मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पाझरणारा पाषाण!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाझरणारा पाषाण!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मेजर साहेबांनी हातातली रायफल खाली ठेवली… आणि ती वृद्धा आणि त्या तीन मुलींना आपले दोन्ही हात पसरवून एकत्र मिठीत घेतले… हिमालयाच्या कुशीत चार छोटी हिमशिखरे विसावली आहेत… असे ते दृश्य! या पाचही जणांच्या नेत्रांतून अश्रूंचा एक प्रवाह वाहू लागला… इथे शब्दांचे काहीही काम नव्हते. ती वृद्धा म्हणाली… ”बेटा! माझं उरलेलं सर्व आयुष्या तुला लाभो! आणि… हो… आमची ही कहाणी तू जगाला एक न एक दिवस जरूर सांग! ” मेजर साहेबांनी मानेनेच होकार दिला आणि साहेबांनी त्या चौघींना तिथून सुरक्षित पाठवण्याच्या सूचना त्यांच्या सहकारी सैनिकांना दिल्या… आणि डोळे पुसले! साहेबांच्या डोळ्यांची आणि आसवांची भेट या पूर्वी कधी झाली होती हे त्यांचे त्यांनाही स्मरत नव्हते. अगदी काहीच मिनिटांपूर्वी त्या सात नराधमांना यमसदनी धाडताना त्यांचे हात जराही थरथरले नव्हते! पण ती वृद्धा आणि तिच्यासोबतच्या त्या तीन असाहाय्य पिडीत कन्या पाहून साहेबांच्या पाषाणहृदयातून कारुण्याचा, ममतेचा एक निर्झर त्यांच्याही नकळत पाझरून गेला होता!

शत्रू एकदा निश्चित झाला की त्याला थंड डोक्याने संपवण्याचे प्रशिक्षण त्याला मिळालेले होते.. आणि ते त्याने नसानसांत भिनवून घेतले होते. त्यादिवशी त्याच्या नेतृत्वात एक-दोन नव्हे सात जण यमसदनी धाडले गेले होते… या कामात तो सर्वांच्या पुढे होता.

साधा सैनिक ते एन. एस. जी. कमांडो आणि पुढे लवकरच मेजर या पदापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अतिशय रोमांचक असाच आहे. केरळमधील एका लहानशा खेड्यातून एक सामान्य मनुष्य लष्करात भरती झाला… आणि त्याच्या पोटी आलेला हा निधड्या छातीचा पोरगा त्याच वाटेवर चालला… पण बापाच्या एक पाऊल पुढे!

जवान (लष्करी शिपाई) म्हणून कारकीर्द सुरु करून, शिक्षण पूर्ण करीत करीत, विविध परीक्षा देत देत साहेब अधिकारी बनले. National Security Guard (N. S. G.) मध्ये कमांडो बनणे हे आव्हानही त्यांनी पेलले. सल्ला देणारा देह कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा त्या देहाने जगाचा किती अनुभव प्राप्त केला आहे… यावर साहेब त्या देहाचा सल्ला प्रमाण मानत. एका चाळीस किलोमीटर्स धावण्यातच नव्हे तर अभ्यासक्रमाच्या सर्वच आघाड्यांवर साहेब क्रमांक एकवर होते. त्यादिवशी अडीचशे प्रशिक्षणार्थी जवानांचा जथा रात्रीच्या अंधारात चाळीस किलोमीटर्स धावण्याच्या स्पर्धेत धावण्यास सज्ज होता. साहेबांनी ही कामगिरी याआधीही पूर्ण करून दाखवली होतीच. या वेळी त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला नसता तरीही त्यांचा एकूणातला पहिला क्रमांक काही गमवला जाणार नव्हता. म्हणून त्यांनी अगदी शर्यत सुरु झाल्यावर काही मिनिटांतच शर्यतीत सोडून दिली. अडीचशे जवान पुढे निघून गेले. साहेबांच्या पेक्षा कनिष्ठ पदावर परंतू वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या एका सैनिकाने साहेबांशी संवाद साधला… आणि या पुढे निघून गेलेल्या जवानांपैकी एखादा तरी “तुम्ही चाळीस किलोमीटर्स शर्यत पूर्ण केली नाही… असं म्हणू शकेल असं म्हणत त्यांच्यातल्या कर्तृत्वाला आव्हानच दिले… शर्यत पूर्ण करणं म्हणजे काही फार कठीण बाब असते असं नाही… फक्त मागचा पाय पुढं टाकीत रहायचं… आणि शर्यत संपेपर्यंत हा क्रम थांबवायचा नाही! साहेबांनी या बोलण्यातलं मर्म जोखलं… आणि शारीरिक थकवा, वेदना यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत त्या रात्री ती चाळीस किलोमीटर्स धावण्याच्या शर्यतीची अंतिम रेषा प्रथम क्रमांकाने पार केली! पुढे देशभरात अनेक धाडसी कारवायांत भाग घेऊन पराक्रम गाजवला.

त्यांच्या लष्करी कारकीर्दीतला एक मोठा मैलाचा दगड म्हणजे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रीग्ज साहेबांचे A. D. C. अर्थात साहाय्यक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे!

१९८०-९० हे दशक भारतातल्या पंजाब राज्यातल्या दहशतवादी घटनांनी अक्षरश: धडधडा जळत होते. सुमारे ८ हजार दहशतवादी आणि कित्येक हजार पोलिस, लष्करी जवान, अधिकारी आणि सामान्य नागरिकांचे यात बळी गेले!

मेजर साहेबांना यावेळी पंजाबात कर्तव्यावर धाडण्यात आलं. सकाळी सकाळी एक खबर मिळाली… एका फार्म हाउसवजा घरात सहा दहशतवादी आहेत… साहेबांनी आपले दल सज्ज केले आणि साहेब त्वरेने निघाले. प्रचंड मोठे शेत शिवार. पण पिकं काढून मोकळं केलेलं. मध्यभागी एक दोन-अडीच मजली इमारत. या इमारतीच्या आसपास मात्र बारा-पंधरा फुट उंचीचे पीक… बहुदा जनावरांना चारा मिळावा म्हणून केलेली सोय. पण याच शेतात आज काही मानवी जनावरं दबा धरून बसणार होती… हे कुणास ठाऊक होतं?

साहेब त्या फार्म हाऊसपासून सुमारे दीडशे मीटर्सवर पोहोचले… त्या इमारतीपासून वीस मीटर्स अंतरावर सी. आर. पी. एफ. च्या दोन जवानांचे मृतदेह पडलेले… एक जवान अजूनही जिवंत होता… जखमी अवस्थेत विव्हळत पडून होता. त्या फार्म हाऊस मधून गस्तीवर निघालेल्या या जवानांवर अचानक हल्ला चढवण्यात आलेला होता. इतर जवानांनी या इमारातीला लांबून वेढा दिलेला होता… परंतू आतून अतिशय मोठ्या प्रमाणावर अचूक आणि मोठ्या क्षमतेचा गोळीबार होत असल्याने पुढे जाता येत नव्हते… मात्र इमारतीमधील दहशतवाद्यांना तिथून बाहेरही पडता येत नव्हते. स्थानिक पोलिस, सी. आर. पी. एफ. यांच्या जोडीला आता एन. सी. जी. ला पाचारण करण्यात आलं होतं!

मेजर साहेबांनी त्या इमारतीपर्यंत थेट पुढे न जाता दोनशी मीटर्स दूरवरून वळसा घालून पोहोचण्याची योजना आखली… साहेब ज्या बाजूने इमारतीच्या जवळ जाणार होते… त्या बाजूला त्या इमारतीला खिडक्या नव्हत्या! साहेब आणि त्यांचे दल त्या इमारतीच्या अगदी भिंतीपर्यंत पोहोचले… पण कसं कुणास ठाऊक… त्या दहशतवाद्यांनी इमारतीवरून उद्या घेऊन त्या दाट शेतात आश्रय घेतला! साहेब त्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या खोल्यांत पोहोचले!

आत चूल पेटली होती… भात रटरटत होता… दूध उकळत होतं. चुलीपुढे बसलेल्या वृद्ध महिलेने आणि घरातल्या बाजांवर निपचित पडलेल्या तीन पोरींनी साहेबांच्या अशा आत घुसण्यावर काहीही प्रतिक्रिया नोंदवली नाही… जणू काही झालंच नाही… असा त्यांचा अविर्भाव होता! सैनिक इमारतीच्या छतावर गेले… तोच त्यांच्या दिशेने गोळीबार सुरु झाला… पण नेमक्या गोळ्या कुठून येत होत्या… हे कळायला काही मार्ग नव्हता… कारण उंच गवतामुळे दहशतवादीसुद्धा अंदाजेच गोळीबार करीत असावेत!

साहेबांनी मोक्याची जागा शोधली… त्या शेतातल्या सुमारे पाऊणशे मीटर्स अंतरावर त्यांना थोडासा धूर वर येताना दिसला… अर्थात दहशतवादी तिथ होते तर! साहेबांसोबत असलेल्या जवानांला त्याच्या हातात असलेले Rocket Launcher डागण्याजोगी स्थिती सापडत नव्हती. आहे त्या स्थितीत सरळ rocket डागले तर ते दीडशे मीटर्सवर गेल्यावरच फुटणार… म्हणजे जिथे हे दहशतवादी होते त्यांच्या पलीकडे जाऊन ते फुटणार होते… म्हणजे उपयोग फारसा होणार नव्हताच. अशा स्थितीत मेजर साहेबांनी स्वत: धोका पत्करला… rocket डागण्याचा अनुभव नसताना साहेबांनी launcher खांद्यावर घेतले… खांदा, पाय यांना दुखापत होण्याचा धोका होताच… साहेबांनी launcherचा कोन बदलला… ते सरळ न धरता आकाशाकडे काहीसे वर केले आणि डागले… गोळा थेट वर गेला… तिथून पुढे गेला… आणि बरोबर सुमारे पंचाहत्तर मीटर्सवर हवेत फुटला… खाली लपलेल्या दहशतवाद्यांवर आग कोसळली… काम फत्ते झाले होते! पण अजून धोका संपला नव्हता. ते दहशतवादी अधून मधून गोळीबार करीत होतेच!

यावर उपाय म्हणून साहेबांनी एक वाहन मागवून घेतले… वाहनावर आडोसा ठेवून त्याच्यामागून गोळीबार करीत त्या वाहनातून साहेब पुढे निघाले… त्या शेतातील पीक तुडवीत… चालकाला पुढचे काही दिसत नव्हते… साहेब गोळीबार करता करता चालकाला दिशा सांगत होते… अचानक चालकाला गोळी लागली… वाहन मागे घ्यावे लागले… दुसरा चालक घेतला… वाहन पुढे निघाले… पण आधी त्याच वाहनाने त्या रस्त्यावरील पीक आडवी केल्याने रस्ता साफ झाला होता… ते दहशतवादी आता नजरेच्या टप्प्यात आलेले होते… साहेबांनी आणि इतरांनी त्या सहा जणांच्या डोक्यात नेम धरून गोळ्या मारल्या…!

साहेब वाहनावरून खाली उडी मारून पुढे जाण्याच्या अगदी बेतात असताना त्यांच्यापेक्षा पदाने कनिष्ठ परंतू अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या सैनिकाने सांगितले… साहेब… रायफल लोड करूनच खाली उतरा… साहेबांनी ते मानले… आणि खरंच… त्या पिकाच्या दुस-या बाजूला हालचाल दिसली… सातवा दहशतवादी तिथे होता… जखमी परंतू गोळीबार करण्याच्या स्थितीत. साहेबांनी आणि इतरांनी मिळून त्याच्यावर शेकडो गोळ्या झाडल्या… आणि त्याच्या शरीराची चाळण केली… कामगिरी फत्ते झाली होती!

मेजर साहेबांना अशा कामगिरी काही नव्या नव्हत्या! त्यांनी शांतपणे त्या दहशतवाद्यांच्या देहांची पुढची व्यवस्था करण्याच्या कामाला सुरुवात केली… तेवढ्यात ती वृद्धा पुढे आली… म्हणाली… मला साहेबांना काही सांगायचे आहे! मेजर साहेब त्या वृद्धेवर आधीच रागावलेले होते… तिने फक्त सहाच दहशतवादी आहेत, असे सांगितल्याचा साहेबांचा समज होता… आणि प्रत्यक्षात सात निघाले होते! . पण सहा आकडा त्या वृद्धेने सांगितलेला नव्हता असे सहकारी अधिका-याने साहेबांना सांगितले. तिची वाट रोखून धरणा-या अधिका-याला जवळजवळ ढकलून ती वृद्धा पुढे आली… आणि मेजर साहेबांच्या पायांशी बसली.. त्यांचे पाय घट्ट धरून! आता साहेब थोडे नरमले… इतकी म्हातारी बाई… आपल्या पायाशी बसते! साहेबांनी तिला उभे केले… त्यावर ती वृद्धा म्हणाली… माझं फक्त एवढं ऐका.. साहेब! इतका वेळ मी माझ्या आणि माझ्या नाती असलेल्या या अभागी मुलींच्या जीवाच्या भीतीने काही बोललो नव्हतो… हे सात जण जगले असते… तर त्यांनी आमचे आणखी हाल केले असते, साहेब! या माझ्या तिन्ही नातींवर या सातही जणांनी रात्रभर पाशवी अत्याचार केले हो.. माझ्या नजरेसमोर! तुम्ही हे जगाला निश्चितच सांगा… या सात दहशतवाद्यांपैकी पाच जण आमच्याच रक्ताचे… आणि उरलेले दोघे पाकिस्तानी… आमच्या लोकांच्या वेशात आलेले राक्षस… होते! अतिरेकाचे हे भयावह रूप… आपल्याच माणसांच्या हातून आपल्याच माणसांचे बळी घेणारे! भारतात अराजक माजवण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, भारातीयांना भडकावू शकतो हेच यातून सिद्ध झाले.. आजही हे सुरु आहे. मात्र भारतीय लष्कर समर्थपणे मुकाबला करते आहे.. आणि करीत राहील!

ती वृद्धा बोलत असताना त्या तिन्ही मुली पुढे आल्या… त्यातली एक तर केवळ अकरा-बारा वर्षांची. वृद्धेने त्या मुलीच्या गळ्यातला दुपट्टा बाजूला केला… गळ्यावर, चेह-यावर चावल्याच्या, ओरबाडल्याच्या असंख्य खुणा… कुत्तरओढ झालेली नुसती! पोरी भेदरून गेलेल्या हरिणी जणू… पशूंना अगतिकतेने शरण गेलेल्या… नव्हे जावं लागलेल्या!

मेजर पहाडासारखा कणखर माणूस… पण ते दृश्य पाहून त्याचे अंत:करण द्रवले… डोळे भरून आले… मेजर साहेबांनी त्या चौघींना हात पसरवून जवळ घेतले… एका आलिंगनात.. आणि आसवांना वाहण्याची अनुमती दिली काही क्षण! अतिरेक्यांच्या डोक्यात गोळ्या घालताना न थरथरलेले त्यांचे हात त्या लेकरांच्या माथ्यांवर फिरताना थरथरत होते!

या पहाडाचे नाव… मेजर ए. के. रवीन्द्रन… ऊर्फ मेजर रवी(निवृत्त). रवी साहेबांना दोनदा सेना मेडलने गौरवण्यात आले आहे. साहेबांनी जम्मू-काश्मीरमध्येही पराक्रम गाजवून पदक मिळवले आहे… अंदमान निकोबार मध्ये लष्करी गुप्तचार विभागात सेवाही केली आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या संशयित मारेक-यांना पकडण्याच्या मोहिमेचे ते प्रमुख होते. आपल्या पराक्रमाचे श्रेय सर्व सहकारी दलाचे आहे… असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या सोबत लष्करी कारवाईत महत्वाची कामगिरी बजावलेल्या प्रत्येकाला सन्मान मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सध्या ते खाजगी सैन्य प्रशिक्षण केंद्र चालवतात… आणि त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारीत कीर्ती चक्र, कर्मयोद्धा इत्यादी चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. लष्कराची योग्य ती प्रतिमा जनमानसात रुजावी यासाठी ते चित्रपट निर्मात्यांना लष्करविषयक सल्ला देण्याचे कामही करत असतात!

मेजर रवीन्द्रन यांची फारशी माहिती मराठी वाचकांना नसावी. Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी मुलाखत बघायला मिळाली. केवळ एका असामान्य लष्करी अधिका-याची माहिती सामान्य मराठी वाचकांना व्हावी, या उद्देशाने, संबंधित podcast निर्मात्यांचा कॉपी राईट भंग होण्याचा गुन्हा हातून घडण्याची आणि कारवाई होण्याची शक्यता, असा धोका पत्करून मी हे लिहिले आहे. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे जपायला हवं… – लेखिका : सुश्री वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ हे जपायला हवं… – लेखिका : सुश्री वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

हे जपायला हवं .

काकासाहेब चितळ्यांच्या चरित्रलेखनाच्या एका प्रोजेक्टवर काम करत असताना एक विलक्षण अनुभव आला… मुंबईला एका वृद्ध जोडप्याकडे मुलाखतीसाठी गेले होते. पंजाबी भाषा बोलणारं धट्टकटं सरदार कुटुंब. आजोबा होते वय वर्ष ८५ आणि आजी ८०. दोघेही तब्येतीने अगदी खणखणीत. मी येणार म्हणून आवर्जून खाण्यापिण्याची छान तयारी करुन ठेवली होती. खूप गप्पा-गोष्टी झाल्या, चर्चा झाली… मी त्यांना म्हटलं मी निघते आता… त्याचवेळी ते आजोबा त्यांच्या ६० वर्षांच्या मुलाला काही विचारत होते.. तो मुलगा त्यांना नाही म्हणाला असं मला जाणवलं..

मी निघताना माझ्या सवयीप्रमाणे त्या आजोबा-आजींना खाली वाकून नमस्कार केला… तर त्या आजोबांनी माझ्या हातात ५०० रुपये ठेवले… मी ते हातात घेत म्हटलं की, मैं आज इसे ना नही कहुंगी.. क्यों की यह आपका आशीर्वाद है…

आणि खरं सांगते त्या दिवशी अनेक वर्षांनी आपण लहान आहोत असा फिल आला… संसाराच्या रहाटगाडग्यात आणि विशेषत: वडील गेल्यानंतर जबाबदारीच्या ओझ्यानं जीव मेटाकुटीला आला होता… त्या दिवशी त्या आजोबांनी हातात पाचशेची नोट ठेवल्यावर एवढं नॉस्टॅल्जिक झाले.. माझ्या लहानपणी मोठ्या माणसांना नमस्कार केल्यावर ते हातात खाऊसाठी काहीतरी ठेवत असत.. त्या खाऊच्या पैशाच्या आशेनेही आम्ही लहान मुलं नमस्कार करत असू… हे सगळं आठवलं.. आता खरी गंमत पुढे आहे… मी त्या आजी-आजोबांकडून निघाले तर रात्रीचे ९ वाजले होते. पुण्यात परत येता येता रात्रीचे दीड वाजले… तोवर दर तासा तासाने ते आजी-आजोबा मला फोन करत होते… रात्री दीड वाजता मी पोहोचल्यावर जेव्हा त्यांना पोहोचल्याचा फोन केला तेव्हा ते झोपी गेलेत…काही नातं नाही.. पहिल्यांदाच भेट.. तरीही आपली सख्खी नातंच जणू काही पुण्यात रात्री पोहोचते आहे अशा काळजीने ते जागे होते… एका भावपूर्ण नमस्कारानं किती चित्र बदलवून टाकलं होतं… हा भाव मला पूर्वेची विशेषत: भारताची श्रीमंती वाटतो.. हा अनुभूतीचा विषय आहे… पश्चिम तर्कावर आधारीत आहे.. पूर्व भावावर…

ओशोंचं एक फार सुंदर वाक्य आहे.. ’’पुरूष तर्क से जीता है और स्त्री अनुभूति से.. और जब भी तर्क और अनुभूति में दौड़ होगी.. तर्क हार जायेगा अनुभूती जीत जायेगी”…

पार्थिव, संपत्ती, सत्ता आणि उपभोग संपल्यावर हा भावाचा प्रदेश सुरू होतो… इथे मी भाव हा शब्द वापरतेय… भावना नाही याची कृपया नोंद घ्यावी.

भारतातली ही नाती, या परंपरा, हे संस्कार हे मला भारतीय संस्कृतीचं फार लोभस आणि विलोभनीय वैशिष्ट्य वाटतं… जे एकमेवाद्वितीय आहे…

वडीलधारे असतील, गुरू असतील नमस्काराचा हा संस्कार आपण आग्रहाने जपला पाहीजे… जो आज लुप्त होताना दिसतो आहे… आमच्या लहानपणी कोणी मोठे आले तर नमस्कार करा हे सांगायची गरजच नसे… आजचे किती पालक आपल्या मुलांमध्ये जाणीवपूर्वक हा संस्कार जोपासताहेत… नमस्कार हा कृतज्ञतेचा संस्कार आहे, विनम्रतेचा संस्कार आहे… गुरूंना केलेला नमस्कार, आई-वडीलांना केलेला नमस्कार, सकाळी उठून भूमीला पादस्पर्शं क्षमस्व मे म्हणत केलेलं वंदन, नदयांची होणारी आरती, मध्यप्रदेशात तर वर्षातून एकदा नर्मदेला साडी नेसवून नमस्कार करण्याचा सोहळाच होतो..

हजारो आकाशगंगा, पृथ्वी, सूर्यमाला, हे अनंत कोटी ब्रह्मांड… जीवनाच्या अनन्वित शक्यता… तुम्ही शिकतच राहू शकता आणि केवळ विनम्रच होऊ शकता… अकड मुर्दे की पहचान है.. या झुकण्यातून, लीन होण्यातून सर्जनाच्या किती शक्यता उमलू शकतात…

एका पुरस्कार समारंभात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी पुरस्कार स्वीकारताना रतन टाटांना खाली वाकून नमस्कार केल्याचं छायाचित्र सर्व वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालं होतं… त्यावेळी मूर्तींच्या या gestureची खूप वाहवा झाली होती…

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना प्रसिद्ध झालेली एक बातमी आठवतेय.. त्या बातमीचं शीर्षक होतं… Even the Prime minster has compelled to touch her feet.. दक्षिण भारतातल्या एक खेड्यातल्या अशिक्षित वृद्ध स्त्रीनं स्वत:च्या कल्पनेनच लाखो गरीब महिलांच्या बचत गटांचं जाळं उभं केलं होतं.. ते काम इतकं अतुलनीय होतं की पंतप्रधान वाजपेयींनी तीच्या कामाला सॅल्युट म्हणून तीला खाली वाकून नमस्कार केला…

भारतीय संस्कृतीचं हे निर्विवाद सौंदर्य आहे… माझे वडील मला सांगत ‘’बेटा एक नमस्कार तुमचं जीवन फार सुकर करू शकतो.. आपल्या हातून कुठली चूक झाली तर मोठ्या माणसांची मनापासून माफी मागायची आणि नमस्कार करायचा.. तुमची मोठी शिक्षा टळून जाईल याने’’… नमस्कार केल्यावर दिलेला आशीर्वाद हा संरक्षक कवचासारखं काम करतो हा माझा तरी विश्वास आहे…

भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नमस्काराचा संस्कार तुम्हाला सर्वत्र सारखा दिसेल… संस्कृतीचे हे कवडसे सर्वत्र सारखे चमकताना दिसतात… धर्म वेगवेगळे असतील.. भाषा वेगळ्या असतील.. पोशाख-पदार्थ वेगळे असतील.. पण संस्कृती एक आहे… धर्मापेक्षा संस्कृती मोठी आहे हा महत्वाचा विचार सुप्रसिद्ध शायर निदा फाज़ली यांनी मांडला होता. भारतात प्रत्येक राज्य हे स्वतंत्र राष्ट्र होऊ शकते हा विचार मांडणाऱ्यांनी हा संस्कृतीचा जोडणारा बांधून ठेवणारा दुवा लक्षात घेतलेला दिसत नाही… आईचं प्रेम, वडिलांचा दरारा, बहिणीची माया आणि भावाची जबाबदारी.. हे भारतात कुठेही जा सारखंच सापडेल…

भारतीय संस्कृतीत गुरूचं अपरंपार महत्व आहे. सोबतच नमस्काराचं… आपल्या मुलांना मोठ्या लोकांना जाणीवपूर्वक नमस्कार करायला लावायला हवा… या संस्काराचं वहन व्हायला हवं…

काल भारतीय महिला चमूने क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यातले विजयाच्या जल्लोष करणारे, खेळाडू मुली भावूक झालेले अनेक फोटो व्हायरल झाले. पण मला सर्वात जास्त आवडला तो कोच अमोल मुजुमदार यांना हरमनप्रीत कौर खाली वाकून नमस्कार करत होती. काय सुंदर जेश्चर होतं ते.

अमृता प्रीतम यांच्या शब्दात सांगायचं झालं तर…

माँओं की चेहरे की जगमगाहट,

बहनों की चुडियों की खनखनाहट,

प्रेयसी के दुपट्टे की सरसराहट

और समय की आहट

सभी जगह एक जैसी होती हैं…

लीन होऊयात.. नतमस्तक होऊयात…


लेखिका : वसुंधरा काशीकर

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लीलावती…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लीलावती…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

 – –भास्कराचार्यांची गणिताची काव्यमय सुरमाला 

१. प्रास्ताविक

भारतीय ज्ञानपरंपरेत असंख्य ग्रंथ आढळतात; परंतु रुक्ष वाटणाऱ्या गणितालाच काव्याचा शृंगार करणारा, संख्या-चिन्हांना नृत्य करविणारा, आणि कठीण संकल्पनांना गोड गीतामध्ये परिवर्तित करणारा ग्रंथ म्हणजे भास्कराचार्यांची ‘लीलावती’!

‘लीलावती’ भास्कराचार्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या नावाने रचलेला ग्रंथ आहे. पतीचे अकाली निधन झाल्यावर मुलगी पितृगृहात परत आली आणि भास्कराचार्यांनी तिला गणित शिकविण्याचा संकल्प केला. त्या शिक्षणाचीच ही रम्य, काव्यात्मक परिणिती— लीलावती!

२. भास्कराचार्य— व्यक्तिमत्त्वाचा परिचय

भास्कराचार्य (द्वितीय) हे मध्ययुगातील महान भारतीय गणितज्ञ व खगोलवेत्ते. त्यांचे वडील महेश्वरभट्ट हेही गणित व ज्योतिषाचे विद्वान आणि तेच भास्कराचार्यांचे गुरु.

जन्म : शके १०३६ (इ. स. १११४)

जन्मस्थान : सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले विज्जलविड

गोत्र : शांडिल्य

प्रमुख कृती : वयाच्या ३६व्या वर्षी रचलेला अमर ग्रंथ सिद्धान्तशिरोमणी

या महाग्रंथातील पहिला विभाग म्हणजेच अंकगणिताचा अप्रतिम ग्रंथ— लीलावती!

३. भास्कराचार्यांची ग्रंथसंपदा

भास्कराचार्यांनी खालील महत्त्वाचे ग्रंथ लिहिले :

सिद्धान्तशिरोमणी

करणकुतूहल

सर्वतोभद्रयंत्र

वसिष्ठतुल्य

विवाहपटल

यांपैकी पहिले दोन उपलब्ध असून उर्वरित ग्रंथ कालोघात हरवले.

४. ‘लीलावती’चा विषय

इ. स. ११५० च्या सुमारास रचलेल्या सिद्धान्तशिरोमणीचे चार विभाग :

१. लीलावती (अंकगणित)

२. बीजगणित

३. गणिताध्याय

४. गोलाध्याय

लीलावती अनेक शतके भारतातील अंकगणिताचे “पाठ्यपुस्तक” मानले जात होते.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य

हसत-खेळत गणित शिकविणारी शैली

सूत्र + उदाहरण + कोडे अशी रंजक मांडणी

अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, व्याज, प्रमाण, शेषमापन, दैनंदिन व्यवहारातील गणित याचे सुंदर विवेचन

ग्रंथात एकूण २७८ श्लोक असून ब्रह्मस्फुट, गणित-पाश यांसारखी अध्यायरचना आहे.

भास्कराचार्यांचे काही कार्यविशेष

परार्ध (१०¹⁷) पर्यंतच्या संख्यांची नावे

पायथागोरस सिद्धान्ताची संक्षिप्त सिद्धता

डायोफँटाइन समीकरणांना “कुट्टक” हे नाव

पेल्स समीकरणासाठी “चक्रवाल” पद्धत

π (पाय)चे स्थूल व सूक्ष्म मूल्य

‘फर्माचे समीकरण’ १७६९ मध्ये लॅग्रांजनं सोडवलं, परंतु भास्कराचार्यांनी त्याचे उत्तर १२व्या शतकातच मिळवले होते!

५. लीलावतीची काव्यमय भाषाशैली

ग्रंथाची भाषा संस्कृत असली तरी कठीण नाही— उलट लालित्यपूर्ण, संवादप्रधान आणि अलंकारिक आहे. निसर्गचित्रण, उपमा, प्राणी-पक्ष्यांची रूपके, भावपूर्ण संबोधने अशा मोहक शैलीतून गणित जणू बोलू लागते.

उदाहरण (भावानुवाद):

“मृदुहासिनी लीलावति

कम्पितभ्रूभङ्गे विचिन्तय।”

अर्थ : हे कोमल हास्यवती लीलावती, हा प्रश्न नीट विचार करून सोडव.

६. काही सुंदर गणिती कोडी

(अ) मधमाशांचे रूपक — गुणाकार

संस्कृत (भावानुवादी):

“परागसिक्तपङ्कजे भ्रमराणां यथा क्रमवृद्धिः,

तथैव संख्यानां गुणनं प्राज्ञैः परीक्ष्यते।”

अर्थ : कमळावर जशी मधमाशांची संख्या वाढत जाते, तसेच संख्यांचे गुणाकारही क्रमाने वाढतात.

(आ) पाण्याचा घडा — दर व वेळ

“सूक्ष्मछिद्रेण वहति तोयं,

पुनर्भरणं क्षणैः।

एतयोः वेगयोराश्रित्य

निश्चितव्यः कालः।”

अर्थ : छिद्रातून पाणी खाली पडते आणि वरून पुन्हा भरते. दोन्ही वेगांवरून घडा किती वेळात भरतो किंवा रिकामा होतो हे शोधायचे.

(इ) व्यापाऱ्याचे द्रव्य — क्रमवार वजाबाकी

“अर्धस्य तृतीयांशं दत्त्वा,

शिष्टे चतुर्थभागव्ययः।

अन्ते यत् अवशिष्टं स्यात्,

तत् मूलधनं ज्ञेयम्।”

अर्थ : व्यापाऱ्याने अर्ध्याचा तृतीयांश दान दिला, उरल्यावरून पाव भाग खर्च केला. अंतिम शिल्लक माहीत असल्यास मूलधन शोधायचे.

(ई) फुलपाखरांचे गट — शेषमापन

“त्रिभिः, चतुर्भिः, पञ्चभिः

विभक्तेऽपि शेषोऽस्ति।

तां संख्यां चिन्तयेत्

बुद्धिमान्।”

अर्थ : ३, ४ किंवा ५ ने भागले तरी काही शिल्लक उरणारी संख्या शोधायची.

(ए) नौका व नदी — सापेक्ष वेग

“स्रोतोवेगेन सह याते

नौकायाः लघुः कालः।

प्रतिस्रोते तु दीर्घः—

नद्याः वेगः गणनीयः।”

अर्थ : नदीच्या दिशेने जाताना वेळ कमी आणि उलट दिशेने जास्त लागतो. या फरकावरून नदीचा वेग शोधायचा.

७. लीलावतीचे अलौकित्व

काव्य आणि गणित यांचा अनुपमेय संगम

अवघड सिद्धांतही सुंदर रूपकांत

१२व्या शतकातच व्याज, शेषमापन, संयोजन यांसारखे “अत्याधुनिक” विचार

कोडी, संवाद, निसर्गचित्रण यातून शिक्षणाला आनंदाची जोड

आजही जगभरातील संशोधक लीलावतीचे उदाहरण देतात

८. ग्रंथाची लोकप्रियता व टीकासाहित्य

लीलावतीची अनेक भाषांत भाषांतरे झाली आणि विद्वानांनी त्यावर टीकाग्रंथ लिहिले आहेत. त्यातील विशेष उल्लेखनीय टीकाग्रंथ —

गणितामृतसागरी — गंगाधर

बुद्धिविलासिनी — गणेश दैवज्ञ

लीलावती-भूषण — धनेश्वर दैवज्ञ

लीलावती-विवृत्ती — मुनीश्वर

९. समारोप

लीलावती म्हणजे केवळ गणिताचा धडा नाही; ती एक मायानगरी आहे, जिथे संख्या बोलतात, प्रश्न फुलपाखरांसारखे उडतात, वेग पाण्याच्या धारेतून झिरपतो, आणि संख्यांचे गुह्य काव्यातून उलगडत जाते. गणिताची ही काव्यरम्य गाथा आजही तितकीच मोहक आणि प्रेरणादायी आहे!

🙏🏽🙏🏽🙏🏽

(टीप : लेखात दिलेली संस्कृतपदे ही मूळ श्लोक नसून मूळ अर्थ, छंद आणि शैली जपत केलेल्या भावानुवादी पुनर्रचना आहेत, याची नम्र नोंद घ्यावी.)

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३५  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।।

तत्तु विषयत्यागात्संगत्यागाच्च ॥३५॥

अर्थ : भगवंताला प्राप्त करायचे जे मार्ग आहेत, त्यांचे आचरण करताना काही नियम पाळले पाहिजेत. विषय आणि संग यांचा त्याग करता आला पाहिजे.

विवेचन : अध्यात्ममार्गात, भक्तीपंथात प्रगती साधण्यासाठी मुमुक्षाला आपले मन, तन, चित्त शुद्ध करणे अनिवार्य ठरते. मन शुद्ध केल्याशिवाय साधकाची अध्यात्मातील प्रगती होऊच शकत नाही. साधकाचा ‘मन ते अमन’ असा प्रवास असतो. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो.

*नाही निर्मळ जीवन । काय करील साबण॥ १ ॥ तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥२॥ वृक्ष न धरी पुष्पफळ। काय करील वसंत काळ ॥ ३ ॥ वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥ तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥*

ज्याला परमेश्वराची प्राप्ती करवून घ्यायची आहे त्याने अनेक पथ्ये पाळण्याची गरज असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, *”जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणें पथ्ये सांभाळावी”*. अर्थात हा नियम दैनंदिन व्यवहारात देखील पाळावा लागतो. ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, तेथील नियम आणि अटी मनुष्याला कधी नाईलाजाने तर कधी आवडीने पाळाव्याच लागतात आणि इथे तर साक्षात भगवंताची चाकरी आहे तर मग नियम अधिक कठोर असणार आणि लबाडी चालणे शक्यच नाही. सर्व संत असे सांगतात की देव कुठे बाहेर भेटत नाही तर तो आपल्या अंतरंगात असतोच, फक्त मन आणि शरीर शुद्ध झाले की तो प्रगट होतो, साधकाला त्याची प्रचिती येत असते.

आपण कुठे बाहेरगावी फिरावयास गेलो तर आपल्या आवडीचे आणि खिशाला परवडेल असे राहण्याचे ठिकाण शोधतो. इथे तर साक्षात भगवंत राहायला येणार असेल (अंतरंगात प्रकट होणार! ) तर आपले शरीर आणि मन त्याला आवडेल असे ठेवायला नको का? समजा तसे ते नसेल तर तो एखादवेळेस येईल पण कायम राहील याची शाश्वती कोण देणार? म्हणून साधकाने आपले आचार, विचार आणि आहार अतिशय शुद्ध ठेवायला हवा. शरीर शुद्ध राहण्यासाठी साधकाने योग्य तितका व्यायाम नियमितपणे करावा तसेच सात्विक आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा, तसेच चवीला तीव्र नसावा. पोट भरेल आणि सुस्ती येणार नाही याची काळजी साधकाने जरूर घ्यावी. *वाढत्या वयाबरोबर जिभेची चव आणि पोटाची भूक कमी व्हावी तसेच जिभेलाही थोडा आराम द्यावा. पचनसंस्थेस आराम मिळावा म्हणून साधकाने महिन्यातून किमान दोनदा किंवा जास्तीतजास्त चार दिवस उपवास करावा* (निराहार राहावे). *”एकादशी आणि दुप्पट खाशी”* असे होऊ नये. अतिउपवास केल्यामुळे नैसर्गिक भूक मरते आणि शरीरात विकृती निर्माण होतात, असे पू. बाबा आपल्याला सांगतात. आहारावर नियंत्रण आले की झोपेवर नियंत्रण मिळविणे सोपे होते.

*”ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला”* असे म्हणतात ते याचसाठी.

संग म्हणजे मिठी मारणे. साधकाने कोणाला मिठी मारावी अथवा मिठीत घ्यावे याचे नियम आहेत. (मिठी या शब्दाचा अर्थ संगत असा आहे) सर्व संत सांगतात की सत्संग करावा. अर्थात सत् म्हणजे चांगल्या गोष्टींचा संग. इथे चांगल्या म्हणजे ज्या देवाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा संग. देहाकडे नेणाऱ्या गोष्टींचा संग त्यागण्यास सांगितले आहे.

दुधात किंचित मीठ पडले तरी पिंप भरून असलेले दूध नासते, पण त्यात किंचित साखर पडली तर ते दूध नासत नाही तर त्याची गोडी साखरेच्या प्रमाणात वाढते आणि त्यापासून अधिकाधिक रुचकर अशी मिठाई तयार होऊ शकते.

सर्व संत सांगतात की मनुष्याला भव रोग झाला आहे. आणि हा रोग सर्वांना झाल्याने त्या रोगाचे नाव रोगांच्या पुस्तकातून काढून टाकले गेले आहे. भवरोग दूर करण्याचे प्रभावी औषध एकच आहे, ते म्हणजे भक्तीमार्ग. आपण भक्तिमार्गापासून दूर जाणार नाही यासाठी जे काही करावे लागेल ते साधकाने करावे असे नारद मुनी या सूत्रातून सांगत आहेत.

विषयत्यागाने भक्ती का भक्तीने विषयत्याग? भक्ती करिता विषयत्याग हे साधन व विषय त्यागाकरिता भक्ती हे साधन मानले तर अन्योन्याश्रय दोष येतो. याचे थोडक्यात उत्तर हे की, नारदांनी सांगितल्याप्रमाणे प्रथमतः विवेकाने विषयत्याग व संगत्याग हळूहळू करण्याचा प्रयत्न करावा. हा करीत करीत भगवद्‌भक्तीकडे मन वळवीत जावे. ते जसे जसे वळेल व ती गोडी लागेल तसा तसा सवासना विषयत्याग पूर्णरूपाने होईल. हेच सांगण्याकरिता पुढील छत्तिसाव्या सूत्राची रचना केली आहे. विषयत्यागास विवेक-वैरागादि साधने सांगितली आहेत. पण तीही कठीणच आहेत. त्यातही अनेक विघ्ने येत असतातच. ज्यांना ते शक्य आहे असे वाटते त्यानी आत्मविश्वासपूर्वक त्या साधनाचा अवलंब करावा पण ज्यांना अशक्य किंवा कठीण वाटेल त्यांच्याकरिता भक्तिसाधनाचा मार्ग बंद नाही. याकरिता पुढील सूत्रात आणखी एक महत्त्वाचे साधन सांगितले आहे.

माझी सध्याची स्थिती खालील प्रमाणे आहे. ती नित्य तशीच रहावी असा आशीर्वाद आपल्या सारख्या रामस्वरूप वाचकांनी मला द्यावा अशी नम्र विनंती करतो.

*” संतांची उच्छिष्टें। बोलतों उत्तरे।*

*काय म्यां पामरें। जाणावें हें।।”*

– *संत तुकाराम महाराज*

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूला चारवेळा हुलकावणी दिलेला वायुसूत वैमानिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूला चारवेळा हुलकावणी दिलेला वायुसूत वैमानिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

शाळेतील इतर मुलांप्रमाणे हा मुलगाही कागदी विमाने तयार करून उडवत असावा, पण याचे कागदी विमान मात्र निश्चित योग्य पद्धतीने सुरक्षित जमिनीवर उतरत असावे, हे मात्र निश्चित. आभाळातून प्रचंड वेगाने जाणारी लढाऊ विमाने आणि अधिक उंचीवरून उडत जाणारी प्रवासी विमाने यांत त्याला लढाऊ विमानांचे आकर्षण जास्त वाटे. त्यामुळेच घरची परिस्थिती फारशी सकारात्मक नसताना, पालकांचा विरोध असतानाही हा तरुण प्रचंड अभ्यास,अदम्य आत्मविश्वास या जोरावर १९६१ मध्ये एन. डी. ए. खडकवासला येथे प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला.

दिलीप कमलाकर पारूळकर १९६३ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले. १९६२ चे भारत-चीन युद्ध संपुष्टात आलेले होते. भारतीय सेनेचे मनोबल तसे काहीसे खालावलेले होते. अशात पाकिस्तानने १९६५ मध्ये आगळीक केली आणि यात भारतीय सेनेला आपल्या तलवारी पुन्हा एकदा परजायची संधी मिळाली!

आपले कथानायक अशा संधीची वाटच पहात होते… त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करायला निघालेल्या तुकडीत स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारली. हल्ला सुरु झाला… लक्ष्य वेधले जाऊ लागले. पाकिस्तानाला अमेरिकेने विकलेल्या पॅटन रणगाड्यांवर विमान विरोधी तोफा बसवलेल्या होत्या. या तोफेने पारुळेकर साहेबांच्या विमानाचा खालून अचूक वेध घेतला… एक गोळी कॉकपिटमध्ये शिरली आणि साहेबांच्या उजव्या खांद्यातून आरपार वर निघून गेली. साहेबांनी त्यांच्या खुर्चीवर डोके टेकवलेले नसल्याने त्यांचे डोके बचावले.. पण खांद्यातून प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. हातात ताकद राहिली नसल्याने त्यांना विमानावर नियंत्रण करणे अवघड झाले होते… त्यामुळे त्यांना युद्धक्षेत्रात टिकून राहणे अशक्य झाले. हल्ल्याचे नेतृत्व करणा-या अधिका-याने आपल्या या वैमानिकाला आदेश दिला… विमानातून बाहेर पडा! पण या बहादराने आदेशाकडे काणाडोळा केला… आणि एका हाताने विमानावर नियंत्रण राखीत भारतीय विमानतळावर हे विमान सुरक्षितरीत्या उतरवण्यात यश मिळवले… एक महागडे विमान आणि एक अमूल्य वैमानिक या कृतीमुळे बचावले गेले! या कामगिरीबद्दल भारतीय वायुसेनेने पारुळेकर साहेबांना वायू सेना मेडल देऊन सन्मानित केले!

विमानातून उडी न घेता विमान उडवत नेऊन भारतीय तळावर नेण्याचा त्यांचा हा निर्णय प्रमुखाची आज्ञा भंग करणारा होता खरा… परंतु तो आदेश त्यांनी पाळला असता तर वैमानिकाच्या आसनामध्ये बसवण्यात आलेली छत्री उघडलीच गेली नसती… चारशे किलोमीटर्स प्रती तास या वेगाने पारूळकर साहेब जमिनीकडे कोसळले असते… कारण पाकिस्तानी गोळीबारात त्यांच्या कॉकपिट मध्ये शिरलेली गोळी, त्यांच्या खांद्यातून विमानात वैमानिकाच्या खुर्चीच्या वरच्या भागात असलेल्या छत्रीचा खटका नादुरुस्त करून वर निघून गेली होती… खुर्ची हवेत उडाली असती पण या खुर्चीला जोडलेली हवाई छत्री उघडली गेलीच नसती!

पारूळकर साहेबांनी मृत्यूला दिलेली ही पहिली हुलकावणी ठरली… कुशल लढाऊ वैमानिकाच्या अंगी हा हुलकावणी देण्याचा गुण असावा लागतोच.

२ मे,१९७०. फ्लाईट लेफ्टनंट पारुळेकर साहेब सुखोई ७ विमान उडवत होते… त्यांना शिमला येथे जायचे होते… पण विमानाच्या इंजिनाने दगा दिला… साहेबांना विमानातून उडी घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

१० डिसेंबर,१९७१. भारत-पाकिस्तान बांगलादेश मुक्तीसंग्राम युद्ध. भारतीय विमाने पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खोलवर घुसली होती… जोरदार हल्ला सुरु असताना नेमके पारुळेकर साहेबांचे सुखोई ७ विमान पाकिस्तानी विमानविरोधी तोफांच्या तुफान हल्ल्यामध्ये सापडले… सुदैवाने विमान जास्त उंचीवर असल्याने साहेबांना विमानातून अचूक उडी घेता आली… पण ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती सापडले आणि युद्धकैदी झाले! भारताने युद्ध जिंकल्यावर एकमेकांच्या युद्धबंदी सैनिकांची पाठवणी करण्याचे सत्र सुरु झाले. परंतु पाकिस्तानी कैदेत असलेल्या भारतीय वैमानिकांची सुटका होण्यात विलंब लागू लागला. १९६९ मध्ये त्यांचे कमांडिंग ऑफिसर एम. एस. बावा यांना “मी शत्रूच्या तावडीत सापडलो तरी तिथून पळून येईन” असे सांगितलेल्या पारुळेकर साहेबांना असे कैदेत जास्त दिवस राहणे,शक्य झाले नाही. त्यांनी तेथील बंदिगृहात मिळतील त्या साधनांनी,अतिशय उत्तम योजना आखून आणखी दोन वैमानिकांसह बंदिगृहातून पलायन केले. परंतु हे पलायन अगदी ऐनवेळी अयशस्वी झाले. अफगाणिस्तान हद्दीच्या अगदी समीप असताना हे तिघे पाकिस्तानला सापडले आणि त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली! त्यांनी योजना आखताना पाकिस्तानचा त्या भागातील नकाशा तयार केला होता. त्यात एक रेल्वे स्टेशन आहे, अशी त्यांची माहिती होती. त्या रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे, आणि तेथून अफगाणिस्तानात शिरायचे,असे ठरले होते. परंतु हे रेल्वे स्टेशन खूप वर्षांपूर्वीच बंद करण्यात आलेले होते… आणि हे तिघे याच रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारत होते… त्यामुळे गडबड झाली.. सुटका केवळ चार मैलांवर असताना हे तीन गरुड पुन्हा कैदेत गेले! या तिघांना गोळ्या घालून ठार करावे, असा आदेश पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी दिला होता… हे तिघे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्यांना गोळ्या घातल्या… अशी बतावणी करता येईल, अशी त्यांची अटकळ होती. पण तत्कालीन पाकिस्तानी वायुसेना प्रमुखाने त्यांना पुढे होऊ शकणा-या परिणामांची जाणीव करून दिल्याने तो प्रकार टाळला गेला,असे समजते… पण पुढे काही दिवसांनी पारुळेकर साहेब आणि त्यांच्या अन्य सहका-यांची भारतात सुखरूप पाठवणी झाली… पण त्यांचे १ डिसेंबर,१९७२ रोजी वाघा सीमेवर फार जल्लोषात स्वागत करण्यात आले होते! या जगप्रसिद्ध पलायनाविषयी फेथ जॉनस्टन यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे… फोर माईल्स टू फ्रीडम! या धाडसी कामगिरीवर एक चित्रपटही निर्माण करण्यात आला… दि ग्रेट इंडियन एस्केप.. यातले नायक आहेत.. तिघेही त्यावेळचे फ्लाईट लेफ्टनंट दिलीप पारुळकर,एम. एस. ग्रेवाल उर्फ गॅरी, हरीश सिंग उर्फ हॅरी. ही कथा तरणजीतसिंग नामधारी यांनी दिग्दर्शित केली होती.

२४ जानेवारी,१९७५. स्क्वाड्रन लीडर दिलीप पारुळेकर साहेब यावेळीही सुखोई ७ उडवत होते… आज तिसरा अपघात होणार होता… तांत्रिक बिघाड झाला आणि सुखोई जमिनीकडे वेगाने जाऊ लागले.. साहेबांनी याहीवेळी अचूक उडी घेतली… सलग चौथ्या वेळी त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली होती!

पुढील कारकीर्दीत दिलीप पारूळेकर साहेबांनी भारतीय वायुसेनेत उल्लेखनीय कामगिरी केली. लढाऊ विमान प्रशिक्षक म्हणून त्यांचे काम अतिशय प्रभावी होते. सिंगापूरच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना दोन वर्षे प्रशिक्षण देण्यासाठी झालेली त्यांची निवड अत्यंत योग्य अशी ठरली. पुढे खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये त्यांनी दीर्घकाळ बटालियन कमांडर म्हणून भरीव कामगिरी बजावली. त्यांच्या एकूण देदीप्यमान कारकीर्दीचा गौरव म्हणून वायुसेनेने त्यांना विशिष्ट सेना मेडलने गौरवले.

ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर पारूळकर साहेबांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली नसती तर ते सहज एअर मार्शल पदावर पोहोचले असते. सेवानिवृत्तीनंतर साहेबांनी पर्यावरण संरक्षण आणि शेतीमध्ये लक्ष घातले. खेळ हा त्यांचा आवडीचा प्रांत होता,त्यासाठी ते नियमितपणे विम्बल्डनची वारी करीत. पुणे शहरात त्यांनी आपला अखेरचा कालावधी घालवला. तब्बल चार वेळा मृत्यूला चकवा दिलेल्या पारुळकर साहेबांना दहा ऑगस्ट,२०२५ रोजी त्यांच्या वयाच्या ८२ व्या गाठले! पण तोपर्यंत साहेब अतिशय अभिमानास्पद आयुष्य जगले! त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी भारतीय वायुसेनेने त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला! फेअर विंडस! असे नौदलात शुभेच्छा देण्याची पद्धत आहे… म्हणजे तुम्ही ज्या जहाज प्रवासाला निघाला आहात… त्या प्रवासात तुम्हांला वा-याची उत्तम साथ लाभो… पारुळकर साहेबांचे सारे आयुष्य वा-याशी स्पर्धा करण्यात गेले.. त्यांच्या स्वर्गापर्यंतच्या प्रवासात त्यांना ‘फेअर विंडस’ म्हणूयात!! …

भावपूर्ण आदरांजली! जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या आजच्या खऱ्या नायिका – लेखक – डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ या आजच्या खऱ्या नायिका – लेखक – डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

या दोन सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही ॲम्बुलन्स चालवतात… मृतदेह उचलतात, रात्री-अपरात्री अपघात झालेल्या रुग्णांना तातडीने दवाखान्यापर्यंत पोहचवतात! पिंपरी चिंचवड, पुणे-मुंबई हायवे परिसरात दिवसा-रात्री सायरन वाजवत कोणी स्त्री जर ॲम्बुलन्स चालवताना तुम्हाला दिसली असेल तरी ती या दोघींपैकी एक असेल!

कोविड नंतर काही कारणांनी यांचं कौटुंबिक आयुष्य बदललं आणि या दोघी बहिणींनी ॲम्बुलन्स चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्रीनं ॲम्बुलन्स चालवणं ही साधी गोष्ट नाही, त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना येणं खरंतर हीच मोठी क्रांतिकारी घटना आहे. हे काम करणं खरंतर पुरुषांची मक्तेदारी… आणि का असू नये? वेळी-अवेळी कधीही इमर्जन्सी येते, रुग्ण गंभीर असतात, रस्त्यावर कोण कसं असेल माहीत नाही, गुन्हेगार असतात, मदतीला कोणी आहे, नाही. हायवेवरील अपघात असेल, एखाद्या झोपडपट्टीच्या गल्लीतील इमर्जन्सी रुग्ण असेल किंवा कुठून एखादा फाशी घेतलेला मृतदेह घेऊन येणं असेल… कोणत्याही परिस्थितीत काम करावं लागतं. एका स्त्रीनं हे काम करणं किती अवघड असेल याची कल्पना करून बघा… इथं दोघी आहेत!

कुठूनतरी अचानक फोन येतो, ठिकाण सांगितलं जातं, ताबडतोब ॲम्बुलन्स काढली जाते आणि त्या ठिकाणी जाऊन रुग्णाला उचलून गाडीत टाकलं जातं. मदतीला कोणी व्यक्ती, पोलिस असेल तर ठीक, नाहीतर स्वतःच ते काम करायचं. गरज पडली तर ऑक्सिजन लावायचा, सीपीआर सुद्धा द्यायचा. अपघात झाल्यानंतर दवाखान्यात पोहचेपर्यंतचा जो ‘गोल्डन पिरेड’ असतो तो रुग्णाच्या जीवासाठी फार महत्त्वाचा असतो. या दोघी देवदूत बनून ते काम करतात. आजवर यांनी शेकडो रुग्ण मरणाच्या दारातून दवाखान्यापर्यंत पोचवलेले आहेत, लोक वाचवलेले आहेत.

माझ्या बाजूला ज्या ताई उभ्या आहेत त्यांचा एक अनुभव अगदी कमी शब्दात इथे देतोय. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एका ठिकाणी काहीतरी घडले आहे म्हणून त्यांना एक फोन आला आणि त्या ताई एकट्या तिथे पोहोचल्या. एका सुमसान ब्रिजखाली एक माणूस पडलेला होता, त्याचं अख्खं शरीर रक्तानं भरलं होतं. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की त्या माणसाने काचेची बॉटल स्वतःच्याच गळ्यामध्ये खूपसुन घेतली होती, तो अजूनही स्वतःला हानी पोहोचवत होता. अशावेळी एकटी स्त्री, समोर अशी गंभीर परिस्थिती… खरंतर त्यांनी तो कॉल घेतला नसता तरी चाललं असतं, यात त्यांचा काही आर्थिक फायदाही नव्हता पण त्याचा जीव गेला असता. त्या अवस्थेत यांनी त्याला एकटीनं उचलून ॲम्बुलन्समध्ये टाकलं. तो एक मनोरुग्ण होता हे गाडी सुरू केल्यानंतर त्यांना समजलं. तो रक्ताने माखलेला माणूस मागच्या सीटवर बसून मोठ्याने ओरडत होता… खरंतर आता यांच्याच जीवाला धोका होता! तरीही त्यांनी त्या माणसाला बाहेर न काढता अवघ्या काही मिनिटांत आमच्यासमोर आणलं… त्या माणसाला त्यांनी कसं आणलं हे त्यांनाच माहीत पण तो ‘माणूस वाचवला’!

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रेल्वे कटिंग! त्यांची ॲम्बुलन्स अपघात विभागासमोर लागली आणि त्या घाई गडबड न‌ करता चालत येताना दिसल्या की माझा पहिला प्रश्न असतो… रेल्वे कटिंग आणलंय का? आणि त्या ‘हो’ म्हणून मान हलवतात. बरेच लोक स्वतः रेल्वेमधून पडलेले असतात, काहींचा अपघात असतो, काहींना ढकलून दिलेलं असतं. अक्षरशः शरीराच्या चिंधड्या झालेल्या असतात! घटनास्थळावर जायचं, ज्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे तिथलं कोणीतरी मदतीला घ्यायचं, नसेल तर स्वतःच ते सगळे विखुरलेले भाग गोळा करून कपड्यात गुंडाळायचे आणि घेऊन यायचं. आपण कल्पनाही करू शकत नाही की प्रत्यक्षात तो कसा अनुभव असेल!

आयुष्यात काहीतरी परिस्थिती आली आणि त्यांनी हा मार्ग निवडला. या सगळ्या गोष्टीत त्यांच्या आर्थिक गोष्टीही असतील. कुटुंब सांभाळत हे काम करणं फार मोठी गोष्ट आहे. चित्रपटात आपण डॅशिंग काम करणाऱ्या नायिका बघतो… वास्तव जीवनातील या दोघी खऱ्या नायिका आहेत ज्यांनी आजवर असंख्य स्त्री-पुरुषांना वाचवलं, मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं.

खूप अनुभव आहेत सगळंच नाही लिहिता येणार. खऱ्या आयुष्यातील या योद्ध्या आहेत… आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना असंही कोणीतरी बाहेरच्या जगात आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून हा लिखाणाचा प्रयत्न. त्यांना म्हटलं तुमच्यावर एक लेख लिहायचा आहे, परवानगी द्या… आणि त्यानंतर हा सुंदर फोटो काढला.

गरजूंना ‘गोल्डन पिरेडमध्ये’ वाचवणाऱ्या अशा ‘गोल्डन स्त्रियांना’ अभिवादन 

 

लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ५  ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

ललित साहित्य एका भाषेतून दुसर्‍या भाषेत आणताना दोन भाषांच्या सांस्कृतिक संदर्भांची गल्लत होऊ शकते. भाषांतराचे दोन प्रकार असतात. मूलनिष्ठ भाषांतर किंवा छायानुवाद व लक्ष्यनिष्ठ भाषांतर किंवा भावानुवाद. पहिला प्रकार मूळ रचनेशी, मूळ भाषेच्या संस्कृतीशी, भाषिक वैशिष्ठ्यांशी एकनिष्ठ असतो तर लक्ष्यनिष्ठ भाषांतर किंवा भावानुवाद हा भाषांतराच्या भाषेशी, त्या भाषेच्या वैशिष्ठ्यांशी, सांस्कृतिक संदर्भांशी बांधिलकी जपणारा असतो. अर्थात मूळ साहित्यातील गाभा कोणत्याही प्रकारच्या भाषांतरात जसाच्या तसाच राहिला पाहिजे. प्रख्यात साहित्यिक श्री म माटे यांनी भाषांतराविषयी असं म्हटलय की, “एका कुपीतलं अत्तर दुसर्‍या कुपीत आलय की नाही हे महत्वाचं. दोन्ही बाटल्यांची काच सारख्याच वाणाची, आकाराची असली पाहिजे असा आग्रह धरण्यात कांही मतलब नाही. ”

स्वतः टागोरांनी त्यांच्या ‘The Gardener’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे की, भाषांतर म्हणजे केवळ शब्दाला शब्द देणे नाही तर काही वेळा मूळ रचनेतील शब्द बदलणे किंवा वाक्य रचना बदलणे सुद्धा आहे. मूळ काव्याचा गाभा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बदल करावे लागतात.

उदाहरणादाखल गीतांजली मधील एका कवितेचा उल्लेख करता येईल.

टागोरांनी गीतांजलीत ६५ व्या मूळ कवितेत

“What devine drink wouldst thou have my God, from this overflowing cup of my life? “

इथे अनुवाद करताना “देवा, तू कोणते दैवी पेय घेणार? … ” असं म्हणावं लागलं असतं. पण देवाला पेय देऊ करण्याची कल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे रचना कशी करावी, हा प्रश्न होता. त्या ओळीचा भावानुवाद मग असा केला.

“भरुनी वाहतो देवा,

सुखी जीवनाचा ठेवा 

तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून 

कोणता रस तुजला 

अर्पू मी, न कळे मला”

————–

गीत : १३

The song that I came to sing remains unsung to this day.

I have spent my days in stringing and in unstringing my instrument.

The time has not come true, the words have not been rightly set; only there is the agony of wishing in my heart.

The blossom has not opened; only the wind is sighing by.

I have not seen his face, nor have I listened to his voice; only I have heard his gentle footsteps from the road before my house.

The livelong day has passed in spreading his seat on the floor; but the lamp has not been lit and I cannot ask him into my house.

I live in the hope of meeting with him; but this meeting is not yet.

—————

भावानुवाद : गीत १३

*

गीत ना मी गाईले, येथ आलो ज्या गायना

दिस गेले, वर्षे सरली, तानपुरा लावताना

शब्द गीतातले न जुळती, वेळ ही नाही खरी

मनोरथांच्या अपूर्णतेची वेदना आहे उरी

बहर नाही उपवनी, मात्र वारा गुणगुणे

प्राशिली ना मुखप्रभा, ना स्पर्शिले ध्वनिचांदणे

पदरव त्याचे मृदुल, परि ऐकता मन नादवे

दर्शनाची ओढ हृदयी, अता प्रतिक्षा न साहवे

स्वागत त्याचे कराया, पायघड्या मी घातल्या

त्या पसरता, जीवनाच्या प्रदीर्घ घटिका संपल्या

दीप ना चेतविले, अंधार भवती दाटला

चाहूल त्याची असुनही, क्षण भेटीचा न पातला

अशा अवेळी, अशा तिमिरी, त्या न मी बोलाविते

अद्याप आशा तेवते परि, प्रकाशास आसाविते

————-

गीत : १४

My desires are many and my cry is pitiful, but ever didst thou save me by hard refusals; and this strong mercy has been wrought into my life through and through.

Day by day thou art making me worthy of the simple, great gifts that thou gavest to me unasked— this sky and the light, this body and the life and the mind — saving me from perils of overmuch desire.

There are times when I languidly linger and times when I awaken and hurry in search of my goal; but cruelly thou hidest thyself from before me.

 Day by day thou art making me worthy of thy full acceptance by refusing me ever and anon, saving me from perils of weak, uncertain desire.

—————-

भावानुवाद : गीत १४

*

अनंत आशा मनात धरितो

टाहो फोडून तुला विनवितो

जाणिसी तू ही असे मूढता

नाकारुनि मज रक्षी तत्वता

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥१॥

*

मोही जन्मते, जे सुख नश्वर

नच देउनि ते राखी ईश्वर

घेउनि जातो त्या मार्गावर

जेथे शाश्वत सुख निरंतर

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥२॥

*

नाकारुनि मज क्षण ते मोहाचे

आकारिसी मम घट जीवनाचे

होता मी मग अशा योग्यतेचा

की करिसी तू वर्षाव भेटींचा

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥३॥

*
न मागता मी, दिधलेस आकाश

त्या आकाशी भरिलास प्रकाश

देऊनि नरजन्म दाविले प्रमाण

फुंकिलेस त्या देही पंचप्राण

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥४॥

*
मोहमायेतून मज तू सोडवितो

मी सुस्तावतो, तुज पुनः शोधितो

ध्येयाप्रत जाण्या, कुठे न मिळसी, 

का आत्मशोधना मला सांगसी?

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥५॥

*

आशा न पुरवुनि, दडी मारुनि

देशी शिकवण या साऱ्यातुनि

मज मिळेल जर सुयोग्य आकार

करशील तेंव्हा माझा स्वीकार 

हे परमेशा, अखेर आकळले मला

तू सन्मार्ग दाविसी भला॥६॥

———–

गीत : १५

I am here to sing thee songs. In this Hall of thine I have a corner seat.

In thy world I have no work to do; my useless life can only break out in tunes without a purpose.

When the hour strikes for thy silent worship at dark temple of midnight, command me, my master, to stand before thee to sing.

When in the morning air the golden harp is tuned, honour me, commanding my presence.

——————-

भावानुवाद : गीत १५

*

तुझ्या मंदिरी नगण्य स्थानी

बसुनि गातो तुझीच गीते

ध्येय नसे, हे व्यर्थचि जीवन

अकारण, अनावर गातो गीते॥

*

मूकपूजना तुझ्याचसाठी, 

मध्यरात्रीचे टोले पडता, 

नीरव तिमिरी, तुज सामोरी

सांग मला तू गाण्या गीता॥

*

प्रभात काली वायु संगे

तव वीणेच्या सुरेल लहरी

साक्षीदार मज अद्भुत प्रहरी

करुनि माझे जीवन उद्धरी॥

– क्रमशः भाग पाचवा 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

३१ डिसेंबर…. प्रसिद्ध कवयित्री, गीतकार.. *वंदना विटणकर* यांचा स्मृती दिन!!

मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ‘वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू, बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली.

वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. महंमद रफी यांनी त्यांच्या भावगीतांचा केलेला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. “हा रुसवा सोड सखे’, “हा छंद जिवाला लावी पिसे’, “हे मना आज’ यासह वंदनाताईंची अनेक गाणी रफी यांनी गायली.

कृष्णा कल्ले यांनी गायिलेले “परी कथेतील राजकुमारा’, “नाते जुळले मनाचे’ (जयवंत कुलकर्णी) ही सतत आठवणीत राहणारी गाणी त्यांचीच आहेत.

“अगं पोरी संबाळ दर्याला’, “ऐ आई मला पावसात जावू दे’, “कुहू कुहू येई साद’, “चित्र जयाचे मनी रेखिले’, “आम्ही दोघे राजा राणी’, “पीर पीर पावसाची’, “उजळू स्मृती कशाला’, “स्वप्नामध्ये सत्य गवसले’, “नको आरती नको पुष्पमाला’, “नाते जुळले मनाचे’, अशी सुरेल शब्दरचना करणाऱ्या वंदनाताईंच्या गीतांना सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासह आघाडीच्या संगीतकारांनी संगीतसाज दिला होता. हेमंत कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांसह ख्यातनाम गायकांनी त्यांची भावगीते, भक्तीगीते गायिली आणि ती रसिकांत लोकप्रिय ठरली.

*रसिका मी कैंसें गाऊ गीत* या गाण्याचा किस्सा* 

चालीवर गीताची बांधणी करणं हा शब्द स्वरांचा खेळ आहे, शब्दांवर प्रेम आणि स्वरांशी मैत्री असली की गीत रचना करणं आनंददायी असत असं त्यांना वाटायच. फक्त त्या वेळी मनस्थिती उत्तम असली पाहिजे. अरुण पौडवाल यांनी सुंदर चाल बांधली होती. पण वंदना विटणकर यांच्या पतीच्या डोळ्याचे मोठे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती स्थिर नव्हत्या. अशा वेळी गाणं सुचणं खूप अवघड झालं होत.

दवाखान्याच्या खोलीत त्या विचार करत बसल्या होत्या. श्रोते शब्दांच्या आणि स्वरांच्या सौन्दर्याने धुंद होतात पण गाणे जन्म घेत असताना कवीची मानसिकता त्यांना कशी कळेल असं वाटत असतानाच अचानक त्यांना गाण्याच्या ओली सुचल्या

*रसिका मी कैसे गाऊ गीत*

*दाटून आले घन आसवांचे, *

*मिटलेल्या पापणीत*

आणि मग त्या भरलेल्या तंद्रीतच पुढची कडवी देखील लिहून झाली आणि एका नितांत सुंदर गाण्याचा जन्म झाला

तुटल्या मनाच्या हळुवार तारा

गेला सुरांचा जळुनी फुलोरा

नाचे प्रलय लयीत!

 

मैफल सुखाची झाली विराणी

उरे वेदनांची जखमी कहाणी

रडते स्वप्न व्यथीत!

दोन कडव्याचं गाणं आहे आणि ध्वनीमुद्रण न झालेले तिसरं कडवं देखील आहे

कशाला स्वरांची आरास आता

विझली अभागी अंगारगाथा

झाला जन्म पतीत!

स्वर : अनुराधा पौडवाल

संगीत : अनिल अरुण 

‘शुरा मी वंदिले’, ‘पारध’, ‘देवता’, ‘मर्दानी’, ‘चोराच्या मनात चांदणं’, ‘अर्धांगी’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘आम्ही दोघं राजाराणी’, ‘आई पाहिजे’, ‘मामला पोरींचा’, ‘राजानं वाजवला बाजा’, ‘सवाई हवालदार’, ‘महानदीच्या तीरावर’ आदी चित्रपटांसाठी वंदनाताईंनी गीतलेखन केलं होतं.

आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदाश्रमात रहात होत्या. वर्षाअखेरीला सकाळी चहा घेताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाजवळच्या दवाखान्यात नेले, पण त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना डॉ. डी. वाय. हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे नेत असतानाच दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांनी नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली होती. त्या प्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले; तर कळंबोलीतील एम. जी. एम रुग्णालयात देहदान करण्यात आले.

वंदना विटणकर यांना विनम्र अभिवादन!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वज्र प्रसवा मोती!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “वज्र प्रसवा मोती!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

वर्ष साधारण १९९५-९६. स्थळ काश्मीरमधील एक अतिरेकीग्रस्त गाव. या गावातल्या एका दुकानात काही अतिरेकी खरेदी करायला नियमित येतात… अशी पक्की खबर होती. यांत बहुतांश पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केलेले असतात, हेही निश्चित होतं. ते त्यावेळी मेजर पदावर होते. ९, पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्सेसमधून कमांडो प्रशिक्षण उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले सैन्याधिकारी होते.. त्यांनी कुणाच्याही नजरेस न पडता त्या दुकानाच्या छतावर मुक्काम हलवला… तब्बल ४८ तास… काहीही हालचाल न करता निपचित पडून राहिले… पण एक बोट हातातल्या एके-४७च्या ट्रिगरवर सज्ज होते. डोळ्यांनी झोपेची ओळख नाकारली होती. शरीराला कोणतेही धर्म आठवत नव्हते… एकोणपन्नासाव्या तासाला ते आले… तिघे होते… खांद्यांवर रायफल्स, कमरेला काडतुसं आणि गळ्यात हातगोळे. यांनी छतावरच्या फटीतून या तिघांनाही अचूक टिपले! आणि आपल्या खात्यात आणखी तीन बळी नोंदवले!

कश्मिरमध्ये येण्याआधी ते आसामात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त होते. जन्माने त्याच भागातला असल्याने ते स्थानिक नागरिकांत सहजी मिसळून जात. परिसरात अतिरेकी तर आहेत… त्यापैकी एक-दोघांची नांवेही माहीत आहेत… पण आपल्या सैनिकांना ते मिळून येत नाहीत.. यामुळे हे साहेब अत्यंत अस्वस्थ होते. कारण लक्षात आलं… इतर सैनिक, अधिकारी स्थानिक लोकांच्यात सहज वेगळे दिसून यायचे. हे तर स्थानिक. एके दिवशी स्वारी एकटीच बाहेर पडली… अतिरेक्यांच्या शोधात. अंगात बनियन, कमरेला आसामी गमछा, पायांत साधे धावायचे शूज आणि कमरेत लपवलेलं एक साधं पिस्टल! पण हो… मनात मुलखाचा नीडरपणा. कोणत्याही पूर्वोत्तर राज्यातील माणसासारखी उंची… पण घोटीव देहयष्टी.. अंग कातळासारखे मजबूत… टणक. जंगलाची वाट तुडवत असताना वाटेत एक मुलगा भेटला… त्याला विचारलं… अमुक अमुक कुठं आहे काही माहीत आहे का? तो मुलगा ‘हो’ म्हणताच यांनी त्याला चुचकारून सोबतीला घेतले… तीन-चार किलोमीटर्सवर तो मुलगा अचानक थांबला आणि झाडाआड लपला… म्हणाला… साहेब… पुढून जो चालत येतो आहे ना… तो अमुक अमुक आहे. तो बहाद्दर एकदम आरामात हातात रेडीओ घेऊन चालत येत होता. तो जवळ येताच साहेबांनी थेट त्याची मानगूट धरली. तो होता most wanted… पण त्याने साहेबांना खोटं नांव सांगितलं… साहेबांनी त्याच्या डोक्याला पिस्टल लावत त्याचं बखोटं धरून त्याला चालवत गावाच्या दिशेनं नेलं. वाटेत एक लहान मुलगा भेटला… त्याला विचारलं… या दादाचं नांव काय… त्या पोरानं याचं खरं नाव सांगितलं! मग मात्र साहेबांनी याला त्याच्याच कपड्यांनी एका झाडाला करकचून बांधून ठेवलं… कारण याच्यापेक्षा आणखी एका भयानक अतिरेक्याचा शोध घेणं बाकी होतं! साहेबांनी आधी भेटलेल्या आणि सोबत घेतलेल्या मुलाला सांगितलं… तू आमच्या कॅम्प पर्यंत पळत जा… आणि तिथंच थांब… मी आलोच!

साहेब पुढे चालत निघाले… दोन-तीन किलोमीटर्स… एका जागी काही झोपड्या… लोक शेतातला भात कापत आहेत.. त्यांचे जेवणही तिथे अंगणात शिजते आहे… साहेब त्या लोकांच्या सुमारे थोड्या अंतरावर पोहोचले… त्यातला पिवळ्या टी शर्ट वाला उठून उभा राहिला… कोण पाहिजे? त्याने विचारले… साहेबांनी ते स्वत: अतिरेकी असल्याचे सोंग घेतले… साहेब म्हणाले… आपल्या कमांडरने (म्हणजे अतिरेक्यांच्या म्होरक्याने) मला तुझ्याकडे पाठवलं आहे… एक निरोप आहे तातडीचा… एवढं बोलता बोलता साहेब पुढं पुढं पावलं टाकत होते.. त्या अतिरेक्याला संशय आलाच… त्याने त्याच्या कमरेचं पिस्टल काढून साहेबांच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरुवात केली… साहेबांनीही त्याला गोळीनेच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली… पण दोघांचाही नेम त्या गोंधळात चुकला… तो अतिरेकी मागे वळून पळत सुटला… त्याचं पिस्टल बहुदा कुठं तरी पडलं असावं… साहेबांनी त्याचा पाच-सहा किलोमीटर्स पाठलाग केला.. त्याला जिवंत पकडायची संधी साधायची होती! शेवटी एके ठिकाणी त्याच्यावर साहेबांनी झडप घातली… त्याला व्यवस्थित फटकावला… इतका की तो अर्धमेला झाला! त्या बाजूने एक बिचारा खेडूत सायकलवरून येत होता… साहेबांनी त्याची सायकल उसनी मागितली… आणि या अतिरेक्याला सायकलवर पुढच्या नळीवर बसवून कॅम्प पर्यंत आणला! झाडाला बांधून ठेवलेल्या अतिरेक्याला इतर सैनिकांनी मग पकडून आणले! या साहेबांचं नाव हेमंतो पॅंगिंग.. आताचे कर्नल हेमंतो पॅंगिंग (सेवानिवृत्त)

हेमंतो साहेबांच्या मातोश्रींचं नाव रीटा… म्हणजे मोती. मार्गारिटा वा मार्गारेट या नावाचं संक्षिप्त रूप म्हणजे रीटा. मोती नाजूक, देखणा आणि तसा मृदू. पण या मोत्यातून दोन वज्र अर्थात हिरे जन्माला यावेत, हा एक असाधारण दैवयोग. आणि हा योग भारताच्या दैवात असावा, हेही भाग्याचेच लक्षण! रीटा या पेशाने शिक्षिका. त्यांचा जन्म त्यावेळच्या N. E. F. A. (North-East Frontier Agency) अर्थात व्यापक आसाम राज्यात, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यावर्षी, १९४७ मध्ये झालेला असला तरी त्या पुढे अरुणाचल प्रदेशची लेक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. अरुणाचल म्हणजे अरुण=सूर्य, अचल=पर्वत. उगवत्या सूर्याचा प्रदेश. त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आज अभिमानाने विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे पती बन्सीराम पावो पॅंगिंग हे मूळचे शिक्षणतज्ज्ञ आणि बँक अधिकारी. पुढे ते स्पेशल सर्विसेस ब्युरो (आताचे सशस्त्र सीमा बल) मध्ये सर्कल ऑफिसर आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावाजले गेले. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट, नामसिंग सारख्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या या दांपत्याने त्यांच्या चारही मुलांना मोठी स्वप्नं पहायला उद्युक्त केलं. ही चारही अपत्ये शिस्तबद्ध आणि अभ्यास, खेळांत अत्यंत उजवी निपजली.

थोरले चिरंजीव मोहंतो यांनी प्रचंड मेहनत घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (N. D. A.) प्रवेश मिळवला व भारतीय वायूसेनेत विविध विमाने उडवू शकणारे, प्रशिक्षण देऊ शकणारे लढाऊ वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला. पुढे ते ग्रुप कॅप्टन पदापर्यंत पोहोचले. सुखोई-एम. के. आय. विमानांच्या स्क्वाड्रनचे कमांडर बनणारे पूर्वोत्तर राज्यातील ते पहिलेच वैमानिक ठरले. लढाऊ विमाने उडवण्याचा ३३०० तासांचा अनुभव असलेले आणि वायूसेना मेडलने सन्मानित मोहंतो साहेबांचे कर्तृत्व अभिमानास्पद आहे. ते सेवानिवृत्तीनंतर स्थानिक जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या कार्यात मग्न असतात.

भारतवासीयांच्या शारीरिक ठेवणीत वैविध्य आहे. मात्र अज्ञानी सामान्य जनता पूर्वोत्तर राज्यांतील भारतीय नागरीकांना सरसकट नेपाळी किंवा चिनी म्हणून मोकळी होते… हे अत्यंत दुर्दैवी! या आपल्याच राज्यांतील नागरीकांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केल्याचा इतिहास आहे. विस्तारवादी चीन या प्रदेशांचा लचका तोडण्याचा सतत प्रयत्न करीत असतो… ही बाब जगजाहीर आहे. भारतीय सैन्यात इथल्या शूरांनी अफाट पराक्रम गाजवलेला आहेच… लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिटा साहेब(निवृत्त), लेफ्टनंट जनरल डॉ. कोन्सम हिमालय सिंग (निवृत्त), कारगिल युद्धातल्या असाधारण पराक्रमासाठी मरणोत्तर महावीर चक्र विजेते कॅप्टन केंगृसे, चीन विरोधातल्या युद्धात महाप्रचंड पराक्रम गाजवून मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त केलेले रायफलमन जसवंतसिंग रावत ही काही नांवे आहेत जी लष्करात अत्यंत आदराने घेतली जातात. आसाम रेजिमेंट शौर्यासाठी प्रसिद्ध आहेच.. त्यांचा ‘तगडा रहो’… नारा पूर्वोत्तर राज्यांतील सैनिकांचे मनोबल दर्शवत असतो…थोडक्यात हे आपले रक्षक आहेत!आपले कथानायक श्री. हेमंतो पॅंगिंग यांनी बंधू मोहंतो यांच्या पावलावर पाऊल टाकीत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवला. युद्ध कौशल्य, नेतृत्व कौशल्य, विविध खेळ, शस्त्रे चालवणे इत्यादी कामांत त्यांनी आपला अमीट ठसा उमटवून दाखवला. त्यांचे नाव सर्वच सैनिक मोठ्या आदराने घेताना दिसतात. काश्मीर मध्ये हेमंतो साहेबांनी अतिरेक्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली होती! सहकारी त्यांना एका विशिष्ट अर्थाने ‘चेंगीज खान’ असे संबोधत असत… कारण देशाच्या शत्रूंना हेमंतो साहेबांनी अजिबात दया दाखवली नाही. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत… अतिरेक्यांना आपण घाबरायला नको… उलट त्यांनी आपल्याला घाबरायला हवे… असा त्यांचा खाक्या होता… आणि त्यांनी तो जगून दाखवला आहे! लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी काश्मिरात घडवून आणलेल्या नरसंहाराचा प्रतिशोध त्यांनी त्यावेळी सीमापार घुसून सुमारे २० अतिरेक्यांना यमसदनी पाठवून घेतला होता. ९, पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्स कमांडो म्हणून कर्नल दीब्रेटो, मेजर सुधीर वालिया अशा अनेक श्रेष्ठ लष्करी अधिका-यांसोबत खांद्याला खांदा लावून लढताना हेमंतो साहेबांनी कित्येक अतिरेक्यांचा खात्मा केला.. ऑपरेशन रक्षकमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली! सेना मेडल, सेना मेडल+बार असे सन्मान त्यांनी प्राप्त केले. त्यांचे दुसरे बंधू जयंतो हे GAIL (गॅस ऑथोरीटी ऑफ इंडिया लिमिटेड) मध्ये उच्च पदस्थ आहेत, तर दिवंगत भगिनी गीता या न्यायाधीश होत्या!

“Monks & Warriors” नावाचा podcast शौर्य चक्र विजेते कर्नल कौशल कश्यप (निवृत्त) आणि सेना मेडल विजेते लेफ्टनंट कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) हे दोन माजी लष्करी अधिकारी चालवतात… त्यांचे आभार मानायला शब्द नाहीत! भारतीय सेनेतील शूरांचा अतिशय अचूक परिचय ते करून देत असतात… सर्वांनी हा podcast आवर्जून पहावा. याच “Monks & Warriors” च्या माध्यमातून कर्नल हेमंतो साहेबांची कहाणी ऐकायला मिळाली. कर्नल साहेबांचे शौर्य तर वादातीत आहेच… पण त्यांच्या आई-वडिलांचे श्रेय मोठे आहे… हे नि:संशय.

रीटा अर्थात मोती नाव धारण करून हि-यासारख्या, वज्रासारख्या पुत्रांना जन्म देणा-या वीरमाता कै. रीटा पावो पॅंगिंग, वीरपिता कै. बन्सीराम पावो पॅंगिंग यांना सादर वंदन. हेमंतो साहेबांना कडक सल्यूट! जय हिंद.. जय भारत!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : श्री शिशिर मिश्रा ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : श्री शिशिर मिश्रा ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मी नऊ वर्षांचा होतो! आम्ही त्या सुमारास, मुंबईत कुलाब्याला नौदलाच्या कॅन्टोन्मेंट वसाहतीत राहत होतो. त्या वसाहतीला लागून, युनायटेड सर्व्हिसेस क्लबचे, अरबी समुद्राला लागून, विस्तीर्ण असे गोल्फचे मैदान होते. अनेकदा, तिथे टाटा, गोल्फ खेळताना, आम्हा मुलांना दिसायचे. एका रविवारच्या प्रसन्न सकाळी, मला स्पष्ट आठवते, आम्ही मुले आमच्या सायकली दमटवत असताना, टाटा, गोल्फच्या मैदानावर ‘tee off’ च्या तयारीत होते. अगदी त्याच वेळी, तिकडून एक तरुण नाविक अधिकारी चालला होता. आम्हाला थांबवत आणि टाटांकडे अंगुलिनिर्देश करीत, आम्हाला सांगू लागला…

“मुलांनो! त्यांना नीट बघून घ्या! लोक आयुष्यात बक्कळ धन कमवतात, पण त्यांच्या इतका मान खूप कमीजणांना मिळतो. “

पंधरा वर्षांनंतरचा काळ… बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ह्या कंपनीत मी नुकताच कन्सल्टंट म्हणून रुजू झालो होता. टाटा मोटर्स बाजारात, एक नवीन ट्रकचे मॉडेल आणणार होते, त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आमचा ग्रुप, टाटा मोटर्ससाठी वेगवेगळी माहिती संग्रहित करीत होता. त्या निमित्ताने, मी बरेच वेळा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तर पूर्व भारतात, खूपदा दुर्गम भागात, जेथे ट्रकड्रायव्हर विश्रांतीसाठी थांबत, त्यांना गाठत असे. त्यांच्याशी दोस्ती करून, त्यांच्या बरोबर जेवता जेवता, प्रसंगी एक दोन पेग घेत, मला हवी अ

टाटा नावाचा ब्रँड – –

सलेली माहिती काढून घेत असे. अशा, जवळ जवळ ५०० ड्रायव्हर्सना मी त्यावेळी भेटलो होतो!

… अशाच एका उत्साहवर्धक बैठकीत, मी एका ज्येष्ठ शीख ड्रायव्हरला मुद्दाम प्रश्न केला (भारतात, शीख संप्रदाय, ट्रक व्यवसायात अग्रेसर आहे.)

“पापाजी! राग मानू नका, पण इतर चांगले ट्रक, जसे भारत बेंझ, अशोक लेलँड, बाजारात आहेत, ते घसघशीत सवलती पण देत असतात, मग तुम्ही टाटांचे का बरे ट्रक पसंत करता? इतकी पसंती आणि ज्वाज्जल्य निष्ठा टाटा ब्रँडला? का बरे? “

… पापाजी शून्यात गेले. एका विसरु पाहणाऱ्या घटनेचे तरंग नकळत त्यांच्या डोळ्यात दिसू लागले आणि त्यांना धाप लागली… त्यांना आठवली ती एक १९८४ ची भयानक थंडी गोठवणारी रात्र, त्यांच्या भावाला, घराला आणि त्यांच्या ट्रकला अचानक भस्मसात करणारी… कौटुंबिक, न भरून येणारे दुःख तर आभाळगत होते, पण पाचजणांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर अवलंबून होता, तो त्यांचा ट्रक पण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. संपूर्णपणे खचलेले, पापाजी, ते शहर सोडून, पंजाबातील गावी परतण्याचा विचारात होते…

– – इतक्यात काही दिवसानंतर, दंगलीची धूळ खाली बसल्यानंतर, टाटा मोटर्सचा एक कर्मचारी, त्यांच्या घरी आला. त्यांच्या हातात नवीन ट्रकच्या चाव्यांचा जुडगा देऊन निघून गेला. एकही, कसलाही प्रश्न न विचारता!

… पापाजी आणि त्यांच्यासारखे खूप शीख ड्रायव्हर्स, शीखविरोधी दंगलीत, आपले ट्रक गमवून बसले होते, जी त्यांची रोजी रोटी होती. अशा असंख्य ड्रायव्हर्सना टाटा मोटर्सने शोधून निःशुल्क ट्रक वितरीत केले होते.

… ही घटना कुठेही छापून येणार नाही ह्याची संपूर्ण खबरदारी टाटा मोटर्सने त्या वेळी घेतली असताना देखील, अशा अभागी ट्रक ड्रायव्हरसच्या स्मृतिपटलावर आजही ती जणु कोरलेली आहे!

– – – वरील सर्व घटनाक्रम कथन करताना पापाजींचे डोळे पाणावले होते आणि उलगडले गेले ते, टाटा ह्या ब्रँडबरोबर केलेल्या आजन्म कराराचे गुपित सुद्धा!

व्यवहारात सचोटी आणि दर्जा राखत, बाजारातील आपले अत्युच्च स्थान प्राप्त करणाऱ्या समूहाप्रती, तो होता पापाजींचा नितळ, पारदर्शक दिशादर्शक ठरेल असा लाखमोलाचा सल्ला! नाही का?

– – – मित्रांनो! तुमची व्यवहारातील उत्तमोत्तम कार्यकुशलता आणि नेकीची खरे तर भारताला गरज आहे. ती आपल्या उत्कर्षाची नांदी ठरेल!


लेखक : श्री शिशिर मिश्रा 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares