☆ थोडा अंधार हवा आहे… – लेखक – अनामिक☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.
मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.
माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ६० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं.
पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वागणुकीची इस्त्री ! – लेखक : श्री सचिन मेंडिस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
कधी कधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागच्या आठवड्यातील किस्सा घ्या. नवा कोरा, रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवा. पण लक्षात आलं नाही की इस्त्री सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. अतिशय उच्च तापमानावर. सरळ गरम इस्त्री कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात… एक भला मोठा काळा डाग उमटला. थोडं सावरायच्या आतच एक अनपेक्षित, अक्राळ विक्राळ भगदाड. इस्त्रीची सेटिंग न पाहता सुती कपड्याचं उच्च तापमान रेशमी कपड्यावर लादण्याचा बेफिकीरपणा मला चांगलाच नडला होता.
ते भगदाड पाहून खूप वाईट वाटलं. पण त्या क्षणात एक वेगळाच विचार मनात चमकून गेला. आपण नात्यांमध्येही हेच करत नाही का? प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. कुणी डेनिम, सहजपणे सगळं सोसून घेणारं. कुणी लिनन थोडं टोकदार पण व्यवस्थित सांभाळलं तर शिस्तीत बसणारं. आणि काही माणसं रेशमासारखी अतिशय नाजूक, हलकसं गरम तापमानही न झेलता येणारी.
पण आपण काय करतो? सगळ्यांना एकाच वागणुकीने हाताळायला जातो. आपल्या स्वभावाच्या तापमानात कुणी सहज बसतं, कुणी त्यात व्यवहार म्हणून सांभाळून घेतं, आणि काहीजण आपली रेशमी नाती सोडून कायमचे निघून जातात. आपण बोलतो, वागतो विचार न करता. आपल्या शब्दांची उष्णता समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या वस्त्रांना झेलता येईल का, याचा विचार करत नाही आणि मग जळालेले डाग पाहून आपल्यालाच वाईट वाटतं. खरं तर आपल्या स्वभावाच्या तापमानावर माणसं मोजायची नसतात, त्यांना त्यांच्या धाग्यांच्या ताकदीने समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. त्याला समजून घेतलं तर नातं टिकतं, नाहीतर फक्त जळालेले ठसे उरतात.
काही नाती गरम इस्त्रीनेच नीट बसतात. थोडं स्पष्ट बोलावं लागतं, काही वेळा थोडं तापूनही घ्यावं लागतं. पण काही नाती मात्र फक्त गारवा ओळखतात. त्यांना उष्ण स्पर्श झेलताच येत नाही. बोलण्याच्या उष्णतेने जर नातं जळत असेल, तर समजून घ्या की तुम्ही योग्य तापमान ठरवलेलं नाही. आपण जर आपल्या संवेदनशीलतेचे तापमान व्यक्तीनुसार हाताळले, तर नाती सहज टिकतील, सुरकुत्या विरहित होतील आणि कुठेही न जळता सुंदर दिसतील.
पुढच्या वेळी इस्त्री हातात घेतली किंवा कुणासोबत संवाद साधला तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, ही व्यक्ती सुती आहे की रेशमी? आणि त्यानुसार आपल्या वागणुकीचं तापमान ठरवा. सगळ्या नात्यांना सारखं तापमान लागू केलं की काही सुरकुत्याही नाहीशा होतात आणि काही नातीसुद्धा. जळलेला रेशमी कुर्ता एकवेळ शिवता येईल पण जळलेलं नातं पुन्हा विणता येईलचं असं नाही.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी काही ऋणानुबंध असतात.
निरपेक्ष प्रेमाने जवळ येणारी माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण परमेश्र्वराने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून ती योजना केलेली असते पण आपण वारंवार त्यांना नाकारलं तर ते पुन्हा कधीही आपल्या जवळ येणार नाहीत. कारण सुसंधी वारंवार मिळत नाही.
लेखक – श्री सचिन मेंडीस
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला.
थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.
दिवसा कधी दिसत नसायचा.
खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.
मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.
रात्रीचे साडेबारा वाजले असतील.
मी त्या मंदिराकडे आलो.
तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला.
मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो.
मला बघून तो गालातल्या गालात हसला.
जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.
मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?
सर माझ्या घरात लाईट नाही.
माझी आई आजारी असते.
दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी ऐपत नाही.
बाळ तू मला बघून का गोड हसलास ?
सर तुम्ही देव आहात !
नाही रे!
सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.
ते जाऊदे तू जेवलास का?
मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे.
सर म्हणूनच मी हसलो.
मला माहित होतं.
तो (देव) कोणत्याही रूपात येइल पण मला भुकेलेला नाही ठेवणार.
मी जेंव्हा जेंव्हा भुकेलेला असतो, तो काहींना काही मला देतोच.
कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो.
आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो.
मला माहित होतं…. तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात.
तुम्ही देव आहात ना !
मी निःशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडलं होतं.
रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.
माझे डोळे तरळले.
त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.
तो पाच मिनिटांनी परत आला.
त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.
सर,
माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.
क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.
शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले.
देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला.
असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं.
रात्रीची वेळ होती.
देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही.
वाईट वाटलं मला.
या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?
काय खात असेल ?
कसा जगत असेल ?
असे ना ना प्रश्न आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले.
असाच आमचा एक मित्र पॉजिटीव्ह होऊन दगावला.
मी त्याच्या अंत्य संस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले.
सर्व आपल्या घरी निघाले.
निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो.
पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता.
मला बघून त्याने आवाज दिला,
सर….
अरे तू इथे काय करतोस ?
सर आता मी इथेच राहतो.
आम्ही घर बदललं.
भाडं भरायला पैसे नव्हते.
त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईटही बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली.
काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे.
त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.
तिथे जीवंत माणसं यायची आणि इथे मेलेली.
ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो.
सर मी हार नाही मानली.
आई सांगायची……..
ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.
बरं… तुझी आई कुठे आहे ?
सर ती कोरोनाच्या आजारात गेली.
तीन दिवस ताप खोकला होता.
नंतर दम अडकला.
मी कुठे गेलो नाही.
इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला.
१४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो.
सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं ती सांगायची.
आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.
सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही.
ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून.
कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय.
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.
ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.
असो
सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता ?
तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ?
सर,
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
सर तोंड गोड करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.
भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.
सर,
मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.
आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो…
न सांगता.
खरा देव तर कधीच नाही दिसला पण,
मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला…
मी देव पाहिला…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
(हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी शेअर करतोय… कारण मलाही कळले माणसातच देव आहे.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पध्दतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडले.
सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली. सराफाने बघून सांगितले की ते कानातले सोन्याचे आहे. ते घेऊन ती घरी आली.
घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले. सखू म्हणाली, “वहिनी, लेकीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं. थोडे पैसे उसने द्या.”
ती म्हणाली, “हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे. ते मी तुला देईन. ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस.”
सखू म्हणाली, “नको वहिनी. या महिन्याची फी द्या. पुढचं काहीतरी करून जमवेन मी. आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर. विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवले आहे का म्हणून. कुणी कष्टाने हे बनवलं असलं आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल. पै पै जमवून बायका दागिना बनवतात, तो मी कसा वापरणार?”
वहिनी म्हणाली, ”छान आहे ग आयडिया.” तिनं लगेचच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुक वर लिहली.
दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे. असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते.
.. ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली.
तिनं दुसरं कानातलं दाखवलं. वहिनीनं सखूला बोलावलं आणि कान्हेरे बाईंना सांगितलं, “तुम्हाला या सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरका.” व सारी हकीकत सांगितली.
कान्हेरे बाई खूष होऊन सखू ला म्हणाली, “थॅंक्यू सखू. तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते. हे माझ्या आजीचं कानातलं आहे. तिची आठवण आहे ही. कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला. सगळीकडे शोधून आले. आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला. कसे तुमचे आभार मानू? बक्षिस काय देऊ तुम्हाला?”
वहिनी म्हणाली, “ललिताताई तुम्हीच त्या नव्या १२ वी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना? तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे!”
“हो. मीच ती ललिता कान्हेरे. आजीची ईच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही. तिचं स्वप्न मी पूर्ण केलं. देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे.” कान्हेरे बाई म्हणाल्या.
“बक्षिस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फी मधे तुमच्या शाळेत घ्याल का? “ वहिनी म्हणाली.
“अहो अगदी आनंदाने! Actually, मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन. वह्या, पुस्तकं, युनिफॅार्म सर्व काही मी बघेन. चालेल का सखुबाई?” कान्हेरे बाई म्हणाल्या.
सखूचे डोळे भरून आले. “वहिनी, माझे नशीब म्हणून मी तुमच्यासारखीकडे काम करते.”
वहिनी म्हणाली, “सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस. मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून, तरी तुझा विवेक ढळला नाही. ”
कान्हेरे बाई कौतुकाने हसून म्हणाल्या, “निघू मी? सखू ये उद्या लेकीला घेऊन. आज शांतपणे झोपेन बघ. Thank_you_so_much. ”
सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती. “देवा तुझी किमया अगाध आहे…. क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा! ” असं म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
तसा मी खूप व्यावहारिक माणूस आहे. जाताना माझ्या आईने मला सांगितले होते.
“मिलिंद… तुला सुखी राहायचे असेल तर फक्त एकच गुण तुझ्या अंगी बाणवून घे, ‘जितक्या लवकर एखाद्याशी जोडला जाशील, तितक्याच लवकर त्याच्यापासून दूर होता आले पाहिजे’. थोडक्यात मोह धरला तर दुःखी होशील. “
ही गोष्ट मी इतकी मनाशी रुजवली आहे की जो पर्यंत कुणी माझ्या सोबत आहे, मी त्याचा असतो. ज्यावेळी तो दूर जातो, मी त्याला विसरून जातो. कुणाला हा दुर्गुण वाटू शकतो पण माझ्यासाठी तो गुण आहे. बरे ही गोष्ट माझ्या मनात इतकी घट्ट बसली आहे की अनेकदा लोकांना मी पाषाणहृदयी वाटतो. आई असताना मी कायम तिचा सारथी असायचो. तिला कुठेही जायचे तरी तिच्यासोबत मी असणारच. तिच्या आजारपणातही मी तिच्याजवळच बसलेला असायचो. त्यामुळे त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता, आई गेल्यावर याला किती त्रास होईल? पण ती ज्या दिवशी गेली त्याच दिवसापासून माझे हसणे, विनोद करणे चालू झाले. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. सकाळी आई जाते आणि संध्याकाळी हा हास्यविनोद करतोय? म्हणजे याचे वागणे खोटे होते की काय? हे मला त्या लोकांच्या चेहऱ्यावरही दिसून यायचे. पण माझ्यात काही फरक पडला नाही. आजही मी तसाच आहे.
हे सगळे आठवण्याचे कारण… काल खूप दिवसांनी भद्रकाली मंदिरात गेलो होतो. पायऱ्या चढताना मनात विचार आला, या पायऱ्या बोलू शकल्या असत्या तर किती छान झाले असते? माझी पणजी ( माझ्या आईची आजी ) आणि माझी आजी कायम दर्शन झाल्यावर या पायऱ्यांवर बसलेल्या असायच्या. माझ्या आईचे बालपण याच पायऱ्यांवर खेळण्यात गेले. मीही माझ्या आईला अनेकदा इथे दर्शनाला घेऊन आलेलो.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमीच्या ठिकाणी पादत्राणे काढली आणि देवीसमोर जाऊन उभा राहिलो. मागे कीर्तन चालू होते. ऐकायला ८/१० लोकच असतील. देवीची मूर्ती खूपच छान दिसत होती. दर्शन घेताना मला माझी आई आठवत होती त्यामुळे आपोआपच डोळे भरून आले. आई ज्याप्रमाणे देवीच्या पुढे बनवलेल्या पावलांवर डोके ठेवून दर्शन घ्यायची मीही अगदी त्याचप्रमाणे दर्शन घेतले आणि दरवाज्याजवळील आतल्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शांत बसून राहिलो. थोड्या वेळात काही स्त्रिया दर्शनाला आल्या. त्यांचे वय साठीच्या आसपास असेल. त्या प्रत्येकीत मला माझ्या आईच्या काही गोष्टी दिसू लागल्या. काहींची वेशभूषा माझ्या आईसारखी, काहीची केशभूषा आई सारखी. काहींचे चालणे, काहींचे बोलणे आईसारखे. आणि आपोआपच माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मनात म्हटले… आई काही आपल्याला सोडायला तयार नाही. हेहेहे…
काल रात्री खूप दिवसांनी आई स्वप्नात आली.
“बरे झाले… देवच पावला म्हणायचा. ” आईने म्हटले.
“कशाबद्दल?”
“वाकडी वाट करून देवीच्या दर्शनाला जाऊन आलास. एरवी कुणी सांगितले असते तर म्हणाला असतास, ‘देवीला मनातल्या मनात मनोभावे नमस्कार केला तरी पोहोचतो, त्यासाठी मंदिरातच का जायला हवे?” तिने हसत म्हटले आणि मलाही हसू आले. कारण अनेकदा तिने मला मंदिरात दर्शनाला चल म्हटल्यावर मी हेच वाक्य बोलायचो.
“हेहेहे… मी जरी मंदिरात जात नसलो तरी बाहेरून नमस्कार करतो. आणि कलियुगात हीच गोष्ट जास्त पुण्य देऊन जाते. “
“ठीक ठीक… पण मंदिरात जात जा असाच. मी तुला कायम तिथे भेटेल. कुणा ना कुणाच्या रुपात. ” तिने माझ्याकडे रोखून बघत म्हटले.
“आई… एक विचारू?”
“विचार… “
“मी, तू गेल्यावर रडलोही नाही, तू म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीचा मोह ही धरला नाही तरी मंदिरात गेल्यावर तुझ्या आठवणीने माझे डोळे का डबडबले?” मी विचारले तसे आईच्या चेहऱ्यावर नेहमीचे चिरपरिचित स्मित झळकले.
“कारण तू मोह धरला नसला तरी तुझ्या हृदयात प्रेम कायम आहे. त्यामुळेच तुला समोर येणाऱ्या स्त्रीमध्ये मी दिसते. तू कायम मला शोधत असतोस आणि मीही त्यांच्या रुपात तुझ्यासमोर येते. लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुला माझी गरज असेल, मी कायम तुझ्या जवळपास असेल. “
“अरे.. !!! मोह आणि प्रेम एकच ना?”
“नाही… मोह आणि प्रेम जरी वरकरणी एक वाटत असले तरी त्यात फरक आहे. मोहात स्वार्थ असतो, प्रेम निस्वार्थ असते. मोहात माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतो, प्रेमात दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो. मोह अल्पकालीन असतो, प्रेम कायमस्वरूपी असते. मोह बांधून ठेवतो, प्रेम कशातही अडकवत नाही. त्यामुळे याबद्दल फारसा विचार करू नकोस. जसा आहे तसाच रहा. ज्यावेळी तू मला कोणत्याही स्त्रीमध्ये बघशील, तिचा आदर करशील, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम टिकून राहील. ” आईने सांगितले आणि मला जाग आली. आई असताना भलेही मी स्वतःला तिचा सारथी म्हणवून घेत होतो पण माझी आईच खऱ्या अर्थाने माझी सारथी आहे. ज्यावेळी मी अर्जुनासारखा संभ्रमित होतो, ती श्रीकृष्णासारखी मला उपदेश करते. तुम्हीही ज्यावेळी संभ्रमित व्हाल, फक्त तुमच्या आईला आवाज द्या, ती कृष्ण बनून तुमच्या मदतीला हजर असेल यात शंका नाही.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आयुष्याला क्षणभंगुर का म्हणतात हे मला एक अख्खा दिवस मावळण्याच्या आतच कळलं होतं.
वेग, धावपळ लोकांचा घोळका, मित्रांच्या मैफिली, कौतुक, टाळ्या, हशा जाऊन त्याची जागा काळजी आणि सहानुभूतीने घेतली ते कळलच नाही. तरीही दीड वर्ष मी काहीतरी चांगले क्षण हेरत राहिलो, कधी सावधानतेच्या कड्याकुल्पातून हळूच चोरत राहीलो.
गेले दोन सव्वा दोन महिने मी स्वतःला शारीरिक कड्या कुलपात ठेवले
कागज के फूल या गुरुदत्तच्या सिनेमात कैफी आझमीने लिहिलंय ….
“वक्त है मेहरबा आरझु है जवा
फिक्र किसी बात की करें इतनी फुरसत है कहा “
… या अशा आयुष्यात लोळायला फार बरं वाटतं. त्यावेळी असं वाटायचं वेळ मिळाला की हे वाचायचं, ते पाहायचं आहे, या विषयावर लिहायचय, अनेक संकल्प डोळ्यासमोर असायचे आज वेळ आहे संकल्पही आहेत पण काही करण्याची ती उर्मी कमी झाली. लिखाण करण म्हणजे माझ्यासाठी समाधी लागण असल्यामुळे मी अधून मधून लिहीत असतो. काही गोष्टी करताना आनंदाच् वातावरणात असणं फार महत्त्वाचं असतं.
सध्या कैफीची जागा सुरेश भटांनी घेतली. त्यांच्या कवितेचे शब्द अधून मधून कानामध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रमाणे ऐकू येत असतात.
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की मज हसावे लागले “
ही कविता त्यानी आपल्यासाठी लिहिली का असं वाटायला लागलं.
हळूहळू लक्षात यायला लागला की माणूस बदललेल्या परिस्थितीत आयुष्याशी जुळवून घेतो. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मन नावाचा भुंगा फक्त फुल बदलतो. नसेल ते फुल पहिल्या इतक सुंदर, पण त्यातला मकरंद शोधतच राहतो
मी कुठल्या गोष्टी बंद करायला हव्यात याची लिस्ट डॉक्टर ने दिल्यानंतर चेहरा पडण्यासाठी मला दिलीप कुमारच्या अभिनयाच्या गुणवत्तेची गरज नव्हती.. तो नैसर्गिकपणे पडला माझ्या मुलाने माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य पटकन वाचलं आणि तो एक वाक्य उच्चारला.. ते वाक्य करवतीने लाकूड कापत जाव तसं मन कापत गेल. तो म्हणाला “पब्लिक, चाहते, टाळ्या मित्र, घोळका, कौतुक यातच तुम्हाला सुख आहे का?आम्ही तुमचे कोणी नाही का?'”
आयुष्यात कधीतरी आमच्यासाठी जागा ठेवा हे तो सांगत होता आणि त्याचं काही चुकलं नाही. माणूस आजारी एकटा पडत नाही. तो कुटुंबाला घेऊन आजारी पडतो. शारीरिकदृष्ट्या तो त्रास भोगतो पण मानसिक दृष्ट्या सर्व कुटुंबच त्यात गुंतलेल असतं. आता कुटुंब पहिलं बाकी इतर सगळ्या गोष्टी नंतर असं ठरवून टाकलं.
मुलाकडे राहत असल्यामुळे आजोबा आणि नातू किंवा नात हे नातं सगळं विसरायला लावत, हे लक्षात आलं. दहा-बारा दिवसासाठी नात येऊन गेली आणि नात ( स्वरा) आणि नातू ( कियांश)यांच्याबरोबर खेळताना ते दहा-बारा दिवस किती पटकन निघून गेले हे कळलच नाही. पण त्या गोड आठवणी पहिला लेख जपून ठेवावा तशा मी जपून ठेवल्या. मी पुन्हा लहान झालो जवळपास त्यांच्याच वयाचा त्यांच्याबरोबर खेळलो, कधी पत्ते कधी लहानपणी खेळलेला व्यापारसारखा खेळ (सध्या नवा अवतार पाहायला मिळतो). जणू बालपण पुन्हा अवतरल. त्यांच्याबरोबर खेळताना आपण हरायच असतं हे मला उमगलं. आदर्श विचार केला तर हे चुकीच असेल. लहान मुलांना पराभव झाला तर तो स्वीकारायचा हे शिकवायला हवं ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याचदा आजोबाचं मन हे आदर्शवादाला जुमानत नाही. ते नात किंवा नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला आसुसलेलं असतं. बऱ्याच गोष्टीने मी घरची शिस्त बिघडवतो. नातवाच्या आई-वडिलांना वाटतं की त्याने जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहु नये आणि ते योग्यच आहे पण नातवासाठी आजोबा आणि आजी हे फार सॉफ्ट टार्गेट असते. चेहऱ्यावर अजीजीचे भाव आणून “आबा पाच मिनिटांसाठी मोबाईल दे” असं म्हटल्यावर मी पाघळतो. त्या पाचची पंधरा मिनिटे कधी होऊन जातात कळत नाही.
मला पटतं मी चुकतोय.. पण वळत नाही. माझा नातू सहा वर्षाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण गुंतून गेलो. सकाळी तो शाळेत जाताना त्याने मला कॉपी दिली नाही तर तो येईपर्यंत मला चैन तू काय दिवसभर माझ्याबरोबर खेळत नाही पण त्याचा आसपासचा वावर माझ्यासाठी भरलेल्या ऑडिटोरियम इतकाच प्रिय आहे. त्यालाही मी हळूहळू मॅच्युअर होताना पाहत आहे. त्याच वाढलेलं प्रेम आणि दिवसागणीक मधासारखं गोड आणि अत्यंत घट्ट होत जाणाऱ् नातं मला सुखावत. अगदी, माझ्या कुठल्याही वैयक्तिक आनंदापेक्षा. पूर्वी आमच्या घरून मुलाच्या घरी आल्यावर परतताना तो सांगायला “आजी येताना काहीतरी घेऊन ये. एखाद टॉय आण. आणि त्याची टॉय ठरलेली असायची, कधी विमान, कधी बोट कधी, बंदूक. मुलांकडून पुन्हा दम यायचा त्याला अशा सवयी लावू नका. मध्यंतरी दहा-बारा दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाताना मी सहज विचारलं, ” काय घेऊन येऊ? ‘
तो म्हणाला ” काहीही आणू नका. फक्त तुम्ही या. तुमची वाट बघतोय” माझे आणि बायकोचे डोळे पाणवले त्याच्यातला हा बदल सुखावत होताच पण मनाला एक वेगळा आनंद देऊन गेला. मध्यंतरी माझ्या व्याहांचा 70 वा वाढदिवस होता. घरातली सगळी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. मी नाही जाऊ शकलो. माझ्या नातवाने आई-बाबांना भंडावून सोडलं की आबा आणि आजी का नाही आले ?आणि मला भेटल्यानंतर तो म्हणाला, “मी ती पार्टी एन्जॉय नाही करू शकलो कारण तुम्ही दोघेजण नव्हता. ” त्याची एक, दोन मिनिटांची मिठी बरंच काही सांगून जाते. त्या मिठीची उब अचानक अंगावर प्रेमाची वीज पडल्यासारखी वाटते. अंग मोहरून जात. कधीतरी तो माझ्याकडे हट्ट करतो, ” आबा क्रिकेट खेळायला चला किंवा मला बोलिंग टाका. किंवा मी सायकल चालवतोय चला ना खाली चला चला ” या क्षणी त्याच्या मागे मला पळणे शक्य नाही. मन पळायला तयार आहे पण शरीर परवानगी देत नाही. मी त्याला समजून सांगण्याचा एकदा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, “आबा तू कधी बरा होणार?. लवकर हो. ह्या वाक्याने मनात निर्माण झालेला भावना कल्लोळ यांचे वर्णन मी नाही शब्दात करू *शकत. मी त्याला म्हणालो” अरे लवकरच बरा होईन.. मग आपण क्रिकेट खेळू. सायकल चालवू सगळं करू ” आणि मग आकाशाकडे पाहत परमेश्वराला म्हटलं “अरे माझ्यासाठी जाऊ देत नातवासाठी तरी तथास्तु म्हण. निदान हे नवं बालपण तरी मला पुन्हा नीट उपभोगून दे”
☆
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈