मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९५.

या जीवनाचा उंबरठा मी प्रथम ओलांडला

त्या क्षणाची जाणीव मला नव्हती.

मध्यरात्री अरण्यात कळी फुलावी तसं मला

उमलू देणारी ती शक्ती कोणती बरं?

 

सकाळी उजेडात डोळे उघडून पाहिले

तेव्हा आपण या जगात परके नाही,

हे क्षणात माझ्या ध्यानी आले.

माझ्या आईच्या रूपानं निनावी आकारहीनानं मला आपल्या

हातात घेतलं आहे असं मला जाणवलं.

 

माझ्या मृत्यूच्या वेळी सुद्धा तीच अनोळखी शक्ती

जशी मी तिला ओळखत होतो,प्रकटेल.

जीवनावर मी प्रेम केलं तसंच मी मरणावरही प्रेम करेन,

हे मला ठाऊक आहे.

 

माता आपल्या उजव्या स्तनाजवळून बालकाला

दूर करते तेव्हा ते रडतं,

पण ती त्याला डाव्या स्तनाला लावते

तेव्हा क्षणात त्याला समाधान लाभतं.

 

९६.

मी इथून जाईन तेव्हा जातानाचा निरोपाचा शब्द

हाच असावा –

मी इथं जे पाहिलं ते उत्कृष्ट आणि अद्वितीय होतं.

 

प्रकाश सागरावर बागडणाऱ्या कमळातील लपलेला मध मी चाखला आणि मी पुनीत झालो.

हाच माझा निरोपाचा शब्द असावा.

 

अगणित आकाशाच्या खेळघरात मी खेळलो

आणि निराकाराचं दर्शन मला इथं झालं.

 

जे शब्दातीत आहे त्याचा स्पर्श मला झाला

आणि माझं सर्वांग थरथरून गेलं.

 

शेवटच व्हायचा असेल तर तो इथंच व्हावा.

हाच माझा अखेरचा शब्द असावा.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आपल्या लहानपणीचे आईचे काही फ़ेमस डायलॉग …

 

१. आई भूक लागली …

“सारखं काय द्यायचं तुम्हाला खायला, आता मलाच खा”

( दहा मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला असायचं तो भाग वेगळा)

 

२. सकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं…अती त्राग्याने..” मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं? एक एक दिवस अगदी परीक्षाच असते

( त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)

 

३. आई वेणी घालून दे ना…

” एवढी घोडी झाली तरी आई लागते वेणी घालायला”

कृतःकोपा ने प्रेमळ धपाटा ..

( बोले पर्यंत वेणी घालून पण होते ते निराळं )

 

४. ” किती पसारा करता रे..आवरताना जीव मेटाकुटीस येतो, शिस्त नाही तुम्हाला, माझंच चुकलं, चांगले दणके द्यायला हवे होते..”

( तिच्या ही नकळत, रागाच्या भरात सर्व पसारा तीच आवरते)

 

५. पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलं की…

” दूध ठेवलय गं गॅस वर, लक्ष ठेव, माझी पाठ वळली की

पळून जाऊ नकोस, मी आलेच पटकन.

( गॅस इतका बारीक ठेऊन जाते, की ती परत आली तरी

किमान दहा मिनिटं तरी दूध तापायला लागतील , पण आपल्याला चांगलीच ओळखून असते त्यामुळे..)

” आणि ढणढण्या गॅस ठेऊ नकोस, दूध करपतं”

( काय बिशाद आपली गॅस मोठा करण्याची)

 

६. परीक्षेला जाताना…

” सगळं व्यवस्थीत घेतलंस ना? पेपर आधी नीट वाच,

धांदरटपणा करु नकोस “

( जगातल्या तमाम आयांना, आपलं परीक्षेला बसणारं

मुल धांदरट का वाटतं, हे न उलगडणारं कोडं आहे, अगदी मी आई झाले तरी)

 

७. आपण बाहेर जाताना…

“लवकर ये, उशीर करु नकोस…जास्त उशीर केलास तर दार उघडणार नाही “

आपल्याला यायला उशीर होतोच..

काळवंडलेल्या चेहर्याने दार उघडताच..

” कित्ती उशीर, काय झालं? सगळं ठीक आहे ना?”

( काळजीने प्रश्नांच्या सरबत्तीत, दार उघडणार नव्हती हे विसरुनच जाते)

 

काय अजब रसायन असतय ना आई म्हणजे?

आपल्याला म्हणते सुट्टी असली तरी लवकर उठावं 

आणि बाबांना म्हणेल, झोपू द्या हो एकच दिवस मिळतो..

 

आपल्याला म्हणते, असं घाबरून कसं चालेल?

आणि स्वतः मात्र सारखी घाबरते..

( हे घाबरणं आपल्यासाठी होतं हे आपल्याला कळे पर्यंत मात्र एक तप उलटतं)

 

पिढ्यांपिढ्या थोडया फार फरकाने हे संवाद असेच चालू रहातील, कारण आई सगळयांची सारखीच असते..आई ही आईच असते..

ती काल ही अशीच होती, आज ही अशीच आहे आणि उद्या पण अशीच राहील..

कारण आई ही फक्त आईच असते… कायम..

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

यावर आपण एक उदाहरण बघू. तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.

जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)

तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.

भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.

(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.

(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 

परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.

घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.

(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.

आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.

स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.

परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.

अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते.. 

सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद !

संग्रहिका : माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.

पार्टी म्हणजे धांगडधिंगा… 

 

पंगत म्हणजे सहभोजन.

पार्टी म्हणजे स्वभोजन… 

 

पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.

पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे… 

 

पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार

पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार… 

 

पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.

पार्टी म्हणजे हवंतर जेवा… 

 

पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.

पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट…

 

पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई

पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई … 

 

पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली

पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली … 

 

पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी

पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई … 

 

पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 

पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची

कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खिरीची…

 

पंगत म्हणजे हर हर महादेवा !

पार्टी म्हणजे डान्सचा जलवा… 

 

पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ !

पार्टी म्हणजे डीजे ,नाय तर सगळं व्यर्थ… 

 

पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची,

पार्टी म्हणजे भीती उपाशी राहण्याची… 

 

पंगत म्हणजे सत्व रजाची आरास..

पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास…

 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  शुद्धीकरणाचे ११ प्रकार.… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  शुद्धीकरणाचे ११ प्रकार ✨ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि  व्यायामामुळे !

२. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे !

३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे !

४. विद्वत्ता ही अधिक शुद्ध होते, ज्ञानामुळे !

५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मननामुळे !

६. अहंभाव शुद्ध होतो, सेवा केल्यामुळे !

७.”स्वभाव” शुद्ध होतो, मौनामुळे !

८. अन्न शुद्ध होते, श्लोक म्हटल्यामुळे !

९. संपत्तीचे शुद्धीकरण होते, दान केल्यामुळे !

१०. भावनांचे शुद्धीकरण होते, प्रेमामुळे !

‌११. शेवटी अंतःकरण शुद्धीकरण होतं, सद्गुरुकृपेने !

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सोनेरी दिवस… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सोनेरी दिवस… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

शाळेत असताना  टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी  नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….कारण मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो.

माझे सगळे टीचर मला क्लासमध्ये उभा रहायला सांगून शिकवत असत.कारण माहितीये? ….ते सगळे माझी खूप इज्जत करत असत.

माझ्या शालेय दिवसांमध्ये,  माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई- पप्पांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही मला direct सांगायला घाबरत असत…

मी जे काही लिहायचो, ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे,  माझे हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे. त्याच कारणास्तव ते बरेचवेळा मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…

कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती chalk माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…ही गोष्ट वेगळी की ती कॅच सुटून मलाच chalk लागत असे.

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावं . हीच काय ती अपेक्षा होती त्यांची माझ्याकडून.

परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजूबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत.

कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे, 

कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा  घ्यावी आणि मला  वर्गातल्या  सर्व मुली व्यवस्थित दिसाव्यात, हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती.

माझ्या शरीराला vitamin D आणि मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बरेच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानाला 10 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

जेव्हा की बाकी मुलं वर्गात घाम गाळत , गुदमरत शिकत असत.

मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….

तू शाळेत का येतोस?..तुला ह्याची गरज नाहीये…

वाह ! काय ते सोनेरी दिवस होते!

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 50 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 50 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९२.

माझ्या डोळ्यावर अखेरचा पडदा पडेल,

या पृथ्वीवरील दृश्य दिसेनासं होईल,

जीवन शांतपणं रजा घेईल.

तो दिवस येणार हे मला ठाऊक आहे.

 

रात्री चांदण्यांचा पहारा असेल,

नेहमीप्रमाणे सकाळ उगवेल आणि

सागराच्या लाटाप्रममाणं सुख – दुःखावर

कालक्रमण होत राहील.

 

जेव्हा माझ्या अखेरच्या क्षणाचा

विचार मनात येतो,

तेव्हा क्षणाचं बंधन तुटतं आणि मृत्यूच्या

प्रकाशात तुझं अस्ताव्यस्त वैभव मला दिसतं .

तिथं सर्वात कमी दर्जाचं आसन

अगदी क्वचितच असतं,

जीवनातील क्षुद्रताही अगदी क्वचितच असते.

 

ज्या गोष्टीची निरर्थक वासना मी धरली होती,

आणि ज्या गोष्टी मला प्राप्त झाल्या होत्या,

त्या सर्व किती निरर्थक आहेत

हे आता मला समजतं.

ज्यांच्याकडं मी दुर्लक्ष केलं आणि

त्या लाथाडल्या त्यांचं मोल आता मला कळतं.

 

९४.

माझी सुटका झाली. बंधूंनो! मला निरोप द्या.

नमस्कार! आम्ही जातो!

या माझ्या घराच्या किल्ल्या! माझ्या घरावरील

सर्व हक्क मी तुमच्या स्वाधीन करतो.

मधुर शब्दांत तुम्ही निरोप द्यावा एवढीच माझी इच्छा!

फार पूर्वीपासूनचे आपण शेजारी -शेजारी!

मी तुम्हाला जे देऊ शकलो

त्याहून अधिकच मला मिळालं.

 

दिवस उजाडलाय.

माझा काळोखी कोपरा प्रकाशणारा दिवा

आता विझला आहे.

 

बोलावणे आले आहे.

प्रवासाला जायची माझी तयारी झाली आहे.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतेचा सोपा अर्थ… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ गीतेचा सोपा अर्थ… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत “मोह” म्हटले आहे.

जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत “लोभ” म्हटले आहे.

कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो, त्याला गीतेत ” ईर्षा” म्हटले आहे.

काही वेळेस कुल्फी संपण्याच्या आधीच कुल्फी कशी खायची असते, हे न समजल्याने दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते, त्याला गीतेत ” क्रोध” म्हटले आहे.

झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात, त्याला गीतेत “आळस”असे म्हटले आहे.

हॉटेलमध्ये भोजन झाल्यावर, ओंजळभर बडीशेप व साखर खातो, त्याला गीतेमध्ये,

“भिकारी”पणाचे लक्षण म्हटले आहे.

बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पहाणे, ह्याला गीतेत “भय” म्हटले आहे.

व्हाॅटस् अपवर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहणे किंवा फेसबूकवर एखादी पोस्ट टाकली तर त्याला किती लाईक्स मिळाले, हे सतत पहात रहाणे, ह्याला गीतेत “उतावळेपण” म्हटले आहे.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी, “साधी पुरी, कधी मसाला पुरी, कधी गोड पुरी दे रे, भैय्या,” असे म्हणतो, त्याला गीतेत “शोषण ” म्हटले आहे.

फ्रुटी पिऊन झाल्यानंतरही स्ट्राॕने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे, ह्याला गीतेत ” मृगतृष्णा” म्हटले आहे.

चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे, ह्याला गीतेत “अक्षम्य अपराध ” असे म्हटले आहे.

जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा जिलेबी वाढणारा येत आहे, हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन आणि अख्खी जिलेबी तोंडांत कोंबून आणखी जिलब्या ताटात वाढून घेतो, त्याला गीतेत “छळवाद” असे म्हटले आहे.

ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे ” मोक्ष.”

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?

…आठवतं का?

 

बर्‍याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.

अंधशाळेच्या प्रिन्सिपल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि

त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचं सुंदर मिश्रण होतं त्यात..

नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम.

शबाना आजमी प्रिन्सिपल  आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..

हे सगळं आठवायला एक कारण घडलं.

काल-परवा

आपलं माणूस 

हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!

नाना आणि सुमित राघवन..

त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता-बोलता

विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतांस?

कधी आउटिंगला?

बाहेर जेवायला?”

सुमित गप्प…

इथपर्यंत ठीक..

पण नंतर नाना सुमितला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?”

आणि अंगावर सरसरून काटा आला..

नाना पुढे म्हणतात,

“एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे स्पर्श करत नाही,ही साधी गोष्ट नाही.” हा तर पुढचा कहर..

 

किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो,  पण खरंच स्पर्श टाळतो का?

आणि

तो खरंच इतका महत्वाचा असतो?

आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण?

 

खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक.

स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..

 

लहानशी गोष्ट. स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..

पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय?

 

आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो?

आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात!

उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..

दिवाळीत आंघोळीआधी,

पाडव्याला आईने,

भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श..

तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला.

रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित..

 

ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श..

 

लग्नात लज्जा होमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..

 

स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात..

मायेने ओथंबलेले असतात कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात, पण ते बोलतात..

 

पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…

 

आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी कदाचित नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..

 

स्पर्श रेशमी असतात..

जाडेभरडे असतात..

आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..

 

आज माझी आई सत्तरीच्या  पुढे

आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टीव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते,“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत

कितीतरी देवाण-घेवाण करते..

 

स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी

एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बाद दिली जाते, तशीच दसर्‍याला सुद्धा गळाभेट असतेच की.

पाश्चात्य संस्कृती मध्ये

शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही

परिचयाची, भेटीची पद्धत.

इथेही स्पर्श महत्त्वाचा..

 

का असेल स्पर्श महत्त्वाचा?

मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात..

हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..

मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.

आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..?

म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला?”

 

लक्षातच येत नाही आपल्याला..

हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं

काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत..

ती आपली गोष्ट सांगत राहतात .

कुठे तरी, कोणाचे तरी,

हात ताटकळतात..

डोक्यावरून फिरण्यासाठी.,

कुणाचेतरी तळवे,

कोमेजून जातात तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..

सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून..,

पण वेळ नसतो ना आपल्याकडे.

पैसा असतो,

टीव्ही असतो,

गाड्या, घोडे सगळ काही आहे.

पण, पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “जेवलीस का गं ?” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण…!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मी पेपर उघडला.

त्यात  मीच दिलेली

जाहिरात होती-

‘हरवला आहे .. “आनंद “

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …

 

रंग … दिसेल तो

उंची ..भासेल ती

 

कपडे सुखाचे

बटण  दुःखाचे

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून

 

“आनंदा,परत ये.

कुणीही तुझ्यावर रागवणार नाही

तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही

 

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय

 वाढून ठेवलंय आशेचं  ताट”

 

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम’

मग म्हटलं आपणच करावं हे  काम

 

काय आश्चर्य ..

सापडला की गुलाम ..

 

एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड

एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड

 

आठवणींच्या मोरपिसात

अगरबत्तीच्या मंद वासात

 

मोगऱ्याच्या  मखमली स्पर्शात …

अवेळी येणाऱ्या पावसात

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा

जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा

 

मी म्हटलं अरे , इथेच होतास ,

उगाच दिली  मी जाहिरात

तो म्हणाला

वेडी असता तुम्ही माणसं

बाहेर शोधता .. . मी असतो तुमच्याच मनात … !

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares