तीन स्वभाववैशिष्ट्यं यांचं एकत्र रसायन असलेल्या एकाही व्यक्तिमत्वाला जग नाकारू शकलेलं नाही. स्वत:च्या व्यक्तिमत्वात ह्या सहा गोष्टी विकसित केलेली व्यक्ती स्वत:चं स्थान निर्माण करतेच.

– क्रमशः भाग पहिला 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares