मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४३ ☆ साक्षर केली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४३ ?

☆ साक्षर केली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

मेघाने या काल पालथी घागर केली

काळी माती त्याची हिरवी चादर केली

*

वाघावाणी वागायाची काल लेक ही

वाघीणीची या लोकांनी मांजर केली

*

घर सावरण्या मीही थोडा दिलाय टेकू

छिलून माझ्या देहाची मी पाचर केली

*

पीठ घ्यायला खिशात नव्हते पैसे माझ्या

पोरांसाठी मग कोंड्याची भाकर केली

*

सावित्रीने काल सोसल्या हाल अपेष्टा

नवी पिढी ही या मातेने साक्षर केली

*

वयोपरत्वे किती बदलला सूर तुझा रे

गाताना तू कटु शब्दांची साखर केली

*

तुझ्याकृपेने मला मिळाले वैभव देवा

एक विनवणी जगतासाठी सादर केली

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीगणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीगणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

श्रीगणेश जाताना

काळजास दुःख आहे

पुन्हा आगमनाची

भक्ती रुख रुख आहे.

*

पुजा पाठ नेवैद्य

आरतीत तोच आहे

देवळी मुर्ती विना

अप्रसन्न पेच आहे.

*

आरास गजबज

सारे कसे शांत होई

मन  खाई मनास

क्षण क्षण खंत देई.

*

देवाधिराज देव

गजानन बुध्दि दाता

विरह जणू युग

आशिर्वाद दुर होता,

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्यर्थ अवडंबर केवढे प्रथांचे ते… ☆ शुभा रुद्र ☆

शुभा रूद्र 

🌸 विविधा  🌸

☆ व्यर्थ अवडंबर केवढे प्रथांचे ते… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

संस्कृती आणि परंपरेचा मूळ हेतू निसर्गाप्रती कृतज्ञता, आत्मिक समाधान आणि समाज एकत्र आणणे हा होता. दुर्दैवाने, आज सणांमधील हा खरा भाव हरवला असून केवळ दिखावा, स्पर्धा आणि अनिर्बंध अवडंबर शिल्लक राहिले आहे.

दसर्‍याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने लुटली जातात, पण दुसऱ्या दिवशी तीच पाने आणि झेंडूची फुले रस्त्यावर पायदळी तुडवली जातात; झाडे मात्र बोडकी होतात. ती पाने तोडण्यापेक्षा प्रत्येकाने एक जिवंत रोपटे लावण्याची परंपरा का सुरू करू नये?

नवरात्रात रंगीबेरंगी साड्यांचे फॅड आले, पण भोंडल्याच्या जुन्या गाण्यांमधील अर्थहीन सासुरवास आजच्या स्वतंत्र स्त्रीशी विसंगत वाटतो.

हत्तीच्या प्रतिकाभोवती खिरापतीऐवजी लहान रोपांची देवाणघेवाण करून ही प्रथा अधिक अर्थपूर्ण करता येईल.

प्रत्येक सण आज कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा दणदणाट, वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांपुरता मर्यादित झाला आहे. आवाजाचे हे प्रदूषण आजारी आणि वृद्ध माणसांचा श्वास कोंडते. आरोग्याबाबत बोलायचे तर भेसळयुक्त मावा, अतिरिक्त साखर आणि मैदा सणाच्या नावाखाली पोटात ढकलून स्वतःला आजारांच्या खाईत लोटले जाते. बाजारात वर्षभर सर्व पदार्थ सहज उपलब्ध असताना सणाचा खरा कौटुंबिक आनंदच संपला आहे.

मोबाइलच्या छोट्या पडद्यात अडकलेला माणूस निसर्गाच्या विशाल सौंदर्यापासून तुटला आहे. स्टिकर्सच्या रांगोळ्या आणि तोडलेल्या फुलांचा सडा यांत निसर्गाचा सन्मान नाही. आता गरज आहे ती पोकळ प्रथांना नाकारून, विवेकाची कास धरून, निसर्गपूरक व अर्थपूर्ण बदल अंगीकारण्याची वेळ आलेली आहे.

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पर्श …! – लेखिका : सुश्री राधा मराठे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ स्पर्श …! – लेखिका : सुश्री राधा मराठे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

“अक्का खूप आजारी आहेत. आठवण काढत आहेत. एकदा येऊन भेटून जा” असा नीरजाचा निरोप येऊन खरं तर ८-१० दिवस होऊन गेले होते पण काही ना काही कामं निघत राहिली आणि जायचं राहून गेलं. अक्का तशा माझ्या कुणीच लागत नव्हत्या. माझ्या मावशीच्या जावेची बहिण – इतका लांबचा संबंध होता आमचा.

बालविधवा होत्या – घरात तसं त्यांना काही महत्त्वाचं स्थान नव्हतंच. मग कुणा नातेवाईकाकडे काही अडचण निघाली की अक्कांची रवानगी तिथे होई. अक्का त्या घरी मिळून-मिसळून राहत, तिथली अडचण निस्तरली की दुसरीकडे कुठेतरी बोलावणं असेच, नाहीतर मग पुतण्याकडे जात. नीरजा त्यांच्या चुलतसुनेची सून. म्हणजे तशी त्यांची नातसूनच. पुतण्याच्या घरात अक्कांना थारा होता, त्यांना कधी कुणी जा म्हटलं नाही पण प्रेमाने अगत्यही दाखवलं नाही. कर्तव्य समजून त्यांचं करत राहिली ती माणसं. पण तेवढंही आजकाल कोण करतं? त्यामुळे अक्कांना फार कृतज्ञता वाटे त्यांच्याबद्दल.

एक दिवस मी अगदी वेळ काढून मुद्दाम अक्कांना भेटायला गेले. अक्कांची अगदी जुडी झाली होती. अंथरुणावर दिसतही नव्हत्या. मी त्यांच्याजवळ बसले. त्यांचा हात धरला.

“कशा आहात अक्का? ”

माझा आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडून पाहिलं. चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित उमटलं. मला अगदी भरून आलं. अक्का खूप राबल्या होत्या आमच्या घरी. माझ्या भावांच्या मुंजी, आमची सगळ्यांची लग्नं, आम्हा बहिणींची आणि भावजयांची बाळंतपणं, आईचं आजारपण असे कितीतरी प्रसंग. प्रत्येक वेळी आई हक्काने अक्कांना बोलवून घेई. त्याही लगेच येत. आल्या-आल्या त्यांच्या हातात स्वयंपाकघर सोपवून आई इतर गोष्टीत लक्ष द्यायला मोकळी होई. प्रत्येकाची आवड, आमच्या घरच्या पद्धती, चवी-ढवी सगळं बरोब्बर लक्षात असे त्यांच्या. आमच्या परीक्षा, इतर उद्योगही त्यांना पाठ असत. आमच्या घरी यायच्या वेळा लक्षात ठेवून आवर्जून काहीतरी खायला, चहा त्या तयार ठेवीत. प्रेमाने आग्रह करून खायला घालीत. आई नेहमी म्हणे, “देव तरी कसा निष्ठूर. इतकी हौस आहे संसाराची, हाताला चव आहे. पण स्वत:चा संसार काही करु शकली नाही बिचारी. सासरे त्या काळी थोड्या नव्या विचारांचे म्हणून केशवपन तरी टळलं बाईचं.

अक्कांच्या वयाचा आम्हाला कधी नेमका अंदाज यायचाच नाही. विचारलं तरी त्याही हसून टाळायच्या. आता त्या आडगावात त्यांच्या जन्म तारखेची नोंद तरी कोण करणार होतं म्हणा. पण आईपेक्षा ५-७ वर्षांनी तरी लहान असाव्यात त्या. उभं आयुष्य ह्याच्या-त्याच्या घरी चूल फुंकण्यात गेलं. कोणतंच घर कायमस्वरूपी त्यांचं झालं नाही. आयुष्याच्या अखेरीला डोकं टेकायला जागा मिळाली हेच मोठं नशीब अशी परिस्थिती.

त्यांचा हात हातात घेऊन मी त्यांची चौकशी केली. माझा हात त्यांनी अगदी घट्ट धरला. त्यांच्या त्या कृश हातात अजून बरीच शक्ती होती म्हणायची. माझा हात आपल्या गालावर घट्ट दाबून धरला. त्यांच्या डोळ्यातल्या काढत पाण्याने माझा हात ओला झाला. मला अगदी अवघडल्यासारखं झालं. एका मागोमाग एक कामे चपळाईने उरकणाऱ्या अक्का अशा विकल झालेल्या पाहून पोटात अगदी तुटलं. त्यांच्या डोक्यावर मी हात फिरवला. तोही हात आपल्या हातात घेऊन त्यांनी छातीशी अगदी घट्ट धरला. आता मला आणखीच अवघडायला झालं. तेवढ्यात नीरजा खोलीत आली. तिची चाहूल लागल्याबरोबर अक्कांनी माझे हात सोडून दिले. त्यांच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून ती म्हणाली, “चहा घ्यायला बाहेरच चला तुम्ही. इथे नको. पडू दे त्यांना शांत. ”

मी तिच्या मागोमाग बाहेर आले. तिने पुढे केलेला चहा न बोलता घेतला. ती घुटमळत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं बहुतेक. बोलू की नको अशा संभ्रमात असावी. अखेर म्हणालीच, “तुमच्या आईची आणि तुम्हा सर्वांची सतत आठवण काढतात. त्यांना फार वाटतं तुम्हा सगळ्यांबद्दल. त्यांना तुम्ही जवळच्या वाटता म्हणून एक सांगावंसं वाटतं. बोलू का? ”

“हो, हो. बोल ना. अगदी नि:संकोच बोल. ” मी असं म्हटलं खरं, पण मनातून थोडी धास्तावलेच. तिच्या प्रस्तावनेचा एकूण सूर पाहून अक्कांना तुमच्याकडे न्या असं म्हणते की काय याची सूक्ष्म भीती वाटली. ह्यांच्या अनियमित वेळा, मुलां-नातवंडांचं वेळापत्रक सगळं क्षणात मनात उभं राहिलं.

“अक्का हल्ली फार विचित्र वागतात. मुलांना जवळ बोलावतात, त्यांचे हात कुरवाळतात, त्यांना आपल्या अंगावरुन हात फिरवायला सांगतात. मुलांना नाही आवडत. या सदा कुणाच्या ना कुणाच्या घरी चूल फुंकत राहिलेल्या. मुलांना पणजी-आजी म्हणून त्यांची काही माया लागलेलीच नाही. आजोबांची काकू आपल्या घरात राहते एवढीच ओळख. आता शरीर अगदीच साथ देत नाही म्हणून इथेच पडून असतात एवढंच. बाबांकडे पाहून आम्ही काही बोलत नाही. त्यांचं सगळं पाहतो. देवाच्या दयेने आम्हाला काही कमी नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली, आया सगळी व्यवस्था आम्ही केली आहे. पण त्यांच्या विचित्र वागण्याने मी आणि सासूबाई अगदी त्रासून गेलो आहोत. प्राचीच्या सासऱ्यांची साठी आहे म्हणून सासूबाई तिच्याकडे गेल्या आहेत ८-१० दिवसांसाठी. म्हणून मी बोलून घेतेय. काय करावं काही कळत नाही. ” मी एकदम गप्पच झाले. त्यांच्या हातातली असोशी मलाही जाणवली होती. थोडं विचित्र वाटलं होतं, पण नीरजा काही वेगळंच सांगत होती.

“मी बघते, विचार करते. ताईशी, वहिनीशी बोलते. ८-१० दिवसांत चक्कर टाकते परत. ” असं म्हणून मी बाहेर पडले. अक्कांचा निरोप घ्यायचंही सुचलं नाही. विचार करते असं नीरजाला म्हटलं तरी काय विचार करणार होते मी तरी? काही सुचत नव्हतं. ही विचित्र समस्या कुणाशी अगदी ताई आणि वहिनीशी तरी कशी बोलावी असं झालं होतं. ४-६ दिवसांनी पुन्हा नीरजाचा फोन आला. “ताबडतोब येऊन जा. ” यावेळी मी लगेच गेले. खोलीत जाऊन अक्कांजवळ बसले. अक्का घळा घळा रडायला लागल्या. नीरजा तिथेच उभी होती. “गेले चार दिवस चाललंय हे रडणं. थांबतच नाहीत. मी अगदी घाबरून गेले आहे. सासुबाईंना यायला अजून ४ दिवस अवकाश आहे. काय करावं काही सुचत नाही. ”

मी स्वस्थ राहिले. जरा वेळाने अक्का उठून बसल्या. पाठीशी उशी घेऊन भिंतीला टेकून बसल्या. आवाज जरा क्षीण झाला होता, पण वाणी स्पष्ट होती. माझा हात हातात घेऊन सांगू लागल्या, “दहाव्या वर्षी लग्न झालं. न्हाण यायच्या आधीच साप चावून नवरा गेला. नाव लिहावं लागतं म्हणून ते आठवतंय, पण चेहरा नाही आठवत आता. माझे सासरे त्या काळच्या हिशेबाने नव्या विचारांचे होते, म्हणून न्हाव्याला परतवला त्यांनी, बोडकी नाही केली मला. पण यापेक्षा जास्त सुधारणा नाही झेपली त्यांना. माहेरी गरिबी. तिथे तरी कोण विचारणार होतं? सासरी निदान अन्न-वस्त्राला तरी काही कमी पडलं नसतं. म्हणून त्यांनी ठेवून तरी घेतलं. तेव्हापासून कष्टांना जे जुंपून घेतलं ते हात-पाय चालेनासे होईपर्यंत. कष्ट करीत होते, म्हणून लोकांना माझी आठवण तरी येत होती. पुढे कोकणातून इथे शहरात आले. गोपाळ मोठ्या हुद्द्यावर होता, त्याने ठेवून घेतलं. पण सुनेला ही गावंढळ चुलत सासू फारशी आवडत नव्हती. तिच्याकडे चार नोकर राबत होते. तिला माझ्या कष्टांची तशी गरजही नव्हती. मग जिकडे गरज असे, तिकडे ती माझं बोचकं ती पाठवून देई. दोन वेळचं जेवण आणि अंगावर धड लुगडं एवढ्यावर राबले सगळ्यांच्या घरी. लोकांनी आपुलकी दाखवली, विश्वास टाकला, नोकराइतकी हलकी वागणूक नाही दिली पण शेवटी मी आश्रितच राहिले. कुणाच्याही घरात घरची होऊन राहणं नशिबात नव्हतं माझ्या.

लग्न झालं तेव्हा मायेचा स्पर्श जो सुटला, तो पुन्हा कधी मिळाला नाही. न्हाण यायच्या आधी नवरा गेला, म्हणून नवऱ्याचा स्पर्श नाही. नवरा नाही म्हणून मुलं नाहीत, त्यांचा लडिवाळ स्पर्श नाही. ज्या ज्या घरी राहिले-राबले, तिथे कुणी जवळ यावं, मिठी मारावी, गळ्यात हात टाकावे असं काही नातं नसायचं. देवाच्या दयेने कधी आजारपण आलं नाही, पण कधीतरी डोकं कलकलायचं. मग आपलं आपणच आल्याचा चहा घ्यायचा, कपाळावर वेखंड-सुंठीचा ओढा घालून घ्यायचा आणि पुन्हा पदर खोचून उभं राहायचं. मुलं खायला माझ्याकडे मागायची, पण शाळेतून-बाहेरुन आल्यावर त्यांना आई-आजीच लागायच्या. अक्का नाही. फार जीव तुटायचा माझा. आपण अधांतरी तरंगतोय, आपल्या पायाखाली जमीनच नाही असं वाटायचं. दोन वेळा जेवण, अंगभर कपडा आणि डोक्यावर छप्पर असलं की शरीर जगतं, पण मनाला तेवढं पुरत नाही. त्याला प्रेम, माया हवी असते. शरीराला मायेचा, प्रेमाचा स्पर्श मिळाला की मन शांत होतं. आयुष्यभराची ही ओढ मला जाळतेय. आग होतेय अंगाची. ती औषधाने थांबणार नाही. तिला मायेच्या स्पर्शाचीच गरज आहे. कुणाला सांगणार ही जळजळ? आश्रित बाईला मन असतं हे कुणाला पटणार? कोणत्या जन्मातलं पाप फेडतेय ते एक त्या देवालाच माहीत. ”

अक्का बोलायच्या थांबल्या. पण त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत राहिलं. “शांत व्हा” असं म्हणून मी त्यांचा हात धरला. तो त्यांनी घट्ट धरला. “रडू दे गं. उभ्या आयुष्याचं रडणं साठवून ठेवलंय. रडण्याचा आनंद तरी मिळू दे. ” मी अगदी कानकोंडी झाले. अक्कांचं बोलणं कणभरही खोटं किंवा चूक नव्हतं. अक्कांच्या वागण्याची तक्रार करणारी नीरजाही एकदम गप्प झाली होती.

मी घरी आले. आल्या-आल्या ह्यांनी माझ्या हातातली पिशवी घेतली. सुनेने पाणी दिलं. तिच्या कडेवरच्या नातवाने माझ्या अंगावर उडी मारली. आजी त्याला दिवसभर भेटली नव्हती. तिच्याकडून लाड करुन घ्यायची हुक्की आली होती त्याला. त्याला छातीशी कवटाळून सोफ्यावर टेकले. त्या सगळ्यांच्या ओझरत्या स्पर्शाने माझ्या शरीराचा दिवसभराचा थकवा गेला पण मन आणखी थकून गेलं. अक्कांचा चेहरा, त्यांची विकलता मनातून जाईना. आजपर्यंतच्या आयुष्यात झालेले स्पर्श आठवत राहिले. प्रेम, माया, आपुलकी, ओढ – काय नव्हतं त्या स्पर्शात? आनंद, दु:ख, संताप, निराशा, कंटाळा, वैफल्य – विविध भावनांच्या कल्लोळात किती वेळा सापडले. ज्या ज्या वेळी स्पर्शाची ओढ लागली, त्या त्या वेळी ती मिटवणं मला सहज शक्य झालं होतं. मुलगी, मैत्रीण, बहिण, बायको, आई आणि आता आजीही. प्रत्येक नात्याचा वेगळा स्पर्श त्या त्या वेळी मला न मागता-अगदी सहजपणे मिळत गेला. कदाचित त्यामुळेच अन्न-वस्त्राइतकीच जिवंत माणसाचा स्पर्श ही देखील माणसाच्या जगण्याची गरज असते हे मला कधी कळलंच नाही. अक्कांच्या रूपाने अगदी अचानक ते सत्य प्रकर्षाने माझ्या समोर आलं आणि त्यामुळे मी अगदी अस्वस्थ होऊन गेले. रस्त्यावरच्या भिकारणीलाही जे सहज मिळू शकतं, ते कित्येकांचा अंतरात्मा तृप्त करणाऱ्या अक्कांसारख्या बाईला का मिळू नये? इतकी साधी बिन-पैशांची गरजही पूर्ण होऊ नये आणि आयुष्यभर तळमळत राहावं असं काय पाप केलं असेल त्यांनी मागच्या जन्मी?

दुसऱ्याच दिवशी सकाळी अक्का गेल्याचा निरोप आला. सगळं आटपून आम्ही घरी आलो. सून म्हणाली, “अक्कांचं जाणं तुम्हाला फारच लागलेलं दिसतंय. तुमचं सगळं जगावेगळंच असतं. अक्का आपल्या नात्याच्या न गोत्याच्या. एका आश्रित, स्वयंपाकाच्या बाईसाठी तुम्हाला इतकं वाईट वाटावं याचीच कमाल वाटते मला. ” अक्कांच्या वेदनेचा आणि अतृप्तीचा मनाला लागलेला भुंगा माझं मन कुरतडतोय हे नाही सांगू शकले मी तिला.

लेखिका : सुश्री राधा मराठे

प्रस्तुती : प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळशीबाग” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “तुळशीबाग…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

लग्नाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सौंना स्पेशल गिफ्ट द्यायचं मनात होतं. नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन करायचं ठरवलं पण विनाकारण खर्च करण्यापेक्षा तेच पैसे मुलीच्या कॉलेजसाठी उपयोगी होतील. असं सौंच मत अर्थात मलाही ते पटलं तरीही तिला काय गिफ्ट दयावं हे समजत नव्हतं. साडी, दागिने, ट्रीप सगळ्यालाच तिनं नकार दिला.

“तुला नक्की काय गिफ्ट पाहिजे? ”मी विचारलं.

“चिडणार नसाल तर सांगते”

“नाही चिडणार. बोल”

“आपण तुळशीबागेत जाऊ. खूप दिवसात गेलो नाही. ”सौंच्या अत्यंत अनपेक्षित मागणीनं मी पार क्लीन बोल्ड. काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजलं नाही. म्हणून होकारार्थी मान डोलावली. दुसऱ्या दिवशी गर्दी आणि पार्किंग प्रॉब्लेमचा विचार करून रिक्षानं दुपारी तुळशीबागेत पोचलो. आजकाल सगळीकडे सगळं काही मिळतं तरीही तुळशीबागेतल्या खरेदीची सर कशालाच नाही. जसं हॉटेलमधलं जेवण कितीही चांगलं असलं तरी घरचं जेवण ऑल टाइम बेस्ट! ! तसंच काहीसं.

नेहमीप्रमाणे तुळशीबागेत तुडुंब गर्दी. कडकडीत उन्हातही खरेदीचा अफाट उत्साह होता त्यात सौ हरवल्या आणि मी आजूबाजूला बघत उभा राहिलो. सर्व महिला भान हरपून तुळशीबागेतल्या मोहमयी दुनियेत हरवतात हा सार्वत्रिक अनुभव… 

… खरंतर पुरुष मंडळींना ‘काय घ्यायचं ते घे अन पटकन चल’ असं ओरडून सांगायचं असतं पण स्पष्टपणे सांगता येत नाही. कितीही कंटाळा, वैताग आला तरी शांत रहावं लागतं. भरिसभर म्हणजे बायका हे कसं दिसतं, ते कसं दिसतं, हे घेऊ की ते घेऊ असं विचारून हैराण करतात. त्यामुळे पुरुषांना खास करून नवऱ्यांना सतत अलर्ट मोडवर रहावं लागतं.

… माझीसुद्धा अवस्था अशीच झालेली. अगदी ‘एक रुपया’ अशी किंमत सांगितली तरी महिलामंडळींना महाग वाटते आणि मग सुरू होतो बार्गेनिंगचा खेळ. दुकानदारानं सांगितलेल्या किमतीला वस्तू घेणं महिला मंडळींना कमीपणाचं वाटतं याच्या नेमकं उलट पुरुषमंडळी “किती” एवढंच विचारतात आणि पैसे देऊन मोकळे होतात.

तास-दीड तास झाला तरी सौंची खरेदी सुरूच होती. उभं राहून पाय आणि डोकं दुखयाला लागलं. जाम कंटाळलो.

“ए, चल बास आता”

“दोन मिनिटं. हे कानातलं बघा. किती छान आहे”

“हा मस्तयं. घेऊन टाक”

… मी निघण्याचा आग्रह करत होतो पण सौ खरेदीत गुंग होत्या. इतक्यात तिचं लक्ष गेलं माझा आविर्भाव पाहून ती म्हणाली “सॉरी! ! माझ्यामुळं तुम्हांला ताटकळावं लागलं. इच्छा नसताना इथं यावं लागलं. ” 

“अगं, तसं काही नाही”

“माहितीये. तुम्ही काही बोलणार नाही. चला निघू या. आता थेट लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसालाच येऊ. तेसुद्धा जमलं तर “इच्छा नसताना उतरलेल्या चेहऱ्यानं सौ निघाली. मला कसतरीचं वाटलं. बायकोची इतकी साधी इच्छा.

त्यातसुद्धा तिनं तडजोड केली.

… मनात कालवाकालव झाली. तिचं वागणं खूप खोलवर भिडलं. विनाकारण अपराधी वाटायला लागलं.

“कितीही घेतलं तरी कमीच आहे. चला” सौंच्या बोलण्यानं विचारांची तंद्री तुटली.

“अजून आपण त्या साईडला गेलो नाही. तिकडं खूप व्हरायटी आहे. ”

“नको”

“अगं खरंच, तुला हवी तेवढी खरेदी कर मी सोबत आहे”

“चेष्टा करताय”

“नाही. खरंच! ! तुझी शप्पथ”

“माझा खूप राग आलाय ना”

“नाही गं राणी. आज सगळी तुळशीबाग फिरल्याशिवाय घरी जायचं नाही. बिनधास्त खरेदी करू”मी हसलो तेव्हा सौंचा चेहरा उजळला. पुढचे दोन-अडीच तास तुळशीबागमय होते. प्रत्येक खरेदीत मी सक्रिय सहभाग घेतला. बार्गेनिंगसुद्धा केलं त्यामुळे सौ प्रचंड नव्हे अतिप्रचंड खुष झाली.

– – – किमती, ब्रॅंडेड वस्तूंपेक्षा आपल्या माणसांना ‘वेळ देणं’ यापेक्षा मोठं गिफ्ट नाही.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”रफ वही..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रफ वही..“ ☆ संध्या बेडेकर ☆

“आयुष्याची वही व्यवस्थित ठेवायला, पुन्हा एकदा रफ वहीची गरज भासू लागली आहे. “

आजकाल एखाद्याचे नाव आठवत नाही, कोणाकडे गेले की,

अरे! ! हे सांगायचे/ विचारायचे राहूनच गेले. असं होतं. एखादी वस्तू कुठे ठेवली आहे? ? हे आठवत नाही. घरात ती वस्तू आहे हे नक्की माहित असतं, पण वेळेवर शोधूनही ती वस्तू मिळत नाही. वस्तू खूप महाग असते अस वगैरे नाही, पण घरी असलेली वस्तू वेळेवर कामास येत नाही. त्यांचे वाईट वाटते. त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला आठवत नाही या गोष्टीचा होतो.

म्हंटल तर घर व्यवस्थित आहे. काम करायची पध्दत ही व्यवस्थित आहे. वस्तू व्यवस्थित वापरणे, काम झालं की त्या जागेवर ठेवणे हेही सवयीत आहे. सर्व व्यवस्थित आहे. कुठे काही मी कमी पडत नाही. खरं तर,

काकू! ! तुम्ही घर छान ठेवता. नेहमी चकाचक.

असे ‘comments ‘ ऐकल्यावर 

मी स्वतः वरच मनातल्या मनात हसते. हे सर्व वरवरचे आहे. असं मला वाटू लागलं आहे.

वाढत्या वयाचा परिणाम आता दिसू लागला आहे.

काल हल्दीरामचा रसगुल्ल्याचा डबा उघडला. त्यात एकंदर सोळा रसगुल्ले असतात, हे मला नक्की माहित आहे. सर्व संपले. पण सोळा कसे? कुठे? कोणाला? दिले, त्याचा हिशोब सहज लावत असताना चार रसगुल्ल्यांचा हिशोब काही लागत नव्हता. चार मेंम्बर असलेल्या शेजारच्या सर्व फॉमिलीज् डोळ्यासमोर आल्या, पण आठवत नव्हतं. मी आनंदाने प्रेमानेच माझ्या सुखदुःखाच्या प्रिय मैत्रिणींना दिले होते. याचा आनंदच होता मला, पण डिटेल्स आठवत नव्हते, त्यांचा त्रास होत होता.

या चार दिवसांत काय काय झालं? ? कुठे? कोणाकडे? गेलो, हे जेंव्हा आठवत नाही, तेंव्हा मानसिक त्रास खूप होतो. त्यात नुकसान असं काही च नसतं, फक्त आपल्याला आठवत नाही याचं दुःख होत. त्याचा त्रासही होतो.

बरं! ! असं नाही की सर्व च विसरते. काही अनावश्यक गोष्टी ज्या विसरले तर बरं होईल, त्रास कमी होईल असं वाटत, त्या छान आठवतात. त्या आठवतात म्हणून त्रास होतो.

बरे असो.

शाळेत असताना एक रफ वही असायची ज्यात सर्व लहान लहान गोष्टी लिहिल्या असायच्या. नक्की कोणत्या पेजवर आहे हे जरी माहीत नसलं तरी या वहीत कुठेतरी कानाकोपऱ्यात मिळेल ती खात्री असायची. ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा आत्मविश्वास असायचा. ही रफ वही खूप महत्वाची असायची. पण तिचे रंगरूप काही खूप छान नसायचे. त्यामानाने बाकी वह्या जास्त व्यवस्थित असायच्या. बाकी फेअर कॉपीज् या रफ वहीच्या भरवशावर खूप मटकायच्या. पण अडल्या वेळी हीच जीवाभावाची सखी मदतीला धावून यायची. वर्ग संपता संपता सरांनी काही विशेष गोष्ट सांगितली तर घाईघाईत रफ वहीत लिहायचे. म्हणजे आपलं काम अडणार नाही, शोधलं तर आपल्याला नक्की कळेल/ मिळेल, आपलं काम होईल. ही मनोमन खात्री असायची. स्वतः वर विश्वास असायचा.

आता पुन्हा अशाच एका रफ वहीची गरज मला भासू लागली आहे.

म्हणजे अगदी रसगुल्ल्यांचा हिशोब वगैरे लिहायला नाही, पण रोजची दैनंदिनी लिहायला. आयुष्याची गणित सोडवायला. घरातील वस्तू संपल्या, कोणाला फोन करायचा आहे, मेसेज द्यायचा आहे, हळदीकुंकू, लग्नाला जायचे आहे. डॉक्टर कड़े जाणे आहे. आपली साप्ताहिक, मासिक, वार्षिक काम, bank details हे सर्व आता लिहून ठेवायचे असा विचार मनात आला. आणि रफ वहीची आठवण झाली.

अस विसरण म्हणजे एक सिग्नलच आहे. स्वतः कडे लक्ष द्यायची गरज आहे.. मी विसरते, मी विसरते हा विचार मनात पक्का बसायच्या आधी त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

वयामाना प्रमाणे हे सर्व होणारच, पण जेवढं लांबवता येईल तेवढं बरं. आत्मविश्वास कमी व्हायला नको. म्हणून मधून मधून ही रफ वही चाळायची, म्हणजे उजळणी होत राहील.  गोष्टी लक्षात राहतील. आपली काळजी आपणच घ्यायला हवी.

अल्झायमर ची सुरुवात अशीच होते. तेंव्हा एकाच वहीत सर्व लिहिलेले असले तर तेथे शोधलं तर सर्व मिळेल. ही खात्री हवी.

म्हणतात ना,

“There is nothing in this world that can trouble as much as your own thoughts. “

मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत शिरतो ना, त्याच दरवाज्यातून आपला स्वतः वरचा विश्वास बाहेर पतो. आत्मविश्वास कमी झाला तर पूढचे सर्वच कठीण होईल.

 मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. एकदा का एखादा चूकीचा विचार मनात घर करून बसला, तर मग दिशाभूल होते. मनात जे पेराल ते अधिक वेगाने उगवत.

चूकीच्या विचारांवर वेळेवर बंधनं घालणे आवश्यक आहे.

म्हणून वेळेवर सावध राहणही आवश्यक आहे.

रफ वही ची आयडिया मला आवडली, पटली लगेच एक शंभर पानांची वही तयार केली. ही वही मात्र अगदी समोरच ठेवली, नाही तर ही वही कुठे ठेवली? ? हेच विसरायला होईल.

आज वार्षिक चेक अप करिता डॉक्टर कड़े जायचे आहे. म्हणून काल मागच्या सर्व टेस्ट रिपोर्ट बघून रफ वहीत सर्व लिहून काढल. उजळणी केली. आज डॉक्टर ने विचारायचाच अवकाश की मी भराभर तारखांसकट सर्व उत्तरे दिली.

डॉक्टर म्हणाले पण,

व्वा मॅडम! ! तुमची स्मरण शक्ती छान आहे. बदाम वगैरे व्यवस्थित घेता बहुतेक डायट मध्ये. डॉक्टर हसले.

त्यांना काय माहिती हा सर्व रफ वहीचा कमाल आहे.

काही असो, मी माझ्या समस्या वर शोधलेला मार्ग मला आवडला. त्यांचा सकारात्मक प्रभाव ही दिसला.

आता मी स्वतः शी खूप गप्पा मारते. स्वतः लाच सांगते,  चला संध्या मॅडम, चला 

फ्रीजमधून वांगी काढायची आहेत. दूधाचे भांडे ठेवायचे आहे. असं स्वतः लाच सांगत सांगत काम करत राहते. मुलं सूना आॉफिस मध्ये गेल्यावर माझंच राज्य असत. मी एकटीच स्वतः बरोबर बोलत आपली कामं करत राहते. रामरक्षा ऐकते. म्हणते.  

कोणाकडे जायचे असेल तर तयारी करते. तेथे काय बोलायचे? ? ? हे आठवते, ठरवते. त्यांच्या घरच्या घडलेल्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवते. आवर्जून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. होम वर्क करुनच बाहेर पडते.

काल जोशी वहिनीकडे गेले, तेंव्हा त्यांचे कौतुक अभिनंदन करायला मी विसरले नाही. इतक्यातच त्यांची नात सिंगापूरला उच्च शिक्षणासाठी गेली असल्याचे लक्षात ठेवून त्यांचे अभिनंदन केले.

मला माझेच कौतुक वाटले. मनोमन माझ्या रफ वहीला धन्यवादही दिले.

आता प्रगती बरी आहे.

म्हणतात ना,

There are different problems In different phases of life. Without hesitation, take decisions timely as per your requirements.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अहं ब्रह्मास्मि – लेखक : अज्ञात – संकलक : श्री यशवंत गोखले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अहं ब्रह्मास्मि – लेखक : अज्ञात – संकलक : श्री यशवंत गोखले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आयुष्याच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण स्वतःला घडवत असतो…

दुसऱ्या इनिंगमध्ये संसार, नाती, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये निभावत असतो…

आणि तिसरी इनिंग सुरू झाली की मात्र एक प्रश्न हळूच मनाच्या दारावर येऊन उभा राहतो?

आता माझ्यासाठी मी काय? 

आता माझे काय अस्तित्व? 

मुलं मोठी होतात. आपापल्या संसारात रमून जातात. काही नाती काळाच्या पडद्याआड जातात. काही माणसं कायमची दूर होतात. घर तेच असतं, पण घरातले आवाज कमी झालेले असतात. पूर्वी ज्यांच्यासाठी दिवस धावत जायचा, त्यांच्यापासून थोडेसे अलिप्त होऊन आपण स्वतःकडे पाहू लागतो…

कधी एकटेपण जाणवतं.

कधी जुन्या आठवणी डोळ्यांत पाणी आणतात.

कधी वाटतं, आपली गरज आता कोणाला आहे?

– – पण कदाचित हाच तो क्षण असतो, जेव्हा आयुष्य आपल्याला बाहेरून आत घेऊन जात असते.

आणि तेव्हाच अहं ब्रह्मास्मि या शब्दांचा खरा अर्थ उमजू लागतो

मी म्हणजे फक्त कोणाची आई, बाबा कोणाची पत्नी, पती कोणाची आजी, आजोबा किंवा कोणाची मित्र, मैत्रीण नाही. या भूमिका अत्यंत सुंदर आहेत!

– – पण त्या माझ्या अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ नाहीत.

माझ्या आत एक, अशी जागा आहे, जिथे माझ्या नात्यांची ओळख नाही, वयाची मर्यादा नाही, भूतकाळाची खंत नाही आणि भविष्याची चिंता नाही.

– – तेथे फक्त मी आहे… माझे चैतन्य आहे… आणि त्या चैतन्यात परमेश्वराचा अंश आहे…

म्हणूनच तिसरी इनिंग म्हणजे आयुष्याचा उतार नव्हे?

… ती स्वतःकडे परतण्याची वेळ आहे.

आता दुसऱ्यांनी आपल्याला काय समजावे यापेक्षा, आपण स्वतःला काय समजतो हे महत्त्वाचे आहे.

कोणी फोन केला नाही म्हणून आपण कमी होत नाही!

कोणी कौतुक केले नाही म्हणून आपली किंमत कमी होत नाही!

कोणी आपल्याला विसरले म्हणून, परमेश्वराने आपल्याला विसरले असे होत नाही!

… उलट, या शांततेत आपण स्वतःचा हात स्वतःच्या हातात घ्यायला शिकतो.

पूर्वी आपण सगळ्यांसाठी जगलो.?

आता स्वतःच्या मनासाठी थोडे जगू या!

पूर्वी इतरांच्या इच्छा जपल्या.

आता स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू या!

पूर्वी घर कुटुंब सांभाळले.

आता मनाला सांभाळू या.

राग, अपेक्षा, दुःख, उपेक्षा, जुन्या आठवणी,

एकेक करून त्यांना प्रेमाने निरोप देऊ या…

कारण

अहं ब्रह्मास्मि म्हणजे मी सर्वांपेक्षा मोठा आहे असे नाही; तर माझ्यातही तोच परमात्मा आहे, जो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, ही जाणीव आहे.

मग कुणाबद्दल द्वेष कसा राहील?

ज्याने दुखावले त्यांच्यासाठीही मनातून क्षमा वाटू लागते…

जो सोडून गेला, त्याच्याबद्दलची तक्रार कमी होते…

त्याचे जाणे स्वीकारलेले असते…

तो एक सहजीवनाच्या प्रवासाचा आजवरचा सोबती होता…

त्याचा प्रवास लवकर संपला… आपला प्रवास अजून कुठपर्यंत आहे?

माहीत नाही…

जे मिळाले नाही त्याची खंत कमी होते…

आणि जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता वाढते…

आयुष्याची तिसरी इनिंग मग एकटेपणाची न राहता आत्मशोधाची होते…

संध्याकाळच्या शांत वेळी खिडकीत बसून आकाशाकडे पाहताना मन म्हणते…

खूप धावलों …

खूप जपले…

खूप गमावले…

खूप रडलों …

पण आता स्वतःला हरवायचे नाही. 

… कारण शेवटी सगळ्या भूमिका संपतात, सगळे आवाज शांत होतात, सगळी नाती आपापल्या मार्गाने जातात…

… उरते ते फक्त एक चैतन्य रुप.

आणि त्या चैतन्याची ओळख म्हणजे?

अहं ब्रह्मास्मि! 

ही तिसरी इनिंग म्हणून मिळालेली आयुष्याची सुंदर संधी आहे…

जगापासून दूर जाण्याची नव्हे, तर?

… स्वतःच्या अधिक जवळ जाण्याची.

… स्वतःच्या अंतरंगात उतरण्याची.

खरं आहे ना?

लेखक : अज्ञात 

संकलक : यशवंत गोखले 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दर्याचा ‘परम विशिष्ट’ राजा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “दर्याचा ‘परम विशिष्ट’ राजा!”  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

 भारतीय आरमाराचे जनक, हिंदवी स्वराज्य संस्थापक सदैव स्मरणीय छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब, ब्रिटीशांचा १७-१८व्या शतकातील अत्यंत कर्तबगार नौसेना प्रमुख होराशिओ नेल्सन, अमेरिकेचे १८व्या शतकातील नौसेनेचे रिअर ॲडमिरल जॉन डहलग्रीन आणि भारताचे विसाव्या शतकातील एक महान, द्रष्टा, ऋषितुल्य नौसेनाधिकारी यांच्यात एक गोष्ट समान होती… sea-sickness अर्थात समुद्री प्रवासात होणारा त्रास ज्याला आपण ‘बोट लागणे’ असं म्हणतो!

 आणि असं असूनही या सर्वांनी समुद्रावर हुकुमत गाजवली, हे विशेष.

तब्बल तीस वर्षे समुद्रात व्यतीत केलेल्या होराशिओ नेल्सन यांनी त्यांच्या अर्ल ऑफ कॅम्डेन याला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.. ” I am ill every time it blows hard and nothing but my enthusiastic love for my profession keeps me one hour at sea… ” अर्थात जेंव्हा केंव्हा समुद्र खवळतो त्या प्रत्येक वेळी मी खूप आजारी पडतो… पण माझं देशावरचं प्रेम मला समुद्रापासून दूर ठेवू शकत नाही! ”

भारताला तब्बल ११ हजार ९८. ८१ किलोमीटर्स एवढा समुद्रकिनारा लाभला आहे… आणि यातील सुमारे ३३३० किलोमीटर्स समुद्रकिनाऱ्याला आपला शेजारी आहे… नापाकिस्तान!

सैन्य किंवा फौज म्हटल्यावर सामान्य लोकांच्या नजरेसमोर सर्वप्रथम येते ते पायदल नंतर वायुदल आणि शेवटी नाविक दल अर्थात Navy! परंतु जगाचा लढाईचा इतिहास पाहू जाता ज्याचे समुद्रावर राज्य त्याचे जगावर राज्य अशी परिस्थिती असे.

भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे सर्वोच्च सेनापती असतात. माननीय राष्ट्रपतींनी प्रदान केलेला ध्वज हा त्या त्या सेनादलाचा अत्यंत अभिमानाचा विषय असतो.

स्वतंत्र भारतात हा Colors अर्थात ध्वज सर्वप्रथम प्राप्त करण्याचा मान मिळाला तो भारतीय नौसेनेला! आणि हा ध्वज स्वीकारण्याचा बहुमान स्वीकारण्यासाठी तरुण, तडफदार, शूर आणि नौसेनेसाठीच जणू देवाने जन्मास घातले आहे अशा मराठी तरुणाची निवड करण्यात आली… ते होते त्यावेळी अवघे तेवीस वर्षे वय असलेले आणि लेफ्टनंट पदी असलेले श्री. मनोहर प्रल्हाद आवटी! हा दिवस होता २७ मे, १९५०.

७ सप्टेंबर, १९२७ रोजी गुजरातेतील सुरत येथे आवटी साहेबांचा जन्म एक मराठा कुटुंबात झाला. आवटी कुटुंबीय मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विंचुर्णे त्येथील. साहेबांचे पिताश्री श्री. प्रल्हाद आवटी हे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. आणि त्यांच्या नोकरीनिमित्त ते भारतात विविध ठिकाणी वास्तव्यास असत. श्री. मनोहर यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण वर्धा, नागपूर येथे तर पुढील शिक्षण मुंबईत झाले. जन्मभूमी गुजरात आणि कर्मभूमी मुंबई यांचे समुद्राशी मोठं सान्निध्य. कुमारवयीन आवटी साहेबांना समुद्र खुणावत राहिला आणि औपचारिक शिक्षणाची वाट सोडून ते थेट नाविकांना प्रशिक्षण देणाऱ्या Training Ship असलेल्या Dufferin जहाजावर प्रशिक्षणासाठी गेले आणि अभ्यासक्रमात द्वितीय क्रमांक प्राप्त केला… पुढील संपूर्ण कारकिर्दीत आवटी साहेबांसारख्या अद्वितीय दर्यावर्दी योद्ध्याला द्वितीय क्रमांकावर रहावे लागले..!

आवटी साहेबांची नाविक कार्यकुशलतेवर हुकूमत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना ब्रिटिश नौसेनेमध्ये दाखल करून घेतले. ब्रिटानिया रॉयल नेवल कॉलेजमधून १९४६ मध्ये ते पदवीधर बनले… या अभ्यासक्रमातही आवटी साहेबांनी अनेक पारितोषिके पटकावली. परदेशात HMS अर्थात His Majesty’s Ship फ्रॉबिशर आणि ट्रायम्फ सारख्या महाकाय जहाजांवर अनुभव घेतल्यावर आवटी साहेब भारतात परतले. लवकरच भारत स्वतंत्र झाला आणि ब्रिटिश रॉयल नेव्ही ‘इंडियन नेव्ही’ बनली. परदेशातून आधुनिक सागरी संदेशवहन तज्ज्ञ बनून आलेल्या आवटी साहेबांचा भारतीय नौदलास खूप उपयोग झाला. सागरी विनाशिका ‘ रणजीत’ आवटी साहेबांनी सेवा बजावली. आय. एन. एस. मैसूर या लढाऊ जहाजावर मुख्य संदेश आणि दळणवळण अधिकारी म्हणून आवटी साहेबांची नियुक्ती झाली. वेलिंग्टन नौसेना महाविद्यालयात उच्च प्रशिक्षण परतल्यावर आवटी साहेब कमांडर बनले. युगोस्लवियाचे प्रमुख मार्शल टिटो यांच्या भारत दौऱ्यात आवटी साहेब त्यांचे ADC होते.. ही मोठी राजनैतिक जबाबदारी होती… भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आवटी साहेब चीन भेटीवरही जाऊन आले होते!

१९६१ ते १९६४ या चार वर्षांत आवटी साहेबांनी शेकडो नाविक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. जहाजावरची मोकळी जागा म्हणजे डेक तसे खूप लांब, रुंद असते. त्यात समुद्रावर मोकळा, आवाज करणारा वारा घोंगावत असतो. अशा परिस्थितीत आवटे साहेब प्रशिक्षणार्थी किंवा समुदायाशी संवाद साधताना लाऊड स्पीकर वापरत नसत… त्यांना निसर्गतः खूप कडक आणि दमदार आवाज लाभला होता! Am I audible till the last row? ते म्हणत आणि शेवटची रांग जोरात म्हणे… Aye, Aye, sir!

साहेब १९६९ पर्यंत Substantive Captain पदावर पोहोचले होते! हे पद केवळ कामगिरीत सातत्य, उच्च दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आणि प्रदीर्घ निष्ठापूर्वक सेवा केलेल्या नौसेना अधिकाऱ्यास प्राप्त होते! Commander पेक्षा वरचे Commodore पेक्षा कनिष्ठ पातळीचे हे पद असते!

आणि १९७१ वर्ष आले… भारत-पाकिस्तान युद्धाचा प्रसंग उभा राहिला.

यावेळी आवटी साहेब ‘स्क्वाड्रन’ नावाच्या सागरी गस्ती जहाजाचे आणि आय. एन. एस. कामोर्टा चे कमांडर होते. ही जहाजे बंगालच्या उपसागरात तैनात होती. आवटी साहेब थेट पाकिस्तानी समुद्रात घुसले. पाकिस्तान्यांनी ठिकठिकाणी पाणसुरूंग पेरून ठेवले होते. शत्रूच्या पाणबुड्या तिथे होत्याच… त्यांची पर्वा न करता आवटी साहेबांनी खोलवर मुसंडी मारली! जहाजे हाकारण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्याने आवटी साहेबांनी हुकूमत गाजवली. शत्रूच्या तीन जहाजे जप्त केली.

पाकिस्तानच्या पाणबुडीचा पाठलाग केला… तिचे मोठे नुकसान केले आणि त्यामुळे ती पाणबुडी निकामी झाली. या कामगिरीत आवटी साहेबांनी प्रचंड धैर्य आणि व्यावसायिक 

कार्यकुशलतेचे दर्शन घडवले… ही कामगिरी त्यांना वीर चक्र पुरस्काराची मानकरी ठरवून गेली. १९७१ मध्ये पाकिस्तानने शरणागती पत्करली त्यावेळी पाकिस्तानी सैनिक भारतीय सैन्यापुढे शस्त्रे टाकीत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध आहेत. आवटी साहेबांपुढे पाकिस्तानी नौसेनेच्या अधिकाऱ्याने शरणागतीचे प्रतीक म्हणून एक रिव्हॉल्व्हर (पिस्तूल) ठेवले होते! त्यावेळचे छायाचित्र उपलब्ध नाही! हे Webley Revolver. 38 calibre सध्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या संग्रहालयात आहे. आवटी साहेबांना काही काळ एन. डी. ए. कमांडंट नेमले गेले होते. या छोट्या कारकिर्दीत आवटी साहेबांनी प्रशिक्षणार्थी मंडळींचा स्नेह प्राप्त केला होता.. अत्यंत कडक शिस्त राखून सुद्धा प्रेमाने वागता येतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. एका cadet च्या ताब्यात असलेलं एक उपकरण तांत्रिकदृष्ट्या फक्त वीस मिनिटे गहाळ झाले होते. त्या कॅडेटला याबाबत मोठी शिक्षा होऊ शकली असती, पण आवटी साहेबांनी मोठ्या कौशल्याने हा विषय हाताळून त्या कॅडेटला शिक्षेपासून वाचवलं… तो cadet मोठा अधिकारी बनून निवृत्त झाला.. असे अनेक विद्यार्थी आहेत!

दिल्लीत आवटी साहेबांना Chief of Personnel मोठ्या जबाबदारीच्या पदावर नेमण्यात आले होते. त्यांच्या कार्यालयात ते घोडागाडीने जात! नेव्हीचा पूर्ण रुबाबदार गणवेश, पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर अधिकाराची कॅप, पायांत शुभ्र बूट, हातात छडी अशा दिमाखात ते घोडागाडीतून जात तेंव्हा ते दृश्य पाहणाऱ्या लोकांना आपण राजेशाही मधील दृश्य पाहतो आहोत आणि सरसेनापती युद्धभूमीकडे निघालेले आहेत, असा भास होई. एवढे राजबिंडे व्यक्तिमत्व आवटी साहेबांना लाभले होते. दिल्लीतील एका अत्युच्च नेत्यांनी आवटी साहेबांनी असं घोडागाडीतून जाऊ नये, असे परस्पर सुचवले होते… कारण आवटी साहेबांचा प्रभाव अधिक होता!

अर्थात आवटी साहेब केवळ रुबाब दर्शवत फिरत नव्हते… नौसेनेतील अगदी कनिष्ठ सैनिकाशीही ते मित्रत्वाच्या नात्याने बोलू शकत… त्यांच्या बरोबरीने बसून चहा सामोशाचा आस्वाद घेऊ शकत. आवटी साहेब संपूर्णतः निर्व्यसनी होते!

ते लोकांचे कमांडर बनले होते.

त्यांनी नौसेनेच्या अनेक विभागांत, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. किंबहुना भारतीय नौदलाच्या उभारणीत ते आरंभीच्या दिवसांपासून प्रत्यक्ष संलग्न राहिले होते! १९८३ मध्ये त्यांना त्यांच्या अप्रतिम कामगिरीबद्दल परम विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले होते.

एवढ्या प्रचंड व्यापात असतानाही आवटी साहेबांनी जोपासलेल्या छंदांची नुसती यादी पाहिली तरी आश्चर्य वाटत राहते… पक्षी अभ्यासक, पुष्प अभ्यासक, लेखक, नौसेना इतिहास अभ्यासक, किल्ल्यांचे अभ्यासक इत्यादी इत्यादी. Homo Sapiens and Panthera Leo, The Vanishing Indian Tiger and Nature Clubs of India ही आवटी साहेबांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.

ॲडमिरल प्रकाश हे एमपी अर्थात मनोहर प्रल्हाद आवटी यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणत असत.

Circumnaviagation म्हणजे कापडी शिडाच्या बोटीतून संपूर्ण जगाला समुद्रमार्गे प्रदक्षिणा घालणं. या साहसी उपक्रमाचे आवटी साहेब जागतिक प्रणेते आहेत! एकट्याने आणि तेही भारतीय बनावटीच्या बोटीतून ही धाडसी सागर परिक्रमा करण्याच्या प्रकल्पाचे आवटी साहेब पितामह म्हणून ओळखले जातात. सागर परिक्रमा आणि INS Tarini या बोटीबाबत शालेय अभ्यासक्रमात उल्लेख आला होता. कमांडर दिलीप दोंदे साहेब अशी परिक्रमा एकट्याने करणारे पहिले भारतीय ठरले होते. स्वतःला बोट लागण्याच्या विकाराचा म्हणजे समुद्र प्रवासात प्रचंड उलट्या होण्याचा त्रास असूनही आवटी साहेबांनी छोटी बोट घेऊन कोची ते कोलंबो मजल मारली होती!

दोंदे साहेब आवटी साहेबांना The most respected Admiral असं म्हणतात!

घरी अत्यंत साध्या कपड्यांत वावरणारे आवटी साहेब कोणत्याही प्रकारच्या मोठेपणाचा प्रदर्शनाच्या विरोधात होते.

आवटी साहेबांची स्मरणशक्ती अफाट होती… जिला Elephant’s memory म्हटलं जातं अशी. त्यांच्याकडे विविध किस्से आणि विनोदाचा खजिना असे. लहान मुले, तरुण प्रशिक्षणार्थी यांच्याशी ते अत्यंत प्रेमाने वागत बोलत. एकूण पस्तीस वर्षे नौदलात कार्यरत राहिल्यानंतरच्या काळात तर ते अधिकच कामात राहिले.

भारतीय नौदलाचा इतिहास तसा फारसा प्रभावीपणे जतन केला गेलेला नाही हे ध्यानात येताक्षणी त्यांनी त्याचा ध्यास घेतला आणि अगदी शून्यातून सुरुवात करून Indian Maritime History Society ची स्थापना करण्यात सर्वस्व झोकून दिले… आणि त्यामुळे भारतीय नौसेनेचा इतिहास जतन करता आला.

आवटी साहेबांबद्दल सर्वसामान्य मराठी माणसाला फारसे ठाऊक नाही, असे दिसते. हिंदीत तर ते ‘अवाती’ म्हणून ओळखले जातात!

सेवानिवृत्तीनंतर आवटी साहेब फलटण जवळच्या विंचुर्णी येथे कृषीकर्मात दंग झाले होते. त्यांनी वयाच्या नव्वदीमध्ये कष्टपूर्वक एक छोटे परिपूर्ण जंगल उभारून दाखवण्याची किमया साधली होती.

एवढी अफाट क्षमता असलेले हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व भारतीय नौदलाच्या सर्वोच्च अधिकार पदी अर्थात Admiral पदी पोहोचू शकली नाही, ही खेदाची आणि दुर्दैवाची बाब म्हणता येईल. एक नौसेना अधिकारी तर असे म्हणून गेले… He was the best Admiral Indian Navy never had!

Vice Admiral या द्वितीय क्रमांकाच्या पदांपर्यंत मनोहर प्रल्हाद आवटी स्वकर्तृत्वाने पोहोचले. अर्थात कोणतेही पद हे त्यांच्या देशप्रेमाच्या कार्याचे ध्येय कधीच नव्हते. नौदलात अगदी तळापासून आरंभ करून आवटे साहेब या दलातील सर्वांत प्रसिद्ध आणि आदरणीय अधिकारी बनले, हे मात्र खरे.

आवटी साहेब एन. डी. ए. ची सुवर्ण महोत्सवी म्हणजे पन्नासावी तुकडी उत्तीर्ण झाली त्यावेळी तिथे कमांडंट होते. ५ जून, १९७६. Passing Out Parade चा दिवस. त्यादिवशी खडकवासल्यात प्रचंड पाऊस पडला. Parade मैदानात भले मोठे तळे साचले. जणू समुद्रच. त्यामुळे तिथे पथ संचलन… march past होऊच शकला नाही. त्यामुळे परेड मैदानावर संचलन न करताच ती तुकडी एन. डी. ए. मधून बाहेर पडली. हे इतिहासात पहिल्यांदा घडले होते… तेंव्हा आवटी साहेब म्हणाले होते, ” नौसेना अधिकारी इथं कमांडंट असल्यावर समुद्र येथे आला यात आश्चर्य ते काय? “

त्यांच्या विषयी लिहिताना लेफ्ट. जनरल के. जे. सिंग लिहितात.. आवटी साहेब सर्वव्यापी, सर्वसामर्थ्यशाली आणि सर्वक्षमताधारक होते!

वयाच्या ९१व्या वर्षी म्हणजे ३ नोव्हेंबर, २०१८ रोजी आवटी साहेबांची जीवन नौका समुद्रात क्षितिजापल्याड निघून गेली… समुद्रासारखे धीरगंभीर व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीने भारताला दिले.. हे या मातीचे उपकार!

२०२७ हे पुढील वर्ष आवटी साहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे!

या लेखात मला त्यांच्याविषयी तूर्त एवढेच लिहिता आले… त्यांचे जीवन अफाट आहे! अभ्यासक लोकांनी मराठीत आणखी लिहिले तर ते सामान्य मराठी वाचकांना प्रेरणादायक आणि अभिमानाचे ठरेल.

 © श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्ट्रेस फ्री नंबर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्ट्रेस फ्री नंबर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

Stress Free Number

(ज्या नंबरवर कॉल लागला की मनाला दिलासा किंवा शांतता मिळतें…)

 आपल्या आयुष्याची पण एक गंमत असते, नाही का?

सुखात असताना अनेक नंबर आठवतात… पण मन तुटलेलं असतं, तेव्हा बोटं आपोआप एका ठराविक नंबरवर जाऊन थांबतात. आणि तेव्हाच कळतं… तो फक्त मोबाईलमधला नंबर नसतो, तर आपल्या आयुष्यातला “Stress Free Number” असतो.

आपण सगळ्यांनी टोल-फ्री नंबर ऐकला आहे. बँकेचा हेल्पलाइन नंबर असतो, गॅसची तक्रार नोंदवण्यासाठी नंबर असतो, आपत्कालीन सेवांचे नंबर असतात. अडचण आली की नंबर फिरवायचा आणि मदत मिळते.

पण आयुष्याचं काय?

मन थकलं असेल, विचारांचा गुंता वाढला असेल, शब्द गळ्याशी अडकले असतील, स्वतःचाच आवाज नकोसा वाटत असेल…

तेव्हा कोणता नंबर डायल करायचा?

नशीबवान असतात ते लोक, ज्यांच्या आयुष्यात एक “Stress Free Number” असतो.

तो मोबाईलमध्ये सेव्ह केलेला साधासुधा नंबर असतो; पण त्यामागे उभं असतं एक अमूल्य नातं… विश्वासाचं, स्वीकाराचं आणि निःस्वार्थ मायेचं. त्या व्यक्तीला फोन केला की शब्दांची जुळवाजुळव करावी लागत नाही. आपण काय बोलतोय यापेक्षा आपण काय अनुभवतोय, हे तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. मनात जे असतं, ते तसंच ओठांवर येतं.

कारण त्या व्यक्तीकडे न्यायालय नसतं. तिथे फक्त मनाला विसावा असतो.

ती व्यक्ती तुमचं बोलणं मध्येच तोडत नाही. प्रत्येक वाक्यावर मत मांडत नाही. न मागता सल्ल्यांचा पाऊस पाडत नाही. गरज भासली तरच बोलते; बाकी वेळ ती मनापासून ऐकत राहते.

अनेकदा आपल्याला उपाय किंवा सल्ले नको असतात. आपल्याला फक्त कोणीतरी पूर्णपणे ऐकावं, एवढंच हवं असतं.

लहान मूल दिवसभर खेळून दमलं की आईच्या कुशीत येतं. आई प्रत्येक वेळी त्याला उपाय सांगत नाही; ती फक्त जवळ घेते आणि मूल शांत होतं.

पावसात भिजलेला प्रवासी एखाद्या झाडाखाली थांबतो. झाड पावसावर भाष्य करत नाही; ते फक्त आसरा देतं.

समुद्रकिनारी बसलेला माणूसही समुद्राकडून उत्तरं मागत नाही. लाटांचा आवाज त्याच्या मनातला गोंधळ हळूहळू शांत करत जातो.

अगदी तसंच काही माणसं आपल्या आयुष्यात असतात. त्यांच्याशी बोलून समस्या कदाचित सुटत नाहीत; पण त्या समस्या पेलण्याची ताकद मात्र नक्की मिळते. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…

हा Stress Free Number कोणाचाही असू शकतो.

तो आईचा असू शकतो… बाबांचा असू शकतो… बहिणीचा असू शकतो… भावाचा असू शकतो… जिवलग मित्र किंवा मैत्रिणीचा असू शकतो… जीवनसाथीचा असू शकतो… किंवा रक्ताचं कोणतंही नातं नसलेल्या अशा व्यक्तीचाही असू शकतो, जी फक्त तुमच्यासाठी ‘ऐकून घेणारा कान’ बनून उभी राहते.

आजच्या जगात अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत.

ऐकणारे कमी… बोलणारे जास्त…

समजून घेणारे कमी… निष्कर्ष काढणारे जास्त…

स्वीकारणारे कमी… न्याय करणारे जास्त…

म्हणूनच आयुष्यात असा एक Stress Free Number असेल,

तर तो जपा.

कारण जगातली सर्वात महागडी गोष्ट पैसा नाही..

वेळही नाही…

तर अशी व्यक्ती आहे, जिच्याकडे आपण कोणताही मुखवटा न घालता जाऊ शकतो… आणि जी आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारते.

तुमच्याही आयुष्यात असा एखादा Stress Free Number आहे का?

असेल तर आजच तो नंबर डायल करा.

गरज असेल म्हणूनच नाही…

कधी फक्त “कसा/कशीआहेस? ” एवढं विचारण्यासाठीही करा.

आणि त्याहून महत्त्वाचं…

त्या व्यक्तीला जपायला कधीच विसरू नका.

कारण काही माणसं आयुष्यात प्रश्नांची उत्तरं देत नाहीत… ती मनाला दिलासा देतात.

आणि विश्वास ठेवा…

उत्तरं देणारी माणसं अनेक भेटतील; पण मनाला शांतता देणारी माणसं ही या जगातली सर्वात दुर्मिळ संपत्ती असतात.

ती जपून ठेवा.

बघा पटतंय का…!

☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पितृपक्ष ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पितृपक्ष ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान!

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares