मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हत्तीची आजी – – ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हत्तीची आजी – – ☆ प्रा. भरत खैरकर ☆

कोकणामध्ये आंबोली घाट उतरून खाली गेलो की हिरण्यकेशी नदीचा उगम आहे.. तिथून अजून खाली उतरलो तर तिलारी नावाचा एक मोठासा जलाशय आपणास दिसतो.. आणि अजून खाली उतरलं तर मग गोवा बॉर्डर सुरू होते.काही अंतरावर कर्नाटक बॉर्डर  आहे. त्या निसर्गरम्य भागात राहणाऱ्या एका गावातील आजीची ही गोष्ट..

कोकणामध्ये पंधरा-वीस  वर्षापासून सारखा हत्तीचा धुमाकूळ आणि त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रातून  येतात.. आजीचे शेत  मुख्य गावापासून साधारण सात आठ किलोमीटर जंगलामध्ये.. तेथे आजी व आजोबाने एक झोपडी वजा राखण करण्यासाठी मचानासारखं घर बंद होतं.. बाजूलाच विहीर होती.. जंगलातील हत्ती कित्येक वर्षापासून आजी आजोबांना बघायचे.. आजी आजोबा सुद्धा.. हत्तींना सरावले होते.. विहिरीचं पाणी प्यायला मिळत असल्याने म्हणा.. किंवा त्या भागात हत्तींना सेफ वाटत असल्याने.. तोच त्यांच्या येण्या- जाण्याचा व विसाव्याचा मार्ग होता..  हत्ती बऱ्याचदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह आजीच्या ह्या घराजवळ बराच वेळ घालवायचे.. आजोबा आजी हत्तींचा हा कुटुंब कबीला लांबून निरीक्षण करायचे.. कधीही त्यांना ढोल बडवून किंवा मोठा आवाज करून.. फटाके लावून.. करंट लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही.. उलट त्यांच्यासाठी सुरक्षित असे वातावरण त्या ठिकाणी निर्माण केले..

एक दिवस दुपारी आजी आजोबा लांबून हत्तींना बघत असताना.. एक भली मोठी हत्तीण  जमिनीवर गडबडा लोळायला  लागली.. तिला वेदना होत होत्या असं वाटलं.. आणि थोड्याच वेळात.. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला..  तीन चार हत्ती तिच्या बाजूला घोळका करून बघत होते.. बराच वेळ झाला तरी हत्तीण जागेवरून उठत नव्हती.. त्यामुळे इतर हत्तीची  कासावीस वाढली होती..  ते काळजीपोटी मागेपुढे.. मागेपुढे  करत होते.. काय करावं त्यांना सूचना! आजीने हे लांबून बघितलं.. तिच्या लक्षात आलं.. शेवटी आजीही एक आईच होती.. तिने हिंमत करून  हत्तीजवळ जायचं ठरविलं.. आजोबा ‘नको.. नको’  म्हणत असतानाही आजी गेली.. तिने विहिरीतून दोन-तीन बदल्याभरून पाणी काढलं.. आणि ते पाणी बेशुद्ध झालेल्या हत्तीणीच्या सोंडेवर आणि अंगावर ओतलं.. थोडसं पाणी तिने हिमतीने.. सोंडेतही टाकण्याचा प्रयत्न केला.. आणि काय आश्चर्य पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये हत्तीण उठून उभी झाली.. हत्तीणीच्या डोळ्यांमध्ये एक कारुण्य भाव होता.. नंतर तो कळप थोड्याच वेळात जंगलात निघून गेला.. आजी आणि आजोबाही  आपल्या गावात आले..

दरम्यानच्या काळात कोरोना संकट आल्याने.. दोन अडीच वर्ष.. कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते.. शिवाय आजीचीही तब्येत बऱ्यापैकी खालावली होती.. कारण नेहमी रानात फिरणारे आजी आजोबा कोरोना पायी घरात बसून बसून अजून थकले होते.. खेड्यातील माणसाला विशेषता रानातल्या माणसाला.. रानाशिवाय कसं जगवेल..? पण त्यांचं रानात जाणं मात्र बंद झालं होतं..

बऱ्याच दिवसानंतर.. गावातलाच एक गुराखी खूप घाबरत घाबरत आजीकडे आला आणि म्हणाला,” आजी तुमच्या जंगलातल्या घराकडे रोज दहा-बारा हत्तीचा कळप येतो.. तो तुमचं घर पाडणार आहे.. आम्ही हाकलायचा खूप प्रयत्न केला.. पण ते काही तिथून हलत नाही.. रोज दुपारी तुझ्या झोपडीजवळ त्यांचा राबता असतो.. बघ काहीतरी कर जंगलच्या लोकांना सांग.. नाहीतर तुझा घर काही रहायचा नाही.. काहीतरी सुतळी बॉम्ब वगैरे लाव.. फटाके वगैरे फोडून  हाकलून देऊ आपण त्यांना..” असं मनात गुराख्याने उपाय सुचविला.. आजी म्हटली” अरे हो, गप कि जरा! मला बघू तर दे!”

” उद्या जाते मी रानात अन् बघते काय करायचं ते?”  असं सांगून आजीने त्या गुराख्याला त्याच्या घरी पाठवलं..

दुसऱ्या दिवशी आजी आजोबा सह अडीच तीन वर्षानंतर पहिल्यांदा जंगलातील  शेतावर गेली.. तिला हत्तींची दुपारची येण्याची वेळ माहिती होती.. तोच वेळ तिने साधला.. आणि गेल्यावर पाहते तर काय.. आता दहा-बारा हत्ती होते.. त्यातला एक हत्ती आजीला पाहताच.. पुढे येऊन आपली सोंड वर करून “जणू इकडे ये.” असं सांगतो आहेस वाटत होतं.. आजीने ओळखलं ही हत्तीण तीच होती.. जिला आपण पाणी पाजलं होतं.. ती आपली सोंड सारखी.. कधी आजीकडे तर कधी छोट्या पिलांकडे करत होती.. जणू ती आजीला आपलं मूलं दाखवीत होती.. आणि जवळ येण्यासाठी सारखी सोंड खालीवर करून आजीला बोलवत होती..!

आजोबा ‘नको.. नको’ म्हणत असतानाही.. आजी हिंमत करून पुन्हा त्या हत्तीणीपाशी गेली.. तर आश्चर्य.. हत्तीणीने   सोंडेने आजीला स्पर्श करत.. आपल्या छोट्या बाळाच्या दिशेने हलकसं ढकललं.. जणू काही “हा तुझा नातू आहे बघ!” असंच काहीसं त्या हत्तीणीला सांगायचं असेल.. आजीनेही मग त्या छोट्या हत्तीच्या   पाठीवरून हात फिरवून  त्याला  अंजारलं..गोंजरलं.. विहिरीतलं तीन-चार बादल्या पाणी काढलं.. छोट्या हत्तींना पाजलं.. पाणी पिऊन झाल्यावर पुढच्या काही क्षणातच संपूर्ण कळप जंगलाच्या दिशेला निघाला.. आजीही आपल्या घरी आली..

तिने पुण्यातल्या आपल्या सॉफ्टवेअर  इंजिनीयर  असलेल्या नातवाला फोन करून सांगितलं, ” बाबू, आपल्या रानात हत्ती आले आहेत.. आपल्या शेतात राहतात.. तुला बघायचे असतील तर तू दिवाळीमध्ये ये.. तुला दाखवते मी हत्ती जवळून..!”

आजीचा हा फोन ऐकून नातवाला आश्चर्य वाटलं. तो सुरुवातीला आजीवर रागावला.. “कशाला ह्या गोष्टी करतेस.. हत्ती पिसाळला वगैरे तर ठेवेल कां तुला?”

वगैरे समजावलं.. पण आजीच म्हणाली, “अरे, तू डरपोक की काय?  मला नाही भीती वाटत.. तू ये तुझा कॅमेरा घेऊन.. वाटल्यास लांबच उभा रहा आणि माझा फोटो काढ बरं हत्ती आणि त्याच्या पिला सोबत…!” तेवढाच तुला फेसबुक का काय म्हणतात त्याला स्टेटस ठेवायला बरं.. नाहीतर रिल बनवायला बरं..” म्हणून आजीने फोन ठेवला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेलो तरी असेन मी..! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ गेलो तरी असेन मी..! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

राम चाले वाटे… लक्ष्मण झाडी काटे! आजीच्या मांडीवर डोकं टेकवून त्या दोघांनीही आजीच्या गोष्टींत कधीतरी हे शब्द ऐकले असावेत. प्रभू रामचंद्र यांच्या पदरी वनवासाचा निखारा पडला… तोच निखारा आपल्याही पदरात बांधून घेणारा लक्ष्मण हे बंधूप्रेमाचे एक महान उदाहरण म्हणून जगाने स्मरणात ठेवले आणि पुढच्या पिढ्यांना सांगितले!

वनातली वाट म्हणजे पायांची कसोटी पाहणारी… अणकुचीदार दगड, टोकदार काटे यांचे आच्छादन असते या वाटांवर. प्रभू याच वाटेवर चालू लागले… सीतामाई त्यांचे अनुसरण करीत निघाल्या होत्या… धाकटे लक्ष्मण यांचे सारे ध्यान या दोघांच्या पायांकडे लागून राहिलेले होते… या चरणकमलांना इजा होता कामा नये! लक्ष्मण पुढे झाले… त्यांनी वाटेलगतची झुडपे तोडून त्यांचा झाडू बनवला… आणि ते प्रभूंच्या पुढे झाले…. खाली वाकले आणि त्यांनी मार्ग निष्कंटक करायला आरंभ केला! भावाने आपला बंधूभाव असा प्रकट केला आणि सा-या जगाला एक उदाहरण घालून दिले!

पण कलियुगात कुणी कुणाचे राहिले नाही…. पण कुठेतरी एखादे राम… एखादे लक्ष्मण मात्र जन्म घेत होते… असेच एका आईच्या पोटी दोघे जन्मले… पण इथे थोरल्या रामाने धाकटया लक्ष्मणाचा मार्ग निष्कंटक केला… स्वत:च्या पायांत काटे रुतवून घेत!

निसर्गाने मानवाला दोन मूत्रपिंडे प्रदान केलीत. एक नादुरुस्त झाले तरी दुस-यावर काम सोपवता येते. पण जेंव्हा दोन्ही निकामी होतात… तेंव्हा देह अंतर्गत विषबाधेने जेरीस येतो आणि त्याचा अकाली अंत होतो. वैद्यकशास्त्रात प्रगती होत गेली, विविध प्रयोग होत गेले. एका देहातील अवयव दुस-या देहात प्रत्यारोपित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली… आरंभी प्राण्यांचे मूत्रपिंड माणसाच्या शरीरात बसवण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. मानवी शरीर बाहेरचे काहीही लगोलग स्विकारत नाही! एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन शरीरे मात्र याबाबतीत एकमेकांना पूरक ठरू शकतात… कारण रक्ताचे नाते अधिक जवळचे! १९५४ मध्ये रोनाल्ड आणि रिचर्ड हेनरिक या जुळ्या भावांवर हा प्रयोग झाला… डॉक्टर जोसेफ मरे, डॉक्टर जॉन मेरील, डॉक्टर हॅरिसन यांनी रोनाल्डची एक किडनी काढून रिचर्डच्या शरीरात बसवली…. आणि रिचर्डला पुढे आठ वर्षांचे वाढीव आयुष्य लाभले! पण यासाठी रोनाल्डने सुद्धा रिचर्डएवढ्याच वेदना सहन केल्या!

एक अवयव काढून दुस-या शरीरात बसवणे ही प्रक्रिया दाता आणि स्वीकारकर्ता या दोघांनाही सारखीच वेदनादायी प्रक्रिया असते.

आजपासून बत्तीस वर्षांपूर्वी असेच एक प्रत्यारोपण झाले.

मोठ्या भावाने धाकट्याला त्याचं एक मूत्रपिंड (किडनी) दिली. साधारणत: १९९३ मधील ही गोष्ट असावी. त्यावेळी आजच्या इतकी अवयवदान जागृती आणि आधुनिक साधनेसुद्धा नव्हती. उपचारांसाठी शहरात जावे लागे! धाकट्या भावाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झाले! एकच पर्याय होता…. मूत्रपिंड प्रत्यारोपण!

 अशावेळी थोरले बंधू पुढे सरसावले… केवळ भावावरील निस्सीम प्रेमापोटी हे दान झाले… दान नव्हे जीवनदान…. पंधरा वर्षांच्या श्वासांचे दान.

 महर्षि दधिची यांचे येथे स्मरण होते…. एका भयावह असूराशी लढण्यासाठी देवांना एका वज्राची गरज होती… आणि ते वज्र केवळ हाडांपासून बनवण्यात येऊ शकत होते… यासाठी देवांनी दधिची यांना प्रार्थना केली… आणि महर्षि दधिची यांनी देहत्याग केला! त्यांच्या हाडांपासून वज्र बनवले गेले आणि त्या असूराचा नाश केला गेला! पुढे महर्षींच्या उर्वरित हाडांपासून गांडीव, पिनाक आणि सारंग नावांची धनुष्ये बनवली गेली, असे पुराणात सांगितले जाते!

ऋषींनी दान देण्याची रीत समाजाला समजावली… लक्ष्मण यांनी सेवेचा, त्यागाचा मार्ग अवलंबला!

माऊली ज्ञानोबाराय म्हणतात.. येथ वडील जे जे करिती, तया नाम धर्म धर्मु ठेविती… तेचि येर अनुसरिती सामान्य सकळ! वडील म्हणजे मोठी माणसे जे काही करतात त्याचे अनुकरण सामान्य माणसे करीत असतात. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या मातोश्री म्हणाल्या होत्या.. “केवळ माझे मूत्रपिंडच नव्हे.. तर गरज पडली तर माझे सर्व अवयव घ्या.. पण माझ्या मुलाला वाचवा! “

आपल्या या प्रस्तुत सत्य कहाणीमधल्या थोरल्या भावाच्या रक्ताने धाकट्या भावाच्या रक्ताचा गंध जाणला… एकाच मुशीत तयार झालेले हे दोन जीव… एकमेकांशी यांनी जुळवून घेतले… शरीराने हा नवा अवयव स्वीकारला… धाकट्याचे जीवन पंधरा वर्षांनी वाढले… त्याचा संसार झाला! ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकऱ्याने, त्याकाळी मर्यादित साधने असताना हे धाडस केले होते.. ही मोठी गोष्ट होती.

इकडे एकाच किडनीवर थोरल्या बंधूंची मदार होती. आता त्यांना स्वतःच्याही तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागणार होती. शेतातली कामे तर होतीच. मुले अजून हाताशी यायची होती. पण आपले घर अजून एकसंध आहे याचे समाधान पदरी होते. या सर्व गदारोळात पत्नीने जणू जबाबदारीच्या धनुष्याला स्वतः प्रत्यंचा लावली होती… आणि ते पेललेही.

त्यांनी आयुष्याला निर्धारित वळण लावून घेतले. नवा जन्म लाभलेल्या बंधूंनी सुद्धा आहार विहार सांभाळला, पथ्यपाणी कसोशीने पाळले. थोरल्याने अध्यात्माची कास धरली. हरिपाठ, भजन यांत हजेरी नियमित ठेवली… एक एक दिवस कारणी लावला. पाऊस असला तरी घराच्या ओसरीत ठरवलेली पावले चालण्याचा नेम चुकवला नाही… पावले मोजण्यासाठी जपमाळ हाती घेतली… स्वार्थाच्या जोडीने परमार्थ साधला जाऊ लागला!

कालांतराने धाकट्याची प्राणज्योत मालवली… तो आघात सोसला आणि संसाराचे ओझे खांद्यावर पेलले!

पुढे देहाने वार्धक्य अंगिकारले.. वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्षे उलटली…. संसार मार्गी लागला होता… कन्यादानाचे पुण्य लाभले होते.. दोन्ही चिरंजीव शेतीत, जबाबदारीच्या नोकरीत स्थिरावले! नातवंडांचा गराडा अवती भवती होता… काळया आईची सेवा धनधान्य देत होती.

पण.. निसर्ग आपल्या वेगाने पावले टाकीत आला… शरीर आणि अवयव आता थकत चालले होते…. देहावसान अपरिहार्य!

वेदना झाल्या.. मात्र आधुनिक उपचार, कुटुंबियांची सेवा यामुळे अंतकाळी त्या सुसह्य झाल्या!

दादा म्हणत सर्वजण त्यांना.. दशक्रियेच्या दिवशी हजारोंनी समाज लोटला… प्रत्येकाने हीच भावना व्यक्त केली… कीर्ती रुपे उरावे ते असे!

बत्तीस वर्षांपूर्वी जी आर्थिक, सामाजिक, मानसिक परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाला असलेला धोका पत्करून धाकट्याचे प्राण वाचवण्याची हिंमत दाखवणे किती जिकिरीचे असेल.. याची कल्पनाच करता येईल… ज्यांनी हे प्रत्यक्ष भोगले त्यांच्या जीवालाच त्या कळा ठाऊक!

सोपानरावांना हे जग सोडून आता वीसेक दिवस झाले असतील… पण त्यांच्या दातृत्वाचा, बंधुप्रेमाचा आदर्श पुढील कित्येक पिढ्यांना पुरेल असाच ठरेल!

(माझे आप्त कैलासवासी सोपानराव सखाराम गोगावले यांना नुकतीच देवाज्ञा झाली… त्यांच्या दातृत्वाला वंदन करण्यासाठी हा लेखन प्रपंच. यानिमित्ताने अवयवदान करणाऱ्या, प्रेमासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सर्वांना नमस्कार! दादांना भावपूर्ण श्रद्धांजली… राम कृष्ण हरी)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मारी क्युरी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ मारी क्युरी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी समजते, कमी अक्कल असते, असे समजणाऱ्या विद्वानांच्या काळात शास्त्रीय जगतात आपल्या बुद्धीतेजाने प्रखरपणे तळपणारी एकमेव चांदणी होती, ती म्हणजे प्रख्यात शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेत्या मारी क्युरी. 4 जुलै 1934 ला मारी क्युरी देहाने निवर्तल्या. पण जगाला अणूयुगात नेणाऱ्या त्यांच्या अद्वितीय संशोधनामुळे आजही त्या शास्त्रीय जगतातील जनमनसाच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने…

ज्या काळात पोलंड रशियन त्झारच्या जुलमी राजवटीखाली होता, त्या काळात पोलिश जनतेला मातृभाषेत बोलायचीही मोकळीक नव्हती, शालेय शिक्षण सक्तीनं रशियन भाषेत घ्यावं लागे, देवाची प्रार्थनादेखील परक्या रशियन भाषेतच म्हणावी लागे, अशा काळात, वॉर्सामधल्या एका शाळा शिक्षकाच्या घरी मारिया ऊर्फ मान्या या तेजस्वी मुलीनं जन्म घेतला. हुशार, तल्लख मान्या शालांत परीक्षेत पहिली आली, पण ज्ञानार्जनाच्या ध्यासानं झपाटलेल्या ह्या मुलीच्या पुढील शैक्षणिक वाटेवर अंधारच होता, कारण पोलंडमध्ये विद्यापीठात मुलींना प्रवेशच नव्हता! अशा परिस्थितीत, शाळेतून नुकतीच बाहेर पडलेली ही तडफदार मुलगी मोठ्या बहिणीला डॉक्टर बनण्यासाठी फ्रान्सला जाण्यास प्रेरित करते; परक्या घरी गव्हर्नेसची नोकरी करून बहिणीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवते; आणि पुढे बहिणीच्या आधारानं स्वतःच्या शिक्षणासाठी दूरदेशी फ्रान्सला प्रयाण करते. हलाखीच्या परिस्थितीत अत्यंत काटकसरीनं राहून, अपार परिश्रम करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करते. अशा या मुलीवर वडिलांनी केलेले मूल्यवान संस्कार, भावंडांचे घट्ट प्रेमबंध, देशप्रेमाची प्रखर प्रेरणा, आणि पिएर-मारी, (नवरा-बायको आणि एकमेकांचे कार्यालयीन सहकारीदेखील) यांची परस्परपूरक व्यक्तिमत्त्वं, यांचा परामर्श घेणं आजच्या बदलत्या मूल्यांच्या काळात फार गरजेचं आहे.

मारी क्युरी (Marie Curie) या एक प्रसिद्ध पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी किरणोत्सारीतेवर (radioactivity) महत्त्वाचे संशोधन केले. त्या दोन वेगवेगळ्या विज्ञान शाखांमध्ये (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला आहेत. त्यांनी विज्ञानात महिलांसाठी एक नवीन मार्ग उघडला. त्या पॅरिस विद्यापीठात प्राध्यापक होणाऱ्या पहिल्या महिला होत्या आणि त्यांनी अनेक महिलांना विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रेरित केले. त्यांचं अखंड जीवन हे आपणा सर्वांसाठी दिशादर्शक आहे. कितीही मोठं आकर्षण समोर उभं राहिलं तरी क्युरी दांपत्यानं आपल्या मूल्यांवरची निष्ठा ढळू दिली नाही. श्रीमंती आणि काबाडकष्ट हे टोकाचे पर्याय नजरेसमोर स्पष्ट असूनही, आपल्या शास्त्रीय शोधाचं ‘पेटंट’ या दोघांनी घेतलं नाही. एवढं मोठं मन आजच्या जगात कोणत्या शास्त्रज्ञाकडे असेल?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक समोसा दिन! … ५ सप्टेंबर ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जागतिक समोसा दिन! … ५ सप्टेंबर ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

समोसा – – – 

हा चटकदार पदार्थ दहाव्या शतकात इराण मधून भारतात आला आणि बघता बघता लोकप्रिय झाला!

याचा आकार त्रिकोणी असतो. बाहेरचे अवरण मैद्याचे असते आणि आतील सारण बटाटा, मटार, पनीर, कांदा, मिरची, कोथिंबीर, पुदिना, आले-लसूण, गरम मसाला, मीठ इ चे असते. मांसाहारी लोक चिकन, खीमा वगैरेही वापरतात. तेलात गुलाबी सोनेरी खरपूस तळलेले गरम गरम समोसे हिरवी चटणी, चिंच खजुराची आंबट -गोड चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केले जातात.

भारतातील विविध राज्यात विविध प्रकारची सामग्री उपयोजून नाना चवीचे चमचमीत समोसे केले जातात. हैदराबादमधे मका आणि कांदा याचे लहान आकाराचे समोसे मिळतात तर बंगाली ‘सिंघाड़ा’ त माश्याचे सारण भरतात. कर्नाटक, आंध्र, तमिलनाडु इथले समोसे काहीसे दाबून चपटे केले जातात. काही ठिकाणी ड्राईफूट्सचे समोसे मिळतात तर काही ठिकाणी शेव, फरसाण, बाकरवडी सारखे सारण भरलेले समोसे मिळतात. दिल्ली आणि पंजाबमधील लोकांना बटाटा, मटार आणि पनीर वापरून केलेले समोसे आवडतात.

समोसा- प्रांतपरत्वे पर्यायी नावे:

समोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिङाड़ा, सिंगड़ा, सिंघाडा, समूज़ा, इंग्लिश मधे रिसोल (Rissole) इत्यादि

समोसा कुठे कुठे लोकप्रिय आहे?

संपूर्ण भारतदेश, पाकिस्तान, भारतीय उपमहाद्वीप, मध्य आशिया, पश्चिम आशिया, उत्तर अफ्रीका, दक्षिण अफ़्रीका. आता अमेरिकन लोकांनाही आवडू लागलाय.

जगातील सर्वात विशाल समोसा २०१७ साली तयार केला गेला. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मधे केली गेली आहे. त्याचे वजन १५३ किलोग्राम (३३५ पौंड) होते, लंडनच्या एका मशिदीत एका चॅरिटी विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो केला गेला होता.

तर मंडळी, असा हा चटकदार समोसा!

या जागतिक समोसा दिनाच्या निमित्ताने घरी उत्साहाने समोसा करा, सहकुटुंब सहपरिवार एकत्र बसून त्याचा यथेच्छ आस्वाद घ्या. मित्रमंडळींना बोलवा, शेजाऱ्याला बोलवा आणि सुखाने समोसा दिन साजरा करा. शुभेच्छा.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंदोदरी – लेख क्र. १२ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मंदोदरी – लेख क्र. १२ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

तेजस्वी चेहरा, भव्य स्वरूप, कुशल नेतृत्व पाहूनच माझे पिता मय दानवांनी माझा विवाह दशाननांशी संपन्न केला. पहिल्याच दृष्टी भेटीत मी मंत्रमुग्ध झाले होते आणि आपल्याला लंकेसारखं सासर मिळालं म्हणून खूप आनंदी होते. कां नाही होणार? मय श्रेष्ठ शिल्पी होते. त्यामुळे शिल्पकलेत लंका साऱ्या जगात प्रसिद्ध होती. तसेच मय दानवांना विमान रचना करता येत होती. त्यामुळे दशाननां जवळ विमान होते. सुषेणासारखा मंत्री होता. जो युद्धात मुर्च्छा आल्यास उपचार करणारा होता. औषधी वनस्पतींचे त्याला गुणधर्म माहीत होते व त्या मिळवण्याची ठिकाणे माहीत होती. श्रेष्ठ वृक्षायुर्वेद शास्त्री दरबारात होते. उत्तम रस्ते होते. नद्यांचे पाणी अडवून त्याचे व्यवस्थापन केले जात होते. नद्यांवर पूल बांधले होते. अशोक वाटिका नावाचे विशाल व सुंदर उद्यान होते. तशीच इतरही ठिकाणी उद्याने होती. अशी संपन्न लंका होती. त्याशिवाय वेद, पुराण, नीती, दर्शनशास्त्र, इंद्रजाल यात पारंगत, बुद्धिमान पती मला मिळाला होता. त्यांनी तर ब्रह्मदेव, महादेव यांच्याकडून निरनिराळ्या शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या. त्यांना तंत्रविद्याही माहीत होती. तुम्हाला माहित आहे? तांडव नृत्य हे देव क्रोधात असताना क्रोध शमविण्यासाठी करतात. पण दशाननांनी लिहिलेले स्तोत्र ऐकून महादेव म्हणाले आज पहिल्यांदा मी खूप आनंदी झालो आणि तांडव नृत्य केले. (म्हणूनच त्या स्तोत्राला शिवतांडव स्तोत्र म्हणतात) 

त्यांना खूप दुष्ट तरी कशी म्हणू? त्यांनीच लक्ष्मणाला नीतिशास्त्राचे धडे दिले. युद्धात लक्ष्मणाला मूर्च्छा आली तेव्हा सुषेणाला बोलावून घेऊन त्याच्यावर उपचार करवले. मला समजतच नाही जो माणूस घोर तपश्चर्या करून देवांना प्रसन्न करू शकतो, जो माणूस महादेवांची पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेत नाही. त्याला इतकी श्रद्धा इतकी भक्ती केल्यानंतर थोडा संयम, थोडी सत्यप्रियता, थोडा विवेक यायला हवा ना? क्रूरपणा, अहंकार थोडा कमी व्हायला हवा होता ना? एकाच शरीरात, नव्हे एकाच मनात दोन वेगवेगळ्या व्यक्ती कशा असू शकतात? एक देव आणि एक दानव! एक पित्याचा वारसा व दुसरा मातेचा वारसा! खरं म्हणजे पुलस्त्य ऋषींसारखे पितामह, विश्रवा‌ ऋषींसारखे पिता असा समृद्ध वारसा वरचढ ठरला असता व कैकसी मातेचा दानव वारसा दबला गेला असता तर जन्माने सुर होतेच व आपल्या बुद्धिमत्तेच्या, शौर्याच्या, कुशलतेच्या जोरावर त्रैलोक्याचा राजा झाले असते. पण आपल्या कर्माने असुरात गणले जाऊ लागले.

माझ्या बाबतीत उलटं होतं. माता अप्सरा हेमा होती तर पिता दैत्य कुळातील मयासुर, म्हणजेच मयदानव पण माझ्यात सौंदर्य, विद्वत्ता, विवेक, संयम, धर्मनिष्ठा, धैर्य, उदात्त विचार जन्मतःच होते. माझी माझ्या पतीवर खूप निष्ठा होती. मला प्रजेची काळजी होती. राज्यकारभारात मी कुशल होते. चांगल्या वाईटाची जाण होती. त्यामुळे एक पत्नीच नव्हे तर त्यांची कुशल सल्लागार होते. कर्तव्यनिष्ठ राणी होते. धर्म परायण स्त्री होते. मीच माझे कौतुक करते आहे असे नव्हे. सारेच म्हणायचे सौंदर्य असून शीलवती, शक्ती असून नम्रता असणारी व संकटे आली तरी संयम. विवेक व धर्म न सोडणारी राणी! पण म्हणतात नां विनासायास मिळालेल्या गोष्टींची कदर राहत नाही. तसं झालं होतं. त्यांच्या प्रत्येक चुकीच्या वर्तनाला मी नेहमीच विरोध केला होता. समजावून सांगत होते. पण अधर्मी वृत्ती भिनली की एरवी प्रजेच्या कल्याणाची सर्व कामे माझ्या सल्ल्याने करणारे इथे मात्र माझी एकही गोष्ट ऐकत नव्हते. सीता माऊलीचे अपहरण ही काय अपहरणाची पहिलीच गोष्ट नव्हती. अनेक युद्धे केली. अनेक राजांना अपमानित केले. त्यांच्या स्त्रिया, बहिणींना उचलून आणून आपल्या कैदेत ठेवले. अनेकांचे त्यामुळे शाप मिळाले. वास्तविक मी सीतामातेपेक्षा सुंदर होते. सीतामातेमध्ये असणारे दैवी गुण सोडले तर माझ्यातही पुष्कळ चांगले गुण होते. तरी यांना सीता मातेचा मोह का व्हावा?

पुरुषाचा अहंकार, जे जे काही सुंदर असेल, ज्या ज्या गोष्टी हव्या असतील त्या सर्व मिळवण्याचा अट्टाहास, सत्तेचा हव्यास यामध्ये माझ्यासारख्या किती स्त्रिया होरपळत असतील कोण जाणे! खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये या गोष्टी असाव्यात. कारण याच गोष्टी त्याला प्रगतीपथावर नेतात, पण सर्व गोष्टी मिळवण्यासाठी राजमार्ग असतो. त्याने जावं. हीन पातळी गाठून मिळवू पहाल तर त्याला महत्वकांक्षा म्हणत नाहीत, हव्यास, मुजोरी म्हणतात. सत्याने, धर्माने, न्यायाने जे मिळते तेच फक्त आपले असते आणि आपल्याजवळ कायम राहते. स्वतःचा विनाश स्वतःच्या हाताने करून दशाननांनी काय मिळवलं? स्वतःचं आयुष्य गमावलं, मुलांनी तर अजून आयुष्य अनुभवलच नव्हतं, त्यांना पणाला लावलं. आणि सगळे मला एकटीला सोडून गेले.

जेव्हा दशानन धारातीर्थी पडले त्यावेळी माझा राग अनावर झाला आणि मी अखेर त्यांना म्हटलं, “अनेक यज्ञांचा विध्वंस केलात, धर्म व्यवस्थेची छकले केलीत, देव, दानव, मनुष्य यांच्या मुलींचे अपहरण केलेत. या सर्व पापांमुळे आज तुमची ही अवस्था झाली आहे. ” माझा विलाप बघून, पती बरोबर अग्निप्रवेश करण्याची माझी इच्छा बघून श्रीराम तेथे आले. त्यांनी मला श्रीलंकेचा राजा विभीषण होतो आहे याची कल्पना दिली. मी श्रीलंकेच्या प्रजेची काळजी घ्यावी आणि लंकेला तिचं वैभव पुन्हा परत मिळवून द्यावं. यासाठी मी विभिषणाचा पती म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. माझ्या मनातील शंका कुशंका पाहून त्यांनी सांगितले की विभिषण हे त्यांच्या पित्याप्रमाणे विद्वान, ऋषीतुल्य आहेत. या विवाहामुळे तुझ्या पातिव्रत्यात कोणतीही बाधा येणार नाही आणि एक आदर्श पतिव्रता म्हणून तू साऱ्या जगात आदरणीय राहशील. त्यामुळे नंतर माझी प्रजा हेच माझे अपत्य आणि त्याची काळजी, त्यांचा विकास हेच माझे ध्येय झाले.

आज आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट जाणवते, शक्ती, सामर्थ्य, सौंदर्य याला काही मोल नाही जर विवेक, धर्माचा आधार नसेल तर! दशाननांची पत्नी म्हणून पतीबद्दल प्रेम, निष्ठा होती पण स्त्री म्हणून कायम मी धर्माची बाजू घेतली, सत्याची बाजू घेतली. माझे जीवन दुःखाने भरलेले होते पण माझे चारित्र्य हेच माझे वैभव होते.

– लेख क्र. १२.

☆

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।। 

आत्मरत्यविरोधेनेति शांडिल्यः ॥ १८ ॥

अर्थ : आत्मस्वरूपाविषयी प्रेमभाव निर्माण होऊन त्याला विरोध न होता उलट त्याचे पोषणच होऊन उत्तरोत्तर प्रेम वाढणे हेच भक्तीचे मुख्य लक्षण आहे असे शांडिल्य ऋषी सांगतात.

विवेचन : महर्षी व्यास व गर्ग यांनी केलेले भक्तिलक्षण सांगून श्रीनारद आता शांडिल्याचे भक्तिलक्षण सांगतात. शांडिल्य ऋषी महान आहेत. त्यांनी लिहिलेली भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनी प्रत्येक तत्त्ववेत्त्याची मते विचारात घेतात आणि त्यांचा उचित सन्मान करतात असे आपल्या लक्षात येईल.

सामान्य मनुष्य हा सामान्यपणे आपल्या देहाला खरे मानत असतो. देहाचे सुख आणि देहाचे दुःख त्याला खरे वाटते. त्यामुळे तो देहाच्या सुखदुःखात गुरफटलेला असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शांडिल्य ऋषी सांगतात की देहाला सत्य न मानता, देहाच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्याला खरे मानून (अर्थात तोच सत्य आहे) त्याच्यावर प्रेम करावे, त्याच्या ठिकाणी रत व्हावे असे सांगतात.

आत्मा निर्गुण आहे, तो आपल्याला दिसत नाही त्यामुळे तो आहे असे गृहीत धरूनच त्यावर प्रेम करावे लागते. पण सामान्य मनुष्य तसे करू शकतोच असे नाही. सामान्य मनुष्याला दृष्ट्यातले प्रतीक लागते.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान ।

गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥

लागला उशीर पतितपावना ।

विसरोनि वचना गेलासि या ॥२॥

जाळोनि संसार बैसलों अंगणीं ।

तुझे नाहीं मनीं मानसीं हें ॥३॥

तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला ।

उठीं देई मला भेटी आतां ॥४॥

(संदर्भ: अभंग २४८, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

तुकाराम महाराजांसारखे संत या गोष्टी स्वतःसाठी लिहित नसावेत, तर ते आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांसाठी लिहिलेले असावे.

एक कथा पाहू. एकदा जनक राजा आपल्या महालात झोपले होते. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नांत त्यांनी एक युद्ध केले. त्यात त्यांची हार झाली. शत्रू राजाने त्यांना पकडले आणि आता त्याचा शीरच्छेद करणार अशी वेळ आली. कधीही युद्ध न हरलेल्या जनक राजाला ते फार मानहानीकारक वाटले, त्याला भीती वाटली, दरदरून घाम फुटला…. तितक्यात काहीतरी आवाज आला आणि त्यांचे स्वप्न भंगल….

जाग आल्यावर पाहतात तर ते शयन गृहात होते…..

त्यांना प्रश्न पडला की स्वप्न खरे की मी मंचकावर शयन करीत आहे ते खरे?

दुसऱ्या दिवशी त्यांनी राजसभेत प्रश्न विचारला

अनेक विद्वान तिथे होते, त्यांनी आपापल्या परीनं उत्तरे दिली. पण राजाचे समाधान होईना 

शेवटी तिथे अष्टावक्र ऋषी आले. ते म्हणाले की राजा तू मंचकावर झोपला होतास ते सुद्धा खरे नाही आणि स्वप्नांत युद्ध हरला ते सुद्धा खरे नाही

राजा म्हणाला, मग नक्की खरे काय आहे?

अष्टावक्र मुनी म्हणाले की या दोन्ही घटना घडत असताना त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहणारा जो तू (मी….! ) आहेस, तोच खरा आहे…….!

जो आपल्या प्रत्येक गोष्टीला साक्षीत्वाने पाहत असतो. तोच आत्मा आहे. त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्या ठिकाणी रत होणे म्हणजे भक्ति असे शांडिल्य मुनी आपल्याला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १८

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शौर्याचा मार्ग प्रदीप्त करणारा सैन्याधिकारी! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ शौर्याचा मार्ग प्रदीप्त करणारा सैन्याधिकारी! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

त्या दोघांना ठोकताना अर्थात रायफलमधून अचूक गोळीबार करून ठार मारताना त्यांच्यातला तिसरा पाठीमागून कधी आला आणि त्याने कधी मरणमिठी मारली हे समजायला मेजरसाहेबांना काही क्षण लागलेच.. साक्षात यमदूत पाठीवर वर होता…. पाठीमागून कमरेला मिठी मारलेल्याला पाठीमागून पुढे आपटायला वेळ नाही लागला… पण त्याने मिठी सैल केली नाही… मग दोघेही जमिनीवर लोळण घेत पुढे गडगडले… दोघांमध्ये अंतर असे नव्हतेच… तो झटक्यात उठला आणि त्याने त्याच्या हातातील एके-४७चा ट्रिगर दाबण्यात बाजी मारली… जो आधी वार करेल तो जिंकतो हातघाईच्या लधाईत… साहेबांच्या पोटात, मांडीत कित्येक गोळ्या तातडीने घुसल्या आणि त्यांनी आपले काम बजवायला प्रारंभही केला… रक्ताची धार शरीराबाहेर धावू लागली… शरीरात लालबुंद तापवलेल्या शिगा खुपसल्या जाताहेत असे वाटले… पण दुस-याच क्षणी साहेबांच्याही रायफलीतून गोळ्यांचा फवारा उडाला… अचूक. तिसरा त्या दोघांच्या पावलांवर पावले टाकीत निघून गेला.. त्याच्या ‘आखरी अंजाम’ कडे… पाकिस्तानातून भारतात ते पाच लांडगे घुसले होते ते इथे रक्तपात घडवून आणायाला… पण मेजर साहेब त्यांच्यापुढे एखाद्या पहाडासारखे उभे ठाकले… आणि त्यांनी आणि त्यांच्या शूर सैनिकांनी या पाचही जणांना ठोकले!!

या आधी त्या सर्वांना मेजर साहेबांनी शरण येण्याचे आवाहन केले होते. ते एका झोपडीत लपून बसल्याची पक्की खबर साहेबांना मिळाली होती. त्यावेळी साहेब त्यांच्या युनिटचे ऑफिसीएटींग कमांडींग ऑफिसर होते, म्हणजे वरिष्ठ अधिका-यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या युनिटचे नेतृत्व मेजर साहेबांच्या हाती होते. सेनेत कुणासाठी कोणतेही काम थांबून रहात नाही.

त्या अतिरेक्यांच्या मेंदूत शरण जाण्याची भाषा पोहोचली नसावी… त्यांपैकी दोघे झोपडीच्या दुस-या बाजूने तिथून निसटून जाण्याच्या तयारीत असतानाच साहेबांनी त्यांना पाहिले… आणि मग क्षमा करण्यात काही अर्थ नव्हता… साहेबांनी दोघे अचूक टिपले!

तिस-या अतिरेक्याच्या गोळ्यांच्या वर्षावात पुरते जायबंदी झालेले मेजर साहेब खरे तर तिथून मागे फिरून औषधोपचारासाठी जाऊ शकले असते… पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. ऑपरेशन अर्थात मोहीम अर्धवट सोडून जर नेताच मागे फिरला असता, तर सोबतच्या सैनिकांना मार्गदर्शन कुणी केले असते.. आणि भारतीय सेनेची अशी परंपराही नाहीच! आणखी दोन अतिरेकी शिल्लक होते.. आणि ते अंदाधुंद गोळीबार करीत होते. आपले सहकारी सैनिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होणार नाही अशा पद्धतीने मेजर साहेबांनी पुन्हा व्यूहरचना केली… आणि काही मिनिटांनी दोन्ही बाजूंचा गोळीबार एकदाचा थांबला… उर्वरीत दोन्ही अतिरेकी ठार मारले गेले होते… मोहीम फत्ते झाली… गड आला… पण सिंह कायमचा निघून गेला…. हाती ढाल नसताना केवळ शेला गुंडाळून लढता लढता उदयभानला कापताना तानाजीराव हे जग सोडून गेले होते! कोंडाण्यावरची सरदार तानाजीराव मालुसरे यांची आठवण यावी अशी ही घटना… हा दिवस होता १७ जून, २००० आणि ठिकाण होते जम्मूमधील पूंच क्षेत्रातील शाहपूर हे गाव!

हे परमेश्वरा! तुझ्या आणि मातृभूमीच्या सेवेत रत असताना सैन्यदलांचा सन्मान आमच्याद्वारे अबाधित राखला जाऊ शकेल इतपत आम्ही आम्हांला शारीरिकदृष्ट्या सशक्त, मानसिकदृष्ट्या सजग आणि चारित्र्याने निष्कलंक ठेवावे यासाठी साहाय्यभूत हो!

बाह्य आक्रमण आणि देशांतर्गत अराजक यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी आम्हांस बळ प्रदान कर. प्रामाणिक व्यवहार आणि निर्मळ विचाराप्रती आमच्या मनांत आदरभाव निर्माण होऊ दे आणि आमच्याकडून सुलभ परंतु अयोग्य आणि दुष्कर परंतु योग्य यांमधील योग्य गोष्ट निवडली जावी, यासाठी आम्हांस मार्गदर्शन कर. आमच्या सैनिकी-साथीदारांबद्दल आमच्या हृदयांत बंधुत्व भावना आणि ज्यांचे आम्ही नेतृत्व करणार आहोत त्यांच्याविषयी एकनिष्ठतेची भावना जागव. सत्य आणि न्याय्य गोष्टी संकटात असताना, उदात्ततेविषयीच्या प्रेमातून उत्पन्न होणा-या, तडजोड न जाणणा-या, माघार न घेणा-या धैर्याची आम्हांस देणगी दे!

तुझी, या देशाची, ज्यांचे आम्ही नेतृत्व करणार आहोत त्यांची सेवा घडवतील अशा नवनवीन संधी आम्हांस उपलब्ध करून दे… आणि अशी सेवा आम्हांसाठी सर्वोपरी असावी यासाठी साहाय्य कर!

वर्ष होते १९८०. पुण्याजवळच्या खडकवासला येथे स्थित आणि सेवा परमो धर्म: हे ब्रीदवाक्य असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रशिक्षणार्थी छात्र नेहमीप्रमाणे ही प्रार्थना म्हणत होते. या प्रशिक्षणार्थी तरुणांमध्ये प्रथम वर्षात असलेला एक मराठी तरुणही होता.

१६ जानेवारी १९५५ रोजी एन. डी. ए. चे औपचारिक उद्घाटन झाले. या अतिशय महत्वपूर्ण अशा संरक्षण प्रशिक्षण संस्थेत आरंभी महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण विविध कारणांनी इतर राज्यांच्या तुलनेने अल्प होते. महाराष्ट्रात एन. डी. ए. आहे, पण एन. डी. ए. मध्ये महाराष्ट्र अभावानेच दिसतो, अशा आशयाचे एक वक्तव्य देशाचे अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केले होते आणि ते खूप गाजलेही होते.

हे प्रमाण वाढावे यासाठी मुलांना विद्यार्थी-दशेपासूनच सैनिकी प्रशिक्षण गरजेचे होते. त्यासाठीच २३ जून, १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साता-यात सुरु झाली. या शाळेने कित्येक शूर, तडफदार अधिकारी भारतीय सैन्यास दिले.

यशवंतराव चव्हाण यांना देवाज्ञा झाली ते वर्ष होते १९८३. आणि याच वर्षी वर उल्लेखिलेल्या मराठी तरुणाने एन. डी. ए. प्रशिक्षण पूर्ण केले, हा एक योगायोगच म्हणावा! एन. डी. ए. च्या तोपर्यंतच्या इतिहासात एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवणा-या काही मोजक्या मराठी तरुणांच्या यादीत असलेल्या या बहाद्दराचे नाव होते… प्रदीप रामचंद्रराव ताथवडे!

प्रदीप या नावाचा अर्थच ‘प्रकाशाचा स्रोत’ असा आहे. Central Excise खात्यात सेवारत असलेल्या रामचंद्रराव ताथवडे आणि सुगृहिणी असलेल्या कुसुमताई ताथवडे यांना दोन मुलगे आणि एक मुलगी. या तीन अपत्यांपैकी प्रदीपजी हे मधवे… जन्म २१ सप्टेंबर, १९६३. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ या ग्रामीण भागात जन्मलेले प्रदीपजी इयत्ता पाचवीपासून सातारा सैनिकी शाळेचे विद्यार्थी बनले. या शाळेने २०२३ पर्यंतच्या नोंदीनुसार एक जनरल, लेफ्ट. जनरल आणि समकक्ष पद प्राप्त केलेले अकरा, मेजर जनरल आणि समकक्ष पद प्राप्त केलेले पंधरा, ब्रिगेडीअर आणि समकक्ष पद प्राप्त केलेले चाळीस इतके सैन्याधिकारी भारतीय सेनेस दिलेले आहेत! आणि उत्कृष्ट सेवेसाठी विविध सन्मान मिळवलेले अधिकारीसुद्धा अगणित आहेत. मेडल्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर दिसतात ते मेजर प्रदीप ताथवडे साहेब… कीर्ती चक्र (मरणोत्तर).. देश वीर सैनिकांना प्रदान करीत असलेले चौथ्या क्रमांकाचा सन्मान! तत्कालीन राष्ट्रपती महोदय श्री. कोचेरील रमण अर्थात के. आर. नारायणन यांच्या हस्ते मेजर साहेबांच्या वीरपत्नी लीनता ताई यांनी कीर्ती चक्र स्वीकारले!

प्रदीपजी अभ्यासात, खेळांत अत्यंत वाकबगार होते. त्यांच्या मातोश्रींचे वडील कोंडाजीराव घनवट यांनी पहिल्या महायुद्धात कामगिरी बजावली होती, तर मामा लेफ्टनंट मार्तंडराव घनवट हे दुस-या महायुद्धात लढाईवर जाऊन आले होते… आणि दुसरे मामा कॅप्टन शिवाजीराव घनवट (निवृत्त) यांनी १९७१च्या भारत-पाक युद्धात मर्दुमकी गाजवली होती! बाल प्रदीप यांनी त्यांच्या या फौजी नातलगांकडून आजोळी अशा अनेक शौर्य कथा ऐकल्या असतील… त्यांच्या मनात आपणही असेच शौर्य गाजवावे, हा विचार न येता तरच नवल!

सातारा सैनिकी शाळेत सैनिकी संस्कार प्राप्त केलेले प्रदीपजी १९८० मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवते झाले. मुष्टियुद्ध, Water Polo, जलतरण इत्यादी खेळांत प्राविण्य दाखवत, तीन वर्षांचा अत्यंत खडतर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून कडेट प्रदीप रामचंद्रराव ताथवडे लष्करी अधिकारी बनले.

१९८४ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी, देहरादून येथे त्यांचे एक वर्षाचे प्रगत प्रशिक्षण झाले आणि जून १९८४ मध्ये प्रदीपजी 8, जम्मू and काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये सेकंड लेफ्टनंट पदी रुजू झाले. पुढील वर्षी बेळगावच्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी कमांडो कोर्स पूर्ण केला आणि १८ जून १९८६ मध्ये साहेब कॅप्टन झाले! प्रदीप साहेबांना हवाई दलाचे विशेष आकर्षण होते. त्यांची ही इच्छा सुदैवाने लवकरच पूर्ण झाली… सियाचीन मधील अत्यंत खडतर युद्धभूमीवर त्यांची नेमणूक झाली आणि आर्मी एविएशन विंग मध्ये ते निवडले गेले… लष्करी Helicopters ते लीलया उडवू लागले… त्यांच्या गणवेशावर पंख लागले!

१७ जून २००० पर्यंत साहेबांनी तब्बल सोळा वर्षांची सैनिकी सेवा प्रभावीरीत्या बजावलेली होती. अगदी एकच वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर १९९९ मध्ये त्यांनी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या पाच अतिरेक्यांना वरचा मार्ग दाखवला होता. त्याआधी १९८७ मध्ये मेजर वरिंदर सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन राजीव मध्येही ताथवडे साहेबांचा सहभाग होता.. सेकंड लेफ्टनंट राजीव पांडे साहेबांच्या सन्मानार्थ या मोहिमेला ‘राजीव’ हे नाव दिले गेले होते. या प्रसिद्ध मोहिमेत पाकिस्तानच्या निर्मात्याच्या नावाने असलेले कायद ठाणे भारतीय सैनिकांनी जिंकून घेतले होते आणि त्या कामगिरीत अतुलनीय कामगिरी बजावलेल्या बाणा सिंग यांचे नाव त्या ठाण्याला दिले गेले! सियाचीन मधील वास्तव्याच्या काळात ताथवडे साहेबांनी घरच्यांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश ‘अमर योद्धा’ या पुस्तकात केला गेला आहे. सातारा सैनिक शाळेच्या माजी विद्यार्थी मित्रांनी मेजर साहेबांच्या जीवनावर बनवलेला एक लघुपट लवकरच प्रकाशित होईल, असे समजते.

त्या दिवशी मेजर साहेबांचे सहकारी मेजर सीयान ओब्रायन साहेबांनी ताथवडे साहेबांचा देह पुण्यापर्यंत पोहोचवला होता. त्यांनी साहेबांची कामगिरी त्यावेळी विशद करून सांगितली होती.

पुणे महानगरपालिकेने मेजर साहेबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मेजर प्रदीप ताथवडे उद्यानाची २००२ मध्ये निर्मिती केली. या उद्यानात मेजर साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून दरवर्षी १७ जून रोजी साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या उद्यानात येत असतात. मी गेली कित्येक वर्षे ताथवडे उद्यानासमोरून जाताना त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतो. मात्र दुर्दैवाने मलाही मेजर साहेबांची इतकी सखोल माहिती नव्हती. या लेखाच्या निमित्ताने मला या महान हुतात्मा सैनिकाचे जीवन थोडेसे माहित झाले. अनेक उल्लेख राहून गेले आहेत, क्षमस्व!

मेजर प्रदीप रामचंद्रराव ताथवडे साहेबांसारख्या शूर, वीर सैन्याधिकाऱ्यांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी हा सदर दीर्घ लेख लिहिण्यामागचा उद्देश आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मंत्रपुष्पांजली.. इतिहास आणि आशय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मंत्रपुष्पांजली.. इतिहास आणि आशय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे, म्हणून एक दिवस प्रजेने त्या राजाला राजपदावरून बेदखल केलं.

राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.

खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा आविक्षित याला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे आविक्षिताला वारंवार आक्रमणांच्या संकटांना तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने उत्तम राज्य केले. आविक्षित हा प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.

“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित 

“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त

हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.

भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय? त्यानी प्रजेसाठी अनेक अडचणींना तोंड देत एक मोठ्ठा यज्ञ केला.

यज्ञ म्हणजे समाजातील अनेकांच्या भल्यासाठी केलेला प्रकल्पच.

यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक संघ तयार होतो. या संघातील सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार, तज्ञ, कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या संघाच्या प्रमुखाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे, डोंगरावर झाडी लावणे, जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे, शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि साठी अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.

यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.

तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी(इंद्र आदि देवांनी) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी मदत द्यायचं मान्य केलं.

समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळू हळू मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून, त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ उत्तमप्रकारे यशस्वी केला.

यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” – अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.

अशाप्रकारे “ यज्ञेन…. ” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार केवळ श्रद्धा नसून आपली परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता (कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.

असा हा मंत्र पुष्पांजलीचा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा समाज, देश आणि विश्व सुखी आणि आनंदी बनवण्याचा परंपराप्राप्तमार्ग वारंवार आपल्या सर्वांच्या मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्रपुष्पांजली आहे.

मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात. मंत्रपुष्पांजलि शिवाय पूजेची सांगता होत नाही. स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करण्यासाठी असा हा मंत्र खाली दिलाय.

प्रथम:

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।

ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||

*
द्वितीय:

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।

स मे कामान् काम कामाय मह्यं।

कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।

*

तृतीय:

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।

समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।

पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

*
चतुर्थ:

ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।

मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

*
॥ मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि ॥

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘नर-नारायण…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘नर-नारायण…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

कुष्ठरोग्यांची सेवा आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेणारे व्रतस्थ समाजसेवी स्वर्गीय बाबा आमटे (जन्मः २६ डिसे. १९१४, मृत्यूः ९ फेब्रु २००८) सर्वांना माहित आहेत. त्यांचे कार्य महान आहेच पण त्यांच्या आधी पुण्याच्या अवतार मेहेरबाबा (जन्म: २५ फ्रेबु १८९४, मृत्यूः ३१ जाने १९६९) या पारसी सत्पुरुषाने कुष्ठरोगी, महारोगी, मनोरुग्ण, वेड्या लोकांची सेवा करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता.

मेहेरबाबाबा आपल्या शिष्यांसह ज्या गावी जात तिथे, समाजाने उकिरड्यावर टाकून दिलेल्या महारोग्यांना आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या वेडयांना उचलून घरी आणत. स्वतः कुष्ठरोग्यांचे व्रण काळजीपूर्वक धुवून स्वच्छ करत. त्यावर मलमपट्टी करत. मनोरुग्णांच्या हातापायाची वाढलेली नखे, अस्ताव्यस्त वाढलेले, उवा पडलेले डोईचे आणि दाढीचे केस कापत. त्यांना स्नान घालून, उत्तम नवी वस्त्रे नेसवून, मिष्टान्नाचे भोजन स्वहस्ते भरवीत. वर दक्षिणा देऊन त्यांची यथासांग पूजा करीत. त्यांच्या चरणावर मस्तक टेकवून, नमस्कार करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत. बाबा म्हणत, ‘ हा खरा नारायण आहे ‘. मनोरुग्णांना, वेड्यांना ते ‘मस्त’ म्हणत.

जगविख्यात आणि भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी ‘टाटा मोटर्स’चे चेअरमन, पद्मभूषण स्वर्गीय सुमंत मुळगांवकर (जन्म: ५ मार्च १९०६, मृत्यू : १ जुलै १९८९) यांना ऑटोमोबाईल क्षेत्रातले महर्षी म्हणता येईल. सारं जग त्यांना उद्योजक व ऑटोमोबाईल मॅन म्हणून ओळखत असलं तरी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पद्मश्री स्वर्गीय लीलाताई मुळगावकर (जन्म: १० ऑक्टो १९१६, मृत्यू: २० मे १९९२) यांनी रक्त संकलन, रक्त पेढ्या, दिव्यांग व्यक्तींचे, अंधांचे, महारोग्यांच्या सेवेचे, त्यांच्या पुनर्वसनाचे महान कार्य जन्मभर केले हे फार कमी लोकांना माहित असावे.

दृष्टीहीन, लेप्रसी ग्रस्त, पोलिओ झालेले, युद्धात अवयव गमावलेले सैनिक असे काही दिव्यांग कर्मचारी आमच्या टाटा मोटर्स, पुणे कंपनीच्या सेवेत होते. लेप्रसीमुळे बोटे झडलेले पण आता रोगमुक्त झालेले कर्मचारी चेअरमन आणि त्यांच्या बरोबर आलेल्या पाहुण्यांना आवर्जून चहा-पाणी देत. अशा कामी त्यांची नियुक्ती जाणीवपूर्वक केली जाई. त्यांतून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न असे की लेप्रसी बरी होऊ शकते. तो संसर्गजन्य रोग नाही. रोगमुक्त व्यक्तीची घृणा न करता त्यांच्याशी सर्वसामान्य व्यवहार निर्धोकपणे करता येतात, नव्हे करावेत.

कंपनीतील सोफे व खुर्च्यांचे केनिंग करणे अशी कामे अंधांकडून करवून घेतली जात. इंजि. ड्राईंग्जच्या घड्या घालणे, बुक व रेकॉर्डस् बाईंडिंग, इलेक्ट्रॉनिक कांपोनन्टस् जोडून छोट्या असेम्ब्लीज करणे, क्वालिटी कंटोल, कार्यालयांतर्गत पत्रांचे संकलन व वितरण इ. कामे रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांकडून करवून घेतली जात. हे लोक सामान्य कर्मचाऱ्याच्या बरोबरीने, गुणवत्तेने करीत असत.

सामाजिक दायित्व म्हणून कंपनी काही विशिष्ठ कामाचे ठेके ब्लाईंड मेन असोशिएशन, लेप्रसी पेशंट असोशिएशन, सैनिकांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्था अशा संस्थाना आवर्जून देत असे. त्यामळे ही अंध मंडळी, लेप्रसीतून बरे झालेले रुग्ण, अपंगत्व आलेले सैनिक कंपनीत इतर सामान्य कर्मचाऱ्यासारखेच वावरत, काम करत, उठत, बसत, जेवत, कंपनीच्या बसमधून ये-जा करीत. समाज विकास हा टाटांच्या औद्योगिक धोरणाचा महत्वाचा अविभाज्य भाग आहे.

मी भाग्यवान की अशा उदात्त जीवनमूल्ये व व्यावसायिक मूल्ये असणाऱ्या औद्योगित परिवारात मी जन्मलो, शिकलो, वावरलो, वाढलो, मोठा झालो!

‘ जे जे भेटेल भूत ते ते मानी भगवंत ‘ ही शिकवण आम्हाला आमच्या महान भारतीय संस्कृतीनं आणि आमच्या संतांनी दिली आहे. त्यानुसार नरातही नारायण पाहणाऱ्या स्वर्गीय सर्वश्री अवतार मेहेरबाबा, बाबा आमटे, सुमंत मुळगांवकर, लीलाताई मुळगांवकर यांच्या सेवाकार्याचे स्मरण करुन या महानुभावांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “कृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितके नाव कठीण तितका समजायला कठीण.

…. पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर कृष्ण समजून घ्यावा.

दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण…. सातवा अवतार प्रभू राम

राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचे वागणे ही सरळ मर्यादेत म्हणून मर्यादा पुरुषोत्तम.

रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही. तरीही काही जणांनी रामात दोष शोधले त्याच्यावर टीका केली. मग पुढच्या अवतारात प्रभूने सर्व मर्यादा ओलांडल्या करा काय करायचे ते.

जीवनात आचरण रामासारखे असावे अन समजून कृष्ण घ्यावा. कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये.

कृष्ण म्हणजे श्रीमद भगवद्गीता जीवनाचे सार

प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला.

जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावे लागले.

गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला. म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णा सोबत होती, कृष्ण ८ वर्षाचा होईपर्यंत… जे राधा आणि कृष्ण विषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा ८ वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी.

इतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचे नाव कृष्णाशी कायमचे जोडले गेले. किंबहुना तिचे प्रेम इतके नितळ निस्सीम निर्मळ होते की नाव कायमचे कृष्णाच्या आधी लागले.

कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,

जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम.

…… असे हे राधा आणि कृष्णाचे प्रेम किंबहुना प्रेमाचे दुसरे नाव म्हणजेच राधा व कृष्ण.

कृष्णाला १६१०८ बायका त्यांचाही इतिहास….

ज्यांना त्याने मुक्त केले त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला. अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता.

आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे. अरे त्याने आग लागलेली ५० गावे गिळून टाकली होती… तू एखादा जळता कोळसा गिळून दाखव की आधी, मग कृष्णाची बरोबरी कर.

आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा.

त्या साठी गीता समजून घेणे महत्वाचे. गीते मध्ये काय नाही? तर गीतेत सर्व आहे.

जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितले.

यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजते. अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात ५ वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचे शिक्षण घेतले.

या देहासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो ५ वर्षे तिथे राहिला. म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजते.

त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेल मोह माया याचे पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली.

गीता समजण्या साठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे ९ अध्याय सांगून पाहिले.

त्याची तयारी करून घेतली. मग पुढे खरा गूढार्थ सांगितला. विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली. त्याची तयारी करून घेतली. मग त्याला दाखवले की सर्व काही करणारा मीच आहे. तू फक्त निमित्तमात्र आहेस.

….. असा हा कृष्ण. त्याच्या विषयी किती सांगावे अन किती नको. तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो जास्त आवडतो.

त्याला जितके समजून घेऊ तितके कमीच.

त्याचे तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचे सार. ते समजून घेतले की जीवन समजले. जीवन सफल झाले. मनुष्य जीवनमुक्त झाला.

अशा या कृष्णाला वंदन.

श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,

हे नाथ नारायण वासुदेव,

प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,

मुकुंद विष्णू भगवन नमस्ते!!

जय श्री राधे कृष्णा.

श्री कृष्णाला समजून घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना.

कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार. तितक्यात, श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला. व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.

नंतर सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा युध्द विराम होत असे. तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.

जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला,

“आधी तू रथाच्या खाली उतर. ” त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.

त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतर च स्वतः रथाच्या खाली उतरला.

दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.

जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते.

तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतल्या रथ आपोआप कसा काय पेटला “अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? “

तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की,

“युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत.

ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली.. तेव्हा, ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस. “

त्याच प्रमाणे मानवी देह आहे.

जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण आनंद सुख ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते.

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares