मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नांदत्या घराची किंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “नांदत्या घराची किंमत…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं.. कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला. जरा थकलेला.. पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता.

“मी आलेय फोटो घेऊन. डेक्कनच्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का? ” 

अरे बाप रे.. एवढ्या वयस्क आजी. मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला. झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या. फिकटसं नऊवारी पातळ, सुपारीएवढा अंबाडा, हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात.

ब्रेकफास्ट ची वेळ होती. नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता. मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती. मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती. लेक पसार झाली काहीतरी काम काढून.

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली. माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या, ” मी करते ग पोहे, तू निश्चिन्तपणे फोटोचे काम हातावेगळे कर. ” मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले. माझे काम होईस्तोवर पोहे तय्यार.

भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते. हक्कानी पापड मागून घेतले. मी भाजते म्हटलं तर म्हणाल्या ” थांब मी तळते की “.

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला. आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश. जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला. आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले, ” आजी खूप त्रास घेतलात हो. “

आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही.

त्या म्हणाल्या “नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले, अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला… खूप छान वाटलं ग “

या एका वाक्यात मीच रडवेली झाले. ” पुन्हा याल ना? ” त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या 

” परमेश्वराची इच्छा “

खरा सांगू.. सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे….. आजींच्या ” नांदत्या ” या एका शब्दाने मला ती किंमत कळली.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

थोड वाईट वाटेल पण हेच सत्य आहे आणि हेच सत्य राहील..

# काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

# तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पुर्वस्थितीत येतील.

# नातवंडे धावत-खेळत राहतील.

# तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!

# दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

# जमाव हळूहळू पांगू लागेल..

# काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.

# येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

# दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

# महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.

# तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.

# प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल. 

# आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.

# हे सर्व इतक्या सहजतेने, इतक्या सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.

# या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.

# दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात, दणक्यात केले जाईल, तुम्हाला न मिळालेले खाद्य पदार्थ लोकांना खायला मिळतील

# मोठमोठ्या महाराजांची किर्तने,प्रवचने ५/७ दिवस मोठ्या दिमाखात होतील 

# अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.

 आता सांगा… 

# लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.मग तुम्ही कशासाठी धावत आहात?

# तुम्हाला कशाची काळजी आहे ?…

 # योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.

# आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.

# इतरांपेक्षा स्वतः च स्वतः ला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.

# इत्तरांचे प्रपंच मोडकळीस आणण्याचे पाप करु नका, त्याचा परिणाम आपल्याही कुटुंबांवर होऊ शकतो

# आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते,….  

“होय, एक गोष्ट…”

# आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला निरपेक्ष प्रेमाने मदत करा,  तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.

# आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा.

# सत्कर्म करत रहा. हेच खरे जीवन आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एके दिवशी तुकोबा 

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे 

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती 

माझी गाथा परतुन..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*
उगा मला तिष्ठविले असे 

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला.. ?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा 

अंत मी कसा पाहीन.. ?

*

ऐका तुकोबा..

कधीच कोणा कळली न मात..

काय घडले सांगते 

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी 

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन 

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट 

येता सहजी चालून..

कोणी देईल का ??

थोडी चव घेतल्या वाचून ?

*

तशी गाथा अवचित 

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग 

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस केले 

तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून.. !

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला 

तिला मी काय तारीन ?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची 

गेले मीच उद्धरून……

 

कवी : केशवानंद 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गुरू…!!!!!” – लेखक : श्री सलील कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “गुरू…!!!!!” – लेखक : श्री सलील कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

जी व्यक्ती चालायला शिकवते…

धावायला बळ देते आणि

उगाच धावण्यातला फोलपणा सजवून सांगते….

ते गुरु…!!

काहीही लिहिताना.. गाताना..बोलताना…चित्रपट करताना…

ज्यांचा धाक वाटतो…ह्यांना आवडायलाच हवं…ह्यांना पटायला हवं असं वाटतं..

ते गुरु…!!

काय अनुभवायला हवं आणि कुठे फिरकायचं सुद्धा नाही हे स्वतःच्या अनुभवातून सांगतात

ते गुरु…!!

मी सांगतो तेच करायला हवं… असं न म्हणता..

तू करून पाहा…

मी आहेच पाठीशी.. असं म्हणतात..

ते गुरु…!!

….. चांगल्या गोष्टीची गोडी लावतो तो गुरू…

….. १००% कशाला म्हणायचं… हे शिकवतो तो गुरु…

….. “मीपण” बाजूला ठेवून  काहीही अपेक्षा न ठेवता देऊ शकतो

तो गुरु…!! 

म्हणजेच…

जो आई होऊ शकतो तो गुरु ……!!

जो बाप होऊ शकतो तो गुरु……!!

लेखक : श्री सलील कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कहर व्हॉटसअपचा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

 

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ कहर व्हॉटसअपचा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

आमचे एक शेजारी होते… वय वर्षे पंच्याऐंशीं ते नव्वद….

मात्र कॉम्प्युटर अन स्मार्टफोन अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील, इतक्या सफाईने वापरीत.

गेली पाच वर्षे काका अंथरूणावरच बेडरीडन होते.

(वाक्य खटकण्यासारखं आहे, रियल फॅक्ट सारखं)

 

पण काकांच्या अंथरुणावर त्यांचं एक

स्पेशल बेड होतं, म्हणून असा शब्दप्रयोग…

 

छंद फक्त एकच. स्मार्टफोन.

हल्ली त्यांना व्हाटसअपचा नाद लागला होता.

दर तासाला स्टेटस अपडेट करायचे.

स्टेटस तरी काय??

 

बीपी अमुक,.. शुगर तमुक,…

नुकतंच दोन दिवसानंतर पोट साफ झालं,

फीलिंग फिदरी. इत्यादी इत्यादी…

 

झोपल्या-झोपल्या काकांनी अनेक विविध क्षेत्रातले आभासी मित्र जोडले होते…

डॉक्टर, वकील, इंजिनियर, इतकंच काय तर

मृत-सामग्री केंद्राचे मालक, वैकुंठ रथाचे ड्रायवर,

तेरा दिवसांचे काँट्रॅक्ट घेणारे, सर्व उपयोगी क्षेत्रातले लोक काकांचे आभासी मित्र होते..

 

रोज सकाळी व्हाटसअप वर मेसेज यायचे..

 

“तैयारीकू लगू क्या?? ”

काका त्यांना, “वेट अँड वॉच.. ” चा सल्ला द्यायचे..

 

एक मात्र विशेष मैत्रीण भेटली होती काकांना..

त्यांच्या प्रत्येक स्टेटस वर कॉमेंट करणारी..

 

शब्द संपले की, ती एखाद्या पायाच्या नखाने जमीन कुरतडणाऱ्या मांजरीचा फोटो टाकायची..

उत्तरादाखल काका टाळ्या पिटणारं माकड टाकायचे..

 

काकुला वाटायचं, आपल्याला माकड म्हणतो हा थेरडा.

ती वस्सकन फेंदारलेल्या मिश्यांची मांजर टाकायची..

 

एकंदरीत काय, यमराजाची वाट पाहणं सुकर झालं होतं व्हाटसअप मुळे..

 

आणि एक दिवस..

साक्षात यामराजाची फ्रेंड रिक्वेस्ट आली.

रेड्याचा व्हाट्सअप वर मेसेज आला..

“कमिंग टुडे.. आवरतं घ्या.. ”

 

आदल्या रात्रीच काकांचं फोरजी बंद पडलं..

नियतीचे संकेत काकांना समजले..

रात्रभर बायको, मुलगा आणि सून..

गंगाजल घेऊन बाजूला बसले होते..

 

काका शेवटचं स्टेटस अपडेट करत होते..

“आम्ही जातो आमुच्या गावा.. ”

 

सकाळी सकाळी काका गेले…

क्रियाकर्म आटोपले….

 

पिंडदानाचा दिवस आला.

दोन कावळे हजर होते. पण पिंडाला एकही शिवेना…

 

काकांच्या सर्व इच्छा पुरवायचे वचन दिल्या गेले,

पण कावळे अगदी ढिम्म…

 

मुलांनी काकांच्या अंगवस्त्रांना अंतर न देण्याचं वचन दिलं, पण कावळे अगदी ढिम्म..

 

सुनांनी त्यांना “सासूबाईंचा दर्जा देऊ.. ” हे मान्य केलं,

पण कावळे आपले हूं नाही की चुं नाही..

सगळे वैतागले. इतक्या समृद्ध माणसाचं मन कशात अडकलं असेल, समजायला मार्ग नव्हता..

शेवटी काकांचा नातू आला आणि म्हणाला,

आजोबा, तुमच्या अंतिम पोस्टला एकशे साठ लाइक आले, आणि मुख्य म्हणजे तुमची

बेस्ट फ्रेंड आजीची कॉमेंट पण आली,

‘Coming Soon, B Happy‘

अशी…

आणि काय आश्चर्य???

…….. कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले हो..

– – – चला हसत हसत दिवस घालवू……

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी एका शिक्षकाची…” कवी – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी एका शिक्षकाची…” कवी – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी। 

माझी कर्मभूमी हीच, माझी रोजची पंढरी ॥ 

*

माझा खडू-फळा माझे, टाळ, विणा नि मृदूंग। 

फुले ज्ञानाची घेवून, रोज रंगतो अभंग ॥ 

*

मन मोकळे कराया, जेव्हा येतात लेकरं । 

त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझं चंद्रभागा तीर ॥ 

*

त्यांचे दुःख निवारून, देतो दान आनंदाचे । 

काही वेगळे आहे का, पूण्य देव दर्शनाचे ॥ 

*

ज्ञानदानाचे हे व्रत, हीच माझी एकादशी। 

माझ्या लेकरांचे यश, माझे प्रयाग नि काशी ॥ 

*

जेव्हा येतात लेकरं सुख-दुःख वाटायला । 

त्यांच्या रूपाने विठ्ठल, रोज येतो भेटायला ॥

*

राम कृष्ण हरी!!!!!

कवी : अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?’ –  लेखक – कै. पु. ल. देशपांडे प्रस्तुती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?‘ –  लेखक – कै. पु. ल. देशपांडे प्रस्तुती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

…. ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?

ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?

गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रकलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.

इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला ! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्ल्स बरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.

संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळी अवेळी पेटी बडवणा-या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.

नाटकात पहिली भूमिका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात ! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.

-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे, ”

हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शण’केलेले स्मरते.

सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.

असो; हे विषयांतर झाले.

विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही

 

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नुसता सल्ला नव्हे.. हे तर झणझणीत अंजन – लेखक – श्री नाना पाटेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ नुसता सल्ला नव्हे.. हे तर झणझणीत अंजन – लेखक – श्री नाना पाटेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत.. कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे… त्यानंतर Dance क्लास 

attend करायचा… भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ 

करायचेच… कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

— Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.

— एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.

— आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील.

आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की.. “what is square of 12?” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता- ” तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?”

तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात.

 — ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही.

School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.

वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर 

लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात

 शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे 

मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins, DHA, minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली.. आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp, face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही.

– दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.

ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते… कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट.. E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

– – अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.

– – guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.

– – लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. — – – 

– – कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद,

निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य.. ह्याला बाजारू 

किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.

– – काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय…. पण त्यात देशाचं नाही, तर भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल, पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील…

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?… असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात… “निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.

जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल, ह्याची सतत तपासणी होते.

 दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत.

अनावश्यक विषय शिकवत नाहीत.

चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषयआणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

‘ शिक्षण काय असतं?’ –

रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.

— एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्यासमोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती.

आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत

फिरत होता… तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.

— सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?” 

टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं.

पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “

— टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात… आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि – –

…… आणि जगायचं राहून जातं !!

लेखक — नाना पाटेकर 

संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Mandatory overs!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “Mandatory overs!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

एका पाठोपाठ एक wickets पडाव्यात तसा एक एक दात crease सोडून चाललाय! तरीही काही खायला जावं तर घरातल्या घरात running between the wicket चालू होतं.

डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

डोळ्यात मोतीबिंदू झाला की काय? सारखं bad light चं appeal करतायंत! तरीही डोळे फाडून फाडून मोबाईल मधे cheer girls पाहायला जावं तर बायको पाठीमागे caught behind साठी तत्पर! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, बरोबरच आहे! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

आजकाल पाय वळतात म्हणून जरा बाहेर मित्र मैत्रिणीकडे जायला पाय वळवले तर ते नेमके ते wide ball पडल्या सारखे उजवी डावी कडे पडतात. रस्ता अडवून बायको दारात उभी आणि मुलगा सून, नातू सारे एक सुरात leg before wicket out म्हणतात. खरं म्हणजे इन म्हणतात. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

काठी ठेवत चला bat सारखी!

आजकाल कान सुद्धा माझं ऐकत नाहीत. त्या मुळे बरेच शब्द, काही वेळा अख्खं वाक्य mis-field होतं आणि विषय पार boundary line च्या बाहेर! है ना चौका देनेवाली बात! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

डोक्याच्या pitch वर जरा कुठे गवत राहीलं असेल तर शप्पथ! पार पाटा wicket. पोटाचा आकार Shape बदललेल्या चेंडू सारखा होत चाललाय. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय चालायचंच. आता mandatory overs! विसरलात वाटतं.

गुळगुळीत दाढी करून पँट वर ball घास घास घासून तकाकी लकाकी कायम ठेवावी तसं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर क्रीम चोळून चोळून चेहेऱ्यावरची तकाकी कायम ठेवायचा निष्फळ प्रयत्न करतोय. पण व्यर्थ! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच,

 mandatory overs. विसरालात वाटतं!

मनगटं तर अशी दुबळी झाली आहेत की हातातली कपबशी कधी spin होउन कपाचा कान bells उडाव्या तसा उडतो ते माझं मलाच समजत नाही. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

काहीही लक्षणं नसताना सर्दी होते. रुमालाची covers on होतात आणि खेळ थांबतो नाक आणि घशाचं field inspection होई पर्यंत! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

कॉन्फिडन्स तर एवढा शेकी झालाय की बारीक सारीक सरळ पडणारा ball सुद्धा bouncer वाटतो आणि विनाकारण beat होतो. hook करायला जावं तर हुकतो! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

Umpire ने केव्हाच इशारा केलाय तुमच्या Power play च्या overs केव्हाच संपल्यात. तेव्हा उगाच मोठे strokes न मारता जमतील तेवढ्या chikki runs काढून score board हलता ठेवावा हे मलाही उमगलंय. पण यमराज टीम चा Power play मात्र सुरू झालाय. मोठी attacking field लावलीय. डायबेटिस, बीपी,

सांधेदुखी, कंपवात, विस्मरण हे fielders, slip, gully, covers, point ला catch घ्यायला टपून बसलेत. यमदूत नेटाने inswing, outswing ची भेदक balling करतायंत. *umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandetory overs! विसरलात वाटतं!

त्या सगळ्यांना चकमा देत गोळ्या इंजेक्शन्स् चे pad बांधून इन्सुलिन चे helmet घालून gap काढत आपली मात्र batting चालू आहे. तरी एकदा attacking stroke ने दगा दिलाच. mid on ला चक्क catch out. तरीही umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!

आम्ही जवळ जवळ crease सोडून निघालोच होतो!

पण तो वरती बसलाय ना third umpire! त्याने चित्रगुप्ताला action replay दाखवायला सांगितला परत परत! आणि फायनली तो no ball ठरून आम्ही crease वर परत दाखल! आता मात्र century मारायचीच! मगच pavilion ची वाट धरायची. मग भले त्या डॉक्टर नांवाच्या umpire ला म्हणू दे ना…

mandatory overs! विसरलात वाटतं!

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आली ज्येष्ठ कृष्ण नवमी 

गेला विठू आनंदूनी ।

माझा ज्ञाना निघे आज

आता अलंकापुरीतून ।।१।।

*

निवृत्ती सोपान आणि

मुक्ता चित्कलिका ।

संगे येतील घेऊन 

नामा जना आणि एका ।।२।।

*
विसो गोरा बंका 

संत गजानन चोखा ।

भक्त येतील घेऊन 

साऱ्या संतांच्या पालख्या ।।३।।

*
संत मांदियाळी 

आता येईल पंढरी ।

भक्त नाचतील 

हरिनामाच्या गजरी ।।४।।

येता एकादशी । 

आता दक्षिण ती काशी ।

जाई फुलुनी भक्तांनी । 

देव बोले रखुमाईसी ।।५।।

*
राही माझी बाळे

आता येतील माहेरी ।

दुमदुमेल माझ्या 

आता नावाने पंढरी ।।६।।

*
भक्त येतात चालत । 

मनीं दर्शनाचा हेत ।

संतांच्या पालख्या 

खांद्यावरुनी वहात ।।७।।

*
नाही पावसाची पर्वा

नाही उन्हाची गणती ।

भूक तीही विसरून 

भक्त मार्ग तो चालती ।।८।।

*
देई वस्त्रे नवी

आणि शेला तो पैठणी ।

कोणते दागिने 

घालू राही अंगावरी ।।।९।।

*
नाथ सोन्याच्या ह्या माळा 

आणि कंठा मोतियांचा ।

मुकुट मस्तकी 

ठेवा कौस्तुभ रत्नांचा ।।१०।।

*
कंठामधे घाला

हिऱ्यामाणकांचे हार।

आणि कानामधे घाला 

स्वामी कुंडले मकर ।।११।।

*
मग तुमचे रुपडे । 

अति दिसेल सुंदर ।

आल्या भक्तावरी घाला 

तुम्ही शेल्याने पाखर ।।१२।।

*
प्रसाद वाटण्या 

रांधू सांगा काय देवा ।

खीर, घावन घाटलं

की मिठाई नि मेवा ।।१३।।

*
उडे लगबग मग

राही आणि विठ्ठलाची ।

करिती तयारी दोघे 

भक्त स्वागताची ।।१४।।

*
येता एकादशी 

ठेवी हात निढळावर ।

जणु भक्ताचे दर्शन 

घेण्या विठूची अधीर ।।१५।।

*
येता एकादशी 

भक्त पोचती पंढरी ।

नाचती आनंदे 

विठुनामाच्या गजरी ।।१६।।

*
झाली दर्शनाची बारी ।

भेटे भक्ता उरोउरी ।

भक्तही सुखावे 

रूप पाहुनी अंतरी ।।१७।।

*
भक्ताच्या पायासी

लावी राही तेल प्रेमे ।

हळूवारपणे 

हात विठूचा तो फिरे ।।१८।।

*

श्रम भक्तांचे ते मग

होऊनिया लुप्त ।

सांगता सोहळा होई 

विठूच्या घरात ।।१९।।

*
आला दिवस काल्याचा । 

बसे भक्तांची पंगत ।

राही करीतसे नाना- । 

विध पक्वान्नांचा बेत ।।२०।।

*
लाडू जिलबी घीवर

आणि पुरणाच्या पोळ्या ।

शेवटी तो मिळे 

दहीपोह्याचाही काला ।।२१।।

*
पार पडता सोहळा 

आला वियोगाचा दिन ।

दुःख भक्तांचे अंतरी । 

मुख विठूचेही म्लान ।।२२।।

*
निरोप देण्यासी । 

देव येई वेशीप्रत ।

भक्त जाता दूरी 

मुख लपवी शेल्यात ।।२३।।

*

भक्त जाईल रमून । 

राही फिरूनी संसारी ।

वाट पाहणे नशिबी । 

मम पुन्हा वर्षभरी ।।२४।।

*

एक दिसाचा आनंद । 

मज येत असे बळ ।

मग राही विटेवरी 

सर्व सोसूनिया कळ ।।२५।।

कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares