मराठी साहित्य – विविधा ☆ ‘कुचंबले किचन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कुचंबले किचन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

जिथे नव्या हाऊसिंग स्कीम्स उभारल्या जात आहेत, सोसायट्यांचा पुनर्विकास झाला आहे/ होत आहे, नवी टाॕवर्स, नव्या इमारती बांधल्या गेल्या आहेत किंवा जात आहेत त्यांच्या १-२-३ बीएचके फ्लॅट मध्ये किचनचा एवढा संकोच करून ठेवला आहे की जेमतेम एक माणूस कसाबसा उभा राहू शकतो! गेल्या ५-७ वर्षात मुख्यतः महानगरातून हे विशेषत्वाने आढळून येते.

नक्की काय खूळ (कदाचित व्यावसायिक लाभाचे गणित? ) बसले आहे या पुनर्विकासक/ बिल्डर/इंटीरियर करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही कळत नाही.

ह्या लोकांना असे का वाटते की, हल्ली घरी कोणी स्वयंपाक करतच नाही. सगळे रोज सकाळ संध्याकाळ बाहेरील हाॕटेलांत आॕर्डर देऊन तिथून घरी पार्सलं मागवून खातात.

हल्ली कोणी कोणाच्या घरी जात नाही की येत नाही. कुटुंबे लहान आहेत. (घरात जास्तिजास्त तीन सदस्य! ) घरी पाहुण्या-रावळ्यांचा राबता नसतो. मामाच्या घरी येऊन धुडगूस घालणारी, मामीकडे शिक्रण पोळीचा हट्ट धरणारी व्रात्य भाचरे नसतात. त्यामुळे भांडी, ताटे, वाट्या, पातेली, डाव, ओगराळी किंवा गेलाबाजार क्रोकरी असले अवजड सामान ठेवायला कशाला जागा लागते? तेव्हा ती वाचवलेली जागा या नवीन रचनेत बेडरूम, हॉल मोठा करण्यात वापरू या. त्यांचे मानस खरेच असे आहे का?

ज्या लोकांनी १९८५ ते ९५ सालापर्यंत फ्लॕट घेतले आहेत ते लोक नवीन फ्लॕट बघायला जातात तेव्हा तिथले वितभर रुंदी-लांबीचे किचन पाहिल्यावर त्यांचे डोकेच सटकते.

मी काय म्हणतो, बांधकाम व एफ एस आय इ. चे चे नियम बदलले आहेत/असतीलही. त्यामुळे घराच्या, साॕरी फ्लॕटच्या, रचनेत बरेच बदल करावे लागत असतील हे ही मान्य करू या. पण भारतीय संस्कृतीमध्ये घरातील सगळ्यात महत्त्वाचे असलेले स्वयंपाकघर म्हणजे किचन, आणि चक्क त्याचाच बळी पडत आहे. किचनचा असा श्वास कोडणारा संकोच अगदी अमान्य आहे. अहो, असे करुन कसे चालेल बरे?

पुनर्विकास करताना या किचन कुचंबणेचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. गृहिणींनीही नव्या फ्लॕटमधे मोठ्या किचनचा आग्रह धरावा. मला वाटते की हा स्त्रीहट्ट योग्य आहे आणि तो पुरवायला हवा.

सोसायट्यांच्या पुनर्विकास समित्यांनी व विकासकांनी या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा. या सूचनेला पुरेसे महत्व व प्राधान्य द्यावे.

घरोघरीच्या (गृह) लक्ष्मींना प्रसन्न करण्याची, पुनर्विकासाच्या निमित्ताने घर चालत आलेली ही सुवर्णसंधी, कोणाही ‘धूर्त व चाणाक्ष’ पुरुषाने अजिबात दवडू नये असे त्यांच्या हिताचे सांगणे आहे.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तक्रार निवारण केंद्र…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “तक्रार निवारण केंद्र…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आपण मोबदला देऊन घेतलेल्या वस्तू व सेवा याच्या बद्दल काही तक्रार असल्यास अशी तक्रार निवारण करायला निवारण केंद्र असतात.

यात प्रत्यक्ष भेटून, लिहून, किंवा तोंडी तक्रार देता येते. हल्ली ऑनलाईन तक्रार करता येते. ब-याचदा तर तक्रार करणारा आणि घेणारा समोरासमोर येत सुुध्दा नाहीत.

पण मला आठवतय आमच्यावेळी असणारं तक्रार निवारण केंद्र. हे साधारण आमचे आईवडील म्हणजे पालक आणि आम्हाला शिकवणारे म्हणजे गुरूजन म्हणजे शिक्षक यांच्यातच असायचं. आणि तक्रार…. साहजिकच ती आमच्या बद्दलच असायची. आणि आईवडील व शिक्षक यापैकी कोणालाही तक्रार करायची मुभा असायची.

या तक्रारीची नुसतीच दखल घेतली जायची नाही तर तीचं निवारण झालं की नाही याची शहानिशा व्हायची.

ब-याचदा तर मोठा भाऊ, बहीण कोणीतरी दोन तीन वर्षांच्या अंतराने मागच्या किंवा पुढच्या वर्गात असायचेच. याची व्यवस्थित माहिती शिक्षकांना असायची. काहिवेेळा तर त्यांचच उदाहरण दिलं जायचं. बघ जरा…… तो किंवा ती कशी….. आणि तू…… या तू म्हणण्याचा अर्थ कळायचाच…… शाळेतली तक्रार त्यांच्याच मार्फत घरी पोहचवण्याची व्यवस्था व्हायची. आणि ते सुुध्दा जशीच्यातशी आणि न चुकता ती तक्रार घरी व्यवस्थित पोहोचवायचे. स्पीड पोस्ट. किंवा एका दिवसात डिलेव्हरी…… त्यावेळी सुुध्दा होती.

या तक्रारीत तर आमच्यावरचे असणारे अधिकार सुध्दा एकमेकांना विश्वासाने सोपवले जायचे. म्हणजे शिक्षकांनी तक्रार केली तर तुमचा मुलगा….. अशी सुरुवात व्हायची. आणि आईवडील यांची तक्रार असेल तर….. तुमचा विद्यार्थी आहे…. घ्या ताब्यात…. अशीच सुरुवात करायचे.

तक्रारीच्या स्वरूपानुसार मग योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न व्हायचा. प्रयत्न बहुतेक यशस्वीच व्हायचा.

यात जागेवर ऊभा रहा. यापासून जागेवर पण बाकावर ऊभा रहा. अशा काही सौम्य पण अपमान वाटणा-या गोष्टी असायच्या. तर काहीवेळा वर्गाच्या दारात सुध्दा ऊभं रहावं लागायचं.

आजकाल एरी॓अल व्ह्यू हा शब्द ऐकू येतो. पण याचा अनुभव आम्ही शाळेत असतांनाच ज्या ज्या वेळी बाकावर ऊभं राहिलो त्या त्या वेळी घेतला होता. बाकावर ऊभं राहिल्यावर काही गोष्टी दिसायच्या. यात पुस्तकात धड्यांचे लेखक किंवा लेखिका यांच्या फोटोवर पेनच्या सहाय्याने चढवलेला चष्मा. किंवा त्यांना काढलेली निळ्या रंगाची दाढीमिशी दिसायची. ती वाकून पाहण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्यात शिक्षक ओरडायचे, नीट, ताठ ऊभा रहा……. या आवाजात इतकं वजन असायचं, कि बाकावर ऊभा असलेला काय पण बाकावर बसलेला सुध्दा ताठ बसलेेला असला तरी परत सरसावून बसायचा. कधी कधी या ओरडण्यासोबत एक खडूचा तुकडा अचानक मीसाईल सारखा यायचा आणि त्याच काम करून जायचा. सर्जीकल स्ट्राईक.

वस्तू दुरुस्त झाल्यावर जसे काही स्क्रु पिळून घट्ट करतात तसेच काहीवेळा आमचे कानसुध्दा स्क्रू सारखेच पिळले नाही तर अक्षरश: पिरगळले जायचे. फक्त वस्तूंचे सगळेच स्क्रू पिळून घट्ट झाले का पहावे लागतात. आमच्या एका कानाचा स्क्रू पिळला जाणार अशी शंका आलीतरी सगळेच स्क्रू आपोआप ठिकाणावर गेल्याची जाणीव व्हायची.

ब-याचदा तर एक स्क्रू म्हणजे कान पकडल्यानंतर दुसरा स्क्रू म्हणजे कान पिळला जाऊनये म्हणून तो एका हाताने झाकायचा केविलवाणा प्रयत्न असायचा. पण मग त्या झाकलेल्या हातावरच असा फटका बसायचा कि न पिळताच तो स्क्रू रुपी कान ठणकायचा.

किल्ली फिरवून घट्ट केली कि काहीकाळ चालणारी खेळणी असतात. त्याच पध्दतीने आमचा कान पीरगळून एकदा किल्ली घट्ट केली की आमचं खेळणं बराचकाळ नीट चालायचं. पर्याय नसायचा. सारखी सारखी कोण किल्ली घट्ट करून घेणार…

अक्षराबद्दल काय बोलणार… अक्षर चांगलच असलं पाहिजे असाच कटाक्ष असायचा. अक्षर वाईट असेल आणि त्याच दर्शन शिक्षकांंना झालं, तर त्याचं आणि अक्षराचं दोघांच प्रदर्शन वर्गात होणारच याची खात्रीच असायची. वर… काय लिहितोस?… असा शेरा असायचाच.

अक्षरासाठी मग वहिची दोन पानं लिहून आणायची शिक्षा असायची. अशी दोन पानं करता करता एकदातर माझी एक पूर्ण वही भरली होती. सुदैवाने ते वर्ष संपलं म्हणून. नाहीतर घरी नवीन वही मागावी लागली असती. परत आता वही कशाला हवी? … ही विचारणा झालीच असती. मोठ्यांंची हिशोबासाठी वही असायची, पण आमच्या वह्यांचा हिशोब सुुध्दा त्यांच्याकडे असायचा.

पाढे पाठ असणं किंवा करणं हा शिस्तीचा भाग असायचा. पण तोच कधीकधी शिक्षेसाठी कारणीभूत ठरायचा. मग पाढे पाठ नसायची शिक्षा पाठीवर जाणवायची.

पण त्या तक्रार निवारण केंद्रात माया, आणि प्रेम काळजी, आणि आपुलकी होती हे खरं आहे. शिक्षणसंस्था, शिक्षण, शिकवणं आणि शिकणं या बद्दल शिक्षकांना आणि पालकांनासुध्दा आस्था व अभिमान असायचा.

विद्यार्थांचं अपयश हे शिक्षकांना स्वतःच अपयश वाटायचं, तर विद्यार्थांच्या यशाने शिक्षकांची छाती गर्वाने फुलायची आणि मान अभिमानाने ताठ व्हायची.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोळी…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

कोळी घरात कोठेतरी कोपऱ्यात आढळणारा प्राणी. दिसला की गृहिणी केरसुणी आणायला पळतेच. पण परत येते तेव्हा तो कोळी कुठच्या कोठेच पळालेला असतो. सापडतच नाही. दिसते ते त्यांने कोपऱ्यात कोठे तरी केलेले जाळे. अतिशय पारदर्शक व सूक्ष्म तंतू पासून केलेली कलाकृती. खरोखरच किती अद्भुत आहे नाही! माणसाने कितीही प्रयत्न केले तरी असे नाजूक जाळे करणे शक्य नाही.

हे जाळे ज्यावेळी घराबाहेर एखाद्या झाडाला किंवा खिडकीला धरून केले जाते, तेव्हा विशेष शोभिवंत दिसते. लांबवर त्याचे हातपाय पसरलेले असतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात ते चमकू लागले की त्याची रचना स्पष्ट दिसते. त्या लटकणाऱ्या झोपाळ्यात झोके घेणारा तो कोळी अगदी राजासारखा शोधतो. जणू आपले ऐश्वर्य डोळे भरून पाहत आहे, उपभोगत आहे. त्यात हिवाळा असेल तर दवबिंदूही त्याचा आधार घेतात. आणि मग तो हिरे महालच होऊन जातो. सूर्याच्या सप्तरंगात तो न्हाऊन निघतो. त्या छोट्या विश्वकर्माच्या त्या रचने पुढे नतमस्तक व्हावे वाटते. केवळ फोटोत बंदिस्त करणे आपल्या हातात असते.

असे हे जाळे नुसते शोभेचे नाही. किड्यांना पकडून आपले पोट भरण्याचे कोळ्याचे ते साधन आहे. बसल्या जागी अन्न मिळवण्याची ही त्याची अनोखी पद्धत. ‘पोटासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी तू जगदिशा’ म्हणायची वेळ त्याचे वर कधीच येत नाही.

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घर बांधायला त्याला काही सामग्री गोळा करावी लागत नाही. घर बांधायचे म्हणजे माणसाची किती धावपळ. विटा, वाळू, सळई, पाणी, लाकूड आणि मुख्य म्हणजे जागा आणि कामगार, काय नको! पण हा बिचारा आपल्या शरीरातून एक चिवट धागा काढतो व आपल्या शरीराभोवती मोठ्या कौशल्याने गुंतवितो. अंतरिक्षात लोंबत ठेवतो. साहित्य नको, जागा नको. माणसाच्या श्रेष्ठत्वाच्या अभिमानाला तडा देतो. माझे घर म्हणणाऱ्यांना आपली जागा दाखवतो. सुखा समाधानाने जाळ्यात येणाऱ्या अन्नाचा उपभोग घेतो. गरज संपल्यावर सगळा पसारा आपल्यातच सामावून घेऊन मोकळा. मागे काही उरत नाही. सृष्टीची निर्मिती करून लिला दाखवणारा आणि परत सृष्टीला आपल्या सामावून घेणारा परमात्माच तो होतो. ज्या परमात्म्याने त्याला निर्माण केले, त्याचा आदर्श तो तंतोतंतो पाळतो. आपल्या पसारा आपणच आवरून त्या परमत्वात लीन व्हायला मोकळा. केर नाही कचरा नाही. म्हणूनच अवधुताने आपल्या २४ गुरूत त्याला स्थान दिले.

आदर्श घ्यावा तर त्याचा. स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी सारा पसारा मांडावा. पण त्याचा त्रास कुणाला होणार नाही. त्याची जबाबदारी कुणावर पडणार नाही. अशा प्रकारे तो आवरून निरोप घ्यावा. हा आदर्श देणारा एकमेव कोळी.

कोळी तसा निरुपद्रवी प्राणी, घर अस्वच्छ करतो असे वाटत असले तरी बारीक सारीक किडे खाऊन घर स्वच्छ ठेवतो. त्याचा स्पर्श झाला किंवा अंगावर चिरडला गेला तर थोडा त्रासदायक असे म्हणतात. त्याच्या पुष्कळ जाती, रंगावरून व घर बांधायच्या पद्धतीवरून ठरतात. असो आठ पायांचा हा छोटासा प्राणी सृष्टीच्या विविधतेचे एक अंग आहे एवढे मात्र नक्की.

पर्यावरण रक्षणासाठी माणसे ज्या 5R(reduce, reuse, recycle, refuse, recover) चा वारंवार गवगवा करतात, ते तर याच्या पचनीच पडलेले असतात. कारण ज्या ज्या वेळी तो नवीन जाळं तयार करतो, तेव्हा पहिले खाऊन पचवतो, शक्ती मिळवतो आणि परत शरीरातून काढलेल्या धाग्याने नवीन जाळे तयार करतो. फारतर एक तासाचा कालावधी. ही जाळ्याची तोडमोड ध्येयपूर्तीपर्यंत सुरू असते. एकदा का अंडी घातली की कार्यभाग संपला. मग पसारा आवरून रामराम. राहिलाच एखादा जाळ्याचा धागा तर तो इतर पक्षांचे आवडते खाद्य. त्यातून परोपकारही साधला. सारेच अजब!

‘एका कोळीयाने घर बांधलेले ना कळस ना पाया रे’ खरं आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ए. आय…… भविष्याचा मार्ग” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “ए. आय… भविष्याचा मार्ग” ☆ श्री जगदीश काबरे ☆

मागच्या वर्षा-दीड वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला वाढू लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर कपात होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण त्याच वेळेला नवीन प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होणार, अशी आशाही या क्षेत्रातील तज्ञ दाखवू लागले आहेत. माझ्यासारख्या मागच्या शतकात जन्मलेल्या माणसाला ही सगळी दुनिया अद्भुतच वाटत आहे. आमच्या पिढीने कधीकाळी या सगळ्या गोष्टी स्वप्नातसुद्धा आणल्या नव्हत्या त्या आज नवीन पिढी जन्मल्यानंतर लगेच वापरायला सुरुवात करते.

तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जुन्या नोकऱ्या जाऊन नवीन प्रकारच्या कोणत्या नोकऱ्या निर्माण होणार हे समजून घेण्यासाठी मी ’एआय’ म्हणजे ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे नेमके काय प्रकरण आहे आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो या विषयावर तज्ञांनी लिहिलेली पुस्तके वाचायला सुरुवात केली. वाचताना माझ्या लक्षात आले की, त्यातील बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी कल्पनातीत आहेत. पण आजच्या तरुण पिढीने त्या जर समजून घेतल्या तर त्यांचे भविष्य उज्वल आहे. तेव्हा माझ्या वाचनातून मला जे काही आकलले त्याची सूत्र पद्धतीने या लेखात मांडणी केलेली आहे.

बदल हा निसर्गाचा जसा स्थायीभाव आहे तसाच माणसाच्या आयुष्यातही बदल घडणारच. तेव्हा त्या बदलानुसार माणसानेही बदलणे क्रमप्राप्त आहे. त्या बदलाला अभ्यासाने प्रकट होत धैर्याने सामोरे जाणे हाच जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे. जो बदलणार नाही तो मागे पडणार… थोडक्यात जो थांबला तो संपला. तेव्हा तरुणांनो, या एआय मुळे ज्या प्रकारच्या नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत त्याचा अभ्यास करायला लागा, हे सांगण्यासाठी विदर्भातून प्रसिद्ध होणाऱ्या ’जनयात्रा’ वर्तमानपत्रात मी हा लेख लिहिला आहे. तो असा…

ए. आय. मुळे निर्माण झालेल्या नव्या नोकरीच्या संधी : तरुणांसाठी भविष्याचा नवा मार्ग – जगदीश काबरे

आजचा जगाचा चेहरा बदलवणारे तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता—Artificial Intelligence, किंवा थोडक्यात ‘ए. आय. ’. माणसाच्या विचार, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता याचे अनुकरण करणारे हे तंत्रज्ञान आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरले आहे. ए. आय. म्हणजे फक्त रोबोट्स नाहीत, तर भाषांतर करणारी साधने, व्हॉईस असिस्टंट्स, स्मार्टफोनवरील कॅमेऱ्यांचे ऑटोफोकस, वैद्यकीय निदान करणारे सॉफ्टवेअर, ग्राहकांच्या सवयी ओळखून जाहिराती तयार करणारे अल्गोरिदम्स, अशा असंख्य क्षेत्रांतील उपयोग याचाच एक भाग आहेत. काही जणांना वाटते की ए. आय. मुळे मानवी नोकऱ्या नाहीशा होतील, परंतु वास्तविकता अशी आहे की ए. आय. मुळे तितक्याच वेगाने नव्या प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होत आहेत. विशेषतः तरुणांसाठी या क्षेत्रात सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि विश्लेषणशक्ती यांचा सुंदर मिलाफ असलेले करिअरचे नवे दरवाजे उघडले आहेत.

ए. आय. आणि नोकऱ्यांचा बदलता पट लक्षात घेतला तर अनेक अभ्यास सांगतात की, ज्या नोकऱ्या पुनरावृत्तीच्या स्वरूपाच्या आहेत—उदा. डेटा एंट्री, साधे लेखापरीक्षण, ग्राहक सेवा, किंवा मूलभूत भाषांतर—त्या मोठ्या प्रमाणावर ए. आय. द्वारे हाताळल्या जात आहेत. पण त्याच वेळी मानवी सर्जनशीलता, तर्कशक्ती, भावना आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये ए. आय. आधारित नव्या नोकऱ्या वाढत आहेत. या नव्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ए. आय. शी संवाद साधता यायला हवे, त्याचे परिणाम समजून घ्यायला हवे आणि मानवी समाजासाठी उपयुक्त दिशा देण्यासाठी त्याला वापरता यायला हवे.

ए. आय. च्या नव्या युगातील प्रमुख कौशल्य म्हणजे ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’. हे या नव्या क्षेत्रातील सर्वात चर्चित आणि मागणी असलेले कौशल्य आहे. ए. आय. मॉडेल्स—जसे की चॅट जीपीटी, क्लाऊड, जेमिनी, मीडजर्नी यांना योग्य प्रश्न, सूचना आणि संदर्भ देऊन अपेक्षित आणि अचूक उत्तर मिळवणे ही या कामाची कला आहे. या मॉडेल्सना दिलेल्या सूचनेला “प्रॉम्प्ट” म्हणतात. चांगला प्रॉम्प्ट म्हणजे ए. आय. कडून योग्य प्रकारची, सखोल आणि तर्कशुद्ध माहिती मिळवण्याची गुरुकिल्ली. उदाहरणार्थ, एखाद्या जाहिरात कंपनीला नव्या उत्पादनासाठी प्रचार मोहीम तयार करायची आहे. जर त्यांनी ए. आय. ला फक्त ’नवीन शीतपेयासाठी जाहिरात तयार करा’, असा प्रॉम्प्ट दिला, तर ए. आय. सर्वसाधारण मजकूर तयार करेल. पण एक प्रशिक्षित प्रॉम्प्ट इंजिनिअर असे लिहील की, ’तरुणाईत ऊर्जा आणि आनंद निर्माण करत घट्ट मैत्री साधण्यासाठी शीत पेयाच्या ब्रँडची आकर्षक आणि उत्साहवर्धक शब्दामध्ये मराठी जाहिरात करा. ’ तर यामुळे तयार होणारे उत्पादन अधिक विशिष्ट, स्थानिक आणि प्रभावी ठरते. म्हणूनच, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे एक प्रकारे भाषिक आणि तांत्रिक कौशल्यांचा संगम आहे.

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त इंग्रजी किंवा मराठी भाषेचे ज्ञान पुरेसे नाही. डेटा मॉडेल्स, मशीन लर्निंगचे प्राथमिक तत्त्व, आणि ए. आय. च्या कार्यपद्धतींचे आकलन असणे आवश्यक आहे. वापरकर्त्याचा हेतू समजून त्यानुसार ए. आय. ला योग्य दिशेने मार्गदर्शन करणे, परिणाम तपासून त्याचे विश्लेषण करणे, आणि चुकीच्या प्रतिसादांवर सुधारणा सुचवणे, अशी सर्व कौशल्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा भाग आहेत. आज अनेक कंपन्या ’ए. आय. इंटरॅक्शन डिझायनर प्रॉम्प्ट आर्किटेक्ट, ए. आय. कंटेंट स्पेशालिस्ट’, अशा पदांसाठी भरती करत आहेत.

प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगइतकेच महत्त्वाचे दुसरे क्षेत्र म्हणजे डेटा सायन्स म्हणजे विदा शास्त्र. ए. आय. चा आधारस्तंभ म्हणजे विदा. विदा गोळा करणे, तिचे वर्गीकरण करणे, चुकीची विदा गाळणे आणि मॉडेल्सना शिकवण्यासाठी त्याचा वापर करणे, या सगळ्या प्रक्रियेत विदा शास्त्रज्ञाची भूमिका निर्णायक असते. तसेच ’ए. आय. मॉडेल ट्रेनर’ किंवा ’डेटा एनोटेटर हीसुद्धा महत्त्वाची पदे निर्माण झाली आहेत. या कामात माणसाला योग्य उदाहरणे दाखवून ए. आय. ला शिकवायचे असते. उदा. फोटोमधून मांजर आणि कुत्रा ओळखणे, किंवा मजकुरातून भावना ओळखणे. या प्रकारचे काम मानवी अभिप्रायावर आधारित शिक्षण म्हणून ओळखले जाते.

ए. आय. च्या मदतीने आता लेखन, चित्रकला, संगीतनिर्मिती, व्हिडिओ एडिटिंग आणि डिझाइन या सर्जनशील क्षेत्रांत प्रचंड बदल घडला आहे. ‘जनरेटिव्ह ए. आय. ’ ही अशी प्रणाली आहे जी मजकूर, प्रतिमा, ध्वनी किंवा व्हिडिओ तयार करू शकते. त्यामुळे ’ए आय कंटेंट क्रियेटर’, ’ए आय व्हिडिओ एडिटर’, ’ए आय म्युझिक कंपोजर’, ’ए आय आर्ट क्रिएटर‘ अशा अनेक नव्या पदांची मागणी वाढली आहे.

आज अनेक तरुण चॅट जीपीटी किंवा क्लाऊडसारख्या साधनांचा वापर करून स्क्रिप्ट लेखन, ब्लॉग लेखन, किंवा मार्केटिंग कंटेंट तयार करून फ्रीलान्सिंग करत आहेत. काही जण ’मीडजर्नी’ आणि ’डाल-ई’ वापरून डिजिटल आर्ट तयार करतात, ज्याची विक्री NFT बाजारात किंवा ऑनलाइन गॅलरीमध्ये केली जाते. (NFT बाजार हा असा एक अद्वितीय डिजिटल मालमत्ता बाजार आहे, जिथे डिजिटल कला, संगीत, गेमिंग मालमत्ता आणि इतर संग्रहणीय वस्तूंची मालकी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे सत्यापित केली जाते.) त्यामुळे ए. आय. च्या माध्यमातून स्वावलंबी व्यवसाय निर्माण करण्याची संधीही वाढली आहे.

आरोग्य क्षेत्रात ए. आय. चा वापर निदान प्रक्रियेत वाढत आहे. एक्स-रे, एमआरआय स्कॅन किंवा रक्तातील घटकांचे विश्लेषण ए. आय. द्वारे जलद आणि अचूकरीत्या केले जाते. त्यामुळे ’ए आय मेडिकल डाटा एनॅलिस्ट’, ’हेल्थकेअर डेव्हलपर’, ’बायोइन्फॉर्मेटिक इंजिनियर’, अशी पदे तयार झाली आहेत.

शेतीत ए. आय. आधारित ‘प्रिसिजन फार्मिंग’ तंत्रज्ञानामुळे पिकांची वाढ, मातीतील पोषण आणि हवामानातील बदल यांचे निरीक्षण करता येते. यासाठी ए. आय. ड्रोन ऑपरेटर, विदा विश्लेषक, आणि कृषी-सल्लागार अशा पदांची गरज आहे.

शिक्षण क्षेत्रातही ’ए आय शिक्षक’, ’ए आय प्रशिक्षणासाठी तयार केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचा डिझायनर’ अशी नव्या पिढीची पदे निर्माण होत आहेत. शिक्षक आणि ए. आय. यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वैयक्तिक शिकवणी आणि विश्लेषण देण्याचे काम या पदांवर होते.

दुसऱ्या बाजूला ए. आय. जसजसे प्रगत होत आहे, तसतसे त्याच्या दुरुपयोगाचे धोकेही वाढत आहेत. बनावट माहिती – ज्याला आपण फेक न्यूज म्हणतो ती, डीपफेक व्हिडिओ, आणि विदा गोपनीयतेचे प्रश्न गंभीर झाले आहेत. त्यामुळे “ए आय एथिक्स विशेषज्ञ’, ’ए आय सायबर सुरक्षा रक्षक’, ’ए आय ची धोरणे ठरवणारा संशोधक’ अशा पदांना मोठी मागणी आहे. हे तज्ञ ए. आय. प्रणाली नैतिक, पारदर्शक आणि सुरक्षित राहतील यासाठी मार्गदर्शक धोरणे तयार करतात.

भारतासारख्या देशात ए. आय. वर आधारित स्टार्टअप्स झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य, वित्तीय सेवा, शिक्षण, वाहतूक, कृषी, आणि शासन व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत ए. आय. चा वापर करून नव्या संधी निर्माण होत आहेत. ’ए आय सल्लागार’, ’चॅटबोट निर्माते’, ’व्हॉइस इंटरफेस डिझाईन’, ’प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स’ अशा सेवांची मागणी वाढल्यामुळे तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची मोठी संधी मिळाली आहे.

ए. आय. साठी आवश्यक शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी संगणक विज्ञान, गणित, सांख्यिकी, डेटा सायन्स, आणि भाषिक तंत्रज्ञान यांचा अभ्यास उपयोगी ठरतो. भारतातील अनेक विद्यापीठे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स जसे की Coursera, edX, NPTEL, IITs, आणि Google AI कोर्सेस, हे मोफत किंवा सशुल्क प्रमाणपत्र अभ्यासक्रम देतात. ‘Python’, ‘TensorFlow’, ‘PyTorch’, ‘Hugging Face’ यांसारखी साधने शिकणेही आवश्यक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्यात जिज्ञासा आणि शिकण्याची तयारी हवी. कारण ए. आय. क्षेत्र झपाट्याने बदलत आहे आणि सतत नवीन तंत्रज्ञान येत आहे.

जरी ए. आय. अनेक कामे जलद आणि कार्यक्षमपणे करत असले, तरी त्याला मानवी संवेदना, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी शिकवावी लागते. म्हणूनच भविष्यातील ए. आय. व्यावसायिकांनी फक्त तंत्रज्ञान नव्हे तर मानवतावाद, मानसशास्त्र, आणि समाजशास्त्राचाही अभ्यास केला पाहिजे. मशीनच्या मर्यादा समजून त्याचा वापर समाजाच्या प्रगतीसाठी करण्याची दृष्टी तरुणांमध्ये असली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटेमुळे नोकऱ्यांच्या स्वरूपात झालेला बदल अपरिहार्य आहे, परंतु तो विनाशकारी नाही. उलट, ज्यांना नवे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ए. आय. मुळे जगात सर्जनशीलता, विश्लेषण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांचा संगम घडत आहे. “प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग”, “डेटा सायन्स”, “ए. आय. एथिक्स”, “जनरेटिव्ह क्रिएटिव्हिटी” आणि “सायबरसुरक्षा” ही नव्या युगातील प्रमुख क्षेत्रे ठरत आहेत.

म्हणून आजचा तरुण जर या बदलत्या जगाकडे घाबरून न पाहता शिकण्याच्या दृष्टिकोनातून पाहू लागला, तर त्याच्यासाठी नवी युगनिर्मिती शक्य आहे. ए. आय. ही माणसाची जागा घेणारी प्रणाली नाही, तर माणसाची क्षमता अनेक पटींनी वाढवणारी साधनशक्ती आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सुसंस्कारित विचारशक्ती यांच्या संगमातूनच तरुण पिढी ए. आय. च्या मदतीने अधिक न्याय्य, सर्जनशील आणि प्रगत समाजाची निर्मिती करू शकते.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “नो प्रॉब्लेम, बोला” वखरेसाहेब म्हणाले. मनाशी नेमकं कांहीच ठरवलेलं नसल्याने जे आपल्या मनात आहे ते सगळं हातचं काहीही राखून न ठेवता मोकळेपणानं बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. गेल्या दोन दिवसात यासंदर्भात घडलेलं सगळं आणि त्यावरच्या माझ्या मनात उमटलेल्या त्या त्या वेळच्या प्रतिक्रिया यांचंच उत्स्फूर्त शब्दरूप माझ्याही नकळत मनाच्या तळातून उत्कटतेनं व्यक्त होत राहिलं..! )

“तसं पाहिलं तर प्रभूदेसाई आणि सहस्त्रबुद्धे दोघेही कालपरवापर्यंत तरी माझ्यासाठी अनोळखीच होते. ” मी म्हणालो. ” कदाचित दोघांनाही मी प्रथमच

भेटल्यामुळेही असेल घडलेल्या प्रसंगाकडे मी तिऱ्हाईत नजरेने पाहू शकलो. तरीही या सर्व प्रकरणात दोघांपैकी नेमकं कुणाचं चुकलं याचा खल मधे प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर आज करणं निरर्थकच वाटतं. तीन वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीचा आज पंचनामा करण्यासारखा तो केवळ एक उपचारच ठरेल. त्याऐवजी ही प्रदीर्घ काळ विलंबित राहिलेली तक्रार सहस्त्रबुध्देंनी विनाविलंब मागे घेण्यासाठी कांही करता येईल कां याचा विचार करणं याक्षणी गरजेचं आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी काय करायला हवं ते ठरवूया. “

” पण सहस्त्रबुद्धे तक्रार मागं घ्यायला सहजासहजी तयार होतील? “

” सहजासहजी नाही होणार. तो त्यांच्यापुरता तरी प्रेस्टीज इश्यूच बनलेला आहे. प्रभूदेसाईंची भूमिकाही मला तरी तितकीच ताठर आहे असंच वाटतंय. सहस्त्रबुध्देंचं समाधान होईल अशी शिक्षा प्रभूदेसाईंना व्हायला हवी असा त्यांचा आग्रह आहे आणि तोच आपल्यासाठी मोठा अडसर ठरायची शक्यता आहे. प्रभूदेसाईंची चूक आहे असं एक वेळ गृहित धरलं तरी कोणत्या चुकीला काय शिक्षा करायची हे बॅंकेच्या नियमांप्रमाणेच ठरवायला हवं. पण त्याने सहस्त्रबुद्धेंचं समाधान होणं अवघड आहे. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करावा लागेल पण ते त्यांचा कल पाहून. त्यातून कांही मार्ग सापडला तर प्रभूदेसाईंनाही थोडं नमतं घ्यायला लावणं हे ओघानं आलंच. पण ती नंतरची गोष्ट. “

“प्रभूदेसाईचं खरंच काही चुकलंय असं वाटतंय तुम्हाला? “

“ति-हाईतपणे विचार केला तर हो. मुख्य म्हणजे ‘साॅरी’ या शब्दाचं महत्त्व आणि शक्ती कुणीही कधीच विसरू नये. या प्रकरणात प्रभूदेसाईंनी ती ओळखली नव्हती. स्वत:चं कांहीतरी चुकलंय हे त्यांना योग्यवेळी जाणवलं असतं तर वाद सुरू होण्यापूर्वीच मिटला असता. एक पाऊल योग्यवेळी मागं घेणाराच दहा पावलं पुढं जाऊ शकतो. प्रभूदेसाईंना हे या प्रकरणामुळे कायम लक्षात राहिल असं वाटतं.

दुसरी गोष्ट प्रभूदेसाईंना सहस्त्रबुद्धे आजोबा हे नेहमीच तक्रारखोर म्हणून ‘अनवाॅंटेड कस्टमर’च वाटत असत. उलट

वस्तूस्थिती ही आहे कीं सहस्त्रबुध्दे हे एक साधे पेन्शनर कस्टमर आहेत. बँकेत ते फक्त दोन कारणांसाठीच यायचे. पेन्शन काढायला आणि महागाईभत्ता वाढीचा ठराविक अंतराने मिळणारा फरक जमा झालाय कां हे पहायला. सेंट्रल व स्टेट गव्हर्नमेंट पेन्शनर्सची खाती आणि त्या संदर्भात येणाऱ्या सर्क्युलर्सचा अभ्यास करून देय रक्कम योग्य वेळेत पेन्शनर्स खातेदारांच्या पेन्शनखात्यांमधे जमा करणे ही खरंतर बँकांचीच जबाबदारी. दैनंदिन कामातल्या बिझी शेड्यूलमधे ही किचकट कामे नेहमीच दुर्लक्षित रहाणं हा सार्वत्रिक अनुभवच आहे. बऱ्याच ब्रॅंचेसमधे सहस्रबुद्धेंसारख्या अभ्यासू आणि जाणकार पेन्शनरला एखादा क्लार्क मदतीला देऊन ती सर्क्यूलर्सची माहिती समजून घेऊन त्या कामांना प्राधान्य देणं जाणीवपूर्वक केलं जातंही. स्वतःची नेमकी अडचण सांगून, सहस्त्रबुध्देंशी मोकळेपणाने बोलून पेन्शनर्सच्या संदर्भातली कामे प्रभूदेसाई अशा पद्धतीने सहजसुलभपणे पूर्ण करू शकले असते. पण तसं न करता त्यांच्यावर ‘तक्रारखोर’ असा शिक्का मारून त्यांना मोडीत काढणं प्रभूदेसाईंना सोयीचं वाटलं आणि मन कलुषित व्हायला तेच कारणीभूत ठरलं. निदान ब्रॅंचमॅनेजर या पदावर काम करणाऱ्याने तरी सामोपचार आणि सहकार्य यांचं महत्त्व ओळखून नियमानुसार काम करतानाही सर्वांच्याच हिताचं ठरेल असा अॅप्रोच ठेवायलाच हवा असं मला वाटतं.

त्यादिवशी ज्या मन:स्थितीत सहस्त्रबुद्धे बँकेत आले होते याचा विचार केला तर ब्रँचमधे प्रवेश केल्यापासूनचा प्रभूदेसाईंचा त्यांच्या बाबतीतला अॅप्रोच कुणालाही खटकणं सहाजिकच होतं. सहस्त्रबुद्धेना पाहून ‘आता हा माणूस सकाळी सकाळी माझं डोकं खायला कशाला आलाय? ‘ हाच विचार प्रभूदेसाईंच्या मनात आल्यासारखं ते त्यांना सातत्याने टाळतच राहिले होते. त्यांच्यानंतर आलेल्या महत्वपूर्ण ग्राहकाला प्राधान्यक्रमाने अटेंड करणं चुकीचं नसलं तरी निदान सहस्त्रबुद्धे दुसऱ्यांदा केबिनमधे आले तेव्हा तरी त्यांचं (वरवर कां होईना) हसतमुखाने स्वागत करून, ”काय काम आहे? ” असं अगत्याने विचारून कामाचं स्वरूप ते जाणून घेऊ शकले असते. फक्त बॅंकेचाच विचार करायचा म्हंटलं तरीही क्षणार्धात हातावेगळं करता आलं असतं इतकं किरकोळ काम होतं त्यांचं. पण सहस्त्रबुध्देंच्यासाठी तेच काम अतिशय निकडीचं तर होतंच आणि तितकंच महत्वाचंही. त्या कामाचं स्वरूप समजल्यानंतर तरी प्रभूदेसाई अकाऊंटंला बोलावून त्याच्यावर ते काम सोपवू शकले असते आणि प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटला असता. पण घडलं वेगळंच. ‘मी बोलावल्यानंतरच त्यांनी केबिनमधे यायला हवं.. ‘ हा प्रभूदेसाईंचा दुराग्रह समर्थनीय नक्कीच नव्हता. निदान एका जबाबदार ब्रॅंच मॅनेजरकडून तरी हे अपेक्षित नव्हतं असं मला वाटतं. बायको नुकतीच गेल्यानंतरची समोर उभ्या एका वृध्द ग्राहकाची मनोवस्था ब्रॅंचमॅनेजरला माहित नसणं गृहित धरलं तरी कांही कामानिमित्त केबिनमधे

आलेल्या सामान्य ग्राहकाला निदान आपुलकीची वागणूक देण्याचं भान तरी त्यांनी राखायला हवं ना? ते राखलं गेलं असतं तर त्या ग्राहकाचं काम लक्षपूर्वक समजून घेता आलं असतं. आणि त्यामुळे त्या वृध्द ग्राहकाच्या मन:स्थितीची जाणीवही त्याने न सांगताच झाली असती. त्यानंतर आपसूकच आलेले सांत्वनाचे दोन शब्दही त्याचं समाधान करायला पुरेसे ठरले असते. पण ते काय सांगताहेत याच्याकडे प्रभूदेसाईंचं पूर्ण लक्षच नव्हतं. या माणसाला कसं घालवायचं एवढाच विचार ते करत होते. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती त्यांना समजूच शकली नाही. शिवाय त्यानंतरचं त्यांचं लागट असं तोडून बोलणं तर कुणालाही संताप यावा असंच होतं. या पार्श्वभूमीवरची त्या विशिष्ट मन:स्थितीत सहस्त्रबुध्देंकडून उमटलेली टोकाची प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल कुणालाही किंव वाटावी अशीच होती. याक्षणी नकळत कां असेना आपल्याकडून अक्षम्य चूक झालीय ही जाणीव प्रभूदेसाईंना होणं अपेक्षित होतं. आणि ती न होणंच पुढच्या अरिष्टाला आमंत्रण देणारं ठरलं. हे सगळं सांगण्यामागे प्रभूदेसाईंच्या सारख्या स्टार परफॉर्मरला दोष देण्याचा माझा उद्देश नाहीये. निर्माण झालेल्या परिस्थितीचं ति-हाईत नजरेनं विश्लेषण करताना जे जाणवलं ते मांडणं आवश्यक वाटलं एवढंच. या सगळ्यामुळे निर्माण झालेलं सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनातलं दुखावलेपण समजून घेऊन त्याची तीव्रता कमी करायचा प्रयत्न करणं अगत्याचं आहे असं मला वाटतं. तरच निर्माण झालेला हा प्रश्न पुढे योग्य पद्धतीने सोडवणं सोपं जाईल. “

माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असताना वखरे साहेब कांहीसे गंभीर झाले होते. मी बोलायचं थांबताच ते भानावर आले.

“हे खरंच खूप विचित्र आहे. यापुढं हे प्रकरण आणखी न चिघळता सामोपचारानं मिटवायलाच हवं. प्रभूदेसाईला हे सांगणं फारसं अवघड नाही. मी बोलेन त्याच्याशी. पण सहस्त्रबुद्धेंचं काय? ते हटूनच बसले तर? “

“मी उद्या सकाळीच भेटतो सहस्त्रबुद्धेना. बोलतो त्यांच्याशी. बाकी कांही नाही तरी ते कसा प्रतिसाद देतात हे तरी समजेल. “

त्या दिवसापुरता हा विषय असा अधांतरीच राहिला. मनात विचार सुरू झाले ते उद्या सकाळी त्यांना भेटल्यानंतर काय बोलायचं याचेच.

नियोजित एम्. डी. मिटींगमुळे

निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची थेट कल्पना सहस्त्रबुध्देना देणं आमच्या निर्णयप्रक्रियेत अडसर निर्माण करणारं ठरू शकतं असतं. कदाचित ते ऐकून सहस्त्रबुद्धे प्रभूदेसाईना अडचणीत आणण्यासाठी तडजोड करणं नाकारतील ही भीती होतीच. अधिक उशीर न होता सहस्त्रबुध्देना लवकरात लवकर न्याय मिळावा ही माझ्या मनातली प्रामाणिक भावना योग्य पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचवणं एवढंच माझ्या हातात होतं. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही इच्छा असूनही मी त्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. काय करायचं ते ‘तो’ पाहून घेईल असं म्हणून सगळं त्या’च्यावर सोपवण्याशिवाय माझ्या हातात दुसरं होतंच काय?

त्या त्या क्षणापुरते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे असे प्रसंग कधी ना कधी प्रत्येकाच्याच आयुष्यात अचानक निर्माण होतात आणि आता एखादा चमत्कार घडल्याशिवाय यातून मार्ग निघणं शक्यच नाही असं वाटण्याइतके आपण हतबल होऊन जातो. मीही याला अपवाद नव्हतो. अशा प्रत्येकवेळी माझ्या मनावरचं सगळं ओझं ‘तो’च आपसूक उतरवून घेतो. मग जे कांही घडतं ते सहजपणे योगायोगानेच घडलंय असं वाटावं असंच असतं, पण माझ्यापुरता त्या क्षणी तरी तो चमत्कारच असतो. अतिशय अकल्पित आणि ‘त्या’चा परीसस्पर्शच वाटावा इतका अतर्क्यही..!

दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहस्रबुद्धे आजोबांच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मनात विचार होते ते आता त्यांच्याशी काय बोलायचं याचेच. मनातली हतबलता कधीच विरून गेली होती. अनिश्चिततेचा तर लवलेशही नव्हता. हीच पुढे घडू पहाणाऱ्या चमत्काराची सुरूवात आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाही नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत आहे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? विविधा ?

☆ तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत आहे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत आहे. 🌹

अनेक आजार हे प्रत्यक्षात आजार नसतात — ते वाढत्या वयानुसार शरीरात दिसणारी नैसर्गिक चिन्हे असतात.

बीजिंगमधील एका रुग्णालयाच्या संचालकांनी वयोवृद्धांसाठी दिलेल्या पाच सल्ल्यांकडे लक्ष द्या —

तुम्ही आजारी नाही, फक्त वय वाढत आहे.

तुम्हाला वाटणारी अनेक “लक्षणे” ही प्रत्यक्षात शरीर वृद्ध होत असल्याची नैसर्गिक चिन्हे आहेत.

—

1️⃣ स्मरणशक्ती कमी होणे

हे अल्झायमर नाही. ही मेंदूची स्वतःला जपण्याची एक पद्धत आहे.

घाबरू नका — मेंदू जुना होत आहे, आजारी नाही.

तुम्ही चावी कुठे ठेवली हे विसराल, पण स्वतः शोधून काढू शकत असाल, तर ते विस्मरण (डिमेन्शिया) नाही.

—

2️⃣ चालण्याचा वेग कमी होणे किंवा पाय अस्थिर होणे

हे पक्षाघात नाही, तर स्नायू कमकुवत होण्याचे परिणाम आहेत.

उपाय औषध नाही — अधिक हालचाल हा उपाय आहे.

—

3️⃣ झोप न येणे

आजार नाही, मेंदू आपली लय बदलत आहे.

झोपेची रचना बदलते आहे. झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहू नका —

त्याने पडणे, विस्मरण, अशक्तपणा वाढतो.

सर्वोत्तम झोपेचे औषध: दिवसा सूर्यप्रकाशात वेळ घालवा,

आणि नियमित दिनक्रम पाळा.

—

4️⃣ अंगदुखी

हे संधिवात नाही, तर वृद्धत्वामुळे मज्जातंतू कमकुवत होण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.

—

5️⃣ हातपाय सर्वत्र दुखतात असे अनेक जण सांगतात.

“हे संधिवात आहे का? हाडांची वाढ आहे का? ”

हाडे कमकुवत होतात, पण ९९% अंगदुखी हा आजार नाही.

मज्जासंवेदना मंद होतात आणि त्यामुळे वेदना अधिक जाणवतात —

याला सेंट्रल सेंसिटायझेशन म्हणतात.

ही वृद्धावस्थेतील सामान्य स्थिती आहे.

वेदनाशामक औषधे उपाय नाहीत.

उपाय: हलका व्यायाम, फिजिओथेरपी, पायांना गरम पाण्याचा शेक,

हलकी मालिश — औषधांपेक्षा प्रभावी आहेत.

—

6️⃣ वैद्यकीय तपासणीत दिसणारी काही “असामान्य” मूल्ये

तीही आजार नसतात — मानके जुनी असल्यामुळे ती अशी दिसतात.

—

7️⃣ जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे की

वयोवृद्धांसाठी तपासणीची मानके शिथिल करावीत.

थोडासा जास्त कोलेस्ट्रॉल त्रासदायक नाही —

असे लोक जास्त जगतात!

कारण कोलेस्ट्रॉल हार्मोन्स व पेशींच्या भिंती बनवण्यासाठी आवश्यक असतो.

खूप कमी असल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

चीनमधील मार्गदर्शक तत्वांनुसार वृद्धांसाठी रक्तदाबाचे लक्ष्य <150/90 mmHg आहे,

तर तरुणांसाठी <140/90.

वृद्धत्वाला आजार म्हणून पाहू नका; बदलांना रोगलक्षणे म्हणून ओळखू नका.

—

8️⃣ वृद्ध होणे हा आजार नाही —

 ते जीवनाचा नैसर्गिक प्रवास आहे.

—

वयोवृद्ध आणि त्यांची मुले यांच्यासाठी काही सूचना:

1️⃣ प्रत्येक अस्वस्थता म्हणजे आजार नाही, हे लक्षात ठेवा.

2️⃣ भीती ही वृद्धांची सर्वात मोठी शत्रू आहे. तपासणी अहवालांचा किंवा जाहिरातींचा गुलाम होऊ नका.

3️⃣ मुलांचे कर्तव्य फक्त आई-वडिलांना रुग्णालयात नेणे नाही —

त्यांच्यासोबत फिरा, उन्हात बसा, बोला, जेवा,

आणि भावनिक नाते टिकवा.

वय वाढणे शत्रू नाही;

ते जगण्याचेच दुसरे नाव आहे.

स्थिर बसणे — हेच खरे शत्रू आहे!

🌿 आरोग्यदायी रहा! ☘️

एका ब्राझिलियन कॅन्सर-तज्ज्ञाचे विचार:

1️⃣ वृद्धत्व अधिकृतरीत्या ६०व्या वर्षी सुरू होते आणि ८० पर्यंत टिकते.

2️⃣ “चौथी अवस्था” — ८० ते ९० वयदरम्यान.

3️⃣ “दीर्घायुष्य” ९० पासून मृत्यूपर्यंत टिकते.

4️⃣ वृद्धांचे सर्वात मोठे संकट म्हणजे एकटेपणा.

जोडप्यातील एक जण आधी जातो, आणि वैधव्य हे कुटुंबासाठीही ओझं वाटू शकतं.

म्हणून मित्रांशी नातं टिकवा, भेटत राहा —

मुलं आणि नातवंडांवर ओझं बनू नका (जरी ते सांगत नसले तरी).

माझा वैयक्तिक सल्ला:

आपले जीवन आपल्या हातात ठेवा —

कधी बाहेर पडायचं, कोणासोबत रहायचं,

काय खायचं, काय घालायचं,

कोणाला फोन करायचा, केव्हा झोपायचं, काय वाचायचं, काय अनुभवायचं —

हे सगळं तुम्हीच ठरवा.

नाहीतर तुम्ही इतरांवर ओझं बनाल.

—

विल्यम शेक्सपियर म्हणाले:

> “मी नेहमी आनंदी असतो, कारण मी कुणाकडून काही अपेक्षा करत नाही. ”

अपेक्षाच सर्वात मोठी वेदना आहे.

प्रत्येक समस्येचं समाधान असतं —

फक्त मृत्यूचं नाही.

*

प्रतिक्रिया देण्यापूर्वी… खोल श्वास घ्या.

बोलण्यापूर्वी… ऐका.

टीका करण्यापूर्वी… स्वतःकडे पाहा.

लिहिण्यापूर्वी… विचार करा.

आक्रमण करण्यापूर्वी… समर्पण करा.

मरायच्या आधी… आयुष्य पूर्णपणे जगा!

—

सर्वोत्तम नातं ते नसतं जिथे व्यक्ती परिपूर्ण असतो,

तर ते असतं जिथे व्यक्ती जीवनाला सुंदर व आनंदी बनवायला शिकलेला असतो.

इतरांच्या कमतरता बघा, पण त्यांच्या गुणांचे कौतुक करा.

*

तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर —

इतरांना आनंद द्या.

काही मिळवायचं असेल, तर आधी काही द्या.

स्वतःभोवती प्रेमळ, हसरे, सकारात्मक लोक ठेवा —

आणि तुम्ही स्वतः तसले बना.

—

जीवन कठीण झालं तरी, डोळ्यात अश्रू असले तरी,

हसतमुखाने उठा आणि म्हणा —

“सगळं ठीक होईल, कारण आपण प्रवासात प्रगती करत आहोत! ”

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘नाकी नऊच का?’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘नाकी नऊच का?’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

जीव कासावीस होणे, घाबरा- घुबरा होणे या अर्थी ‘नाकी नऊ येणे’, ‘प्राण कंठाशी येणे’ असे वाक्प्रचार आपण वापरतो. ‘डोळ्यात प्राण आणून एखादी आई किंवा प्रिया दूरदेशी गेलेल्या आपल्या लेकराची किंवा सख्याची वाट पहाते. पण नाकी नऊच का? पाच किंवा सात का नाही? प्राण कंठाशीच का, पाठीत किंवा पोटात का नाही? डोळ्याऐवजी कानात प्राण आणून आई किंवा प्रिया का वाट पहात नाही? माझ्याप्रमाणे आपल्यालाही कधीतरी असे ‘पोरकट, भोचक, बालिश प्रश्न’ पडले असतीलच ना! असो, ‘अथ तो ज्ञानजिज्ञासा’!

शरीरात व बाहेर सर्वत्र वायुचा संचार असतोच. भारतीय शास्त्रानुसार आपल्या शरीरात दहा प्राणवायु आणि नऊ प्रमुख रंध्रे आहेत. (दोन डोळे, दोन कान दोन नाकपुड्या, तोंड, मूत्रद्वार आणि गुदद्वार) प्रत्येक रंध्राशी एक एक प्राण वसलेला आहे. व्यक्तीच्या मृत्युच्या क्षणी प्रथम या वायुद्वारे सर्व रंध्रांतून शरीरात साठलेली मलद्रव्ये शरीराबाहेर विसर्जित केली जातात. नंतर ही रंध्रे बंद होऊन सर्व नऊच्या नऊ प्राण कंठात एकत्र येऊन नाकातून बाहेर जातात. म्हणून ‘नाकी नऊ येणे’, ‘प्राण कंठाशी येणे’ म्हणजे मृत्यूच्या वेळेसारखा क्लेशदायक, गंभीर प्रसंग, अत्यवस्था निर्माण होणे होय. यालाच हिंदीत म्हणतात, ‘नाकमें दम आना।’

हिंदु शास्त्रानुसार शरीरात जे दहा प्रकारचे प्राणवायु असतात त्यांचे चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन ही महत्वाची कार्ये असतात. त्या दहातील मुख्य पंचप्राण वायु असे… प्राण, अपान, व्यान, उदान, समान. उप पंचप्राण वायु असे… नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय.

मुख्य पंचप्राणवायु व त्यांची कार्ये

१) प्राणवायुः हृदयात असून श्वास आत घेणे व बाहेर सोडणे तसेच अन्नाचे पाचन करणे हे त्याचे कार्य असते. नासिका, हृदय, नाभि, कुण्डलिनीच्या भोवताली आणि पदांगुष्ठ या ठिकाणी प्राणवायु रहातो.

२) अपानवायुः मूलाधारात वास करतो. मुख, गुह्य, लिंग, उरु, जानु, उदर, कटि, नाभि या ठिकाणी अपान वायु रहातो. मल,मूत्र, वीर्य इ. विसर्जित करणे हे त्याचे कार्य.

३) समान वायुः नाभिस्थानी वास. शरीरास संतुलित ठेवणे हे त्याचे कार्य. उदाराग्नि व सर्वांगात समान वायु रहातो.

४) उदान वायुः कंठस्थित हा वायु शरीराची वृद्धी करतो. सर्वसंधि आणि हात, पायामधे उदान वायु असतो.

५) व्यान वायुः सर्व शरीरांतर्गत देवाण-घेवाण करतो. कर्ण, नेत्र, कंठ, नाक, मुख, कपोल, मणिबंध येथे व्यान वायु रहातो.

उप पंचप्राणवायु व त्यांची कार्ये

१) नाग वायुः ढेकर देणे

२) कूर्म वायुः डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप

३) कृकल वायुः शिंक देणे.

४) देवदत्त वायुः जांभई देणे

५) धनंजय वायुः मृत्युच्या क्षणी नऊ वायु नवद्वारातून कंठात गोळा होऊन नाकावाटे निघून जातात हे आपण पाहिले. एकटा ‘धनंजय वायु’ मात्र मृत्युनंतरही शरीरात वास करून असतो. चार तासानंतर मृत देह फुगू लागतो, सडू लागतो, त्याचे विघटन होऊ लागते ते या दहाव्या धनंजय वायुमुळे!

मृत्युसमयी नऊ वायु कंठात जमून नाकावाटे बाहेर पडतात व दहावा धनंजय हा वायु शरीरातच रहातो ही सामान्य प्राणोत्क्रमणक्रिया होय. काही वेळा ‘अमुक एकाचा प्राण मुखातून गेला’ असे आपण ऐकतो. खरेच असे घडते का? तर हो, असेही घडते पण क्वचित. पुण्यवान व्यक्तीचे प्राणोत्क्रमण मुखातून होते अशी हिंदुधर्मात श्रद्धा आहे. त्यावेळी मृताचे तोंड वाकडे होते व उघडे राहते. नाभिखालील रंध्रातून प्राण गेल्यास मृत्युपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा अधोगतीला जातो, अंधःकारमय मार्गाने पुढील प्रवास करतो तर नाभिवरील शरीराच्या एखाद्या रंध्रातून प्राणोत्क्रमण झाल्यास मृताच्या आत्म्याला सद्गती लाभते, तो आत्मा प्रकाशमय मार्गाने जातो अशी मान्यता आहे.

एखाद्याची अत्यंत उत्कटतेने वाट पाहणे म्हणजे शरीरस्थ नऊही प्राणवायु डोळ्यात एकवटून प्रतीक्षा करणे. यालाच ‘डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे’ म्हणतात. डोळ्यातून प्राण गेल्यास मृत व्यक्तीचे नेत्र उघडे राहतात, विस्फारलेले दिसतात.

आता कळलं असेल, ‘नाकी नऊ येणे’, ‘प्राण कंठाशी येणे’, ‘डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे’ म्हणजे काय ते!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मनातले श्लोक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मनातले श्लोक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हे माझ्या किंवा आमच्या घरातले मनातले श्लोक आहेत. या श्लोकांची आणि श्री. समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांची कोणतीही तुलना नाही. बरोबरी तर मुळीच नाही.

रामदास स्वामींचे श्लोक मराठी मनावर जेवढे आरुढ झालेले आहेत, त्याचप्रमाणे हे मनातले श्लोक भाषांची बंधन सोडून बऱ्याच जणांच्या मनातले असू शकतात.

मनाचे श्लोक काल प्रभावी होते, आज आहेत, आणि उद्याही राहतील. आमच्या मनातल्या श्लोकांची अवस्था तेवढीच बळकट आहे. त्यांचा प्रभाव पडतोच. किंवा पडावा या साठीच प्रयत्न असतो.

मनाच्या श्लोकांचे संदर्भ तसेच असतील. आमचे मनातले श्लोक मात्र त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार बदलतात. त्यांचे संदर्भ सुध्दा बदलतात. मागच्या काही घटनांसह अगदी नजीकच्या काळात घडलेल्या गोष्टींचा प्रभाव त्यात असतो. ब्रेकिंग न्यूज सारखं ते बिंबवले जातात. आणि तो भाव चेहऱ्यावर दिसतो. त्यातल्या भावना प्रखरपणे मांडल्या नाहीत तरी नेहमी प्रखरच असतात. म्हणजे काही वेळा त्या इतक्या प्रखर असतात की भावना मांडल्या आहेत का सांडल्या आहेत हाच प्रश्न पडतो.

मनाच्या श्लोकात आचरण कसं असावं याबद्दल सांगितलं आहे असं म्हटलं, तर आमच्या मनातल्या श्लोकात त्यावेळी आचरण कसं होतं याचच विस्तृत, सखोल, संसदर्भ स्पष्टीकरण असतं. या आचरणाचा उल्लेख काहीवेळा बेताल वागणं असाही होतो.

 मनातले श्लोक हे सहसा मनाच्या श्लोकांसरखे तालात आणि मोठ्याने म्हटले गेले नाहीत तरी नुसत्या पुटपुण्यावरुन त्याच गांभीर्य लक्षात आल्याशिवाय रहात नाही. आणि ते पुटपुटणं कोणत्या स्थितीत आहे हे हालचालीवरून लक्षात येतं.

 बऱ्याचदा मनातल्या श्लोकात मनाच्या श्लोकांच्या काही ओळी, पंक्ती आम्ही जशाच्या तशा उचलतो आणि त्याचा अर्थ सद्य परिस्थितीत लावण्याचा प्रयत्न करतो.

 मना श्रेष्ठ धारीष्ट जीवी धरावे।

हि ओळ आठवली की आम्ही याचा अर्थ फक्त धारीष्ट दाखवण्यासाठी घेत थोडं धारीष्ट दाखवतो आणि मनातल्या श्लोकाचा आवाज थोडा वाढतो. आणि मग मधल्या काही ओळी सोडून पुढच्या काही पंक्ती आमच्या मनातल्या श्लोकांच्या पंगतीत बसवतो. आणि परत म्हणतो…

 न होता मनासारिखें दु:ख मोटें

आणि गप्प बसतो.

 हे मनातले श्लोक कधी ऐकावे लागतात, तर कधी ऐकवले जातात. कधीकधी तर जुगलबंदी सुध्दा होते. कधी श्रावणसरींसारखे असतात. अचानक येतात आणि थांबतात सुध्दा.

 अर्थात परिस्थिती नुसार जयपराजय हा कोणाचा यावर विचार नसतो. पण त्यामुळे परत एका शीतयुद्धाच्या किंवा सर्जीकल स्ट्राईक सारख्या गोष्टींची पुसट कल्पना येते.

 कधी कधी या मनातल्या श्लोकात काही वस्तूंचा नाद भर घातात.

हां… पण हे श्लोक कोणते? … कशासाठी? आणि… किती? … ते मात्र सांगितल्या शिवाय सुध्दा तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल… आणि आला नसेल तर ते माझ्या मनातले आहेत असं म्हणून सोडून द्यावे… 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पारिजातक…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पारिजातक… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सुगंधी फुलांबरोबर पौराणिक, धार्मिक, औषधिक महत्त्व असलेला वृक्ष म्हणजे पारिजातक. याच्या जन्माची कथा अगदी आगळी वेगळी. देवदानवानी केलेल्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्न काढली, त्यातले एक म्हणजे पारिजातक. इंद्राने हा वृक्ष आपल्या बागेत म्हणजे नंदनवनात लावला. अशा प्रकारे स्वर्गीय सौंदर्य असलेला हा पारिजातक. या वृक्षाला स्पर्श करताच देव, नर्तकी, उर्वशीचा थकवा दूर होत असे. सत्ययुगात समुद्रातून स्वर्गात केलेला हा वृक्ष, द्वापार युगात स्त्री हट्ट पुरवण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणला.

नारदांचा संचार सर्वत्र. एकदा त्यांनी पारिजातकाची फुले स्वर्गातून आणून श्रीकृष्णाला दिली. श्रीकृष्णाने ती आपली पत्नी रुक्मिणीला दिली. ती सुंदर फुले पाहून सत्यभामा ही मोहात पडली. पण ती रुक्मिणीला दिलेले पाहून क्रोधित झाली. तेव्हा श्रीकृष्णाने तो वृक्ष पृथ्वीवर आणला. सत्यभामेच्या बागेत लावला. इंद्राला श्रीकृष्णाने वृक्ष स्वर्गातून हलवला हे आवडले नाही. त्यांनी शाप दिला, ही फुले दिवसा उमलणार नाहीत आणि उमललेली थोड्याच अवधीत कोमेजून जातील. श्रीकृष्णाने वृक्ष जरी सत्यभामेच्या बागेत लावला, तरी त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडत. म्हणून गाणं ‘बहरला पारिजात दारीl फुले का पडती शेजारीl’ सत्यभामा आपली व्यथा सांगते. असा हा पारिजातक यांच्या जन्माबद्दल बऱ्याच कथा पुराणात सांगितल्या जातात.

मला मात्र लहानपणापासून अगदी आत्ता ७५ वर्षापर्यंत या झाडाचा व त्याच्या फुलांचा सहवास अखंड लाभला. बालपण कोकणात गेले. तेथे तर मागे पुढे पारिजातक. तुळशी वृंदावनाची जागा ही बहुतेक पारिजातकाच्या जवळ असते. नंतर मी मिरज, मुंबई, पुणे येथे राहिले. तेथे पारिजातक होताच. लग्न झाल्यावरही दारात पारिजातक आणि तुळशी वृंदावन. त्यामुळे पारिजातकाच्या फुलांची शानशी रांगोळी तुळशी समोर काढायचा छंद मला लागला. म्हणून म्हणावेसे वाटते,

माझ्या अंगणी पारिजात फुलतो

गंध केशराची पखरण तो करतो

अलवार फुले मी हळूच वेचिते

रचून सुरेख रांगोळी साकारते

मोहक रचना मन सुखावते

प्रभात सारी सुगंधित होते

पारिजातकाचे खरे सौंदर्य त्याच्या कळ्यात. रात्रीच्या वेळी अर्धोन्मिलीत कळ्यांचा अनुभव घेण्यासारखा आनंद नाही. सहा टोकदार पाकळ्यांच्या त्या कळ्या हिरव्या आकाशातील तारकांप्रमाणे झाडावर शोभतात. पण आकाशातील तारकांना सुगंध नाही. ती उणीव या झाडावरील तारका भरून काढतात. सकाळी घराबाहेर डोकवावे, तो पांढऱ्या केशरी रंगाच्या फुलांचा सडा आणि अजूनही टप टप फुले पडतच असतात. म्हणून बालगीत आठवते ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’. असे हे फुल म्हणजे सौंदर्य आणि सुवास यांचा मेळा. दिसायला अतिशय नाजूक.

 याचा रंग पांढरा शुभ्र नाही, तर थोडासा ओलावा असलेला मायेचा आणि देठाचा केशरी रंग म्हणजे त्यागाचे प्रतीक. म्हणजे आपल्याजवळ काहीही न ठेवता मुक्तपणे आपले वैभव उधळण करणारा. घेणाऱ्याने हवे तेवढे घ्यावे. परत दुसऱ्या दिवशीच्या कार्यासाठी मोकळा. पण फुलांचा सडा पाहणारा चार फुले घेऊनच पुढे जातो. याचा खरा बहर असतो श्रावण महिन्यात. औषधातील याचा उपयोगाला तोड नाही. कितीतरी जीवदान देणारे औषधी गुणधर्म आहेत. सौंदर्यप्रसाधनातही उपयोग.

पूजेतही महत्त्वाचे महत्त्वाचे स्थान. बायका हौसेने याची लाखोली देवाला वाहतात. प्राचीन ग्रंथात वेगवेगळे नावे आढळतात. हरसिंगर, शेफालीका, नालकुंकुम, रागपुष्पी, फुले गळून पडतात म्हणून ‘ट्री ऑफ साॅरो’ म्हणतात पण ते खटकते. पण एक मात्र खरे, ही फुले दिवसाचा प्रारंभ प्रसन्नतेने करुन देतात!

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – लता अजून गाते… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – लता अजून गाते… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तसं तर लताचा आज जन्मदिन नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग मी का लिहितो तिच्यावर? तर माझ्यासाठी ती अजूनही गातच असते. दिवसभरात कानावर तिची कुठली ना कुठली तरी गाणी पडत असतात. त्या माध्यमातून ती माझ्याशी बोलत असते आणि गातही असते. आता तुम्ही म्हणाल की लतासाठी एकेरी शब्द वापरणारा हा कोण शहाणा? पण खरं सांगू? आपल्या जवळच्या माणसाला कोणी आहो जाहो करतं का? आपली आई आपल्याला सगळ्यात जवळची असते. तिला करतो का आपण आहो जाहो? तशीच आहे लता माझ्यासाठी!

खरंतर आज ती आपल्यात नाही. पण असं कधीच वाटत नाही. ती अजूनही गात असते. तिचं कोणतेही गाणं कानावर पडलं की मन त्यात हरवून जातं. ते गाणं पूर्वी जरी ऐकलं असलं तरी आता ते ऐकताना त्यातील नवीन अर्थ, नवीन सौंदर्य प्रतीत होतं. त्यातून ती जणू बोलतच असते माझ्याशी! हा अबोल संवाद असतो. आणि बऱ्याच वेळा एकतर्फी. ती बोलत असते आणि मी ऐकत असतो. तो दैवी स्वर, त्यातील भावभावना जिवंत होऊन हृदयाला हात घालतात. (लताचं लहानपणीच नाव हृदया होतं असं म्हणतात. किती सार्थ नाव! ) गाणं ऐकताना कधी कधी डोळे नकळत पाणावतात, हातही नकळत जोडले जातात. तिच्या दिव्यत्वाला प्रणाम करण्यासाठी. कोणी असंही म्हणेल की असं कुठे असतं का? याचं आपलं काहीतरीच! कोणाला असंही वाटेल की हा वेडा आहे, भावनाप्रधान आहे. पण मला ते मान्य आहे. कुठलं तरी वेड असल्याशिवाय त्यातील आनंद कसा घेता येईल? परमेश्वराच्या भक्तीत रंगलेल्या अनेकांची अवस्था, संशोधनात गढून गेलेल्या शास्त्रज्ञांची अवस्था वेड्यासारखीच तर होती. जगाच्या दृष्टीने ते वेडेच होते आणि व्यवहारात कुचकामी. पण अशा अवस्थेमुळेच ते आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू शकले. भक्तांच्या पदरी भक्तीचा आनंद आणि फळ त्यांच्या पदरात पडलं. परमेश्वराची प्राप्ती झाली. शहाण्या आणि व्यवहारी माणसांपासून परमेश्वर बहुधा चार हात लांबच राहत असावा.

लताच्या आठवणीशिवाय जावा असा एक दिवसही जात नाही. कोणीतरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिची आठवण करून देत असतोच. नाहीतर आपल्या गीतातून ती समोर येतेच. आपण एखादा काम करत असावं आणि जवळपास हळू आवाजात एखादं गाणं सुरू असावं तसं लताचं एखादं ऐकलेलं गाणं काम करत असताना देखील मनामध्ये बॅकग्राऊंडला वाजत राहतं. त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात.

परवा कोणीतरी लतादीदी आणि पुलं देशपांडे यांनी एकमेकांना पाठवलेली पत्रे समाजमाध्यमांवर टाकली होती. या पत्रांनी लतादीदींच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. कधी फारशी शाळेत न गेलेली लता लंडनहून पुलंना किती सुंदर पत्र लिहिते! त्यांची आपुलकीने चौकशी करते. पुलं तिच्यापेक्षा वयाने मोठे म्हणून पत्राची सुरुवात तिने त्यांना ‘ चरणस्पर्श ‘असं म्हणून केली आहे.

या पत्राला पुलंनी दिलेले उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणतात की मी वयाने मोठा असल्यामुळे तुला ‘चरणस्पर्श’ असे म्हणू शकत नाही. “आणि तुझ्या लक्षावधी गीतातल्या एकाही चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे. पूर्वीचे राजे मुलुख पादाक्रांत करायचे. तू तर सारे जग ‘ पदाक्रांत ‘ केले आहे. तुझे हे सार्वभौमत्व चिरकाल टिको हीच इच्छा.” पुलंनी ‘ चरणस्पर्श ‘ जरी केला नसला तरी आपल्यासारख्या लाखो वाचकांच्या हृदयाला ‘ हृदयस्पर्श ‘ केला आहे इतके त्यांचे पत्र सुंदर आहे! ते वाचल्यावर लताबाई आणि पुलं समोर असते तर त्यांचा ‘ चरणस्पर्श ‘ केल्याशिवाय राहवले नसते. असो. पण तो योग आता नाही.

पुलंबद्दल सुद्धा रोज काही ना काही तरी समाजमाध्यमांवर येतच असते. कोणी त्यांच्यावरील एखादा लेख टाकतो, कोणी त्यांचे एखादे पत्र प्रसारित करतो, कुठेतरी त्यांच्या बटाट्याची चाळ किंवा सुंदर मी होणार यासारख्या नाटकांचे प्रयोग सुरू असतात. कोणीतरी कुठल्यातरी कार्यक्रमात त्यांच्या पत्रांचे वाचन करत असतो. कोणीतरी अप्रकाशित पुलं कार्यक्रम सादर करतो, कोणाच्यातरी कार मध्ये पुलंच्या कथांचा ऑडिओ सुरू असतो तर कुठेतरी जीए आणि सुनीताबाईंच्या पत्रांचा वाचन सुरू असतं. लतादीदी आणि पुलं सर्वव्यापी आहेत. लतादीदी आणि पुलं यांना चिरंजीवित्वाचा वर मिळाला आहे. त्यांनी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे. पुण्यात एकदा रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या एका पुस्तक विक्रेत्याकडे मला पुलंचं रवींद्रनाथ: तीन व्याख्याने हे पुस्तक मिळालं. ते मला एवढं आवडलं की त्यावरून रवींद्रनाथांबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि त्यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच माझं आनंदयात्री रवींद्रनाथ हे पुस्तक जन्माला येतंय.

म्हणूनच म्हणतो की लता, खरं म्हणजे तू आणि पुलं म्हणजे जित्याजागत्या लिजन्ड्स आहात. रोज तुमचा कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठेतरी उल्लेख होतच असतो आणि हो केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ भारतातच राहील तर पुलंच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे तुम्ही दोघांनी जग पादाक्रांत केले आहे. पूर्वी मी बद्रीनाथ केदारनाथ सहल केली होती, तिथे त्या हिमालयातील उंच आणि दुर्गम शिखरांवर तुझे स्वर ऐकू येत होते. एवढेच काय पण गेल्या जूनमध्ये मी स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा तेथील आल्प्स पर्वतावर देखील तुझ्या गीतांचे स्वर कानी पडले. माझा रोम रोम पुलकित झाला. मन अभिमानाने भरून आलं. माझ्यासारख्या तुमच्या भक्ताला अजून काय हवं! तुम्ही केवळ देश नाही जोडलात, तर विविध देशातील भारतीयांना एका सूत्राने बांधून ठेवलं. एकाने सुरांनी जग जिंकलं तर दुसऱ्याने शब्दांनी!

मी सुरुवातीला म्हटलं ना की तू अजूनही गातेस, माझ्याशी बोलतेस, ते खरंच आहे. अनेक लेखक, गीतकार तुझ्याबद्दल रोज काहीतरी बोलत असतात. अन्नू कपूर, शिरीष कणेकर, सुधीर गाडगीळ किंवा कोणीतरी तुझे किस्से किंवा आठवणी सांगत असतो. रंगोली कार्यक्रमातील निवेदिका तुझ्याबद्दल बऱ्याच वेळा काहीतरी सांगत असते. गावोगावी होणाऱ्या संगीत मैफलित तुझ्या गाण्यांशिवाय आणि आठवणींशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. गायिका आणि संगीतातील तज्ज्ञ असलेल्या मृदुला दाढे यांच्यासारखं कोणीतरी तुझ्या गाण्यांचं विश्लेषण करीत असतं. ‘ कांटोसे खींचके ये आचल ‘ या गाईड चित्रपटातील गीताच्या सुरुवातीचा आलाप लताने कसा म्हटला आहे, आणि तोच किती योग्य आहे हे त्या सोदाहरण स्पष्ट करून सांगतात. पण मला वाटतं गाताना तू स्वतः देखील एवढा विचार कधी केला नसशील कारण तुझं गाणं हे नैसर्गिक होतं. एखाद्या फुलासारखं ते आपोआप आतून उमलून येत होतं. तुझं गाणं म्हणजे एखादी सुंदर कलाकृती! एखादी सुंदर रांगोळी असावी किंवा एखादा अस्सल सोन्याचा सुंदर घडवलेला दागिना असावा तसं तुझं गाणं! ज्यांना त्याचं विश्लेषण करायचं आहे त्यांनी ते खुशाल करावं. पण ज्याप्रमाणे परमेश्वर सर्व विश्व व्यापून दशांमुळे उरला आहे असं म्हटलं जातं तशीच तू देखील या विश्लेषणाच्या पलीकडे दशांगुळे उरलेली असतेसच!

कवयित्री बहिणाबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या. त्या निरक्षर होत्या असे म्हटले जाते. लौकिक अर्थाने त्या शिकलेल्या नव्हत्या. परंतु त्यांच्या कविता किती सुंदर आहेत! अनेक शिकलेले लोक त्यांचा आपापल्या परीने अर्थ लावत बसतात. अनेक लोक त्यांच्यावर पीएचडी करतात. तसंच तुझ्या गाण्यांचं आणि संगीताचंही असावं असं मला वाटतं.

तुझं संगीत म्हणजे खरोखरच नक्षत्रांचं देणं आहे. त्याचं मोल, त्याचं तेज कधीही कमी होत नाही. हे नक्षत्रांचं देणं कितीही वाटलं तरी रिक्त न होणारं. आमचीच ओंजळ अपुरी पडते ते घ्यायला. तुझ्या गीतांबाबत असं म्हणावसं वाटतं की तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. केवळ आयुष्य स्पर्शून नाही गेला तर आयुष्य समृद्ध करून गेला! तुझ्या गीतांबाबत बोलायचं तर तूच गायलेल्या ‘ किनारा ‘ या चित्रपटातील गीताची आठवण येते. ‘ नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा

मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे…!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares