मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ श्रीमंत आणि भिकारी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

श्रीमंत आणि भिकारी…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

एका मोठ्या शहरात, एका व्यस्त रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसायचा. चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत एक वेगळी चमक होती. रोज येणाऱ्या- जाणाऱ्यांकडे हात पसरून, काहीतरी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच असायचा.

एके दिवशी, तिथून एक अतिशय श्रीमंत, सुसंस्कृत आणि प्रभावशाली माणूस गाडीमधून जात होता. त्याचं लक्ष त्या भिकाऱ्याकडे गेलं. काहीतरी वेगळं वाटलं त्याला. गाडी थांबवून तो थेट त्या भिकाऱ्याजवळ गेला.

“काय रे बाबा, ” तो म्हणाला, “तू चांगला सशक्त आणि तंदुरुस्त दिसतोस, मग भीक का मागतोस?”

भिकारी थोडा संकोचून म्हणाला, “साहेब, हातात कसलीच संधी नाही. कुणी काम देत नाही. नशीब फाटलेलं आहे. जर तुम्ही मला एखादी नोकरी दिलीत, तर मी ही भीक मागणं कायमचं सोडून देईन. “

त्या श्रीमंत माणसाने हसत म्हटलं, “मी तुला नोकरी नाही देणार… पण त्यापेक्षाही जास्त काहीतरी देणार आहे. “

भिकारी गोंधळला, डोळे विस्फारले. “काय म्हणालात?”

“माझ्याकडे एक तांदुळाची गिरणी आहे. मी तुला गिरणीचा माल विकायला देईन. बाजारात योग्य दर मिळव. विक्रीतून होणाऱ्या नफ्याचा ९०% तुझा, फक्त १०% माझा. बघ जमतं का तुला?”

भिकारी गहिवरला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या नशिबात असा एखादा दिवसही लिहिलेला होता.

“साहेब, तुम्ही खरंच माझ्यासाठी देवदूत आहात. तुमच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही!”

त्या दिवशीपासून सगळं बदललं.

भिकारी कामाला लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत फिरायचा. स्वस्तात चांगला तांदूळ विकायचा. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसायला लागला. व्यापार वाढत गेला. काही महिन्यांत तो एक यशस्वी व्यापारी झाला.

पण… एक दिवस त्याच्या मनात एक विचार आला.

“हे सगळं मी केलं… रात्रंदिवस मेहनत घेतली… तो श्रीमंत माणूस कुठे दिसतोय? केवळ संधी दिली, त्यावर एवढा वाटा का? त्याला १०% का द्यायचं?”

हळूहळू त्याच्या मनात ते १०% देखील खुपायला लागले. अहंकार डोकं वर काढू लागला.

आणि त्या दिवशी, ठरल्याप्रमाणे श्रीमंत माणूस नफ्याचा १०% हिस्सा घ्यायला आला. शांत चेहऱ्यानं विचारलं, “कसा चाललाय व्यापार? माझा हिस्सा तयार आहे का?”

तेव्हा तो माजी भिकारी चेहरा पाडून म्हणाला, “साहेब, अजून हिशोब नीट झालेला नाही. काही कर्ज बाकी आहे. माझं खरंच नुकसान झालंय…”

श्रीमंत माणूस शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला, “माझ्या माहितीनुसार तुला चांगलाच नफा झालाय. मी फक्त १०% मागतोय. वाटा ठरलेला आहे. आठवतंय का?”

भिकारी थोडा चिडून म्हणाला, “साहेब, मेहनत मी केलीय, धंदा मी उभा केलाय. तुम्ही फक्त सुरुवात केलीत. आता त्या नफ्यावर तुमचा काही हक्क नाही. “

त्या क्षणी, तो श्रीमंत माणूस फक्त एक स्मित करत निघून गेला.

ही गोष्ट फक्त त्या श्रीमंताची आणि भिकाऱ्याची नाही… ही आहे आपली आणि भगवंताची.

भगवंत — आपल्याला जन्म देणारा, शरीर देणारा, वाणी, बुद्धी, जाणीव देणारा — आपल्याला जगायला ‘संधी’ देतो. हे जीवन ही त्याचीच ‘गिरणी’ आहे. आपण आपापल्या परीने मेहनत घेतो, प्रगती करतो.

आणि तरीही… जेव्हा तो आपल्याकडे फक्त १०% वेळ, १०% श्रद्धा, १०% उत्पन्न सत्कर्मासाठी मागतो —

तेव्हा आपलं मन देखील म्हणतं, “सगळं काही माझ्यामुळेच झालंय… देवाचा यात काही वाटा नाही!”

हेच तर आपलं अपयश आहे.

म्हणून,

चोवीस तासांपैकी दिवसाचे फक्त १०% भगवंताच्या स्मरणात घालवा.

आपल्या कमाईतून फक्त १०% भाग सत्कर्मासाठी वापरा.

आणि कधीही विसरू नका — संधी दिल्याशिवाय प्रगती शक्यच नव्हती.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थिंक पॉझिटिव्ह… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थिंक पॉझिटिव्ह… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, काही आपल्या जवळपासही असतात.

एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालली होती. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होता. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराने ब्रेक लावला आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागाने ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला.

ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही, उलट त्यालाच ‘सॉरी’ म्हणून पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता, आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले ‘तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिलेस? त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो. ‘

ऑटोवाला म्हणाला, ‘साहेब, अनेक लोक गार्बेज ट्रक (कचऱ्याचा ट्रक) प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही, त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात. उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ.

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याच्या शोधात राहतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटेला लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेन आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहीन. ‘

मला असे वाटते की आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद द्या आणि जे लोक वाईट वागतात, त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात, तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात.

लाइफ मॅनेजमेंट नियम

पहिला नियम – शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

दुसरा नियम – ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी माणूस सुख, दुःखी माणूस दुःख, ज्ञानी माणूस ज्ञान, भ्रमित माणूस भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो.

तिसरा नियम – जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो, त्याला इतरांचे सुख तरी कसे भावणार?तो इतरांवर निर्व्याज प्रेमही करू शकत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

एका अतिशय श्रीमंत स्त्रीने एका गरीब चित्रकाराकडून आपलं पोर्ट्रेट काढून घेतलं. जेव्हा ती स्त्री ते चित्र घ्यायला आली, तेव्हा ती फार खूश झाली.

तिने चित्रकाराला विचारले, “मी तुला काही बक्षीस देऊ का?”

चित्रकार गरीब होता. गरीब माणूस किती मागणार? गरीब माणसाच्या मागण्या काय असतात? त्या सगळ्या मागण्या परमेश्वराकडेच असतात.

तो स्वतःशी विचार करू लागला – ‘मी एक हजार मागू का? की दोन? की पाच?’ पण मग त्याला वाटू लागलं, ‘इतकं मागितलं तर देईल का ती?’त्याचं मन डगमगू लागलं.

शेवटी त्याने विचार केला की आपण काही मागूच नये; तिच्यावरच सोडावं. कदाचित ती अधिक देईल.

पण त्याच्या मनात भीती होती – कदाचित ती काहीच देणार नाही. किंवा फार थोडं देईल. एकदा जर संधी सोडली तर पुन्हा काही होणार नाही!

तरीही त्याने धाडस केलं आणि म्हणाला, “तुमची जी इच्छा असेल ते द्या.”

त्या बाईच्या हातात एक छानशी पर्स होती. ती म्हणाली, “ठीक आहे! ही पर्स तू ठेव. ही फार मौल्यवान आहे.”

पर्स तर खरोखरच सुंदर आणि मौल्यवान होती, पण चित्रकाराचं मन खट्टू झालं. त्याला वाटलं, “मी या पर्सचं काय करणार? खरं तर थोडेसे पैसे मागितले असते, तर काही उपयोग तरी झाला असता.”

मग तो म्हणाला, “नाही नाही, मी पर्सचं काय करणार? तुम्ही मला दहा हजार रुपये द्या.”

ती म्हणाली, “तुझी इच्छा.” तिने पर्स उघडली – त्यात एक लाख रुपये होते. तिने त्यातून दहा हजार रुपये काढले, चित्रकाराला दिले आणि पर्स घेऊन निघून गेली.

आजतागायत तो चित्रकार स्वतःच्या छाती बडवत बसलाय, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली!’

माणसाची स्थितीही अशीच आहे. परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे ते अदृश्य स्वरूपात आहे, गूढ आहे.

आपण मागतच राहतो.. दोन पैसे, थोडी सुख-सुविधा. पण परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे, ते जीवनाचं गुपित, ते अमूल्य धन, तो आपल्या आत असलेलं  खजिना.. तो पर्स आपण उघडून पाहिलाच नाही.

जे मिळालं आहे , ते तुमच्या मागण्यांपेक्षा अनंतपटीने अधिक आहे.

पण… मागण्यांपासून जर आपण मोकळे झालो, तरच ते दिसू शकेल ना !

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लेक माझी… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ लेक माझी… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

अशी कशी लेक, देवा,

माझ्या पोटी येते

नावसुद्धा माझं ती

इथेच ठेवून जाते

 *

 पहिला घास, देवा, ती

माझ्याकडून खाते

माझाच हात धरुन ती

पहिलं पाऊल टाकते

 *

 माझ्याकडूनच ती

पहिलं अक्षर शिकते

तिच्यासाठीसुद्धा मी

रात्र रात्र जागतो

 *

कुशीत माझ्या झोपण्यासाठी

ती गाल फुगवून बसते

मी आणलेला फ्रॉक घालून

घरभर नाचते

 *

अशी कशी लेक, देवा,

माझ्या पोटी येते

असे कसे वेगळे हे

तिचे माझे नाते

 *

 एक दिवस अचानक, ती,

मोठी होऊन जाते

बाबा, तुम्ही दमला का?

हळूच मला विचारते

 *

 माझ्यासाठी कपडे, चप्पल,

खाऊ घेऊन येते

नव्या जगातील नवीन गोष्टी

मलाच ती शिकवते

 *

 तिच्या दूर जाण्याने

कातर मी होतो

हळूच हसून मला ती

कुशीत घेऊन बसते

 *

 कळत नाही मला, देवा,

असे कसे होते

कधी जागा बदलून ती

माझीच आई होते

 *

 देव म्हणाला, ऐक, पोरा

तुझे, तिचे नाते

 विश्वाच्या ह्या साखळीची

एक कडी असते

 *

तुझ्या दारी फुलण्यासाठी

हे रोप दिले असते

सावली आणि सुगंधाशी तर

तुझेच नाते असते

 *

 वाहत्या प्रवाहाला, कोणी,

मुठीत कधी, का, धरते ?

मार्ग आहे ज्याचा, त्याचा

पुढेच असते जायचे

 *

 तुझ्या अंगणातली धारा ही

“जीवनदात्री” होते

आणि वाहती राहण्यासाठीच

“गंगा” सागराला” मिळते

 *

एक तरी मुलगी असावी

उमलताना बघावी

नाजूक नखरे करताना

न्याहाळायला मिळावी

 *

एक तरी मुलगी असावी

साजिरी गोजिरी दिसावी

नाना मागण्या पुरवताना

तारांबळ माझी उडावी

 *

 एक तरी मुलगी असावी

मॅचिंग करताना बघावी

नटता नटता आईला तिने

नात्यातली गंमत शिकवावी

 *

 एक तरी मुलगी असावी

जवळ येऊन बसावी

मनातली गुपितं तिने

हळूच कानात सांगावी

 *

एक तरी मुलगी असावी

गालातल्या गालात हसावी

कधीतरी भावनेच्या भरात

गळ्यात मिठी मारावी

 *

एक तरी मुलगी असावी

एक तरी मुलगी असावी

 ☆ ☆ ☆ ☆

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवांचा व्हाट्सअप ग्रुप …” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “देवांचा व्हाट्सअप ग्रुप …” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

देवसुद्धा कंटाळले

सारखा ऐकून जप

ठरवलं मग त्यांनी

करु सुरू व्हाॅटस अप

*

मनात करून विचार नारदांनी

मारली ब्रह्मदेवांना Pin

म्हणाले महाराज,

आपणच व्हा ना Group Admin

*

खूप करून विचार

दिली ब्रह्मदेवांनी संमती

मग Netpack आणि Wi-Fi संगे

आली Smartphones ना गती

*

सर्व देवांना Add करुन

रात्री ब्रम्हदेवांनी गाठली शेज

सकाळी आला गणरायाचा

पहिला Good Morningचा मेसेज

*

पण नेमकी त्यावेळी

कैलासावर नव्हती Range

तिन्हीसांजेला मिळाला

कैलासपतींना तो GM चा Message

*

क्रोधित होऊन त्यांनी,

पुत्राला केले Connect

कोपलेल्या महादेवांनी

नंतर ग्रुपच केला Left

*

सरस्वतीदेवींनी पाठवले

ज्ञानाचे Message

तर अप्सरांनी केल्या

Beauty Tips पेश

*

धनप्राप्तीसाठी लक्ष्मी-नारायणांनी

लिहीले अनुभवाचे बोल

तर गुरुदेव दत्तांनी लिहीले

शांती व वैराग्याचे मोल

*

गोपाळकृष्णांनी केले

Photo Upload

पण प्रभू रामचंद्रांची एक पत्नी व्रताचीच

कविता ठरली तोडीस तोड

*

आई अन्नपूर्णेने ग्रुपवर

टाकल्या छान छान पाककृती

तर धन्वंतरी म्हणाले

सगळं खा पण जपा आपली प्रकृती

*

मारुतीरायांनी लिहिला लेख

योगा आणि Gym चे फायदे

संतप्त दुर्गादेवी म्हणाल्या

पाळा सर्व नियम आणि कायदे

*

यमराजांनीसुद्धा रेडा सोडून,

फोटोसाठी मागितली Bike

तर पंढरीच्या विठ्ठल रखुमाईंच्या

फोटोला आले प्रचंड  Like

*

Whats Appच्या या खेळात,

देव पुरते झाले दंग

पण धरतीवरची सारीच,

यंत्रणा झाली की हो भंग

*

माणसाच्या कर्तृत्वाला

नव्हते देवांचे आशीर्वाद

होऊ लागले त्यांच्यात

तंटे, बखेडे, वितंडवाद

*

मग मात्र नारदमुनींचे

धाबे पुरते दणाणले

ब्रम्हदेवांना ते परत

एकदा शरण गेले

*

म्हणाले देवा, Group

सारा करा Delete

सगळ्याच देवांना

याचा आला आहे वीट

*

माणसांनाच करू द्या

त्यांचे हे रोजचे काम

आपण फक्त देऊ आशीर्वाद

ऐकूनी आपुले नाम

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तसंच! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

तसंच! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!

या ‘तसंच’ मधे जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा, ” म्हणत ती हातावर दे..

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर..

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप, हे सारं अध्याहृत होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाहीत, त्यांचं स्मितहास्य लोपायचं नाही… इतकं ते सारं सहज होतं! सहज होतं म्हणून सुंदर होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही – घरातल्या सर्व माणसांसाठी उपनियम!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको कॉलेजला! ” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पातून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच, ” असं म्हणण्याचा अवकाश…

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं, एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ, ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही, हा या सगळ्याचा व्यत्यास.. तो ती तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्षं घे, चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ” ‘तशीच’ जाऊ नको गं, ” म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. ‘लहान आहे, मोठी होईल तेव्हा कळेल, ‘ असं म्हणून सोडूनही द्यायच्या!

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील, तर आपल्या घरातलं काही जाणार नाही. पण ‘पत’ मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने पत सांभाळावी. ”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार..?

आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आसपासच वावरत असतात.

लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरे मी काय केले? –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दुसरे मी काय केले? –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एक दिवस लेकीला आई बोले –

 रांधा, वाढा, उष्टी काढा

दुसरे मी काय केले?

लेक म्हणे हसून,

श्लोक, ओव्या, सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस?

स्वच्छ वाणी, सुरेल शब्द

भांडार तूच खुले केलेस

 *

तुझा स्वयंपाक बघून बघून

मलाही लागली गोडी,

तुझ्यातली अन्नपूर्णा

माझ्यातही आली थोडी.

 *

संस्कार वर्गात नाही जावे लागले आम्हाला! कसे वागावे, कसे बोलावे ठेवा तुझाच सर्वांना!

 *

नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल,

तरी काहीच अडले नाही

तुझ्यासोबत. बोलताना

गोष्टी कधीच संपल्या नाहीत.

 *

सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस ॲडजेसमेंट

 *

आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

डाॅक्टर आमचा तूच होशी

ओवा, हळद, शेपा, हरडा

आजही असते माझ्यापाशी

 *

तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहीत नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली.

 *

पै पाहुण्यात वाढलो म्हणून

कंटाळा आजही येत नाही,

माणसं जोडण्याची कला.

जणू जगण्याचाच भाग होई!

 *

तरीही आई आता असं का म्हणतेस

 आयुष्यात मी काय केले?

तुझ्याशिवाय का गं आई

 माझ्यातल्या कळीचे फूल झाले?

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ हीच खरी सावित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हीच खरी सावित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

ती वडाच्या फांदीखाली बसलेली नाही,

ती आय. टी. च्या स्क्रीनपलीकडे दिसते,

ती पिंपळपानं ओवून नवऱ्याचं आयुष्य मागत नाही,

ती त्याच्यासोबत उभी राहून त्याचं आयुष्य बनवते.

 

तिला यम भेटत नाही,

पण बँकेचे कर्ज, मुलांचं शिक्षण, आणि सासूचा रिपोर्ट

या सगळ्या यमाच्या रूपांशी तिचा रोज तिचा सामना होतो

हसत, लढत, झगडत.

 

ती नवऱ्याच्या पाठी मागे उभी नाही,

ती त्याच्या शेजारी आहे

त्याच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवणारी,

त्याच्या अपयशात सुद्धा माझा आहे ना! म्हणणारी.

 

ती संध्याकाळी फक्त दिवा लावत नाही,

ती घर, नोकरी, स्वप्नं आणि नातं…….

सगळं उजळवत ठेवते.

 

ती पाटावर ओवाळत नाही,

पण सकाळी दोन डब्बे भरते — एक स्वतःसाठी, एक त्याच्यासाठी.

ती उपवास करत नाही,

पण गरज पडली, तर स्वतःच्या भुकेवर पाणी फिरवते.

 

आजची सावित्री काळावर नाही, परिस्थितीवर मात करते,

ती पूजा नाही करत,

पण रोजच्या जगण्याला एक –तपस्येचं रूप देते.

 

हीच खरी सावित्री —

मूक नाही, कधी कधी थकलेली, पण कधीही हार न मानणारी.

तिला वंदन, तिच्या अस्तित्वाला सलाम!

लेखक : अज्ञात

संकलन व प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘गंभीर मनोवृत्तीने विचार करता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘गंभीर मनोवृत्तीने विचार करता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी असलेल्या शाळेत आयोजित केलेल्या एका समारंभात, एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक भावनिक भाषण दिलं — जे ऐकणाऱ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं.

शाळेचं व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्या वडिलांनी विचार मांडला :

“जेव्हा निसर्गाच्या प्रवाहात बाहेरून कोणतीही ढवळाढवळ होत नाही, तेव्हा निसर्गाची व्यवस्था पूर्णत्वाकडे झुकते.

पण माझा मुलगा, हर्बर्ट, इतर मुलांप्रमाणे शिकू शकत नाही. त्याला गोष्टी समजत नाहीत. मग त्याच्या बाबतीत निसर्गाची व्यवस्था कुठे आहे? “

प्रश्न ऐकून सगळं सभागृह सुन्न झालं. वडील पुढे बोलू लागले:

“माझा विश्वास आहे की, हर्बर्टसारखं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम मूल जेव्हा या जगात येतं, तेव्हा आपल्याला मानवतेचं खरं रूप पाहण्याची संधी मिळते — कारण अशा मुलाला इतर लोक कसे वागवतात, त्यातून ती मानवता प्रकट होते. “

त्यांनी एक प्रसंग सांगितला.

एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, काही मुलं बेसबॉल खेळत होती.

हर्बर्टने वडिलांना विचारलं :

“बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का? “

वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखा मुलगा आपल्या संघात नको असतो. पण त्यांना हेही जाणवले की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.

वडील मुलांपैकी एकाकडे गेले आणि विचारलं,

“हर्बर्टला थोडं खेळता येईल का? “

त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला, “आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात घ्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू. “

हर्बर्ट हळूहळू स्मितहास्य करत बेंचकडे गेला, संघाचा जर्सी चढवला. त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

हर्बर्टच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं प्रतिबिंब बाकीच्या मुलांनीही पाहिलं — आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यातला अभिमानसुद्धा.

नवव्या इनिंगची सुरुवात झाली. हर्बर्टने हातमोजा घालून उजव्या फील्डमध्ये उभं राहत खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे कुठलाही बॉल आला नाही, तरी तो फक्त खेळात असल्यानेच इतका आनंदी होता की चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं, आणि वडील प्रेक्षकांतून जल्लोष करत होते.

नवव्या इनिंगमध्ये संघाने काही धावा केल्या. आता, दोन बॅट्समन बाद, तिन्ही बेस भरलेले — आणि हर्बर्ट फलंदाजीसाठी तयार होता.

हा निर्णय — हर्बर्टला फलंदाजीची संधी देणं — जिंकायची संधी गमावणं होतं. तरीही त्याला ती संधी दिली गेली.

सर्वांना माहीत होतं की, हर्बर्टला बॅट नीट पकडता येत नाही, तर बॉल मारणं तर दूरची गोष्ट होती.

पण बॉलरला लक्षात आलं — समोरचा संघ हर्बर्टला आनंद देण्यासाठी जिंकण्याची संधी सोडत आहे.

त्याने बॉल अगदी हळू फेकला — जसा हर्बर्टला मारता येईल असा.

पहिल्या प्रयत्नात हर्बर्टने मारण्याचा प्रयत्न केला, पण चुकला.

दुसऱ्यांदा, त्याने बॉल मारला — अगदी सौम्यपणे — आणि बॉल पिचरच्या पुढ्यात थांबला.

पिचर सहज बॉल पकडून पहिल्या बेसवर फेकून हर्बर्टला आऊट करू शकत होता. पण त्याने बॉल मुद्दामहून पहिल्या बेसमनच्या डोक्यावरून उंच फेकून दिला.

सर्व प्रेक्षक ओरडू लागले:

“हर्बर्ट, पहिल्या बेसकडे धाव घे, धाव घे! “

हर्बर्ट धावत गेला — ते अंतर त्याने कधीच गाठलं नव्हतं.

“दुसऱ्या बेसकडे धाव घे! “

परत एका खेळाडूने — तो सर्वात लहान मुलगा होता— बॉल पकडला आणि जाणलं की तो ‘हिरो’ बनू शकतो. पण त्यालाही जाणवलं की हर्बर्टसाठी मोठं काहीतरी घडतंय. त्याने बॉल तिसऱ्या बेसमनच्या डोक्यावरून फेकला.

हर्बर्ट तिसऱ्या बेसवर पोहोचला. पुढचे धावपटू होमप्लेटवर पोहोचले.

सर्व मुलं आणि प्रेक्षक ओरडत होते,

“होमप्लेटकडे धाव घे! “

हर्बर्ट धावत जाऊन होमप्लेटवर पोहोचला — हात वर करून उभा राहिला — विजयी हसत. त्याचे वडील त्याचं कौतुक करत उभे होते.

आणि तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला मिठी मारली — जणू त्यानेच ‘ग्रँड स्लॅम’ मारून सामना जिंकवला!

वडील डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाले—

“त्या दिवशी या मुलांनी मिळून खऱ्या प्रेमाचं आणि मानवतेचं एक अद्वितीय उदाहरण जगापुढे ठेवलं. “

हर्बर्ट पुढचा उन्हाळा पाहू शकला नाही. त्या हिवाळ्यातच तो गेला. पण त्याच्या मनात मात्र एकच गोष्ट कायम राहिली — तो एकदा ‘हिरो’ झाला होता.

आईने त्याला आनंदाश्रूंत मिठी मारली होती — आणि त्याच्या वडिलांचा हसतमुख चेहरा हे त्याला आयुष्यभर पुरेसं होतं.

एक छोटंसं शेवटचं सांगणं:

आपण दररोज शेकडो विनोदी मेसेज एकमेकांना पाठवतो. पण जेव्हा आयुष्याचं खरं सौंदर्य सांगणारे, प्रेम आणि माणुसकी शिकवणारे संदेश येतात — ते पुढे पाठवताना आपण थोडं थबकतो.

तुम्ही जर हा मेसेज कोणाला पाठवायचा का, याचा विचार करत असाल — तर ज्या व्यक्तीने तुम्हाला तो पाठवला, त्याला विश्वास आहे की आपल्यामध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून तुमच्या संपर्कात असलेली प्रत्येक व्यक्ती हे ऐकण्याच्या योग्यतेची आहे.

कोणीतरी एक शहाणा माणूस म्हणाला होता:

“प्रत्येक समाजाची खरी कसोटी ही तिथल्या सर्वांत दुर्बल घटकांशी तो कसा वागतो यावरून होते. “

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बिघाड…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “बिघाड…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

फ्रिज बिघडला.

टीव्ही बंद.

वाय-फाय डाऊन.

 

शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.

 

“आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं! ” – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.

 

सहा वेळा प्लग काढून लावला.

टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.

नेट कनेक्शन गायब.

 

सगळीकडे जणू “No Signal”.

 

तो चिडून म्हणाला,

“हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय. “

 

त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.

ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,

“काय झालं? “

 

“काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये? “

 

ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडा थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.

ती म्हणाली—

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का? “

 

क्षणभर तो गोंधळला.

काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणिवेचा प्रकाश पडला.

त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.

 

फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं…

टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही…

नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…

 

पण ती?

ती अजूनही सकाळी उठून सगळं करत होती.

गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…

सगळं ‘नॉर्मल’ चालू.

 

ती बिघडत नाही? ती थकत नाही?

 

ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का? “

 

ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं. जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,

ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?

 

ती तापातही उठते.

 

पाळीच्या दुखण्यातही काम करते.

मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते.

सासूबाई टोचून बोलल्या तरी चूप राहते.

 

कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.

 

तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.

 

काही वर्षांपूर्वी तो नवीन नोकरीला लागला होता.

तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.

ती लग्नानंतर शहरात आली. नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.

सगळं ती शिकत गेली.

रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.

त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.

 

एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.

तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”

ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच. ”

 

 

आणि आत्ताच…

 

तो फ्रिज उघडून पाहतो, “कसं जमवायचं आता सगळं? “

 

पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—

“माझ्या आयुष्याचं तपमान बिघडत असताना… किती वेळा हिने ‘फ्रिज’सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय! ”

 

तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो.

ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.

 

“कधी बिघडशील गं तू? ” तो हळूच म्हणतो.

 

ती थांबते. थोडा वेळ शांत.

मग म्हणते—

“बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला! “

 

त्याच्या छातीत काहीतरी धडधडतं.

 

दुपारी…

 

तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.

मुलाला विचारतो, “तुला सॅंडविच खायचंय का? “

 

मुलगा म्हणतो, “पप्पा, तुम्ही बनवाल? “

 

तो म्हणतो, “हो, आई विश्रांती घेत आहे. “

 

ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—

“उद्या काय? पुन्हा मीच चालू? “

 

तो म्हणतो,

“नाही. आता मीही चालू राहीन. “

 

रात्री…

 

ती शांत झोपलेली असते.

तो तिच्या पायाशी चादर घालतो.

लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.

 

आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—

“तू चालू होतीस… म्हणून घर चाललं.

पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय—

तू बिघडलीस तर मीही संपलो! “

 

या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो.

पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?

तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.

कारण ती जर एक दिवस खरंच “Shutdown” झाली,

तर घर चालणार नाही… फक्त ‘जगणं’ चालू राहील… पण त्यात ‘जीव’ नसेल.

घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares